Home Blog Page 665

२६ ऑक्टोबर’ला मान्यवरांच्या उपस्थितीत ‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’चे वितरण

गरजू व प्रतिभावान विद्यार्थांनी लाभ घ्यावा- सनी विनायक निम्हण यांचे आवाहन

पुणे,ता.४: दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या व्दितीय स्मृतिदिनानिमित्त ‘सोमेश्वर फाऊंडेशन’ तर्फे पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना ‘विनायकी’ विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. पुणे शहरातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार असून याची नोंदणी www.sunnynimhan.com या संकेस्थळावर १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सुरू आहे.

संकेतस्थळावर नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची दि १८, १९, २० ऑक्टोबर २०२४ ला, सोमेश्वर फाऊंडेशन कार्यालय, ४४८, गोपी भवन, शैलेजा हॅाटेल लेन, शिवाजीनगर, पुणे- ५ येथे प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थांना दि २६ ऑक्टोबर २०२४ ला, बालगंधर्व रंगमंदिर , जंगली महाराज रोड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शिष्यवृत्तीचे वाटप केले जाईल.

मागील वर्षी या गौरव शिष्यवृत्तीद्वारे ३६८ गरजू व प्रतिभावान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली होती. यावर्षी देखील अशा गरजू व प्रतिभावान विद्यार्थ्यांना संधी देत आहोत. इयत्ता पाचवी व आठवी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या आणि काहीच गुण कमी पडल्यामुळे शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उमेद न सोडता प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक व्हावे यासाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येते. डिप्लोमा, आयटीआय तसेच आर्टस, सायन्स, कॉमर्स, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर,
कृषी, फार्मसी, मॅनेजमेंट, लॉ, जर्नालिझम इत्यादी शाखांतील पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक निकष, नियम व अटीची पुर्तता करून गौरव शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

“माणसाला उत्तम आरोग्य आणि शिक्षण मिळाले तर, कोणत्याही संकटावर पाय रोवून उभं राहण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण होते” असा विचार मांडणारे दिवंगत आमदार विनायक निम्हण यांनी आरोग्य आणि शिक्षणाला विशेष महत्त्व दिले. सोमेश्वर फाऊंडेशनच्या माध्यमातून कला, क्रिडा, साहित्य, शैणक्षिक असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी विषयक व्याख्यानमाला, गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ तसेच करियर मार्गदर्शन असे उपक्रम आयोजित करण्यात येतात. दरवर्षी नियमितपणे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपही करण्यात येते. १९९९ पासून ‘नो डोनेशन.. नो डिपॉझिट तत्वावर ‘सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल’, ज्युनिअर कॉलेज कोथरूड, पाषाण ही संस्था उभी करून अनेक विद्यार्थी घडवले. यासह त्यांनी, सामाजिक कार्य व्यापक स्वरूपात करण्यासाठी ‘सोमेश्वर फाऊंडेशन’ची स्थापना केली.

आरोग्य क्षेत्रातही सोमेश्वर फाऊंडेशन मागील अनेक वर्षेपासून उत्तम काम करत आहे. त्यामध्ये मागील दोन वर्षात पुण्यात ‘कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबीर, एकच ग्वाही – तपासणीपासून शस्रक्रियेपर्यंत मोफत सर्वकाही, असे भव्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यात दोन्ही वर्षाचे शिबिर मिळून जवळपास सव्वा लाख रुग्णांनी सहभाग घेतला होता. या शिबीरात जगविख्यात डॉक्टरांकडून उपचार तसेच विविध तपासण्या, चाचण्या आणि अगदी मोठ्या शस्त्रक्रियाही मोफत करण्यात आल्या. गरजू रुग्णांना या महा-आरोग्य शिबीराचा मोठा लाभ झाला आहे. सदर माहिती सोमेश्वर फाऊंडेशनचे सनी विनायक निम्हण यानी दिली. यावेळी फाऊंडेशनचे बिपीन मोदी, उमेश वाघ, अमित मुरकुटे, अनिकेत कपोते उपस्थित होते.

व्यावसायिकाची गृहप्रकल्पात 95 कोटींची आर्थिक फसवणूक:लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

पुणे- लोणीकंद याठिकाणी प्रकल्पाच्या विकासासाठी गुंतवणूक घेऊन व्यवसायिकाची तब्बल 94 कोटी 49 लाख 44 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रवी राज सक्सेना यांनी सर्बिबिया असोसिएट ट्रस्ट पुणे यांच्यातर्फे लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.

सदर तक्रारीनुसार, पोलिसांनी एस एस जी रियालिटी अँड इन्फ्राचे भागीदार प्रणय प्रकाश सिंघी ( राहणार -मोहम्मदवाडी ,पुणे ), सुशील एकनाथ घुले (राहणार -हडपसर ,पुणे ),अभिजीत वसंत शेंडे ,सौरभ एकनाथ घुले आणि विनय प्रकाश सिंघी व इतर आरोपींवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे .सदरची घटना जानेवारी 2015 ते 22 /7/ 2023 यादरम्यान घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,तक्रारदार रवी सक्सेना व इतर गुंतवणूकदार यांचा बांधकाम व्यवसाय आहे. आरोपींनी त्यांच्या प्रकल्पातील फ्लॅट खरेदी धारकांकडून 62 कोटी व वित्तीय फर्मकडून 25 कोटी रुपये कर्ज स्वरूपात घेतले. परंतु, पाच वर्षापासून सदर प्रकल्प पूर्ण केलेला नाही. त्यांना सदर प्रकल्पाकरीता घेतलेल्या एकूण 87 कोटी कर्ज रकमेपैकी केवळ 30 ते 35 कोटी रुपये बांधकामा करीता वापरले असून रेराद्वारे खरेदीदरांची खोटी मुदतवाढ घेऊन चुकीच्या पद्धतीने बांधकाम पूर्ण करून खरेदीदारंची फसवणुक केली आहे. याबाबत पुढील तपास गुन्हे शाखेचे आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डांगे करत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सुरक्षेवर अपयशी ,राजीनामा द्या – खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

पुणे-राज्यात राेज महिलांवर बलात्कार, विनयभंग, अत्याचार घटना घडतात. त्यातून वर्दीची भीती राहिली नसल्याचे दिसून येते. पाेलिस यंत्रणेचे नेतृत्व याला जबाबदार असून या प्रकरणी गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली

महिला अत्याचाराच्या घटना राेखण्यासाठी काेणत्याही उपाययाेजना हाेताता दिसत नाही. वेळेत गुन्हा दाखल करुन फास्टट्रक न्यायालयात केस चालवून भर चाैकात दाेषीला फाशीची शिक्षा द्या ही सातत्याने मागणी आम्ही करतो. पण हे सरकार एन्काउंटर करुन पाेस्टरबाजी करते. हे गलिच्छ राजकारण आहे. एखाद्या मुलीवर अत्याचार हाेताे व त्यावर घाणरेडे राजकारण होते हे चुकीचे आहे, त्या म्हणाल्या.सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपण पोलिसांच्या वर्दीचा मान, सन्मान राखतो. देशात सर्वात चांगले पाेलिस हे महाराष्ट्रात आहेत. परंतु आज या यंत्रणेला काय नेमके झाले आहे? त्याचे मूळ कारण मंत्रालय हे आहे. पाेर्श सारखी कार भरधाव वेगात येते व एखाद्यास उडून जाते, आराेपींचे रक्ताचे नमुने बदलले जातात, महिला अत्याचार घडतात, ससून रुग्णालयातून ड्रग डिलर गायब हाेताे या गाेष्टी महाराष्ट्राला न शाेभणाऱ्या आहेत. एन्काउंटर करुन प्रश्न सुटत नाहीत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माझ्या खूप अपेक्षा हाेत्या. परंतु गृहमंत्री यांचे बंदूक हातात घेतलेले पाेस्टर राज्यात लागत असतील तर ही बाब याेग्य नाही.राज्य सरकार महिला सुरक्षेवर अपयशीसद्यस्थितीत एक नागरिक व लाेकप्रतिनिधी म्हणून प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. बदलापूरची घटना ही काही टीव्हीवरील मिर्झापूर सारखी मालिका नाही. ते वास्तव आहे. राज्याच्या व देशाच्या लेकी बद्दल पाेस्टरबाजी करणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजे. एखाद्या मुलीवर अत्याचार हाेताे व त्यावर घाणरेडे राजकारण करणे चुकीचे आहे. एकमेकांविराेधात पाेस्टरबाजी करुन क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला जाताे. हे दुर्देवी आहे. ट्रिपल इंजिन सरकारचा मी जाहीर निषेध करते. महिला सुरक्षा बाबत राज्य सरकार अपयशी ठरलेले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.हर्षवर्धन पाटील कुटुंबाशी कौटुंबिक संबंधमाजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमचे कुटुंबाचे सहा दशकांपासून काैटुंबिक संबंध आहेत. ते भाजपात असताना देखील ते संबंध आम्ही जपले. भाऊ आज पुन्हा घरी येतात त्याचा आम्हाला आनंद व समाधान वाटले. काही कारणामुळे मध्यंतरी दुरावा आला पण ताे राजकीय दुरावा हाेता. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आमच्या मनात नेहमीच प्रेम व आदर भावना आहे, असेही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.

पुणे नवरात्रौ महोत्सवात पंडित भीमसेन जोशी यांचा सांगीतिक प्रवास उलगडला

पुणे-पुणे नवरात्रौ महोत्सवात आज भारतरत्न स्वारभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले अजरामर अभंग, भजने, नाट्यगीते, ठुमरी आज श्रीनिवास भीमसेन जोशी व विराज श्रीनिवास जोशी या  पितापुत्रांनी आपल्या बहारदार गायकीने पंडित भीमसेन जोशी यांचा सांगीतिक प्रवास उलगडला.
 ३०व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या उद्घाटनानंतर सायंकाळी  ‌‘परंपरा‌’ कार्यक्रमाअंतर्गत भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, श्रीनिवास जोशी ते विराज जोशी यांचा सांगीतिक प्रवास उलगडणारा कार्यक्रम पार पडला. आपल्या बहारदार गायकीने  श्रीनिवास जोशी व विराज जोशी  पितापुत्रांनी पं. भीमसेन जोशी यांनी गायलेले अभंग, भैरवी, भजन सादर करून श्री. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे श्रोत्यांची मने जिंकली. श्रोत्यांनी टाळ्यांची दाद देऊन कार्यक्रमात रंगत आणली.
 अविनाश दिघे यांनी हार्मोनियम, पांडुरंग पवार यांनी तबला व माऊली टाकळकर  यांनी त्यांना साथसंगत देऊन कार्यक्रमात रंग  भरला.
 शाम बजाय आज मुरलीया हे या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘दान करी रे गुरुधन अति पावन, श्रेयभाग जाण हा कुठूनि तुजसी लाभला’ या नाट्यगीतांच्या सादरीकरणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
 
   ‘जय दुर्गे दुर्गति परिहारिणी शंभूविदारिनी, माता भवानी जय जय दुर्गाती’ हे रण जंगला ताल सादर करून वाहवा मिळवली. ‘देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल हा अभंग सादर करून विठ्ठलाचे रूप उलगडले.
 
आगा वैकुंठीच्या राया’ ही भैरवी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले ख्यालगायन, आर्त ठुमरी, संतवाणी, बंदिश, नाट्यगीत, अभंग श्रीनिवास जोशी व विराज जोशी या पितापुत्रांनी आपल्या गायकीने पंडित भीमसेन जोशी यांना जणू आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला उत्तरोत्तर रंगत आली. रसिकांनी माना डोलवून व टाळ्यांची दाद देऊन प्रतिसाद दिला. याप्रसंगी श्रीनिवास जोशी व विराज जोशी यांच्यासह सर्व कलाकारांचा सत्कार सागर बागुल यांनी केला.
नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.

पंतप्रधान ठाण्यातील 32,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.  ते वाशिमकडे प्रयाण करतील आणि सकाळी 11.15 वाजता पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील. वाशिम येथील संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते श्रद्धांजली अर्पण करतील.  त्यानंतर, पंतप्रधान सकाळी 11:30 वाजता, बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करतील.  दुपारी 12 वाजता ते सुमारे 23,300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ करतील.  दुपारी 4 वाजता, पंतप्रधान ठाणे येथे 32,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.  त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता, मुंबईमधील बीकेसी मेट्रो स्टेशनवरून पंतप्रधान बीकेसी ते आरे जेव्हीएलआर दरम्यान धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय पंतप्रधान बीकेसी आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान मेट्रो द्वारा प्रवास देखील करणार आहेत.

पंतप्रधानांचे वाशिम मधील कार्यक्रम
शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20,000 कोटी रुपयांचा पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित करतील. या 18 व्या हप्त्यासह, पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना जारी केलेला एकूण निधी सुमारे 3.45 लाख कोटी रुपये असेल. याशिवाय, पंतप्रधान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या 5व्या हप्त्याचेही वितरण करतील.
पंतप्रधान कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) अंतर्गत 1,920 कोटी रुपयांचे 7,500 हून अधिक प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. या प्रमुख प्रकल्पांमध्ये कस्टम हायरिंग सेंटर, प्राथमिक प्रक्रिया युनिट, गोदामे, वर्गीकरण आणि प्रतवारी केंद्र, कोल्ड स्टोरेज प्रकल्प, काढणीपश्चात व्यवस्थापन प्रकल्प यांचा समावेश आहे. 
पंतप्रधान सुमारे 1,300 कोटी रुपयांची एकत्रित उलाढाल असलेले 9,200 शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) राष्ट्राला समर्पित करतील.

त्याशिवाय, पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा पंतप्रधान शुभारंभ करतील. शेतकऱ्यांना पशुधनात वाढ करण्याकरिता परवडणाऱ्या किमतीत लिंग-वर्गीकृत वीर्याची उपलब्धता वाढवण्याच्या आणि त्याची किंमत प्रति मात्रा सुमारे 200 रुपयांपर्यंत कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. देशी पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप, गौचिप आणि म्हशींसाठी माहीचिप जिनोटायपिंग सेवांसह विकसित करण्यात आल्या आहेत. जनुकीय निवडीच्या अंमलबजावणीमुळे तरुण उच्च दर्जाच्या बैलाची कमी वयातच निवड करणे शक्य होणार आहे.
याशिवाय, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2.0 अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 19 मेगावॅट क्षमतेचे पाच सौर ऊर्जा पार्क पंतप्रधानांच्या हस्ते लोकसमर्पित केले जातील. कार्यक्रमादरम्यान ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांचाही सन्मान करतील.

पंतप्रधानांचे ठाण्यातील कार्यक्रम
या प्रदेशात नागरी गतिशीलता वाढवण्याच्या मोठ्या प्रयत्नाचा भाग म्हणून, पंतप्रधान प्रमुख मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.  सुमारे 14,120 कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो लाईन – 3 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी विभागाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. या विभागात 10 स्थानके असून त्यापैकी 9 स्थानके भूमिगत आहेत. मुंबई मेट्रो लाइन – 3 हा एक महत्त्वाचा सार्वजनिक वाहतूक प्रकल्प आहे ज्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमधील प्रवास सुखकर होईल. लाईन-3 पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर याद्वारे दररोज सुमारे 12 लाख प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा आहे.
सुमारे 12,200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.  या प्रकल्पाची एकूण लांबी 29 किमी असून त्यात 20 उन्नत आणि 2 भूमिगत स्थानके आहेत.  हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र असलेल्या ठाण्याच्या वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
सुमारे 3,310 कोटी रुपये खर्चाच्या छेडा नगर ते आनंद नगर, ठाणे या उन्नत पूर्व मुक्त मार्गाच्या विस्ताराची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ते ठाण्यापर्यंत अखंड संपर्क सुविधा उपलब्ध होणार आहे.
याशिवाय, पंतप्रधान सुमारे 2,550 कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (NAINA) प्रकल्पाच्या फेज-1 ची पायाभरणी करतील.  या प्रकल्पामध्ये प्रमुख रस्ते, पूल, उड्डाणपूल, अंडरपास आणि एकात्मिक उपयोगिता पायाभूत सुविधांचे बांधकाम समाविष्ट आहे.
सुमारे 700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे महापालिकेच्या इमारतीची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.  ठाणे महानगरपालिकेची उंच प्रशासकीय इमारत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इमारतीत एकाच ठिकाणी महानगरपालिका कार्यालये सामावून घेऊन ठाण्यातील नागरिकांचा त्रास कमी करणार आहे.

राज ठाकरे यांच्या हस्ते वैशाली माडे म्युझिक ॲकडमीचे उद्घाटन

मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीला आजवर वैशाली माडे अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. आपल्या सुमधुर गायकीने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणाऱ्या वैशाली माडे आता एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहेत. नुकतीच त्यांनी वैशाली माडे म्युझिक ॲकडमी सुरु केली असून या ॲकडमीचे उद्घाटन माननीय राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. या भव्य उद्घाटन सोहळ्याला संसद सदस्य रवींद्र वायकर, बॉलिवूड पार्श्वगायिका साधना सरगम, मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख कुणाल इंगळे उपस्थित होते.

या सोहळ्याबद्दल राज ठाकरे म्हणतात, ”वैशाली माडे एक मोठी गायिका आहे. संगीत अकादमी सुरू करून आज तिने तिच्या कलेचा वारसा इतरांना देण्याचा एक स्तुत्य प्रयत्न केला आहे. तिच्या अकादमीच्या माध्यमातून आज भावी गायक घडतील आणि मोठे होतील. आपले मराठी संगीत हे आपणच पुढे नेले पाहिजे.’’

आपल्या या नवीन प्रवासाबद्दल वैशाली माडे म्हणतात, ” एखादी संगीत ॲकडमी सुरु करावी, अशी माझी कित्येक वर्षांपासून इच्छा होती आणि आज माझे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. माननीय राज ठाकरे हे कलाप्रेमी आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. ते नेहमीच कलेला प्राधान्य देत आले आहेत. अशा कलाप्रेमीने माझ्या या संगीत ॲकडमीचे उद्घाटन केले, हे सुखावह आहे. या ॲकडमीच्या माध्यमातून आम्ही नवीन गायक घडवणार आहोत. येथे विद्यार्थ्यांना व्होकल, इंस्ट्रूमेंटल, कराओके, गझल या सगळ्यांचा अभ्यास करता येणार आहे. खूप आनंद होतोय की, या ॲकडमीच्या माध्यमातून मी कलाप्रेमींपर्यंत पोहोचू शकणार आहे. आमची ही संगीत ॲकडमी महत्त्वाकांक्षी संगीतकारांसाठी दीपस्तंभ म्हणून कायमच उभी राहील. आमची संपूर्ण टीम संगीताच्या परिवर्तनशील शक्तीवर विश्वास ठेवणारी असल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांमधून एक अद्वितीय आवाज शोधण्यासाठी आम्ही कायमच वचनबद्ध असू. या आवाजाला उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा कायमच प्रयत्न राहील. इथे तुम्ही तुमच्या पॅशनला शिक्षणाच्या रूपात बदलू शकता आणि या प्रवासात आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू.’’

भरतनाटयम् नृत्याने जिंकली रसिकांची मने !

पुणे:महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’ निमित्त पुण्यात ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एलोरा बोरा यांचे भरतनाट्यम नृत्य आयोजित करण्यात आले होते. गांधी भवन येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी होते. स्नेहा कारंजकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. भरतनाट्यम् कलाकार श्रीमती एलोरा बोरा,मायुखी बेजबरूआ यांचा शालिनी टेकाळे यांनी सत्कार केला. तेजस भालेराव यांनी कलाकारांचा परिचय करून दिला.अन्वर राजन यांनी आभार मानले. एड. स्वप्नील तोंडे यांनी सूत्र संचालन केले.डॉॅ.उर्मिला सप्तर्षी,डॉॅ.प्रवीण सप्तर्षी, जांबुवंत मनोहर,श्रीराम टेकाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्रीमती एलोरा बोरा,मायुखी बेजबरू गुवाहटी (आसाम ) मधील प्रसिद्ध भरत नाटयम् कलाकार आहेत.गणेश वंदनेने त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली.यानंतर राग मालिका ,ज्योतीस्वरम ,शब्दम, श्रीमन् नारायणा ,अष्टपदी, वैष्णव जन तो, या नृत्य रचना सादर केल्या.मंगलम या नृत्य रचनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.

सप्ताहातील आगामी कार्यक्रम

दि.५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जेएनयू मधील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.मणिंद्रनाथ ठाकूर यांचे २१ वी सदी की समस्याए और गांधी ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत.सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संसदीय आणि बिगर संसदीय राजकारण’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे,अभ्यासक चैत्रा रेडकर, प्रा. सुरेंद्र जोंधळे सहभागी होणार आहेत. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी असतील.

खादी प्रदर्शन,गांधी चित्रपट महोत्सव

गांधी सप्ताहानिमित्त ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह फिल्म फेस्टीव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.गांधी भवन मध्ये विविध चित्रपट दाखविले जात आहेत.दि.४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘टू मच डेमोक्रसी’ चित्रपट दाखवला गेला,दि.५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘कोर्ट’,दि.६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘द किड’,दि.७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम कॉम्रेड’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.

महात्मा गांधी यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शन मुख्य सभागृहात सप्ताहभर खुले असेल. गांधी भवन आवारात खादी प्रदर्शन,पुस्तक प्रदर्शन,इतर गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले आहेत.

मराठी भाषा विकास आणि प्रचार यादृष्टीने आगामी काळात काम करावे लागेल – केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे-
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा भाषेचा गौरव आहे. आता आपले काम सुरू झाले असून भाषा विकास आणि प्रचार यादृष्टीने काम करावे लागेल. मराठी शाळेत दर्जा सुधारणे, पटसंख्या वाढवणे याबाबत काम करावे लागेल. आपली पुढील काळात परीक्षा आहे आगामी काळात आपण प्रयत्न करावे लागणार आहे. पुढील अर्थसंकल्पात भाषा करीता निधी तरतूदसाठी काम करण्यात येईल असे मत केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. यावेळी अभिनेते प्रवीण तरडे यांनी केंद्र शासनाचा अभिनंदन ठराव केला.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या निमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पुणे पुस्तक महोत्सव आणि संवाद पुणे यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, रामदास फुटाणे,
पुणे विद्यापीठ कुलगुरू सुरेश गोसावी, अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष दीपक मानकर,माजी खासदार प्रदीप रावत, राजीव तांबे, राहुल सोलापूरकर, आनंद माडगूळकर, प्रवीण तरडे, धीरज घाटे, किरण साळी, राजीव बर्वे, सुनील महाजन, राजेश पांडे उपस्थित होते.

साहित्य संमेलन माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले की, मराठी भाषेला दर्जा मिळाला आता केंद्र सरकार काय करणार हे सांगण्यात आले. प्रगत भाषेला निधी देण्याची तरतूद करण्यात यावी. राज्य शासन त्याला पाठबळ आगामी काळात देईल. प्रत्येक भाषेचे सेंटर ऑफ एक्सेलंस तयार करून त्यात मनुष्यबळ उपलब्ध करावे. देशात 50 पेक्षा अधिक केद्रिय विद्यापीठ आहे त्याठिकाणी आपल्या भाषेचे अध्यासन केंद्र सुरू करण्यात यावे. अभिजात भाषा यांना कोणताही मतभेद न करता सम प्रमाणात निधी देण्यात यावा तसेच त्याकरीता वेगळे निधी तरतूद करण्यात यावी. अभिजात भाषा दर्जा दिल्याने मराठी भाषा प्राचीन आणि कोणत्या दुसऱ्या भाषेतून आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठी भाषा ज्ञान भाषा झाली पाहिजे. मराठी नाटक, सिनेमा आपण पहिले पाहिजे, मराठी पुस्तके विकत घेऊन वाचावी. आपली भाषा बाबत अस्मिता टोकदार होणार नाही तोपर्यंत ती जिवंत राहून टिकणार नाही.

रामदास फुटाणे म्हणाले , 11 वर्ष रखडलेले काम पूर्ण केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन आहे. जर्मन, फ्रांस आणि चीन या देशात मातृ भाषेत शिक्षण दिले गेल्याने त्यांनी विकास साधला. अभिजात दर्जा टिकवणे हे साहित्यिक, कलाकार यांचे काम आहे. विद्यापीठ मध्ये भाषेचे शिक्षण दिले जाते पण त्याचा वापर प्रत्यक्षात दैनंदिन जीवनात झाला पाहिजे.इंग्रजी भाषा आपल्याला टाळता येत नाही पण मराठी भाषा आपल्याला विसरता येणार नाही ती जिवंत ठेवण्याचे काम आगामी काळात करावे लागेल.

पुणे विद्यापीठ कुलगुरू सुरेश गोसावी म्हणाले, मराठी भाषा भवन विद्यापीठ मध्ये राबविण्यात येत आहे. एक हजार पुस्तके मराठी भाषेत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संशोधन दृष्टीने ते पुढे नेण्यात येईल.

राहुल सोलापूरकर म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी भांडारकर संस्थेने पुढाकार घेतला आणि तीन प्राध्यापक यांनी त्यात सक्रिय भाग घेऊन 126 पानी अहवाल केंद्र सरकारला सन 2013 मध्ये पाठवला होता. आज आपल्याला त्याची पूर्तता झाली आहे. मराठी शाळा सक्षम झाल्या पाहिजे, मराठी बोलण्याचा आग्रह सर्वांनी केला पाहिजे. जो मातृभाषेत विचार व्यक्त करतो तो अधिक प्रगल्भ असतो.

जेष्ठ साहित्यिक आनंद माडगूळकर म्हणाले, इंग्रजी भाषेला विरोध करणे बाजूला ठेवून आपली भाषा विकसित करण्याचे धोरण अवलंबण्यात यावे. मराठी भाषा राज्यातील सर्व शाळेत बंधनकारक करण्यात यावी. त्यात मराठी भाषा संस्कृती समाविष्ट करण्यात यावी. इतरांचा द्वेष न करता आपली भाषा प्रगल्भ करावी.

राजेश पांडे प्रास्ताविक करताना म्हणाले, पुणे शहराचे साहित्य, भाषा यावर मोठे प्रेम असल्याचे पुस्तक मोहत्सव मधून दिसून आले आहे. अनेकजणांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले. अनेक वर्षानंतर स्वप्नं सत्यातले असून आज आनंदाचा क्षण आहे. संवाद पूनेचे सुनील महाजन यांनी आभार प्रदर्शन केले.

महाराजा श्री अग्रसेन यांची जयंती वाकडमध्ये उत्साहात साजरी

शोभायात्रेसह गुणवंत विद्यार्थी व समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा झाला सन्मान

वाकड : अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत महाराजा श्री अग्रसेनजी यांची जयंती अग्रवाल समाज पार्क स्ट्रीट सोसायटी वाकड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोसाइटीमध्ये असलेल्या गणपती मंदिरापासून महाराजा श्री अग्रसेन यांच्या प्रतिमेची मनोभावे शोभायात्रा काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात तसेच महाराजा श्री अग्रसेन जी की जय असा जयजकार करीत शोभायात्रा मार्गस्थ झाली.
शोभायात्रेनंतर वाकडच्या हाॅटेल अॅम्बियन्समध्ये महाराजा श्री अग्रसेन जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या ठिकाणी महाराजा अग्रसेन यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच आरती करण्यात आली. या समारंभात अग्रसेन महाराजांच्या १८ मुलांची नावे व गोत्र आणि त्यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
या वेळी सर्वोत्तम कार्य करणारे अग्रवाल समाजातील वरिष्ठ नागरिक ईश्वरचंद अग्रवाल, धरमपाल अग्रवाल, लक्ष्मीनारायण अग्रवाल, सुभाष अग्रवाल यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय या वेळी 8 वी ते 12 वी आणि ग्रॅज्युएशन पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी संगीत, नाट्य, कला, क्रीडा, स्पर्धेत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले त्या विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले.
या समारंभाला पवन अग्रवाल, डाॅ. अशोक अग्रवाल, राजकुमार अग्रवाल, नितिन अग्रवाल, मधुसुदन गर्ग, दिनेश अग्रवाल यांच्यासह समाजातील महिला-पुरुष आणि लहान मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होती.

काव्य लेखन करणे सोपे नाही – ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गुर्जर  

  • डॉ. नितीन करीर यांच्या उपस्थितीत डॉ. दाक्षायणी पंडित यांच्या “सोबतीला तू” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन 

पुणे : काव्य लेखन हा एक महत्वाचा साहित्य प्रकार आहे. कविता ही हृदयातून प्रकट होत असते. आपण सर्वच आपापल्या परीने कधीना कधी कविता करतच असतो. महाकवी व्यास वाल्मिकी पासून आपल्याकडे कवितेची मोठी परंपरा आहे. महाकवी कालीदास, संत ज्ञानेश्वर, तुकाराम या संत कवींपासून मर्ढेकर, कुसूमाग्रज, पाडगावकर, आरती प्रभू, ग्रेस अशी खूप मोठी यादी आहे. मात्र, कविता करणारे सगळेच कवी नसतात तर, मागणी प्रमाणे काव्य पाडणारे हे गीतकार असतात. असे काव्य लेखन करणे सोपे नाही. डॉ. दाक्षायणी पंडित यांच्या काव्य लेखनात लालित्य आणि गेयता असे सगळे गुण दिसतात, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गुर्जर यांनी व्यक्त केले.  

डॉ. दाक्षायणी पंडित लिखित “सोबतीला तू” हा गेय कवितांचा संग्रह (समग्र प्रकाशन) प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी लेखक रवींद्र गुर्जर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे निवृत्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर उपस्थित होते. यांसह कार्यक्रमास समग्र प्रकाशनचे देविदास पाटील व वैशाली प्रकाशनचे विलास पोतदार आदी उपस्थित होते.

निवृत्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर म्हणाले, वैद्यकीय पेशा आणि कविता लेखन यांचा तसा तर काहीही संबंध नाही. पण डॉ. पंडित यांनी तो ‘गियर’  बदलण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. त्यांच्या कविता या उस्फूर्त व मानवी भावनांना स्पर्श करतात. 

कवियत्री  डॉ. दाक्षायणी पंडित यांनी यापूर्वी आकाशवाणी, दूरचित्रवाणी आणि विविध वर्तमान पत्रांसाठी वैद्यकीय लेखन केले आहे. तर निवृत्ती नंतर त्यांनी हा काव्यासंग्रह साकारला आहे. या काव्यसंग्रहास दिवंगत ज्येष्ठ लेखक ना. धों. महानोर यांची प्रस्तावना लाभली आहे. याच कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखक मार्क ट्वेन यांच्या ‘ॲडव्हेंचर्स ऑफ टाॅम साॅयर’ या कादंबरीचे डाॅ. दाक्षायणी यांनी साकारलेली संक्षिप्त आवृत्तीही (वैशाली प्रकाशन) प्रकाशित करण्यात आली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डाॅ. दाक्षायणी यांनी लिहिलेली व स्वरबद्ध केलेली नादमधुर गाणी डॉ. राधिका जोशी यांनी गायली. त्यांना निनाद सोलापूरकर यांनी कीबोर्डवर साथ दिली. या कार्यक्रमास श्रोत्यांनीही उत्तम दाद दिली. 

या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ दिवंगत कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांची प्रास्तावणा लाभली असून त्यामणि त्यात म्हंटले आहे की, या संग्रहातील कविता नवनवे छंद, गीतरचना अशा छंदोमयी आहेत, त्यामुळे वाचताना मजा येते. अशा कवितांसाठी कवीजवळ शब्दभांडार व गीतभांडाराचा ऐवज गणगोतासारखा जवळ असावा लागतो. तो आहे. कुठेही तो ‘टाका’ चुकलेला दिसत नाही. कवितेनं सगळं सांगू नये, नेमकं सांगावं व त्याशिवायच्या अनेक वलयांनी त्याला अलिखित शब्दांच्या दुनियेत कवळून बसावं. कवयित्रीनं अनेक कवितांमधून हे अनुभव गीतबद्ध केलेले आहेत. मराठीतल्या श्रेष्ठ कवींशी नातं सांगणारी ही कविता. कवयित्री अनुकरण न करता स्वतःच्या शब्दांची, अनुभवांची बांधिलकी घेऊन उभी आहे. वेगवेगळ्या अनुभवांनी गच्च भरलेली ही कविता तिचीच आहे, आणि सगळ्यांची आहे.

कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केतकी पंडित यांनी केले. 

रस्त्यांच्या दुतर्फा पे अँड पार्किंग पॉलिसीच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी पार्टी आक्रमक

पुणे-महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले राबवू पाहत असलेल्या रस्त्यांच्या दुतर्फा पे अँड पार्किंग पॉलिसीच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी पार्टी आक्रमक झाली आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या या ठेकेदारप्रेमी वृत्तीचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन करण्यात आले.

पुणे शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या पार्किंगच्या जागा ठेकेदारांच्या घशात घालून सर्वसामान्य नागरिकांकडून पार्किंग शुल्क वसूल करणारे नवीन पार्किंग धोरण राबवण्याचा घाट महानगरपालिका प्रशासनाकडून घातला जात आहे.हे धोरण लागू झाल्यास आजपर्यंत जिथे सर्वसामान्य नागरिक मोफत वाहन पार्किंग करू शकत होते तिथेच वाहन पार्क करण्यासाठी यापुढे नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी सांगितले.

याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी महानगरपालिका प्रशासनावर कडक शब्दात ताशेरे ओढले.ते म्हणाले,’ “पुणे महानगरपालिकेवर सध्या प्रशासक राज्य असून, लोकनियुक्त प्रतिनिधी नसताना प्रशासकांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. मात्र, महायुती सरकारच्या काळात अधिकारी हेच शहरांचे राजे झाल्याने महानगरपालिका प्रशासनाने पूर्वीच्या लोकनियुक्त सदस्यांनी आखलेले पार्किंग धोरण रद्द करून नवीन पार्किंग धोरण करण्याबाबत राज्य शासनासोबत पत्रव्यवहार केला. हा पत्रव्यवहार बेकायदेशीर असून तातडीने रद्द व्हावा अशी आमची मागणी आहे. हे पार्किंग धोरण लागू झाल्यास पुणेकरांच्या खिशातून शेकडो कोटी रुपये ठेकेदारांच्या घशात जाणार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पवार पक्षाचा या धोरणाला विरोध आहे” अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी मांडली.

प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना याबाबत निवेदन दिले असून, नवीन पार्किंग धोरणाचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा अशी मागणी केली आहे. या आंदोलानाला प्रशांत जगताप , योगेश ससाणे, आशाताई साने, राहुल तुपेरे, स्वातीताई पोकळे, राजश्री पाटिल, दिलशाद आतार, यूसुफ़ शेख, दीपक कामठे, पूजा काटकर, अमोघ ढमाले,गौरव जाधव, आप्पा जाधव , रोहन पायगुड़े, स्वप्निल जोशी, केतन ओरसे आदि पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ८ ऑक्टोबर रोजी जनसुनावणी

पुणे दि.४: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यासाठी रोजगार हमी योजना सभागृह, विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन येथे ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.

या जनसुनावणीस आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. महिलांना त्यांच्या तक्रारींबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडता यावे यासाठी या जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील कोणतीही पिडीत महिला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली समस्या लेखी स्वरुपात आयोगापुढे मांडू शकतील.

या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारीस यांनी केले आहे.

लोकसेवकांच्या भ्रष्टाचार विषयक तक्रारी करण्यासाठी सुविधा उपलब्ध

पुणे, दि. ४: लोकसेवकांच्या भ्रष्टाचारविषयक तक्रारी नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सादर करता याव्यात याकरीता तालुक्यांच्या शासकीय विश्रामगृहस्थळी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त दयानंद गावडे यांनी दिली आहे.

भोर येथे मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी, लोणावळा ९ ऑक्टोबर, बारामती १० ऑक्टोबर, खेड राजगुरुनगर ११ ऑक्टोबर, नारायणगांव १२ ऑक्टोबर, दौंड १३ ऑक्टोबर, सासवड १४ ऑक्टोबर, शिरुर १९ ऑक्टोबर, इंदापूर २० ऑक्टोबर आणि जुन्नर येथे २७ ऑक्टोबर २०२४ रोजी विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या वेळापत्रकानुसार उपस्थित राहून नागरिक त्यांच्याकडील माहिती, तक्रारी सादर करू शकतात, असे लाचलुचपत विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी कळविले आहे.

पश्चिम पुण्याचे सर्वात मोठे चांदणी चौक कोथरूड येथील अग्निशमन केंद्र सुरू होणार कधी?

पुणे-पश्चिम पुण्याचे सर्वात मोठे चांदणी चौक कोथरूड येथील अग्निशमन केंद्र सुरू होणार कधी? असा सवाल करत आजमितीस पश्चिम पुणे शहरातील सर्वात मोठे चांदणी चौक, मौजे कोथरूड येथील अग्निशमन केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यासाठी पुणे मनपाचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची पुणे – अर्बन सेलच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि तांत्रिक गोष्टींवर सविस्तर चर्चा करत लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली.यावेळी पुणे अर्बन सेलचे शहराध्यक्ष स्वप्नील दुधाने, अर्बन सेलच्या खडकवासला अध्यक्ष मीनल धनवटे, अर्बन सेलचे कोथरूड अध्यक्ष सचिन यादव, कोथरूड महिला अध्यक्षा ज्योती ताई सूर्यवंशी, अर्बन सेलचे सदस्य गणेश ठोंबरे आणि विशाल शेडगे उपस्थित होते.

यासंदर्भात पुणे अर्बन सेलचे शहराध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी सांगितले कि,’ कोथरूडमधील चांदणी चौक, सर्व्हे नं. ७७/१ या ठिकाणी पुणे मनपाच्या वतीने पश्चिम पुणे शहरातील सर्वात मोठे अग्निशमन केंद्र बांधण्यात आले असून या ठिकाणी ५ अग्निशमन वाहने उपलब्ध असणार आहेत. शहरातील संपूर्ण कोथरूड, बावधन, पाषाण, बालेवाडी, सुस, भुगांव, म्हाळुंगे आणि वारजे महामार्ग येथील अनेक भाग या केंद्राखाली समाविष्ट होत असूनही सदर अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आलेले नाही.

दि. २२ फेब्रुवारी २०१९ रोजी पुणे बांधकाम विभाग – मनपाकडून अग्निशमन केंद्राला परवानगी प्राप्त झाली असता भवन विभाग, मनपाकडून तब्बल ५६ गुंठे जागेत या अग्निशमन केंद्राच्या आरक्षित जागेवर कामास सुरवात केली. आज या केंद्राचे काम पूर्णत्वास जाऊनही तांत्रिक गोष्टींमुळे ते सेवेत उपलब्ध करण्यात आलेले नाही. याबाबत खडकवासला विधानसभा अर्बन सेलचे अध्यक्ष मीनल ताई धनवटे आणि कोथरूड अर्बन सेलचे अध्यक्ष सचिन यादव यांनी पाठपुरावा केला असता अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला. मनपाच्या मालमत्ता विभागाने सदर जागा ताब्यात घेऊन भवन विभागाने सहा वर्षांत काम पूर्ण केले आहे.

परंतु काम पूर्ण झाल्यानंतर मनपाच्या बांधकाम विभागाकडून अंतिम भोगवटापत्र घेणे आवश्यक असून तसेच ते अग्निशमन विभागाला हस्तांतरीत न केल्याने पुढ़ील अग्निशमन केंद्र सुरू करण्याचे काम स्थगित झाले आहे. यावेळी मनपाचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले तसेच भवन विभागाचे मुख्य अधिकारी युवराज देशमुख यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी सदर प्रश्नाचे लवकरात लवकर निवारण करण्यात यावे, अशी विनंती केली. आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित बांधकाम विभागाला अंतिम भोगवटापत्र देण्याबाबत लगेच फोनवर सूचना दिल्या आणि लवकरात लवकर केंद्र सुरू करत नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.यामुळे शहरातील मोठा परिसर सुरक्षित बनणार असून नागरिकांना अग्निशमन सुविधा उपलब्ध होणार आहे. सदर घटनेत त्वरित उपाययोजना केल्याबद्दल आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांचे पुणे अर्बन सेलने आभार मानले असुन सेलच्या माध्यमातून घेतलेली ही भूमिका नागरिकांच्या कल्याणासाठी असून भविष्यात यामुळे नागरिकांना सुरक्षितता प्राप्त होणार आहे. असे दुधाने यांनी म्हटले आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने यांची निवड

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष सुनील रासने यांची एकमताने निवड करण्यात आली. शुक्रवारी (दि.४ आॅक्टोबर) झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून पुढील २ वर्षांकरिता सुनील रासने यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, माजी अध्यक्ष माणिक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

विश्वस्त मंडळाच्या बैठकीला ट्रस्टचे माजी अध्यक्ष माणिक चव्हाण, माजी उपाध्यक्ष सुनील रासने, विद्यमान उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी आदी उपस्थित होते. सुनील रासने हे ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

सुनील रासने हे ट्रस्टच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ कायमच सक्रिय सहभागी असतात. तसेच कोविड काळात ट्रस्टने केलेल्या मदतकार्यात देखील स्वत: रस्त्यावर उतरुन त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच मंदिराच्या दैनंदिन व्यवस्थापनात स्वच्छता, दानपेटी सारख्या विषयात ते स्वत: लक्ष देतात. त्यांच्या आवाजातील गणपती बाप्पाची महाआरती सर्वत्र प्रसिद्ध असून आजही ते दैनंदिन आरती स्वत: म्हणतात. हसतमुख असलेले आणि मंदिरात कायम उपलब्ध असणारे विश्वस्त म्हणून त्यांची ओळख असून ट्रस्टचे संस्थापक उपाध्यक्ष कै. मामासाहेब रासने यांचा वारसा ते समर्थपणे चालवित आहेत.

यापूर्वी दि.१५ सप्टेंबर २०२२ साली झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ट्रस्टच्या पुढील १४ वर्षांच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सन २०२२ ते २०२४ याकाळात माणिक चव्हाण यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यावेळी विश्वस्त मंडळात इतर पदभार देखील बदलण्यात आले होते. ते २०२४ ते २०२६ या कालावधीकरिता कायम ठेवण्यात आले आहेत.

सन २०२४ ते २०२६ याकरिता ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, विश्वस्त कुमार वांबुरे, मुरलीधर लोंढे, उत्तमराव गावडे हे वरील पदांवर कार्यरत राहणार आहेत. बैठकीनंतर सर्व विश्वस्तांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.

मागील बैठकीतील निर्णयानुसार १४ वर्षांचे नियोजीत अध्यक्ष
सन २०२२ ते २०२४ याकरिता ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण यांनी कार्यकाळ पूर्ण केला. आता सन २०२४ ते
२०२६ अशा दोन वर्षांकरीता ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने, सन २०२६ ते २०३१ या पुढील पाच वर्षांकरीता महेश सूर्यवंशी आणि सन २०३१ ते २०३६ या त्या पुढील पाच वर्षांकरीता हेमंत रासने हे ट्रस्टचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.