Home Blog Page 80

लोकमान्यनगर पुनर्विकास स्थगिती: हे सरकार नेमकं कोणाचं आहे — जनतेचं की बिल्डर्सचं?”आदित्य ठाकरेही आक्रमक

८०० घरांचे होणार १६०० घरे -जागा तेवढीच,रस्त्यांची रुंदी हि तेवढीच .. अन वाहने आणि माणसांची गर्दी मात्र वाढणार हे पर्यावरण प्रेमी ठाकरेंच्या लक्षात कसे येत नाही ?

पुणे : राज्यातील सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. “निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेलं हे सरकार आता जनतेचं न राहता ‘बिल्डर-कंत्राटदारांचं सरकार’ बनलं आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे. पुण्यातील लोकमान्य नगर पुनर्विकास प्रकल्पाला थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिलेल्या स्थगितीचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्स वर (ट्वीटर) एक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “लोकमान्य नगरमधील रहिवाशांनी स्वतःच पुनर्विकासाचा निर्णय घेतला होता. तो विकास त्यांनाच हवा होता. मात्र, अचानक स्थानिक आमदाराच्या पत्रावर मुख्यमंत्री कार्यालयाने या पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती दिली. असा निर्णय झटक्यात घेण्यामागे कारण काय आहे?”
ते पुढे म्हणाले की, “क्लस्टर विकासाच्या नावाखाली हीच जागा सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या बिल्डरकडे देण्याचा प्रयत्न सुरु आहे का? जर स्थानिक नागरिकांचं मत न ऐकता मुख्यमंत्री असा निर्णय घेत असतील, तर हे सरकार नेमकं कोणाचं आहे — जनतेचं की बिल्डर्सचं?”

याच पोस्टमध्ये त्यांनी पुण्यातील रस्त्यांवरील खोदकामावरूनही सरकारवर टीका केली आहे. “पुण्यातील बहुतांश रस्ते आता ऑप्टिक फायबर टाकण्यासाठी पुन्हा खोदले जाणार असल्याचं समोर आलं आहे. पण, या खोदकामासाठी मनपाकडून जो मोबदला आकारला जातो, तो सरकारचा लाडका कंत्राटदार असल्यामुळे माफ केला जाणार आहे का?” असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

निवडणुकीशी संबंधित सर्व शंका/तक्रारींच्या निराकरणासाठी “1950” हेल्पलाइन देशभरामध्‍ये

जिल्हास्तरावर मतदारांच्या मदतीसाठी ‘बुक-अ-कॉल विथ बीएलओ’ सुविधा

नवी दिल्‍ली, 29 ऑक्‍टोबर 2025

  1. नागरिकांच्या सर्व शंका/तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार हेल्पलाइन आणि सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी जिल्हास्तरीय ‘हेल्पलाइन’ सक्रिय केल्या आहेत.
  2. राष्ट्रीय संपर्क केंद्र (एनसीसी) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्रीय हेल्पलाइन म्हणून सेवा देईल. दररोज सकाळी 8:00 ते रात्री 8:00 पर्यंत 1800-11-1950 या टोल-फ्री क्रमांकाच्या माध्यमातून ती उपलब्ध असेल. नागरिकांना आणि इतर भागधारकांना निवडणूक सेवा आणि प्रश्नांमध्ये सहाय्य करणाऱ्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांद्वारे दूरध्वनीला उत्तर दिले जाईल.  
  3. वेळेवर आणि स्थानिक पातळीवर प्रतिसाद मिळावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्याला अनुक्रमे स्वतःचे राज्य संपर्क केंद्र (एससीसी) आणि जिल्हा संपर्क केंद्र (डीसीसी) स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही केंद्रे वर्षभर सर्व कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत कार्यरत राहून राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या प्रादेशिक भाषांमध्ये मदत पुरवतात.
  4. सर्व तक्रारी आणि शंका राष्ट्रीय तक्रार सेवा पोर्टल (NGSP 2.0) द्वारे नोंदवल्या जातात आणि त्यांचा मागोवा घेतला जातो.
  5. याव्यतिरिक्त केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘बुक-अ-कॉल विथ बीएलओ’ सुविधा सुरू केली असून याद्वारे ‘ईसीआयनेट- प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्याद्वारे, नागरिक आपापल्या बूथस्तरीय अधिकाऱ्याशी थेट संपर्क साधू शकतात. 
  6. नागरिक ईसीआयनेट अॅप वापरून निवडणूक अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधू शकतात. केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ), जिल्हा निवडणूक अधिकारी (डीईओ), मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांना  नियमितपणे प्रगतीचे निरीक्षण करण्याचे आणि वापरकर्त्यांच्या विनंतीचे 48 तासांच्या आत  निवारण करण्याचे निर्देश दिले आहेत.
  7. निवडणुकीशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विद्यमान यंत्रणेव्यतिरिक्त या सुविधा आहेत. नागरिक complaints@eci.gov.in वर ईमेल देखील पाठवू शकतात.
  8. निवडणूक आयोग सर्व मतदारांना त्यांच्या समस्यांचे त्वरित आणि पारदर्शक निराकरण करण्यासाठी निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती, अभिप्राय, सूचना आणि तक्रारींसाठी ‘बुक-अ-कॉल विथ बीएलओ’ आणि समर्पित मतदार हेल्पलाइन क्रमांक – 1950 सुविधांचा वापर करण्यास प्रोत्साहित करत आहे.

माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार:31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

हैदराबाद-माजी क्रिकेटपटू आणि एमएलसी मोहम्मद अझरुद्दीन यांना तेलंगणा सरकारमध्ये मंत्री म्हणून नियुक्त केले जाईल. ते शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी राजभवन येथे शपथ घेतील. ११ नोव्हेंबर रोजी जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत असल्याने हे घडले आहे. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या ३०% आहे. अझरुद्दीन यांच्या मंत्रिमंडळात प्रवेशाचा काँग्रेस पक्षाला फायदा होईल असे मानले जाते.

२०२३ मध्ये ते याच जागेवरून निवडणूक हरले. दरम्यान, तेलंगणा काँग्रेस सरकारमध्ये सध्या एकही मुस्लिम मंत्री नाही. यामुळे मंत्रिमंडळात मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व कमी असल्याचा आरोप होत आहे. अझरुद्दीन यांची मंत्री म्हणून नियुक्ती आता ही पोकळी भरून काढेल. त्यांच्या समावेशामुळे रेवंत रेड्डी यांच्या मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या १६ होईल, तर राज्यातील मंत्र्यांची कमाल संख्या १८ आहे.
जुबली हिल्स मतदारसंघातील प्रत्येक तिसरा मतदार मुस्लिम आहे: जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघात एकूण अंदाजे ३.९० लाख मतदार आहेत. त्यापैकी अंदाजे १.२० ते १.४० लाख मतदार मुस्लिम समुदायाचे आहेत. याचा अर्थ असा की येथील अंदाजे ३०% मते मुस्लिम आहेत. म्हणूनच या भागातील मुस्लिम मतदार निवडणूक निकाल निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मुस्लिम मते मिळवणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या विजयाची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. म्हणूनच, अझरुद्दीनला मंत्री बनवून काँग्रेसने या समुदायावरील आपला विश्वास मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
पण पोटनिवडणुकीत मुस्लिम उमेदवार नाही – आमदार गोपीनाथ यांच्या निधनानंतर, ज्युबिली हिल्स जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. मागंती सुनीता गोपीनाथ बीआरएसकडून, वल्लाला नवीन यादव काँग्रेसकडून आणि लंकाला दीपक रेड्डी भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. यावेळी, तीन प्रमुख पक्षांपैकी कोणत्याही पक्षाकडून मुस्लिम उमेदवार नाहीत.
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत अझरुद्दीनचा पराभव – २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत अझरुद्दीन यांनी जुबली हिल्स मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, परंतु बीआरएस उमेदवार मागंती गोपीनाथ यांच्याकडून १६,३३७ मतांनी त्यांचा पराभव झाला. बीआरएस उमेदवाराला ८०,५४९ मते मिळाली, तर अझरुद्दीनला ६४,२१२ मते मिळाली.
२०२३ च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत, काँग्रेसने ११९ पैकी ६४ जागा जिंकल्या, तर सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (BRS) ने ३९ जागा जिंकल्या. भाजपने आठ, AIMIM ने सात आणि CPI ने एक जागा जिंकली.अझरुद्दीन यांनी २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर मुरादाबाद येथून लोकसभा निवडणूक जिंकली. नंतर त्यांनी २०१४ मध्ये राजस्थानमधील टोंक-सवाई माधोपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला. २०१८ मध्ये त्यांना तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.

भारतासाठी ९९ कसोटी सामने खेळले

मोहम्मद अझरुद्दीन यांनी ९९ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. तो त्याचा १०० वा कसोटी सामना खेळणार होता तेव्हा त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप झाला. २००० मध्ये, बीसीसीआयने चौकशीनंतर अझरवर आजीवन बंदी घातली. तथापि, २०१२ मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने ही बंदी रद्द केली.

मानवतेचा धर्म पाळणे महत्वाचे – आमदार सिद्धार्थ शिरोळे

माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या वतीने पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दोन कंटेनर मदत रवाना

पुणे :  महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर हालाकीची परिस्थिती ओढावली आहे. अशा परिस्थितीत दिवाळी सारखा सण साजरा करताना त्यांच्या दु:खाची जाणीव आपण ठेवणे गरजेचे आहे. यालाचा मानवतेचा धर्म म्हणतात आणि तो पाळणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले.

पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर यांच्या वतीने सोलापू आणि मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत म्हणून अन्नधान्य, शालेय साहित्य याचे दोन कंटेनर आमदार शिरोळे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रवाना करण्यात आले यावेळी शिरोळे बोलत होते. 

याप्रसंगी सुनिता वाडेकर, परशुराम वाडेकर, शिक्षण मंडळ माजी सदस्य अमित मुरकुटे , रिपब्लिकन पक्षाचे  शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष अविनाश कदम, माजी नगरसेवक संभाजी शिंदे, माजी नगरसेवक आनंद छा जेड सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन काजी, जुबेर पिरजादे, रमेश नाईक आदींसह रिपाइं चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, माजी उपमहापौर सुनिता वाडेकर या पदावर असताना ज्या प्रमाणे काम करत होत्या त्याच प्रमाणे त्या आजही काम करत आहेत. दरवर्षी रिक्षाचालक आणि कष्टकरी सफाई कर्मचारी यांच्या समवेत वाडेकर दाम्पत्य दिवाळी साजरी करत आहेत. यंदा त्यांनी सामाजिक भान ठेवत मानवतेचा धर्म जपत मराठवाडा आणि सोलापूर येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना अन्न धान्य व शिक्षण साहित्याचे मदतीचे किट पाठवले आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे.

परशुराम वाडेकर म्हणाले, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी नुकसान झालेल्या मराठवाडा आणि सोलापूर येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत किट पाठवत आहोत. दोन कंटेनर भरून पाठवलेली ही मदत त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करेल अशी आशा आहे. सण साजरा करताना त्यांच्या सोबत आपली संवेदना आहेत, हेच सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यंदाही विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने रिक्षाचालक, आरोग्य कर्मचारी आणि  सफाई कर्मचारी यांच्यासाठी दिपावली स्नेह समारंभ आयोजित करण्यात आला होता.

लाईट्स, कॅमेरा, ॲक्रिडीशन!


56व्या इफ्फीकरिता माध्यम अधिस्वीकृतीसाठी अंतिम तारीख 5 नोव्हेंबर – त्वरित अर्ज करा!

माध्यमांसाठी वैशिष्ट्यपूर्ण संधी: इफ्फी 2025 मध्ये एफटीआयआयचा चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रम

मुंबई, 29 ऑक्टोबर 2025

माध्यम प्रतिनिधी म्हणून 56 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवामध्ये (इफ्फी) सहभागी होण्याची संधी तुम्ही शोधत आहात काय?

या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून माध्यम प्रतिनिधी म्हणून लगेच नोंदणी करा:

https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx

गोव्यात पणजी येथे दिनांक 20 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत 56 व्या इफ्फीचे आयोजन करण्यात येणार आहे. अधिस्वीकृत  माध्यम व्यावसायिकांना या महोत्सवातील चित्रपट सादरीकरणे, गट चर्चा, मास्टर क्लासेस तसेच जगभरातील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि कलाकारांशी संवाद साधण्यासाठी आयोजित नेटवर्किंग सत्रे अशा विविध कार्यक्रमांमध्ये विशेषत्वाने प्रवेश दिला जाईल.

यामध्ये आणखी भर घालत, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतर्फे (एफटीआयआय) 18 नोव्हेंबर 2025 रोजी चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये केवळ अधिस्वीकृतीप्राप्त  माध्यम प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे. यापूर्वी अशा अभ्यासक्रमात सहभागी होऊ न शकलेल्या पत्रकारांना यावर्षीच्या प्रवेशाच्या वेळी प्राधान्य दिले जाईल.

माध्यम प्रतिनिधींनी हे लक्षात घ्यावे की माध्यम अधिस्वीकृतीसाठीचे पोर्टल 05 नोव्हेंबर 2025 पर्यंतच खुले  असेल.

अर्जदारांनी पोर्टलवर दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे आणि वैध ओळखपत्र तसेच व्यावसायिक अधिकारपत्रांसह सर्व आवश्यक दस्तावेज अपलोड करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तपशीलवार पात्रता निकष आणि दस्तावेजीकरणविषयक मार्गदर्शक सूचना संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

यासंबंधी कोणतीही मदत किंवा चौकशी साठी कृपया iffi.mediadesk@pib.gov.in येथे पीआयबी इफ्फी माध्यम सहाय्य  डेस्कशी संपर्क साधावा.

पत्रसूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा म्हणाले,

“इफ्फी हा जगभरातील वैविध्यपूर्ण चित्रपटीय आवाजांना एकत्र आणणारा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. अधिस्वीकृती मिळवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडणे सुनिश्चित करून घेण्याप्रती तसेच या प्रतिष्ठित सोहोळ्याची समग्र  माहिती मिळवण्यासाठी पत्रकारांना मदत करण्याप्रती पत्रसूचना कार्यालय कटिबद्ध आहे.” 

गोव्यात पणजीच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर प्रदर्शनासाठी सज्ज झालेला इफ्फी सोहोळा जागतिक सहयोग आणि सर्जकतेची जोपासना करतानाच, भारताच्या चित्रपटीय वारशाचा उत्सव साजरा करतो. दर वर्षी 45,000 पेक्षा जास्त चित्रपट रसिक आणि व्यावसायिक या नऊ दिवसांच्या चित्रपटीय महोत्सवासाठी एकत्र येतात आणि जगभरातील प्रेक्षकांना प्रेरित करणाऱ्या, आव्हान देणाऱ्या आणि एकमेकांशी जोडणाऱ्या कथांचा रसास्वाद घेतात. आशियातील या प्रमुख चित्रपट उत्सवाचा भाग होण्याची संधी चुकवू  नका. आजच अर्ज करा आणि चित्रपटांच्या भव्य रंगमंचाकडे म्हणजेच इफ्फी 2025 कडे नेणारा तुमचा मार्ग निश्चिंत  करा!

महत्त्वाची माहिती:

👉🏻 माध्यमांना अधिस्वीकृतीसाठीचे पोर्टल:  accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx

👉🏻 माध्यम अधिस्वीकृती पोर्टल 15 ऑक्टोबर ते 05 नोव्हेंबर 2025 या काळात सक्रीय असेल.

👉🏻 महोत्सवाच्या तारखा : 20 ते 28 नोव्हेंबर 2025

👉🏻 स्थळ: पणजी, गोवा.

👉🏻 चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमाची तारीख : 18 नोव्हेंबर 2025

👉🏻 मदतीसाठी ईमेल: iffi.mediadesk@pib.gov.in

कोर्टाने दिलेली वेळ संपली पण ..बच्चू कडू यांचे आंदोलन सुरूच; म्हणाले- आम्ही आंदोलन स्थळ सोडू, पण आमची व्यवस्था तुरुंगात करा

साले तुम्ही डरपोक, कोर्टाला समोर करता : बच्चू कडू
बच्चू कडू यांनी आम्ही कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणार नाही, असं म्हटलं. मात्र, जर आंदोलन करायला आलेले सोबतचे लोक आंदोलन सुरू ठेवायचे आहे असे म्हणत असेल तर आम्ही आंदोलन सुरू ठेवू, असं बच्चू कडू म्हणाले. आता लोक न्यायालय आणि विधी न्यायालय यांच्यातला हा संघर्ष आहे. आम्ही न्यायालयाचा अवमान करणार नाही. मात्र, लोक न्यायालयाचे ऐकणे सोडणार नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.कोर्टाचा आदेश घेऊन पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी बच्चू कडू यांना भेटले. यामध्ये पोलिसांच्या स्पेशल ब्रॅचचे डीसीपी सातव यांचा समावेश होता.
बच्चू कडू यांनी साले तुम्ही डरपोक, कोर्टाला समोर करता, नामर्दांची औलाद आहे. असं म्हटलं जेल कमी पडेल, अटक करा,आता रामगिरी ताब्यात घेऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. तर, पोलिस अधिकाऱ्यांनी कोर्टाच्या आदेशाची प्रत बच्चू कडू यांना दाखविली.

नागपूर- प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनस्थळ सोडावे, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेत. नागपूर खंडपीठाचे आदेश आल्यानंतरही बच्चू कडू यांनी त्यांचे आंदोलन सुरूच ठेवले आहे. तसेच आम्ही आंदोलन स्थळावरून हटायला तयार, पण आमची व्यवस्था तुरुंगात करा, असा निर्धार केला आहे. त्यामुळे या आंदोलनाला आणखी आक्रमक वळण मिळण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, न्यायव्यवस्थेनेही जबाबदारीने वागले पाहिजे.

शेतकऱ्यांनी नागपूर-हैदराबाद महामार्ग (एनएच-44) काल जवळजवळ सात तास रोखला होता. त्यानंतर आजही आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. काही आंदोलकांनी रेल्वे रोको आंदोलन केले. तर काही आंदोलकांनी समृद्धी महामार्गही रोखला होता.

दरम्यान, बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आता सरकार सक्रिय झाले आहे. मंत्री पंकज भोयर आणि मंत्री आशिष जयस्वाल हे आज, बुधवार, दुपारी चार वाजता बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. या आंदोलनाची तीव्रता वाढू नये आणि सकारात्मक चर्चा होऊन विषयावर मार्ग निघावा, यासाठी ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांच्या भेटीनंतर बच्चू कडू हे आंदोलनाबाबत कोणती भूमिका घेतात आणि सरकारकडून नेमके कोणते आश्वासन मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

आंदोलनाबाबत बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले की, सरकारने निवडणुकीदरम्यान कर्जमाफी आणि पीक बोनसचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप कोणालाही कोणतीही मदत मिळालेली नाही. निदर्शकांनी “सात बारा कोरा” सारख्या घोषणा दिल्या. कडू यांनी इशारा दिला की जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ते बुधवारी दुपारी 12 नंतर रेल्वे गाड्या थांबवतील. बच्चू कडू यांनी दावा केला की बुधवारी आणखी 1,00,000 शेतकरी, ज्यात मोठ्या संख्येने महिलांचा समावेश आहे, आंदोलनात सामील होतील.

शेतकऱ्यांचा आरोप आहे की राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफी आणि बोनस देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. बच्चू कडू म्हणाले, “सरकारने प्रत्येक पिकावर 20% बोनस आणि सोयाबीनवर 6,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु शेतकऱ्यांना आतापर्यंत काहीही मिळालेले नाही. मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांना भेटण्यासाठीही वेळ नाही.”

गेल्या वर्षभरात दुष्काळ आणि गारपिटीमुळे पिके उद्ध्वस्त झाली आहेत, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. तरीही, सरकारने भरपाई प्रक्रियेत हलगर्जीपणा दाखवला आहे. “कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत,” कडू म्हणाले. “संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आम्ही गाव सोडणार नाही.”

स्वाभिमानी पक्षाचे नेते रविकांत तुपकर यांनीही सरकारवर निशाणा साधला आणि म्हणाले, “सरकारकडे महामार्ग आणि मेट्रो प्रकल्पांसाठी पैसे आहेत, पण शेतकऱ्यांसाठी नसल्याचे म्हटले आहे.
माजी राज्यमंत्री, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या आक्रमक भूमिकेसाठी आणि सार्वजनिक चळवळींसाठी ओळखले जातात. ते शेतकरी, तरुण आणि अपंगांशी संबंधित मुद्दे मांडतात.

या आंदोलनाचे मुख्य ठिकाण जामठा उड्डाणपूल होते, जो समृद्धी एक्सप्रेस वेचा प्रवेशद्वार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह जिल्हा आहे. आंदोलकांनी सांगितले की सरकारने आता शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ मध्ये ३१,६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले, ज्यामध्ये पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना १०,००० रुपयांची रोख मदत समाविष्ट होती. राज्य सरकारच्या मते, ही मदत २९ जिल्ह्यांमधील ६८ लाख हेक्टर पीक नुकसान आणि शेतकऱ्यांना दिली जाईल.

सप्टेंबरमध्ये, फडणवीस यांनी ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’च्या सातव्या हप्त्याअंतर्गत ९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १,८९२.६१ कोटी रुपये हस्तांतरित केले होते. तथापि, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की ही मदत अपुरी आहे आणि केवळ कर्जमाफी हाच कायमचा उपाय आहे.

शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनादेश सुपूर्त

पुणे, ता. २९ : मागील महिन्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील पिके वाहून गेली, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ‘सोमेश्वर फाउंडेशन’ आणि ‘सनीज फूड्स’ यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश सोमेश्वर फाउंडेशनचे विश्वस्त व माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सुपूर्त केला.

‘सोमेश्वर फाउंडेशन’ आणि ‘सनीज फूड्स’ यांच्या वतीने दरवर्षी सर्वसामान्यांना दर्जेदार फराळ सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला जातो. हजारो नागरिक हा फराळ विकत घेतात आणि “ना नफा, ना तोटा” या तत्वावर जनसामान्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड करण्याचे भाग्य निम्हण परिवाराला लाभते.

या फराळ विक्रीतून जमा झालेल्या रकमेतील काही हिस्सा मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा संकल्प निम्हण परिवाराने केला होता. या आवाहनाला नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळाला आणि तो संकल्प प्रत्यक्षात उतरला.

मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सनी विनायक निम्हण यांनी धनादेश सुपूर्त केला. या उपक्रमाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनापासून कौतुक केले आणि ‘सोमेश्वर फाउंडेशन’च्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या, अशी माहिती सनी विनायक निम्हण यांनी दिली.

राहुल गांधींचा डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद, न्यायाच्या लढाईत पाठीशी असल्याचे दिले आश्वासन..

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करा, रणजितसिंह नाईक निंबाळकरांना तात्काळ अटक करा: हर्षवर्धन सपकाळ

डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीआधीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याडून नाईक निंबाळकरांना क्लिन चिट.

पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार, सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी गप्प का?

मुंबई/बीड, दि. २९ ऑक्टोबर.

बीड जिल्ह्यातील कन्या डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्या आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. डॉक्टर संपदाने दबाव व छळाला कंटाळून आयुष्य संपवले. या प्रकरणी एसआयटी स्थापन करून करून हाय कोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी केली पाहिजे तसेच भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तात्काळ अटक करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बीड जिल्ह्यातील कवडगाव येथे जाऊन फलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अशोकराव पाटील, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनावणे आदी उपस्थित होते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी पीडित मुलीची आई व मुंडे कुटुंबातील लोकांशी फोनवरून संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. घाबरु नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारवर दबाव आणेल, असे आश्वासन त्यांनी दिले. राहुल गांधी यांनी संपाच्या कुटुंबियांकडून व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून या प्रकरणाची संपूर्ण माहितीही घेतली.

याभेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर चुकीचे कामे करण्यासाठी प्रचंड दबाव आणला जात होता, त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला. नाईक निंबाळकर यांच्या गुंडगिरीच्या अनेक घटना प्रकाशात आल्या आहेत. या घटनेतील कळस म्हणजे चौकशी करण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह निंबाळकर यांना जाहिर क्लिन चिट देऊन टाकली हे संताप आणणारे आहे. या प्रकरणाची चौकशी फलटण बाहेर करावी, उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी असून काँग्रेस पक्ष मात्र गप्प बसणार नसून डॉ. संपदा मुंडेला न्याय मिळवूण देण्यासाठी रस्त्यावर उतरेल. दिल्लीत कालच युवक काँग्रेसने आंदोलन केले आहे. महिला काँग्रेसही याप्रकरणी राज्यभर आंदोलन करेल, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, या प्रकरणी महिला आयोगाची भूमिकाही संताप आणणारी असून पीडित कुटुंबाला भेटून त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी होती पण त्यांनी आधी पोलीसांची भेट घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. महिला आयोगाने महिलांवर होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन काम करणे गरजेचे आहे पण त्यांनी तसे न करता पोलिसांची वकिली केली. डॉ. संपदा मुंडे ज्या समाजाची आहे त्या समाजातील एकही लोकप्रतिनिधी बोलत नाही. बीड जिल्ह्यात मध्यंतरी काही घटना झाल्या त्यावेळी येथील सत्ताधारी पक्षाचे एक आमदार दररोज प्रसार माध्यमासमोर येऊन भूमिका मांडत होते, आज ते गप्प आहेत. पंकजा मुंडे गप्प आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांचा दबाव झुगारून बोलले पाहिजे. मुंबईतील एक सामाजिक कार्यकर्त्या अनेक विषयावर आक्रमक भूमिका घेत असतात त्यांनीही या विषयावर मौन बाळगलेले आहे. नारायण गड व भगवान गडाला आमचे साकडं आहे की त्यांनी या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी पुढे यावे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी म्हटले आहे.

वेदनेतून निर्माण झालेली ‘प्रक्षोभ’ कलाकृती मराठी साहित्यातील वैभव : डॉ. श्रीपाल सबनीस

डॉ. प्रकाश जाधव लिखित ‘प्रक्षोभ’ कादंबरीचे प्रकाशन

पुणे : गावकुसाच्या आतील आणि गावकुसाबाहेरील अनेक व्यक्तिरेखा डॉ. प्रकाश जाधव यांनी मनोविश्लेषणात्मक पद्धतीने ‘प्रक्षोभ’ या कादंबरीत मांडलेल्या आहेत. बुद्धिवादी संवेदनशील मनाचा प्रकाश या कादंबरीतून दिसतो आहे. वेदनेतून निर्माण झालेली ही कलाकृती मराठी साहित्यातील वैभव आहे,असे गौरवोद्‌गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. वेदनेच्या जंजाळात अडकलेल्या या नायकाने कांदबरीच्या माध्यमातून आयुष्याचे सोने करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. प्रकाश जाधव लिखित ‘प्रक्षोभ’ या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आज (दि. २८) ज्येष्ठ लेखिका इंदूमती जोंधळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. श्रीपाल सबनीस अध्यक्षपदावरून बोलत होते. ज्येष्ठ लेखक भीमराव पाटोळे, सुप्रसिद्ध लेखक देवा झिंजाड, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, सकाळ प्रकाशनचे प्रमुख आशुतोष रामगीर, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळ प्रकाशनतर्फे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

लेखकाने अनेक पात्रांची वास्तव भाषेत केलेली मांडणी भावते, असे सांगून डॉ. सबनीस पुढे म्हणाले, मनोविश्लेषणात्मक केलेले लिखाण हा या कादंबरीचा आत्मा आहे.

भीमराव पाटोळे म्हणाले, जगण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या समाजासाठी ही कादंबरी मार्गदर्शक ठरणारी आहे. शालेय वयात मराठी बोलता, लिहिता न येणाऱ्या व्यक्तीला कादंबरी लिहिता येणे ही एक प्रकारे दैवी शक्ती आहे.

जगणे, भोगणे आणि लिहिणे यातील अंतर खूप कमी असलेला डॉ. प्रकाश जाधव हा माणूस आहे. लिखाणातून त्यांच्या मनाची अस्वस्थता दिसून येते. घरातूनच त्यांच्या शिक्षणाला विरोध झाला नसता तर ते लिहिते झाले नसते. आयुष्यात भोगलेल्या हालअपेष्टा लिखाणातून रिते करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आयुष्यात जे घडले ते त्यांनी प्रांजळपणे मांडले आहे.

इंदूमती जोंधळे म्हणाल्या, समाजाचे देणे लागतो या भावनेने डॉ. प्रकाश जाधव यांनी स्वत:च्या शिक्षणासाठी पैसा नसतानाही २५ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली यासाठी मोठे औदार्य लागते. हलाखीची परिस्थिती असतानाही शिक्षणाद्वारे ते स्वत: प्रकाशनमान झाले त्याचप्रमाणे इतरांच्या आयुष्यातही त्यांनी प्रकाश दिला.

लेखनाविषयी मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रकाश जाधव म्हणाले, शिक्षण, लिखाणामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन मिळाला. मराठी भाषेची जबाबदारी केवळ अभिजनांनीच घेतलेली नाहीये तर आम्ही सुद्धा घेतली आहे, हे मुद्दाम सांगावेसे वाटते.   

शिरीष चिटणीस यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला तर स्वागत आशुतोष रामगीर, रश्मी जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा जोग यांनी केले. आभार डॉ. संदीप सांगळे यांनी मानले.

स्टार हेल्थची 21% वार्षिक नफ्याच्या वाढीच्या दराने 518 कोटी रु. नफ्याची नोंद

·         IFRS अंतर्गत आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाही मध्ये COR मध्ये 170 bps ने सुधारणा

• ताज्या रिटेल प्रीमियममध्ये 24% वाढ

• खर्चाच्या गुणोत्तरात (Expense Ratio) 31.1% वरून 29.7% वर सुधारणा (IFRS)

चेन्नई,: भारतातील सर्वात मोठी स्वतंत्र रिटेल आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (स्टार हेल्थ इन्शुरन्स) ने 30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या सहामाहीसाठी (H1FY26 आर्थिक वर्ष 26 ची पहिली सहामाही) आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने 518 कोटी रु. चा करपश्चात नफा (PAT) नोंदवला असून IFRS अंतर्गत 21% वार्षिक वाढ आहे. ही वाढ नुकसान गुणोत्तराचे (Loss Ratio) चांगले प्रमाण आणि सुधारित कार्यक्षमतेमुळे झाली आहे.

कंपनीने दुसऱ्या तिमाही मध्येही आपली मजबूत गती कायम ठेवली असून आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाही मध्ये 12% वार्षिक वाढ दर्शवत ग्रॉस रिटन प्रीमियम (GWP) 8,809 कोटी रु. वर (N आधारावर) पोहोचला आहे. रिटेल GWP 17% ने वाढून 8,332 कोटी रु. वर (N आधारावर) पोहोचला आहे. त्याला फ्रेश रिटेल प्रीमियममध्ये 24% वाढ आणि रिटेल हेल्थमध्ये 98% नूतनीकरण टिकाऊपणा (renewal persistency) यामुळे चालना मिळाली आहे. 32% बाजारपेठीय हिस्स्यासह कंपनी भारतातील रिटेल हेल्थ विमा क्षेत्रात अग्रणी राहिली आहे.

व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रॉय म्हणाले, “या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आम्ही स्थिर आणि अर्थपूर्ण प्रगती केली असून IFRS प्रमाणे PAT मध्ये 21% वाढ झाली आहे. 8.3% या भक्कम गुंतवणूक परताव्याबरोबरच सुधारित लॉस रेशो आणि खर्चातील घट यामुळे नफ्यात वाढ साध्य झाली आहे.”

ग्राहकांचा अनुभव हा स्टार हेल्थच्या धोरणाचा पाया राहिला आहे. आमच्या दाव्यांवरील NPS 52 वरून 61 वर सुधारला असून, कंपनीचा एकूण NPS 59 वरून 61 वर वाढला आहे. हे निकाल आमच्या सातत्यपूर्ण कार्यप्रदर्शनाचे आणि रिटेल-केंद्रित मॉडेलच्या मजबूतीचे द्योतक आहेत.

“रिटेल हेल्थ इन्शुरन्सवर GST सूट मिळाल्याने आम्ही जोरदार सकारात्मक प्रवाह पाहत आहोत. सुरुवातीच्या प्रवाहावरून मागणीत वाढ स्पष्ट दिसत असून त्याचे प्रतिबिंब मजबूत लीड जनरेशन, नवीन पॉलिसी जारी करणे आणि ऑक्टोबरमधील GWP वाढीत दिसून येते. हे वाढत्या परवडणाऱ्या आरोग्य विम्याचे सूचक आहे.”

कंपनीचे पोर्टफोलिओ पुनर्संतुलनाचे (portfolio recalibration) परिणाम दिसून येत आहेत. नेट इन्कर्ड क्लेम्स रेशो आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाही मध्ये 70.6% वर राहिला. तो गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 30 bps ने कमी आहे. मजबूत रिटेल मिश्रण आणि अधिक नफा देणाऱ्या समूह विभागामुळे हे शक्य झाले आहे. कंपनीचे प्रमुख उत्पादन सुपर स्टार ने आपल्या पहिल्याच वर्षात 1,250 कोटी रु. च्या प्रीमियमचा टप्पा ओलांडला असून हे ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद आणि उत्पादनाच्या ताकदीचे प्रतीक आहे. कंपनी आता जसे पूर्वी जाहीर केले होते तसे वार्षिक रीप्राइसिंग धोरण अवलंबेल.

खर्चाचे गुणोत्तर (Expense Ratio) आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाही मध्ये 29.7% वर सुधारला आहे (गेल्या वर्षी ते 31.1% होते). मनुष्यबळ उत्पादकता, प्रक्रिया कार्यक्षमता आणि शिस्तबद्ध खर्च व्यवस्थापनामुळे हे शक्य झाले आहे. कंबाइंड रेशो (IFRS आधारावर) गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 102.1% वरून 100.3% पर्यंत सुधारला आहे, तर सॉल्व्हेन्सी रेशो नियामक आवश्यकतेपेक्षा खूपच जास्त 2.15x वर मजबूत राहिला आहे.

आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाही मध्ये खर्चाचे गुणोत्तर आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाही मधील 31.1% वरून 29.3% वर सुधारले आहे. लॉस रेशो आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाही मधील 73.7% वरून आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाही मध्ये 71.8% झाला आहे. कंबाइंड रेशो (IFRS आधारावर) मागील वर्षीच्या याच कालावधीतील104.8% वरून या वर्षी 101% झाला आहे.

कंपनीने आपल्या तंत्रज्ञान-आधारित ग्राहक अनुभव उपक्रमांना पुढे नेले असून, जलद आणि अखंड क्लेम सेटलमेंटसाठी AI-प्रणीत क्लेम प्लॅटफॉर्म लागू केला आहे. स्टार हेल्थ अॅपने आता 12 दशलक्ष डाउनलोड्सचा टप्पा पार केला आहे.

स्टार हेल्थ शिस्तबद्ध अंडररायटिंग, प्रगत डिजिटल आणि फसवणूक विश्लेषण (fraud analytics), तसेच रुग्णालये आणि वितरकांसोबत सखोल भागीदारी यावर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनी जबाबदार वाढ आणि ग्राहक-केंद्रित नवकल्पनांचा संगम साधत भारताच्या 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा या राष्ट्रीय दृष्टीकोनाशी सुसंगतपणे आपले नेतृत्व कायम राखण्याच्या स्थितीत आहे.

लोकमान्यनगर पुनर्विकासावरील स्थगिती उठविण्यासाठी धंगेकरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

पुणे- येथील बहुचर्चित आणि दुमजली – तिमजली इमारतींच्या लोकमान्य नगर पुनर्विकासाचा प्रकल्प पूर्ण झाला तर १० मजली इमारती होतील आणि रहिवाश्यांच्या संखेत , वाहनांच्या संख्येत दुपटी तिपटीने वाढ होईल आणि रस्त्यांची रुंदी मात्र वाढणार नाही अशा अवस्थेत होऊ पाहणाऱ्या सर्वच पुनर्विकासाच्या प्रकल्पांचा सारासार विचार व्हावा असा वाहतूक कोंडीतून ,प्रदूषणातून शहर वाचवा म्हणणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील काही लोकांचा सूर असताना आता हा पुनर्विकास प्रकल्प होऊ द्यात त्याला आडकाठी आणू नका अशी भूमिका घेत रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र देऊन लोकमान्यनगर पुनर्विकासावरील स्थगिती उठवावी अशी मागणी गेल्या एक महिन्यापूर्वीच केली आहे .

धंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,’लोकमान्य नगर पुणे येथील म्हाडा वसाहत सन १९६१ ते ६२ च्या दरम्यान म्हणजे साधारणपणे ६० वर्षांपूर्वी पानशेत धरणाच्या पुरानंतर स्थापन करण्यात आली. या बसाहतीमध्ये सर्वसाधारण मध्यमवर्गीय नागरिक राहत असून सद्यस्थितीत सदर नागरिक हे अत्यंत दुरावस्था झालेल्या इमारतीमध्ये राहत आहेत. या ठिकाणी ५३ इमारती असून सर्व इमारतीमधील नागरिकांनी नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या आहेत. यातील काही गृहनिर्माण सहकारी संस्थांचा पुनविकास अंतिम टप्प्यात आला आहे.
येथील इमारती अत्यंत जीर्ण झाल्या असून मूलभूत सोयी सुविधा देखील येथील नागरिकांना मिळत नाहीत. येवोल इमारतींचा पुनर्विकास लवकरात लवकर झाल्यास नागरिकांची होणारी परवड थांबणार आहे. परंतु काही घटक एकात्मिक विकासाच्या नावाखाली या ठिकाणची जागा आणि पुनर्विकासात मिळणारा लाभ विचारात घेऊन येथील रहिवाशांनी सुरू केलेले पुनर्विकासाचे प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घटकांनी शासनाची दिशाभूल करून एकात्म विकासाचा कुठलाही आराखडा नसताना देखील पुनर्विकासाला खीळ घातली आहे. शासनाने स्वानिक रहिवाशांची भावना विचारात घेऊन पुनर्विकासाला दिलेले स्थगिती तातडीने उठवावी व स्थानिक रहिवाशांना न्याय द्यावा, अशी मी आपणाकडे या पत्राद्वारे विनंती करीत आहे.


जैन बोर्डिंग व्यवहार : धर्मादाय आयुक्त हे लबाडीतले साक्षीदार आणि भागीदार- रवींद्र धंगेकर यांचा थेट आरोप

बुलढाणा बँकेच्या देशपांडेंच्या कारभारालाही हि धंगेकर देणार आव्हान …

लोकमान्य नगर पुनर्विकासाच्या प्रकल्प जर बिल्डर आणि रहिवासी नियम पाळून करत आहेत तर इतरांनी त्यात पडण्याचे कारण काय ?

पुणे- जैन बोर्डिंग व्यवहाराचा विषय आमचे नेते शिंदेसाहेब आणि सामंत साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे संपण्याच्या मार्गावर आहे याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे मात्र या व्यवहारात कोणी नियमबाह्य , बेकायदेशीर काय केले याची चौकशी होणे गरजेचे आहे यात बिल्डर ,ट्रस्टी जरी माघारी घेत असतील तरी धर्मदाय आयुक्तांपासून बुलढाणा बँकेच्या देशपांडे नामक अधिकाऱ्यापर्यंत कोणी काय भूमिका कशा पद्धतीने आचरणात आणली याचा तपास झाला तर अनेकांना जेल्वारी घडेल असे धंगेकर म्हणाले आहेत . रुपेश मारणे याच्या अटकेची धंगेकर यांनी थट्टा उडविली पण म्हटले , आता मला तोंड शिवून घ्यावे लागणार आहे . सत्य सत्य बोलत राहणे आता ऐकायला थकवा येईल एवढे सत्य बाहेर येऊ शकते . पण पोलीस आयुक्त मात्र चांगले काम करताहेत त्यामुळे यावर मी काही बोलणार नाही . पूर्वी म्हणालो तसे मी आता लोकमान्य नगरच्या पुनर्विकास प्रक्लापाचा मुद्दाही हातही घेणार आहे, जर बिल्डर आणि रहिवासी म्हाडाच्या नियमानुसार पुनर्विकास करून घेत आहेत तर त्यात मध्ये अन्य कोणी पडायचे कशासाठी ? हा प्रश्न आहे.

धंगेकर पुढे म्हणाले,’ मी शिंदे साहेबांशी बोललो आणि साहेबांनी जैन धर्मियांना व मला त्यांनी शब्द दिला होता की मी दोन दिवसात विषय संपेल. तो त्याप्रमाणे आता संपल्यात जमा आहे. कारण शेवटी जनतेचा एवढा प्रचंड रेटा होता आणि त्या रेट्यामुळे जैन समाज देशा मध्येच नाही तर जगा मधल्या जैन समाजाच्यामध्ये त्यांच्या मना मध्ये या प्रकाराने काहूर निर्माण केलं त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता. आणि या भावना सगळ्यांच्या लक्षात आल्या आणि आता दोन्ही पार्ट्या एका मुद्द्यावर माघारी आल्याच. पण यांच्यामध्ये जो गतिमान व्यवहार झाला, तो संशयास्पद आहे. खरेदीसाठीचे हे पैसे कुठले? कर्ज कुठल्या बँकेने दिलेत? मग या खरेदी मध्ये धर्मदाय आयुक्तांचा काय रोल का होता? प्रशासनाचा रोल काय होता? रजिस्ट्रार ऑफिसचा रोल , तहसिलदार चा रोल काय आहे? हे सगळे रोल बघता गतिमान जो व्यवहार झाला ह्याच्या मग प्रचंड पैसा पेरला गेला. म्हणजे हे काम काही बिगर पैशाचे होत नाही. आणि हा पब्लिक ट्रस्ट आहे,हा काही खाजगी ट्रस्ट नाही. त्यामुळे पब्लिक ट्रस्टवर संपूर्ण पूर्ण पणे वर्चस्व हे सरकारचं असतं. त्यामुळे ज्या पद्धतीने या ट्रस्टी ,बिल्डर, अधिकारी यांनी काही फायदा घेतलाय का? या आवारात काही तरी त्रुटी आहेत का? हे पाहिले पाहिजे म्हणून हे पहिले संचालक मंडळ बरखास्त केले पाहिजे आणि प्रशासक नेमला पाहिजे आणि प्रशासकाच्या मार्फत व समाजातील जे मान्यवर योग्य आहेत त्यांच्यामार्फत चौकशी करावी तर बिल्डर तर ह्याच्यामध्ये दोषी आहेच पण ह्याच्यामध्ये धर्मदाय आयुक्त देखील दोषी, ह्यांच्या मध्ये रजिस्ट्रार दोषी आहेत आणि ह्या बँकेत पैसा आला कुठून? हाही प्रश्न आहेच आणि ह्या बँकेला एवढी पावर येते का एवढे पैसे द्यायची ? कि त्यांचे लागेबांधे ह्या प्रकल्पामध्ये आहेत का ? ह्या बँकेत पैसा कुठून आला? हे सारं तपासले पाहिजे .
जैन समाज दानशूर आहे. तो याच्यापेक्षा दहापट पैसे उभे करू शकतो. कारण तो समाजाला कायम देत आलाय. हे पैसे परत द्या हा व्यवहार संपवा असे म्हणून कसे चालेल . एकदा जर पोलीस केस केली तर शेवटी शासन प्रशासनाला व सरकारला फसवण्याचा उद्योग बाहेर येईलच ना ? हा काही सोपा विषय नाहीये. एकदा पोलीस केस गेले तर जेलची वारी होईल त्यांना हे लक्षात घ्या .
धर्मदाय आयुक्तांनी तर मला एक भारतीय नागरिक म्हणून बलावावे यावर बोलवल्यानंतर मी त्यांना मुद्दा सांगेन. ते तो फोडून काढू शकत नाही.
सगळी सुविधा त्यांच्याकडे जातो. धर्मादाय आयुक्त आता आपण शासन व्यवस्थेवर जास्त बोलणे योग्य नाही. पण तुम्ही आम्हाला वेड्यात काढून का? आमचं तोंड उघडं करायला लावू नका. आता झालंय ते झालंय. पण जर त्यांनी जर अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे शोभत नाही त्यांना कारण ते ज्या संस्थेवर आहेत त्यांना कशाला द्यायचं? जर तुम्हाला न्यायसंस्थेवर नेमलं त्या चौकटीच्या बाहेर जाता येतं का? स्वतः धर्मदाय आयुक्त स्वतःला क्लीन चीट देऊ शकतात काय ?. मी जाहीर बोलतो. त्यांनी त्यासाठी माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल करावा , काय? मला समज द्यावी. मी त्याला उत्तर देईन कारण ह्याच्या मध्ये न्यायसंस्था मध्ये काही लबाडी झाली. त्या लबाडी तले साक्षीदार भागिदार धर्मादाय आयुक्त आहेत
असिम सरोदे साहेब मला म्हणले कि आम्ही तुमच्या बरोबर आहोत. एक वकील म्हणून मी आणि आमची सगळी ट्रीम. अनेक माझे वकील मित्र आहेत. सगळे म्हणले कि ह्या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकरणामध्ये तुमच्याबरोबर आम्ही आहोत आणि तुम्ही जी बाजू मांडत आहे ती समाजाच्या हिताची म्हणजे शहराच्या हिताची. त्यामुळे तुम्ही पुणेकर म्हणून आम्ही तुम्हाला जी काही मदत करायची ती करायला तयार आहे. आणि शेवटी त्यांच्याशी मी बोलणार आहे. जे लोक माझ्या बरोबर येतील त्यांना घेऊन मी माझी बाजू मांडणार.
. त्यामुळे आता मला काही काळजी नाही. मी काही नवीन आलो नाही आणिया जनतेने मला एकदम प्रचंड प्रमाणामध्ये ताकद दिली. आशिर्वाद दिले आणि त्याच्या जोरावर जात आहे. यापुढे आपण सामाजिक जीवनामध्ये काम करताना काय काय कर्वे लागते लोकशाहीत चांगल्या माणसांना हि कधी कधी लोक शिव्या घालत असतात .
लोकमान्य नगरच्या पुनर्विकासावर बोलताना ते म्हणाले,’ पूर्वी आमचे बापट साहेब होते. आमच्या मुक्ता टिळक होत्या. आम्हीही होतो. आता आम्हाला समजत नाही असं का? आम्हाला माहिती होतं. पुनर्विकासाचा प्रयत्न काम जर रहिवासी आणि बिल्डर यांच्यात होतंय तर आपण त्यात मध्ये का पडावं ? त्यामेले काय झालं . आता शेवटी संशयाची पाल तुम्ही अंगावर घेतली. तुम्ही तो प्रकल्प वाढवला. म्हाडाचे नियम आत्ता जे आहेत त्या नियमानुसार त्यांनी तो प्रोजेक्ट चालू केला. त्याच्यामुळे त्यांनी नियम तोडून बांधकाम केले नाही हा महत्त्वाचा भाग आहे. मग तुमच्या मनात काय करायचे आहे ? १६ एकर जमिनी चे . हा बिल्डर एवढा आहे.तो बिल्डर तेवढा आहे. मग मी आणू शकतो बिल्डर . मी करू शकतो हे चाललय काय ?

भाजपच्या 36 वर्षीय महिला नेत्याला भाजयुमो प्रदेशाध्यक्षाकडून धमकी, पुण्यात 9 जणांवर गुन्हा

पुणे- भाजपमधील अंतर्गत संघर्ष टोकाला गेला आहे. भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याला भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाने टोळक्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना चिंचवड येथे घडली आहे. या प्रकरणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह आठ जणांविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३६ वर्षीय पीडित महिला ही भाजपमध्ये संघटनात्मक पदावर कार्यरत आहे. २६ ऑक्टोबर रोजी त्यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार अनुप मोरे (वय ४३, रा. निगडी प्राधिकरण), अनिता तिपाले, एकविरा खान, प्रवीण यादव, आशिष राऊत, गौरव गोळे, सागर घोरपडे आणि जयेश मोरे अशी आरोपींची नावे आहेत.२६ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारास पीडित महिला ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी चिंचवड येथे गेल्या असता काही संशयितांनी त्यांना अडवले. ‘आमचा दादा अनुप मोरे येथे असताना तू इथे का आलीस? तुला जिवंत ठेवणार नाही. तुला गाडीखाली घालून संपवू. अनुप मोरेने तुला संपवायचे सांगितले आहे. तुला बदनाम करून जगणे अवघड करू,’ अशा धमक्या त्या टोळक्याने दिल्या, असे तक्रारदार महिलेच्या फिर्यादीत नमूद आहे.
या धमकीने घाबरलेली पीडित महिला परत बंगल्यात गेल्या असता, नंतर काही महिला आणि तरुणांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. नंतर त्या पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्या असता, अनिता तिपाले आणि एकविरा खान यांनी पोलिस ठाण्याच्या परिसरातच त्यांच्याशी वाद घालून मारहाण आणि शिवीगाळ केली, असा आरोप करण्यात आला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर पीडित महिला पोलिस ठाण्याबाहेर पडताच सुमारे शंभर जणांच्या गर्दीने पुन्हा ‘तुला ठार करू’ अशी धमकी दिली. दरम्यान, पीडित महिलेच्या जबाबात आठ जणांची नावे नमूद केली असताना सुरुवातीला अनुप मोरे यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यात आले होते. मात्र फिर्यादीने यावर आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी अनुप मोरे यांचा नाव आरोपींमध्ये समाविष्ट केल्याची माहिती मिळाली. या त्रुटीबाबत पोलिसांनी ‘नाव अनावधानाने राहून गेले’ असे स्पष्टीकरण दिले आहे. सध्या या प्रकरणामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

एसटीला दिवाळी हंगामात ३०१ कोटी रुपये उत्पन्न

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (२९ आक्टोबर) यंदाच्या दिवाळी हंगामात एसटीला तब्बल ३०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले आहे. त्या खालोखाल धुळे व नाशिक या विभागाचा क्रमांक लागतो. चांगले उत्पन्न आणल्याबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
या वर्षी १८ आक्टोबर ते २७ आक्टोबर या दिवाळीच्या १० दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी ३० कोटी याप्रमाणे तब्बल ३०१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे दिवाळी सुटीच्या परतीच्या दिवशी २७ ऑक्टोबरला ३९ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न मिळवुन या वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा नवा विक्रम केला आहे.
एसटीच्या ३१ विभागात सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने आणले असून (₹२० कोटी ४७ लाख) त्यानंतर धुळे (₹१५कोटी ६० लाख) आणि नाशिक (₹१५ कोटी ४१ लाख ) विभागाचा क्रमांक लागतो. मागील वर्षीच्या दिवाळी हंगामाच्या पेक्षा यंदा महामंडळाने तब्बल ३७ कोटी रुपये उत्पन्न जास्त आणले आहे.

सर्वसामान्य प्रवाशांची दिवाळी गोड करण्यासाठी घरापासून दूर राहून अहोरात्र कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी अभिनंदन केले आहे.

उत्पन्नाचे अपेक्षित लक्ष गाठण्यास एसटीला अपयश

यंदाच्या आर्थिक वर्षांमध्ये एप्रिल व मे हे दोन महिने वगळता गेली चार महिने एसटी महामंडळाला सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थिती यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये महामंडळाला सुमारे १५० कोटी पेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला. परंतु ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा हंगाम व सुट्ट्यांच्या कालावधीमुळे उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे प्रतिदिन ३४ कोटी रुपये याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात १०४९ कोटी रुपयाचे उत्पन्न मिळविण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले होते. तथापि, ऐन दिवाळीच्या काही मोजके दिवस सोडता दैनंदिन लक्ष गाठण्यात महामंडळाला शक्य झाले नाही. पुणे, बीड, अहिल्या नगर अमरावती, बुलढाणा या विभागांनी मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीमध्ये चांगले उत्पन्न आणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, धाराशिव यासारख्या विभागांनी मात्र अत्यंत सुमार कामगिरी केल्यामुळे महामंडळाच्या एकूण उत्पन्नावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते.
निर्धारित केलेल्या लक्षात पेक्षा अत्यंत कमी उत्पन्न आणणाऱ्या विभागांच्या कामगिरी बाबत मंत्री सरनाईक यांनी चिंता व्यक्त केली असून सातत्याने तोट्यात राहणाऱ्या विभागांचे योग्य मूल्यमापन होऊन त्यांच्या कामगिरीत सुधारणा होण्यासाठी एसटी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत “आशा” चे विशेष स्क्रीनिंग

जागतिक कन्या दिनानिमित्त डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आगामी मराठी चित्रपट “आशा” ची विशेष स्क्रीनिंग आयनॉक्स, नरिमन पॉईंट येथे पार पडलीमहिलांच्या सामर्थ्याचा आणि आशा सेविकांच्या निःस्वार्थ कार्याला प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा, दिग्दर्शक दीपक पाटील, निर्माते दैवता पाटील आणि निलेश कुवर यांनी केलेल्या प्रयत्नाला जवळपास ५०० आशा आणि अंगणवाडी सेविकांनी भरभरून दाद दिली.

यावेळी निर्मात्या दैवता पाटील म्हणाल्या, “एखादी स्त्री जेव्हा घराच्या चौकटीबाहेर पाऊल टाकते, तेव्हा तिला असंख्य अडचणींना सामोरे जावं लागतं — कधी घराबाहेरचा विरोध, तर कधी घराच्या आतलाच संघर्ष. तरीही ती थांबत नाही. प्रत्येक अडथळा ओलांडत, ती स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत पुढे जाते. ‘आशा’ चित्रपटातील नायिकाही अशीच आहे, आशा सेविका म्हणून काम करत असली, तरी ती हे फक्त नोकरी म्हणून करत नाही, तर तिच्यासाठी ते एक आवड आणि ध्यास आहे. म्हणूनच तिची कहाणी ही फक्त एका आशा सेविकेची राहत नाही, तर ती प्रत्येक स्त्रीची कहाणी बनते… बाईपणाच्या संघर्षाची आणि सामर्थ्याची गोष्ट ठरते.”

“आशा” या चित्रपटाला ६१ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री या विभागांत पारितोषिके मिळाली आहेत.
आरोग्यसेविकांच्या सेवाभावावर आधारित हा चित्रपट महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि संघर्षाचा हृदयस्पर्शी प्रवास दाखवतो.

पुरस्कार विजेते दिग्दर्शक दीपक पाटील म्हणाले, “सध्या मराठी सिनेमा नव्या वाटा शोधत आहे. विविध आणि आशयपूर्ण विषयांवर चित्रपट निर्माण होत आहेत, आणि प्रेक्षकही या नव्या प्रवाहाला मनापासून दाद देत आहेत. एका शिबिरादरम्यान आशा सेविकांचं काम जवळून पाहण्याची संधी मिळाली, तेव्हा मनात विचार आला, अरे, या कामामागचं जग किती मोठं आणि महत्त्वाचं आहे! यावर तर नक्कीच एक चित्रपट व्हायला हवा.
ही खरं तर एका वेगळ्या जगाची गोष्ट आहे. आपल्या समाजातच राहणारा हा एक वर्ग पण ज्याच्या आयुष्याबद्दल, संघर्षाबद्दल आणि त्यागाबद्दल आपल्याला फारसं माहिती नसतं. ‘आशा’ या चित्रपटाच्या माध्यमातून ती गोष्ट पहिल्यांदाच जगासमोर येणार आहे. ‘आशा’ हा सिनेमा फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाही, तर घर सांभाळून, स्वतःची ओळख शोधणाऱ्या, प्रसंगी त्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आहे. तिच्या स्वप्नांचा, तिच्या जिद्दीचा आणि तिच्या न थकणाऱ्या प्रवासाचा आहे. मराठी प्रेक्षकांनी नेहमीच नव्या विषयांना आणि प्रामाणिक कथांना उघड मनाने स्वीकारलं आहे. म्हणूनच, ही वेगळी, अनोखी आणि भावस्पर्शी कहाणीही त्यांच्या मनाला नक्कीच भिडेल, असा विश्वास वाटतो.”

या सोहळ्यास डॉ. श्रीकांत शिंदे (खासदार, शिवसेना) श्री. प्रतापराव जाधव (केंद्रीय राज्य मंत्री – आयुष आणि आरोग्य व कुटुंब कल्याण) आणि शायना एन.सी. (राष्ट्रीय प्रवक्त्या, शिवसेना) उपस्थित होते.

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमाने महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान केला. ह्यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “
चित्रपट हे समाजप्रबोधनाचं एक प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे. समाजातील विविध प्रश्न, भावना आणि संघर्ष जर चित्रपटाच्या माध्यमातून मांडले गेले, तर त्यातून दिला जाणारा संदेश नक्कीच लोकांच्या मनापर्यंत पोहोचतो. समाजात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद सिनेमात आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘आशा’ हा चित्रपट. दिग्दर्शक दीपक पाटील आणि निर्माते निलेश कुवर आणि दैवता पाटील यांनी समाजातील अत्यंत महत्त्वाचा पण आजवर दुर्लक्षित राहिलेला घटक आशा सेविका यांच्या जीवनावर हा चित्रपट साकारला आहे. आपल्या गावखेड्यात आरोग्यसेवा, जनजागृती आणि समाजहितासाठी अखंड झटणाऱ्या या महिलांची कहाणी पहिल्यांदाच चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. या सुंदर उपक्रमाबद्दल आणि संवेदनशील प्रयत्नाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक.”

चित्रपटात मुख्य भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी रिंकू राजगुरू समवेत सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, हर्षा गुप्ते, आणि दिलीप घारे यांचा समावेश आहे. चित्रपटाचे लेखन अंतरिक्ष श्रीवास्तव आणि दीपक पाटील यांनी केले आहे तर दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील सुरेश सारंगम यांनी कॅमेराची धुरा सांभाळली आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आगामी मराठी चित्रपट “आशा” ची विशेष स्क्रीनिंग आयनॉक्स, नरिमन पॉईंट येथे पार पडली

महिलांच्या सामर्थ्याचा आणि आशा सेविकांच्या निःस्वार्थ कार्याला प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा, दिग्दर्शक दीपक पाटील, निर्माते दैवता पाटील आणि निलेश कुवर यांनी केलेल्या प्रयत्नाला जवळपास ५०० आशा आणि अंगणवाडी सेविकांनी भरभरून दाद दिली.

यावेळी निर्मात्या दैवता पाटील म्हणाल्या, “एखादी स्त्री जेव्हा घराच्या चौकटीबाहेर पाऊल टाकते, तेव्हा तिला असंख्य अडचणींना सामोरे जावं लागतं — कधी घराबाहेरचा विरोध, तर कधी घराच्या आतलाच संघर्ष. तरीही ती थांबत नाही. प्रत्येक अडथळा ओलांडत, ती स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत पुढे जाते. ‘आशा’ चित्रपटातील नायिकाही अशीच आहे, आशा सेविका म्हणून काम करत असली, तरी ती हे फक्त नोकरी म्हणून करत नाही, तर तिच्यासाठी ते एक आवड आणि ध्यास आहे. म्हणूनच तिची कहाणी ही फक्त एका आशा सेविकेची राहत नाही, तर ती प्रत्येक स्त्रीची कहाणी बनते… बाईपणाच्या संघर्षाची आणि सामर्थ्याची गोष्ट ठरते.”

“आशा” या चित्रपटाला ६१ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री या विभागांत पारितोषिके मिळाली आहेत.
आरोग्यसेविकांच्या सेवाभावावर आधारित हा चित्रपट महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि संघर्षाचा हृदयस्पर्शी प्रवास दाखवतो.

पुरस्कार विजेते दिग्दर्शक दीपक पाटील म्हणाले, “सध्या मराठी सिनेमा नव्या वाटा शोधत आहे. विविध आणि आशयपूर्ण विषयांवर चित्रपट निर्माण होत आहेत, आणि प्रेक्षकही या नव्या प्रवाहाला मनापासून दाद देत आहेत. एका शिबिरादरम्यान आशा सेविकांचं काम जवळून पाहण्याची संधी मिळाली, तेव्हा मनात विचार आला, अरे, या कामामागचं जग किती मोठं आणि महत्त्वाचं आहे! यावर तर नक्कीच एक चित्रपट व्हायला हवा.
ही खरं तर एका वेगळ्या जगाची गोष्ट आहे. आपल्या समाजातच राहणारा हा एक वर्ग पण ज्याच्या आयुष्याबद्दल, संघर्षाबद्दल आणि त्यागाबद्दल आपल्याला फारसं माहिती नसतं. ‘आशा’ या चित्रपटाच्या माध्यमातून ती गोष्ट पहिल्यांदाच जगासमोर येणार आहे. ‘आशा’ हा सिनेमा फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाही, तर घर सांभाळून, स्वतःची ओळख शोधणाऱ्या, प्रसंगी त्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आहे. तिच्या स्वप्नांचा, तिच्या जिद्दीचा आणि तिच्या न थकणाऱ्या प्रवासाचा आहे. मराठी प्रेक्षकांनी नेहमीच नव्या विषयांना आणि प्रामाणिक कथांना उघड मनाने स्वीकारलं आहे. म्हणूनच, ही वेगळी, अनोखी आणि भावस्पर्शी कहाणीही त्यांच्या मनाला नक्कीच भिडेल, असा विश्वास वाटतो.”

या सोहळ्यास डॉ. श्रीकांत शिंदे (खासदार, शिवसेना) श्री. प्रतापराव जाधव (केंद्रीय राज्य मंत्री – आयुष आणि आरोग्य व कुटुंब कल्याण) आणि शायना एन.सी. (राष्ट्रीय प्रवक्त्या, शिवसेना) उपस्थित होते.

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमाने महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान केला. ह्यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “
चित्रपट हे समाजप्रबोधनाचं एक प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे. समाजातील विविध प्रश्न, भावना आणि संघर्ष जर चित्रपटाच्या माध्यमातून मांडले गेले, तर त्यातून दिला जाणारा संदेश नक्कीच लोकांच्या मनापर्यंत पोहोचतो. समाजात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद सिनेमात आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘आशा’ हा चित्रपट. दिग्दर्शक दीपक पाटील आणि निर्माते निलेश कुवर आणि दैवता पाटील यांनी समाजातील अत्यंत महत्त्वाचा पण आजवर दुर्लक्षित राहिलेला घटक आशा सेविका यांच्या जीवनावर हा चित्रपट साकारला आहे. आपल्या गावखेड्यात आरोग्यसेवा, जनजागृती आणि समाजहितासाठी अखंड झटणाऱ्या या महिलांची कहाणी पहिल्यांदाच चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. या सुंदर उपक्रमाबद्दल आणि संवेदनशील प्रयत्नाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक.”

चित्रपटात मुख्य भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी रिंकू राजगुरू समवेत सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, हर्षा गुप्ते, आणि दिलीप घारे यांचा समावेश आहे. चित्रपटाचे लेखन अंतरिक्ष श्रीवास्तव आणि दीपक पाटील यांनी केले आहे तर दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील सुरेश सारंगम यांनी कॅमेराची धुरा सांभाळली आहे.