Home Blog Page 660

 शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीचा भाजपला तोटाच

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या मतदानपूर्व जनमत चाचणीचे निष्कर्ष

पुणे-शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विभाजन आणि फुटीचा भाजपला तोटाच होत असून आगामी काळातही तोटाच होण्याचा संभव असून पक्षाच्या मतांच्या प्रमाणात घट होऊ शकते असा निष्कर्ष सर्वेक्षणातून निघत आहे. केवळ सत्तेसाठी संख्येची जुळवाजुळव करण्याइतपतच ठीक आहे मात्र मतदारांच्या समोर जाताना स्थानिक पातळीवर राजकीय मिश्रण रुचताना दिसत नाही. मागील निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांचे मतांचे प्रमाण पाहिल्यास फाटाफूट आणि विभाजनानंतर दोन्ही गटांचे एकत्रित मतांचे प्रमाण वाढलेले असून खरा राजकीय लाभ मिळाल्याचे स्पष्ट होते. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना(ठाकरे) गटाचे मतांचे प्रमाण 16.72 टक्के तर शिवसेना शिंदे गटाचे मतांचे प्रमाण 12.95 टक्के होते यांची एकूण मतांचे 29.67 टक्के प्रमाण आहे तर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) मतांचे प्रमाण 10.27 टक्के तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे मतांचे प्रमाण 8.6 टक्के होते यांची एकूण मतांचे 18.87 टक्के प्रमाण आहे. दोन्ही गटांच्या पक्षांचे एकूण 48.54 मतांचे प्रमाण होते. भाजपचे 26.18 टक्के प्रमाण जवळपास स्थिरावले आहे तर काँग्रेसचे देखील 16.92 मतांचे प्रमाण स्थिरावले आहे. बंडाळीचा खरा लाभ कोणाला होत आहे हे भाजप व काँग्रेसने अभ्यासने महत्वाचे आहे. हे गणित समजणे जरा कठीण जाऊ शकते त्यासाठी सविस्तरपणे खुलासा अहवालात पाहू शकता. राज्यातील राजकीय उलथापालथ होण्यास जबाबदार भाजपला ठरवले जात असून स्थानिक पातळीवर मतदारांमध्ये याचा रोष पहावयास मिळत आहे. त्याचा विपरीत परिणाम मतदानातून दिसून येईल. दरम्यान महायुतीतून लढणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धोक्याचेच असून जागावाटपात कितीही जागा मिळाल्या तरी 15 ते 20 जागांवरच गाडी अडखळणार आहे अशी राजकीय स्थिती स्थानिक पातळीवर निर्माण झालेली असल्याचे सर्वेक्षणात दिसून आलेले आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर अचूक सर्वेक्षण अंदाज वर्तविण्यात प्राविण्य मिळविलेल्या पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेकडून राज्यात मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मतदारांचे मत आजमावून घेतले. या मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल)मध्ये धक्कादायक निष्कर्ष आलेले आहेत. त्यानुसार विधानसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) नुसार राज्यात महाविकास आघाडीचाच सर्वाधिक प्रभाव या निवडणुकीत राहणार आहे असा अंदाज निष्कर्षातून व्यक्त होत आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या मतांचे प्रमाण भाजप-22.83% तर कॉंग्रेस-18.42% आणि शिवसेना-11.74% तर शिवसेना (उबाटा)-15.24% आणि राष्ट्रवादी-8.48% आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)-13.71 तसेच अन्य राजकीय पक्ष, अपक्ष व नोटासह 9.58% असे संभाव्य मतांचे प्रमाण राहील असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तविण्यात येत आहे. महायुतीच्या प्रमुख तीन पक्षांच्या एकत्रितपणे मतांचे प्रमाण 43.05 टक्के इतके तर महाविकास आघाडीच्या प्रमुख तीन पक्षांच्या एकत्रितपणे मतांचे प्रमाण 47.37 टक्के इतके राहण्याची शक्यता मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) नुसार व्यक्त होत आहे.

मतदारांचा कल आणि स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींवर आधारित राजकीय पक्षांमध्ये उमेदवारांचे सर्वाधिक विजयी होण्याचे तुलनात्मक प्रमाणात (स्ट्राईक रेट) मध्ये राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष सरस ठरणार आहे. मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) मध्ये पक्ष निहाय भाजप पक्षाचे मतांचे प्रमाण अन्य पक्षांच्या तुलनेत जास्तीचेच राहणार आहे मात्र मागील निवडणुकांच्या तुलनेत जनाधारात घट होण्याचा संभव आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींवर स्ट्राईक रेट अवलंबून राहणार आहे. मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी आणि प्रमुख शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमधील विभाजन, फाटाफूटीचा लाभ कोणाला मिळणार यासह अन्य प्रमुख निष्कर्ष प्राब संस्थेच्या सर्वेक्षण अहवालात पाहण्यास मिळेल.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 नंतरच्या काळात राजकारणातील घडामोडींमध्ये झपाट्याने धक्कादायक बदल होत गेले. बदलत्या राजकीयदृष्ट्या समीकरणांमुळे स्थानिक पातळीवरील राजकारणात देखील अमुलाग्र बदल झाले त्याचा थेट परिणाम राजकीय पक्षांच्या जनाधारात परिवर्तीत होत गेले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 मधील निकालापूर्वीच आत्मसन्मानाची बीजे रोवली होती असे नंतर स्पष्ट झाले होते. प्रमुख राजकीय पक्षांमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १६४ जागा लढवून १०५ जागा जिंकल्या होत्या. मतांचे प्रमाण 25.75 टक्के इतके होते. अर्थातच युती मध्ये निवडणूक लढवली होती. शिवसेनेने १२४ जागा लढवून ५६ जागा जिंकल्या होत्या. मतांचे प्रमाण 16.41 टक्के इतके होते.

राष्ट्रवादीने १२१ जागा लढवून ५४ जागा जिंकल्या होत्या. मतांचे प्रमाण 16.71 टक्के इतके होते. काँग्रेसने १४७ जागा लढवून ४४ जागा जिंकल्या होत्या. मतांचे प्रमाण 15.87 टक्के इतके होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १०१ जागा लढवून अवघी १ जागा जिंकली होती. त्यांच्या मतांचे प्रमाण 2.25 टक्के इतके होते. एमआयएमने ४४ जागा लढवून २ जागा जिंकल्या होत्या. मतांचे प्रमाण 1.34 टक्के इतके होते. शेकापने २४ जागा लढवून अवघी १ जागा जिंकली होती. त्यांच्या मतांचे प्रमाण 0.97 टक्के इतके होते. स्वाभिमानी पक्षाने ५ जागा लढवून अवघी १ जागा जिंकली होती. त्यांच्या मतांचे प्रमाण 0.40 टक्के इतके होते. वंचित बहुजन आघाडीने २३६ जागा लढवून एकही जागेवर यश मिळाले नाही मात्र मतांचे प्रमाण 4.58 टक्के इतके होते. राष्ट्रीय समाज पक्षाने ६ जागा लढवून अवघी १ जागा जिंकली होती. त्यांच्या मतांचे प्रमाण केवळ 0.15 टक्के इतके होते.

निकालानंतर शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतली आणि आघाडीच्या पक्षांबरोबर सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेत बंड होऊन 2 गटांमध्ये विभाजन झाले यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार व उद्धव ठाकरे यांच्याकडे उर्वरित आमदार राहिले. शिवसेनेपाठोपाठ कालांतराने राष्ट्रवादी पक्षामध्ये 2 गटांमध्ये विभागणी होऊन अजित पवार यांच्या गटाकडे 40 आमदार तर उर्वरीत आमदार शरद पवार यांच्याकडे राहिले. भाजपने शिंदे यांची सेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट एकत्रितरीत्या महायुती नावाने सत्ता उपभोगत असून सार्वजनिक लोकसभा निवडणुकांना प्रथमच सामोरे गेले आणि जनतेने त्यांच्या विरोधात कौल दिला. बहुतांश जागा महायुतीला गमवाव्या लागल्या आहेत त्यामुळे प्रामुख्याने भाजपला धक्का बसला आहे. मुळातच महायुतीचे राजकीय मिश्रण मतदारांना रुचले नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. राजकारणात जसे वारे वाहते तसा पक्षांतराचा प्रवाह प्रवाहित होतो आणि महाविकास आघाडीकडे राजकीय महत्वाकांक्षा असलेले उपेक्षित नेते आकर्षित झालेले पहावयास मिळत आहेत. महाविकास आघाडीमध्ये सद्यस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुड फीलचे वातावरण आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक घटकांच्या विविध मागण्या व विरोधाचा परिणाम महायुतीच्या पराभवात दिसून आला त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना मतदारांचा कल कसा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेकडून करण्यात आला. मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) मध्ये स्थानिक पातळीवरील मतदारांची व राजकीय पदाधिकाऱ्यांची सद्यस्थितीत असलेले मत आजमावून घेतले त्याचा निष्कर्ष अहवालात दिलेला आहे.

मतदारांनी दिलेल्या कल व पसंती नुसार राजकीय पक्षांच्या मतांचे प्रमाण वरीलप्रमाणे विषद करण्यात आलेले असून साधारण स्ट्राईक रेट प्रमाणे जागा मिळतील यामध्ये 2 ते 7 टक्के कमी-जास्त होऊ शकतात. भाजप- 65 ते 70 तर शिवसेना(शिंदे)- 25 ते 35 आणि राष्ट्रवादी(अजित पवार)- 15 ते 20 तसेच अन्य घटक पक्ष- 5 ते 10 असे महायुतीचे किमान 110 तर कमाल 135 पर्यंत संभाव्य जागा येऊ शकतील असा निष्कर्ष निघत आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस- 55 ते 60 व शिवसेना(ठाकरे)- 35 ते 40 आणि राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार)- 60 ते 65 तसेच आघाडीतील घटक पक्ष व अन्य- 3 ते 13 असे महाविकास आघाडीचे किमान 153 तर कमाल 178 पर्यंत संभाव्य जागा येऊ शकतील असा निष्कर्ष या ओपिनियन पोल मधून निघत आहे. यामध्ये जागावाटप व अन्य परिणामकारक घाडमोडीनंतर बदल होऊ शकतात.

2019 च्या निवडणूक निकालानंतर महाराष्ट्र विधानसभेतील एकूण 288 जागांपैकी रिक्त झालेल्या 6 मतदारसंघात पोटनिवडणुका घेण्यात आल्या तर लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने 7 आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने सद्यस्थितीत सदर जागा रिक्त आहेत तर कॉंग्रेसच्या एका आमदाराने राजीनामा देऊन शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने एक जागा रिक्त असून अन्य काही जागांमध्ये निधनाने रिक्त आहेत.

विधानसभा निवडणुकांमध्ये जागा वाटपावरून कोणत्या पक्षाकडे जागा जाते हे निश्चित झाल्यानंतर लढत स्पष्ट होईल तेव्हा संभाव्य अंदाजातील अचूकता निष्पन्न होईल. मतदारांचा कल जाणून घेताना राजकीय पक्ष आणि स्थानिक पातळीवरील प्रमुख पदाधिकारी यांची पसंती आजमावून घेतली जाते त्यावरून संभाव्य मतांचे प्रमाण ठरते. प्राब संस्थेकडून मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) घेऊन स्थिती स्पष्ट केलेली असून स्थानिक पातळीवर पक्षांतर, बंडखोरी, उमेदवारी वाटप, सामाजिक समीकरणांवर तेथील संभाव्य यश अवलंबून राहणार आहे. या सर्वेक्षणाचा जागावाटप व उमेदवार निवडीसाठी राजकीय पक्ष व इच्छुकांना उपयुक्त अहवाल आहे. या अहवालाच्या आधारावर उमेदवारीवर दावा केला जाऊ शकतो व सत्य वस्तुस्थिती काय आहे हे देखील स्पष्ट होते.

महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, चौथी आघाडी, वंचित, मनसेसह यांचा तसेच सामाजिकदृष्ट्या मराठा, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम या प्रमुख घटकांचा देखील समावेश सर्वेक्षणात अंतर्भूत केलेला आहे.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा समर्पित जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

पुणे दि, 7 ऑक्टोबर: आपल्या धडाडीच्या पत्रकारितेने सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच, समाजातील असंख्य वंचितांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने करण्यात आले होते. या पत्रकारांनी तीन दशकांहून अधिक कालावधीत शोध पत्रकारिता करीत, चुकीच्या गोष्टींचा प्रखर विरोध केला. त्याचप्रमाणे विविध मुद्द्यांवर अग्रलेखाद्वारे समाजाच्या भावना मांडल्या आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक मुद्द्यांवर परखडपणे लिखाण केले आहे. त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांना समर्पित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर (मुंबई), ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे(पुणे), बाळासाहेब बडवे (पंढरपूर), आचार्य प्रा. डॉ. रतनलाल सोनाग्रा(अहमदनगर), डॉ.सुकृत खांडेकर (मुंबई), जयप्रकाश दगडे (लातूर), राजा माने (मुंबई), डॉ. सुब्रतो रॉय (पुणे), विनायक प्रभू (मुंबई) आणि मोहम्मद वजीरुद्दिन (मुंबई)यांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि पदक देऊन सन्मान करण्यात आला.
 पत्रकारांचा सन्मान करून, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने एकप्रकारे समजाचा सत्कार करण्याचे काम केले आहे. यावेळी पत्रकारितेचे शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी उपस्थित असल्याने, त्यांना या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याची भावना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांनी व्यक्त केली
यावेळी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस आणि या परिषदेचे मुख्य समन्वयक प्र. कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
डॉ. संजय उपाध्ये यांनी प्रास्ताविक करीत, कार्यक्रमाची भूमिका विषद केली.  प्रा. डॉ. मिलिंद पत्रे यांनी सूत्रसंचालन केले.

नवरात्रोत्सवा निमित्त विविध मंडळाना स्पीकर सेट भेट देण्याचा क्रिएटिव्ह फाउंडेशन व वेस्टर्न इंडिया फोर्जिंग चा उपक्रम – संदीप खर्डेकर.

पुणे-गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवितानाच कर्णकर्कश डीजे न लावता सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही अश्या पद्धतीने मिरवणूक काढणाऱ्या व गणेशोत्सव साजरा करणाऱ्या विविध मंडळाना क्रिएटिव्ह फाउंडेशन व वेस्टर्न इंडिया फोर्जिंग प्रा. लि. कंपनीच्या वतीने स्पीकर सेट भेट देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमांस क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त सौ. मंजुश्री खर्डेकर, कै.विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके, तसेच महिला उत्सव प्रमुख सौ. कल्याणी खर्डेकर,सौ.अक्षदा भेलके,सौ. श्वेताली भेलके, भाजपा शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले, बाळासाहेब टेमकर, आर पी आय ( आठवले ) चे वसंतराव ओव्हाळ, केशवराव पवळे इ मान्यवर उपस्थित होते.
सध्या उत्सवांचे स्वरूप विभत्स होत असून त्यामागचा सामाजिक आशय नष्ट होत आहे, अश्या परिस्थितीत केवळ कायद्याचा धाक दाखवून बदल होणार नाही तर मंडळाच्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन करणे आणि चांगले कार्यक्रम करणाऱ्या मंडळाना प्रोत्साहन देण्यातूनच बदल घडेल असे संदीप खर्डेकर म्हणाले.या प्रसंगी शनी मारुती मंडळाचे प्रमुख सचिन पवार,शुभम पेंढारे, राज पेंढारे, आकाश पाडेकर,
जयदीप मंडळाचे संदीप मोकाटे,हर्षल मोहिते, हर्षल कुसाळकर, सौरभ पवार,नवनाथ मंडळाचे रामभाऊ भिसे, ओम नवनाथ मंडळाचे शंतनू खिलारे, हर्षवर्धन खिलारे, वैभव तनपुरे, शुभम चोरगे, साहिल साळवी,राजबाग मंडळाचे समीर फाले, ओंकार शिंदे, निहाल सातपुते,सुजीत फाले,छत्रपती शिवाजी मंडळाचे विनायक गायकवाड, संतोष गायकवाड, अचानक मित्र मंडळाचे विशाल टिळेकर,सोहन मोतीवाले,किरण पोळेकर,यश बोराडे,खिलारेवाडी मित्र मंडळाचे निखिल धिडे,अनिकेत साठे, स्वामी ठोंबरे, रोहन जोशी, अथर्व साठे,कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे मिलिंद सातपुते, नवनाथ शिंदे, यासह इतर मंडळाना ही भेट देण्यात आली. यात स्पीकर सेट, दोन कॉर्डलेस माईक, एक वायर माईक चा समावेश असून त्याला वायफाय व पेनड्राइव्ह घालण्याची देखील सोय देखील आहे.
दिवाळी दरम्यान काही स्वयंसेवी संस्थांना देखील अशीच भेट देणार असल्याचे ही संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले.
हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगतानाच शनी मारुती मंडळाचे सचिन पवार व ओम नवनाथ मंडळाचे शंतनू खिलारे यांनी यापुढे देखील विधायक कार्यक्रमांवर भर देणार असल्याचे सांगितले.तसेच आपले उत्सव अधिकाधिक लोकाभिमुख व्हावेत यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे वेस्टर्न इंडिया फोर्जिंग चे प्रमुख अरुण जिंदल यांनी जाहीर केले.

चंद्रकांतदादांच्या बाणेरमधील दांडिया उत्सवात,प्राजक्ता माळीला सेल्फीचा मोह आवरेना, बाणेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दांडिया हा नवरात्रोत्सवातील आनंद साजरा करण्याचे माध्यम- नामदार चंद्रकांतदादा पाटील

पुणे-नवरात्रोत्सवानिमित्त बाणेर मध्ये ५-६ दोन दिवस दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास बाणेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अबालवृद्ध, तरुण-तरुणी सारेच या महोत्सवात उत्साहात सहभागी झाले होते. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या उपस्थितीने तरुणाईच्या जल्लोषात आणखीनच भर घातली.

महायुती सरकारने यंदाही निर्बंधमुक्त वातावरण नवरात्रोत्सव असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गरबा रास दांडीया या नृत्यप्रकाराची तरुणाईमध्ये लोकप्रियता आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र गरबा रास दांडियांना तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून बाणेर-बालेवाडीमध्ये दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय या महोत्सवात घूमर, भवाई, दांडीया रास, डिस्को गरबा नृत्य सादर करताना तरुण व तरुणी पारंपारिक पेहरावात सहभागी झाली.

या महोत्सवात प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही उपस्थिती लावली. यावेळी तिने फुलवंती चित्रपटातील मदन मंजिरी गाण्यावरील नृत्याविष्कार सादर करत तरुणांची मने जिंकली. प्राजक्ताच्या नृत्याविष्काराच्या विविध छटा तरुण- तरुणींनी आपल्या कॅमे-यात टिपल्या. तर लकी ड्रॉमुळे अनेकांना प्राजक्तासोबत सोल्फी काढण्याची संधी मिळाली.

यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, “पोटाची भूक भागल्यानंतर; मनाची भूक भागविण्यासाठी अशा प्रकारच्या सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची आवश्यक्ता असते. हिंदू समाजात संपन्नता असल्याने; आपला आनंद साजरा करायचा असतो. मराठी दिनदर्शिकेत प्रत्येक दिवशी विविध प्रकारचे सण, व्रत, वैकल्याच्या निमित्ताने हा आनंद साजरा करायला मिळतो. त्यातील प्रमुख ३० सणांमध्ये गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी सारखे सण आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दांडिया महोत्सवास हा आनंद व्यक्त करण्याचे माध्यम आहे.”

वादग्रस्त रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला स्मरणपत्र.

रश्मी शुक्लांची मुदतवाद विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला फायदा पोहचणारी.

मुंबई, दि. ७ ऑक्टोबर २०२४
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांना बेकायदेशीरपणे मुदतवाढ दिली असून शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. उच्च पदावर असलेल्या अधिकारी रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करतात. अशा पक्षपाती अधिकाऱ्यांमुळे विधानसभा निवडणूक पारदर्शक व निष्पक्षपातीपणे पार पडतील याबाबत शंका असल्याने त्यांची तातडीने हकालपट्टी करावी, या मागणीचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुनरुच्चार केला आहे.

२४ सप्टेंबर रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्यात मागणी केली होती. मुख्य निवडणूक आयुक्त राज्याच्या दौऱ्यावर असताना रश्मी शुक्लांच्या हकालपट्टीबाबत काँग्रेस शिष्टमंडळाने मागणी करून निवेदन दिले होते. परंतु अद्याप त्यावर कारवाई झाली नसल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवडणूक आयोगाला स्मरणपत्र पाठवले आहे. या स्मरणपत्रात नाना पटोले पुढे म्हणतात की, रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) म्हणून अलीकडील नियुक्ती आणि त्यानंतर त्यांना दिलेली मुदतवाढ ही कायदेशीर नियम आणि प्रक्रियांचे उल्लंघन करणारी आहे. रश्मी शुक्ला यांना निवृत्तीनंतरही मुदतवाढ देऊन राज्य सरकारने महाराष्ट्र पोलीस कायद्याचे स्पष्ट उल्लंघन केले आहे. रश्मी शुक्ला यांना दिलेल्या मुदतवाढीचे समर्थन करण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा प्रकाश सिंह यांचा हवाला दिला आहे मात्र, सुप्रीम कोर्टाचा तो निकाल हा पोलीस प्रमुखांचा कार्यकाळ निश्चित करण्यासाठीचा असून राज्य सरकारने या निकालाचा चुकीचा अर्थ लावलेला आहे. रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय हे देशात एक धोकादायक उदाहरण होऊ शकते. उच्च पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) घालून दिलेल्या मानदंडांना बगल देऊन अशा पद्धतीने मुदतवाढ दिल्यामुळे चुकीचा पायंडा पडू शकतो. भविष्यात इतर राज्यातही अशाच पद्धतीने नियुक्त्या केल्या जाण्याची भिती आहे.
रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आल्याचे दिसून येते तसेच यात पारदर्शकता नसल्यामुळे सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वादग्रस्त पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ दिल्याने संशय निर्माण झाला आहे. राज्य सरकारचा निर्णय हा राजकीय दृष्ट्या प्रेरित असून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकणारा आहे. अशा पद्धतीने एका कलंकित अधिकाऱ्याला मुदतवाढ दिल्याने सरकारच्या निष्पक्षता आणि निष्पक्षतेवरील विश्वास आणखी कमी होतो. रश्मी शुक्ला यांना दिलेल्या मुदतवाढीचा तात्काळ आढावा घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी कोल्हापूरच्या अजित संधे यांच्या घरी दिलेल्या भेटीचे फोटो पहा …


लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी शनिवार दिनांक ५ ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यात उचगाव येथे टेम्पोचालक अजित तुकाराम संधे यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. यावेळी राहुल गांधी यांनी संधे यांच्या स्वयंपाक घरात जाऊन हरभऱ्याची भाजी, वांग्याची भाजी, तुरीची डाळ व भाकरी बनवली व त्यांच्यासोबत जेवण केले.

राहुल गांधी यांनी तुकाराम संधे व अंजना तुकाराम संधे यांच्याशी यावेळी तासभर चर्चा केली. शाहू पटोले आणि तुकाराम संधे यांच्याशी जाती आणि भेदभावाच्या वैयक्तिक अनुभवांबद्दल बोलताना दलित आहाराबद्दल जागरूकता नसणे आणि या संस्कृतीच्या दस्तऐवजीकरणाचे महत्त्व यावर राहुल गांधी यांनी चर्चा केली.

दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा गडी ठरला:हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरची उमेदवारी

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली घोषणा
इंदापूर-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील या महत्त्वाच्या मतदारसंघात त्यांचा सामना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्ता भरणे यांच्याशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. ते म्हणाले, आजच्या कार्यक्रमाची गर्दीच विधानसभा निवडणुकीचा निकाल सांगत आहे. 2019 मध्ये आमच्या पक्षाचे एकेक नेते आम्हाला सोडून जात होते. त्यावेळी मी राज्यात सांगत होतो, अ, बक, क गेला तरी चालेल कारण, शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद आमच्याकडे आहे. शरद पवार नावाचे विद्यापीठ आमच्याकडे आहे.

त्यांनी एकदा नव्हे तर चारवेळा हे करुन दाखवले आहे. महाराष्ट्राला लढणारा नेता हवा असतो. दिल्लीवाल्यांनी जेव्हा केव्हा जबरदस्ती केली तेव्हा शरद पवार यांनी त्यांना मराठी स्वाभिमान दाखवण्याचे काम केले.

जयंत पाटील म्हणाले, आज राज्यातील स्वाभिमानी माणसे शरद पवार यांच्या मागे उभी आहेत. हर्षवर्धन पाटील 2019 साली काही कारणांमुळे भाजपमध्ये गेले. पण आता ते स्वगृही परत आलेत. त्यांनी यापूर्वीच येण्याची गरज होती. पण आमच्या घरी गर्दी थोडी जास्त होती. त्यामुळे त्यांना येता आले नाही. पण आता ते आलेत याचा फार मोठा आनंद आहे.

शरद पवार बहुजन समाजाचा विचार घेऊन मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रही त्यांच्यासोबत येत आहे. दुसरीकडे, विधानसभा निवडणूक पाहून सत्ताधाऱ्यांना आता बहिणी लाडक्या झाल्या आहेत.

जयंत पाटलांनी यावेळी व्यासपीठावरूनच हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारीही जाहीर केली. ते म्हणाले, इंदापूरची जागा कोणत्याही स्थितीत आपल्याला निवडून आणायची आहे. उद्याच्या विधानसभेला इंदापूरचे हे महाशिवधनुष्य हर्षवन पाटील यांच्या प्रवेशामुळे सहज सुलभ झाले आहे. त्यांनीच हे धनुष्य हातात घ्यावे अशी आमची त्यांना विनंती आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय मला यासंबंधीची घोषणा करता येणार नाही. पण त्यांचा प्रवेश करताना मी त्यांच्या हातात तुतारी देणार आहे. त्यामुळे इंदापूरकरांना याहून वेगळे काहीही सांगण्याची गरज मला वाटत नाही. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे एकप्रकारे त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरची उमेदवारीच दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

शरद पवार हेच बिग बॉस घोषणा करत हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीत सामील

इंदापूर-भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आमदार हर्षवर्धन पाटील यांनी अखेर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांच्या रुपात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आणखी एक मोहरा विरोधकांच्या हाती लागला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज त्यांनी इंदापूर येथे आयोजित एका दिमाखदार कार्यक्रमात शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यामुळे पवारांच्या पक्षाची ताकद कैकपटीने वाढली असून, भाजपला मोठे भगदाड पडले आहे.

यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात ‘परिवर्तन’ होण्याचा विश्वास व्यक्त करत शरद पवार हेच ‘बिग बॉस’ असल्याचे स्पष्ट केले. हर्षवर्धन पाटील म्हणाले, जयंत पाटील जेव्हा, जेव्हा भेटायचे तेव्हा म्हणायचे, का थांबलाय तिथे ( भाजपत ) या इकडे. शेवटी कोणत्याही गोष्टीसाठी योग लागतो. पण मी वैयक्तिक राजकारणासाठी निर्णय घेत नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ‘तुतारी’ हातात धरण्याचा निर्णय घेतला.

हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयात आपलाही अदृश्य हात असल्याचे सांगितले. ते म्हणाले, सुप्रिया सुळे आमच्या भगिनी आहेत. सुप्रिया सुळे चारवेळा खासदार झाल्या. याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांना तीनवेळा खासदार करण्यात आमचा प्रत्यक्ष सहभाग होता. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आमचा सहभाग हा अदृष्य स्वरुपाचा होता, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.

इंदापूरच्या जनतेची मी शरद पवार गटात जावे अशी इच्छा होती. हा जनतेचा उठाव आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांचा उठाव आहे. त्यानुसार मी आज शरद पवार गटात प्रवेश केला. एकतर जनतेचा आग्रह होता की मी येथून निवडणूक लढवली पाहिजे. दुसरे म्हणजे बऱ्याच निवडणुकांपासून आमच्या विचारांचे कार्यकर्ते या मतदारसंघात लोकप्रतिनिधी झाले आहेत. मागच्या निवडणुकीत आमचा अवघ्या 1500 मतांनी पराभव झाला. शेवटी जनता श्रेष्ठ आहे. त्यामुळे जनतेच्या आग्रहासाठी आम्ही शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.

इंदापूर विधानसभेच्या उमेदवारीसाठी आग्रही

हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. यासाठी त्यांनी महायुतीकडे तिकीट मागितले होते. पण महायुतीतील घटकपक्षांनी विद्यमान जागा आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा पत्ता कट झाला होता. त्यामुळे त्यांनी शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. आता त्याने तिथे विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण समाजाला किमान 30 जागा मिळाव्यात

सकल ब्राह्मण संघाची भाजपाकडे मागणी : मित्रपक्षांनाही निवेदन
पुणे : ब्राह्मण समाजाने आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला नेहमीच संपूर्ण पाठिंबा दिला आहे. सध्या राज्यातील ब्राह्मण समाजाच्या राजकीय प्रतिनिधीत्वाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभेसाठी किमान 30 जागा ब्राह्मण समाजाला द्याव्यात, अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाने भारतीय जनता पार्टीकडे केली आहे, अशी माहिती सकल ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे बहुभाषी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, भालचंद्र कुलकर्णी, तेजस फाटक, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. सचिन बोधनी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड, कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मुलुंड या विधानसभा मतदारसंघांत ब्राह्मण समाजाची मतदारसंख्या निर्णायक आहे. या मतदारसंघांमध्ये ब्राह्मण समाजाला उमेदवारी दिल्यास, भाजपला विजय मिळवणे सोपे होईल. याच आशयाचे निवेदन भाजपाचे मित्र पक्ष शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना दिले आहे.
चिंचवड मतदारसंघात बहुजन समाजातील इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे कोणालाही उमेदवारी दिली तरी बंडखोरी अटळ आहे. त्यामुळे मतांची विभागणी होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर ब्राह्मण उमेदवाराला संधी दिल्यास, या मतदारसंघात विजय मिळवणे सहज शक्य होईल.
राज्यातील 45 विधानसभा मतदारसंघांमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या निर्णायक आहे. त्यापैकी किमान 30 जागांवर ब्राह्मण उमेदवारांना संधी मिळावी, अशी सकल ब्राह्मण समाजाची मागणी आहे. पुण्यातील कोथरूड, कसबा तसेच पिंपरी-चिंचवड, ठाणे, कल्याण-डोंबिवली या मतदारसंघांमध्ये ब्राह्मण उमेदवार निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार उपलब्ध आहेत. योग्य व्ोळी आम्ही त्यांची नावे सादर करू.
महाराष्ट्रीयन ब्राह्मण तसेच बहुभाषक ब्राह्मण मिळून अनेक मतदारसंघांमध्ये 80 हजारांहून अधिक मतदार आहेत. ब्राह्मण समाज नेहमीच विचारपूर्वक मतदान करतो, त्यामुळे त्यांच्या मतांचा योग्य वापर झाला पाहिजे.
गेल्या काही वर्षांत राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न झाले आहेत, ज्यात ब्राह्मण समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले आहे. या परिस्थितीत ब्राह्मण समाजाला राजकीय भूमिका घेणे अनिवार्य झाले आहे, त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत.
भाजपकडे ब्राह्मण समाजाची एकगठ्ठा मते आहेत, विशेषत: चिंचवड, कसबा, कोथरूड, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि शिवाजीनगर मतदारसंघात. ब्राह्मण समाजाने नेहमीच कर्तव्य म्हणून मतदान केले आहे, मात्र यावेळी भाजपने नेतृत्वाची संधी देऊन ब्राह्मण उमेदवाराला उभे करावे, अशी समाजाची विनंती आहे.
राज्यभरातील विविध समाजांनी संघटित होऊन राजकीय जागरूकता दाखवली आहे. ब्राह्मण समाजही आता जागरूक होऊन संघटित होत आहे. शिक्षण, नोकरी यासारख्या क्षेत्रात आरक्षण नसतानाही ब्राह्मण समाज आपल्या कष्ट, बुद्धिमत्ता व गुणवत्तेच्या जोरावर टिकून आहे. म्हणून भाजपने ब्राह्मण समाजाला गृहीत धरू नये.
राज्यभरात अनेक मतदारसंघांमध्ये सक्षम ब्राह्मण नेते आहेत, मात्र त्यांना पुढे येण्याची संधी मिळत नाही. संधी मिळाल्यावर त्यांनी नेहमीच त्यांचे नेतृत्व सिद्ध केलेले आहे. म्हणून, योग्य उमेदवारांना संधी दिल्यास ब्राह्मण समाजही यशस्वी नेतृत्व देऊ शकेल.
ब्राह्मण समाजाने आतापर्यंत संघर्ष नको म्हणून बरेच त्याग केले आहेत, पण आता समाजाला संघर्ष करण्याची गरज आहे आणि यासाठी पक्षाने ब्राह्मण उमेदवारांना संधी देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा. ब्राह्मण समाजाने हिंदुत्वाच्या समर्थनार्थ कायम उभे राहून भाजपला पाठिंबा दिला आहे आणि भविष्यातही तो पाठिंबा कायम राहील. मात्र, या वेळी उमेदवारी न मिळाल्यास समाजाला आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा लागेल, असे पत्रात नमूद केले आहे.
गौड ब्राह्मण समाज, गौर ब्राह्मण संघटन, पुणे, विप्र फौऊंडेशन, अखिल ब्राह्मण संघ, राष्ट्रीय सेवा संघ, महाराष्ट्र ब्राह्मण सभा, परशुराम सेवा संघ, आम्ही सारे ब्राह्मण, ब्राह्मण महासंघ, महाराष्ट्रीय ब्राह्मण संघ, बहुभाषिक ब्राह्मण संघ आदी संघटनांचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते.

गोडबोले यांच्या पुस्तकात पुण्यातील समाजकारण आणि राजकारणातल्या व्यक्तींचे नेमके चित्रण-अरविंद गोखले

पुणे दिनांक ७-पत्रकार अविनाश गोडबोले यांनी त्यांच्या चार दशकांच्या पत्रकारितेतील अनुभवावर आधारित ऐसी अक्षरे मेळविली हे जे पुस्तक लिहिले आहे, त्यात गेल्या चार दशकात पुण्यातील समाजकारण आणि राजकारणातील ज्या व्यक्तींशी त्यांचा संबंध आला त्यांचे नेमकेपणाने वर्णन केले आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांनी केले.
या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल निवारासभागृहात गोखले यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की गोडबोले आणि माझी पत्रकारिता समांतर काळातली आहे, त्यामुळे मला त्यांनी यात केलेले लिखाण प्रत्ययकारी वाटले. वर्तमानपत्रामध्ये काम करताना सर्वस्पर्शी व्यापक दृष्टिकोनाची गरज असते, कोणतीही जबाबदारी न टाळता लिखाणामध्ये वैविध्य आणणे हेच पत्रकाराचे काम असते ते काम गोडबोले यांनी या पुस्तकात केले आहे, असे गोखले म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा होते. त्यांनी यावेळी गोडबोले यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव करत त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य नमूद केले. आचार्य अत्रे, ग.वा.बेहरे, वा.रा. कोठारी या जेष्ठ संपादकांच्या आठवणीही सोनग्रा यांनी यावेळी कथन केल्या. प्रभातकार कोठारी यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दिलेल्या योगदानाच्याही आठवणी त्यांनी सांगितल्या.
उल्हासदादा पवार म्हणाले की गोडबोले यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत केवळ प्रभातशी च निष्ठा ठेवून तेथे 37 वर्षे काम केले. जिथे पत्रकारीतेला प्रारंभ केला तेथेच ते निवृत्त झाले. राजकारण्यांमध्ये सध्या अशी निष्ठा दिसत नाही. डाव्या विचारसरणीची माणसे एका क्षणात उजव्या विचारसरणीची होतात, त्या सगळ्या गमती जमती आज आपण सगळीकडे पाहत आहोत. त्यामुळे एकाच दैनिकाशी निष्ठा ठेवून गोडबोले यांनी केलेली पत्रकारिता महत्त्वाची वाटते. बाळासाहेब शिवरकर म्हणाले की पुण्यातील वृत्तपत्रांची पूर्वीची स्थिती वेगळी होती. त्यांचा प्रभाव मोठा होता. वर्तमानपत्रात आलेल्या वाचकांच्या पत्रातून एखादी तक्रार आली तरी प्रशासन स्तरावर त्याची गांभीर्याने दखल घेऊन दुरुस्ती केली जायची परंतु आज नेमकी दुर्दैवी स्थिती उद्भवली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना गोडबोले यांनी चार दशकातील पत्रकारितेने आपल्याला सामाजिक विषयाचे भान दिले, सर्व क्षेत्रातील माहितगार बनवले असे नमूद केले. तसेच त्यांनी यावेळी या पुस्तका मागची भूमिका विशद केली. संजय बालगुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी आभार मानले.

रा.स्व.संघ कसबा भागाचा विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव सिरम इन्स्टिट्यूटचे केदार गोखलेंच्या उपस्थितीत साजरा

रा.स्व. संघाचे अखिल भारतीय सह बौद्धिक प्रमुख दीपक विसपुते यांची उपस्थिती ; विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
पुणे :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेपासून हिंदू समाजाचे संघटन करण्यासोबतच समाजामध्ये विजयाकांक्षा जागविण्यासाठी प्रयत्नशील आहे. या दृष्टिकोनातून व शिस्तबद्ध संघटनेच्या शक्तीचे समाजाला दर्शन घडावे याकरिता विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भाग तर्फे ताडीवाला रस्त्यावरील भारतीय रेल्वे खेळाचे मैदान येथे शस्त्रपूजन उत्सव पार पडला.

यावेळी  सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक केदार गोखले, रा.स्व. संघाचे अखिल भारतीय सह बौद्धिक प्रमुख दीपक विसपुते,  भाग संघचालक विधीज्ञ प्रशांत यादव व्यासपीठावर उपस्थित होते. उत्सवात स्वयंसेवकांनी विविध शारीरिक व बौद्धिक प्रात्यक्षिके सादर केली.

केदार गोखले म्हणाले, काळानुरूप शस्त्रांचे स्वरूप बदलत गेले. आता विध्वंसक शस्त्रे असतात तशी मनुष्याचे जीवन उज्वल करणारे शस्त्र म्हणजे व्हॅक्सिन. व्हॅक्सिन च्या रुपाने मानवी शरीराला शस्त्र मिळते. तसेच अणूशक्तीचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात शब्द हीच शस्त्रे ठरली. जसे ‘वन्दे मातरम्’ या शब्दाने संपूर्ण देश भारावला आणि शब्द शस्त्र ठरले. शक्ती हे स्त्री रुप आहे; आपण महिलांचाही सन्मान केला पाहिजे. स्त्रीचे रक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. तरुणांना पालकांनी असे संस्कार द्यावे. संघ बाल-तरुणांना अशा प्रकारचे संस्कार देतो व भविष्यातही राष्ट्र रक्षणाप्रमाणे स्त्री रक्षणाचे संस्कार संघ देत राहील.

दिपक विसपुते म्हणाले, दिनांक २७ सप्टेंबर१९२५ रोजी संघाची स्थापना डाॅ. हेडगेवार यांनी केली. त्याचे आता विशाल स्वरुप झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्यालाही ७५ वर्षे झाली आहेत. पंच्याहत्तर वर्षांत आपली ओळख एक मजबूत राष्ट्र अशी झाली आहे. आता जग भारताकडे आदराने बघत आहे. जसे भारताने जगाला व्हॅक्सिन दिले. अन्न-गहू कोरोना काळात भारताने जगाला दिले. संघाचा इतिहास सुद्धा असाच विकासाचा आहे. देशातील लोकांच्या मनात संघ देशभक्तीचे जागरण गेली शंभर वर्षे करीत आहे. संघाच्या चार पिढ्या या कामात समर्पित झाल्या आहेत.

ते पुढे म्हणाले, संघाच्या शाखा हीच संघाची शक्ती आहे. संघ कामाची स्विकार्हता समाजात वाढली. समाजाच्या एकाकी पणाची भावना संघाने दूर केली. भारतीय समाज स्वत:च्या भारतीय विचारांवर उभा रहावा, यासाठी संघाने कार्य केले. शंभर वर्षांत समाज कसा असावा याचे प्रारुप संघाने उभे केले. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरणपूरक जीवन, नागरिक शिष्टाचार, स्वदेशी आधारित जीवनशैली या पाच गोष्टींचे आचरण व प्रचार करावा असे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.

याप्रसंगी प्रसंगी  प्रांत शारीरिक प्रमुख निलेश भंडारी, महानगर सहकार्यवाह मंगेश घाटपांडे उपस्थित होते. सर्व प्रथम प्रशांत यादव यांनी आभार मानले. तर कसबा भागाचे कार्यवाह राहुल पुंडे यांनी मान्यवरांचा परिचय करुन देत प्रास्ताविक केले.

महायुतीला तिहेरी आकडा गाठता येणार नाही:महाविकास आघाडी 183 हून अधिक जागा जिंकणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

पुणे-आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला तिहेरी आकडाही गाठता येणार नाही. याऊलट महाविकास आघाडीला 183 हून अधिक जागा मिळतील, असा ठाम विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केला. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे आमचा आत्मविश्वास दुणावल्याचेही ते यावेळी म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर यांनी सोमवारी निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी उपरोक्त दावा केला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. याचा अर्थ आम्ही तब्बल 65 टक्के जागा जिंकल्या. या गोष्टीचा विचार केला, तर विधानसभा निवडणुकीत आम्हाला 183 जागा मिळतील. याऊलट सत्ताधारी महायुतीला तिहेरी आकडाही गाठता येणार नाही अशी स्थिती आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण चिंताजनक झाल्याचाही दावा केला. ते म्हणाले, राज्यात बारा बलुतेदार समजा, मराठा समाज, दलित समाज आदी सर्वचजण खेळीमेळीच्या वातावरणात राहत होते. त्यांच्यात केव्हाच तेढ निर्माण झाले नाही. पण आता काही राजकीय पक्ष त्यांच्यात तेढ निर्माण करत आहेत. यामुळे महाराष्ट्राचे सामाजिक आरोग्य बिघडले आहे.

दलित समाजातील बौद्ध व दलित तसेच हिंदू व दलित अशी विभागणी करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर जातीय, धार्मिक दंगली घडवण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असे ते म्हणाले.

राज्यात माझ्या नेतृत्वात सरकार असताना मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आले. पण फडणवीस सरकारला ते टिकवता आले नाही. सध्या राज्यात बेरोजगारीचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. लोकांच्या हाताला काम नाही. मागच्या 10 वर्षांत एकही मोठा उद्योग किंवा कंपनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आली नाही. जे उद्योग येत होते, ते गुजरातला पळवण्यात आले. राज्यातील वातावरण उद्योगस्नेही नाही अशी परिस्थिती जाणिवपूर्वक निर्माण करण्यात आली. यामुळे तरुणांवर बेरोजगारी कोसळली. या बेरोजगारीमुळेच राज्यात आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले.

काँग्रेसने अल्पसंख्याक मंत्रालय बदनाम केले:केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रीजिजू यांचा आरोप

पुणे -माझ्याकडे देशाचे अल्पसंख्याक मंत्रालय कामकाज आहे. काँग्रेस काळात या मंत्रालयास खूप बदनाम करण्यात आले. केवळ मुस्लिम मंत्रालय असे त्याला दाखवले गेले. पण आमचे मंत्रालय सहा धर्मियांसाठी काम करत आहे. मी ठिकठिकाणी जाऊन खरी परिस्थिती मांडून दुरुस्ती करत आहे. काँग्रेसने मुस्लिमांना व्होट बँक म्हणून पाहिले. त्यामुळे ते अल्पसंख्याक मंत्रालय हे मुस्लिम मंत्रालय असल्याचे दाखवण्याचे प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रीजिजू यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी मंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते.किरण रीजिजू म्हणाले, महाराष्ट्र मध्ये मी दौरा करत आहे कारण महाराष्ट्र वीरांची भूमी असून त्यातून देशाला प्रेरणा मिळते. राज्याला देशातील राजकारणात सध्या बदनाम करण्यात आले असून विरोधकांकडून दिशाभूल करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी दुषप्रचार करतात की, भारतात लोकशाही संपुष्टात आली आहे. अल्पसंख्याक यांची गळचेपी होत आहे परदेशात जाऊन देशाला बदनाम करण्याचे काम विरोधक करत आहे. देशविरोधी यांच्याशी संगनमत करून वेगवेगळे आरोप केले जातात. सर्व धर्मियांना सोबत घेऊन विकासाचे दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहे. संविधान धोक्यात आहे असे सांगून खोटा प्रचार करणारे यांनी संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गोष्टी हटवण्याचे काम आतापर्यंत करत आली आहे. संविधान नष्ट करण्याचे काम त्यांनी केले पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान यात्रा, संविधान दिवस, संविधान पूजन सुरू केले. सबका साथ, सबका विकास यादृष्टीने आम्ही देशाचा विकास करत आहे. सन २०४७ मधील विकसित भारत यादृष्टीने काम करत आहे. महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन निर्माण करण्याचे आम्ही ठरवले असून ते सर्व धर्मियांसाठी असेल. बौद्ध विहार यांच्यासाठी विशेष मदत करण्यात येणार आहे कारण त्यांना सुरवातीला दुर्लक्षित करण्यात आले होते.

पंढरपुर मंदिर परिसरासाठी १४०० कोटी व पत्रकार गृह निर्माण सोसायटीला ७ कोटी निधीची तरतूद करणारे एकनाथ शिंदे एकमेव मुख्यमंत्री … गोऱ्हे

सोलापूर-दि:६ ऑक्टोंबर : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या नीलमताई गोऱ्हे तुळजापूर सोलापूर दौऱ्यावर असताना आज दुपारी सोलापूर शासकीय निवासस्थान येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत डॉ .गोऱ्हे यांनी संवाद साधला. सोलापूर येथून येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाला व महायुतीला अधिकाधिक यश मिळेल असा विश्वास डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडी कडून दिशाभूल करणारी वक्तव्ये सामान्य माणसापर्यंत पोचवण्याचे दुष्पाप करण्यात आले होते त्या गोष्टीला सामान्य मतदार आता बळी पडणार नाही असा विश्वास देखील डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सोलापुरातील ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना जसे वयाच्या 84 व्या वर्षी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या योगदानाबद्दल साक्षात्कार झाला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी योजनांबद्दल जो अपप्रचार खासदार प्रणिती शिंदे ह्या करत आहेत त्यांना देखील कालांतराने एकनाथ शिंदे बद्दल साक्षात्कार होईल अशी खात्री मा.नीलमताई गोऱ्हे यांनी व्यक्त केली. लाडकी बहिण योजने मुळे राज्याच्या तिजोरीवर कुठलाही बोजा पडणार नाही राज्य सरकार च्या मागे देशातील मोदी सरकार भक्कम पणे उभे आहे

सोलापूर शिवसेना पक्षात अनेक मतभेद गटबाजी आहे असा अपप्रचार जाणून बुजून करण्यात येत होता त्याला मात्र आज नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकारी एकत्रितरित्या उपस्थित असल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला असे मत सर्व पदाधिकारी यांनी देखील व्यक्त केले. या बैठकीत जिल्हाप्रमुख शिवाजी सावंत, मनीष काळजे, अमोल शिंदे व प्रवक्ता ज्योतीताई वाघमारे यांनी आपले विचार मांडले व संजय मशिलकर संपर्क प्रमुख यांनी सर्व पदाधिकारी एक विचाराने काम करतील असे मत मांडले व आभार मानले.

या वेळी शिवाजी सावंत सोलापूर संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, दिलीप कोल्हे शहर समन्वय, मनोज शेजवाल शहर समन्वयक, उमेश गायकवाड, सागर शितोळे, महिला जिल्हाप्रमुख रवीना राठोड, मोबिना मुलानी, आरती बसवंत ,जयश्री पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महाराजा अग्रसेन यांची मूल्ये जपल्यास समाजाची प्रगती निश्चित

अग्रसेन जयंती कार्यक्रमात सुप्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांचे प्रतिपादन

पुणे : महाराज श्री अग्रसेन हे जनतेची काळजी घेणारे एक आदर्श राजे होते. त्यांनी अहिंसा, समानता आणि समृद्धी ही तीन प्रमुख मूल्ये जपली होती. या मूल्यांचा अंगीकार केल्यास कोणत्याही समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. अग्रवाल समाजाने काटेकोरपणे ही मूल्ये जोपासावीत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध उद्योपती तथा घोडावत ग्रुपचे चेअरमन संजय घोडावत यांनी केले.
अग्रवाल समाज पुणे वतीने पुण्याच्या डीपी रोडवरील सिद्धी बँक्वेट्स मध्ये रविवार ६ आॅक्टोबर रोजी अग्रसेन महाराज जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून संजय घोडावत बोलत होते.
अग्रवाल समाज पुणे अध्यक्ष ईश्वरचंद गोयल हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मंचावर समाजाचे उपाध्यक्ष विजय अग्रवाल, सचिव अमित अग्रवाल, कोषाध्यक्ष मुरलीधर चौधरी व अग्रवाल महिला संघटनेच्या अध्यक्षा भारती जिंदल आदि या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाला केंद्रीय सहकार व नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात सुरवातीला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. हेमंत अग्रवाल यांनी अग्रवाल समाजाच्या विविध संघटना व क्लबची माहिती दिली. कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
आपल्या खुमासदार भाषणात संजय घोडावत पुढे म्हणाले की, जीवनात नेहमी मोठे ध्येय ठेवा. कारण मोठे ध्येय ठेवणारेच जीवनात प्रगतीच्या शिखरावर पोहोचतात. याशिवाय मोठी ध्येये गाठताना कधीही वयाचा विचार करू नका. कारण यशस्वी होण्यासाठी वयाची अट जरुरी नसते. ध्येय गाठण्यासाठी मोटिवेशन आणि इन्स्पीरेशन आवश्यक असते, परंतु सर्वांत महत्वाचे असते ते अॅक्शन. यशस्वी होण्यासाठी मागचा-पुढचा विचार न करता तत्परतेने अॅक्शन घ्या. यश नक्कीच तुमचे असेल.
मुरलीधर मोहोळ या वेळी बोलताना म्हणाले की, पुण्यात प्रत्येकच जाती-धर्माचे सण-उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरे होत असतात. ही पुण्यासाठी अभिमानाची बाब आहे. अग्रवाल समाज हा व्यवसायात आघाडीवर आहे, परंतु या समाजाने पुण्याच्या आर्थिक उन्नतीत मोठे योगदान दिलेले आहे. मला सातत्याने अग्रवाल समाजाच्या लोकांकडून मदत झालेली आहे. तुम्ही तुमचे काम केलेले आहे, त्यामुळे आता मी समाजाच्या सर्व मागण्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे.
ईश्वरचंद गोयल यांनी अग्रवाल समाजातर्फे चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये हिंदी माध्यमाची शाळा, वैकुंठ रथ या विषयी त्यांनी सांगितले. त्यांनी या वेळी जमलेल्या अग्रवाल समाजातील नागरिकांना एकमेकांशी नाती जपण्याची व संबंध वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले.
अमित अग्रवाल यांनी प्रास्ताविक करताना पुणे अग्रवाल समाज कार्यकारिणीच्या कामांची माहिती दिली. तसेच मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर समाजाच्या विविध समस्यांची मांडणी केली. या समस्या लवकरच सोडवू, असे आश्वासन या वेळी मोहोळ यांनी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक अग्रवाल आणि रितू बन्सल यांनी केले. विजय अग्रवाल यांनी सर्वांचे आभार मानले.

  • सर्वोत्तम कार्य करणाऱ्यांना अग्रसेन सन्मान प्रदान
    विविध क्षेत्रात कार्यरत राहून समाजाची सेवा करणाऱ्या पाच जणांना या वेळी अग्रसेन सन्मान प्रदान करण्यात आला. यामध्ये उद्योग क्षेत्रातून वसंत ग्रुपचे प्रेमचंद मित्तल, चिकित्सा क्षेत्रात सर्वोत्तम कार्यासाठी डाॅ. बालकृष्ण अग्रवाल, नेत्रदानाचे तसेच नेत्रहीन विद्यार्थ्यांसाठी कार्य करणारे सीए माखनलाल अग्रवाल, आरोग्य क्षेत्रात कार्य करणारे डाॅ. जितेंद्र अग्रवाल आणि क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल अजय अग्रवाल यांना हे पुरस्कार उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

— मोफतची सवय समाजाच्या उन्नतीसाठी घातक
कार्यक्रमात बोलताना संजय घोडावत यांनी मोफत या संकल्पनेवर टीका केली. त्यांनी सांगितले की, कुठलीही मोफतची सवय चांगली नाही. मोफतच्या सवयीमुळे समाज पंगू बनतो. एकीकडे देशात बेरोजगारी प्रचंड आहे, तर दुसरीकडे काम करण्यास माणसे मिळत नाहीत, हे दरी केवळ मोफत संस्कृतीमुळे फोफावली आहे. समाजाला कार्यान्वित करायचे असेल तर ही मोफत संस्कृती संपवावी लागेल.