Home Blog Page 75

विशाखा सुभेदारांचा मुलगा मुंबईत परतला:कुवेतमध्ये अडकलेल्या 30 मराठी नागरिकांची सुटका

मुंबई-अमेरिका, इस्राएल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे आखाती देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी विमानवाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक विविध देशांमध्ये अडकून पडले होते. अशाच परिस्थितीत मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार कुवेतमध्ये अडकला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर करून मुलाला सुरक्षित भारतात आणण्याची विनंती केली होती. या आवाहनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत संबंधित यंत्रणांना हालचाली करण्याचे निर्देश दिले. अखेर सर्वांच्या प्रयत्नांमुळे विशाखा सुभेदार यांचा मुलगा सुखरूप मुंबईत परतला आहे.

अभिनय सुभेदार लंडनला जाण्यासाठी प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान कुवेत येथे त्याचा ट्रान्झिट थांबा होता. मात्र त्याचवेळी इराणकडून कुवेतवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू झाल्याने परिस्थिती अचानक तणावपूर्ण बनली. सुरक्षेच्या कारणास्तव कुवेतचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आणि विमान कंपन्यांनी अनेक उड्डाणे अनिश्चित काळासाठी रद्द केली. त्यामुळे अभिनय सुभेदार आणि त्याच्यासह इतर काही मराठी नागरिक कुवेतमध्ये अडकून पडले. पुढे प्रवास करणे किंवा भारतात परत येणे शक्य नसल्याने सर्वजण युद्धजन्य वातावरणामुळे भीतीच्या छायेत होते. कुवेतच्या आकाशात ड्रोन इंटरसेप्शनसारख्या घटना दिसत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर वाटत होती.

या पार्श्वभूमीवर विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर करून मदतीची आर्त विनंती केली. त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज ठाकरे यांच्याकडे मुलाला सुरक्षित भारतात आणण्यासाठी मदत मागितली. या व्हिडीओनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः विशाखा सुभेदार यांना फोन करून मुलाला सुरक्षित परत आणण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तातडीने कारवाई सुरू केली. मुख्यमंत्री कार्यालयाने वेगाने हालचाली करत विदेश मंत्रालयाशी संपर्क साधला आणि परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले.

या प्रक्रियेत केंद्र सरकारच्या यंत्रणांनीही मदत केली. फडणवीस यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यास सांगितले. दरम्यान कुवेतमध्ये अडकलेल्या नागरिकांना थेट भारतात आणणे शक्य नसल्याने त्यांना सौदी अरेबियातील रियाध मार्गे परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यासाठी व्हिसाचा अडथळा निर्माण झाला होता. यावेळी विदेश मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम महाजन यांनी पुढाकार घेत संबंधितांना सौदी अरेबियाचा व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केली. त्यामुळे अभिनय सुभेदारसह सुमारे 30 महाराष्ट्रीयन नागरिकांना कुवेतहून रियाधकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

यानंतर या सर्वांनी सुमारे 700 किलोमीटरचा जवळपास दहा तासांचा रस्ते प्रवास करून रियाध गाठले. तेथून भारतात परतण्यासाठी विमानप्रवासाची व्यवस्था करण्यात आली. नियोजनानुसार 9 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी रियाधहून मुंबईकडे जाणारे विमान उड्डाण केले. हे विमान 10 मार्चच्या पहाटे सुमारे 3 वाजता मुंबईत उतरले. या विमानातून अभिनय सुभेदारसह महाराष्ट्रातील जवळपास 30 नागरिक सुरक्षितपणे मायदेशी परतले. या संपूर्ण प्रक्रियेत कुवेतमधील भारतीय दूतावासानेही महत्त्वाची मदत केल्याची माहिती देण्यात आली आहे.

महापालिकांत सुमारे दीड लाख पदे रिक्त, सांगा विकास कसं होणार? माधुरी मिसाळ म्हणाल्या,’लवकरच भरती सुरू करू

महापालिकांत 1.4 लाख, नगर परिषद, नगरपंचायतीत 6 हजारांवर पदे रिक्त, ‘कार्यालयामध्ये अधिकारी-कर्मचारीच नाहीत
मुंबई-राज्यातील महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतींमधील रिक्त पदांचा प्रश्न आता गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. राज्यातील महानगरपालिकांमध्ये तब्बल १.४ लाख पदे रिक्त असून नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये ६ हजारांहून अधिक पदे रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.रिक्त पदांमुळे शहर विकासाची कामे ठप्प झाली असून नागरिकांना रोजच्या कामांसाठी अक्षरशः कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. हा मुद्दा सोमवारी राज्याच्या अधिवेशनातही जोरदारपणे गाजला.

विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सरकारवर तिखट टीका करत सांगितले की, कार्यालयांमध्ये अधिकारी-कर्मचारीच नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. नगरविकासाशी संबंधित अनेक महत्त्वाची कामे बांधकाम परवाने, पाणीपुरवठा, स्वच्छता, मालमत्ता कर, जन्म-मृत्यू दाखले, विविध योजना यांसाठी नागरिकांना अनेक दिवस वाट पाहावी लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक विभागांची जबाबदारी दिली जात असल्याने कामांचा वेग मंदावला आहे, ही बाबही लोकप्रतिनिधींनी सभागृहात सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे.

रिक्त पदांबाबत अधिवेशनात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर सरकारच्या वतीने मंत्री माधुरी मिसाळ यांनी लोकप्रतिनिधींची भूमिका लक्षात घेत, सकारात्मक पावले उचलण्याची ग्वाही दिली. प्रशासनाकडून लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन मंत्री मिसाळ यांनी सभागृहात दिले. भरती प्रक्रियेचा प्रस्ताव सरकारकडे, टप्प्याटप्प्याने पदे भरण्याचा विचार, तात्पुरत्या उपाययोजनांवर भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
पदेच भरली जात नाहीत, मग विकास कसा होणार?

अर्थसंकल्पीय अधिवेशनात नगर परिषद, नगरपंचायती, महापालिकांतील रिक्त जागांच्या मुद्द्यावरून लोकप्रतिनिधी आक्रमक झाले होते. आमदार श्वेता महाले, नमिता मुंदडा आदी सदस्यांनी अधिवेशनात सरकारला थेट सवाल केला की, “पदे भरली नाहीत तर शहरांचा विकास कसा होणार?” अनेक वर्षांपासून भरती न झाल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रिक्त पदे कधी भरणार आहात, असा थेट प्रश्न उपस्थित केला.

रिक्त पदांची आकडेवारी

नगर परिषद, नगरपंचायती स्थानिक कर्मचारी रिक्त पदे
गट क३,४७७
गट ड १,४५७
सफाई कामगार१,१९३
एकूण६,१२७

अधिवेशनात सरकारला सवाल, प्रशासकीय काम कोण करणार?
नगर परिषद ‌राज्य संवर्ग रिक्त पदे
गट क श्रेणी अ,ब,क २,३०८

गट क४६,०६६
गट ड४९,४०५
सफाई कामगार८,८६३
एकूण१,०४,३३४

रिक्त पदांच्या या आकडेवारीवर आमदार आक्रमक झाले आहेत.

जन्म-मृत्यू दाखल्यासाठी अनेक दिवसांची प्रतीक्षा बांधकाम परवान्यांना महिन्यांचा विलंब तक्रारींचे निराकरण होत नाही साफसफाईचा बोजवारा उडाला आहे. पाणीपुरवठ्याची गैरसोय आरोग्यसेवेचा उडतोय बोजवारा

कांदा चालला माॅरिशसला…

महाराष्ट्रातील 1 लाख टन कांद्याची माॅरिशसलाही निर्यात-
मुंबई- राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नाशिक आणि नगरच्या कांद्याला आता मॉरिशसची बाजारपेठ उपलब्ध झाली असून, सुमारे १ लाख टनांहून अधिक कांदा निर्यात होणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत दिली.

चांदवड येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाबाबत सचिन अहिर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. रावल म्हणाले, गेल्या काही वर्षांत श्रीलंका आणि बांगलादेश या पारंपरिक बाजारपेठांनी स्वतः कांदा उत्पादन सुरू केले. स्पर्धा वाढली. म्हणून केंद्रास विनंती केली. ५ लाख क्विंटल मका खरेदीला मंजुरी दिली. मक्यासाठी २४०० रुपये प्रतिक्विंटल इतकी एसआरपी देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

भारताच्या एकूण कांदा निर्यातीपैकी सुमारे ८०% कांदा एकट्या महाराष्ट्रातून जातो. महाराष्ट्रातून होणाऱ्या एकूण निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक (जवळपास ७०-८०%) आहे. लासलगाव ही आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ निर्यातीचे मुख्य केंद्र आहे.

श्रीलंका-बांगलादेशातील वाढत्या स्पर्धेमुळे मॉरिशससारख्या नवीन बाजारपेठा शोधणे अनिवार्य झाले आहे. तसेच मे-जूनऐवजी मार्च-एप्रिलमध्ये सरकारी खरेदी करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी गेमचेंजर ठरू शकतो.

जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी-गारपिटीचा इशारा:हिमाचल, गुजरात, महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

नवी दिल्ली-जम्मू-काश्मीरमध्ये हवामान विभागाने 10 आणि 11 मार्चसाठी जोरदार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. विभागाच्या मते, एका नवीन पश्चिमी विक्षोभामुळे पश्चिम हिमालयीन प्रदेशात 15 मार्चपर्यंत हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

हिमाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि गोव्यात तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये तापमान 40 अंशांच्या वर राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

दुसरीकडे, मध्य प्रदेशातील इंदूर येथील देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावर धावपट्टीच्या एका भागावरील डांबराचा थर दुरुस्तीच्या कामादरम्यान जास्त तापमानामुळे वितळून सैल झाला. यामुळे दोन प्रवासी विमानांना भोपाळकडे वळवावे लागले.
हवामान विभागाच्या मते, सध्या राजस्थानच्या वाळवंटी भागातून उष्ण वारे येत आहेत. ज्याचा परिणाम मैदानी राज्यांमध्ये दिसून येत आहे. वाऱ्याची दिशा आता ईशान्येकडून पश्चिम आणि वायव्येकडे झाली आहे. तसेच, हवेतील आर्द्रता खूप कमी आहे. यामुळे येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढेल. यामुळे उन्हाचा तिखटपणाही वाढू शकतो.

उष्णतेची लाट कधी मानली जाते

हवामान विभागाच्या मते, उष्णतेची लाट तेव्हा मानली जाते, जेव्हा मैदानी प्रदेशात तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पोहोचते. जर सामान्य तापमानापेक्षा 4 ते 6 अंश सेल्सिअस जास्त तापमान नोंदवले गेले. अशा स्थितीत लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो आणि उष्माघाताचा धोका वाढतो.

पुढील 2 दिवसांचे हवामान-

11 मार्च- केरळ आणि आंध्र प्रदेश (विशेषतः किनारी भागांमध्ये) काही ठिकाणी हलका पाऊस किंवा गडगडाटासह हलका पाऊस पडू शकतो.
12 मार्च- हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा अंदाज, ईशान्येकडील काही ठिकाणी गडगडाटासह हलका पाऊस किंवा वीज पडण्याची शक्यता आहे.

महामार्गालगत दारूच्या दुकानांना परवानगी देऊ नये:खा.मेधा कुलकर्णी यांची संसदेत मागणी

  • देशातील वाढत्या रस्ते अपघातांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे

पुणे : देशात वाढत्या रस्ते अपघातांच्या गंभीर समस्येकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत शून्यकाल उल्लेखाद्वारे केली. बेफिकीर वाहनचालक, मद्यपान करून वाहन चालवणे तसेच सोशल मीडियासाठी रस्ते व महामार्गांवर रील किंवा फोटोशूट करण्याची वाढती प्रवृत्ती ही अपघातांची नवी व चिंताजनक कारणे ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये देशात सुमारे १.७८ लाख लोकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. म्हणजेच दररोज शेकडो कुटुंबांवर ही दुर्घटना ओढवते. विशेषतः १८ ते ३४ वयोगटातील तरुणांचे प्रमाण सुमारे ६० टक्के असल्याने ही बाब अधिक चिंताजनक आहे. महाराष्ट्रातही आर्थिक सर्वेक्षणानुसार, २०२४ मध्ये ३६ हजार ८४ रस्ते अपघातांची नोंद झाली असून, त्यात १५ हजार ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातही परिस्थिती चिंताजनक असून, पुणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये १,४०४ अपघातांमध्ये ३२० जणांचा मृत्यू झाला, तर १,३२० जण जखमी झाले. २०२३ मध्ये ही संख्या १,२३० होती.”

सोशल मीडियासाठी रस्ते व महामार्गांवर रील किंवा फोटोशूट करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत मद्यपान करून वाहन चालवणे व बेफिकीर वाहनचालकांवर कठोर शिक्षेची तरतूद असली, तरी अनेक ठिकाणी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालवणे व धोकादायक वाहनचालना यावर किमान कठोर शिक्षा निश्चित करणे, रस्ते अपघातांशी संबंधित मृत्यू प्रकरणांसाठी फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वेग शोध प्रणाली, ब्रेथ अॅनालायझर व सीसीटीव्ही यांचा व्यापक वापर करणे, तसेच मुंबई–पुणे द्रुतगती मार्गासारख्या उच्च वेगाच्या मार्गांवर अपघातप्रवण ठिकाणांचे नियमित सुरक्षा लेखापरीक्षण करणे, अशा उपाययोजनांची मागणी त्यांनी केली.

तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये रस्ते सुरक्षा व जबाबदार वाहनचालनाबाबत जनजागृती मोहीम राबविणे आणि अपघातग्रस्त व त्यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश,कोथरुड मधील पानशेत पुरग्रस्तांचा बहुप्रलंबित प्रश्न मार्गी

पुणे-राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, कोथरुड मधील पानशेत पूरग्रस्तांचा वर्षानुवर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. राज्य सरकारने पूरग्रस्तांना मालकी हक्क बहाल केला आहे. त्याबद्दल पानशेत पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मनापासून आभार मानले आहेत.

१२ जुलै १९६१ रोजी पुण्यात पानशेत धरण फुटीमुळे झालेल्या भीषण पुरात सुमारे १,००० हून अधिक लोकांचा मृत्यू आणि ६५,००० पेक्षा जास्त लोक विस्थापित झाले होते. या दुर्घटनेनंतर पानशेत पूरग्रस्तांना शहराच्या वेगवेगळ्या भागांत पुनर्वसन करण्यात आले.

आज ही त्या जागांवर सध्या तिसरी पिढी राहात आहे. तरीही, त्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला आहे. पूरग्रस्तांना त्यांच्या घरांचा मालकी हक्क मिळावा, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. तसेच, त्यांची वाढीव बांधकामे नियमित करण्याता प्रश्न रखडला होता.

हा प्रश्न सुटावा यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील सातत्याने प्रयत्नशील होते. १५ जून २०१८ मध्ये या संदर्भात ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मदत पुनर्वसन आणि महसूल विभागाची जबाबदारी असताना, त्यांनी याबाबत बैठक घेऊन यासंदर्भात अडचणी समजून घेतल्या होत्या. तसेच पूरग्रस्तांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करुन, जलदगतीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र, तांत्रिक अडचणींमुळे सदर विषयांचा निपटारा करताना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, ना. पाटील यांचा मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरुच होता. जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालय या दोन्ही स्तरावरील पाठपुराव्यामुळे पूरग्रस्तांना अखेर न्याय मिळाला आहे. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांची मुदतवाढ देखील मिळाली आहे. त्यामुळे याबद्दल पूरग्रस्तांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

ना. पाटील यांची संवेदनशीलता आणि पाठपुराव्याबद्दल पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी त्यांचे आभार मानले असून, समितीच्या वतीने लवकरच त्यांचा नागरी सत्कार करणार असल्याचे जाहीर केले आहे.

चुकीचा बांधला म्हणून उड्डाणपुल पाडला:नवा बांधला,दुसऱ्याच दिवशी त्यातही दिसला हलगर्जीपणा; सनी निम्हण यांनी उघडा केला ठेकेदाराचा कारभार

पुणे- काल सावित्रीमाई फुले विद्यापीठा नजीकच्या ज्या डबलडेकर पुलाचे वाजत गाजत उद्घाटन झाले त्याच पुलाच्या कामात हलगर्जीपणा झाल्याचे आज नगरसेवक सनी निम्हण यांनी उघडकीस आणले आहे. हा पुल बांधला त्याला कारण होते . यापूर्वी बांधलेला पूल चुकीचा बांधला म्हणून तो पाडून नवा पूल बांधण्याचा मोठा निर्णय घेतला गेला आणि आता हा पूल देखील कमकुवत आहे कि काय ? असे निम्हण यांनी सदर केलेय फोटो वरून प्रश्न विचारले जाणार आहेत.

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पीएमआरडीएकडून बांधण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्हर्च्युअली केले असले, तरी या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मात्र, या उड्डाणपूलाच्या कामात काही त्रुटी आणि हलगर्जीपणा दिसून येत असल्याचा आरोप करत नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.पूल सुरू झाल्यानंतर या उड्डाणपूलाची काही छायाचित्रे समोर आली असून त्यावरून कामाच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण होत असल्याचे निम्हण यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा सखोल तांत्रिक अभ्यास केल्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढता येईल.

कदाचित हा मोठा स्ट्रक्चरल दोष नसेलही; मात्र उघड्या डोळ्यांनी पाहताना काम करताना हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच ज्या व्यक्तीला हा पूल समर्पित करण्यात आला आहे आणि ज्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले, त्या दोघांच्या स्वभावाच्या दृष्टीने हा प्रकार अपमानास्पद असल्याचेही निम्हण यांनी म्हटले आहे.स्व. अजित पवार हे कामाच्या दर्जाबरोबरच त्याच्या सौंदर्याबाबत अत्यंत जागरूक आणि काटेकोर होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही कामाच्या गुणवत्तेबाबत तितकाच जागरूक दृष्टिकोन असल्याचे त्यांनी नमूद केले.

हा दोष राजकीय नेतृत्वाचा नसून प्रशासकीय ढिसाळपणा आणि बेजबाबदारपणाचे द्योतक असल्याचा आरोप निम्हण यांनी केला. पूलाच्या उद्घाटनापूर्वी किमान अंतिम पाहणी होणे अपेक्षित होते.मात्र तेही झाले नसल्याचे दिसते. त्यामुळे या प्रकरणी जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणी निम्हण यांनी केली आहे. तसेच आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून सरकारचा प्रतिनिधी असलो, तरी त्याआधी पुणे शहराचा जागरूक नागरिक आणि अभियंता म्हणून ही भूमिका मांडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या दुमजली उड्डाणपूला बद्दल

▪️उड्डाणपुलाची एकूण लांबी (रॅम्पसह) १७६३.५२ मीटर आहे.
▪️प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता किंमत ₹२७७ कोटी आहे.

▪️औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर या प्रमुख मार्गांना जोडणारी रॅम्प व वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

▪️वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ५५ मीटर लांबीचा स्टील गर्डर बसविण्यात आला आहे.

मुलींच्या घटत्या संख्येवरही विधानसभेत चिंता व्यक्त

मुंबई-गर्भलिंग संदर्भात गंभीर प्रश्न आमदार सुरेश धस यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांवर मोक्का सारखे गुन्हे लागले पाहिजेत अशी मागणी धस यांनी केली. ते म्हणाले, आजही हे प्रकार मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. ग्रामीण भागात पारावर बसून गप्पा मारायच्या. पण कोणीच विचारत नाही लग्नाचे. कर्नाटकमधून मुलगी आणली जाते. ती येते काही दिवस राहते आणि सगळे दागिने घेऊन पळून जाते. असे काही टोळ्या सक्रिय झाले आहेत. ही भयंकर वस्तुस्थिती आहे, गंभीर बाब आहे. मुलींची संख्या वाढली पाहिजे. मुलगा मोठ-मोठ्या शाळेत शिकवायचे आणि मुलींना साधारण शाळेत टाकले जाते. अजूनही आपण गप्पाच मारतो आहोत. आमच्या ऊस तोड महिला कामगारांचा अपघातात मृत्यू होतात. जड वस्तू उचलाव्या लागतात, त्यात त्यांचा गर्भ गळून पडतो हे देखील त्यांना समजत नाही. त्या महिलांवर काहीतरी निर्णय घेतला गेला पाहिजे.

वय उलटून गेले तरी लग्न होत नाही,मुलगी द्यायला कुणीही तयार नाही-विधानसभेत आमदारांनी मांडल्या तरुणाईच्या व्यथा

मुंबई- जागतिक महिला दिनानिमित्त विधानसभेत एकीकडे महिलांच्या सक्षमीकरणावर चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एका अत्यंत ज्वलंत आणि गंभीर सामाजिक समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. “ग्रामीण भागातील शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या असून, लग्नासाठी मुलांनाच हुंडा द्यावा लागत आहे,” अशा शब्दांत सोळंके यांनी ग्रामीण तरुणांची व्यथा मांडली. या परिस्थितीमुळे फसवणुकीचे मोठे रॅकेट सक्रिय झाले असून, सरकार यावर काय उपाययोजना करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी ग्रामीण समाजात निर्माण होत असलेल्या या गंभीर सामाजिक प्रश्नावर सरकारने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.

लक्षवेधी सूचनेदरम्यान बोलताना प्रकाश सोळंके म्हणाले की, “मी ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करतो आणि तिथली परिस्थिती अत्यंत भयावह आहे. आज प्रत्येक लहान-मोठ्या खेडेगावात २५ ते ३० वयोगटातील किमान ५० ते १०० तरुण असे आहेत, ज्यांचे वय उलटून गेले तरी लग्न झालेले नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे हे तरुण शेतीचा व्यवसाय करतात. आज ग्रामीण भागात शेती करणाऱ्या मुलाला मुलगी द्यायला कुणीही तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे.”

लग्नाच्या या टंचाईमुळे ग्रामीण भागात एक नवी आणि घातक प्रथा रूढ होत असल्याचे सोळंके यांनी निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले, “पूर्वी मुलींकडून हुंडा घेतला जात असे, पण आता परिस्थिती उलटी झाली आहे. मुलाला लग्न करण्यासाठी मुलीच्या कुटुंबाला हुंडा द्यावा लागत आहे. या हतबलतेचा फायदा घेऊन फसवणुकीचे मोठे जाळे विणले जात आहे. ‘बोगस मुली’ आणून त्यांचे विवाह लावून दिले जातात. अडीच-तीन लाख रुपये लुटले. धक्कादायक म्हणजे, एकाच मुलीचे चार-चार विवाह लावून तरुणांना लुटण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.”
लग्नासाठी होणारी वणवण आणि समाजात मिळणारी वागणूक यामुळे ग्रामीण भागातील अविवाहित तरुण मोठ्या प्रमाणावर नैराश्यात जात आहेत. “लग्न होत नसल्याने अनेक तरुण व्यसनांच्या आहारी जात आहेत. हे केवळ एका कुटुंबाचे नुकसान नसून सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न आहे. अशा तरुणांचे विवाह लागावेत यासाठी सरकार काही विशेष योजना किंवा मदत करणार का?” अशी विचारणा सोळंके यांनी केली.

आमदार सोळंके यांनी मांडलेली ही वस्तुस्थिती राज्य सरकारने गांभीर्याने घेतली आहे. यावर उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, “आमदार प्रकाश सोळंके यांनी मांडलेली माहिती ही वर्तमान परिस्थितीचे वास्तव चित्र आहे. शासन या बाबीची गंभीर दखल घेणार असून संबंधित सूचनांचा अभ्यास करून आवश्यक त्या उपाययोजना आणि योजना तयार करण्याबाबत विचार केला जाईल,” असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

मानवता तीर्थावरील मल्लविद्या: शांती आणि शक्तीचा अपूर्व संगम

मानवतातीर्थ भवन, रामेश्वर रुई येथे आयोजित राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर  केसरी स्पर्धा 2026 या निमित्ताने एक विशेष लेख

– डॉ रत्नदीप जोशी

रामेश्वर रुई येथील पवित्र यज्ञ भूमीवर, विश्वातील एकमेव मानवतातीर्थ भवनाच्या विशाल प्रांगणात  राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर  केसरी स्पर्धे  एक अभूतपूर्व सोहळा रंगणार आहे. हा केवळ कुस्त्यांचा आखाडा नाही, तर सरस्वतीरत्न विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सरांच्या उदात्त प्रेरणेतून साकारलेला ‘ विश्वशांतीचा आविष्कार’ आहे.
संस्कारांची पावन भूमी: मानवतातीर्थ भवन
जिथे विज्ञानाची दृष्टी आणि अध्यात्माची सृष्टी एकत्र येते, त्या मानवतातीर्थ भवनाच्या भिंतींमधूनही आज राष्ट्रप्रेमाचे पडसाद उमटत आहेत. डॉ. विश्वनाथ कराड सरांनी मांडलेला ‘विश्वधर्माचा’ विचार हा केवळ ग्रंथात मर्यादित न राहता, तो आता मातीतील कुस्तीच्या माध्यमातून जनमानसात झिरपत आहे. हे भवन म्हणजे केवळ दगड-धोंड्यांची वास्तू नसून, ती मानवी मूल्यांचे संवर्धन करणारी एक जिवंत प्रयोगशाळा आहे.
युद्धाच्या सावटात शांतीचा हुंकार
आज जग जेव्हा बारुदाच्या ढिगाऱ्यावर बसले आहे, जिथे विनाशाची भाषा बोलली जात आहे, अशा काळात रामेश्वर रुईच्या मातीतून ‘शांतीचा संदेश’ दिला जात आहे. शस्त्राने मिळवलेला विजय हा तात्पुरता असतो, पण शास्त्र आणि कौशल्याने जिंकलेले मन अजरामर असते. या स्पर्धेचे मूळ सूत्र हेच आहे की, संघर्ष हा विनाशासाठी नसावा, तर तो स्वतःच्या मर्यादा ओलांडण्यासाठी असावा. रणांगणावरील रक्तापेक्षा, आखाड्यातील घाम हा अधिक पवित्र असतो, कारण तो शरीर आणि मनाला सुदृढ करतो.
आखाड्यातील थरार
या कुस्ती स्पर्धेचे वर्णन करताना शब्दांनाही नवे धुमारे फुटतात. जेव्हा दोन मल्ल समोरासमोर ठाकतात, तेव्हा ते केवळ दोन देह नसतात, तर ते दोन ‘निश्चयाचे महामेरू’ असतात. आखाड्यातील ती लाल माती म्हणजे जणू क्रांतीचे प्रतीकच वाटत आहे. मल्लांच्या अंगावर उडणारी माती पाहून असे भासते की, जणू धरणीमाताच आपल्या पुत्रांना आशीर्वादाचा टिळा लावत आहे. मानवता तीर्थभवनातील हे कुस्तीचे मैदान म्हणजे ‘जीवनाचे रणांगण’ आहे. इथे पडणे म्हणजे हार नाही, तर पुन्हा जोमाने उठण्याची तयारी आहे. आज या ‘मल्लांतील जोश, मातीची ओढ आणि मनगटातील मर्दुमकी’ या त्रिवेणी संगमाने प्रयागविश्व रामेश्वरचा आसमंत दुमदुमून गेला आहे.
डॉ. कराड सरांचा सुदृढ शरीरात सुदृढ मन हा नेहमीच आग्रह असतो. ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’ – म्हणजे शरीर हेच सर्व कर्तव्ये पार पाडण्याचे पहिले साधन आहे याचा ते कायम दाखला देतात. आखाड्यात उतरणारा मल्ल हा केवळ बलवान असून चालत नाही, तर तो चारित्र्यसंपन्न आणि संयमी असावा लागतो. या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणाईला व्यसनांच्या गर्तेतून बाहेर काढून व्यायामाच्या ‘नंदवनात’ आणण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
विश्वधर्मी सरस्वती रत्न प्रा. डॉ. विश्वनाथ कराड: एक द्रष्टा नेतृत्व
ज्याप्रमाणे एखाद्या शिल्पकाराने दगडाला आकार देवून त्याचे मूर्तीत रूपांतर करावे, त्याप्रमाणे विश्वधर्मी डॉ. कराड सरांनी भारतीय संस्कृतीला आधुनिक विज्ञानाची जोड देऊन हे भव्य आयोजन केले आहे. त्यांच्या प्रेरणेतून साकारलेली ही स्पर्धा म्हणजे ‘मानवतेची गुढी’ आहे. त्यांच्या मते, कुस्तीतील डावपेच हे कोणाला हरवण्यासाठी नसून, स्वतःमधील सुप्त गुणांना जागृत करण्यासाठी असावेत. मंगळवार दि. १० मार्च रोजी जेव्हा ढोल-ताशांच्या गजरात या स्पर्धांना सुरुवात होईल, तेव्हा रामेश्वर रुईचे आकाश ‘हर हर महादेव’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणांनी भरून जाईल. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले ‘रुस्तम-ए-हिंद’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’चे स्वप्न पाहणारे तरुण मल्ल.
अंगात सळसळणारे रक्त, डोळ्यांत जिंकण्याची ईर्षा आणि मनात शांतीचा संकल्प: विश्वशांतीचा एक नवा सूर्योदय
रामेश्वर रुई येथील या कुस्ती स्पर्धा केवळ १० मार्चच्या दिवसापुरत्या मर्यादित नाहीत. हा एक विचार आहे जो प्रत्येक तरुणाच्या मनात रुजवायचा आहे. युद्धाच्या धामधुमीत शांतीचा मार्ग हा खेळाच्या मैदानातून जातो, हेच या स्पर्धेने सिद्ध केले आहे.
जेव्हा हे मल्ल त्या लाल मातीत एकमेकांना आलिंगन देतील, तेव्हा तो केवळ कुस्तीचा एक प्रकार नसेल, तर ती ‘जागतिक बंधुत्वाची’ एक मिठी असेल. डॉ. विश्वनाथ कराड सरांच्या स्वप्नातील बलशाली आणि शांतताप्रिय भारत घडवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
सर्वजण या, सारे सारे या, अवघे या! अनुभूती घ्या!   विश्वगुरू भारतासाठी विश्वशांती द्वारे विकसित भारत हे ध्येय साध्य करण्यासाठी विश्वधर्मी सरस्वतीरत्न प्रा. डॉ विश्वनाथ कराड सर यांनी स्व कष्टातून निर्माण केलेल्या या विश्वशांती राजमार्गावरती चालू या आणि वसुधैव कुटुम्बकम या उदात्त प्रेरणेचे दर्शन देणाऱ्या भारतीय विचारांचे आणि दर्शनांचे पाईक बनून या मार्गावरती पुढे मार्गक्रमणा करूया!
आहे तितुके जतन करावे। पुढे आणिक मेळवावे।।
महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ।।

असंघटीत, वंचित पत्रकारांना न्याय देण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याची गरज – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पत्रकारांच्या अडचणींकडे विधानपरिषद सभागृहात लक्ष वेधले

मुंबई, दि. ९ मार्च २०२६ :
महाराष्ट्र विधानपरिषदेत नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचनेअंतर्गत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करण्याबाबतचा मुद्दा विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधले.

त्या म्हणाल्या की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ अनेक पात्र पत्रकारांना मिळत नाही, कारण त्यांनी ज्या वर्तमानपत्रांमध्ये काम केले ते बंद पडलेले असते किंवा संबंधित संपादकांकडून प्रमाणपत्र मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत पात्र पत्रकार अपात्र ठरत असल्याचे अनेक प्रकरणे त्यांच्या निदर्शनास आली असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, अशा प्रकरणांमध्ये सत्यता पडताळण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या कामात निकषांबाबत तांत्रिक अडचणीतुन मार्ग काढण्यास यंत्रणा स्थापन करण्याची गरज आहे, जेणेकरून पत्रकारांना आपली बाजू मांडण्यासाठी योग्य मंच उपलब्ध होईल. अनेक वृद्ध पत्रकार आजारी असूनही योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहतात, मात्र विद्यमान यंत्रणेतील मर्यादांमुळे त्यांना अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच जिल्हा स्तरावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला (DGIPR) या संदर्भात अधिक अधिकार देऊन एक सक्षम आणि कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री कार्यालयाकडे खाते असले तरी संबंधित मंत्र्यांनी या विषयाकडे लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सूचित केले.

यावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या सूचनांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले.

पिंपरी येथे ‘ग्रंथोत्सव’आयोजन

पुणे, दि. 9: उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व १५ मार्च २०२६ दोन दिवसीय आर्य समाज पुस्तकालय व मोफत वाचनालय, पिंपरी कॉलनी, महर्षी दयानंद मार्ग, पिंपरी, येथे ‘ग्रंथोत्सव-2025’ चे आयोजन करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष लेखक व साहित्यिक प्रा.डॉ. शरद गायकवाड असणार आहे. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन, विक्री आणि त्यासोबतच विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रंथोत्सवाचा समारोप १५ मार्च रोजी जेष्ठ साहित्यिक बाबा भांड, यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती श्रेया गोखले यांनी दिली दिली आहे.

कार्यक्रमाचे स्वरुप:

शनिवारी पहिल्या सत्रात सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. पिपंरी परिसरातील शालेय विद्यार्थी व जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी यांचा सहभागी होणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० वा. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन, दुसऱ्या सत्रात दुपारी ३ ते ४ या वेळेत त लोकमाता ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” या विषयांवर डॉ. अनुजा कुलकर्णी यांचे व्याख्यान तसेच दुपारी ४ ते ५.३० या वेळेत ‘गझल: वाटचाल उर्दूतून मराठीकडे’ सादरकर्ते प्रदीप निफाडकर यांचे माहितीपर व्याख्यान होणार आहे.

रविवारी पहिल्या सत्रात सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत कलाविष्कारः शालेय विद्यार्थी कला गुण सादरीकरण हा विद्यार्थ्यांच्या गुणविशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून शाळा व सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहे. दुपारी २ वा. चला समृध्द पिढी घडवूयाः वाचन संस्कारांच्या माध्यमातून सीमा शिंदे, जि.प. शिक्षिका यांचे विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन होणार आहे. दुपारी ४ वा. इनुची गोष्ट- या पुस्तकाचे लेखक युनूस सय्यद यांची प्रकट मुलाखत लेखिका आशा नेगी घेणार आहेत.

दोन दिवसीय ग्रंथोत्सवात विविध नामांकित प्रकाशकाच्या दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ६ वाजेपर्यंत असून प्रवेश विनामूल्य आहे. तरी सर्व नागरिक व ग्रंथप्रेमी रसिकांनी या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा व ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

पोलीस शिपाई चालक भरती कौशल्य चाचणीबाबत सूचना

पुणे, दि. 9 : पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस भरती सन २०२४–२५ अंतर्गत १२३ उमेदवारांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी दिनांक १० व ११ मार्च २०२६ रोजी आयडीटीआर, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. या चाचण्या दुपारी ३.३० वाजल्यानंतर घेण्यात येणार आहेत.

पक्की अनुज्ञप्ती चाचणीसंबंधी पूर्वनियोजित वेळ देण्यात आलेल्या उमेदवारांच्या चाचण्याही संबंधित वेळेपूर्वी पूर्ण करण्यात येतील. त्यामुळे सर्व संबंधित उमेदवारांनी नमूद तारखांना नियोजित वेळेपूर्वी उपस्थित राहून पक्की अनुज्ञप्ती चाचणीसंबंधी कामकाज पूर्ण करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

नागरिकांच्या तक्रारी जिल्हास्तरावरच सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

विभागीय लोकशाही दिनात नऊ प्रकरणांवर सुनावणी

पुणे, दि.९: विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आज झालेल्या विभागीय लोकशाही दिनात नऊ प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. नागरिकांच्या तक्रारी जिल्हास्तरावरच सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, तक्रारींवर गुणवत्तेने निर्णय द्यावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी यंत्रणांना दिल्या.

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे तसेच विविध विभागांचे अधिकारी, तक्रारदार उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार पुढे म्हणाले, नागरिकांच्या छोट्या छोट्या तक्रारी, समस्या तालुका, जिल्हास्तरावरच समाधानकारक व न्याय्य पद्धतीने सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. असे झाल्यास त्यांना विभागीय लोकशाही दिनात तक्रार करण्याची वेळच येणार नाही व त्यांचा वेळ व पैसा वाचेल. न्यायालयीन तसेच अर्धन्यायिक प्रकरणे लोकशाही दिनाच्या कक्षेत येत नसल्याचे नागरिकांना स्पष्ट केल्यास त्यांचा वेळ अकारण वाया जाणार नाही, असेही ते म्हणाले.

विभागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय्य पद्धतीने व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या लोकशाही दिनात नव्याने दाखल ७ आणि मागील प्रलंबित दोन प्रकरणांचा समावेश होता. यावेळी पुणे जिल्ह्यातील ६ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तीन प्रकरणात अर्जदारांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन डॉ. पुलकुंडवार यांनी सुनावणी घेतली.

डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वीकारला ‘पीएमआरडीए’च्या महानगर आयुक्तपदाचा पदभार!

  • पुणे महानगर प्रदेशाच्या विकासाला गती देणार: डॉ. अभिजीत चौधरी

पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) नूतन महानगर आयुक्त म्हणून डॉ. अभिजीत चौधरी (IAS) यांनी सोमवारी (दि.9) अधिकृतपणे पदभार स्वीकारला. मावळते महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याकडून त्यांनी सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. चौधरी यांनी पुणे महानगर क्षेत्राच्या सुसूत्र नियोजनासह रिंग रोड आणि मेट्रो प्रकल्पांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.

याप्रसंगी अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, सहआयुक्त (प्रशासन) रुपाली आवले-डंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. मावळते महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे व अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी डॉ. चौधरी यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसर, तसेच ग्रामीण भागातील वाढत्या शहरीकरणाचे आव्हान पेलण्यासाठी ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून प्रभावी पावले उचलली जातील, असे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “पुणे रिंग रोड, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आणि टाऊन प्लॅनिंग स्कीम्स (टीपीएस) या महत्त्वाच्या प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर आमचा भर असेल. तसेच नदी सुधार प्रकल्पासह आयटी आणि औद्योगिक क्षेत्रातील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल. भूसंपादन तसेच परतावा जमिनीसंदर्भात शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, ते समन्वयाने मार्गी लावले जातील.”

डॉ. अभिजीत चौधरी यांचा प्रशासकीय सेवेतील १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव पाहता, त्यांच्या नेतृत्वाखाली ‘पीएमआरडीए’च्या प्रलंबित प्रकल्पांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भविष्यातील समृद्ध, उद्योगक्षम आणि राहण्यायोग्य ‘सर्वांगसुंदर महानगर’ घडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.