Home Blog Page 648

पाचवी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा ध्रुव शहा व अनन्या चांदे यांची विजेतेपदावर मोहोर

सांगली दिनांक १३ऑक्टोबर २०२४
मुंबईच्या टीएसटी संघाचे खेळाडू ध्रुव शहा व अनन्या चांदे यांनी अष्टपैलू खेळाचा प्रत्यय घडविला आणि पाचव्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात विजेतेपद पटकाविले.

नवकृष्णा व्हॅली स्कूल, कुपवाड एमआयडीसी, सांगली येथे सूरज फाउंडेशन सांगली यांच्यातर्फे आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मुलांच्या १९ वर्षाखालील गटात तृतीय मानांकित खेळाडू ध्रुव याने मुंबई महानगर जिल्हा संघाचा आठवा मानांकित खेळाडू पार्थ मगर याची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित केली. त्याने अटीतटीच्या लढतीनंतर ११-७,११-३,११-१३,११-१३, ११-४,११-९ असा विजय मिळविला. या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी अतिशय बहारदार खेळ करीत प्रेक्षकांना खेळाचा आनंद मिळवून दिला. उपांत्य फेरीत ध्रुव याने पुण्याचा द्वितीय मानांकित खेळाडू नील मुळ्ये याच्यावर ११-८,११-९,११-९ असा सहज विजय मिळविला होता तर पार्थ याने आपला सहकारी सिद्धांत देशपांडे या चौथ्या मानांकित खेळाडूवर ११-३,१२-१४,११-४,११-८ अशी अनपेक्षित मात केली होती.

  मुलींच्या अंतिम सामन्यात अनन्या हिने आपलीच सहकारी श्रावणी लोके या तृतीय मानांकित खेळाडूवर मात करीत आपले अग्रमानांकन साथ ठरविले. हा सामना तिने ११-२,११-५,११-७,११-९ असा जिंकताना काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला. उपांत्य फेरीत तिने ठाण्याची पाचवी मानांकित खेळाडू रितिका माथूर हिचे आव्हान ११-८,११-८,१२-१० असे संपुष्टात आणले होते तर श्रावणी हिने ठाण्याची खेळाडू ऋतुजा चिंचासुरे या दहाव्या मानांकित खेळाडूला ७-११, १३-११,११-८, ११-७ असे पराभूत केले होते.

रा. स्व. संघातर्फे विजयादशमी सघोष पथसंचलन उत्साहात

  • संघाचा शताब्दी वर्षात प्रवेश
  • बारा हजार स्वयंसेवकांचा सहभाग
  • वस्ती व सोसायट्यांमधून संचलनांचे भव्य स्वागत

पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिन असलेल्या विजयादशमीच्या निमित्ताने शनिवारी (१२ ऑक्टोबर) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगर रचनेतील ५८ ठिकाणी सघोष संचलने काढण्यात आली. पुणे महानगरात नऊ भागातील विविध ५५ नगरांमध्ये काढण्यात आलेल्या संचलनांमध्ये एकूण बारा हजारांहून अधिक पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.महानगरात सर्व उपनगर व वस्त्यांमध्ये (झोपडपट्टी) सर्व स्तरातील नागरिकांनी पथसंचलनाचे जोरदार स्वागत केले. विजयादशमीच्याच दिवशी नागपूरामध्ये मोहिते वाड्यात १९२५ मध्ये संघाची स्थापना झाली होती.यंदा संघ शताब्दी वर्षात प्रवेश करत असल्याने सघोष पथ संचलनांना एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते.

या वेळेच्या संचलनाचे वैशिष्ठ्य सांगायचे तर शहरातील विविध वस्त्या (झोपडपट्टी) व छोट्या- मोठ्या सोसायट्यांमधून संचलन मार्गाचे प्रकारचे नियोजन करण्यात आले होते.तसेच विद्यापीठ नगराचा भाग असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदा प्रथमच सघोष संचलन काढण्यात आले. त्यात विद्यार्थी स्वयंसेवक लक्षणीय संख्येने सहभागी झाले. दरम्यान काही ठिकाणी संचलनासमवेत शस्त्र पूजन उत्सवांचे आयोजन देखील करण्यात आले होते. विशेष म्हणजे हे संचलन वस्तीतून विविध मार्गस्थ होताना सर्व स्तरातील नागरिकांनी भव्य असे स्वागत केले. यावरून समाजात संघाविषयी स्वीकारार्हता वाढल्याचे दिसून येते आहे.

विजयादशमी निमित्ताने विविध नगरांमध्ये सकाळी ७.३० वाजता सघोष संचलनांचे आयोजन करण्यात आले होते. संचलनाच्या मार्गावरून नागरिकांनी आकर्षक रांगोळी आणि विविध फुलांच्या व पाकळ्यांच्या सड्यांनी भरून गेलेले दिसत होते. दरम्यान संचलनातील स्वयंसेवकांवर व भगव्या ध्वजावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे विविध नगरांमध्ये सर्व विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील संचलनाचे स्वागत केले. तर पुणे महानगराच्या विविध नगरांमध्ये प्रतिष्ठित व मान्यवर नागरिकांनी प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित राहून संचलनाची पाहणी केली.

प्रथेप्रमाणे सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैशिष्ट्यपूर्ण घोषातर्फे शिवाजीनगर भागातील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सघोष मानवंदना देण्यात आली.यावेळी व केंद्रीय हवाई वाहतूक व सहकार विभागाचे राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर व कसबा भागाचे संघचालक अॅड. प्रशांत यादव यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्याआधी पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर व कसबा भागाचे संघचालक प्रशांत यादव यांच्या हस्ते मोतीबाग कार्यालयात शंख व भगव्या ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

संघ कामात अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. अनेक तरूणांनी संघ कार्यात सहभाग वाढवित व संचलनात संपूर्ण गणवेशात सहभागी झालेले दिसून आले. तरूणांसोबत अनेक ज्येष्ठ स्वयंसेवक देखील गणवेशासह संचलनात सहभाग नोंदविला.

शस्त्र पूजन उत्सवात तरूणांचा सहभाग अधिक
विजयादशमीपूर्वी पुणे शहरामधे एकूण ३७ ठिकाणी तरूण विभागाचे शस्‍त्रपूजन उत्‍सव झाले तसेच ४० ठिकाणी बाल विभागाचे शस्‍त्रपूजन उत्‍सव झाले. या उत्‍सवांना देखील ७००० पेक्षा अधिक तरूण आणि ३००० पेक्षा अधिक बाल उपस्थित होते.

बाबा सिद्दिकींना गोळ्या घालणारे UPचे दोन शूटर ,पुण्यातल्या भंगार विक्रेत्याकडे काम करणारे १८/१९ वर्षाची पोरं

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडणारे दोन हल्लेखोर उत्तर प्रदेशातील बहराइच येथील आहेत. बहराइचच्या एसपी वृंदा शुक्ला यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले- धर्मराज कश्यप असे एका आरोपीचे नाव आहे. दुसरा शिवकुमार गौतम उर्फ ​​शिव.शिवा फरार आहे तर धर्मराजला मुंबई पोलिसांनी पकडले आहे. दोघेही एकाच गावातील गंडारा येथील रहिवासी आहेत. घरे शेजारी शेजारी आहेत. वय साधारण १८-१९. दोघेही पुण्यात भंगार विक्रेते म्हणून काम करायचे. त्यांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड अद्याप सापडलेला नाही.

एसपी वृंदा शुक्ला म्हणाल्या की, दोघेही सामान्य कुटुंबातील आहेत. कुटुंबीयांशीही संपर्कात होते. पोलिस दोघांच्याही घरी पोहोचले असून कुटुंबीयांशी बोलणे सुरू आहे. या घटनेबाबत कुटुंबीयांकडे काय माहिती आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 नराधमांनी हा गुन्हा केला आहे. तिसऱ्याचे नाव गुरमेल बलजीत सिंग (२३ वर्षे, रा. हरियाणा) असे आहे.शिव पुण्यात ६ वर्षांपासून काम करत होता, धर्मराजला दोन महिन्यांपूर्वी बोलावले
बहराइच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिव 6 वर्षांपासून पुण्यातील एका भंगार विक्रेत्याकडे काम करत होता. दोन महिन्यांपूर्वी शिवाने शेजारी असलेल्या धर्मराजलाही कामानिमित्त पुण्याला बोलावले. सुपारी देणाऱ्या व्यक्तीने शिव आणि धर्मराज यांची गुरमेलला भेटण्याची व्यवस्था केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 40 दिवसांपासून मुंबईत राहून शूटर सिद्दिकीची रेकी करत होते. 2 सप्टेंबरपासून ते कुर्ला येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. अटक करण्यात आलेल्या दोन्ही शूटर्सनी सांगितले की त्यांनी बाबांचे घर आणि मुलाच्या ऑफिसची रेका केली होती.हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग असल्याच्या वृत्ताला मुंबई पोलिस सूत्रांनी दुजोरा दिला आहे. सुपारी देऊन बाबा सिद्दिकींची हत्या करण्यात आली होती. सुपारी कोणी दिली? कितीची दिली? हा अजूनही तपासाचा विषय आहे.

शिव गौतमचे वडील बाळकृष्ण म्हणाले- आम्हाला आज सकाळीच कळले. पोलिस आले होते. चौकीवर नेऊन आमची चौकशी केली. माझा मुलगा काहीही चूक करू शकत नाही. त्याला फूस लावली आहे. मी 15-20 दिवसांपूर्वी शिवशी बोललो. माझ्याकडे फोन नव्हता. १५ दिवसांपूर्वी त्याने मला हरीश नावाच्या मुलाकडे फोन केला होता.धर्मराजची आई म्हणाली- मुलगा दिल्लीला जात असल्याचे सांगून गेला होता
धर्मराजची आई म्हणाली- महिन्याभरापूर्वी तिचे मुलाशी बोलणे झाले होते. आम्ही त्याला लवकर येण्यास सांगितले. त्यावर त्याने होळीला येणार असल्याचे सांगितले. पोलिस आमच्याकडे आले. माझे नाव विचारले. मला अनुराग आणि धर्मराज अशी दोन मुले आहेत. मुलगी नाही. याची माहिती आम्ही पोलिसांना दिली. आम्हाला काही कळत नाही. माझा मुलगा दोन महिन्यांपूर्वी आला होता. दिल्लीला जातो सांगितले.

श्री महालक्ष्मी मंदिरासमोर प्रतिकात्मक रावण दहन 

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग सार्वजनिक नवरात्र उत्सव ; महिला अत्याचार, स्त्री भ्रूण हत्येविषयी जनजागृती
पुणे :  महिला अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या, बालशोषण, नशाखोरी, वृद्धांची उपेक्षा, बेरोजगारी, भेदभाव यांसह विविध दहा सामाजिक समस्यांच्या प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरासमोर करण्यात आले. यावेळी प्रभू श्रीराम यांची वानरसेना आणि रावणाची सेना यांच्या युद्धाचा जीवंत प्रसंग देखील सादर करण्यात आला. 
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट तर्फे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल २५ फूट उंच प्रतिकात्मक रावणाचे दहन यावेळी करण्यात आले. मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लद्दड यांसह आमदार माधुरी मिसाळ देखील यावेळी उपस्थित होत्या.
डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, वाढत्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवात स्त्री शक्तीचा जागर करण्यासोबतच नारी शक्तीचा सन्मान देखील करण्यात आला. यंदा आयोजित केलेल्या रावण दहन कार्यक्रमात देखील महिला अत्याचार व स्त्री भ्रूण हत्येसारख्या समस्यांच्या प्रतिकात्मक रावणाचे दहन करुन समाजात स्त्री सबलीकरणाचा संदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्रामचे लोकार्पण

पुणे, दि.13 : . पुणे शहरात मेट्रो आली, नदीसुधार प्रकल्प सुरु आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात नुसती भूमिपूजन झाली पण मोदी सरकार प्रत्यक्षात प्रकल्प साकारत आहेत. त्यामुळेच शहराचा चेहरा मोहरा बदलत असल्याचे मत केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नातून पु. ल. देशपांडे उद्यान येथे विकसित करण्यात आलेल्या कलाग्रामचे लोकार्पण मोहोळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, दीपक मिसाळ, धीरज घाटे, करण मिसाळ, श्रीकांत जगताप, किरण ठाकूर यांची उपस्थित होते. वास्तूरचनाकार तीर्था मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला.

मोहोळ म्हणाले, आपलं पुणे ही जशी सांस्कृतिक नगरी आहे, तशीच ती कलाकारांची ही नगरी आहे. कलाकरांना आपले कलाविष्कार सादर करण्यासाठी विविध व्यासपीठे पुण्यनगरीने उपलब्ध करुन दिलेली आहेत. आणि आता याच पुण्यनगरीत कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ असणारं ‘कलाग्राम’ नक्कीच मोठा आधार ठरणारं आहे. या ‘कलाग्राम’च्या माध्यमातून विविध कलाविष्कार सादर करण्याची संधी कलाकारांना मिळणार असून कलाकारांना आपले कलाविष्कार लोकांपर्यंत पोहोचणं सहज शक्य होणार आहे. अतिशय भव्य-दिव्य अशा या कलाग्राममुळे पुण्याच्या कला विश्वात वैभवात निश्चितच भर पडली आहे. शिवाय यामुळे पर्यटनालाही चालना मिळण्यास मदत होणार आहे. ‘कलाग्राम’ साकारल्याबद्दल माधुरीताई आणि महापालिकेचे विशेष अभिनंदन !

आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, सिहंगड रोड ला 50 एकर जागा यामध्ये पहिल्या फेजमध्ये पु. ल. देशपांडे उद्यान झाले, आता कलाग्राम झाले म्हणजे पूर्ण 50 एकर विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. पुढे पु. ल. देशपांडे कट्टा विकसित केला जाईल. ज्यामध्ये पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित कला, साहित्याचे सादरीकरण करण्यात येईल.

मिसाळ म्हणाल्या, बांबू दगडांपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू आणि ग्रामीण कलाकृतींच्या प्रात्यक्षिकांसह विविध राज्यांमधील लोककला आणि खाद्यपदार्थांची मेजवानी पुणेकरांना एकाच शताकाली येथे उपलब्ध होणार आहे. कलाग्रामचा परिसर बांधकाम एखाद्या गावातील वास्तूप्रमाणे साकारण्यात आले आहे. या ठिकाणी तीस गाळे बांधण्यात आले असून, त्यात एक अँमफी थिएटर, विविध राज्यांच्या वस्तूंच्या विक्रीचे काउंटर, लायब्ररी, विविध राज्यांमधील खाद्यपदार्थ विक्री करणारे स्टॉल, विविध प्रकारच्या कार्यशाळासाठी खुली व्यासपीठे, तसेच बांबू व दगडापासून तयार केलेल्या विविध वस्तू व हस्तकलांची प्रात्यक्षिके पाहता येणार आहेत.

प्रास्ताविक राजेंद्र भोसले यांनी केले.
सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

सलमान खान नंतर शिंदे, फडणवीसांच्यासह मलबार हिल्स परिसरातील इतर मंत्र्यांच्या बंगल्याच्या सुरक्षेत वाढ

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सिद्दिकी यांचा मृत्यु झाला. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. गँगमधील एका सदस्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून ही जबाबदारी स्वीकारली. दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्री यांच्या बंगल्यावर देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासोबतच मलबार हिल्स परिसरातील इतर मंत्र्यांच्या बंगल्याची देखील सुरक्षा वाढवण्यात आली असून बंगल्याबाहेर पोलिसांची गस्त वाढवली आहे. यासोबतच मलबार हिल्स परिसरातील अतिमहत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती मिळत आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी आणि सलमान यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. सिद्दिकी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्ट्यांमध्ये सलमान नेहमी उपस्थित राहत असे. सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉनेन्स बिश्नोई गँगने घेतली असून त्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली. या पोस्टमध्ये सलमान खानचा उल्लेख असल्यामुळे त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, सलमान खानच्या बिग बॉस 18 चे शुटिंग देखील थांबवण्यात आले आहे.

हरियाणा आणि युपीच्या शूटर्सनी केली हत्या-दरम्यान, हरियाणा आणि यूपीच्या शूटर्सनी बाबा सिद्दिकी यांची हत्या केली. पोलिसांनी 3 पैकी 2 शूटर्सना अटक केली आहे. एकजण फरार आहे. एक शूटर हरियाणाचा तर 2 उत्तर प्रदेशातील बहराइचचे आहेत. ते 40 दिवस मुंबईत थांबले होते आणि सिद्दिकी यांचे घर आणि मुलाचे कार्यालयाची रेकी केली होते. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कॉन्ट्रॅक्ट किलिंगला दुजोरा दिला आहे. शिव, धर्मराज आणि गुरमेल अशी या हत्येतील आरोपींची नावे आहेत. शिव आणि धर्मराज हे बहराइच, यूपीचे रहिवासी आहेत, दोघांवर यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नाही. गुरमेल हा हरियाणाचा रहिवासी आहे. धर्मराज आणि गुरमेल यांना अटक करण्यात आली आहे. शिव फरार आहे. त्याला या हत्येचे कंत्राट देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

विजयादशमीनिमित्त पराक्रमी सेनाधिका-यांचा सन्मान

सैनिक मित्र परिवार तर्फे आयोजन ; सेनाधिकारी एअर मार्शल सुनील सोमण (निवृत्त) यांचा गौरव
पुणे : शूरवीरांचा सन्मान नौबतीसह करायचा ही मराठी परंपरा आहे. त्यानुसार विजयादशमीला भारतीय सैन्यदलातील सेनाधिका-यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सनई-चौघडयाच्या गजरात, रांगोळी व दारावर तोरण लावून मराठमोळ्या पद्धतीने पुण्यात सन्मान करण्यात आला. सेनाधिकारी एअर मार्शल सुनील सोमण (निवृत्त) या वायुदलातील निवृत्त सेनाधिका-यांचा गौरव सैनिक मित्र परिवारातर्फे करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

एनआयबीएम कोंढवा येथील सोमण यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोमण यांच्या पत्नी रश्मी सोमण, ज्येष्ठ बँकिंग तज्ञ अ‍ॅड.सुभाष मोहिते, किरण पाटोळे, आनंद सराफ, शिरीष मोहिते, विष्णू ठाकूर, नितीन पंडित  आदी उपस्थित होते.  पुणेरी पगडी, तिरंगी उपरणे, सन्मानचिन्ह, श्रीफळ, मिठाई असे सन्मानाचे स्वरुप होते. कल्याणी सराफ, स्वाती ओतारी, प्रज्ञा काळे त्यांनी आयोजनात सहभाग घेतला. 

सुनील सोमण म्हणाले, सैन्यदलात सेवेत असताना माझ्या २३ ठिकाणी बदल्या झाल्या. सकाळी ५.३० ते ६ पासून मी बाहेर जात असे. त्यामुळे मुला-मुलीचे लहानपण पाहिले नाही. अनेकदा आठवडा आठवडा आमचे बोलणे देखील होत नसे. माझ्या पत्नीने कुटुंबाकडे लक्ष देत सर्व काही केले. त्यामुळे मी देश रक्षणार्थ कार्य करु शकलो. भारतीय हवाई दलात मी सन १९७६ पासून कारकीर्दीस सुरुवात केली. युद्ध सहभाग, तातडीच्या मोहिमा, लढाऊ विमान दलाचे नेतृत्व, नवोदितांना प्रशिक्षण, लष्कराच्या विशेष समितीचे सल्लागार, असा प्रदीर्घ कार्य सहभाग देखील घेतला. आता निवृत्तीनंतर सैनिक मित्र परिवारने माझ्या कार्याची दखल घेत केलेला सन्मान माझ्यासाठी खूप वेगळा आहे.

आनंद सराफ म्हणाले, सन १९९६ पासून सैनिकांसाठी कृतज्ञतेने काम करण्याचा प्रयत्न, सैनिक मित्र परिवाराच्या माध्यमातून केला जात आहे. सामान्य नागरिकांनी सैनिकांसाठी काहीतरी करावे, यासाठी ही संकल्पना सुरु झाली. तिरंगी झेंडयासाठी प्राण पणाला लावणा-या सैनिकांच्या प्रत्येक सणाला पहिला मान आहे. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन हे सण साजरे करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले. भारत खळदकर यांनी सनई-चौघडा वादन केले.  

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलचा विभागीय पातळीवर प्रथम क्रमांक

पुणे -महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानामध्ये ‘न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे’ या शाळेने विभागीय पातळीवर अ व ब वर्ग महापालिका खासगी शाळा गटात प्रथम क्रमांक पटकावून एकवीस लाखांचे पारितोषिक मिळवले आहे. नागपूरच्या सरस्वती विद्यालयाला दुसरा तर पुण्याच्या श्री शिवाजी मराठा हायस्कूल शाळेला तिसरा क्रमांक मिळाला

शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता राव, पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार, शाला समिती अध्यक्ष खेमराज रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन या स्पर्धेसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न केले. या प्रयत्नांना या पुरस्काराच्या रूपाने यश आले.

कृत्रिम तारांगण असलेली आशिया खंडातील एकमेव शाळा, अवकाश निरीक्षणासाठी वेधशाळेची सोय, ३७००० पुस्तकांचे भव्य ग्रंथालय, इंग्रजी भाषा प्रयोगशाळा, गणित खेळघर, भव्य प्रयोगशाळा, भव्य मैदान, जगभरातील १२५ खनिजांचे भूवस्तूसंग्रहालय, दुर्मीळ दिव्यांचे संग्रहालय अशी या शाळेची वैशिष्ट्ये आहेत.

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या जयंतीच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षात या पारितोषिकाच्या रूपाने पुन्हा एकदा शाळेचे नाणे खणखणीत वाजले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत योगदान दिलेल्या या शाळेने इतिहास घडविला आहे.
अगदी सामान्य घरांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना अत्यंत प्रामाणिकपणे आणि मनापासून शिक्षण देऊन, त्यांचा सर्वांगीण विकास करून, समाजामध्ये, विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवून समाजाची सेवा करण्यासाठी चांगले नागरिक घडविणाऱ्या या शाळेच्या आजपर्यंतच्या प्रयत्नांना महाराष्ट्र शासनाकडून मिळालेली ही शाबासकीची थाप आहे.

शाळेने राबवलेल्या काही महत्त्वपूर्ण उपक्रमांची यादी खालीलप्रमाणे,-
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या उल्लेखाशिवाय भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा, मराठी साहित्याचा आणि मराठी व्याकरणाचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. अशा या शाळेमधील विविध उपक्रमांच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य शाळेमधून व्याख्याने, क्षेत्रभेटी यांचे आयोजन करून सतत केले जाते.
शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने दुधीभोपळा, दोडकी, वांगी, मिरच्या, कांदा व अळू यांचे उत्पादन परसबागेत घेतलेले आहे. शाळा सदर भाज्या जशा उपलब्ध होतील तशा पोषण आहारासाठी उपयोगात आणते.

पर्यावरण संवर्धनासाठी शाळेतील विद्यार्थी स्वयंसेवक पर्यावरणपूरक कार्यक्रम राबवतात. विद्यार्थी दर शनिवारी सभा घेऊन पुढील आठवड्यात करायच्या कामाची रूपरेषा ठरवतात. विद्यार्थी स्वत:च्या परिसरातील प्लास्टिक कचरा जमा करून इको ब्रिक्स तयार करतात. या ब्रिक्स सामाजिक संस्थांना देतात.

शाळेच्या इमारतीभोवती असणाऱ्या वृक्षांची देखभाल विद्यार्थी करतात. याशिवाय शाळेबाहेर जाऊन टेकड्यांवरही वृक्षारोपण केले जाते. स्वतः तयार केलेले सीडबॉल विविध ठिकाणी जाऊन टाकतात.
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केली आहे. हे विद्यार्थी स्वत:च्या परिसरामध्ये राहणाऱ्या जनतेचे स्वच्छता विषयक प्रबोधन करतात. विविध वर्गांमध्ये जाऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतात. वॉशरूममध्ये हँडवॉशचा वापर करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवतात. हे स्वच्छता दूत असणारे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांचे निरीक्षण करतात आणि त्यांना सुधारणा करण्यास प्रेरणा देतात.

विद्यार्थ्यांना शालेय परिसरातील ऐतिहासिक ठिकाणी भेट देण्यासाठी नेले जाते. यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळ, पुण्यातील विविध मार्गांवरील नीलफलक असलेल्या वास्तू, सिंहगड अशा ठिकाणी नेऊन विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासघटकाचे अध्यापन केले जाते.

शाळेतील शिक्षक स्वत:चे मोबाईल ॲप तयार करून त्यावर अध्यापन करतात. शिक्षक स्वत: विविध पीपीटी तयार करून त्यांचा वापर अध्यापनात करतात. शैक्षणिक कार्ड, तक्ते, खेळ तयार करून विद्यार्थ्यांना आवडेल अशा पद्धतीने अध्यापन करतात. शाळेमध्ये विविध दिवसांचे औचित्य साधून गगोला (गणिताची गोडी लावणे), पाय डे, शेकडो विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रात्यक्षिक असे उपक्रम घेतले जातात. शिक्षक स्वत: पुस्तके लिहितात.

शाळेने ICT प्रयोगशाळा उभारलेली आहे. यामध्ये आधुनिक संगणक ज्ञानाचा पाया भक्कम करण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम शिकवला जातो. हा अभ्यासक्रम शाळेने तयार केलेला आहे. अद्ययावत ३१ संगणकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक संगणकज्ञानासाठी तयार केले जाते.

सुतारकाम, शेती व्यवस्थापन, प्लंबिंग, केटरिंग, इलेक्ट्रिशियन असे व्यवसाय मार्गदर्शन वर्ग शाळेने डेक्कन एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या माध्यमातून तयार केलेले आहेत. येथे विद्यार्थी वर्कशॉपमध्ये प्रत्यक्ष कार्य करून व्यवसायात तयार होतात. प्लंबिंगमध्ये तुषार सिंचन प्रकल्प, रोबोट, मोबाईल स्टँड, पुस्तक स्टँड, कपडे सुकवण्याचे स्टँड तयार करतात. सुतारकामामध्ये लाकडी किचन तयार करतात. केटरिंगमध्ये केक तयार करतात. विद्यार्थी उटणे तयार करून त्याची विक्री करतात.
शाळेतील विद्यार्थी योगासन व कराटे स्पर्धा़मध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळवतात. शाळेचे मैदान भव्य आहे. तेथे विविध खेळांचा सराव घेतला जातो. काही प्रशिक्षक विद्यार्थ्यांना दररोज मोफत मार्गदर्शक करतात. माजी विद्यार्थी आर्थिक साहाय्य करून क्रीडा साहित्य, मैदान निर्मिती (उदा. गोळाफेकीचे मैदान) करतात.
पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम घेतले जातात.
विद्यार्थ्यांसाठी इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे (क्रांतिदिन), श्री. प्रांजल अक्कलकोटकर (लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर सावरकर), श्री. किरण सबनीस (व्यवसाय मार्गदर्शन) अशा व्याख्यात्यांना निमंत्रण देऊन विद्यार्थांना वैचारिक मेजवानी दिली जाते. विद्यार्थ्यांची सामाजिक जडणघडण, सांस्कृतिक जडणघडण व मूल्यसंवर्धन यांसाठी या व्याख्यानांचा उपयोग होतो.
विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उत्तम राखण्यासाठी शाळा विशेष प्रयत्न करते आहे. शाळेमध्ये नेव्ही व एअरफोर्स असे दोन एनसीसी विभाग कार्यरत आहेत. त्यांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होतात. तसेच शाळेमध्ये स्काऊट-गाईडचे गट आहेत. विविध निवासी प्रशिक्षणासाठी या सर्व गटांतील विद्यार्थी जातात.
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती, आठवी शिष्यवृत्ती, मंथन, NMMS, इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा, भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा, संस्थेतर्फे आयोजित करण्यात येत असलेली इयत्ता सातवीची प्री-स्कॉलरशिप परीक्षा अशा विविध स्पर्धापरीक्षांमध्ये विद्यार्थी सहभाग घेऊन यश मिळवत आहेत. या परीक्षांच्या निकालाचा आलेख वाढता दिसून येत आहे.

इयत्ता दहावीनंतर कोणकोणती क्षेत्रे उपलब्ध आहेत, त्यांची माहिती शाळेकडूनच दिली जाते. एनडीए प्रवेशासाठी विशेष मार्गदर्शन करणारे व्याख्याते बोलवून विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते.
चित्रकला, शिल्पकला, कथाकथन अशा स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.
विशेष बाबींचे औचित्य साधून शाळा दरवर्षी एक विशेष उपक्रम घेते. शाळेचे आद्यसंस्थापक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षाचेनिमित्त साधून यावर्षी शाळेने संस्थापक सप्ताह आयोजित केला होता. यामध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला नोंद झालेल्या लोकमान्य टिळकांच्या प्रतिमांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या काळात महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र व शिक्षण तथा वस्त्रोद्योग मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, लोकमान्य टिळकांच्या वंशज मा. डॉ. गीताली टिळक, माजी बालसाहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. न. म. जोशी, साहित्यिका डॉ. संगीता बर्वे, व्याख्याते मोहन शेटे अशा अनेक मान्यवरांनी शाळेस भेट दिली आहे. विद्यार्थ्यांनी संस्थापकांच्या जीवनातून कोणता आदर्श घ्यावा, याबाबत हस्तलिखिते तयार केली आहेत.

अनेक माजी विद्यार्थी, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींच्या माध्यमांतून शाळेसाठी देणगी मिळवली जाते. या देणगीमधून एकल पालक विद्यार्थी व गरजू विद्यार्थी यांना आर्थिक साहाय्य केले जाते.

महाविकास आघाडीकडून महाभ्रष्ट युती सरकारचा ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध.

गुजरातधार्जिणे सरकार हद्दपार करून महाराष्ट्र वाचवणे हेच मविआचे लक्ष्य: नाना पटोले

राज्याची प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या महायुतीच्या हातून महाराष्ट्र वाचवणे गरजेचे: शरद पवार

शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र मोदीशाहांचा होऊ देणार नाही: उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १३ ऑक्टोबर २०२४
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ज्यांनी विरोध केला त्याच विचाराचे लोक आज सत्तेत आहेत. या सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून विटंबना करण्याचे पाप केले, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप माफी मागितली नाही. शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचे पाप शिंदे फडणवीस सरकारने केले आहे. महायुती सरकार हे गुजरात धार्जिणे आहे, या सरकारला सत्तेतून बाहेर काढणे, हेच महाविकास आघाडीचे लक्ष्य आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

वांद्रे पश्चिम येथील हॅाटेल ताज लॅंडस एन्डमध्ये महाविकास आघाडीने राज्यातील महाभ्रष्ट युती सरकारच्या काळ्या कारभाराचा ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, खा. संजय राऊत, खा.अरविंद सावंत, खा.सुप्रिया सुळे, खा.अनिल देसाई, आ.आदित्य ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, माजी मंत्री आमदार बाबा सिददीकी यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला. शाळेतील मुली सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत. राज्यातली जनता सुरक्षित नाही आता तर सत्तेतील लोकही सुरक्षित नाहीत. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे आता महायुतीच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले जाणार नाहीत तर जनताच यांना सत्तेतून खाली खेचेल. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना असंवैधानिक पद्धतीने पदावर बसवले आहे, काँग्रेसने त्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्ष त्यांच्या विचारांच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदावर बसवून लोकशाहीचा खुन करण्याचे काम करत आहे, रश्मी शुक्ला हे त्याचेच एक उदाहरण आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही, पीक विम्यातून शेतकऱ्यांचा फायदा होत नाही. अतिवृष्टीनंतर केंद्राचे पथक आंध्र प्रदेशात गेले पण महाराष्ट्रात आले नाही. महाराष्ट्रात दररोज ७ शेतकरी आत्महत्या होत आहेत. तरुण मुले शिक्षण घेऊन नोकरीची प्रतिक्षा करत आहेत पण ह्या सरकारने सर्व उद्योग व रोजगार गुजरातला पळवले आहेत, आता हे सरकार घालवले पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यावेळी म्हणाले की, महायुती सरकारने मंत्रिमंडळात धडाधड निर्णय घेतले पण त्यातील किती निर्णयांची अंमलबजावणी होईल. महाराष्ट्राच्या प्रशासनाचा देशात लौकिक होता पण महायुती सरकराच्या काळात ही प्रशासकीय व्यवस्था उद्ध्वस्थ झाली आहे, त्याची महाराष्ट्राला मोठी किंमत मोजावी लागत आहे. प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या हातून महाराष्ट्र वाचवावे लागेल आणि त्यासाठी मविआ प्रयत्न करत आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, बाबा सिद्दीकींची हत्या होईपर्यंत यंत्रणा काय करत होत्या? फडणवीसांचे सरकार असताना नाना पटोले यांचा फोन टॅप केला जात होता, विरोधकांवर बारीक लक्ष पण गुन्हेगारांवर लक्ष का नाही? ईडी, सीबीआय फक्त विरोधकांसाठीच आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत जर हत्या होत असेल, महिलांवर अत्याचार होत असतील तर राज्यात कायदा आहे कुठे? अभिषेक घोसाळकर या तरुणाची हत्या झाली त्यावेळी, “गाडीखाली कुत्रे आले तरी विरोधक गृहमंत्र्याचा राजीनामा मागितील”, असे फडणवीस म्हणाले होते, हे जनतेला कुत्रे म्हणतात. महायुतीने महाराष्ट्राला गुजरातची वसाहत बनवले आहे परंतु मविआ मात्र शिव, शाहु, फुले, आंबेडकरांचे राज्य मोदीशाह यांचे होऊ देणार नाही. विधानसभा निवडणुकीत या सरकारला हरवले पाहिजे.

काँग्रेसने बंजारा समाजाला काहीच दिले नाही या आरोपाचा समाचार घेत शरद पवार म्हणाले की, काँग्रेसने बंजारा समाजाला राज्याचे नेतृत्व करण्याची दोनदा संधी दिली. वसंतराव नाईक यांना ११ वर्षे मुख्यमंत्रीपद दिले तर सुधाकर नाईक यांनाही मुख्यमंत्री केले. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे असेही पवार म्हणाले.
हरियाणाच्या निकालावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता राज्यात बदल करण्यासाठी उत्सुक आहे. लोकसभा निवडणुकीवेळीही तसेच चित्र होते. मविआने ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या आणि विधानसभेलाही तसेच परिणाम येतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
मविआच्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर उत्तर देताना मविआच्या नेत्यांनी, मविआत नेतृत्वाच्या प्रश्न नाही व खुर्चीसाठी वादही नाहीत, आमच्यात एकमत आहे. ही निवडणूक मविआ विरुदध महायुती अशी आहे. महायुतीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केल्यानंतर पाहू, असे स्पष्ट केले.

लाडकी बहिण- फुकट कसले पैसे देताय,काम द्या,सक्षम करा लोकांना,फुकटाच्या सवयी लावताहेत :नागडा होणार आहे महाराष्ट्र …. तर महाराष्ट्र बरबाद झाला म्हणून समजा

मुंबई- लाडकी बहिण योजनेवर आज येथे राज ठाकरे यांनी घणाघात करताना म्हटले कि, कोणी मागितले होते पैसे ? महिलांना जर सक्षम बनवायचे असेल तर त्यांच्या हाताला काम द्या ,त्यांना मार्ग दाखवा , फुकट कसले पैसे देताय ?बेरोजगारांना , शेतकऱ्यांना काही ना काही फुकट द्या ,एका पक्षाने दिले कि दुसऱ्यांनाही ते द्यावे लागतात, फुकटाच्या सवयी लावताहेत… पगार द्यायला पैसे राहायचे नाहीत…. नागडा होणार आहे महाराष्ट्र ….

राज ठाकरेंनी जनतेलाही सवाल केला , तुम्हाला चांगला ,सरळ, सभ्य माणसे काआवडत नाही ? नक्की तुम्हाला आवडतंय काय ? देशाच्या प्रगतीचा विचार करा चांगला माणूस हवाय कि नाही ते ठरवा , आज जर तुम्ही योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बरबाद च झाला म्हणून समजा बरबाद

आगामी विधानसभा निवडणुकीत ना युती सोबतच आघाडी सोबत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. आगामी निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेमधील पक्ष असेल, असा दावा देखील राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रातील मतदारांनी महाराष्ट्र निर्माण सेनेवर विश्वास दाखवावा, त्यांना आपण उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू. जगाला हे हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवून दाखवावा, एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. या महाराष्ट्राचे धुरा माझ्या हातामध्ये द्या, अशी विनंती देखील राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. कारण हा केवळ मराठा समाजाचा विषय नाही. तर या देशांमध्ये जेवढी राज्ये आहेत, त्या प्रत्येक राज्यातील विविध समाजाचा हा विषय असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. आरक्षणाची मागणी कोणताच पक्ष पूर्ण करू शकत नाही, असा दावा देखील त्यांनी केला. एका राज्यात एका समाजाला आरक्षण दिले तर सर्वच राज्यातील इतर समाज देखील पेटून उठतील, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र कोणत्याही समाज हाताला काम असल्याशिवाय राहू नये, ही माझी भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, राज ठाकरे स्पष्ट बोलतो, त्यामुळेच मी दिसतो. ते इतरांना नको वाटते, असे देखील त्यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हा विषय पुन्हा निघणार नाही. पुढील वेळेस जेव्हा पुन्हा निवडणुका येतील त्यानंतरच या विषयाचे वारे वाहू लागतील, असा दावा देखील त्यांनी केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्यात आला होता. त्यामुळे मनसे विधानसभा निवडणुकीत देखील युती सोबत जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा सुरू केली होती. त्यातच त्यांनी 200 पेक्षा जास्त विधानसभा निवडणुका लढवण्याची घोषणा देखील केली होती. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आज मुंबईत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुती किंवा महाआघाडीसोबत जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. आता मनसे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्यांची सुद्धा:छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

दबाव आणला तर पोलिस काम कसे करणार?

येवला-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवरुन छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याची देखील आहे, असे भुजबळ म्हणाले. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. अशात छगन भुजबळ यांनीही सरकारला घरचा आहेर दिला आहे. पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे, अशी सूचना देखील भुजबळ यांनी दिली आहे. ते नाशिकच्या येवल्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, बाबा सिद्दिकी यांची हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे. 10-12 हजारांत पोरं हत्या करतात. पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे. मी तुमच्या पाठीमागे उभा राहिल. तुम्ही काय करतात हे मी विचारणार नाही. पण जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांची विल्हेवाट लावा. मात्र ही केवळ गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्यांची देखील जबाबदारी आहे, असे भुजबळ म्हणाले.

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, पोलिस खात्यात योग्यप्रकारचे अधिकाऱ्यांची नेमणूक केली पाहिजे. योग्य अधिकारी कोण आहेत, याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती असते. कुणाला घेतले पाहिजे, कुणाला बाहेर ठेवले पाहिजे, याबाबत त्यांना माहिती असते. त्यांच्यावर आम्ही दबाव आणला, तर पोलिस खाते कसे काम करणार, असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.

बाबा सिद्दिकी यांना अनेक वर्षांपासून ओळखत होतो. त्यांना धमकी मिळाल्यानंतर वाय सुरक्षा देण्यात आली होती. पण फक्त सुरक्षा देऊन काही होत नाही. धमकी कोणी दिली याचा तपास करणे गरजेचे होते. भायखळा येथील तालुका प्रमुखांची देखील निघृ्ण हत्या झाली होती. या हत्या म्हणजे मुंबई पोलिसांसाठी एक चॅलेंज आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

श्रीनगरमधील पुनीत बालन ग्रुप व काश्मिरी पंडित संघर्ष समिती आयोजित रावण दहन कार्यक्रम ठरला आकर्षण

श्रीनगर/ पुणे :
काश्मीर खोऱ्यात विजयादशमी (दसरा) उत्सव मोठ्यात उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. श्रीनगर येथे पुनीत बालन ग्रुप वकाश्मिरी पंडित संघर्ष समिती यांच्या वतीने दसरा मोहत्सव 2024 निमित्त सलग दुसऱ्या वर्षी आयोजित प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम हा या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरला. हजारो काश्मिरी नागरिकांनी रावण दहन कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर स्टेडियम येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. समृद्ध ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा काश्मिर खोऱ्याला लाभला आहे. त्याला चालना देण्यासाठी श्रीनगर येथे पुनीत बालन ग्रुप व काश्मिरी पंडित संघर्ष समिती यांच्या वतीने गत वर्षीपासून ‘दसरा महोत्सव’ सुरू करण्यात आला आहे. वाईटावर चांगल्या प्रवृत्तीचा विजयाचे प्रतिक म्हणून यावर्षी या मोहत्सवात रावण, मेघनाथ आणि कुंभकरण यांच्या प्रतिकात्मक दहन करण्यात आले. काश्मीर खोऱ्यातील हा एकमेव विजय दशमी उत्सव असल्याने हा कार्यक्रम पाहण्यासाठी विविध शासकीय अधिकाऱ्यांबरोबर येथील समाजातील सर्व घटकांतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. रावण दहन कार्यक्रम आता काश्मिरी पंडित आणि मुस्लिम यांच्यातील सामायिक सांस्कृतिक वारशाचे प्रतीक बनले आहे, ज्यामुळे विविधतेतील एकतेच्या कल्पनेला बळकटी मिळाली आहे. या वर्षीच्या उत्सवाने सांप्रदायिक सलोख्याचा संदेश आणखी मजबूत केला. या उत्सवाचे प्रायोजक पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या पुनीत बालन ग्रुपने सलग दुसऱ्या वर्षी हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी मोठे सहकार्य केले. पुनीत बालन यांची जी सामाजिक बांधिलकीमुळेच या भव्य पुतळण्यांची उभारणी आणि सर्व कार्यक्रम शक्य होऊ शकला अशी भावना काश्मिरी पंडित संघर्ष समिती यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. त्याबद्दल त्यांनी पुनीत बालन यांचे आभारही व्यक्त केले.
वाईटावर चांगल्याचा, असत्यावर सत्याचा आणि अन्यायावर नीतिमत्तेच्या विजय म्हणजेच विजयादशमी. काश्मीर खोऱ्यात एकजुटीची भावना आणि सांस्कृतिक वारशाला चालना मिळावी या भावनेतून दसरा मोहत्सव सुरू करण्यात आला आहे. येथील नागरिकांचा या महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. काश्मिरी पंडित संघर्ष समिती आणि सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.
– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.

सिद्दिकी हत्येमागे लॉरेन्स गँगचा हात असल्याचा संशय, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा वाढवली:

बाबा सिद्दिकींवर आज रात्री साडेआठ वाजता मरीन लाइन्स स्टेशनसमोरील बडा कब्रिस्तानमध्ये अंत्यसंस्कार

बाबा सिद्दिकी हत्येच्या प्रकरणात लॉरेन्स गँगचे नाव समोर आल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अतिरिक्त पथक तैनात करण्यात आले आहे. कोणालाही घराबाहेर पडू दिले जात नाही. 14 एप्रिल रोजी सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता.

राष्ट्रवादीचे (अजित गट) नेते आणि महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या मृतदेहाचे मुंबईतील कूपर रुग्णालयात शवविच्छेदन झाले आहे. 5 डॉक्टरांच्या पथकाणे शवविच्छेदन केले आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओग्राफी करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकींवर आज रात्री साडेआठ वाजता मरीन लाइन्स स्टेशनसमोरील बडा कब्रिस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.बाबा सिद्दीकींवर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागे गँगस्टर लॉरेन्स गँगचा हात असल्याचा संशय आहे. गोळीबार करणाऱ्यांनी चौकशीदरम्यान सांगितले की, ते गेल्या 25-30 दिवसांपासून त्या भागात फिरत होते. तिन्ही आरोपी ऑटो रिक्षाने वांद्रे पूर्व येथील शूटिंग स्थळी (जिथे गोळी झाडण्यात आली) पोहोचले होते.

महाराष्ट्र: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या मुंबईतील घराबाहेरील दृश्ये.

बाबा शनिवारी रात्री ९.३० वाजता मुंबईतील वांद्रे येथील खेर वाडी सिग्नलजवळील त्यांचा मुलगा आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयातून बाहेर पडले होते. त्यानंतर एका कारमधून तीन शूटर आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. तिघांनी तोंडाला रुमाल बांधले होते. त्यांनी दोन बंदुकांमधून 6 राऊंड फायर केले.बाबांना तीन गोळ्या लागल्या. दोन गोळ्या त्यांच्या पोटात आणि एक गोळी त्याच्या छातीवर लागली. त्यांच्या कारलाही दोन गोळ्या लागल्या. बाबांसोबत उपस्थित असलेल्या व्यक्तीच्या पायालाही गोळी लागली होती. बाबांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी रात्री 11.27 वाजता त्यांना मृत घोषित केले.

एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्याकडे तपास .-सूत्रांनी सांगितले की, बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी ऑफिसमधून घरी जाण्यासाठी एकत्र निघाले होते, मात्र त्यानंतर झिशानचा फोन आला आणि तो ऑफिसमध्ये गेला. हल्लेखोरांनी मिळून दोघांची हत्या करण्याचा कट रचला होता.
हल्ला झाला त्यावेळी पथदिवे बंद होते. घटनास्थळी सीसीटीव्हीही लावण्यात आले नव्हते. सिद्दीकींची गाडी बुलेटप्रुफ होती, तरीही गोळी काचेत घुसली. हल्लेखोरांकडे ९.९ एमएमचे अत्याधुनिक पिस्तूल होते असे समजते. 15 दिवसांपूर्वी सिद्दिकींना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यांना वाय लेव्हलची सुरक्षाही मिळाली. तरीही त्यांच्यासोबत हवालदार नव्हते.या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक या प्रकरणाचा तपास करत आहेत. सीएम एकनाथ शिंदे म्हणाले की, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी कर्नैल सिंग हा हरियाणाचा रहिवासी आहे. दुसरा आरोपी धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशचा आहे. तिसरा आरोपी फरार आहे.

बाबा सिद्दिकीच्या हत्येने गृहखात्याची लक्तरे वेशीवर

पुणे- महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय , गुन्हेगारी वाढलीय , महिला मुलांवरील अत्याचार वाढलेत या आरोपांना राज्य सरकारमधील गृह खात्याने कायमच हलक्यात घेतले , या खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर गुन्ह्याची उकल होणे महत्वाचे , गुन्हे तर वाढतच राहणार असे बोलत वाढत्या गुन्हेगारीचे एकप्रकारे समर्थनच चालविले . पण आता खुद्द सत्तेतील माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने गृहखात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. जनाची नाही तर मनाची तरी बाळगून सरकार याची जबाबदारी घेणार आहे कि नाही , असा प्रश्नच विचारू नये एवढी निलाजरी स्थिती सध्याच्या राजकारणात दिसते आहे. जेवढी कधीच नव्हती .विजयादशमीच्या दिवशी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे बॉलीवूड आणि भाजपा नेत्यांनी मौन पाळलेय,मात्र विरोधी पक्षातील विविध नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.

राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.

शरद पवार

अतिशय धक्कादायक! मुंबईतील माजी आमदार व मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याला भररस्त्यात गोळी झाडून मारण्यात आले. पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठिण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे पुत्र झीशान यांच्यासोबत आहेत. त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी.

-सुप्रिया सुळे

बाबा सिद्दिकी यांच्यावरील गोळीबार अत्यंत दुर्दैवी आहे. मुंबईतील बांद्रासारख्या ठिकाणी, त्यातही माजी राज्यमंत्र्यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तीवर हा हल्ला होणं यातून राज्याची कायदा व सुव्यवस्थेची कोलमडलेली स्थिती कळते. मागील वर्षभर राज्यातील कायदा व सुव्यवस्था टांगणीला लागलेली आहे. प्रत्येक प्रसंगानंतर सत्ताधारी केवळ वेळ मारून नेत आहेत. पण हा हल्ला अत्यंत गंभीर असून याची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यायलाच हवी. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटूंबियांना या संकट काळात सावरण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

माझे जवळचे मित्र, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे वृत्त अतिशय धक्कादायक व हादरवून टाकणारे आहे. आम्ही विधीमंडळात एकत्र काम केले. मंत्रिमंडळातही आम्ही सोबत होतो. त्यांचे नेतृत्व लोकांशी नाळ जुळलेले व सर्व समाजात सर्वमान्य असे नेतृत्व होते. बाबा सिद्दीकी यांच्या अकाली निधनाने मी एक चांगला, डॅशिंग मित्र गमावला आहे. त्यांच्या अचानक जाण्याचे मला तीव्र दुःख आहे. अतिशय जड मनाने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे सुपुत्र आ. झिशान सिद्दीकी व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, हीच प्रार्थना.

अशोक शंकरराव चव्हाण

महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. एका ‘वाय’ सुरक्षाप्राप्त व्यक्तीची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या होते तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय हा सवाल आहे. कायदा सुव्यवस्थेची स्थिती अतिशय दयनीय झालीय याचा ही घटना पुरावा आहे. हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. या घटनेमुळे सिद्दिकी कुटुंबाला झालेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या कठिण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे पुत्र आमदार @zeeshan_iyc यांच्यासोबत आहेत. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

प्राजक्त प्रसाद तनपुरे

बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात झालेला मृत्यू दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त

विधिमंडळातील सहकारी आणि सर्वसामान्यांचा नेता गमावला
-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. 12 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री बाबत सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागच्या सूत्रधारही शोधण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्यांक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचे निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान आहे. झीशान सिद्दीकी, सिद्दीकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी असल्याचेही असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.