चित्रपटांचा आनंद सामायिक करण्यासाठी माध्यम प्रतिनिधींचे इफ्फीकडून स्वागत
एफटीआयआयद्वारे पहिल्या काही भाग्यवान माध्यम प्रतिनिधींसाठी मोफत चित्रपट प्रशंसा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
पुणे- 18 ऑक्टोबर 2024
55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2024 साठी मीडिया प्रतिनिधींच्या नोंदणीला आज, 18 ऑक्टोबर 2024 रोजी सुरुवात झाली असून #ifiwood मध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही अनुभवी चित्रपट समीक्षक असाल किंवा गोष्ट सांगण्याची आवड असलेले नवोदित पत्रकार असाल, 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत गोव्यातील पणजी येथे होणाऱ्या 55 व्या इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांची अनुभूती घेण्याची ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधी म्हणून नावनोंदणी करून, दर्जेदार चित्रपटांवरील आशयघन लेखांसह हा महोत्सव जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या चमूचा तुम्ही एक भाग बनाल.
भारत जगासाठी किफायतशीर आणि उच्च-गुणवत्तेचे आशय निर्मिती केंद्र बनण्याची तयारी करत असताना, त्याचा पहिला चित्रपट महोत्सव – भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) – हा मनोरंजन क्षेत्रातील सर्जनशीलतेला प्रोत्साहन, ओळख आणि दाद देण्याचा मंच आहे.सर्जनशील अभिव्यक्तीच्या या उत्कटतेची घेतलेली दखल म्हणजे चित्रपट निर्मितीशी संबंधित आणि त्यांच्या कठोर परिश्रमांसाठी संधींची नवी कवाडे उघडते. या महोत्सवात असंख्य विषयांवरील महत्त्वाच्या कथा पाहता, ऐकता आणि अनुभवता येतात.
तसेच, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा चित्रपट निर्मितीच्या कलेबाबतची तुमची समज वाढवण्याचा मंच आहे कारण त्यात मास्टरक्लास आणि संभाषण सत्रांचा समावेश असतो. यात जगभरातील सिनेविश्वातील दिग्गज त्यांचे अनुभव आणि विचार सांगतात !
सिनेमाला दाद देण्याची संस्कृती वाढवण्यात आणि चित्रपट निर्मितीच्या कलेबद्दलचे खरे प्रेम जोपासण्यात माहिती आणि संप्रेषण महत्त्वाची भूमिका बजावते हे आपण जाणतोच. म्हणूनच, 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला भव्य यश मिळवून देण्यासाठी तुम्ही माध्यम प्रतिनिधींचा एक अत्यावश्यक भाग आहातदर्जेदार चित्रपट आणि चित्रपट निर्मात्यांबाबत बारकावे उलगडून दाखविण्याचा तुमच्याकडे केवळ अधिकारच नव्हे तर विशेषाधिकार आहे. 55 व्या इफ्फीमध्ये तुमचा प्रत्येक लेख नक्कीच आशयघन ठरेल.
नोंदणी प्रक्रिया
माध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करण्यासाठी, तुम्ही 1 जानेवारी 2024 पर्यंत वयाची 21 वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे आणि मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल किंवा ऑनलाइन माध्यम संस्थेशी संबंधित वार्ताहर, छायाचित्रकार, कॅमेरा पर्सन किंवा डिजिटल सर्जक असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा अट पूर्ण करणाऱ्या मुक्त पत्रकारांनादेखील नोंदणी करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. कृपया नोंदणी करण्यापूर्वी संबंधित पात्रता निकष वाचून नमूद कागदपत्रे नोंदणी करण्यापूर्वी अपलोड करण्यासाठी तुम्ही तयार ठेवा. नोंदणी प्रक्रिया सुलभ असून https://my.iffigoa.org/media-login यावर ती ऑनलाइन पूर्ण केली जाऊ शकते.
नोंदणीची अंतिम मुदत 12 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11:59:59 (भारतीय प्रमाणवेळेनुसार) पर्यंत आहे. तुमच्या अर्जाची पडताळणी केल्यावर माध्यम प्रतिनिधी म्हणून तुमच्या स्वीकृतीबाबत तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर कळवले जाईल याची कृपया नोंद घ्यावी. माध्यम क्षेत्रातील ज्या व्यक्तींना सदर नोंदणी प्रक्रियेच्या माध्यमातून पत्रसूचना कार्यालयाद्वारे (पीआयबी) मान्यता देण्यात आली असेल अशाच व्यक्ती 55 व्या इफ्फी 2024 साठीचे माध्यम प्रतिनिधी म्हणून पास मिळवण्यास पात्र ठरतील. कोणत्याही माध्यम संस्थेची नियतकालिकता, आवाका (अभिसरण, प्रेक्षकवर्ग, पोहोच), चित्रपटांवरील भर आणि इफ्फीसंदर्भातील अपेक्षित मिडिया कव्हरेज इत्यादी घटकांच्या आधारावर पीआयबी प्रत्येक माध्यम संस्थेला किती मान्यतापत्रे द्यायची याचा निर्णय घेईल.
मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधींना 18 नोव्हेंबर 2024 पासून इफ्फीच्या कार्यस्थळावर त्यांचे माध्यम प्रतिनिधी पासेस मिळतील. या संदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी कृपया ‘माध्यम मान्यतेबाबत चौकशी’ अशा विषयाच्या उल्लेखासह pibiffi[at]gmail[dot]com या ईमेल आयडीवर मेल पाठवावा.
एफटीआयआय म्हणजेच भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतर्फे माध्यम प्रतिनिधींसाठी चित्रपट रसग्रहण प्रमाणपत्र अभ्यासक्रम
चित्रपट यशस्वी कशामुळे होतो याचा कधी विचार केलाय? चित्रपटाच्या पडद्यापलीकडे चित्रपटाविषयी अधिक सखोल माहिती मिळवण्यासाठी तयार राहा. ही माहिती कशी मिळेल??
यावर्षी एक दुर्मिळ मेजवानी पहिल्या काही नशीबवान मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधींची वाट पाहत आहे. त्यांना एका मोफत चित्रपट रसग्रहण प्रमाणपत्र अभ्यासक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या सहयोगासह प्रतिष्ठित अशा भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील माहितगार व्यक्तींतर्फे दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी गोव्यात पणजी येथे हा कार्यक्रम होईल. लवकरात लवकर माध्यम प्रतिनिधी नोंदणी अर्ज सादर करणाऱ्या आणि त्या अर्जात सदर अभ्यासक्रमासाठी उपस्थित राहण्याचा पर्याय निवडणाऱ्या मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधींना पहिल्यांदा येणाऱ्यास प्रथम संधी या तत्त्वावर या एक दिवसीय अभ्यासक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या प्रतिनिधींना योग्य वेळी अभ्यासक्रमाचा अधिक तपशील कळवण्यात येईल. म्हणूनच, आजच नोंदणी करा. यामुळे इतरांच्या आधी, आघाडीचे नोंदणीदार होण्याची संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला 2024 च्या इफ्फीचा धमाकेदार कार्यक्रम सुरु होण्याआधी अत्यंत मौलिक विचारधन तसेच ओळखी वाढवण्याच्या संधी मिळतील.
इफ्फीविषयी थोडक्यात माहिती
वर्ष 1952 मध्ये सुरु करण्यात आलेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा आशियातील प्रमुख चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. इफ्फीने सुरुवातीपासूनच चित्रपट, त्यांच्या गुंगवून टाकणाऱ्या कथा आणि त्यामागील प्रतिभावान व्यक्ती यांचा गौरव करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. चित्रपटांबद्दल लोकांच्या मनात तीव्र कौतुक आणि प्रेम रुजवून त्याला प्रोत्साहन देणे, लोकांमध्ये परस्परांबद्दल समजूतदारपणा आणि सौहार्दाचे सेतू तयार करणे आणि त्यांना वैयक्तिक तसेच सामुहिक उत्कृष्टतेची नवीन उंची गाठण्यासाठी प्रेरित करणे हे या महोत्सवाच्या आयोजनाचे हेतू आहेत.
गोवा सरकारमधील गोवा मनोरंजन संस्थेच्या सहयोगासह केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे दरवर्षी इफ्फीचे आयोजन केले जाते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील चित्रपट महोत्सव संचालनालय (डीएफएफ) बहुतांश करून या महोत्सवाचे नेतृत्व करीत असे, परंतु चित्रपट माध्यम संस्थांचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात (एनएफडीसी) विलीनीकरण झाल्यानंतर एनएफडीसीने या महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. 55 व्या इफ्फीच्या ताज्या माहितीसाठी, कृपया महोत्सवाच्या www.iffigoa.org या संकेतस्थळाला भेट द्या तसेच एक्स, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या विविध समाजमाध्यम मंचांवर तसेच पीआयबीच्या समाजमाध्यमांशी संबंधित हँडलवर इफ्फीला फॉलो करा.