Home Blog Page 655

युवक काँग्रेस तर्फे पुण्यात बेरोजगारी आणि वाढती नशेखोरीच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन

मोदी सरकारने भारताची प्रतिमा खराब केली – उदय भानु चिब

पुणे – महाराष्ट्रात वाढती बेरोजगारी आणि त्यामुळे वाढणारे गुन्हे यावर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने युवक सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना उदय भानु चिब म्हणाले , “आज आपण इथे उपस्थित राहून हे दर्शवले आहे कि भारत मातेच्या भविष्यासाठी हे आंदोलन किती महत्त्वचे आहे. या 10 वर्षात बेरोजगारी, नशा खोरी, ड्रग्ज रॅकेट याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या व्यसनामुळे केवळ तो व्यसन करणारा युवक बरबाद होतं नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंब बरबाद होते. आज या मोदी सरकारने भारताची प्रतिमा खराब केली आहे. हे सरकार झोपेचे सोंग घेऊन बसले आहे, असा आरोप ही यावेळी त्यांनी केला. तसेच बेरोजगारी आणि नशेखोरी थांबवण्यासाठी मोदी सरकार ने प्रयत्न करावे अशी मागणी ही केली.

भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राष्ट्रीय युवक काँग्रेस प्रभारी कृष्णा अल्ला वरू, महाराष्ट्र अध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा , कार्यअध्यक्ष शिवराज मोरे , महाराष्ट्र युवक काँग्रेस सह प्रभारी एहसान भाई खान, पुणे शहर युवक काँग्रेस शहराअध्यक्ष सौरभ आमराळे,प्रदेश प्रभारी अजय चीकारा, अध्यक्ष कुणाल राऊत, रोहित कुमार, मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, उमेश पवार, कौस्तुभ नवले, अजित सिंग, वैष्णवी किराड, दीपाली ससाणे, प्रथमेष आबनावे,प्रविण बिरादार, श्रीनिवास नालमवार, तारीक बागवान, गणेश उबाळे, आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“नोकरी द्या नशा नको” अशा घोषणा देत काँग्रेस भवन येथून पदयात्रा करीत हल्लाबोल आंदोलन सुरु करण्यात आले. पुढे बालगंधर्व चौकात आंदोलन कर्त्यांना अडविण्यात आले. तर पोलिसांकडून काही आंदोलन करणार्‍या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शिवराज मोरे म्हणाले , “आपला महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला मिळणारे उद्योग, रोजगार आज गुजरातला पळवण्याचे काम मोदी, शहा करत आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डोळे झाकून बसले आहेत. बेरोजगारीमुळे आज महाराष्ट्र काय संपूर्ण देशातले तरुण देशोधडीला लागले आहेत. वाढत्या बेरोजगारीमुळे अनेक तरुणांनी परदेशात पळ काढला आहे. आज महाराष्ट्र उडता पंजाब झाला आहे. एवढेच काय तर आज बीडचा बिहार झाला आहे. आज महाराष्ट्राची प्रतिमा घसरत चाली आहे. या वाढत्या बेरोजगारीमुळे युवकांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही आजची लढाई निवडणुकी पुरता नाही तर युवकांना जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यत ही लढाई चालू राहणार आहे. ड्रग्सचे रॅकेट महाराष्ट्रात थांबवल्या शिवाय आम्ही ही लढाई थांबवणार नाही”.

एहसान भाई खान म्हणाले ,” आज या आंदोलनात तरुणांचा जोश दिसत आहे. यावरून आपल्याला कळते कि आज देशात बेरोजगारीचे प्रमाण किती वाढले आहे. आज केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार या गोष्टीकडे डोळेझाक करत आहे. अशा या सरकारचे आपल्याला या आंदोलनातून डोळे उघडणी करायची आहे.”

सौरभ अमराळे म्हणाले , “आधी पुण्याची ओळख ही विद्येचे माहेर घर म्हणून होती मात्र आता ड्रॅगचे माहेर घर म्हणून ओळखली जात आहे. आज पुण्यात सर्वात जास्त व्यसनाच्या आधीन गेलेले तरुण पाहायला मिळत आहे”.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त गोरेगाव येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन

मुंबई, दि. १६ फेब्रुवारी २०२५: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या जन्मदिनाचे औचित्य साधून गोरेगाव येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव, संपर्क नेते मुंबई सिद्धेश कदम यांनी या शिबिराचे आयोजन केले.

हे शिबिर सन्मित्र क्रीडांगण, गोरेगाव (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले होते. नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. डोळे तपासणी, मोफत चष्मा वाटप, महिलांचे आजार, कर्करोग तपासणी, बालरोग, दंत काळजी, मधुमेह, रक्तदाब आणि हृदयरोग तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, औषधोपचार आणि ईसीजी तपासणी, सीबीसी तपासणी आणि रक्तदान शिबीर अशा विविध आरोग्याशी संबंधित तपासण्या आणि उपचारांचा समावेश होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

राजकीय व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

या महत्त्वपूर्ण उपक्रमाला माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, आमदार प्रकाश सुर्वे, भाऊसाहेब चौधरी, किरण पावसकर, अमेय घोले, शिवसेना नेत्या मीना कांबळी, मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे यांनी उपस्थित राहून या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विशेष मत

याप्रसंगी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले,
“महाआरोग्य शिबिर हा लोककल्याणासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे. आरोग्य हे प्रत्येक नागरिकाच्या जीवनात मूलभूत भूमिका बजावते. अशा उपक्रमांमधून समाजातील गरजू लोकांना मोफत आणि उत्तम वैद्यकीय सेवा मिळणे आवश्यक आहे.”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

“अतिशय चांगला आणि लोककल्याणकारी उपक्रम सन्माननीय नेते रामदासजी कदम यांच्या विचारांबरोबरच सिद्धेश कदम यांनी उत्कृष्ट पद्धतीने आयोजित केला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते. या शिबिरामुळे अनेक नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय मदत मिळाली.” असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

कार्यक्रमाचे विशेष संयोजन

नगरसेवक शंकर हुडारे, दिंडोशी विभागप्रमुख लालसिंग राजपुरोहित, वैभव भराडकर, स्वप्रिल टेंबवलकर, अल्ताफ पेवेकर, ज्ञानेश्वर सावंत, सौ. वैषवी घाग, सौ. प्रियांका आंबोळकर, सौ. शिल्पा वेळे, सौ. विशाखा मोरये, सौ. पूनम वैद्य यांनी या उपक्रमाचे विशेष संयोजन केले.

भारती विद्यापीठ-कोल्हापूरमध्ये अंतिम लढत

आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स स्पर्धा-विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे आयोजन
पुणे : भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि कोल्हापूरच्या डीवायपीसीईटी संघ यांच्यात विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित आर्किटेक्चर महाविद्यालयांच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्समधील फुटबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटाची अंतिम लढत रंगणार आहे.
वानवडी येथील एस. आर. पी. एफ.च्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील मुलांच्या गटाच्या उपांत्य फेरीत भारती विद्यापीठ संघाने सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर टायब्रेकमध्ये ४-२ने मात केली. निर्धारित वेळेत ही लढत गोलशून्य बरोबरीत सुटली होती. यानंतर टायब्रेकमध्ये भारती विद्यापीठकडून आर्यसेन काळे, ऋतुराज वाडेलकर, दीपक कश्यप, दिव्यांक मोदक यांनी गोल केले, तर सिंहगड कॉलेजकडून आकाश उटे आणि शुभम बडे यांनाच गोल करता आले. 
दुसऱ्या उपांत्य लढतीत सुजल हळदेने (१५ मि.) केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर कोल्हापूरच्या डीवायपीसीईटी संघाने मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली आणि अंतिम फेरी गाठली.
मुलींच्या गटातील उपांत्य फेरीच्या लढतीत समृद्धी शेंडेच्या (२० मि.) एकमेव गोलच्या जोरावर भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली.
निकाल : उपांत्य फेरी – बास्केटबॉल मुले – मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ३३ वि. वि. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी – ३०; सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ३७ वि. वि. ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर – ३२.
मुली – पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – २३ वि. वि. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी – ११.

व्हॉलिबॉल मुले – डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी वि. वि. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पिंपरी-चिंचवड २५-१४, २०-२५, १५-१३; पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २४-१३, २५-१८.
मुली – भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २५-११, २५-१५; सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी २५-२३, २५-१७.

भारताच्या सांस्कृतिक वारशाशी विद्यार्थी जोडले जावेत – हर्षवर्धन पाटील

अद्वितीय उत्साहात पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा ‘अनंतम २०२५’ सांस्कृतिक सोहळा

पिंपरी, पुणे (दि.१६ फेब्रुवारी २०२५) भारताला शिक्षण, कला, क्रीडा, संस्कृतीचा मोठा वारसा आहे. या समृद्ध सांस्कृतिक वारशाशी विद्यार्थी जोडले जावेत यासाठी अनंतम सारखे सांस्कृतिक सोहळे झाले पाहिजेत असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे ‘अनंतम २०२५’ हा वार्षिक सांस्कृतिक सोहळा प्रमुख सेलिब्रिटींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दोन दिवस चाललेल्या या वार्षिक सोहळ्यामध्ये कला, संस्कृती आणि राष्ट्रीय ऐक्याचा भव्य उत्सव अनुभवायला मिळाला. या सोहळ्याच्या आयोजनात ७५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तर ३,००० पेक्षा जास्त प्रेक्षकांनी उपस्थिती राहून सहभागी कलाकारांचा उत्साह वाढविला. पहिल्या दिवशी ‘सैराट’ चित्रपटातील मुख्य कलाकार आकाश ठोसर याने विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत कार्यक्रमाची रंगत वाढवली. सांस्कृतिक कार्यक्रम हे विद्यार्थी व्यक्तिमत्त्वविकास, आत्मविश्वास आणि सामाजिक कौशल्ये जोपासण्याचे महत्त्वाचे माध्यम असल्याचे आकाश ठोसर याने सांगितले. दुसऱ्या दिवशीची रंगत ‘नटरंग’ मधील अभिनय व ‘अप्सरा आली’ या गाण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. सोनालीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाला वंदन करणारे ‘शिव गर्जना’ सादर करून उपस्थितांना भारावून टाकले. विद्यार्थ्यांसोबत नाच, गाणी आणि मुक्त संवाद साधत या दोन्ही कलाकारांनी उत्सवाला खराखुरा सोहळ्याचा बाज दिला.
पीसीयूने अवघ्या दोन वर्षांत ३,००० हून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षण देऊन शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर भरारी घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगतीबरोबरच समाज आणि राष्ट्राच्या विकासातही मोठे योगदान आहे असे पीसीयूच्या कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी विविध राज्यांतील लोकनृत्ये व संगीताचे सादरीकरण करून भारताच्या संस्कृतीची विविधता सादर केली हे आपल्या देशाच्या बहुरंगी संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. दोन वर्षात पीसीयूला मिळालेली अनेक मानांकने व पुरस्कार अभिमानास्पद आहे असे प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी सांगितले.
अशा जल्लोषपूर्ण वातावरणातून एकोप्याची भावना वृद्धिंगत होते, ज्यामुळे सर्वांनाच दीर्घकालीन यशासाठी प्रेरणा मिळते असे अभिनेत्री सोनारी कुलकर्णी हिने सांगितले.
पिंपरी चिंचवड विद्यापीठ कुलपती हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) अध्यक्ष
ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन प्रतिनिधी अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

शिवजयंती निमित्त २० हजार विद्यार्थ्यांच्या सहभागाने पदयात्रेचे आयोजन

पुणे, दि. १६: राष्ट्रभावना, सामाजिक सलोखा, युवांच्या संकल्पना जाणून घेणे, कला, संस्कृती व परंपरा जतन करणे, स्वच्छता, पर्यावरण याबाबत जागृकता, राष्ट्र निर्माणात मोलाचे योगदान देणा-या व्यक्तिमत्वाच्या कार्याचे आदर्श युवा पिढी पर्यत पोहचविण्याच्या उद्देशाने शिवजयंती दिनी ” जय शिवाजी, जय भारत” पदयात्रेचे सकाळी ९.३० वा. ते १२.३० या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.

सांस्कृतिक वारसा जतन करणे यासाठी केंद्र शासनाच्या युवा कल्याण व खेळ मंत्रालय व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्र व राज्याच्या शाश्वत विकासात युवांचे मोलाचे योगदान आहे. युवांमध्ये नेतृत्व गुण, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक सेवा भाव, शासकीय उपक्रमांबाबत माहिती व सहयोग यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यामुळे या पदयात्रेत युवा व क्रीडा पुरस्कारार्थी तसेच शहरातील सुमारे १५००० ते २०००० विद्यार्थी व युवा सहभागी होणार आहेत. या पदयात्रेला राज्याचे मुख्यमंत्री, नागरी विमान वाहतूक आणि सहकार केंद्रीय राज्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, क्रीडा व युवक कल्याण व अन्य मंत्री सहभागी होणार आहेत.

पदयात्रेचा सकाळी ९.३० वाजता सी.ओ.ई.पी तंत्रनिकेतेन विद्यापीठ, शिवाजीनगर पुणे येथील क्रीडांगणावरुन प्रारंभ करण्यात येणार आहे. पदयात्रेचा मार्ग सी.ओ.ई.पी. होस्टेल गाऊंड, शिवाजीनगर ते फर्ग्युसन महाविद्यालय असा राहील. सी.ओ.ई.पी. होस्टेल ग्राऊंड, डावीकडे वळून स.गो. बर्वे चौक, डावीकडे वळून एआयएसएसपीएमएस कॉलेज, छ. शिवाजी महाराज पुतळा अभिवादन (हॉल्ट नं. १) उजवीकडे वळून कोर्टासमोरील गेटमधून उजवीकडे वळून छ. शिवाजी महाराज पुतळा चौक, उजवीकडे वळून स.गो. बर्वे चौक, डावीकडे वळून जंगली महाराज रोडने झाशीचीराणी चौक (हॉल्ट नं. २) छ. संभाजी महाराज पुतळा, खंडोजी बाबा चौक यु टर्न करून गुडलक चौक, फर्ग्युसन कॉलेज गेट डावीकडे वळून फर्ग्युसन कॉलेज असा मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागाचे अधिकारी यांचेमार्फत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. पदयात्रेमध्ये शहरातील युवा, युवतींनी, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक युवराज नाईक यांनी केले आहे.

मंगळवार पेठेतील ‘ती’ जागा ४०० कोटीची अन विकली ७० कोटीला, मंत्र्याशी संबधित बिल्डरला केले मालामाल

पुणे- मंगळवार पेठेतील डॉक्टर आंबेडकर भवन लगतची म्हणजे ससून डेड हाउस च्या अगदी समोरची सव्वादोन एकराची जागा जिचे आज बाजार मूल्य ४०० कोटीच्या घरात असल्याचे बोलले जाते ती जागा एका बड्या मंत्र्याशी संबधित असलेल्या बिल्डरला अवघ्या ६० ते ७० कोटीत विकल्याची माहिती पुढे येते आहे. या संदर्भात पुण्यातल्या अनेकांनी चुप्पी साधली असून एवढे मोठे प्रकरण दडपले कसे यावर आश्चर्य व्यक्त होत आहे .

पूर्वी हि जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची होती ती त्यांनी एम एस आर डीसी ला ९९ वर्षाच्या लीजने दिली . आणि MSRDC ने रिंग रोडला भाग भांडवल हवे म्हणून तब्बल ४०० कोटीची हि जागा एका मंत्र्याशी संबधित अशा बिल्डरला अवघ्या ६० ते ७० कोटीत बहाल करून टाकली असे वृत्त येथे समजले आहे. हे सारे कसे चिडीचूप पद्धतीने झाले यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. आंबेडकर भवन ला पार्किंग साठी हि जागा द्यावी , ससून लाच कॅन्सर रुग्णालय उभारण्यासाठी हि जागा द्यावी अशा मागण्या होत असताना सरकारी जागा विकण्याचा हा डाव यशस्वी करण्यात आलाच कसा? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. आणि पुण्यातील नेते मंडळी याबाबत नेमकी काय भूमिका घेणार कि ते सहज पणे दुर्लक्ष करत चुप्पी साधणार हे काळच प्रत्यक्ष दर्शविणार आहे .

जुन्नर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयांचे उद्घाटन संपन्न

पुणे, दि. १६: पक्षकारांचे जीवन हे वकिलाच्या हातात असते त्यामुळे पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने नवीन वकिलांनी कायम ज्येष्ठ वकिलांकडून न्यायाधिशांसमोर खटला मांडणी, खटला पडताळणीबाबत सतत अध्ययन करीत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी केले. ‘सर्वांसाठी आणि सर्वांपर्यंत न्याय’ या उद्देशाने जिथे जिथे आवश्यक आहे तेथे न्यायालयीन पायाभूत सोयी सुविधा वाढविण्यात येत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उद्घाटन न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरीफ सा. डॉक्टर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे महेंद्र महाजन, आमदार शरद सोनवणे, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जुन्नर एस.एस. नायर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲड. ए. एच. हुसेन, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. अहमद खान पठाण, ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. विठ्ठल कोंडे-देशमुख, ॲड. राजेंद्र उमाप आदी उपस्थित होते.

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे म्हणाल्या, जनतेला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी न्यायिक पायाभूत सोयी सुविधा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. खटल्यांची वाढलेली संख्या, त्यामाध्यमातून जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास याबाबीचा विचार करुन जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा हा देशातील सर्वाधिक मोठा न्यायिक जिल्हा आहे. त्यामुळे आवश्यक तेथे न्यायिक पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.

जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन झाल्यामुळे विविध प्रकारचे खटले दाखल होईल, प्रत्येक खटले पीडित व आरोपीच्यादृष्टीने महत्वाचे आहेत. त्यामुळे न्यायाधिश आणि वकील यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. न्यायालयाचा आपल्यावरील विश्वास गमावू नये यासाठी प्रत्येक खटल्याचा बारकाईने वकिलांनी अभ्यास केला पाहिजे; प्रत्येक खटल्याची पडताळणी केली पाहिजे, लोकांच्या हक्कासाठी त्यांचे रक्षक बनून त्यांचे संरक्षण करावे. खटल्याचा गांभीर्याने विचार करुन वकिलांनी न्यायालयात पुरावे सादर केले पाहिजे. नवोदित वकिलांनी वकिली करताना कठोर परिश्रम करीत राहिले पाहिजे, कायद्याचा परिपूर्ण अभ्यास करून विविध कलमाचा वापर करुन पक्षकारांना वस्तुनिष्ठपद्धतीने न्याय मिळवून दिला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

जुन्न्र येथील न्यायालयात तालुक्यातील खटले वेगाने चालून नागरिकांना वेळेत आणि गतीने न्याय मिळू शकेल. न्यायदानाला लागणारा विलंब हा न्याय नाकारण्यासारखा असतो त्यामुळे हा विलंब होऊ नये यासाठी वकिलांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे पक्षकारांना त्रास होऊ नये यासाठी वकिलांनी वारंवार सुनावणीच्या तारखा मागू नयेत, कौटुंबिक हिंसाचाराच्याबाबतीत वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करावे, याकरीता न्यायाधीशांचीही मदत घेतली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा -उपमुख्यमंत्री अजित पवार

जुन्नर येथील जुन्या न्यायालयाची इमारत सन १८३८ या सालाची असून विविध राजवटीचे कामकाज परिसरातील भुईकोट किल्ला, गढी येथून चालत होते; या ऐतिहासिक वास्तूचा पुनर्विकासाबाबतच्या विविध मागण्या विचारात घेवून न्यायालय, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वकील संघटना तसेच आदींनी मिळून विकास आराखडा तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

आपल्या देशात, राज्यात न्यायव्यवस्थेवर जनतेचा मोठा विश्वास आहे. लोकशाहीच्या रक्षणामध्ये न्यायालयांच खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे राज्यात आवश्यक येथे न्यायालयीन इमारती उभ्या करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जुन्नर येथील न्यायालयीन इमारत परिसर विकास आणि निवासस्थानाबाबत कार्यवाही करण्यात येत असून याकरीता आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. आगामी काळात जुन्नरवासियांना अभिमान वाटेल असाप्रकारचा परिसर विकसित करण्यात येईल, असेही श्री. पवार म्हणाले.

न्यायालयीन वास्तू दिमाखदार तसेच सर्व सुविधांनीयुक्त असल्या पाहिजेत आणि त्यामधून नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे, याकरीता जिल्ह्यात टप्प्याने न्यायालयीन इमारतीचा विकास करण्यात येत आहे. जुन्नर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीचे आज उद्घाटन करण्यात आले असून आज जुन्नरवासियांच्या न्यायिक इतिहासात आजचा दिवस एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. या न्यायालयामुळे पक्षकरांना खेड-राजगुरुनगर येथे जाण्या-येण्याची वेळ तसेच इंधनाची बचत होणार असून परिणामी त्रासही कमी होणार आहे.

न्यायालयाच्या माध्यमातून गुन्हेगारी खटले, दिवाणी आणि फौजदारी खटले निकाली काढण्यास निकाली काढण्यास मदत होणार आहे. परिसरातील नवोदित वकिलांना सेवा देण्याची संधी उपलब्ध होण्यासोबतच त्यांच्या व्यवसायात वाढ होईल. शिवाजीनगर येथील वकिलांच्या मागणीबाबत सकारात्मक विचार इमारतीला साजेसे असे स्वच्छतागृह आणि परिसराचा विकास करण्यात येईल. मुंबई येथे उच्च न्यायालयासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी बीकेसी येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, देशातील उत्तम वास्तूविशारदाकडून उत्कृष्ट आराखडा उपलब्ध करुन देण्यात यावा. देशातील सर्वात चांगली उच्च न्यायालयाची इमारत मुंबई येथे उभारु, अशा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.

भारतीय संविधानानुसार न्यायालय देशात कायद्याची अंमलबजावणी करण्यासोबतच नागरिकांना न्याय देण्याची भूमिका बजावतात. भारतीय संविधानाने न्यायालयाला स्वातंत्र्य दिले असल्यामुळे ते निर्भयपणे आणि तत्वनिष्ठ काम करीत असतात. न्यायालय एक लोकशाहीचा स्तंभ असून नागरिकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेचे राज्य संकल्पना डोळयासमोर ठेवून वकिलांनी पक्षकाराची बाजू मांडून न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

न्यायमूर्ती श्री. मारणे म्हणाले, पुणे हा देशातील सर्वात मोठा न्यायालयीन जिल्हा असून एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आजच्या घडीला प्रलंबित असलेल्या ५३ लाख खटल्यांपैकी ७ लाख १० हजार खटले एकट्या पुणे जिल्ह्यात प्रलंबित आहेत. हे साठलेले खटले निकाली काढण्यासाठी नवीन न्यायालयीन सोयी सुविधा उभारणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. न्यायालयीन व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास असून तो टिकवण्यासोबतच निकाल वेळेत लावण्याकरीता प्रयत्न करावे. याकरीता वकिलांनी स्वत:चा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

न्यायमूर्ती आरीफ सा. डॉक्टर म्हणाले, जुन्नर येथील न्यायालयीन व्यवस्था बळकट करण्याच्यादृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. परिसरातील सर्वसामान्यांना पारदर्शकपद्धतीने वेळेत न्याय मिळवा यासाठी आपल्याला सामूहिक प्रयत्न करावे लागतील, असेही ते म्हणाले.

न्यायाधीश श्री. महाजन म्हणाले, उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार काम करीत असताना राज्यशासनाची मदत आवश्यक असते. राज्यशासनाच्या सहकार्यामुळे जिल्ह्यात पाच जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. आज जुन्नर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये सुरू झाले असून परिसरातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे, असे श्री. महाजन म्हणाले.

ॲड. अहमदखान पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक जुन्नर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवदास तांबे यांनी केले.

यावेळी विधी व न्याय विभागाचे सचिव सतीश वाघोले, सहसचिव विलास गायकवाड,
माजी आमदार बाळासाहेब दांगट, अतुल बेनके, न्यायाधीश, वकील, विविध वकील संघटनांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
0000

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला प्रतिष्ठेचा राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार

मुंबईदि. १६ फेब्रुवारी २०२५ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा म्हणून सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेला ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिष्ठेचा स्कोच सुवर्ण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचसोबत महावितरणच्या सौर ग्राम योजनेला स्कोच रजत पुरस्कार मिळाला. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे हे पुरस्कार स्वीकारले.

स्कोच समुहातर्फे दरवर्षी सार्वजनिक क्षेत्रात उपयुक्त ठरलेल्या विविध योजनांसाठी पुरस्कार देण्यात येतात. विविध तज्ज्ञांकडून अत्यंत काटेकोरपणे परीक्षण होऊन ज्युरींच्या मतांच्या आधारे हे पुरस्कार दिले जातात. सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठीचे हे पुरस्कार प्रतिष्ठेचे मानले जातात.

अपर मुख्य सचिव ( ऊर्जा ) आभा शुक्ला यांच्या संयोजनात राज्याचा ऊर्जा विभाग, महावितरण आणि महसूल विभागातर्फे समन्वयाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. या योजनेत विकेंद्रित स्वरुपात सौर ऊर्जा निर्मिती करून त्यावर कृषी पंप चालविण्यात येतात. मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एप्रिल २०२३ मध्ये ही योजना सुरू झाल्यानंतर गतीने अंमलबजावणी सुरू आहे. आतापर्यंत ४९ प्रकल्प पूर्ण झाले असून त्यांची क्षमता २०३ मेगावॅट आहे. मार्च २०२६ पर्यंत ही योजना पूर्ण होईल व राज्यातील सर्व कृषी पंप सौर ऊर्जेवर चालविण्याचे स्वप्न पूर्ण होईल. त्यामुळे सौर कृषी पंपांसाठी १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जानिर्मिती क्षमता निर्माण होणार आहे. ही जगातील सर्वात मोठी विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती योजना आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे कृषी पंपांना दिवसा व दर्जेदार वीज पुरवठा होईल व शेतकऱ्यांची अनेक दशकांची मागणी पूर्ण होईल. त्यासोबत या योजनेत अत्यंत किफायतशीर दरात वीज उपलब्ध होत असल्याने महावितरणचा वीज खरेदीचा खर्च कमी होऊन उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा दूर करण्यात मदत होत आहे. या योजनेमुळे राज्यात खासगी विकसकांकडून ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून ग्रामीण भागात ७० हजार रोजगार निर्माण होत आहेत. ही ऊर्जा क्षेत्रातील गेम चेंजर योजना आहे.

महावितरण राज्यात सौर ग्राम योजनेत १०० गावे विकसित करत आहे. या योजनेत गावामध्ये छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून सर्व घरांसाठी लागणारी वीज गावातच निर्माण केली जाते. त्यासोबत ग्रामपंचायत कार्यालय, रस्त्यावरील दिवे, जिल्हा परिषदेची शाळा, पाणी पुरवठा योजना अशा सर्वांसाठी सौर ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे गावाचे वीजबिल शून्य होते तसेच पर्यावरण रक्षणाला मदत होते. सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी हे राज्यातील पहिले सौर ग्राम ठरले आहे. आतापर्यंत सहा गावे सौर ग्राम झाली आहेत.

संगीताचा रियाज अभ्यासासाठी उपयुक्त

शास्त्रीय गायिका सानिया पाटणकर यांचे मत

पुणे :- मनाची शांतता, एकाग्रता, व्यक्तिमत्त्वाची जडण घडण, स्वास्थ्य यासाठी संगीत उपकारक आहे. संगीताचा रियाज अभ्यासासाठी ही उपयुक्त ठरतो. म्हणून त्यासाठी वेळ काढला पाहिजे असे मत प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सानिया पाटणकर यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांस्कृतिक समिती आयोजित हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभावेळी
पाटणकर बोलत होत्या.

याप्रसंगी उपाध्यक्ष ऍड.अशोक पलांडे,कार्यवाह डाॅ.आनंद काटिकर,प्राचार्य डाॅ. विजय तिडके सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे उपस्थित होते.

पाटणकर म्हणाल्या, “मी पुण्यातील शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना जाते. परंतु शंभरहून अधिक स्पर्धकांचा समावेश असणारी ही पुण्यातील पहिलीच घटना आहे. इंटरनेटमुळे संगीताचा खूप मारा होतो. बदलत्या काळानुसार काय ऐकायचे ते ठरवावे लागेल.”

शास्त्रीय संगीत हे शाश्वत असून,अभिजात संगीत विषयाची अभिरूची अधिक वाढावी यासाठी संस्थेने शालेय व महाविद्यालयीन स्तरावर ही स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेत १६० विद्यार्थी सहभागी झाल्याचे मिलिंद कांबळे यांनी सांगितले.

उद्घाटन प्रसंगी जेष्ठ शास्त्रीय गायिका माधुरी डोंगरे म्हणाल्या,” संगीत ही अत्यंत श्रेष्ठ कला आहे. ती श्रोत्यांच्या साक्षीनेच सादर करावी लागते. त्यामुळे इतर कलांच्या तुलनेत ती सादर करताना परफेक्शन लागते. संगीताचा अध्यात्माशी जवळचा संबंध आहे त्यातून आत्मचिंतनाचा मार्ग सापडतो.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपाली देशपांडे यांनी केले.आभार प्रा. जगदीश पाटील यांनी मानले.

स्पर्धेचा निकाल

शास्त्रीय गायन स्पर्धा

लहान गट
प्रथम
आरोही अद्वैत देवधर
मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय

द्वितीय
प्रज्ञा प्रसाद भुजंग अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स

तृतीय
आनंदी सोमनाथ जायदे
मा.स.गो ळवळकर गुरुजी विद्यालय

उत्तेजनार्थ
युगंधरा विक्रांत दाभाडे न्यू इंग्लिश स्कूल सातारा.

शास्त्रीय गायन स्पर्धा
मोठा गट

प्रथम
विभा केदार हरिश्चंद्रकर
डी. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल

द्वितीय
सृजन सारंग कालेकर
एन.ई. एम.एस
तृतीय
कणाद अद्वैत देवधर
मा.स.गो ळवळकर गुरुजी विद्यालय

शास्त्रीय हार्मोनियम वादन स्पर्धा
लहान गट
प्रथम
संहिता हेरंब फडके
मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय

द्वितीय
तेजस्विनी समर्थ काळोखे
द्रविड हायस्कूल वाई

तृतीय
सृष्टी नितीन भोसले
न्यू इंग्लिश स्कूल सातारा

उत्तेजनार्थ
सत्यन धनराज सावंत
मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय

शास्त्रीय हार्मोनियम वादन स्पर्धा

मोठा गट
प्रथम
पार्थ वैभव जोशी
डी. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल

द्वितीय
दिशा शिरीष सपकाळ
मा.स.गो ळवळकर गुरुजी विद्यालय

तृतीय
विराज सचिन सुतार
न्यू इंग्लिश स्कूल सातारा

शास्त्रीय तबला वादन स्पर्धा
लहान गट
प्रथम
शर्वरी मंगेश दर्भे

द्वितीय विभागून
क्षितिज काटे
डी. ई. एस. इंग्लिश स्कूल
कौस्तुभ धनंजय मावडीकर
एन. ई एम. एस

तृतीय विभागून
गंधार देशपांडे
श्रेया घोडके

मोठा गट

प्रथम
जय प्रवीण झोपे
डी. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल

द्वितीय विभागून
अजितेश सोमनाथ जायदे
मा.स.गो ळवळकर गुरुजी विद्यालय

शैलेश पंडित

तृतीय विभागून
अवनीश पटवर्धन
डी. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल
श्रेयस बर्गे
शास्त्रीय संगीत स्पर्धा गायन व वादन -२०२५
पारितोषिक विजेते विद्यार्थी

महाविद्यालयीन गट –
गायन स्पर्धा –

प्रथम – समिता सांबारे ( विल्गिंडन कॉलेज, सांगली )
द्वितीय- ईश्वरी दुलांगे ( फर्ग्युसन कॉलेज, पुणे.)
तृतीय – स्वराली सांबारे ( चिंतामणराव मॅनेजमेंट कॉलेज,सांगली )

सुर वाद्य स्पर्धा
प्रथम – सिद्धी देशपांडे – फर्ग्युसन कॉलेज,पुणे.
द्वितीय – सिद्धांत कांबळे ( फर्ग्युसन कॉलेज, पुणे.)
तृतीय – सिया निमकर ( नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज,पुणे.)

केळकर संग्रहालयात उमटले सी. रामचंद्र यांचे सूर !

पुणे :

मराठी,हिंदी चित्रपट संगीताच्या दुनियेत ३ दशकांहून अधिक काळ आपल्या सुमधूर संगीताने,रसिकांच्या मनावर राज्य करणारे गायक व संगीतकार स्व.सी.रामचंद्र तथा रामचंद्र नरहर चितळकर यांच्या वापरातील पियानो आता राजा दिनकर केळकर संग्रहालयात देणगी स्वरुपात दाखल झाला आहे.रविवार,दि.१६ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संग्रहालयामध्ये छोटेखानी समारंभामध्ये हा पियानो सुप्रसिद्ध अॅकॉर्डियन वादक इनॉक डॅनियल यांचे हस्ते स्वीकारण्यात आला.

सी.रामचंद्र अण्णांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी बेन यांनी हा पियानो मुंबईस्थित सुरेश यादव यांच्या कुटुंबियांकडे त्याची जपणूक करण्यासाठी सुपूर्द केला होता.पियानोचे सुयोग्य जतन राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये होईल व पुढील पिढ्यांना तो पाहता येईल या स‌द्भावनेने सुरेश यादव यांनी तो संग्रहालयास सुपूर्द करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता.

या छोटेखानी समारंभास सुरेश यादव हे सपत्नीक,त्यांच्या स्नेह्यांसह उपस्थित होते.संग्राहक दिनकर केळकर यांचे पुतणे ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ.श्रीकांत केळकर, संगीत क्षेत्रातील जाणकार अभ्यासक डॉ.प्रकाश कामत ,मेलडी मेकर्सचे सुहासचंद्र कुलकर्णी, मंगेश वाघमारे,श्याम मोटे,नितीन मेणवलीकर,संग्रहालयाचा कर्मचारी वर्ग विशेषकरून उपस्थित होते. राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी स्वागत केले.सुरेश यादव,इनॉक डॅनियल यांनी सी. रामचंद्र यांच्या आठवणी सांगीतल्या, दोघांनीही पियानोवर ‘ भोली सुरत दिल के खोटे’ च्या सुरावटी वाजवून उपस्थितांना संगीताच्या सुवर्णकाळात नेले.

सी.रामचंद्र तथा अण्णांनी अनेक गाणी याच पियानोवर बसून संगीतबद्ध केली होती.१९७५ मध्ये अण्णांनी सुरू केलेल्या ‘मुलाये न बने’ या वाद्यवृंदात श्री.यादव यांनी सॅक्सोफोन वाजविण्यास सुरुवात केली होती. श्री.यादव यांची दोन्ही मुले सुशांत आणि संदेश हेही याच पियानोवर शिकले. संगीत सहाय्यक रचनाकार इनॉक डॅनियल यांनी सी.रामचंद्र यांचेसह इतर विविध संगीतकारांसोबतही अप्रतिम अॅकॉर्डियन वादन केले आहे.आपल्या यशस्वी हिंदी चित्रपट कारकीर्दीत पाश्चिमात्य संगीताचा उत्तम वापर करणारे सी. रामचंद्र हे पहिले संगीतकार होत. सी. रामचंद्र यांनी आपल्या यशस्वी संगीत कारकीर्दीत ११८ हिंदी, ७ मराठी, १ तमीळ व १ तेलगू चित्रपटांना उत्तम संगीत दिले. शहनाई, आशा, अनारकली, अलबेला, आझाद अशा निवडक व लोकप्रिय चित्रपटांचा उल्लेख वानगीदाखल करता येईल.

पुण्याला पुरेसे पाणी पुरवण्यात भाजपची टाळाटाळ

चंद्रकांत पाटील, आता तरी विखे पाटलांना समज देतील का?-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : शहराची वाढती मागणी लक्षात घेता जलसंपदा खात्याने २१ टीएमसी पाण्याचा कोटा तातडीने मंजूर करायला हवा. भाजप सरकार यात टाळाटाळ का करत आहे? त्याचा भुर्दंड पुणेकरांना सोसावा लागत आहे, आता तरी मंत्रीमहोदय चंद्रकांत पाटील हे आपले सहकारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाण्याच्या कोट्याबाबत समज देतील काय? असा सवाल माजी आमदार मोहन जोशी यांनी केला आहे.

पुणे महापालिकेला १४ टीएमसी पाणी कोटा जलसंपदा खात्याने मंजूर केला. परंतु वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हा कोटा वाढविण्याची गरज आहे. ही वाढीव मागणी मंजूर न करता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की, ‘महापालिकेला जादा पाणी वापराबद्दल दंड ठोकू’, हे त्यांचे म्हणणे अन्यायकारक आहे. पुणे शहर हे महानगर म्हणून आकार घेत आहे. गेल्या काही वर्षात पुण्याची लोकसंख्या ५० लाखांहून अधिक झाली आहे. याची कल्पना जलसंपदा खात्याच्या मंत्र्यांना नसावी, याचे आश्चर्य वाटते. महापालिकेला दंड ठोकण्याची भाषा करणाऱ्या जलसंपदा मंत्र्यांना कोथरूडचे आमदार आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री अजित पवार हे ही त्यांना माहिती का देत नाहीत? याचेही कोडे आहे. भाजपच्या मंत्र्यांमध्ये विसंवाद आहे. त्याचा परिणाम पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

खडकवासला धरण साखळीतून पुण्याला २१ टीएमसी पाणी मिळावे, अशी मागणी चंद्रकांत पाटील या मंत्री महोदयांनी केली होती. त्यांच्या या मागणीचा त्यांनाच विसर पडला आहे का? याचा उलगडा व्हायला हवा. चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भरभरून मते दिली. निवडणूक काळात मोठमोठी आश्वासनं भाजपने दिली होती. प्रत्यक्षात पाण्याची मूलभूत मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ पूर्ण करू शकत नाहीत. पुणेकरांच्या मागणीबाबत टाळाटाळ चालू आहे. हा प्रकार संतापजनक आहे. पुणेकरांना २१ टीएमसी पाणी मिळण्यासाठी अजून किती काळ वाट पहावी लागणार आहे? हे आता चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करावे आणि जलसंपदा आणि महापालिका यामधील संघर्ष तरी मिटवावा, असे मोहन जोशी यांनी पसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पाण्याचा कोटा वाढवून मागताना पुणे महापालिकेने पाण्याच्या फेरवापराची प्रक्रिया पूर्ण करायला हवी, असा सल्ला जलसंपदा मंत्र्यांनी दिलेला आहे. सांडपाणी फेरवापर प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने अर्थसहाय्य करण्याची गरज आहे. हे सुध्दा चंद्रकांत पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांना सांगायला हवे. महायुती सरकारमधील या मंत्र्यांनी परस्परांमधील श्रेय वाद, शह-काटशह ही स्पर्धा बंद करून, पुणेकरांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचे प्रस्ताव 22 फेब्रुवारीपर्यंत सादर करा

पुणे दि. 16 -: राज्यातील नोंदणीकृत मदरशाच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचे 2024-25 साठीचे प्रस्ताव 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजने अंतर्गत पात्र मदरशांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, या योजने अंतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणा-या मदरशांनी त्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत अल्पसंख्यांक विकास विभागाच्या 11 ऑक्टोबर 2013 च्या शासन निर्णयामध्ये विहीत केलेल्या निकषानुसार तपासणी करुन पात्र मदरशांची शासनास शिफारस करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येतील.

तसेच राज्यातील नोंदणीकृत शाळांच्या आधुनिकीकरणासाठी धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपरिषद व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2024-25 मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार शासन निर्णय 7 ऑक्टोबर 2015 अन्वये या योजने अंतर्गत पात्र शाळांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. 7 ऑक्टोबर 2024 अन्वये सदर योजनेअंतर्गत पायाभूत सोयीसुविधेसाठी देण्यात येणार्‍या अनुदानाची रक्कम 2 लाखा वरून वाढवून 10 लाख करण्यात आली आहे.

शासन निर्णयामध्ये विहीत केलेल्या निकषानुसार तपासणी करुन पात्र शाळांची शासनास शिफारस करण्यासाठी इच्छुक शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.

क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी याच्या उपस्थितीतसहाव्या ‘सिंधी प्रीमिअर लीग’चे शानदार उद्घाटन

पुणे : ‘सिंधी प्रीमिअर लीग’च्या सहाव्या पर्वाचे भारतीय क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी याच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन झाले. येत्या ९ मार्चपर्यंत चालणारी ही क्रिकेट स्पर्धा पिंपरीतील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर होत आहे. उद्घाटन सोहळ्यावेळी उद्योजक डब्बू आसवानी, श्रीचंद आसवानी, संयोजक कन्वल खियानी, हितेश दादलानी, कमल जेठानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण अस्वाणी, अवि तेजवानी, अवि इसरानी, कुणाल गुडेला, पियुष जेठानी आदी उपस्थित होते.
राहुल त्रिपाठी म्हणाला, “क्रिकेट हा सर्वांना एकत्र आणणारा खेळ आहे. सर्व कुटुंबाना एकत्र आणून उत्साहाने ही स्पर्धा खेळली जात आहे. मानसिकदृष्ट्या ताजेतवाने आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी मैदानी खेळ खेळायला हवेत. सिंधी समाजाने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. खेळाडूंबरोबर त्यांची मुले मैदानात आल्याने वातावरणात ऊर्जा संचारत आहे. समाजातील तरुणांमध्ये खेळभावना रुजवण्यासाठी ही लीग महत्वाची आहे. संघभावना आणि प्रामाणिकपणे या खेळाचा आनंद घ्यावा.”
कन्वल खियानी म्हणाले, “सिंधी समाजातील तरुणांना खेळांसाठी प्रोत्साहन देण्यासह सिंधी संस्कृतीचे जतन आणि सामाजिक भावनेतून सेवाभावी संस्थांना मदत करण्याच्या उद्देशाने गेल्या सहा वर्षांपासून ही क्रिकेट स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत पुरुष गटात एकूण १६, तर महिला गटात एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत. पुरुषांच्या प्रत्येक संघाचे नाव सिंधी संस्कृतीशी, तर महिला संघांची नावे नद्यांशी निगडित आहेत. महिलांमध्ये ९०, तर पुरुषांमध्ये २५१ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.”
या स्पर्धेतील पुरुष गटामध्ये मस्त कलंदर, सुलतान ऑफ सिंध, मोहेंजोदरो वॉरियर्स, सिंधफूल रेंजर्स, एसएसडी फाल्कन, इंडस डायनामॉस, दादा वासवानीज ब्रिगेड, झुलेलाल सुपरकिंग्ज, हेमू कलानी ग्लॅडिएटर्स, गुरुनानक नाइट्स, संत कंवरम रॉयल्स, आर्यन्स युनायटेड, जय बाबा स्ट्रायकर्स, सिंधी इंडियन्स, अजराक सुपरजायंट्स व पिंपरी योद्धाज, तर महिलांच्या संघात गंगा वॉरियर्स, गोदावरी जायंट्स, झेलम क्वीन्स, सिंधू स्टारलेट्स, यमुना स्ट्रायकर्स, नर्मदा टायटन्स, कृष्णा सुपरनोव्हाज आणि इंद्रायणी थंडरबोल्ट्स यांचा समावेश आहे.
उद्घाटनाचा सामना सिंधफूल रेंजर्स आणि सुलतान्स ऑफ सिंध यांच्यात रंगला. पहिल्याच लढतीत सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. सुपर ओव्हरमध्ये सिंधफूल रेंजर्सने विजय मिळवला. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून रेंजर्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर चिराग निरंकारी व दिनेश रिझवानी यांनी धमाकेदार सुरुवात करत ३७ धावांची सलामी दिली. निरंकारीने १५ चेंडूत ४ षटकार व एक चौकाराच्या मदतीने ३४ धावा केल्या. १३ चेंडूत २ षटकार व १ चौकार मारत राम पोपटानी याने २५ धावांची खेळी केली. ९ षटकांत ५ बाद ८६ धावा करून रेंजर्सने सुलतान्ससमोर विजयासाठी ८७ धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात सुलतान्सचे सलामीवीर राजीव अहुजा (५ चेंडूत ११) व पियुष रामनानी (२४ चेंडूत ४९) यांनी स्फोटक खेळी केली. रामनानीने ५ षटकार व ३ चौकार लगावले. एका धावेने त्याचे अर्धशतक हुकले. धावांचे लक्ष्य गाठताना त्यांनाही ८६ धावांच करता आल्याने सुपर ओव्हर झाली. सुलतान्स ऑफ सिंधने ९ धावा करत १० धावांचे आव्हान दिले. सिंधफूल रेंजर्सने ५ चेंडूंतच १० करत विजय मिळवला. दिनेश रिझवानी सामनावीर ठरला. ———————–संक्षिप्त धावफलक :
सिंधफूल रेंजर्स – (९ षटकांत) ५ बाद ८६ (चिराग निरंकारी ३४, राम पोपटानी २५, मनीष जगवाणी २-६) व (०.५ षटकांत) १ बाद १० विजयी विरुद्ध सुलतान्स ऑफ सिंध – (९ षटकांत) ७ बाद ८६ (राजीव अहुजा ४९, दिनेश रिझवानी ३-२०) व (१ षटकांत) २ बाद ९.

महाकुंभाला जाणाऱ्या 18 जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू

0

नवी दिल्ली-शनिवारी रात्री ९:२६ वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये १४ महिला आणि ३ मुले आहेत. २५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

मृतांना दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात आणण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश मृतदेहांच्या छातीवर आणि पोटावर जखमा होत्या. त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.

हा अपघात प्लॅटफॉर्म क्रमांक १३, १४ आणि १५ दरम्यान झाला. महाकुंभाला जाण्यासाठी दुपारी ४ वाजल्यापासून स्टेशनवर गर्दी जमू लागली.

रात्री ८.३० च्या सुमारास, प्रयागराजला जाणाऱ्या ३ गाड्या उशिराने धावल्या, ज्यामुळे गर्दी वाढली. प्रत्यक्षदर्शीनुसार, ट्रेनचा प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून १६ करण्यात आला. यामुळे चेंगराचेंगरी झाली.

अपघाताच्या चौकशीसाठी दोन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात उत्तर रेल्वेचे दोन अधिकारी नरसिंग देव आणि पंकज गंगवार यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीने नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचे सर्व सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेज सुरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत.

यापूर्वी २९ जानेवारी रोजी प्रयागराजच्या महाकुंभात ३० जणांचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी, १० फेब्रुवारी २०१३ रोजी कुंभमेळ्यादरम्यान प्रयागराज स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला.

“जगातील वाईट शक्ती नष्ट व्हाव्यात आणि जग शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करो”, काशीविश्वेश्वरांकडे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रार्थना

0

वाराणसी: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी १४ फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे पवित्र गंगेत अमृतस्नान केल्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी काशी विश्वेश्वर मंदिरात भक्तीभावाने दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची भगिनी जेहलम जोशी उपस्थित होत्या.

काशीला जाताना त्यांनी गंगेतून बोटीने प्रवास करत भोसले घाट, गणेश मंदिर (पेशवे घाट), सिंधिया घाट आणि पशुपतिनाथ मंदिराचेही दर्शन घेतले. काशी विश्वेश्वराच्या पवित्र दर्शनानंतर त्यांनी कृतज्ञतेने वंदन केले आणि खास मुंबईहून आणलेल्या पुरणपोळ्यांचा नैवेद्य अर्पण केला.

यावेळी त्यांनी श्री अन्नपूर्णा देवी आणि श्री बद्रीनाथजी यांचेही दर्शन घेतले. तसेच ज्ञानवापी मंदिराची झलक पाहण्याचा योगही आला. या संपूर्ण यात्रेदरम्यान त्यांनी आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरणाचा अनुभव घेतला.

याप्रसंगी भावना व्यक्त करताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “भारतामध्ये गंगामाता आणि बारा ज्योतिर्लिंगांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पौर्णिमेनंतर वाराणसी येथे काशी विश्वेश्वरांचे दर्शन झाल्याने मनोभावे शांती लाभली. गंगेतील नौकाविहारामुळे ऐतिहासिक वारसा जिवंत झाल्यासारखे वाटले. काशी विश्वेश्वरांकडे मी प्रार्थना केली की, जगातील वाईट शक्ती नष्ट भाव्यात आणि जग शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करो.”

त्यांनी पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी विकास कार्याचे कौतुक करत महाराष्ट्रातील आगामी कुंभमेळ्यासाठी अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचे सांगितले.