Home Blog Page 8

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही केला? अखेरीस पुणे पोलिसांना हाय कोर्टानेही केला सवाल

पुणे-मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव का नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना हा सवाल उपस्थित केला आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी यांना सध्या अटक करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. मात्र, पार्थ पवार यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याचे पाहायला मिळत होते. आता मुंबई उच्च न्यायालयानेच पार्थ पवारांचे नाव का नाही असा सवाल उपस्थित केल्याने प्रकरणी नवे वळण मिळणार असल्याचे दिसत आहे.

मुंबई उच्च न्यायालयात मुंढवा जमीन प्रकरणी सुरू असलेल्या जमीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारला पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये का नाही? असा थेट सवाल केला. दरम्यान, याप्रकरणी आमचा तपास सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. शीतल तेजवानीने बावधन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर, हायकोर्टाकडून अजित पवारांच्या मुलाचे नाव का नाही, असा थेट सवाल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अंजली दमानिया यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटले की, सामान्य जनतेच्या मनात असलेला प्रश्न शेवटी न्यायमूर्ती जामदार यांनी वकिलांना विचारला. 1800 कोटींची सरकारची जमीन तुम्ही आम्ही घेतली असती, तर आपल्याला पहिल्याच दिवशी उचलून तुरुंगात टाकले असते. पण एक महिना उलटून गेल्यानंतरही एफआयआरमध्ये देखील पार्थ पवारांचे नाव नाही. त्यांच्या पार्टनरला चौकशीला बोलावूनही, तो हजर होत नाही. हे काय चाललंय? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहे.

पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, पण आज शीतल तेजवानी या हायकोर्टात जामिनासाठी गेल्या होत्या. त्यावर तुम्ही सेशन कोर्टात जाण्याऐवजी हायकोर्टात का आलात? अशी विचारणा तेजवानीला केली. त्यावर आम्ही सेशन कोर्टात गेलो, पण नोटरी इशू आल्यामुळे आम्ही हायकोर्टात आलो. यावर जस्टीस जामदार अतिशय चिडले आणि सदरील याचिका मागे घ्या, अन्यथा तुमच्यावर प्रचंड दंड लावण्यात येईल, असे सांगितल्याची माहिती दमानिया यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी खरेदी करण्यात आलेल्या मुंढव्यातील 40 एकर जमीन घोटाळाप्रकरणात, पुणे पोलिसांनी मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीला अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाचा वेग वाढवून तेजवानीची दोन वेळा सखोल चौकशी केली होती, ज्यात तिचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अखेर ही अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, अटकेनंतर शीतल तेजवानीने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

गांजा विक्री करणा-या तरुणीला केले जेरबंद

पुणे- मुंढवा येथील एका गांजा विकणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या . पोलिसांनी सांगितले कि,’
दि.१०/१२/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक छगन कापसे, अति कार्यभार गुन्हे शाखा, युनिट ०५ पुणे शहर व पोलीस अंमलदार यांना गुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गायरान वस्ती, केशवनगर मुंढवा, पुणे येथे चिंचेच्या झाडाजवळील आरोपीचे राहते घराचे अंगणात अवैधरित्या गांजा विक्री चालु आहे अशी बातमी मिळाली. बातमी मिळताच तात्काळ पोलीस निरीक्षक छगन कापसे व पोलीस अंमलदार असे सदर ठिकाणी जावुन छापा टाकला असता सदर ठिकाणी १८,४४०/- रु.कि.चा ९२२ ग्रॅम वजनाचा निव्वळ गांजा हा अंमली पदार्थ, १०,०००/-रु. किं. चा मोबाईल व ६,३००/-रु रोख रक्कम असा एकुण ३४,७४०/- रु. कि.चा मुद्देमाल जप्त केला तसेच निकीता राकेश गारुंगे, वय २९ वर्ष, रा. गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा, पुणे हिचेवर मुंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन तिला पुढील कार्यवाहीकामी मुंढवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे). निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २, राजेद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, युनिट ५, गुन्हे शाखा छगन कापसे, यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड, विनोद शिवले, अमर चव्हाण, स्वाती तुपे, अकबर शेख, परमेश्वर कदम, आडसुळ तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ कडील पोलीस अंमलदार राजस शेख यांचे पथकाने केली.

सदाबहार गीतांनी रसिकांची सायंकाळ ‘हसीन’

पुणे : धर्मेंद्र यांच्याविषयीचे किस्से आणि त्यांच्यावर चित्रित झालेल्या सदाबहार गीतांच्या सादरीकरणातून पुणेकरांची सायंकाळ ‘एक हसीन शाम’ ठरली.

निमित्त होते पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित ‘अलविदा वीरू..’ या विशेष कार्यक्रमाचे. हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्व. धर्मेंद्र यांच्या जन्मदिनाचे निमित्त साधून पूना गेस्ट हाऊस येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धर्मेंद्र यांच्यावर चित्रित झालेली अजरामर गीते आघाडीच्या गायिका मनिषा निश्चल यांच्यासह जितेंद्र पेठकर, सतीश मराठे यांनी सादर केली. स्वप्नील पोरे यांचे निवेदन होते.

‘आपके हसीन रुख़ पे’, ‘मैं कहीं कवि ना बन जाऊ’, ‘झिलमिल सितारों का आँगन होगा’, ‘छलकाये जाम आइये’, ‘ना जा कहीं अब ना जा’, ‘तू मेरा मैं तेरी दुनिया जले तो जले’, ‘यही है तमन्ना तेरे दर’, ‘साथिया नहीं जाना’, ‘देखा है तेरी आँखों में’, ‘एक हसीन शाम को’, ‘गर तुम भुला ना दोगे’, ‘हुई शाम उनका ख्याल आ गया’, ‘ये दिल तुम बिन कहीं’ आदी लोकप्रिय गीते सादर करण्यात आली.

या प्रसंगी धर्मेंद्र स्मृती विशेषांकाचे तसेच ‘जिंदगी कैसी है पहेली हाये’ या मंदार जोशी लिखित पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे, दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडे, ज्येष्ठ लेखिका सुलभा तेरणीकर, संगणक तज्ज्ञ दीपक शिकारपूर, धमेंद्र मानसपुत्र महेश नामपूकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सुरुवातीस डॉ. किशोर सरपोतदार यांनी सांगितीक उपक्रमाविषयी माहिती दिली. या प्रसंगी ज्योत्स्ना सरदेशमुख, सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, कवी राजन लाखे, शरयू जोशी, कवयित्री मीरा शिंदे, आनंद सराफ, मनिष गोखले आदी मान्यवर उपस्थित होते

सैनिक कल्याण विभागात सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पद भरती

पात्र उमेदवारांनी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. 10 : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट क) एकूण ७२ पदाकारिता महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेल्या युध्द काळात किंवा युध्द नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा अपंगत्व येऊन त्यामुळे नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील फक्त एका व्यक्तीस त्यानंतरच्या पसंती क्रमाने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने 31 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 23.59 वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरील पदांपैकी 3 पदे ही अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारांमधून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता, उपलब्धतेनुसार भरण्यात येतील. भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांचे मार्फत होणार आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. असे लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. निः, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000

तुळापूर–वढू (बु.) शिवस्मारक विकासाला गती; ५३२.५१ कोटींचा सुधारित आराखड्यास शिखर समितीची मंजुरी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नागपूर येथे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ विकास शिखर बैठक संपन्न
पुणे, दि. 10 डिसेंबर-
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळ मौजे तुळापूर (ता. हवेली) आणि समाधी स्थळ वढू (बु.) ता. शिरुर यांना थेट जोडणाऱ्या रस्ता व पुलाच्या कामास मान्यता देण्यात आली. “भीमा नदीवर तुळापूर–वढू (बु.) आपटी येथे पूल बांधणे व सद्यस्थितीतील आपटी–वढू (बु.) रस्त्याचे रुंदीकरण करणे” या २५०.२७ कोटी रुपये किंमतीच्या कामास मंजुरी देण्यात आली.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, पालकमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानभवन, नागपूर येथे राज्यातील वढू–तुळापूर विकास आराखड्यासंदर्भातील शिखर समितीची बैठक आज दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत पुणे जिल्ह्याच्या वढू–तुळापूर विकास आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

यापूर्वी “छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ व समाधी स्थळ विकास आराखडा” या २८२.२४ कोटी रुपये किंमतीच्या आराखड्यास मान्यता देण्यात आलेली होती. नव्याने मंजूर झालेल्या रस्ता व पूल बांधकामामुळे एकूण सुधारित आराखड्याची किंमत ५३२.५१ कोटी रुपये इतकी झाली आहे.

नवीन रस्ता हा तुळापूर येथील बलिदानस्थळ व वढू (बु.) येथील समाधी स्थळास थेट जोडणारा ग्रीनफील्ड मार्ग असणार आहे. या रस्त्यामुळे शिवप्रेमी भक्त व भाविकांसाठी सुकर, सोयीस्कर व थेट दळणवळण सुविधा उपलब्ध होणार आहे. शिवप्रेमींच्या भावनांचा आदर म्हणून हा रस्ता “हेरिटेज वॉक” स्वरूपात विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

प्रस्तावित पुलाच्या ठिकाणी प्रेक्षक गॅलरीची सुविधादेखील समाविष्ट करण्यात आली असून येथून आराखड्यातील प्रस्तावित म्यूरल्स, पुतळा व इतर कलाकृतींचा देखावा पाहता येणार आहे. त्यामुळे सदर रस्ता व पूल हे केवळ दळणवळण मार्ग ठरणार नसून एकूण आराखड्याच्या सांस्कृतिक व भावनिक मांडणीला साजेसे असेल.

बैठकीस स्थानिक आमदार श्री. ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव (वित्त), अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम विभाग), प्रधान सचिव (नियोजन), अपर पोलिस महासंचालक (कायदो व सुव्यवस्था), जिल्हाधिकारी पुणे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे उपस्थित होते. तसेच, दूरदृष्य प्रणालीद्वारे पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनीही बैठकीत सहभाग नोंदविला.

“संसदीय आयुधे म्हणजे जनतेशी थेट दुवा साधण्याची साधने” : डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. १० डिसेंबर २०२५ : राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) आयोजित ५१व्या संसदीय अभ्यासवर्गात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांना “संसदीय आयुधे आणि लोकशाही प्रणालीमध्ये त्यांचे महत्व” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, संसदीय आयुधे ही केवळ विचार मांडण्याची साधने नसून लोकशाही अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि जनाभिमुख करण्यासाठीची प्रभावी कार्यपद्धती आहेत. यावेळी विधिमंडळ सचिव मेघना तळेकर ही प्रमुख उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे यांनी सुरुवातीला महाराष्ट्रातील समाजसुधारकांची परंपरा आणि लोकशाहीची वैचारिक पायाभरणी स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, महर्षी कर्वे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळेच आजची सक्षम आणि संवेदनशील लोकशाही उभी असल्याचा उल्लेख त्यांनी केला. विद्यार्थ्यांनी या पार्श्वभूमीची जाण ठेवून काम केले, तर त्यांचे लोकप्रतिनिधित्व अधिक परिणामकारक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संसदीय आयुधांची व्याख्या स्पष्ट करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “संसदीय आयुध म्हणजे तलवार नव्हे, तर विधायक कामकाजाचे सुटसुटीत आणि शिस्तबद्ध रूप.” प्रश्नोत्तरांचा तास, तातडीचे प्रश्न, लक्षवेधी सूचना, अल्पकालीन चर्चा, विधेयकांवरील चर्चा अशा विविध साधनांद्वारे लोकप्रतिनिधी अत्यंत गंभीर प्रश्नांवर शासनाला उत्तरदायी बनवू शकतात, असे त्यांनी सांगितले. केवळ आक्रमक भाषणांनी नव्हे तर तथ्याधारित तयारीने विधानमंडळ परिणामकारक बनते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सभागृहातील शिस्त, संयम, नेमकेपणा यावर विशेष भर देताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “लोकप्रतिनिधी ओरडून नव्हे, तर माहिती, तयारी आणि मोजक्या शब्दांतील मुद्देसूद मांडणीनेच जनतेचा विश्वास जिंकू शकतो.” त्यांनी विद्यार्थ्यांना संसदीय नियमांचे काटेकोर पालन, वेळेचे व्यवस्थापन आणि विधायक पर्याय मांडण्याचे कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. फक्त विरोधासाठी विरोध न करता जनहिताचा पर्याय मांडणे हे संसदीय परंपरेचे खरे बळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

तातडीचे प्रश्न आणि लक्षवेधी सूचनांमुळे अनेक जनजीवनाशी संबंधित मुद्दे जलदगतीने सुटलेली उदाहरणे देत त्यांनी संसदीय साधनांची ताकद स्पष्ट केली. शेतकरी आत्महत्या, पिकांचे नुकसान, महिलांविरुद्धचे गुन्हे, पायाभूत सुविधा आणि स्थानिक समस्यांवर त्यांनी स्वतः विधायक पद्धतीने कसे प्रश्न उपस्थित केले याचे अनुभवही त्यांनी विद्यार्थ्यांसोबत शेअर केले. “लोकशाही टिकवायची असेल तर संवेदनशीलता, सातत्य आणि समस्येची बहुआयामी समज आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. गोऱ्हे यांनी मार्गदर्शक उत्तरे दिली. युवा पिढीने विधायक राजकारणाची निवड केली तर लोकशाही अधिक मजबूत आणि उत्तरदायी बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी उपसभापतींच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनाचे स्वागत केले.

वोट चोरी हा लोकशाही संपुष्टात आणण्याचा भाजपाचा कुटील डाव – हर्षवर्धन सपकाळ

पुणे-“वोट चोरी हे देशातील विदारक सत्य असून लोकशाही संपुष्टात आणण्याचा हा भाजपाचा कुटील डाव आहे. लोकांचा एकमताचा अधिकार हिरावून घेणे म्हणजे नागरिकांना दिलेल्या सर्वोच्च शक्तीचा अपमान आहे. भारतीय संविधानाने सर्व जाती-धर्म, महिला-पुरुष यांना समान मताधिकार दिला आहे. परंतु भाजपा-आरएसएस या शक्तीला कमकुवत करून ठराविक लोकांसाठीच सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. वोट चोरी हे त्यांच्या अनेक हत्यारांपैकी एक असून, लोकशाहीला पोकळ करण्याच्या षड्यंत्राचा तो मोठा भाग आहे.” अशी जळजळीत टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. कॉंग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा – कर्तव्य – त्याग’ सप्ताहात आयोजित “लोकशाहीची हत्या – वोट चोरीचे विदारक सत्य” या प्रदर्शनास बालगंधर्व कलादालन येथे हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट दिली तेव्हा ते बोलत होते.

महत्वपूर्ण आणि मार्मिक निरीक्षणे नोंदवत सपकाळ यांनी प्रदर्शनातील तथ्यपूर्ण मांडणीचे कौतुक केले. प्रारंभी या सप्ताहाचे संयोजक व या प्रदर्शनाचे मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्य्क्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, “वोट चोरी हा केवळ निवडणूक विषय नाही; तो लोकशाहीच्या अस्तित्वाशी निगडित गंभीर प्रश्न आहे.”

प्रदर्शनाचे आयोजक, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, “भारतीय संविधान, लोकशाहीची मूल्ये व मताधिकार ही आपल्या प्रजासत्ताकाची ताकद आहे. पण हीच ताकद कमी करण्यासाठी आरएसएस आणि भाजपा विविध पद्धतीने प्रयत्न करत आहेत. वोट चोरी हा लोकशाहीचा गळा घोटणारा सर्वात धोकादायक प्रयोग आहे.”

याप्रसंगी माजी नगरसेवक अविनाश बागवे, सुनील मलके, लता राजगुरू, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रशांत सुरसे, अॅडवोकेट शाबीर शेख, इंटक्स च्या अध्यक्ष चेतन अग्रवाल, अनेक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्याक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश आबनावे यांनी केले. आभार प्रदर्शन सुनील मलके यांनी केले.

डॉ.बाबा आढाव यांचे कार्य पुढे चालू ठेवणे हीच त्यांना श्रद्धांजली – रमेश बागवे

मातंग एकता आंदोलनाच्या वतीने डॉ.बाबा आढाव यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन
पुणे — उपेक्षितांचे, कष्टकऱ्यांचे व कामगारांचे दिवंगत नेते डॉ. बाबा आढाव यांनी कष्टकरी,वंचित उपेक्षित समाजासाठी आयुष्यभर कार्य केले .त्यांच्या या कार्याचा वसा पुढे चालू ठेवणे आपली सर्वांची जबाबदारी असून त्यांचे हे कार्य पुढे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक व माजी गृहमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केले .
डॉ.बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भवानी पेठ, रामोशी गेट पुणे येथे मातंग एकता आंदोलन या संघटनेच्या वतीने शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते .या शोक सभेचे अध्यक्ष दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते अंकल सोनवणे उपस्थित होते. या शोक सभेमध्ये मोठ्या संख्येने भवानी पेठेतील स्वच्छ संस्थेचे सर्व कचरा वेचणारे, महिलावर्ग तसेच रिक्षा व टेम्पो चालक संघटनेचे विविध पदाधिकारी, टिंबर मार्केट मधील हमाल पंचायतचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमेश बागवे पुढे म्हणाले की ,डॉ. बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्याच्या कार्याला उजाळा देत सर्वांनी त्या ठिकाणी त्यांच्या आठवणी सांगितल्या आणि खऱ्या अर्थाने बाबांना आदरांजली व्हायचे असेल तर त्यांचे कार्य त्यांचे ध्येयधोरण हे आपण शेवटपर्यंत त्या ठिकाणी लक्षात ठेवून काम केले पाहिजे आणि समानता संदेश जो त्यांनी दिला की, स्त्री व पुरुष सगळे समान आहेत. या समानतेच्या माध्यमातून आपण काम केले पाहिजे समाजातल्या शेवटच्या घटकातील डोळ्यातील अश्रु पुसण्याचे काम आपण सर्वानी केले पाहिजे तरच ते डॉ. बाबा आढाव यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल .
तसेच पुण्यनगरीचे माजी महापौर दिवेकर यांचे चिरंजीव संजय दिवेकर यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना बाबा आढावांना या ठिकाणी सर्व सामान्य लोकांसाठी हमालांसाठी दवाखाना उपलब्ध करून देण्याबरोबरच औषधेही स्वस्त दरात उपलब्ध करून देणेकडे लक्ष केंद्रित केले या त्यांच्या कार्यासाठी त्यांनी स्वतःची जागा देऊन त्या ठिकाणी स्वस्त दारातील दवाखाना सुरू केला याची आठवण देखील यांच्या भाषणामध्ये केली.
शोकसभेला प्रमुख उपस्थिती राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे, पुणे महानगरपालिका स्टँडिंग कमिटीचे माजी अध्यक्ष विरेंद्र किराड, टिंबर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष रतनशेठ किराड तसेच बाबा आढाव यांच्यासोबत अनेक वर्ष कामगार चळवळीत काम केलेले कामगार नेते नितीन पवार, तसेच हमाल पंचायत संघटनेचे अध्यक्ष गोरखनाथ मेंगडे त्यांच्या समावेत उपस्थित पुणे शहर काँग्रेस पक्षाचे इंटकचे अध्यक्ष चेतन अग्रवाल, प्रवीण करपे विठ्ठल थोरात, एडवोकेट राजश्रीताई अडसूळ, सुरेखाताई खंडाळे, अरुणजी गायकवाड व इतर मान्यवर सर्व उपस्थित होते.

या शोकसभेच्या आयोजन माजी नगरसेवक अविनाश बागवे व मातंग एकता आंदोलन पुणे शहर यांच्या वतीने करण्यात आले

पुणे बाल महोत्सवाचे चौथे पर्व :११ ते १४ डिसेंबर २०२५.स्थळ : सारसबाग, पुणे

पुणे, १०डिसेंबर २०२५ :
पुणे महानगरपालिकेच्या पुणे बाल महोत्सवचा चौथा पर्व ११ ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान सारसबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव आता शहरातील पालक व लहान मुलांसाठी अत्यंत आवडता कार्यक्रम ठरला असून, दरवर्षी १ लाखाहून अधिक पालक व बालक विविध उपक्रमांचा आनंद घेण्यासाठी येथे उपस्थित राहतात.यंदा उत्सवाचा विषय आहे “लेस स्क्रीन, मोर प्ले” (कमी स्क्रीन, अधिक खेळ), ज्यामध्ये पालकांच्या आरोग्य व कल्याणावर विशेष भर देण्यात आला आहे – हा बालविकासातील महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित घटक आहे. या कार्यक्रमाचा उद्देश मुलांच्या तसेच पालकांच्या संगोपनाचे महत्त्व अधोरेखित करणे आहे.

बालकांच्या आयुष्यातील सुरुवातीची वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. पहिल्या पाच वर्षांत त्यांच्या संज्ञानात्मक, सामाजिक व मोटर कौशल्यांचा झपाट्याने विकास होतो. या विषयावरील जनजागृती वाढविण्याची व पालकांना मुलांच्या विकासासाठी विविध मार्गांची माहिती देण्याची तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज ओळखून दरवर्षी शहरात हा बाल महोत्सव आयोजित केला जातो. यंदा या उत्सवात बालविकास क्षेत्रात कार्यरत ३० हून अधिक संस्था व भागीदार सहभागी होऊन कुटुंबांसाठी माहितीपूर्ण, खेळकर व संस्मरणीय अनुभव निर्माण करणार आहेत. अनेक रोचक खेळ, खेळावर आधारित उपक्रम, गोष्टी सांगणे, प्रत्यक्ष अनुभव देणारी चर्चा सत्र, मुलं आणि पालकांनी एकत्रितपणे मजा घेण्यासाठी आखणी करण्यात आली आहे. हा उत्सव कुटुंबांसाठी एक रोमांचक अनुभव ठरणार आहे.

आपले शहर झपाट्याने वाढत आहे आणि या वाढत्या शहरात डिजिटल युगात जन्माला आलेली नवीन पिढी व त्यांचे पालक राहत आहेत. या वेगाला शहरातील पालक कसे सामोरे जात आहेत याचा जाणीवपूर्वक विचार करणे महत्वाचे आहे . त्याचा पालकत्वाच्या पद्धतीत सकारात्मक बदल झाला आहे का, की पालक पूर्वीपेक्षा अधिक थकलेले आणि दमलेले वाटत आहेत? यावर्षीच्या बाल महोत्सव मध्ये एक केअर पॅव्हिलियन असेल, जे पालकांना त्यांच्या स्वतःच्या जगात डोकावण्याची आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी काय करता येईल हे समजून घेण्याची संधी देईल, ज्यामुळे ते आपल्या मुलांसाठी अधिक चांगले पोषक ठरतील. पुणे हे नर्चरिंग नेबरहूड्स २.० उपक्रमांतर्गत ‘डीप डायव्ह सिटी’ आणि अर्बन ९५ लाईटहॉउस सिटी असून, शहर नियोजन व विकासामध्ये पालकांच्या कल्याण व बालकेंद्रित दृष्टिकोन समाविष्ट करण्यासाठी कार्यरत आहे. हा उपक्रम गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या पाठिंब्याने, व्हॅन लिअर फाउंडेशनच्या सहकार्याने व WRI इंडिया यांच्या तांत्रिक मदतीने राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील चालू व आगामी प्रकल्पांमध्ये या दृष्टिकोनाचा समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्पांच्या पलीकडे जाऊन, शहराने बालक-पालक मेळावे परिसरातील उद्यानांमध्ये आयोजित करून पालक व मुलांमधील संवाद वाढविण्याचे प्रभावी मार्ग दाखवले आहेत व अशा मैदानी उपक्रमांना शहरात हळूहळू नित्याचा भाग बनवले आहे.

आजच्या काळात पालक व्यस्त दिनचर्या सांभाळत असताना व मुले घरात अधिक वेळ घालवत असताना, हा उत्सव सक्रिय, स्क्रीन-मुक्त सहभाग व सकारात्मक पालकत्वाचे महत्त्व अधोरेखित करतो. कुटुंबे, तज्ज्ञ व संस्था यांना एकत्र आणून पुणे बाल महोत्सव पुण्यातील लहान नागरिकांसाठी अधिक निरोगी व आनंदी सुरुवात घडविण्याचे कार्य सातत्याने करत आहे.
११ ते १४ डिसेंबर २०२५ पर्यंत सारसबाग येथील आयोजित बाल उत्सव या कार्यक्रमास सहभागी व्हा असे आवाहन पुणे महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.

सहा तरुणांचा मृत्यू — मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदतीची विधानसभेत आमदार तापकीर यांची मागणी

पुणे, दि. १० डिसेंबर २०२५

दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाजवळील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका – खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

नवीन थार वाहन कोकणाकडे जात असताना चालकाचा ताबा सुटून वाहन सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळले, आणि सहाही तरुणांचा मृत्यू झाला. मृतक सर्व तरुण अत्यंत गरीब, वंचित आणि कष्टकरी कुटुंबांतील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबांवर अपरिमित आर्थिक, सामाजिक आणि मानसिक संकट कोसळले आहे.

माता–वडील आजही धुणे–भांडी, घरकाम, मजुरी, बिगारी अशा अल्प उत्पन्नाच्या कामांवर कसेबसे उदरनिर्वाह करत असताना घरातील एकमेव कर्त्या तरुणांचा मृत्यू त्यांच्या अस्तित्वावरच आघात करणारा ठरला आहे. ही घटना केवळ अपघातापुरती मर्यादित नसून अत्यंत दुर्बल, वंचित आणि उपेक्षित कुटुंबांवर आलेले गंभीर आयुष्यनिर्वाहाचे संकट आहे.

आज महाराष्ट्र विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात Point of Information या सत्रात माध्यमातून खडकवासला मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर यांनी या अत्यंत संवेदनशील प्रकरणाची दखल घेण्याची मागणी शासनाकडे केली.

आमदार तापकीर यांनी सभागृहात पुढील दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या—

१) मृत तरुणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीची, अर्थपूर्ण व समर्पक आर्थिक मदत जाहीर करावी

भूतकाळात शासनाने अनेक दुर्घटनांमध्ये मानवी, संवेदनशील आणि सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन ठेवून मदत जाहीर केली आहे.
त्या परंपरेनुसार या सहा कुटुंबांना तातडीने आर्थिक दिलासा मिळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.

२) ताम्हिणी घाटातील ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने कराव्यात

धोकादायक वळणे सुरक्षित करणे, संरक्षण भिंती उभारणे, चेतावणी फलक, कॅट-आय रिफ्लेक्टर, सुरक्षा जाळी, वेगमर्यादा नियंत्रण आणि रस्त्याचे स्ट्रक्चरल सुधारणा करणे या उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

आमदार तापकीर म्हणाले—या सहा तरुणांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबांचा संपूर्ण भविष्याचा आधारच कोसळला आहे. शासनाच्या हस्तक्षेपामुळे या दुर्बल कुटुंबांना तातडीने दिलासा मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

१०८ रुग्णवाहिकेची राज्यातील १ कोटी १४ लाख नागरिकांना मोफत आरोग्यसेवा


पुणे, दि. १० : महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेची १०८ रुग्णवाहिका राज्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. सलग ११ वर्षांपासून “डायल १०८ रुग्णवाहिका” राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देत आहे. आरोग्य संजीवनी ठरलेल्या या सेवेमुळे १ कोटी १४ लाख ४७ हजार २९६ रुग्णांना मोफत सेवा देण्यात यश आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि भारत विकास समूह (बीव्हीजी इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा राज्यात अव्याहतपणे सुरू आहे.

सद्यस्थितीत राज्यात एकूण ९३७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यात ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट (ए.एल.एस.) आणि बेसिक लाईफ सपोर्ट (बी.एल.एस.) प्रकारातील रुग्णवाहिकांचा समावेश आहे. रुग्णवाहिकेत पल्स ऑक्सिमीटर, वैद्यकीय ऑक्सिजन यंत्रणा आदी सुविधांचा समावेश आहे. देशातील २४ तास डॉक्टर आणि अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारी ही एकमेव सेवा आहे.

राज्यात ५ डिसेंबरपर्यंत अपघाती घटनांमध्ये १०८ रुग्णवाहिकेमधून ५,४४,२२४ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यात आले. त्याचबरोबर आगीच्या घटनांतील ३१,९२७, हृदयरोगातील १,०३,८८९, उंचावरून पडून जखमी झालेल्या १,५९,५५१, विषबाधेच्या २,६७,४७४, प्रसूतीवेळीच्या १७,९६,६५५ आणि शॉक/वीज पडून जखमी झालेल्या ७,३९९ रुग्णांना सेवा देण्यात आली.

अशा प्रकारे राज्यात १०८ सेवेमार्फत एकूण १ कोटी १४ लाख ५८ हजार ३१६ रुग्णांना मोफत आरोग्यसेवा देण्यात यश आले आहे.

विदर्भातील गोंडवाना विभागातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि अमरावती हे आदिवासी बहुल जिल्हे आहेत. या विभागातील १ लाख ३८ हजार ६६५ नागरिकांनी या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे.


“१०८” रुग्णवाहिका ठरली ४१,५१६ बालकांचे जन्मस्थळ-महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेची १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत या रुग्णवाहिकेत ४१,५१६ बालकांचा जन्म झाला आहे. तसेच १७ लाख ९५ हजार २९२ गर्भवती महिलांना यशस्वी सेवा देण्यात आली आहे.
थोडक्यात, १०८ रुग्णवाहिका सर्वसामान्य नागरिकांसाठी अमृतवाहिनी ठरत आहे.


सर्पदंश झालेल्या १,१९,८२४ रुग्णांचे प्राण वाचवले-राज्याच्या ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. सर्पदंश झालेल्या १ लाख १९ हजार ८२४ नागरिकांनी १०८ रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेतला आहे. यात ग्रामीण भागातील बहुतेक शेतकरीवर्गाचा समावेश आहे.

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड

पुणे- सह्याद्री रुग्णालयात एका व्यक्तीचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी शुक्रवारी रुग्णालयाची तोडफोड केली. हडपसर येथे असलेल्या सह्याद्री रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या अजय सपकाळ यांच्या वडिलांवर उपचार सुरु होते. मात्र, बुधवारी शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालयातील सपकाळ यांच्या संतापलेल्या नातेवाईकांनी सह्याद्री रुग्णालयात तोडफोड केली. यावेळी रुग्णालयाच्या इमारतीच्या दर्शनी भागातील काचा कचऱ्याचा स्टीलचा डबा आणि लोखंडी वस्तूंच्या साहाय्याने फोडण्यात आल्या. त्यामुळे रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ काचांचा खच पडला होता. यानंतर मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी सह्याद्री हॉस्पिटलबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले.

या सगळ्याबाबत शिंदे गटाचे पदाधिकारी अजय सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, मी शिंदे गटाचा वैद्यकीय कक्षाचा शहर प्रमुख आहे. माझ्याबाबत ही गोष्ट असेल तर सामान्य लोकांची काय अवस्था असेल. माझ्या वडिलांचं सह्याद्री रुग्णालयात अल्सरचं ऑपरेशन होणार होतं. ही फक्त दोन टाक्यांची साधी शस्त्रक्रिया होती. मात्र, सह्याद्री रुग्णालयाने हळूहळू माझ्या वडिलांना डॅमेज केलं. हे हॉस्पिटल बकवास आहे, थर्डक्लास आहे. सह्याद्री रुग्णालयावर कारवाई झालीच पाहिजे, ही आमची एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी आहे. तोपर्यंत आम्ही रुग्णालयाबाहेरून उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका अजय सपकाळ यांनी घेतली.

मुंढव्यातील सरकारी जमिनीवर अजित पवारांचा आधीपासून डोळा: माजी उपमहापौराचा समावेश असल्याचा अंजली दमानियांचा आरोप


पुणे-पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहारावरून गाजत असलेल्या पुणे मुंढवा जमीन प्रकरणात आता आणखी एक मोठे नाव समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात थेट पुण्याचे माजी उपमहापौर आणि अजित पवार गटाचे नेते नीलेश मगर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “या जमिनीवर सुरुवातीपासूनच अजित पवारांचा डोळा होता आणि नीलेश मगर यांनी 2018 मध्येच या जमिनीची ‘पॉवर ऑफ अटॉर्नी’ आपल्या नावावर केली होती,” असा खळबळजनक दावा दमानिया यांनी केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा भूकंप झाला आहे.

अंजली दमानिया यांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद त्यांनी या प्रकरणाचे जुने धागेदोरे उकरून काढले आहेत. त्या म्हणाल्या, “2006 मध्ये ज्याप्रमाणे शीतल तेजवानी यांनी 89 लोकांची पॉवर ऑफ अटॉर्नी केली होती, त्याचप्रमाणे 2018 मध्ये नीलेश मगर यांनी 18 लोकांची पॉवर ऑफ अटॉर्नी करून घेतली. मुळात ही जमीन ‘वतन’ जमिनीच्या प्रकारात मोडते, त्यामुळे त्यावर 18 जणांचे कुळ दाखवणे पूर्णपणे नियमबाह्य आहे.” मगर हे या प्रकरणातील ‘मोठे खेळाडू’ असून ते मगरपट्टा सिटीचे डायरेक्टर आहेत. त्यामुळे त्यांचीही या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ‘खारगे समिती’ समोर चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी दमानिया यांनी केली आहे.

अंजली दमानिया यांनी या व्यवहाराचे कनेक्शन थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत नेले आहे. “या जमिनीवर अजित पवारांची अनेक वर्षांपासून नजर होती. सत्तेत आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाच्या नावावर या जमिनीच्या खरेदीची तयारी केली. नीलेश मगर हे अजित पवारांच्या पक्षाचेच असल्याने त्यांच्या माध्यमातूनच 2018 मध्ये हालचाली सुरू होत्या,” असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

…तर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार : नीलेश मगर………..दुसरीकडे, माजी उपमहापौर नीलेश मगर यांनी अंजली दमानिया यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावरील आरोपांचे खंडन करताना मगर म्हणाले, “2018 मध्ये पासलकर आणि ढमढेरे हे कुळ मदतीसाठी माझ्याकडे आले होते. मात्र, कागदपत्रात काहीही तथ्य न आढळल्याने मी तो विषय तेव्हाच सोडून दिला होता. सध्याचा वादग्रस्त व्यवहार हा 2025 मधला आहे, ज्याच्याशी माझा सुतराम संबंध नाही.” केवळ अजित पवारांचा कार्यकर्ता असल्याने मला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असून, गरज पडल्यास अंजली दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करेन, असा इशाराही मगर यांनी दिला आहे.

गोव्यात नाईटक्लबपासून हॉटेल्सपर्यंत सर्व आस्थापनांची होणार सुरक्षा पुनर्तपासणी

0
  • “हडफडेची पुनरावृत्ती नाही! गोवा सरकारची कठोर भूमिका;
  • संयुक्त अंमलबजावणी समिती व सुरक्षा लेखापरीक्षण समिती तात्काळ सक्रिय

पणजी, ९ डिसेंबर: ६ डिसेंबर रोजी हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबमध्ये लागलेल्या विनाशकारी आगीच्या घटनेनंतर गोवा सरकारने संयुक्त अंमलबजावणी आणि देखरेख समिती आणि सुरक्षा लेखापरीक्षण समिती या दोन उच्चस्तरीय समित्या स्थापन केल्या आहेत. या दुर्घटनेमुळे झालेल्या नुकसानी आणि दुःखाने गंभीरपणे प्रभावित होऊन, सरकारने गोव्याला एक गंतव्यस्थान म्हणून मानणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, रहिवासी आणि पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.

अशा विनाशकारी घटना पुन्हा कधीही घडू नयेत यासाठी दृढनिश्चयी, राज्याने सर्व पर्यटनाशी संबंधित आस्थापनांमध्ये सुरक्षा मानके आणि जबाबदारी मजबूत करण्यासाठी व्यापक उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रत्येक परवाना आणि तपासणीमागे मानवी जीवनाचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे हे समजून, गोवा सरकारने संयुक्त अंमलबजावणी आणि देखरेख समिती आणि सुरक्षा लेखापरीक्षण समिती या दोन समित्या स्थापन केल्या आहेत.

स्पष्ट मानक कार्यप्रणाली (SOP) विकसित करणार :-
या समित्या नाईटक्लब, बार, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, गेस्टहाऊस, बीच शॅक, कार्यक्रम स्थळे आणि तत्सम आस्थापने सुरक्षितता आणि मानवी प्रतिष्ठेचा अत्यंत आदर करून काम करतील याची खात्री करतील. संयुक्त अंमलबजावणी आणि देखरेख समिती परवाना अनुपालन, अग्निसुरक्षा तयारी, विद्युत प्रणाली, निर्वासन मार्ग आणि गर्दी नियंत्रण उपायांची सखोल तपासणी करेल जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत मदत नेहमीच उपलब्ध असेल याची खात्री होईल. त्याच वेळी, सुरक्षा लेखापरीक्षण समिती अनिवार्य मंजुरींचा आढावा घेईल, संरचनात्मक अखंडतेचे मूल्यांकन करेल आणि स्पष्ट मानक कार्यप्रणाली (SOP) विकसित करेल जे मानवी सुरक्षेला इतर सर्व गोष्टींपेक्षा प्राधान्य देईल.

दोन्ही समित्यांना त्वरित सक्रिय होणार :-
हा निर्णय केवळ नियामक हेतूच नाही तर कोणत्याही कुटुंबाला कधीही असे नुकसान सहन करावे लागू नये आणि कोणत्याही आस्थापनेने त्यांच्या दारातून येणाऱ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नये या गंभीर वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करतो. जीव धोक्यात असताना प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो हे ओळखून दोन्ही समित्यांना त्वरित कारवाई करण्याचे काम देण्यात आले आहे.

शीतल तेजवानीचा आता थेट रणबीर कपूरवर निशाणा!

पुणे-कोरेगाव पार्क , मुंढवा येथील गाजलेल्या 40 एकराच्या सरकारी जमीन लाटण्याच्या गैरव्यवहार प्रकरणात गजाआड असलेल्या मुख्य आरोपी शीतल तेजवानी हिचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. जमीन घोटाळ्यात पोलिसांच्या अटकेत असतानाच शीतल तेजवानीने आता थेट बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर याच्यावर कायदेशीर दावा ठोकला असून, तब्बल 50 लाख 40 हजार रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

अभिनेता रणबीर कपूर याचे पुण्यातील कल्याणी नगर भागातील प्रतिष्ठित ‘ट्रम्प टॉवर्स’मध्ये आलिशान फ्लॅट्स आहेत. या फ्लॅटच्या भाडेकरारावरून हा वाद उफाळला आहे. शीतल तेजवानी हिने केलेल्या दाव्यानुसार, रणबीर कपूरने भाडेकरारातील अटींचे उल्लंघन केले आहे. करारात नमूद केलेल्या ‘लॉक-इन’ कालावधी पूर्ण होण्याआधीच मला घरातून बेकायदेशीररित्या बाहेर काढण्यात आले, असा आरोप शीतलने केला आहे. या कराराच्या भंगामुळे तिने पुणे दिवाणी न्यायालयात धाव घेतली असून, 50 लाख 40 हजार रुपये नुकसानभरपाई आणि त्यावरील व्याजाची मागणी केली आहे.

एकीकडे रणबीर कपूरवर दावा ठोकणारी शीतल तेजवानी सध्या एका गंभीर गुन्ह्यात अटकेत आहे. पुण्याच्या मुंढवा भागात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी घेतलेल्या 40 एकर जमिनीच्या व्यवहारात ती मुख्य आरोपी आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिला मुख्य सूत्रधार मानले असून, यापूर्वी तिची दोनदा कसून चौकशी करण्यात आली होती. चौकशीदरम्यान तिचा या गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पुणे पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आहेत. एका बाजूला कोट्यवधींचा जमीन घोटाळा आणि दुसऱ्या बाजूला बॉलीवूड अभिनेत्यासोबतचा कायदेशीर वाद, यामुळे शीतल तेजवानी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.