श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे महिला न्यायाधीशांचा व वकिलांचा सन्मान
पुणे : आज देशामध्ये नवीन कायदे आले आहेत. या देशात जे कायदे आलेले आहेत, हे कायदे स्थापित करण्यामागचा उद्देश पाहिला तर महिला हा केंद्रबिंदू सरकारने ठेवला आहे. संस्कार देणारी आई, संसाराला मार्गदर्शन करणारी मार्गदर्शिका ही महिला असते. त्यामुळे महिला संरक्षण दृष्टीने हे नवीन कायदे करण्यात आले आहेत, असे मत व्यक्त करीत महिला न्यायाधिश व महिला वकिलांच्या शक्तीचा जयजयकार करण्यासाठी मी आवर्जून या कार्यक्रमाला आलो, असे भाजपा नेते विशेष सरकारी वकिल पद्मश्री अॅड. उज्वल निकम यांनी सांगितले.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात महिला न्यायाधीश व वकिलांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, डॉ. तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील उत्सवात आयोजित करण्यात आले आहेत.
महेंद्र महाजन म्हणाले, भारतातील नारीशक्तीचे कौतुक होणे आवश्यक आहे. सध्याच्या न्यायालयीन व्यवस्थेत ३८ टक्के न्यायाशिध महिला आहेत. पुणे जिल्ह्यात वकील संघात पुरुषांबरोबर स्त्रिया देखील महत्वाचे खटले लढवितात, हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे या महिला न्यायाधिश व वकिल भगिनींचा सन्मान श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे होणे हे भूषणावह आहे.
अॅड. प्रताप परदेशी म्हणाले, नारीशक्तीचा सन्मान करुन नवरात्रीची पूजा बांधण्याचा प्रयत्न ट्रस्टतर्फे करीत असतो. श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत लोकशाहीतील महत्वाचा स्तंभ म्हणजे न्यायव्यवस्था. त्यामुळे त्या व्यवस्थेतील न्यायाधिश व वकिलांचा सन्मान करण्यात आला.