Home Blog Page 645

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज करण्यास ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

पुणे, दि.१४: सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्यावतीने ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत विविध साधने खरेदी करण्यासाठी निधी वितरण करण्यात येत असून या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्यास ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आली आहे.

पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेस, कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा आदी सहाय्यभूत आवश्यक साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी या योजनेअंतर्गत लाभ दिले जातात.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नवीन स्वतंत्र पोर्टल कार्यान्वित होईपर्यंत या योजनेअंतर्गत निधीचे वितरण पात्र लाभार्थ्याच्या वैयक्तिक आधार संलग्न बॅकेच्या बचत खात्यात ऑनलाईन पद्धतीने करण्याऐवजी पात्र लाभार्थ्यांना थेट धनादेशाव्दारे एकवेळ एकरकमी ३ हजार रूपयेच्या मर्यादेत ऑफलाईन पद्धतीने वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

पात्र लाभार्थ्यांनी आपले अर्ज मुदतीत सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयास सादर करावेत, असे आवाहनही समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

मुंबई-मराठी अभिनेते अतुल परचुरेयांचं निधन झालं आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं.तेव्हा त्यांचं वजन झपाट्याने कमी झालं होतं. त्यांची स्थिती कोणालाच पाहवत नव्हती. तरी त्यांनी हिमतीने कॅन्सरवर मात केली आणि ते ठणठणीत बरे झाले. तब्येत सुधारल्यानंतर त्यांनी पुन्हा कामालाही सुरुवात केली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या निधनाची बातमी आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.

कॅन्सरवर मात करुनही गेल्या काही महिन्यांपासून त्यांची तब्येत पुन्हा बिघडली होती. त्यांना काही कॉम्प्लिकेशनला सामोरं जाव लागत होतं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नुकतीच त्यांनी ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकाची घोषणाही केली होती. जोमाने काम सुरु केलं होतं. मात्र तब्येतीने त्यांची साथ दिली नाही. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. एक हरहुन्नरी अभिनेता आपल्यातून हरपला आहे.

नवरात्रीत कात्रजमध्ये दहशत पसरवत खुनी हल्ला करणाऱ्या ६ जणांच्या टोळीला पकडले

पुणे -नागरीकांमध्ये दहशत पसरवून एकाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे ६ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे . १) अमित दिपक चोरघे, वय २७ वर्षे, रा. आंबेगाव खु, पुणे २)अजय किसन रांजणे, वय २६ वर्षे, रा. जैन मंदीराजवळ, आंबेगाव खु, पुणे ३) प्रसाद दत्तात्रय रांजणे, वय २२ वर्षे, रा. दुगड शाळेचे मागे, आंबेगाव खु, पुणे ४) अक्षय किसन सावंत, वय २८ वर्षे, रा. सच्चाईमाता, आंबेगाव खु, पुणे ५) सिध्देश शिवाजी सणस, वय २६ वर्षे, रा. संभाजी राजे मित्र मंडळाजवळ, आंबेगाव खु, पुणे ६) विजय रघुनाथ रांजणे, वय १९ वर्षे, रा. जैन मंदीराजवळ, आंबेगाव खु, पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दि.०८/१०/२०२४ रोजी अय्यप्पा स्वामी मंदिरासमोर, जुनी दुग्गड चाळ, संतोष नगर, कात्रज, पुणे या ठिकाणी फिर्यादी हे त्यांचे मामाचा मुलगा याच्यासह रास दांडीयाचा कार्यक्रम पाहत असताना आरोपी अमीत चोरगे व त्याचे मित्र व त्यांचे सोबतचे इतर तीन ते चार साथीदार यांनी दहशत करण्यासाठी त्यांचे हातातील लोखंडी धारदार हत्यारे हवेत फिरवुन फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे हातातील लोखंडी धारदार हत्याराने फिर्यादी यांचे डोक्यावर, डावे कानावर व पाठीवर सपासप वार करुन गंभीर जखमी केले म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि.न.८३०/२०२४, भारतीय न्याय संहीता कलम १०९,३५२,३५१(२),१८९(२),१८९(४),१९१(२),१९३ (३),१९० आर्म अॅक्ट ४,२५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५, किमीनल लॉ अर्मेन्टमेंन्ट अॅक्ट ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील यांनी गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेबाबत तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या.वरीष्ठांचे सुचनांप्रमाणे तपास पथकातील अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांना आरोपी हे कात्रज घाटामध्ये थांबले असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज घाटामध्ये सापळा रचुन या सहाही आरोपींना ताब्यात घेवुन अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्रीमती नंदीनी वग्याणी, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विदयापीठ पोलीस स्टेशन डी.एस.पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, समीर शेंडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंगलदार मितेश चोरमाले, अवधुत जगदाडे, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, मंगेश पवार, निलेश जमदाडे, सतिश मोरे, नवनाथ भोसले, निलेश खैरगोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांच्या पथकाने केली आहे.

विधानपरिषद दिली असती तर हर्षवर्धन पाटील गेले नसते: आम्हाला एमएलसी किंवा महामंडळं द्यावी जेणे करून सहभाग राहील-रामदास आठवले

लोणावळा – हर्षवर्धन पाटील आमचे चांगले मित्र आहेत. त्यांना विधानपरिषद दिली असती तर ते गेले नसते, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.रामदास आठवले म्हणाले, महायुतीत जागावाटपाचा तिढा हा तारीख पे तारीखमध्ये अडकलाय. अजून ही भाजप, शिंदे आणि अजित पवार गटात वाद-विवाद सुरु असल्याचा गौप्यस्फोट रामदास आठवले यांनी केला आहे. तसेच या तीन प्रमुख पक्षातील नेत्यांचा जागावाटपामधील तिढा लवकर सुटेल आणि आम्हाला योग्य त्या जागा मिळतील, अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.कमी जागा मिळाल्या तरी मी दुसरा काही निर्णय घेणार नाही. आम्ही महायुती बरोबरच राहणार आहोत. राज ठाकरे विरोधात आहेत, प्रकाश आंबेडकर विरोधात आहेत. शिवाय संभाजीराजे आणि बच्चू कडूही विरोधात आहेत. त्यामुळे वेगळा निर्णय घेण्याची आमची भूमिका नाही. आम्हाला एमएलसी किंवा महामंडळं द्यावे. जिल्हा तालुक्यातील कार्यकर्त्यांना सत्तेत सहभाग मिळावा. या गोष्टींचं महायुतीने आम्हाला आश्वासन द्यावे, असे रामदास आठवले यांनी मागणी केली आहे.

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी तसेच महायुती सरकारमध्ये जागा वाटपावरून बरेच खलबते सुरू असल्याचे दिसत आहे. यातच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीमधील जागा वाटपावर भाष्य केले आहे. लोणावळा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात अनेक नेते जात आहेत, यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, आमच्याकडे तिकीट मिळत नसल्याने ते शरद पवारांकडे जात आहेत. त्यांच्याकडे इनकमिंग सुरू आहे असे म्हणता येणार नाही.

मनपा पथविक्रेता समिती निवडणूकचे रविवारी मतदान

फेरीवाल्यांच्या हिताचे, हक्काचे काम करणाऱ्या आपल्या पॅनलला विजयी करा – काशिनाथ नखाते

पिंपरी, पुणे- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून महाराष्ट्र फेरीवाला क्रांती, महासंघ कष्टकरी संघर्ष महासंघ या संघटनाच्या माध्यमातून शहरातील कष्टकरी वर्ग, पथारी, हातगाडी, टपरीधारक यांच्या न्यायहक्काची लढाई आम्ही लढलेली आहे. आमच्या लढाईमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात हॉकर्स झोन निर्माण केले तर ६५ ठिकाणी हॉकर झोन प्रस्तावित असून २०१४ नंतर ५९०० विक्रेत्यांना फेरीवाला प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यापुढेही खूप मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी सर्व पथारी, हातगाडी, टपरीधारकांनी आपल्या संघटनेच्या सर्व उमेदवारांना कपबशी या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पथविक्रेता समिती निवडणूक २०२४ जाहीर झाली असून रविवारी (दि. २० ऑक्टोबर) सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत आपल्या क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असणाऱ्या नियोजित मनपा शाळांमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीत १५ हजार पेक्षा जास्त मतदारांना आठ जागांसाठी मतदान करता येणार आहे. अशी माहिती नखाते यांनी सोमवारी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उमेदवार प्रल्हाद रामभाऊ कांबळे, किरण श्रीधर साडेकर, राजू विलास बिराजदार, संगीता दत्तात्रय शेरखाने, किसन रामा भोसले, सलीम बाबालाल डांगे, अलका सुनील रोकडे आदी उपस्थित होते.
प्रल्हाद कांबळे यांनी सांगितले की, शहरात सर्व भागात नियोजित हॉकर झोन निर्माण करण्यासाठी, फेरीवाला प्रमाणपत्र, ओळखपत्रासाठी, न्याय हक्कासाठी, अतिक्रमण कारवाईस विरोध करण्यासाठी, सुसज्ज भाजी – फळे मंडई साठी आणि मनपा व पोलीस प्रशासनाची दंडुकेशाही रोखण्यासाठी आमच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना कपबशी चिन्हावर शिक्का मारून बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले.
महासंघाने आतापर्यंत केलेल्या कामाविषयी माहिती देताना नखाते यांनी सांगितले की, नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघ, फेरीवाला हॉकर्स महासंघाच्या सुमारे २२ वर्षापासून लढणाऱ्या संघटनांचे अधिकृत उमेदवार हे आहेत. त्यांच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी अनेक वेळा संघर्ष केलेला असून प्रसंगी अनेक वेळा ते तुरुंगामध्ये गेलेले आहेत. वेळोवेळी आम्ही संघर्ष करून अनेक निर्णय प्रशासनाकडे पाठपुरावा करून घेतलेले आहेत. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये पथारी,हातगाडी, टपरी धारकांचे सन २०१२ आणि २०१४ मध्ये संघटनेच्या माध्यमातून पाठपुराव्यातून सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर ५९०० विक्रेत्यांना लायसन वाटपाची प्रक्रिया झाली. आताही आम्ही केलेल्या प्रयत्नातून सर्वेक्षण झालेले आहे. त्यानंतर आता सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये १४०० रू. शुल्क आकारणी सुरू आहे. त्या सर्व विक्रेत्यांना ओळखपत्र व फेरीवाला प्रमाणपत्र मिळणार आहे. आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून निगडी येथे सुसज्ज असे हॉकर्स झोन, खाऊ गल्ली केलेली असून भक्ती शक्तीसह इतर ठिकाणी हॉकर झोनची निर्मिती करण्यात यश आलेले आहे. पुढील कालावधीमध्ये सुसज्ज भाजी मंडई व फेरीवाल्याचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या न्यायासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
यावेळी महासंघाचे पदाधिकारी व तुषार घाटूळे, बालाजी लोखंडे, यासीन शेख, नाना कसबे, संभाजी वाघमारे, मनोज यादव, तुकाराम माने, लाला राठोड, लक्ष्मण शेरखाने, प्रवीण वाघमारे, महबूब मुल्ला, गौतम रोकडे, परमेश्वर बिराजदार, रशीद शेख, नंदा रोकडे, दीपक आरगडे आदी उपस्थित होते.

आंबील ओढ्यात अनधिकृत उत्खनन सव्वा तेरा कोटीच्या दंडावर सुनावणी

पुणे-शहरातील नामांकित बांधकाम व्यवसायिक न्याती बिल्डर यांच्याकडून दांडेकर पूल येथील आंबील ओढा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या ठिकाणी अनधिकृत गौण खनिज उत्खनन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले 13 कोटी 27 लाख 19 हजार 74 रुपये चा दंड आकारला आहे. यावर मंगळवार दि 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता सुनावणी होणार आहे. प्रकरणी स्थानिक कार्यकर्ते प्रदीप भगवान अवघडे आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांनी तक्रार केली आहे.

याबाबतचे सविस्तर हकीकत अशी दांडेकर पूल येथील आंबील ओ ढा झोपडपट्टी स. नं. 135 फायनल प्लॉट 28 येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचे काम सुरू आहे. सदर काम प्रथम हे काम केदार असोसिएट यांच्या वतीने करण्यात येणार होते. मात्र सदर फर्म काळया यादीत गेल्याने पुन्हा ते काम केदार व्हेंचर त्यांना देण्यात आले. यांना स्थलांतरित केल्यानंतर केदार व्हेंचर त्यांनी नामांकित न्याती बिल्डर त्यांच्यासोबत विकासाचा 70 – 30 असा करार केला.
या प्रकल्पात अनेक त्रुटी असून न्याती बिल्डर यांनी झोपडपट्टी वास्त्यांची घरे न बांधता विकण्यासाठीच्या बांधकामाचे सुरू केले तसं त्यांनी जाहिरातही करण्यास सुरुवात केली. दरम्यान न्याती बिल्डर यांनी पाया खोदण्यासाठी 20 मे 2024 रोजी दहा हजार ब्रास खोदकामासाठी जिल्हाधिकारी कडून परवानगी घेतली. त्यासाठी 69 लाख 11 हजार 145 रुपये जमा केले.मात्र त्यापेक्षा प्रमाणात खोदकाम करण्यात आले याबाबत अवघडे यांच्या आमदार धंगेकर यांनी तक्रार केली. त्यानुसार 9 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष जागेवर तपासणी करण्यात आली मध्ये 18 293.463 ब्रास अधिक पवन खणण्याचे उपकरण केल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे न्याती बिल्डर यांना दंड ठरवण्यात आला आहे.

नरेंद्र मोदींनी जाहीर केलेली ‘मेक इन इंडिया’ योजना ठरली ‘फेक इन इंडिया’: जयराम रमेश

मुंबई/दिल्ली, दि. १४ ऑक्टोबर
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी 2014 मध्ये ‘मेक इन इंडिया’ची घोषणा नेहमीसारखे गाजावाजा करून केली होती. नरेंद्र मोदींनी तेव्हा चार उद्दिष्टे ठरवली होती. पण दहा वर्षांत त्याचा पुरता बोजवारा उडला आहे. गेल्या दशकात आर्थिक धोरणनिर्मिती स्थिर, अंदाजे आणि समजूतदार ठरली नाही. भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणामुळे खाजगी गुंतवणुकीच्या वाढीला खीळ बसली आहे. नरेंद्र मोदी यांच्या जवळच्या एक-दोन मोठ्या उद्योगसमूहांना पसंती मिळाल्यामुळे हि स्पर्धा थांबली असून ‘मेक इन इंडिया’ हे केवळ ‘फेक इन इंडिया’ झाले आहे असे माजी केंद्रीय मंत्री व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे चेअरमन जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ची पोलखोल करताना जयराम रमेश यांनी पुराव्यासह या योजनेचे अपयश मांडले आहे. जयराम रमेश म्हणतात, मोदींचा पहिला जुमला, भारतीय उद्योगाचा वृद्धिदर दरवर्षी 12 ते 14% टक्के वाढवणे ठरला कारण वास्तविक चित्र पाहता 2014 पासून उत्पादन क्षेत्राचा वार्षिक वृद्धिदर सुमारे 5.2% इतकाच राहिला आहे. दुसरा जुमला: 2022 पर्यंत 100 दशलक्ष औद्योगिक रोजगार निर्माण करणे परंतु सन 2017 मध्ये उत्पादन क्षेत्रातील कामगारांची संख्या 51.3 दशलक्ष होती ती 2022-23 मध्ये 35.65 दशलक्ष झाली आहे. तिसरा जुमला: उत्पादन क्षेत्राचा हिस्सा 2022 ते नंतर 2025 पर्यंत GDP मध्ये 25% पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले होता परंतु 2011-12 मध्ये भारताच्या एकूण मूल्यवर्धित उत्पादनात (GVA) उत्पादन क्षेत्राचा वाटा 18.1% होता जो 2022-23 मध्ये 14.3% पर्यंत कमी झाला आहे. चौथा जुमला:चीनवर वरचढ होऊन भारताला जगाचा नवीन कारखाना बनवणे आणि उत्पादन क्षेत्रात अग्रणी स्थानावर घेऊन जाणे पण वस्तुस्थिती अशी आहे की, चीन उत्पादित क्षेत्रांवर आपले वर्चस्व निर्माण करण्याऐवजी आपण त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबित झालो आहोत. 2014 मध्ये चीनकडील आयातीचा वाटा 11% होता तर गेल्या काही वर्षांत वाढुन 15% झाला आहे. यामुळे नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जवळपास सर्वच योजना फेल गेल्या असल्याचे स्पष्ट होते, असेही जयराम रमेश म्हणाले.

अभिनेत्री तेजस्विनीला लोनारीला संस्मरणीय गिफ्ट

वाढदिवस म्हटला कीं गाठीभेटी,भेट वस्तू, मोज मज्जा मस्ती सारं काही घडत असते. कधी नव्हे ते अनेकांचे एका मागोमाग फोन येत असतात. त्याहूनही बरेच जण काही संस्मरणीय घडेल अशी गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात.

तेजस्विनी लोणारी च्या बाबतीत अशी आगळीवेगळी गोष्ट घडली आहे. ती तिच्या कायम मनात राहणारी ठरणार आहे.

प्रेक्षकांना, तिच्या चाहत्यांना सुद्धा तिच्या या अनोख्या गिफ्टचं कौतुक वाटणार आहे.

तेजस्विनी लोणारीच्या वाढदिवशी, तिच्या जोस्त्ना नावाच्या फॅन्सने गॅलक्सीमध्ये एक तारा तिच्या नावाने नामांकित केला आहे.

तेजस्विनी अभिनय क्षेत्रात बरोबर त्यांच्या सामाजिक कामा साठी ही ओळखल्या जातात, नुकतेच त्यांनी पालघर येथील कोचाळे आदिवासी पाड्यावर शाळेत शालेय सामुग्री, आणि वृक्षारोपण व वृक्ष लागवड उपक्रमासाठी गावाला भेट दिली होती.

“हा तारा तिच्या प्रभावाचे प्रतीक आहे, जो नेहमी चमकत राहील,” असे फॅनचे म्हणणे आहे.

तेजस्विनीच्या गॅलक्सीमधील ताऱ्यामुळे तिच्या फॅन्सच्या प्रेमाची एक नवीन पायरी उभारली गेली आहे.

हा तारा अमेरिका स्थित star registered नामक एका नामांकित कंपनी मार्फत योग्य कागद पत्राची पडताळणी करून नोंदणीकृत करण्यात आला. या ताऱ्याला तेजस्विनी लोणारी असे नाव देण्यात आले आणि त्याचे प्रमाणपत्र व नोंदणीपत्र देण्यात आले. हा तारा तिचे फॅन्स आकाशात प्रत्यक्ष टेलिस्कोप व मोबाईल वरील Star finder app मध्ये रजिस्टर नंबर टाकून पाहू शकतात.

तेजस्विनीचा वेगळा असा चाहता वर्ग आहे.. या अनोख्या भेटीने तेजस्विनी भारावून गेली आहे.तेजस्विनीने या गिफ्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले, “मी आपल्यास सर्वांचा खूप आभारी आहे. ही अनोखी भेट मला नेहमीच प्रेरणा देईल.”

सौ.गौरी कैलास केंजळे यांना कार्यगौरव पुरस्कार

पुणे :
बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि फल ज्योतिष अभ्यास मंडळ तर्फे देण्यात येणारा ‘कार्यगौरव पुरस्कार’ पुण्यातील गौरी-कैलास ज्योतीष संस्थेच्या संचालक आचार्या सौ.गौरी कैलास केंजळे यांना जाहीर झाला आहे.कै.पंडित श्रीकृष्ण अनंत जकातदार यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या ‘ज्योतिर्विदांचा मेळावा ‘ मध्ये हे पुरस्कार वितरण बुधवार,१६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.ज्योतिष मेळाव्याच्या समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ उद्योजक अशोक चोरडिया ,समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदकुमार कुलकर्णी यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे .
आचार्या सौ.गौरी कैलास केंजळे या ‘केपी बेसिक अँड एडव्हान्स’,मोबाईल न्युमेरॉलॉजी रेमेडिज, मेडिकल न्यूमेरोलोजी, क्रिस्टल या विषयाच्या मार्गदर्शक आहेत.गौरी कैलास ज्योतीष संस्थेच्या संचालक आहेत. ‘मोबाईल न्यूमरोलॉजी’,’सुलभ केपी’,’ क्रिस्टल्सच्या अद्भुत दुनियेत’,’फलादेशाचे तंत्र (उपयुक्त पायऱ्या)’ या ग्रंथाच्या त्या लेखिका आहेत.

‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा-२ मध्ये पुणे महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक पारितोषिक

पुणे-शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनामार्फत सन २०२४-२५ मध्ये राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा-२’ उपक्रमाचा गौरव पुरस्कार प्रदान समारंभ आज सोमवार दिनांक १४ रोजी नरिमन पॉइंट येथील जमशेद भाभा थिएटर येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग आय.ए.कुंदन,शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या उपक्रमात पुणे महापालिकेच्या भारतरत्न पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी विद्यानिकेतन क्र.१६ या शाळेने महानगरपालिका वर्ग अ व वर्ग ब विभागातून विभागपातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त केला असून सदर शाळेला सन्मान चिन्ह, प्रशस्तिपत्र तसेच २१ लाख रुपयेचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.तसेच छ.शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्र.१ या शाळेने विभागपातळीवर तृतीय क्रमांक मिळविला असून शाळेला सन्मान चिन्ह, प्रशस्तिपत्र तसेच ११ लाख रुपयेचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिक्षण विभाग(प्राथ.)पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त आशा राऊत ,प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे, उपप्रशासकीय अधिकारी शुभांगी चव्हाण, प्रकल्प अधिकारी समग्र शिक्षा मनोरमा आवारे, सहायक प्रशासकीय अधिकारी विजय आवारी,पर्यवेक्षिका माधुरी वालकोळी, विनि १६ च्या मुख्याध्यापक सुरेखा कुंभार, वि नि १ च्या मुख्याध्यापक मा.विना नाईक,दोन्ही शाळांतील शिक्षक,सेवक वर्ग उपस्थित होता.

लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनच्या बोधचिन्हाचे लोकार्पण

पुणे : विजयादशमीच्या मुहुर्तावर लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनच्या बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर, प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, सुप्रसिद्ध लेखिका मीना प्रभू आदी उपस्थित होते.

लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनच्या कार्यकरिणीत आभा औटी, मृण्मयी मोहन, सुनील महाजन, किरण केंद्रे, रघुनंदन लेले, मुकुल मारणे यांचा समावेश आहे.

मराठी भाषेचा सर्वांगिण विकास व्हावा आणि सर्व कलांना वाव मिळावा हा करिता पुणे शहरात लोकमान्य कल्चरल फाऊंडेशन सारख्या संस्थांची आवश्यकता होती, असे प्रतिपादन मृणाल कुलकर्णी यांनी केले. कला, साहित्य, नृत्य, संगीत यावर आधारित कार्यक्रम करताना नवीन कलाकृती रसिकांसमोर आणण्यास फाऊंडेशनची नक्कीच मदत होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

मीना प्रभू म्हणाल्या, लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी झाल्याने मला मराठी असल्याचा अभिवान वाटत आहे. जगभरात प्रवास केल्यानंतरही मला मराठी भाषेविषयी अभिमान वाटतो. त्यामुळे या फाऊंडेशनच्या माध्यमातून मला कार्य करण्यास नक्कीच आवडेल.

महाराष्ट्रातील लप्तु होऊ लागलेल्या लोककला आणि साहित्यकृतींना आपण एक चांगला मंच देऊ तसेच संगीत, नृत्य, कला, साहित्य या विषयांवरील कार्यशाळा आणि उपक्रमांचे लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजन करू, अशी ग्वाही फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अद्विता उमराणीकर, आभार प्रदर्शन किरण केंद्रे यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन मुकुल मारणे यांनी केले.

मार्केटयार्ड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी विश्वास दिघे

पुणे-काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या मार्केटयार्ड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या मार्केटयार्ड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी विश्वास दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदार नानाभाऊ पटोले तसेच पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे तसेच पर्वती चे नेते आबा बागुल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष यांच्या प्रयत्नातून मला पुणे शहर काँग्रेस कमिटी पर्वती मतदारसंघ मार्केट यार्ड ब्लॉकच्या अध्यक्षपदी निवड करून माझ्यावरती जो काँग्रेस पक्षाने व आमच्या नेत्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासास पात्र ठरून मी येणाऱ्या काळामध्ये मार्केट यार्ड ब्लॉक मध्ये काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहील माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वांचे आभार – विश्वास दिघे

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याला सोडण्यात यावा – परशुराम वाडेकर

पुणे :- राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. महायुतीमध्ये महत्वाचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने १० ते १२ जागांवर आपला दावा ठोकला आहे, त्यामध्ये पुण्यातील पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. हा मतदारसंघ रिपाइं साठी सोडावा अशी मागणी रिपाइं चे राज्य संघटक परशुराम वाडेकर यांनी केली आहे.

पुढे बोलताना परशुराम वाडेकर म्हणाले, आज केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची मजबूत पकड आहे. आपल्याला सत्ता मिळवायची असेल तर काहीतरी तडजोड करणे आवश्यक आहे, या विचारातून आंबेडकरी चळवळीच्या विचारधारेच्या विरोधी असलेल्या राजकीय पक्षांशी युती करण्याचे धैर्य रामदास आठवले साहेबांनी दाखवले. साहेबांच्या या निर्णयाचा फायदा चळवळीतील नेते, कार्यकर्त्यांना कमी आणि भाजपला अधिक होत असल्याचे या १५ वर्षातील चित्र आहे. यामुळे आंबेडकरी समाजात नाराजीचे वातावरण आहे. आमच्या पक्षाला लोकसभेला संधी नाही मिळाली आता विधानसभा निवडणूकीत किमान १२ जागा मिळाव्यात ही पक्षाची भाजपकडे मागणी आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून यामध्ये आंबेडकरी समाजाची मते निर्णायक आहेत, यामुळे इथे आम्हाला संधी मिळायला हवी. मी आजपर्यंत तीन वेळा विधानसभा निवडणूक लढली आहे. त्यामध्ये कॅन्टोन्मेंट मतदार संघ आहे या तीनही वेळेला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविली आहेत, यामुळे भाजपने आम्हाला संधी द्यावी या वेळेस कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यासाठी वातावरण चांगले आहे. असे सांगत वाडेकर यांनी ते या ठिकाणाहून लढण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले
भाजपने आंबेडकरी चळवळीतून आलेल्या रिपाईच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली द तर आंबेडकरी समाजात महायुतीबद्दल एक सकारात्मक संदेश जाईल. यामुळे महायुतीला पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, असेही वाडेकर यांनी नमूद केले. गेली १५ वर्षे मध्ये भाजपाने महायुतीमधून एकही जागा रिपाईला दिली नाही यामुळे अगोदरच मोठी नाराजगी आहे जर या वेळेस संधी न मिळाल्यास याचा परिणाम निवडणुकीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही यामुळे आम्हाला सन्मानपूर्वक जागा देऊन आंबेडकरी समाजाच्या नाराजगी दूर करावी असे पत्र राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर यांनी प्रसिद्ध दिले आहे

शिवाजीनगर येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली भेट

सर्वसामान्य नागरिकांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचे केले आवाहन

पुणे दि.१४: दर्जेदार मूलभूत आरोग्य सेवा नागरिकांना सत्वर उपलब्ध व्हाव्यात म्हणून शासनाने ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना सुरू केली आहे. जनतेच्या सेवेसाठी असलेल्या दवाखान्याचा सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

रविवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी पुणे येथील छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील चाफेकर नगर येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आभासी तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आले. त्याची प्रत्यक्ष पाहणी आज उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. याप्रसंगी, शिवसेना शहर समन्वयक धनंजय जाधव, शिवसेना झोपडपट्टी सेना शहर प्रमुख राजू विटकर, वॉर्ड अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील, उप अभियंता राजेश खरात, वॉर्ड वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणालिनी कोलते, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी सदर योजना सुरू केली आली आहे. पुणे शहरात वैद्यकीय उपचाराची सेवा गोरगरीब रुग्णांना मोफत मिळावी यासाठी, पुणे शहरात २५ दवाखान्यांची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील चाफेकर नगर येथील दवाखाना सुरू झाल्याने गोरगरिब रुग्णांना या सेवेचा लाभ मिळणार आहे. या दवाखान्यातून मोफत तपासणी, मोफत औषधी, गर्भवती माताची तपासणी, लसीकरण, नेत्र तपासणी, रक्त चाचण्या, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा आदी अनेक महत्वाच्या सेवा नागरिकांना मिळणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

या दवाखान्यासाठी आग्रही राहिलेल्या शिवसेना पुणे शहर समन्वयक धनंजय जाधव यांनी सांगितले की, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निधी उपलब्ध होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळवून दिल्यामुळेच हा दवाखाना प्रत्यक्षात सुरू करता आला आहे.

मुळशीत पावसाच्या धारांमध्ये खेळ रंगला पैठणीचा

मुळशी तालुक्यातील सुनंदा तोंडे ठरल्या फोर व्हिरलच्या विजेत्या

पिरंगुट : हजारो महिल्यांच्या उपस्थितीत शंकरभाऊ मांडेकर युवा मंचच्या वतीनं आयोजित ‘खेळ रंगला पैठणीचा’ हा कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमात काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये मुळशी तालुक्यातील सुनंदा तोंडे या फोर व्हीलरच्या विजेत्या ठरल्या.

पिरंगुट मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिवसेनेच्या (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर उपस्थित होते. पुणे जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर, पंचायत समितीच्या उपसभापती सारिका मांडेकर, उपजिल्हा प्रमुख संतोष मोहोळ, मुळशी तालुका प्रमुख सचिन खैरे, राजगड तालुकाप्रमुख दीपक दामुगडे, भोर तालुका प्रमुख शरद जाधव, हनुमंत कंक, महिला जिल्हा संघटक संगीता पवळे, स्वाती ढमाले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, बहिणींची थट्टा उडवणाऱ्या बदमाश लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. पंधराशे देऊन दहा हजाराचे बॅनर लावून आपल्या गरिबीची थट्टा उडवली जातीये. त्यामुळे शंकर मांडेकर यांच्यासारख्या कर्तृत्ववान भावासोबत आपण राहील पाहिजे.

या कार्यक्रमास भोर, राजगड, मुळशी या तिन्ही तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भर पावसात ही तिन्ही तालुक्याच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या महिलांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचा आनंद लुटला.

चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांनी घेतलेल्या खेळांमधून कार्यक्रमात मोठी रंगत आणली.