Home Blog Page 652

कर्तृत्ववान कलाकार महिलांचा सन्मान सोहळा संपन्न

नवा विष्णू चौक मित्र मंडळाच्या वतीने कलासाधक स्त्रीशक्ती सन्मान सोहळा
पुणे:   नवा विष्णू चौक मित्र मंडळाच्या वतीने कलासाधक स्त्रीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कलाक्षेत्रातील नऊ कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला.

सदाशिव पेठेतील नवा विष्णू चौक मित्र मंडळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. संगीता मावळे यांच्या हस्ते महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमित सुरगुडे, कार्याध्यक्ष कुमार रेणुसे उपस्थित होते. पल्लवी सोनकुळ, माला पवार, पूनम गांधी, आशा सोनकुळ, अपर्णा पोळ, मनीषा सोनकुळ यांनी आयोजनात सहभाग घेतला.

माधुरी जोशी, विनिता देशपांडे, विनया देसाई, डॉ. भाग्यश्री काळे पाटसकर, रश्मी देव, सुचेता वाडेकर, आस्था गोडबोले कार्लेकर, मैत्रेयी बापट यांना सन्मानित करण्यात आले. जान्हवी धारीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
संगीता मावळे म्हणाल्या, स्त्री आणि त्यासोबत आव्हाने हे ओघानेच येते. कोणत्याही क्षेत्रात काम करताना स्त्रियांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तरीही या आव्हानांना सामोरे जात जगाला प्रकाशित करण्याचे काम समस्त स्त्रिया करीत आहेत. 
विनया देसाई म्हणाल्या सद्गुण अंगात असणे ही भगवंताची कृपा असते. त्यामधून कलेची सेवा करण्याची संधी महिलांना मिळते. चैतन्य रूपाने देवी ही प्रत्येक स्त्रीच्या मध्ये वास करत असते. त्यांना मिळणारा सन्मान हा ऊर्जा देणारा असतो, काम करण्याची शक्ती यातून मिळते असेही त्यांनी सांगितले. मृणालिनी दुसाने यांनी सूत्रसंचालन केले.

सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार निधीमधून १४ दिव्यांग बांधवांना ई स्कूटरचे वाटप

दिव्यांगांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने पथदर्शी उपक्रमाचे आयोजन

पुणे, दि. ११ ऑक्टोबर, २०२४ : दिव्यांग बांधवांना केवळ तात्पुरती मदत न करता त्यांना स्वावलंबी बनवीत त्यांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार विशेष निधीमधून १४ दिव्यांग बांधवांना आज ई स्कूटरचे वाटप करण्यात आले. गोखले नगर येथील मुनोत सभागृह या ठिकाणी संपन्न झालेल्या एका विशेष कार्यक्रमात शिरोळे यांच्या हस्ते या ई स्कूटर आज लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आल्या.

डिझाईन सल्लागार, पीसीएमसी दिव्यांग भवन फाउंडेशन तसेच गोवा राज्य आयुक्तांचे सल्लागार असलेले अभिजीत मुरुगकर, ईझी राईड संस्थेचे सह-संस्थापक नरेंद्र देव, दिव्यांग भवनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, श्याम सातपुते, दत्तात्रय खाडे, गणेश बगाडे, अपर्णा कुऱ्हाडे, दत्तात्रय मिर्गवणे हे देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान शिरोळे यांच्या हस्ते व स्वरूप तावडे फाउंडेशनच्या सौजन्याने दिव्यांग बांधवांना वॉकर, ब्लाइंड स्टिक, वॉकिंग स्टिक, व्हीलचेअर्स आणि क्रचेस सारख्या साधनांचे आणि खाद्य किट्स देखील वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना शिरोळे म्हणाले, “समाजकारणात सक्रीय असताना अनेक दिव्यांग बांधवांचा प्रवास मी पाहिला आहे. हे सर्वच बांधव कायमच मला एक सकारात्मक ऊर्जा देत आले आहेत. जेव्हा सर्वसामान्य माणूस यांच्याशी परिचित होतो तेव्हा हे त्यांना अनेकप्रकारे प्रेरित करतात. यांना पाहिले की आपल्या वेदना या नक्कीच यांच्यापेक्षा कमी आहेत, हे जाणवत राहते. त्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी समाजातील बांधिलकी आणखी वाढायला हवी असे मला वाटते.” समाजाची या बांधवाप्रती असलेली संवेदना जागृती होणे आज गरजेचे असून दिव्यांग बांधवांचे आयुष्य सुकर, सुलभ करण्यासाठी आम्ही कायमच कटिबद्ध असू, असेही शिरोळे यांनी नमूद केले. 

दिव्यांगांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना असून त्यांविषयी योग्य प्रकारे माहिती घेऊन त्या दिशेने कष्ट केल्यास या योजनांचे सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतील. सरकारी मदत आणि समाजाची दिव्यांगांप्रती असलेली संवेदना यांच्या एकत्रित परिणामाने दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल, असेही शिरोळे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड प्रमाणे पुणे शहरात देखील लवकरात लवकर दिव्यांग भवन उभारणीसाठी प्रयत्नशील असल्याची माहितीही शिरोळे यांनी दिली.

कार्यक्रमा दरम्यान छाया चाफले या दिव्यांग मुलाच्या पालक व स्वत: दिव्यांग असलेले महेश मिस्त्री यांनी आपली आव्हाने आणि अनुभव यांबद्दल उपस्थितांना सांगितले. अभिजीत मुरुगकर यांनी अधिक समावेशक समाज निर्माण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. नरेंद्र देव यांनी ईझी राईडच्या दिव्यांगांविषयीच्या प्रयत्नांबद्दल माहिती दिली. या ई स्कूटरचा प्रती तास खर्च हा २० पैसे असून यामुळे दिव्यांग बांधवांचा पेट्रोलचा खर्च वाचेल असेही ते म्हणाले. परेश गांधी यांनी दिव्यांग भवनमधील सक्षमीकरणाच्या उपक्रमांविषयी माहिती दिली.

आनंद पंड्या यांनी प्रास्ताविक केले तर मितल इंदानी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना; पश्चिम महाराष्ट्रातील १२ लाख शेतकऱ्यांना शून्य वीजबिल

कृषिपंपांच्या त्रैमासिक वीजबिलांपोटी ७५१ कोटींच्या पावत्यांचे वितरण

पुणे, दि. ११ ऑक्टोबर २०२४: राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार एप्रिल २०२४ पासून राज्यातील ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा करण्यात येत आहे. या योजनेचा पुणे प्रादेशिक विभागामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हयातील १२ लाख १८ हजार ९९९ कृषिपंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या शेतकऱ्यांच्या एप्रिल ते जून २०२४ च्या त्रैमासिक वीजबिलांपोटी राज्य शासनाकडून ७५० कोटी ८६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त महावितरणला प्राप्त झाली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना वीजबिल प्राप्तीच्या पावत्या म्हणजेच शून्य वीजबिलांचे वितरण महावितरणकडून करण्यात आले आहे. 

राज्यात महावितरणचे राज्यात ४७ लाख ४१ हजार कृषिपंपधारक वीजग्राहक आहेत. या कृषिपंपांकडून ३९ हजार २४६ दशलक्ष युनिट वार्षिक वीजवापर होतो. शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे व अनियमित पर्जन्यमानामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जाहीर केली आहे व त्याची अंमलबजावणी महावितरणकडून करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा करण्याचा व त्यासाठी १४ हजार ७६० कोटी रुपये अनुदान महावितरणला देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रात महावितरणचे एकूण १३ लाख ७७ हजार १५३ कृषिपंपधारक वीजग्राहक आहेत. यामध्ये १२ लाख १८ हजार ९९९ कृषिपंपांची क्षमता ७.५ अश्वशक्तीपर्यंत तर १ लाख ५८ हजार १५४ कृषिपंपांची क्षमता त्यापेक्षा जास्त आहे.

योजनेनुसार ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना एप्रिल २०२४ पासून पाच वर्षांपर्यंत मोफत वीजपुरवठा करण्यात येणार आहे.त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील १२ लाख १८ हजार ९९९ कृषिपंपांच्या एप्रिल ते जून २०२४ या त्रैमासिक वीजबिलांपोटी राज्य शासनाकडून ७५० कोटी ८६ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना वीजबिलाची रक्कम प्राप्त झाल्याची पावती वितरीत करण्यात आली आहे.

पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत ७.५ अश्वशक्तीपर्यंत (कंसात एप्रिल ते जूनच्या त्रैमासिक वीजबिलांचा राज्य शासनाकडून करण्यात आलेला भरणा) पुणे जिल्ह्यातील ३ लाख ३० हजार ५४६ कृषिपंपधारकांपैकी २ लाख ८७ हजार ३५५ कृषिपंपधारक शेतकऱ्यांना (२३५.७१ कोटी), सातारा जिल्ह्यातील २ लाख १५ हजार २०९ पैकी १ लाख ९९ हजार ३४० शेतकऱ्यांना (७६.४६ कोटी), सोलापूर जिल्ह्यातील ४ लाख २ हजार १२ पैकी ३ लाख ४५ हजार ३५४ शेतकऱ्यांना (२६०.६४ कोटी), सांगली जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार १०६ पैकी २ लाख ५० हजार ६३६ शेतकऱ्यांना (१२७.७८ कोटी) आणि कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ६५ हजार २८० पैकी १ लाख ३२ हजार १४५ शेतकऱ्यांना (५०.२५ कोटी) मोफत वीज उपलब्ध होणार आहे.

गुंतवणुकीवर दीडपट देताे सांगून ७ कोटीचा गंडा: बाफना माेटार कंपनीचे संचालक सुमतीप्रसाद मिश्रीलाल बाफनावर गुन्हा दाखल

पुणे-अॅम्ब्युनिअस फॅब्रिकेशन कंपनीसाठी पैशाची गरज असल्याचे सांगून बाफना माेटार कंपनी व रिअल इस्टेटच्या व्यवसायातून गुंतवणुकीवर दीडपट रक्कम परत देताे असे अमिष दाखवून व्यवसायिकाची सात काेटी एक लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी नामांकित बाफना माेटार कंपनीचे संचालक सुमतीप्रसाद मिश्रीलाल बाफना (रा.मरीन ड्राईव्ह, मुंबई) यांच्यावर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुनिल सुमतीलाल मुथ्था (वय-64,रा.घाेरपडी,पुणे) यांनी आराेपी विराेधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व आराेपी हे एकमेकांचे आेळखीचे असून साेबत व्यवसाय करतात. बाफना हेल्थ केअर प्रा.लि. ही कंपनी त्यांनी स्थापन केली असून त्यात संचालक म्हणून समान भागीधारक आहे. सदर कंपनीत अॅम्ब्युनिअस फॅब्रिकेशनचे काम त्यांनी सुरु केले असून आराेपींना पैशाची गरज हाेती. त्यामुळे त्यांनी तक्रारदार यांच्याकडून रक्कम मागून दिलेल्या रकमेवर बाफना माेटार कंपनी व रिअल इस्टेटच्या माध्यमातून दीडपट रक्कम परत देण्याचे ताेंडी आश्वास दिले.

त्यावर तक्रारदार यांनी विश्वास ठेऊन त्यांनी धनराज छगनलाल अँड कंपनी व तक्रारदार यांचे व्यैक्तिक खाते व सुनेच्या बँक खात्यावरुन एकूण सात काेटी एक लाख रुपये आराेपींना दिले. त्यानंतर त्यांनी वारंवार आराेपींना फाेन करुन मुद्दल व परतावा मिळण्यासाठी बाेलले. परंतु आराेपींनी पैसे देण्यास टाळाटाळ करुन ‘ज्यादा हुशारी कराे मत , नही ताे मे आपके पिछे गुंडाेकाे लगा दुंगा आैर आपका जीना मुश्किल कर दुंगा ’ असे म्हणत त्यांचा फाेन कट केला. तसेच आजपर्यंत गुंतवणुक रक्कम परत न करता तक्रारदार यांचा फाेन व व्हाॅटसअप मेसेज ब्लाॅक केले आहे. याबाबत पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एन कणसे करत आहे.

आमच्याकडे ‘कमिटी’ नाही थेट ‘डीबीटी’:हरियाणाचा ढोल पिटणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली, महाराष्ट्रात तेच होईल -एकनाथ शिंदे

0

मुंबई-: महाराष्ट्रातील सावत्र भाऊ लाडकी बहिण योजना बंद करण्याच्या मार्गावर असल्याची टीका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र, कोणीही ‘माय का लाल’ आला तरी योजना बंद पडणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पहिल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकारमधील कार्यकाळ पहा आणि मागच्या दोन सव्वा दोन वर्षात आम्ही केलेला कामाचा कार्यकाळ पहा. फरक तुम्हाला स्पष्ट दिसेल, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

राज्य सरकारच्या सर्व योजनांमध्ये आडवे येण्याचे काम विरोधक करत आहेत. मात्र त्यांना आडवे करण्याचे कामच जनता करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आमच्या कार्यकाळात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. हरियाणा मध्ये आमचा विजय होणार असे ढोल वाजत होते. मात्र हरियाणाच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. आता महाराष्ट्रात देखील तसेच होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मी गरीब कुटुंबातून आलो आहे. मी गरीबी पाहिलेली आहे. माझी आई कशी तगमग करायची. कशा पद्धतीने कुटुंब चालवायची, हे मी पाहिले आहे. त्यामुळे माझ्याकडे अधिकार येताच, सर्वात आधी आमच्या लाडक्या बहिणीसाठी हा निर्णय घेतला. लाडक्या बहिणींना पैसे दिले जात आहेत. हा निर्णय आम्ही का घेऊ नये? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला आहे. हे गोरगरिबांचे सरकार आहे. अधिकाऱ्यांनी देखील सर्वसामान्यांचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा एकही अधिकारी जागेवर ठेवणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. हे जनतेचे राज्य आहे. सर्वसामान्य व्यक्तीचे राज्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

बोपदेव घाटातील बलात्कार : एकाला अटक

पुणे : कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रासाेबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पसार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी ६० पथकांची शोधमोहीम देखील सुरु होती.

तर दोघांची स्केचही तयार करण्यात आले होते. अखेर या शोधमोहीम मध्ये पुणेपोलिसांना यश आले असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर दोघांचा शोध सुरु असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.

गुरुवारी (दि. ३) रात्री तरुणी आणि तिचा मित्र बोपदेव घाट परिसरात फिरायला गेले होते. रात्री अकराच्या सुमारास तरुणी आणि तिचा मित्र घाटात गप्पा मारत थांबले हाेते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले. तरुणीला धमकावून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिघे जण पसार झाले. घाबरलेल्या तरुणीला मित्राने रुग्णालयात दाखल केले होते. त्या तिघांसाठी पोलिसांनी ४० गावे पालथी घातली होती. तसेच सराईतांची चौकशीही सुरु होती. आता सिसिटीव्हीच्या माध्यमातून एकाचा शोध घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

थोड्याच वेळात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल होणार आहेत. या घटनेनंतर त्यांच्यावरही विरोधकांकडून टीका केली जात होती. तसेच पुण्याच्या गुन्हेगारीबद्दल अनेक सवालही उपस्थित केले होते. आताही देवेंद्र फडणवीस यांना या घटनेबाबत प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. बोपदेव घाटातील घटनेला इतके दिवस उलटून गेले आहेत. पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करूनही तीन गुन्हेगारांना पकडू शकले नाहीत. त्यांची ६० तपास पथके या तिघांचा शोध घेत आहेत.

घटनास्थळापासून जवळ असलेल्या सुमारे ४० छोट्या – मोठ्या गावांमध्ये जाऊन पोलिसांनी पाहणी केली आहे. त्या गावांतील ढाबे, दारू विक्रेते, लपूनछपून अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडे चौकशी करून माहिती घेण्यात आली आहे. पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक हॉटेलवरील सीसीटीव्ही तपासले. मात्र, त्यामध्ये पूर्ण रस्त्यावरील परिसर दिसत नसल्याने अडचणी येत आहेत. सासवड, राजगड पोलिसांची देखील मदत घेण्यात येत असून पोलिसांकडून आरोपींचा माग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पंधरा दिवसांमध्ये बोपदेव घाटमार्गे गेलेल्या सुमारे ५० हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. याशिवाय यापूर्वी शहरातील प्रमुख टेकड्या, घाट परिसरात विनयभंग, बलात्कार, दरोडा असे गंभीर गुन्हे केलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली आहे.

नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड:नोएल हे दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र बंधू, टाटा ट्रस्टने सर्वानुमते घेतला निर्णय

टाटा ट्रस्टने दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. बोर्डाने त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले.सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कुणाची निवड होणार? हा प्रश्न ऐरणीवर आला होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. टाटा ट्रस्टने शुक्रवारी बोलावलेल्या एका बैठकीत नवे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. नोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट व टाटा ट्रस्टमधील एक विश्वस्त आहेत. त्यांची कार्यशैली रतन टाटा यांच्याहून फार वेगळी आहे. त्यांना प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणे आवडते.

नोएल हे टाटा समूहाची कंपनी ट्रेंट व व्होल्टासचे अध्यक्ष

नवल व सिमोन टाटा यांचे सुपुत्र नोएल हे सध्या ट्रेंट, व्होल्टास, टाटा इन्व्हेस्टमेंट्स आणि टाटा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आहेत. ते टाटा स्टील आणि टायटनचे उपाध्यक्षही आहेत.₹13.8 लाख कोटींच्या समूहात टाटा ट्रस्टचा वाटा 66%टाटा ट्रस्ट ही टाटा समूहाच्या धर्मादाय संस्थांचा एक समूह आहे. सुमारे 13 लाख कोटींच्या महसूलासह त्याचा टाटा समूहात तब्बल 66% वाटा आहे. टाटा ट्रस्टमध्ये सर रतन टाटा ट्रस्ट व अलाइड ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट व अलाइड ट्रस्टचा समावेश आहे. दारिद्र्य निर्मुलन, आरोग्य सेवा व शिक्षणावर लक्ष केंद्रीत करणारा हा ट्रस्ट रतन टाटा यांच्या वारशाचा अभिन्न अंग आहे.

रतन टाटांनी सुप्रीम कोर्टातील सुनावणीत उत्तराधिकाऱ्याविषयी नोंदवले होते मत

उल्लेखनीय बाब म्हणजे रतन टाटा यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याविषयी सुप्रीम कोर्टात एका सुनावणीत स्पष्ट मत नोंदवले होते. सध्या मी या ट्रस्टचा अध्यक्ष आहे. पण भविष्यात दुसरी एखादी व्यक्ती माझ्या जागी असेल. त्याचे नाव टाटा हेच असावे हे गरजेचे नाही. एका व्यक्तीचे आयुष्य फार मर्यादित असते. पण संघटना नेहमीच कार्यरत असते, असे ते म्हणाले होते.

उल्लेखनीय बाब म्हणजे रतन टाटा हे टाटा ट्रस्ट व टाटा सन्सचे अध्यक्षपद एकाचवेळी सांभाळत होते. ही दोन्ही पदे सांभाळणारे ते एकमेव व्यक्ती होते. त्यानंतर 2022 मध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळाने सर्वानुमते त्यांच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये एक सुधारणा केली होती. त्यानुसार एकच व्यक्ती या दोन्ही पदांवर राहणार नाही अशी तरतूद करण्यात आली होती. उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्यासोबतच्या कायदेशीर लढाईमुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

स्वतःच्या उत्तराधिकाऱ्याविषयी रतन टाटांना काय वाटत होते?

रतन टाटा यांनी यांनी आपल्या टाटायन नामक पुस्तकातून आपल्या उत्तराधिकाऱ्याविषयी मत व्यक्त केले होते. आपला उत्तराधिकारी द्रष्टा हवा. त्याच्याकडे भविष्यवेधी नजर हवी. किमान पुढील 2-3 शतके त्याला समूहाचे नेतृत्व करता यावे अशा वयाचा तो असावा. विशेषतः आपल्या उत्तराधिकाऱ्याला अहंभाव नसावा. कारण एक व्यक्ती म्हणून एवढ्या मोठ्या व्यवसायाचा प्रमुख म्हणून त्याच्या अहंकार उत्पन्न होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या संभाव्य उत्तराधिकाऱ्याकडे असा दुर्गुन नसावा, असे रतन टाटा यांना वाटत होते. यावरून रतन टाटा यांना आपला उत्तराधिकारी केवळ नेमायचा म्हणून नेमण्यात कोणताही रस नव्हता हे स्पष्ट होते.

‘हरि भजनाविण काळ घालवू नको रे…‌’

जीएसबी संयुक्त कोंकणी सभा आयोजित शारदोत्सवात पंडित शौनक अभिषेकी यांची स्वरसेवा
पुणे : ‌‘आधी रचिली पंढरी‌’, ‌‘भवानी दयानी जननी‌’, ‌‘नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी‌’, ‌‘अबीर गुलाल उधळीत रंग‌’, ‌‘सर्वात्मका सर्वेश्वरा‌’, ‌‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर‌’ असे प्रसिद्ध अभंग आणि भक्तीरचना सादर करून पंडित शौनक अभिषेकी यांनी देवी शारदेच्या चरणी आपली स्वरसेवा रुजू केली. भक्तीमय वातावरणात भावविभोर झालेल्या रसिकांनी पं. अभिषेकी यांना भरभरून दाद देत मैफलीचा आनंद घेतला.
जीएसबी संयुक्त कोंकणी सभा, पुणे यांच्यातर्फे प्रथमच शारदोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून पंडित शौनक अभिषेकी यांच्या स्वराभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शारादोत्सव मजेंटा लॉन्स, डी. पी. रोड, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. राजगोपाल गोसावी (तबला), उदय कुलकर्णी, (संवादिनी), अतुल गरुड (टाळ), अभेद अभिषेकी, राज शहा (सहगायन) यांनी साथसंगत केली. कलाकारांचा सत्कार बिपिन पंडित यांनी केला.
सकाळच्या सत्रात अभिषेक, राम नाम जप आणि धार्मिक विधी झाले.
पंडित शौनक अभिषेकी यांनी आपल्या गायनाची सुरुवात ‌‘शांताकारम्‌‍ भुजग शयनम्‌‍‌’, ‌‘सर्व मंगल मांगल्ये‌’ या आदिशक्तीच्या आळवणीने केली. त्यानंतर वारकरी संप्रदायात सादर केला जाणारा ‌‘जय जय रामकृष्ण हरी‌’ हा जयघोष करत रसिकांनाही सहभागी करून घेतले. संत नामदेव रचित ‌‘आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी‌’ हा अभंग बहारदारपणे सादर केला. शास्त्रीय संगीत सादर करताना पंडित अभिषेकी यांनी पंडित रामाश्रय झा यांनी रचलेली ‌‘भवानी दयानी जननी‌’ ही रचना प्रभावीपणे सादर करून त्याला जोडून तराणा ऐकविला. ‌‘नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी‌’ ही संतरचना सादर केल्यानंतर संत सोयराबाई रचित ‌‘हरि भजनावीण काळ घालवू नको रे…‌’ ही रचना भावपूर्णतेने सादर केली. ‌‘अबीर गुलाल उधळीत रंग‌’ या संत चोखामेळा रचित अभंग सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात साथ केली. ‌‘सर्वात्मका सर्वेश्वरा‌’ आणि ‌‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर‌’ या भैरवीतील प्रसिद्ध रचना सादर करून पंडित अभिषेकी यांनी रसिकांच्या मनात आपले सुरेल स्वर निनादत ठेवले. पंडित शौनक अभिषेकी यांनी ‌‘गोयंचे नाव व्हड करून ल्हान जाले म्हान, बनखणीची देवळा जाली लामण दिवे प्राण‌’ आणि ‌‘त्या दिसा वडा कडेन गडद तीनसना, मंद मंद वाजत आयली तुजी गो पायंजणा‌’ या कवी बा. भ. बोरकर यांच्या कोकणी कविता सादर केल्या .
भजनसंध्येनंतर पुणेकरांनी पारंपरिक रासगरबाचा आनंद घेतला.
जीएसबी संयुक्त कोंकणी सभेचे अध्यक्ष अरुण किणी, उपाध्यक्ष जनार्दन भट, सचिव मंजुनाथ नायक, खजिनदार बिपिन पंडित महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत.

खतरनाक संत्या चा ‘रानटी’अंदाज

सिनेमांतल्या भूमिकांसाठी कलाकार काय-काय करत असतात. एखादं दृश्य खरं वाटावं यासाठी जीव ओतून मेहनत घेतात. काही कलाकार चित्रपटातील आपल्या कॅरेक्टरला योग्य न्याय देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत किंवा रिस्क घ्यायला मागे पुढे पहात नाहीत. मराठीसोबतच हिंदीतही सक्रीय असणारा महाराष्ट्राचा लाडका संत्या अर्थात अभिनेता संतोष जुवेकर याबाबतीत नेहमी आघाडीवर असतो.  आगामी ‘रानटी’ चित्रपटात शरद केळकरच्या बालपणीच्या जिगरी मित्राची ‘बाळा’ची भूमिका साकारणाऱ्या संतोषने आपल्या भूमिकेसाठी चक्क संपूर्ण केसांचे टक्कल करून घेत तसेच पायाने अपंग व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.  प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरून त्याचा खतरनाक अंदाज पाहायला मिळत आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता संतोष जुवेकर त्याच्या दमदार भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘बाळा’च्या भूमिकेसाठी त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, मेकअपच्या साथीने भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी संतोषने घेतलेली मेहनतही नक्कीच मोलाची ठरते. या गेटअप मध्ये धावण्यापासून ते अगदी अॅक्शन सीन करण्यापर्यंतची मेहनत घेत ही भूमिका संतोषनी साकारली आहे. या वेगळ्या भूमिकेचं आव्हान स्विकारत संतोषनी  घेतलेली मेहनत ‘रानटी’ चित्रपटात दिसून येणार आहे.  

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना संतोष सांगतो कि, ‘कोणतीही भूमिका एकरूप होऊन केली की ती प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचते,  दिग्दर्शक समित कक्कड कडून मला नेहमी  माझ्यातल्या अभिनयाला वाव देणाऱ्या भूमिका ऑफर झाल्या आहेत. त्याच्या  चित्रपटात काम करण्यासाठी माझा उत्साह व्दिगुणीत होतो. भूमिकेचं सोनं करण्यासाठी मी वाट्टेल ती मेहनत घेतो. ‘रानटी’ चित्रपटातील माझी ही खलनायकी भूमिका प्रेक्षकांना ‘बाळा’च्या प्रेमात पाडेल.

‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे.

इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या पहारेकऱ्यांच्या सतर्कतेला सलाम-सिंहगडावर आत्महत्येसाठी आलेल्या तरुणीला वाचवण्यात यश

पुणे :
सिंहगडावर आत्महत्या करण्याच्या इराद्याने आलेल्या एका तरुणीला ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘पुनीत बालन ग्रुप’कडून नेमण्यात आलेल्या पहारेकऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचविण्यात यश मिळाले. संबधित तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते पुढील तपास करीत आहेत.‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘पुनीत बालन ग्रुप’ यांच्या माध्यमातून सिंहगडासह काही महत्वाच्या ठिकाणांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. बुधवारी (दि. ९ ऑक्टोबर) दुपारी हे कर्मचारी सिंहगडावर काम करत असताना एक तरुणी गडावर आली. तिच्या बोलण्यावरून आणि हावभावावरून ती काही तरी गडबडत असल्याचे या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. या कर्मचाऱ्यांनी तरुणीला विचारणा केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे देत ती कल्याण दरवाजाच्या दिशेने निघून गेली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले, त्यांनी तत्काळ गडावरील ‘चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट’ व इतर कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन या तरुणीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. तरुणी एका बुरूज आणि दरीच्या ठिकाणी उभी राहून खूप वेळ मोबाईलवर बोलत रडत उभी होती. कुठल्याही क्षणी ती दरीत उडी मारू शकते अशी परिस्थिती होती, मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रसंगावध राखून दिलेल्या माहितीमुळे वन विभाग आणि पोलिस पाटील जागेवर पोहचले. त्यांनी या तरुणीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांकडून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. मात्र, ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ व ‘पुनीत बालन ग्रुप’च्या पहारेकरी कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तरुणीला वाचविता आले. त्यामुळे गडावरील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.


‘‘सिंहगडावरील स्वच्छता आणि सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून त्या तरुणीला वाचविले. ज्या उद्देशाने आम्ही ऐतिहासिक ठिकाणी कर्मचारी नेमले आहे, तो उद्देश साध्य होत आहे. कर्मचाऱ्यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. एका तरुणीचे धोक्या आलेले प्राण त्यांनी वाचवल्याने मी या कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक करतो, त्यांच्या सतर्कतेला सलाम करतो आणि त्यांचे आभारही मानतो.’’

  • पुनीत बालन
    (अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)

ॲटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी धारकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना- नोंदणी करा..

पुणे, दि. ११ : राज्यातील ॲटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी धारकांसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ॲटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक’ कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ॲटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालकांनी मंडळाकडे नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

एका कुटूंबातील एकूण चार व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराकडे अनुज्ञप्ती व बॅज असणे आवश्यक राहील. योजनेचा निधी संकलन मंडळाच्या कार्यालयात केवळ डिजीटल, ऑनलाईन पद्धतीने केले जातील. कोणत्याही परिस्थितीमध्ये रोखीने निधी संकलन केले जाणार नाही. योजनेसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, ३९, डॉ. आंबेडकर रोड, संगम पुलाजवळ, पुणे येथे कक्ष उभारण्यात आला आहे. याठिकाणी अर्ज निशुल्क वितरीत करण्यात येत असून तात्पुरत्या स्वरुपात अर्जही स्विकारले जात आहेत, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
0000

“अर्बन ९५-II कार्यक्रमाचे ज्ञान, व्यवहार आणि दृष्टिकोन परिवर्तन” कार्यशाळा संपन्न

पुणे१० ऑक्टोबर २०२४ | पुणे महानगरपालिकेने “अर्बन ९५-II कार्यक्रमाचे ज्ञान, व्यवहार आणि दृष्टिकोन परिवर्तन” या विषयावर ५वे क्षमता निर्माण कार्यशाळेचे आयोजन केले

पुणे महानगरपालिकेने १० ऑक्टोबर २०२४ रोजी शिवाजीनगर येथील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे ५वी क्षमता निर्माण कार्यशाळा यशस्वीपणे आयोजित केली. अर्बन ९५ पुणे कार्यक्रमाच्या फेज II अंतर्गत नियोजित मालिकेतील ही पाचवी आणि शेवटची कार्यशाळा होती, जी शिशु, लहान मुले आणि त्यांचे पालक (ITC) यांच्यासाठी अनुकूल शहरी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणारी होती.

“अर्बन ९५-II कार्यक्रमाचे ज्ञान, व्यवहार आणि दृष्टिकोन परिवर्तन” या विषयावरील कार्यशाळेत PMC सोबत काम करणाऱ्या विविध कंत्राटदार, सल्लागार, स्वयंसेवी संस्था आणि PMC अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील तज्ञ आणि सहभागींना एकत्र आणले. या सत्रांचे नेतृत्व प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट (PMU) च्या इजिस इंडिया कन्सल्टिंग इंजिनिअर्स प्रा. लि. (तांत्रिक भागीदार), वॅन लिअर फाउंडेशन (VLF) (समर्थन भागीदार) आणि पुणे महानगरपालिका (अंमलबजावणी भागीदार) या तज्ञांनी केले. हा कार्यक्रम लहान मुलांसाठी आणि कुटुंबांसाठी अनुकूल शहरी वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एकत्रित प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे.

कार्यशाळेत अर्बन ९५ कार्यक्रमाच्या उद्दिष्टांवर, धोरणांवर आणि मुख्य विषयांवर विशेषतः बालमैत्रीपूर्ण पायाभूत सुविधा विकसित करण्यावर चर्चा झाली, ज्यामुळे लहान मुलांच्या प्रारंभिक बाल्याच्या विकासाला चालना मिळेल. सत्रे परस्परसंवादी होती, ज्यामध्ये भूमिकापेढ्या, गटचर्चा आणि व्यायामांचा समावेश होता. यामध्ये शिशु-लहान मुले-पालक अनुकूल शेजार तयार करण्याच्या आव्हानांवर चर्चा करून नवीन कल्पना आणि उपाय ओळखले गेले.

PMC चे उपआयुक्त आणि विभागप्रमुख या कार्यशाळेत प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. त्यांनी लहान मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या संगोपनासाठी योग्य शहरी नियोजनाचे महत्त्व पटवून दिले.

ही कार्यशाळा एक गतिशील व्यासपीठ ठरली, ज्यामध्ये हितधारकांनी लहान मुलांसाठी अनुकूल शहरी डिझाईन धोरणांचा अभ्यास, विचारविनिमय आणि अंमलबजावणी करण्यासाठी संधी घेतली. या कार्यशाळा मालिकेच्या समारोपासह, अर्बन ९५ कार्यक्रमाने मूल्यवान धडे घेतले आहेत आणि पुणे शहराला त्याच्या मुलांसाठी अधिक समावेशक आणि संगोपनात्मक बनवण्यासाठी मजबूत बांधिलकीसह पुढे वाटचाल केली आहे.

पुण्यात पुन्हा हिट अँड रन प्रकरण:भरधाव ऑडी चालकाने दुचाकीस्वाराचा घेतला बळी(व्हिडीओ)

पुणे- आता पुन्हा एकदा अशाच प्रकारे हिट अँड रन केसची पुनरावृत्ती मुंढवा परिसरात घडली आहे. या अपघातात रुउफ अकबर शेख (वय -21) याचा दुर्देवीरीत्या मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाचा पोलिसांनी शोध घेऊन त्याला राहत्या घरातून अटक केली आहे.प्रदीप तयाल( वय 34 वर्षे ,रा. हडपसर,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्री 1.30 ते 1.35 वा सुमारास एबीसी रोड कडून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एम एच 12 एन ई 4464 कारचालकाने प्रथम ऍक्टिवा वरील तिघांना जोरात ठोसर मारली त्यात ते तिघे रस्त्यावर खाली पडले त्यांना किरकोळ मार लागला. त्यानंतर पुढे एक्सेस गाडीवरून जाणाऱ्या टू व्हीलर चालक रुउफ अकबर शेख यास पाठीमागून ऑडी कारने जोरात धडक दिल्याने तो जखमी झाला होता. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत नोबल हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात जखमी तरुणाचा मृत्यू झालेला आहे. सदरचा वाहनचालक अपघात करून पळून गेलेला होता.सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून वाहनाचा क्रमांक प्राप्त करून त्यात मिळालेल्या मोबाईल नंबर वरून वाहनचालकचा पत्ता मिळाला त्यातून संबधित वाहनचालक आयुष प्रदीप तयाल (वय 34 ) यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेतले असुन सदरचे वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर भा न्या स . 105,281, 125(a), 132 119,177,184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुंढवा पोलिस करत आहे.आरोपी कारचालक दारुच्या नशेत असल्याची प्रार्थमिक माहिती मिळाली आहे.तसेच चालक शेजारी बसलेली व्यक्ती गाडीत सिगारेट ओढताना प्रत्यक्षदर्शींनी पाहीला आहे. गुगल बिल्डींग समोर ही घटना मध्यरात्री घडली. आलिशान कारचालकाने दुचाकीस्वाराला उडवले त्यानंतर तरुणाच्या अंगावरून गाडी घालत भरधाव वेगाने आरोपी पळून गेला.अपघातात बळी गेलेला रौफ शेख स्विगी डिलीवरीचे काम करत होता.त्याची घरची परिस्थिती गरिबीची असून त्याचे वडिल म्हशी सांभाळन्याचे काम करतात.

गणपती मंडळाच्या वतीने पोलिसांसाठी आरोग्य शिबीर संपन्न

पुणे:

गणेशोत्सवामधे अहोरात्र झटलेल्या व कामाच्या व्यस्ततेमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष झालेल्या सर्व पोलीस बांधवांसाठी आरोग्य शिबीर नाना पेठेतील श्री संभाजी मित्र मंडळाचे वतीने आयोजन करण्यात आले. या शिबीरात पोलीस बांधवांचे ह्रदय ईसीजी तपासणी, दंत चिकित्सा, डोळे तपासणी, हाडांची तपासणी, बीएमआय, हिमोग्लोबीन, बीपी, ब्लड शुगर तपासणी, मॅग्नेटिक बेड ट्रिटमेंट द्वारे सर्व तपासण्या करून पुढील उपचारांची दिशा ठरवून औषधोपचार करण्यात आले. फरासखाना व विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या १८० पुरूष व महिला पोलीसांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरातील सुविधांबाबत पोलीसांनी समाधान व्यक्त केले. फरासखान हाॅलमधे एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळाल्याने आमचा खूप वेळ वाचल्याचे पोलीसांनी नमूद केले. शिबिरस्थळी पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल्ल, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, फरासखाना पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, विश्रामबाग पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी भेट देउन सुविधांचा आढावा घेतला. मंडळाचे अध्यक्ष शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे आणि मंडळाचे कार्यकर्ते नरेश लडकत, आकाश खैरे, तेजस जावळकर, आदित्य हरगुडे, अथर्व मोरे, ओंकार झेंडे यांनी परिश्रम घेतले. माजी महापौर स्नेहल आंबेकर, राजेंद्र शिंदे, अनंत घरत, नंदू येवले, नितीन रावळेकर, नागेश खडके, अजय परदेशी, ज्योती चांदेरे, अमृत पठारे, रोहिणी कोल्हाळ, करूणा घाडगे, प्रविणी भोर, स्नेहल जाधव, अमर मारटकर, संतोष भूतकर, दिनेश दाभोळकर, राहुल आलमखाने, युवराज पारीख, नितीन थोपटे उपस्थित होते.

सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात रेजिमेंटल दुकानांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

पुणे, दि. १०: सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारामध्ये असणाऱ्या रेजिमेंटल दुकानांसाठी महाविद्यालयाचे संचालक आणि कमांडन्ट यांच्यावतीने पात्र अर्जदारांकडून १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

या रेजिमेंटल दुकानांमध्ये उपाहार गृह, टेलर गारमेंट, शू शॉप, पुस्तकांचे, तसेच एनएलएच जवळ कॅफेटेरिया, फर्निचर, भाजीपाला, दुचाकी दुरुस्ती, कपडे धुण्याचे व शिंपी अशा प्रकारच्या दुकानांचा समावेश आहे. या दुकानांसाठी अर्ज करण्यास सेनेमध्ये सेवा बजावत असताना शहीद झालेल्या जवानांच्या युद्ध विधवा, अपंग सैनिक, माजी सैनिक आणि त्यांचे अवलंबित तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नी हे पात्र असतील.

अर्जाचा नमुना, अन्य तपशील, सामान्य अटी व शर्ती आदी माहिती महाविद्यालयाचा सूक्ष्म शास्त्र विभाग, दुसरा मजला, डायमंड ज्युबिली ब्लॉक, वानवडी, पुणे या ठिकाणी सकाळी ८.३० ते दुपारी १ वा. यादरम्यान मिळेल. सर्व कागपत्रांसह १५ ऑक्टोबरअखेर संध्याकाळी ४ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.
0000