मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार
पुणे- – कोंढवा परिसरात बोपदेव घाटामध्ये मित्रासोबत फिरावयास गेलेल्या एका 21 वर्षे महाविद्यालयीन तरुणीवर अनोळखी 3 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींवर कोंढवा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नुकतेच दोन दिवसांपूर्वीच बोपदेव घाटात मित्रांसोबत फिरावयास गेलेल्या एका तरुणीचे कारमधून एका तरुणाने अपहरण केले होते. तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा गाडीत विनयभंग करून आरोपी तरुणीला सोडून पळून गेला होता. त्यानंतर आता पुन्हा बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे.
पीडित मुलगी ही मूळची सुरत येथील राहणारी असून तिचा मित्र जळगाव येथील राहणार आहे .सदर दोघे पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. गुरुवारी रात्री सदर दोघे दुचाकी वर बोपदेव घाट या ठिकाणी फिरावयास गेले होते .त्यावेळी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान तीन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आल्या त्यांनी जबरदस्ती करत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला .सदर जागा ही एकांत ठिकाणी असल्याने कोणतीही मदत पीडित मुलीस मिळू शकली नाही.
या घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत असलेले पीडित मुलीस तिच्या मित्राने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी घेतल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती कोंढवा पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी येऊन घडलेल्या घटनेची माहिती घेत आज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी पाच वाजता याबाबत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या 10 टीम आणि डीबी पथक रवाना करण्यात आले आहे.