कनिना खास कारकला (हरयाणा) येथे झालेल्या ‘सीबीएससी बॉक्सिंग नॅशनल कॅाम्पीटीशन 2023-2024 ‘मध्ये राजवीर प्रिया अमीत सुर्यवंशी ने गोल्ड मेडल पटकावले तसेच बेस्ट बॉक्सर हा बहुमान मिळवला. दि.१६ ते २० ऑक्टोबर २०२४ दरम्यान ही स्पर्धा झाली.१७ वर्षाखालील मुलांच्या ५० ते ५२ किलो या वजनी गटात त्याने हे विजेतेपद पटकावले.राजवीर हा दिल्ली पब्लिक स्कुल(पुणे)चा विद्यार्थी असून एमआयजीएस पुणे या क्लबमध्ये बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतले.त्याला मृणाल भोसले,रोहन जगदाळे,उमेश जगदाळे, मंगेश यादव,हरिकिशन बेलवाल,जयसिंग पाटील,अर्जुन नेगी, मोहम्मद आरिफ,विजय शर्मा, सिद्धार्थ वर्मा यांचे मार्गदर्शन लाभले .
राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या राज्य प्रवक्ता अॅड.रूपाली पाटील-ठोंबरे,अजय दराडे,माजी नगरसेवक युवराज बेलदरे,डॉ.संतोष तळेकर,अविनाश बागवे,भरत वावळ,मदन वाणी,अभिमन्यू सूर्यवंशी,अमोल सोनवणे, विजय गुजर,जीवनलाल निनदाणे,अशोक मेमजादे,रॅाबर्ट दास,ऋषिकांत वचकळ,शरद कंक, गोडसे,वाढवणे,जयदीप नीलवर्ण,वेदप्रकाश यादव,प्रवीणकुमार,एमआयजीएस,सर्व पालक व विद्यार्थी यांनी राजवीरचे अभिनंदन केले.
भाजपाकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न; काँग्रेस-शिवसेनेत कसलेही वाद नाहीत.
भाजपाचे हिंदुत्व नकली; हिंदुच्या नावावर भाजपाचे केवळ राजकारण.
मुंबई/नवी दिल्ली, दि. २१ ऑक्टोबर. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.
दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शिवसेना आघाडीतून बाहेर पडणार या बातम्यात काहीही तथ्य नाही, भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबद्दल गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव होईल. पराभवाच्या भितीने भाजपा अशी खेळी करत आहे. काँग्रेस कडूनही अशा पद्धतीचे कोणतेही विधान केलेले नाही. महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आणण्यासाठी आमच्या सर्वांचे एकत्रित सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत.
एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, भाजपाचे हिंदू प्रेम नकली आहे, नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि स्वयंभू विश्वगुरु असा प्रचार करण्यात आला. या ११ वर्षात शेतकऱ्यांचा आत्महत्यांमध्ये वाढ झाली त्यात जास्त हिंदूच होते. बेरोजगाराला कंटाळून तरुणांच्या आत्महत्या झाल्या त्यातही जास्त हिंदूच आहेत. भाजपाची सत्ता आली की हिंदूवर अन्याय केला जातो हे लपून राहिले नाही. भाजपाचे हिंदुत्व हे केवळ राजकारणासाठी आहे. छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केले असे जाहीरपणे सांगायचे व उमेदवारांच्या यादीत औरंगाबाद लिहायचे ही दुतोंडी भूमिका आहे. काँग्रेस पक्षाची सर्वधर्म समभावाची स्पष्ट भूमिका आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
एमआयटी डब्ल्यूपीयूत‘ सहाव्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचे उद्घाटन’
पुणे, २१ ऑक्टोबर :” मिडिया आणि समाज यांचे अतूट नाते आहे. सामाजिक प्रश्न आणि जनहिताशी जोडूनच पत्रकारिता अर्थपूर्ण बनते. पत्रकारितेच्या तीन स्तरावरील अभ्यासात सर्व प्रथम स्तर गेल्या १०० वर्षातील पत्रकारिता, स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता आणि वर्तमान काळातील पत्रकारिता असा अभ्यास करता येतो.” असे विचार माजी सनदी अधिकारी व सांसद टिव्हीचे माजी वरिष्ठ कार्यकारी अधिकारी रवी कपूर यांनी व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी च्या स्कूल ऑफ मिडिया अँड कम्युनिकेशन, पुणेतर्फे सहाव्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषद, कोथरुड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे आयोजित करण्यात आली. याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पुणे युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट, आर. के.लक्ष्मण संग्रहालय आणि नवी दिल्ली फॉरेन करस्पॉन्डंटस क्लब ऑफ साउथ एशिया यांच्या सहयोगाने ही परिषद होत आहे. यावेळी प्रसिद्ध टेलिव्हिजन निर्माता सिद्धार्थ काक, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुमित भावे, हेरॉल्ड पब्लिकेशनचे समूह प्रमुख सुजय गुप्ता, बुलंद भारत टिव्हीचे मुख्य संपादक राजकिशोर तिवारी, लेखक निल डिसुल्वा आणि अभिनेत्री प्रांजली सिंग परिहार या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे सीओओ डॉ. संजय कामतेकर व स्कूल ऑफ मीडिया कम्युनिकेशनचे सहयोगी अधिष्ठाता धिरज सिंग उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली ही परिषद होत आहे. रवी कपूर म्हणाले,” सर्वात पहिला स्तर म्हणजे गेल्या १०० वर्षामध्ये सृष्टीवरील संपूर्ण समाजाला आणि घटनांना बीबीसी, सीएनबीसी, इकॉनॉमिक्स आणि टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रांनी जोडून ठेवले होते. त्यानंतर देशात स्वातंत्र्यपूर्व काळात म. गांधीजी यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला नियंत्रित केले होते. वर्तमान काळात सोशल मिडियाच्या माध्यमातून संपूर्ण मानव एक दूसर्याशी जुळलेला आहे. आता सरकारवर विचार करण्याची वेळ आली आहे की याला नियंत्रित कसे करावे. त्यातच भविष्य एआयचे आहे. परंतू हे सर्व असतांना सुद्धा कंटेन्ट सर्वात महत्वपूर्ण राहणार आहे.” प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”माध्यमांच्या माध्यमातूनच समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य होत आहे. त्यामुळे पत्रकारितेत तत्वांचे पालन करून योग्य मार्गावर चालावे. आध्यात्माच्या आधारे तत्वनिष्ठ पत्रकारिता करावी. सध्याच्या काळात शिक्षण क्षेत्रात काॅन्शियसनेस ही संकल्पना नवी दिशा देणारी असल्याने माध्यमांनी यावर ही विचार करावा.” सुमीत भावे म्हणाले,” पत्रकारिता ही समाजातील घटनांना व्यक्त करणारे माध्यम आहे. परंतू वर्तमान काळात वाढत्या सोशल मिडियामुळे समाजाला व्यक्त होता येते परंतू हाच मिडिया देशामध्ये विभाजन आणू पाहतो. एआयचा प्रवेश होत असतांना पत्रकाराने स्वतःला अपडेट करावे.” ” पुणे श्रमिक पत्रकार संघ हा देशातील सर्वात जुनी १९४० ची संघटना असून यामध्ये जवळपास ५०० पेक्षा अधिक पुणे व पिंपरीचे सदस्य असल्याचे त्यांनी नमूद केले.” राजकिशोर तिवारी म्हणाले,” सतत बातम्यांच्या शोधात असलेले माध्यमे हे शक्तीशाली असून त्यामध्ये अनेक आव्हाने आहेत. ५ डब्ल्यू १ एच या तत्वाचे पालन करून प्रश्न विचारण्याची ताकत तुमच्यात असावी. याशिवाय पत्रकारिता पूर्ण होऊच शकत नाही. एआयच्या जगात मोठ्या प्रमाणात बदल होणार्या माध्यमात आजही कंटेन्टला सर्वाधिक महत्व आहे.” सिध्दार्थ काक म्हणाले,” समाजाला नवउत्साह देण्याचे काम माध्यमातून होत आहे. पत्रकारिता करतांना निरिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. तसेच ऐकणे व समजणे, प्रश्न विचारणे आणि विचारपूर्वक लिखाण करणे हे खूप गरजेचे आहे.” मिडिया हा समाजाशी जुळलेला असल्याने कोणताही विषय हाताळतांना त्याच्या मुळापर्यंत जाऊन काम करावे. मिशन, व्हिजन, गोल आणि शोध पत्रकारिता करतांना पत्रकारितेचे तत्व सोडू नये. कोविडच्या काळानंतर या क्षेत्रात प्रचंड बदल आले आहेत. असे विचार सुजय गुप्ता, निल डिसुल्वा व अभिनेत्री प्रांजली सिंग परिहार यांनी व्यक्त केले. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संदेश देऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर डॉ. संजय कामतेकर यांनी विचार मांडले. प्रा.धिरज सिंग यांनी स्वागतपर भाषण केले. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.
बिग बॉस विजेता सुरज चव्हाण याचा नुकताच प्रदर्शित झालेला राजा राणी हा चित्रपट समाजासाठी घातक असून यान चित्रपटातून समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे म्हणून त्या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी नाहीतर न्यायालयाचे दरवाजे ठोठाहून चित्रपटावर कायदेशीररित्या बंदी घातली जाईल असा निर्वाळीचा इशारा प्रसिद्ध ॲड. वाजिद खान (बिडकर) यांनी श्रमिक पत्रकार भवन या ठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला.
ॲड. खान असे म्हणाले की सध्या सुरज चव्हाण हे प्रसिध्द व्यक्तिमत्व महाराष्ट्रात गाजत असून राजा राणी हा त्याचा चित्रपट पाहुन अनेक तरुण तरुणी आत्महत्या करु शकतात, याची शक्यता नाकारता येत नाही. चित्रपटाच्या शेवटी असे दाखवण्यात आले आहे की समाज व नातेवाईकांमुळे चित्रपटातील दोन प्रेमी एकत्र होवू शकत नाहीत, म्हणून चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री टोकाचे पाऊल एकमेकांच्यावर गोळ्या झाडून आत्महत्या करतात. असा चुकीचा संदेश चित्रपटाच्या सरते शेवटी देण्यात आलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे.
सध्या सुरज चव्हाण हे महाराष्ट्रातील प्रसिध्द व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटाचे अनुकरण महाराष्ट्रातील अनेक तरुण तरुणी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतील. ह्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून सुरज चव्हाण यांचा राजा राणी हा चित्रपट बॅन करण्यात यावा अशी मागणी प्रसिद्ध ॲड. वाजिद खान (बिडकर) यांनी केली आहे. या चित्रपटात अभिनेता रोहन पाटील, अभिनेत्री वैष्णवी शिंदे सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे.
खोट्या बातम्या पसरवून माझी उमेदवारी धोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु
पण पक्ष श्रेष्ठींवर माझा विश्वास –त्यांना ठाऊक कामाच्या माणसालाच विरोध केला जातो
पुणे- आज काही माध्यमातून बागवे पिता पुत्र फडणवीसांना भेटले आणि ते भाजपच्या वाटेवर आहेत असे वृत्त दिल्याने कॉंग्रेसचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवार आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे अखेरीस संतापले आहे,आजवर विविध मार्गाने मला उमेदवारी मिळू नये म्हणून भाजपची सुपारी घेऊन माझे विरोधक प्रयत्न करत आहे आता त्यांनी अशा चांगल्या समजल्या जाणाऱ्या माध्यमांना हाताशी धरून खोट्या बातम्या पेरून माझी उमेदवारी धोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मी इकडे भाजप आणि फडणवीस यांच्या विरोधात आंदोलने करतो माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सर्वाधिक आंदोलने जनतेच्या हिताच्या मुद्द्यावर करणारा मी क्रमांक १ चा अध्यक्ष असेल . माझ्या विरोधकांनी उघडलेल्या खेचाखेचीच्या राजकारणाला बळी पडून माध्यमांनी यांच्या नादाला लागून खोट्या बातम्या देऊ नयेत.मी जर भेटलो असेल फडणवीसांना तर पुराव्यासह दाखवून द्यावे .मुळात मी गांधीवादी आणि सर्वधर्मसमभाव मानणारा कार्यकर्ता आहे,पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात माझा विजय निश्चित आहे आणि माझ्या एवढा जनसंपर्क दांडगा ठेवलेला,स्ट्राँग उमेदवार नाही म्हणून माझे पाय खेचायचे कामे केली जात आहेत. पण मी या सर्वांना पुरून उरेन असेही ते म्हणाले. पक्ष श्रेष्ठींवर माझा विश्वास असून त्यांना माझ्या कामाबाबत काम केल्याने शत्रू निर्माण झालेबाबत माहिती आहे. त्यामुळे अशा बिनबुडाच्या बातम्या आणि आरोपांवर ते विश्वास ठेवणार नाहीत.
सणासुदीच्या काळात खरेदीत मोठी वाढ होत असल्यामुळे, अनेक ग्राहक बऱ्याचदा महत्त्वाच्या सुरक्षात्मक पद्धतीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आर्थिक नुकसान आणि मनस्ताप होऊ शकतो. NPCI ने ग्राहकांना सण-उत्सवाचा काळ अधिक सुरक्षितपणे आणि आनंदाने घालवण्यासाठी काही महत्वाचे सल्ले दिले आहेत.
· झकपक ऑफर आणि सूट सवलतींमुळे अनियंत्रित खरेदीला चालना मिळू शकते. पटकन या ऑफर्स मिळविण्याच्या नादात अनेकदा तुमच्याकडून प्लॅटफॉर्मच्या वैधतेकडे दुर्लक्ष होऊ शकते. अनोळखी विक्रेते आणि अविश्वासार्ह व्यवसायांबद्दल पुरेशी माहिती गोळा करण्याची खात्री करा.
· ऑफर्ससाठी साइन अप करताना, आवश्यक नसलेली जास्त वैयक्तिक माहितीची देवाणघेवाण करू नका कारण यामुळे डेटा चोरी होण्याचा धोका वाढतो.
· खरेदीसाठी शॉपिंग मॉल्समधील ओपन वाय-फाय नेटवर्कसारख्या असुरक्षित नेटवर्कचा वापर करू नका. त्यामुळे तुमची आर्थिक माहिती हॅकर्सना खुली होऊ शकते.
· सणासुदीच्या काळात खरेदीचे प्रमाण वाढत असल्यामुळे, आपण नक्की काय काय ऑर्डर केले आहे याची नोंद ठेवणे ग्राहकांकडून चुकू शकते. त्यातून ते फिशिंग स्कॅम्सला बळी पडू शकतात. बनावट डिलिव्हरी नोटिफिकेशन्स टाळण्यासाठी पेमेंट लिंकवर क्लिक करण्यापूर्वी नेहमी दोनदा तपासून पाहा.
· तुमच्या खात्यांसाठी साधा किंवा पूर्वनिर्धारित डीफॉल्ट पासवर्ड वापरणे टाळा. यामुळे हॅकर्ससाठी तुम्ही सोपे लक्ष्य बनता. प्रत्येक खात्यासाठी मजबूत आणि वेगळा विशिष्ट पासवर्ड तयार करून सुरक्षा वाढवा.
विश्वबंधुता साहित्य परिषदेतर्फे रयत विचारवेध संमेलन पुणे: “समाजातील सर्व घटकांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत, त्यातून समताधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समता व बंधुतेचा विचार घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना सन्मान दिला. ही समताधिष्ठित समाज व्यवस्था भविष्यातही टिकून राहावी, यासाठी बंधुतेची गरज आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. बंधुता लोकचळवळीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विश्वबंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रयत विचारवेध संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, उद्घाटक रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, कवयित्री ललिता सबनीस, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. अरुण आंधळे, विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सविता पाटील, कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, साहित्यिक प्रा. शंकर आथरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच सबनीस यांच्या हस्ते डॉ. शिवलिंग मेनकुदळे, डॉ. अरुण आंधळे, डॉ. सविता पाटील, चंद्रकांत वानखेडे, शंकर आथरे, संगीता झिंजुरके आणि जनसंपर्क व पत्रकारितेतील योगदानाबद्दल जीवराज चोले यांचा संविधान देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले , “स्वार्थाच्या राजकारणापायी समाज तुटत चालला आहे. माणूस जातीधर्माच्या, वर्णभेदाच्या चौकटीत विभागाला जात आहे. अशावेळी समाजाला एकसंध ठेवण्यासाठी बंधुत्वाची भावना जनमानसात रुजायला हवी. भाऊरावांनी शंभर वर्षांपूर्वी केलेले कार्य पुढे घेऊन जाण्याचे काम प्रकाश रोकडे करत आहेत. धर्मांधतेचे राजकारण आपण हणून पाडायला हवे. मतभेदांना दूर करून सामाजिक समरसता जोपासण्याचे काम बंधुतेचा विचार करतो. बंधुतेची ही चळवळ विश्वव्यापी होतेय, याचा आनंद वाटतो.” डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले, “समता आणि बंधुता जपणारा माणूस आपल्याला बनायचे आहे. शाहू महाराजांकडून ज्या पद्धतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रेरणा घेतली तशी प्रेरणा आपल्याला घयायची आहे. अशा महापुरुषांचा विचार जपण्यासाठी आज बंधुतासारख्या संस्थांची गरज आहे. पारंपरिक बुरसटलेल्या विचारांना छेद देऊन भाऊराव पाटलांनी जसे शिक्षणाला प्राधान्य दिले त्याप्रमणे आज प्रत्येकाने शिक्षित होणे गरजेचे आहे. समाजात जर का सर्व बाजूनी परिवर्तन घडवायचे असेल तर शिक्षणाशिवाय याला पर्याय नाही. “ बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणले, “छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच रयतेचा विचार केला. आपल्याला लोकशाहीचे, मानवतावादाचे धडे त्या काळापासून दिले आहेत. मात्र अलीकडच्या काळात रयतेला जाती-धर्माच्या नावाने लढवले जात आहे. आरक्षणाच्या नावाखाली देशातील रयतेला एकमेकांसोबत झुंजत ठेवले जात आहे. ही गोंधळाची परिस्थिती निवारण्यासाठी हे रयत संमेलन आहे. आज प्रत्येकाच्या घरात संविधान असणे महत्त्वाचे आहे. साहित्यिकांनी अपप्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे.” प्रा. डॉ. अरुण आंधळे यांनी प्रास्ताविक केले. संगीता झिंजुरके यांनी अमोघ सूत्रसंचालन केले. रमेश पतंगे यांच्या सनई चौघडा वादनाने कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली. प्रा. शंकर आथरे यांनी आभार मानले.
समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या आगामी मराठी चित्रपटाची मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मॉडेल शान्वी श्रीवास्तव मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शान्वी श्रीवास्तव हिने दाक्षिणात्य चित्रपटांच्या दुनियेत चांगलंच नाव कमवलं आहे. शान्वीने २०१२ मध्ये तेलुगू चित्रपट लव्हली द्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते.‘अड्डा’,‘प्यार में पडीपोयने’,‘भले जोडी’,‘मुफ्ती’,‘चंद्रलेखा’ यासारख्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.
‘रानटी’ चित्रपटात मैथिली या महत्त्वाच्या भूमिकेत शान्वी दिसणार आहे. ‘रानटी’ या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला. सोबतच दिग्दर्शक समित कक्कड सारख्या नावाजलेल्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभवही कमालीचा असल्याचा ती सांगते. या चित्रपटातून तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहस दृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे.
पुणे-मागील एका वर्षाचे कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचा-यांना आपले कर्तव्य बजावत असताना, वीरमरण आले, अशा संपुर्ण भारत देशातील सर्व राज्य, केंद्रातील निमलष्करी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार / जवान यांचे स्मृतिला आज दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०७/३० वा.ते ०९/०० वा.चे दरम्यान पाषाण रोड स्थित महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र, (सीपीआर), पाषाण पुणे येथील पोलीस हुतात्मा स्मृतिस्थळावर पोलीस दलाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. लडाख येथे दि.२१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी हॉटस्प्रिंग या कडाक्याच्या थंडीच्या ठिकाणी, सुसज्ज चिनी सैन्याने केंद्रीय निमलष्करी पोलीस दलाच्या १० शुर शिपायांच्या तुकडीवर पुर्व तयारी निशी अचानक हल्ला केला. त्यावेळी त्या १० शुर वीरांनी शत्रुशी निकराने लढत देऊन देशासाठी आपले देह धारातिर्थी ठेवले. तेव्हापासुन २१ ऑक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलाचे वतीने पोलीस स्मृतीदिन म्हणुन पाळला जातो. पोलीस स्मृतिदिनाचे दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाचे ठिकाणी मागील एका वर्षाचे कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत असताना प्राणांची आहुती दिली त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते.
आज महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधनकेंद्र, (सीपीआर), पाषाण पुणे येथील पोलीस हुतात्मा स्मृति स्मारकावर सकाळी ०८/०० वा. श्री. दत्ता पडसलगीकर मानद संचालक महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी पुणे व माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य तसेच श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी- चिंचवड, पुणे, दीपक पाण्डये अप्पर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण माहिती तंत्रज्ञान व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे,सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, शशीकांत महावरकर पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी अप्पर आयुक्त, पिंपरी चिंचवड पुणे, अरविंद चावरिया अप्पर पोलीस आयुक्त, प्रशासन पुणे शहर, शैलेश बलकवड अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर, मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, अतुल पाटील पोलीस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग, पंकज देशमुख पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, तुषार दोशी पोलीस अधिक्षक, पुणे लोहमार्ग व पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी (तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कृष्णन, नारायण स्वामी, चंद्रशेखर दैठणकर, मकरंद रानडे, रामराव वाघ, मानगावकर, प्रकाश मुत्याळ, श्री. शेषराव सुर्यवंशी, प्रभाकर ढमाले, राम मांडुरके, आर.एस. खैरे, सी.जी. कुंभार, अरुण वालतुरे, जाफरभाई शेख, सुनिल देशमुख, राम पठारे असे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवर, पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी पुष्प अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली.
दि.१ सप्टेंबर २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत महाराष्ट्रातील १. पोलीस उप निरीक्षक प्रकाश नाना शिंदे २. पोलीस कॉन्सटेबल राहूल गोपीचंद पवार ३. पोलीस कॉन्सटेबल वैभव सुनिल वाघ असे ०३ पोलीस जवान कर्तव्यावर असताना शहिद झाले. या प्रसंगी शोक कवायतीचे आयोजन करण्यात आले होते. शोक कवायतीसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालया कडील एक प्लाटुन, पुणे ग्रामीण कडील एक प्लाटुन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालया कडील एक प्लाटुन, पुणे लोहमार्ग कडील एक प्लाटुन व राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१ व २ यांचेकडील प्रत्येकी एक प्लाटुन अशा एकुण ०६ प्लाटुन मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तसेच बॅण्ड पथका मध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण यांचे कडील वाद्य-वृंदांनी भाग घेतला होता. परेड कमांडर, राखीव पोलीस निरीक्षक, मुख्यालय, पुणे शहर दशरथ हटकर, व सेकंड परेड कमांडर, राखीव पोलीस उप-निरीक्षक, मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे संजय जाधव यांनी परेड कवायतीचे नेतृत्व केले. पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण, बिनतारी संदेश विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग, मोटार परिवहन विभाग पुणे, विविध शाखा या विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, पोलीस दवाखाना वैद्यकीय स्टाफ यांचेसह हजर होते. दि.१ सप्टेंबर २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत आपले कर्तव्य बजावित असताना, वीरगती प्राप्त झालेल्या देशातील पोलीस अधिकारी व पोलीस जवान (सर्व दर्जाचे) असे एकुण २१४ जवानांच्या नावाच्या यादीचे वाचन शोक कवायत्तीचे दरम्यान नंदिनी वाग्याणी सहा. पोलीस आयुक्त, वाहतुक शाखा, पुणे शहर व अनुजा देशमाने सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालनसिताराम नरके, सेवानिवृत्त, सहा. पो. फौज. एसआरपीएफ, ग्रुप, रामटेकडी, पुणे व दत्तात्रय निकम, पोलीस अंमलदार, पिंपरी पो.स्टे. यांनी केले.
पुणे-महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ साठी आचार संहिता लागू झाली आहे. सध्या रेशनिंग दुकानातून शिधापत्रिकाधारकांना दिवाळीचा गोड शिधा वाटप चालू आहे. हा शिधा देण्यासाठी ज्या पिशव्या वापरण्यात आल्या आहेत त्या पिशव्यांवरती भारताचे पंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आदींचे फोटो छापलेले असून त्यांची जाहिरातबाजी चालू आहे. आचार संहितेच्या काळात अशी जाहिराबाजी करून तीचा भंग केला जात आहे.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेसच्या शिष्ट मंडळाने मुख्य निवडणुक अधिकारी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान रेशनिंग दुकानातून गोड शिधा वाटपाच्या पिशव्यांवर छापण्यात आलेले फोटो व त्यांची जाहिरात या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच त्वरीत रेशनिंग दुकानदारांना आदेश देवून हे थांबविले पाहिजे व जाहिरात केल्या प्रकरणी आचार संहिता भंग केल्याबाबत संबंधितांवर त्वरीत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रविंद्र धंगेकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, उपाध्यक्ष अजित दरेकर, संजय बालगुडे, मुख्तार शेख, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, राजू ठोंबरे व मुकेश धिवार आदी उपस्थित होते.
मीना कुर्लेकर यांची माहिती; वंचित विकास अभयाच्या वतीने एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे आयोजन पुणे : वंचित विकास अभयाच्या वतीने ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ हे छोट्या व्यावसायिकांचे प्रदर्शन येत्या २५, २६ व २७ ऑक्टोबर २०२४ या तीन दिवशी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत नवी पेठेतील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन यशस्वी उद्योजिका अनघा अजित चाफळकर यांच्या हस्ते होईल, अशी माहिती वंचित विकास संस्थेच्या कार्यवाह मीना कुर्लेकर यांनी दिली. प्रसंगी वंचित विकासच्या संचालिका सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले, मीनाक्षी नवले, चैत्राली वाघ आदी उपस्थित होते. मीना कुर्लेकर म्हणाल्या, “वंचित विकास संस्था गेली चाळीस वर्ष स्त्रिया आणि मुलांमध्ये काम करते. छोट्या व्यावसायिकांचे प्रशिक्षण घेते व त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देते. यंदा प्रदर्शनात २५ ऑक्टोबरला सायंकाळी खास महिलांसाठी होम मिनिस्टर हा खेळ, तर २६ ऑक्टोबरला सायंकाळी मुलांसाठी गंमत जत्रा असणार आहे. यासह दिवाळीच्या वस्तू, फराळ, इमिटेशन ज्वेलरी, खाद्यपदार्थ, गिफ्ट आर्टिकल्स, कपडे, मुलांसाठी विज्ञान खेळणी, तसेच उत्तम प्रतीचा सुकामेवा निम्म्या किमतीत उपलब्ध असेल. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.” या प्रदर्शनात वापरण्यायोग्य कपडे, भांडी, वर्तमानपत्राची रद्दी आणि सर्व प्रकारचे ई-वेस्ट संकलित केले जाणार आहे. वंचित विकास प्रबोधनाचे काम करते. प्रत्येक भारतीयाने मतदान करावे, असे जागृती अभियानही या प्रदर्शनातून केले जाणार आहे. एकल महिलांच्या सन्मानासाठी अभया संबोधावे, असा शासन आदेश येण्यासाठी सही अभियानही करणार आहोत. दिवाळीच्या निमित्ताने पुण्यामध्ये अनेक प्रदर्शने असतात. पण सामाजिक संस्थेने महिला उद्योजकांसाठी आयोजित केलेले हे प्रदर्शन आहे. या छोटया व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी जरुर यावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ची वैशिष्ट्ये– छोट्या व महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन, आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यासपीठ- दि. २५ ते २७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत विनामूल्य खुले- उत्तम प्रतीचे ड्रायफ्रूट निम्म्या किमतीत उपलब्ध होणार- शाळेतील मुलांनी बनवलेल्या हात कागदाच्या वस्तू- बचत गटातील महिलांची विविध उत्पादने, खाद्यपदार्थ असतील- हँडमेड ज्वेलरी, कलमकारी कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, हस्तकला, गिफ्ट आर्टिकल्स, होम डेकोरेशन, फराळ आदी
पुणे :सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली-२० मध्ये रेरा कायद्याची पायमल्ली करून झालेल्या दस्त नोंदणीची चौकशी करण्यासाठी तपासणी पथक नियुक्त करण्यात आले आहे.सह जिल्हा निबंधक (मुद्रांक जिल्हाधिकारी) संतोष हिंगणे यांनी तसा आदेश काढला आहे.तपासणी पथकामध्ये एक सह दुय्यम निबंधक वर्ग-१,दोन वरिष्ठ लिपिक,एक कनिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे.
या प्रकरणी चौकशीची मागणी लोकजनशक्ती पार्टी रामविलासचे पुणे शहराध्यक्ष संजय आल्हाट यांनी दि.८ ऑक्टोबर रोजी सह जिल्हा निबंधक (मुद्रांक जिल्हाधिकारी) यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती.बांधकामाच्या ग्रामपंचायत परवानग्या असलेल्या दस्तांची सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली-२० मध्ये नोंदणी करण्यात आल्या.त्यातून महा रेरा कायद्याची पायमल्ली करण्यात आली.१५ ऑगस्ट २०२४ पर्यंत आणि नंतरही येथील अधिकाऱ्याने दस्त नोंदणी चालू ठेवली.हे दस्त सर्व आवश्यक बांधकाम परवानग्या घेऊन केलेले आहेत का आणि कबुली जबाबासाठी राखून ठेवले आहेत का याची चौकशी व्हावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित उपनिबंधकाचा पदभार काढून घेण्यात यावा,अशी मागणी या निवेदनात करण्यात आली होती.अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तसेच पुणे जिल्हाधिकारी यांनाही या निवेदनाची प्रत पाठविण्यात आली होती.या पाठपुराव्याची दखल घेऊन तपासणी पथक नियुक्त करण्यात आले असून त्यात एक सह दुय्यम निबंधक वर्ग -१,दोन वरिष्ठ लिपिक,एक कनिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे.
कायद्याची पायमल्ली करून अवैधरित्या दस्त नोंदणी करणे हा गंभीर प्रकार असून तपासणी पथकाने तातडीने तपासणी करून गैर प्रकार उघडकीस आणावेत आणि या द्वारे दोषींना शिक्षा व्हावी,असे लोकजनशक्ती पार्टी रामविलासचे पुणे शहराध्यक्ष संजय आल्हाट यांनी म्हटले आहे.
मुंबई-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिवसा राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात रात्री एक गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीत महायुतीने मनसेच्या निवडक उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचा मोठा दावा केला जात आहे. या वार्तेमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांच्यात रात्री उशिरा मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत शिवडी वरळी, माहीमसह अन्य काही मतदार संघांतील लढतीवर चर्चा झाली. जवळपास 2 तास चाललेल्या या बैठकीचा अधिकृत तपशील अद्याप समोर आला नाही. पण त्यात महायुतीने मनसेच्या काही निवडक उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघांत बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. मनसेने ही विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. त्यातच महायुतीने मनसेला निवडक जागांवर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मध्यरात्री 12 वा. नागपूरहून मुंबईत पोहोचले. त्यानंतर त्यांचा ताफा मुंबई विमानतळावरून निघाला. या दोन्ही नेत्यांचा ताफा वरळीपर्यंत आला आणि त्यानंतर तो अज्ञातस्थळी गेला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही ठाण्याहून मुंबईच्या दिशेने निघाले. त्यानंतर मध्यरात्री उशिरा शिंदे, फडणवीस व राज ठाकरे यांची एका हॉटेलमध्य भेट झाली. त्यानंतर पहाटे 3 च्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे आपल्या वर्षा निवासस्थानी, तर देवेंद्र फडणवीस आपल्या सागर बंगल्यावर गेले.
उल्लेखनीय बाब म्हणजे राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. महायुती आता मनसेच्या निवडक उमेदवारांना पाठिंबा देऊन राज ठाकरे यांच्या पाठिंब्याची परतफेड करणार असल्याची माहिती आहे.
मनसेच्या 7 उमेदवारांच्या नावांची घोषणा-मनसेने आतापर्यंत शिवडी, पंढरपूर, लातूर ग्रामीण, हिंगोली, चंद्रपूर, राजुरा व यवतमाळ या 7 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यात मुंबईतील शिवडी मतदारसंघातून मनसेने आपले ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना संधी दिली आहे. तर पंढरपूर येथून दिलीप धोत्रे, लातूर ग्रामीण येथून संतोष नागरगोजे, हिंगोली येथून बंडू कुटे, चंद्रपूर येथून मनदीप रोडे, राजुरा येथून सचिन भोयर व यवतमाळ येथून राजू उंबरकर यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.
चौथ्यांदा चौकार नाही तर षटकार मारणार -बंड तर २४ तासात शमणार
पुणे- तीन वेळा ज्या जनतेने मला निवडून दिले माझ्यावर विश्वास टाकला त्या जनतेच्या शुभेछ्या आणि नेत्यांची मिळत असलेली साथ यामुळे मला भाजपची उमेदवारी पुन्हा म्हणजे चौथ्यांदा मिळाली असून आता मी चौकार नव्हे तर षटकार मारून विजयी होईल अशी हर्षदायी प्रतिक्रिया माधुरी मिसाळ यांनी माय मराठी ला दिली , आता पर्वती मतदार संघाचे मंत्रीपद देखील दूर नसल्याची यावेळी त्यांच्या समर्थकांनी स्पष्ट केले . काल भाजपच्या पहिल्या ९९ उमेदवारांच्या यादीत माधुरी मिसाळ यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यंच्या समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला .श्रीनाथ भिमाले यांच्या भूमिकेबाबत विचारता त्यांनी भिमालेंना आपण बरोबर घेऊन काम करत आलो आणि करत राहू असेही सांगितले आज उद्याच त्यांची भेट घेऊन त्यांनाही बहिणीच्या नात्याने समवेत ठेउनच प्रचार आमचा सुरु असेल असे त्या म्हणाल्या .
तीन वेळा पर्वती जिंकलेल्या माधुरी मिसाळ यांच्याबद्दल ….
माधुरी सतीश मिसाळ भाजप उमेदवार पर्वती मतदारसंघ
शिक्षण बीकॉम
2007 पुणे महापालिकेत नगरसेविका
2009, 2014, 2019 पर्वती मतदारसंघातून सलग तीनदा आमदार
सध्याच्या विधानसभेत प्रतोद अशी जबाबदारी
भाजपा, पुणे शहर माजी अध्यक्ष
लोकलेखा समिती सार्वजनिक उपक्रम समिती या समितीच्या सदस्य
पुणे महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता येण्यात महत्त्वाचा वाटा
पर्वती विधानसभा मतदारसंघातून 22 नगरसेवक निवडून आणले
विद्या सहकारी बँकेच्या माजी अध्यक्ष उद्यम सहकारी बँक संचालिका
सतीश धोंडीबा मिसाळ प्रतिष्ठान अध्यक्ष
माजी स्थायी समिती अध्यक्ष सतीश मिसाळ यांच्या पत्नी
स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देणाऱ्या क्रांतिकारक केशवराव देशपांडे यांची नात
महत्त्वाची विकासकामे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुरुवातीपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा पुणे मेट्रो, स्वारगेट मल्टी मोडेल हब, सिंहगड रस्ता उड्डाणपूल, पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्राम, पर्वती देवस्थान विविध विकासकामे, तळजाई वन आराखडा, बिबवेवाडी येथे ईएसआयसी 500 बेडचे रुग्णालय
मागील तीन वेळा पर्वती मतदारसंघातील मतदारांनी मला प्रचंड बहुमताने विजयी केले. यंदा पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला याबद्दल मी पक्षाची, महायुतीची ऋणी आहे. गेल्या पंधरा वर्षात पर्वती परिसरासाठी मी केलेल्या विकासकामांची साक्षीदार असलेले मतदार मला पुन्हा एकदा विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील, याची खात्री आहे.- माधुरी मिसाळ
आचारसंहिता लागण्यापूर्वी सुरु असलेल्या योजना बंद करण्याचा अधिकार आयोगाला आहे काय ?
सातारा-: लाडकी बहिण योजना निवडणुका जाहीर होण्यापूर्वीची योजना आहे,निवडणुका लागण्यापूर्वी २/३ महिने अगोदर पासून महिलांना पैसे द्यायला सुरुवात झालेली योजना आहे . ती आचार संहितेचे कारण देऊन निवडणूक आयोगाने बंद केली असा खोटा प्रचार करण्यात येत असून ,आचारसंहिता असल्याने लाडकी बहीण योजना काही महिने बंद केल्याचे सांगत राज्य सरकार खोटे बोलत आहे. राज्य सरकारने ही योजना आर्थिक टंचाईमुळे व सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने बंद केली असून, राज्यातील लाडक्या बहिणींना महायुतीने फसविल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. जिल्हा काँग्रेस कमिटीत पदाधिकाऱ्यांचा आढावा बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. चव्हाण म्हणाले, “महाविकास आघाडीची पहिली जागा वाटप यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाचा निर्णय सुरू असून, दोन दिवसांनंतर अर्ज भरले जाणार आहेत. काँग्रेसचे दोन राष्ट्रीय पातळीवरील निरीक्षक महाराष्ट्रात आले आहेत. महाविकास आघाडीचा निवडणूक जाहीरनामा अंतिम टप्प्यात आला आहे. पंचसूत्री गॅरंटी कार्डद्वारे आश्वासन दिले जाणार आहे. पुढील पाच वर्षांचे व्हिजन असे तीन टप्प्यात जाहीरनामा येत आहे. आजची लढाई विचारधारेची आहे. काँग्रेस सरकारने दिलेल्या वचननाम्यानुसार कर्नाटक, तेलगंणामध्ये आम्ही जे बोललो ते दिलेच आहे.” “भाजपने लाडकी बहीण योजना बंद केली असून, शेतकरी सन्मान योजना बंद होणार आहे का? प्रधानमंत्री आवाज योजना थांबणार आहे का? याचे उत्तर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी द्यावे. हे महायुतीसरकार योजना कोणाची, या श्रेयवादात अडकले. लोकांची दिशाभूल करून निवडणुका जिंकता येत नाहीत. कृषीविषयक धोरणामुळे दररोज महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा जास्त आत्महत्या होत आहेत. विधानसभेची आजची लढाई ही विचारधारेची आहे. यामध्ये महायुती सरकार पैशाचा वापर करत आहे. या निवडणुकीत राज्यातील जनतेचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सातारा जिल्हा हा फुले- शाहू आंबेडकर यांच्या विचारावरच चालणार आहे. शिवछत्रपतींच्या आदर्शावर आम्ही चालणार आहोत. जाती-धर्माचे विभाजन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. परंतु भाजप हा सत्तेसाठी हापापलेला पक्ष असून, केंद्रातील सत्तेचा गैरवापर करत आहे,” असा आरोप चव्हाण यांनी केला.