पुणे -येरवडा परिसरातील एका खासगी कंपनीतील मॅनेजरने कंपनीत काम करत असताना सदर कंपनीतील २७ वर्षीय तरुणीला अश्लील शब्द वापरुन ती वॉशरुमला जाताना तिचा वारंवार पाठलाग केला. तिला उघड उघड शारिरिक संबंधाची मागणी करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न करुन, शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास कंपनीतून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने आरोपी विरोधात येरवडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तरुणी काम करत असलेल्या कंपनीतील मॅनेजरने तिचा वारंवार वॉशरुमला जाताना पाठला गेला. तुला वॉशरुमला एवढा वेळ का लागतो, अशी विचारणा त्याने करुन उघड उघड शारीरिक संबंधाची मागणी केली. तरुणीने त्यास नकार दिल्यावर कामाच्या ठिकाणी सतत तिला मानसिक त्रास दिला गेला. त्यानंतर तरुणीने याबाबत पोश कमिटीकडे तक्रार केली असता, कमिटीने सदरचे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रकार घडला. आरोपीने त्यानंतर पुन्हा उघड उघड शारीरिक संबंधाची मागणी केल्याने तरुणीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. तिला शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास कंपनीतून काढून टाकण्याची धमकी देखील आरोपीने दिली. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियांका देवकर पाटील करत आहे.
पंडित सी. आर. व्यास जन्मशताब्दीनिमित्त विशेष संगीत सभा
पुणे : गुरुकृपेने पावन झालेला शिष्य, त्याच्या भावपूर्ण शब्दांतून प्रकट झालेल्या बंदिशी, त्यांचे अर्थपूर्ण गायन याचा आकृतीबंध दर्शविणाऱ्या विशेष संगीत सभेतून पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांनी रचलेल्या बंदिशींचे सादरीकरण हीच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने अर्पण केलेली आदरांजली ठरली. निमित्त होते आकाशवाणी, पुणे आणि गांधर्व महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंडित व्यास यांच्या बंदिशींवर आधारित गायन मैफलीचे. मैफलीची सुरुवात पंडित शौनक अभिषेकी यांनी नटभैरव रागातील विलंबितमध्ये ‘गूँज रही कीरत तुम्हरी, चहूँ ओर संगीत जगत मे’ आणि मध्य लय एकतालातील ‘सूरज चंदा जबतक फिरे’ या बंदिशी सादर करून पंडित सी. आर. व्यास यांची गुरुप्रती असलेली निष्ठा, समर्पणभाव, अद्वैत, तादाम्यता दर्शविली. त्यानंतर देसी रागातील ‘आई रे आई तोहे मिलनको’, ‘शबरी भई थी राम औतार’ आणि ‘सुनरी एरी आज… शुभ दिन शुभ सगुन’ या पूरिया रागातील बंदिशी तसेच बागेश्री रागात बांधलेल्या ‘ना डारो रंग मोपे, तंग बसन अंग अंग प्रगट होत’ आणि ‘कैसी नाही तोहे लाज आवे’ या बंदिशीतून पंडित सी. आर. व्यास यांच्या शब्दसामर्थ्याचे दर्शन घडविले. पंडित सी. आर. व्यास यांनी रचलेली ‘तोहे रे गाऊँ मै आज, गुनिदास बलम मोरे’ आणि ‘चतराई कीन्हीं मोंसे, सपना मोहे दरस देके’ या स्वानंदी रागातील बंदिशीतून गुरुभक्तीचे उत्कट दर्शन घडविले. गुरुभेटीच्या आतुरतेतून निर्माण झालेली कैशिकरंजनी रागातील ‘ए मितवा कित जाय रहे भीरीमें हाथनमें लेत फूलनके हरवा’, ‘दिन मंगल आज आये गुन सागर घर आये’ या बंदिशी पंडित अभिषेकी यांनी अतिशय भावपूर्णतेने सादर केली. उत्तरार्धात पंडित सी. आर. व्यास यांचे ज्येष्ठ सुपुत्र पंडित सुहास व्यास यांचे गायन झाले. त्यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या बंदिश रचनेमागील भावपूर्ण आठवणी सांगितल्या. पंडित सी. आर. व्यास आणि पंडित जिंतेंद्र अभिषेकी यांच्यातील भावाबंधही उलगडले. सादरीकरणाची सुरुवात धनकोनी कल्याण रागातील ‘सरस सूर गाऊँ मन रिझाऊँ’, ‘बीते जीवन कछु काम ना आवे’ ही बंदिशी विलंबित लयीत तर दृतमध्ये ‘देख चंदा नभ निकस आयों’ने केली. शिव अभोगीमधील ‘सौ सौ बार गाऊँ तोहे’, ‘नित रहे मगन तोमें, मन चाहत गुन गाऊँ’, ‘तूही ग्यान तूही ध्यान चरआचरमें तूही’ या बंदिशी सादर केल्या. ‘बलम जा जा जारे काहे मनावन आया’, ‘जबहि घर आवे बतिया बनावे’ ही एका विरहिणीची लाडीक तक्रार सुधरंजनी रागात रचलेल्या बंदिशीच्या सादरीकरणातून दर्शविली. त्यानंतर ललत रागात ‘सुरनमें रस तुम हो, तालनमें लय गुनिदास’ ही भावपूर्ण बंदिश सादर केली. आत्मोपदेश स्वरूपात रचलेली गुजरीतोडी रागातील ‘बीत गयो सब जीवन तेरो, करत बखान अपनो ही अपनी’, ‘जानगुनी समझ न तोहे, भरम जाल कर दूर’ या बंदिशीनंतर दुगम हिंडोल रागातील ‘कैसे रिझाऊँ मन उन्हींके जब पिया मोरी बात न माने’, ‘मीठी बतियाँ करत नित मोंसे’ ही लाडीक तक्रार करणाऱ्या प्रियेची भावावस्था दर्शविणारी बंदिश सादर केली. जीवनाचे मर्म सांगणारी राग बिलासखानी तोडीमधील अतिशय सुमधुर बंदिश ‘तज रे अभिमान, जान गुणीयन सों, गुन की सेवा ना मानो अब मान’ आणि ‘कौन जाने, कब मिटे जाय साँस तन की..’ ही बंदिश रसिकांना विशेष भावली. कलाकारांना सुभाष कामत (तबला), प्रमोद मराठे (संवादिनी), अभेद अभिषेकी, राज शहा, केदार केळकर, निरज गोडसे (तानपुरा) यांनी साथ केली. बंदिश ही चिरकाल टिकणारी गोष्ट असून युवा पिढीतील कलाकारांनी बंदिश गाताना त्यातील मर्म, गुढार्थ समजून-उमजून सादर करावी. बंदिशीच्या शब्दांमागील विचार, ती रचताना सर्व बाजूंनी केलेला अभ्यास त्यासाठी आवश्यक अशी आध्यात्मिक बैठक आणि गुरुकृपा यातूनच हृदयाला भिडणारी कलाकृती निर्माण होते, असे पंडित सुहास व्यास यांनी आवर्जून सांगितले. आपले वडील पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित सी. आर. व्यास यांचे नाते शब्दांपलिकडचे होते असे सांगून पंडित शौनक अभिषेकी यांनी या दोन महान कलाकरांच्या भावनिक नात्याची वीण उलगडून दाखविली. युवा पिढीने अभ्यासपूर्ण नजरेने या बंदिशींकडे पाहावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे समर्पक, अभ्यासपूर्ण निवेदन मंगेश वाघमारे यांनी केले. आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी इंद्रजित बादल उपस्थित होते.
पुणे / पिंपरी (दि.25) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. १२ येथील आणि पेठ क्र. ३०-३२ येथील सर्वांसाठी परवडणारी घरे योजनेअंतर्गत शिल्लक असलेल्या सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ करण्यात आला असून त्यास प्रतिसाद मिळत आहे. यात २४ ऑक्टोबरपर्यंत जवळपास दोन हजार नागरिकांनी प्राथमिक नोंदणीची प्रक्रिया संबंधित संकेतस्थळावर केली आहे.
पीएमआरडीएअतंर्गत पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत EWS (१ BHK) प्रवर्गातील ४७ सदनिका व LIG (२ BHK) प्रवर्गातील ६१४ सदनिका तसेच पेठ क्र. ३०-३२ येथील EWS (१ RK) प्रवर्गात ३४७ सदनिका तसेच LIG (१ BHK) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांच्या लॉटरी काढण्यात येणार असून त्यासाठी इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यात १२ ते २५ ऑक्टोबर २०२४ दुपारी चारपर्यंत एक हजार ९३२ जणांनी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. यात २९९ नागरिकांनी परिपुर्ण अर्ज भरले असून २१८ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली असून त्यांचे परिपूर्ण अर्ज पीएमआरडीएला प्राप्त झाले आहे. उर्वरित अर्ज कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी अर्जदारांकडून पुर्णपणे भरलेले नाही. परंतु, त्यांची प्राथमिक नोंदणीची झाली आहे.
कागदपत्रांची पडताळणी पीएमआरडीएअतंर्गत काढण्यात आलेल्या सदनिकेच्या लॉटरीसाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. यात गत १३ दिवसात (२४ ऑक्टोबरपर्यंत) एक हजार ९३२ नागरिकांनी प्राथमिक नोंदणी केली आहे. यात आधार, पॅन, डोमेसाईल, उत्पन व जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची पडताळणी लॉनलाईन पद्धतीनेच करण्यात येत आहे. यासह शासनाच्या नियमानुसार 2018 नंतरचे डोमेसाईल तसेच जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे. या सदनिकांसाठी नागरिकांनी मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहेत.
१२ नोव्हेबरपर्यंत मुदत इच्छुकांना पीएमआरडीएअंतर्गत असलेल्या सदनिकांसाठी १२ नोव्हेबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत EWS (१BHK) प्रवर्गातील २९.५५ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत १५,७४,४२४/- इतकी असून LIG (२ BHK) प्रवर्गातील ५९.२७ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत ३५,५७,२००/ आहे. तर पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS (१ RK) प्रवर्गातील २५.५२ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत २०,९०,७७१/ असून LIG (१ BHK) प्रवर्गातील ३४.५७ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत २८,३२,२०८ आहे. या गृहप्रकल्पातील EWS प्रवर्गातील सदनिकांसाठी ५००० अनामत रक्कम असून LIG प्रवर्गातील सदनिकांसाठी १०,००० अनामत रक्कम आहे. तसेच दोन्ही प्रवर्गासाठी GST सह फॉर्म फी ७०८ रुपये लागणार आहे.
पीसीईटी आणि जपान वाणिज्य दूतावासाच्या वतीने ‘जपान मधील संधी’ यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पिंपरी, पुणे (दि. २५ ऑक्टोबर २०२४) जपान ने तंत्रज्ञानामध्ये प्रचंड प्रगती केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांना जपान मधील आधुनिक तंत्रज्ञान, औद्योगिक विकास तसेच संस्कृती अभ्यासण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्या अंतर्गत उन्हाळी शिबिरे आयोजित केली जातात. विद्यार्थ्यांना कौशल्य विकास करण्यासाठी ही उन्हाळी शिबिरे उपयुक्त आहेत असे प्रतिपादन जपानच्या एससीसीआयपीचे अध्यक्ष रेन्या किकुची यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) आणि जपान वाणिज्य दूतावासाच्या वतीने ‘जपान मधील संधी’ यावर दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे हे तिसरे वर्ष होते. यावेळी मुंबईतील जपानच्या वाणिज्य दूतावासातील संस्कृती आणि माहिती विभागाचे अधिकारी हमुरो मेगुमी, फिडेल सॉफ्टटेकचे अध्यक्ष आणि विशेष संचालक सुनील कुलकर्णी, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, जलतापचे सदस्य हरी दामले, पीसीसीओई आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत तसेच औद्योगिक क्षेत्रातील वीस कंपन्यांचे प्रतिनिधी, पुणे, पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रातील पंढरपूर, अहिल्यानगर येथील सुमारे एक हजार सातशे विद्यार्थी सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी हमुरो मेगुमी, सुनील कुलकर्णी यांनी जपानमधील अभ्यासक्रमासाठी प्रवेश, शिष्यवृत्ती योजना, जपान मधील आयटी उद्योगातील करिअर संधी विषयी माहिती दिली. इंडो – जॅपनीज असोसिएशनच्या वर्षा जोशी यांनी जपानी भाषेत सादरीकरण केले. स्वाती धर्माधिकारी यांनी ओरिगामी कला सादर केली. बोन्साय ग्रुपच्या अध्यक्षा डॉ. सुजाता भट यांच्या मार्गदर्शनाखाली जपानी भाषेत उत्कृष्ठ सादरीकरण केले. दुसऱ्या दिवशी डॉ. हरी दामले, प्रोसिड टेक्नॉलॉजीचे समीर लघाटे, फुजेत्सुचे सेवा वितरण संचालक सचिन कळसे, सुरेश पाटील, थिंक स्मार्ट सिस्टीमचे संचालक सागर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सिमिटीस्यु फॅक्टरी ऑटोमेशन ग्रुप व्यवस्थापकीय संचालक हैदर आलम, डॉ. विनायक शिंदे यांनी इंटर्नशिप, प्लेसमेंट संधी याविषयी मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन डॉ. संदीप पाटील तर गीतांजली झांबरे यांनी आभार मानले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई–महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी-पाचपखाडी येथून अर्ज भरणार आहेत. प्रचाराची औपचारिकता झाली असून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे कोकणाने त्यांची साथ सोडली. तेथे त्यांचा एकही खासदार आला नाही, आता एकही आमदार येऊ देणार नाही, असे एकनाथ शिंदेंनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंना आव्हानच दिले.
एकनाथ शिंदे म्हणाले, ठाकरे गटाने ठाणे लोकसभा जिंकण्यासाठी जंग जंग पछाडले. मात्र, त्यांना यश आले नाही. कोकणात त्यांचा एकही खासदार आला नाही. आता एकही आमदार दिसणार नाही. त्यांचे सगळे किल्ले उद्ध्वस्त झाले.
एकनाथ शिंदे यांनी पुढे बोलताना महाविकास आघाडी सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडीने बंद पाडलेले, स्टे दिलेले प्रकल्प आम्ही सुरू केले, असा दावा त्यांनी केला. आम्ही लाडकी बहीण सारख्या अनेक कल्याणकारी योजना आणल्याचेही शिंदे म्हणाले. महाराष्ट्रास मोठ्या प्रमाणावर उद्योग आले असून विकास आणि योजना यांची सांगड घालण्याचे काम आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जनता निवडणुकीत आमच्या कामाची पोचपावती देईल. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बहुमताने येईल, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आम्ही लाडकी बहीण योजना सुरु केली, त्याचवेळी काँग्रेसचा एक वडपल्लीवार न्यायालयात गेला. मात्र हायकोर्टाने त्यांना चपराक दिली होती. लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीच्या पोटात सलतीये. त्यांना आता जनता साथ देणार नाही. कोणीही माई का लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्याचे पैसे वाढत जातील. योजना बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना लोक खाली बसवतील, अस घणाघणात एकनाथ शिंदेंनी केला.
एकनाथ शिंदे यांनी महायुतीतील जागावाटपावर सुरू असलेल्या वादावर देखील भाष्य केले. सध्या महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. महायुतीतील जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल. याबाबतच्या काही बाबी नंतर सांगितल्या जातील. आमची दुसरी यादी उद्या येईल, असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत मशालीविरुद्ध धनुष्यबाण जिंकलेला आहे. त्यावेळी फेकाफेकी करुन, फेक नेरेटिव्ह करुनही धनुष्यबाण भारी पडला होता. लोकांना फसवून देखील लोकसभा निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट उबाठापेक्षा चांगला होता. कामाच्या जोरावर महायुतीचा विधानसभेला स्ट्राईक रेट एकदम सगळ्यात भारी असेल. महायुती सर्वांना चारीमुंड्या चित करेल. या निवडणुकीत आमचे लोक चौकार -षटकार मारतील, असा विश्वासही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. लोकसभेत आम्ही 13 जागा समोरासमोर लढल्या. त्यातील 7 जागा आम्ही जिंकल्या. आमचा 47 टक्के स्ट्राईक रेट होता, तर त्यांचा 40 टक्के स्ट्राईक रेट होता, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
खडकवासला विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांचे निर्देश
पुणे, दि. २५ : निवडणुकीतील पोलीस दलाची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याने या कालावधीत शांतता राखणे, गैरव्यवहार टाळणे आणि जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी पोलीस दलाने समन्वय ठेऊन आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, असे निर्देश खडकवासला विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिले. सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आले आहे. या दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी डॉ. माने बोलत होते.
यावेळी तहसीलदार किरण सुरवसे, अंकुश गुरव आदी उपस्थित होते. निवडणूक कालावधीत शांतता राखणे, गैरव्यवहार टाळणे आणि जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देणे कायदा व सुव्यस्था राखण्याच्या दृष्टीने महत्वाचे असते. पोलिसांची भूमिका संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत अत्यंत महत्वाची आणि तितकीच जबाबदारीची असते. कामकाज करताना निवडणुक प्रशासनासमवेत समन्वय असला पाहिजे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे, असे सांगून डॉ. माने यांनी त्यादृष्टीने महत्वाच्या सूचनादेखील दिल्या. या शिबिराचे प्रमुख प्रशिक्षक प्रा. तुषार राणे आणि प्रा. माधुरी माने यांनी पोलीस दलाच्या निवडणूक प्रक्रियेतील जबाबदाऱ्या आणि अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले. कायदेशीर प्रक्रियेबाबत सखोल माहिती तसेच परिस्थितीनुरूप कार्यक्षमता वाढवण्याचे यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचा उपयोग पोलीस दलाला त्यांच्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यासाठी होणार आहे. 0000
प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या कडून चंद्रकांतदादांच्या कामाचे कौतुक
पुणे -राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज सकाळी पासून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या आणि प्रथितयश व्यक्तींच्या भेटी-गाठी घेण्यास सुरुवात केली आहे. आज आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगणक तज्ज्ञ तथा प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांची चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट घेतली. यावेळी डॉ. भटकर यांनी चंद्रकांतदादांच्या कार्याचे कौतुक केले.
भारतीय जनता पक्षाकडून चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज सकाळी कोथरूड मधील विठ्ठल मंदिरात काकड आरतीला उपस्थिती लावली. त्यानंतर आज विविध क्षेत्रातील मान्यवर आणि प्रथितयश व्यक्तींच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली.
या भेटीमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांचे आदरपूर्वक स्वागत केले जात आहे. त्यामुळे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. आज प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ विजय भाटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या. यावेळी डॉ. भटकर यांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले.
यासोबतच चितळे बंधू मिठाईवालेचे संजय चितळे, इंद्रनील चितळे, प्रसिद्ध कथक नृत्यांगना गुरु शमा भाटे, विनीत कुबेर, रवींद्र घाटपांडे, भूपाल पटवर्धन, डॉ. दीपक शिकारपूर आदींच्या भेटीगाठी घेऊन, अनौपचारिक संवाद साधला.
पुणे, दि. २५ ऑक्टोबर २०२४: महावितरणचे वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाइन’द्वारे विविध पर्याय उपलब्ध असतानाही गेल्या सहा महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रातील लघुदाब ग्राहकांनी वीजबिलांपोटी दिलेले ४१ कोटी ८९ लाख रुपयांचे १६ हजार १४१ धनादेश विविध कारणांमुळे अनादरीत (चेक बाऊंस) झाले आहेत. त्यामुळे या ग्राहकांना बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस म्हणून तब्बल १ कोटी २१ लाख ५ हजार ७५० रुपयांचा नाहक दंड तसेच १.२५ टक्के विलंब आकार शुल्क देखील भरावे लागले आहे. त्यामुळे धनादेशाऐवजी घरबसल्या ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा फायद्याचे झाले आहे.
पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत गेल्या सहा महिन्यांत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार ५४३ धनादेश अनादरीत झाल्याने बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेसचे ९४ लाख ७ हजार २५० रुपये भरावे लागले आहे. तर सातारा- ४८८ धनादेश अनादरीत झाल्याने ३ लाख ६६ हजार रुपये, सोलापूर- ८९४ धनादेश अनादरित झाल्याने ६ लाख ७० हजार ५०० रुपये, कोल्हापूर- १७२२ धनादेश अनादरीत झाल्याने १२ लाख ९१ हजार ५०० आणि सांगली जिल्ह्यात ४९४ धनादेश अनादरित झाल्याने ३ लाख ७० हजार ५०० रुपये ग्राहकांना भरावे लागले आहे.
वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाइन’सह ‘ईसीएस’, ‘एनईएफटी’, ‘आरटीजीएस’ असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रात दरमहा सरासरी २६९० धनादेश अनादरित झाले आहेत. त्यामुळे लघुदाब ग्राहकांनी धनादेशाऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे वीजबिलांचा भरणा करावा असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.
अनादरीत धनादेशासाठी चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, संबंधीत खात्यात रक्कम नसणे आदी कारणे दिसून येत आहेत. अनादरीत धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा एकत्रित भरणा केला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी दंडात्मक रक्कम व विलंब आकार लावण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक वीजबिलासाठी ७५०/- रुपये बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस व १.२५ टक्के विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे.
धनादेश दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच वीजबिल भरणा ग्राह्य धरला जातो. याउलट पश्चिम महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला राज्यात सर्वाधिक ४२ लाख १२ हजार (७९ टक्के) लघुदाब वीजग्राहक सरासरी ११९५ कोटी ७० लाख रुपयांच्या (८० टक्के) वीजबिलांचा घरबसल्या व सुरक्षितपणे भरणा करीत आहेत.
महावितरणकडून लघुदाबाच्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाइन’द्वारे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगची सोय उपलब्ध आहे व प्रत्येक वीजबिलासाठी ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. यासोबतच दरमहा थेट बॅंक खात्यातून इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टीम (ईसीएस) आणि ५ हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिलासाठी ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे वीजबिल भरण्याची सुविधा आहे.
बॉलिवूडचे पॉवरहाऊस असलेले अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा साहस आणि विनोद यांनी परिपूर्ण असा ‘बड़े मियां छोटे मियां’ हा चित्रपट प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट २७ ऑक्टोबर रोजी सोनी मॅक्सवर प्रदर्शित होणार आहे. टेलिव्हिजन प्रिमिअरच्या आधी अक्षय कुमारने टायगर श्रॉफबरोबर काम करण्याचा आपला अनुभव सांगितला. “टायगर हा मला माझ्या धाकट्या भावासारखा आहे”, तो म्हणाला. “आम्ही लगेच मित्र झालो आणि आमची मैत्री आश्चर्यकारक आहे. धाडसी साहसदृष्ये सादर करण्यापासून ते व्हॉलीबॉल, लुडो यांसारखे खेळ आणि आराम करण्यापर्यंत आम्ही तासन्तास एकत्र घालवले आहेत. तो पूर्णपणे व्यावसायिक आहे आणि मी त्याच्याकडून खूप काही शिकलो आहे.
प्रामाणिकपणे सांगायचे, तर आता मी टायगरबरोबरच्या चित्रीकरणाला मुकणार आहे.” ‘बड़े मियां छोटे मियां’ या अभिजात चित्रपटाचे हे आधुनिक सादरीकरण आहे. यात रोमांचक कथा, आश्चर्यकारक दृश्ये आणि चित्तथरारक साहसदृश्ये आहेत. या चित्रपटात दोन माजी सैनिकांची कथा आहे, जे जगाला धोकादायक संकटातून वाचवण्यासाठी सैन्यात सहभागी होतात. ‘बड़े मियां छोटे मियां’ हा सर्व वयोगटांतील प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा, साहस, विनोद आणि नाट्य यांचा परिपूर्ण मिलाप आहे. २७ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ८ वाजता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सोनी मॅक्सवर पाहायला विसरू नका.
उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडले,पुण्यात ठाकरे गटाला एकही जागा नाही
पुणे-पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार महादेव बाबर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर 6 तास थांबलो. पण त्यांनी केवळ 40 सेकंद आम्हाला दिले. ठाकरेंनी पुणे जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार केली असून, आम्ही यापुढे त्यांचे काम करणार नाही, असे बाबर यांनी म्हटले आहे.
शरद पवार गटाने हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणाहून ठाकरे गटाचे महादेव बाबर इच्छुक होते. पण ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला गेल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. या प्रकरणी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवत हडपसर येथून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिलेत.महादेव बाबर म्हणाले, मी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेलो. तिथे तब्बल 6 तास त्यांची वाट पाहिली. पण त्यांनी केवळ 40 सेकंद आम्हाला दिले. उद्धव यांनी शिवसेना पुणे जिल्ह्यातून हद्दपार केली आहे. त्यांना येथून एकही जागा आपल्या पक्षासाठी मिळवता आली नाही. त्यामुळे शिवसेना केवळ मुंबईपुरती मर्यादित राहिली आहे. यामुळे सर्व शिवसैनिक नाराज झालेत. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यात झाला. पण तिथेच ठाकरे गटाला एकही जागा मिळाली नाही.
आम्ही आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धडा शिकवू. या प्रकरणी केवळ मीच नाही तर संपूर्ण पुणे जिल्हा नाराज आहे. शिवसैनिक नाराज आहेत. जिल्ह्यात मशालीचा एकही उमेदवार नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी काम कसे करायचे? पुणे जिल्ह्यात मशाल कशी पोहोचवावी? मी याविषयी लवकरच माझ्या समर्थकांचा मेळावा घेईल.
महादेव बाबर म्हणाले, पक्षप्रमुखांना आमचे काहीही देणेघेणे नाही. त्यांनी शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडले आहे. आमची तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही महाविकास आघाडीसोबत राहणार नाही. मी आजपासूनच शिवेसनेचे काम करणार नाही. काही दिवसांपूर्वी मी संजय राऊत यांना भेटलो. त्यात त्यांनी शरद पवार स्वतः माझे नाव सर्व्हेत आघाडीवर असल्याचे सांगितले होते. याचा अर्थ संजय राऊत साफ खोटे बोलले.उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मी व माझे सहकारी तब्बल 6 तास थांबलो. पण ठाकरेंनी केवळ 40 सेकंद आमच्याशी संवाद साधला. त्यात त्यांनी केवळ प्रयत्न सुरू आहेत असे वाक्य उच्चारले. त्यानंतर ते निघून गेले, असेही महादेव बाबर यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधताना म्हणाले.
कामगारांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक
पुणे दि.२५:भोसरी येथे पाण्याची टाकी कोसळून दुर्घटना झाली त्या ठिकाणाला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, ऐन सणासुदीच्या तोंडावर कामगारांवर जो प्रसंग ओढवला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील कामगारांसाठी तकलादू पद्धतीने पाण्याची टाकी उभारली असल्याचे प्रथमदर्शनी कळते आहे. येथील ठेकेदाराने येथील टाकीची बांधणी व्यवस्थित केली असती तर हा प्रसंग ओढवला नसता. तसेच येथील कामगार हे कुठून आलेले आहेत याची माहिती पूर्णपणे नाही. कामगार विभाग आणि महापालिका सातत्याने कामगारांची नोंदणी व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. यातून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागू शकतो. जे श्रमिक कामगार आहेत त्यांची अधिकृतपणे नोंदणी होणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर त्यांना जे लाभ मिळतात त्याबद्दल कामगार अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. बऱ्याचदा हे लाभ द्यावे लागू नयेत म्हणून कंत्राटदार त्यांची अधिकृत नोंदणी करण्यास विलंब करत असतात त्यामुळे कामगारांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक असल्याचे मत शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
याखेरीज पिंपरी चिंचवड भागात सर्वच ठिकाणी कामगारांची नोंदणी होण्यासाठी तपासणी मोहिम चे आयोजन करावे, याखेरीज ज्या ज्या ठिकाणी लेबर कॅम्प आहेत तेथे मोबाईल व्हॅनने काय सोयी सुविधांची तरतुद केली आहे याची देखरेख करणारी नोंदणी व तपासणी सुरू करावी.या घटनेतील मृत्युमुखी पडलेले कामगार हे बाहेर राज्यातील असल्याने त्या त्या राज्यातील प्रशासनाला यासंदर्भात माहिती देऊन त्यांच्या परिवाराला कळवावे, या घटनेत ज्यांना अपंगत्व आलेले आहे तसेच ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्या सर्वांचा खर्च संबंधीत कंपनीने करावा आणि या घटनेचा सविस्तरपणे अहवाल सादर करावा अशा सुचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या .
तसेच या पूर्वी देखील तळवडे येथे दुर्दैवी घटना घडली होती त्यासंदर्भात विधानपरिषदेत लक्षवेधी अंतर्गत प्रश्न घेऊन निर्देश देखील दिले होते. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने संपूर्ण सर्वेक्षण करून कामगारांना कशा प्रकारे सुरक्षा देता येईल याबद्दल अहवाल मागविला होता. तसेच पिंपरी चिंचवड, भोसरी भागातील रेड झोन चा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे येथील जमिनीवर असणाऱ्या मजूर कॅम्प हे चिंतेचे विषय बनले आहेत. असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
याप्रसंगी,सारिका ताई पवार,मनीषाताई परांडे,संभाजी शिरसाठ, दादासाहेब बांगर तसेच कामगार उपायुक्त अभय गीते, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण, उपअग्निशामक अधिकारी दिलीप गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहीवाल, पिंपरी चिंचवड मनपा उपअभियंता मनोज बोरसे, विभाग अधिकारी फडतरे, लेबर अधिकारी श्रीकांत चौबे उपस्थित होते.
पुणे-विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आचारसंहिता सुरू असल्याने पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. पुण्यातील सहकारनगर परिसरात शुक्रवारी सकाळी नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एका टेम्पोतून तब्बल 138 कोटी रुपयांचे सोने जप्त केले. आचारसंहिता काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने पकडले गेल्यामुळे शहरात एकच खळबळ माजली. पण चौकशीअंती हे सोने बेकायदा नव्हे तर एका सोने डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीचे असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी नाकेबंदीत पकडलेल्या या सोन्याची माहिती निवडणूक अधिकारी व आयकर विभागालाही दिली. त्यानंतर जप्त करण्यात आलेले सोने पुढील तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. पाेलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की, सहकारनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी सुरु असताना, मुंबईच्या दिशेने एक पांढऱ्या रंगाचा टेम्पाे एमएच 02 ईआर 8112 हा पुण्यात आला होता. सिक्वेअल कंपनीचा सदर टेम्पाे सहकारनगर परिसरातून जात असताना पाेलिस पथकाने त्याला थांबवून त्याची तपासणी केली. त्यात टेम्पोत पांढऱ्या पोत्यांत बॉक्स ठेवल्याचे आढळले. पोलिसांनी संशयावरून त्याची पाहणी केली असता त्यात 138 किलाे साेने असल्याचे दिसून आले. सदर सोने हे मुंबईतील एका साेने डिलीव्हरी करणाऱ्या कंपनीचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्याबाबतची कागदाेपत्री तपासणी आयकर विभाग करत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे पुण्याच्याच खेड – शिवापूर परिसरात सोमवारी रात्री एका कारमधून तब्बल 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या घटनेमुळे अवघे राजकारण ढवळून निघाले होते. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी ही रोख रक्कम सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे असल्याचा आरोप केला होता. पण त्याची पुष्टी झाली नव्हती.
पुणे-कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना देखील वैद्यकीय व्यवसाय करत रुग्ण तपासणी करून औषध उपचार करणाऱ्या खोट्या डाॅक्टरविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पांडुरंग बबनराव देवडकर (वय 40, रा. पायस सोसायटी, लोकमान्यनगर, नवी पेठ,पुणे) असे गु्न्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत डाॅ. गोपाळ उजवनकर (वय 38) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. आरोपी देवडकर याच्याकडे वैद्यकीय पदवी नसताना नाडी परीक्षण करुन तो नागरिकांना औषध देत होता. याबाबतची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली. याप्रकरणी चौकशी करण्यात आली. तेव्हा देवडकर याच्याकडे वैद्यकीय पदवी, तसेच व्यवसायाच कोणते प्रमाणपत्र नसल्याचे उघड झाले. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स ॲक्ट 1961 चे कलम 33 (1) उल्लंघन केल्याप्रकरणी देवडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करत आहेत.
पुणे शहर, परिसरात वैद्यकीय पदवी नसताना व्यवसाय करणाऱ्या बनावट डाॅक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कोरेगाव येथे बनावट नाव आणि वैद्यकीय पदवीचा वापर करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या मेहमूद फारुक शेख याला अटक करण्यात आली हाेती. आरोपी शेख हा महेश पाटील या बनावट नावाने रुग्णालय चालवत होता. शेखचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. दहावीनंतर नांदेड येथे एका खासगी रुग्णालयात तो कंपाउंडर म्हणून काम करीत होता. मुंढवा केशवनगर भागातील पी. रामकृष्ण रेड्डी (वय 66) तो शस्त्रक्रिया विभागात मदतनीस होता. निवृत्तीनंतर त्याने उत्तर प्रदेश येथून एका संघटनेकडून प्रमाणपत्र घेऊन मुंढवा भागात दवाखाना थाटल्याचे उघडकीस आले होते. जुलै महिन्यात लोणी काळभोर भागात तोरणे नावाच्या तोतया डाॅक्टरला अटक करण्यात आली होती. वारजे भागात मूळव्याधीवर उपचार केंद्र चालविणाऱ्या आरोपीला देखील अटक करण्यात आली होती.
पुणे: डॉ. महमंदखान करीमखान व त्यांच्या पत्नी बिबी राबियाबी यांनी १९३५ साली लक्ष्मी रस्त्यावरील १७ हजार ३०० फूट क्षेत्रफळ असलेली सुमारे १०० कोटी रुपयांची मालमत्ता आमदार रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा यांच्यासह अन्य साथीदारांच्या साथीने हडप केल्याचा प्रकार उघड झाला आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी नुकत्याच दिलेल्या निकालात ही मालमत्ता ‘वक्फ’ बोर्डाची असल्याचे घोषित केल्यानंतर याठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाला महापालिकेने तातडीने स्थगिती दिली आहे. लक्ष्मी रस्त्यावर हामजेखान चौकात असलेला हा १७ हजार चौरस फुटाच्या भूखंडाची किंमत १०० कोटी रुपयांहून अधिक आहे. याठिकाणी होणारी उलाढाल ही करोडो रुपयांमध्ये असल्याने या भूखंडावर डोळा ठेवून तो लाटण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषदेत पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गणेश बीडकर यांनी केला आहे. याप्रकरणी रसुल अन्सर चित्तारी व त्यांचे सहकारी डॉ. एहेतेशाम शेख, वसीमभाई शेख, महिबूब सय्यद, वाहिद शेख, साबीर सय्यद, जमीर मोमीन, हमजा एहेतेशाम शेख, फारुख शेख, शफी मामु उपस्थित होते.
गणेश बीडकर म्हणाले, “डॉ. महमंदखान करीमखान यांनी ही मालमत्ता वक्फला देताना या मालमत्तेचा कशासाठी वापर करण्यात यावा, हे आपल्या वक्फनाम्यात स्पष्ट केले होते. या मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न मशिदीसाठी, गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, दफनविधी, गरिबांचे लग्नकार्य आदी समाजउपयोगी कार्यासाठी खर्च करावे, असा उदार विचार डॉ. महमंदखान करीमखान यांनी १९३६ साली वक्फनाम्यात मांडला होता. मात्र, त्यांच्या पश्चात ही जमीन वक्फ न होता तिचा गैरवापर सुरू होता. या प्रकरणी रसुल अन्सर चित्तारी व त्यांचे सहकारी डॉ. एहेतेशाम शेख, वसीमभाई शेख, महिबूब सय्यद, वाहिद शेख, साबीर सय्यद, जमीर मोमीन, हमजा एहेतेशाम शेख, फारुख शेख, शफी मामु यांनी वक्फ मंडळाकडे पाठपुरावा सुरू केल्यानंतर हा गैरप्रकार लक्षात आला आहे.
या जमिनीचा सध्याचा ताबा हा आमदार धंगेकर यांची पत्नी प्रतिभा यांच्यासह सहकारी व्यक्तींकडे आहे. गेली अनेक वर्षे याप्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन संघर्षानंतर ७ ऑक्टोबर रोजी वक्फ मंडळाने हा भूखंड वक्फ असल्याचे घोषित केले. त्यामुळे मुस्लिम समाजाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. त्यासाठी चित्तारी यांनी अनेक वर्ष न्यायालयीन लढा दिला. ही जागा वक्फ असल्याचे धंगेकर यांना माहिती असतानाही त्यांनी या जागेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी सुरू ठेवला होता. त्याला वक्फ मंडळाच्या आदेशाने लगाम लागला आहे. आमदार धंगेकर हे अनेक वर्ष महापालिकेत नगरसेवक होते. त्यांच्या पत्नीच्या नावे हा भूखंड असल्याने त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत वक्फ असलेली मालमत्ता स्वतःच्या फायद्यासाठी लाटून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू केले असल्याचा आरोप मूळ अर्जदार व सहकारी यांनी पत्रकार परिषदेत केला.
महापालिका प्रशासनाने या बांधकामास परवानगी दिल्याने वक्फ मंडळाने महापालिका आयुक्तांनाही पत्र पाठवून हे बांधकाम थांबविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने तातडीने या बांधकाम थांबविण्याचे आदेश मे. उत्कर्ष असोसिएटसतर्फे प्रतिक सुनील आहिर व इतरांना १८ ऑक्टोबर रोजी दिले आहेत. याशिवाय वक्फ मंडळाने जिल्हाधिकारी तसेच संबंधित यंत्रणांना आदेश देत या मालमत्ता पत्रकाच्या मालकी हक्कात वक्फ संस्थेचे (डॉ. महमंदखान करीमखान बीबी राबिया वक्फ) यांचे नाव लावण्यात यावे, तसेच या मालमत्ता पत्रकात असलेल्या खासगी व्यक्तींची नावे कमी करावीत, असे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.
एका लोकप्रतिनिधींकडून सार्वजनिक वापरासाठी, गोरगरिबांसाठी दान केलेल्या (वक्फ) जागेचा स्वतःच्या हितासाठी तिचा वापर करणे हे दुर्दैवी आहे. याप्रकरणी वक्फ मंडळाकडे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा रविंद्र धंगेकर व त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि लवकरात लवकर ताबा घेण्यात यावा. तसेच जिल्हा भूमिअभिलेख / नगर भुमापन क्र. २ येथे अर्ज करून प्रॉपर्टीकार्डवरून नाव कमी करून वक्फ बोर्डाचे नाव त्वरित करण्यात यावी असा अर्ज वक्फ बोर्डकडे करण्यात आला आहे, असे बीडकर यांनी सांगितले.
पुणे- कसबा भाजपच्या ताब्यातून कॉंग्रेसकडे खेचल्यावर आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीला कॉंग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली असली तरी गेल्या निवडणुकीत मिळाले तसे सहाय्य त्यांना यावेळी मविआ कडून मिळणार काय? असा सवाल उपस्थित होईल असे चित्र दिसू लागले आहे . त्याला कारणही तसेच घटना दिसत आहे. माजी महापौर कमल व्यवहारे यांनी कसब्यात बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे.
कॉंग्रेसच्या माजी महापौर महिला प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे ‘संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्ष’ च्या वाटेवर असून त्या कसबा मतदार संघात स्वराज्य पक्षा कडून लढणार असे येथे चित्र रंगविले जातेय. . उद्या सकाळी ठिक 10 वा. कसबा गणपतीचे दर्शन घेवून माझी राजकीय भूमिका जाहीर करणारं आहे असे कमल व्यवहारे यांनी जाहीर केलंय.
२०१९ ला देखील व्यवहारे यांनी कॉंग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांच्या विरोधात प्रथमतः बंडखोरीचा पवित्र जाहीर केला होता पण नंतर माघार घेतली होती.