Home Blog Page 667

माय मराठीसाठी सोन्याचा दिवस : – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन

मुंबई, दि. ३:- आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील मराठी प्रेमी, तसेच साहित्यिक, संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे.
आजचा हा दिवस यापुढे ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्र्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या
माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ।। या ओळींचाही दाखला दिला आहे. ते म्हणतात, अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीला हा दर्जा मिळावा यासाठी आग्रह धरला होता. त्यांच्यासाठी हा निर्णय म्हणजे स्वप्नपूर्ती आहे . निती आयोगाच्या बैठकीतही मराठीला अभिजात दर्जा द्यावी अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. या निर्णयामुळे आपल्या प्रदीर्घ लढ्याला यश मिळाले आहे. मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचा हा निर्णय आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घेतला गेल्याने दुधात साखर असा योग जुळून आला आहे. यासाठी आपल्या लाडक्या मराठीचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार मानतो. मराठी भाषा प्रगल्भ आहेच. आता तिचा प्रचार, प्रसार आणखी जोमाने करता येईल. मराठी भाषा आपल्या संतांनी जतन केली, वाढवली. तिचा आपण व्यवहारात आवर्जून वापर केला पाहिजे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या मराठी भाषक, विचारवंत, भाषा अभ्यासक- संशोधक, साहित्यिक आणि समीक्षक अशा सर्वांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्रात सत्तापालट होण्याची गरज: अशोक वानखेडे

पुणे:

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’ निमित्त पुण्यात ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘नागरी समाज व निवडणुका ‘ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे (दिल्ली)यांचे व्याख्यान गांधी भवन येथे झाले. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी होते.एड. स्वप्नील तोंडे यांनी सूत्र संचालन केले. स्नेहा कारंजकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. अप्पा अनारसे यांनी स्वागत केले. जांबुवंत मनोहर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.

अन्वर राजन,डॉ.अच्युत गोडबोले, डॉ. उर्मिला सप्तर्षी,डॉॅ.प्रवीण सप्तर्षी,आनंद करंदीकर, ज्ञानेश्वर मोळक,विकास लवांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अशोक वानखेडे म्हणाले,’ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीने उधळलेल्या बैलाला काबू करून कामाला लावण्याचे काम केले आहे. वक्क विधेयकावरून घेतलेली माघार त्याचीच निदर्शक आहे.केलेल्या कुकर्मातून सन्माननीय रित्या बाहेर जाण्याचा मार्ग त्यांच्या कडून शोधला जात आहे. संघ परिवार सुधारून काही वक्तव्ये करीत असला तरी त्यात तथ्य नाही. पंतप्रधानांनी सतत असत्य बोलण्याची शपथ घेतली आहे. इलेक्टोरल बाँड हा मोठा भ्रष्टाचार आहे. शेतकऱ्यांना लुटले जात आहे. त्यांच्या समोर रोज नव्या अडचणी उभ्या केल्या जात आहेत. नागरी समाजाने सत्ताधाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात राजकीय व्यभिचार चालू आहे. कर्जाच्या ओझ्याखाली राज्य दबले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा गेली आहे.स्वाभिमानी महाराष्ट्राला १५o० रुपयांची भीक घातली जात आहे. या भीकेची सवय लावून घेता कामा नये. कामाची सवय गेलेला समाज बरबाद होणार आहे. म्हणून राज्यात सत्तापालट करणे गरजेचे आहे.विधायक काम करणारे लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजे.

गांधीजींबद्दल बोलताना वानखेडे म्हणाले,’ गांधीजींना पुस्तकात, पुतळयात ठेऊन उपयोग नाही. गांधीजी आपल्या दैनंदिन जीवनात असले पाहिजेत. त्यांचे विचार कृतीत आणले पाहिजेत. गांधीजींची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देता कामा नये.

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,’ गांधी सप्ताह हा विचारांचा यज्ञ आहे. पुणे हे देशाचे वैचारिक केंद्र आहे. हल्ली उत्सवात आपण अंशा अंशाने बहिरे होत आहोत. पुण्यातील वैचारिक उत्सव थांबला तर देश मागे जाईल. तसे होऊ नये यासाठी ही वैचारिक परंपरा गांधी सप्ताहातून चालू आहे.

सप्ताहातील आगामी कार्यक्रम

४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एलोरा बोरा यांचे भरतनाट्यम नृत्य आयोजित करण्यात आले आहे.दि.५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जेएनयू मधील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.मणिंद्रनाथ ठाकूर यांचे २१ वी सदी की समस्याए और गांधी ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत.सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संसदीय आणि बिगर संसदीय राजकारण’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे,अभ्यासक चैत्रा रेडकर, प्रा. सुरेंद्र जोंधळे सहभागी होणार आहेत. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी असतील.

खादी प्रदर्शन,गांधी चित्रपट महोत्सव

गांधी सप्ताहानिमित्त ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह फिल्म फेस्टीव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.गांधी भवन मध्ये विविध चित्रपट जात आहेत.दि.३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम’ हा चित्रपट दाखवला गेला.दि.४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘टू मच डेमोक्रसी’,दि.५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘कोर्ट’,दि.६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘द किड’,दि.७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम कॉम्रेड’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.

महात्मा गांधी यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शन मुख्य सभागृहात सप्ताहभर खुले असेल. गांधी भवन आवारात खादी प्रदर्शन,पुस्तक प्रदर्शन,इतर गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले आहेत.

बोपदेव घाटात गँगरेप

मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार
पुणे- – कोंढवा परिसरात बोपदेव घाटामध्ये मित्रासोबत फिरावयास गेलेल्या एका 21 वर्षे महाविद्यालयीन तरुणीवर अनोळखी 3 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींवर कोंढवा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नुकतेच दोन दिवसांपूर्वीच बोपदेव घाटात मित्रांसोबत फिरावयास गेलेल्या एका तरुणीचे कारमधून एका तरुणाने अपहरण केले होते. तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा गाडीत विनयभंग करून आरोपी तरुणीला सोडून पळून गेला होता. त्यानंतर आता पुन्हा बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे.

पीडित मुलगी ही मूळची सुरत येथील राहणारी असून तिचा मित्र जळगाव येथील राहणार आहे .सदर दोघे पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. गुरुवारी रात्री सदर दोघे दुचाकी वर बोपदेव घाट या ठिकाणी फिरावयास गेले होते .त्यावेळी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान तीन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आल्या त्यांनी जबरदस्ती करत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला .सदर जागा ही एकांत ठिकाणी असल्याने कोणतीही मदत पीडित मुलीस मिळू शकली नाही.

या घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत असलेले पीडित मुलीस तिच्या मित्राने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी घेतल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती कोंढवा पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी येऊन घडलेल्या घटनेची माहिती घेत आज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी पाच वाजता याबाबत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या 10 टीम आणि डीबी पथक रवाना करण्यात आले आहे.

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या कोषाध्यक्षपदाचा कार्यभार आचार्य पवन त्रिपाठीकडे

मुंबई -: मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या कोषाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी कुटुंबासह श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. सोबत महेश मुदलियार, जितेंद्र राऊत, भास्कर विचारे, सुदर्शन सांगळे, गोपाळ दळवी, भास्कर शेट्टी, मीना कांबळे, राहुल लोंढे, मनीषा तुपे या सर्व विश्वस्तांनीही पदभार स्वीकारला.

श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर पवन त्रिपाठी म्हणाले की, भगवान श्री सिद्धिविनायक गणपती आणि गणेशभक्तांची सेवा करणे हे माझे परम आणि आद्य कर्तव्य आहे. ते म्हणाले की, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे जगातील श्रद्धेचे मोठे केंद्र तसेच मानवतेचे मोठे केंद्र आहे. सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टतर्फे गरजूंना मदत केली जाते. जास्तीत जास्त गरजू लोकांना याचा लाभ घेता यावा यासाठी मी प्रयत्नशील राहीन.

यावेळी पवन त्रिपाठी यांना संन्यास आश्रमाचे प्रमुख पीठाधीश्वर स्वामी विश्वेश्वरानंद, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला, माजी खासदार गोपाल शेट्टी, आमदार प्रसाद लाड, राजहंस सिंह, भाजप नेते मोहित कंबोज, अमरजीत सिंग, ब्रह्मदेव तिवारी, आर.यू.सिंग, ओमप्रकाश चौहान, भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडे, सचिव विजय सिंह, मुंबई उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष जयप्रकाश सिंह, जिल्हाध्यक्ष राजेश शिवडकर, डॉ. सुषम सावंत, शरद चिंतनकर, भालचंद्र शिरसाट, मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना, पंकज यादव, आरडी यादव, ज्ञानमूर्ती शर्मा, रमाकांत गुप्ता, संतोष पांडे, दीपक सिंग, मुंबई भाजपा सचिव प्रमोद मिश्रा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र सिंह, लोकगीत गायक सुरेश शुक्ला, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र, हितचिंतक, आणि उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

नथुराम गोडसेने गांधींची हत्या केल्याने सावरकर, ब्राह्मण समाज, हिंदुत्व बदनाम झाले -शरद पोंक्षे

पुणे-नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ ला गांधींची हत्या केली. त्यामुळे ब्राह्मण समाज, हिंदुत्व व हिंदू महासभेचे नेतृत्व करणारे स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर बदनाम झाले, असे प्रतिपादन प्रख्यात अभिनेते, सावरकरांचे अभ्यासक शरद पोंक्षे यांनी सांगितले.

पुण्यातील गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे शरद पोंक्षे यांना डॉ. दा. वि. नेने स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.कर्वेरस्ता, कोथरूड येथील स्वामीकृपा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम अष्टेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

त्या वेळी ते म्हणाले की, १९४६ पासून सावरकर सांगतात ते खरे होताना पाहून त्यांची व हिंदू महासभेची ताकद वाढत होती. त्यामुळे आपण १९५२ च्या निवडणुकांना कसे सामोरे जाणार हा प्रश्न नेहरूंना भेडसावत होता. ते एका चमत्काराची अपेक्षा करत होते. तो चमत्कार घडवला गोडसेने. त्याने ३० जानेवारी १९४८ ला गांधींची हत्या केली.

ब्राह्मण समाज, हिंदुत्व व हिंदू महासभेचे नेतृत्व करणारे सावरकर बदनाम झाले. त्यांच्यावर काळा डाग लावण्याची आयती संधी नेहरूंकडे चालून आली. गांधी हत्येच्या कटात सामील असल्याचा ठपका ठेवत सावरकरांना आरोपी क्रमांक ८ बनवण्यात आले. १९३७ साली सावरकरांना काँग्रेसमध्ये सामील होण्याचे निमंत्रण होते, परंतु काँग्रेसने स्वीकारलेल्या हिंदी राष्ट्रवाद व पराकोटीचं मुस्लिमांचं लांगूलचालन यामुळे त्यांनी त्यास नकार दिला.

स्वतः सुप्रीम कोर्टात ५ वेळा माफी मागणारा काँग्रेसचा नेता जेव्हा मी सावरकर नाही, मी माफी मागणार नाही, असे म्हणतो. सावरकर जाऊन ५८ वर्षे लोटली असली तरी दर २ महिन्यांनी काँग्रेस त्यांच्यावर चिखलफेक करते. यावरूनच आजही सावरकरी विचारांची दहशत कायम असल्याचे दिसते, असे पोंक्षेंनी सांगितले.

‘घरातील स्त्रियांचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखणे, हेच शक्तीचे जागरण’

अखिल भारतीय काँग्रेस समिती अध्यक्ष अलका लांबा यांचे प्रतिपादन
३० व्या पुणे नवरात्र महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन
पुणे – ‘स्त्रीची प्रतिष्ठा आणि सन्मान तसेच सुरक्षा यांची ग्वाही मिळणे, हेच नवरात्र उत्सवातील शक्तीचे खरे जागरण ठरेल’, असे उद्गार अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी गुरुवारी येथे काढले. ‘आपापल्या घरातील, कुटुंबातील स्त्रियांचा सन्मान, प्रतिष्ठा राखण्याची शिकवण गरजेची आहे. पुरुष जेव्हा घरातील स्त्रीचा सन्मान करण्यास शिकतील, तेव्हा काळ आणि परिस्थिती बदलेल’, असेही त्या म्हणाल्या.
आबा बागुल आणि जयश्री बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार्या पुणे नवरात्र महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. पुणे नवरात्र महोत्सवाचे यंदा ३० वे वर्ष आहे. सकाळी ६ वाजून पाच मिनिटांनी शिवदर्शन येथील लक्ष्मीमाता मंदिरात आबा बागुल आणि जयश्री बागुल तसेच कुटुंबियांच्या उपस्थितीत घटस्थापना झाली. त्यानंतर गणेश कला क्रीडा मंच, येथे नवरात्र उत्सवाचा औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडला.


उद्घाटन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून काँग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे,माजी आमदार मोहन जोशी, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दिप्ती चवधरी,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड,तसेच ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व  माजी आमदार उल्हास पवार, काॅग्रेस नेत्या संध्या सव्वालाखे,  आमदार रवींद्र धंगेकर, आमदार संजय जगताप, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, पुणे शहर प्रशांत जगताप, शहर प्रमुख, शिवसेना उबाठा पक्ष संजय मोरे, अध्यक्ष, एनएसयूआय महाराष्ट्र प्र. काँग्रेस अमिर शेख, अध्यक्षा, पुणे शहर महिला काँग्रेस पूजा आनंद, माजी महापौर कमल व्यवहारे, संगीता तिवारी, संजय बालगुडे, अंकुश काकडे, दूरदर्शन व आकाशवाणीचे संचालक इंद्रजीत बागल आदी अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पुणे नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना उद्घाटन सोहळ्यात ‌‘श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार‌’ देऊन गौरविण्यात आले. राजीव खांडेकर (ज्येष्ठ संपादक), ॲड. वंदना चव्हाण (माजी खासदार, पर्यावरणवादी), नितीन बानगुडे-पाटील (प्रसिद्ध व्याख्याते), डॉ. संजीव चौधरी (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ऑर्थोपेडिक सर्जन), आनंदी विकास (ज्येष्ठ संगीतकार व गायिका), हिंदवी पाटील (लावणी लोककलावंत) यांना उद्घाटन सोहळ्यात श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, गौरवचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या सोहळ्यात गजराज ग्रुपच्या संदेश जगताप यांचाही गौरव करण्यात आला.
अलका लांबा यांनी राज्यात काही ठिकाणी घडलेल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख केला. ‘नवरात्र उत्सवात देवीच्या शक्तीरूपांचे पूजन करत असताना, मुलींवर होणारे अत्याचार मनाला त्रास देतात. एकीकडे शक्तीरूपाचे पूजन आणि त्याच वेळी हे अत्याचार, हे चित्र संतापजनक आहे. आपण सार्यांनीच या प्रकारांचा गांभीर्याने विचार करायला हवा. आपल्या पुरुषांची मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे. विचार बदलले तरच कृती बदलेल, असे त्या म्हणाल्या’.
‘आबा बागुल यांनी आयोजिलेल्या या महोत्सवात सहभागी होताना, एका नगरसेवकामध्ये किती मोठी उर्जा असू शकते, याचे दर्शन घडले. आबांनी त्यांचा वार्ड किती उत्तम सांभाळला आहे आणि सामाजिक कार्याचा आदर्श उभा केला आहे, हे या महोत्सवाच्या निमित्ताने लक्षात येते’, असेही त्या म्हणाल्या.


‘उत्सवाच्या माध्यमातून गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवणारे आणि सदैव माणसे जोडत राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे आबा बागुल’, अशा शब्दांत विश्वजीत कदम यांनी पुणे नवरात्र महोत्सवाचे प्रणेते, प्रवर्तक आबा बागुल यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. पुणे महानगरपालिकेतील सर्वांत अभ्यासू नगरसेवक अशी आबांची ओळख आहे आणि तरुणाईला लाजवेल असा त्यांचा उत्साह आणि उर्जा आहे, असेही कदम म्हणाले.
प्रास्ताविक मांडताना आबा बागुल यांनी नवरात्र महोत्सवातील उपक्रमांची माहिती दिली. ‘माणसाच्या हदर्यात बांधलेले घर कायम टिकते, हा आईचा उपदेश मी आचरत आहे. त्यातूनच महोत्सवाची ३० वर्षांची परंपरा निर्माण झाली आहे’, असे ते म्हणाले.
पुरस्कारप्राप्तांच्या वतीने राजीव खांडेकर तसेच वंदना चव्हाण व बालगुडे यांनी मनोगत मांडले.
सुप्रसिद्ध सिनेतारका रुपाली भोसले, भार्गवी चिरमुले, मधुरा कुलकर्णी, आलापिनी निसाळ, अमृता धोंगडे, मीरा जोशी, वैष्णवी पाटील, पूनम घाडगे, आदिती द्रविड आणि नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे, फुलवंती चित्रपटातील नायिका प्राजक्ता माळी यांची उद्घाटन सोहळ्यातील उपस्थिती लक्ष्यवेधी होती. उद्घाटन सोहळ्याची सुरवात नृत्यांगना शर्वरी जमेनीस व त्यांच्या शिष्यांनी दुर्गानमन या रचनेने केली. स्वाती धोकटे व ग्रुपने देवीचा जागर व गोंधल सादर केला. बालिवूड धमाकामधून अनेक चित्रतारकांनी सादरीकऱण केले.
 शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर घनश्याम सावंत यांनी आभार मानले. प्रारंभी देवीची आरती करण्यात आली. मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलन केले.
उत्तरार्धात प्रसिद्ध गायक पं. श्रीनिवास जोशी व युवा गायक विराज जोशी यांची परंपरा ही गायन मैफल रंगली.

मराठी भाषकांचा स्वाभिमान वाढवणारा मोदी सरकारचा निर्णय :चंद्रकांतदादा पाटील

पुणे:उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मराठी भाषकांचा स्वाभिमान वाढवणारा मोदी सरकारचा निर्णय असे वक्तव्य करत आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले,”एकीकडे महाराष्ट्रात मराठी ही मातृभाषा संकटात असल्याची चर्चा अनेक व्यासपीठांवरुन होत असताना,गेल्या कित्येक वर्षांची मराठी भाषकांची महत्त्वपूर्ण मागणी भारत सरकारने मान्य केली, मराठी भाषकांचा स्वाभिमान वाढवणारा हा मोदी सरकारचा निर्णय आहे, महाराष्ट्राचा उच्च शिक्षण मंत्री या नात्याने मी भारत सरकारचे अत्यंत मनापासून आभार मानतो, आनंद व्यक्त करतो.
भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करतानाही मातृभाषेला महत्त्वाचे स्थान दिले आहे,या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असल्याने देशभरातील ४५० विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. मराठी भाषा, बोलीभाषांचे संशोधन,लेखन, अनुवाद यासह मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी म्हणून या निर्णयामुळे मोलाची मदत होणार आहे.शिवाय राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये अधिक सशक्त करुन त्यांच्यामार्फत मराठी भाषा आणि
साहित्य, ग्रंथनिर्मिती, ग्रंथसंग्रह अशांसाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
जगभरातील १५ कोटी मराठी भाषकांच्या वतीने या निर्णयाबद्दल मोदी सरकारचे पुन्हा आभार मानतो.

पुणे रेल्वे-स्टेशन समोरील जनरल स्टोअर्सला आग

पुणे: PMCPune आज शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता पुणे रेल्वे-स्टेशन समोरील विल्सन गार्डन येथे अग्रवाल जनरल स्टोअर्सला आग लागली. अग्निशमन दलाच्या २ फायरगाड्या व २ वॉटर टँकर दाखल होत आगीवर पुर्ण नियंत्रण मिळविले असून जखमी कोणी झालेले नाही. तर तेथेच लगतच असणाऱ्या लॉजिंगमधील नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने जवानांनी सुखरुप बाहेर काढले आहे .

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल -उपमुख्यमंत्री अजित पवार

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने
अजित पवारांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी
प्रयत्न केलेल्या सर्व मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन
— उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 3 :- “मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयाने जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमी आनंदित झाले आहेत. या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल, मराठी भाषा ज्ञानभाषा, अर्थार्जनाची भाषा बनण्यास मदत होईल. महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रीमंडळाचे मी मनापासून आभार मानतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या प्रतिक्रियेत पुढे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची गेल्या अनेक दशकांची मागणी होती. ही मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे पूर्ण झाली आहे. यासाठी गेली अनेक दशके प्रयत्न करणाऱ्या सर्व मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समस्त महाराष्ट्रवासीयांचे, मराठीभाषकांचे, मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन केले असून यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
—-००००—

रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस 

नवी दिल्‍ली, 3 ऑक्‍टोबर 2024

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील  केंद्रीय मंत्रिमंडळाने 11,72,240 रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकतेवर आधारित बोनस (पीएलबी) म्हणून, कामाच्या 78 दिवसांकरता एकूण 2028.57 कोटी रुपयांना मंजुरी दिली.

ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ सहाय्यक, पॉइंट्समन, मंत्रालयांच्या सेवेतील कर्मचारी आणि इतर ग्रुप XC कर्मचारी यांसारख्या विविध श्रेणीतील रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून ही रक्कम दिली जाईल.

पीएलबी साठी पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना ही रक्कम दरवर्षी दुर्गापूजा/दसऱ्याच्या सुट्टीपूर्वी वितरीत केली जाते. यावर्षी देखील, सुमारे 11.72 लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतकी पीएलबी ची रक्कम दिली जात आहे.

78 दिवसांसाठी प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला दिली जाणारी कमाल रक्कम रु.17,951/- इतकी आहे. ही रक्कम विविध श्रेणीतील रेल्वे कर्मचारी, जसे ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्टर्स, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ सहाय्यक, पॉइंट्समन, मंत्रालयांच्या सेवेतील कर्मचारी आणि इतर गट ‘क’ कर्मचारी यांना वितरीत केली जाईल.

2023-2024 या वर्षात भारतीय रेल्वेची कामगिरी खूप चांगली राहिली. रेल्वेने 1588 दशलक्ष टन इतकी विक्रमी मालवाहतूक केली, तर जवळजवळ 6.7 अब्ज प्रवासी वाहतूक केली.

या विक्रमी कामगिरीमध्ये अनेक घटकांचा हातभार लागला. सरकारने रेल्वेमध्ये विक्रमी कॅपेक्स (भांडवली खर्च) केल्यामुळे पायाभूत सुविधांमध्ये झालेली सुधारणा, कामकाजातील कार्यक्षमता आणि उत्तम तंत्रज्ञान इत्यादी गोष्टींचा यात समावेश आहे.

मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा

नवी दिल्‍ली, 3 ऑक्‍टोबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. देशातील अभिजात भाषा या भारताच्या पुरातन आणि प्राचीन सांस्कृतिक वारशाच्या संरक्षकाची भूमिका पार पाडत आल्या आहेत. यासोबतच या भाषा म्हणजे प्रत्येक समुदायाने गाठलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वाटचालीतील मैलाच्या टप्प्यांचे सार आणि मूर्त रूप आहेत.

मुद्देनिहाय तपशील आणि पार्श्वभूमी :

भारत सरकारने 12 ऑक्टोबर 2004 रोजी अभिजात भाषा म्हणून भाषांची एक नवीन श्रेणी तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्या अंतर्गत अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी खालील  नमूद निकष निश्चित केले, आणि  याच निकषांवर तमिळ या भाषेला अभिजात भाषा म्हणून घोषित केले होते.

  1. संबंधित भाषेच्या वाटचालीच्या इतिहासात सुरुवातीच्या टप्प्यावर निर्माण आणि नोंद झालेली ग्रंथसंपदा अत्यंत पुरातन / एक हजार वर्षांचा इतिहास असलेली असावी.
  2. या भाषेच्या प्राचीन साहित्याचा/ ग्रंथांचा काही एक संग्रहाला, त्या भाषेच्या पिढीजात भाषकांमध्ये मौल्यवान वारसा म्हणून मान्यताप्राप्त  असावा.
  3. त्या भाषेची वाङ्मयपरंपरा ही अस्सल असावी, ती इतर कोणत्याही भाषिक समुदायाकडून आलेली नसावी

अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रस्तावित भाषांची चिकित्सा करण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने नोव्हेंबर 2004 मध्ये साहित्य अकादमीच्या अखत्यारित भाषिक तज्ञांची समिती (LEC) स्थापन केली होती.

त्यानंतर नोव्हेंबर 2005 मध्ये अभिजात भाषेचा दर्जाशी संबंधित निकषांमध्ये खाली नमूद केल्याप्रमाणे सुधारणा करण्यात आली आणि संस्कृत भाषेला अभिजात भाषा म्हणून घोषित करण्यात आले:

  1. संबंधित भाषेच्या वाटचालीच्या इतिहासात सुरुवातीच्या टप्प्यावर निर्माण आणि नोंद झालेली ग्रंथसंपदा 1500 ते 2000 वर्षांचा अत्यंत पुरातन इतिहास असलेली असावी.
  2. या भाषेच्या प्राचीन साहित्याचा/ ग्रंथांचा काही एक संग्रहाला, त्या भाषेच्या पिढीजात भाषकांमध्ये मौल्यवान वारसा म्हणून मान्यताप्राप्त असावा.
  3. त्या भाषेची वाङ्मयपरंपरा ही अस्सल असावी, ती इतर कोणत्याही भाषिक समुदायाकडून आलेली नसावी
  4. अभिजात भाषा आणि त्या भाषेतील निर्मित साहित्य हे आधुनिक भाषेपेक्षा वेगळे असल्याने अभिजात भाषा आणि तिची नंतरची रूपे किंवा तिच्या इतर शाखा यांमध्ये विसंगती असू शकते.
भाषाअधिसूचना जारी झाल्याची तारीख
तामिळ12/10/2004
संस्कृत25/11/2005
तेलुगू31/10/2008
कन्नड31/10/2008
मल्याळम08/08/2013
उडिया01/03/2014

महाराष्ट्र सरकारकडून 2013 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती करणारा प्रस्ताव मंत्रालयाला प्राप्त झाला होता, जो भाषा तज्ञ समितीकडे पाठवण्यात आला होता. या समितीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शिफारस केली. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी 2017 मध्ये मंत्रिमंडळाकडे आलेल्या प्रस्तावाच्या मसुद्यावरील आंतर मंत्रालयीन चर्चेदरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यासाठीचे निकष बदलण्याचे आणि ते अधिक कडक करण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान कार्यालयाने आपल्या टिप्पणीत असे नमूद केले की अशा प्रकारे आणखी किती भाषा पात्र होण्याची शक्यता आहे त्याचा शोध घेण्यात यावा.

दरम्यानच्या काळात बिहार, आसाम, पश्चिम बंगाल यांच्याकडूनही पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले.

त्यानुसार भाषा तज्ञ समितीने(साहित्य अकादमीच्या अंतर्गत) 25 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत एकमताने खालील प्रमाणे निकषांमध्ये बदल केले. साहित्य अकादमी ही भाषा तज्ञ समितीसाठी एक नोडल समिती म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.  

  1. या भाषेतील ग्रंथ/ लिखित इतिहास 1500 ते 2000 वर्षांहून अधिक  प्राचीन असावा.
  2. प्राचीन साहित्य/ग्रंथांचा एक भाग, ज्याला वक्त्यांच्या पिढ्यांनी एक वारसा मानले आहे.
  3. ज्ञान ग्रंथ विशेषतः कविता, पुराभिलेख  आणि शिलालेखांचे पुराव्यांव्यतिरिक्त गद्य ग्रंथ.
  4. अभिजात भाषा आणि साहित्य त्यांच्या सध्याच्या स्वरूपापेक्षा वेगळे असू शकेल किंवा त्यांच्या नंतरच्या स्वरूपापासून वेगळे झालेले असू शकेल.

खाली नमूद केलेल्या भाषा या सुधारित निकषांची पूर्तता करत असून, त्यामुळे या भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली जावी अशी शिफारसही या समितीने केली आहे.

  1. मराठी
  2. पाली
  3. प्राकृत
  4. आसामी
  5. बंगाली

अंमलबजावणीचे धोरण आणि उद्दिष्टे: 

अभिजात भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अनेक पावले उचलली आहेत. याअंतर्गत संस्कृत भाषेच्या जतन, संवर्धन आणि प्रोत्साहनासाठी संसदेत कायदा संमत करण्यात आला, आणि 2020 मध्ये तीन केंद्रीय विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. तमिळ भाषेतील प्राचीन ग्रंथसंपदेचे सुलभतेने भाषांतर करण्यासाठी, या भाषेच्या संशोधनाला चालना देण्यासाठी आणि विद्यापीठातील विद्यार्थी आणि तमिळ भाषेच्या अभ्यासकांसाठी विविध अभ्यासक्रमांची रचना करण्यासाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तामिळ या संस्थेची स्थापना करण्यात आली. पुढे जात अभिजात भाषांसंबंधाचे संशोधन आणि त्यांच्या जतन संवर्धनविषयक उपक्रमांची व्याप्ती वाढावी यासाठी म्हैसूर येथील केंद्रीय भारतीय भाषा संस्थेच्या अधिपत्याखाली कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया या अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी उत्कृष्टता केंद्रांची स्थापना करण्यात आली. या उपक्रमांव्यतिरिक्त अभिजात भाषाभ्यासाच्या क्षेत्रातील कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी तसेच, प्रोत्साहन देण्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरदेशीय पुरस्कारांची आखणी केली गेली आहे. यासोबतच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने अभिजात भाषांना दिल्या जाणाऱ्यायेणाऱ्या लाभांमध्ये अभिजात भाषांसाठी राष्ट्रीय पुरस्कार, विद्यापीठांमध्ये विशेष विभाग, अभिजात भाषांच्या जतन संवर्धन केंद्रांचा समावेश आहे.

रोजगार निर्मितीसह प्रमुख लाभ :

एखाद्या भाषेचा अभिजात भाषेच्या श्रेणीत समावेश झाल्याने त्या भाषेच्या क्षेत्रात, विशेषत: शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या महत्त्वाच्या संधी निर्माण होतील. याव्यतिरिक्त, या भाषांमधील प्राचीन ग्रंथसंपदेचे जतन, दस्तऐवजीकरण आणि डिजिटलायझेशन यामुळे संग्रह करणे, अनुवाद, प्रकाशन आणि डिजिटल माध्यमांमध्ये अशा विविध स्वरूपाचे रोजगार निर्माण होतील. 

समाविष्टीत राज्ये / जिल्हे :

याअंतर्गत प्राथमिक टप्प्यावर समाविष्ट केलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र (मराठी), बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश (पाली आणि प्राकृत), पश्चिम बंगाल (बंगाली) आणि आसाम (आसामी) या राज्यांचा समावेष आहे. या निर्णयाचा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक स्वरुपातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रभाव पडणार आहे. 

जिरायत भागाला ओलिताखाली आणण्यासाठी नीरा – कऱ्हा उपसा सिंचन योजना करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. ३: बारामती तालुक्यातील जिरायत भागातील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी १ हजार २५ कोटी रुपयांची नीरा – कऱ्हा उपसा सिंचन योजना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

जळगाव क.प. वि.का. सेवा सहकारी संस्थेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रकाश जगताप, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, रणजित तावरे, जळगाव क.प. वि.का. सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन रमेश चव्हाण, व्हॉईस चेअरमन रतनबाई पोंदकुले आदी उपस्थित होते.

या भागात शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कायमच प्रयत्न करण्यात आले असून अद्यापही त्यावर काम करणे बाकी असल्याने उपसा सिंचन योजना राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, या योजनेत या परिसरातील बहुतांश जिराईत गावे समाविष्ट करण्यात येणार असून सुमारे ४५ हजार एकर क्षेत्र पाण्याखाली आणण्यात येणार आहे. या योजनेत ७.५ फूट व्यासाची पाइपलाइन असणार असून त्यात दोन टप्प्यात २ हजार अश्वशक्तीचे १२ पंप तर २ हजार १५० अश्वशक्तीचे ७ पंपाद्वारे पाणी उचलले जाणार आहे. प्रतिवर्षी या भागात २ टीएमसी पाणी देण्यात येणार असून १ टीएमसी पाणी ३० दिवसात विहिरी, पाझर तलाव, बंधारे भरण्यासाठी देण्यात येईल तर १ टीएमसी पाणी उर्वरित ११ महिन्यासाठी देण्याचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या पाचपैकी तीन वर्षात बारामती तालुक्यात रस्ते, रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, बस स्थानक, विविध भव्य इमारती आदींसाठी ८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी दिला आहे. सर्वांना घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देऊन राज्यशासनाच्यावतीने लाडकी बहिण योजनेची तीन महिन्यांची रक्कम देण्यात आली असून ऑक्टोबर, नोव्हेंबर या दोन महिन्यांची रक्कम लवकरच वितरीत करण्यात येईल, असे सांगितले.

ते पुढे म्हणाले, शासनाने सर्वच घटकांसाठी विविध निर्णय घेतले असून शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेंतर्गत ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज, दूध उत्पादकांना चांगला दर मिळावा यासाठी प्रतीलिटर ७ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, कोतवाल, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आदींचे मानधन वाढविण्यात आले आहे.

विविध कार्यकारी सेवा संस्था ही गावाच्या विकासाची नाडी असते असे सांगून श्री. पवार पुढे म्हणाले, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देण्याचा आमचा प्रयत्न असतो. जळगाव क.प. वि. का. स. सहकारी संस्थेने उपलब्ध जागेमध्ये गावाच्या वैभवात भर घालणारी वास्तू उभी केली आहे. संस्थेची आर्थिक स्थिती चांगली असून स्वस्त धान्य दुकान, आर.ओ. प्रकल्प, सी.एस.सी. सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याशिवाय भविष्यात प्रधानमंत्री जन औषधी केंद्र आणि संस्थेच्या इमारतीवर सौर पॅनल बसविण्यात येणार असल्याने संस्था उत्तम काम करत आहे, असेही ते म्हणाले.

संस्थेच्या मालकीची १ हजार १२८ चौरस फूट जागा असून त्यावर २ हजार ४०० चौरस फूट दोन मजली बांधकाम केलेले आहे. इमारतीचा आराखडा, अंदाजपत्रक आदीसाठी ८५ हजार रुपये, बांधकामासाठी ३४ लाख ८० हजार रुपये आणि विद्युतीकरण खर्च १ लाख १० हजार रुपये झाला आहे. संस्थेत एकूण ८५७ सभासद असून संस्थेची उलाढाल ५ कोटी ४७ लाख रुपये एवढी आहे, अशी माहिती यावेळी प्रास्ताविकात संस्थेचे संचालक गोरख चौलंग यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते यावेळी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेंतर्गत शून्य वीज बील प्रातिनिधिक स्वरूपात ५ शेतकऱ्यांना देण्यात आले.

कार्यक्रमास बारामती खरेदी विक्री संघाचे चेअरमन विक्रम भोसले, जळगाव क. प. चे सरपंच रामभाऊ जगताप, भिलारवाडीच्या सरपंच सत्त्वशीला जगताप, सेवा संस्थेचे संचालक, नागरिक उपस्थित होते.

काऱ्हाटी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते काऱ्हाटी येथे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. त्यामध्ये जाधववाडी ते कऱ्हा नदी रस्ता, जाधववाडी स्मशानभूमी सुशोभीकरण, काऱ्हाटी स्मशानभूमी बैठक व्यवस्था करणे या एकूण ४० लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. याशिवाय काळाडाग रस्ता ते जळगाव सुपे रस्ता, यशवंतराव सभागृह सुशोभीकरण करणे, जाधव वस्ती भैरवनाथ मंदिर रस्ता, उर्वरित रानमळा रस्ता, माकरवस्ती रस्ता, संजय लोणकर यांचे घर ते पीडीसीसी बँक रस्ता ही १ कोटी ५० लाख रुपयांची कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सरपंच श्रीमती दिपाली लोणकर, उपसरपंच श्रीमती रेखा लोणकर आणि ग्रामपंचायत सदस्यांच्यावतीने उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचा सत्कार करण्यात आला.

सुपे गावातील ३ कोटी ४५ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपे गावातील भैरवनाथ सभामंडप व नियोजित मंदिर, विविध रस्ते, भूमिगत गटार, प्राथमिक शाळा संरक्षण भिंत, ग्रामसचिवालय इमारत बांधकाम, समाज मंदिर, विठ्ठल मंदिर सभामंडप, स्वच्छतागृह, शह मन्सूर दर्गा भक्त निवास आदी एकूण ३ कोटी ४५ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांसह सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच श्रीमती अश्विनी सकट, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
0000

राजकारणात महिलांना सक्षम करण्यासाठी  ‘इंदिरा फेलोशिप’ : ससाने 

पुणे : खऱ्या समता आणि न्यायासाठी राजकारणात अधिक महिलांची गरज आहे. वर्षभरापूर्वी काँग्रेस पक्षाने राजकारणात महिलांचा आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने ‘इंदिरा फेलोशिप’ सुरू केली होती. आज हा उपक्रम महिला नेतृत्वासाठी एक सशक्त चळवळ बनला आहे. ह्या उपक्रमाचा लाभ पुणे शहरातील महिलांनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व इंदिरा फिलोशीप राज्य समन्वय दिपालीताई ससाने यांनी पत्रकार परिषदेत केले . पत्रकार परिषदेस युवा व क्रीडा प्रदेशाध्यक्ष  समिताताई गोरे. पुणे माजी महापौर कमलताई व्यवहारे, जीविका भुतडा, सुषमा घोरपडे आदी उपस्थित होते.

 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उपक्रम, ‘शक्ती अभियान’ चा उद्देश ‘महिलांच्या हितासाठी’ राजकारण आणि निर्णय घेण्याच्या सर्व स्तरांवर ‘महिला प्रतिनिधित्व’द्वारे समान अधिकारांना प्रोत्साहन देणे आहे असं  ‘शक्ती अभियान’ हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एक उपक्रम आहे.  ‘इंदिरा फेलोशिप’ माध्यमातून स्थानिक स्वत:ला सशक्त करण्याचा उद्देश आहे- राज्य संस्था/शहरी मंडळे, विधिमंडळे आणि संसद यांसारख्या शासनाच्या सर्व पातळ्यांवर महिलांसाठी समान जागा निर्माण करणे. इंदिरा फेलोशिप हा शक्ती अभियानाचा एक अविभाज्य भाग आहे, जो राजकीय क्षेत्रात महिलांचा आवाज मजबूत करण्यासाठी आणि आपल्या समाजात अत्यंत आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सन्मानार्थ एक उपक्रम आहे.

एका वर्षाच्या अल्प कालावधीत, 350 ते इंदिरा फेलोन यांनी 28 राज्ये आणि 300 तालुक्यांमध्ये 31,000 सदस्यांसह 4,300 शक्ती क्लब स्थापन केले आहेत;

समाज आणि राजकारणात खरा बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या सर्व महिलांनी शक्ती अभियानात सहभागी व्हावे आणि महिला केंद्रित राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन काँग्रेस पक्ष करते. शक्ती अभियानात सामील होऊन, तुम्ही तळागाळातील मजबूत संघटना निर्माण करण्यात आणि अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी योगदान द्याल. शक्ती अभियानात सामील होण्यासाठी https://www.shaktabhiyan.in वर नोंदणी करा आणि 8860712345 वर एसएमएस करा, कॉल करा. असे हि आवाहन यावेळी करण्यात आले . 

सिद्धार्थ शिरोळे यांनी केली मतदारसंघातील सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीच्या कामांची पाहणी

शिरोळे यांच्या विशेष प्रयत्नांमधून पहिल्या टप्प्यांत ७० सार्वजनिक शौचालयांची कामे होणार पूर्ण  

पुणे, दि. ३ ऑक्टोबर, २०२४ : छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विशेष प्रयत्नांनी मतदार संघातील सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीची अनेक कामे सुरु आहेत. शिरोळे यांनी आज स्वत: विविध ठिकाणी भेट देत या कामांची पाहणी केली.

टॉयलेट पाहणी अभियान या शिरोळे यांनी मतदार संघात हाती घेतलेल्या उपक्रमानंतर विविध ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था खराब असून सामान्य नागरिकांना अडचणी येत असल्याचे लक्षात आले व त्यांच्या दुरुस्तीची काम सुरु करण्यात आली.  

शिरोळे यांनी आपल्या प्रयत्नांमधून निधीची उभारणी केल्यानंतर पहिल्या टप्प्यांत ७० शौचालयांची दुरुस्तीची कामे सध्या सुरु आहेत. या दुरुस्त्यांमध्ये शौचालयांमध्ये पाण्याची सोय करणे, पाण्याची टाकी उभारणे, गरज असल्यास बोअर उभारणी, शौचालयातील भांडी, टाईल्स, नळ बसविणे, बाहेरील व आतील बाजूने रंगरंगोटी करणे, विजेची सोय करणे अशा अनेक कामांचा समावेश आहे.      

पहिल्या टप्प्यात खडकी, मुळा रस्ता, भोसलेवाडी, पुलाचीवाडी, १२०२ वसाहत, गोखलेनगर, पाटील इस्टेट, भैया वाडी, चाफेकर नगर, वडारवाडी, औंध, बोपोडी, चिखलदरा या भागांत असलेल्या शौचालयांची पाहणी आज करण्यात आली. शिवाय चिखलवाडी व सॅपरस खडकी येथे २ नवीन शौचालयांची उभारणीही करण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी शिरोळे यांच्या विशेष प्रयत्नांमधून १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या दुरुस्तीच्या कामांनंतर स्थानिक नागरिकांना दिलास मिळून त्यांना लवकरच स्वच्छ शौचालये  वापरायला मिळतील, असा विश्वास यावेळी शिरोळे यांनी व्यक्त केला.

युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड हवी : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे विचार

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित १० व्या जागतिक विज्ञान, धर्म/अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेच उद्घाटन
पुणे दि. ३ ऑक्टोबर ः” जागतिक शांतता दिवस साजरा करीत असताना दुसरीकडे अनेक देशात युद्धाचे सावट पसरले आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर येऊन जगात शांतता नांदावी. यासाठी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालावी लागणार आह.” असे विचार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे  विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे आयोजित जगातील सर्वात मोठ्या शांती घुमटात १० व्या जागतिक विज्ञान, धर्मे/अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या प्रसंगी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, द पॉवर ऑफ वर्ल्डस फाउंडेशनच्या संस्थापक देबोरा सवाफ, डॉ डीनीस क्वॉर्डा, जैन धर्मगुरू आचार्य लोकेश मुनी, प्रा. रूझान पश्चू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ.मंगेश तु. कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, संसदेचे मुख्य समन्वयक व प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पाडे उपस्थित होते.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, ” जागतिक शांततेच्या दिनी इराणहून इस्त्राइलवर २०० मिसाईल डागण्यात आले. दुसरीकडे रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत जागतिक शांतता दिवस कसा साजरा करू शकतो. तसेच उच्च शिक्षणात व्यावसायिक अभ्यासक्रमाला अधिक देण्यात आले आहे. यामध्ये विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणे कठीण झाले आहे. अशवेळेस विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून नवी पिढी घडवू शकतो. अध्यात्म हे अनुभवांकर आधारित असून आत्मिक आणि मानसिक शांतता मिळते. वर्तमान काळात दलाई लामा, नेल्सन मंडेला,य मार्टिन ल्युथर किंग, म.गांधी यांच्याकडून प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे.”
डॉ.विजय भटकर म्हणाले, ” २१ व्या शतकात शांततेने जगू शकू का हा प्रश्न सातत्याने निर्माण झाला आहे. सध्याच्या काळात मशीन आणि मनुष्या अशी जोडी भयानक वाटत आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय झाला. त्यामुळे भविष्यात शांततेबाबत चिंता वाटते. डॉ. कराड यांनी जागतिक संसदेच्या माध्यमातून सुरू केलेले प्रयत्न, नक्कीच शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” जगात शांतता नांदावी ही आता काळाची गरज आहे. जगाची परिस्थितीकडे आपण पाहिल्यास संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, महात्मा गांधी यांचे विचार अंमलात आणावे. आपल्या विचारातून आळंदी, अयोध्या, अजमेर या शहरांना जोडावे लागणार आहे. त्यासाठी आपल्याला वर्ल्ड पीस डोममध्ये सुरू असलेल्या, संसदेचा नक्कीच फायदा होणार आहे. ”
देबोरा सवाफ म्हणाल्या,” शांतता आणि एकात्मिकता प्रस्थापित करणे सर्वांची जवाबदारी आहे. तसेच मुलांना शाळांमधून ’इमोशनल इंटेलिजन्स’ शिकवण्याची गरज आहे. त्याशिवाय आपण प्रगती करू शकणार नाही. संस्कृती, अध्यात्म, विज्ञानाला ’इमोशनल इंटेलिजन्स’, ’इमोशनल कोशंट’ची जोड दिल्यास, आपण उत्कृष्ट युवा पिढी आणि जागतिक नेते नक्कीच घडवू शकू.”
डॉ. डीनीस क्वॉर्डा म्हणाले,” विज्ञान, तंत्रज्ञान, मानवता मूल्ये आणि धर्माच्या माध्यमातून जगात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. युद्धाच्या छायेत जगणारे व्यक्तींना आता तंत्रज्ञान आणि अध्यात्माच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यावर विचार करावा.”
राहुल कराड म्हणाले,” विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वक्षमता विकसित करायची आहे. यामध्ये शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्याला वाईट प्रवृत्तींकडून चांगल्याकडे जाण्याचा प्रयत्न अशा संसदेतून करायचा आहे.”
या नंतर ज्येष्ठ खासदार डॉ. करण सिंह आणि डॉ. टोड क्रिस्तोफरसन यांनी व्हिडिओया माध्यमातून शांतते संदर्भात विचार मांडले.
डॉ. आर.एम. चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.
सूत्रसंचालन डॉ. गौतम बापट यांनी केले.