पुणे, दि. १९: खडकवासला विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारसंघात नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे आयोजित करण्यात आले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, मतदारसंघाच्या प्रशिक्षण कक्षप्रमुख तुषार राणे, संजय भोर आदी उपस्थित होते.
डॉ. माने यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदार यादी अद्ययावत करण्याच्यादृष्टीने अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मतदान केंद्रावर करण्यात येणाऱ्या किमान सुविधांनुसार कार्यवाही करावी, मतदार ओळख चिठ्ठीचे वेळेत वितरण करावे, अशा सूचना डॉ. माने यांनी केल्या.
प्रशिक्षक श्री. राणे आणि श्री. भोर यांनी मतदानाच्या दिवशी करावयाचे नियोजन, संपर्क आराखडा, स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती, मतदार चिठ्ठीचे वितरण, आदर्श आचार संहितेचे पालन, मतदार यादी अद्ययावतीकरण आदीबाबत माहिती दिली. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या भूमिका, निवडणुकीच्या दरम्यान येणाऱ्या आव्हानांविषयी माहिती दिली. 0000
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे विचार- एमआयटी डब्ल्यूपीयूचा ६ वा दीक्षांत समारंभ, ५४७८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
पुणे, १९ ऑक्टोबर :” सतत नवे ज्ञान आत्मसात करणे, आव्हानांचा सामना करणे, कठिण परिश्रम आणि सतत पुढे जाण्याची जिद्द हेच गुण विद्यार्थी जीवनाचा माईल स्टोन असेल. कॉर्पोरेट जगात पाऊल ठेवताना स्वतःला सिद्ध करा आणि आपल्या गुणांच्या आधारे कुटुंब व संस्थेची प्रतिष्ठा वाढविण्याचे कार्य करावे.” असे विचार केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा ६ वा दीक्षांत समारंभ शनिवारी विश्व सभामंडप, विश्वराजबाग, लोणी-काळभोर, पुणे येथे पार पडला. यावेळी विद्यापीठाच्या ५४७८ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विज्ञान क्षेत्रात आयुष्यभर केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल प्रसिद्ध शास्त्रज्ञ भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार पद्मश्री डॉ. कृष्णस्वामी विजय राघवन यांना “एमआयटी डब्ल्यूपीयू विज्ञान महर्षी सन्मान ” देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, सरस्वतीची मुर्ती व ५ लक्ष रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सल्लागार प्रा. रामचरण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरु डॉ. आर. एम. चिटणीस, सीईओ डॉ. संजय कामतेकर, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. राहुल जोशी, तसेच विद्यापीठाचे अधिष्ठाता व संचालक हे सर्व उपस्थित होते. या प्रसंगी विद्यार्थी अभिजीत पवार याला ‘फाउंडर प्रेसिडेंट मेडल’ व विद्यार्थिनी अनुश्री कुलकर्णी हिला ‘एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट मेडल’ ने गौरविण्यात आले. तसेच १२२ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, ८५ रौप्य व ८५ कास्य पदक असे एकूण २९५ विद्यार्थ्यांना मेडल बहाल करण्यात आले. तसेच २६ विद्यार्थ्यांना पी.एचडी देण्यात आली. यामध्ये ४३५ विद्यार्थी मेरीट लिस्ट मधील आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, कम्प्यूटर सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग, रामचरण स्कूल ऑफ लिडरशीप बिझनेस, ईकॉनॉमिक्स अॅण्ड कॉमर्स, स्कूल ऑफ गर्व्हनमेंट, हेल्थ सायन्य अँड टेक्नॉलॉजी, सायन्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज, डिझाइन, लिबरल ऑर्टस, लॉ आणि कॉन्शसनेस या व्यतिरिक्त अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले,” तंत्रज्ञानाच्या काळात ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. हजारो वर्षाचे ज्ञान गेल्या १०० वर्षात कित्येक पटीने वाढले आहे. तसेच गेल्या १० वर्षात नवे प्रयोग व नवे ज्ञान समोर येत आहे. अशावेळेस विद्यार्थ्यांनी सतत शिकत रहावे आणि ज्ञान आत्मसात करावे. आज माहिती तंत्रज्ञानामुळे आपल्या बोटांमध्ये संपूर्ण जगाचे ज्ञान आले आहे. वर्तमान काळात मानव जीवनाला समृध्द करण्यासाठी सर्व समस्यां सोडविण्यावर भर दिला जावा.” 21 व्या शतकाला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी कृतीशील शिक्षणाकडे वळताना संकल्पनात्मक शिक्षणाची कास धरली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्यामधील सुप्त कौशल्य गुणांचा शोध घेवून त्यांचा विकास करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. असेही केंद्रीय मंत्री शेखावत यांनी सांगितले. डॉ. कृष्णस्वामी विजय राघवन म्हणाले,” गेल्या १५ वर्षात सृष्टीवर पर्यावरण, वातावरण बरोबर आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशा वेळेस विद्यार्थ्यांनी वर्गापेक्षा बाहेरच्या जगाला समजून घेणे गरजेचे आहे. समाजातील सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपली दिशा निश्चित करावी.” प्रा. रामचरण म्हणाले,” विद्यार्थ्यांना यशासाठी संपूर्ण आकाश उघडे आहे. देशाची आर्थिक स्थिती उत्तम असतांना आपण डिग्री घेतली आहे. त्यामुळे हा आपल्यासाठी गोल्डन इरा आहे. या काळात देशाची जीडीपी वृद्धी होत आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पना या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पदोपदी ज्ञान उपलब्ध आहे त्याचा लाभ घ्यावा. वाढते सोशल नेटवर्क आणि सर्वात महत्वाचे विद्यार्थ्यांना आपले ध्येय लक्ष निर्धारित करून यश मिळविता येते.” प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञान ही तत्व जीवनात शांती निर्माण करतात. आज संपूर्ण भारताला भगवान गौतम बुद्ध आणि म. गांधी यांच्या नावाने ओळखले जाते. विद्यार्थ्यांनी शिस्त आणि वचन बद्धतेचे पालन करावे. तसेच धर्म आणि स्वतःच्या कर्तव्याला ओळखावे. भविष्यात सुख-समाधान आणि शांतीचा मार्ग दाखविण्याचे दायित्व भारताचे आहे.” राहुल कराड म्हणाले,” आम्ही समाजाचा एक महत्वपूर्ण भाग आहोत. अशा वेळेस येथील संविधान हे अत्यंत महत्वपूर्ण असल्यामुळे समाजातील सर्व समस्यांचे समाधान करणे विद्यार्थी व आमची जवाबदारी आहे. हे विद्यापीठ जागतिक स्तरावरील ज्ञानाबरोबरच आध्यात्मिक ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. परिवर्तनीय भारतासाठी विद्यार्थ्यांची महत्वाची भूमिका असेल.” ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला. कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रस्ताविक व स्वागतपर भाषण केले. प्रा. डॉ. शालिनी टोंपे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राहुल जोशी यांनी आभार मानले.
मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील विशिष्ट समुदायाच्या मतांचे एकत्रीकरण करण्यासाठी राज्यात धार्मिक तेढ वाढवून राजकीय फायदा मिळविण्याचे षडयंत्र सुरू असून यास कोणत्या नेत्यांची फूस आहे याची चौकशी करावी अशी मागणी प्रदेश भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीस मतदान करणारा मुस्लिम नव्हेच, अशा शब्दांत महायुतीच्या विरोधात धार्मिक विखार पेरणाऱ्या एका धर्मगुरुचा व्हिडियो समाजमाध्यमांवरून सर्वत्र फैलावला असताना, वोट जिहाद या विखाराचा आणखी कोणता नवा पुरावा निवडणूक आयोगास हवा, असा सवालही उपाध्ये यांनी केला.
वोट जिहाद हा काल्पनिक प्रकार नसून विशिष्ट धार्मिक समुदायास महायुतीच्या विरोधात मतदान करण्याकरिता धार्मिक बाबींना पुढे करून धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचे लोकसभा निवडणुकीतच समोर आले होते. अशा वोट जिहादी संकल्पनेमुळे महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी किमान 14 मतदारसंघांत वोट जिहादचा प्रभाव दिसून आल्याने, या समुदायाच्या मतदारांनी हिंदुत्ववादी विचाराच्या उमेदवारांच्या विरोधात जाणीवपूर्वक मतदान केले, हा वोट जिहादचाच प्रकार होता. अशा प्रकारास फूस लावण्यासाठी महायुतीच्या विरोधातील काही राजकीय नेत्यांनी विशिष्ट समुदायांच्या नेत्यांशी हातमिळवणी केली असून त्या समुदायाच्या धार्मिक हितरक्षणाची आश्वासने देऊन त्यांना युतीविरोधी मतदानास भाग पाडले, असा आरोपही त्यांनी केला. अगदी अलीकडे, मुस्लिम समुदायाच्या एका नेत्याने मुस्लिमांना महायुतीच्या विरोधात मतदान करण्याचे जाहीर आदेश दिल्याची ध्वनिचित्रफीतच समोर आल्याने वोट जिहादचे राजकीय षडयंत्र स्पष्ट झाले असून, मुस्लिमांनी महायुतीस मतदान करू नये असे स्पष्ट आदेश या नेत्याने दिल्याचे या चित्रफितीमध्ये दिसते, असे सांगून उपाध्ये यांनी ती ध्वनिफीतच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना ऐकविली. लोकसभा निवडणुकांच्या आसपास मुस्लिम मतांचे एकगठ्ठा एकत्रिकरण करण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे तसेच शरद पवार गटाचे नेते सक्रिय झाल्याची शंका व्यक्त होत होती, उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी तर मुस्लिम समुदायाच्या नेंत्यांचा पाहुणचार करून, देशातील सीएए कायदा अंमलात येणार नाही यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिल्याचा आरोपही उपाध्ये यांनी केला. संपूर्ण देश ज्या कायद्यासाठी आग्रही आहे, तो कायदा लागू करू नये या मुस्लिम समुदायातील काही नेत्यांच्या मागणीस पाठिंबा देणारे ठाकरे आता वोट जिहादला प्रोत्साहन देत आहेत का, असा सवालही श्री. उपाध्ये यांनी केला. याच समुदायाच्या नेत्यांनी उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशी त्यांना शाल पांघरली आणि तलवार भेट दिली होती, याकडेही उपाध्ये यांनी लक्ष वेधले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांस हरताळ फासून मुस्लिम लांगूलचालन करणाऱ्या उद्धव व आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेमुळे वोट जिहादचा प्रकार महाराष्ट्रात फोफावेल अशी भीती उपाध्ये यांनी व्यक्त केली. त्यांची फूस असल्यामुळेच मुस्लिमांना महायुतीच्या विरोधात मतदान करण्याचे जाहीर आवाहन करण्याचे प्रकार धार्मिक नेत्यांकडून सुरू असल्याचा आरोपही उपाध्ये यांनी केला.
पुणे-सामाजिक कार्यकर्त्या रुमाना अली यांची पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.भाजपचे अल्पसंख्यक आघाडी प्रमुख इम्तियाज मोमीन यांच्या हस्ते त्यांचे शनिवार, 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी कोंढवा येथे झालेल्या कार्यक्रमात पक्षात स्वागत करण्यात आले.
सुफी पीर खाजा इकबाल,मौलाना ईद्रीस कारी,सतपाल पारगे,इकबाल चिष्टी, इसाक पानसरे , तौफिक शेख, नितीन बोके, नुरजहा शेख, समीर पठाण उपस्थित होते. सिटी लॉन, पारगे नगर येथे हा कार्यक्रम शनिवार, 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी झाला.
नागरिक अधिकार मंच च्या वतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला.सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भाजपचे ध्येय धोरणाना अनुसरून आगामी काळात कार्यरत राहणार असल्याचे रुमाना अली यांनी सांगितले.भाजपा सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांना घेऊन सामाजिक प्रगती करीत आहे. भाजपावर सर्वांचा विश्वास वाढत आहे.असे मनोगत इम्तियाज मोमीन यांनी व्यक्त केले.
पुणे : भजन, जोगवा, गोंधळ, भारूड अशा भक्तीसंगीताच्या विविध प्रकारांचे अभिनव पद्धतीने सादरीकरण करीत ‘भूपाळी ते भैरवी’ या कार्यक्रमाने भजनाचार्य वै. मनोहरपंत तथा दादा सबनीस यांच्या आठवणींना सांगीतिक कार्यक्रमाद्वारे उजाळा देण्यात आल्या.
भजनाचार्य वै. मनोहरपंत तथा दादा सबनीस जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आयोजित दोन दिवसीय कार्यक्रमाला आज (दि. 19) सुरुवात झाली. सदाशिव पेठेतील म. ए. सोसायटीचे भावे प्राथमिक शाळा सभागृह (रेणुका स्वरूप प्रशाला आवार) येथे ‘भूपाळी ते भैरवी’ हा कार्यक्रम राष्ट्रसेविका समिती नागपूर संचलित राणी लक्ष्मीबाई भजन मंडळाने सादर केला. भजन, जोगवा, गोंधळ, भारूड अशा भक्तीसंगीताच्या प्रकारांचे अभिनव सादरीकरण या वेळी करण्यात आले. राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाह चित्राताई जोशी, संत वाङ्मयाचे अभ्यासक व आळंदी संस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त विद्यावाचस्पती ह. भ. प. डॉ. अजित कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जन्मशताब्दी वर्षाची सांगता रविवारी (दि. 20) सायंकाळी 5 वाजता नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर संस्थान येथे ‘अष्टपदी भजन’ या कार्यक्रमाने होणार आहे.
सुरुवातीस मिलिंद सबनीस यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली.
दादा सबनीस यांच्या आठवणींना उजाळा देताना चित्राताई जोशी म्हणाल्या, राष्ट्रसेविका समिती आणि दादा सबनीस मास्तर यांचा अनेक वर्षांचा स्नेह होता. नागपुरमधील मावशी केळकर यांनी दादांचे भजन ऐकल्यानंतर त्यांनी नागपुरात येऊन भगिनींना भजन शिकवावे असा आग्रह केला. त्यानंतर दादा अनेक वर्षे भजन शिकवित असत. दादांची राहणी अतिशय साधी होती, ते अत्यंत मनमिळावू होते. ते भजन शिकविताना भजनाचा अर्थही समजावून सांगत असत. त्यामुळे भजन म्हणताना भावनिर्मिती होत असे. दादांनी भगिनींना समाज ऋणाची जाण ठेवण्याचे संस्कारही दिले.
विद्यावाचस्पती डॉ. अजित कुलकर्णी म्हणाले, सबनीस कुटुबियांशी असलेल्या स्नेहातून मला भजनाची गोडी लागली. ते म्हणाले, भजनातून जीवनातील आनंद मिळण्यासाठी भगवंताशी तादात्म्यता आणि परम व्याकुळता असावी लागते जी सबनीस कुटुंबियात रुजलेली आहे. प्रत्येकाने भागवत भजनाचा धागा जीवनात धरून ठेवला तर जीवन सुसह्य होईल.
‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा गजर करत ‘भूपाळी ते भैरवी’ या कार्यक्रमाची सुरुवात झाली. गणेश वंदनेनंतर ‘उठा सद्गुरू झाली पहाट’, ‘वासुदेव आला हो वासुदेव आला’, ‘गळा तुळशीची माळ’, ‘रंगा येई वो’, ‘प्रभो मला कर तुझ्या खडावा’, ‘श्रीरामचंद्र कृपाळू भज मन’, ‘नवरात्र अंबा मातेचे’, ‘गजानना गजानना’ अशा विविध रचना या वेळी सादर करण्यात आल्या. उत्तरा नवरे (संवादिनी), योगेश देशपांडे (तबला) यांनी साथसंगत केली तर निवेदन मोहिनी खोत यांनी केले.
नवी दिल्ली-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागल्याचे वृ्त्त जोरकसपणे फेटाळून लावले. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागण्याचा प्रश्नच येत नाही. कारण, आम्ही नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले आहेत, असे ते म्हणालेत. महायुतीच्या जागावाटपात आता केवळ 30- 35 जागांवर तिढा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी महायुतीच्या जागावाटपाच्या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या संवादाची माहिती दिली. ते म्हणाले, महायुतीच्या जागावाटपावर अमित शहा यांच्याशी चर्चा झाली. ही चर्चा अतिशय सकारात्मक झाली. आमची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पुढील 1-2 दिवसांत यासंबंधीचा निर्णय होऊन तशी घोषणा होण्याची शक्यता आहे. पत्रकारांनी यावेळी त्यांना महायुतीच्या जागावाटपाचा तिढा यापुढे दिल्लीत सुटेल की मुंबईत? असा प्रश्न केला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता महायुतीत कोणताही तिढा राहिला नसल्याचे जोर देऊन सांगितले. ते म्हणाले, महायुतीत आता तिढा एवढा जास्त राहिला नाही. काही गरज भासली तर अमित शहांशी चर्चा होईल आणि तो तिढा सोडवला जाईल. आता हार्डली 30 ते 35 जागांवर तिढा राहिला आहे. त्यामुळे जागावाटपाची चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे. यासंबंधी काळजी करण्याचे कारण नाही. ही चर्चा 2 दिवसांत संपेल. त्यानंतर लगेचच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल. एकनाथ शिंदे यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवल्याच्या मुद्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेला ब्रेक लावण्याचा प्रश्नच येत नाही. कारण, आम्ही नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले आहेत. आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे दिले. हे सरकार अॅडव्हान्स देणारे आहे घेणारे नाही. त्यामुळे आमची नियत साफ आहे. आमची वृत्ती देण्याची आहे. मुळात आम्ही हा निर्णय निवडणूक डोळ्यापुढे ठेवून घेतलाच नाही. आमच्या लाडक्या बहिणींना हे पैसे पर्मनंट मिळावेत ही भावना मनात ठेवून आम्ही हा निर्णय घेतला. त्यामुळे ऑक्टोबरमध्येच आम्ही नोव्हेंबरचे पैसे दिले. महायुतीतील सर्वच घटकपक्ष आता एक टीम म्हणून काम करत आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा आमचेच सरकार येईल याची आम्हाला खात्री आहे.मागच्या सव्वा दोन वर्षांत आमच्या सरकारने पायाभूत सुविधांचा विकास केला. उद्योगदधंदे उभारले. तसेच कल्याणकारी योजनाही राबवल्या. आम्ही कधी नव्हे एवढे ठोस निर्णय घेतले. त्यामुळे जनता या कामाची पोचपावती आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. सरकारने सर्वसामान्य जनतेसाठोी अनेक निर्णय घेतलेत. त्यामुळे या प्रकरणी रद्द झालेल्या निर्णयांकडे पाहण्याची गरजच नाही, असेही एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. दरम्यान, निवडणुकीपूर्वी गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेण्याचा मानस असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. मला आसामच्या मुख्यमंत्र्यांनी निमंत्रित केले आहे. त्यामुळे तिथे गेल्यानंतर मला नक्की कामाख्या देवीचे दर्शन घेण्यास आवडेल, असे ते म्हणाले.
पुणे-सावित्रीबाई फुले स्मारक तसेच पुण्यात अलिशान महापौर बंगला अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात सॅन होजे शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणाऱ्या तसेच सर्वात प्रथम आयटी क्षेत्राला बांधकामाला २ FSI, मिळकत करत सवलत देऊन पुण्यात आयटी हब निर्माण करण्यास प्रारंभ केलेल्या माजी महापौर आणि माजी आमदार दीप्ती चवधरी यांनी शिवाजी नगर विधानसभा मतदार संघासाठी कॉंग्रेस कडून उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह धरला आहे तर कसबा विधान सभा मतदार संघातून माजी महापौर असलेल्या कमल व्यवहारे यांनी थेट विद्यमान आमदार विरोधात शड्डू ठोकले आहेत .व्यवहारे यांनी तर मला उमेदवारी मिळाली नाही तर वेगळा विचार करेल अशा शब्दात आव्हान दिल्याने कसब्याच्या जागेबाबत नेत्यांना विचारपूर्वकच निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि मेरीट नुसार जर शिवाजी नगर मतदार संघाचा निर्णय घ्याचा असेल तर दीप्ती चवधरी यांनी केलेलं काम येथील इच्छुकांमध्ये उजवे ठरणारे असणार आहे .
पुण्यात कॉंग्रेस कसबा, कँटोंमेंट आणि शिवाजी नगर अशा तीन विधानसभा मतदार संघातून लढणार असल्याचे सांगितले जातेय. या शिवाय पर्वती आबा बागुल यांच्या साठी सोडावा असाही कॉंग्रेसचा आग्रह आहे. तर हडपसर , वडगाव शेरी , खडकवासला आणि पर्वती अशा चार मतदार संघांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा सांगितला आहे , जागा वाटप आणि उमेदवार एकाच वेळी जाहीर होतील असे चित्र आहे पुण्यातून शिवसेना ठाकरेंच्या गटाला कोथरूड मतदार संघ लढविण्यास देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान कॉंग्रेस कि राष्ट्रवादीची तुतारी हाच निर्णय पर्वतीतून कधी होणार अशा प्रतीक्षेत लांबत चालला असून त्या बरोबर कॉंग्रेसच्या निवडून येऊ शकणाऱ्या कसबा आणि कँटोंमेंट विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस अंतर्गत लाथाळ्यांना आता बळ मिळत असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. अंतर्गत कुरघोड्यांच्या या रोगामुळे या दोन्ही मतदार संघातून हरयाणा सारखे निकाल आल्यास कुणाला नवल वाटणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे येथे उमेदवार देताना मुंबईतल्या नव्हे तर थेट दिल्लीच्या नेत्यांनी लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात आणून या रोगावर नियंत्रण मिळविले आणि निवडून येऊ शकणारे योग्य उमेदवार दिले तरच तरच पक्षाला येथून मिळू शकणारा विजय मिळू शकेल अशी स्थिती आहे.
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. हे महत्त्वाचे पद भूषवणाऱ्या विजया रहाटकर या पहिल्याच मराठी महिला ठरल्यात हे विशेष.
केंद्राने शुक्रवारी जारी केलेल्या एका अधिसूचनेनुसार विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्या पुढील 3 वर्षे आयोगाच्या अध्यक्षा म्हणून कामकाज सांभाळतील. या कालावधीत त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा दर्जा प्राप्त असेल. विजया रहाटकर यांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक, महापौर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, भाजपच्या राजस्थान सहप्रभारी, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, भाजप राष्ट्रीय सचिव म्हणूनही काम केले आहे. यावरून त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख चढाच राहिल्याचे स्पष्ट होते.विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना विविधांगी काम केले होते. सक्षमा उपक्रमाद्वारे त्यांनी अॅसिड हल्ल्यातील पीडितांना दिलासा दिला होता. तर प्रज्ज्वला योजनेद्वारे त्यांनी केंद्रीय योजनांशी लाखो महिलांना जोडले होते. सुहिता योजनेतून महिलांना आठवड्यातील 24 तास सुरू राहणारी हेल्पलाइन उपलब्ध करून दिली होती. तसेच निर्मल वारी उपक्रमातूनही त्यांनी लाखो महिला वारकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. याशिवाय, पोस्को सेल, ट्रिपल तलाक सेल, मानवी तस्करी विरोधी विशेष सेल, डिजिटल लिट्रसी, महिला आयोग आपल्या दारी असे विविध उपक्रमही त्यांनी आपल्या कारकिर्दीत राबवले.
विजया रहाटकर यांनी आपल्या नियुक्तीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत. राष्ट्रीय महिला आयोगासारख्या घटनात्मक संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार. या महत्वपूर्ण जबाबदारीचे पालन मी निष्ठेने आणि समर्पणाच्या भावनेने करेन. शिक्षण, आरोग्य, सामाजिक स्थान यासारख्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे महिलांच्या क्षमतांना आणि संधींना अधिक गती देण्याचा प्रयत्न करेन. केवळ महिला सक्षमीकरण एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता, महिलांच्या नेतृत्वाखाली विकासयात्रेला चालना देण्याचा माझा प्रयत्न राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाकडे महिलांशी संबंधित प्रकरणांवर केंद्र व राज्य सरकारला सूचना, शिफारशी करण्याचा अधिकार आहे. 1992 मध्ये एका विशेष कायद्याद्वारे महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाला सिव्हिल न्यायालयाचेही अधिकार देण्यात आलेत. महिलांच्या विकासासाठी कायदेशीर व घटनात्मक मुद्यांची समीक्षा करणे, महिलांच्या समस्या सोडवणे, संसदीय व विधायक शिफारशी करणे, महिलांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यावर योग्य ती कारवाई करणे आदी विविधांगी कामे राष्ट्रीय महिला आयोगाला करावी लागतात.
पुणे : डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आयोजित आठवे आंतरराष्ट्रीय डेअरी व फिड प्रदर्शन दि. २४ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटर, पिंपरी पुणे येथे होणार आहे. येत्या गुरुवारी (दि. २४) सकाळी १०.३० वाजता केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या एक्स्पोचे उद्घाटन होणार आहे. गोकुळ दुध संघांचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक डॉ. चेतन नरके, चितळे बंधू मिठाईवालेचे इंद्रनील चितळे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित रहाणार आहेत. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. तेव्हा डेअरी व पशुखाद्य निर्मिती व्यावसायिकांनी, युवक, युवतींनी या संधीचा लाभ घेत प्रदर्शनाला भेट देऊन आपला व्यवसाय अत्याधुनिक व वृद्धिंगत करावा, अशी माहिती संयोजक, बेनिसन मीडियाच्या प्राची अरोरा व सहयोगी आनंद गोरड यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाचे पश्चिम विभागीय उपाध्यक्ष डॉ. सुजीत कुलकर्णी, जाफा फूडचे अमिया नाथ, गोकुळ दूधचे विक्री व पणन अधिकारी सुजय गुरव, चितळे बंधू मिठाईवाले येथील संशोधन अधिकारी डॉ. वैभवी पिंपळे आदी उपस्थित होते.
प्राची अरोरा म्हणाल्या, “प्रदर्शनाचे हे आठवे वर्ष असून, बेनिसन मीडियातर्फे याचे आयोजन केले जाते. या डेअरी व फिड प्रदर्शनात अभ्यासपूर्ण सेमिनार्स, वर्कशॉप्स, चर्चासत्रांसह गोठा व्यवसाय, जनावरांचे आरोग्य व आहार व्यवस्थापन, क्लीन मिल्क प्रोडक्शन, लॅबोरेटरी सेटअप, लॅब तपासणीच्या पद्धती, डेअरी प्लांट मशीनरी, दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे आधुनिक तंत्रज्ञान, आईस्क्रीम व मिठाई उत्पादन, पॅकेजिंग व साठवणूक तंत्रज्ञान, डेअरी प्रॉडक्ट्स निर्यातीमधील संधी, डेअरी व्यवसाया व आयातनिर्यात, पशुखाद्य निर्मिती तंत्रज्ञान, मशीनरी सेट-अप, कच्च्या मालाची निवड व फॉर्मुलेशन, पोल्ट्री, मत्स्य व पशुखाद्य मार्केटची स्थिती अशा डेअरी व पशुखाद्य निर्मिती उद्योगासंबंधीच्या देशविदेशामधील सुमारे १०० कंपन्यांच्या मशिनरींची प्रात्यक्षिके पाहता येतील. तज्ञांसोबत थेट संवाद साधून या क्षेत्रातील अर्थकारण समजून घेता येईल. तसेच शासकीय योजना व कायदेशीर बाबीचीही माहिती दिली जाईल.”
आनंद गोरड म्हणाले, “भारत हा कृषिप्रधान व दूध उत्पादनामध्ये जगात प्रथम क्रमांकाचा देश आहे. देशातील बहुतांश ग्रामीण अर्थकारण, तसेच काही भागातील उदरनिर्वाह दूध व्यवसायावरच अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांत दूध उत्पादन व त्याच्या गुणप्रतीमध्ये कमालीची सुधारणा झाल्याने विदेशातूनही दुग्धजन्य पदार्थाना मागणी वाढत आहे. देशातील जनतेची क्रयशक्ती व आरोग्याप्रती पौष्टिक खाद्याविषयी जागृती वाढल्याने दुग्धजन्य पदार्थांचे सेवनही वाढले आहे. त्यातून व्यावसायिक संधी वाढल्या आहेत. ग्रामीण सुशिक्षित युवक, युवती दूध उत्पादनासोबतच स्वतःचे दुग्धजन्य पदार्थ निर्मित करून गावाजवळील बाजारपेठामध्ये, पर्यटन व धार्मिक स्थळामध्ये, एसटी स्टॅन्ड, रेल्वे स्टेशनसमोर स्वतःच्या ब्रँडच्या डेअरी उत्पादनांची विक्री केंद्रे सुरु करून ग्राहकांना व हॉटेल रेस्टोरंट, ढाबे यांना पुरवठा करण्याच्या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वळत असल्याचे दिसून येते.”
“छोट्या-मोठ्या दूध उत्पादन, संकलन व प्रक्रिया करणारे प्रकल्पधारक, पोल्ट्री व मत्स्य पालन करणारे उद्योजक हे स्वतःचे छोटे किंवा मध्यम क्षमतेचे फिड उत्पादन युनिट सुरु करून अधिक नफा मिळवीत आहेत. गावी दूध संकलन करणारे उद्योजक दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक, वितरण, विक्री यासारखे व्यवसाय करीत आहेत. यामुळेच अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकून घेण्यासाठी, डेअरी व पशुखाद्य प्रदर्शनांना ग्रामीण युवकांचा मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच असून प्रदर्शनांमधील प्रत्यक्षिके पाहून व विविध वर्कशॉप, सेमिनार्स, चर्चासस्त्रे यांमध्ये ग्रामीण युवक, युवती फार मोठ्या संख्येमध्ये सहभाग घेत आहेत. आपल्या प्रकल्पामधील शिल्लक उत्पादन क्षमतेच्या संधी मिळण्यासाठी, उत्पादित मालाला स्थानिक, राष्ट्रीय व तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी मिळवता येईल यासंबंधीची माहिती या प्रदर्शनांमध्ये देण्यात येणार आहे,” असे आनंद गोरड यांनी नमूद केले.
मुंबई-प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहेलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, कर्नाटकचे मंत्री जी. परमेश्वरा, एम. बी. पाटील, तेलंगाणाचे मंत्री उत्तम कुमार रेड्डी, दरासरी अनुसया सिताक्का, टि. एच. सिंग देव, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य खा. नासीर हुसेन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षाताई गायकवाड वॅार रूमचे प्रमुख वामशी रेड्डी आदी उपस्थित
पुणे दि.१९: महिला कायमच विविध उपक्रम राबवित असतात त्यांनी बनविलेल्या उत्पादनांचा दर्जा अभिमान वाटावा अशा प्रकारचा आहे. समाजाचा आणि सरकारचा महिला उद्योजकांवरील विश्वास वाढताना दिसत आहे आगामी काळात तो आणखीन दृढ होत जाणार असून २०३० पर्यंत पन्नास टक्के महिला उद्योग क्षेत्रात कार्यरत असतील असा विश्वास शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
महिला उद्योजकांना प्रोत्साहन व त्यांच्या उज्वल भविष्याला दिशा मिळावी या हेतूने रीझारी प्रस्तुत दिवाळी २०२४ विशेष – रेडियन्स् प्रदर्शनाचे आयोजन शुभारंभ लाॅन्स् डीपी रोड, पुणे येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन आज शनिवार दि. १९ ऑक्टोबर रोजी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी, आकार चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा स्वाती देवळे, सिद्धेश्वर मारटकर गुरुजी, भोसले ग्रुप चे अध्यक्ष किसन भोसले, उद्योजक पोपट खरमाटे, करुणा पाटील, मनीषा तपस्वी, ऐश्वर्या पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, महिला उद्योजकांनी बनविलेल्या उत्पादनांकरिता बाजारपेठ मिळण्यासाठी असे उपक्रम अतिशय महत्वाचे आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये महिलांनी बचत गट व इतर माध्यमातून जे उद्योग उभारले आहेत त्याच्यामध्ये बँकांच्या परतफेडीची जे प्रमाण आहे ते ९९% टक्के आहे. तसेच महिला उद्योजक सतत नाविन्यपूर्ण प्रयोग करताना दिसतात. त्यामुळे महिला उद्योजक निश्चितपणे कौतुकास पात्र असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. तसेच या उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या स्वाती देवळे या कार्पोरेट क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असून देखील त्यांनी महिला उद्योजकांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी ‘रेडियन्स्’ प्रदर्शनाचे आयोजन करून स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे कौतुक केले.
चित्रपटांचा आनंद सामायिक करण्यासाठी माध्यम प्रतिनिधींचे इफ्फीकडून स्वागत
एफटीआयआयद्वारे पहिल्या काही भाग्यवान माध्यम प्रतिनिधींसाठी मोफत चित्रपट प्रशंसा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
पुणे- 18 ऑक्टोबर 2024
55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2024 साठी मीडिया प्रतिनिधींच्या नोंदणीला आज, 18 ऑक्टोबर 2024 रोजी सुरुवात झाली असून #ifiwood मध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही अनुभवी चित्रपट समीक्षक असाल किंवा गोष्ट सांगण्याची आवड असलेले नवोदित पत्रकार असाल, 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत गोव्यातील पणजी येथे होणाऱ्या 55 व्या इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांची अनुभूती घेण्याची ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधी म्हणून नावनोंदणी करून, दर्जेदार चित्रपटांवरील आशयघन लेखांसह हा महोत्सव जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या चमूचा तुम्ही एक भाग बनाल.
भारत जगासाठी किफायतशीर आणि उच्च-गुणवत्तेचे आशय निर्मिती केंद्र बनण्याची तयारी करत असताना, त्याचा पहिला चित्रपट महोत्सव – भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) – हा मनोरंजन क्षेत्रातील सर्जनशीलतेला प्रोत्साहन, ओळख आणि दाद देण्याचा मंच आहे.सर्जनशील अभिव्यक्तीच्या या उत्कटतेची घेतलेली दखल म्हणजे चित्रपट निर्मितीशी संबंधित आणि त्यांच्या कठोर परिश्रमांसाठी संधींची नवी कवाडे उघडते. या महोत्सवात असंख्य विषयांवरील महत्त्वाच्या कथा पाहता, ऐकता आणि अनुभवता येतात.
तसेच, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा चित्रपट निर्मितीच्या कलेबाबतची तुमची समज वाढवण्याचा मंच आहे कारण त्यात मास्टरक्लास आणि संभाषण सत्रांचा समावेश असतो. यात जगभरातील सिनेविश्वातील दिग्गज त्यांचे अनुभव आणि विचार सांगतात !
सिनेमाला दाद देण्याची संस्कृती वाढवण्यात आणि चित्रपट निर्मितीच्या कलेबद्दलचे खरे प्रेम जोपासण्यात माहिती आणि संप्रेषण महत्त्वाची भूमिका बजावते हे आपण जाणतोच. म्हणूनच, 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला भव्य यश मिळवून देण्यासाठी तुम्ही माध्यम प्रतिनिधींचा एक अत्यावश्यक भाग आहातदर्जेदार चित्रपट आणि चित्रपट निर्मात्यांबाबत बारकावे उलगडून दाखविण्याचा तुमच्याकडे केवळ अधिकारच नव्हे तर विशेषाधिकार आहे. 55 व्या इफ्फीमध्ये तुमचा प्रत्येक लेख नक्कीच आशयघन ठरेल.
नोंदणी प्रक्रिया
माध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करण्यासाठी, तुम्ही 1 जानेवारी 2024 पर्यंत वयाची 21 वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे आणि मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल किंवा ऑनलाइन माध्यम संस्थेशी संबंधित वार्ताहर, छायाचित्रकार, कॅमेरा पर्सन किंवा डिजिटल सर्जक असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा अट पूर्ण करणाऱ्या मुक्त पत्रकारांनादेखील नोंदणी करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. कृपया नोंदणी करण्यापूर्वी संबंधित पात्रता निकष वाचून नमूद कागदपत्रे नोंदणी करण्यापूर्वी अपलोड करण्यासाठी तुम्ही तयार ठेवा. नोंदणी प्रक्रिया सुलभ असून https://my.iffigoa.org/media-login यावर ती ऑनलाइन पूर्ण केली जाऊ शकते.
नोंदणीची अंतिम मुदत 12 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11:59:59 (भारतीय प्रमाणवेळेनुसार) पर्यंत आहे. तुमच्या अर्जाची पडताळणी केल्यावर माध्यम प्रतिनिधी म्हणून तुमच्या स्वीकृतीबाबत तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर कळवले जाईल याची कृपया नोंद घ्यावी. माध्यम क्षेत्रातील ज्या व्यक्तींना सदर नोंदणी प्रक्रियेच्या माध्यमातून पत्रसूचना कार्यालयाद्वारे (पीआयबी) मान्यता देण्यात आली असेल अशाच व्यक्ती 55 व्या इफ्फी 2024 साठीचे माध्यम प्रतिनिधी म्हणून पास मिळवण्यास पात्र ठरतील. कोणत्याही माध्यम संस्थेची नियतकालिकता, आवाका (अभिसरण, प्रेक्षकवर्ग, पोहोच), चित्रपटांवरील भर आणि इफ्फीसंदर्भातील अपेक्षित मिडिया कव्हरेज इत्यादी घटकांच्या आधारावर पीआयबी प्रत्येक माध्यम संस्थेला किती मान्यतापत्रे द्यायची याचा निर्णय घेईल.
मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधींना 18 नोव्हेंबर 2024 पासून इफ्फीच्या कार्यस्थळावर त्यांचे माध्यम प्रतिनिधी पासेस मिळतील. या संदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी कृपया ‘माध्यम मान्यतेबाबत चौकशी’ अशा विषयाच्या उल्लेखासह pibiffi[at]gmail[dot]com या ईमेल आयडीवर मेल पाठवावा.
एफटीआयआय म्हणजेच भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतर्फे माध्यम प्रतिनिधींसाठी चित्रपट रसग्रहण प्रमाणपत्र अभ्यासक्रम
चित्रपट यशस्वी कशामुळे होतो याचा कधी विचार केलाय? चित्रपटाच्या पडद्यापलीकडे चित्रपटाविषयी अधिक सखोल माहिती मिळवण्यासाठी तयार राहा. ही माहिती कशी मिळेल??
यावर्षी एक दुर्मिळ मेजवानी पहिल्या काही नशीबवान मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधींची वाट पाहत आहे. त्यांना एका मोफत चित्रपट रसग्रहण प्रमाणपत्र अभ्यासक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या सहयोगासह प्रतिष्ठित अशा भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील माहितगार व्यक्तींतर्फे दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी गोव्यात पणजी येथे हा कार्यक्रम होईल. लवकरात लवकर माध्यम प्रतिनिधी नोंदणी अर्ज सादर करणाऱ्या आणि त्या अर्जात सदर अभ्यासक्रमासाठी उपस्थित राहण्याचा पर्याय निवडणाऱ्या मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधींना पहिल्यांदा येणाऱ्यास प्रथम संधी या तत्त्वावर या एक दिवसीय अभ्यासक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या प्रतिनिधींना योग्य वेळी अभ्यासक्रमाचा अधिक तपशील कळवण्यात येईल. म्हणूनच, आजच नोंदणी करा. यामुळे इतरांच्या आधी, आघाडीचे नोंदणीदार होण्याची संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला 2024 च्या इफ्फीचा धमाकेदार कार्यक्रम सुरु होण्याआधी अत्यंत मौलिक विचारधन तसेच ओळखी वाढवण्याच्या संधी मिळतील.
इफ्फीविषयी थोडक्यात माहिती
वर्ष 1952 मध्ये सुरु करण्यात आलेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा आशियातील प्रमुख चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. इफ्फीने सुरुवातीपासूनच चित्रपट, त्यांच्या गुंगवून टाकणाऱ्या कथा आणि त्यामागील प्रतिभावान व्यक्ती यांचा गौरव करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. चित्रपटांबद्दल लोकांच्या मनात तीव्र कौतुक आणि प्रेम रुजवून त्याला प्रोत्साहन देणे, लोकांमध्ये परस्परांबद्दल समजूतदारपणा आणि सौहार्दाचे सेतू तयार करणे आणि त्यांना वैयक्तिक तसेच सामुहिक उत्कृष्टतेची नवीन उंची गाठण्यासाठी प्रेरित करणे हे या महोत्सवाच्या आयोजनाचे हेतू आहेत.
गोवा सरकारमधील गोवा मनोरंजन संस्थेच्या सहयोगासह केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे दरवर्षी इफ्फीचे आयोजन केले जाते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील चित्रपट महोत्सव संचालनालय (डीएफएफ) बहुतांश करून या महोत्सवाचे नेतृत्व करीत असे, परंतु चित्रपट माध्यम संस्थांचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात (एनएफडीसी) विलीनीकरण झाल्यानंतर एनएफडीसीने या महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. 55 व्या इफ्फीच्या ताज्या माहितीसाठी, कृपया महोत्सवाच्या www.iffigoa.org या संकेतस्थळाला भेट द्या तसेच एक्स, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या विविध समाजमाध्यम मंचांवर तसेच पीआयबीच्या समाजमाध्यमांशी संबंधित हँडलवर इफ्फीला फॉलो करा.
गुणीजान बैठकीत पापरी चक्रवर्ती यांचे सुरेल गायन पुणे : महनीय गुरूंचे मार्गदर्शन आणि सुरांप्रती समर्पण भाव असलेल्या जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका पापरी चक्रवर्ती यांच्या सुमधुर दैवी स्वरांच्या सादरीकरणात रसिक तल्लीन झाले. प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या 100व्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध शहरांमध्ये सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र ललित कला निधी, मुंबई यांच्या वतीने गुणीजान बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम लागू रंग अवकाश ऑडिटोरिअम येथे आयोजित मैफलीत कोलकाता येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका पापरी चक्रवर्ती यांचे गायन झाले. सांगीतिक क्षेत्रातील दिग्गज कलावंत पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पंडित सुहास व्यास, पंडित रघुनंदन पणशीकर, विदुषी सानिया पाटणकर, सायली पानसे शेल्लेकरी आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र ललित कला निधी, मुंबईचे अध्यक्ष आणि कार्यकारी विश्वस्त, सुप्रसिद्ध संतूरवादक पद्मश्री सतीश व्यास यांनी या मैफलीचे आयोजन केले होते. पापरी चक्रवर्ती यांनी आपल्या मैफलीची सुरुवात भक्तीरसाची जागृती करणाऱ्या राग भूपमधील ‘येरी आज भईलवा सुखवा मोरे’ या सदारंग रचित बंदिशीने केली. सुमधुर, दमदार आवाज, स्वरांवरील पकड यामुळे सुरुवातीपासून त्यांनी मैफल खुलवत नेली. ‘सहेला रे आ मिल गाये, सप्तसुरन के भेद सुनाये’ ही गानसरस्वती विदुषी किशोरी आमोणकर यांनी अजरामर केलेली रचना ऐकविल्यानंतर पापरी यांनी जणू आपल्या गुरुंप्रती स्वरांचे समर्पण केल्याची भावना रसिकांच्या मनात आली. यानंतर पापरी यांनी गंभीरता आणि मधुरता यांचे मिश्रण असलेला राग जयजयवंती सादर केला यात ‘आली पिया आली’ ही झपतालातील पारंपरिक बंदिश सादर करून द्रुत लयीत ‘जारे जारे पपिहरा’ ही स्वरचित बंदिश बहारदारपणे सादर केली. पापरी चक्रवर्ती यांनी मैफलीची सांगता नायकी कानडा रागात विलंबित रूपकमध्ये ‘निरुपिया रसिया’ ही बंदिश सादर करत त्याला जोडून द्रुतलयीमध्ये ‘रतिया मै जागी’ या मोगूबाई कुर्डीकर यांनी रचलेल्या रचनेने केली. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या शिष्या पापरी चक्रवर्ती यांच्या गायनाने रसिक नुसते प्रभावितच नाही तर मंत्रमुग्ध झाले. महनीय गुरूंचे मार्गदर्शन आणि स्वरांप्रती समर्पण भाव यातून खुललेल्या गायनाने पापरी यांनी रसिकांना दैवी आनंदानुभूती दिली. पापरी चक्रवर्ती यांना अजिंक्य जोशी (तबला), निलय साळवी (संवादिनी) यांनी सुरेल, समर्पक साथ केली. कलाकारांचा सत्कार पंडित सुहास व्यास यांनी केला. कार्यक्रमाचे निवेदन, कलाकार परिचय आणि आभार प्रदर्शन पंडित सतीश व्यास यांनी केले.
दर महिन्याला सरासरी १२०० कोटी रुपयांचा घरबसल्या भरणा
पुणे, दि. १९ ऑक्टोबर २०२४: महावितरणच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील लघुदाब वर्गवारीच्या वीजग्राहकांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. या वर्गवारीतील तब्बल ४१ लाख १२ हजार घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वीजग्राहक दर महिन्याला सुमारे ११९५ कोटी ७० लाख रुपयांच्या वीजबिलांचा सुरक्षित व घरबसल्या ‘ऑनलाइन’ भरणा करीत आहेत.
महावितरणकडून सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत सर्व प्रकारची ग्राहकसेवा एका क्लिकवर डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे. प्रामुख्याने बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहून, कार्यालयीन वेळेत वीजबिल भरण्याऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व २४ तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांसाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध आहे. तसेच एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे.
गेल्या तीन महिन्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील १ कोटी २६ लाख ३८ हजार ६०६ लघुदाब वीजग्राहकांनी ३५८७ कोटी ३२ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. त्यानुसार दर महिन्याला ४२ लाख १२ हजार (७९ टक्के) वीजग्राहक सरासरी ११९५ कोटी ७० लाख रुपयांच्या (८० टक्के) वीजबिलांचा घरबसल्या भरणा करीत आहेत. यामध्ये दर महिन्याला पुणे जिल्ह्यात २५ लाख ८४ हजार ४३० वीजग्राहक ७९६ कोटी, सातारा जिल्ह्यात ४ लाख ६३ हजार २२० वीजग्राहक ७५ कोटी ८१ लाख, सोलापूर जिल्ह्यात ३ लाख २० हजार १४० वीजग्राहक ८३ कोटी २७ लाख, कोल्हापूर जिल्ह्यात ५ लाख ४४ हजार ६५० वीजग्राहक १६९ कोटी २७ लाख आणि सांगली जिल्ह्यातील ३ लाख ४३० वीजग्राहक ७१ कोटी ३३ लाख रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या ‘ऑनलाइन’ भरणा करीत आहेत.
वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरणा करणे सोयीचे व सुरक्षित आहे. या पद्धतीला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पेमेंट व सेटलमेंट कायदा २००७ च्या तरतुदी लागू आहेत. तसेच ‘ऑनलाईन’द्वारे वीजबिल भरणा केल्यानंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच दिली जाते. वीज बिल भरण्यासंदर्भात काही तक्रार किंवा शंका असल्यास ग्राहक helpdesk_pg@mahadiscom.in या ईमेलद्वारे महावितरणशी संपर्क साधू शकतात. तसेच वीजबिलांचा क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे ऑनलाईन भरणा केल्यास वीज बिलामध्ये ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे.
शिक्षण संस्थांनी विद्यार्थी केंद्रित तंत्रज्ञान स्नेही व्हावे – डॉ. गिरीश देसाई
पीसीयू मध्ये आंतरराज्य मुख्याध्यापक संवाद, संमेलन संपन्न
पिंपरी, पुणे (दि. १९ ऑक्टोबर २०२४) अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापनात आयसीटीचा वापर केला पाहिजे. आता शिक्षणातील तंत्रज्ञानाच्या परिवर्तनीय भूमिकेवर लक्ष केंद्रित करून २१ व्या शतकातील विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नवनवीन अध्यापन तंत्रांचा स्वीकार केला पाहिजे असे आवाहन पीसीयू व्यवस्थापन मंडळाचे सदस्य विवेक सावंत यांनी उपस्थित शिक्षकांना केले. यावेळी त्यांनी एआय आधारित लर्निंग सोल्यूशन्समध्ये शिक्षणाच्या आणि वैयक्तिक शिकण्याच्या संधींचे प्रात्यक्षिक सादर केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) अंतर्गत साते, वडगांव मावळ येथील पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी (पीसीयू) येथे ‘प्रिन्सिपल्स कॉन्क्लेव्ह २०२४’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीसीईटी चे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयू च्या कुलगुरू डॉ. मणिमला पुरी, प्र कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, सीनियर जनरल मॅनेजर एमकेसीेएल अमित रानडे आदी उपस्थित होते. यामध्ये उत्तर प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, चंदीगड, पश्चिम बंगाल, बिहार आणि गोवा राज्यातील मुख्याध्यापक आणि शाळा प्रमुख उपस्थित होते. पारंपरिक शैक्षणिक पद्धतीचा अभिनव आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अर्थपूर्ण वापर करून शिक्षण संस्थांनी विद्यार्थी केंद्रित तंत्रज्ञान स्नेही व्हावे त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. या उद्देशाने प्रिन्सिपल्स कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी दिली. डॉ. मणिमला पुरी यांनी पीसीयू आणि पीसीईटी समुहाची ओळख करून दिली आणि विद्यापीठाने दिलेले विविध कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणाबाबतची बांधिलकी या विषयी माहिती दिली. शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देण्याच्या आणि सर्व विषयांमध्ये नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींना चालना देण्याच्या विद्यापीठाच्या दृष्टीकोन आहे असेही सांगितले. डॉ. सुदीप थेपडे यांनी पीसीयू मध्ये अनुभवात्मक शिक्षण, आंतरविद्याशाखीय सहयोग आणि शैक्षणिक परिणाम वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या एकात्मतेवर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे सांगितले. पीसीटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आयोजन करण्यात मार्गदर्शन केले व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.