Home Blog Page 627

कोपा मॉलच्या पोएट्री पार्टीमध्ये गोष्टी आणि कवितांचा आनंद

पुणे, २३ ऑक्टोबर २०२४ – कोपा मॉल हे पुण्यातील लक्झरी लाइफस्टाइल डेस्टिनेशन ऑक्टोबरमध्ये आणखी एक आकर्षक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. मॉलमध्ये टेप अ टेलतर्फे पोएट्री पार्टी आयोजित केली जाणार असून त्यात कथाकथन, कविता आणि कल्पक अभिव्यक्तीला वाव दिला जाणार आहे. २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी टेरेसवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नव्या युगातील काही प्रमुख स्टोरीटेलर्स आणि कवींचा समावेश असेल.

पोएट्री पार्टीचे स्टार्स रंगमंचावर काव्य आणि कथांचा अनोखा मिलाफ सादर करणार आहेत. प्रेक्षकांना अमनदीप सिंग यांच्या प्रेम व विरहाच्या कथा ऐकायला मिळतील, तर वानिका सांगतानी त्यांच्या काव्यात्म नजरेतून भावनिक प्रवासाचा आढावा घेतील. दिव्या प्रकाश दुबे पहिल्या दिवशी आपल्याशा वाटणाऱ्या, भावस्पर्शी कथा सादर करतील. दुसऱ्या संध्याकाळी याहया बुटावाला रोमँटिक कथा सादर करतील, निधी नारवाल यांच्या कथांतून स्वतःला आणि नात्यांना शोधतानाचा प्रवास उलगडेल आणि रूचिका लोहिया आयुष्याबद्दलचे विचारपूर्वक प्रतिबिंब मांडतील.

कलात्मक पद्धतीने सजवण्यात आलेल्या टेरेसवर होणार असलेली ही पोएट्री पार्टी उपस्थितांना प्रेम, आयुष्य आणि प्रेरणेद्वारे भावनिक उंचीवर घेऊन जाईल. तुम्ही कवितांचे दर्दी असाल, किंवा कथांचे, हे सादरीकरण मनोरंजन आणि स्वशोधाचा उत्तम मेळ घालणारे असेल. प्रत्येक संध्याकाळी ६ ते ९ चालणार असलेल्या या टेप अ टेलमध्ये सर्जनशील आणि कथाप्रेमींच्या सहवासात एकमेकांशी कनेक्ट होण्याची अनोखी संधी मिळेल.

ठिकाण : टेरेस, कोपा मॉल

तारीख: २६ ऑक्टोबर (शनीवार) आणि २७ (रविवार)

वेळ : संध्याकाळी ६ ते रात्री ९

महाराष्ट्राला यशोमती ठाकूर सारख्या बुलंद व कणखर नेतृत्वाची गरज- आ. विनेश फोगाट

नामांकन रॅली व सभेला नागरिकांची अफाट गर्दी

महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर चा नामांकन अर्ज दाखल

तिवसा येथे लोकनेत्या यशोमती ठाकूर यांचे शक्तिप्रदर्शन

अमरावती-महिलाच नव्हे तर युवकांवर देखील अन्याय करणाऱ्या भाजप प्रणित सरकारला पराभूत करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार निवडून आणा. यशोमती ठाकूर सारख्या बुलंद व कणखर नेतृत्वाची समाजाला व पर्यायाने महाराष्ट्राला गरज असून या आपल्या बहिणीला हरविण्यासाठी विरोधक षडयंत्र रचतील परंतु आपण कोणत्याही भ्रमात न राहता यशोमती ठाकूर यांचा बुलंद आवाज विधानसभेत पोहचवा असे आवाहन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आ. विनेश फोगाट यांनी केले.
महाविकास आघाडीच्या उमेदवार लोकनेत्या यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट सभेत आ. विनेश फोगाट बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव,मध्यप्रदेशचे माजी मंत्री सुखदेव पांसे,खा. बळवंत वानखडे,वर्धा येथील खा. अमर काळे, यवतमाळ येथील खा.संजय देशमुख,माजी मंत्री अनिलबाबू देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख,आ. धीरज लिंगाडे,बबलू देशमुख, वीरेंद्र जगताप दिलीप एडतकर, सुनील देशमुख, विलास इंगोले, बबलू शेखावत,शाम देशमुख, यांची उपस्थिती होती.महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्ते व जनताजनार्दन यांच्यां उपस्थितीत यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा विधानसभा मतदार संघासाठी नामांकन दाखल केले. आ. यशोमती ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडी व घटकपक्षाचे हजारो कार्यकर्ते तिवसा येथील समर्थ आडकूजी महाराज नगर सातरगाव रोड येथील मैदानावर जमले होते.
प्रारंभी नामांकन रॅली काढून यशोमती ठाकूर यांनी अफाट सभा घेतली.मोठ्या शक्तीप्रदर्शनात त्यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी पुढे बोलतांना विनेश फोगाट म्हणाल्या की,यशोमती ठाकूर या बहादूर बेटी व बहीण आहे. यशोमतींचा आवाज म्हणजे तुमचा आवाज.यशोमती ठाकूर सारख्या महिला निर्माण झाल्यास महिलांवर अत्याचार होणार नाहीत असा विश्वास आ.फोगाट यांनी व्यक्त केला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांनी केंद्र सरकार सोबतच राज्य सरकारचा समाचार घेत यशोमती ठाकूर सारख्या जनतेच्या पाठीराख्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले. यावेळी माजी मंत्री सुखदेव पांसे यांनी यशोमती सारख्या विकासाभिमुख नेतृत्वाची आज गरज असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
यावेळी खा.अमर काळे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.भाजपा व महायुतीच्या उमेदवारांची लोकसभेत कशी दयनीय अवस्था झाली याची सर्वांनाच कल्पना आहे त्याची धास्ती घेऊन विद्यमान सरकारने अनेक योजनांचे प्रलोभन जनतेला दाखविले. अश्या फोकनाड सरकारला खाली खेचण्याची वेळ आली असून आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असा आशावाद महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.

तुमची साथ, तुमचा आशीर्वाद हाच माझा विश्वास-यशोमती ठाकूर

तुमचे प्रेम,आशीर्वाद,विश्वास माझी ताकद आहे.कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी तुमची साथ पुरेशी आहे. ही लढाई नुसती निवडणूकी पुरती नसून संविधान वाचविण्यासाठी आहे. विद्यमान सरकारने तुमचा विश्वासाघात केला.शेतीमालाला आजही पंधरा वर्षांपूर्वीचेच भाव आहे. फसव्या योजना काढून भाजप प्रणित सरकारने मतदारांना आमिष दाखविले आहे. आपल्याला कोणत्याही प्रलोभनांना बळी पडायचे नाही.पक्ष व घर फोडण्याचे काम करणाऱ्या लोकांना संविधानाची ताकदच येणाऱ्या काळात दाखवावी लागेल यासाठी सजग राहून महाविकास आघाडीला भक्कम साथ द्या. विकास करणाऱ्यांच्या पाठीशी राहा.संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणण्याचे आवाहन तिवसा विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केले.

यशोमती ताईंनी नेतृत्व सिद्ध केलं-खा. वानखडे

याप्रसंगी बोलतांना खा. बळवंत वानखडे यांनी म्हटले की, यशोमती ठाकूर यांनी तिवसा विधानसभा मतदार संघात विकासाची गंगा आणली.त्यांनी विविध विकासकामे करून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. हे नेतृत्व आपण जपलं पाहिजे असं नेतृत्व लाभण आपल्या जिल्ह्याचे भाग्य आहे आहे त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणावे असे आवाहन यावेळी खा.बळवंत वानखडे यांनी केले.

आदर्श आचारसंहितेमुळे ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेचे अर्ज स्वीकारणे बंद

पुणे, दि. २४: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडून ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, असे समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी कळविले आहे.

या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांकडून स्वीकारण्यास ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून या योजनेंतर्गत अर्ज स्वीकारण्याबाबत मुदतवाढ लागू राहणार नाही, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे.

‘जश्न-ए-अदब’साहित्य संमेलन पुण्यात रंगणार !

  • दोन दिवसीय कार्यक्रम 26 आणि 27 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित केला जाईल.
  • हा महोत्सव भारतीय कला, संस्कृती आणि साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित असेल.
  • भारतभरातील प्रसिद्ध कलाकार साहित्योत्सव जश्न-ए-अदब सांस्कृतिक कारवाँ वारसा पाहतील.

पुणे: भारतातील सर्वात लोकप्रिय साहित्य महोत्सव आणि साहित्य आणि संगीताचा महाकुंभ ‘जश्न-ए-अदब सांस्कृतिक कारवां विरासत’ पुणे शहरात सुरू होत आहे. हा दोन दिवसीय महाकुंभ 26 आणि 27 ऑक्टोबर 2024 रोजी नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (NFAI) सभागृह, NFDC, लॉ कॉलेज रोड येथे आयोजित केला जाणार आहे. भारतीय संस्कृती, कला आणि साहित्याचा उत्सव साजरा करण्यासाठी समर्पित साहित्य उत्सव हा कार्यक्रम शास्त्रीय गायन, गझल गायन, पॅनेल डिस्कशन, नाटक, मुशायरा आणि कवी संमेलन, वाद्य वादन, शास्त्रीय नृत्य आणि लोकगायन इत्यादी उपक्रमांनी भरभराटीला येणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे आणि www.jashneadab.org या लिंकवर स्वतःची नोंदणी करून उपस्थित राहता येईल.

या भव्य सोहळ्याबद्दल उत्साह व्यक्त करताना, साहित्योत्सव जश्न-ए-आदबचे संस्थापक, कुंवर रणजीत चौहान म्हणाले, “साहित्योत्सव ‘जश्न-ए-आदब’ सांस्कृतिक कारवां विरासत २०२४ हा संपूर्णपणे भारतीय कला, संस्कृती आणि साहित्याचा उत्साही उत्सव आहे भारतीय संस्कृतीच्या वैविध्य आणि समृद्धतेचा आदर करत, देशाच्या कानाकोपऱ्यात भारतीय कला, साहित्य आणि नृत्याचा अनमोल वारसा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे नव्या पिढीच्या मनात आपल्या सांस्कृतिक परंपरेबद्दल आदर निर्माण व्हावा, अशा वेळी आम्ही सर्व शहरवासीयांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने साहित्य संमेलनात सहभागी व्हावे आणि हा अनोखा सोहळा आणखी विशेष आणि संस्मरणीय बनवावा.”

प्रख्यात बासरीवादक आणि संगीत दिग्दर्शक, पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया आणि प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक, पद्मभूषण पं. साजन मिश्रा यांच्या उपस्थितीत शनिवार, 26 ऑक्टोबर रोजी पहिल्या दिवसाची सुरुवात होईल. याशिवाय अनेक नामवंत कलाकार आणि साहित्यिकही या महोत्सवात सहभागी होणार आहेत. यानंतर मराठी कवी संमेलनात मराठी भाषेतील कवी आपल्या कलाकृतींमधून श्रोत्यांना भाषेचा गोडवा आणि खोली अनुभवायला मिळतील. यानंतर ‘अज्ञात ते ज्ञातापर्यंत…’ या सत्रात प्रसिद्ध अभिनेते, चित्रकार, लेखक आणि दिग्दर्शक पंकज झा आपल्या कवितांमधून जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करून रसिकांना मंत्रमुग्ध करतील. ‘द स्वर्लिंग वर्ल्ड ऑफ थिएटर’ या सत्रात पंकज झा आणि प्रसिद्ध अभिनेते सुमीत व्यास कुंवर रणजीत चौहान यांच्याशी संवाद साधतील आणि थिएटरच्या जगाच्या विविध पैलूंवर चर्चा करतील. ‘मृतांच्या स्मरणार्थ’ तारीकी हमीद यांचे कॉमेडी स्किट सादर केले जाणार आहे, जे प्रेक्षकांना हसायला लावेल. यानंतर ‘सूर-साधना’मधील पद्मभूषण पं. साजन मिश्रा यांचे सुश्राव्य सादरीकरण श्रोत्यांना शास्त्रीय संगीताच्या अप्रतिम प्रवासात घेऊन जाईल. पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या मधुर बासरीवादनाने कार्यक्रमाची सांगता होईल.

कार्यक्रमाचा दुसरा दिवस रविवार 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पहिले सादरीकरण ‘मुशायरा- नौ बहार’ हे असेल, ज्यामध्ये दखत रावल मिजाझ, जव्वाद सय्यद फैसल खान, अदनान शेख, शोएब फिरोजी आणि पूनम खत्री आपल्या कवितांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. यानंतर, ‘अपनी कहानी के अपनी किरादार’ सत्रात, प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक मनु ऋषी चढ्ढा त्यांच्या कथा वाचतील, ज्याच्याशी सर्व श्रोते स्वतःला जोडलेले असतील. कथ्थक तज्ञ ऋचा जैन ‘कथा-कथक’मध्ये कथ्थक नृत्य सादर करणार असून, त्यात कथा आणि नृत्याचा अप्रतिम संगम पाहायला मिळणार आहे. ‘OTT – सिनेमा आणि थिएटर- बदलते पर्यावरण’ या सत्रात मनू ऋषी चढ्ढा, प्रसिद्ध अभिनेता चंदन रॉय सन्याल, कुंवर रणजीत चौहान यांच्यासोबत ओटीटी, सिनेमा आणि थिएटरच्या बदलत्या वातावरणावर चर्चा करेल. ‘सुखन बहार- मुशायरा’मध्ये फरहत एहसास, शमीम अब्बास, मदन मोहन दानिश, कर्नल गौतम राजऋषी, कुंवर रणजीत चौहान, जावेद मुशिरी, शाकीर देहलवी आणि अनस फैजी आपल्या कवितांनी संध्याकाळ उजळून टाकतील. समारोप समारंभानंतर राजा सरफराज दरबारी अँड ग्रुप ‘मेहफिल-ए-कव्वाली’ सादर करतील.

भारतीय संस्कृती आणि साहित्याला प्रोत्साहन देणे आणि युवा पिढीला त्याचे महत्त्व पटवून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे, हे विशेष. या दोन दिवसीय महोत्सवात आयोजित केलेले विविध सांस्कृतिक आणि साहित्यिक उपक्रम पुण्यातील रहिवासी आणि पाहुण्यांना एक अनोखा अनुभव देणार आहेत. देशभरातील सर्व साहित्य आणि संस्कृती प्रेमी या महोत्सवात सहभागी होऊ शकतात आणि या अनोख्या प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा भाग बनू शकतात.

चांगुलपणाच्या बेरजेचे तत्त्वज्ञान समाजात रुजविण्याचा प्रयत्न : डॉ. श्रीपाल सबनीस

मातंग साहित्य परिषदेतर्फे डॉ. श्रीपाल सबनीस यांचा अमृत महोत्सवी सत्कार
डॉ. अशोककुमार पगारिया यांचा डॉ. श्रीपाल सबनीस समाजकार्य तर डॉ. राजा दीक्षित यांचा डॉ. श्रीपाल सबनीस विचारवंत पुरस्काराने गौरव

पुणे : ‌‘बहुजन सुखाय, बहुजन हिताय‌’ ही संकुचित भूमिका मान्य नाही तर ‌‘सकलजन हिताय, सकलजन सुखाय‌’ ही भूमिका मी मानतो. मला डावे-उजवेही मान्य नाही. मी चांगुलपणाच्या बेरजेचे तत्त्वज्ञान समाजात रुजवू पाहतो आहे, यासाठीच माझे जगणे व मरणे आहे. जातीच्या जाणिवांच्या पलिकडे जाऊन प्रेम करणे मला मान्य असून माझ्या तत्त्वात शुद्ध अंत:करणाची बेरीज आहे, असे प्रतिपादन विवेकवादी विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. प्रत्येक जाती-धर्मात चांगले-वाईट अनुभवायला मिळत असताना मातंग साहित्य परिषदेकडे संवादाचे व्यासपीठ म्हणून बघतो, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

मातंग साहित्य परिषद, पुणेतर्फे विवेकवादी विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांचा अमृत महोत्सवी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सबनीस बोलत होते. डॉ. सबनीस यांचा सत्कार कोहिनूर ग्रुपचे संचालक आणि प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची प्रमुख उपस्थिती होती तर मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात डॉ. अशोककुमार पगारिया यांचा डॉ. श्रीपाल सबनीस समाजकार्य पुरस्काराने तर डॉ. राजा दीक्षित यांचा डॉ. श्रीपाल सबनीस विचारवंत पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे, ललिता सबनीस मंचावर होते.

अभिजन आणि बहुजन यांना एकत्र करण्याची कृती मातंग साहित्य परिषदेच्या माध्यमातून होत आहे, असे सांगून डॉ. सबनीस म्हणाले, आज बहुजनामध्येही जातीवाद पोसला जात आहे. राजकारणी देखील स्वार्थासाठी असत्याची बेरीज करीत आहेत. परंतु मातंग साहित्य परिषदेच्या माध्यमातून केली जाणारी बेरीज ही सत्यासाठी होत आहे.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, डॉ. सबनीस हे कृतीशिल विचारवंत आहेत, त्यांची दृष्टी मानवतेची असून त्यांचे कार्यही महान आहे. प्रभुणे, डॉ. पगारिया, डॉ. दीक्षित यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.
गिरीश प्रभुणे म्हणाले, डॉ. श्रीपाल सबनीस हे खरोखरच विवेकवादी विचारवंत असून महाराष्ट्रासह राजकारणात आज न आढळणारा विवेकवाद डॉ. सबनीस जपत आहेत. डॉ. भिसे यांची चळवळ समन्वय आणि विवेकवादी आहे. त्यांच्या भूमिकेला सबळ करण्यात डॉ. सबनीस यांचा मोलाचा वाटा आहे.
अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य भाऊसाहेब जाधव म्हणाले, डॉ. सबनीस यांच्या वागण्या-बोलण्यात निस्वार्थीपणा आहे. त्यांचे कार्य महान आहे. ते सर्व समाजात वावरणारे आणि मानवतावाद जपणारे आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आपलेपणाची भावना आहे.
पुरस्काराबद्दल डॉ. राजा दीक्षित आणि डॉ. अशोककुमार पगारिया यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात डॉ. धनंजय भिसे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती विशद केली. आभार डॉ. संतोष रोडे यांनी मानले.

चंद्रकांतदादा कोथरूड मधून विक्रमी मताधिक्याने निवडून येणार- मुरलीधर मोहोळ

रॅलीमध्ये महिलांसह कोथरुडकर नागरीक उत्साहाने सहभागी

पुणे-कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांंनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढलेल्या रॅलीत कोथरुडकरांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य कोथरुडकर मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभागी झाले होते. कोथरूड मधून नामदार चंद्रकांतदादा पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पुन्हा शपथ घेणार असा विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवीजी, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खा. प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेनेचे नाना भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिपक मानकर, आ. भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुणे शहर भाजप सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि कोथरुड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडीमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सकाळी शंकर महाराज, कसबा गणपती, मृत्यूंजयेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. या वेळी कोथरुड मधील प्रत्येक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता.

कोथरूडकरांच्या मनातला आमदार, कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील, सर्वसामान्यांचा नेता पुन्हा होणार विजेता, था थकत ना थांबत जनसेवेसाठी दादा सदैव कार्यतत्पर अशा आशयाचे फ्लेक्स घेऊन अनेक कार्यकर्ते आणि कोथरुडकरांनी दादांना प्रतिसाद देत होते. या रॅली दरम्यान केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे कार्यालय, हुतात्मा चौक, दशभुजा गणपती मंदिर, नळस्टॉट येथे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये दादांचे स्वागत करण्यात आले.

उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, कोथरुडच्या जनतेने भारतीय जनता पक्षावर नेहमीच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत.‌देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे गेल्या १० वर्षातील विकासकामे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची राज्यभरातील सर्व सामान्य नागरिकांसाठी राबविलेल्या योजना आणि कोथरुडचे आमदार म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात राबविलेले सेवा उपक्रम आणि विकासकामे यामुळे कोथरुडची जनता समाधानी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोथरुड मधून नामदार चंद्रकांतदादा पाटील विक्रमी मताधिक्याने निवडून येतील हे आजच्या रॅलीला मिळालेल्या प्रतिसादामुळे सिद्ध झाले आहे, असा विश्वास व्यक्त केला.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत कोथरूडकर जनतेने भारतीय जनता पक्षावर भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना ७५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी बनवले. त्यामुळे आजच्या रॉलीला मिळालेला प्रतिसाद पाहून कोथरुड विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

पुणे विद्यार्थी गृहाच्या माजी कार्याध्यक्षांसह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल:बनावट बदल अर्ज दाखल करत घेतला संस्थेचा ताबा

पुणे-पुणे विद्यार्थी गृहाचे माजी कार्याध्यक्षांसह दोन जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बनावट बदल अर्ज धर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर करुन संस्थेचा बेकायदा ताबा घेऊन आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न आरोपीकडून करण्यात आल्याचे पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत सांगितले आहे.

याबाबत पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे माजी कार्याध्यक्ष रामचंद्र लक्ष्मण शेटे (वय 74, रा. चिंतामणीनगर, बिबवेवाडी,पुणे), वरुण संजय दिवाडकर (वय 32, रा. नारायण पेठ,पुणे) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजेंद्र विठ्ठल बोऱ्हाडे (वय 55, घाटकोपर, मुंबई) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. संस्थेचे माजी कार्याध्यक्ष शेटे आणि दिवाडकर यांनी तळेगाव, नाशिक-अंजनेरी येथे संस्थेची नियामक मंडळाची सभा झाल्याचे खोटे भासविले. त्यांनी संगनमत करून परस्पर सभेचे बनावट इतिवृत्त तयार केले.

दिवाडकर यांनी संस्थेचे कार्यकारी मंडळ, नियामक मंडळाच्या नियुक्तीबाबत बनावट 15 बदल अर्ज, तसेच संस्थेच्या घटनेतील बदलांबाबत दोन बदल अर्ज त्यांच्या वकिलांमार्फत पुण्यातील धर्मादाय उपायुक्त कार्यालयात देखील परस्पर सादर केले.ही गोष्ट संस्थेच्या कागदपत्रे तपासणी दरम्यान समोर आल्यानंतर हा गैरव्यवहार उघडकीस आला. त्यामुळे संस्थेचा बेकायदा ताबा, तसेच आर्थिक लाभ मिळवण्यासाठी त्यांनी आर्थिक फसवणूक केल्याचे बोऱ्हाडे यांनी तक्रारीत सांगितले आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस फडतरे याबाबत पुढील तपास करत आहेत.

भारत माताच संपूर्ण जगाला सुख व शांतीचा मार्ग दाखविणार- डॉ. विश्वनाथ दा. कराड 

तामिळनाडू येथील कुमारागुरू फाउंडेशन डे निमित्त निर्मित ग्रंथाचे प्रकाशन

पुणे, दि.२४ ऑक्टोबर: “स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्यानुसार भारत माताच संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखविणार आहे. विज्ञान आणि आध्यात्माची सांगड घालून एमआयटी संस्थेत विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. तसेच येथे विद्यार्थ्यांच्या  चारित्र्य निर्मितीवर अधिक भर दिला जातो.” असे विचार एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
 तामिळनाडूच्या कोयंबटूर मधील कुमारागुरू संस्थेच्या वतीने कुमारागुरू फाउंडेशन डे आणि अरूचेलवर यांच्या जन्म शताब्दी निमित्त कुमारागुरू संस्थेच्या वतिने तयार करण्यात आलेल्या ग्रंथाचे प्रकाशन गुरूवारी एमआयटी डब्ल्यूपीयूत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
 या प्रसंगी शक्ती ग्रुप ऑफ कंपनीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष पेरूमल, राष्ट्रसंचार व पंढरी संचार वृत्तपत्राचे  संचालक संपादक बाळासाहेब बडवे, डॉ. संजय उपाध्ये, गिरीश दाते व राजेंद्र रणभोर उपस्थित होते.
तामिळनाडूच्या कोयंबटूर मधील कुमारागुरू संस्थेच्या वतिने कुमारागुरू फाउंडेशन डे आणि अरूचेलवर यांच्या जन्म शताब्दी निमित्त डॉ. विश्वनाथ दा कराड व सौ.उषा विश्वनाथ कराड यांचा      ‘अरूचेलवर डॉ. एन. महालिंगम पुरस्कार’ देऊन नुकताच विशेष सत्कार करण्यात आला होता. या संपूर्ण कार्यक्रमाची आणि एमआयटी डब्ल्यूपीयू संदर्भातील सर्व कार्याचा आढावा या ग्रंथात नमुद करण्यात आला आहे.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले,” संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम यांच्या तत्वज्ञानाचे पालन एमआयटी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांचे जीवन घडवित आहे. तसेच जगातील सर्वात मोठ्या डोमची निर्मिती करून संपूर्ण मानव जातीला शांतीचा संदेश देण्याचे कार्य सुरू आहे.”

दिलीप वळसे पाटलांच्या उमेदवारीवरून राडा:शिवसेनेच्या आदिवासी नेत्याचा तीव्र विरोध, पत्रकार परिषदेतच केली पक्ष सोडण्याची घोषणा

पुणे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून गुरुवारी भर पत्रकार परिषदेत मोठा राडा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्यांनी वळसेंची उमेदवारी आपल्याला मान्य नसल्याची टीका करत पत्रकार परिषदेतच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली. यामुळे महायुतीचे राजकारण चांगलेच तापले आहे.

दिलीप वळसे पाटील गुरुवारी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. तत्पूर्वी आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या परिषदेत शिंदे गटाच्या आदिवासी विभागाचे प्रमुख विजय आडारी यांनी वळसेंच्या उमेदवारीला कडाडून विरोध दर्शवला. ते म्हणाले, मला या ठिकाणी पक्षाची बैठक असल्याचे सांगून बोलावण्यात आले होते. पण प्रत्यक्षात येथे दुसराच ठराव घेतला जात आहे. हा प्रकार मला मान्य नाही. वळसेंनी आम्हाला वेळोवेळी त्रास दिला. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीविरोधात आम्ही इथे आताच्या आता पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा करत आहोत.

विजय आडारी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती निवडून आणताना आणि इतर सर्व कामांत आम्ही त्यांना मदत केली. पण त्यानंतरही त्यांनी आदिवासी भागात आम्हाला खूप त्रास दिला. सद्यस्थितीत मी माझा जीव मुठीत धरून दिवस काढत आहे. आम्हाला इथे पक्षाची बैठक असल्याचे सांगून बोलावण्यात आले. पण इथे दुसराच ठराव घेतला जात आहे. त्याची आम्हाला कोणतीही माहिती नव्हती. मी जिल्ह्याचा आदिवासी प्रमुख म्हणून काम करतो. मी आत्ता या क्षणी पक्ष सोडण्याची घोषणा करत आहे. मी माझी पुढील भूमिका आताच स्पष्ट करमार नाही. पण आमचा दिलीप वळसे पाटील यांच्या उमेदवारीला विरोध आहे.उल्लेखनीय विजय आडारी यांच्या या भूमिकेमुळे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर फूट पडल्याचे चित्र आहे.

अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंसाठी आणि शरद पवारांसाठीच राज्यात प्रचार करणार

मुंबई -आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचार करणार असल्याची माहिती आहे. केजरीवाल महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तसेच इतर घटक पक्षांचा प्रचार करणार आहेत. मात्र, ते काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अरविंद केजरीवाल यांची राज्यात विभागवार सभा होणार असल्याची देखील माहिती आहे.

महाराष्ट्रात आम आदमी पक्षाचे संघटन काहीच भागात असून त्या मतदानाचा फायदा महायुतीला होऊ द्यायचा नाही, याची खबरदारी महाविकास आघाडीने घेतली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून अरविंद केजरीवाल यांना प्रचाराचे निमंत्रण देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

कथित लिकर पॉलिसी भ्रष्टाचार प्रकरणार केजरीवाल यांना तुरुंगात जावे लागले होते. याच दरम्यान त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्रीपदी गमवावे लागले. त्यामुळे केजरीवाल हे भाजपविरोधात अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या याच आक्रमकतेचा महाविकास आघाडीला फायदा करुन घेण्याचे मविआने ठरवले असल्याची माहिती आहे.

अरविंद केजरीवाल विधानसभा निवडणुकीत मुंबई, पुणे, नागपूर शहर यांसह विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचार करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, केजरीवाल हे महाराष्ट्रासह झारखंडमध्ये सुद्धा भाजपविरोधात प्रचार करणार आहेत.दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे आम आदमी पक्षाने याआधीच जाहीर केले होते. विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. आम आदमी पक्षाने हरियाणा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली होती. त्याचा थेट फटका काँग्रेसला बसून भाजपचा मोठा फायदा झाला होता. याचे विरोधकांच्या इंडिया आघाडीत तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे आपने महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीत सावध भूमिका घेत या दोन्ही राज्यांतील निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तसेच महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष इंडिया आघाडीला पाठिंबा देईल, असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार आता अरविंद केजरीवाल महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रचार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

मुद्रणाबाबतची माहिती निवडणूक कार्यालयास देणे बंधनकारक- निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम

पुणे,दि.२४: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत मुद्रणालयामध्ये निवडणूक विषयक कोणत्याही प्रकारचे मुद्रण होत असल्यास त्याची माहिती मुद्रणालय चालकाने निवडणूक कार्यालयास देणे बंधनकारक आहे, असे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कायदा व सुव्यवस्था समन्वय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम म्हणाल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुद्रणालय चालकांसोबत बुधवारी (२३ ऑक्टोबर) रोजी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

श्रीमती कदम म्हणाल्या, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ कलम १२७ (क) नुसार कोणतीही व्यक्ती मुद्रक व प्रकाशकाचे नाव व पत्ता नमूद केल्याशिवाय आणि दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेले प्रतिज्ञापत्र प्रकाशकाकडून घेतल्याशिवाय कोणतीही निवडणूक पत्रके, भित्तीपत्रक, हस्तपत्रके किंवा अन्य कागदपत्रांचे मुद्रण करणार नाही, प्रकाशित करणार नाही किंवा मुद्रण करण्याची अथवा प्रकाशित करण्याची व्यवस्था करणार नाही.

कागदपत्रांच्या मुद्रणानंतर वाजवी वेळेत कागदपत्रांच्या प्रतीसह प्रतिज्ञापत्राची प्रत जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांना देण्याची जबाबदारी अशा मुद्रणालयाची आहे, असेही श्रीमती कदम म्हणाल्या.

हडपसर विधानसभा मतदारसंघात १३ लाख रुपयांची रोकड जप्त

पुणे,दि.२३: हडपसर विधानसभा मतदारसंघात हडपसर येथे स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनांची तपासणी करण्यात येत असताना पुणे सोलापूर रस्त्यावर मांजरी बुद्रुक येथे द्राक्ष संशोधन केंद्रासमोर ह्युंदाई क्रेटा वाहन क्रंमाक एमएच ४६ सीएच ३७५७ या वाहनात १२ लाख ९९ हजार ५०० रुपये आढळून आले. ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.

स्थिर सर्वेक्षण पथकाने वाहनातील इसम वसीऊल्ला वलीउल्ला खान यांना रक्कमेबाबत विचारणा केली असता, त्यांनी सदर रक्कम ही त्यांच्या भंगार व्यवसायाची असल्याबाबत सांगीतले. परंतु त्याबद्दल कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे सदर रक्कमेचा सविस्तर पंचनामा करुन, गुन्ह्याची नोंद करुन रक्कम आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे असे हडपसर पोलीस ठाण्याच्या पोलीस उप निरीक्षकांनी कळविले आहे.

निरामय संस्था आणि एकता मित्र मंडळ यांच्याकडून मुलांना दिवाळी निमित्त भेट म्हणून नवीन कपडे वाटप

निरामय संस्था आणि एकता मित्र मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने मुलांना दिवाळी निमित्त भेट म्हणून नवीन कपडे वाटप करण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचा पुणे जिल्हा उत्कृष्ट मंडळ प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल निरामय संस्थेतर्फे एकता मित्र मंडळाचा गौरव समारंभ येथे संपन्न झाला

निरामय संस्था आणि एकता मित्र मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने अरण्येश्वर, संजयनगर व संत नगर परिसरातील १६२ हुन अधिक लहान मुलांना दिवाळीनिमित्त भेट म्हणून नवीन कपडे वाटप करण्यात आले.निरामय या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने सामाजिक संस्थंच्या सहकार्याने दरवर्षी गरजू मुलांना दिवाळी निमित्त नवीन कपडे वाटप करण्यात येतात. यावेळी गेली ८ महिन्यांपासून एकता मंडळात किशोरी शक्ती वर्ग कार्यरत असून यंदा पहिल्यांदाच मंडळात हा अतिशय आगळा वेगळा आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि त्यांच्या जीवनात आनंद आणणारा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या उपक्रमाचे आणि कार्यक्रमाचे सर्व नागरिकांनी आणि पालकांनी मनापासून कौतुक व आनंद व्यक्त करत एकता मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तसेच निरामय संस्थेचे आभार व्यक्त केले.

यावेळी एकता मित्र मंडळाला नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाचा पुणे जिल्ह्यातून उत्कृष्ट गणेश मंडळ प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल निरामय संस्थेच्या वतीने सुंदर भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

एअर इंडिया आणि सिंगापूर एअरलाइन्स भागीदारी करत आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे जाळे विस्तारून देशांतर्गत, तसेच परदेशातील ५१ शहरांना जोडणार

मुंबई/पुणे -जगभरात विमानसेवेचा विस्तार वाढविण्यासाठी एअर इंडियाने नवा पुढाकार घेतला आहे. देशांतर्गत सेवेच्या बळकटीकरणासह आंतरराष्ट्रीय विमानसेवा वाढविण्यासाठी एअर इंडियाने आता सिंगापूर एअरलाइन्सशी हातमिळवणी केली आहे. यानिमित्ताने देशातील ११ शहरे तर आंतरराष्ट्रीय ४० शहरे जोडली जाणार आहे. दोन्ही एअरलाइन्सच्या वतीने या संदर्भात नुकताच दिल्ली येथे करार झाला. एअर इंडियाचे चीफ कमर्शिअल अधिकारी श्री. निपुण अग्रवाल आणि सिंगापूर एअर लाइन्सचे चीफ कमर्शिअल अधिकारी श्री. ली लीक हसीन यांनी कोडशेअर करारावर स्वाक्षरी केली. तब्बल चौदा वर्षांनंतर पहिल्यांदाच दोन्ही एअरलाइन्सने विमानसेवा विस्तारासाठी हातमिळवणी केली. या करारामुळे केवळ भारत आणि सिंगापूर देशातील शहरेच नव्हे, तर इतर देशांतही पर्यटकांना प्रवासाचा मार्ग सुकर होणार आहे.

कोडशेअर सेवेच्या निमित्ताने करारावर स्वाक्षरी करणा-या दोन विमान कंपन्या एकमेकांच्या तिकिटाची विक्री करतात. हा करार विमानसेवेचा विस्तार वाढविण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. या निमित्ताने विमान कंपन्यांना विविध ठिकाणी उड्डाण करता येते, शिवाय तिकीट विक्रीतील वाटा उचलता येतो. कंपनीच्या आर्थिक स्थैर्यासाठी, तसेच पर्यटनाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करण्यासठी कोअरशेड करार फार महत्त्वाचा मानला जातो.

येत्या २७ ऑक्टोबरपासून एअर इंडिया आणि सिंगापूर एअरलाइन्समध्ये कोडशेअर सेवा उपलब्ध होईल. भारतात बंगळुरू आणि चेन्नई, तर सिंगापूर येथे ही सेवा सुरू होईल. या शहरांमधील एकमेकांच्या विमानसेवेची तिकिटे विकली जातील. कालांतराने साप्ताहिक कोडशेअर सेवा १४ वरून ५६वर वाढविली जाईल.

सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियाच्या दिल्ली आणि अमृतसर, बंगळुरू, कोइंबतूर, लखनऊ आणि वाराणसीच्या दरम्यान, तसेच मुंबई, अहमदाबाद, अमृतसर, बंगळुरू, कोइंबतूर, गोवा, जयपूर, कोलकाता, लखनऊ, तिरुअनंतपूरम, तसेच कोलकाता आणि गुवाहटीच्या दरम्यान देशांतर्गत उड्डाणांच्या तिकीट विक्रीत सहभाग घेईल.

दुसरीकडे एअर इंडियाचे ग्राहक सिंगापूर एअरलाइन्सच्या २९ शहरांना जोडले जातील. यात ऑस्ट्रेलिया देशातील अॅडलेड, ब्रिस्बेन, केर्न्स, डार्विन, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी ब्रुनेई देशातील बंदर, सेरी, बेगवान, कंबोडिया देशातील नोम, पेन्ह, सीमरीप, इंडोनेशियातील डेनपासार, जकार्ता, मेदान आणि सुराबाया, जपानमधील फुकुओका, नागोस ओसाका, टोकिया-हनेडा आणि टोकिया देशांचा समावेश आहे, तसेच दक्षिण कोरियातील बुसान आणि सोल, मलेशियातील क्वालालंपूर आणि पेनांग, न्यूझीलंडमधील ऑकलंड फिलिपिन्समधील सेबू आणि मनिला व व्हिएतनामधील दानांग, हनोई आणि हो ची मिन्स शहरांमध्येही कोअरशेअर सेवा उपलब्ध असेल. यामध्ये अगोदरपासूनच सुरू असलेल्या क्वालालंपूर सेवेचाही समावेश करण्यात आला आहे.

देशातील बंगळुरू, मुंबई आणि दिल्ली या शहरांतून सिंगापूर एअरलाइन्सचे ग्राहक एअरइंडियाच्या विमानांची सेवा उपलब्ध असलेल्या युरोप, आफ्रिका, तसेच इतर देशांमध्ये प्रवास करू शकतील. एअर इंडियाची विमानसेवा उपलब्ध असलेल्या डेन्मार्क येथील कोपनहेगन, फ्रान्समधील पॅरिस, जर्मनीतील फ्रॅंकफर्ट, इटलीतील मिलान, केनियातील नैरोबी, नेदरलॅँण्डमधील अॅमस्टरडॅम, सौदी अरेबियातील जेद्दाह आणि रियाध, श्रीलंकेतील कोलंबो, तसेच युनायटेड किंगडममधील बर्मिंगहॅम, लंडन-गॅटविक व लंडन-हिथ्रो शहरात सिंगापूर एअरलाइन्सच्या ग्राहकांना एअरइंडियाच्या विमानांतून प्रवास करता येईल.

या देशांमध्ये कोअरशेड सेवेचे जाळे विणत असताना, दोन्ही कंपन्या वेगवेगळे देश आणि शहरही विमानसेवेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दोन्ही कंपन्या आपापल्या बुकिंगसेवेचा दर्जा वृद्धिंगत करत कोअरशेड सेवा पुरविण्यास सज्ज झाल्या आहेत. या सेवा आवश्यक नियमांचे पालन करून काटोकोरपणे अवलंबल्या जात आहेत.

एअर इंडियाचे मुख्य व्यावसायिक अधिकारी निपुण अग्रवाल म्हणाले की, एअर इंडिया कंपनीच्या वतीने ग्राहकांना विमानसेवेचे अधिकाधिक पर्याय, तसेच जागतिक पातळीवर पर्यटनाचे विस्तारित जाळे तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा उद्देश साधण्यासाठी पूर्वीपासूनच आम्ही सिंगापूर एअरलाइन्ससोबत भागीदारी केली होती. नव्या कोअरशेअर कराराच्या निमित्ताने आता नवीन देशांना आम्ही जोडले जाऊ. दक्षिण मध्य आशिया, ऑस्ट्रेलिया आणि इतर महत्त्वाच्या देशांमध्ये आम्हांला ग्राहकांना विमानसेवा उपलब्ध करता येईल. आम्ही सिंगापूर एअरलाइन्सच्या ग्राहकांना देशातील आमची विमानसेवा उपलब्ध असलेल्या युरोप, आफ्रिका आणि इतर देशांमध्ये पर्यटनाच्या संधी उपलब्ध होतील. ही सेवा पुरविण्यास आम्ही उत्सुक आहोत.’’

वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे अजित पवारांच्या भेटीस

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची विधानसभा निवडणुकीची उमेदवार यादी बुधवारी जाहीर झाली मात्र, सदर यादीत पुण्यातील वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव नसल्याने उमेदवारीबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. यादीत नाव न आल्याने टिंगरे हे मुंबईत अजित पवार यांचे भेटीस तातडीने गेले. वडगाव शेरी मतदार संघात आपले जबरदस्त प्रस्थ तयार केल्यावर एक घटना त्यांना भोवली , पोर्श कार अपघात प्रकरणात आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरून टिंगरे अडचणीत आलेत त्यामुळे त्याचा फायदा घेत भाजपचे माजी शहराध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक यांनी हा मतदार संघ भाजपला मिळावा म्हणून स्वतःची इच्छुक उमेदवारी घोषित केली . वडगाव शेरी मतदारसंघात खा.शरद पवार यांनी देखील वैयक्तिक लक्ष्य घातले असून माजी आमदार बापू पठारे व त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांचा भाजपमधून शरदचंद्र पवार गटात प्रवेश झाला आहे. पठारे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.