Home Blog Page 63

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत 12 नोव्हेंबर रोजी पुणे येथे संवाद सत्राचे आयोजन

पुणे,  4 नोव्हेंबर 2025

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्या मार्फत नागरिकांच्या पासपोर्ट संबंधित समस्यांचे निराकरण  करण्याच्या उद्देश्याने पुणे येथे संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. याचा तपशील पुढीलप्रमाणे-

तारीख – 12 नोव्हेंबर 2025 (बुधवार)

स्थळ – प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयपासपोर्ट बिल्डींगसर्व्हे नंबर 5/2/2 बाणेर-पाषाण लिंक रोडबाणेर, पुणे

वेळ – दुपारी 3 ते 5.

या संवाद सत्रादरम्यान, पासपोर्ट अर्जदार त्यांच्या पासपोर्ट अर्ज/तक्रारीशी संबंधित प्रश्नांसाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटू शकतात.

खालील तपशीलांचा आगाऊ उल्लेख करून rpo.pune@mea.gov.in वर लिहिण्याची विनंती आहे पाठवा.

फाइल क्रमांक 
नवीनतम पासपोर्ट क्रमांक (जर असेल तर) 
नाव 
प्रश्न थोडक्यात 

बिबट्यापासून संरक्षणासाठी पुण्यात २० रेस्क्यू टीम, ५०० पिंजरे, अत्याधुनिक उपकरणांसह उपाययोजना:११ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर

मनुष्यहानी रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य;
नागरिकांना घाबरुन जाऊ नये
-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ४ :- मागील काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांमध्ये मानव-बिबट्या संघर्षाची परिस्थिती गंभीर बनली आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि मानवी वस्त्यांमध्ये त्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील पाच वर्षांत झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. नुकत्याच झालेल्या हल्ल्यांत एका १३ वर्षीय चिमुरड्याचा, तसेच एका वृद्ध महिलेसह लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीची दखल घेत बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी आणि मानव-बिबट संघर्षावर नियंत्रण आणण्यासाठी तब्बल ११ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मनुष्यहानी रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरुर या तालुक्यात ऊसाचे क्षेत्र, पाण्याच्या मुबलकतेसह अनुकुल वातावरणामुळे गेल्या काही वर्षात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या भागात बिबट्या आणि नागरिकांच्यात सातत्याने संघर्ष होत आहे. याला पायबंद घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आंबेगावचे स्थानिक आमदार, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ११ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या मंजूर निधीतून जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात २० विशेष रेस्क्यू टीम कार्यरत होणार असून प्रत्येक टीममध्ये प्रशिक्षित नेमबाज, शोधक, ट्रँक्युलायझिंग गन, रेस्क्यू वाहने, अत्याधुनिक कॅमेरे, पिंजऱ्यांसह आवश्यक उपकरणांचा समावेश असेल.

या मोहिमेत ५०० पिंजरे, २० ट्रँक्युलायझिंग गन, ५०० ट्रॅप कॅमेरे, २५० लाईव्ह कॅमेरे, ५०० हाय-पॉवर टॉर्च, ५०० स्मार्ट स्टिक, २० मेडिकल इक्विपमेंट किट्स यांसह प्रत्येक टीमसाठी ५-६ प्रशिक्षित सदस्य असणार आहेत. जुन्नर वनविभागात ६११.२२ चौ.कि.मी. क्षेत्र आहे ज्यात जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या चार तालुक्यांचा समावेश आहे. घोड, कुकडी, माणिकडोह, पिंपळगाव जोगा यांसारख्या सिंचन प्रकल्पांमुळे या भागात ऊस, केळी, द्राक्ष, डाळिंब यांसारखी दिर्घकालीन बागायती पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या बागायती पिकांमुळे बिबट्यांना लपण्यासाठी निवारा, पाणी आणि भक्ष्य सहज उपलब्ध होते. परिणामी या भागात बिबट्यांचा स्थायिक अधिवास निर्माण झाला असून अंदाजे १५०० बिबट्यांचे अस्तित्व असल्याचे वनविभागाचे निरीक्षण आहे.
या निधीसाठी आंबेगावचे आमदार तथा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ११ कोटी २५ लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला. यापूर्वीही जिल्हा नियोजन मंडळामार्फत २ कोटी रुपयांचा निधी पिंजरे खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून पिंजरे खरेदीचे कार्यादेश देण्यात आले आहेत.

मनुष्यहानी रोखणे हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य…
या ठोस उपाययोजनांमुळे बिबट्यांना मानवी वस्त्यांपासून सुरक्षित अंतरावर ठेवणे, त्यांना योग्य ठिकाणी स्थलांतरित करणे आणि मनुष्यहानीचे प्रमाण कमी करणे शक्य होईल. मानव-बिबट संघर्षामुळे सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी आणि वन्यजीवांचे संरक्षण करताना मानवी जीविताचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. या निधीतून रेस्क्यू टीम, पिंजरे आणि तांत्रिक साधनसामग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. कारवाई तातडीने सुरू होईल, मनुष्यहानी रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

भूकरमापक संवर्गातील पद भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन

पुणे, दि. ४: भूमी अभिलेख विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी १३ व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाइन परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी विभागाच्या https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (कंप्युटर बेस्ड टेस्ट) १३ नोव्हेंबर रोजी सत्र १ (सकाळी ८ वाजता) मध्ये पुणे व अमरावती विभागासाठी व सत्र २ (दुपारी १२ वाजता) मध्ये नाशिक व नागपूर विभागासाठी घेण्यात येणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी सत्र १ (सकाळी ८ वाजता) मध्ये मुंबई (कोकण) विभागासाठी तर सत्र २ (दुपारी १२ वाजता) मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या ४ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात येत असल्याने उमेदवाराचे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका किंवा अन्य ठिकाणी असू शकते. परीक्षा केंद्र बदलण्याबाबत उमेदवाराच्या कोणत्याही विनंतीचा विचार करण्यात येणार नाही. परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. काही अपरिहार्य कारणास्तव परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल झाल्यास त्याबाबतची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.
0000

बाजीराव रस्त्यावर भर दुपारी हत्येचा थरार

जनता वसाहतीत २ महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला वचपा; बाजीराव रोडवर भर दिवसा युवकाचा कोयत्याने वार करुन खुन

पुणे- शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजीराव रस्त्यावर आज भर दुपारी गर्दीच्या वेळेत घडलेल्या कोयत्याच्या खुनी हल्ल्याने खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणांवर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मयंक खरारे (वय २३) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दुचाकीवरुन जाणार्‍या दोघा युवकांवर मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी कोयत्याने सपासप वार करुन एका १७ वर्षाच्या तरुणाचा भरदिवसा खुन केला.मयंक सोमदत्त खरारे (वय १७, रा. साने गुरुजीनगर, आंबिल ओढा) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा मित्र अभिजित संतोष इंगळे (वय १८, रा. दांडेकर पुल) यालाही कोयता लागून जखम झाली आहे.मयंक खरारे हा मुळचा मंगळवार पेठेत राहणारा आहे. त्याची आई महापालिकेत कामाला आहे. त्यामुळे त्यांना साने गुरुजीनगर येथे खोली मिळाली आहे. तेथे ते राहतात. दोन महिन्यांपूर्वी जनता वसाहतीतील मुलांबरोबर त्याची भांडणे झाली होती.मयंक खरारे आणि अभिजित इंगळे हे दुचाकीवरुन दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगरकडे जात होते. बाजीराव रोडवरील टेलिफोन भवन जवळ मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. त्यांनी मयंक खरारे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यात तो जागीच कोसळला. त्याचा वाचविण्यासाठी गेलेल्या अभिजित इंगळे यालाही कोयता गालाला लागून जखम झाली. आपली ओळख लपविण्यासाठी हल्लेखोरांनी तोंडाला मास्क लावला होता.या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयंक खरारे याला तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला. बाजीराव रोडवरील सीसीटीव्हीद्वारे हल्लेखोरांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु आहे. खडक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत असून हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

अंधश्रद्धेने पोखरले .. अंगात शंकर महाराज येंत अशी बतावणी करून १४ कोटी लुबाडले ..

पुणे : ‘अंगात शंकर महाराज येतात’ अशी बतावणी करून उच्चशिक्षित दाम्पत्याला तब्बल १४ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोथरुड परिसरातील या प्रकरणात दीपक खडके आणि वेदिका पंढरपूरकर या दाम्पत्याने दीपक डोळस या आयटी इंजिनिअर आणि त्यांच्या पत्नीची सात वर्षांपासून फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी ‘अंगात शंकर महाराज येतात’ असा दावा करून डोळस दाम्पत्याचा विश्वास संपादन केला. त्यांच्या मुलींच्या आजारपणावर उपायाच्या नावाखाली त्यांनी विविध धार्मिक विधी, पूजापाठ आणि दानधर्मासाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेण्यास सुरुवात केली.या कालावधीत त्यांनी डोळस दाम्पत्याला इंग्लंडमधील घर, फार्महाऊस, प्लॉट आणि फ्लॅट विकायला लावले. सर्व संपत्ती विकून आलेले पैसे आरोपींनी स्वतःच्या खात्यात वळवले असल्याचे तपासात उघड झाले आहे.अखेर शेवटचे घर विकण्यास डोळस दाम्पत्याने विरोध दर्शवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक चौकशीत आरोपींनी या फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून कोथरुड परिसरात आलिशान बंगला विकत घेतल्याचेही उघड झाले आहे.

एसबीआयने येस बँकेतील 13% हिस्सा विकला:नफा वाढून ₹20,160 कोटींवर पोहोचला, शेअर्सने ₹959 चा उच्चांक गाठला

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत ₹२०,१६० कोटींचा स्वतंत्र निव्वळ नफा नोंदवला आहे, जो मागील वर्षीच्या तुलनेत १०% वाढ आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत SBI ने ₹१८,३३१ कोटींचा नफा नोंदवला होता.एसबीआयच्या नफ्यात येस बँकेतील १३.१८% हिस्सा विकून मिळालेला ४,५९३.२२ कोटींचा नफा समाविष्ट आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत (Q2FY26) स्टेट बँकेचे एकूण व्याज उत्पन्न ₹१.२० लाख कोटी होते, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत ₹१.१३ लाख कोटी होते. हे वर्षानुवर्षे ५.०८% वाढ दर्शवते.दुसऱ्या तिमाहीत एसबीआयचे निव्वळ व्याज उत्पन्न ₹४२,९८४ कोटी (अंदाजे $१.८ अब्ज) होते, जे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ₹४१,६२० कोटी (अंदाजे $४.८ अब्ज) होते. हे वर्षानुवर्षे ३.२८% वाढ दर्शवते.निव्वळ एनपीए ९% ने घटून १८,४६० कोटी रुपये झाले.

दुसऱ्या तिमाहीत (Q2FY26) बँकेचा निव्वळ NPA (नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स) 9.04% ने कमी होऊन ₹18,460 कोटी झाला, जो जुलै-सप्टेंबर 2025 या कालावधीत ₹20,294 कोटी होता.

दुसऱ्या तिमाहीत एसबीआय बँकेचा नफा १०% वाढला

वार्षिक आधारावर

एसबीआय बँकआर्थिक वर्ष २६ (जुलै-सप्टेंबर)आर्थिक वर्ष २५ (जुलै-सप्टेंबर)परतावा (%)
व्याज उत्पन्न₹१.२० लाख₹१.१३ लाख६%
इतर उत्पन्न₹१५,३२५₹१५,२७००.३६%
एकूण उत्पन्न₹१.३४ लाख₹१.२९ लाख४%
एकूण खर्च₹१.०७ लाख₹०.९९ लाख८%
निव्वळ नफा₹२०,१६०₹१८,३३११०%
एकूण एनपीए₹७६,२४३₹८३,३६९-८%
एकूण एनपीए %१.७३%२.१३%,
निव्वळ एनपीए₹१८,४६०₹२०,२९४-९%
निव्वळ एनपीए %०.४२%०.५३%,

तिमाही आधारावर

एसबीआय बँकआर्थिक वर्ष २६ (जुलै-सप्टेंबर)आर्थिक वर्ष २५ (एप्रिल-जून)परतावा (%)
व्याज उत्पन्न₹१.२० लाख₹१.१७ लाख३%
इतर उत्पन्न₹१५,३२५₹१७,३४५-११%
एकूण उत्पन्न₹१.३४ लाख₹१.३५ लाख-०.७%
एकूण खर्च₹१.०७ लाख₹१.०४ लाख३%
निव्वळ नफा₹२०,१६०₹१९,१६०५%
एकूण एनपीए₹७६,२४३₹७८,०४०-२%
एकूण एनपीए %१.७३%१.८३%,
निव्वळ एनपीए₹१८,४६०₹१९,९०८-७%
निव्वळ एनपीए %०.४२%०.४७%,

टीप: आकडे कोटी रुपयांमध्ये आहेत.

एसबीआयने १७ सप्टेंबर रोजी येस बँकेतील १३.१८% हिस्सा विकला होता.

एसबीआयने १७ सप्टेंबर २०२५ रोजी येस बँकेतील त्यांचा १३.१८% हिस्सा प्रति शेअर ₹२१.५० या दराने विकला, ज्यामुळे त्यांना ₹४,५९३.२२ कोटी नफा झाला. कंपनीने या नफ्याला अपवादात्मक उत्पन्न मानले आहे, जे भांडवली राखीव निधीमध्ये जमा केले जाईल.

हिस्सेदारी विक्रीनंतर, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत एसबीआयचा येस बँकेतील हिस्सा १०.७८% पर्यंत कमी होईल. तथापि, एसबीआयला अजूनही गुंतवणूक भागीदार मानले जाईल.

स्टँडअलोन आणि कंसॉलिडेटेड म्हणजे काय?

कंपनीचे निकाल दोन भागात येतात: स्टँडअलोन आणि कंसॉलिडे​​​​​​टेड. स्टँडअलोन अहवाल फक्त एकाच विभागाची किंवा युनिटची आर्थिक कामगिरी दर्शवितात. दुसरीकडे, कंसॉलिडेटेड आर्थिक अहवाल संपूर्ण कंपनीचा व्यापक अहवाल प्रदान करतात.

वसूल न झालेली रक्कम एनपीए होते.

एनपीए म्हणजेच नॉन-परफॉर्मिंग अॅसेट म्हणजे बँक कर्ज किंवा क्रेडिट जे कर्जदार किंवा संस्था वेळेवर परतफेड करू शकत नाही.

सोप्या भाषेत सांगायचे तर, जर एखाद्या व्यक्तीने किंवा कंपनीने बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता किंवा व्याज ९० दिवस किंवा त्याहून अधिक काळ भरले नाही तर ते कर्ज एनपीए होते.

यामुळे बँकेचे नुकसान होते, कारण वसुली करणे कठीण होते. समजा तुम्ही बँकेकडून १० लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ ईएमआय भरला नाही, तर ते कर्ज एनपीए मानले जाईल.

एसबीआयच्या शेअर्सनी एका महिन्यात १०% परतावा दिला.

तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर आज एसबीआयचे शेअर्स १% वाढून ₹९५९.३० या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. एका महिन्यात ते १०% आणि एका वर्षात १५% वाढले आहेत.

गेल्या सहा महिन्यांत बँकेच्या शेअरमध्ये २१% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. एसबीआयचे मार्केट कॅप ₹८.८४ लाख कोटी आहे, ज्यामुळे मूल्यांकनानुसार ती देशातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी बनली आहे.

एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे.

एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. एसबीआयमध्ये सरकारचा ५५.५% हिस्सा आहे. ही बँक १ जुलै १९५५ रोजी स्थापन झाली. बँकेचे मुख्यालय मुंबईत आहे.

बँकेच्या २३,००० हून अधिक शाखा आहेत आणि ५० कोटींहून अधिक ग्राहक आहेत. ही बँक जगभरातील २२ देशांमध्ये कार्यरत आहे. भारताबाहेर तिच्या २४१ शाखा आहेत.

246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल

मुंबई- राज्यात गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज एका पत्रकार परिषदेद्वारे राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, या दोन्ही संस्थांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.या निवडणुकीत 1 कोटींहून अधिक मतदार मतदान करतील. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मशीन आणि बॅलेट युनिट वापरण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात10 नोव्हेंबर 2025
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत17 नोव्हेंबर 2025
उमेदवारी अर्जांची पडताळणी18 नोव्हेंबर 2025
अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत21 नोव्हेंबर 2025
अपिल असलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत25 नोव्हेंबर 2025
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी जाहीर26 नोव्हेंबर 2025
मतदानाचा दिवस2 डिसेंबर 2025
मतमोजणी3 डिसेंबर 2025
शासन राजपत्रात निकाल घोषित करण्याचा दिवस10 डिसेंबर 2025

कोणत्या विभागात किती नगरपरिषद – नगरपंचायतींसाठी होणार निवडणूक?
कोकण – 17

नाशिक -49

पुणे -60

संभाजीनगर -52

अमरावती -45

नागपूर -55
राज्यात एकूण किती मतदार?
एकूण मतदार – 1 कोटी 7 लाख 3 हजार 576

महिला मतदार – 53 लाख 22 हजार 870

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असतील. त्यामध्ये 53 लाख 22 हजार 870 महिला मतदार असतील. या निवडणुकांसाठी राज्यात एकूण 13 हजार कन्ट्रोल युनिट स्थापन करण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर रोजी सुरूवात होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असेल. त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाईल. अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर अशी असेल. तर अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 25 नोव्हेंबर ही असेल. 26 नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. याच दिवशी त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटपही केले जाईल. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. शासन राजपत्रात निकाल घोषित करण्याचा दिवस 10 डिसेंबर असेल.नगरपंचायतीत 1 सदस्य व 1 अध्यक्ष असतो. त्यामुळे त्यात मतदारांना दोन मते द्यावी लागतील. नामनिर्देशन हे पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. आयोगाने यासंबंधी एक पोर्टल तयार केले आहे. उमेदवारांना त्यावर आपले अर्ज भरता येतील. एका प्रभागात एका उमेदवाराला अधिकाधिक 4 उमेदवारी अर्ज भरता येतील. संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन जमा करावी लागेल. उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. पण ज्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे त्यांना अर्ज केल्याची पावती सादर करून आपला अर्ज भरता येईल.

ना. चंद्रकांतदादा कोथरुड मधील सर्व मुलींचे पालक झालेत- हभप चंद्रकांत महाराज वांजळे

चंद्रकांतदादांनी कोथरुडच्या वैभवात आणखी भर घातली!

श्री म्हातोबा बॅंक्वेट हॅाल लोकार्पणप्रसंगी सर्वसामान्य कोथरुडकरांची भावना

पुणे-मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुडच्या वैभवात आणखीनच भर घातली असून; कोथरुडकरांचे खऱ्या अर्थाने पालक आहेत, अशी भावना सर्वसामान्य कोथरुडकरांनी आज व्यक्त केली. चंद्रकांतदादा कोथरुड मधील सर्व मुलींचे पालक झाले आहेत, असे गौरवोद्गार हभप चंद्रकांत महाराज वांजळे यांनी काढले.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून कोथरुडचे ग्राम दैवत श्री म्हातोबा मंदिर परिसरात बॅंक्वेट हॉल उभारण्यात आला असून, त्याचे लोकार्पण ना. पाटील आणि सर्व कोथरुड ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी कोथरुड देवस्थानचे अध्यक्ष गजानन(नाना) भेलके, उपाध्यक्ष शंकर मोकाटे, सचिव संतोष माथवड, खजिनदार तानाजी गाढवे, सदस्य पंढरीनाथ दुधाने, महादेव वांभिरे, हभप चंद्रकांत महाराज वांजळे, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, विनय गानू, भाजप कोथरुड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, भाजप महिला मार्चा मध्य मंडल अध्यक्षा हर्षाली माथवड यांच्यासह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बॅंक्वेट हॅालच्या लोकार्पणप्रसंगी हभप चंद्रकांत महाराज वांजळे म्हणाले की, ना. चंद्रकांतदादा पाटील हे कोथरुड मधील गोरगरीबांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच कार्यरत असतात. कोथरुड मधील हजारो मुलींचे पालकत्व घेतलं आहे. त्यासाठी सुकन्या समृद्धी, सुखदा, मानसी, शिष्यवृत्ती, झाल अशा विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून कोथरुड मधील लेकींचे पालक झाले आहेत. त्यांचे कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व हे कोथरुडकरांना नेहमीच भावते. बॅंक्वेट हॉलच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबातील मुलींचे लग्न अतिशय थाटामाटात व्हावे; ह्यासाठी ही व्यवस्था उभी करुन गरीब कुटुंबातील मंगल कार्याची तजवीज केली आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे , अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

देवस्थानच्या तिजोरीत पैसे कमी पडणार नाहीत- मंत्री चंद्रकांत पाटील

हिंदू संस्कृतीत मंदिरातील दान पेटी ही समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी वापरली जात असते. कोथरुडचे ग्रामदैवत श्री म्हातोबांच्या आशीर्वादाने देवस्थानला समाज कार्यासाठी कधीही पैसे कमी पडले नाहीत, भविष्यात ही पडणार नाहीत. बॅंक्वेट हॉल उभारताना देवस्थान समितीला विनंती केली होती की, हा हॉल गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी अल्पदरात उपलब्ध करुन द्यावा. त्यामुळे हॅालच्या देखभालीसाठी 40 हजार आणि 20 हजार शुल्क घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एखाद्या गरजू कुटुंबाला तेवढी रक्कम देणे शक्य होत नसेल, तर ते देतील ती रक्कम देवस्थानने घ्यावी, उर्वरित रक्कम देवस्थान समितीला लोकसहभागातून देण्यासाठी प्रयत्न करु, असे ना. पाटील यांनी यावेळी आश्वास्त केले. तसेच, तीन वर्षे लोकसहभागातून हॅालची देखभाल व्यवस्था करु, अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी केली

हाय कोर्टाने मतदारयाद्यांशी संबंधित 4 याचिका फेटाळल्या

मुंबई- -मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मतदारयाद्यांशी संबंधित 4 याचिका फेटाळून लावल्या. या याचिकांद्वारे मतदारयाद्यांच्या मसुद्यावर आक्षेप घेण्यासाठी कमी कालावधी मिळाल्याचा आरोप घेण्यात आला होता. राज्य निवडणूक आयोगाकडून आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याच्या पार्श्वभूमीवर कोर्टाने या याचिका फेटाळल्या आहेत हे विशेष.

मुंबई उच्च न्यायालयात मतदार यादी, सीमांकन व आरक्षणाच्या संदर्भात 42 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिका नागपूर व औरंगाबाद खंडपीठातून मुंबई हायकोर्टात वर्ग करण्यात आल्या आहेत. त्यापैकी मतदार यादीशी संबंधित असणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी झाली. त्यात कोर्टाने मतदार यादीच्या ड्राफ्टवर आक्षेप घेण्यासाठी मिळालेला अल्प कालावधी, ऑनलाइन अर्ज करूनही यादीत नाव नसणे व मतदार यादीतील नाव ट्रान्सफर करण्याशी संबंधित असणाऱ्या 4 फेटाळून लावल्या.

मतदारयादीच्या ड्राफ्टवर आक्षेप नोंदवण्यासाठी 6 दिवसांचा अवधी होता. पण मराठवाडा व विदर्भात पूरस्थिती असल्यामुळे याचिकाकर्त्यांना आक्षेप नोंदवणे शक्य झाले नाही. ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार पार पडली. त्यामुळे याचिकाकर्त्यांचे आक्षेप ग्राह्य धरता येणार नाहीत, असे निरीक्षण कोर्टाने या प्रकरणी सदर याचिका फेटाळताना नोंदवले आहे. कोर्ट सीमांकनाशी संबंधित याचिकांवर येत्या गुरुवारी सुनावणी करणार आहे.

आजच्या सुनावणीत रुपिका सिंग नामक याचिकाकर्तीच्या याचिकेवरही सुनावणी झाली. रुपिका सिंग हिला गत एप्रिल महिन्यात 18 वर्षे पूर्ण झाली. पण त्यानंतरही निवडणूक आयोगाने तिचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले नाही, असा आरोप तिने केला आहे. या याचिकेवरील सुनावणीत कट ऑफ डेटचा महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, भारतीय निवडणूक आयोगाने कट ऑफ डेट 1 ऑक्टोबर 2025 ठरवली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ती 1 जुलै 2025 अशी निश्चित केली. कट ऑफ डेटचा हा गोंधळ याचिकाकर्त्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. एकीकडे न्यायालयीन लढाई आणि दुसरीकडे आयोगाकडून निवडणुकीची तयारी असा काहीसे विरोधाभासी चित्र राज्यात निर्माण झाले आहे, अशी बाब रुपिका सिंग यांच्या वकिलांनी आज कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर कोर्टाने कोणतेही निरीक्षण नोंदवले नाही.

राज्यातील सर्वच मतदारयाद्या स्क्रॅप करण्याची गरज:काही ठिकाणी भाजपला 1, काँग्रेसला 500 मते; बावनकुळेंचाही हल्लाबोल

मुंबई-राज्यात मतदार याद्यांमधील कथित घोळावरून मोठे रणकंदन माजले आहे. विरोधकांनी या प्रकरणी मतदारयाद्या स्वच्छ करून निवडणुका घेण्याचा सूर आळवला आहे. त्यात आता राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भर पडली आहे. त्यांनी राज्यातील काही मतदान केंद्रांवर भाजपला 1 व काँग्रेसला 500 मते पडत असल्याचे नमूद करत संपूर्ण मतदार याद्याच स्क्रॅप करण्याची गरज व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडी व मनसेने गत शनिवारी मतदार याद्यांतील कथित घोळाविरोधात मुंबईत मोर्चा काढला होता. त्यांनी मतदार याद्या स्वच्छ केल्यानंतरच राज्यात निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद बोलावली आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारयाद्या स्क्रॅप करण्याची गरज व्यक्त केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभेची निवडणूकी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाची भेट घेण्याची गरज होती. आमच्या जागा निवडून आल्या असल्या तरी मतदार यादी चुकलेली आहे. मतदार यादीत अनेक ठिकाणी दुबार, तिबार नावे आहेत अशी तक्रार त्यांनी करणे अपेक्षित होते. पण या प्रकरणी पहिला आक्षेप विरोधकांनी नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवला. त्यांनी हायकोर्टात पहिली याचिका दाखल केली. त्यानंतर मी, आशिष शेलार व किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यात मतदार यादीत डिलिशन नव्हे तर केवळ ॲडिशन होत असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आणून दिली.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कामठी, मालेगाव, सिल्लोड आदी अनेक मतदारसंघांत एकाच व्यक्तीचे नाव चार-चार, पाच-पाच वेळा आले आहे. विरोधकांनी केवळ हिंदू मतदारांच्या नावांवर आक्षेप घेतला. पण अनेक बुथवर मुस्लिम मतदारांचीही एकाहून अनेकवेळा नावे आली आहेत. या भागात भाजपला 1 मत, तर काँग्रेसला 500 मते मिळाली आहेत. ज्या भागात मुस्लिम मतदार वाढले, तेथील मतदारयाद्यांत दुबार, तिबार नावे येत आहेत. तिथे विरोधक आक्षेप घेत नाहीत. त्यामुळे राज्यातील सर्वच मतदारयाद्या स्क्रॅप करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

दुसरीकडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे पुन्हा एकदा मतदारयाद्या स्वच्छ करण्याची मागणी केली आहे. लोकशाहीत राजकीय पक्ष महत्वाचे घटक आहेत. राजकीय पक्षांशिवाय निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन मतदार यादी निर्दोष करा म्हणतात तेव्हा त्याबाबत पाऊले उचलणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे.

आता तर सत्ताधारी ही तेच म्हणत आहेत. मुख्यमंत्री तेच म्हणतात , बावनकुळे मतदार यादी रद्द झाली पाहिजे असे म्हणत आहेत. काल भाजपाचे नेते तेच म्हणाले. मग आता अडचण काय? निवडणूक आयोगाने तात्काळ यांची दखल घेतली पाहिजे. का भाजपाचे खाण्याचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत? मागून कनपट्टीवर काही ठेवले आहे का? असे त्यांनी म्हटले आहे.

राज्य मंत्रिमंडळाचे 21 मोठे निर्णय:राष्ट्रीय आरोग्य अभियानात 10 वर्ष पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर होणार समायोजन

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मंगळवारी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 10 वर्षे पूर्ण होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. सरकारने राज्यातील आरोग्य विभागांतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्याचाही निर्णय घेतला आहे. आरोग्य सुविधांच्या या विकेंद्रीकरणाचाही जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा आणि चांगले उपचार व्हावेत यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करण्यास मान्यता. तसेच राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला. विशेषतः राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 10 वर्षे पूर्ण होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयांचा सर्वसामान्य जनेतला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

गंभीर आजारांवरील उपचारासाठी मिळणार 10 लाख

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत विविध प्रकारच्या 2400 आजारांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 2399 आजारांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत. तर ज्या गंभीर आजारांवर अधिकचा खर्च होत आहे, त्यांना 10 लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

खाली वाचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले संक्षिप्त निर्णय

(सार्वजनिक बांधकाम विभाग)
विरार ते अलिबाग बहुउद्देशिय वाहतूक मार्गिका (VAMMC) प्रकल्पाच्या कर्जास शासन हमी देण्यास मान्यता. हुडको कडून घेण्यात येणारे हे कर्ज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ भूसंपादनासाठी येणाऱ्या खर्चासाठी वापरणार आहे.

(उच्च व तंत्रशिक्षण विभाग)
नागपूर येथील लक्ष्मी नारायण अभिनव तंत्रज्ञान (एलआयटी) विद्यापीठ, नागपूर विद्यापीठास निधी देण्यास मान्यता. सन २०२५-२०२६ ते सन २०२९-२०३० या कालावधीकरीता दरवर्षी ७ कोटी रुपयांचा निधी चार हप्त्यात वितरीत करण्यात येणार. संस्था १९४२ मध्ये स्थापन झालेली ही संस्था रसायन तंत्रज्ञान क्षेत्रात नावाजलेली संस्था.

(महसूल विभाग)
सोलापूर जिल्ह्यातील मौजे कुंभारी ( ता. दक्षिण सोलापूर) येथील असंघटित कामगारांच्या प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ३० हजार घरांच्या गृहप्रकल्पास अनर्जित रक्कम, नजराणा रक्कम व अकृषिक करातून सवलत देण्यास मान्यता.

(महसूल विभाग)
वाशिम जिल्ह्यातील मौजे वाईगोळ ( ता.मानोरा) येथील मधील १.५२ हे.आर. जागा ग्रामपंचायत, वाईगौळ यांना भक्त निवास व यात्रेकरूंसाठीच्या सोयी-सुविधा उभारण्याकरिता विनामूल्य देण्यास मान्यता.

(विधि व न्याय विभाग)
पुणे जिल्ह्यात घोडनदी (शिरुर) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तसेच शासकीय अभियोक्ता कार्यालय यांची स्थापना होणार. त्यासाठी आवश्यक पद निर्मितीस मान्यता.

(विधि व न्याय विभाग)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय होणार. त्यासाठी आवश्यक न्यायीक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पद निर्मितीस मान्यता.

(वित्त विभाग)
राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी “MAHA ARC LIMITED” बंद करण्यास मंजुरी. केंद्राच्या नॅशनल अँसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापन केली होती, त्याच धर्तीवर राज्य कंपनीची स्थापना सप्टेंबर २०२२ मध्ये स्थापन करण्यात आली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२३ मध्ये या कंपनीला परवाना नाकारल्याने, कायदेशीर दृष्ट्या या कंपनीला कामकाज पाहणे शक्य नसल्याने, कंपनी बंद करण्याचा निर्णय.

(ग्राम विकास विभाग)
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी असलेल्या कर वसुलीच्या अटीत सुधारणा. कर्मचाऱ्यांना दिलासा.

(मत्स्यव्यवसाय विभाग)
मत्स्यव्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्याने मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यकास्तकारांना बँकाकडून देण्यात येणाऱ्या अल्प मुदतीच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जावर ४ टक्के व्याज परतावा देण्यास मान्यता.

(अल्पसंख्याक विकास विभाग)
“हिंद-की-चादर” श्री. गुरुतेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० वी शहीदी समागम शताब्दी कार्यक्रमास आवश्यक निधीस मान्यता. नांदेड, नागपूर आणि रायगड जिल्ह्यांतर्गत राज्यभरातील विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी ९४ कोटी ३५ लाख ६४ हजार रुपयांच्या निधीच्या तरतुदीस मान्यता.

(सामान्य प्रशासन विभाग)
प्रस्तावित “महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश, २०२५” मधील तरतुदीमधील सुधारणांना मान्यता.

(महसूल विभाग)
जमीन मुंबई उपनगर जिल्हातील मौजे वांद्रे ( ता. अंधेरी) येथील ३० वर्ष कालावधीसाठी एक रुपया नाममाफ वार्षिक भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या ६४८ चौ.मी. शासकीय जमिनीसमोरील ३९५ चौ.मी. भुखंडावर आवश्यक अन्य सोयी-सुविधा पुरविण्यास मान्यता.

(महसूल विभाग)
अकृषिक कर आकारणी तसेच जमिनीच्या अकृषिक वापराच्या परवानगी व सनदेबाबतच्या तरतुदींमधील सुधारणांना मान्यता. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा करण्यात येणार

(सार्वजनिक आरोग्य विभाग)
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या विस्तारीत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड निर्माण व वितरण करणाऱ्या क्षेत्रिय स्तरावरील कर्मचा-यांच्या (Front Line Workers) मानधनात वाढ करण्यास मंजुरी.

(सार्वजनिक आरोग्य विभाग)
राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा आणि चांगले उपचार व्हावेत यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करण्यास मान्यता.

(सार्वजनिक आरोग्य विभाग)
राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करणार. आरोग्य सुविधांचे विकेंद्रीकरणामुळे नागरिकांना दिलासा.

(नियोजन विभाग)
परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ व श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांना मंजुरी.

(वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)
बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहयोगी प्राध्यापकांची पाच पदे निर्माण करण्यास मान्यता. त्यासाठी आवश्यक खर्चाच्या तरतुदीस मंजुरी.

(नगरविकास विभाग)
वर्धा शहरातील रामनगर येथील भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंडधारकाला निवासी भूखंड कायमस्वरुपी मालकी हक्काने देण्यास मंजुरी

(सार्वजनिक आरोग्य विभाग)
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयात दुरुस्तीस मान्यता. अभियानात १४ मार्च २०२४ रोजी दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्चाऱ्यांचे समकक्ष पदावर समायोजन. सेवा प्रवेश नियमांत दुरूस्ती न एक वेळची बाब म्हणून समायोजन केले जाणार. सार्वनजिक आरोगय विभागातील पदांबरोबर, ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणारी आरोग्य सेवेतील रिक्त पदांबाबतचा निर्णय.

(उच्च व तंत्रशिक्षण विभाग)
चंद्रपूर जिल्हयातील मुल येथे ३०० प्रवेश क्षमतेचे नवीन पदविका अभियांत्रिकी शासकीय तंत्रनिकेतन सुरु करण्यात येणार. त्यासाठी आवश्यक ३९ शिक्षक व ४२ शिक्षकेतर पदांना व त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता.

विरोधकांच्या शिष्टमंडळाला EC ने भेट नाकारल्याने शिष्टमंडळ आक्रमक, मराठी नेत्यांचा आयोगाच्या कार्यालयातच ठिय्या


नवी दिल्ली-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता असतानाच, राजधानी नवी दिल्लीत एक मोठा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. मतदार याद्यांमधील गोंधळाविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांच्या शिष्टमंडळाला केंद्रीय निवडणूक आयोगाने (EC) भेटण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने संतप्त नेत्यांनी आयोगाच्या कार्यालयातच ठिय्या दिला.

मतदारयाद्यांमधील घोळासंदर्भात तक्रार करण्यासाठी मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले. या शिष्टमंडळात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह अतुल लोंढे, राजवी झा यांचा समावेश होता.

शिष्टमंडळातील सर्व नेते आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेले असता, अधिकाऱ्यांनी सर्वांना भेट देण्यास नकार दिला. केवळ दोन नेत्यांना भेटणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, जोपर्यंत आमच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन आयोगाचे अधिकारी भेट घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही कार्यालयातून बाहेर पडणार नाही,” अशी ठाम भूमिका घेत सर्वांनी एकत्रितपणे ठिय्या आंदोलन सुरू केले. भेट द्यायची असेल, केवळ दोघांना नाही, तर सर्वांनाच भेट द्या, अशी मागणी अनिल देसाई यांनी केली. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने पुकारलेल्या ठिय्यामुळे दिल्लीत मोठा राजकीय तणाव निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरमध्ये नगरपालिका, डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि जानेवारी २०२६ मध्ये महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, विरोधी पक्षांचा प्रमुख आक्षेप मतदार याद्यांमधील मोठ्या गोंधळावर आहे. लाखो मतदारांची नावे दुबार असणे किंवा याद्यांमध्ये गंभीर त्रुटी असणे, यामुळे निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाहीत, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत आणि याच तक्रारीसाठी हे शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचले होते.

एकीकडे, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दुपारी ४ वाजता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्यामुळे आजच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे आयोगाकडून भेट नाकारली गेल्याने संतप्त झालेल्या मराठी नेत्यांनी थेट आयोगाच्या कार्यालयातच ठिय्या मांडल्यामुळे, महाराष्ट्राच्या निवडणुकांवरील राजकीय वाद आता दिल्लीच्या दारात पोहोचला आहे. आयोगाकडून या ठिय्या आंदोलनावर कोणती भूमिका घेतली जाते आणि आयोगाचे अधिकारी अखेर नेत्यांना भेटतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ट्रायजेमिनल न्यूराल्जियासारख्या दुर्मिळ मेंदूविकरांच्या रुग्णांसाठी डॉ. जयदेव पंचवाघ यांच्या चित्रांची आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातून निधीची उभारणी

पुणे03 नोव्हेंबर2025:  गेल्या अनेक दशकांपासून कला हे मानवी भावना आणि सौंदर्यदृष्टी व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. चित्रकारांनी प्रकाशाचा खेळ, कलात्मक दृष्टीकोन आणि सावल्यांचे चित्रण करुन जगाचे अदृश्य सौंदर्य उलगडले. पुणे येथे मेंदू आणि पाठीच्या कण्यावरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांच्यासाठी कलेची ही संकल्पना थेट मानवी मेंदूपर्यंत विस्तारली गेली. शस्त्रक्रियेदरम्यान, कवटीच्या आत, मेंदूच्या खोलवरच्या रचनेत आणि खाचांमध्ये दिसणारा प्रकाश आणि सावल्यांचा खेळ पाहून त्यांना प्रेरणा मिळाली. या प्रेरणेतून त्यांनी एक अद्वितीय आणि जबरदस्त चित्रसंग्रह तयार केला. या संग्रहात मेंदूत दडलेली अद्वितीय गुंतागुंत आणि सौंदर्य अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. 

‘मला गेल्या कित्येक वर्षांपासून निसर्ग प्रकाश चित्रकला येते. या काळातच माझ्या रोजच्या शस्त्रक्रियांच्या कामातील प्रकाशाने मी आकर्षित होत गेलो. या निसर्ग प्रकाश चित्रकलेच्या माध्यमातून स्कल बेस ट्युमर (Skull base tumours), मायक्रोव्हॅस्क्युलर डिकम्प्रेशन (Microvascular decompression), एन्युरिजम्स, इंट्राव्हेंट्रिक्युलर ट्युमर (Aneurysms and intraventricular tumour) यांसारख्या अवघड कामाच्या प्रवासाला अनोखी आणि समृद्ध दिशा मिळाली आहे.’’, असे डॉ. पंचवाघ यांनी सांगितले. त्यांच्या या मनोगतातून कला आणि अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचे काम यांतील प्रदीर्घ अनुभव झळकतो.

पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सल्लागार न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी पाच वर्षांपूर्वी आपल्या निसर्गप्रेरित चित्रकलेचा प्रवास सुरू केला. वैयक्तिक आवड म्हणून सुरु झालेला हा प्रवास आता ६० हून अधिक आकर्षक संग्रहात रुपांतरित झाला आहे. नुकतेच मुंबई येथील आंतरराष्ट्रीय न्यूरोसर्जरी परिषदेत या संग्रहाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. गेल्या सप्टेंबर महिन्यात जर्मनी येथेही डॉ. पंचवाघ यांच्या प्रकाश चित्रकलेचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. परदेशातही डॉ. पंचवाघ यांच्या कलाप्रदर्शानाला चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शानातील चित्रांची विक्री करुन ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, हेमीफेशियल स्पाइमने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी निधी गोळा करण्यात आला. डॉ. पंचवाघ यांच्या कलेत न्यूरोसर्जिकल कौशल्याची वैज्ञानिक अचूकता आणि  कलात्मक प्रवासातील सर्जनशील अभिव्यक्ती यांचा सुरेख संगम दिसतो. शस्त्रक्रिया करताना त्यांनी पाहिलेल्या मेंदूच्या गुंतागुंतीच्या रचनेतून प्रेरित होऊन त्यांचे कलाविश्व मानवी मनाच्या सौंदर्यावर आणि जटिलतेवर नवा दृष्टिकोन देते.

डॉ. जयदेव पंचवाघ यांच्या चित्रांना वैद्यकीय आणि कला क्षेत्रातील समुदायांकडून मोठी प्रशंसा मिळाली आहे. डॉ. पंचवाघ यांच्या ‘फायरिंग लाइन्स’s या चित्राला जगभरातून दाद मिळाली. हे चित्र स्पायनल कॉर्ड आर्टिरिओव्हेनस मॅलफॉर्मेशन (Arteriovenous Malformation of the spinal cord) या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या मायक्रोस्कोपिक छायाचित्रावर आधारित आहे. जगप्रसिद्ध न्यूरोसर्जन आणि बॅरो न्यूरोलॉजिकल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मायकल लॉटन यांच्या शस्त्रक्रियेचे हे चित्र होते. डॉ. लॉटन हे एलोन मस्कच्या न्यूरालिंकशी जोडलेले असल्याने प्रसिद्धीझोतातील नाव आहे. ‘फायरिंग लाइन्स’ या चित्रात केवळ स्पायनल कॉर्डची जटिलताच नव्हे तर सूक्ष्मदर्शकाखाली दिसणा-या लाल, गुलाबी, किरमिजी आणि पिवळसर रंगांच्या रक्तवाहिन्यांचे नैसर्गिक सौंदर्य कलात्मकरित्या रेखाटले आहे. डॉ. पंचवाघ यांनी सांगितले, ‘‘मी पहिल्यांदाच दुस-या न्यूरोसर्जनची शस्त्रक्रिया चित्रित केली. या चित्रासाठी मला तब्बल १२ तास लागले. मला जगातील अग्रगण्य न्यूरोसर्जनने केलेली प्रक्रिया माझ्या कलेत टिपण्याचा मान मिळाला. हे चित्र मेंदूतील असमान्य रक्तवाहिन्यांचे गुंतागुंतीचे जाळे लाल रंगाच्या छटांमध्ये जिवंत असल्यासारखे प्रभावीपणे दर्शवते.’’

‘‘मेंदूतील महत्त्वपूर्ण रचनांमध्ये लपलेले सौंदर्य आणि गुंतागुंत उघड करणे हा माझ्या कलाकृतीचा उद्देश आहे.’’, या शब्दांत डॉ. पंचवाघ यांनी आपल्या निसर्ग प्रकाश चित्रकलेच्या आवडीमागील कारण स्पष्ट केले. न्यूरोसर्जन म्हणून प्रदीर्घ अनुभव घेतल्यानंतर विज्ञान आणि कला या दोन्ही क्षेत्राचा समन्वय साधण्यात ते आता पारंगत झाले आहेत. आधुनिक एंडोस्कोपीमुळे त्यांना मेंदूच्या गुंतागुंतीच्या रचनेला बारकाईने अभ्यास करता येतो. डॉ. पंचवाघ यांच्या मते, हा वैज्ञानिक आणि कलात्मक शोध आहे. सौंदर्यशास्त्र आणि न्यूरोसायन्सला एकत्र आणणारा हा अद्वितीय कलाप्रकार आहे. त्यांच्या संशोधनाच्या काळात सुरु झालेले साधे रेखाटन हळूहळू चित्रकलेत रुपांतरित झाले. या प्रक्रियेतूनच त्यांना मेंदूचे हे मोहक आंतरिक दृश्य कॅन्व्हासवर उतरवणे शक्य झाले.

डॉ. पंचवाघ यांनी चेह-यामध्ये असह्य वेदना देणा-या या दुर्मिळ आणि वेदनादायी आजाराबाबत जागरुकता पसरवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या दुर्मिळ आजारावर अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केलेल्या डॉ. पंचवाघ यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून रुग्णांना आर्थिक मदत केली. त्यांनी जर्मनीतील कला प्रदर्शनातील चित्रांच्या विक्रीतून ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आणि हेमीफेशियल स्पाइमने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी निधी उभारला. डॉ. पंचवाघ न्यूरोसर्जरी आणि सर्जनशीलता यांचा सुरेख संगम साधत आहेत. त्यांच्या या कार्यातून वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना तसेच सामान्य जनतेलाही मेंदूतील गुंतागुंतीचे सौंदर्य ओळखण्याची प्रेरणा मिळते. या कलेच्या माध्यमातून त्यांनी गंभीर स्वरुपातील विकारांकडेही लक्ष वेधले आहे.

डॉ. पंचवाघ म्हणाले की, छायाचित्रांपेक्षा चित्रकला माणसाच्या मनाशी अधिक खोलवर जोडली जाते. चित्रकला आणि मानवी अंतरंगाचे अगदी पूर्वापार गुंफेत राहणा-या पूर्वजांच्या काळापासून नाते आहे. कला ही मानवी मनातील जन्माजात सौंदर्य-भूक भागवते. ज्ञान सहजतेने भागवते. या एकमेव कारणामुळे छायाचित्रणाच्या युगातही चित्रकला टिकून आहे.

राज्य निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे ‘चित्र’ स्पष्ट होणार, आचारसंहिता लागणार?

आज दुपारी 4 वाजता ‘बिगुल’ वाजणार


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत केवळ तारखांची घोषणाच नव्हे, तर आरक्षणासंदर्भातील अंतिम स्थिती किंवा निवडणुकीच्या तयारीतील अन्य प्रशासकीय टप्प्यांबद्दलही महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.

…..राज्यातील जवळपास 15 हून अधिक महापालिका, मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे यांसारख्या प्रमुख शहरांसह सुमारे 25 जिल्हा परिषदा आणि 248 पंचायत समित्यांच्या निवडणुका विविध कारणांमुळे अनेक महिन्यांपासून रखडल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा तिढा, वॉर्ड रचनेतील बदल आणि प्रशासकीय अडचणींमुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासकीय राजवट लागू आहे. प्रशासक राजवटीमुळे लोकप्रतिनिधींना आपले हक्क बजावता येत नाहीत, या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर सातत्याने टीका केली आहे.

आज दुपारी 4 वाजता होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात मोठे निर्णय जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक आयोग आतापर्यंत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत होता; मात्र आता सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्यानंतर आयोगाकडून निवडणुकांचा अंतिम कार्यक्रम घोषित केला जाण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मतदार याद्या अद्ययावत करणे, निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि सुरक्षा व्यवस्था पूर्ण झाल्याचे संकेत मिळत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश सरकारला दिल्यामुळे, राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. आयोगाने या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचा आराखडा तयार केला आहे. यात सुरुवातीला नगर परिषदा आणि नगर पंचायती, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आणि सर्वात शेवटी मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी मतदार यादीतील त्रुटी आणि दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावल्याचे दिसून आले. तसेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या वेळेत निवडणुका घेण्यावर निवडणूक आयोग ठाम आहे

आज दुपारी 4 वाजता मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे सचिवालय जिमखाना येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून नेमकी कोणती घोषणा होते, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतात का, संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल आणि आचारसंहिता कधी लागू होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाच्या आजच्या घोषणेनंतर राज्यातील राजकारण अधिकच वेगवान होण्याची शक्यता आहे.

या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. आगामी २०२९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपूर्वी स्थानिक पातळीवर आपली ताकद अजमावण्याची ही शेवटची मोठी संधी असणार आहे. त्यामुळे शिंदे गट, भाजप, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच प्रमुख पक्ष गेल्या अनेक महिन्यांपासून या निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत.

https://whatsapp.com/channel/0029VbBTlcmEKyZGcearLG0x

वाहतूक कोंडी पुण्याचा कॅन्सर..बरा करायचा असेल तर बांधकामांच्या उंचीवर निर्बंध घालावीच लागतील

पुणे- पेन्शनरांचे शहर,सायकलींचे शहर,शांत शहर,पाण्याची ऐतिहासिक मुबलकता लाभलेले शहर,सांकृतिक राजधानी असलेले,शिक्षणाचे माहेरघर अशा अनेक उपाध्यांनी नटलेल्या शहराला आज महापालिकेची बेसुमार हद्दवाढ आणि निव्वळ उंचच उंच इमारतींना परवानग्या देण्याचा गेल्या २० वर्षात लावलेला अफाट सपाटा यामुळे वाहतूक कोंडी नावाच्या कॅन्सर ने ग्रस्त केले आहे. आणि त्यावर उपाय करणारे म्हणजे निव्वळ खिसे भरणारे डॉक्टर दिसू लागलेत.आणि असे डॉक्टर असले कि शहराचे काय होणार ते सांगणे गरजेचे नाही.या शहरात टांगेवाले होते ज्यांनी रिक्षा आल्या तेव्हा रिक्षांना विरोध केला होता,आता रिक्षा वाले देखील संघर्ष करत आहेत,ओला उबेर आणि बरोबर शासकीय,निमशासकीय संस्थाचे डोक्यावरचे गाठोडे यामुळे रिक्षावाले हैराण न झाले तर नवल.पण हे होताच राहणार बदलत्या काळाप्रमाणे शहराचे रुपडे बदलत राहणार..पण हे बदलताना मुलभूत गोष्टींकडे ध्यान दिले नाही आणि बदलाचा प्रारंभ तिथूनच केला नाही तर अशा शहराचे आजचे कॅन्सरग्रस्त पुणे व्हायला वेळ लागत नाही.

या शहरात वाहतुकीच्या कोंडीच्या नावाने ऐतिहासिक कोतवाल चावडी (जिथे आज गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्पठाना होते, मोठे डेकोरेशन उभारले जाते त्या ठिकाणी हि कोतवाल चावडी होती) पेशव्यांच्या अत्याचाराची कहाणी असे सांगितले जात असलेली हि चावडी वाहतूक कोंडीच्या नावाखाली उधवस्त केली गेली.असंख्य रहिवासी तेथील इमारतीत राहत होते.जेव्हा ती पाडली तेव्हा तेथील रहिवासी कुटुंबे ढसाढसा रडले होते.कोंढवा येथे आंगराज ढाब्याच्या नजीक असलेली सुमारे ५०० सदनिकांच्या रस्ता रुंदीत जाणाऱ्या इमारती राजीव अग्रवाल नामक महापालिका आयुक्तांनी धडाधड पाडून अनधिकृत बांधकामे करणारांना धडकी भरवली होती.शिवाजीराव पवार हे सिटी इंजिनिअर असताना त्यांनी तत्कालीन त्यांचे असिस्टंट माधव हरिहर यांच्या कडून शहरात किती हॉटेल्स असे आहेत ज्यांनी अनधिकृत बांधकामे केलीत त्यांचा सर्वे करून तत्कालीन मंत्री थिटे, मोरे,कलमाडी,तसेच ढोले पा.अशा सर्वच मान्यवरांच्या हॉटेल वर देखील हातोडा मारणे सुरु ठेवले होते.लक्ष्मी रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव एकीकडे होता आणि दुसरीकडे लक्ष्मी रस्त्यावरील कापड दुकानांमधील पोटमाळे बेकायदा ठरवून त्यावर धडाधड कारवाया होत होत्या. पण हे फार काळ चालले नाही.निवडणूक आयोगाची शेषन गेल्यावर जशी परिस्थिती झाली तशी परिस्थिती पुढे २००० पासून हळूहळू सुरु झाली. जुना मुंबई गोवा मार्गातील पुणे वगळले गेले .आणि पुण्यातील वृक्षवल्लीवर कुऱ्हाड आली.कात्रजच्या तळ्यानजीकच्या जंगलात रानगवा पकडण्यात आला होता. ते जंगल नाहीसे झाले.महापालिकेच्या जकात नाक्यांनी हद्दी ओलांडल्या.हळू हळू महापालिकांच्या हद्दी बाहेर बेसुमार भूमाफिया आणि अनधिकृत बांधकामे होऊ लागली, जिल्हाधिकारी कार्यालयाने तर होणाऱ्या बेसुमार टेकड्यांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष केले.पुणे वाढताना ते बकाल बनलेली गावे पोटात घेऊ लागले.आणि तिथून होय तिथून सुरु झाली शहराच्या कॅन्सरची सुरुवात. राजकारण्यांनी इथे महापलिका येणार,येणार असे सांगत आजूबाजूची गावे गिळंकृत करत तिथे जागांचा,बांधकामांचा सपाटा लावत..माया गोळा करण्याचे काम सुरु केले आणि राज्याच्या नगरविकास खात्याने एकामागे एक अशी बकाल गावे महापालिकेच्या पोटात ढकलली.

सहकारनगर तळजाई टेकडीचा भाग म्हणून येथील जयंतराव टिळक नगरलाही महापलिकेत विरोध झाला,पण जास्त उंची न देता अखेरीस राजकीय दबावाखाली ते वसले.शिवाजीराव पवारांचे एक धोरण होते महापालिकेची इमारत 5 मजली.. त्यापेक्षा कोणतीही इमारत मोठी नको,अलका चौकातल्या भारती विद्यापीठाच्या इमारतीला सर्वप्रथम महापलिकेत जोरदार विरोध झाला पण पतंगरावांनी नगरविकास खात्याकडून सहाय्य घेतले. पुढे सिटी इंजिनिअर बदलले.शहरातील वाडे संस्कृतीही आता बदलत होती.आणि ती बदलताना TDR ची संकल्पना आणली गेली.सर्वप्रथम कोथरूड मध्ये TDRघोटाळा झाला(AVB) ..आणि पुढे तो तसाच सुरु राहिला वाड्यांच्या पुनर्विकासाच्या नावाखाली उंच उंच इमारती उभारल्या गेल्या .

रस्ते..रस्त्यांच्या रुंदी याकडे मात्र म्हणावे तसे लक्ष कोणीच दिले नाही BRT च्या प्रभावामुळे स्वारगेट कात्रज रस्त्याचे रुंदीकरण झाले तसे २/३ रस्त्यांची रुंदीकरणे सोडली तर अन्य रस्ते मात्र तसेच राहिले महापालिकेचा बेडूक टम्म फुगत होता.आता शहरातील रस्ते तेवढेच होते त्याच रुंदीचे होते पण उंच उंच इमारती उभारल्या जाऊ लागल्याने जिथे १० कुटुंबे राहत होती तिथे १०० राहू लागली. जिथे ३ कार्यालये होती तिथे ५० कार्यालये निर्माण झाली. ना कोणी व्हिजिटर पार्किंग चा विचार केला.ना इमारतीत असलेल्या सदनिका तेथील रहिवासी त्यांची वाहने आणि पार्किंग कुठे असेल किती असेल याचा विचार केला .कागदोपत्री नाममात्र पार्किग ठेऊन धडाधड बांधकामे झाली.आणि जिथून १० वाहने बाहेर पडत होती तिथून शंभर वाहने बाहेर पडू लागली,त्यातच महालीकेची हद्द सुद्धा अशीच बकाल बनवलेली गावे घेऊन वाढत होती तेथील वाहने देखील रस्त्यावरील वाहनाची संख्या वाढवीत राहिल.आणि मग काय होणार…वाहतूक कोंडीचा अजगर..त्याचा विळखा या पेन्शनरांचे शहर,सायकलींचे शहर,शांत शहर,पाण्याची ऐतिहासिक मुबलकता लाभलेले शहर,सांकृतिक राजधानी असलेले,शिक्षणाचे माहेरघर अशा अनेक उपाध्यांनी नटलेल्या शहराला पडला.

यावर उड्डाणपूल,मेट्रो ,बसेस वाढविणे अशा मलमपट्टी स्वरूपाचे तात्पुरते उपाय होत गेले.अनेकदा पे आणि पार्किंग चे भूत हि लोकांना लुटी साठी उभे केले गेले. हेल्मेट चे भूत उतरविण्यासाठी जे रस्त्यावर उतरले ते खासदार झाले पण हेल्मेटचे भूत मात्र तसेच ठेवले गेले..पुण्याचा हा कॅन्सर बहुधा कोणाला बरा करायचा नव्हताच.तात्पुरत्या औषध उपायांनी पुणे लुटण्याचे काम झाले पण वाहतूक कोंडीच्या अजगराचा विळखा तसाच ठेवला गेला. आणि जातोय याकडे अजूनही कोणी लक्ष द्यायला तयार नाही

१० फुट रुंदीचे, २० फुट रुंदीचे , ४० फुट रुंदीचे रस्ते पुण्यात आहेत.पण एवढ्या रुंदीच्या रस्त्यांवर किती फुट उंचीचे बांधकाम करायला परवानगी द्यायला हवी.याबाबत काही नियम धोरण ठरवायला हवे यावर कोणी विचार करायला तयार नाही.TDR आणि पुनर्विकास या दोनच गोष्टींनी,विशेषतः अनधिकृत बांधकामांनी शहराला कधी गिळंकृत केलेय.यातून आता हे शहर बाहेर पडेल काय? या प्रश्नाचे उत्तर यावरच वाहतूक कोंडी चे उत्तर देखील अवलंबून रहाणार आहे हे तेवढेच निश्चित.

https://whatsapp.com/channel/0029VbBTlcmEKyZGcearLG0x