Home Blog Page 641

आचारसंहिता सुरु त्याच दिवशी ३२ गावांमधील मिळकतकर वसुलीला स्थगिती…

पुणे- निवडणुकीच्या आचार संहितेचा नामला सुरु झाल्यावर त्याच दिवशी अनेक शासनाचे निर्णय धडाधड धडकत असून याच दिवशी पुणे महापालिकेला सुमारे ४०० कोटीचा फटका बसेल असा निर्णय शासनाने दिला आहे अर्थात आचारसंहिता संपल्यावर महापलिका त्याबाबतचा निर्णय घेण्यास सरसावणार आहेच . आचार संहितेचा अंमल सुरु झाला त्याच दिवशी राज्य शासनाने महापालिकेत २०१७ पासून समाविष्ट झालेल्या नवीन ३२ गावांमधील मिळकतकर आकारणी करण्यास स्थगिती दिली आहे.

त्याचबरोबर या गावांसाठी महापालिकेकडून लावण्यात आलेल्या मिळकतकर आकारणीचे पुनर्विलोकन करावे आणि हा कर ही गावे ग्रामपंचायतीत असताना त्या वेळी झालेल्या करआकारणीच्या दुप्पट दराने आकारणी करावी. असे आदेश दिले आहेत.हा निर्णय होईपर्यंत या समाविष्ट गावांमधून कोणतीही करवसुली करू नये, अशा स्पष्ट सूचना महापालिकेस दिल्या आहेत.

परिणामी महापालिकेस मोठा आर्थिक फटका बसणार असून, कर आकारणीवरून जुनी हद्द आणि नवीन हद्द या नव्या वादाला तोंड फुटणार आहे.शासनाकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावांमधील शास्तीकर वसुलीस स्थगिती दिली होती. या स्थगितीबाबत निर्णय झालेला नसतानाच आता शासनाने सरसकट करवसुलीलाच स्थगिती दिल्याने महापालिकेचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची भीती आहे.

महापालिकेत २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर २०२१ मध्ये आणखी २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर महापालिकेकडून या सर्व गावांंमध्ये महापालिकेनजीकच्या मिळकतीच्या दरानुसार करआकारणी सुरू केली आहे.मात्र, या मिळकतींना महापालिका आकारत असलेला कर ग्रामपंचायतीच्या करापेक्षा कितीतरी पट अधिक असल्याने या गावांमधील नागरिकांनी शासनाकडे मागणी करून मिळकतकर रद्द करण्याची मागणी केली होती.

त्यात उरूळी देवाची आणि फुरसुंगी या दोन्ही गावांचाही समावेश होता. मात्र, शासनाने आता ही दोन गावे वगळून नवीन नगरपरिषद केल्याने आता ३२ गावांमधील करवसुलीस स्थगिती दिली आहे.

महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये एकूण ४ लाख ३७ हजार ३४५ मिळकती आहेत. महापालिकेने केलेल्या कर आकारणीनुसार या मिळकतींंना २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी पालिकेने सुमारे ५९५ कोटी रुपयांची बिले पाठविली आहेत.त्यामुळे या गावांमधून महापालिकेस ६०० कोटींचा महसूल मिळणार होता. मात्र, आता शासनाच्या आदेशानुसार ग्रामंपचायतीच्या नियमानुसार करआकारणी केल्यास पालिकेची मागणी थेट ४०० कोटींनी कमी होऊन २०० कोटींवर येणार आहे. त्यामुळे महापालिकेस ४०० कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे.

मंत्री तानाजी सावंत यांच्या बंगल्यावर काम करणार्‍या सुरक्षा रक्षकाच्या घरी .. रिव्हॉल्व्हरच्या गोळीने १३ वर्षीय मुलगा जबर जखमी

पुणे-

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या धनकवडी येथील बंगल्यावर काम करणार्‍या सुरक्षा रक्षकाच्या घरी एक घटना घडली आहे. रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन ते बॅगेत कपाटात ठेवले होते. मुलाचा धक्का लागून बॅग खाली पडली व गोळी सुटून १३ वर्षाच्या मुलाच्या पायाला लागून तो जबर जखमी झाला आहे.अभय शिर्के (वय १३) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार हेमंत राऊत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन हनुमंत शिर्के (वय ४०, रा. श्री गणेश अपार्टमेंट, वनराई कॉलनी, धनकवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजता शिर्के यांच्या घरात घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन शिर्के हे मंत्री तानाजी सावंत यांच्या धनकवडीतील बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर आहे. त्यांनी आपल्या परवाना धारी रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन कसलीही खबरदारी न घेता रिव्हॉल्व्हर असलेली बॅग कपाटात ठेवली. त्यांचा मुलगा अभय शिर्के याने कपडे घालण्यासाठी कपाट उघडले. त्याने शर्ट घातला. त्यानंतर पँट घालत असताना धक्का लागून कपाटातील रिव्हॉल्व्हर असलेली बॅग खाली पडून त्यातून गोळी सुटली. ती अभय याच्या उजव्या पायाच्या पोटरीला लागून तो जबर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे व अन्य अधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील अधिक तपास करीत आहेत.

धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडेंच्या कारला अपघात:ट्रॅव्हल्सने दिली जोराची धडक

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा बीड जिल्ह्याचे पालकंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारला भीषण अपघात झाला आहे. पुणे- सोलापूर महामार्गावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सोरतापवाडी या ठिकाणी ट्रॅव्हल्सने राजश्री मुंडे यांच्या कारला धडक दिली. या अपघातात राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवास करत होत्या. त्या बीडहून मुंबईकडे जात असताना त्यांची कार सोरतापवाडी या ठिकाणी आल्यानंतर एका खासगी ट्रॅव्हल्स बसने त्यांच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, राजश्री मुंडेंच्या कारच्या समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक खोळंबली होती. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांची वेगाने धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.या अपघातात धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस अपघातस्थ

तात्याराव भिडे यांचा पुतळा उभारणारच:आयुक्तांचे ब्राह्मण महासंघाला आश्वासन

पुणे-अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्ह्याच्या वतीने, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले , आणि अभियंता युवराज देशमुख यांची भेट घेऊन महात्मा फुले स्मारक (पूर्वीचा भिडे वाडा) येथे, तात्याराव भिडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा व त्यांनी केलेल्या त्यागाचा इतिहास फलक स्वरूपात मांडण्यात यावा अशी मागणी करण्यात आली, ही मागणी प्रोजेक्ट च्या प्लॅन मध्ये समाविष्ट करण्यात आली व वर्षभरात तिथे पुतळा उभारण्यात येईल याची खात्री देण्यात आली तसेच या प्रकल्पातील पुतळा पूर्णत्वासाठी आवश्यक वाटल्यास अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या टीम चे सहकार्य घेण्यात येईल.

पुणे महानगरपालिका येथे झालेल्या बैठकीला जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ केतकी कुलकर्णी, ब्रह्मद्योग आघाडी अध्यक्ष अमोघ पाठक, उपाध्यक्ष विकास अभ्यंकर, जिल्हा सरचिटणीस राहुल जोशी, कोथरूड शाखा महिला आघाडी अध्यक्ष सौ जयश्री घाटे उपस्थित होते.तात्याराव भिडे यांनी समाजाचा विरोध झुगारून आपला राहता वाडा (भिडे वाडा पुणे) देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करण्यासाठी महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन दिला होता.ब्राह्मण समाजाचा इतिहास चिरकाल टीकावा, अस्तित्व अबाधित रहावे यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे यशस्वी पाऊलात रूपांतर झाले असे म्हणता येईल.असे मंदार रेडे,केतकी कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

स्पर्धेतून मिळते विद्यार्थ्यांच्या विचारांना प्रेरणा – डॉ. आदित्य अभ्यंकर

पीसीसीसोईआर येथे ‘अल्टिमेट रोबोटिक चॅम्पियनशिप – २४’ चे उद्घाटन

पिंपरी, पुणे (दि. १७ ऑक्टोबर २०२४) – विविध स्पर्धांमधून भाग घेताना विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण विचारांना प्रेरणा मिळते. चाकोरी बाहेरच्या नवकल्पना अशा स्पर्धांमधून प्रकट होतात. त्यासाठी रोबोटिक चॅम्पियनशिप सारख्या राष्ट्रीय स्पर्धा एक उपयुक्त व्यासपीठ आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीसोईआर) येथे अल्टिमेट रोबोटिक चॅम्पियनशिपचे (युआरसी) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि. १६) करण्यात आले. यावेळी पीसीसीसोईआर चे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, ई अँड टीसी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राहुल मापारी, प्रा. दिपाली ढाके, प्रा. रूपाली तावडे आदी उपस्थित होते.
या दोन दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांच्या २२ संघांनी सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांना रोबोटिक क्षेत्रातील माहिती व्हावी, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबद्दल जाणून घेता यावे यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे, असे डॉ. राहुल मापारी यांनी सांगितले.
येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रमा बरोबरच तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे, असे डॉ. हरीश तिवारी म्हणाले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विद्याशाखांचे प्रमुख, देशभरातून आलेले विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. सुत्रसंचलन सुहानी चालमेटी हिने केले. प्रा. रूपाली तावडे यांनी आभार मानले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू चे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

शिक्षणावर ब्रिटिशांचा पगडा – डॉ. आदित्य अभ्यंकर

भारतावर ब्रिटिशांनी अनेक वर्ष राज्य केले. त्याचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रातही दिसून येतो. या शिक्षण पध्दतीत केवळ कारकुन तयार होण्याचे काम होते. रट्टा मारून शिक्षणाची प्रगती होत नाही. मुलांना लहानपणापासून अनेक छोटे छोटे प्रश्न सतावत असतात. परंतु या शिक्षण पद्धतीमुळे त्यांना पडलेले प्रश्न सोडविण्यासाठी बळ मिळत नाही. विचार, संशोधन वृत्तीला खतपाणी घातले पाहिजे. हळूहळू ही परिस्थिती बदलत आहे‌. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती जोपासली जात आहे. त्यासाठी सरकार व अनेक शैक्षणिक संस्था प्रयत्न करत आहे; ही समाधानाची बाब आहे. आयटी क्षेत्रात प्रॉडक्टिव्ह कंपनी भारतामध्ये नाही ती भविष्यात उभी राहिली पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी व्यक्त केली.

“महायुती पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकणार – संदीप खर्डेकर.

महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती.

पुणे–महाराष्ट्र भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी , राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खा. डॉ. मेधा कुलकर्णी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीतील सर्व घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय राखत पुणे महानगर,पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक म्हणून विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकण्याचा मी संकल्प केला आहे असे संदीप खर्डेकर म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांची या महत्वाच्या पदावर नियुक्ती केल्याचे जाहीर केल्यावर संदीप खर्डेकर यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

” मी पंचवीस वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत असून पुणे शहर प्रचार प्रसिद्धी प्रमुख, पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष, शहर उपाध्यक्ष, शहर सरचिटणीस अश्या विविध पदांवर काम केले असून सध्या प्रदेश प्रवक्ता म्हणून जबाबदारी पार पाडत असताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे, बारामती व शिरूर मतदारसंघात महायुतीचा समन्वयक म्हणून काम केले आहे. पक्ष संघटनेत निष्ठेने दिलेली जबाबदारी पार पाडत असल्यामुळे . फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांतदादा यांनी ही महत्वाची जबाबदारी सोपविली असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले.केवळ राजकीय पक्षच नव्हे तर विविध ज्ञाती संस्था, सामाजिक संस्था / संघटना यांच्याशी ही संपर्कात असून ह्या सर्वांना सोबत घेऊन महायुतीच्या प्रचारात त्यांचा सक्रिय सहभाग असेल, असेही खर्डेकर म्हणाले.
मी जिल्ह्यात मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या विद्यमान लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संपर्कात असून महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्यावर प्रत्येक मतदारसंघात महायुतीचे मेळावे, बैठका घेऊन सर्व एकवीस उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन असेही संदीप खर्डेकर म्हणाले. महायुतीतील सर्व सहयोगी पक्षांचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी सज्ज असून राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार स्थापन होईल असा विश्वास ही संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला.

सरन्यायाधीश चंद्रचूड 10 नोव्हेंबरला निवृत्त होणार; उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची शिफारस!

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होणार आहेत. निवृत्तीआधी चंद्रचूड यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे.

सरकारच्या मंजुरीनंतर न्यायमूर्ती खन्ना हे 51 वे सरन्यायाधीश होणार आहेत.

केंद्र सरकारने गेल्या शुक्रवारी सरन्यायाधीशांना पत्र लिहून ‘मेमोरँडम ऑफ प्रोसिजर’नुसार आपली शिफारस पाठवण्यास सांगितले होते. त्यानुसार सरन्यायाधीशांनी कायदा व न्याय मंत्रालयाकडे त्यांचा उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे.

न्यायमूर्ती संजीव खन्ना हे पुढील महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती खन्ना यांचा कार्यकाळ केवळ 6 महिन्यांचा असणार असून 13 मे 2025 रोजी ते निवृत्त होतील.

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा अल्प परिचय –

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा जन्म 14 मे 1960 रोजी झाला. 1983 मध्ये दिल्ली बार काऊन्सीलमध्ये वकील म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली.
2004 मध्ये त्यांची दिल्लीच्या स्थायी सल्लागारपदी (सिव्हील) नियुक्ती करण्यात आली. अतिरिक्त सरकारी वकील आणि अॅमिकस क्युरी म्हणून अनेक फौजदारी खटल्यांमध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहिले आणि युक्तीवादही केला.
2005 मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली आणि 2006 मध्ये ते कायमस्वरुपी न्यायाधीश बनले. 1
8 जानेवारी 2019 रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालायचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती मिळाली. 17 जून 2023 ते 25 डिसेंबर 2023 पर्यंत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्षपदही भूषवले.
सध्या ते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष आणि राष्ट्रीय न्यायिक अकादमी, भोपाळच्या गव्हर्निंग काऊन्सलचे सदस्य म्हणून कार्य करत आहेत.

मंगलदास बांदल यांच्या घरावर पुन्हा ईडीचा छापा: 85 कोटींची मालमत्ता जप्त

पुणे-पुण्यातील एका सराफाला खंडणी मागितल्याच्या प्रकरणात गाजलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, हनुमंत संभाजी खेमधारे, सतीश जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या 85 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे.पीएमएलए कायद्यानुसार या सर्वांच्या पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर येथील स्थावर मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. बांदल यांच्या पुण्यातील महंमदवाडी, शिक्रापूर आणि बुरुंजवाडी (ता.शिरूर) येथील निवासस्थानांवर ईडीच्या पथकाने ऑगस्ट महिन्यात छापे टाकले होते. मंगलदास बांदल यांच्याकडे 5 आलिशान गाड्या आणि 1 कोटी किमतीची चार मनगटी घड्याळेही आढळून आली होती. शिवाजीराव भोसले सहकारी बँक फसवणूक प्रकरणी हि कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

पुणे जिल्ह्याच्या राजकारणात बांदल यांच्या नावाच्या वारंवार चर्चा केल्या जातात. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील बांदल पैलवान म्हणूनही त्यांची ओळख आहे. मंगलदास बांदल हे पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती आहेत, वारंवार पक्षबदलाचे आरोप त्यांच्यावर होत असतो.मंगलदास बांदल हे कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. पुण्यातील एका सराफाला खंडणी मागितल्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं होतं. याशिवाय मंगलदास बांदल यांनी 2009 ला भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. अपक्ष उमेदवार म्हणून ते जिल्हा परिषदेवरही निवडून गेले होते. तर 2019 मध्येही त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

बँक फसवणुकीचे नेमके काय होते प्रकरण?

शिरूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी बनावट खरेदी खताच्या आधारे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून सव्वा कोटींचे कर्ज घेतले आणि त्याची परतफेड न करत एका नागरिकाची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी 26 मे 2021 रोजी अटक केली होती. दत्तात्रय मांढरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर बांदल यांच्यावर कारवाई झाली होती. मंगलदास बांदल यांनी फिर्यादी मांढरे यांच्याशी सुरुवातीला मैत्रीचे संबंध निर्माण केले. मांढरे यांच्या नावावर खोटे खरेदी खत करून बांदल यांनी त्या आधारे शिवाजीराव भोसले बँकेतून आठ लाख रुपये कर्ज घेऊन ते स्वतः वापरले. त्यानंतर पुन्हा सदर मिळकतीवर कर्जाकरिता मांढरे यांचे कुलमुकात्यारपत्र व बोगस पुरवणी दस्त करून शिवाजीराव भोसले बँकेतून सव्वा कोटी रुपये कर्ज घेत तेही स्वतः साठी वापरले. त्याचे कर्ज हप्ते अडीच कोटी रुपयापर्यंत गेले आहे. या प्रकरणी फसवणूक झाली म्हणून मांढरे यांनी फिर्याद दिली होती.

महाविकास आघाडीत 200 जागांवर मतैक्य:शरद पवार म्हणाले – मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर चर्चा करून ठरवू

मुंबई-मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल हे आम्ही निवडणुकीनंतर ठरवू, आता चर्चा करणे योग्य नाही, आमच्यासाठी तो विषय संपला आहे. मविआची पत्रकार परिषद झाली तेव्हाच हा विषय ठरला. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि मी स्वतः होतो. जयंत पाटील यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी आहेच. ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, जागांबाबतचा निर्णय जयंत पाटील घेणार आहेत.दरम्यान शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीत 288 पैकी 200 जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित जागांसाठी आज बैठक होईल. बैठकीला तिन्ही पक्षांचे अध्यक्ष हजर राहतील. निर्णय घेतील आणि आम्हाला सांगतील.

शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत जसा पिपाणीचा फटका बसला तसा फटका यावेळी बसेल का असा प्रश्न केा असता ते म्हणाले की, लोकसभेला जे चित्र होते ते स्पष्ट झालेले नव्हते. आता आम्ही स्पष्ट केले आहे. हरियाणात भाजप सरकार होते ते कायम राहिले. जम्मू काश्मीरमध्ये तसे झाले नाही. पण त्या निवडणुकीचा महाष्ट्रात परिणाम येथे होईल असे वाटत नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाबाबत काही नेते दावा करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रश्न केला असता शरद पवार म्हणाले की मनोज जरांगे यांचा निवडणूक लढण्याचा ‘निर्णय तर होऊ द्या, निर्णय झाल्यावर मग बोलता येईल.

यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देणार -जयंत पाटील

महायुतीच्या पत्रकार परिषदेत महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, असा प्रश्न विचारण्यात आला होता.त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते की आमच्याकडे मुख्यमंत्रिपदाचे कुणालाही डोहाळे लागलेले नाही. आमचे काम हाच आमचा चेहरा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता विरोधी पक्षनेत्यांच्या चेहरा ठरवावा असे म्हटले होते.जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री चेहरा जाहीर करावा असं उध्दव ठाकरे यांचा आग्रह आहे पण याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहे.माझ्यावर मोठी जबाबदारी आहेच. जास्तीत जास्त विधानसभेला जागा निवडून आणायच्या आहेत. त्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहे. बाहेरच्या पक्षातील लोकांना घेण्याचा आमचा उद्देश नाही. आमच्याकडे तरुण चेहरे आहेत, असे म्हणत त्यांनी यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देणार हे स्पष्ट केले आहे.

आचारसंहितेनंतरच्या निर्णयांची नाही होणार अंमलबजावणी: जीआर हटवले अन आयोग कारवाई करणार

आचार संहिता लागू झाल्यावर मतदारांना प्रलोभन दाखविणारे शासन निर्णय धूळफेक

मुंबई-आचारसंहिता लागू झाल्यानंतरही महायुती सरकारने दीडशेहून अधिक शासकीय आदेश (जीआर) जारी केले. त्यावर आयोगाने कारवाईचे आदेश दिले आहेत.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम बुधवारी म्हणाले की मंगळवारी दुपारी ३.३० वाजेनंतर निघालेल्या जीआरची मािहती राज्य निवडणूक अधिकारी कार्यालय माहिती संबंधित विभागाकडून घेईल. ज्या सॉफ्टवेअरद्वारे सर्व जीआर जारी केले जातात त्यावर जारी करण्याची वेळ नमूद केलेली असते. दुपारी ३.३० नंतर किती जीआर जारी करण्यात आले आणि ते कोणते जीआर होते याबाबत आम्ही संबंधित विभागाकडून संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासन आदेश निघाले असतील तर त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

निवडणूक प्रक्रियेमध्ये माध्यम कक्षाची भूमिका महत्त्वाची:जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. १६: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक प्रक्रियेमध्ये माध्यम कक्षाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडताना मतदार संघनिहाय माध्यम कक्ष समन्वय अधिकाऱ्यांनी निरपेक्ष व पारदर्शकपणे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघातील माध्यम कक्ष समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, माहिती अधिकारी सचिन गाढवे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे सहायक प्राध्यापक योगेश बोराटे, सहायक संचालक जयंत कर्पे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, जनमानसामध्ये प्रशासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे काम माध्यम कक्षामार्फत केले जाते. निवडणूक प्रक्रियेत माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती खूप महत्त्वाची असून या समितीमार्फत राजकीय पक्ष, उमेदवार यांना सर्वच माध्यमांद्वारे जाहिरात प्रसारणासाठी पूर्व परवानगी दिली जाते. तालुका स्तरावरील माध्यम कक्षांनी पेड न्यूज, वृत्त वाहिन्यावरील जाहिराती, मतदारांची दिशाभूल करणाऱ्या समाज माध्यमांवरील पोस्टवर बारकाईने लक्ष देणे, निवडणूक प्रक्रियेविषयी चुकीची माहिती पसरवणाऱ्या वृत्तांचे तात्काळ खंडन करणे, राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे व्यक्तिगत चारित्र्य हनन, समाजामध्ये द्वेष, तेढ निर्माण करणाऱ्या अथवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोस्ट, बातम्या, प्रचारावर लक्ष ठेऊन त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हास्तरीय माध्यम कक्षाच्या निदर्शनास आणून देणे तसेच चुकीच्या बातम्यांचे तातडीने निराकरण करावे आणि त्यावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचनाही डॉ. दिवसे यांनी दिल्या.

ते म्हणाले, निवडणूक प्रक्रियेवर भारत निवडणूक आयोगाचे बारकाईने लक्ष असते. निवडणूक प्रक्रिया महत्त्वाचे कार्य असून या प्रक्रियेत वैयक्तिक हितसंबंधाला महत्त्व देता कामा नये. जिल्ह्यात ८७ लाख मतदार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाचे जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. सर्व अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा बारकाईने अभ्यास करुन जागरुकपणे आपापली जबाबदारी पार पाडावी, असेही ते म्हणाले.

जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार माध्यम कक्षाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांच्या प्रचार-प्रसिद्धीच्या खर्चावर जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीमार्फत नियंत्रण ठेवण्यात येते. या समितीमार्फत जाहिरातींच्या प्रसारणासाठी पूर्व प्रमाणिकरण आवश्यक असून राजकीय पक्षांना सर्वच माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी या समितीमार्फत पूर्व परवानगी दिली जाते असे सांगून सर्व विधानसभा मतदार संघ स्तरीय माध्यम कक्षाच्या अधिकाऱ्यांनी पेड न्यूज व समाजमाध्यमांवरुन प्रसारित होणाऱ्या संदेशांबाबत सतर्क रहावे असे आवाहन केले. बैठकीला माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती सदस्य आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विक्रांत मंडपे व दैनिक सकाळचे पत्रकार अनिल सावळे तसेच विधानसभा मतदार संघाचे माध्यम कक्षांचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.
0000

‘एमआयटी एडीटी’ची मानसिक आरोग्यासाठी जनजागृती

विद्यार्थ्यांनी पथनाट्य व रॅलीच्या माध्यमातून दिला समाजाला सकारात्मक संदेश 

पुणे:  एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च व स्कूल ऑफ वेदिक सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘मानसिक आरोग्य सप्ताह’ साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांच्या वतीने संवेदनशीलता –  मानसिक आरोग्याची’ या विषयावर लोणी-काळभोर गावात रॅली काढून व पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.

विद्यापीठातील ‘मॅनेट’ या इमारतीपासून या रॅलीला विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा. डाॅ.अनंत चक्रदेव व डाॅ.मोहित दुबे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी, स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चच्या प्रभारी प्राचार्या डॉ. प्रिया सिंग आणि स्कूल ऑफ वेदिक सायन्सेसच्या प्रभारी प्राचार्या  डॉ. माधवी गोडबोले यांच्यासह दोन्ही स्कुलचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शेकडो विद्यार्थी देखील उपस्थित होते. 

ही रॅली लोणी-काळभोर गावात पोचल्यानंतर प्रा. पुष्पा आटोळे आणि डॉ. शशिकला यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्यावर आधारित, ‘पिंजरे से मुक्ती’  हे अतिशय सुंदर पथनाट्य सादर केले. रॅलीच्या सांगते साठी लोणी-काळभोर गावच्या सरपंच सौ. सविताताई लांडगे यांनीही हजेरी लावून पथनाट्याचे तोंडभरून कौतुक करताना विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. या रॅलीच्या व मानसिक आरोग्य सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. नीता म्हवान यांनी कष्ट घेतले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक डाॅ.सुनिता कराड, प्र. कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

उत्तराखंड-पिथौरागढ़
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे उत्तराखंडमधील मुनसियारी येथील रालम येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. याचे कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर मिलमच्या दिशेने जात होते. त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी विजयकुमार जोगदंडे हेही आहेत.

CEC नी मिलम ते नंदा देवी बेस कॅम्पला ट्रेकिंगसाठी जाण्याचा बेत आखला होता, पण दरम्यान दुपारी 1 वाजता हवामान बिघडले. पायलटला धोका लक्षात येताच त्याने शहाणपण दाखवत जवळच्या शेतात हेलिकॉप्टरचे सुरक्षित लँडिंग केले.

अधिकाऱ्यांनी सांगितले कि , ते सुरक्षित आहेत. उतरल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या इतर अधिकाऱ्यांना जवळच्या अतिथीगृहात नेण्यात आले.राजीव कुमार हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 15 मे 2022 रोजी त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त बनवण्यात आले. राजीव कुमार हे देशाचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. ते 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत हे पद सांभाळतील.

15 लाख देणार होते, 1500 दिले अन 1080 एकर जमीन अदानीला दिली -आदित्य ठाकरेंची टीका

मुंबई–भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य नागरिकांना 15 लाख रुपये देणार होते. मात्र आता ते पंधराशे रुपये देत आहेत आणि दुसरीकडे 1080 एकर भूखंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अदानी यांच्या घशात टाकला अ सर्वसामान्य व्यक्तीच्या खिशात मात्र पन्नास रुपये, शंभर रुपये टाकले जात आहेत असा आरोप करत शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेले रिपोर्ट कार्ड पाहता त्यांच्या रिपोर्टकडचे नाव महाराष्ट्र आता डिपोर्ट कार्ड करणार असल्याचे येथे सांगितले . ठाकरे म्हणाले, त्याचे कारण अनेक गोष्टी त्यांनी महाराष्ट्रातून डिपोर्ट केल्या आहेत . महायुतीची पत्रकार परिषद होतात आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीवर हे आरोप केले आहेत.

अदानी समूहाच्या फायद्याचे सर्व जीआर प्रकाशित होत नाही, तोपर्यंत आचारसंहिता लागू होत नाही, असे मी आधी देखील सांगितले होते. आचारसंहिता लागण्याआधीच मुंबई आणि राज्यातील मोठे भूखंड अदानी समूहाला देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर मधील मंत्रिमंडळाच्या बैठका पाहिल्या तर त्यांच्या प्रत्येक बैठकीत जनतेला काहीतरी देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र या सर्व बैठकांमध्ये अदानी समूहासाठी काही निर्णय घेण्यात आले होते, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

मुंबईतील टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तो अत्यंत कमी टोल असल्यामुळे लोकांना काहीतरी आपल्या हातात मिळत असल्याचे वाटते. मात्र यासोबतच अनेक भयानक गोष्टी महायुती सरकारने केल्या असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मतदानाच्या दिवशी महाराष्ट्राने या सर्वांवर विचार करणे आवश्यक असल्याचे आदित्य यांनी म्हटले आहे. धारावी पुनर्विकास योजनेबद्दल आमचे सर्व मित्र पक्ष सतत आरोप करत आहोत. त्यासाठी अनेक मोर्चे, सभा, चौक सभा, बैठका आम्ही घेतल्या आहेत. मीडियाच्या माध्यमातून देखील या योजनेबद्दलच्या अनेक भयानक गोष्टी समोर येत आहेत. मात्र मंत्रिमंडळ बैठकीत पन्नास रुपयांची सूट सर्वसामान्य जनतेला दिली जाते तर 50 कोटी रुपयांचा फायदा अदानी समूहाला दिला जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

अदानी समूहाला सरकारने दिलेली जमीन

कुर्ला मधील 21 एकर जमीन
मुलुंड भांडुप आणि कांजूरमार्ग एकत्र केल्यास 255
मढ मध्ये 140
देवनार मध्ये 124 एकर
जमीन अदानी यांच्या समूहाला दिला असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

या सर्वांचा हिशोब केला तर 1080 एकर भूखंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अदानी यांच्या घशात टाकला असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या खिशात मात्र पन्नास रुपये, शंभर रुपये टाकले जात आहेत. तर दुसरीकडे आदानींना हजारो हेक्टर जमीन मोफत दिली जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुंबईकरांना विकत घेता येत नाही, त्यामुळे जोर जबरदस्ती करून, दादागिरी करून अदानी समूहाला भूखंड दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तर अरबी समुद्राचं नाव देखील अदानी समूह करून टाकतील असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

राज्य सरकारच्या वतीने टोल माफीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावरचा निर्णय का घेण्यात आला? असा प्रति प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या पक्षात होते त्यावेळी त्यांनी केलेले वक्तव्य पहा आणि आता दुसऱ्या पक्षात गेल्यावर त्यांनी केलेले वक्तव्य पहा. यावरूनच किती पात्री नाटक तयार होऊ शकते, त्याचा अंदाज पत्रकारांनी लावावा, असे आवाहन देखील आदित्य ठाकरे यांनी केले आहे. या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारच्या टोल माफीच्या निर्णयावर देखील टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नाही तर ‘रेट कार्ड’वर बोलावे: नाना पटोले

काँग्रेसच्या काळातच महाराष्ट्र आघाडीवर; गुजरातच्या हस्तकांनी मात्र दोन वर्षातच राज्याची वाट लावली

भाजपा युती सरकारमुळे फक्त ‘लाडका उद्योगपती’ व ‘लाडके कंत्राटदार’च मालामाल; शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे मात्र प्रचंड हाल.

महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही, महाभ्रष्ट युतीला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही.

मुंबई, दि. १६ ऑक्टोबर २०२४
कटकारस्थान, बेईमानी व असंवैधानिक मार्गाने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व दावे खोटे व बनावटी आहेत. मागील दोन वर्षात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत पिछाडीवर गेला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर नंबर एक होता पण फडणवीसांच्या काळात व शिंदे सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली हे उघड सत्य आहे. आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राची गुजरातच्या हस्तकांनी मागील दोन वर्षात मात्र पुरती वाट लावली आहे, असा घणाघाती हल्लाबोल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
भाजपा युती सरकारने केलेल्या दाव्यांची पोलखोल करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, या सरकारने दोन वर्षात मोदी-शाह यांच्या आदेशाने महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे, महाराष्ट्र हे मोदी शाह यांच्यासाठी फक्त एटीएम आहे. राज्यात प्रस्तावित असलेले मोठे प्रकल्प गुजरात व राज्यात पळवून नेले त्यावेळी शिंदे, फडणवीस व अजित पवार मूग मिळून गप्प बसले होते. फडणवीस यांनी तर गुजरातमध्ये गुंतवणूक होते त्याचे समर्थन केले होते. राज्यातील उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात गेल्याने महाराष्ट्रात बेरोजगारांची फौज बनली आहे. उद्योगधंदे गुजरातला व गुजरातचे ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरुण पिढी बरबाद करण्याचे पाप या सरकारने केले आहे. मुंबईतील महत्वाच्या जमिनी लाडक्या उद्योगपतीच्या घशात घातल्या व टेंडर मागून टेंडर काढून कंत्राटदारांचे भले केले व त्यातून मलई खाण्याचे काम दोन वर्ष बिनबोभाटपणे सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिपोर्टकार्ड वर बोलणे हास्यास्पद आहे, त्यांनी रेटकार्ड वर बोलले पाहिजे असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. २०१९ ला महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोरोना महामारीचा सामना करावा लागला, त्या संकटातही महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाची दखल देशानेच नाही तर जगाने घेतली. गुजरात, उत्तर प्रदेशात या भाजपा शासित राज्यात मृतदेहांचे ढिग लागले होते, त्यामुळे युती सरकारने पाठ थोपटून घेऊ नये. त्यांची कामगिरी व ओळख फक्त ‘गद्दारी’ व ‘खोके सरकार’ एवढीच आहे.
दोन वर्षात महाराष्ट्रात जाती धर्मात तेढ निर्माण करून राज्यात अशांतता पसरवण्याचे काम केले. आरक्षणाच्या नावावर जाती जातीत भांडणे लावली, कायदा सुव्यवस्था अत्यंत खालावली असून जंगलराज झाले आहे. महिला सुरक्षित नाहीत, शाळेत मुली सुरक्षित नाही व सत्ताधारी पक्षाचे नेतेही सुरक्षित नाहीत ही या सरकारची कामगिरी आहे. महागाई व बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सरकारी भरती निघत नाही निघाली तर प्रत्येक परिक्षेचे पेपर फुटतात, तरुणांची वयोमर्यादा उलटून गेली आहे एका पिढीचे भविष्य बरबाद करण्याचे काम युती सरकारने केले. शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम या सरकारने केले असून राज्यावर ९ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा केला, हे या सरकारचे काम आहे असा टोलाही पटोले यांनी लगावला. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही, महाभ्रष्ट युतीला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.