Home Blog Page 74

पुणे पीपल्स बँकेची विजयी सलामी 

सहकार करंडक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात ; पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने आयोजन

पुणे : पुणे पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेने पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी आयोजित आंतरसहकारी बँक सहकार करंडक क्रिकेट स्पर्धेत पुणे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर ३७ धावांनी मात केली.

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलच्या मैदानावर ही लढत झाली. पुणे पीपल्स बँकेने निर्धारित ८ षटकांत सहा बाद ८१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पुणे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ७ बाद ४४ धावाच करता आल्या. यात मंगेश वाडकरने अष्टपैलू कामगिरी केली.

दुस-या लढतीत साधना सहकारी को-ऑपरेटिव्ह बँकेने धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर ८० धावांनी मात केली. साधना सहकारी बँकेने २ बाद ११६ धावा केल्या. धर्मवीर बँकेला ५ बाद ३६ धावाच करता आल्या.

‘सहकार करंडक क्रिकेट स्पर्धा २०२५’ चे उद्घाटन राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते झाले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष (२०२५) निमित्ताने आयोजित स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पंडित नेहरू स्टेडियम येथे पार पडला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ढमढेरे, उपाध्यक्ष रमेश वाणी, मानद सचिव अॅ’ड. सुभाष मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके, संचालक प्रल्हाद कोकरे, राजेश कवडे, सय्यद मोहम्मद गौस शेर अहमद, संजय शेवाळे, कांतीलाल गुजर, बाबुराव शितोळे, प्रिया महिंद्रे, नंदा लोणकर, युवराज वारघडे आणि इतर बँकेचे वंदना काळभोर, कमल व्यवहारे, गौतम कोतवाल, अनिरुद्ध देसाई, दीपक घाडगे, अजय रजपूत, जितेंद्र पायगुडे आदी उपस्थित होते. 

धावफलक : १) पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक – ८ षटकांत ६ बाद ८१ (मंगेश वाडकर २५, किशोर तुपे नाबाद २१, उमेश कोतकर २१, मोरेश्वर ढमढेरे २-०-११-२, किरण चौबोरे २-०-१९-१, तुषार साबळे १-०-१५-१) वि. वि. पुणे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक – ८ षटकांत ७ बाद ४४ (आदित्य ढमढेरे ५, मंगशे वाडकर २-०-६-२, संतोष साबळे २-०-११-१, चंद्रकांत पवार २-०-४-१, प्रतिक गुजराती १-०-१०-१).


२) साधना सहकारी को-ऑपरेटिव्ह बँक – ८ षटकांत २ बाद ११६ (रोहन तिखे ४५, सुमीत गावडे नाबाद ३४, गोपाळ मुंडे नाबाद २०) वि. वि. धर्मवीर संभाजी को-ऑपरेटिव्ह बँक – ८ षटकांत ५ बाद ३६ (सचिन कडू १२, गोपाळ मुंडे १-०-३-१, सागर माथवड १-०-२-१).

गरीब वीजग्राहकांना २५ वर्षे मोफत वीज

 राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२५: दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना २५ वर्षे मोफत विजेची सुविधा उपलब्ध करण्यासाठीच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनुदानामुळे या योजनेतील लाभार्थी ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरावा लागणार आहे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने स्मार्ट योजना सुरू केली आहे. दारिद्र्य रेषेखालील १.५४ लाख तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल ३.४५ लाख अशा महिना १०० युनिटपेक्षा कमी वीज वापणाऱ्या पाच लाख घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी ६५५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर राबविण्यात येणार आहे. महावितरणच्या नुकत्याच झालेल्या संचालक व मुख्य अभियंत्याच्या राज्यस्तरीय बैठकीत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. त्यामध्ये ग्राहकांना एक किलोवॅटचा छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी ३० हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळते. स्मार्ट योजनेत या अनुदानाखेरीज राज्य सरकारकडूनही अनुदान मिळणार असल्याने वीज ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरून प्रकल्प बसविता येईल.

स्मार्ट योजनेनुसार दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना एक किलोवॅटचा सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ३० हजार रुपये तर राज्य सरकारकडून १७,५०० रुपये अनुदान मिळेल. सौर ऊर्जा प्रकल्पाची ऊर्वरित रक्कम भरून ग्राहक २५ वर्षे मोफत विजेचा लाभ घेऊ शकतो.

शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांनाही केंद्र सरकारच्या ३० हजार रुपये अनुदानाखेरीज राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे. या गटातील सर्वसाधारण ग्राहकांना दहा हजार रुपये राज्य सरकारकडून मिळतील. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या ग्राहकांना राज्य सरकार १५ हजार रुपये अनुदान देणार आहे. 

एक किलोवॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीजनिर्मिती होते. त्यामुळे शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना स्वतःची गरज भागवून अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते. या प्रकल्पातून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ लाभ होतो.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या चांदणी चौक ते पाषाण दरम्यान मुख्य रस्त्याकडे प्रशासनाचे वेधले लक्ष

पुणे -अनेक वर्षांपासून रखडलेल्या चांदणी चौक ते पाषाण दरम्यान मुख्य रस्त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून येथे प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना पाचारण करून माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी नागरिकांच्या भावना त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या . बावधन परिसरातील चांदणी चौक ते पाषाण दरम्यानचा 36 मीटर मुख्य रस्ता, ड्रेनेज व पावसाळी लाईनचे अनेक वर्षांपासून रखडलेले आहे या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

या कामाच्या विलंबामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीची मोठी गैरसोय, साचलेल्या पाण्यामुळे अस्वच्छता आणि आरोग्यविषयक समस्या भेडसावत होत्या. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर चिखल व पाणी साचल्याने वाहनचालक व पादचारी दोघांनाही त्रास सहन करावा लागत होता.या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी अनेक वर्षांपासून या कामासाठी सातत्यपूर्ण आणि ठामपणे पाठपुरावा केला आहे. त्यांनी प्रशासनाच्या विविध स्तरांवर बैठक घेत कामाची गती वाढविण्याचा सातत्याने आग्रह धरला.या प्रयत्नानंतर अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आज स्थळ पाहणी करून संबंधित विभागांना काम तात्काळ सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

पाहणीदरम्यान पथ विभागाचे अजित आंबेकर, भुताडा, सुनिल भोंगळे,मालमत्ता विभागाचे उपआयुक्त प्रशांत ठोंबरे, अभिषेक घोरपडे
बांधकाम विभागाचे बोबडे, महेश शेळके,भू संपादन विभागाचे मोरे,कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय नायकल, आरोग्य अधिकारी व अभियंता,ड्रेनेज विभागाचे सुभाष फावरा, अजिक्य वानखडे, रुचिता बावणकर अशी अधिकाऱ्यांची मोठी फौजच अवतरली होती त्यामुळे आता नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी हे अनेक वर्षांपासून रखडलेले मुख्य रस्ता, ड्रेनेज व पावसाळी लाईनचे काम आता लवकरच सुरू होणार आहे असा विश्वास व्यक्त केला आहे .

कविता माणसाला जगण्याचे बळ देते : राजन लाखे

कविसंमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद : पुणे बुक फेअरचा समारोप
पुणे : कविता माणसाला जगण्याचे बळ देते. सामाजिक जाणिवेच्या व वेदनांवर फुंकर घालणाऱ्या कविता सादर करून कवींनी आपल्यातील प्रतिभा सिद्ध केली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.
एक्सपो सेंटर, महाराष्ट्र साहित्य परिषद, आकाशवाणी, महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन व सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आपटे रोडवरील सेंट्रल पार्क येथे 23व्या पुणे पुस्तक जत्रा व मराठी साहित्य मेळा येथे कविसेंमलन रंगले. पुणे बुक फेअरचे आयोजक पी. एन. आर. राजन, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह शिरीष चिटणीस उपस्थित होते. कविसंमेलनाने पुणे बुक फेअरचा समारोप झाला.
कविसंमेलनामध्ये अंजली कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर, जोत्स्ना चांदगुडे, वि. दा. पिंगळे, माधव राजगुरू, सविता कुरुंदवाडे, रुद्रांश जगताप, डॉ क्षितिजा पंडित, रूपाली अवचरे, प्रशांत निकम, डॉ प्रेरणा उबाळे, शरयू पवार, डॉ. राहुल भोसले, विनोद अष्टूळ, रमेश जाधव, दशरथ दूनधव, डॉ मृणालिनी गायकवाड, डॉ. लता पाडेकर, डॉ. गोविंद सिंग राजपूत, ज्योत्स्ना बिडवे, आकांक्षा अग्रवाल आदी मान्यवर कवी सहभागी झाले होते. कवींनी सादर केलेल्या कवितांवर मार्मिक भाष्य करत राजन लाखे यांनी कार्यक्रम रंगवत नेला. आभारप्रदर्शन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रा. सुनील धनगर यांनी केले. कविसंमेलनास उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भाजपला मतचोरीतही हिंदू मुस्लीम दिसते, भाजपाच्या बुद्धीची किव करावी वाटते: हर्षवर्धन सपकाळ

डॉ. संपदा मुंडे आत्महत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार रणजित नाईक निंबाळकरला तात्काळ अटक करा.

डॉ. संपदा मुंडे प्रकरणी न्यायमूर्तींचा सहभाग असलेली एसआयटी स्थापन करा, अन्यथा १० नोव्हेंबरला ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालू: उदन भानू चिब

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक टिळक भवनमध्ये संपन्न.

मुंबई, दि. ३ नोव्हेंबर २०२५.

राज्यात व केंद्रातील भाजपाचे सरकार मतचोरी करून सत्तेत आले आहे. भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी कशी केली हे लोकसभेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केलं आहे. हा प्रकार लोकशाही साठी अत्यंत घातक आहे. परंतु भारतीय जनता पक्षाला यातही हिंदू- मुस्लीमच दिसते, यावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असे प्रत्युतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मतचोरी मुद्दा सर्वात आधी काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी उघड केला. आता देशभरातील विरोधी पक्ष याप्रश्नी आवाज उठवत आहेत. निवडणूक आयोगाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिंन्ह उभे राहिले आहे. काँग्रेस पक्षाने हा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे काँग्रेस पक्षाने प्रचंड मोठे आंदोलनही केले. मुंबईत दोन दिवसापूर्वी निघालेल्या मोर्चातही काँग्रेस पक्षाने सहभाग घेतला होता. या मोर्चावेळी काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते व झेंडेही होते पण भाजपा त्यावरही टीका करत आहे, ते चुकीचे आहे. या मोर्चात मी सहभागी होण्याचा मुद्दा गौण असून मतचोरी हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यावेळी म्हणाले की, डॉ. संपदा मुंडे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न भाजपा महायुती सरकार करत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी हाय कोर्टाच्या न्यायमुर्तींचा सहभाग असलेली एसआयटी स्थापन करावी. भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. सत्ताधारी पक्षाचा एक नेताच या प्रकरणात सहभागी असताना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच चौकशीआधी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना क्लिन चिट दिल्याने राज्य सरकारचे अधिकारी निष्पक्ष तपास कसा करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

डॉ. संपदा मुंडे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर व पोलीसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. हे प्रकरण काँग्रेस पक्षाने गांभिर्याने घेतले आहे. देश पातळीवर आंदोलन केले जात असून भाजपा महायुती सरकारने या प्रकरणी न्यायामूर्तींचा सहभाग असलेली एसआयटी स्थापन केली नाही तर १० नोव्हेंबला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस वर्षा बंगल्याला घेराव घालून तीव्र आंदोलन करणार आहे. या आंदोलनातील राज्यभरातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व तरुण सहभागी होतील असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आज टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. युवक काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी मनिष शर्मा, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, प्रभारी अजय चिकारा, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सरचिटणीस प्रविणकुमार बिरादार यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

PSI प्रमोद चिंतामणीला 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : पिंपरी पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेतील पीएसआयवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सापळा कारवाईची देशपातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. सीबीआयच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची चौकशी केली आहे. त्यात पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याने तुम्ही दिलेल्या रक्कमेत आम्ही आमचे बघुन घेऊ. सीपी, डिसीपी यांना मॅनेज करु, असे म्हणाल्याने पिंपरी चिंचवड पोलीस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आले आहे. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायालयाने अधिक तपासासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला २ कोटी रुपयांची लाच मागून त्यातील पहिला हप्ता म्हणून ४६ लाख ५० हजार रुपये घेताना सापळा कारवाईत पकडण्यात आले.४ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या जामीन अर्जावर से देण्यासाठी अगोदर चिंतामणी याने २ लाख रुपयांची मागणी तक्रारदार यांच्याकडे पोलीस निरीक्षक संदिप सावंत यांच्या केबिनमध्ये केली. तसेच तक्रारदार वकील यांना संदिप सावंत व चिंतामणी यांनी त्यांच्या केबिनमध्ये अरेरावीची भाषा केली असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

चिंतामणी याने मला एक कोटी व साहेबांना १ कोटी रुपये द्या, अशी मागणी केली. वर साहेबांना हा विषय बोलू नका, असे म्हणाले. त्यानंतर अशिलाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी चिंतामणी हे तक्रारदार यांना ‘‘तुम्ही दिलेल्या रक्कमेत आम्ही आमच बघुन घेऊ, सीपी, डिसीपी यांना मॅनेज करु, असे म्हणाले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर चिंतामणी याचे तक्रारदार वकीलांच्या अशिलाशी बोलणे झाले. त्यानंतर चिंतामणी हे तक्रारदार ‘‘ त्याला उदया दोन कोटी पोहोचवायला लावा’’असे म्हणाले.

त्यानंतर चिंतामणी याने पोलीस निरीक्षक संदिप सावंत यांची भेट घडवून आणली तेव्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पंच समवेत होते . तेव्हा पोलीस निरीक्षक सावंत तक्रारदार यांना म्हणाले, फिर्यादीचे पैसे मिळत असतील तर ठिक आहे, किती दिवसात पाठवताय सांगा, असे म्हणाले. त्यावर तक्रारदार यांनी त्यांना तीन चार दिवसात असे म्हणाले, त्यानंतर त्यांच्यात अशिलाच्या जामीन अर्जावरील सुनावणीबाबत चर्चा झाली. त्यावेळी चिंतामणी यांनी सावंत यांना आपण म्हणल्याप्रमाणे मी त्यांना १ सीआरचे बोललो, की एक कराच तुम्ही, असे म्हणाले. त्यावर पोलीस निरीक्षक सावंत तक्रारदार यांना ‘‘म्हटल्याप्रमाणे प्रश्नच नाही, त्यावरती काही विश्वास नाही’’ असे बोलले. तक्रारदार व पंच यांच्याबरोबर बोलताना पोलीस निरीक्षक संदिप सावंत यांनी प्रत्यक्ष लाचेची मागणी केली नाही.

त्यानंतर तक्रारदार यांनी चिंतामणी याला अशिलाने ४५ लाख रुपयांची सोय केली आहे. माझ्याकडील दीड लाख रुपये असे ४६ लाख ५० हजार रुपये देतो, असे सांगितले. त्यानंतर दीड लाख रुपयांची रोकड आणि ४५ लाखांच्या बनावट नोटा असे ४६ लाख ५० हजार रुपयांचे बंडल तयार करण्यात आले. चिंतामणी याला रास्ता पेठेतील पुना कॅफेमध्ये वरील मजल्यावर बोलवले. ते तिथे आले व त्यांनी इथे नको, इथे कॅमेरे आहेत, असे म्हणाले. त्यानंतर तक्रारदार व पंच चालत उंटाड्या मारुती मंदिरासमोर पोहचले. तेथे चिंतामणी याने रिक्षा केली. रिक्षाच्या मागील बाजूला लाचेची रक्कम असलेली पिशवी ठेवली. चिंतामणी रिक्षामध्ये बसत असताना त्याने लाचेची रक्कम असलेली पिशवी एका हाताने उचलत असताना सापळा पथकाने त्याला ताब्यात घेतले.

या कारवाईत चिंतामणी याने पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांचे नाव घेतले. तसेच पोलीस निरीक्षक संदिप सावंत यांच्या केबिनमध्ये चर्चा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. एखादा पीएसआय इतकी मोठी लाच कशी मागू शकतो, असा प्रश्न उपस्थित करुन सीबीआयने या कारवाईची दखल घेतली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस दल रडारवर आले आहे.

जयपूरमध्ये डंपर ट्रकने 17 वाहनांना चिरडले, 13 ठार

जयपूर- एका भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर ट्रकने एकामागून एक १७ वाहनांना धडक दिली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. अनेकांचे हातपाय तुटले. रस्ता रक्ताने माखला होता. चालक मद्यधुंद अवस्थेत होता.अपघातात १० हून अधिक जण जखमी झाले आहेत. तिघांना गंभीर अवस्थेत एसएमएस हॉस्पिटल ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर करण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, हा अपघात सोमवारी दुपारी हरमारा येथील लोहा मंडी येथे झाला. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास डंपर महामार्गावर जाण्यासाठी रोड क्रमांक १४ वरून लोहा मंडी पेट्रोल पंपाकडे जात होता.या घटनेदरम्यान, तो वाहनांना धडकला. वाहतूक वळवण्यात आली आहे. घटनास्थळावरून डंपर हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.जवळच्या लोकांच्या मदतीने जखमींना एसएमएस हॉस्पिटल ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात येत आहे. दरम्यान, हॉस्पिटल व्यवस्थापनाने ट्रॉमा सेंटरमध्ये तयारी केली आहे. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफच्या टीमला सतर्क करण्यात आले आहे.अपघातादरम्यान अनेक लोकांचे कपडे फाटले होते. जवळच्या लोकांनी मृतदेह बाजूला हलवले. त्यानंतर ज्यांचे कपडे फाटले होते त्यांचे मृतदेह त्यांच्याकडे असलेल्या कपड्यांनी आणि रुमालाने झाकले.

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. ३- जिल्ह्यातील पदवीधर व मान्यताप्राप्त माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी मतदार नोंदणीसाठी येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीस निवडणूक उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर, तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.

जिल्ह्यातील एकही शासकीय अधिकारी वा कर्मचारी पदवीधर मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी तालुकास्तरावर मिशन मोडमध्ये नोंदणी मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यासाठी प्रांताधिकारी यांनी तात्काळ तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित नोंदणी पूर्ण करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

पदवीधर मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्ष, महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्था यांचे सहकार्य घेण्याचे निर्देश देत, शिक्षकांनाही पदवीधर मतदार म्हणून नोंदविण्यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची माहिती घेऊन नोंदणी करावी आणि एकही शिक्षक नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी सकाळी ६.०० वाजेपासून रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनीवर्धक वापरास परवानगी

पुणे, दि. ३ नोव्हेंबर : पुणे येथे होणाऱ्या ७१ व्या सवाई गंधर्व संगीत महोत्सव सन २०२५ या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी, त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) नुसार १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजेपासून रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. या कालावधीत ध्वनीची विहीत मर्यादा काटेकोरपणे पाळावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कात्रज- मंतरवाडी रोडवरील वाहतुकीत तात्पुरते बदल – मागविल्या नागरिकांच्या सूचना

पुणे, दि. ३ : पुणे शहरातील काळेपडळ वाहतूक विभागांतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या आदेशानुसार (क्र. एम.व्ही.ए. ०११६/८७१/सीआर ३७/ठीआरए २, दिनांक २७ सप्टेंबर १९९६) आणि मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१)(२)(बी), ११६(४) व ११७ अन्वये पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) हिंमत जाधव यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून कात्रज मंतरवाडी रोड व हांडेवाडी चौक परिसरात प्रायोगिक स्वरूपात खालीलप्रमाणे तात्पुरते वाहतुकीचे बदल लागू करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
काळेपडळ वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रात करण्यात आलेल्या या प्रायोगिक बदलांनुसार – श्रीराम चौक (जे.एस.पी.एम. कॉलेज) ते हांडेवाडी चौक मार्गावरून होळकरवाडी व कात्रजकडे जाणारी दुचाकी, चारचाकी व हलकी मोटार वाहने डावीकडे वळतील. कात्रजकडून येणाऱ्या वाहनांनी मंतरवाडीच्या दिशेने १०० मीटर पुढे जाऊन जोगेश्वरी मिसळ हॉटेलसमोरून उजवीकडे वळून ‘यू-टर्न’ घेऊन इच्छित स्थळी जाता येईल.
त्याच मार्गावरील जड व अवजड मोटार वाहनांनी मंतरवाडीच्या दिशेने २५० मीटर अंतरावर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरील हॉनेस्टी स्टील दुकानाजवळून उजवीकडे वळून ‘यू-टर्न’ घ्यावा.
होळकरवाडी व मंतरवाडी येथून येणारी दुचाकी व हलकी वाहने हांडेवाडी चौकातून कात्रजच्या दिशेने १०० मीटर पुढे जाऊन शिवेंद्र हॉटेलसमोरून उजवीकडे वळून ‘यू-टर्न’ घेऊन श्रीराम चौक, सय्यदनगर, हडपसर या दिशेने जाता येईल.
होळकरवाडी व मंतरवाडी येथून येणाऱ्या जड व अवजड वाहनांना कात्रजच्या दिशेने २५० मीटर पुढे जाऊन मयुरी वजनकाटा परिसरातून घृव शाळेसमोर उजवीकडे वळून ‘यू-टर्न’ घेऊन पुढे इच्छित स्थळी जाता येईल.
नागरिकांना कळविण्यात येते की, या तात्पुरत्या प्रायोगिक वाहतूक बदलांबाबत आपल्या सूचना व हरकती १६ नोव्हेंबर 2025 दरम्यान लेखी स्वरूपात पोलीस उपायुक्त (वाहतूक नियंत्रण शाखा), बंगला क्र. ६, एअरपोर्ट रोड, येरवडा पोस्ट ऑफिससमोर, पुणे येथे सादर करता येतील. प्राप्त सूचनांचा विचार करून अंतिम आदेश जाहीर करण्यात येतील. अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) यांना सूट देण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुकेश अंबानींच्या घशात घालण्याचा डाव

मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात द्या: राजेश शर्मा

६ नोव्हेंबरला अंधेरी विकास समिती तीव्र आंदोलन करणार.

मुंबई, दि. ३ नोव्हेंबर ..

अंधेरी येथील अद्ययावत सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे ही मुंबईकरांची मागणी आहे. हे हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानी यांना देण्याचा घाट घातला जात आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत या हॉस्पिटलचे खाजगीकरण करू नये. भाजपा महायुती सरकारने मुंबईकरांच्या मागणीची तत्काळ दखल घ्यावी, यासाठी ६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता हॉस्पिटलसमोर तीव्र आंदोलन करणार, असा इशारा अंधेरी विकास समितीने दिला आहे.

यासंदर्भात माहिती देताना मुंबईचे माजी उपमहापौर तथा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश शर्मा म्हणाले की, अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे यासाठी मागील काही महिन्यापासून प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीएमसी व संबंधित यंत्रणांकडे यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आहे परंतु मुख्यमंत्री वा कोणत्याही यंत्रणांकडून त्याला प्रतिसाद दिला जात नाही हे गंभीर आहे. भाजपा महायुती सरकारला मुंबईकांच्या आरोग्याची चिंता नाही त्यांना फक्त उद्योगपतींचे हित पहायचे आहे. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने सार्वजनिक गरजा लक्षात घेऊन सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या जागेत प्रगत वैद्यकीय संशोधन केंद्र आणि शिक्षणासह आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल म्हणून विकसित करण्याचा विचार करणे आवश्यक आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या आवारात शिल्लक असलेल्या जागेवर मेडीकल व नर्सिंग कॉलेज सुरु करता येउ शकते.

सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या जागेचा मुळ मालकी हक्क मुंबई महानगरपालिकेचा आहे. महानगरपालिकेने ही जागा सेव्हन हिल्स हॉस्पिटलला लीजवर दिलेली आहे. मुंबई महापालिकेने दुसऱ्या कोणत्याही खाजगी कंपनीच्या ताब्यात ती जागा जाऊ न देता स्वतः ताब्यात घेतली तर मुंबईमध्ये एक प्रशस्त, अत्याधुनिक, सर्व सोयीनियुक्त असे महत्वाचे आरोग्य केंद्र बनू शकते. अंधेरीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या हॉस्पिटलची बाजार भावानुसार ३००० ते ४००० कोटी रुपये किंमत आहे पण या जागेकडे व्यापारी दृष्टीकोनातून न पाहता मानवी दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यांच्या आरोग्य सेवांसाठी हे हॉस्पिटल एक मोठी संधी आहे, त्यासाठी सध्या असलेल्या सर्व सुविधांचा विचार करता मुंबई महानगरपालिकेने वेळ न घालवता हे हॉस्पिटल ताब्यात घेऊन मुंबईकरांना अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही राजेश शर्मा म्हणाले.

सुपरस्टार सलमान खान 6 डिसेंबरला हैदराबादमध्ये होणाऱ्या इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या दुसऱ्या फेरीला उपस्थित राहणार

      इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (आयएसआरएल) ने आपल्या हैदराबाद फेरीसाठी नवीन तारखांची घोषणा केली आहे — आता ही स्पर्धा 6 डिसेंबर 2025 रोजी जीएमसी बालयोगी अॅथलेटिक स्टेडियम, गाचीबोवली येथे होणार आहे.
      पहिल्यांदा 7 डिसेंबर रोजी आयोजित केलेला हा कार्यक्रम आठवड्याच्या सुट्टीच्या हिशोबाने प्रेक्षकांची अधिक चांगली उपस्थिती लाभावी यासाठी एका दिवसाने अलीकडे आणण्यात आला आहे.

पुणे, 3 नोव्हेंबर 2025: जगातील पहिली फ्रँचायझी-आधारित सुपरक्रॉस रेसिंग लीग असलेल्या इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (आयएसआरएल) ने आज आपल्या अत्यंत उत्सुकता लागून राहिलेल्या हैदराबाद फेरीसाठी वेळापत्रक बदलाची घोषणा केली. हा कार्यक्रम आता डिसेंबर 2025 रोजी सुप्रसिद्ध जीएमसी बालयोगी अॅथलेटिक स्टेडियम, गाचीबोवली येथे होईल.

या रोमांचक कार्यक्रमात अधिक रंग भरत आयएसआरएलचा ब्रँड अॅम्बेसेडर मेगास्टार सलमान खान स्वतः उपस्थित राहून संघांना प्रोत्साहन देईल आणि स्टँड मधल्या चाहत्यांशी, प्रेक्षकांशी संवाद साधेल.

पूर्णपणे क्शनने भरलेल्या रेस वीकेंडची सुरुवात 5 डिसेंबर रोजी राइझ मोटोज फॅन पार्कसह होईल. पुण्यात झालेल्या पहिल्या फेरीत याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. रोमांचक फॅन अनुभव मिळवून देताना लाईव्ह संगीत, गेमिंग आणि रेसिंग सिम्युलेटर, खाद्यपदार्थ व पेयांचे स्टॉल्स, टीम मर्चेंडाइज आणि इंटरअॅक्टिव्ह ब्रँड झोन यांची रेलचेल असणार आहे, तेलंगणामधील मोटरस्पोर्ट प्रेमी आणि कुटुंबांसाठी हा एक अविस्मरणीय उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या प्रवर्तकांनी तेलंगणा सरकार आणि तेलंगणा क्रीडा प्राधिकरणाचे सुपरक्रॉसचा खेळ या राज्यात आणणे शक्य करण्यासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य सहकार्य आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक आभार मानले आहेत. आयएसआरएल तेलंगणा रायझिंग 2047 या दृष्टीकोनाप्रती योगदान देऊन  नाविन्यपूर्णता, युवकांचा सहभाग आणि क्रीडा उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहे.

आयएसआरएलचे ब्रँड अॅम्बेसेडर सलमान खान म्हणाले: “हैदराबाद रेसचा भाग होण्यासाठी आणि चाहत्यांची व रायडर्सची अतुलनीय ऊर्जा अनुभवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग भारतातील मोटरस्पोर्टसाठी नवा मापदंड निर्माण करत असून हे वेगवान, थरारक आणि उत्कटतेने भरलेले आहे.”

आयएसआरएलचे व्यवस्थापकीय संचालक वीर पटेल म्हणाले: “हैदराबाद फेरी 6 डिसेंबरला अलिकडे आणल्याने आम्हाला चाहत्यांसाठी आणखी शानदार शनिवारी-रात्रीचा अनुभव देण्याची संधी मिळत आहे. सलमान खानच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे हा कार्यक्रम भारतातील मोटरस्पोर्टसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. आम्ही एका छताखाली जागतिक दर्जाचे रेसिंग, मनोरंजन आणि मोटरस्पोर्टप्रेमी समुदाय एकत्र आणण्यास उत्सुक आहोत.तेलंगणा रायझिंग २०४७ या उपक्रमांतर्गत नवोपक्रम, युवकांचा सहभाग आणि क्रीडा उत्कृष्टतेबद्दल तेलंगणा सरकारचे दृष्टीकोन आम्हाला प्रेरणा देतात. सुपरक्रॉस हा खेळ राज्यात आणण्यासाठी दिलेल्या त्यांच्या अमूल्य सहकार्याबद्दल आम्ही तेलंगणा सरकार आणि तेलंगणा क्रीडा प्राधिकरणाचे मनःपूर्वक आभार मानतो.”

पुण्यातील पहिल्या फेरीत चाहत्यांनी मुसळधार पावसातही हजेरी लावून आपल्या आवडत्या रायडर्सना प्रोत्साहन दिले होते. भारतातील मोटरस्पोर्टची आवड पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे हे आयएसआरएलने त्या कार्यक्रमातून सिद्ध केले. त्या यशावर आधारित, आयएसआरएल जागतिक दर्जाचे रेसिंग, मनोरंजन आणि युवकांचा सहभाग एकाच मंचावर आणत भारतातील मोटरस्पोर्टमध्ये क्रांती घडवत आहे.

हैदराबाद फेरीनंतर, आयएसआरएल सीझन 2ची ग्रँड फिनाले (तिसरी फेरी) 21 डिसेंबर 2025 रोजी केरळ येथील कालिकत मधील ईएमएस कॉर्पोरेशन स्टेडियमवर होणार आहे. त्यातून भारतातील सर्वात मोठ्या मोटरस्पोर्ट सीझनची शानदार सांगता होईल.

हैदराबाद आणि केरळमध्ये हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीची अपेक्षा असून आयएसआरएल स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यास आणि रेसिंग प्रेमींच्या नव्या पिढीला प्रेरित करण्यास वचनबद्ध आहे.

चाहते आपली तिकिटे बुक माय शो वरून खास बुक करू शकतात. तिथे ॲप आणि वेबसाईटवर सर्वसाधारण जनरल आसनांपासून ते व्हीआयपी पासपर्यंत विविध पर्याय उपलब्ध असतील. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी, हैदराबाद फेरी युरोस्पोर्टवर भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीवमध्ये तसेच Rev TV वर कॅनडामध्ये प्रसारित केली जाईल. हा कार्यक्रम फॅनकोड (इंडिया) आणि आयएसआरएलच्या यूट्युब चॅनेलवर जागतिक स्तरावर थेट प्रसारित केला जाईल.

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा ८वा दीक्षांत समारंभ शनिवारी: ३३३४ विद्यार्थ्यांना होणार पदवी प्रदान

पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), विश्वराजबाग, पुणे या विद्यापीठाचा ८वा दीक्षांत समारंभ  शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. यंदाचा समारंभ राजस्थानचे राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली, स्वामी विवेकानंद मंडप, विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे संपन्न होणार आहे.
यंदा एकूण ३३३४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मंडी, हिमाचल प्रदेशचे संचालक प्रा. डॉ. लक्ष्मीधर बेहरा यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच, एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून भारत सरकारच्या तंत्रज्ञान, नवोन्मेष, उष्मायन व उद्यमशीलता क्षेत्रातील राष्ट्रीय तज्ज्ञ सल्लागार परिषदेचे अध्यक्ष श्री. रामानन रामनाथन यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (D.Sc.) ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. तर ‘ग्लास मॅन ऑफ इंडिया’ म्हणून परिचित आणि गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्रीजचे चेअरमन श्री. सुभाष त्यागी यांना औद्योगिक नेतृत्वाबद्दल ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ (D.Litt.) या मानद पदवीने सन्मानित केले जाणार आहे.

एमआयटी एडीटी विद्यापीठाची २०१५ साली स्थापना झाल्यापासूनची प्रगती उल्लेखनीय आहे. यंदाच्या दीक्षांत समारंभात २१ विद्यार्थ्यांना पीएच.डी., २१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, तर १९५ विद्यार्थ्यांना रँक होल्डर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी पालक, विद्यार्थी आणि निमंत्रितांसह सुमारे ८ हजारांहून अधिक उपस्थिती अपेक्षित आहे.

आजपर्यंतच्या सात दीक्षांत समारंभांत, माजी राज्यपाल व विद्यमान उपराष्ट्रपती मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन, मा. श्री. नितीनजी गडकरी, श्री. विनोदजी तावडे, इस्त्रोचे माजी चेअरमन पद्मविभूषण डॉ. जी. माधवन नायर, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, डीआरडीओचे माजी चेअरमन डॉ. जी. सतीश रेड्डी, इस्त्रोचे विद्यमान चेअरमन डॉ. एस. सोमनाथ आदी मान्यवरांनी हजेरी लावली आहे.
“यंदा राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे यांचे उपस्थितीमुळे विद्यापीठात उत्साहाचे वातावरण आहे,” अशी माहिती कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

“यंदा दीक्षांत समारंभात २१ पीएच.डी., २१ सुवर्णपदकांसह एकूण ३३३४ विद्यार्थ्यांना एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे, प्रा. डॉ. लक्ष्मीधर बेहरा, श्री. रामानन रामनाथन आणि श्री. सुभाष त्यागी प्रथमच विद्यापीठात येत असल्याने, विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोचली आहे.”
– प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी अध्यक्ष तथा प्र-कुलपती,
एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे.

ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द:महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलची मोठी कारवाई

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने सोमवारी सुप्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांची वकिलीची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करून त्यांना जोरदार झटका दिला. असीम सरोदे हे सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत. पण आता त्यांची सनद रद्द झाल्यामुळे त्यांना या प्रकरणात कोणताही युक्तिवाद करता येणार नाही.असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल व विधानसभा अध्यक्ष यांच्याविषयी काही आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यांच्या या विधानांमुळे न्याय व्यवस्थेचा अवमान झाला असून, न्यायालयांविषयी अविश्वास निर्माण झाला आहे, अशी तक्रार एका व्यक्तीने बार कौन्सिलकडे केली होती. या प्रकरणी असीम सरोदे यांना 19 मार्च 2024 पर्यंत लेखी माफी मागण्याची संधी देण्यात आली. पण त्यांनी माफी मागण्यास ठाम नकार दिला. त्यामुळे आता बार कौन्सिलने या तक्रारीवर कारवाई करत त्यांची वकिलीची सनद 3 महिन्यांसाठी रद्दबातल केली आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी वकील विवेकानंद घाटगे यांच्या नेतृत्वात एक समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने असीम सरोदे यांच्या भाषणाचे ट्रान्सक्रिप्ट व व्हिडिओ क्लिप पाहिल्या. त्यात असीम सरोदे स्पष्टपणे म्हणताना दिसून येत आहेत की, ‘राज्यपाल फालतू आहेत’ व ‘न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे’. अशा विधानांमुळे जनतेमध्ये न्यायालयाविषयी अविश्वास निर्माण होतो. न्यायव्यवस्था व घटनात्मक पदांविषयी आदर राखणे वकिलाची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे. वकील हे ‘न्यायालयाचे अधिकारी’ (ऑफिसर ऑफ द कोर्ट) असतात. त्यामुळे त्यांनी न्यायसंस्थेविषयी संयम व सन्मान राखला पाहिजे, असे बार कौन्सिलच्या समितीने म्हटले आहे.

असीम सरोदे यांनी या प्रकरणी आपण कोणत्याही न्यायालय किंवा घटनात्मक पदाचा अपमान केला नसल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते, मी कोणत्याही प्रकारे न्यायालयाचा किंवा घटनात्मक पदाचा अवमान केला नाही. माझे विधान हे लोकशाहीतील रचनात्मक टीका होती. मी फालतू हा शब्द अपमानार्थ नव्हे, तर सर्वसामान्य भाषेत वापरला. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. माझा हेतू न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्याचा नव्हता, तर लोकांना जागरूक करण्याचा होता.

असीम सरोदे हे एक नामवंत वकील आहेत. त्यांचा भारतीय संविधान व कायद्याचा अभ्यास दांडगा आहे. ते सातत्याने राज्यासह देशभरातील विविध सामाजिक व राजकीय मुद्यावर आपले परखड मत मांडत असतात. मानवी हक्कांवरही त्यांचा सखोल अभ्यास आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण बार असोसिएशनचे ते पुण्याचे अध्यक्ष आहेत. ते सध्या शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत आपली बाजू मांडत आहेत. एवढेच नाही तर संसदेत घुसखोरी करून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडणाऱ्या घटनेतील आरोपी असणाऱ्या अमोल शिंदे नामक तरुणालाही ते कायदेशीर मदत पुरवत आहेत.

आदित्य बिर्ला कॅपिटलच्या दुसऱ्या तिमाहीच्या नफ्यात 3% ची वाढ, 855 कोटी रुपयांचा नफा

मुंबई, 3 नोव्हेंबर 2025: सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत आदित्य बिर्ला कॅपिटलच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 3 टक्क्यांची वाढ होऊन तो 855 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

आदित्य बिर्ला ग्रुपच्या या वित्तीय सेवा शाखेने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 834 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

आदित्य बिर्ला कॅपिटलने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, पुनरावलोकनाधीन तिमाहीत एकूण उत्पन्न वाढून 10,609 कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या वर्षी 10,362 कोटी रुपये होते.

व्याजातून मिळालेले उत्पन्न हे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 4,141 कोटी रुपयांवरून 5,003 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर एकूण खर्चही 9,034 कोटी रुपयांवरून 9,475 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

एकूण मालमत्ता व्यवस्थापन (एएमसी, जीवन विमा आणि आरोग्य विमा) 30 सप्टेंबर 2025 रोजी 10 टक्क्यांनी वाढून 5,50,240 कोटी रुपयांवर पोहोचले आहे जे गेल्या वर्षीच्या याच काळात 5,01,152 कोटी रुपये एवढे होते.

समायोजित PAT बद्दल सविस्तर माहितीसाठी, कृपया खाली दिलेली टीप पहा:

आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाहीत करपश्चात एकत्रित नफा 1,001 कोटी रुपये होता. कंपनीने आदित्य बिर्ला इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेड (“ABIBL”) मधील तिचा संपूर्ण 50.002% हिस्सा 30 ऑगस्ट 2024 रोजी समारा कॅपिटल ग्रुपचा भाग आणि समारा अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंडची संलग्न कंपनी एडमी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला विकला होता. यातून कंपनीला 202.90 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे (कराचा निव्वळ नफा 166.88 कोटी रुपये आहे). 30 ऑगस्ट 2024 पासून ABIBL ने कंपनीची उपकंपनी म्हणून काम थांबवले आहे. एका वेळचा एकत्रित नफा वगळता करपश्चात नफा आर्थिक वर्ष 25च्या दुसऱ्या तिमाहीत 834कोटी रुपये होता