Home Blog Page 664

महिलांवरील वाढत्या अत्याराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी-उपसभापती डॉ. गोऱ्हे

निर्जन स्थळी पोलीस चौकी अद्ययावत कराव्यात, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, गस्त घालते वेळी सायरनचा वापर करावा असे डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पुणे पोलिसांना निर्देश

पुणे, दि. ५ : पुणे शहरात तसेच परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी असे निर्देश दिल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुणे शहर आणि परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून पोलीसांनी आरोपींना पकडून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. बोपदेव घाट, दिवे घाट, वेताळ टेकडी, एनडीए परिसर तसेच अन्य निर्जन स्थळी नागरिकांच्या संरक्षणासाठी गस्त वाढवावी. गस्त घालते वेळी सायरनचा वापर करावा. निर्जन स्थळी असलेल्या पोलीस चौकी अद्ययावत कराव्यात. तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रभावशील प्रकाश झोताची आणि भोंग्यांची व्यवस्था करावी. अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याची वेळोवेळी देखरेख व्हावी. याबाबतची माहिती सुरक्षितेतेच्या दृष्टीने नागरिकांना होणे गरजेचे आहे. यासाठी पुरेशी प्रसिद्धी द्यावी अशी सूचना पुणे पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षात तात्काळ पैसा कमावण्याच्या मोहामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येते. यांचेवर विविध प्रकारे वचक ठेवणे आवश्यक आहे. महिला दक्षता समित्यांच्या बैठकांमधून फलनिष्पती काय झाली, तक्रारींचा निपटारा कसा केला याबाबतचा कृती अहवाल दक्षता समितीमधील महिला सदस्यांना द्यावी. यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येवू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विविध कक्ष स्थापन करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक कक्ष, जात पंचायत निर्मूलन कक्ष, अंध श्रद्धा निर्मूलन कक्ष तसेच मानवी तस्करी संदर्भातील कक्ष स्थापन होणे आवश्यक आहे.

काही ठिकाणी घरातील व्यक्तिंकडूनच महिलांवर आणि मुलींवर अत्याचार होताना दिसत आहेत. अशा वेळी नातेवाईकांनी पुढे येवून पोलीसांकडे तक्रार देणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारामध्ये शाळा, महाविद्यालयाच्या तसेच स्कूल बसचे वाहनचालक आणि वाहक यांची चारित्र्य पडताळणी होणे आवश्यक आहे. शाळांमध्ये गांभीर्यपूर्वक ‘बॅड टच गुड टच’ याची कार्यशाळा आणि मार्गदर्शन व्हावे. शहरात नवीन पोलीस ठाणे वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यादृष्टिने प्रयत्न सूरू आहेत.

पोलीसांनी गुन्हेगारांवर केलेल्या कारवाई संदर्भातील यशकथा प्रसारमाध्यमातून वेळोवेळी प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. यामुळे समाजातील नागरिकांचा कायद्यावरील विश्वास वाढण्यास मदत होईल. पुणे शहर व परिसरातील गुन्हेगारी कमी होण्यासाठी पोलीस विभागाने सदैव तत्पर राहण्याच्याही सूचना देण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री महालक्ष्मी मंदिरात शिव-पार्वती विवाह सोहळा थाटात

 श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजन
पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात शिव -पार्वती विवाह सोहळा थाटात साजरा झाला. सारसबागेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील चौकातून सुरु झालेल्या वरातीचा समारोप मंदिरात झाला आणि मंदिरात विवाहसोहळा थाटात  संपन्न झाला. 
ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लद्दड आदी उपस्थित होते. प्रत्यक्ष शिव-पार्वती लग्नसोहळ्यात सहभागी प्रत्येक देवतांच्या वेशभूषेत कलाकार वरातीत सहभागी झाले होते. यावेळी भस्म देखील उधळण्यात आला. 
भगवान शिव- माता पार्वती सह वीर हनुमान, देवर्षी नारद, नंदी आणि सर्व गण सहभागी झाले होते. यावेळी पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थिती लावत हा अभूतपूर्व सोहळा अनुभविला. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील उत्सवात आयोजित करण्यात आले आहेत. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा ‘सार्वजनिक नवरात्र उत्सव’ मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होत आहे. त्यानिमित्ताने या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यात भाजपची मोगलाई सुरू:अरबी समुद्रात महाराजांचे स्मारक पाहणीपासून आम्हाला रोखले तर ते खपवून घेणार नाही – संभाजीराजे

पुणे-सन 2016 मध्ये मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन त्यांनी अरबी समुद्रात महाराज यांचे स्मारक भूमिपूजन केले होते. महाराज यांचे स्मारक खरेच निर्माण झाले की नाही याची पाहणी 7 ऑक्टोबर रोजी करण्याचे आम्ही ठरवले आहे. कोट्यवधी रुपये सरकारने खर्च केल्याचे सांगितले आहे. मात्र, याची धास्ती सरकारने घेऊन आमचे सर्व बोर्ड जे कायदेशीर होते ते काढले. जिथे रीतसर बोट बुकिंग केले त्यांना देखील धमकावले आहे. बोट परवानगी रद्द करू असे सांगण्यात आले आहे. ही भाजपची मोगलशाही आहे. या गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. भाजपची दडपशाही राज्यात सुरु असून ते मनमानी कारभार करत आहे. कायदा मोडून आम्ही काही करत नसून आमचा तो अधिकार आहे. आम्हाला अडवले तर त्यास सरकार जबाबदार आहे, असा इशारा महाराष्ट्र स्वराज पक्षाचे प्रमुख संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यावेळी उपस्थित होते.

संभाजीराजे म्हणाले, 100 बोटी आम्ही बुकिंग केल्या होत्या त्यापैकी केवळ 50 बोटी आतापर्यंत कन्फर्म करण्यात आल्या आहे. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी भाजप मते मिळवण्यासाठी धडपड केली जात आहे. पंतप्रधान स्वतः कार्यक्रमास येत असतात त्यावेळी सर्व परवानगी घेतलेल्या असतात पण त्या 75 टक्केच घेतल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. आमच्या कार्यकर्त्यांना पोलीस फोन करून धमक्या देतात ही हुकुमशाही आहे. आम्हाला घटनेने जो अधिकार दिला त्याबाबत जाब विचारत आहे. गड किल्ले दुरुस्ती याकडे सरकार लक्ष्य देत नाही. अरबी समुद्रात जर स्मारक करणे पर्यावरण दृष्ट्या योग्य नव्हते तर ते कशासाठी भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आला आहे.

जातनिहाय जनगणना झाली पाहिजे

11 ऑक्टोबर रोजी पुण्यात महारष्ट्र स्वराज पक्ष उद्घाटनचा जाहीर कार्यक्रम होणार आहे. आगामी निवडणूक अनुषंगाने जे अस्वस्थ लोक आहे ते इच्छा व्यक्त करत आहे. जे विस्थापित आहे त्यांना तिकीट देण्यास आमचे प्राधान्य आहे. शरद पवार यांची भूमिका आरक्षण बाबत कशा पद्धतीने सांगतात मला माहित नाही. ते जेष्ठ नेते असून त्यांना माझी टिंगल करणे अधिकार आहे. जे मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिले ते समाजाला मान्य नाही. ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी आहे. समाजात अस्वस्थता आहे. जातनिह्या जनगणना झाली पाहिजे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. त्यांनी निवडणुकीत पाडापाडी राजकारण करण्यापेक्षा उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवावे, असे मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

महिलांच्या केवळ असल्याने वातावरण सकारात्मक -ज्येष्ठ बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव ; पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकाऱ्यांचा सन्मान
पुणे : महिलांचा समाजामध्ये मोठा प्रभाव आहे. महिला असल्या की सगळ्या पुरुषांच्या तोंडावर लगाम बसतो. त्यांच्याकडून वाईट  बोलले जात नाही. सुसंस्कृत भाषा बोलली जाते, ही नारीशक्ती आहे. त्यांना मान सन्मान द्यावा असे समाजात बोलले जाते, परंतु प्रत्यक्षात त्यांना म्हणावा तसा मान मिळत नाही. प्रत्यक्षात महिलांच्या केवळ असल्याने वातावरण सकारात्मक होते,  असे मत ज्येष्ठ  बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले. 
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने  पुणे महानगरपालिकेतील प्रमुख महिला अधिकाऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त राजकुमार अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, अ‍ॅड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले उपस्थित होते. सन्मानचिन्ह, उपरणे देऊन महिला अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 
विद्याधर अनास्कर म्हणाले,  महानगरपालिका ही पुणे शहराची जीवनवाहिनी आहे. ती जर थांबली तर संपूर्ण शहर थांबेल. त्यामुळे महानगरपालिकेतील महिला अधिकाऱ्यांचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. महालक्ष्मी मंदिराच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येत आहे, हे कौतुकास्पद आहे. 
 अॅड. प्रताप परदेशी म्हणाले,  श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येतो. खरी नवरात्र म्हणजे नारीशक्तीचा सन्मान आहे. 

खडकी कॅन्टोन्मेंट भागातील खड्डे न बुजवल्यास आंदोलनाचा आप चा इशारा!

पुणे-खडकी कॅन्टोन्मेंट विभागातील होळकर ब्रिज चौक, तसेच मुळा रोड, भैय्यावाडी चौक ते खडकी बाजार रोड या सर्वच गर्दीच्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेले असून , तातडीने खड्डे दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला देण्यात आले . यावेळेस आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांचे सोबत पदाधिकारी मनोज एरांडकर ,अजय पारचा, विकास चव्हाण, अमोल मोरे, संजय कटारनवरे, तहसीन शेख आदी उपस्थित होते.

खडकी कॅन्टोन्मेंट विभागातील होळकर ब्रिज चौक, तसेच मुळा रोड, भैय्यावाडी चौक ते खडकी बाजार रोड या सर्वच गर्दीच्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेले असून गेल्या दोन महिन्यापासून आम आदमी पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते या संदर्भात कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे तक्रार करीत आहेत. अनेक स्थानिक नागरिकांनी सुद्धा याबाबत तक्रार दिलेली होती. परंतु कॅन्टोन्मेंट प्रशासन या संदर्भात ढीम्म असल्यामुळे काल शुक्रवार रोजी आम आदमी पार्टीने सदरच्या जागेवरून दुपारी सोशल मीडियावर खड्डे व वाहतूक कोंडीचे व्हिडिओ लाईव्ह केले तसेच स्थानिक नागरिकांच्या वाहन चालकांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात आली.
खडकी कॅन्टोन्मेंट येथे गेले अनेक वर्ष निवडणुकाच न झाल्यामुळे त्याला कोणी वाली उरलेला नाही. तसेच प्रशासनही यासंदर्भामध्ये काहीही कार्यवाही करत नाही. मुख्य म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या इमारतीजवळच्या चौकातच मोठे खड्डे असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्या चौकातून खडकी प्रशासनाचे अधिकारी रोज येजा करतात तरीसुद्धा ते खड्डे बुजवण्याचे काम झालेले नाही. स्थानिक आमदार शिरोळे मात्र त्या चौकातही बॅनरबाजी करीत आहेत असा रोष आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केला.

दुर्गा माता मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा संपन्न 

भेकराईनगर येथील शशी नवयुवक मित्र मंडळ : श्री बाबा महाराज (दिवे घाट) यांच्या हस्ते कलशारोहण
पुणे : शशी नवयुवक मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त भेकराईनगर येथील दुर्गा माता मंदिराचा नवरात्रोत्सवानिमित्त जिर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा संपन्न झाला. भेकराई नगर सूर्यवंशी कॉलनी येथील दुर्गा माता देवीची नवरात्र उत्सवानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.

दिवे घाटाचे श्री बाबा महाराज यांच्या हस्ते श्री दुर्गा माता मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न झाला. तसेच देवीची प्राणप्रतिष्ठापना वेल्ह्याचे नितीन शिळीमकर महाराज यांच्या हस्ते झाली. यावेळी माजी नगरसेवक गणेश वरपे, सामाजिक कार्यकर्ते विनायक वरपे, जालिंदर कामठे, हर्षल दारकुंडे, नितीन मोहोळ, रत्नप्रभा जगताप तसेच आयोजक नानासाहेब सूर्यवंशी, रामदास सूर्यवंशी, पंढरीनाथ निवंगुणे, रमेश आप्पा निवंगुणे यावेळी उपस्थित होते. कल्पवृक्ष पतसंस्था, श्री गुरुदेव दत्त मंदिर ट्रस्ट, सुयबा परिसर नागरिक यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

नवरात्र उत्सवानिमित्त मंडळातर्फे विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी श्री शिवानंद स्वामी यांचा संतवाणी अभंगवाणी कार्यक्रम होणार आहे. याशिवाय दिनांक ७ ऑक्टोबर रोजी राकेश पिंजण सरकार यांचे शिवव्याख्यान, दिनांक ९ ऑक्टोबर रोजी किरण पाटील प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे.

संत गाडगे महाराज भजनी मंडळ, गुरुदेव दत्त भजनी मंडळ, श्री गजानन महाराज भजनी मंडळ, भेकराई माता भजनी मंडळ, संत लिंबराज महाराज भजनी मंडळ, श्री गणेश भजनी मंडळ, श्री ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ, संत तुकाराम महाराज भजनी मंडळ हे आपली भजन सेवा देणार आहेत.

“मेक इन इंडिया”- अपयशाचे पारडे जडच !

मोदी सरकारने मोठा गाजावाजा करून २०१४मध्ये “मेक इन इंडिया” धोरणाची घोषणा केली. दहा वर्षे पूर्ण केलेल्या या धोरणाचा आढावा घेतला तर त्यास यश थोडे तर अपयश मोठ्या प्रमाणावर लाभलेले दिसते. याची नेमकी केलेली कारणमीमांसा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी पहिल्या काही महिन्यात लोकप्रिय घोषणा केल्या. त्यात सर्वसामान्यांना आवडेल अशी ” मेक इन इंडिया” घोषणा होती. ही घोषणा करताना मोदी सरकारने दोन उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवलेली होती.पहिले उद्दिष्ट म्हणजे देशाच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये म्हणजे जीडीपी मध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा वाढवणे. त्यावेळी तो साधारणपणे 14 ते 15 टक्के होता तो किमान 25 टक्क्यांवर न्यावा अशी अपेक्षा होती. त्याचप्रमाणे उत्पादन क्षेत्रात साधारणपणे सहा कोटी रोजगार दिला जात होता त्यात वाढ करून किमान दहा कोटी रोजगार निर्माण करावा अशी अपेक्षा होती. मोदी सरकारचे हे धोरण निश्चितच सकारात्मक होते व देशांतर्गत उत्पादन क्षेत्राला चालना मिळावी अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात दहा वर्षानंतर या घोषणेचा प्रत्यक्ष परिणाम कशा प्रकारे झाला आहे याचा आढावा घेतला असता आपल्याला नकारात्मक उत्तर सापडते.

गेल्या दहा वर्षात म्हणजे 2022-23पर्यंत आकडेवारी पाहिली तर भारतातील उत्पादन क्षेत्राची वाढ मंद गतीने होऊन ती 5.5 टक्क्यांच्या घरात झालेली दिसते. त्यामुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये म्हणजे जीडीपी मध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा जेमतेम 15 ते 17 टक्के आहे. दहा वर्षांपूर्वी तो 14 ते 15 टक्के होता. म्हणजे त्यात अपेक्षित अशी 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली नाही. दुसऱ्या बाजूला या क्षेत्रात रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर व्हावी अशी अपेक्षा होती परंतु आजच्या घडीला या क्षेत्रामध्ये रोजगार जवळजवळ वाढलेला नाही किंबहुना तो कमी झालेला दिसतो.

मोदी सरकारच्या पूर्वीच्या सरकारने 2012 मध्ये नवीन उत्पादन धोरण जाहीर केले होते परंतु त्याची कधीच अंमलबजावणी झाली नाही व ते कागदी धोरण ठरले. या योजनेचेच पुनरुज्जीवन करण्याचा मोदी सरकारने चांगला निर्णय घेतला. वास्तविक पाहता गेल्या दहा वर्षातील प्रत्यक्ष निव्वळ भाववाढ लक्षात घेतली आणि सकल राष्ट्रीय उत्पादनाची म्हणजे जीडीपीची टक्केवारी पाहिली तर आपला विकासदर साधारणपणे सात ते आठ टक्क्यांच्या घरात गेलेला आहे. यामध्ये वाढत्या निर्यातीचा मोठा हातभार लागलेला आहे. 2003 ते 2008 या पाच वर्षांमध्ये निर्यातीवर जास्त भर दिल्यामुळे एकूण आर्थिक कामगिरी चांगली झालेली होती पण त्यावेळीही उत्पादन क्षेत्राची वाढ खूपच मर्यादित झाली आणि याचे प्रमुख कारण म्हणजे आपला आयातीवर जास्त भर राहिला होता तसेच त्या काळातही रोजगारांमध्ये फार काही लक्षणीय वाढ झालेली नव्हती.

आज दहा वर्षानंतर देशातील विविध सांख्यिकी संस्थांची आकडेवारी लक्षात घेतली तर देशातील उत्पादन क्षेत्राची कामगिरी असमाधानकारक झालेली आहे. 2001-2002 या वर्षात उत्पादन क्षेत्राचे एकूण वाढलेले मूल्य हे 8.1 टक्क्यांच्या घरात होते. 2012-13 या वर्षात ते 5.5 टक्क्यांपर्यंत खाली आलेले आहे. एवढेच नाही तर गेल्या तीन दशकांमध्ये उत्पादन क्षेत्राचा सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये म्हणजे जीडीपी मध्ये असलेला वाटा हा 15 ते 17 टक्क्यांच्याच घरात आहे. तीन दशकांचा विचार करता या दशकामध्ये त्यात थोडीशी वाढ झालेली दिसते पण त्याचे प्रमुख कारण म्हणजे उत्पादन क्षेत्राच्या वाढीचे मूल्यमापन करण्याच्या निकषात केलेला बदल. या पार्श्वभूमीवर देशातील उत्पादन क्षेत्रामध्ये असलेल्या रोजगारामध्ये वाढ झाली आहे किंवा कसे हे पाहिले असता 2011-12 या वर्षात या क्षेत्रातील रोजगाराची टक्केवारी साधारणपणे 12.6 टक्क्यांच्या घरात होती. मात्र 2022-23 या वर्षात ही रोजगाराची टक्केवारी घसरलेली असून ती 11.4 टक्क्यांच्या घरात आहे. यामध्ये देशातील असंघटित किंवा अनौपचारिक उत्पादन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत असतो. त्याची आकडेवारी लक्षात घेतली 2015-16 या वर्षात हा रोजगार 38.8 दशलक्ष होता तो 8.10 दशलक्ष कमी होऊन 2022-23 मध्ये 30.6 दशलक्ष एका खाली आला आहे. गेल्या दहा वर्षात देशात एकूणच रोजगार निर्मिती अपेक्षेपेक्षा कमी झालेली आहे व शहरी व ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे हे जाणवते आहे.याचाच अर्थ मेक इन इंडिया या धोरणाचे दुसरे उद्दिष्ट रोजगार वाढवण्याचे होते त्याला अपेक्षित यश लाभलेले नाही. गेल्या काही दशकांमध्ये देशातील एकूणच उत्पादकतेचे प्रमाण लक्षणीयरीत्या घसरलेले आहे.

अर्थात या योजनेचा काहीच लाभ झाला नाही असे नाही.आज देशात जेवढे मोबाईल संच वापरले जात आहेत त्यापैकी जवळजवळ 90 ते 95 टक्के संच भारतात तयार केलेले आहेत. आज आपण 1.20 लाख कोटी रुपयांच्या मोबाईलची निर्यात करतो.संरक्षण क्षेत्राची निर्यात 21 हजार कोटींवर गेली आहे. त्याचप्रमाणे तयार पोलादाच्या बाबतीत भारत आघाडीचा निर्यातदार झालेला असून रिन्यूएबल एनर्जीच्या म्हणजे शाश्वत ऊर्जेच्या बाबतीतही आपण चौथे मोठे उत्पादक झालेलो आहोत. थेट परकीय गुंतवणुकीत जवळ जवळ 70 टक्के वाढ झालेली असून गेल्या दहा वर्षात आपण 165.1 बिलियन डॉलर इतकी गुंतवणूक आकर्षित केलेली आहे. केंद्र सरकारने 14 क्षेत्रांसाठी उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजना जाहीर केल्याने यामध्ये 1.46 ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक झाली तर 12 ट्रिलियन रुपयांचे उत्पादन झाले.यामुळे 9 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती झाल्याचे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले. देशाच्या विविध भागांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यामध्ये तसेच औद्योगिक संरक्षण विषयक व वाहतूक विषयाच्या दृष्टिकोनातून विविध कॉरिडॉर निर्माण करण्यात आले. या निमित्ताने हाती घेण्यात आलेल्या कुशल भारत या योजनेखाली एक कोटी तरुणांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. देशाच्या विविध भागात सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती या योजनेखाली झालेली आहे.तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सौर शक्तीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर योजना सुरू करण्यात आल्या.त्याचप्रमाणे मेक इन इंडिया योजनेमुळे देशाच्या आर्थिक विकासाला चांगला हातभार लागला.

या योजनेला अपेक्षेप्रमाणे यश लाभलेला नाही ही त्याची दुसरी बाजू आहे. मुळातच देशातील उत्पादन क्षेत्राची अपेक्षेपेक्षा खूप कमी होऊन ती जेमतेम प्रतिवर्षी चार ते पाच टक्के राहिली.परदेशी गुंतवणूक आणखी मोठ्या प्रमाणावर येणे अपेक्षित होती ती फक्त सेवा क्षेत्रामध्ये झाली व उत्पादन क्षेत्रात ही गुंतवणूक तुलनात्मक दृष्ट्या कमी झाली.त्याचप्रमाणे देशभरात वाहतुकीचे कार्यक्षम जाळे, विविध ठिकाणी बंदरे आणि रस्ते यांची दर्जेदार, गुणवत्ता पूर्ण निर्मिती झाली नाही त्याचा मोठा फटका देशातील उत्पादन क्षेत्राला बसलेला आहे.सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या घडीलाही केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर लाल फितीचा कारभार मेक इन इंडिया धोरणाला मारक ठरलेला आहे.केंद्र सरकारने कितीही डांगोरा पिटला असला तरी खालच्या स्तरावर भ्रष्टाचाराचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे उद्योजकांना सातत्याने त्रास होतो हे नाकारता येणार नाही. उद्योग क्षेत्राला खऱ्या अर्थाने चणचण जाणवत आहे ती कौशल्यपूर्ण कामगारांची.आज तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे आणि त्यासाठी कौशल्य असणारे कर्मचारी तयार झालेले नाहीत. व्यवसाय करण्यास आवश्यक असणारी सुलभता अद्याप आपल्याकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. याचाही प्रतिकूल परिणाम मेक इन इंडिया वर झालेला आहे.आजही आपण मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहोत. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स, अवजड यंत्रसामग्री व कच्च्या मालासाठी आपण परदेशांवर अवलंबून असल्यामुळे आयातीचे प्रमाण जास्त आहे. त्यात खंड पडला तर देशातील उत्पादन क्षेत्राला पूर्ण कार्यक्षमतेनुसार काम करता येत नाही. उत्पादन क्षेत्राच्या वाढीबरोबरच देशासमोर गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत ते पर्यावरणाच्या प्रदूषणाचे. घनकचरा व्यवस्थापन हा आपल्याकडे गंभीर विषय आहे. देशाच्या विविध राज्यांमध्ये उत्पादनांसाठी आवश्यक असणारे क्लस्टर निर्माण करण्यात राज्य सरकारे अजून गंभीर नाही. त्यामुळे सेवा व पुरवठादारांना योग्यरित्या उत्पादकांना सेवा देणे अवघड होत आहे. मेक इन इंडिया क्षेत्रासाठी स्वतंत्र संशोधन व विकास यंत्रणा अद्याप उभी राहिलेली नाही.त्याचप्रमाणे सर्व उद्योगांचा विकास सारख्या प्रमाणात होताना दिसत नाही. वाहन उद्योग क्षेत्राचा विस्तार हा वस्त्रोद्योगांपेक्षा जास्त चांगला आहे. त्यामुळे अनेक उद्योगांमध्ये होणारा विस्तार किंवा विकास हा योग्य दिशेने होताना दिसत नाही. देशातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे औषध निर्माण क्षेत्राला नियंत्रकाची अवास्तव बंधने आणि गुणवत्ता पूर्ण उत्पादन करण्यामध्ये अनेक अडचणी आहेत.वाहनांचे प्रदूषण हा देशापुढील महत्त्वपूर्ण व गंभीर विषय आहे. तसेच एरोस्पेस व संरक्षण विभागांमध्ये अपेक्षेएवढी वाढ होताना दिसत नाही. त्याला लाल फितीचे धोरणच कारणीभूत आहे.मेक इन इंडिया धोरणाची योग्य अंमलबजावणी होताना दिसत नाही. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. देशात विविध पायाभूत सुविधांची कमतरता आहे. देशात कच्चामाल, वीज आणि वित्त या गोष्टी उत्पादकांसाठी अजूनही महाग आहेत.चीनच्या तुलनेत आपल्याकडे विजेचे दर खूपच जास्त आहेत.त्याचा उत्पादन खर्चावर परिणाम होतो. याचे एक साधे उदाहरण द्यायचे झाले तर सौर ऊर्जेसाठी लागणाऱ्या बॅटऱ्यांची किंमत ही चीन मधन आयात केलेल्या बॅटऱ्यांपेक्षा तब्बल 40 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.याचा प्रतिकूल परिणाम निर्यातीवर होतो व भारतातील उत्पादकांना उत्पादन करण्यासाठी काही विशेष लाभ होत नाहीत. देशातील कामगार कायदे आजही अत्यंत किचकट आहेत.उत्पादनात वाढ करायची म्हणली तर ते सहज सुलभ होत नाही.कामगार कायद्यांमध्ये लवचिकता नसल्याचा मोठा फटका उत्पादकांना बसतो. आपले उत्पादक परदेशातून आयात होणाऱ्या कच्च्या मालावर किंवा अन्य पुरवठादारांवर अवलंबून आहेत.भारताच्या किनारपट्टीवरील सर्व बंदरे मोठ्या खोल समुद्रातील नाहीत.परिणामतः आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी मालवाहतूक करणारी जहाजे आपल्याकडे येऊ शकत नाहीत अन्य देशात माल उतरून तो आपल्याकडे आणावा लागतो.यामुळे इलेक्ट्रॉनिक सारखे क्षेत्र उत्पादनाऐवजी जोडणी वर भर देतात.उत्पादन खर्च कमी ठेवून जागतिक दर्जाची उत्पादने बनवणे हे ध्येय मेक इन इंडियाचे असले पाहिजे. अगदी कच्च्या मालापासून ते वीज वाहतूक व अन्य सर्व सुविधा उत्तम दर्जाच्या मिळाल्या तर आणि तरच देशातील उत्पादन क्षेत्र चांगले काम करू शकेल अन्यथा अशा घोषणा केवळ कागदावर राहतील हे निश्चित. काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये परदेशी थेट गुंतवणूक आकर्षित करणे यावर भर देणे आवश्यक आहे.मारुती सुझुकी, ॲपल कंपनीची उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून मेक इन इंडिया चा विस्तार झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे.अन्यथा अल्प यश व लक्षणीय अपयश हेच मेक इन इंडियाच्या पदरी सध्या तरी दिसत आहे.त्यासाठी आत्मसंतुष्ट न राहता खऱ्या अर्थाने आवश्यक त्या सर्व ठिकाणी कार्यक्षम सुविधा निर्माण करणे याला पर्याय नाही.देशातील रोजगार निर्मितीचाही तो एक योग्य मार्ग आहे हे विसरून चालणार नाही.आजच्या घडीला तुम्हाला आवडो वा न आवडो निर्यात तंत्रज्ञान व उत्पादन या सर्व क्षेत्रात चीन आघाडीवर आहे आणि ते कोठेही बडेजाव मिरवत नाहीत.आपण शांतपणे योग्य धोरण राबवले तर जगात उत्पादन क्षेत्राचे मुख्य केंद्र बनणे आपल्याला अवघड नाही.या सगळ्यांवर मात केली तरच मेक इन इंडिया हे धोरण पुढील पाच वर्षात अपेक्षित यश मिळू शकेल असे वाटते. त्यासाठी उंटावरून शेळ्या हाकण्याचे धोरण केंद्र सरकारने बंद केले पाहिजे व प्रत्यक्ष तळापर्यंत जाऊन विविध विषयांची योग्य सोडवणूक करण्याची नितांत गरज आहे. निर्यात स्नेही उद्योग धोरण व विविध देशांबरोबर व्यापारी करार यावर जास्त भर देण्याची गरज आहे.

(प्रा नंदकुमार काकिर्डे)

*(लेखक पुणे स्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार असून बँक संचालक आहेत)

राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर:कोल्हापुरात छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे केले अनावरण

कोल्हापूर-काँग्रेस नेते राहुल गांधी आज सकाळीच कोल्हापूरच्या दौऱ्यावर पोहोचले. तब्बल 14 वर्षांनंतर ते कोल्हापूरच्या दौऱ्यावर पोहोचलेत. या दौऱ्यात ते छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहणार आहेत. तसेच संविधान सन्मान परिषदेलाही हजेरी लावणार आहेत. या दौऱ्यावर पोहोचल्यानंतर लगेचच राहुल यांनी कोल्हापुरातील काँग्रेस कार्यकर्ता असणाऱ्या एका टेम्पो चालकाच्या घरी पोहोचले. तिथे त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांची माहिती घेतली.

राहुल गांधी यांनी कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी त्यांनी आपला कालचा दौरा ऐनवेळी रद्द झाल्याबद्दल माफीही मागितली. ते म्हणाले, हा कार्यक्रम काल सायंकाळी होणार होता. पण विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मला येथे येता आले नाही. त्यासाठी मी तुमची माफी मागतो.

राहुल यांचा हा दौरा विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. दलितांना आरक्षण देणाऱ्या शाहू महाराजांची भूमी असलेल्या कोल्हापुरातून ते महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत.

राहुल गांधी यांनी कोल्हापूर येथील उचगाव येथील टेम्पो चालक अजित संधे व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज कोल्हापूरच्या उचगाव येथे टेम्पोचालक अजित तुकाराम संधे यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या घरावर कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिला पहारा

पुणेभाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या घरावर आज शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर ला सकाळी मोर्चा घेऊन येणार आहेत.तरी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुणे स्टेशन येथील अध्यक्षांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने सकाळी 9.30 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन काल कॉंग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी यांनी केल्यावर आज सकाळपासून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी अरविंद शिंदे यांच्या घराबाहेर असा पहारा दिला …. दरम्यान चंद्रपूर येथे एका कॉंग्रेस पदाधिकाऱ्याने केलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार विरोधात आमदार माधुरी मिसाळ यांचे पुत्र करण सतीश मिसाळ हे पुणे स्टेशन च्या आउट गेटवर आंदोलन करणार असल्याची माहिती व्हाटसअप वर फिरत होती या दोन्ही घटनांचा परस्पर संबध आहे किंवा नाही हे मात्र समजू शकलेले नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन

पुणे: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथील भाजी मंडईच्या नूतनीकरण कामाचे तसेच शास्त्रीनगर चौक येथील उड्डाणपूल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी आमदार सुनील टिंगरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, पुणे महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. सुरेंद्रकुमार काटकर आदी उपस्थित होते.

शास्त्रीनगर चौक येथील नियोजित उड्डाणपूल:
पुणे महानगर पालिकेच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या शास्त्रीनगर चौक येथील नियोजित उड्डाणपूलाचे काम झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होऊन चौकातील वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होणार आहे. या पुलाचा अंदाजित बांधकाम खर्च ९७ कोटी रुपये आहे.

नियोजित मंडई इमारतीची वैशिष्ट्ये:
येरवडा येथील सद्या अस्तित्वात असलेल्या भाजी मंडईच्या ठिकाणी पार्किंग, तळमजला आणि पहिला मजला अशी तीन मजली नवीन इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. नियोजित प्रकल्पाचा अंदाजे खर्च सुमारे १० कोटी रुपये इतका आहे.

नियोजित इमारतीत पार्किंग मजला सेमी बेसमेंट स्वरूपाचा असून त्यात ३७० दुचाकी पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच शीत साठवण गृह (कोल्ड स्टोरेज), लोडींग, अनलोडींगची व्यवस्था केलेली आहे. तळ मजल्यावर भाजी मंडई व फळ मंडई प्रस्तावित असून प्रत्येकी १०० गाळ्यांची व्यवस्था असणार आहे. तर पहिल्या मजल्यावर मटण व मच्छी मार्केट प्रस्तावित आहे. पहिल्या मजल्यावर येण्यासाठी लोकांसाठी लिफ्टची सोय केली आहे. मालासाठी स्वतंत्र गुड्स लिफ्टची सोय केलेली आहे.

पार्किंग मजला, तळ मजला आणि पहिला मजला यांचे बांधकामाखालील एकूण क्षेत्र (बिल्ट अप एरिया) ७ हजार ५२ चौरस फूट प्रस्तावित आहे.

बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरण:संशयितांचे सीसीटीव्ही फूटेज आले समोर, पोलिसांच्या 14 पथकांकडून आरोपीचा शोध सुरू

पुणे- बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी शस्त्राच्या धाकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. बलात्कार प्रकरणातील आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान पोलिसांनी ज्या मार्गावर ही घटना घडली तेथून जाणाऱ्या सर्व संशयित वाहनांची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. यावेळी त्यांना एका दुचाकीवरुन तिघे प्रवास करत असल्याचं दिसलं. घटनेत तीन आरोपी असल्याने पोलिसांचा संशय बळावला. सीसीटीव्हीत ते एका ठिकाणी थांबले असल्याचं दिसत आहे. आता पोलीस वाहनाच्या आधारे त्यांची माहिती मिळवत आहेत.

कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रासाेबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर अनोळखी तीन नराधमांनी गुरुवारी रात्री बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. तिच्या मित्राचा हातपाय बांधून ठेवत आरोपींनी अत्याचार केला व नंतर पळून गेले. काही वेळाने स्वत:ची सुटका करून घेत मित्राने पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल केले व पोलिसांना माहिती कळवली. पीडितेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दोन आरोपींचे स्केच तयार केले असून त्यांच्या शोधासाठी 14 पथके रवाना केली आहेत, अशी माहिती सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली. आतापर्यंत 15 ते 20 संशयित आरोपींची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी बोपदेव घाटात एका तरुणीचे अपहरण करून विनयभंग करण्यात आला होता.

पीडित तरुणी सुरत येथील रहिवासी असून पुण्यात इव्हेंट मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. तिचा मित्र जळगावमधील रहिवासी असून तो सीए पदवीचे शिक्षण घेत आहे. दोघांची एका मित्राच्या माध्यमातून ओळख झाली होती. गुरुवारी (3 ऑक्टोबर) रात्री 11 वाजेनंतर तरुणी आणि तिचा मित्र पुणे शहराबाहेर बोपदेव घाट परिसरात फिरायला गेले होते. हे दोघे घाटातील डोंगराच्या उताराला गप्पा मारत थांबले हाेते. त्या वेळी रात्री बाराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघांनी चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवून त्यांना धमकावले.

तरुणाला मारहाण करत एका जागी बसायला लावले. त्याचाच शर्ट व बेल्ट काढून हातपाय बांधून ठेवण्यात आले. यानंतर तरुणीला डोंगराच्या उतारावर आणखी खाली नेत धमकावून, मारहाण करून आळीपाळीने तिघांनीही बलात्कार केला. त्यानंतर तिघेही पसार झाले. जाताना त्यांनी सदर दोघांचे आधी घेतलेले मोबाइल परत केले.
घाबरलेल्या तरुणीने तरुणाला बांधलेल्या अवस्थेतून मोकळे केले. त्यानंतर एका मित्राला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर मित्राने पीडितेला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून तिला ससून रुग्णालय पाठवण्यात आले. ससून प्रशासनाने पहाटे पाच वाजता याबाबतची माहिती कोंढवा पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तातडीने तपास करण्याचे आदेश देण्यात आले.

माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा संशयास्पद मृत्यू:पुण्यातील घरात आढळला मृतदेह

पुणे-माजी क्रिकेटपट्टू सलील अंकोला याच्या ७७ वर्षीय आईचा दरवाजा बंद करून चाकूने गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. माला अशोक अंकोला (७७, रा.प्रभात रोड, पुणे) असे त्यांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माला त्यांच्या मुलीसह प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १४ मध्ये एका सोसायटीमध्ये राहत होत्या. त्यांची मुलगी एका ठिकाणी कामाला जाते. तेव्हा त्या एकट्याच घरात असतात. त्यांच्यावर मागील काही वर्षे स्किझोफ्रेनिया या मानसिक आजारावर उपचार सुरू होते. घरातील सदस्य सकाळी दहा वाजताच बाहेर पडले होते. त्यानंतर अकराच्या सुमारास घरात कामवाली बाई आली. बेल वाजवूनही माला दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी मुलीला फोन केला. मुलीने तातडीने घरी दाखल होत दरवाजा उघडला. त्यांना माला बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी सांगितले की, माला यांचा मृतदेह घरात गळा चिरलेल्या अवस्थेत त्यांच्या मुलीला आढळून आला. त्यांचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर त्यांनी स्वत: हे कृत्य केली की कुणी दुसऱ्याने केले हे कळेल. सध्या तरी कोणत्याही प्रकारचा निष्कर्ष काढणे अयोग्य ठरेल.

….  तर रंगभूमीचा इतिहासच बदला असता – अशोक पाटील

पुणे : केशवराव हे एखाद्या तेजस्वी ताऱ्या प्रमाणे रंगभूमीवर लखलख चमकणारे स्वयंप्रकाशीत सूर्य होते. या चारित्र्य संपन्न कलाकारांची कारकीर्द संघर्षमय होती. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. कोणतेही शिक्षण आणि संगीताची परंपरा नसताना केशवरावांनी आयुष्यभर रंगभूमीची सेवा केली. केवळ कलाकारच नव्हे तर राष्ट्रप्रेमी, समाजकारणी, दानशूर व व्यक्तशीर असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. केशवराव आणखी काही वर्ष जगले असते, तर रंगभूमीचा इतिहासच बदला असता, असे मत केशवराव भोसले यांचे पणतू अशोक पाटील यांनी व्यक्त केले.

संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या १०३ व्या स्मृतिदिनानिमित्त मराठा सेवा संघ प्रणित,संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद, पुणे व अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संगीतसूर्याला मानाचा मुजरा’ या अभिवादन व त्यांच्या संगीत नाट्य कलेला लोककलावंतांच्या कलेतून उजाळा देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर्षा धाबे (प्रदेशाध्यक्ष, संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद महाराष्ट्र),मेघराज राजेभोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), अजित शिरोळे (कार्याध्यक्ष, संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद महाराष्ट्र),मैथिली कलामंदिर चे मिलिंद माळी,उषा पाटील आदी उपस्थित होते.

अशोक पाटील म्हणाले, केशवरावांवर अनेक दिग्गज लेखकांनी लेखन केले आहे. मात्र ते एक रंगभूमीवरील कलाकार म्हणून किंवा संगीत कलावंत म्हणून केले आहे. मात्र, त्यांच्या जीवनपटाकडे पाहिले असता त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे अष्टपैलू आहे, याची कल्पना येते. अशा या गुणी कलाकाराचा वैभवाच्या शिखरावर असताना अकाली मृत्यू होणे, हे दुर्दैवी आहे. वयाच्या केवळ 31 व्या वर्षी आजच्या दिवशीच (4 ऑक्टोबर)  त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांची अंत्ययात्रा एखाद्या राजासारखी निघाली होती. आता उरल्यात फक्त आठवणी. ते देहाने गेले असले तरी अमर आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला माझा मानाचा मुजरा.

वर्षा धाबे यांनी देखील केशवरावांच्या स्मृतींना उजाळा दिला.तर शिवमती प्रमिलाताई भिसे, वंदना मोरे,निनाद जाधव,प्राध्यापक देवेंद्र देशमुख अकोला यांनी नाट्यगीत सादर केले.तसेच विजय गायकवाड यांनी लोकसंगीतातून मानवंदना दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अजित शिरोळे म्हणाले, मागीलवर्षी पासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यासाठी मेघराज राजेभोसले मराठी नाट्य परिषद पुणे,मैथिली कलामंदिर चे मिलिंद माळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले.

“मराठी भाषा:विकास ते अभिजात” पृथ्वीराज चव्हाणांचे योगदान अतुलनीय”-काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी

पुणे –मराठी भाषे’ला अभिजात दर्जा मिळण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने २०१३ साली प्रा. पठारे यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमुन, त्या अहवालावर चर्चा घडवुन २०१४ मध्येच् केंद्र सरकार कडे प्रस्ताव सादर केला त्यावर २०२४ साली निवडणुका लक्षात घेऊन मोदी सरकारने मराठी सह अन्य ४ भाषांचा अभिजात दर्जा मान्य केल्या बद्दल महाराष्ट्रातील तमाम मराठीजनांचे अभिनंदन व केंद्र सरकारला कर्तव्यपुर्ती बद्दल धन्यवाद देत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, राज्याच्या इतिहासात सर्व प्रथम महाराष्ट्राची मातृभाषा, लोकभाषा व राजभाषा असलेल्या ‘मराठी भाषेचा’ वेगळा स्वतंत्र विभाग निर्माण करण्याचे क्रांती कारक पाऊल काँग्रेस राजवटीत तत्कालीन मुख्यमंत्री मा. चव्हाण यांचे कारकिर्दीत (२०१० मध्ये) पार पडले व ‘मराठी भाषा विभागाचे स्वतंत्र मंत्रालय’ निर्माण करून, ते खाते तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांनी स्वतः कडे ठेवले.
एवढेच नव्हे तर ‘मराठी भाषा’ शब्द – कोशाचे विविध खंडात संगणकावर (अपलोड) उपलब्ध करून देण्याची सुरवात देखील त्यांचेच काळात सुरु झाली. त्यांनी प्राकृत भाषा संगणकावर आणण्यासाठी मोठे संशोधन करून, मराठी भाषा संगणकावर आणली.
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना मराठी ‘साहित्य संस्कृती मंडळाची’ स्थापना केली व नंतर श्री पृथ्वीराज चव्हाणांनी मराठी भाषा विकसीत करण्या पासुन ते केंद्र सरकार’कडे मराठी भाषेस अभिजात दर्जा देणे बाबतचा प्रस्ताव दाखल करे पर्यंतचे कार्य निश्चितच गौरवास्पद आहे.
त्यांचे कारकिर्दीत, इ ११वी पासून “भौतिक शास्त्र” विषयाची ‘मराठी भाषेत’ पुस्तके प्रकाशीत करण्याचे आदेश” देखील मा पृथ्वीराज बाबा यांचे नेतृत्वातील मंत्र मंडळाने शिक्षण विभागास दिले, याचा मी साक्षीदार आहे.
सदर राज्य सरकारचा निर्णय जाहीर झालेवर पुणे शहरातील “समर्थ मराठी संस्थे तर्फे (मराठी काका प्रा. अनिल गोरे व मी) असे आम्ही दोघांनी पुढाकार घेऊन” तातडीने इ ११ / १२ वा “भौतिक शास्त्र शाखेची” पुस्तके मराठीत छापून घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांचे हस्ते पुणे सर्कीट हाऊस येथे प्रकाशीत देखील केलीं.
या घटनांचा मागेवा घेतला तर तत्कालीन मुख्यमंत्री श्री पृथ्वीराजजी चव्हाण यांचे मराठी भाषा प्रत्यक्ष राज्यात ही विकसीत होण्यापासुन ते अभिजात दर्जा मिळणे करीता, केंद्र सरकार कडे प्रस्ताव दाखल करे पर्यंतच्या वाटचालीत मा पृथ्वीराजजी चव्हाण यांचे योगदान अतुलनीय आहे ते दुर्लक्षीत करता येणार नसल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
प्रा.पठारे, स्व हरी नरके, इ चे योगदान देखील अविस्मरणीय असल्याचेही सांगितले. राज्यातील राजसभा सदस्या सौ रजनीताई पाटील यांचे सह इंडीया आघाडीच्या नेत्यांनी संसदेत व संसदे बाहेर मराठी अभिजात प्रस्तावाच्या मान्यते साठी वेळोवेळी दखल पात्र मागणी केली. आज ‘त्याच प्रस्तावाला’ मान्यता देणे बाबत गेली १० वर्षे राज्यातील मराठीजनांनी लक्षावधी पत्रे पंतप्रधान मोदी कार्यालयाकडे धाडली, आंदोलनात्मक मागण्या निवेदने व ठराव केंद्राकडे पाठवले व तब्बल १० वर्षा नंतर ‘मराठी भाषेला केंद्राने अभिजात दर्जा देऊन’ आपले कर्तव्यरुपी सोपस्कार पार पाडलेत त्या बद्दल जाहीर धन्यवाद.
केंद्रात १० वर्षे सत्तेवर असतांना भाजप शिर्ष नेतृत्वास मराठी भाषेचे प्रेम दाटून आले नाही, तर आज केवळ सत्ता जाणार या धास्तीने त्यांना मराठी भाषा आठवली व अभिजात दर्जा देण्याचे पुण्य केले असल्याची पुस्ती देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी जोडली.

श्री एकविरा देवी देवस्थानाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

पुणे, दि.४:- श्री एकविरा देवीचे मंदिर प्राचीन आणि सुंदर आहे. त्याला अजून आकर्षक बनवण्यासाठी मुख्य मंदिराच्या व परिसराच्या विकासासाठी ३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून देवस्थान परिसराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्ले, ता.मावळ येथील श्री एकविरा आई देवी देवस्थान परिसरातील मंदिराचे जतन, संवर्धन व विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार आणि मंदिराचे मुख्य विश्वस्त सुरेश म्हात्रे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, श्री एकविरा देवी देवस्थानचे अध्यक्ष दीपक हुलावळे, सरपंच पूजा पडवळ उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर सुरु आहे आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. श्री एकविरा आई देवस्थानच्या पावन भूमीत मंदिर संवर्धन आणि भाविकांच्या सुविधांसाठी विविध विकास कामांचे माझ्या हस्ते भूमिपूजन होत आहे याचा मला आनंद आहे.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्व सामान्यांसाठी विविध लोककल्याणकारी योजना शासनाने सुरु केल्या असून त्याचा लाभ नागरिकांना देण्यात येत आहे. राज्यात मोठ मोठे प्रकल्प व उद्योग उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी लोककल्याणकारी योजनांची अमंलबजावणी सुरु आहे. सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आदी लोककल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या असून त्याचा नागरिकांना लाभ देण्यात येत आहे. यापुढेही विकासाचा आणि कल्याणकारी योजनांचा वेगवान व गतिमान कार्यक्रम असाच सुरु राहील, अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

कार्ले येथील ऐतिहासिक बुद्ध लेणीचा विकास करण्यासाठी आवश्यक अनुदान देण्यात येणार असून लवकरच पोलीस चौकीही मंजूर करण्यात येईल. भाविकांच्या सोयीसाठी गडावर रोप-वे चे बांधकाम आणि कार्ला फाट्यावर उड्डाण पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला ४५ कोटी रुपये अनुदान देण्यात येणार असून लवकरच कामाची सुरुवात होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नियोजित विकास कामांची संक्षिप्त माहिती

श्री एकविरा देवी मंदिर, नगारखाना, स्तंभ व समाधी यांचा जीर्णोद्धार व मंदिर परिसरातील विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये मुख्य मंदिराची दुरूस्ती करणे, मंदिर परिसरातील नगारखान्याची दुरूस्ती करणे, स्तंभ व समाधीच्या दगडी बांधकामाची सफाई आणि सांधे भरणी आणि सुसंवादी प्रदिपण करणे, सध्याच्या रांग-मंडपाला उतरवून सुसंवादी शैलीचे रांग-मंडप उभारणे, मोकळ्याजागेत बगीचा निर्माण करणे, भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्या कक्षाचे बांधकाम, तिकीटघर व शौचालय यांची नवीन सुसंवादी वास्तू बांधणे या कामांचा समावेश आहे. गडावरील पायऱ्यांची दुरूस्ती, संरक्षण भिंत,शौचालय, पार्किंग, डोंगराच्या कठडयाला लागून दगडी पादचारी रस्ता तयार करणे, धबधब्या जवळ तटबंदीची दुरुस्ती करून विश्रांती क्षेत्र तयार करणे, पायऱ्यांच्या मध्यंतरात दमलेल्या भाविकांसाठी प्याऊ, बेंच आणि कचरापेट्या बसवणे, भाविक व पर्यटकांच्या माहिती व सुरक्षतेसाठी सूचना फलके बसविणे ही कामे करण्यात येणार आहेत.