“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे राऊतांचे आवाहन”
पुणे, दि. 29 – शिवसेना ही केवळ सत्तेवर अवलंबून नसून तिची खरी ताकद संघटनात आहे, त्यामुळे पक्ष पराभूत होत नाही आणि पुन्हा सत्तेत येण्याची क्षमता राखतो, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
पुण्यातील बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना तळागाळात काम मजबूत करण्याचे आवाहन केले तसेच लवकरच शिवसेना पुणे शहरात पक्षीय स्तरावर बदल करण्याचे भाकीत देखील केले.महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष सोडून गेलेल्या बहुतांश नगरसेवकांचा पराभव झाल्याचा उल्लेख करत, “मिसिंग लिंक” शोधून जनतेशी पुन्हा नाळ जोडण्यावर त्यांनी भर दिला. येत्या काळात निवडणुका नसल्याने संघटन विस्तारासाठी ही संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.सचिन अहिर यांनी पुण्यातील निवडणुकीत पॅनेल पद्धतीचा फटका आपल्याला बसल्याचे मान्य करत, कार्यकर्त्यांनी जिद्दीने काम करण्याचे आवाहन केले. तर वसंत मोरे यांनी मतांची घट असूनही मिळालेला पाठिंबा सकारात्मक असल्याचे सांगितले.
शहरप्रमुख संजय मोरे यांनी पक्ष वाढीसाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशील आहोत आणि नव्या जोमाने कामाला लागू असे सांगितले.दरम्यान, पश्चिम बंगाल संदर्भात बोलताना राऊत यांनी भाजपवर टीका करत तृणमूल काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीचा उल्लेख केला आणि तेथे भाजपला पराभवाचा सामना करावा लागेल, असा दावा केला.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख सचिन अहिर, माजी आमदार महादेव बाबर, राज्य संघटक वसंत मोरे , शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, आणि युवासेना पदाधिकारी तसेच प्रमुख शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत
विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!
मेट्रो-३ च्या कामासाठी ‘पीएमआरडीए’ ‘ॲक्शन मोड’मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून ‘ग्राउंड झिरो’वर पाहणी!
पुणे : पुणेकरांचा प्रवास सुखकर करणाऱ्या आणि आयटी हबला शहराशी जोडणाऱ्या माण-हिंजवडी-शिवाजीनगर या ‘मेट्रो मार्ग-३’ प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी ‘पीएमआरडीए’ प्रशासन आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. या प्रकल्पातील तांत्रिक अडथळे दूर करून काम वेळेत पूर्ण करण्याच्या उद्देशाने ‘पीएमआरडीए’च्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी विविध ठिकाणांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामाचा आढावा घेतला.
‘पीएमआरडीए’द्वारे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाच्या ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ (PITCMRL) सोबत हा प्रकल्प राबविला जात आहे. मंगळवारी झालेल्या या पाहणी दौऱ्यात कामाची गुणवत्ता आणि प्रगतीवर विशेष भर देण्यात आला. पाहणीदरम्यान विद्यापीठ चौकातील पाषाण रॅम्पजवळ महापालिकेच्या जलवाहिनीतून मोठी पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. या गळतीमुळे मेट्रोच्या कामात अडथळा येत असल्याने अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही गळती तातडीने थांबविण्याच्या सूचना दिल्या.
तसेच, ‘पीएआर २१’ येथील पाहणीदरम्यान मेट्रोच्या जिन्यासाठी आवश्यक असलेली जागा मोकळी करण्याचे आदेशही देण्यात आले. यामुळे या भागातील जिन्याचे प्रलंबित काम मार्गी लागणार आहे. बाणेर येथील ‘पीएआर १५’ ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रो जिन्याच्या कामाचीही यावेळी पाहणी करण्यात आली. केवळ वेगच नव्हे, तर कामाची गुणवत्ताही आंतरराष्ट्रीय दर्जाची असावी, असे निर्देश के. मंजुलक्ष्मी यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात पीएमआरडीएचे अधीक्षक अभियंता योगेश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता उमेश मल्लावत, कनिष्ठ अभियंता सुमीत यादव, गजानन पाटील यांच्यासह पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि अभियंते उपस्थित होते.
“प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी तांत्रिक अडथळे दूर करण्याला आमचे प्राधान्य आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून लवकरात लवकर दिलासा मिळावा, यासाठी ‘पीएमआरडीए’ प्रशासन प्रयत्नशील आहे.”
— के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त महानगर आयुक्त, पीएमआरडीए.
‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या
पुणे-पुणे पोलिसांनी ‘फुलचंद पानात’ नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर मादक बंट्याच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून 3 लाख 38 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे अमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, पोलीस नाईक सचिन जाधव यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. शिवाजीनगर येथील दीनदयाळ हॉस्पिटलजवळील एका निर्जन रस्त्यावर एक संशयास्पद टेम्पो उभा असल्याची माहिती होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पथकाने टेम्पोची तपासणी केली असता, त्याच्या मागील दरवाजाच्या आतमध्ये प्रतिबंधित आणि बेकायदेशीर मादक गोळ्यांची पाकिटे असलेली पोती आढळून आली. पोलिसांनी तात्काळ हा टेम्पो आणि त्यातील सर्व मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलिसांनी विष्णू रामरतन गुप्ता (वय 34, रा. पिंपरी-चिंचवड, पुणे) याला अटक केली आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, जप्त केलेल्या या मादक गोळ्यांचा वापर पुण्यातील ‘फुलचंद पानात’ नशा करण्यासाठी केला जात होता. पोलीस या प्रकरणातील पुढील तपास करत असून, यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सपोनि संतोष पाटील, पोलीस नाईक सचिन जाधव, महावीर वलटे, राजकिरण पवार, इसाक पठाण, दीपक रोमाडे आणि श्रीकांत मखरे यांचा या पथकात समावेश होता.
या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर वचक निर्माण झाला आहे. पान टपरीवर होणाऱ्या अशा बेकायदेशीर कृत्यांवर आता पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे सांगण्यात आले.
नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार
नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार
मुंबई/पुणे , २९ एप्रिल (खंडूराज गायकवाड) : राज्य सरकारने राज्यभरात ६० खासगी स्टॅम्प ड्युटी व दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. घर, जमीन खरेदी-विक्रीसंबंधी दस्तऐवजांची नोंदणी आता महसूल विभागाने नियुक्त केलेल्या खासगी संस्थेमार्फत केली जाणार आहे. मात्र, या सेवेसाठी नागरिकांना सुमारे ५,२०० रुपये अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे.
अधिक सुविधा व सुधारित वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महसूल विभागाने हा निर्णय घेतला आहे. पासपोर्ट नोंदणी कार्यालयांच्या धर्तीवर हा उपक्रम राबविण्यात येत असून, राज्यातील सध्याच्या ५१७ सरकारी नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयांच्या व्यवस्थेत टप्प्याटप्प्याने बदल करण्याचे संकेत या निर्णयातून मिळत आहेत.
महसूल विभागाने व्हीएफएस ग्लोबल सर्व्हिस कंपनी VFS Global Services या खासगी कंपनीला राज्यभर ही कार्यालये उभारणे व चालविण्याची जबाबदारी दिली आहे. या कार्यालयांमध्ये अधिक सुविधा, आधुनिक सोयी व सुटसुटीत व्यवस्था उपलब्ध होणार असून, प्रति नोंदणी सुमारे ५,२१८ रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
पहिल्या टप्प्यात ३० केंद्रे सुरू करण्यात येणार असून, ती मुंबई , ठाणे , पुणे , नागपूर आणि नाशिक या शहरांत उघडण्यात येतील.
महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “काही उपनिबंधक कार्यालयांची अवस्था अत्यंत खराब आहे. बसण्यासाठी जागा, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी तसेच योग्य प्रतीक्षागृह यांचा अभाव आहे. अनेक कार्यालये वातानुकूलितही नाहीत. मोठ्या शहरांतील घरखरेदीदार व कॉर्पोरेट क्षेत्रातील नागरिकांना सुसज्ज, सुविधायुक्त कार्यालयांची अपेक्षा असते. ही गरज लक्षात घेऊन खासगी कार्यालयांचा निर्णय घेण्यात आला आहे.”
या नव्या केंद्रांमध्ये वातानुकूलित प्रतीक्षागृह, कॅफेटेरिया, वाय-फाय, पार्किंग, दूरदर्शन सुविधा, स्वच्छ शौचालये आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने सर्वात कमी दराची निविदा सादर केल्यामुळे संबंधित कंपनीला मंजुरी दिली आहे. या खासगी कार्यालयांमध्ये सरकारी नियंत्रण कायम ठेवण्यासाठी उपनिबंधक व महसूल विभागातील कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.
राज्यात सध्या ५१७ सरकारी नोंदणी कार्यालये कार्यरत आहेत. त्यांच्या दुरवस्थेबाबत तक्रारी आल्यानंतर सरकारने १०० कार्यालयांच्या नूतनीकरणासाठी प्रत्येकी १० लाख रुपये मंजूर केले होते. मुंबईतील काही कार्यालयांचे नूतनीकरण बिल्डर्स व दानशूर संस्थांच्या मदतीने करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्याच्या यशावर दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ३० खासगी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय अवलंबून असेल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
निविदेच्या अटींनुसार कार्यालयांचा आकार, सुविधा, कर्मचारी संख्या व किमान मनुष्यबळ याबाबत स्पष्ट निकष ठरविण्यात आले आहेत. तसेच, ठराविक संख्येपेक्षा जास्त दस्तनोंदणी झाल्यास नफ्यातील वाटाही खासगी संस्थेला देण्याची अटही समाविष्ट करण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय
आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट; भक्तांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
मुंबई/पुणे (दि. २९): संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी येण्याची वर्षानुवर्षांची परंपरा आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची वाढती संख्या आणि उपलब्ध सुविधा लक्षात घेता मुक्कामाचे ठिकाण बदलण्याचा विचार सुरू पालखी सोहळा प्रमुखांकडून सुरू असल्याने स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, भवानी पेठेतील मुक्कामाची परंपरा कायम ठेवण्याची विनंती केली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा लाखो वारकरी आणि भक्तांच्या श्रद्धेचा उत्सव आहे. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी येण्याची ही परंपरा पुणेकरांसाठी अत्यंत भावनिक आणि महत्त्वाची आहे. त्यामुळे ही परंपरा अखंड सुरू राहावी, अशी मागणी आमदार रासने यांनी केली. यावेळी उपस्थित असणाऱ्या आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनीही आपले मत मांडले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन व संबंधितांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरच भवानी पेठेतील मुक्कामाबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकतो.
याबाबत बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले :
“संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, लाखो भाविकांच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. भवानी पेठेतील मुक्कामाची परंपरा ही पुणेकरांच्या भावनांशी घट्ट जोडलेली आहे. पालखी सोहळ्याच्या नियोजनात कोणत्याही भाविकांना अडचण येऊ नये, यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. सर्व संबंधितांशी समन्वय साधून परंपरा अबाधित ठेवत सोहळा अधिक सुयोग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
तीन अमेरिकन नागरिकांवर पुणे पोलिसांकडून कारवाई
पुणे -पर्यटक व्हिसावर भारतात येऊन कायद्याचे उल्लंघन करत ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणाऱ्या तीन अमेरिकन नागरिकांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. “ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे,” असे सांगत पत्रके वाटणाऱ्या या तिघांनाही येत्या १० मे २०२६ पर्यंत भारत सोडून जाण्याचे अधिकृत आदेश देण्यात आले आहेत. इमिग्रेशन आणि फॉरेनर्स ॲक्टनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ५३, ६५ आणि ६६ वर्षे वयोगटातील हे तीन अमेरिकन नागरिक १९ ते २१ एप्रिल दरम्यान पर्यटक व्हिसावर भारतात आले होते. २६ एप्रिलपासून ते पिंपरी-चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये मुक्कासाला होते. २७ एप्रिल रोजी सकाळी हे तिघे पुण्याच्या शुक्रवार पेठ भागात फिरत असताना, त्यांनी एका खाजगी कॅब ड्रायव्हरला थांबवून त्याच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्याला बायबल आणि ख्रिश्चन धर्माशी संबंधित इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील पत्रके देऊन धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न केला.
यासंबंधीचे वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे. संबंधित कॅब चालकाने या प्रकाराची माहिती परिसरात रॅलीच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिली. पोलिसांनी तातडीने या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात धार्मिक पत्रके आढळून आली. पुणे शहर पोलिसांच्या परदेशी नोंदणी कार्यालयाने (FRO) केलेल्या चौकशीत हे तिघेही पर्यटक व्हिसावर आले असताना धार्मिक प्रचार करत असल्याचे निष्पन्न झाले, जे भारतीय कायद्यानुसार बेकायदेशीर आहे.
परदेशी नोंदणी कार्यालयाचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले की, “व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या तिघांना ‘लीव्ह इंडिया नोटीस’ देण्यात आली आहे. त्यांना १० मे २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत.” तपासात असेही समोर आले की, यापूर्वीही हे नागरिक कधी टुरिस्ट तर कधी बिझनेस व्हिसावर भारतात आले होते, मात्र त्यांचा मुख्य उद्देश धर्मप्रसार हाच असल्याचे दिसून आले आहे.पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी जुलै २०२५ मध्येही पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका ४१ वर्षीय अमेरिकन नागरिकाला अटक केली होती. तो २०१६ पासून सातत्याने भारतात येत होता आणि आर्थिक मदतीचे आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न करत होता.
६० लाखाचा विमल गुटखा खेड शिवापुर टोल नाक्यावर पकडला
पुणे- पुणे पोलिसांनी माग काढून खेड शिवापुर टोल नाक्यावर आलेला एक ट्रक पकडून त्यातील ६० लाखाचा विमल गुटखा पकडला
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक २८/०४/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे आंबेगाव परिसरात गस्त करीत असताना पोलीस अंमलदार अमोल सरडे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे अभिलेखावरील सराईत आरोपीचा मोठ्या प्रमाणात भरलेला प्रतिबंधीत गुटख्याचा ट्रक नं. एम.एच.११ डी.डी.-६५२७ कात्रज घाटमार्गे पुणे येथे येणार आहे.
सदर बातमीचे अनुषंगाने वरिष्ठांचे परवानगीने दिनांक २८/०४/२०२६ रोजी रात्रौ ००.३० वा. पासून कात्रज घाट येथे सापळा रचला परंतु बराच वेळ होवून गेला तरी सदरचा ट्रक कात्रज घाटातून न आल्याने त्याबाबत अधिक माहीती घेतली असता सदरचा गुटख्याने भरलेला ट्रक हा खेड शिवापुर टोल नाका येथे थांबल्याची खात्री झाली. सदरबाबत वरिष्ठांना माहीती देवून त्यांच्या परवागीने राजगड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथील पोलीस मदत घेवून खेड शिवापुर टोल नाका येथे उभा असलेल्या ट्रक क्र. एम.एच.११ डी.डी.-६५२७ वरील चालक श्रीशैल तम्माराय हाळके, वय ३२ वर्ष रा. मु.पो उमदी, ता. जत, जि. सांगली यास ताब्यात घेतले.
सदर ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला विमल गुटखा मिळून आला असून सदरचा गुटखा हा पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे अभिलेखावरील दोन आरोपीतांनी पुणे शहरात विक्रीसाठी मागवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
या बाबत राजगड पोलीस ठाणे पुणे ग्रामीण येथे गु.र.नं. १६६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५, सह सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम कलम ७ (२) व २० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६, चे कलम २६ (२) (i) (iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर (अति कार्यभार गुन्हे) विवेक मासाळ, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे ३ शंकर खटके यांचे मार्गदर्शनखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांचे सुचनांप्रमाणे सहा. पो.निरी. अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार, विठ्ठल साळुंखे, संजय राजे, अमोल सरडे, निलेश जाधव, विशाल भिलारे, मंगेश गुंड व अक्षय शिर्के तसेच महिला पोलीस अंमलदार आशा भिंगारे तसेच राजगड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीणकडील पथकाने केली आहे.
5,000रु. पर्यंतच्या यूपीआय व्यवहारांसाठी फिंगरप्रिंट किंवा चेहरा ओळखीद्वारे पेमेंट प्रमाणीकरणाची सुविधा सुरू
मुंबई: आयसीआयसीआय बँक ने iMobile या बँकेच्या मोबाईल बँकिंग सुविधेद्वारे यूपीआय व्यवहारांसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची अंमलबजावणी जाहीर केली आहे. या सुविधेमुळे 5,000 रु. पर्यंतचे व्यवहार चेहरा ओळख किंवा फिंगरप्रिंट प्रमाणीकरणाद्वारे अधिकृत करू शकत असल्यामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक सुधारतो. या नवीन सुविधेमुळे या मर्यादेपर्यंतच्या व्यवहारांसाठी यूपीआय PIN मॅन्युअली टाकण्याची गरज राहत नाही.
बायोमेट्रिक्स सादर होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी ‘शोल्डर-सर्फिंग’चा धोका कमी होतो आणि जलद पेमेंट्स आणि सुरक्षितता असे दुहेरी फायदे मिळतात. ग्राहक पिअर टू पिअर पैसे हस्तांतरण, दुकानातील पेमेंटसाठी QR स्कॅन करणे किंवा ऑनलाइन पेमेंट्स अशा यूपीआय व्यवहारांना त्यांच्या बायोमेट्रिक्सद्वारे अधिकृत करू शकतात. 5,000 रु. पेक्षा जास्तीच्या व्यवहारांसाठी ग्राहकांना पेमेंट अधिकृत करण्यासाठी त्यांचा सध्या वापरत असलेला यूपीआय PIN आवश्यक असेल.
आयसीआयसीआय बँकेचे प्रवक्ते म्हणाले, “आमच्या ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हे नेहमीच आमच्या कामकाजाच्या केंद्रस्थानी राहिले आहे आणि आमच्या ग्राहकांना प्रगत डिजिटल उपायसुविधा पुरविण्यावर आमचा विश्वास आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरण सादर करणे हे सध्याच्या नियामक मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत आहे आणि अधिक सुरक्षित व अखंड पेमेंट अनुभव सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. iMobile वर डिव्हाइस-स्तरीय बायोमेट्रिक पडताळणीचा उपयोग करून सुलभ वापर सुनिश्चित करत आम्ही व्यवहारांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार आणि सोयीप्रमाणे PIN-आधारित आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण यापैकी निवड करण्याची लवचिकताही उपलब्ध आहे.”
ही सुविधा Android – v30 आणि IOS – v28.2 या iMobile अॅपच्या अत्याधुनिक व्हर्जन्सवर उपलब्ध आहे. Android वापरकर्ते फिंगरप्रिंटद्वारे व्यवहार अधिकृत करू शकतात तर IOS वापरकर्ते फेस रेकग्निशन म्हणजेच चेहरा ओळखीद्वारे हे करू शकतात.
iMobile वापरकर्ते काही सोप्या कृतीद्वारे बायोमेट्रिक ऑथेंटिकेटर सहज सक्रिय करू शकतात:
· iMobile अॅपमध्ये लॉग इन करा
· UPI पेमेंट्सवर क्लिक करा आणि UPI सेटिंग्स निवडा
· बायोमेट्रिक सक्षम करण्यासाठी खाते क्रमांक निवडा
· ‘Use biometric for payments’ निवडा आणि ‘proceed’ वर क्लिक करा
· पडताळणीसाठी आपला UPI PIN टाईप करा
· डिव्हाइस-स्तरीय बायोमेट्रिक डेटा प्रमाणीकरण करा
सह्याद्री हॉस्पिटलचा न्यूरोसर्जरीत जागतिक विक्रम:5 वर्षांत 750 हून अधिक ‘एमव्हीडी’ शस्त्रक्रिया यशस्वी
पुणे- सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने न्यूरोसर्जरी (मेंदू शस्त्रक्रिया) क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गेल्या पाच वर्षांत हॉस्पिटलने ७५० हून अधिक मायक्रोव्हॅस्कुलर डिकंप्रेशन (एमव्हीडी) शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. या विक्रमी कामगिरीमुळे शेकडो रुग्णांना तीव्र वेदनांपासून मुक्ती मिळाली असून, पुणे न्यूरोसर्जरीचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे.या ऐतिहासिक यशाची माहिती ज्येष्ठ न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. पंचवाघ आणि त्यांच्या पथकाने गेल्या २२ वर्षांत एकूण २७०० हून अधिक एमव्हीडी शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत.
एमव्हीडी शस्त्रक्रिया ट्रायजेमिनल न्यूराल्जिया (चेहऱ्याच्या तीव्र वेदना), ग्लोसोफॅरिजियल न्यूराल्जिया आणि हेमिफेशियल स्पॅझम (चेहऱ्याचे स्नायू थरथरणे) यांसारख्या मेंदू व मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर आजारांवर प्रभावी मानली जाते. सह्याद्री हॉस्पिटलमधील या शस्त्रक्रियांचे वार्षिक प्रमाण आंतरराष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. येथे प्रत्येक रुग्णाच्या शारीरिक स्थितीनुसार वैयक्तिक उपचार पद्धती आखली जाते.
पत्रकार परिषदेत डॉ. पंचवाघ यांनी सांगितले की, अनेक रुग्ण औषधांवर अवलंबून वर्षानुवर्षे वेदना सहन करतात. औषधांनी उपचार न झाल्यास शस्त्रक्रिया हा उत्तम पर्याय असतो, परंतु माहितीच्या अभावामुळे योग्य उपचारात विलंब होतो. अचूक निदान, तज्ज्ञांचा सल्ला आणि वेळेवर घेतलेला निर्णय हेच उपचारांच्या यशाचे गमक आहे.
डॉक्टरांनी काही विशेष प्रकरणांची माहिती दिली, ज्यात अत्यंत जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. एका रुग्णाच्या मानेच्या वरच्या भागातील संवेदनशील मज्जातंतूजवळची गाठ यशस्वीपणे काढण्यात आली. दुसऱ्या एका प्रकरणात, मेंदूतील मोठी गाठ काढताना मेंदूच्या महत्त्वाच्या कार्यांना कोणताही धक्का न लावता शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर काही आठवड्यांतच हा रुग्ण दैनंदिन जीवनात परतला आणि त्याने तेलचित्रे काढण्यासही सुरुवात केली.
दिल्ली हायकोर्टात व्हर्च्युअल सुनावणीत अश्लील व्हिडिओ हॅकर्स ने चालविला, गाणीही वाजली, मुख्य न्यायमूर्तींनी सुनावणी थांबवली
नवी दिल्ली-
दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान अश्लील व्हिडिओ सुरू झाला. त्यावेळी मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस खरिया यांचे खंडपीठ सुनावणी करत होते. ही घटना दुपारी १२:५६ वाजताची आहे.घटनेच्या वेळी खंडपीठ कोणत्या प्रकरणाची सुनावणी करत होते, हे स्पष्ट झाले नाही. पॉर्न व्हिडिओ सुरू होताच, तात्काळ सुनावणी थांबवण्यात आली. काही मिनिटांनंतर सुनावणी पुन्हा सुरू झाली, पुन्हा पॉर्न व्हिडिओ सुरू झाला. या प्रकरणाची तक्रार दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटकडे करण्यात आली आहे.
व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान अनेक लोक जोडले गेले होते. त्यापैकी एक क्षितिजीत सिंग होते. सुरुवातीच्या चौकशीत क्षितिजीतने दावा केला की त्याचे खाते अमेरिकेतून हॅक करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान तो अश्लील व्हिडिओ कसा चालला याची त्यांना कोणतीही माहिती नाही.
बुधवारी सुनावणीदरम्यान व्हिडिओ सुरू झाल्यानंतर ‘तुमची प्रणाली हॅक झाली आहे’ असा संदेशही स्क्रीनवर दिसला. दोनदा पॉर्न व्हिडिओ चालला आणि तिसऱ्यांदा म्युझिक व्हिडिओ चालला. न्यायालयात 100 हून अधिक जनहित याचिकांवर (PIL) सुनावणी सुरू होती. हे प्रकरण त्याच वेळी समोर आले.
या प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी सांगितले की, प्रशासकीय स्तरावर रजिस्ट्रार जनरल यांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयाची कार्यवाही रेकॉर्ड करणे नियमांच्या विरुद्ध आहे. जर कोणी रेकॉर्डिंग केली असेल तर कारवाई केली जाईल.अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी मुख्य न्यायाधीशांना सांगितले-
ठाकरे गटाने काँग्रेसशी चर्चा न करता दानवेंना उमेदवारी दिली:विजय वडेट्टीवार यांचा आरोप,सपकाळ म्हणाले आम्हीही लढणार
मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित केली आहे. पण आता त्याला काँग्रेसमधून विरोध होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला या प्रकरणी विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप केला आहे. तर भाई जगताप यांनी काँग्रेस या निवडणुकीत आपला उमेदवार देईल असे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या निवडणुकीवरून चांगलेच राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.दरम्यान विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार असे कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. भाजपने यापैकी आपल्या वाट्याला येणाऱ्या 6 जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली. सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी आपले पत्ते अजून उघड केले नाहीत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष कुणाला उमेदवारी देणार? याविषयी उत्सुकता लागली आहे. पण विरोधी बाकावरील ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रंगणांगणात उतरवण्याची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. पण आता काँग्रेसने त्यांच्याविरोधात उमेदवार देण्याचे संकेत दिल्याने महाविकास आघाडीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे.
काँग्रेस नेते भाई जगताप या प्रकरणी बोलताना म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सध्या दिल्लीत आहेत. ते आमच्या नेत्यांशी चर्चा करून विधान परिषदेच्या निवडणुकीसंबंधी योग्य तो निर्णय घेतील. उद्या अर्ज दाखल करायचा आहे. त्यामुळे या प्रकरणी जे काही आहे तोपर्यंत स्पष्ट होईल. या प्रकरणी एवढे अस्वस्थ होण्याची काहीच गरज नाही. आम्ही अस्वस्थ नाही. आम्ही स्वस्थ आहोत. काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी हा विषय खूप मोठा आहे. हा विषय एवढा तकलादू नाही.
आमचे प्रांताध्यक्ष दिल्लीतच आहेत. या सगळ्या घडामोडी होत असताना आम्ही सर्व जबाबदार आहोत. या जबाबदारीनेच सगळ्या गोष्टी होतील. आतापर्यंत याबाबतीतची अधिकृत माहिती किंवा घोषणा हे प्रांताध्यक्षच करू शकतील. मी किंवा इतर कुणीही करू शकणार नाही. पण माझ्या माहितीनुसार, काँग्रेस पक्ष कदाचित या निवडणुकीत आपला उमेदवार देईल.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी ठाकरे गटावर अंबादास दानवेंचे नाव विचारात घेताना विश्वासात न घेतल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, आज शिवसेना ठाकरे पक्षाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी जाहीर करताना त्यांनी काँग्रेसशी कोणतीही चर्चा केली नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वतः ही निवडणूक लढवली असती तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला असता. आमचे तसे ठरलेही होते. पण आता दुसरेच नाव समोर आले. मी यासंबंधी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली. मी त्यांना तुमच्याशी या नावासंदर्भात चर्चा झाली काय? असे विचारले. त्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले.
आता दिल्लीहून मुंबईत परतलेत. मी त्यांच्याशी पुन्हा चर्चा करेन. त्यानंतर पक्षाचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. तूर्त ठाकरे गटाने आमच्याशी या प्रकरणी कोणतीही चर्चा केली नाही. उद्या राज्यसभेची निवडणूक आहे. त्या संदर्भातही स्पष्ट खुलासा होणे आवश्यक आहे. आमची स्पष्ट भूमिका आहे की, ही जागा शिवसेना लढवणार असेल, तर पुढची राज्यसभेची जागा ही काँग्रेसला मिळाली पाहिजे. आम्ही ही जागा सोडणार नाही ही आमची भूमिका आहे. या निवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही हे प्रदेशाध्यक्षांनी ठरवले असेल, तर काँग्रेस उमेदवार देईल.
पत्रकारांनी महाविकास आघाडीतील या वादामुळे भाजप आपला अतिरिक्त उमेदवार देण्याची शक्यता आहे असा प्रश्न वडेट्टीवारांना केला. त्यावर ते म्हणाले, ते काय करतात हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. महाविकास आघाडी म्हणून समन्वय ठेवण्यासाठी चर्चा होऊन उमेदवारी घोषित व्हावी असे ठरले आहे. शरद पवारांच्या बाबतीत एकमत झाले होते. तसेच उद्धव ठाकरेंच्या बाबतीत महाविकास आघाडीचे एकमत होते. पण एखादे नवे नाव समोर आले असेल आणि त्यावर चर्चा झाली नसेल, तर ते योग्य वाटत नाही. चर्चेतून मार्ग काढावा अशीच आमची इच्छा होती. या प्रकरणी आमच्याशी किमान चर्चा व्हावी अशी आमची रास्त अपेक्षा होती. पण दुर्दैवाने आमच्याशी चर्चा न करता ते नाव घोषित करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले होते उमेदवार देण्याचे संकेत
उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः उद्धव ठाकरे या निवडणुकीत उमेदवार नसतील तर काँग्रेस आपला उमेदवार देईल अशी भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सपकाळ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते तिथे काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यात ते या मुद्यावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पक्षाचा निर्णय जाहीर करतील असा अंदाज आहे.
उष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना
पुणे, दि. 29 : सध्या राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेची लाट (Heat Wave) निर्माण होण्याची शक्यता असून पशुधनाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. पशुधनामध्ये उष्माघात, दूध उत्पादनात घट, भूक मंदावणे, निर्जलीकरण तसेच मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याअनुषंगाने पशुधन संरक्षणासाठी पशुपालकांनी करावयाच्या उपाययोजना पुढीलप्रमाणे.
जनावरांना दिवसभर मुबलक प्रमाणात स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. पाण्याच्या टाक्या व पाणवठे स्वच्छ ठेवावेत. शक्य असल्यास पाण्यात इलेक्ट्रोलाइट / खनिज मिश्रणाचा वापर करावा. सावलीची व्यवस्था जनावरांना थेट उन्हात बांधू नये. गोठ्यांवर शेडनेट, गवताचे आच्छादन किंवा ताडपत्रीचा वापर करावा. गोठ्यामध्ये पुरेशी हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. आहार व्यवस्थापन सकाळी लवकर व सायंकाळी उशिरा हिरवा व पौष्टिक चारा द्यावा. दुपारच्या कडक उन्हात खाद्य देणे टाळावे. खनिज मिश्रण व मीठाचा संतुलित वापर करावा.
जनावरांना थंडावा देणे- दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर पाणी शिंपडावे. शक्य असल्यास पंखे किंवा फॉगर्सचा वापर करावा. म्हैस व इतर जनावरांना पाण्यात बसण्याची व्यवस्था असल्यास अधिक चांगले. दुपारी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत जनावरांची वाहतूक टाळावी. बाजार, स्पर्धा किंवा लांब अंतराच्या हालचाली शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी कराव्यात.
धाप लागणे, जास्त लाळ येणे, शरीराचे तापमान वाढणे, सुस्ती व अशक्तपणा, खाद्य व पाणी कमी घेणे आदि लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा
कुक्कुटपालनासाठी विशेष काळजी- शेडमध्ये पुरेसे वायुवीजन ठेवावे. स्वच्छ व थंड पाणी सतत उपलब्ध ठेवावे. गर्दी टाळावी व इलेक्ट्रोलाइटचा वापर करावा.
उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेचा विचार करता सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाची योग्य काळजी घ्यावी व वरील उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.असे आवाहन सहायक आयुक्त, डॉ. विष्णू गर्जे यांनी केले आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण:आरोपी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन; सुटका होण्याची शक्यता
मुंबई-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवून सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, तर सबळ पुराव्याअभावी इतर तिघांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, आता या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दोषी शरद कळसकरचा जामीन मंजूर केल्यामुळे त्याची कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती, तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना 2024 मध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला शरद कळसकरने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, आपल्या अपिलावर निकाल लागेपर्यंत जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने कळसकरचा युक्तिवाद ग्राह्य धरत त्याला 50 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
20 ऑगस्ट 2013 रोजी झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आणि एका प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाच्या आधारे सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना दोषी ठरवले असून, त्यांना 5 लाख रुपये दंड किंवा तो न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याउलट, हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेले वीरेंद्र तावडे यांच्यासह संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
दरम्यान, सीबीआय विशेष न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. सबळ पुरव्यांअभावी तिघेही निर्दोष सुटणे हे सीबीआयचे मोठे अपयश मानले जात आहे.
संजय राऊत यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या तब्बेतीची केली विचारपूस
पुणे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या या भेटीत पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी त्यांनी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची त्यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान राऊत यांनी मोहोळ यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. राजकीय विरोधक असतानाही दोघांमधील ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
काही दिवसांपूर्वी मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अनेक वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना झालेली दुखापत पुन्हा बळावल्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता. 14 एप्रिल रोजी ही शस्त्रक्रिया पार पडली असून त्यानंतर त्यांना किमान महिनाभर विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.ऑपरेशननंतर मोहोळ यांनी स्वतः सोशल मीडियावर माहिती देत लवकरच पुन्हा कामावर रुजू होणार असल्याचे संकेत दिले होते. सध्या ते पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. अशा परिस्थितीत संजय राऊत यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केल्यामुळे राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक नात्यांना प्राधान्य दिल्याचे या प्रसंगातून दिसून आले.या दौऱ्यात शिवसेना गटनेता पक्ष कार्यालयाचे उद्घाटनही पार पडले. त्यानंतर सारसबागसमोरील बाळासाहेब ठाकरे कलादालनात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पुणे शहरातील पक्षबांधणी, संघटन विस्तार आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढील योजना यांचा आढावा घेण्यात येत आहे.
राज्यात दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार संधीची निर्मिती
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
एआयच्या विश्वात महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी पाऊल. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण २०२६ जाहीर. राज्यात दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार संधीची निर्मिती. राज्यभरात एआयच्या संधीचे संतुलन साधण्यासाठी सहा एआय-उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार. याशिवाय पाच एआय इनोव्हेशन सिटीज ची स्थापना होणार. महाराष्ट्राचे एआय पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देणारे दमदार धोरण.
(इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता विभाग)
सामजिक समता व समरसता वर्षा निमित्त साता समुद्रापार महापुरूषांच्या विचारांचा जागर. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या प्रख्यात संस्थेत भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापनेचा महत्त्वपूर्ण निर्णय. कायमस्वरूपी अध्यासनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार. (सामाजिक न्याय विभाग)
हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना. राज्यात तीनशे कोटी वृक्ष लागवडीकरिता महत्वाकांक्षी वृक्षारोपण मोहीम. पायाभूत सुविधा उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी व सनियंत्रण यासाठी आयोग काम करणार. ( वन विभाग)
राज्यातील हरित ऊर्जेचा वापर आणि पारेषण क्षमतेचे अधिक बळकटीकरण. त्यासाठी मॅजेस्टिक – महाराष्ट्र अॅक्सलरेटिंग ग्रीन एनर्जी अँण्ड स्टोरेज टेक्नॉलॉजीज इंटिग्रेशन इन कनेक्टेड ग्रीड (Maharashtra: Accelerating Green Energy and Storage Technologies Integration in Connected Grid – MAGESTIC) योजना राबविण्यात येणार. योजनेसाठी जागतिक बँकेकडून कर्ज मिळणार. त्याबाबतचा प्राथमिक अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता.
(ऊर्जा विभाग)
दिव्यांगाच्या शिक्षण भरारीला आणखी बळ. उच्च माध्यमिक परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मिळणार. गत बारा वर्षांनंतर पहिल्यांदाच भरीव वाढ. आता दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठ, परीक्षा बोर्ड, संस्थेला भरावे लागणारे शुल्क, प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क , नोंदणी शुल्क, ग्रंथालय, नियतकालिकांसाठी, वैद्यकीय तपासणीचे शुल्क मिळणार.
(दिव्यांग सक्षमीकरण विभाग)
रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे नाचणे येथे केंद्रीय विद्यालयाला जमीन. कोकणातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी आणखी एक महत्वाची सुविधा. केंद्र सरकारचे केंद्रीय विद्यालय संघटन, नवीन केंद्रीय विद्यालय उभारणार. मौजे नाचणे येथील अडीच हेक्टर जमीन उपलब्ध करून देणार.
(महसूल विभाग)
आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना. आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थाद्वारा चालविल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १२ व २४ वर्षांच्या नियमित सेवेनंतरची दोन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मान्यता. (आदिवासी विकास विभाग)
