पुणे:
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’ निमित्त पुण्यात ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘नागरी समाज व निवडणुका ‘ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे (दिल्ली)यांचे व्याख्यान गांधी भवन येथे झाले. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी होते.एड. स्वप्नील तोंडे यांनी सूत्र संचालन केले. स्नेहा कारंजकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. अप्पा अनारसे यांनी स्वागत केले. जांबुवंत मनोहर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.
अन्वर राजन,डॉ.अच्युत गोडबोले, डॉ. उर्मिला सप्तर्षी,डॉॅ.प्रवीण सप्तर्षी,आनंद करंदीकर, ज्ञानेश्वर मोळक,विकास लवांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अशोक वानखेडे म्हणाले,’ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीने उधळलेल्या बैलाला काबू करून कामाला लावण्याचे काम केले आहे. वक्क विधेयकावरून घेतलेली माघार त्याचीच निदर्शक आहे.केलेल्या कुकर्मातून सन्माननीय रित्या बाहेर जाण्याचा मार्ग त्यांच्या कडून शोधला जात आहे. संघ परिवार सुधारून काही वक्तव्ये करीत असला तरी त्यात तथ्य नाही. पंतप्रधानांनी सतत असत्य बोलण्याची शपथ घेतली आहे. इलेक्टोरल बाँड हा मोठा भ्रष्टाचार आहे. शेतकऱ्यांना लुटले जात आहे. त्यांच्या समोर रोज नव्या अडचणी उभ्या केल्या जात आहेत. नागरी समाजाने सत्ताधाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
महाराष्ट्रात राजकीय व्यभिचार चालू आहे. कर्जाच्या ओझ्याखाली राज्य दबले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा गेली आहे.स्वाभिमानी महाराष्ट्राला १५o० रुपयांची भीक घातली जात आहे. या भीकेची सवय लावून घेता कामा नये. कामाची सवय गेलेला समाज बरबाद होणार आहे. म्हणून राज्यात सत्तापालट करणे गरजेचे आहे.विधायक काम करणारे लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजे.
गांधीजींबद्दल बोलताना वानखेडे म्हणाले,’ गांधीजींना पुस्तकात, पुतळयात ठेऊन उपयोग नाही. गांधीजी आपल्या दैनंदिन जीवनात असले पाहिजेत. त्यांचे विचार कृतीत आणले पाहिजेत. गांधीजींची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देता कामा नये.
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,’ गांधी सप्ताह हा विचारांचा यज्ञ आहे. पुणे हे देशाचे वैचारिक केंद्र आहे. हल्ली उत्सवात आपण अंशा अंशाने बहिरे होत आहोत. पुण्यातील वैचारिक उत्सव थांबला तर देश मागे जाईल. तसे होऊ नये यासाठी ही वैचारिक परंपरा गांधी सप्ताहातून चालू आहे.
सप्ताहातील आगामी कार्यक्रम
४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एलोरा बोरा यांचे भरतनाट्यम नृत्य आयोजित करण्यात आले आहे.दि.५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जेएनयू मधील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.मणिंद्रनाथ ठाकूर यांचे २१ वी सदी की समस्याए और गांधी ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत.सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संसदीय आणि बिगर संसदीय राजकारण’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे,अभ्यासक चैत्रा रेडकर, प्रा. सुरेंद्र जोंधळे सहभागी होणार आहेत. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी असतील.
खादी प्रदर्शन,गांधी चित्रपट महोत्सव
गांधी सप्ताहानिमित्त ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह फिल्म फेस्टीव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.गांधी भवन मध्ये विविध चित्रपट जात आहेत.दि.३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम’ हा चित्रपट दाखवला गेला.दि.४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘टू मच डेमोक्रसी’,दि.५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘कोर्ट’,दि.६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘द किड’,दि.७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम कॉम्रेड’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.
महात्मा गांधी यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शन मुख्य सभागृहात सप्ताहभर खुले असेल. गांधी भवन आवारात खादी प्रदर्शन,पुस्तक प्रदर्शन,इतर गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले आहेत.