Home Blog Page 77

महाराष्ट्र केसरी सिकंदरला शस्त्र तस्करीप्रकरणी पंजाबमध्ये अटक-महाराष्ट्रात खळबळ

0

मोहाली – सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी व महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखसह चौघांना सीआयए पथकाने शस्त्र तस्करी प्रकरणात मोहाली (पंजाब) येथे अटक केली आहे. हरियाणातील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी त्याचा थेट संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे २४ ऑक्टोबर रोजी एसयूव्ही गाडीत दोन शस्त्रे घेऊन मोहालीत आले होते. ही शस्त्रे सिकंदर शेखकडे देण्याचे ठरले होते. ती शस्त्रे कृष्ण ऊर्फ हॅप्पीकडे पुरवण्याची जबाबदारी सिकंदर शेखवर होती. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी मोहालीच्या एअरपोर्ट चौकातून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर २६ ऑक्टोबर रोजी कृष्ण कुमार ऊर्फ हॅप्पी यालाही अटक केली. त्याच्याकडून आणखी तीन पिस्तुले जप्त केली. या कारवाईची पोलिसांनी एकत्रित माहिती दिली.पुण्यात २०२३ मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या माती गटातील अंतिम फेरीत पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेतल्यामुळे सिकंदर वादग्रस्त ठरला होता. यानंतर २०२४ मध्ये त्याने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असल्यामुळे त्याला क्रीडा कोट्यातून लष्करात भरतीही करून घेतले होते. मात्र नंतर त्याने ही नोकरी सोडली. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून तो पंजाबमध्येच राहत होता.

दरम्यान चारही आरोपींकडून पोलिसांनी १.९९ लाख रोख, पाच पिस्तुले, काडतुसे, दोन एसयूव्ही गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी खरड (पंजाब) पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसएसपी हरमन हंस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अटकेतील आरोपी हरियाणा आणि राजस्थानात सक्रिय असलेल्या विक्रम ऊर्फ पपला गुर्जर टोळीशी थेट संबंधित आहेत. उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणून ती पंजाब आणि परिसरात ते पुरवत होते. आरोपींपैकी तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तर सिकंदर शेखची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधल्याची माहिती हंस यांनी दिली.

मुख्य आरोपी दानवीर याच्यावर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात खून, दरोडा, एटीएम फोडणे, आर्म्स अॅक्ट अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. तो पपला गुर्जर टोळीचा सदस्य असून यूपी आणि मध्य प्रदेशातून शस्त्रांची तस्करी करण्याचे काम करतो.

सातारा जिल्हा रुग्णालयाने दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा; पोलीस अधीक्षक कार्यालयाने चार्जशीट वेळेत दाखल करावे

मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२५ :फलटण तालुक्यातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मागील दोन वर्षांचा विशाखा समितीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाने या प्रकरणातील चार्जशीट वेळेत दाखल करावे असे आदेशही दिले.

या प्रकरणातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीला डॉ. कादंबरी बलकवडे आयुक्त आरोग्य सेवा, डॉ. नितीन अंबाडेकर संचालक आरोग्य सेवा हे समक्ष उपस्थित होते. तर दुरदृश्य प्रणालीद्वारे पोलीस अधीक्षक सातारा श्री. तुषार दोषी , जिल्हा चिकित्सक सातारा डॉ. युवराज कर्पे , धुमाळ वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय फलटण डॉ. अंशुमन धुमाळ, डॉ. आर. बी पवार उपसंचालक पुणे, सहभागी झाले होते. तसेच, राज्य महिला आयोग माजी सदस्या व शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी संगीता चव्हाणही यावेळी उपस्थित होत्या.

फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक श्री. धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. संपदा मुंडे या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी होत्या आणि रुग्णालयातील सर्व सहकाऱ्यांशी त्यांचे संबंध चांगले होते. कोणतीही तक्रार त्यांच्याविरुद्ध नव्हती. पोस्टमार्टम विभागात त्यांच्यासोबत दोन महिला डॉक्टर कार्यरत असून कामकाजात कोणताही दबाव नसल्याचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. रुग्णालयात सुमारे ५० टक्के महिला कर्मचारी कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस विभागाने काही अहवाल रुग्णालयाला सादर केला होता, ज्यावर समितीने चौकशी केली. तथापि, कोणतीही विभागीय चौकशी करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी निर्देश दिले की, सातारा जिल्हा रुग्णालयाने आपल्या अखत्यारीतील सर्व रुग्णालयांचा दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल तयार करून सादर करावा. तसेच तपासात कोणतीही ढिलाई होऊ नये आणि संबंधितांना न्याय मिळावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय, निराधार माहितीचा प्रसार थांबवण्यासाठी पोलीस विभागाने अधिकृत बुलेटिनच्या माध्यमातूनच माहिती प्रसिद्ध करावी, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

डॉ. गोऱ्हे यांनी विशाखा समितीच्या कार्यपद्धतीसाठी सुस्पष्ट एसओपी (SOP) तयार करण्याचे आणि समितीचा तिमाही अहवाल विधी व न्याय विभागाला सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच पोस्टमार्टम व प्रसूती विभागातील डॉक्टरांवर ताण निर्माण होऊ नये यासाठी त्यांच्या मार्गदर्शनार्थ मदत कक्ष (Help Desk) स्थापन करण्याची सूचनाही त्यांनी केली.

पोक्सोच्या प्रकरणात रुग्णालयात दाखल पीडिते सोबत असणाऱ्या एका नातेवाईकाची देखील जेवणाची सोय करावी. तसेंच गर्भवती महिलेच्या सोबत तिच्या पतीचे ही मार्गदर्शन करण्यात यावे. आरोग्य सेवा विभागाने फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील सकारात्मक चर्चा करून शहानिशा करावी, असेही उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

२७ ऊसतोड कामगारांना बंधमुक्त करून मूळ गावी रवाना

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पुणे, दि. 31ऑक्टोबर: अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मानेवाडी (ता. कोपरगाव) येथील श्री. नाना जाधव यांनी जिल्हा विधी सेवा समिती, पुणे व जिल्हाधिकारी (स.यो.) पुणे यांचेकडे अर्ज देऊन आपले तसेच इतर नऊ कुटुंबांतील ऊसतोडणीस गेलेले कामगार मौजे राहु (माधवनगर), ता. दौंड, जि. पुणे येथील जमीनमालक हिरामण गणपत गाढवे यांनी बंधक ठेवले असल्याची तक्रार केली होती. संबंधित मालकाने कामगारांना मूळ गावी न जाण्यास सक्ती केली होती तसेच मारहाण, शिवीगाळ, दमदाटी व महिलांचा अनादर करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले होते.

या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा विधी सेवा समिती, पुणे यांच्या वतीने अॅड. देवभक्त महापुरे, अॅड. सुनिल म्हस्के आणि दीपक पवार यांची समिती गठीत करण्यात आली. समितीतील सदस्य, स्थानिक महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा, कामगार आयुक्तालयाचे प्रतिनिधी, मंडळ अधिकारी जयंत भोसले, ग्राम महसूल अधिकारी राहु, कामगार विभाग, पोलीस प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून कारवाई केली. या संयुक्त मोहिमेत एकूण २७ ऊसतोड वेठबिगार कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना बंधमुक्त करण्यात येऊन संबंधित जमीनमालक हिरामण गणपत गाढवे यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात “The Bonded Labour System (Abolition) Act, 1976” अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व कामगारांना आवश्यक प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी वाहतुकीची सोय करून देण्यात आली. ही कारवाई दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी पूर्ण करण्यात आली.

ही संपूर्ण कारवाई जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५:जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

पुणे, दि. 31ऑक्टोबर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी (पुणे ग्रामीण), सर्व उपविभागीय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सर्व तहसीलदार उपस्थित होते.

बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी पुणे आणि पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना दिल्या. सर्व तडीपार प्रकरणांचा गुणवत्तेवर निपटारा करणे, दारूबंदी आदेश निर्गत करणे, शवबंदी आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करणे तसेच यापूर्वीच्या निवडणुकीतील गुन्ह्यांचा पाठपुरावा करणे यासंबंधी स्पष्ट निर्देश देण्यात आले.

ईव्हीएम व्यवस्थापनासंदर्भात पोलीस आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, तसेच ईव्हीएम स्ट्राँग रूमला पुरेशी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करावी अशा सूचना देण्यात आल्या. याशिवाय ईव्हीएमची योग्य हाताळणी, सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक माहिती भरणे, मतदार यादी अद्ययावत ठेवणे, मतदान वाढीसाठी मतदार जागृती अभियान राबवणे आणि सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीत निवडणुकीसंबंधित सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे काटेकोरपणे पार पाडाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी केल्या.

पसंतीचा वाहन क्रमांक एमएच-12 वाय व्ही आरक्षणासाठी फेसलेस सेवा 1 नोव्हेंबरपासून सुरू

पुणे, दि. 31ऑक्टोबर: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे नवीन वाहनांसाठी आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची फेसलेस (ऑनलाईन) सेवा 1 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

ही सेवा पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात कार्यान्वित असून, कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने शुल्क स्वीकारले जाणार नाही. नागरिकांनी ही सेवा घरबसल्या https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून वापर करता येईल.

सदर फेसलेस सेवा २५ नोव्हेंबर २०२४ पासून कार्यान्वित असून, अर्जदार आधार लिंक मोबाईल क्रमांकाद्वारे ओटीपी घेऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. नव्याने सुरू होणाऱ्या एमएच 12 वाय व्ही मालिकेतील पसंतीचे नोंदणी क्रमांक अर्जदारांना आरक्षित करता येतील. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

“वंदे मातरम” गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त सामूहिक गान करा आयोजन आणि शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहा :आदेश

पुणे, दि. 31ऑक्टोबर: शासनाच्या निर्देशानुसार दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी “वंदे मातरम” या गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सामूहिक गानचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शासनाच्या सर्व विभागांतील शासकीय व निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी अनिवार्यपणे उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत. या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी “वंदे मातरम” गीताच्या सामूहिक गान प्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसिलदार सर्वसाधारण, पुणे यांनी केले आहे.

या उपक्रमाचा उद्देश देशभक्तीची भावना दृढ करणे आणि “वंदे मातरम” या राष्ट्रगीतास १५० व्या वर्षानिमित्त अभिवादन करणे हा असून, जिल्ह्यात हा कार्यक्रम उत्साहात पार पाडावा असे आवाहनही तहसिलदार यांनी केले आहे.

‘महसूल न्यायालयीन खटले व्यवस्थापन प्रणालींचे आधुनिकीकरण’ या विषयावर राष्ट्रीय चिंतन शिबिराचे आयोजन

योग्य भूमी अभिलेखांसाठी सुलभ बदल नोंद प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची – मनोज जोशी

पुणे दि. 31 भारत सरकारच्या भूमी संसाधन विभाग (DoLR), मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) आणि पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी (यशदा) यांच्या सहकार्याने, ‘महसूल न्यायालयीन खटले व्यवस्थापन प्रणालींचे आधुनिकीकरण’ (RCCMS) या विषयावर 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2025 दरम्यान पुणे येथील यशदा येथे दोन दिवसीय राष्ट्रीय चिंतन शिबिराचे आयोजन केले आहे.

या शिबिराचे उद्घाटन आज (31 ऑक्टोबर) रोजी भारत सरकारच्या भूमी संसाधन विभागाचे सचिव मनोज जोशी; महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव तसेच मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम; पुण्यातील यशदा’चे महासंचालक निरंजन के. सुधांसू; भारत सरकारच्या भूमी संसाधन विभागाचे सहसचिव कुणाल सत्यार्थी; कर्नाटक राज्याच्या महसूल विभागाचे प्रधान सचिव राजेंद्र कटारिया; आणि तेलंगणाचे अतिरिक्त मुख्य सचिव विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. देशभरातील इतर सर्व राज्यांचे प्रतिनिधी देखील या कार्यशाळेत सहभागी होत आहेत.

मनोज जोशी यांनी आपल्या प्रमुख भाषणात आधुनिक, पारदर्शक, कार्यक्षम आणि तंत्रज्ञान आधारित भूमी प्रशासनाचे आपले दृष्टिकोन मांडले. त्यांनी सुधारणा, नवोन्मेष आणि नागरिक-केंद्रित महसूल प्रशासनाचे महत्त्व अधोरेखित केले. देशभरात जरी समान भूमी अभिलेख प्रणाली कार्यरत असली तरीही दुरुस्ती आणि बदल प्रक्रिया प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, ज्यामुळे ती वेळखाऊ आणि गुंतागुंतीची बनते, असे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारने या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आधीच काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत आणि या चिंतन शिबिराचे उद्दिष्ट या उपक्रमांवर संवाद सुलभ करण्यासाठी उच्च-स्तरीय व्यासपीठ म्हणून काम करणे, हे असल्याचे त्यांनी सांगितले.

मनोज जोशी यांनी महसूल न्यायालयीन प्रक्रिया सुलभ करणे, हक्कांच्या नोंदींचे मानकीकरण (RoR) करणे तसेच महसूल विषयक संज्ञांचा एकसंध शब्दकोश तयार करण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले. “मालमत्ता बाजारातील व्यवहार सुलभ असणे हे भूमीच्या मूल्यात वाढ होण्यासाठी आवश्यक आहे. तसेच बदल नोंद प्रक्रिया सुरळीत असणे हे योग्य भूमी अभिलेखन साठी अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले. जोशी यांनी सर्व सहभागी प्रतिनिधींना देशभरातील भूमी प्रशासन प्रणालींची कार्यक्षमता सुधारण्यासाठी सूचना आणि कल्पना मांडण्याचे आवाहन केले.

कुणाल सत्यार्थी यांनी आधुनिक महसूल न्यायालयीन खटले व्यवस्थापन प्रणालीच्या उद्दिष्टांवर सविस्तर सादरीकरण केले, तसेच महसूल न्यायालयीन प्रकरणांमध्ये प्रक्रिया सुलभ करण्यासाठी काही उपाययोजनांची शिफारस केली. कुणाल सत्यार्थी यांनी विद्यमान प्रक्रिया मजबूत करण्यासाठी अनेक अंतर्दृष्टीपूर्ण उपाय देखील सुचवले.

पुणे जिल्ह्यात कृत्रिम वाळू युनिट स्थापनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. 31 ऑक्टोबर : पुणे जिल्ह्यातील सर्व इच्छुक व्यक्ती व संस्था ज्यांना एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) युनिट स्थापन करायचे आहे, त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

राज्यातील कृत्रिम वाळू धोरण जाहीर झाले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच ही माहिती https://pune.gov.in या संकेतस्थळावरही अवलोकनासाठी उपलब्ध आहे.

एम-सॅण्ड युनिट स्थापनेसाठी इच्छुकांनी कागदपत्रांसह पूर्ण अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म शाखेत सादर करणे आवश्यक आहे.

अर्जासोबत मिळकतीचा चालू ७/१२ उतारा, वैयक्तिक अर्जदारासाठी – आधारकार्ड व पॅनकार्ड, संस्थेच्या नावाने अर्ज असल्यास – संस्थेची कागदपत्रे, उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र, अर्ज शुल्क रु. ५००/-, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालेल्या CTE परवान्याची प्रत, शंभर टक्के एम-सॅण्ड उत्पादनाबाबतचे रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवरील हमीपत्र व दगडाच्या पुरवठा स्रोताचा तपशील जोडणे आवश्यक आहे.

यापूर्वी महाखनिज सॉफ्टवेअर प्रणालीवर एम-सॅण्डसाठी अर्ज केलेल्या युनिटधारकांनाही पुन्हा नव्याने जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

NSG कमांडो असताना पोलिसांनी गोळी का झाडली?; मुंबईतील एन्काऊंटरवर अनेक गंभीर प्रश्न

राज्यातील गुन्हेगारीला फडणवीसांचे पाठबळ

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी?

अकोला व हिंगोलीतील शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश.

निवडणूक आयोगाविरोधातील सर्वपक्षीय मोर्चात काँग्रेस नेते व कार्यकर्ते सहभागी होणार.

मुंबई, दि. ३१ ऑक्टोबर २०२५

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलीस पाळत ठेवत आहेत. मुंबईतील नाना चौकातील सर्वोदय आश्रमात सपकाळ यांचा मुक्काम असतो, त्या आश्रमात पोलीस सातत्याने पाळत ठेवत आहेत. आज सकाळी एका साध्या वेशातील पोलिसांने थेट बेडरुममध्ये घुसून टेहळणी आणि चौकशी केली. हे आतापर्यंत तिस-यांदा घडले आहे. कोणाच्या आदेशाने आमच्यावर पाळत ठेवली जात आहे?, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.यावेळी काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सकाळी एक पोलीस थेट बेडरूमध्ये घुसून टेहळणी करत होता, तुम्ही पत्रकार परिषद घेणार आहात का? पत्रकार आले आहेत का ?, यासह अनेक प्रश्न विचारले. तुम्ही बेडरुममध्ये प्रवेश का केला, कोणाचे आदेश आहेत, असे विचारले असता, वरिष्ठांचे आदेश आहेत असे म्हणत वरिष्ठांना फोनवर बोला असे सांगितले. अशा पद्धतीने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवली जात आहे. यामागे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून विरोधकांवर पाळत ठेवण्याची भाजपाची प्रवृत्ती आहे, आधी पेगॅसेस नंतर फोन टॅपिंग केले. आता थेट बेडरुमपर्यंत ते पोहचले आहेत परंतु अशा दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मुंबईतील एन्काऊंटरवर अनेक प्रश्न…
पवईत काल पोलिसांनी रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीचे एन्काऊंटर केले. या व्यक्तीने लहान मुलांना ओलीस ठेवले होते हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, मुलांची सुटका महत्वाची होती पण हे संपूर्ण प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या वेळी एनएसजीचे पथक उपस्थित असताना पोलिसांनी गोळ्या झाडून त्याची हत्या करण्याचे कारण काय. तो व्यक्ती मनोरुग्ण आहे असे सांगतिले जात आहे पण याच व्यक्तीने सुंदर माझी शाळा सारखे सरकारी उपक्रम राबिवले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर तो उपस्थित होता. या घटनेची चौकशी झाली पाहिजे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

गुन्हेगारांचा आका देवेंद्र फडणवीस…
डॉक्टर संपदा मुंडे यांना दबावामुळे आत्महत्या करावी लागली, ही आत्महत्या नसून हत्याच आहे. या प्रकरणी भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव घेतले जात आहे. निंबाळकर यांना अनेकांना त्रास दिला आहे, त्यांचा अपहरण, खंडणी, मारहाण यासारख्या गंभीर गुन्ह्यात हात असूनही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चौकशी न करता त्यांना क्लिन चिट देऊन टाकली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांद्याच्या एका फुल व्रिकेत्यानेही भाजपाच्या पाच पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवून आपल्याला आत्महत्या का करावी लागत आहे हे सांगितले आहे. पोलिस सामान्य जनतेच्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत.सत्ताधारीच गुंडगिरी करत असल्याने कारवाई होत नाही. फडणवीस यांच्या काळात राज्यात गुन्हेगारी प्रवृत्ती बोकाळली असून यात भाजपाचे नेते पदाधिकारी यांची गुंडगिरी वाढली आहे. या सर्वांना फडणविसच जबाबदार असून फडणवीस गुन्हेगारांचे आका आहेत असे सपकाळ म्हणाले.

शिवसेना, भाजपाच्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश…

अकोला जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय मालोकार यांनाही काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यांनी तीनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली असून शासनाच्या विविध समित्यांवरही काम केले आहे. यासोबतच शिवसेना (उबाठा) चे सहसंपर्क प्रमुख व हिंगोली जिल्ह्यातील नेते डॉ. रमेश शिंदे पाटील यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, युवासेना, भाजपा, शेतकरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनाही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापूर्वीच मोठा पक्ष प्रवेश झाला. त्यांनतर जालना जिल्ह्यात व नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे विविध पक्षातून नेते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षात आणखी महत्वाचे नेते लवकरच प्रवेश करणार आहेत.

निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चात काँग्रेस…
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या विरोधात १ नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा आयोजित केला आहे. मतदार याद्यामधील घोटाळे हा गंभीर व चिंतेचा विषय असून राहुल गांधी यांनी या प्रश्नाला सर्वाच आधी वाचा फोडली व पुराव्यासह गडबड घोटाळे उघड केले. निवडणुका या निष्पक्ष व पारदर्शकपद्धतीने झाल्या पाहिजेत ही सर्वांची मागणी आहे. या मोर्चाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून मोर्चात काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

वीजबिलांच्या ग्राहक नावातील बदल अर्जांना आता स्वयंचलित मंजूरी

डिजिटल ग्राहकसेवेत महावितरणचे आणखी एक पाऊल पुढे

मुंबई,: दर्जेदार व तत्पर ग्राहकसेवेसाठी महावितरणने वीजबिलांच्या ग्राहक नावातील बदल (Change of Name) करण्याच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजूरी देण्यास सुरवात केली आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रक्रिया शुल्काचा भरणा केल्यानंतर केवळ तीन ते सात दिवसांमध्ये वीजबिलावरील ग्राहक नावामध्ये बदलाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यापूर्वी या प्रक्रियेस कृती मानकानुसार एक महिन्याचा कालावधी लागत होता.

राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी वीजग्राहकांना तत्पर व घरबसल्या सेवा देण्यासाठी महावितरणच्या डिजिटल सेवेत ग्राहकाभिमुख बदल करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी बिलावरील ग्राहक नावात बदल (Change of Name) करण्याच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजूरी देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नुकतीच ऑनलाइन प्रणाली विकसित व कार्यान्वित करण्यात आली आहे.

खरेदी-विक्री, वारसा हक्क किंवा इतर कारणांमुळे घर किंवा इतर मालमत्तेच्या मालकीमध्ये बदल झाल्यानंतर वीजबिलाच्या ग्राहक नावात बदल करण्यासाठी अर्ज करण्यात येतो. या प्रक्रियेसाठी महावितरण मोबाईल अॅप व www.mahadiscom.in या संकेतस्थळावर वीजग्राहकांना ‘लॉग-इन’द्वारे ऑनलाइन अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे व प्रक्रिया शुल्क (Processing Fee)भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांचे अर्ज, छाननी व मंजूरी या प्रक्रियेसाठी मा. महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाच्या कृती मानकांप्रमाणे एक महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. आता महावितरणकडून या अर्जांना स्वयंचलित मंजूरी मिळत असल्याने नावात बदल करण्याची कार्यवाही केवळ तीन ते सात दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे.

ग्राहक नावात बदल करण्याचा ऑनलाइन अर्ज व अपलोड केलेल्या कागदपत्रांची संबधित उपविभाग कार्यालयाकडून तपासणी होईल. त्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधित ग्राहकांना लगेचच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येईल. सोबतच ग्राहक नावात बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेशही ग्राहकांना पाठविण्यात येईल. ग्राहक नावात बदल करण्याच्या अर्जांना स्वयंचलित मंजूरी मिळणार असल्याने प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसह इतर ग्राहकांना महावितरणच्या डिजिटल सेवेचा तत्पर लाभ होणार आहे.

महावितरणने याआधी लघुदाब वर्गवारीतील सर्व औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती व इतर ग्राहकांच्या १५७ केडब्लूपर्यंत वीज भार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्यास प्रारंभ केला आहे. त्याचा वीजग्राहकांना मोठा लाभ झाला आहे. गेल्या महिन्याभरात २४६० औद्योगिकसह ४ हजार १६४ वीजग्राहकांनी एका क्लिकवर वीज भारामध्ये तब्बल २२ हजार किलोवॅटने वाढ केली आहे. त्यानंतर आता वीजबिलांवरील ग्राहक नावात बदल करण्याची मंजूरी स्वयंचलित केल्याने डिजिटल ग्राहकसेवेत महावितरणने मोठी आघाडी घेतली आहे.

पवन ऊर्जा क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महावितरणला ‘विंड इंडिया-२०२५’ पुरस्कार

मुंबई, दि. ३१ ऑक्टोबर २०२५: केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांशी सुसंगत राहून महावितरणकडून अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. सन २०३० पर्यंतच्या दीर्घकालीन वीज खरेदी करारात पवन-सौर संकरित ऊर्जेचाही समावेश करण्यात आला आहे. त्याची दखल घेऊन भारतातील पवन ऊर्जा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडियन विंड टर्बाइन मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या (IWTMA) चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत गुरुवारी (दि. ३०) केंद्रीय नवीन व नवीकरणीय मंत्री मा. श्री. प्रल्हाद जोशी यांच्याहस्ते महावितरणला ‘विंड इंडिया-२०२५’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात अपर मुख्य सचिव (ऊर्जा) सौ. आभा शुक्ला यांनी राज्याच्या वीज क्षेत्रासाठी रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन तयार केला आहे. या नियोजनाद्वारे प्रामुख्याने सौर ऊर्जेसह पवन-सौर हायब्रिड, पवन, बगॅस, बायोमास व लघु जलविद्युत अशा विविध अक्षय स्रोतांपासून वीज निर्मितीला प्रोत्साहन मिळाले आहे. तर अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांमध्ये अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने प्राधान्य दरांवर दीर्घकालीन वीज खरेदी करार (पीपीए) केले आहेत. यात ४ हजार ३४४ मेगावॅट पवन-सौर संकरीत विजेसाठी दीर्घकालीन खरेदी करार करण्यात आले आहेत.

चेन्नई ट्रेड सेंटरमध्ये आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत गुरुवारी (दि. ३०) केंद्रीय नवीन व नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याहस्ते महावितरणला ‘विंड इंडिया-२०२५’ पुरस्काराने गौरविण्यात आले. महावितरणच्या वतीने मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी (नवीकरणीय ऊर्जा, मुंबई) यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ऊर्जामंत्री एस. एस. शिवशंकर (तामिळनाडू) व के. जे. जॉर्ज (केरळ), केंद्रीय सचिव संतोषकुमार सारंगी व सहसचिव राजेश कुलहारी (नवीन व नवीकरणीय ऊर्जा), जोहान साथॉफ (संसदीय राज्य सचिव, जर्मनी), आयोजन समिती व असोसिएशनचे अध्यक्ष  गिरीश तांती यांची उपस्थिती होती.

ऊर्जा विभागाच्या रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅननुसार सन २०३० पर्यंत तब्बल ३८ हजार मेगावॅट हरित ऊर्जेची सह ४५ हजार मेगावॅट विजेची आणखी भर पडणार आहे. महाराष्ट्रातील नवीकरणीय ऊर्जेची क्षमता १३ टक्क्यांवरून ५२ टक्के होणार आहे. यामध्ये सुमारे ३ लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ७ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. तसेच पुढील पाच वर्षांमध्ये वीज खरेदीमध्ये ८२ हजार कोटी रुपयांची बचत होईल व त्यायोगे सर्व वर्गवारीचे वीज दर कमी होत जाणार आहे.

पहिली व्हिझकिड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा पुण्यात उत्साहात पार पडली

पुणे – पहिली व्हिझकिड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच पुण्यातील बी.एम.सी.सी. कॉलेज येथील टाटा हॉलमध्ये यशस्वीरीत्या संपन्न झाली. ही स्पर्धा  बाकलीवाल ट्युटोरियल्स आणि किंग्स इंडियन चेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रभरातील तरुण खेळाडूंनी बुद्धिमत्ता, रणनीती उत्साह आणि ऊर्जेचा सुंदर संगम या स्पर्धेत दिसून आला आहे.

एकूण ३१० खेळाडूंनी तीन गटांमध्ये १६, १४ आणि १२ वर्षे वयोगटाखालील असणाऱ्या खेळाडूंनी आपले कौशल्य आणि स्पर्धात्मकता प्रदर्शित केली. सात फेऱ्यांच्या या रॅपिड फॉरमॅटमध्ये प्रत्येक खेळाडूस १५ मिनिटे + प्रत्येक चालीनंतर १० सेकंदांची वाढ असा वेळ दिला गेला होता, जेणेकरून खेळाडूंनी झपाट्याने विचार करून आपली रणनीतीक कौशल्याची मांडणी करून आपले कौशल्य दाखविले पाहिजे.
या स्पर्धेचे उद्घाटन फिडे मास्टर गौरव बाकलीवाल यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी खेळाडूंना संबोधित करताना सांगितले कि, खेळाडूवृत्ती, चिकाटी आणि निश्चय या तीन महत्वाच्या भूमिका चेस खेळताना खेळाडूंनी आत्मसात करायला पाहिजे तरच ते खेळाडू  बुद्धिबळ सारख्या स्पर्धेत आपला ठसा उमटवू शकतात.

यानंतर बाकलीवाल ट्युटोरियल्सचे संस्थापक वैभव बाकलीवाल यांनी आंतरराष्ट्रीय चेस मास्टर अक्षय बोरगावकर (सध्या बी. टी. चा  इयत्ता ११ वी चा विद्यार्थी) याच्याशी रोचक संवाद साधला. या चर्चेत त्यांनी बुद्धिबळ आणि शैक्षणिक क्षेत्रातील परस्पर संबंध मांडले आणि बुद्धिबळामुळे विकसित होणारी विश्लेषणात्मक विचारसरणी, संयम व समस्यासोपीकरण कौशल्ये ही शैक्षणिक उत्कृष्टता तसेच २१व्या शतकातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील यशासाठी कशी उपयुक्त ठरतात, हे अधोरेखित केले.

तसेच, त्यांनी सहभागी खेळाडूंना काही आकर्षक बुद्धिबळ आणि तर्कशास्त्रावर आधारित कोडी व प्रश्न विचारले, ज्यांचा प्रेक्षकांनीही मोठ्या उत्साहाने आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला पालक, प्रशिक्षक आणि बुद्धिबळप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा उपक्रम पुण्यातील तरुण बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. आयोजकांनी सर्व खेळाडू, पालक, स्वयंसेवक आणि अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि ही स्पर्धा दरवर्षी साजरी करून येणाऱ्या नवीन तरुण पिढीच्या बुद्धिमत्ता आणि रणनीतिक उत्कृष्टतेची परंपरा म्हणून पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

विजेते खालील प्रमाणे

16 वर्षाखालील गट (या गटातील सर्व विजेते बाकलीवाल टिटोरिअलचे विद्यार्थी आहेत)
1. विहान दावडा (FIDE रेटिंग – 1871, गुण 6.5/7)
2. ओजस देवशतवार (FIDE रेटिंग – 1778, गुण 6/7)
3. CM अर्णव कदम (FIDE रेटिंग – 1867, गुण 6/7)

14 वर्षाखालील गट

1. लाथिक राम (FIDE रेटिंग – 1896, गुण 6/7)
2. भुवन कोंनूर (FIDE रेटिंग – 1545, गुण 6/7)
3. AFM इशान कदम (FIDE रेटिंग – 1520, गुण 6/7)

12 वर्षाखालील गट

1. अविरत चौहान (FIDE रेटिंग – 2071, गुण 7/7)
2. शितिज प्रसाद (FIDE रेटिंग – 1783, गुण 6/7)
3. कविन मथियाझगन (FIDE रेटिंग – 1533, गुण 6/7)

रोहित आर्यवरील आर्थिक अन्यायाच्या कहाणीचा अंत… एन्काऊंटर ?

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा कल्पना रोहितची….

मुंबई- पवई परिसरात आर.ए. स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य याचा पोलिसांनी एन्काऊंटर करत खात्मा केला. पण या घटनेनंतर समोर आलेली पार्श्वभूमी अधिकच धक्कादायक आहे. पोलिसांच्या तपासात आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उघड झालेल्या माहितीनुसार, रोहित आर्य हा काही गुन्हेगार नव्हता, तर शासकीय यंत्रणेच्या अन्यायाला बळी पडलेला एक उद्योजक होता. शिंदे सरकारच्या काळात त्याने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेअंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवला होता. पण त्या कामाचे दोन कोटी रुपयांचे मानधन सरकारने थकवल्याने तो नैराश्यात गेला आणि अखेर या टोकाच्या पावलाकडे वळला.

रोहित आर्य या घटनेपूर्वी वर्षभरापूर्वीच आंदोलनाच्या मार्गावर उतरला होता. त्याने राज्य सरकारकडून थकलेले पैसे मिळावेत म्हणून 16 ते 17 दिवस आमरण उपोषण केलं होतं. पुण्यातील एका सामाजी कार्यकर्त्याने वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, गेल्या वर्षी आम्ही पत्रकार भवनाबाहेर आलो असताना एक व्यक्ती रस्त्यावर बेशुद्ध पडलेला दिसला. त्याच्याशी संवाद साधल्यावर आम्हाला समजलं की तो रोहित आर्य आहे आणि तो सरकारी अन्यायाविरोधात उपोषण करत होता. लोखंडे यांनी पुढे सांगितले की, रोहित आर्यने आपल्या कुटुंबाच्या आर्थिक भविष्याची पर्वा न करता स्वच्छता मॉनिटर उपक्रमासाठी घर आणि दागिने विकले होते. पण सरकारकडून त्याला ना पारितोषिक मिळालं ना मानधन.

या आर्थिक फसवणुकीमुळे रोहित आर्य मानसिकदृष्ट्या कोसळला. त्याने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात दोन वेळा उपोषण केलं, पण प्रत्येकवेळी केवळ आश्वासनांवरच त्याची बोळवण करण्यात आली. यामुळे त्याचं आयुष्य नैराश्याच्या गर्तेत गेलं. जवळपास वर्षभर तो वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे आपल्या पैशासाठी चकरा मारत होता. अखेर त्याचा समाज आणि शासन या दोन्ही यंत्रणांवर विश्वास उठला. गुरुवारी जेव्हा त्याने 17 जणांना ओलीस ठेवले, तेव्हा त्याच्या मागे कोणताही दहशतवादी हेतू नव्हता, तर स्वतःचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता, असं पोलिस सूत्रांनी सांगितलं. पण परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी छातीत गोळी झाडून त्याचा खात्मा केला.

रोहित आर्यचा भूतकाळ पाहता तो शिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्राशी निगडित होता. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, योजनेअंतर्गत त्याने शाळांमध्ये स्वच्छतेचा मॉडेल उभारण्याचं काम केलं होतं. राज्यातील अनेक शाळांमध्ये त्याचा उपक्रम यशस्वी झाला. या योजनेचा उद्देश शाळांचं आधुनिकीकरण आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती निर्माण करणं हा होता. पण शिंदे सरकार गेल्यानंतर आणि फडणवीस यांनी सत्तेची सूत्रं हातात घेतल्यानंतर या योजनेला कात्री लावण्यात आली. निधीअभावी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, ही योजना बंद करण्यात आली आणि त्या सोबत रोहित आर्यासारख्या ठेकेदारांचे पैसेही अडकले.

दरम्यान, रोहित आर्यच्या एन्काऊंटरनंतर ही योजना पुन्हा चर्चेत आली आहे. शिक्षण विभागातील स्वच्छता मॉनिटर, एक राज्य, एक गणवेश आणि पुस्तकाला वह्यांची पान, असे अनेक उपक्रम याच काळात थांबवण्यात आले होते. या योजनांच्या माध्यमातून राज्यभरातील शाळांमध्ये स्पर्धा, पारितोषिक वितरण आणि सौंदर्यीकरणाचे कार्यक्रम घेण्यात येत होते. पण सरकारने निधी रोखल्याने हजारो शाळा आणि शिक्षणाशी संबंधित कामगार अडचणीत आले. रोहित आर्य हा त्याच व्यवस्थेचा बळी ठरला. त्याच्या मृत्यूनंतर या योजनेच्या पारदर्शकतेबाबत आणि थकीत देयकांच्या चौकशीची मागणी होत आहे.

या घटनेने शासनव्यवस्थेच्या संवेदनशून्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. एका माणसाने सरकारी कामासाठी स्वतःचं सर्वस्व पणाला लावलं आणि शेवटी त्याला निराशेच्या भरात प्राण द्यावे लागले. पवईतील एन्काऊंटरने जरी ओलीस प्रकरणाचा शेवट केला असला, तरी रोहित आर्यच्या कथेनं समाजाला विचार करायला भाग पाडलं आहे. शासनाच्या विलंबित निर्णयांमुळे आणि नोकरशाहीच्या दिरंगाईमुळे किती आयुष्यं उद्ध्वस्त होतात, याचं हे जिवंत उदाहरण ठरलं आहे. आता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, योजनेतील आर्थिक व्यवहार आणि थकीत देयके याबाबत सविस्तर चौकशी करून अशा शोकांतिका पुन्हा होऊ नयेत, यासाठी पावलं उचलावीत, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.

रोहित आर्यला खिशातून पैसे देण्याची गोष्ट शंकास्पद:RTI कार्यकर्त्याचे केसरकर, IAS सुरज मांढरेंकडे बोट

पुणे-एखाद्या वेबसीरिज किंवा चित्रपटाला शोभेल असे थरारनाट्य गुरूवारी मुंबईच्या पवई भागात घडले. रोहित आर्य नामक व्यक्तीने ऑडिशनच्या नावाखाली 17 लहान मुलांचे अपहरण केले. हे अपहरणनाट्य रोहितला यमसदनी पाठवल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच संपुष्टात आले. त्यानंतर माजी मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतःहून पुढे येत आपण रोहित आर्यला आपल्या खिशातून पैसे दिल्याचा दावा केला. पण आता त्यांच्या याच दाव्यावर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दीपक केसरकर यांनी रोहित आर्यला त्यांच्या खिशातून पैसे दिल्याची गोष्ट शंका निर्माण करणारी आहे, असे ते म्हणालेत.

विजय कुंभार शुक्रवारी आपल्या एका पोस्टद्वारे रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणात दीपक केसरकर व आयएएस सुरज मांढरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. दीपक केसरकर यांनी रोहित आर्यला त्यांच्या खिशातून पैसे दिल्याची गोष्ट शंका निर्माण करणारी आहे . कोणताही मंत्री कंत्राटदाराला अशा प्रकारे पैसे देणार नाही. त्यामुळे या कृतीमागील हेतू आणि प्रशासनाची, विशेषतः आयएएस सुरज मांढरे यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे. केसरकरांनी स्वतः चेकद्वारे मदत केल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे या व्यवहाराचा सखोल तपास आवश्यक आहे कारण सामान्य व्यवहारात अशी वैयक्तिक मदत संशयास्पद ठरते, असे विजय कुंभार यांनी म्हटले आहे.


दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. शासनाकडं थकीत असलेल्या बिलासाठी रोहित आर्याने मुलांना ओलीस धरण्याचं अघोरी आणि गुन्हेगारी कृत्य केलं यात काही शंका नाही, पण त्याच्या थकीत बिलाच्या विषयाकडं मात्र दुर्लक्ष करता येणार नाही. ठेकेदारांची तब्बल ८० हजार कोटीहून अधिक रुपयांची बिलं थकीत आहेत.

बिलं मिळत नसल्याने यापूर्वी नागपूर तसंच सांगली येथील तरुण ठेकेदाराने आत्महत्या केली आहे. तरीही सरकारला याचं गांभीर्य कळत नाही. थकीत बिलांची मागणी करणाऱ्या ठेकेदारांनी चुकीचं पाऊल उचलावं आणि यात त्याचा एन्काऊंटर करावा किंवा त्याने स्वतःहून तरी आत्महत्या करावी, याची तर सरकार वाट बघत नाही ना? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अन्य एक नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणी सरकारला काही प्रश्न विचारलेत. कंत्राटदारांना आपले पैसे मिळवण्यासाठी आता अपहरण करावे लागत आहे. ही पोस्ट CMO महाराष्ट्र ची आहे. यात काल एन्काऊंटर झालेल्या रोहित आर्य याचा उल्लेख आहे. रोहित आर्यचे सरकारकडे काही कोटी रुपये थकीत होते. ते मिळत नसल्याने त्याने लहान मुलांचे अपहरण करण्याचा कट रचला. अर्थात याच समर्थन मी मुळीच करणार नाही, पण आर्यवर ही वेळ का आली..? याच उत्तर सरकार देणार आहे का..? असे ते म्हणालेत.

रोहित आर्यचे एन्काऊंटर फेक:वकील नितीन सातपुते यांचा आरोप; API ला हिरो व्हायचे म्हणून छातीत गोळी घातल्याचा दावा

रोहित आर्यवर ‘ती’हि’ परिस्थिती सरकारनेच आणली. हा प्रसंग टाळता आला असता.

मुंबई-आरए स्टुडिओत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य याचे मुंबई पोलिसांनी केलेले एन्काऊंटर फेक असल्याचा आरोप ज्येष्ठ विधिज्ञ नितीन सातपुते यांनी केला आहे. पोलिसांना रोहित आर्य यांच्या हात किंवा पायावर गोळी मारता आली असती. पण डीसीपी अमोल वाघमारे यांना हिरो व्हायचे असल्यामुळे त्यांनी थेट त्याच्या छातीत गोळी घालून त्याला यमसदनी पाठवले, असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबईतील ‘रा’ स्टुडिओत गुरूवारी घडलेल्या अपहरणनाट्यामुळे अवघा देश हादरला. पोलिसांनी अपहरकर्त्या रोहित आर्य नामक व्यक्तीला गोळ्या घालून ठार केले. पण आता या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ज्येष्ठ विधिज्ञ नितीन सातपुते यांनी या प्रकरणी पोलिसांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हायकोर्टात दाद मागण्याचे संकेत दिलेत. रोहित आर्य याला गोळी घालून ठार मारण्याऐवजी दुसरा काही उपाय नव्हता का? असा प्रश्न त्यांनी या संबंधी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले, बचाव मोहीम सुरू असताना रोहित आर्य डीसीपी दत्ता नलावडे यांच्याशी संवाद साधत होता. पोलिसांना रोहित आर्य याची प्राश्वभूमी माहिती झाल्यानंतर त्यांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क का साधला नाही? तो दीपक केसरकर यांच्या संपर्कात होता. त्यामुळे पोलिसांनी केसरकरांना त्याच्याशी का बोलू दिले नाही? मुंबई पोलिसांनी या प्रकरणी टोकाचे पाऊल का उचलले? रोहित आर्यने मुलांना ओलीस ठेवले, पण त्याच्यावर ती परिस्थिती सरकारनेच आणली. हा प्रसंग टाळता आला असता.

रोहित आर्य अतिरेकी नव्हता. सरकारची कामे करत होता. त्याने त्याच्या सरकारी कामाचे पैसे मिळवण्यासाठी उपोषणही केले होते. पण सरकारने त्याला ते पैसे दिले नाही. त्यामुळे त्याच्यावर असे कृत्य करण्याची वेळ आली. सरकारने त्याला का वाचवले नाही?

नितीन सातपुते पुढे म्हणाले, रोहित आर्यकडे पिस्तुल होते की नाही हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केले नाही. डीसीपी दत्ता नलावडे यांनी या प्रकरणी तपास करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याच्याकडे छऱ्यांची बंदूक होती. त्या बंदुकीने कुणाचीही हत्या करता येत नाही. पोलिसांना रोहित आर्यच्या हात किंवा पायावर गोळी मारता आली असती. पोलिस म्हणतात, आम्ही पायावरच गोळी मारली. पण पायातून काहीतरी काढायला तो खाली वाकला आणि गोळी छातीत घुसली. पोलिसांचे हे स्पष्टीकरण खोटे असल्याचे एखादा लहान मुलगाही सांगेल.

एपीआय अमोल वाघमारे या अधिकाऱ्याला हिरो व्हायचे होते. त्यामुळे त्याने हे एन्काऊंटर केले. पोलिसांनी मुलांची सुटका केली ही कौतुकाची गोष्ट आहे, पण ज्याला एन्काऊंटरमध्ये मारले तो सराईत गुन्हेगार नव्हता. त्याचा फेक एन्काऊंटरमध्ये खून करण्यात आला. या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, असेही नितीन सातपुते यांनी यावेळी सांगितले.