Home Blog Page 75

“दाही दिशा”, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विचारप्रवासाचे प्रेरणादायी प्रतिबिंब

शब्दांच्या माध्यमातून समाजजागृतीचा दीप – “दाही दिशा” पुस्तक प्रकाशन सोहळा

मुंबई, दि. २ नोव्हेंबर २०२५ :
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित “दाही दिशा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमधील यशोदर्शन सभागृहात पार पडणार आहे. शब्द आणि विचारांचा संगम अनुभवांच्या प्रवासातून जेव्हा साकारतो, तेव्हा जन्म घेतो एक सजीव आणि प्रेरणादायी ग्रंथ — “दाही दिशा”.

या पुस्तकातून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रवास, त्यांच्या नेतृत्वक्षमतेचा ठसा, तसेच समाजातील त्यांच्या भूमिकेचा सखोल अर्थ उजागर केला आहे. “दाही दिशा” या पुस्तकामध्ये सहा प्रेरणादायी प्रकरणांचा समावेश असून त्यात, ‘चळवळीसह शिक्षण’, ‘शहरातून गावाकडे’, ‘पुन्हा शहराकडे’, ‘माध्यमांमधले स्त्री-चित्रण’, ‘चळवळीकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन’ आणि ‘भगिनीभाव’ या विषयांवर सखोल चिंतन करण्यात आले आहे. या प्रकरणांतून स्त्रीशक्ती, सामाजिक परिवर्तन, आणि संवेदनशील नेतृत्व या तीन प्रवाहांचा सुंदर संगम दिसून येतो.

या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या सोहळ्याला मा. ना. श्री. चंद्रकांत पाटील (मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग), मा. ना. श्री. उदय सामंत (मंत्री, उद्योग व मराठी भाषा विभाग), अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. मिलिंद जोशी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती निवेदिता सराफ उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.

“दाही दिशा” हे केवळ आत्मकथन नसून, ते डॉ. गोऱ्हे यांच्या सामाजिक बांधिलकीचे, स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीकोनाचे आणि संवेदनशील नेतृत्वाच्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण आहे. यात त्यांनी महाराष्ट्रातील महिला चळवळींचा अनुभव, ग्रामीण ते नागरी जीवनातील संक्रमण, माध्यमांतील स्त्रीप्रतिमांचा बदल आणि स्त्रीपुरुष सहकार्याच्या नात्याचे सामाजिक भान अशा विविध अंगांनी प्रकाश टाकला आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे यांचा साहित्य प्रवास अत्यंत समृद्ध आणि समाजकेंद्री आहे. त्यांनी आजवर ३० हून अधिक पुस्तकांचे लिखाण केले असून, हे साहित्य सामाजिक चळवळ, कायदा, महिला प्रश्न, राजकारण आणि संवेदनशील समाजनिर्मितीच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांच्या उल्लेखनीय पुस्ताकांमध्ये “स्त्रिया व कायदा”, “महिलांसंबंधी धोरण – स्वयंसिद्धतेकडे वाटचाल” (१९९४), “पीडित महिलाओं की सहेली”, “पंचायतराज मार्गदर्शक”, “अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण”, “महिला मंडळ मार्गदर्शक”, “उरल्या कहाण्या”, “नारीपर्व”, “कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा: स्वरूप व कार्यपद्धती”, “महिला आणि समाज”, तसेच “भिंतीमागचा आक्रोश (महिलांचा अनैतिक व्यापार)” यांचा समावेश आहे.

तसेच, “स्त्रिया समान भागीदार (सीडॉ करार)”, “जागतिक महिला आंदोलनाचा वेध (२००३–२००८)”, “स्त्री-पुरुष समानता; महिला विषयक धोरणे”, “स्त्री-पुरुष समानता; पोलीस मार्गदर्शक”, “स्त्री प्रश्नांचा वेध”, “समानतेकडून विकासाकडे: शाश्वत विकास उद्दिष्टांची ओळख आणि आव्हाने”, “माणूसपणाच्या वाटेवर”, आणि “शरीराची ओळख” या त्यांच्या पुस्तकांमधून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा, समतावादी विचारांचा आणि महिलांच्या स्वायत्ततेच्या प्रवासाचा वेध घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी “Girl Child in Oblivion”, “Wail Behind the Wall (Immoral Trafficking of Women)”, “Women in Decision Making”, “Status of Family Courts in Maharashtra” आणि “Lonely Path to Development (Earthquake in Latur 1993)” यांसारखी इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत.

शिवसेनेतील त्यांच्या योगदानावर आधारित “शिवसेना योजना कक्ष” (2000), “प्रवास एका संघर्षाचा”, “शिवसेनेतील माझी २० वर्षे” आणि “शिवसेनेतील निवडक भाषणे (२००५–२०११)” ही पुस्तके त्यांच्या राजकीय प्रवासाचे आणि सामाजिक चळवळीतल्या नेतृत्वाचे प्रतीक आहेत.

तसेच विधानपरिषद कामकाजातील त्यांच्या सहभागावर आधारित “विधानपरिषद व माझे कामकाज”, “विधानपरिषद कामकाज माझा सहभाग, खंड १ – कायदा-सुरक्षा (२००७–२०१३)” आणि “विधानपरिषद कामकाज माझा सहभाग (२००७–२०१३)” ही पुस्तके त्यांच्या विधायक कार्याचा साक्षीदार ठरतात.

डॉ. गोऱ्हे यांच्या जीवनकार्यावर आधारीत “अपराजिता – डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सामाजिक कर्तृत्वाची संघर्षगाथा” (लेखिका – अंजली कुलकर्णी) आणि “ऐसपैस गप्पा नीलम ताईंशी” (लेखिका – करुणा गोखले) ही पुस्तके त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि सामाजिक वाटचालीचा सखोल मागोवा घेतात.

“दाही दिशा” या पुस्तकाद्वारे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शब्दांना समाजजागृतीचे सामर्थ्य दिले असून, स्त्रीशक्तीच्या प्रबोधनाचा आणि समाजातील न्याय्य समतोल निर्माण करण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचविला आहे. हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या विचारप्रवासाचा, संवेदनशीलतेचा आणि नेतृत्वगुणांचा साक्षात आरसा आहे.

माजी आमदार मोहन जोशी यांच्यावर राज्यातील महापालिका निवडणुकांची विशेष जबाबदारी:प्रदेश काँग्रेस अध्यक्षांची घोषणा

पुणे : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीची विशेष जबाबदारी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यावर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सोपविली आहे.

पक्ष संघटना मजबुतीसाठी महानगरपालिका क्षेत्रात विशेष प्रकल्पांतर्गत आवश्यक त्या उपाययोजना सुचवाव्यात आणि त्या अमलात आणण्यासाठी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करावी. जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधून महापालिका क्षेत्रातील काँग्रेस पक्षाची संघटनात्मक संपूर्ण माहिती घ्यावी, असे पक्षाने मोहन जोशी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. दीर्घ राजकीय अनुभव, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क साधण्याची हातोटी मोहन जोशी यांच्याकडे असल्याने ते, ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडतील, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.

लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रात आणि देशात १२ राज्यात प्रभारी म्हणून माजी आमदार मोहन जोशी यांनी यापूर्वी काम पाहिले आहे. तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वतीने मोहन जोशी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. पक्ष संघटनेत प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश शहर काँग्रेस उपाध्यक्ष अशी पदे सांभाळल्यामुळे त्यांना संघटनेतील कामांचा दांडगा अनुभव आहे.

रंगला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पहिल्या तीन सरसंघचालकांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी प्रयोग…

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच राधिका क्रिएशन्स यांच्यावतीने आयोजन

हडपसर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रथम तीन सरसंघचालक डॉ. हेडगेवार, पू. गुरुजी आणि बाळासाहेब देवरस  यांच्या जीवनावर आधारित ‘संघ गंगा के तीन भगीरथ’ या नाटकाचा ५२ वा प्रयोग हडपसर येथील खासदार विठ्ठलराव तुपे पाटील सभागृहात उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. प्रेरणादायी कथानक, कलाकारांचे प्रभावी अभिनय आणि दिग्दर्शकीय सादरीकरण यामुळे हा प्रयोग प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच राधिका क्रिएशन्स पुणे–नागपूर निर्मित या नाटकाच्या आयोजनात छाया संजीव गदादे यांचे विशेष सहकार्य लाभले. या नाटकाचे मार्गदर्शक सुनिल भुसारी असून, लेखन श्रीधर गडगे यांनी केले आहे. दिग्दर्शन संजय पेंडसे यांचे असून, निर्मिती सारिका पेंडसे यांनी केली आहे. दोन अंकी या नाटकात तब्बल ३५ कलाकारांनी प्रथम तीन सरसंघचालकांचे जीवन, संघर्ष आणि कार्य यांचे प्रभावी सादरीकरण केले.

या प्रसंगी जेष्ठ गोरक्षक मिलिंद एकबोटे, मिलिंद वायकर, महेश रनवरे, राजाभाऊ शेवाळे, जगन्नाथ लडकत, मारुतीआबा तुपे, संदीप दळवी, प्रवीणनाना काळभोर, राहुल शेवाळे, संदीप लोणकर, प्रतिमा शेवाळे, प्रमोद सातव, स्मिता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

छाया संजीव गदादे म्हणाल्या, जो इतिहास सांगितला जातो, जो इतिहास शिकवला जातो, तोच पुढील पिढ्या लक्षात ठेवतात. प्रथम तीन सरसंघचालकांचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम नाटकाच्या माध्यमातून होत आहे. 

विठू माऊली माझी‌’ अभंगवाणीतून उत्कट भक्तीरसाची निर्मिती

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजन

पुणे : विठुमाऊलीच्या भक्तांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या कार्तिकी एकादशीनिमित्त संत रचनांच्या सादरीकरणातून उत्कट भावनिर्मिती घडली. निमित्त होते शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित ‌‘विठू माऊली माझी‌’ या अभंगवाणी कार्यक्रमाचे.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया यांनी या कार्यक्रमाचे आयोजन आज (दि. 1) बालगंधर्व रंगमंदिरात केले होते. महाराष्ट्राला संतांची महनीय परंपरा लाभली आहे. या संतांनी सर्वसामान्य जनतेला विठुरायाच्या चरणी लीन करत दु:ख, ताणतणाव विसरायला लावण्यासाठी अनेक भक्तिरचनांची निर्मिती केली आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जग्‌‍तगुरू तुकाराम महाराज यांच्यासह संत तुकडोजी महाराज, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ यांच्या भावभक्तीपूर्ण रचना तसेच काही भक्तीगीते या कार्यक्रमात सादर करण्यात आली. सायली तळवलकर, सचिन इंगळे, सुरंजन खंडाळकर आणि शुभम खंडाळकर यांनी भावोत्कट स्वरातून रचना सादर केल्या. कलाकारांना सोहम गोराणे (तबला), प्रतिक गुजर (पखवाज), धनंजय साळुंके (तालवाद्य), तुषार दीक्षित (की-बोर्ड) यांनी समर्पक साथसंगत केली. रवींद्र खरे यांचे अभ्यासपूर्ण निवेदन होते. तर नमोल खाबिया यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाची सुरुवात ‌‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा‌’ या अभंगाने करण्यात आली. पंडित रघुनाथ खंडाळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या ‌‘वाचे विठ्ठल गाईन‌’, ‌‘वैष्णवा संगती सुख वाटे‌’, ‌‘असा कसा देवाचा‌’ या रचनांसह ‌‘पंढरपुरीचा निळा‌’, ‌‘अमृताहुनी गोड‌’, ‌‘देव देव्हाऱ्यात नाही‌’, ‌‘पद्मनाभा नारायणा‌’, ‌‘कानडा राजा पंढरीचा‌’, ‌‘कंकड चुन चुन‌’, ‌‘बाजे रे मुरलिया‌’, ‌‘बोलावा विठ्ठल‌’ आदी भक्तीरचना प्रभावीपणे सादर करण्यात आल्या.

वॉलोंग लढाई ही भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतीक

मएसो सीनियर कॉलेज, पुणे यांच्या वतीने भारतीय सेनेच्या सहकार्याने भारत–चीन युद्ध १९६२ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

पुणे: चीनच्या लिबरेशन आर्मी ऑफ चायना या सैन्याने १९६२ मध्ये अचानकपणे अरुणाचल प्रदेश मध्ये केलेला हल्ला हा भारतासाठी एक धक्का होता  तरीही या हल्ल्याचा अतिशय प्रखरपणे सामना करत चीन सैन्याला जशास तसे उत्तर देऊन भारतीय सैन्याने आपली कामगिरी बजावली. या युद्धामध्ये वॉलोंग येथे झालेली लढाई ही एक प्रकारे भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतीक म्हणायला हवी, अशी भावना भारतीय सैनिकांनी व्यक्त केली.

मएसो सीनियर कॉलेज, पुणे यांच्या वतीने भारतीय सेनेच्या सहकार्याने “वॉलोंगच्या रणांगणातील शौर्यकथा – भारत–चीन युद्ध १९६२” या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्नल सूरज चांबियाल (एस.एम., टीम लीडर), मेजर यशवीर, लेफ्टनंट समीप यांनी या युद्धाची अतिशय रंजकपणे  माहिती दिली. या कार्यक्रमात भारतीय सेनेतील अधिकारी युद्धकाळातील सत्य घटनांचा आढावा घेण्यात आला.

निवृत्त कर्नल सुरज चांबियाल म्हणाले, भारत चीन आणि तत्कालीन ब्रिटिश सरकारमध्ये १९१३ रोजी शिमला येथे शांतता करार झाला होता, परंतु चीन सैन्याने १९६२ मध्ये या कराराचे उल्लंघन करून १८ ऑक्टोबर १९६२ च्या मध्यरात्री अरुणाचल प्रदेश मधील मॅकमोहन या दोन देशांच्या सीमारेषेचे उल्लंघन करून भारतामध्ये घुसखोरी केली. हा हल्ला भारतासाठी अतिशय अनपेक्षित होता परंतु भारतीय सैन्याने आपल्या जीवाची बाजी लावत चीन सैन्याचा अतिशय प्रखरपणे प्रतिकार केला. अरुणाचल प्रदेश मधील अतिशय डोंगराळ आणि खडतर अशा भागामध्ये भारतीय सैन्याने हा भाग पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. भारतीय सैन्य तुलनेने कमी होते तरीही जिगरबाज सैनिकांनी आपल्या जीवावर खेळून चीन सैन्याचा अनेक ठिकाणी पराभव केला. केवळ तीन हजार भारतीय सैनिकांनी हा पराक्रम गाजविला अशी ही माहिती त्यांनी दिली.

सत्रादरम्यान भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत सैनिकी जीवनातील शिस्त, देशसेवा आणि त्यागाची महती स्पष्ट केली. त्यांनी तरुणांना आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत युद्धातील तांत्रिक तयारी, मानसिक शक्ती आणि देशभक्तीचे महत्त्व जाणून घेतले. या संवादातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रसेवेबद्दल अभिमान, कर्तव्यबुद्धी आणि प्रेरणादायी उत्साह निर्माण झाला. या सत्राचे विशेष आकर्षण म्हणजे भारतीय सेनेने प्रत्यक्ष युद्धभूमीवरील दृश्ये, सैनिकांचे अनुभव आणि युद्धातील वीरांचा गौरव दृश्ये सादर करण्यात आले. या दृश्यांनी सभागृहातील वातावरण भारावून गेले.

प्राचार्य डॉ रवींद्र वैद्य म्हणाले, भारतीय सैन्याच्या अशा अनेक  महत्त्वपूर्ण युद्धांच्याबाबत सध्याच्या तरुण पिढीला माहिती व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मएसो  सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ रवींद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ पुनम रावत सर्व विभाग प्रमुख आणि  सर्व प्राध्यापक वर्ग यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरेखा वैद्य यांनी केले. उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांना भारतीय सैन्याच्या शौर्याची माहिती होईल तसेच त्यांना प्रोत्साहन मिळू शकेल.

पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजन ; एकूण १५ बँकांचा सहभाग

पुणे : पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी आयोजित आंतरसहकारी बँक ‘सहकार करंडक क्रिकेट स्पर्धा २०२५’ चे उद्घाटन राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते झाले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष (२०२५) निमित्ताने आयोजित स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पंडित नेहरू स्टेडियम येथे पार पडला. 

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ढमढेरे, उपाध्यक्ष रमेश वाणी, मानद सचिव अॅ’ड. सुभाष मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके, संचालक प्रल्हाद कोकरे, राजेश कवडे, सय्यद मोहम्मद गौस शेर अहमद, संजय शेवाळे, कांतीलाल गुजर, बाबुराव शितोळे, प्रिया महिंद्रे, नंदा लोणकर, युवराज वारघडे आणि इतर बँकेचे वंदना काळभोर, कमल व्यवहारे, गौतम कोतवाल, अनिरुद्ध देसाई, दीपक घाडगे, अजय रजपूत, जितेंद्र पायगुडे आदी उपस्थित होते. 

दीपक तावरे म्हणाले, आपण बँकेच्या माध्यमातून सहकार जपत असतो. मात्र, आज खेळाच्या मैदानावर देखील सर्व नागरी सहकारी बँका एकत्र येत सहकार बघायला मिळत आहे. आंतरबँक क्रिकेट स्पर्धा ही उत्तम संकल्पना असून खेळामुळे एकत्र येण्याचा आनंद सर्वानी घ्यावा. 

निलेश ढमढेरे म्हणाले, बँकिंग क्षेत्र हा अर्थविषयक कणा आहे. यंदा स्पर्धेत १५ बँकांच्या संघांनी सहभाग घेतला आहे. बँकांकडून क्रिकेट स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. दि.९ नोव्हेंबर पर्यंत दररोज ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील सामने स्वारगेट येथील पंडित नेहरू क्रिकेट स्टेडियम आणि सहकारनगरमधील शिंदे हायस्कूल मैदानावर होणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने १० षटकांचे होणार आहेत. तर सहकारी बँक सहकार करंडक महिला बॉक्स क्रिकेट स्पर्धा देखील होणार आहे. यामध्ये ६ षटकांचे सामने होतील, असेही त्यांनी सांगितले. सिमा घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश वाणी यांनी आभार मानले. 

आयुक्त साहेब .. अगोदर इमारतींच्या भवतालच्या फ्रंट, साईड मर्जीन अन पार्किंग स्पेस कुठे हरवल्यात ते शोधा .. खर्डेकर

पुणे – सशुल्क पार्किंग स्वागतार्ह पण … बांधकाम परवाने देताना मंजूर असलेल्या फ्रंट, साईड मर्जीन अन पार्किंगच्या हरवलेल्या जागा अगोदर शोधा आणि तिथेच संबधित इमारतींमधील रहिवाश्यांचे अगर व्यावसायिकांचे, व्हिजिटर चे पार्किंग होईल अशी व्यवस्था आपण करा नंतर प्रमुख रस्त्यांवर जरूर सशुल्क पार्किंग चा पर्योग करून पहा असे आवाहन क्रिएटिव्ह फाउंडेशनचे संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना केले आहे.

त्यांनी या संदर्भात आयुक्तांच्या नावे दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,’ जंगलीमहाराज रस्ता, बालेवाडीतील हायस्ट्रीट, लक्ष्मी रस्ता,ना. गोपाळकृष्ण गोखले रस्ता ( फर्ग्यूसन महाविद्यालय रस्ता ), बिबवेवाडी तील मुख्य रस्ता अश्या रस्त्यांवर पुढील महिन्यापासून पुणे मनपा सशुल्क पार्किंग सुरु करणार असल्याचे वृत्त वाचनात आले. यामुळे निश्चितच वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळेल आणि ह्या रस्त्यांवरील अव्यवस्थित व डबल पार्किंग करणारे तसेच जागा अडवीणाऱ्यांना देखील चाप बसेल.हा निर्णय स्वागतार्ह असला तरीही यानिमित्ताने एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे ह्या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहने का लावली जातात ?
याचे साधे उत्तर आहे की येथील बहुतांश इमारतीतील पार्किंग साठी च्या राखीव जागांमध्ये अनधिकृत बांधकाम करून किंवा जागेचा गैरवापर करून त्याठिकाणी व्यवसाय केला जातो व तेथे येणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर वाहने लावण्याशिवाय पर्याय रहात नाही.
हीच परिस्थिती ह्या रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल्स ची आहे, आपण स्वतः पाहणी करून ह्या रस्त्यावरील हॉटेल्स च्या पार्किंग साठी आरक्षित जागांचा तपशील जाहीर करावा व मान्य नकाशा प्रमाणे तेवढ्या वाहनांची जागा उपलब्ध आहे का याची माहिती पुणेकरांना द्यावी.अनेक व्यवसायिक इमारतीं मधील पार्किंग स्पेस गायब असल्याचे ही निदर्शनास आले असून काही ठिकाणी ग्राहकांच्या वाहनांना प्रवेश दिला जात नाही.
तरी आपणास या पत्राद्वारे आग्रही मागणी करत आहे की या प्रमुख पाच रस्त्यावरील गायब झालेल्या पार्किंग स्पेस चा त्वरित शोध घ्यावा व ह्या जागा अगोदर नागरिकांना वाहने लावण्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात.
मनपा च्या त्या त्या भागातील बांधकाम निरीक्षक किंवा अतिक्रमण निरीक्षकाकडे याची माहिती उपलब्ध आहेच.

मनपा च्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आणि व्यवसायिकांच्या स्नेहबंधाचा भुर्दंड सामान्य पुणेकरांच्या माथी मारताना वरील बाबींचा विचार करावा अशी मागणी करत आहे. असे खर्डेकर यांनी म्हटले आहे.

मनीष, अंकिता ठरल्या विजेत्या

‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉनमध्ये २० हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग

पुणे, ता. २ : मनीष राजपूत आणि अंकिता गावीत यांनी भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘पुणे रन फॉर युनिटी’, महामॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटर शर्यतीत अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात अव्वल क्रमांक मिळवला.

स. प. महाविद्यालयातून या महामॅरेथॉनला सुरुवात झाली. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शोरेळ, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर, राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या हस्ते शर्यतीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या वेळी फोर्स मोटर्सचे अध्यक्ष मकरंद कानडे, राकेश मारू, प्रवीण कर्णावत, फोर्स मोटर्सचे ग्रुप सीएफओ रिषी लुहारुका, कर्णधार अभिनिल राय, पुणे विमानतळ संचालक संतोष ढाके, सीआयएसएफ कमांडन्ट प्रताप पुंडे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, चितळे बंधू मिठाईवाल्याचे इंद्रनील चितळे, लोकमान्य कॉपरेटिव्ह सोसायटीचे सुशील जाधव उपस्थित होते.

या वेळी बोलताना मोहोळ म्हणाले, ‘जीवनमान आरोग्य संपन्न ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी दैनंदिन आयुष्यातील तंदुरुस्ती, फिटनेस अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पुणेकर अशा फिटनेस बाबत खूप जागरूक आहेत, याचा मला अभिमान वाटतो. योगाभ्यास, चालणे, पळणे, सायकलिंग, जलतरण, अनेकविध खेळ खेळणे अशा अनेक आघाड्यांवर पुणेकर स्वतःला फिट ठेवण्यात अग्रेसर आहेत. मॅरेथॉन सारख्या उपक्रमांनी पुणेकरांच्या याच फिटनेस प्रेमाला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.’
अर्धमॅरेथॉनसह १० किलोमीटर, पाच किलोमीटर, तीन किलोमीटरच्या शर्यतीही झाल्या. ‘पुणे रन फॉर युनिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह २० हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले होते. केनिया, इथिओपिया इत्यादी देशांतील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटूंचा सहभाग होता. मात्र, त्या सर्वांमध्ये भारतीय धावपटू सरस ठरले. २१ किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत खुल्या गटात भारताच्या मनीष राजपूतने १ तास ५ मिनिटे ०२ सेकंद वेळ नोंदवून अव्वल क्रमांक मिळवला. महिलांमध्ये अंकिता गावीतने बाजी मारली. तिने १ तास १७ मिनिटे ४५ सेकंद वेळ नोंदवली. विजेत्यांना एक लाख रुपये, उपविजेत्यास ७५ हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूस पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. त्याचबरोबर सहभागी प्रत्येकाला टी-शर्ट, मेडल, नाश्ता देण्यात आला.

निकाल : भारतीय (खुला गट) – पुरुष – मनीष राजपूत – १ तास ५ मि. ०२ से.; हाविश शेओरन – १ तास ५ मि. १५ से.; मनोज कुमार – १ तास ५ मि. ३१ से.

महिला – अंकिता गावीत – १ तास १७ मि. ४५ से.; तामसी सिंह – १ तास १९ मि. १७ से.; रविना गायकवाड – १ तास २१ मि. २७ से.

परदेशी (खुला गट) – पुरुष – मिचेल कायलो मैथया (केनिया) – १ तास ७ मि. ११ से.; पॉल केमेई (केनिया) – १ तास ७ मि. २४ से.; मेशाक म्बुगाअ (केनिया) – १ तास ८ मि. ३३ से.

महिला – किपटू कारोलिने (केनिया) – १ तास २० मि. २६ से.; पेनिनाह वाइथिरा (केनिया) – १ तास २३ मि. ९ से.; देसी नेगेसे कितिला (इथिओपिया) – १ तास ३१ मि. ३३ से.

महापालिकेची ‘सशुल्क पार्किंग’ योजना निवडणुकीपूर्वीची राजकीय खेळी ?

पुणे- गेली २५/ ३० वर्षे पुण्यातील रस्त्यांवर सशुल्क पार्किंग च्या योजना महापालिका वारंवार मांडत आहे आणि राजकीय दबावाखाली पुन्हा पुन्हा मागे घेत असल्याचा इतिहास असताना आता पुन्हा पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर सशुल्क पार्किंग सुविधेबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवणार आहे .हि पूर्णतः महापालिका निवडणुकीच्या तोंडावरील राजकीय खेळी असल्याचे दिसते आहे.अशा प्रकारे प्रशासनाने प्रस्ताव अंमलात आणला तर साहजिकच याचा सर्वाधिक धक्का भाजपा आणि राज्यातील सत्ताधारी पक्षांना आगामी महापालिका निवडणुकीत बसणार आहे.आणि हे जाणून च हा प्रस्ताव पुन्हा आणला जात असल्याचे स्पष्ट आहे.त्यामुळे या प्रस्तावावर दबाव येणार आणि तो पुन्हा बासनात गुंडाळला जाणार हेही तेवढेच खरे असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान महापालिकेने शहरातील पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर सशुल्क पार्किंग सुरु करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. सध्या तांत्रिक प्रक्रिया सुरू असून नोव्हेंबरमध्ये ती पूर्ण होईल.त्यानंतर महापालिकेकडून पुढील महिन्यापासून सशुल्क पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे खरेदी व विविध कामानिमित्त मध्यवर्ती भागात येणाऱ्या नागरिकांची वाहने लावण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांवर खरेदीसाठी किंवा विविध प्रकारच्या कामानिमित्त नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र स्थानिक रहिवासी, व्यावसायिकांकडून त्यांची वाहने संबंधित पार्किंगच्या ठिकाणी रात्रंदिवस व कायमस्वरूपी लावून पार्किंग अडविण्याचा प्रयत्न केला जातो. मध्यवर्ती भागात किंवा उपनगरांमध्ये येणाऱ्यानागरिकांना जागा उपलब्ध होत नाही. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे म्हणणे शहर वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडले होते. त्यामुळे महापालिकेने सशुल्क पार्किंग सुरू करण्यास प्राधान्य दिले आहे.शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर ‘नो पार्किंग, नो हॉल्टिंग’ तसेच काही मर्यादित भागांत सशुल्क पार्किंग करण्याचा ठराव मार्च २०१८ मध्ये मांडला होता. संबंधित निर्णयास आयुक्तांची मान्यता मिळाली नव्हती. दरम्यान, आयुक्त नवल किशोर राम यांनी वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी संबंधित ठरावानुसार तसेच वाहतूक पोलिसांशी चर्चा करून प्रमुख रस्त्यांवर सशुल्क पार्किंग तसेच ५० मीटरपर्यंत ‘नो पार्किंग’ करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार, महापालिका व शहर वाहतूक पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या यासंदर्भात बैठका झाल्या. त्यानंतर पाच रस्त्यांवर सशुल्क पार्किंगचा प्रस्ताव तयार करून तो मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवला. तांत्रिक प्रक्रियेस एक महिन्याचा कालावधी लागणार आहे, त्यानंतर पुढील महिन्यापासून प्रायोगिक तत्त्वावर सशुल्क पार्किंग व्यवस्था सुरू होण्याची शक्‍यता आहे.असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

पुण्यातील क्रीडा संस्कृतीला मिळणार बळकटी

अंजली भागवत यांची प्रतिक्रिया; खासदार क्रीडा महोत्सवासाठी मोहोळ यांच्याकडून शुभेच्छा

  • पहिल्या ‘खासदार क्रीडा महोत्सवा’ला सुरुवात
  • ऑलिंपियन, अर्जुन पुरस्कार प्राप्त, माजी खेळाडूंच्या हस्ते ज्योत प्रज्वलित
  • केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली १५ दिवस ३५ स्पर्धांचे आयोजन

पुणे, ता. २ : ‘पुण्यात अनेक गुणवान खेळाडू आहेत. खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने सर्व खेळाडूंना आपले कौशल्य दाखवायला व्यासपीठ मिळणार आहे. यातून पुण्यातील क्रीडा संस्कृतीला बळकटी मिळणार आहे. या स्पर्धेतून काही खेळाडू पुढे देशाचे नेतृत्व करू शकतात,’ असे प्रतिपादन खेल रत्न पुरस्कार प्राप्त ऑलिंपियन नेमबाज अंजली भागवत यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट युवा फॉर विकसित भारत’ या आवाहनाला प्रतिसाद देऊन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सवा’ला आज, रविवारपासून सुरुवात झाली. या महोत्सवाची सुरुवात मॅरेथॉनने झाली. स. प. महाविद्यालयाच्या मैदानात रविवारी झालेल्या पारितोषिक समारंभावेळी खासदार क्रीडा महोत्सवासाठीची ज्योत प्रज्वलन कार्यक्रम पार पडला. यावेळी अंजली भागवत यांनी महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. ही ज्योत प्रज्वलीत करण्यासाठी ऑलिंपियन, आशियाई पदक विजेते आणि सर्वच खेळातील माजी खेळाडू, प्रशिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर श्रीरंग इनामदार, रमेश विपट, सुरेखा द्रविड, गौरव नाटेकर, संदीप कीर्तने, केदार जाधव, रेखा भिडे, मनोज पिंगळे, शांताराम जाधव, मनोर एरंडे, शकुंतला खटावकर, आकांक्षा हगवणे, कौस्तुभ राडकर असे आजी-माजी खेळाडू उपस्थित होते. खासदार मोहोळ यांनी आकाक्षात फुगे सोडून या स्पर्धेची सुरुवात केली.

या वेळी बोलताना मोहोळ म्हणाले, ‘तरुण तंदुरुस्त राहिला, तर देश तंदुरुस्त राहील. त्यासाठीच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माझ्या पुण्याने देशाला अनेक खेळाडू दिले आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने पुण्यातील क्रीडा संस्कृतीचा प्रचार-प्रसार करायचा आहे.’ मोहोळ यांनी या वेळी मागे राहून हे व्यासपीठ खेळाडूंचे असल्याचे सांगून सर्व माजी खेळाडूंना पुढाकार घेण्यास सांगितला.
खासदार क्रीडा महोत्सव १६ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. शहरातील विविध मैदानांवर एकूण ३५ प्रकारांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा विविध खेळांच्या असोसिएशनच्या मदतीने आयोजित करण्यात येणार आहेत. या क्रीडा महोत्सवात खेळाडूंसोबतच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांनाही आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय पारंपरिक खेळांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांचा यात समावेश आहे. तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, जलतरण, बास्केटबॉल, शरीरसौष्ठव, बॉक्सिंग, कॅरम, बुद्धिबळ, सायकलिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युदो, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, पिकलबॉल, रोलबॉल, शूटिंग, स्केटिंग, सॉफ्टबॉल, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिस, व्हॉलीबॉल, वॉल क्लायम्बिंग, वॉटर पोलो, वेट लिफ्टिंग, कुस्ती, वुशू, योग, स्क्वॅश यांसारख्या विविध स्पर्धांचा समावेश आहे. दिव्यांगांसाठी विशेष जलतरण स्पर्धा आणि व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धा; तसेच ज्येष्ठांसाठी कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धा सणस मैदान, टिळक तलाव मैदान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुल, स. प. महाविद्यालय, महाराष्ट्र मंडळ, डेक्कन जिमखाना, खराडी आदी ठिकाणी होणार आहेत.

मुरलीधर मोहोळ म्हणाले…

  • पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०४७ मध्ये विकसित भारत होण्याच्या दिशेने आपण आश्वासक वाटचाल करीत आहोत.
  • मात्र, त्यासाठी युवा आणि सक्षम असलेला भारत हा आरोग्य संपन्न भारतदेखील असणे तितकेच महत्त्वाचे आहे.
  • त्यासाठीच मोदीजींनी फिट इंडिया, स्लिम इंडिया अशा मोहिमा यशस्वीपणे राबवल्या आहेत. त्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाददेखील मिळतो.
  • त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून संतुलित जीवन आणि आहार शैलीचा मंत्र भारताबरोबरच जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवला.
  • खेलो इंडिया शालेय आणि युवा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील उदयोन्मुख प्रतिभेला थेट ऑलिंपिक पदक जिंकण्यापर्यंतची पोषक कार्य संस्कृती आपण निर्माण केली आहे.
  • अद्ययावत वैद्यकीय सुविधा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत असल्यामुळे भारतामध्ये आरोग्य क्रांती झाली आहे. त्यामुळे भारतीयांचे जीवनमान वाढले आहे.

Ganesh Kale Murder Case:चौघे पकडले, हत्येचा धागा आंदेकर टोळीपर्यंत? आरोपींची नावे अन् ‘कनेक्शन’ समोर..

पुणे- काल गणेश काळे हत्येच्या प्रकरणात कोंढवा पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील चारही आरोपींना अटक केली.. हत्येच्या ठिकाणाजवळ आरोपींनी गाडी सोडून पळ काढला होता पण प्राथमिक माहितीनुसार, हत्येचे कारण गँगवॉरमध्येच दडले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. आरोपी एकाच गाडीवर बोपदेव घाटाकडे पळाले होते.माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनातील आरोपी मोक्का खाली तुरुंगात असल्याने हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने त्यांच्या नातेवाईकांना टारगेट केले असावे असे वाटावे अशी स्थिती सध्या आहे पुणे पोलिसांनी बंडु आंदेकर टोळीतील प्रमुख १५ जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर मोक्का कारवाई करुन त्यांना वेगवेगळ्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. तरीही काल वनराज च्या हत्येतील १ आरोपी जेल मध्ये असताना त्याचा मोठा भाऊ आणि सोमनाथ गायकवाड टोळीचा सदस्य गणेश काळे याचा खुन करण्यात आल्याने आंदेकर टोळी अजूनही शहर आणि परिसरात दबदबा धरून आहे कि काय ? या टोळीचे धागेदोरे किती लांबवर पोहोचले असावेत यावर आता चर्चा सुरु होऊ शकेल असे दिसते आहे. पुणे गुन्हे शाखेने चार संशयितांना ताब्यात घेतले असून, पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले आहे. तपास युद्धपातळीवर सुरू असून, आरोपींची ओळख पटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. चारही आरोपी आंदेकर टोळीशी संबंधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील दोघे अल्पवयीन आहेत.अटक करण्यात आलेले आरोपी खेड शिवापूर मधून ताब्यात घेण्यात आले. साताऱ्याच्या दिशेने पळून जात असताना खेड-शिवापूर परिसरात त्यांना गजाआड करण्यात आले. अटक आरोपींची नावे अमन शेख आणि अरबाज पटेल अशी आहेत.

या प्रकरणाच्या तपासात समोर आले कि,ज्याचा खून झाला त्या गणेश काळे याला कोंढवा पोलिसांनी त्याच्या हत्येच्या केवळ 4 दिवस आधी, म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता बेकायदेशीर देशी दारू विक्रीच्या आरोपाखाली अटक केली होती. पोलीस अंमलदार प्रशांत लक्ष्मण खाडे यांनी दारू विक्रीप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.पोलिस तपासात गणेश किसन काळे (वय 30, रा. येवलेवाडी) हा टँगो कंपनीच्या 61 देशी दारूच्या बाटल्या (एकूण ₹2,440 किमतीच्या) विकतांना दिसून आला होता. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ₹8,140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.दारू विक्रीप्रकरणी प्रशांत खाडे, राजपूत, पटेल आणि शेख हे पोलीस 28 ऑक्टोंबर रोजी दुपारी खडी मशीन भागात पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार राजपूत यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, येवलेवाडी येथील शिवकृपा बिल्डिंगमध्ये एक व्यक्ती हातभट्टीची दारू बेकायदेशीरपणे विकत आहे. त्यानंतर पोलिसांनी गणेशला रंगेहाथ पकडले होते. दारू विक्रीच्या या प्रकरणात जामीनावर सुटल्यानंतर त्याची हत्या झाली आहे.पुण्यातले गँगवॉर या हत्येने संपले नसल्याचे दाखवून दिले आहे.

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनासाठी वापरलेली पिस्तुले गणेश काळेचा भाऊ समीर काळे याने मध्यप्रदेशातून आणली होती. सध्या समीर काळे हा तुरुंगात आहे.गणेशचा भाऊ समीर काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणात सहभागी होता. त्यानेच हत्येसाठी पिस्तुले मध्य प्रदेशामधून आणली तेव्हा समीरसोबत आकाश म्हस्के, संगम वाघमारे आणि आबा खोंड होते. या चौघांनी धुळेमार्गे मध्यप्रदेशातून पिस्तूले आणल्याची माहिती समोर आली होती. काही दिवसांपूर्वी नाना पेठेत वनराज आंदेकर हत्येतील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याचा खून झाला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीला अटक केली होती. याच घटनेचा बदला घेण्यासाठीच गणेश काळेची हत्या झाल्याची शक्यता तपासात पुढे आली आहे.पोलिसांनी वेगाने तपास करत काळे खून प्रकरणातील चार संशयितांना अटक केली आहे. हे चारही आरोपी आयुष कोमकर खटल्यातील आरोपी आणि बंडू आंदेकरचा नातू स्वराज वाडेकर याचे अत्यंत जवळचे मित्र असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्वराज वाडेकर याच्या रूपाने आंदेकर कुटुंबाची तिसरी पिढी सुद्धा गुन्हेगार विश्वात आली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच स्वराज वाडेकरचे मित्र असणारे आरोपी अमन शेख, अरबाज पटेल आणि दोन अल्पवयीन मुलांना खेड-शिवापूर परिसरातून पकडण्यात आले.

भरधाव कार मेट्रोच्या खांबावर आदळली, सख्ख्या चुलतभावांचा मृत्यू

पुणे – रविवारी (२ नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ भरधाव वेगातील एका कारला झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये ऋतिक भंडारी आणि यश भंडारी या सख्ख्या चुलत भावांचा समावेश आहे, तर त्यांच्यासोबत असलेला कुशवंत टेकवणी हा गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही थरारक घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. एम एच 24 डी टी 8292 क्रमांकाची ही काळ्या रंगाची कार अतिवेगात होती. गाडीत बसलेल्यांपैकी कोणीतरी अचानक हँड ब्रेक ओढल्याने कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली ही कार रस्त्याच्या डिव्हायडरला धडकली आणि थेट बंडगार्डन मेट्रो स्टेशनच्या सिमेंटच्या खांबावर आदळली. धडक एवढी जबरदस्त होती की, कारचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले. फुटेजमध्ये कारचा वेग प्रचंड असल्याचे दिसून येत आहे. या अपघातात पुढच्या सीटवर बसलेल्या ऋतिक आणि यश यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. या फुटेजमधून कारचा वेग किती होता, याचा अंदाज येतो. भरधाव वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पार्क पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अपघातस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून कारचा वेग आणि अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, थोड्याच वेळात फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल होणार आहे. अपघातग्रस्त कार भाड्याने घेतली होती का, याचाही शोध घेतला जात आहे. गाडी नेमकी कुठून आली आणि अपघाताची नेमकी कारणे काय होती याचा तपास सुरू आहे. अपघातात गाडीत अल्कोहोल किंवा अन्य अंमली पदार्थ होते का, याचीही तपासणी फॉरेन्सिक टीम करणार आहे.

‘सत्याचा मोर्चा’च्या आयोजकांवर गुन्हा दाखल:बेकायदेशीर सभा अन् पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन प्रकरणी कारवाई

मुंबई–मुंबईच्या रस्त्यावर निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी संयुक्तपणे काढलेला ‘सत्याचा मोर्चा’ आता आयोजकांच्या अडचणी वाढवणारा ठरला आहे. पोलिसांनी या मोर्चाला औपचारिक परवानगी नाकारली असतानाही, प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून आणि बेकायदेशीरपणे सभा घेतल्याबद्दल मुंबई पोलिसांनी या मोर्चाच्या आयोजकांवर कठोर कारवाई केली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने निवडणूक आयोगाच्या विरोधात शनिवारी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या मोर्चाला सत्याचा मोर्चा असे नाव देण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. यापूर्वी झालेल्या मराठा आंदोलनावेळी सर्वसामान्यांना झालेल्या त्रासामुळे आणि उच्च न्यायालयाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे पोलीस परवानगी देण्यास टाळाटाळ करत असल्याचे बोलल्या जात होते. परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चा काढल्यास कायदेशील कारवाई केली जाईल, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या सूचनेनंतरही महाविकास आघाडी आणि मनसेने संयुक्तरीत्या मोर्चा काढल्याने पोलिसांनी आता आयोजकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी आयोजकांवर बेकायदेशीर सभा आयोजित करणे आणि प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सत्याचा मोर्चात विरोधी पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट दुबार मतदारांचे पुरावे सादर करत, “निवडणुका एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात याव्या आणि या दरम्यान मतदार याद्यांमध्ये संपूर्ण दुरुस्ती करण्यात यावी,” अशी मागणी केली. या मोर्चात काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांचेही मोठे नेते सहभागी झाले होते.

पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत ५२ वी राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धेचे जळगावात शानदार उद्घाटन

पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत ५२ वी ज्युनिअर राज्यस्तरीय ज्यूडो क्रीडा स्पर्धा महाराष्ट्र ज्यूदो संघटना व जळगाव जिल्हा ज्यूदो हौशी असोसिएशनतर्फे दि. १ नोव्हेंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजित करण्यात आली असून. स्पर्धेसाठी राज्यभरातून ३० जिल्हयाचे सुमारे ३५० खेळाडू व ८० संघ व्यवस्थापक, कोच, मॅनेजर, पंच सहभागी झाले आहेत. काल स्पर्धेचा पहिला दिवस होता.

महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आणि जळगाव जिल्हा ज्यूदोचे अध्यक्ष विष्णू भंगाळे यांच्या सहकार्याने या स्पर्धा सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या या स्पर्धेमुळे खेळाडूंना ज्यूदो खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळत असून ज्यूदोचा प्रसार देखील होण्यास मदत होत आहे.

स्पर्धा महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष शैलेश टिळक व सचिव दत्ता आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते काल करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे शैलेश टिळक, जैन इरिगेशन चे रवींद्र धर्माधिकारी, महाराष्ट्र राज्य ज्यूदो असोसिएशनचे खजिनदार रवींद्र मेटकर, पारोळा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी किशोर चव्हाण, गणेश शेटकर, संचालक अनिल देशमुख, महेश पाटील आंतरराष्ट्रीय पंच विजय यादव, टुर्नमेंट डायरेक्टर अमोल देसाई , राज्य सॉफ्ट बॉल संघटनेचे सचिव व शिव छत्रपती अवार्ड विजेते प्रदीप तळवेलकर, टेक्निकल मेम्बर अतुल बामनोदकर, सचिन देवळे,वृषाली लेग्रस महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन चे उपाध्यक्ष ऍड. विकास पाटील, तांत्रिक समिती अध्यक्ष दर्शना लखानी आदी उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती पाटील व महेश पाटील यांनी केले.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सचिव डॉ उमेश पाटील,योगेश महाजन, अतुल गोरडे, अजय काशीद, डिंगबर महाजन, सचीन वाघ, डॉ चांद खान, अशफाक शेख,पदाधिकारी जळगाव जिल्हा ज्यूदो हौशी संघटना हे परिश्रम घेत आहेत. दरम्यान , उद्या या स्पर्धेचा समारोप होणार असून या प्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील ,राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार , सुप्रसिद्ध वकील उज्ज्वलजी निकम , खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

वनराजच्या हत्येतील आरोपीच्या भावाचा भरदिवसा गोळ्या घालून खून, मेल्यावरही कोयत्याने घातले घाव .. आंदेकर टोळी अजूनही आहे सक्रिय ?

0

खडी मशीन चौकात थरार

पुणे- कोंढवा येथे रिक्षाचालक असलेल्या गणेश काळे (वय 30) या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी सहा राऊंड फायर करत त्याच्यावर कोयत्याने वार केले. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा तपास सुरू केला आहे. मृत गणेश काळे हा सोमा गायकवाड टोळीतील समीर काळेचा भाऊ असल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. समीर काळे हा सध्या कारागृहात असून, त्याच्यावर वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक आहे.त्यामुळे आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे.कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात २ आरोपींनी रिक्षातून प्रवास करणाऱ्या गणेश काळे याच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या गणेश काळे याला लागल्या. तो गतप्राण झाला. त्याचवेळी दुचाकीवरून उतरलेल्या दोघांनी त्याच्या शरीरावर कोयत्याचे वार केले. काही मिनिटांतच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. दोन आरोपी गणेशच्या मागावर होते. त्यांनी गणेशला रिक्षात बसू दिले, काही अंतर कापल्यानंतर त्यांनी गणेशला लक्ष्य केले.

आंदेकर टोळीकडून आयुष कोमकरची हत्या करण्यात आल्यानंतर टोळी प्रमुख सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकर सह अनेकांना अटक करण्यात आली होती. मात्र तरीही आंदेकर टोळी सक्रिय असल्याचं या हत्येतून दिसून येतंय.वनराज आंदेकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या समीर काळेचा भाऊ हा गणेश काळे आहे. त्यामुळे त्याच्या हत्येमागे गँगवॉर आहे काय ? याचा तपास पोलीस करत आहेत.

गेल्या वर्षी वनराज आंदेकरची हत्या कोमकर गँगकडून करण्यात आली होती. त्यानंतर त्या हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आंदेकर गँगचा प्रमुख बंडू आंदेकर आणि त्याच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

1 सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठमध्ये राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली. या प्रकरणात गणेश कोमकर, संजीवनी कोमकर, जयंत कोमकर आणि इतरांसह 21 आरोपींना अटक करण्यात आली.वनराज आंदेकरच्या हत्येनंतर संतापलेल्या आंदेकर टोळीच्या सदस्यांनी त्याच्या अंत्यविधीवेळी शस्त्रपूजन करून बदला घेण्याची शपथ घेतली होती. त्याचाच एक भाग म्हणून 1 सप्टेंबर 2025 रोजी प्लॅनही आखला होता. वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपींची रेकी करण्यात आली होती. पण पोलिसांना याची माहिती मिळाली आणि हा प्लॅन उधळला.गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आरती झाल्यानंतर नाना पेठेमध्ये गोळ्यांचा आवाज झाला. एकीकडे एका गणेश मंडळामध्ये डीजे सुरू होता, त्यामध्ये ‘टपका रे टपका, एक ओर टपका’ हे गाणं सुरू होतं. त्याचवेळी दुसरीकडे आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने त्यांच्या भाच्याला म्हणजे आयुष कोमकरला ठार केलं. या घटनेनंतर पोलीस कारवाई सुरू आहे.