Home Blog Page 81

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

पुणे, दि. २८: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून विविध योजनेंची ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत होती, तथापी नागरिकांकडून कागदपत्रांची पुर्तता करण्याकरिता व इतर कारणांस्तव अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत मागणी होत आहे.

नागरिकांची मागणी व सोडतीसाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. सोडतीसाठीचे नवीन वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार असून इतर मजकूरही ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीप्रमाणे राहील, असे म्हाडाचे मुख्य अधिकारी राहूल साकोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत, मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली माहिती

मुंबई, दि. 28 : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत 8 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले असून, याचा लाभ 40 लाख शेतकर्‍यांना होतो आहे. आणखी 11 हजार कोटी रुपये वितरित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. ही मदत पुढच्या 15 दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी 11 हजार कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आल्याने मदतीसाठी निधीची कुठलीही कमतरता नाही. पुढील 15 दिवसांत ही मदत अतिवृष्टग्रस्त जिल्ह्यातील किमान 90 टक्के शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी जशा याद्या मिळाल्या, तसा निधी वितरित करण्यात आला. ज्यांना केवळ दोन हेक्टरसाठी मदत मिळाली आहे, त्यांना पुढील हेक्टरसाठीचे अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, काही शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत, तर काहींच्या नोंदींमध्ये त्रुटी आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसून आले. या सर्व बाबी तपासून उर्वरित 10 टक्के शेतकर्‍यांपर्यंतही तातडीने मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कुणीही पात्र शेतकरी मदतपासून वंचित राहू नये व अपात्र खातेधारकांच्या खात्यावर निधी जावू नये, यासाठी ई-केवायसी केली जात आहे. अ‍ॅग्रीस्टॅकचा डेटा राज्य शासनाकडे असून यामध्ये ज्या शेतकर्‍यांची माहिती उपलब्ध आहे. त्यांची पुन्हा ई-केवायसी केली जात नसून सहायता निधी थेट त्यांच्या खात्यात जमा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणी करा: मुख्यमंत्री श्री. फडणवीस
शेतमालाच्या खरेदीसाठी राज्यात नोंदणी सुरू केली जात असून यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. अशा नोंदणीमुळे पारदर्शकता आली असून आता शेतकर्‍यांना हमी भाव मिळत आहे. यापूर्वी व्यापारी शेतकर्‍यांकडून कमी दराने माल घेवून शासनाला जास्त दराने विकला जात असे. नोंदणी करून शासकीय खरेदी केंद्रावर किंवा शासनाने जाहीर केलेला हमी भावाप्रमाणे खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांनाच मालाची विक्री करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले आहे.

रामेश्वर नगरीत विश्वधर्मी मानवतातीर्थ भवनाची उभारणी

लवकरच लोकार्पण सोहळा जगभरातील मान्यवर येणार डॉ. प्रा. विश्वनाथ कराड
      पुणे :- सर्वधर्मसमभाव आणि विश्वबंधुत्वाचा एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर (रुई) हे महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील स्वावलंबी व आदर्श गाव म्हणून उदयास आले असून येथे भव्य दिव्य उभारण्यात आलेल्या  ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’च्या माध्यमातून संपूर्ण जगाला ‘वसुधैव कुटुंबकम्’ व ‘एकं सत् विप्रा बहुदा वदंती’ हा मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
         राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी एक आदर्श व स्वयंपूर्ण खेडे कसे असावे, याची संकल्पना मांडली या संकल्पनेला अनुसरून डॉ प्रा. विश्वनाथजी कराड यांच्या पुढाकाराने रामेश्वर (रुई) येथे आदर्शवत् व स्वावलंबी असे खेडे निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांसोबत, रामेश्वर (रुई) गावाचे रूप पालटून आता त्याची विश्वधर्मी मानवता तीर्थ अशी ओळख निर्माण झाली आहे. प्रभु श्रीराम मंदिर, जामा मस्जिद व हजरत जैनुद्दिन चिस्ती दर्गा याचे पुर्ननिर्माण रामेश्वर (रुई) गावातील समस्त हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन केले व सर्वधर्मसमभाव आणि विश्वबंधुत्वाचा एक नवा आदर्श भारतासमोर ठेवला. त्याचप्रमाणे, भारतातील सर्वात मोठा लाल मातीचा कुस्ती आखाडा, ग्रामीण रुग्णालय व वाचनालय, सर्व धर्मांचा संदेश देणारा विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू, तथागत भगवान गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, रामेश्वर (रुई) चे श्रद्धास्थान असलेले संत श्री गोपाळबुवा महाराज यांचे अत्यंत सुंदर समाधी मंदिर अशा विविध समाजोपयोगी उपक्रमातून रामेश्वर (रुई) हे महात्मा गांधींच्या स्वप्नातले स्वावलंबी व आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
         विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन’ लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर येथे साकार होत असून याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस डॉ प्रा विश्वनाथ कराड यांच्यासह प्रगतशील शेतकरी काशीरामनाना कराड, डॉ महेश थोरवे आणि गिरीश दाते यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉ प्रा विश्वनाथजी कराड म्हणाले की,
विश्वशांती, सर्वधर्मसमभाव, विश्वबंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणारी एकमेवाद्वितीय वास्तु रामेश्वर (रुई) येथे साकार होत असून या वास्तूस ‘विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन’ असे नामकरण करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीचे ‘वसुधैव कुटुंबकम्’ व ‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’ हे संदेश जगाला विनाशापासून वाचवू शकतात, अशी आमची धारणा आहे आणि हाच संदेश एकमेवाद्वितीय अशा ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’च्या माध्यमातून संपूर्ण जगाला देण्याचा हा प्रयत्न आहे.
       विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन हे २५० फूट लांब आणि ९० फूट रुंद एवढ्या मोठ्या छताचे उभारणी केली असून भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीकच म्हणावे लागेल. या भवनात मानवतेचा इतिहास घडविणाऱ्या अनेक थोर संत, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ यांच्या भव्य चित्रांमधून आणि त्यांच्या संदेशांमधून मानवता भवनाचे एक आगळेवेगळे दर्शन समाजाला घडेल, यात शंका नाही या भावनाचा योग ध्यानधारणा व ओकार साधना, केंद्र, सरपंच परिषद तसेच इतर ग्रामपंचायती संबंधी कार्यक्रम, कृषी मेळावे, कुस्ती स्पर्धा तसेच टेबलटेनिस, कॅरम इ. इनडोअर खेळ, रक्तदान शिबिरे, विविध विषयांवरच्या परिषद चर्चासत्र कार्यशाळा, मुलांसाठी संस्कार शिबिर, महिला बचत गटांच्या बैठका / मेळावे, लोकशिक्षण व साक्षरता कार्यक्रम, पत्रकारांसाठीचे मेळावे, लोकोपयोगी प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम, वारकरी प्रशिक्षण केंद्र, भागवत सप्ताह, भजन / कीर्तन / भारूड संबंधी कार्यक्रम, विविध वस्तूंचे प्रदर्शन
या शिवाय इतर विविध लोकोपयोगी कार्यक्रमाठी वापर केला जाणार आहे.
       सदरील रामेश्वर (रुई) येथे साकारण्यात आलेल्या ‘अद्वितीय विश्वधर्मी मानवतातीर्थ विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन’ या वास्तूचा लोकार्पण सोहळा १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमास देशभरातीलच नव्हे तर जगभरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे अत्यंत अस्मरणीय असा लोकार्पण सोहळा होईल. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी चे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी काशीराम दा कराड, गिरीश दाते आणि डॉक्टर महेश थोरवे उपस्थित होते.

फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडितेच्या कुटुंबीयांशी संवाद साधत दिले न्यायाचे आश्वासन

सातारा, दि. २८ ऑक्टोबर २०२५ :
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने (Phaltan Doctor Case) संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या प्रकरणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधून त्यांना सांत्वन दिले तसेच न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

डॉ. गोऱ्हे यांनी या संवादादरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांची वेदना जाणून घेतली व सांगितले की, “ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी आवश्यक त्या सर्व स्तरांवर पाठपुरावा केला जाईल.”

त्या पुढे म्हणाल्या की, “मी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच फलटण व साताऱ्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेणार आहे. पीडितेने केलेल्या लेखी तक्रारीवर कोणती कारवाई झाली याची सखोल चौकशी केली जाईल. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रताडना प्रतिबंध समितीने’ कोणती पावले उचलली, हे देखील तपासले जाईल.”

डॉ. गोऱ्हे यांनी पुढे स्पष्ट केले की, “पीडित कुटुंबीयांची मागणी बीड न्यायालयात खटला चालवण्याची असल्यास, त्याबाबत विधी व न्याय विभागाशी तसेच उच्च न्यायालयाशी आवश्यक चर्चा करून निर्णय घेता येईल. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विधी सचिवांनाही पत्र पाठवले जाईल.”

यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या संगीता चव्हाण, माजी आमदार गोविंद केंद्रे व केशव आंधळे यांच्याशीही डॉ. गोऱ्हे यांनी चर्चा केली. त्यांनी सर्व संबंधितांना न्यायप्रक्रिया वेगाने पार पाडावी आणि पीडित कुटुंबीयांना आधार मिळावा यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले.

डॉ. गोऱ्हे यांनी शेवटी पीडितेच्या कुटुंबीयांना दिलासा देत म्हटले की, “तुम्ही एकटे नाही, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. मुलगी अत्यंत हुशार आणि कर्तृत्ववान होती, तिच्या आत्म्यास शांती लाभो आणि न्याय मिळावा, हे आमचे कर्तव्य आहे.”

चक्रीवादळ मोंथा आंध्रच्या किनारपट्टीपासून 50km दूर:15kmph वेगाने पुढे सरकतेय-120 रेल्वे-52 उड्डाणे रद्द

4 राज्यातील 50,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

मोंथा चक्रीवादळाचे परिणाम मुंबईतही जाणवत आहेत, जिथे मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी चक्रीवादळ मोंथा साठी रेल्वेच्या तयारीचा आढावा घेतला.रेल्वे अधिकाऱ्यांना चक्रीवादळ प्रभावित भागात रेल्वे सेवा वेळेवर थांबवण्याचे, सुरक्षा उपाययोजना वाढविण्याचे आणि आवश्यक असल्यास प्रवाशांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. रेल्वेने हाय अलर्ट जारी केला आहे आणि सर्व नियंत्रण कक्ष सक्रिय केले आहेत.कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असेल असे त्यांनी सांगितले.
विशाखापट्टणम चक्रीवादळ इशारा केंद्राच्या उपसंचालकांनी सांगितले की, मोंथा चक्रीवादळ आज काकीनाडा किनाऱ्यावर धडकणार आहे.
चक्रीवादळ मोंथाच्या प्रभावामुळे पुरी येथील समुद्र अत्यंत धोकादायक आणि खवळलेला आहे. अग्निशमन विभागाचे अधिकारी जिग्यांशु बेहरा म्हणाले की, अपघातांचा धोका जास्त असल्याने समुद्रात प्रवेश पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आला आहे.


बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले चक्रीवादळ मोंथा मंगळवारी सकाळी तीव्र वादळात रूपांतरित झाले. सध्या ते मछलीपट्टनमपासून सुमारे १९० किमी आग्नेयेस केंद्रित आहे. त्याचा परिणाम आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बंगाल आणि ओडिशातील जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे.या राज्यांमध्ये ९० ते ११० किमी प्रतितास वेगाने वारे उसळत आहेत. भूस्खलनाच्या वेळी ५ मीटर (१६ फूट) उंचीच्या लाटा उसळतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. चारही राज्यांमधील किनारी भागातून ५०,००० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ५५ हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याच्या मते, काकीनाडा-मछलीपट्टनम किनाऱ्याजवळ येताच वादळ तीव्र होईल. मोंथा चक्रीवादळ पुढे सरकत असल्याने काकीनाडा येथे समुद्र खवळला आहे. सध्या ते मछलीपट्टनमपासून सुमारे १९० किमी आग्नेयेस केंद्रित आहे. हवामान खात्याच्या मते, पुढील ३ दिवस या वादळामुळे केरळ, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि झारखंडमध्ये पाऊस पडू शकतो.थायलंडने वादळाला मोंथा हे नाव दिले. थाई भाषेत याचा अर्थ सुगंधित फूल असा होतो. मंगळवारी सकाळपासून आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये ९० ते ११० किमी प्रतितास वेगाने पाऊस आणि वारे वाहत आहेत.

चक्रीवादळ मोंथाच्या प्रभावामुळे विजयवाडामध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. एनटीआरच्या जिल्हाधिकारी लक्ष्मी शाह यांनी लोकांना घरातच राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.विभागीय स्तरावरील पथके आणि पोलिस दल जिल्ह्यातील गावांवर लक्ष ठेवून आहेत. रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी आणि आपत्कालीन सेवा सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.

अदिदासच्या नावावर गाझियाबादच्या कंपनीचा ट्रॅकसुट मारला खेळाडुंच्या माथी..१२ कोटीच्या निधीचा अपहार

पुणे : तीन नॅशनल गेमसाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या १२ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी दिला असताना त्या निधीचा अपहार करुन खेळाडुंना निकृष्ट दर्जाचे साहित्य दुप्पट किंमतीला खरेदी केल्याचे दाखवून शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे महासचिव नामदेव संपत शिरगावकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नामदेव संपत शिरगावकर Namdev Sampat Shirgaonkar (रा. कोरोल्ला ज्युएल हौसिंग सोसायटी,मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे.याबाबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगार संघ या संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप उत्तमराव भोंडवे (वय ५१, रा. जाणता राजा कुस्ती केंद्राजवळ, लोणीकंद) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडुंसाठी अदिदास या कंपनीचे ट्रॅकसुट प्रत्येकी २५०० रुपयांना घेतल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु ते ट्रॅकसुट ओरीजनल कंपनीचे नसून नाझीयाबाद येथील एक्झॉटिका एलियन या कंपनीकडून प्रत्येकी १२०० रुपयांना मुंबईतील विरा स्पोर्टस यांनी खरेदी केलेले आहेत. परंतु हे ट्रॅकसुट महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन यांनी पुण्यातील दत्तवाडी येथील अजिंक्य सप्लायर्स यांच्याकडून २५०० रुपयांना खरेदी केल्याचे दाखविले आहे. असा प्रकार ब्लेझर, शुज, टी शर्ट, टर्कीश टॉवेल, कीट बॅग याबाबतीत देखील झाल्याचे संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच खेळाडुंच्या विमान प्रवासावर ७१ लाख ९६ हजार ८७२ रुपये इतका अवास्तव खर्च दाखविण्यात आला आहे. अपहार लपविण्यासाठी ते खोट्या व बोगस पावत्या गोळा करत असल्याची खात्रीशीर माहिती आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते याप्रकरणी तपास करीत आहेत.

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन ही खेळ संघटना महाराष्ट्रातील सर्व खेळांची शिखर संघटना आहे. तिला भारतीय ऑलिंपिक असोसिएशनची संलग्नता असल्याने राज्यातील प्राविण्यधारक खेळाडुंना पुरस्कार देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना ५ टक्के गुणांची सवलत देण्यासाठी शासनाकडे यासंघटनेची शिफारस लागत असते. तसेच प्रत्येक ४ वर्षांनी होणाऱ्या नॅशनल गेम्स करीता महाराष्ट्र शासनाकडून निधी घेऊन राज्यातील विविध खेळांचे संघ पाठवण्यासाठी जबाबदारी सुद्धा या असोसिएशनकडे असते. महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे नामदेव शिरगावकर हे महासचिव म्हणून मागील ४ वर्षांपासून कामकाज पहात आहेत.शिरगावकर यांनी स्वत:चे नातेवाईक व जवळच्या व्यक्तींना सोबत घेऊन अनेक खेळ संघटना स्थापन केल्या असून ते स्वत: त्या संघटनेच्या विविध पदावर काम करतात.

नामदेव शिरगावकर यांच्या काळात २०२२ मध्ये गुजरात नॅशनल गेम्ससाठी ३ कोटी ५० लाख, ऑक्टोबर २०२३ मध्ये गोवा नॅशनल गेम्ससाठी ४ कोटी रुपये व जानेवारी २०२५ मध्ये उत्तराखंड नॅशनल गेम्ससाठी ४ कोटी ९५ लाख अशा प्रकारे ३ नॅशनल गेम्ससाठी महाराष्ट्र शासनाने स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी व खेळाडुंचे कोचिंग कॅम्पसाठी १२ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनकडे वर्ग केला होता.

निधी घेतल्यानंतर त्याच्या हिशोबाची बिले व पावत्यासहीत त्या वर्षाचे अखेर ३१ मार्च अगोदर शासनास सादर करणे आवश्यक असते. परंतु, गुजरात नॅशनल गेम्स वगळता इतर २ स्पर्धांचा खर्च महासचिव नामदेव शिरगावकर यांनी अद्याप शासनाला सादर केला नाही. फक्त गुजरात नॅशनल गेम्सचा हिशोब सादर करताना लेखा परीक्षण अहवाल सादर केला आहे. त्याच्या पावत्या, बिले व पुरवठादारांना सादर केलेली कागदपत्रे इत्यादी माहिती शासनास सादर केली नाही. त्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगावकर यांना नोटीस बजावली असून त्याबाबत ३ ऑक्टोंबरपर्यंत सर्व हिशोब सादर करण्यास मुदत दिली होती. परंतु त्यांनी हिशोब सादर केला नाही.

गुजरात नॅशनल गेम्सकरीता शासनाने ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी दिला होता. त्याचे लेखापरिक्षण अहवाल त्यांनी सादर केला. ऑडिट रिपोर्टमध्ये जो खर्च दाखविण्यात आलेला आहे. त्यामध्ये अनेक बाबतीत ताळमेळ बसत नाही.

महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच: हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश.

नांदेड, दि. २८ ऑक्टोबर

अतिवृष्टी व महापूरामुळे झालेल्या नुकसानीपोटी महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारने जाहीर केलेले ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज हे फसवे आहे त्याचप्रमाणे आज मंत्रिमंडळ बैठकीत ११ हजार कोटी रुपयांच्या वितरणाला दिलेली मान्यताही फसवीच आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असून हेक्टरी सरसकच ५० हजार रुपये दिले पाहिजे याचा पुनरुच्चार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

नांदेड येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा व महायुती सरकारवर तोफ डागली. लोकसभातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत सपकाळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे मतांची चोरी करुन मुख्यमंत्री झाले आहेत जो माणूस स्वतः चोर मुख्यमंत्री (चो. मु.) आहे, चिप मुख्यमंत्री आहे म्हणून ते असेच चिप वक्तव्य करत आहेत. अशा पद्धतीने खालच्या पातळीवरच्या टीकेने राहुल गांधी यांचे नेतृत्व व कर्तृत्व कमी होत नाही, असे प्रत्युत्तर हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

नांदेड हा काँग्रेस विचाराचा जिल्हा असून काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तो नेत्यांचा पक्ष नाही. आजही नांदेड जिल्हा काँग्रेस विचाराचाच आहे व उद्याही काँग्रेस विचाराचाच राहिल. काँग्रेस पक्षात इतर पक्षातून येणाऱ्यांचा ओघ वाढत आहे. काल गडचिरोलीत आज नांदेड जिल्ह्यात तर उद्या जालना जिल्ह्यात पक्ष प्रवेश होत आहे. हा राहुल गांधी यांच्या संघर्षाचा परिणाम असून काँग्रेस विचारावर विश्वास ठेवून हे पक्ष प्रवेश होत आहेत याने पक्षाला बळ मिळत असून महाराष्ट्रात काँग्रेसला गतवैभव प्राप्त होतील असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुपडासाफ करा, या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांचेच दात त्यांच्या घशात जातील असे सपकाळ म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश..

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थिती नांदेडमध्ये आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास सुमठाणकर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात ४ माजी नगराध्यक्ष, २३ माजी नगरसेवक, ८ नगरसेवक, २ माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी पंचायत समिती सभापती, माजी पंचायत समिती सदस्य यांचा समावेश आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

महावितरणच्या झटपट योजनेचा उद्योजकांना लाभ

0

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२५:
घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक अशा सर्व वीज ग्राहकांना गरजेनुसार वीजवापर वाढविण्यासाठी महावितरणने झटपट स्वयंचलित परवानगी योजना राबविल्यामुळे राज्यातील ४,१६४ वीज ग्राहकांनी सुमारे एक महिन्यात २२ मेगावॅट क्षमता वाढवून घेतली. यामध्ये २४६० औद्योगिक वीज ग्राहकांचा समावेश असून दिवाळीपूर्वी मागणीनुसार उत्पादन वाढविण्यास त्यांना मदत झाली.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी सांगितले की, वीज ग्राहकांना अधिकाधिक सहजपणे सेवा मिळण्यासाठी प्रक्रियेत बदल करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार ‘इज ऑफ लिव्हिंग’च्या सूत्रानुसार महावितरणने वीज ग्राहकांसाठी मंजूर भार वाढविण्यासाठी (लोड एनहान्समेंट) एक स्वयंचलित व्यवस्था सुरू केली आहे.

या योजनेमध्ये ग्राहक घरबसल्या महावितरणच्या मोबाईल ॲप्लिकेशन किंवा वेबसाईटवर अर्ज सादर करून आणि योग्य शुल्क भरून आपला मंजूर भार वाढवून घेऊ शकतात. ग्राहकाने शुल्क भरल्यानंतर ४८ तासात त्याला परवानगी असलेला मंजूर भार वाढवून दिला जातो.

महावितरणने ही सुविधा २६ सप्टेंबर रोजी सुरू केली. महिनाभरात राज्यातील ४,१६४ ग्राहकांनी नव्या सुविधेचा लाभ घेतला. त्यामध्ये सर्वाधिक २,४६० औद्योगिक वीज ग्राहक आहेत. घरगुती ग्राहकांची संख्या ९४२ असून ५०९ व्यावसायिक ग्राहकांनी सुविधेचा लाभ घेतला. याखेरीज २५३ अन्य ग्राहकांनाही लाभ झाला.

वीज ग्राहकांना महावितरणकडून कनेक्शन देताना त्यांच्या मागणीनुसार वीज वापराबाबतची क्षमता निश्चित केली जाते, त्याला मंजूर भार म्हणतात. औद्योगिक ग्राहकांना उत्पादनात वाढ होत असेल किंवा अधिक क्षमतेची यंत्र सामुग्री वापरायची असेल तर अधिक भार मंजूर करून घ्यावा लागतो. सामान्यतः घरगुती वीज ग्राहकांचा मंजूर भार दोन ते पाच किलोवॅट इतका असतो. ग्राहकांना एअर कंडिशनिंगसारख्या सुविधा बसविण्यासाठी भार वाढवून घ्यावा लागतो. महावितरणने सुरू केलेल्या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना घरबसल्या ऑनलाईन सेवा उपलब्ध झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने गेल्या साडेतीन वर्षात वीज वितरण जाळे अधिक मजबूत केले आहे. तसेच ग्राहकांच्या वाढत्या गरजेनुसार वीज उपलब्ध होण्यासाठी वीज खरेदी करार केले आहेत. त्यामुळे महावितरण ग्राहकांच्या मागणीनुसार तातडीने अधिक भार मंजूर करू शकत आहे.

महावितरणच्या राज्यभरातील वीज ग्राहकांसाठी १ जुलैपासून नवीन वीजदर रचना लागू झाली आहे. प्रथमच सर्व प्रवर्गातील वीज ग्राहकांच्या वीज दरात कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीज वापरासाठी दरामध्ये अतिरिक्त सवलतही देण्यात येत आहे. त्याचा लाभ घेऊन अनेक वीज ग्राहकांचा वीज वापर वाढला आहे. त्यासाठी त्यांना त्यांच्या कनेक्शनसाठीचा भार वाढवून घेणे उपयुक्त ठरत आहे.

खासदार क्रीडा महोत्सव २०२५’ यशस्वीतेसाठी भाजपा नेते कार्यकर्ते एकत्रित बैठक…

पुणे- खासदार क्रीडा महोत्सव २०२५’ यशस्वीतेसाठी भाजपा नेते कार्यकर्ते एकत्रित बैठक येथे संपन्न झाली.

यावेळी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले कि,’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ या संकल्पनेतून प्रेरित होऊन संपूर्ण देशभर ‘खासदार क्रीडा महोत्सव २०२५’ आयोजित केला जात आहे. त्याच अनुषंगाने पुणे शहरात २ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये आरोग्याची जाणीव निर्माण करणे, सामाजिक ऐक्य दृढ करणे आणि खेळांद्वारे एक सक्षम व निरोगी भारत घडवणे, हा या महोत्सवामागचा उद्देश आहे. या खासदार क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे भाजपा मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर कार्यालयात सविस्तर नियोजन बैठक घेतली. या बैठकीदरम्यान भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांना या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. खरंतर खेळ हे विकास आणि संघभावनेचा पाया आहेत. त्यामुळे खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकात फिटनेसची सवय रुजवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खेलो इंडिया, फिट इंडिया’ या संकल्पनेला अनुसरून, पुणे लोकसभेतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विविध वयोगटांसाठी क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या माध्यमातून स्थानिक तरुणाईला निश्चितच प्रोत्साहन मिळेल, तसेच, उदयोन्मुख खेळाडूंना पुढे येण्याची संधी उपलब्ध होईल. या बैठकीस आमदार भीमराव तापकीर, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, पुनीत जोशी, बापू मानकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोककलांच्या जतन संवर्धनासाठी समिती स्थापन करावी— उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. २८ ऑक्टोबर

राज्यातील लोककला, लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलांच्या जतन व संवर्धनासाठी समिती स्थापन करावी, अशी सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

विधानभवनात लोककलावंतांच्या समस्या, आव्हाने आणि उपाययोजना” या विषयावर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. चौरे, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, सुशांत शेलार, लोककलावंत नंदेश उमप, डॉ. भावार्थ देखणे आणि खंडूराज गायकवाड उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात विविध लोककला हा अमूल्य वारसा आहे. मात्र, या कलांना आधुनिक काळात आवश्यक ते प्रोत्साहन आणि संरक्षण मिळणे गरजेचे आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, सांस्कृतिक विभागाने लोककलांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी. या समितीमार्फत लोककलांचे सहंतीकरण, संकलन, तसेच लोककलांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे संग्रहालय स्थापनेचे काम हाती घेता येईल. तसेच विविध लोककला महोत्सव राज्यभरात व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचे नियोजनही या समितीमार्फत करता येईल.

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार म्हणाले की, लोककलावंतांच्या समस्या, आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना करण्यासाठी समितीची स्थापना आवश्यक आहे. या समितीच्या माध्यमातून शिक्षण विभागाशी समन्वय साधून लोककला विषयक प्रमाणपत्र कोर्सेस राबविण्याचे नियोजन करण्यात येईल. तसेच लोककलावंतांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत उपस्थित लोककला अभ्यासक लोककलावंतांनीही आपले विचार मांडले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारांनाजात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत मिळणार


मुंबई- राज्यातील महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींसाठी तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मिळणार आहे. याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
या निर्णयानुसार आता मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यात येईल. तसेच तत्पूर्वी त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल.
तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील तरतूदीत सुधारणा करण्यात येईल. या अनुषंगानेही महाराष्ट्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत देणे, अध्यादेश २०२५ काढण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ही दोन्ही अध्यादेश राज्यपाल महोदयांच्या मान्यतेने काढण्यात येणार आहेत.

जैन ट्रस्ट आणि गोखले बिल्डरला ‘व्यवहार रद्द ‘ बाबत चे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

पुणे: जैन ट्रस्टच्या भूखंडाचा सुमारे २३० कोटींचा व्यवहार रद्द करण्याची पुण्यातील गोखले बिल्डर, जैन ट्रस्टने या दोघांनी तयारी दाखवली आहे. दरम्यान, पुण्यातील शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनीतील जैन ट्रस्ट (सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट) प्रकरणात राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी २० ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेला जैसे थे आदेश ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढविला आहे. तोवर या दोघांना आपल्या भूमिकेबाबत प्रतिज्ञा पत्र सादर करण्यास सांगितले आहे.त्यामुळे आता पुढील सुनावणी येत्या गुरुवारी होणार आहे.हा व्यवहार वादग्रस्त ठरल्यानंतर जैन समाजाच्यावतीने धर्मादाय आयुक्तांकडे या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीत ट्रस्ट संबंधित अर्जदारांतर्फे अ‍ॅड. योगेश पांडे तर प्रतिवादी ट्रस्ट आणि गोखले लँडमार्क एलएलपीतर्फे अ‍ॅड. इशान कोल्हटकर आणि अ‍ॅड. एन. एस. आनंद उपस्थित होते. दोन्ही प्रतिवादींनी जैसे थे वाढविण्यास हरकत घेतली नाही. या दरम्यान, अक्षय जैन, सीए आनंद कांकरिया, लक्ष्मीकांत खाबिया, स्वप्निल गंगवाल, महावीर चौगुले आदी उपस्थित होते. जैन बोर्डिंग प्रकरणी काही दिवसांपूर्वी गोखले बिल्डरकडून हा व्यवहार रद्द करण्यात येत असल्याचा ई-मेल द्वारे कळवण्यात आले होते. त्यानंतर आता ट्रस्टच्यावतीनेही व्यवहार रद्द करण्यासही धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती ट्रस्टच्या वकिलांनी दिली आहे. गोखले ग्रुपने माघार घेतल्यानंतर आता ट्रस्टही अधिकृत माघार घेणार असे सांगण्यात आले.
दरम्यान मॉडेल कॉलनीतील ‘शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट’मध्ये एक हजार ४५२ चौरस फूट जागेत भगवान दिगंबर जैन महावीरांचे मंदिर असून, तेथे जैन समाजाचे नागरिक दर्शनासाठी येतात, असा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी सादर केला आहे.

सरहद संस्थेच्या वतीने ज्योतिरादित्य शिंदे आणि आसामचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गुवाहाटी, आसाम येथे डॉ. भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ

पुणे : यंदाचे वर्ष भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त सरहद संस्थेच्या पुढाकाराने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून ईशान्य भारतविषयक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते आणि आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच नागालँड विद्यापीठाचे कुलपती डॉ. समुद्र गुप्त कश्यप यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण सोमवार दि.03 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.15 वा. गुवाहाटी, आसाम येथील ईशान्य भारत विकास परिषद गुवाहाटी येथील सभागृहात करण्यात येणार आहे.
डॉ.भूपेन हजारिका आणि सरहद संस्थेचे त्यांच्या अंतिम काळात म्हणजेच 2008 ते 2011 सलोख्याचे संबंध तयार झाले होते. संगिताच्या माध्यमातून हिंसाचाराची तीव्रता कमी करता येते आणि माणूस हा केंद्रबिंदू मानून काम करण्यासाठी काही योजना आखण्यात आल्या होत्या. मुंबई आणि महाराष्ट्राला ते कर्मभूमी मानत असत.
हजारिका यांच्या मृत्यूनंतर 2012 पासून संस्थेच्या वतीने त्यांच्या कुटुंबातील सर्वांच्या मान्यतेने ईशान्य भारतातील राष्ट्रीय पातळीवर कामगिरी करणार्‍या व्यक्तींना महाराष्ट्राच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात डॉ. भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. 51,000 रूपये, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यंदा मागील पाच वर्षाचे पुरस्कार मणिपूरमधील प्रसिद्ध गायिका आणि अभिजात नृत्य कलाकार लैश्राम मेमादेवी तसेच मिझोराममधील एल. आर. सायलो. अरूणाचल प्रदेश मधील प्रसिद्ध लेखक व प्रशासकीय अधिकारी येशे दोर्जी थोंगची मेघालयातील प्रसिद्ध इतिहासकार व भारतीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री प्रो. डेविड रीड सिमलीह, आसाममधील प्रसिद्ध प्रकाशक व संगीतकार तसेच आसामी साहित्याचे अभ्यासक पद्मश्री डॉ. सुरजा कांता हजारिका आणि प्रसिद्ध अभिनेत्री तसेच चित्रपट निर्मात्या रजनी बासूमतारी यांना देण्यात येणार आहे. तसेच या प्रसंगी भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभही करण्यात येणार आहे. ही माहिती सरहद संस्थेचे विश्वस्त अनुज नहार, शैलेश वाडेकर तसेच समन्वयक डॉ. शैलेश पगारिया आणि झाहीद भट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई

पुणे, दि. २८ ऑक्टोबर: राज्यात वाळू तसेच इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर, वाहतूक व तस्करीचे प्रकार रोखण्यासाठी महसूल व वन विभागामार्फत “महाराष्ट्र गौण खनिज (विकास व विनियमन) नियम, २०१३ लागू करण्यात आले आहेत. या नियमांनुसार संबंधित विभागांमार्फत समन्वयाने कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.
राज्य परिवहन प्राधिकरण, पुणे यांनी कळविल्यानुसार वाळू व इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वापर व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम तसेच त्याअंतर्गत असलेल्या तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती या कार्यक्षेत्रांमध्ये करण्यात येईल.
गुन्ह्यानुसार कारवाईचे स्वरूप पुढीलप्रमाणे ठरविण्यात आले आहे. ▪ पहिला गुन्हा: वाहन अटकाव करून ठेवणे व परवाना ३० दिवसांसाठी निलंबित करणे. ▪ दुसरा गुन्हा: वाहन अटकाव करून ठेवणे व परवाना ६० दिवसांसाठी निलंबित करणे,तिसरा गुन्हा: वाहन अटकाव करून ठेवणे व परवाना कायमस्वरूपी रद्द करणे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून अवैध उत्खनन व वाहतुकीविरुद्ध संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही शिथिलता न दाखवता तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

• १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन
• तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश

मुंबई दि. २८ : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई वातावरण सप्ताह – ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेच्या संकल्पनेतून साकारला जात असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाची घोषणा केली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, विभागाच्या सचिव जयश्री भोज, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी आदी उपस्थित होते. यावेळी ‘मुंबई क्लायमेट वीक’ च्या लोगोचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. विकसनशील देशांतील वातावरणीय बदल, अन्न व ऊर्जा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून विकास आणि पर्यावरणीय कृती यांच्यात संतुलन साधण्यासाठी तो प्रभावी भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई क्लायमेट वीकचा मुख्य कार्यक्रम १७ ते १९ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे पार पडेल. त्याचबरोबर या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी शहरभर विविध प्रदर्शने, कार्यशाळा, चित्रपट, कला, क्रीडा, आरोग्य आणि अध्यात्म यांच्याशी निगडीत उपक्रम, आणि क्लायमेट फूड फेस्टिव्हल सारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या परिषदेत ग्लोबल साऊथमधील ३० पेक्षा अधिक देशांमधील प्रतिनिधी सहभागी होणार असून यामध्ये व्यवहार्य असा हवामान बदल कृती कार्यक्रम तयार करण्यात येईल. विशेष म्हणजे हा कार्यक्रम राज्यांचे मुख्यमंत्री, विविध शहरांचे प्रतिनिधी, उद्योग, सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि युवक यांच्या सहभागातून तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते मुंबई क्लायमेट विकच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच या उपक्रमाची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई हवामान सप्ताह कृतीसह नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृढनिश्चयाचे प्रदर्शन करतो. माननीय पंतप्रधानांनी ठरवलेल्या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन, मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक दक्षिणेसाठी न्याय्य, नाविन्यपूर्ण, चांगल्या निधीसह हवामान भविष्य घडवण्यास मदत करण्यास तयार आहेत.
ग्लोबल साउथमधील वातावरणीय कृती आणि सहकार्य या क्षेत्रामधील भारताचे नेतृत्व सिद्ध करणारे मुंबई क्लायमेट वीक हे मोठे व्यासपीठ ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईत पहिल्यांदाच “मुंबई क्लायमेट वीक” कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. आता कृती करण्याची वेळ आली आहे.
यासाठी आपण समाजातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक व्यवसायाला आणि जीवनाच्या सर्व स्तरांना हवामान बदलाच्या परिणामांविरुद्ध मोहिमेत सहभागी व्हावे लागणार आहे. तसेच त्यांना कृतींद्वारे बदल कसे कमी करायचे हे प्रत्यक्षात सांगावे लागणार आहे.

“मुंबई क्लायमेट वीक” कार्यक्रम आयोजित केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र आणि मुंबईसाठी बेंचमार्क देखील निश्चित करावे लागतील, हवामान बदलाच्या क्षेत्रात कृती करण्यासाठी काही ध्येये निश्चित करावी लागतील. त्यासाठी आजपासून कृती सुरू करूया असेही ते म्हणाले.

तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्ते मुंबई क्लायमेट वीकच्या व्यासपीठावर एकत्र येऊन वातावरणीय बदलावरच्या सर्वंकष आणि व्यवहार्य उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करतील. हा उपक्रम भारत आणि विकसनशील राष्ट्रांचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचविणारा ठरेल, असेही ते म्हणाले.
मुंबई क्लायमेट वीकचा भर अन्न प्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी सक्षमता या तीन प्रमुख विषयांवर असेल. न्याय, नवोन्मेष आणि वित्तीय दृष्टीकोनातून हे विषय सखोलपणे मांडले जातील.

‘प्रोजेक्ट मुंबई’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती देताना सांगितले की, “मुंबई क्लायमेट वीक हा महाराष्ट्र आणि भारतासाठी एक ऐतिहासिक टप्पा असणार आहे. वातावरणीय बदलाला तोंड देण्यासाठी लोकसहभागावर आधारित असे शाश्वत आणि समावेशक उपाय या परिषदेतील मंथनातून तयार होतील.”

या उपक्रमाचे नॉलेज पार्टनर मॉनिटर डिलॉईट असणार असून क्लायमेट ग्रुप, इंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्ह, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिस्ट्यूट (इंडिया), एव्हरसोर्स, एचटी पारेख फाउंडेशन, युनिसेफ, शक्ती फाउंडेशन, रेनमॅटर फाउंडेशन, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि राष्ट्रीय सेवा योजना यासारख्या संस्था यात सहभागी होणार आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयातील यांचे अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार कौस्तुभ धवसे, प्रोजेक्ट मुंबईचे सल्लागार मंडळ सदस्य रिधम देसाई, जलज दाणी आदी यावेळी उपस्थित होते.