श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव ; पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकाऱ्यांचा सन्मान
पुणे : महिलांचा समाजामध्ये मोठा प्रभाव आहे. महिला असल्या की सगळ्या पुरुषांच्या तोंडावर लगाम बसतो. त्यांच्याकडून वाईट बोलले जात नाही. सुसंस्कृत भाषा बोलली जाते, ही नारीशक्ती आहे. त्यांना मान सन्मान द्यावा असे समाजात बोलले जाते, परंतु प्रत्यक्षात त्यांना म्हणावा तसा मान मिळत नाही. प्रत्यक्षात महिलांच्या केवळ असल्याने वातावरण सकारात्मक होते, असे मत ज्येष्ठ बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने पुणे महानगरपालिकेतील प्रमुख महिला अधिकाऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त राजकुमार अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, अॅड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले उपस्थित होते. सन्मानचिन्ह, उपरणे देऊन महिला अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
विद्याधर अनास्कर म्हणाले, महानगरपालिका ही पुणे शहराची जीवनवाहिनी आहे. ती जर थांबली तर संपूर्ण शहर थांबेल. त्यामुळे महानगरपालिकेतील महिला अधिकाऱ्यांचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. महालक्ष्मी मंदिराच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येत आहे, हे कौतुकास्पद आहे.
अॅड. प्रताप परदेशी म्हणाले, श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येतो. खरी नवरात्र म्हणजे नारीशक्तीचा सन्मान आहे.