Home Blog Page 85

दिवाळी प्रदूषणामुळे दिल्लीतील 42% लोकांना घशात खवखव:25% लोकांना डोळ्यांची जळजळ

तज्ज्ञांनी सांगितले -वेळीच सावध व्हा अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होईल, काळजी घ्या

दिल्ली-दिवाळीच्या रात्रीपासून दिल्ली-एनसीआरमधील हवा विषारी राहिली आहे. बहुतेक भागात हवेचा दर्जा निर्देशांक (AQI) १००० पेक्षा जास्त होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना न जुमानता, लोकांनी मोठ्या प्रमाणात फटाके जाळले. परिणामी, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी अनेक भागात AQI ४०० पेक्षा जास्त झाला.पंजाब आणि हरियाणामध्ये या वर्षी पऱ्हाटी जाळण्याच्या घटनांमध्ये ७७.५% घट झाली असली तरी, दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झालेली नाही. WHO च्या मते, PM २.५ ची पातळी प्रति घनमीटर १५ मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त नसावी, परंतु दिल्लीत ही पातळी मानकापेक्षा जवळजवळ २४ पट जास्त होती.

लोकलसर्कलच्या सर्वेक्षणानुसार, दिल्ली-एनसीआरमधील २५% कुटुंबांमध्ये डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी किंवा निद्रानाशाचा त्रास आहे. प्रत्येक चार कुटुंबांपैकी तीन कुटुंबांमध्ये कोणीतरी वैद्यकीय आजाराने ग्रस्त आहे.४२% घरांमध्ये, कोणीतरी घसा खवखवणे किंवा खोकल्याची तक्रार करतो. दिल्ली-एनसीआरमधील ४४,००० हून अधिक लोकांनी सर्वेक्षणात भाग घेतला. त्यापैकी ६१% पुरुष आणि ३९% महिला होत्या.

फरार PSI गोपाळ बदने पोलिसांना शरण; महिला डॉक्टरवर 4 वेळा बलात्कार केल्याचा आरोप

फलटण- उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी फरार झालेला पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने शनिवारी रात्री उशिरा शरण आला. तत्पूर्वी दुसरा संशयित प्रशांत बनकरला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. सध्या या दोघांचीही पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.मृत डॉक्टर फलटणला ज्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होती, त्याचा प्रशांत बनकर हा मुलगा आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वीच्या सुसाइड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक बदनेने माझ्यावर 4 वेळा अत्याचार केला, असे म्हटले होते. तो फरार झाला होता. त्याचा शोध सुरू असताना तोच शरण आला. दुसरीकडे या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या चौकशीची मागणी होत आहे. दरम्यान, वडवणी (जि. बीड) तालुक्यातील मूळ गावी त्या महिला डॉक्टरवर अंत्यसंस्कार झाले.

पोस्टममॉर्टेम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का?

मृत डॉक्टरच्या बहिणीने सांगितले की, मागील महिन्यात माझे तिच्याशी बोलणे झाले. ती म्हणाली, पोस्टमॉर्टेमसाठी माझ्यावर दबाव येत आहे. अनफिट असेल तर फिट म्हणून दाखवण्यासाठी दबाव येत होता. त्याला नकार दिल्यामुळे तिला त्रास वाढत गेला. आम्ही पाच पानांचे पत्र दिले. त्याची चौकशी झाली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. 80 ते 90 पोस्टममॉर्टेम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का? ती आत्महत्या करूच शकत नाही, असेही तिच्या बहिणीचे म्हणणे आहे.

फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉक्टर महिलेने 23 ऑक्टोबर रोजी रात्री फलटण येथील एका लॉजवर गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेच्या तपासासाठी अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर फलटणमध्ये ठाण मांडून आहेत, तर जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनीही फलटणला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेने तळहातावर लिहिलेल्या मजकुरात प्रशांत बनकरवर मानसिक छळाचा आरोप केला होता. त्याला 24 ऑक्टोबर रोजी मित्राच्या फार्महाऊसवरून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याची 28 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

मोदीसाहेब, सेल डीड रद्द तर कराच,पण मोहोळांचा राजीनामा घेऊन चौकशी करा:धंगेकरांचे उद्यापासून धरणे आंदोलन

जैन बोर्डिंग जागा बळकावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन त्यांना अद्दल घडवलीच पाहिजे.

धंगेकर यांनी हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे, कारण ही जमीन दानधर्मासाठी आहे आणि व्यावसायिक विक्री धर्मादाय कायद्याचे उल्लंघन करते. त्यांनी मोहोळ यांच्यावर गोखले बिल्डर्सशी भागीदारी आणि धर्मादाय आयुक्तांवर दबाव टाकल्याचा आरोप केला आहे

पुणे :रवींद्र धंगेकर यांनी आता थेट नरेंद्र मोदींनाच पत्र लिहून मोदीसाहेब, सेल डीड रद्द तर कराच,पण मोहोळांचा राजीनामा घेऊन चौकशी करा अशी मागणी केली आहे. तसेच २७ नोव्हेंबरपासून जैन बोर्डिंग याठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचेही धंगेकरानी सांगितले आहे.

धंगेकर म्हणाले आहेत की,तमाम पुणेकरांना मी एका गोष्टीची माहिती देऊ इच्छितो, आज आपल्या सर्वांच्या वतीने मी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा व प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी, यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती करत आहे.
तसेच २७ ऑक्टोबर २०२५ पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत मी तमाम पुणेकरांसह जैन बोर्डींग येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसत आहे.आजपर्यंतच्या गेल्या अठरा दिवसांच्या संपूर्ण संघर्षात माझ्यासह अनेक लोकांनी, अनेक वेळा या गोष्टीचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष पुरावे दिले की, व्यवहारातील सर्वच व्यक्ती व संस्था या श्री.मुरलीधर मोहोळ यांच्या संबंधित आहेत. आज मी या पत्रामध्ये देखील आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम देत आहेत.जैन बोर्डिंग चा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरे व देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी या प्रकरणाची निपक्ष:पाती चौकशी होणे गरजेचे आहे. ही निपक्ष:पाती चौकशी तेव्हा शक्य आहे जेव्हा सदर प्रकरणातील मुरलीधर मोहोळ हे आपल्या पदाचा राजीनामा देतील. कारण त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या प्रभावाखालीच हा इतका मोठा गैरव्यवहार घडला आहे. त्यामुळे ही चौकशी होत असताना देखील त्यांनी मंत्रीपदावर राहणे योग्य नाही.
त्यामुळे मी आज मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.आज माननीय पंतप्रधानांसह ,देशाचे गृह तथा सहकारमंत्री, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना देखील आपण या पत्राच्या प्रती पाठवत आहोत.त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने हा व्यवहार आपल्या विशेष अधिकारातून रद्द करावा व या प्रकरणाची कठोर चौकशी होईपर्यंत श्री. मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा ,अशी मागणी मी करत आहे.

धंगेकरांनी मोदींकडे काय केली मागणी?

रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात या मागण्या मांडल्या आहेत. शिवाजीनगरातील ३.५ एकर जैन बोर्डिंग जमीन बेकायदेशीरपणे गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला विकण्यात आली. हा व्यवहार रद्द करावा.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी पदाचा गैरवापर करून धर्मादाय आयुक्तांवर दबाव टाकला, असा आरोप आहे. निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी राजीनामा द्यावा.
जैन बोर्डिंग आणि इतर मंदिर व देवस्थानच्या जमिनी हडपणाऱ्या टोळीवर कठोर कारवाईसाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमावी.
२७ ऑक्टोबरपासून जैन बोर्डिंग परिसरात पुणेकरांसह बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार, जोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत.

काय आहे जैन बोर्डिंग वाद

शिवाजीनगरातील मॉडेल कॉलनी येथील सेठ हीराचंद नेमचंद जैन बोर्डिंग हाऊसची ३.५ एकर जमीन जैन ट्रस्टच्या ताब्यात आहे, जी विद्यार्थी वसतिगृह, जैन मंदिर आणि सामाजिक कार्यांसाठी वापरली जाते. डिसेंबर २०२४ मध्ये ट्रस्ट विश्वस्तांनी ही जमीन गोखले कन्स्ट्रक्शनला विकण्याचा निर्णय घेतला, जो ८ ऑक्टोबर २०२५ रोजी २३० कोटींना अंतिम झाला.

धंगेकर यांनी हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे, कारण ही जमीन दानधर्मासाठी आहे आणि व्यावसायिक विक्री धर्मादाय कायद्याचे उल्लंघन करते. त्यांनी मोहोळ यांच्यावर गोखले बिल्डर्सशी भागीदारी आणि धर्मादाय आयुक्तांवर दबाव टाकल्याचा आरोप केला आहे

एकीकडे भाजपची धंगेकरांविरोधात पत्रकार परिषद दुसरीकडे मुरलीधर मोहोळ जैन मुनींच्या सभेत दाखल

पुणे- धंगेकर केवळ चमकोगिरी करण्यासाठी , भाजपच्या नेत्यांना बदनाम करत असल्याचा आरोप आज येथे भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेत केला,धंगेकरांच्या कृतीने शिवसैनिकात अस्वस्थता असल्याचे ते म्हणाले.महापालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बिडकर यावेळी म्हणाले धंगेकर यांनी स्वतः वक्फ च्या जमीन बळकावली आहे आणि ते आता जैन समाजाच्या जमिनीबाबत बोलत आहेत, पण आम्हीही जैन समाजाच्या बाजूने उभे राहत आहोत एकीकडे भाजपने हि पत्रकार परिषद घेतली तर दुसरीकडे मुरलीधर मोहोळ हे अत्यंत गोपनीय पद्धतीने अचानक जैन मुनींच्या सभेत दाखल झाले .आणि तिथे जैन समाजाच्या मनासारखे काम होईल असे सांगितले .

धंगेकरांच्या आरोपात सत्य, जागेचा व्यवहार विश्वस्तांना ब्लॅकमेल करून झाला की त्यांना भीती घालून झाला ? राजू शेट्टी म्हणाले चौकशी झाली पाहिजे

पुणे-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याबाबत स्पष्ट शब्दांत सांगितले की रवींद्र धंगेकर यांनी केलेले सर्व आरोप सत्य आहेत आणि या प्रकरणामागे मोठा राजकीय आणि आर्थिक अपहार दडलेला आहे.हा व्यवहार विश्वस्तांना ब्लॅकमेल करून झाला की त्यांना भीती घालून झाला, की विश्वस्त आणि खरेदीदार दोघांनी मिळून भ्रष्टाचार करून केला, हे स्पष्ट झाले पाहिजे, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. सगळ्याच गोष्टी संशयास्पद असताना, याला कुठेतरी राजकीय वरदस्त आहे हे म्हणायला वाव आहे, असेही ते म्हणाले. शेट्टी म्हणाले की, “मोहोळ गोखले कन्स्ट्रक्शनचे भागीदार होते. या कंपनीने सुमारे 230 कोटींना जमीन विकत घेतली आणि विकसित झाल्यावर 3000 कोटींचा महसूल मिळणार असल्याचं त्यांच्या भागीदारांनीच पत्रकार परिषदेत जाहीर केलं. जर इतक्या कमी गुंतवणुकीवर इतका प्रचंड नफा मिळत असेल, तर हा व्यवहार पारदर्शक नाही. हा थेट अपहार आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की मोहोळ महापौर असतानाच पुणे महापालिकेतील व्यवहार संशयास्पद रितीने झाले. “जे टेंडर भरत होते, त्यांच्या गाड्या मोहोळ वापरत होते. म्हणजे संगनमत स्पष्ट आहे. धर्मादाय आयुक्तांची परवानगी, महापालिकेचा घाईघाईत मंजूर झालेला लेआउट सगळंच संशयास्पद आहे,” असे ते म्हणाले.

राजू शेट्टी यांनी कठोर शब्दांत प्रश्न उपस्थित केला की, “ही लूट फक्त मुरली मोहोळांची आहे का, की त्यांना वरून दिल्ली किंवा महाराष्ट्रातून राजकीय आशीर्वाद मिळतोय?” त्यांनी 100 टक्के चौकशीची मागणी केली. पुणे विद्येचे माहेरघर असून, थोरामोठ्यांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षण संस्था उभ्या केल्या. तरीही, महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून शिकत असलेली मुले 1 जूनपासून हद्दपार करून ही प्रॉपर्टी गिळंकृत करत असतील, तर चौकशी करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असल्याचे ते म्हणाले.

अभिनेते सतीश शहा यांचे निधन

मुंबई : जाने भी दो यारो ,मै हू ना सारख्या चित्रपटासह अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आज निधन झाले. किडनीच्या आजारामुळे ते त्रस्त होते. वयाच्या 74 व्या वर्षी या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.भारतीय चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पर्व संपल्याची भावना व्यक्त होत आहे. चार दशकावून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले .आपल्या अफाट विनोदी बुद्धी आणि अनोख्या अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात सतीश शहा यांनी कायमचे स्थान मिळवले. 1983 मध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रपट जाने भी दो यारो मधील त्यांच्या अनेक भूमिकांनी त्यांना घराघरात लोकप्रिय केले. त्यांच्या फिल्मोग्राफीमध्ये हम साथ साथ है ,मै हू ना ,कल हो ना हो ,कभी हा कभी ना ,दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे आणि ओम शांती ओम सारख्या अनेक हिट चित्रपटां चा समावेश आहे.

दूरदर्शनवरही सतीश शहा यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. साराभाई वर्सेस साराभाई मालिकेत त्यांनी साकारलेली इंद्र वदन साराभाई ही व्यक्तिरेखा आजही भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वाधिक संस्मरणीय कॉमिक रोल्स पैकी एक मानली जाते. सतीश शहा यांच्या जाण्याने भारतीय मनोरंजन विश्वाने आपल्या विनोद आणि संवेदनशीलतेचा एक अनमोल खजिना हरवला आहे. उद्या 26 ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी माहिती आहे.

सतीश शाह यांनी आपल्या अफाट विनोदबुद्धी आणि अनोख्या अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रसिद्ध व्यंगचित्रपट ‘जाने भी दो यारो’ मधील त्यांच्या अनेक भूमिकांनी त्यांना घराघरात लोकप्रिय केले. त्यांच्या फिल्मोग्राफीमध्ये ‘हम साथ-साथ हैं’, ‘मैं हूं ना’, ‘कल हो ना हो’, ‘कभी हां कभी ना’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ आणि ‘ओम शांती ओम’ सारख्या अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे. प्रत्येक भूमिकेतून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा अभिनय सादर करत आपल्या बहुगुणी व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवली.

दूरदर्शनवरही सतीश शाह यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मालिकेत त्यांनी साकारलेली इंद्रवदन साराभाई ही व्यक्तिरेखा आजही भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वाधिक संस्मरणीय कॉमिक रोल्सपैकी एक मानली जाते. याआधी त्यांनी 1984 मधील प्रसिद्ध सिटकॉम ‘ये जो है जिंदगी’ मधून प्रेक्षकांच्या घरात पोहोचत लोकांची मने जिंकली होती. सतीश शाह यांच्या जाण्याने केवळ एक प्रतिभावान कलाकार गमावला गेलेला नाही, तर भारतीय मनोरंजन विश्वाने आपल्या विनोद आणि संवेदनशीलतेचा एक अनमोल खजिना हरवला आहे. त्यांच्या कलाकृती आणि व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात सदैव जिवंत राहतील.

दिल्लीत एकनाथ शिंदे PM मोदींना भेटल्यावर :पुण्यात केंद्रीय मंत्री मोहोळ जैन मुनींच्या सभेत दाखल

पुणे- अखेर केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ जैन मुनींच्या सभेत हजर ,म्हणाले अन्नत्याग करू देणार नाही, त्या अगोदर समाजाची मागणी मान्य आहे..जैनमुनी म्हणाले, १ नोव्हेंबर च्या आधी जैन धर्माच्या या मंदिराचे जागेचे डील रद्द होत नाही तोपर्यंत संतुष्ट होणार नाही अन्यथा प्राणत्याग देखील करेल .पण आपणावर तशी वेळ येऊ देणार नाही असे त्यांना मोहोळ यांनी आश्वस्त केले .

जैन बोर्डिंग घोटाळ्यावरून सातत्याने आरोप होत असताना, खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज जैन बोर्डिंग उपोषणस्थळी जाऊन जैन मुनींची भेट घेतली. शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यासह विरोधकांच्या वाढत्या आक्रमक भूमिकेमुळे मोहोळ यांच्या अडचणी वाढल्या असताना, या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले. “मी या प्रकरणात सहभागी आहे किंवा माझे कोणीतरी सहभागी आहे, असे आरोप केले गेले. परंतु माझा यामध्ये कोणताही सहभाग नाही, हे मी वारंवार पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मी येथे केवळ वंदनीय जैन गुरुदेवांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. जर मी दोषी असतो, तर इथे येताना 100 वेळा विचार केला असता आणि आलोच नसतो.” मोहोळ यांनी आरोप-प्रत्यारोपांवर बोलताना स्पष्ट केले की, या संपूर्ण विषयावर केवळ राजकारण झाले आणि वैयक्तिक हेतूने या गोष्टी वाढवल्या गेल्या.
जैन समाजाला संबोधित करताना मोहोळ यांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. “मी आपल्याला आश्वासित करतो की, या प्रकरणात योग्य न्याय होईल. मी तुम्हाला न्याय मिळवून देईल. काही दिवसांत हा प्रश्न आपल्या मनासारखा संपेल,” असे ते म्हणाले. “लोकप्रतिनिधी आणि खासदार म्हणून मला तुम्ही निवडून दिले आहे. हा विषय संपवण्यासाठी तशी भूमिका घेण्यासाठीच मी इथे आलो आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जैन मुनींनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “जोपर्यंत तुम्ही हा विषय संपवत नाही, तोपर्यंत आम्ही समाधानी नाही.” तसेच, प्रसार माध्यमांनी हा विषय लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. यावर प्रतिक्रिया देताना मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींनी दिलेल्या सूचना आपण लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण करू, त्यासाठीच आपण इथे आलो आहोत, असे आश्वासन दिले.


या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुढच्या काळात काही निर्णय होणे अपेक्षित असेल, तर या शहराचा खासदार, लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका महत्त्वाची यामध्ये काय असावी, याबाबत जेव्हा विषय झाला. मी माझ्या जैन बांधवांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, राजकीयदृष्ट्या आरोप-प्रत्यारोप खूप झाले. काही लोकांना या विषयाचा आधार घेऊन व्यक्तीगत पातळीवर जाऊन टीका केली. पण माझ्या जैन बांधवांनी एकही दिवस, एकदाही कधी माझे नाव या विषयात घेतले नाही.
राजू शेट्टी हे जैन समाजाचे येतात, त्यामुळे त्यांनी शंका उपस्थित केली होती की कदाचित मी पार्टनरशिप असलेल्या विकासकाने हा जैन बोर्डिंगचा व्यवहार केलाय. पण ज्यावेळी मी स्पष्टपणे माझे कागदोपत्री आणि सगळे पुरावे सादर केल्यानंतर, पुढे कुठेही असा विषय जैन समाजातून आला नाही. परंतू याचा वेगळा गैरफायदा स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी, राजकीय अस्तित्व जीवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्याने चालवले.
मागील दोन दिवसांपूर्वी जैन धर्मियांचे गुरुदेव आज या ठिकाणी या विषयासाठी बसलेले आहेत. त्यांचे शांततेत आंदोलन चालू आहे. त्यांनी मला आवाहन केले की, तुम्ही पुण्याचे लोकप्रतिनिधी आहात, आमच्या जैन समाजाला तुमची मदत हवीये. तुम्ही येथे या आणि आमच्यासाठी उभे राहा. या प्रकरणात जे काही राहिले, त्याबाबत पडदा दूर होईल, असे आवाहन त्यांनी केले.
माझा या प्रकरणात काही सहभाग असता, तर मी इथे येताना शंभरवेळा विचार केला असता. आलो नसतो. समाजाची आणि माझी या विषयातील भूमिका स्पष्ट आहे. इथे आल्यानंतर माझी भूमिका मांडली. लवकरात लवकर हा विषय संपला पाहिजे, असे गुरूदेवांनी सांगितले. हा व्यवहार रद्द होण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे, असेही त्यांनी मला सांगितले. त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेऊन हा विषय कसा सोडवता येईल? यासाठी प्रामाणिकपणे तुमच्या सोबत उभा आहे. लवकरात लवकर यातून मार्ग काढू, असे मी त्यांना आश्वस्त केल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
मुरलीधर मोहोळ जैनमुनींची भेट घेऊन बाहेर निघाल्यानंतर जैन बांधवांनी त्यांना घेराव घातला. यावेळी जैन बांधव मुरलीधर मोहोळांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बोर्डिंग संदर्भात झालेला व्यवहार रद्द करावा, अशी मागणी जैन बांधवांनी यावेळी केली, तसेच जैन बोर्डिंग वाचवा, अशी घोषणाबाजी केली.

महावितरणमधील पुनर्रचना ग्राहक-कर्मचारी हिताचीच- राजेंद्र पवार

संचालक राजेंद्र पवार यांनी घेतला पुनर्रचना अंमलबजावणीचा आढावा

पुणे, दि. २५ ऑक्टोबर, २०२५ – महावितरणने लागू केलेली सुधारित मनुष्यबळ पुनर्रचना ही ग्राहक व कर्मचारी या दोघांच्याही हिताची असून, ग्राहकांना समर्पित व चांगली सेवा देण्यासाठीच असल्याचे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मासं) यांनी केले. शुक्रवारी (दि. २४) गणेशखिंड (पुणे) येथील विश्रामगृहात झालेल्या मनुष्यबळ पुनर्ररचना आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी बैठकीला पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनिल काकडे, अधीक्षक अभियंता युवराज जरग, संजीव नेहते, अनिल घोगरे व सहा. महाव्यवस्थापक (मासं) सत्यजित राजेर्शिके यांचेसह पुणे परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंते उपस्थित होते. पुणे परिमंडलात दोन आठवड्यांपासून सुधारित मनुष्यबळ पुनर्रचनेनुसार महावितरणचे कामकाज सुरु आहे. त्याचा आढावा संचालक राजेंद्र पवार यांनी घेतला.

बैठकीत दरम्यान ते म्हणाले, ‘वीज अभियंते व तांत्रिक कर्मचारी यांना वीजपुरवठा, वीजबिल वसुली अशा सर्वच कामांचा ताण होता. नविन पुनर्रचनेत सरसकट कामाचा ताण कमी करुन निवडक कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. आता कामे करताना ती निश्चित स्वरुपाची व केंद्रित पध्दतीने असणार आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल. पर्यायाने ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देता येईल.’

सेवेप्रती व्यावसायिक दृष्टीकोन ठेवावा- राजेंद्र पवार

पुनर्रचनेचा बदल अभियंते व कर्मचाऱ्यांनी मनापासून स्विकारावा. ग्राहकांना महावितरणकडून सेवेप्रती खूप अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सेवेप्रती व्यावसायिक दृष्टीकोन बाळगणे गरजेचे असून, बदलत्या तंत्रज्ञानाचाही पुरेपूर वापर करावा. तसेच तक्रारींचा निपटारा वेळेत करुन वसूलीचे लक्ष शंभर टक्के गाठावे.

पुनर्रचनेत आवश्यकतेनुसार बदल करु- राजेंद्र पवार

महावितरणने पुनर्रचनेचे प्रारुप लागू करताना ते अधिक चांगले कसे राहील यावर भर दिलेला आहे. तसेच अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या त्रूटी देखील दूर करण्यात येणार आहेत. त्यासाठी सूचना मागविण्यात येत असून, बदल सुचविताना त्याची आवश्यकता व निकड याबाबतचे स्पष्टीकरण जरुर द्यावे. जेणेकरुन पुनर्रचना अधिकाधिक ग्राहक केंद्रित होईल.

धंगेकर यांच्यावर कारवाई करणार काय ? काय म्हणाले दिल्लीत DCM एकनाथ शिंदे …

नवी दिल्ली- पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्यात जैन धर्मियांच्या भूखंडावरून झालेल्या वादाबद्द आज दिल्लीत देखील मध्यम प्रतिनिधींनी DCM एकनाथ शिंदे यांना धंगेकर यांच्यावर कारवाई करणार काय ? असा प्रश्न केला तेव्हा पहा काय म्हणाले एकनाथ शिंदे

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचे स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या येथील बंगल्यावर मुक्काम केल्यानंतर त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भेटीचे कारण सांगितले. ते म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान दिवाळीत बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. त्यामुळे त्यांना तेव्हा भेटता आले नव्हते. पण त्यांनी आज मला वेळ दिली होती. त्यानुसार मी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ही राजकीय नव्हे तर सदिच्छा भेट होती.एकनाथ शिंदे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे जागावाटप व रवींद्र धंगेकर प्रकरणी दिल्ली दौऱ्यावर आल्याचा दावा केला जात आहे. पत्रकारांनी याविषयी त्यांना छेडले असता ते म्हणाले, मी दिल्लीत आलो तरी चर्चा होते आणि गावी गेलो तरी चर्चा होते. त्यामुळे आता चर्चा करणारे, चर्चा करतातच. त्यांचे चर्चेचे चर्वण सुरूच असते. मी माझे काम करत असतो. पंतप्रधान मोदी जे काही देशासाठी व देशाच्या प्रगतीसाठी करत आहेत, त्याचा अभिमान आम्हा सगळ्यांना आहे. त्यामुळे मी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.मोदी व मी जेव्हा – केव्हा भेटतो तेव्हा आमची विकासावरच चर्चा होते. यात महाराष्ट्र व देशाच्या विकासाचाही समावेश आहे. त्यांची भेट घेतल्यानंतर मला आनंद होतो. प्रेरणा मिळते. शिवसेना एनडीएचा घटकपक्ष आहे. त्यामुळे मोदींकडून शिवसेनेला आदराचे स्थान मिळत आले आहे. याचा आम्हाला आनंद आहे. त्यांचे व्यक्तिमत्व खूप मोठे आहे. त्यांना जगभरात विश्वगुरू म्हटले जाते. ते जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. त्याचा आम्हाला गर्व आहे. एक कुटुंबप्रमुख म्हणून त्यांची प्रतिमा आमच्या मनात आहे. मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.
सर्वांनीच महायुती जपली पाहिजेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागावाटपात शिवसेनेला आदराचे स्थान मिळावे यावर तुमची मोदींशी चर्चा झाली का? असा प्रश्न पत्रकारांनी यावेळी त्यांना विचारला. त्यावर शिंदे म्हणाले, मोदींचे एनडीए व महायुतीविषयी अत्यंत स्पष्ट मत आहे. एनडीए व महायुती ही आघाडी एक विचारधारा घेऊन पुढे जात आहे. विकासाचा अजेंडा व विचारधारा आपण राबवली पाहिजे यावर त्यांचा भर होता. महायुती व एनडीए ही प्रत्येक निवडणुकीत मजबुतीने किंबहुना विकासाच्या प्रत्येक कामात आपण एकत्र राहिले पाहिजे अशीच भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.

महायुतीत एकत्र लढण्यावर कोणतेही मतभेद नाहीत. मला तसे वाटतही नाही. शेवटी कार्यकर्ते असतात. त्या त्या भागातील नेते असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही ग्रास रूटची असते. त्यामुळे कार्यकर्त्यांची ही निवडणूक लढण्याची इच्छा असते. पण अंतिम निर्णय हे वरिष्ठ घेत असतात. त्यामुळे एकदा महायुतीच्या वरिष्ठांनी निर्णय घेतला की, त्याची अंमलबजावणी कार्यकर्ते करत असतात. कारण, आम्ही शिस्तीने चालणारे व शिस्तीने वागणारे लोक आहोत.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी पुण्यातील मुरलीधर मोहोळ व रवींद्र धंगेकर यांच्यातील राजकीय वादावरही भाष्य केले. ते म्हणाले, रवींद्र धंगेकर माझ्याकडून निरोप गेला आहे की, महायुतीत कुठेही मतभेद होता कामा नये. महायुतीत कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये. याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. मी पुण्यात गेलो तेव्हाही मी यावर भाष्य केले होते. आजही करतो. प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे. महायुतीत कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचे कृत्य, वक्तव्य करू नये.पत्रकारांनी या प्रकरणी रवींद्र धंगेकरांवर कारवाई करणार काय? असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, रवींद्र धंगेकरांना पक्षाचा जो काही निरोप मिळायचा होता तो मिळाला होता. त्यांचा जो काही दावा आहे, त्याविषयी मी त्यांच्याशी बोलेन. तेही मला भेटतील.

तरुणांना केंद्रस्थानी ठेवूनच केंद्र सरकार कार्यरत – मुरलीधर मोहोळ


17व्या रोजगार मेळाव्याअंतर्गत पुण्यातील 103 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण

पुणे-

देशात तरूणांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. तरूण पिढी ही आपल्या देशाची ताकद असून त्यांना केंद्रस्थानी ठेवूनच केंद्र सरकार कार्यरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

पुण्यात टपाल विभागाच्या वतीने आयोजित 17व्या रोजगार मेळाव्यात श्री. मोहोळ बोलत होते. आज केंद्र सरकार तर्फे देशभरात 40 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे एकाचवेळी आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून देशभरातील सुमारे 51 हजार तरूणांना आज नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवनियुक्त उमेदवारांशी संवाद साधला व संबोधित केले. याचाच एक भाग म्हणून पुण्यात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरलीधर मोहोळ होते. तर याप्रसंगी भारतीय टपाल सेवेतील पुणे विभाग संचालक अभिजित बनसोडे उपस्थित होते.

या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या टपाल विभागासह भारतीय रेल्वे, सीमा सुरक्षा बल, सीजीएसटी आणि कस्टम, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ), सशस्त्र सीमा बल, भारतीय विमानतळ प्राधीकरण, केंद्रीय राखीव पोलीस बल तसेच जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आदी विभागांमधील तब्बल 103 उमेदवारांना मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात मुरलीधर मोहोळ यांनी केंद्र सरकार तरुणांसाठी करत असलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, गेल्या दहा वर्षात देशातील असंख्य तरूणांना केंद्र सरकारच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. गुणवत्ता पूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आदी धोरणांमुळे अनेक क्षेत्रात तरुणांना रोजगार मिळू लागले असून, सर्व समावेशक विकास या उद्देशाने केंद्र सरकार कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये तरूण पिढीला सामावून घेणे हा रोजगार मेळाव्यांचा उद्देश आहे. या माध्यमातून आजपर्यंत 10 लाखांहून अधिक उमेदवारांना नोकरी देण्यात आली, याचा आनंद वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार शैक्षणिक दृष्टिकोनातूनही योग्य दिशेने काम करत आहे. गेल्या 10 वर्षात  देशात 760 विद्यापीठे होती. आज देशात 1334 विद्यापीठे तयार झाली आहेत. आयआयटींची संख्या वाढून 23 झाली आहे. केवळ शिक्षण-नोकरीच नव्हे तर आत्मनिर्भर भारतासाठी उद्योग उभारणीचे कामही अत्यंत वेगाने करण्यात येत आहे, लघु उद्योगासाठी 36 लाख कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. आजघडीला देशातील 50 टक्के नागरिक केंद्र सरकारच्या कोणत्या ना कोणत्या योजनांचा लाभ घेत असून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत, असे ते म्हणाले.

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला पुण्यात पहाटे ४ वाजता धरला, अटक.

तळहातावर सुसाइड नोट लिहून फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी जीवन संपवले होते. या प्रकरणातील प्रशांत बनकरला आता पोलिसांनी अटक केली आहे. तर गोपाल बदनेचाही कसून शोध सुरु आहे.या प्रकरणातील महिला डॉक्टर या बीड जिल्ह्यातील वडवणी येथील मूळ रहिवासी होत्या. त्यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने अद्यापही फरार आहेत. मूळ परळी येथील रहिवासी असलेल्या बदनेवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. बनकर सामान्य नागरिक असल्याचा पोलिस अधिकाऱ्यांचा दावा आहे.सुसाइड नोटमध्ये जे म्हटले ते शब्दश: असे,माझ्या मरण्याचे कारण पोलिस निरीक्षक गोपाल बदने ज्याने माझा 4 वेळा rape केला आणि प्रशांत बनकर ज्याने मागच्या 5 महिने शारीरिक व मानसिक छळ केला.तळहातावर उपनिरीक्षक गोपाळ बदने यांचे नावही लिहिलेले होते. गेल्या पाच महिन्यांत बदने यांनी डॉक्टरवर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपींवर बनावट फिटनेस प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी दबाव आणत होते.गोपाळ बदनेयांच्यावर बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा पोलिस अधीक्षकांना आरोपी उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

ही महिला डॉक्टर बीड जिल्ह्यातील रहिवासी होती आणि फलटण तहसीलमधील सरकारी रुग्णालयात काम करत होती. पोलिसांना आणखी एक चार पानांची सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये एका खासदार आणि त्यांच्या दोन पीएचे नाव आहे.असा आरोप आहे की हे लोक डॉक्टरवर आरोपीसाठी बनावट फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी दबाव आणत होते. जेव्हा तिने नकार दिला तेव्हा खासदाराने महिला डॉक्टरला बोलावले

या प्रकरणात मुख्य आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी वेगवान तपास सुरू करत अनेक ठिकाणी छापे टाकले. प्रशांत बनकर फरार झाल्यानंतर तो आपल्या एका मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सातारा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री सापळा रचून पहाटे चारच्या सुमारास पुणे परिसरात ही कारवाई केली. पोलिसांनी फार्महाऊसला वेढा घालून त्याला बेड्या ठोकल्या. अटकेनंतर बनकरला फलटण शहर पोलिस ठाण्यात आणण्यात येणार असून, त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, दुसरा आरोपी जो पोलिस असल्याचे सांगितले जाते, तो अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. प्रशांत बनकरला अटक झाल्याने या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही अविवाहित महिला डॉक्टर दोन वर्षांपासून फलटण येथे कार्यरत होती. गेल्या काही महिन्यांपासून ती पोलिस आणि आरोग्य विभागाच्या वादात भरडली जात होती. कारण वैद्यकीय तपासणी अहवालाविषयीच्या वादातून तिची चौकशी सुरु होती. त्यामुळे ती खूप मानसिक तणावात होती. तिने वारंवार वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली होती. माझ्यावर अन्याय होत आहे. मी आयुष्याची अखेर करेन, असे ती वारंवार म्हणत होती. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर तिने नामांकित हॉटेलात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा अखेर केला. त्या फलटण शहरातील विद्यानगर परिसरात पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या.या प्रकरणात निलंबित पोलिस उपनिरीक्षक बदने बीड जिल्ह्यातील परळीचा रहिवासी आहे. परळीतच त्याचे शिक्षण झालेले आहे. फलटणमध्ये त्याची या महिला डॉक्टरशी ओळख झाली. त्याने आपण म्हणू तसाच अहवाल देण्यासाठी तिच्यावर दबाव आणल्याचे निदर्शनास आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी चर्चा केली आणि महिला डॉक्टरने सुसाइड नोटमध्ये नमूद केलेल्या पोलिसांवर तसेच इतर सर्व आरोपींवर कठोर कारवाई करा, असे आदेश दिले. दोशी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक बदनेला निलंबित करण्यात आले आहे. प्रशांत बनकर पोलिस नसून सामान्य नागरिक आहे.

मोहोळ मिडियाशी खोटं बोलले ,त्यांच्यावर ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा देखील दाखल:घ्या हा पुरावा ;म्हणाले धंगेकर

कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेला, जैन धर्मियांना न्याय मिळवून देईल.फडणवीस जैन धर्मियांना दुखावणार नाहीत हा विश्वास आहे .भाजपचे सच्चे कार्यकर्ते माझ्याबरोबर ..माझी भूमिका सर्वांना पटलेली आहे , जैन मंदिर पाहिजेच

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी काल (शुक्रवारी) माध्यमांशी बोलताना दिलेल्या उत्तरानंतर (Pune Politics) धंगेकरांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत मोहोळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.(Dhangekar on Mohol)माझ्यावर एकही गुन्हा नाही, असे त्यांनी धडधडीत खोटे ऑन कॅमेरा सांगितले होते .पण हा घ्या पुरावा त्यांच्यावर ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा देखील दाखल आहे असे शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज म्हटले आहे.
धंगेकरांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत मोहोळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी काल माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं, रोज सकाळी तुम्ही तिथे जाता, ते बोगस ट्विट करतात आणि तुम्ही ते दाखवता. त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा. व्यक्तिगत दोष, आकास यामधून हे बोललं जात आहे. बोगस कार्यक्रम चालला आहे त्याचा, कागद दाखवा, पुरावे दाखवा आणि मग बातमी दाखवा. मला या माणसाबद्दल काही बोलायचं नाही. २०११ मध्ये जमीन हडपली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर १० गुन्हे दाखल आहेत, माझ्यावर एकही नाही, त्यांना काय काम धंदा नाही असं म्हटलं होतं, त्यावर आता पुराव्यांसह धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची यादी दिली आहे.

अगदी ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर दाखल
धंगेकरांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, अतिशय सुसंस्कृत व सरळमार्गी वाटणारे मुरलीधर मोहोळ हे कशा पद्धतीने खोटे बोलतात याचे उदाहरण मी तुम्हाला देतो. काल माध्यमांशी बोलताना त्यांनी सरळ सांगितले की त्यांच्यावर एकही गुन्हा नाही. मी या ट्विट सोबत आपल्याला त्यांच्या इलेक्शन एफिडेविट मधील पानांची कॉपी जोडतोय त्यांच्यावर किती गुन्हे आहेत ते कशाकशा संदर्भात आहेत अगदी ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर दाखल आहे.

मला माहित आहे, राजकीय कार्यकर्ता म्हटलं की गुन्हे असतात. काही हेतूपरस्पर केलेले असतात काही आंदोलनातले असतात. परंतु केवळ बदनामी करण्यासाठी माझ्यावर 13 केसेस आहेत आणि त्यांच्यावर एकही नाही असं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण त्या प्रेसची सुद्धा फसवणूक करत असतो आणि तमाम पुणेकरांची देखील फसवणूकच करत असतो, हे एका केंद्रीय राज्यमंत्री व खासदाराला अशोभनीय आहे, बाकी थेट जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली २ प्रकरणे घेऊन लवकरच भेटुयात!


दिवाळीनंतरही पाऊस: 5 दिवस यलो अलर्ट; कोठे बरसणार? पहा IMDचा ताजा अंदाज

यंदा दिवाळी झाली तरी पाऊस महाराष्ट्रात सुरु आहेच . आगामी पाच दिवस पुन्हा एकदा राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने आपल्या ताज्या अंदाजात वर्तवली आहे . बहुतांश ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आलाय. या काळात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे .यंदा अतिवृष्टीने महाराष्ट्र बेजार झालाय. शेतकऱ्यांना चक्क काळी दिवाळी साजरी करावी लागली. हाता-तोंडाशी आलेले पीकच काय जमीन सुद्धा पावसाने खरवडून नेली. मात्र, आता पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवल्याने चिंता व्यक्त होते आहे .


24 ऑक्टोबर, शुक्रवार

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे आणि पुणे घाट, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट, सांगली, सातारा, सातारा घाट, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता.


25 ऑक्टोबर, शनिवार

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे आणि पुणे घाट , सांगली, सातारा, सातारा घाट, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता.
26 ऑक्टोबर, रविवार

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि नाशिक घाट , अहिल्यानगर, पुणे आणि पुणे घाट, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता.

27 ऑक्टोबर, सोमवार

रायगड, अहिल्यानगर, पुणे आणि पुणे घाट, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता.
28 ऑक्टोबर, मंगळवार

सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि घाट कोल्हापूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यताय.

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग – सीजन 2 चीपुण्यात 26 ऑक्टोबरला होणार धमाकेदार सुरुवात

●       राईज मोटो फॅन पार्क दुपारी 2 वाजता खुले होईल | उद्घाटन समारंभ संध्याकाळी 6:20 वाजता | शर्यती रात्री 7 वाजल्यापासून शिव छत्रपती क्रीडा संकुलपुणे येथे सुरू होतील

●       जगभरात थेट प्रक्षेपण ISRL यूट्यूब आणि रेव टीव्ही कॅनडा वर

●       भारतात थेट प्रक्षेपण युरोस्पोर्ट इंडिया आणि फॅनकोड वर

पुणे – इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दुसऱ्या सीजनचा पहिला राऊंड रविवारी, 26 ऑक्टोबरला शिव छत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे बालेवाडी येथे पार पडणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि भारतातील सर्वोत्तम रायडर्स जेव्हा जगातील पहिल्या फ्रँचायझी-आधारित सुपरक्रॉस लीगमध्ये गौरवासाठी लढतील, तेव्हा प्रेक्षकांसाठी हा विकेंड रोमांचक ठरणार आहे.

दमदार स्पॉन्सर लाइनअप

आयएसआरएलने राऊंड 1 साठी मजबूत स्पॉन्सर पूल निश्चित केला आहे. यात राईज मोटो, लिलेरिया ग्रुप, बिसलेरी, कावासाकी इंडिया, टीव्हीएस अपाचे, रेड बुल आणि मॅक्स प्रोटीन यांसारख्या अग्रगण्य ब्रँड्सचा समावेश आहे. यावरून भारतातील सुपरक्रॉस इकोसिस्टमबद्दल वाढत चाललेला व्यावसायिक आत्मविश्वास अधोरेखित होतो.

विकेंड शेड्यूल

शनिवार, 25 ऑक्टोबरला सराव सत्रे होतील. त्यानंतर रविवार, 26 ऑक्टोबरला सहा ग्लोबल टीम्स शर्यतींच्या पहिल्या राऊंडमध्ये उतरणार आहेत. पुण्यातील हा अॅक्शन-पॅक्ड रविवार राईज मोटो फॅन पार्कसोबत सुरू होईल. येथे प्रेक्षकांना लाईव्ह म्युझिक, इंटरॅक्टिव्ह झोन्स, फूड स्टॉल्स आणि टीम मर्चेंडाईजसह एक अद्वितीय अनुभव मिळेल.

संध्याकाळी उत्साही ओपनिंग सेरेमनी आणि प्री-शो होईल, ज्यामध्ये टीम इंट्रोडक्शन्स आणि लाईव्ह परफॉर्मन्सेस असतील. त्यानंतर प्रेक्षकांची सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या आयएसआरएल राऊंड 1 रेस लाईट्सखाली रंगणार आहेत.

वेळकार्यक्रम
2:00 PM – 6:00 PMराईज मोटो फॅन पार्क एक्स्पेरियन्स
5:00 PMस्टेडियमचे गेट उघडणार
6:15 PM – 7:00 PMउद्घाटन समारंभ आणि प्री-शो
7:00 PM – 8:30 PMआयएसआरएल राउंड १ रेसेस

स्ट्रीम आणि कसे पाहणार

जे चाहते थेट स्टेडियममध्ये सर्व थरार अनुभवू इच्छितात, त्यांच्यासाठी तिकीटांची सुविधा बुकमायशोवर उपलब्ध आहे. तर दूरवरून पाहणाऱ्यांसाठी आयएसआरएल सीजन 2 चे थेट प्रक्षेपण युरोस्पोर्ट इंडियावर होणार आहे. तसेच हे सामने जगभरातील प्रेक्षकांसाठी आयएसआरएल चॅनेलवर यूट्यूबवर थेट स्ट्रीम केले जाणार असून, फॅनकोडवर ऑन-डिमांड उपलब्ध असतील. कॅनडामधील सुपरक्रॉस चाहत्यांसाठी विशेष थेट प्रक्षेपण रेव्ह टीव्हीवर पाहता येईल.

वीर पटेलडायरेक्टरइंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग म्हणाले : सीजन 2 हा केवळ रेसिंगपुरता मर्यादित नाहीतर तो चाहत्यांना सुपरक्रॉसच्या थरारऊर्जा आणि आवेशाच्या आणखी जवळ नेणारा आहेया विकेंडला पुणे खेळमनोरंजन आणि फॅन कल्चरच्या नव्या युगाचे साक्षीदार ठरणार आहे.”

सीजन 2 कॅलेंडर

●      पुणे – ऑक्टोबर 25 आणि 26, 2025 – श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी

●      हैदराबाद – डिसेंबर 6 आणि 7, 2025 – गाचीबौली स्टेडियम

●      कोझिकोड (ग्रँड फिनाले) – डिसेंबर 20 आणि 21, 2025 – ईएमएस कॉर्पोरेशन स्टेडियम

खासदार मेधा कुलकर्णींमुळे शहर दंगलीच्या उंबरठ्यावर – राहुल डंबाळे यांचा गंभीर आरोप

कुलकर्णी यांच्यावर कारवाई करण्याची पोलिस आयुक्तांकडे मागणी
पुणे : शनिवार वाडा येथील कथित नमाज प्रकरणाच्या निमित्ताने शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या दृष्टिकोनातून राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आलेले बेकायदेशीर आंदोलन व त्यानंतर त्यांनी केलेली वक्तव्य ही पुणे शहराला दंगलीच्या उंबरठ्यावर घेऊन जाणारी असल्यामुळे त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन केली आहे .

19 ऑक्टोबर रोजी शनिवार वाडा येथे यापूर्वी नमाज अदा केल्याचा दावा करत मेधा कुलकर्णी यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या समवेत परवानगी न घेता शनिवार वाड्यात घुसून आंदोलन केले आहे पोलिसांचे आदेश न जुमानता त्यांनी शुद्धीकरणाचा घाट घातला आहे ही बाब खासदार म्हणून अत्यंत अशोभनीय आहे तसेच यानंतर या घटनेच्या अनुषंगाने त्यांनी केलेली वक्तव्य ही धार्मिक तेढ निर्माण करणारी व दंगलीला प्रोत्साहन देणारी असल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आज नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने करण्यात आली आहे

मेधा कुलकर्णी यांनी यापूर्वी देखील अशाच प्रकारे कसबा पेठ येथील छोटा शेख सालाउद्दीन दर्गा येथे कृती केली होती त्यानंतर पुन्हा अशा प्रकारची कृती ही शहराची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा त्यांचा इरादा आहे की काय असा प्रश्न निर्माण करणारी असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई न केल्यास मुंबई उच्च न्यायालयामध्ये विशेष जनहित याचिका दाखल करून न्याय मिळवला जाईल अशी स्पष्ट भूमिका नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने घेण्यात येत आहे

पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर केल्यानंतर सविस्तर त्यांच्या निदर्शनास आणून दिली असून याप्रकरणी आपण लक्ष घालून योग्य ती कारवाई करू असे त्यांनी आश्वासन दिले