पुणे-महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ साठी आचार संहिता लागू झाली आहे. सध्या रेशनिंग दुकानातून शिधापत्रिकाधारकांना दिवाळीचा गोड शिधा वाटप चालू आहे. हा शिधा देण्यासाठी ज्या पिशव्या वापरण्यात आल्या आहेत त्या पिशव्यांवरती भारताचे पंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आदींचे फोटो छापलेले असून त्यांची जाहिरातबाजी चालू आहे. आचार संहितेच्या काळात अशी जाहिराबाजी करून तीचा भंग केला जात आहे.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेसच्या शिष्ट मंडळाने मुख्य निवडणुक अधिकारी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान रेशनिंग दुकानातून गोड शिधा वाटपाच्या पिशव्यांवर छापण्यात आलेले फोटो व त्यांची जाहिरात या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच त्वरीत रेशनिंग दुकानदारांना आदेश देवून हे थांबविले पाहिजे व जाहिरात केल्या प्रकरणी आचार संहिता भंग केल्याबाबत संबंधितांवर त्वरीत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रविंद्र धंगेकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, उपाध्यक्ष अजित दरेकर, संजय बालगुडे, मुख्तार शेख, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, राजू ठोंबरे व मुकेश धिवार आदी उपस्थित होते.