Home Blog Page 661

विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण समाजाला किमान 30 जागा मिळाव्यात

सकल ब्राह्मण संघाची भाजपाकडे मागणी : मित्रपक्षांनाही निवेदन
पुणे : ब्राह्मण समाजाने आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला नेहमीच संपूर्ण पाठिंबा दिला आहे. सध्या राज्यातील ब्राह्मण समाजाच्या राजकीय प्रतिनिधीत्वाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभेसाठी किमान 30 जागा ब्राह्मण समाजाला द्याव्यात, अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाने भारतीय जनता पार्टीकडे केली आहे, अशी माहिती सकल ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे बहुभाषी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, भालचंद्र कुलकर्णी, तेजस फाटक, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. सचिन बोधनी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड, कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मुलुंड या विधानसभा मतदारसंघांत ब्राह्मण समाजाची मतदारसंख्या निर्णायक आहे. या मतदारसंघांमध्ये ब्राह्मण समाजाला उमेदवारी दिल्यास, भाजपला विजय मिळवणे सोपे होईल. याच आशयाचे निवेदन भाजपाचे मित्र पक्ष शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना दिले आहे.
चिंचवड मतदारसंघात बहुजन समाजातील इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे कोणालाही उमेदवारी दिली तरी बंडखोरी अटळ आहे. त्यामुळे मतांची विभागणी होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर ब्राह्मण उमेदवाराला संधी दिल्यास, या मतदारसंघात विजय मिळवणे सहज शक्य होईल.
राज्यातील 45 विधानसभा मतदारसंघांमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या निर्णायक आहे. त्यापैकी किमान 30 जागांवर ब्राह्मण उमेदवारांना संधी मिळावी, अशी सकल ब्राह्मण समाजाची मागणी आहे. पुण्यातील कोथरूड, कसबा तसेच पिंपरी-चिंचवड, ठाणे, कल्याण-डोंबिवली या मतदारसंघांमध्ये ब्राह्मण उमेदवार निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार उपलब्ध आहेत. योग्य व्ोळी आम्ही त्यांची नावे सादर करू.
महाराष्ट्रीयन ब्राह्मण तसेच बहुभाषक ब्राह्मण मिळून अनेक मतदारसंघांमध्ये 80 हजारांहून अधिक मतदार आहेत. ब्राह्मण समाज नेहमीच विचारपूर्वक मतदान करतो, त्यामुळे त्यांच्या मतांचा योग्य वापर झाला पाहिजे.
गेल्या काही वर्षांत राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न झाले आहेत, ज्यात ब्राह्मण समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले आहे. या परिस्थितीत ब्राह्मण समाजाला राजकीय भूमिका घेणे अनिवार्य झाले आहे, त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत.
भाजपकडे ब्राह्मण समाजाची एकगठ्ठा मते आहेत, विशेषत: चिंचवड, कसबा, कोथरूड, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि शिवाजीनगर मतदारसंघात. ब्राह्मण समाजाने नेहमीच कर्तव्य म्हणून मतदान केले आहे, मात्र यावेळी भाजपने नेतृत्वाची संधी देऊन ब्राह्मण उमेदवाराला उभे करावे, अशी समाजाची विनंती आहे.
राज्यभरातील विविध समाजांनी संघटित होऊन राजकीय जागरूकता दाखवली आहे. ब्राह्मण समाजही आता जागरूक होऊन संघटित होत आहे. शिक्षण, नोकरी यासारख्या क्षेत्रात आरक्षण नसतानाही ब्राह्मण समाज आपल्या कष्ट, बुद्धिमत्ता व गुणवत्तेच्या जोरावर टिकून आहे. म्हणून भाजपने ब्राह्मण समाजाला गृहीत धरू नये.
राज्यभरात अनेक मतदारसंघांमध्ये सक्षम ब्राह्मण नेते आहेत, मात्र त्यांना पुढे येण्याची संधी मिळत नाही. संधी मिळाल्यावर त्यांनी नेहमीच त्यांचे नेतृत्व सिद्ध केलेले आहे. म्हणून, योग्य उमेदवारांना संधी दिल्यास ब्राह्मण समाजही यशस्वी नेतृत्व देऊ शकेल.
ब्राह्मण समाजाने आतापर्यंत संघर्ष नको म्हणून बरेच त्याग केले आहेत, पण आता समाजाला संघर्ष करण्याची गरज आहे आणि यासाठी पक्षाने ब्राह्मण उमेदवारांना संधी देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा. ब्राह्मण समाजाने हिंदुत्वाच्या समर्थनार्थ कायम उभे राहून भाजपला पाठिंबा दिला आहे आणि भविष्यातही तो पाठिंबा कायम राहील. मात्र, या वेळी उमेदवारी न मिळाल्यास समाजाला आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा लागेल, असे पत्रात नमूद केले आहे.
गौड ब्राह्मण समाज, गौर ब्राह्मण संघटन, पुणे, विप्र फौऊंडेशन, अखिल ब्राह्मण संघ, राष्ट्रीय सेवा संघ, महाराष्ट्र ब्राह्मण सभा, परशुराम सेवा संघ, आम्ही सारे ब्राह्मण, ब्राह्मण महासंघ, महाराष्ट्रीय ब्राह्मण संघ, बहुभाषिक ब्राह्मण संघ आदी संघटनांचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते.

गोडबोले यांच्या पुस्तकात पुण्यातील समाजकारण आणि राजकारणातल्या व्यक्तींचे नेमके चित्रण-अरविंद गोखले

पुणे दिनांक ७-पत्रकार अविनाश गोडबोले यांनी त्यांच्या चार दशकांच्या पत्रकारितेतील अनुभवावर आधारित ऐसी अक्षरे मेळविली हे जे पुस्तक लिहिले आहे, त्यात गेल्या चार दशकात पुण्यातील समाजकारण आणि राजकारणातील ज्या व्यक्तींशी त्यांचा संबंध आला त्यांचे नेमकेपणाने वर्णन केले आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांनी केले.
या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल निवारासभागृहात गोखले यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की गोडबोले आणि माझी पत्रकारिता समांतर काळातली आहे, त्यामुळे मला त्यांनी यात केलेले लिखाण प्रत्ययकारी वाटले. वर्तमानपत्रामध्ये काम करताना सर्वस्पर्शी व्यापक दृष्टिकोनाची गरज असते, कोणतीही जबाबदारी न टाळता लिखाणामध्ये वैविध्य आणणे हेच पत्रकाराचे काम असते ते काम गोडबोले यांनी या पुस्तकात केले आहे, असे गोखले म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा होते. त्यांनी यावेळी गोडबोले यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव करत त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य नमूद केले. आचार्य अत्रे, ग.वा.बेहरे, वा.रा. कोठारी या जेष्ठ संपादकांच्या आठवणीही सोनग्रा यांनी यावेळी कथन केल्या. प्रभातकार कोठारी यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दिलेल्या योगदानाच्याही आठवणी त्यांनी सांगितल्या.
उल्हासदादा पवार म्हणाले की गोडबोले यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत केवळ प्रभातशी च निष्ठा ठेवून तेथे 37 वर्षे काम केले. जिथे पत्रकारीतेला प्रारंभ केला तेथेच ते निवृत्त झाले. राजकारण्यांमध्ये सध्या अशी निष्ठा दिसत नाही. डाव्या विचारसरणीची माणसे एका क्षणात उजव्या विचारसरणीची होतात, त्या सगळ्या गमती जमती आज आपण सगळीकडे पाहत आहोत. त्यामुळे एकाच दैनिकाशी निष्ठा ठेवून गोडबोले यांनी केलेली पत्रकारिता महत्त्वाची वाटते. बाळासाहेब शिवरकर म्हणाले की पुण्यातील वृत्तपत्रांची पूर्वीची स्थिती वेगळी होती. त्यांचा प्रभाव मोठा होता. वर्तमानपत्रात आलेल्या वाचकांच्या पत्रातून एखादी तक्रार आली तरी प्रशासन स्तरावर त्याची गांभीर्याने दखल घेऊन दुरुस्ती केली जायची परंतु आज नेमकी दुर्दैवी स्थिती उद्भवली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना गोडबोले यांनी चार दशकातील पत्रकारितेने आपल्याला सामाजिक विषयाचे भान दिले, सर्व क्षेत्रातील माहितगार बनवले असे नमूद केले. तसेच त्यांनी यावेळी या पुस्तका मागची भूमिका विशद केली. संजय बालगुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी आभार मानले.

रा.स्व.संघ कसबा भागाचा विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव सिरम इन्स्टिट्यूटचे केदार गोखलेंच्या उपस्थितीत साजरा

रा.स्व. संघाचे अखिल भारतीय सह बौद्धिक प्रमुख दीपक विसपुते यांची उपस्थिती ; विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
पुणे :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेपासून हिंदू समाजाचे संघटन करण्यासोबतच समाजामध्ये विजयाकांक्षा जागविण्यासाठी प्रयत्नशील आहे. या दृष्टिकोनातून व शिस्तबद्ध संघटनेच्या शक्तीचे समाजाला दर्शन घडावे याकरिता विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भाग तर्फे ताडीवाला रस्त्यावरील भारतीय रेल्वे खेळाचे मैदान येथे शस्त्रपूजन उत्सव पार पडला.

यावेळी  सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक केदार गोखले, रा.स्व. संघाचे अखिल भारतीय सह बौद्धिक प्रमुख दीपक विसपुते,  भाग संघचालक विधीज्ञ प्रशांत यादव व्यासपीठावर उपस्थित होते. उत्सवात स्वयंसेवकांनी विविध शारीरिक व बौद्धिक प्रात्यक्षिके सादर केली.

केदार गोखले म्हणाले, काळानुरूप शस्त्रांचे स्वरूप बदलत गेले. आता विध्वंसक शस्त्रे असतात तशी मनुष्याचे जीवन उज्वल करणारे शस्त्र म्हणजे व्हॅक्सिन. व्हॅक्सिन च्या रुपाने मानवी शरीराला शस्त्र मिळते. तसेच अणूशक्तीचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात शब्द हीच शस्त्रे ठरली. जसे ‘वन्दे मातरम्’ या शब्दाने संपूर्ण देश भारावला आणि शब्द शस्त्र ठरले. शक्ती हे स्त्री रुप आहे; आपण महिलांचाही सन्मान केला पाहिजे. स्त्रीचे रक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. तरुणांना पालकांनी असे संस्कार द्यावे. संघ बाल-तरुणांना अशा प्रकारचे संस्कार देतो व भविष्यातही राष्ट्र रक्षणाप्रमाणे स्त्री रक्षणाचे संस्कार संघ देत राहील.

दिपक विसपुते म्हणाले, दिनांक २७ सप्टेंबर१९२५ रोजी संघाची स्थापना डाॅ. हेडगेवार यांनी केली. त्याचे आता विशाल स्वरुप झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्यालाही ७५ वर्षे झाली आहेत. पंच्याहत्तर वर्षांत आपली ओळख एक मजबूत राष्ट्र अशी झाली आहे. आता जग भारताकडे आदराने बघत आहे. जसे भारताने जगाला व्हॅक्सिन दिले. अन्न-गहू कोरोना काळात भारताने जगाला दिले. संघाचा इतिहास सुद्धा असाच विकासाचा आहे. देशातील लोकांच्या मनात संघ देशभक्तीचे जागरण गेली शंभर वर्षे करीत आहे. संघाच्या चार पिढ्या या कामात समर्पित झाल्या आहेत.

ते पुढे म्हणाले, संघाच्या शाखा हीच संघाची शक्ती आहे. संघ कामाची स्विकार्हता समाजात वाढली. समाजाच्या एकाकी पणाची भावना संघाने दूर केली. भारतीय समाज स्वत:च्या भारतीय विचारांवर उभा रहावा, यासाठी संघाने कार्य केले. शंभर वर्षांत समाज कसा असावा याचे प्रारुप संघाने उभे केले. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरणपूरक जीवन, नागरिक शिष्टाचार, स्वदेशी आधारित जीवनशैली या पाच गोष्टींचे आचरण व प्रचार करावा असे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.

याप्रसंगी प्रसंगी  प्रांत शारीरिक प्रमुख निलेश भंडारी, महानगर सहकार्यवाह मंगेश घाटपांडे उपस्थित होते. सर्व प्रथम प्रशांत यादव यांनी आभार मानले. तर कसबा भागाचे कार्यवाह राहुल पुंडे यांनी मान्यवरांचा परिचय करुन देत प्रास्ताविक केले.

महायुतीला तिहेरी आकडा गाठता येणार नाही:महाविकास आघाडी 183 हून अधिक जागा जिंकणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

पुणे-आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला तिहेरी आकडाही गाठता येणार नाही. याऊलट महाविकास आघाडीला 183 हून अधिक जागा मिळतील, असा ठाम विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केला. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे आमचा आत्मविश्वास दुणावल्याचेही ते यावेळी म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर यांनी सोमवारी निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी उपरोक्त दावा केला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. याचा अर्थ आम्ही तब्बल 65 टक्के जागा जिंकल्या. या गोष्टीचा विचार केला, तर विधानसभा निवडणुकीत आम्हाला 183 जागा मिळतील. याऊलट सत्ताधारी महायुतीला तिहेरी आकडाही गाठता येणार नाही अशी स्थिती आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण चिंताजनक झाल्याचाही दावा केला. ते म्हणाले, राज्यात बारा बलुतेदार समजा, मराठा समाज, दलित समाज आदी सर्वचजण खेळीमेळीच्या वातावरणात राहत होते. त्यांच्यात केव्हाच तेढ निर्माण झाले नाही. पण आता काही राजकीय पक्ष त्यांच्यात तेढ निर्माण करत आहेत. यामुळे महाराष्ट्राचे सामाजिक आरोग्य बिघडले आहे.

दलित समाजातील बौद्ध व दलित तसेच हिंदू व दलित अशी विभागणी करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर जातीय, धार्मिक दंगली घडवण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असे ते म्हणाले.

राज्यात माझ्या नेतृत्वात सरकार असताना मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आले. पण फडणवीस सरकारला ते टिकवता आले नाही. सध्या राज्यात बेरोजगारीचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. लोकांच्या हाताला काम नाही. मागच्या 10 वर्षांत एकही मोठा उद्योग किंवा कंपनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आली नाही. जे उद्योग येत होते, ते गुजरातला पळवण्यात आले. राज्यातील वातावरण उद्योगस्नेही नाही अशी परिस्थिती जाणिवपूर्वक निर्माण करण्यात आली. यामुळे तरुणांवर बेरोजगारी कोसळली. या बेरोजगारीमुळेच राज्यात आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले.

काँग्रेसने अल्पसंख्याक मंत्रालय बदनाम केले:केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रीजिजू यांचा आरोप

पुणे -माझ्याकडे देशाचे अल्पसंख्याक मंत्रालय कामकाज आहे. काँग्रेस काळात या मंत्रालयास खूप बदनाम करण्यात आले. केवळ मुस्लिम मंत्रालय असे त्याला दाखवले गेले. पण आमचे मंत्रालय सहा धर्मियांसाठी काम करत आहे. मी ठिकठिकाणी जाऊन खरी परिस्थिती मांडून दुरुस्ती करत आहे. काँग्रेसने मुस्लिमांना व्होट बँक म्हणून पाहिले. त्यामुळे ते अल्पसंख्याक मंत्रालय हे मुस्लिम मंत्रालय असल्याचे दाखवण्याचे प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रीजिजू यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी मंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते.किरण रीजिजू म्हणाले, महाराष्ट्र मध्ये मी दौरा करत आहे कारण महाराष्ट्र वीरांची भूमी असून त्यातून देशाला प्रेरणा मिळते. राज्याला देशातील राजकारणात सध्या बदनाम करण्यात आले असून विरोधकांकडून दिशाभूल करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी दुषप्रचार करतात की, भारतात लोकशाही संपुष्टात आली आहे. अल्पसंख्याक यांची गळचेपी होत आहे परदेशात जाऊन देशाला बदनाम करण्याचे काम विरोधक करत आहे. देशविरोधी यांच्याशी संगनमत करून वेगवेगळे आरोप केले जातात. सर्व धर्मियांना सोबत घेऊन विकासाचे दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहे. संविधान धोक्यात आहे असे सांगून खोटा प्रचार करणारे यांनी संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गोष्टी हटवण्याचे काम आतापर्यंत करत आली आहे. संविधान नष्ट करण्याचे काम त्यांनी केले पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान यात्रा, संविधान दिवस, संविधान पूजन सुरू केले. सबका साथ, सबका विकास यादृष्टीने आम्ही देशाचा विकास करत आहे. सन २०४७ मधील विकसित भारत यादृष्टीने काम करत आहे. महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन निर्माण करण्याचे आम्ही ठरवले असून ते सर्व धर्मियांसाठी असेल. बौद्ध विहार यांच्यासाठी विशेष मदत करण्यात येणार आहे कारण त्यांना सुरवातीला दुर्लक्षित करण्यात आले होते.

पंढरपुर मंदिर परिसरासाठी १४०० कोटी व पत्रकार गृह निर्माण सोसायटीला ७ कोटी निधीची तरतूद करणारे एकनाथ शिंदे एकमेव मुख्यमंत्री … गोऱ्हे

सोलापूर-दि:६ ऑक्टोंबर : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या नीलमताई गोऱ्हे तुळजापूर सोलापूर दौऱ्यावर असताना आज दुपारी सोलापूर शासकीय निवासस्थान येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत डॉ .गोऱ्हे यांनी संवाद साधला. सोलापूर येथून येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाला व महायुतीला अधिकाधिक यश मिळेल असा विश्वास डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडी कडून दिशाभूल करणारी वक्तव्ये सामान्य माणसापर्यंत पोचवण्याचे दुष्पाप करण्यात आले होते त्या गोष्टीला सामान्य मतदार आता बळी पडणार नाही असा विश्वास देखील डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सोलापुरातील ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना जसे वयाच्या 84 व्या वर्षी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या योगदानाबद्दल साक्षात्कार झाला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी योजनांबद्दल जो अपप्रचार खासदार प्रणिती शिंदे ह्या करत आहेत त्यांना देखील कालांतराने एकनाथ शिंदे बद्दल साक्षात्कार होईल अशी खात्री मा.नीलमताई गोऱ्हे यांनी व्यक्त केली. लाडकी बहिण योजने मुळे राज्याच्या तिजोरीवर कुठलाही बोजा पडणार नाही राज्य सरकार च्या मागे देशातील मोदी सरकार भक्कम पणे उभे आहे

सोलापूर शिवसेना पक्षात अनेक मतभेद गटबाजी आहे असा अपप्रचार जाणून बुजून करण्यात येत होता त्याला मात्र आज नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकारी एकत्रितरित्या उपस्थित असल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला असे मत सर्व पदाधिकारी यांनी देखील व्यक्त केले. या बैठकीत जिल्हाप्रमुख शिवाजी सावंत, मनीष काळजे, अमोल शिंदे व प्रवक्ता ज्योतीताई वाघमारे यांनी आपले विचार मांडले व संजय मशिलकर संपर्क प्रमुख यांनी सर्व पदाधिकारी एक विचाराने काम करतील असे मत मांडले व आभार मानले.

या वेळी शिवाजी सावंत सोलापूर संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, दिलीप कोल्हे शहर समन्वय, मनोज शेजवाल शहर समन्वयक, उमेश गायकवाड, सागर शितोळे, महिला जिल्हाप्रमुख रवीना राठोड, मोबिना मुलानी, आरती बसवंत ,जयश्री पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महाराजा अग्रसेन यांची मूल्ये जपल्यास समाजाची प्रगती निश्चित

अग्रसेन जयंती कार्यक्रमात सुप्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांचे प्रतिपादन

पुणे : महाराज श्री अग्रसेन हे जनतेची काळजी घेणारे एक आदर्श राजे होते. त्यांनी अहिंसा, समानता आणि समृद्धी ही तीन प्रमुख मूल्ये जपली होती. या मूल्यांचा अंगीकार केल्यास कोणत्याही समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. अग्रवाल समाजाने काटेकोरपणे ही मूल्ये जोपासावीत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध उद्योपती तथा घोडावत ग्रुपचे चेअरमन संजय घोडावत यांनी केले.
अग्रवाल समाज पुणे वतीने पुण्याच्या डीपी रोडवरील सिद्धी बँक्वेट्स मध्ये रविवार ६ आॅक्टोबर रोजी अग्रसेन महाराज जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून संजय घोडावत बोलत होते.
अग्रवाल समाज पुणे अध्यक्ष ईश्वरचंद गोयल हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मंचावर समाजाचे उपाध्यक्ष विजय अग्रवाल, सचिव अमित अग्रवाल, कोषाध्यक्ष मुरलीधर चौधरी व अग्रवाल महिला संघटनेच्या अध्यक्षा भारती जिंदल आदि या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाला केंद्रीय सहकार व नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात सुरवातीला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. हेमंत अग्रवाल यांनी अग्रवाल समाजाच्या विविध संघटना व क्लबची माहिती दिली. कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
आपल्या खुमासदार भाषणात संजय घोडावत पुढे म्हणाले की, जीवनात नेहमी मोठे ध्येय ठेवा. कारण मोठे ध्येय ठेवणारेच जीवनात प्रगतीच्या शिखरावर पोहोचतात. याशिवाय मोठी ध्येये गाठताना कधीही वयाचा विचार करू नका. कारण यशस्वी होण्यासाठी वयाची अट जरुरी नसते. ध्येय गाठण्यासाठी मोटिवेशन आणि इन्स्पीरेशन आवश्यक असते, परंतु सर्वांत महत्वाचे असते ते अॅक्शन. यशस्वी होण्यासाठी मागचा-पुढचा विचार न करता तत्परतेने अॅक्शन घ्या. यश नक्कीच तुमचे असेल.
मुरलीधर मोहोळ या वेळी बोलताना म्हणाले की, पुण्यात प्रत्येकच जाती-धर्माचे सण-उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरे होत असतात. ही पुण्यासाठी अभिमानाची बाब आहे. अग्रवाल समाज हा व्यवसायात आघाडीवर आहे, परंतु या समाजाने पुण्याच्या आर्थिक उन्नतीत मोठे योगदान दिलेले आहे. मला सातत्याने अग्रवाल समाजाच्या लोकांकडून मदत झालेली आहे. तुम्ही तुमचे काम केलेले आहे, त्यामुळे आता मी समाजाच्या सर्व मागण्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे.
ईश्वरचंद गोयल यांनी अग्रवाल समाजातर्फे चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये हिंदी माध्यमाची शाळा, वैकुंठ रथ या विषयी त्यांनी सांगितले. त्यांनी या वेळी जमलेल्या अग्रवाल समाजातील नागरिकांना एकमेकांशी नाती जपण्याची व संबंध वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले.
अमित अग्रवाल यांनी प्रास्ताविक करताना पुणे अग्रवाल समाज कार्यकारिणीच्या कामांची माहिती दिली. तसेच मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर समाजाच्या विविध समस्यांची मांडणी केली. या समस्या लवकरच सोडवू, असे आश्वासन या वेळी मोहोळ यांनी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक अग्रवाल आणि रितू बन्सल यांनी केले. विजय अग्रवाल यांनी सर्वांचे आभार मानले.

  • सर्वोत्तम कार्य करणाऱ्यांना अग्रसेन सन्मान प्रदान
    विविध क्षेत्रात कार्यरत राहून समाजाची सेवा करणाऱ्या पाच जणांना या वेळी अग्रसेन सन्मान प्रदान करण्यात आला. यामध्ये उद्योग क्षेत्रातून वसंत ग्रुपचे प्रेमचंद मित्तल, चिकित्सा क्षेत्रात सर्वोत्तम कार्यासाठी डाॅ. बालकृष्ण अग्रवाल, नेत्रदानाचे तसेच नेत्रहीन विद्यार्थ्यांसाठी कार्य करणारे सीए माखनलाल अग्रवाल, आरोग्य क्षेत्रात कार्य करणारे डाॅ. जितेंद्र अग्रवाल आणि क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल अजय अग्रवाल यांना हे पुरस्कार उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

— मोफतची सवय समाजाच्या उन्नतीसाठी घातक
कार्यक्रमात बोलताना संजय घोडावत यांनी मोफत या संकल्पनेवर टीका केली. त्यांनी सांगितले की, कुठलीही मोफतची सवय चांगली नाही. मोफतच्या सवयीमुळे समाज पंगू बनतो. एकीकडे देशात बेरोजगारी प्रचंड आहे, तर दुसरीकडे काम करण्यास माणसे मिळत नाहीत, हे दरी केवळ मोफत संस्कृतीमुळे फोफावली आहे. समाजाला कार्यान्वित करायचे असेल तर ही मोफत संस्कृती संपवावी लागेल.

नाठाळ राजकारण्यांवर साहित्यिकांनी दबाव निर्माण करावा : राज ठाकरे

पुणे : महाराष्ट्राची आज सर्कस झाली आहे. राजकारणाच्या क्षेत्रात सध्या बोलल्या जाणाऱ्या भाषेला धरबंध राहिलेला नाही. अशा परिस्थितीत नाठाळ राजकारण्यांचे कान धरून त्यांना वठवणीवर आणण्याचे, खडे बोल सुनविण्याचे काम साहित्यिकांनी करावे, असे मत नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. राजकारणी व्यक्तींना साहित्य संमेलनांमध्ये साहित्यिकांचे विचार ऐकायला बोलवावे, बोलायला नको असे सांगून पूर्वीच्या मराठी साहित्यिकांच्या अंगात, मनात मराठी बाणा रुजलेला दिसत होता, परंतु ती धमक आज कमी झालेली जाणवते, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज (दि. 7) राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात कार्यक्रम झाला. महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी राजमुद्रा व लेखणी असे बोधचिन्हाचे स्वरूप आहे. दिल्ली येथे दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत साहित्य संमेलन होत आहे. सरहद पुणेचे अध्यक्ष संजय नहार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, विनोद कुलकर्णी, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष प्रकाश पागे, गुरय्या स्वामी, डॉ. शैलेश पगारिया आदी मंचावर होते.
ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा आहे, असे आपण म्हणत आलो आहोत पण सद्यस्थितीत महाराष्ट्रातील राजकारणाची भाषा अत्यंत खालच्या थराला गेली आहे. अशा परिस्थितीत साहित्यिकांनी सामाजिक चळवळ उभी करण्याची गरज आहे. साहित्यिकांनी ट्रोल होण्याचा विचार न करता अधिकारवाणीने बोलावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, वैचारिक मोकळेपणा, उदारमतवादी भूमिका घेणारी संस्था म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे बघितले जात आहे. 119 वर्षांच्या कार्यकाळात मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी परिषद कार्यरत असून लेखकांची खंबिरपणे पाठराखण करीत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी परिषदेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी सांगितली.
संजय नहार म्हणाले, परस्पर विरोधी विचारांच्या व्यक्ती साहित्य परिषदेत एकत्र येऊन समाजाची दिशा बदलण्याची क्षमता ठेवत कार्यरत असतात. विरोधकाला शत्रू मानायचे नसते अशी भूमिका घेणाऱ्या साहित्य परिषदेच्या वास्तूमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण होत आहे, ही आनंदाची बाब आहे. मराठी अस्मितेचा विषय ज्यावेळी येतो त्यावेळी राज ठाकरे हे कायम पुढे असतात. दिल्ली काबिज करायची आजही मराठी माणसात कुवत आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
बोधचिन्ह साकारणारे प्रसाद गवळी यांचा तसेच संमेलनाच्या माजी अध्यक्षांचा यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, संजय सोनवणी, राजन खान, शिरीष चिटणीस, राजन लाखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना चव्हाण यांनी केले तर आभार लेषपाल जवळगे यांनी मानले.

सरकारतर्फे नवीन कायदे स्थापनेमागे महिला हा केंद्रबिंदू -भाजपा नेते उज्वल निकम

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे महिला न्यायाधीशांचा व वकिलांचा सन्मान
पुणे : आज देशामध्ये नवीन कायदे आले आहेत. या देशात जे कायदे आलेले आहेत, हे कायदे स्थापित करण्यामागचा उद्देश पाहिला तर महिला हा केंद्रबिंदू सरकारने ठेवला आहे. संस्कार देणारी आई, संसाराला मार्गदर्शन करणारी मार्गदर्शिका ही महिला असते. त्यामुळे महिला संरक्षण दृष्टीने हे नवीन कायदे करण्यात आले आहेत, असे मत व्यक्त करीत महिला न्यायाधिश व महिला वकिलांच्या शक्तीचा जयजयकार करण्यासाठी मी आवर्जून या कार्यक्रमाला आलो, असे भाजपा नेते विशेष सरकारी वकिल पद्मश्री अ‍ॅड. उज्वल निकम यांनी सांगितले. 
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात महिला न्यायाधीश व वकिलांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, डॉ. तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील उत्सवात आयोजित करण्यात आले आहेत. 
महेंद्र महाजन म्हणाले, भारतातील नारीशक्तीचे कौतुक होणे आवश्यक आहे. सध्याच्या न्यायालयीन व्यवस्थेत ३८ टक्के न्यायाशिध महिला आहेत. पुणे जिल्ह्यात वकील संघात पुरुषांबरोबर स्त्रिया देखील महत्वाचे खटले लढवितात, हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे या महिला न्यायाधिश व वकिल भगिनींचा सन्मान श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे होणे हे भूषणावह आहे. 
अ‍ॅड. प्रताप परदेशी म्हणाले, नारीशक्तीचा सन्मान करुन नवरात्रीची पूजा बांधण्याचा प्रयत्न ट्रस्टतर्फे करीत असतो. श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत लोकशाहीतील महत्वाचा स्तंभ म्हणजे न्यायव्यवस्था. त्यामुळे त्या व्यवस्थेतील न्यायाधिश व वकिलांचा सन्मान करण्यात आला.

सुस-पाषाण टेकडीवरचे लुटारू पकडले चौघात २ अल्पवयीन

पुणे- सुस-पाषाण टेकडीवर नागालँन्ड राज्यातील स्पायसर कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विदयार्थी यांना जबरदस्तीने लुटणारे ४ आरोपी यांना चतुःश्रृंगी पोलीसांनी पकडले असून यातील दोघे अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दिनांक २८/०९/२०२४ रोजी १९/३० वाजे चे सुमारास सुस-पाषाण टेकडी पुणे येथे स्पायसर कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे नागालँड राज्यातील फिर्यादी नामे पॉजेंदाई कामेई वय १९ वर्षे धंदा शिक्षण रा.C/O भास्कर मधुकांत कोल्हे यांचे घरी भाडेकरु, प्लॉट नं २०, फ्लॅट नं १०५, दुसरा मजला, आनंद नगर, स्वीमींग पुल रोड, जे मार्ट चे मागे, गंगानगर जुनी सांगवी पुणे. मुळपत्ता-राज्य, नागालँड, व त्यांचा मित्र नामे राकेश रॉय असे मिळुन सदर ठिकाणी सायकलींग ट्रॅकींगकामी गेले असता सदर ठिकाणी ०४ अनोळखी इसमांनी येवुन फिर्यादी यांना त्यांचा मित्र यांना कोयत्याचा धाक दाखवुन व कोयत्याने मारहाण करुन त्यांचेकडुन दोन मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकुण-२०,०००/-रुपये किंमतीचा मुददेमाल जबरदस्तीने काढुन घेवुन चोरी करुन नेला आहे. म्हणुन फिर्यादी यांनी ०४ अनोळखी इसमाविरुध्द दिले तक्रारीवरुन चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयाचे घटनास्थळी वरिष्ठांनी भेट देवुन दाखल गुन्हयाबाबत सुचना दिल्याने सदर गुन्हयाचा पुढील तपास हा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करीत असताना तपास पथकातील अधिकारी,अंमलदार यांनी यातील आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करुन यातील आरोपी १) अजिंक्य अशोक बोबडे, वय-१८ वर्ष, रा-गुरुकृपा बिल्डींग, दुसरा मजला, रुम नं.०३, संत तुकाराम नगर वाघजाई चौकाजवळ, नवी सांगवी पुणे. २) निखील बाबासाहेब डोंगरे, वय १८ वर्ष, रा-साकेत सोसायटी, आंबेडकर चौक, डी.पी. रोड औंध पुणे.व ०२ विधीसंघर्षीत बालक यांचा हददीत/परहददीत शोध घेवुन घेवुन त्यांना शिताफीतीने ताब्यात घेवुन त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन दाखल गुन्हयात जबरदस्तीने काढुन चोरुन नेलेला व गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल व लोखंडी धातुचा कोयता असा एकुण-०१,२१,२००/-रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करुन उत्तम कामगिरी केली आहे.
तसेच सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त पुणे शहर. अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त सो.रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०४ पुणे शह हिंम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयानंद पाटील तपास पथकाचे अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उप-निरीक्षक, प्रणिल चौगले, पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले, पोलीस हवालदार बाबुलाल तांदळे, पोलीस हवालदार सुधाकर माने, पोलीस हवालदार इरफान मोमीन, पोलीस हवालदार बाबासाहेब दांगडे, पोलीस हवालदार श्रीधर शिर्के, पोलीस हवालदार किशारे दुशिंग, पोलीस हवालदार संदिप दुर्गे, पोलीस हवालदार विशाल शिर्के, पोलीस अंमलदार बाबासाहेब भांगले, पोलीस अंमलदार प्रदिप खरात, पोलीस अंमलदार श्रीकांत साबळे, पोलीस अंमलदार प्रशांत गायकवाड यांनी केली आहे.

राष्ट्रीय टपाल सप्ताह

भारतीय डाक विभाग 07 ऑक्टोबर 2024 ते 11 ऑक्टोबर 2024 या दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताह
साजरा करत आहे.1874 मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन (यूपीयू) च्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त 9
ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो.
जागतिक टपाल दिनाचा उद्देश हा जनसामान्य आणि
व्यवसायांच्या दैनंदिन जीवनात डाक विभागाची भूमिका तसेच जागतिक, सामाजिक आणि आर्थिक विकासात
त्याचे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. या वर्षीच्या जागतिक पोस्ट दिनाची थीम ‘150
Years of Enabling Communication and Empowering Peoples Across Nations’ ही थिम आहे
या वर्षी, राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करण्याची रूपरेखा भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात
भारतीय डाक विभागच्या उदयोन्मुख भूमिकेच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. मुलींच्या सक्षमीकरणावर भर
देऊन वित्तीय सशक्तिकरण, DNK सारख्या मेल आणि पार्सल सेवा, दुर्गम, डोंगराळ, सेवा नसलेल्या आणि बँक
नसलेल्या भागात ऑन-द-स्पॉट बँकिंग सेवा यावर भर दिला जाणार आहे.
राष्ट्रीय टपाल सप्ताहादरम्यान साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध दिवसांचा सारांश खालीलप्रमाणे आहे –
7 ऑक्टोबर – मेल आणि पार्सल दिवस:
• मेल आणि पार्सल अंतर्गत घेतलेल्या नवीन उपक्रमांबद्दल ग्राहकांना माहिती देण्यासाठी आणि प्रदान केली
जाणारी सेवांबद्दल त्यांचा अभिप्राय मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांसाठी ग्राहक मेळाव्याचे आयोजन
मंडळ, प्रादेशिक आणि विभागीय स्तरावर सोलापूर, श्रीरामपूर, सातारा, अहमदनगर येथे आयोजित करणे.
• डाक घर निर्यात केंद्रावर जागरूकता कार्यक्रम: निर्यातदारांसाठी विविध स्तरावर कार्यशाळा आयोजित
केल्या जातील आणि डाक घर निर्यात केंद्राकडून दिले जाणारे फायदे आणि सुविधा यावर लक्ष केंद्रित केले
जाईल.
8 ऑक्टोबर- फिलॅटेली दिवस:
• ” पत्रलेखनाचा आनंद: डिजिटल युगात पत्रांचे महत्त्व” यासाठी शाळांमध्ये संवादात्मक सत्र संगमनेर,
पाचगणी, पंढरपूर येथे आयोजित करणे.
• प्रश्नमंजुषा आणि इतर क्रियाकलाप पुणे सिटी वेस्ट अंतर्गत येणाऱ्या जास्तीत जास्त शक्य ठिकाणी
आयोजित करणे.
फिलॅटेलीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कार्यक्रमाला प्रसिद्धी प्रदान करण्यासाठी फिलॅटेलीस्टसाठी
सेमिनार आयोजित केले जातील.

9 ऑक्टोबर – जागतिक टपाल दिवस:
• सर्व पोस्ट ऑफिसमध्ये आणि पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व डिजिटल डिस्प्लेमध्ये UPU वर्ल्ड
पोस्ट डे पोस्टर आणि राष्ट्रीय पोस्टल सप्ताह 2024 चे बॅनर (मार्केटिंग विभागाद्वारे पुरवले जाणारे) प्रदर्शित
करणे.

• थीम: ‘150 Years of Enabling Communication and Empowering Peoples Across
Nations’
• पोस्टाथॉन वॉक रिले: “फिट पोस्ट, फिट इंडिया” या संदेशाचा प्रचार करणारा राष्ट्रव्यापी चालण्याचा
कार्यक्रम आयोजित करणे.
• “एक पेड माँ के नाम” साठी वृक्षारोपण समारंभासह, पोस्टाथॉन कार्यक्रम आयोजित करणे.
• प्रेस ब्रीफिंग
10 ऑक्टोबर – अंत्योदय दिवस:
• प्रत्येक डाक मंडळाद्वारे एक परिसंवाद आयोजित केला जाईल जेथे संबंधित राज्य सरकारांच्या विविध
विभागांचे अधिकारी, समाजातील गरीब, उपेक्षित आणि मागासलेल्या घटकांच्या उन्नतीशी संबंधित
प्रकरणे/योजना हाताळण्यासाठी पॅनेल चर्चेसाठी आमंत्रित केले जातील.
• आदिवासी, डोंगराळ आणि ग्रामीण/दुर्गम भागात आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये जनजागृती सह आधार
नोंदणी आणि आधार अद्ययावत शिबिरे आयोजित केली जातील.
11 ऑक्टोबर – मुलींच्या सक्षमीकरणावर भर देणारा वित्तीय सशक्तिकरण दिवस:
•मूलींचे साबलीकरण व शशक्तीकरण: आर्थिक साक्षरता आणि समावेश कार्यक्रमांद्वारे मुलींच्या
सक्षमीकरणावर विशेष भर दिला जाईल.
• डाक चौपाल: प्रत्येक उपविभागात तीन (३) डाक चौपाल आयोजित केले जातील डाक चौपालच्या कक्षेत
विशेष डाक विमा पोलिसी वितरण/ मार्केटिंग मोहिमेचे आयोजन केले जाईल.
• आर्थिक साक्षरता सत्र आयोजित करणे.

बोपदेव घाट बलात्कार प्रकरणात आरोपींची माहिती देण्याऱ्यास देणार 10 लाखांचे बक्षीस

पुणे- बोपदेव घाटात एका 21 वर्षीय तरुणीवर तीन नराधमांनी सामुहिक अत्याचार केला होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या घटनेतील आरोपींना शोधण्यासाठी राज्य सरकार आणि गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा पोलिसांनी केली आहे. आरोपींची नावे आणि पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीची ओळख उघड केली जाणार नाही, असे आश्वासन देखील पोलिसांनी दिले आहे.

बोपदेव घाटात गुरुवारी रात्रीच्या सुमारास मित्रासोबत फिरायला गेलेल्या 21 वर्षीय तरुणीवर अज्ञात तिघांनी सामुहिक बलात्कार केला होता. या घटनेनंतर आरोपी फरार झाले. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत बोपदेव घाट परिसरात गेलेल्या 3 हजार मोबाईलधारकांची माहिती जमा केली आहे. तर 200 पेक्षा अधिक संशयित व्यक्तींची कसून चौकशी केली आहे.

दरम्यान, संशयित आरोपींची रेखाचित्र देखील जारी करण्यात आले. रेखाचित्रांच्या आधारे पोलिसांचा आरोपींना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. यामुळे पोलिस खात्याच्या वतीने आरोपींची माहिती आणि पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील बोपदेव घाट परिसरात फिरायला गेली होती. रात्रीच्या वेळी पुणे कसे दिसते हे तिला पहायचे होते. बोपदेव घाट परिसरात पीडित तरुणी आणि तिचा मित्र गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी तिघे जण तिथे आले. त्यांनी पीडिता आणि तिच्या मित्राला शस्त्राचा धाक दाखवत तरुणाला मारहाण केली. आरोपींनी तरुणाचाच शर्ट काढून त्याचे हात बांधले, तर पॅन्टच्या बेल्टने त्याचे पाय बांधले. त्यानंतर तरुणाला एका झाडाला बांधून ठेवले. यानंतर आरोपींना पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींचा शोध घेत आहेत. पीडित तरुणी ही परराज्यातील असून तिचा मित्र जळगाव जिल्ह्यातील असल्याचे म्हटले जात आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा

पुणे:महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर अचूक सर्वेक्षण अंदाज वर्तविण्यात प्राविण्य मिळविलेल्या पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेकडून राज्यात मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मतदारांचे मत आजमावून घेतले. या मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल)मध्ये धक्कादायक निष्कर्ष आलेले आहेत. त्यानुसार विधानसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) नुसार राज्यात महाविकास आघाडीचाच सर्वाधिक प्रभाव या निवडणुकीत राहणार आहे असा अंदाज निष्कर्षातून व्यक्त होत आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या मतांचे प्रमाण भाजप-22.83% तर कॉंग्रेस-18.42% आणि शिवसेना-11.74% तर शिवसेना (उबाटा)-15.24% आणि राष्ट्रवादी-8.48% आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)-13.71 तसेच अन्य राजकीय पक्ष, अपक्ष व नोटासह 9.58% असे संभाव्य मतांचे प्रमाण राहील असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तविण्यात येत आहे. महायुतीच्या प्रमुख तीन पक्षांच्या एकत्रितपणे मतांचे प्रमाण 43.05 टक्के इतके तर महाविकास आघाडीच्या प्रमुख तीन पक्षांच्या एकत्रितपणे मतांचे प्रमाण 47.37 टक्के इतके राहण्याची शक्यता मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) नुसार व्यक्त होत आहे. 
मतदारांचा कल आणि स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींवर आधारित राजकीय पक्षांमध्ये उमेदवारांचे सर्वाधिक विजयी होण्याचे तुलनात्मक प्रमाणात (स्ट्राईक रेट) मध्ये राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष सरस ठरणार आहे. मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) मध्ये पक्ष निहाय भाजप पक्षाचे मतांचे प्रमाण अन्य पक्षांच्या तुलनेत जास्तीचेच राहणार आहे मात्र मागील निवडणुकांच्या तुलनेत जनाधारात घट होण्याचा संभव आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींवर स्ट्राईक रेट अवलंबून राहणार आहे. मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी आणि प्रमुख शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमधील विभाजन, फाटाफूटीचा लाभ कोणाला मिळणार यासह अन्य प्रमुख निष्कर्ष प्राब संस्थेच्या सर्वेक्षण अहवालात पाहण्यास मिळणार आहे.

जनतेचा अंकुश कायमस्वरूपी असला पाहिजे: निखिल वागळे

भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान

पुणे:महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’ निमित्त पुण्यात ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘ भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे व्याख्यान गांधी भवन येथे झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी होते.एड. स्वप्नील तोंडे यांनी सूत्र संचालन केले. प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. जांबुवंत मनोहर, रोहन गायकवाड यांनी स्वागत केले.

अन्वर राजन, डॉ. उर्मिला सप्तर्षी, संदीप गव्हाणे, डॉॅ. प्रवीण सप्तर्षी,श्रीराम टेकाळे, प्रसाद झावरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

निखिल वागळे म्हणाले,’ लोकसभा निवडणुकीवेळी निर्भय बनो सभेत जाताना आमच्यावर हल्ला झाला आणि आज शांततेत व्याख्यान होत आहे. हा वातावरणातील फरक आहे. गेल्या आठ महिन्यात त्या हल्ल्याचा तपास झाला नाही. महाराष्ट्राला परखड विचार मांडण्याची परंपरा आहे. पोलीस सरकारच्या संगनमताने काम करतात, हे दुर्दैवी आहे. संविधान जेंव्हा जेव्हा चुकीच्या हातात पडले तेंव्हा असे हल्ले झालेले आहेत. लोकशाही टिकविण्यासाठी बोलावे लागते. या देशातील सर्व समावेशकता, धर्म निरपेक्षता टिकली पाहिजे. निराशावादी असून चालणार नाही. जनतेचा दबाव संपल्याचे जाणवत आहे. लोकप्रतिनिधी नीट काम करण्यासाठीं दबाव गट असणे आवश्यक आहे.

हुकूमशाही पध्दतीने चालणारे सरकार नको हा मतदारांचा संदेश लोकसभा निवडणुकीत दिसून आला. जनतेचा अंकुश कायमस्वरूपी असला पाहिजे. त्या निकालाने लोकशाही टिकण्याची आशा पल्लवीत झाली आहे. पक्षांतर बंदी कायदा मोडीत काढता कामा नये. सर्वोच्च संस्थां बद्दल आदर कायम राहील, याची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या कृतीतून आदर मिळवला पाहिजे. पुढे देशभर पक्षांतर कायदा मोडला गेला तर त्याला सर्वोच्च न्यायालय आणि चंद्रचूड जबाबदार असणार आहेत. बेकायदेशीर सरकार त्यांनी २ वर्षे कसे चालू दिले. उमर खालिदला का जामीन मिळत नाही. आदिवासी, मुस्लीम, दलित, महिला यांचा सहभाग वाढणार नसेल तर लोकशाही टिकणार कशी ? महिलांना पैसे दिले म्हणून त्या मत विकतील असे समजणें हा महिलांचा अपमान आहे.

हरयाणा, जम्मू काश्मीर मध्ये एक पक्ष, एक झेंडा, एक नेता अशी पद्धती चालू देणार नाही, हा संदेश या निवडणुकीतून पुढे येणार नाही. प्रश्न विचारण्याचा अधिकार असला पाहिजे, एवढेच जनतेचे म्हणणे आहे. दहा वर्षात वातावरण विषारी झाले, कहर झाला होता. जम्मू काश्मीर मध्ये लोकशाहीचे हनन झाले होते. काश्मीर मध्ये राज्यपाल नियुक्त ५ आमदार का निवडले गेले आहेत, त्यांना विधी मंडळात मतदानाचा अधिकार का दिला आहे ? हे लोकशाही विरोधी आणि घटना विरोधी आहे. शेतकरी आंदोलन देशविरोधी आहे, असा प्रचार सत्ताधाऱ्यानी करणे चुकीची गोष्ट होती, असेही निखिल वागळे यांनी सांगितले.

राजकीय, सामाजिक अभिसरणाचे काम निवडणुकीतून झाले पाहिजे.महाराष्ट्रात दलित, मुस्लीम, आदिवासी साठी महाविकास आघाडीने योगदान दिले पाहिजे.या आघाडीला महाराष्ट्रात अनुकूल वातावरण आहे. लोकशाहीत मॉब लिंचिंग होता कामा नये,अल्पसंख्य लोकशाहीत सुरक्षित राहिले पाहिजेत. प्रसाद असो किंवा अन्य कारणाने तेढ निर्माण होता कामा नये. गेले १० महिने महाराष्ट्रात दंगल पेटविण्याचे प्रयत्न चालू आहेत. राज्याचे गृहमंत्री दंगलीला प्रोत्साहन

देणारी भाषा वापरतात.ते गृहमंत्री पदावर राहण्याच्या योग्यतेचे नाहीत. पुण्यात कोयता गँग वाढते आहे, बलात्कार वाढत आहे.ते या गृहमंत्र्यांना रोखता येत नाही, असाही आरोप वागळे यांनी केला.भीमा कोरेगाव सारखी कट कारस्थाने पुन्हा होता कामा नये, असे त्यांनी सांगितले.

डॉ. कुमार सप्तर्षी यांनी अध्यक्षिय समारोप केला. ते म्हणाले, ‘लोकशाहीचे बीज टिकवून ठेवले पाहिजे. त्यासाठी संघर्ष केला पाहिजे. फॅसिझम पुढे जाता कामा नये.उत्सवातून हल्ली व्याख्याने आयोजित केली जात नाहीत.ते बंद होऊन विचार मारले जात आहेत, आणि वाद्यांचा आवाज मोठा केला जात आहेत.विचारांची परंपरा गांधी सप्ताहच्या निमित्ताने पुढे सुरु राहत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे’.

पुणे नवरात्रौ महोत्सवात सलग १२ तासांचा लावणी धमाका

पुणे-

घुंगरांचा आवाज आणि ढोलकीची थाप लालित्यपूर्ण पदन्यास सोबत गाण्यातील आर्जव, प्रेक्षकांचे वन्स
मोअरचे नारे, टाळ्यांचा कडकडाट आणि हजारो रसिक प्रेक्षकांची गर्दी अशा लावणीमय वातावरणात पुणे
नवरात्रौ महोत्सवात रविवारी दुपारी  १२ पासून सलग १२ तासांचा‘लावणी धमाका’श्री गणेश कला-क्रीडा
रंगमंच येथे आयोजित केला गेला. ‘महाराष्ट्रात सलग १२ तासांचा धमाकेबाज‘लावणी महोत्सव’पुणे
नवरात्रौ महोत्सवात आम्ही प्रथम ३० वर्षांपूर्वी  सुरू केला. गेली ३० वर्षे  त्यास चोखंदळ पुणेकरांनी प्रचंड
मोठा प्रतिसाद दिला, याबद्दल सर्व लावणी कलावंत आणि रसिक पुणेकर यांचे मी आभार मानतो’, असे
भावपूर्ण उद्गार पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी
उद्घाटनप्रसंगी काढले.
 
विक्रमी लावणी महोत्सवात लावणी कलावंत माया शिंदे, सोनम जाधव (छत्तीस नखरेवाली‌) , खुशी शिंदे,
शबनम पुणेकर (ओरिजनल जल्लोष अप्सरांचा‌) , पूनम कुडाळकर, काव्या (तुमच्यासाठी कायपण‌),
शलाका पुणेकर, सोनाल शिंदे (कैरी मी पाडाची) , श्रुती मुंबईकर, मेनका औंधकर  (चंद्रकला) अशा अनेक
लावणी कलावंताच्या  ग्रुप सह त्यांच्या १०० सहकार्‍यांनी तब्बल बारा तास ठसकेबाज लावणी सादर
करुन प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
 
महोत्सवाची सुरुवात ’३६ नखरेवली’ ग्रुपने गणेश वंदना सादर करून केली. शंभरहून अधिक लावण्यवतींनी
आपला नृत्यविष्कार दाखवून प्रत्येक लावणीत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. श्री गणेश कला क्रीडा
रंगमंच दुपारी १२ पासून रसिक प्रेक्षकांनी अखेरपर्यंत गच्च भरले होते. यावेळी प्रेक्षकांनी शिट्या, टाळ्या व
नृत्य करुन लावणीला वन्समोअरची दाद दिली. या लावणी महोत्सवात महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था
करण्यात आली होती. त्यांचाही मोठा प्रतिसाद होता.
 
 ‘माझी मैंना गावाकडे राहिली’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहार’, ‘रात्र धुंदीत ही जागवा..’, ‘कैरी मी
पाडाची….’,  ‘पैलवान आला हो पैलवान आला…’, ‘तुमच्या पुढ्यात कूटते मी…’, तुमच्यासाठी जीव झाला
वेडा पिसा’ ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘पिंगा…’, ‘ज्वानीच्या आगीची मशाल हाती…’, ‘तुझ्या
उसाला लागेल कोल्हा’ अशा अनेक लावण्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली.
 
‘विचार काय आहे तुमचा पाहूनं…’, ‘मला वाटलं होतं तुम्ही याल…’, ‘तुमच्या पुढ्यात बसले मी…’,
‘सांगना कशी दिसते मी नऊवारी साडीत…’, ‘शिट्टी वाजली गाडी सुटली….’, ’आंबा तोतापुरी’,  ’,  ‘चंद्रा’
चित्रपटातील ‘बान नजंतला घेऊनी अवतरली चंद्रा’, ‘नटरंग’ चित्रपटातील ‘नटरंग उभा अशा एकाहून एक
सरस’ अशा लावण्या व गौळणीच्या सादरीकरणाने रसिकांवर लावणी या लोकप्रिय लोककलेची भुरळ
घातली.

याबरोबरच ‘बुगडी माझी सांडली गं…’, ‘सोडा सोडा राया नाद खुळा…’ या लावणीने वन्समोअरची दाद
मिळवली. ‘नाद एकच बैलगाडा शर्यत’ ही लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘इंद्राची अप्सरा
आली…’, ‘कान्हा वाजवितो बासरी’ यासह ‘वाजले की बारा…’, ‘अप्सरा आली…’, ‘नटरंग उभा…’, या
‘नटरंग’ चित्रपटातील लावण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
 
‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…’ या बैठकीच्या लावणीच्या सादरीकरणाने आपल्या हावभावातून
लावण्यवतींनी रसिकांची मने जिंकली. ‘मी मेनका ऊर्वशी…’ आणि ‘छत्तीस नखरेवाली…’ या लावण्यांच्या
सादरीकरणाने कार्यक्रमात बहार आणली. ‘केसात गुंफूणी गजरा तुम्हाला मानाचा मुजरा..’, ‘तुमच्या
पुढ्यात बसले मी..’,  ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘आई मला नेसव शालू नवा’ अशा ठसकेबाज जुन्या
 लावण्यांचे सादरीकरणाने प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद दिली.
 
हावभाव, पदन्यास आणि ढोलकीची थाप यांच्या एकत्रित सादरीकरणाने लावणी या लोककलेचा अप्रतिम
कलाविष्कार रसिकांनी अनुभवला. तब्बल सलग 12 तास नृत्यांगणांनी आपली लावणी सादर करून
प्रेक्षकांची मने जिंकली.
 
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला
महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी मान्यवरांचा व कलाकारांचा सत्कार केला. यावेळी पुणे
नवरात्रौ महोत्सवाचे विश्वस्त घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे,  रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर,
मुख्य संयोजक अमित बागुल,  आदी पदाधिकारी व मान्यवर  उपस्थित होते.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम सावंत यांनी केले. हा लावणी महोत्सव रात्री उशिरापर्यंत चालू राहिला.
लावणी रसिकांनी सारे प्रेक्षागृह तुडुंब भरले होते.