Home Blog Page 613

राज्यात १८ ते १९ वयोगटातील २२ लाख २२ हजार ७०४ तर वयाची शंभरी पार केलेले ४७ हजार ३९२ मतदार

मुंबई, दि. 31 : राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील एकूण 22 लाख 22 हजार 704 तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले 47 हजार 392 मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

राज्यातील एकूण मतदारांमध्ये 5 कोटी 22 हजार 739 पुरुष, 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला तर 6 हजार 101 तृतीयपंथी मतदार असे एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आहेत. यामध्ये 18 ते 19 वर्षे वयोगटातील एकूण 22 लाख 22 हजार 704 मतदारांमध्ये पुरुष मतदार 12 लाख 91 हजार 847, 9 लाख 30 हजार 704 महिला तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 153 इतकी आहे. 20 ते 29 या वयोगटातील एकूण 1 कोटी 88 लाख 45 हजार 005 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 कोटी 1 लाख 62 हजार 412, महिला मतदार 86 लाख 80 हजार 199 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 2394 इतकी आहे. 30 ते 39 या वयोगटातील एकूण 2 कोटी 18 लाख 15 हजार 278 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 कोटी 11 लाख 21 हजार 577, महिला मतदार 1 कोटी 6 लाख 91 हजार 582 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 2 हजार 119 इतकी आहे.

40 ते 49 या वयोगटातील एकूण 2 कोटी 7 लाख 30 हजार 598 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 कोटी 7 लाख 49 हजार 932, महिला मतदार 99 लाख 79 हजार 776 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 890 इतकी आहे. 50 ते 59 या वयोगटातील एकूण 1 कोटी 56 लाख 10 हजार 794 मतदारांमध्ये पुरुष मतदार 78 लाख 54 हजार 052, महिला मतदार 77 लाख 56 हजार 408 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 334 इतकी आहे. 60 ते 69 या वयोगटातील एकूण 99 लाख 18 हजार 520 मतदारांमध्ये पुरुष मतदार 50 लाख 72 हजार 362, महिला मतदार 48 लाख 46 हजार 25 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 133 इतकी आहे.

वर्ष 70 ते 79 या वयोगटातील एकूण 53 लाख 52 हजार 832 मतदारांमध्ये पुरुष मतदार 26 लाख 36 हजार 345, महिला मतदार 27 लाख 16 हजार 424 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 63 इतकी आहे. 80 ते 89 या वयोगटातील एकूण 20 लाख 33 हजार 958 मतदारांमध्ये पुरुष मतदार 9 लाख 15 हजार 798, महिला मतदार 11 लाख 18 हजार 147 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 13 इतकी आहे. 90 ते 99 या वयोगटातील एकूण 4 लाख 48 हजार 38 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 लाख 97 हजार 323 तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 50 हजार 715 इतकी आहे.

वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेल्या 100 ते 109 या वयोगटातील एकूण 47 हजार 169 मतदारांमध्ये पुरुष मतदार 20 हजार 983, महिला मतदार 26 हजार 184 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 2 आहे. 110 ते 119 या वयोगटातील एकूण 113 मतदारांमध्ये पुरुष मतदार 52 तर महिला मतदारांची संख्या 61 आहे. तर 120 हून अधिक वयोगटातील 110 मतदारांमध्ये पुरुष मतदार 56 तर महिला मतदारांची संख्या 54 आहे.

विशेष वयोगटामध्ये 85 ते 150 वयोगटामधील एकूण 12 लाख 40 हजार 919 मतदारांमध्ये 5 लाख 42 हजार 891 पुरुष, 6 लाख 98 हजार 022 महिला आणि 6 तृतीयपंथी मतदार आहेत. तर 100 ते 150 वयोगटामधील एकूण 47 हजार 392 मतदारांमध्ये 21 हजार 91 पुरुष, 26 हजार 299 महिला आणि 2 तृतीयपंथी मतदार आहेत. त्याचबरोबर एकूण 6 लाख 41 हजार 425 दिव्यांग मतदारांमध्ये पुरुष मतदार 3 लाख 84 हजार 69, महिला मतदार 2 लाख 57 हजार 317 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 39 इतकी आहे. सेवा दलातील (सर्व्हिस व्होटर्स)  एकूण 1 लाख 16 हजार 170 मतदारांमध्ये 1 लाख 12 हजार 318 पुरुष तर 3 हजार 852 महिला मतदार आहेत.

राज्यात मतदानासाठी एकूण 1 लाख 186 मतदान केंद्र उभारण्यात येत असून यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 केंद्र असणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकीसाठी वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तात्काळ हटवा.

पक्षपाती पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग का हटवत नाही? : नाना पटोले

झारखंड, पश्चिम बंगाल व महाराष्ट्राला वेगळा कायदा आहे का?

मुंबई, दि. ३१ ऑक्टोबर २०२४
विधानसभेच्या निवडणुका सुरु झाल्या असतानाही निवडणूक आयोगाने अद्याप पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले नाही. काँग्रेस पक्षाने रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती पण त्याकडे आयोगाने दुर्लक्ष केले आहे. पश्चिम बंगाल व झारखंडच्या पोलीस महासंचालकांना हटवण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली असता त्यांना तात्काळ बदलण्यात आले पण महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना याच निवडणूक आयोगाने अद्याप हटवले नाही. रश्मी शुक्ला या वादग्रस्त व भारतीय जनता पक्षाला मदत करणाऱ्या अधिकारी आहेत, त्या पदावर असल्याने निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पडतील असे वाटत नाही त्यामुळे त्यांना पदावरून तात्काळ हटवावे, या मागणीचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुनरुच्चार केला आहे.

निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की, काँग्रेस पक्षाने २४ सप्टेंबर २०२४ व ४ ऑक्टोबर २०२४ रोजी पत्र पाठवून रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. २७ सप्टेंबर रोजी निवडणुक आयोगाचे अधिकारी मुंबई दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करणे व त्यांना नाहक त्रास देण्याचे फर्मान पोलीस आयुक्त तसेच जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना सोडले आहे, पोलीस यंत्रणा विरोधी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांची अडवणूक करत आहेत, त्यांच्यावर दबाव आणत आहेत, धमक्या देत आहेत. रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती याआधीही वादग्रस्त राहिली आहे. त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते, शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर त्यांना पोलीस महासंचालक पदावर नियुक्त करण्यात आले आणि निवृत्तीनंतरही त्यांना नियमबाह्य पद्धतीने कार्यकाल वाढवून दिला आहे. निवडणुका पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी वादग्रस्त व सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवणे गरजेचे आहे, आयोगाने त्यांना तात्काळ हटवावे, असे नाना पटोले म्हणाले.

पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर

पुणे, दि. 31 : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेख्यांची तपासणीच्या तरतूदीनुसार पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरिक्षक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघातील कै. बाबुराव सणस मैदान, सारसबाग जवळ, पुणे येथील निवडणूक खर्च नियंत्रण कक्षात खर्च तपासणी करण्यात येईल. ही तपासणी तीन टप्प्यात होणार असून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी 9 नोव्हेंबर रोजी तर दुसरी 13 नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी 17 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 12. 30 वाजता होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय मनोजकुमार खैरनार यांनी दिली आहे.

बंडोबांच्या किंमती भिडल्या गगनाला: एका बंडोबाला मुंबईत नेण्यास भाजपने पाठवले चार्टर्ड विमान

मुंबई- महायुती – महाविकास आघाडीत यंदा बंडखोरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या बंडखोरांची समजूत काढून ४ नोव्हेंबरपर्यंत त्यांना अर्ज माघारी घ्यायला लावण्यासाठी नेत्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर प्रमुख नेते नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. भाजपने सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सुधीर मुनगंटीवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह ६ नेत्यांवर विभागनिहाय मन वळण्याची जबाबदारी सोपवली आहे. ४ तारखेपर्यंत हे उमेदवार माघार घेतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

कालपर्यंत नेत्यांच्या घराचे उंबरे झिजवणाऱ्या बंडोबांना आता पहिल्या दिवाळीत नव्या जावयाला मिळतो तसा पाहुणचार मिळू लागलाय. शिर्डीतील बंडोबाला आणण्यासाठी भाजप श्रेष्ठींनी चक्क चार्टर्ड विमान पाठवावं लागलं. पण त्याने मुंबईत जाऊनही ‘श्रद्धा व सबुरी’चाच मंत्र दिला. इकडे ‘यू टर्न’फेम राजसाहेबांनी स्वबळाचा नाद सोडून ‘कमळ’ हाती घेण्याचे संकेत दिलेत. त्यांनाही ‘इंजिन’ सत्तेच्या यार्डात लावायचंय ना. पण माहीममध्ये ‘राज’पुत्राच्या विजयाचे कोडे क्लिष्ट बनलेय. ज्या सरवणकरांवर ‘सदा’ दबाव टाकला जातोय त्यांनीच आज बाळासाहेबांची आठवण करून देत राज यांच्या डोळ्यात अंजन घातलंय.मात्र आता याच सदाभाऊ ना विधानपरिषदेचे गाजर दाखविले जाऊ लागले आहे.

शिर्डीतून भाजपने मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना उमेदवारी दिली. मात्र पक्षाचे नेते राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी भाजप नेत्यांनी बुधवारी विशेष चार्टर्ड विमान पाठवून त्यांना सपत्नीक मुंबईत नेले. ‘पक्षनेतृत्वाने चर्चेस बोलावल्याने आपण गेलो. मात्र अद्याप निर्णय झाला नाही,’ असे पिपाडा यांनी सांगितले. यापूर्वी कोपरगावात उमेदवारीवर अडून बसलेल्या माजी आ. स्नेहलता कोल्हे यांना थेट दिल्लीत नेऊत अमित शाह यांची भेट घालून देत नाराजी दूर केली होती.

अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या:निवडणूक शपथपत्रात 16 चुका; मालमत्तांची माहितीही लपवली, उमेदवारी रद्द करण्याची मागणी

सिल्लोड -सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अब्दुल सत्तार यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात गंभीर प्रकारच्या सोळा चुका असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसेच सत्तार यांच्या शपथपत्रात मानमत्तांची, वाहनांची, हिऱ्यांच्या दागिण्यांची खोटी माहिती दिल्याचा आरोप देखील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी केली आहे.

या संदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल केली असल्याचे शंकरपल्ली यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सत्तार यांनी शपथपत्रात दाखवलेल्या मालमत्तेचा तपशील आणि प्रत्यक्ष मालमत्ता यामध्ये प्रचंड तफावत आहे. अनेक मालमत्तांचे क्षेत्रफळ हे चुकीचे दाखवण्यात आले आहे. तसेच मालमत्तेवर करण्यात आलेल्या बांधकामाच्या गुंतवणुकीची माहिती देखील दाखवण्यात आली नसल्याचे या आरोपात म्हटले आहे. काही मालमत्ताची माहिती शपथ पत्रातून गायब करण्यात आली आहे. विविध सहकारी संस्थांमध्ये सत्तार त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सबाबतही खोटी माहिती देण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

उमेदवारी रद्द करण्याची मागणी2019 विधानसभा निवडणुकीतही सत्तार यांनी शपथपत्रात अनेक गोष्टी लपवून निवडणूक आयोगाची फसवणूक केली होती. यासंदर्भात देखील सिल्लोड न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्या प्रकरणात देखील न्यायालयाने साताऱ्यांना समन्स बजावले होते. मात्र हे प्रकरण अद्याप सुनावणीसाठी प्रलंबित आहे. असे असताना सत्तारी यांनी पुन्हा एकदा खोटे शपथपत्र दाखल केले आहे. त्यामुळे सत्तार यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

फरजाना शेख यांचाही ‘आरपीआय’ सदस्यत्वाचा राजीनामा

डॉ. सिद्धार्थ धेंडें यांच्‍या भूमिकेला समर्थन; महायुतीकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची टीका

पुणे: महायुतीमध्ये सहभागी असलेल्‍या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ‘आरपीआय’मधील पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. सन्‍मानाची वागणूक मिळत नसल्‍याची टीका करीत माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठोपाठ ‘आरपीआय’च्‍या पुणे महापालिकेतील माजी गटनेत्‍या फरजाना आय्युब शेख यांनीही पक्षाच्‍या सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्‍याकडे त्‍यांनी आपला राजीनामा पाठविला आहे.

देशात नुकत्‍याच लोकसभेच्‍या निवडणुका पार पडल्‍या. या निवडणुकांमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्‍या नेतृत्‍त्‍वाखालील आरपीआयला एकही जागा सोडली नाही. सध्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीतही पक्षाला जागा मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. आरपीआयला एससी, एसटी, ओबीसीसह अनेक समाजातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद आहे. या मतांचा गठ्ठा केवळ निवडणुकीत वापरायचा आणि नंतर सन्‍मानाची वागणूक द्यायची नाही, अशी भूमिका महायुतीची आहे.

त्यामुळे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी टीका करत राजीनाम्याचे हत्यार उपसले. त्यांच्या या भूमिकेचे समर्थन करत फरजाना आय्युब शेख यांनीही पक्षातून बाहेर पडणे पसंत केले आहे. २०१७ मध्ये पुणे महापालिकेत आरपीआयच्‍या माध्यमातून नगरसेविका म्‍हणून निवड झाली आहे. डॉ. धेंडे यांच्‍यासोबत राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्‍यामुळे त्‍यांनी घेतलेल्‍या भूमिकेचे समर्थन करत मी देखील पक्ष सदस्‍यत्‍वाचा राजीनामा देत असल्‍याचे शेख यांनी पत्रात म्‍हटले आहे.

पक्षाला सन्‍मानपुर्ण वागणूक देऊन काही जागा महायुतीमध्ये ठेवणे अपेक्षित होते. ते झाले नाही. यामुळे पक्षाचा कार्यकर्ता दुखावले आहे. डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. त्‍या भूमिकेला माझेही समर्थन आहे. महायुतीकडून पक्षाला मिळणारी वागणूक पाहता मी देखील पक्ष सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिला आहे.  
– फरजाना आय्युब शेख, माजी गटनेत्‍या, आरपीआय. पुणे महापालिका.

———————————–

दृष्टीहीन मुलींनी लुटला सहलीचा ‘विशेष’ आनंद 

सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे दृष्टीहिन विद्यार्थीनींकरीता अनोखा उपक्रम
पुणे : सृष्टीचे निसर्ग सौंदर्य डोळ्यांनी पाहता येत नाही तरीही फुले, पाने, अंगावर पडत असलेले पाणी आणि पक्षांचा किलबिलाट ऐकत त्यांनी निसर्ग सौंदर्याची उधळण प्रत्यक्ष अनुभवली. तसेच, कांदा भजी, पिठलं-भाकरी, साजूक तुपातला शिरा या गावरान मेनूवर देखील विद्यार्थिनींनी ताव मारला. त्यासोबतच बनेश्वर येथील मंदिरात मुलींनी दर्शन घेत आरती देखील केली. 

निमित्त होते, शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळातर्फे दृष्टीहीन विद्यार्थीनींसाठी आयोजित वेल्हे तालुक्यात आयोजित सहलीचे. कोथरूड येथील पुणे अंध मुलींची शाळा, वाघोली येथील लुई ब्रेल अंध अपंग कल्याणकारी संस्था, न-हे येथील साई गुरु सेवा संस्था या संस्थांमधील दीडशे मुलींनी या वर्षात सहलीत सहभाग घेतला. उपक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष पराग शिंदे, अमर लांडे, सचिन ससाणे, विक्रम मोहिते, सुरेश तरलगट्टी, अनुप थोपटे, कुणाल जाधव, प्रद्युम्न पंडित यांनी उपक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. 

शिरीष मोहिते म्हणाले, गणेशोत्सव व नवरात्रीनंतर सगळ्या लहान मुलांना सहलीचे वेध लागतात.  त्यामुळे अशा सहलीचा आनंद दृष्टिहीन मुलींनाही घेता यावा, याकरीता हे आयोजन केले जाते. सहलीचा मनसोक्त आनंद विद्यार्थीनी घेतात, त्यामुळे दरवर्षी या सहलीला येण्यास त्या उत्सुक असतात. या दृष्टीहीन मुलींना आनंद देण्यातच कार्यकर्त्यांना आनंद व उर्जा मिळत असते. यंदा देखील ताई-दादांसोबत गप्पा मारत बसमध्ये बसून गाण्यांच्या भेंडयांमध्ये देखील विद्यार्थीनींनी उत्साहाने सहभाग घेतला. तर दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा सहलीला न्याल ना? असा गोड हट्टही मंडळातील ताई-दादांकडे केला.

एकनाथ शिंदे यांचा कोल्हापुरात काँग्रेसला झटका:विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर-कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जयश्री जाधव यांचा हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर महिला आघाडीच्या उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे.

दरम्यान काँग्रेसने राजेश लाटकरांना दिलेली उमेदवारी रद्द केल्याने त्यांनी या मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार जयश्री जाधव या देखील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. मला तिकीट मिळेल असा दावाही त्यांनी केला होता.मात्र, काँग्रेसने मधुरिमाराजे यांना उमेदवारी दिल्याने नाराज जाधवांनी शिवसेनेत प्रवेश केला.

काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. तसेच नवीन उमेदवार निवडतानाही त्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते, असा आरोप आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. जाधव यांच्या या प्रवेशाने सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पती उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून शिवसेनचे राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला. जाधव यांच्या निधनानंतर 2022 मध्ये जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्यांनी भाजपचे सत्यजित कदम यांचा पराभर केला आणि त्या आमदार बनल्या. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही आमदार जयश्री पाटील कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्यास सज्ज होत्या. पण पक्षाने आधी राजू लाटकर आणि नंतर मधुरीमाराजे यांनी उमेदवारी दिल्याने आमदार जाधव नाराज झाल्या होता. आज अखेर आपली नाराजी व्यक्त करत जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

बाळासाहेबांची प्रकृती स्थिर,तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा

सुजात आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : मीडियाच्या माध्यमातून मी मीडिया आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की, इकडे खूप मोठी डॉक्टरांची टीम आहे, सपोर्टीग स्टाफ आहे, जो बाळासाहेबांची काळजी घेत आहे. त्यामुळे हॉस्पिटल आणि स्टाफ यांना त्रास होईल अशी कोणतीही कृती करू नका. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, आपापले मतदारसंघ सांभाळा, ते सोडू नका आम्ही सर्व बाळासाहेबांच्या सोबत असल्याचे वंचित बहुजन युवा आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.

सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे की, काल रात्री बाळासाहेबांना छातीत दुखत होते आणि अस्वस्थ वाटत होते. म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची अँजीओग्राफी करण्यात येणार आहे. त्यानंतर जो रिपोर्ट येईल त्यानुसार पुढील उपचार डॉक्टर कळवतील तसे आम्ही तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवू. आम्ही डॉक्टरांच्या रिपोर्टसाठी थांबलो आहोत. जसा रिपोर्ट येईल तशी माहिती बाळासाहेबांच्या आणि वंचितच्या हॅण्डलवरून कळवण्यात येईल.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे (३१ ऑक्टोबर) पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, येत्या तासाभरात त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार असल्याचेही वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटर हॅण्डलवरून कळवण्यात आले आहे.

शाही अभ्यंगस्नान, फराळ, फाट्याकांचा आनंद घेत रस्त्यावरील मुलांची दिवाळी झाली गोड

विनाखंड सलग १७ वर्षे श्री आबा बागुल यांच्या या उपक्रमाचा गौरव

पुणे- रस्त्यावरील व सिग्नल वरील गरीब मुलांना दिवाळी सणाचा आनंद देणारा व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा  आनंद सोहळा गुरुवारी सकाळी सारसबाग येथे पार पडला. याचे आयोजक होते ते श्री आबा बागुल. शाही अभ्यंगस्नान, फराळ, फाट्याकांची आतिषबाजी आणि नवीन कपडे यामुळे उपस्थित मुले अक्षरशः नाचू लागली.

        पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्री आबा बागुल यांनी केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा उपक्रम राबविला नसून, गेली १७ वर्षे तो सातत्याने राबवित आहेत. ज्यांना दोन वेळचे अन्य वेळेवर मिळत नाही, त्यांना दिवाळीत स्वतःच्या हाताने शाही अभ्यंगस्नान घालून नवीन कपडे देऊन व दिवाळीचा फराळ देत त्यांची दिवाळी गोड केली.

        सारबाग येथील आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आजचा नरक चतुर्थीचा सोहळा पार पडला. उटणे, मोती साबण याने नाहून ही मुले आबांच्या जवळ येउनच बिलगली. यावेळी त्यांना मिठाई देऊन त्यांना फटाके देण्यात आले. या फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वतः आबा सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करीत होते. यावेळी या गरीब मुलांचे पालकही भारावून गेले. यावेळी विश्वास दिघे, संतोष गिले, साई कसबे, गोरख मरळ, मनीषा गायकवाड, जयश्री बागुल, हर्षदा बागुल, इम्तियाज तांबोळी, अशोक नेटके, जयकुमार ठोंबरे, अमित बागुल आदी उपस्थित होते.

     पुणे नवरात्र महोत्सवाअंतर्गत गेली १७ वर्षे नेहमीच पुणे शहरात काय पण महाराष्ट्रात नावाजलेल्या श्री आबा बागुल यांनी काशी यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम राबविणे, महापालिकेच्या हाती जे जमले नाही अशो राजीव गांधी ई लर्निंग शाळा सुरू करून पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात एक आदर्श उभा केला आहे.

स्व. इंदिरा गांधी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना भावपूर्ण आदरांजली

पुणे-भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी व देशाचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त माजी आमदार, ज्येष्ठ नेते उल्हास पवार,पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष अरविंद शिंदेआमदार रविंद्र धंगेकर व यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

     यावेळी बोलताना उल्हास पवार म्हणाले की, ‘‘स्व. इंदिराजी गांधी या देशावर निस्सिम प्रेम करणाऱ्या, जाती धर्माच्या पलिकडे विचार करणाऱ्या, देशामध्ये सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या आयर्न लेडी होत्या. सरदार वल्लभभाई पटेल हे कणखर, कडक, शिस्तप्रिय व स्पष्ट वक्ता होते. जगभरात त्यांची महती लोहपुरूष म्हणून झाली होती. तसेच ते प्रखर देशभक्त होते. त्यांचा धर्मांध, जातीयवादी शक्तींना प्रखर विरोध होता. या दोन्ही देशभक्त नेत्यांना मी आज भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.’’

     यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस ॲड. अभय छाजेड,  रफिक शेख, नरेंद्र व्‍यवहारे, शिवराज भोकरे, हेमंत राजभोज, अक्षय माने, राज अंबिके, सुमित डांगी, रवि आरडे, उषा राजगुरू, अर्चना शहा, शारदा वीर, सुरेश कांबळे, सचिन भोसले आदी उपस्थित होते. 

केवळ सत्ता प्राप्तीसाठी चटावलेल्या महाराष्ट्राला धगधगत्या इतिहासाचे दुर्दैवी विस्मरण ! —विश्वास पाटील

केवळ सत्ता प्राप्तीसाठी चटावलेल्या महाराष्ट्राला धगधगत्या इतिहासाचे विस्मरण पडल्याची टीका सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी एका पोस्टद्वारे केली आहे.मराठ्यांना “गनिमी काव्या”चा महामंत्र देणाऱ्या व दिल्लीकर जहांगीर बादशहाच्या लष्कराला पाणी पाजणाऱ्या भातवडीच्या युद्धाला आज 400 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने विश्वास पाटील यांनी एक विस्तृत पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकारणावर भाष्य करत सत्ताप्राप्तीसाठी चटावलेल्या महाराष्ट्राला सध्या आपल्या धगधगत्या इतिहासाचे विस्मरण झाल्याची खंत व्यक्त केली आहे.

खाली वाचा विश्वास पाटलांची पोस्ट जशीच्या तशी

मराठ्यांना “गनिमी काव्या”चा महामंत्र देणाऱ्या व दिल्लीकर जहांगीर बादशहाच्या लष्कराला पाणी पाजणाऱ्या भातवडीच्या युद्धाला आज 400 वर्षे पूर्ण !
केवळ सत्ता प्राप्तीसाठी चटावलेल्या महाराष्ट्राला #धगधगत्या इतिहासाचे दुर्दैवी #विस्मरण !
—विश्वास पाटील

होय मित्रांनो, शिवरायांसह तमाम मराठ्यांना #गनिमीकाव्याचा धडा शिकवणारे भातवडीचे युद्ध ऑक्टोबर सोळाशे चोवीसच्या अखेरीस घडले होते. जिथे #शहाजीराजे व मलिक अंबरने दिल्लीच्या व #विजापूरच्या एक लाख फौजेची आपल्या फक्त चाळीस हजार सैन्यानिशी धूळदाण केली होती. त्या घनघोर युद्धाला आज 400 वर्षे पूर्ण झाली. ज्या #युद्धामध्ये #जिजाऊ साहेबांचा ऐन विशीतला लाडका दीर आणि शिवरायांचे चुलते शरीफजीराजे भोसले #हुतात्मा झाले होते. तो प्रसंग #अहमदनगर पासून फक्त 11 मैलावरील भातवडी गावात घडला होता. खरे तर, मराठ्यांच्या इतिहासालाच #कलाटणी देणाऱ्या या घटनेचे स्मरण महाराष्ट्रभर दारोदारी #दिंड्यापताका फडकवून व्हायला हवे होते. मात्र राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी चटावलेल्या आजच्या मानी मराठ्यांना व या भूमीला या पवित्र युद्धाचे विस्मरण घडावे ही किती दुर्दैवी बाब आहे. जिथे आपल्या भूत आणि भविष्यासाठी हुतात्म्यांचे सडे पडले. तोफा धडाडल्या. दुश्मनांचा नायनाट झाला, त्या #स्फूर्तीदायी इतिहासामागे आपण धावायला हवे. पण आजकाल ज्या दिशेने मीडियाचा कॅमेरा फिरतो त्या दिशेनेच सर्वजण धावत असतात. भातवडीच्या युद्धात जेव्हा दिल्लीकर मोगलांचा सेनानायक मनचेहर हा आपल्या तीनशे हत्तींचे दल घेऊन #रणांगणात हाहाकार माजवत होता. तेव्हा त्याचा माज उतरवण्यासाठी शरीफजी भोसले घोडा फेकत निघाले. त्यांनी आपल्या थोरल्या भावाला, शहाजीराजांना शब्द दिला होता की, “मोगलांच्या बलाढ्य हत्तीदलाचा नायनाट केल्याशिवाय मी काय, माझा मुडदाही आपल्या भेटीस माघारा येणार नाही दादा.” दिल्या शब्दाप्रमाणे शरीफजी आणि #हंबीरराव चव्हाणने ते प्रचंड हत्तीदल धुळीस मिळवले होते.
दुश्मनांच्या हजारो तलवारींच्या पात्यांचा नायनाट आपल्या बुद्धीच्या एका समशेरीने कसा करता येतो, त्याचे तंत्र शहाजीराजांनी या युद्धापासूनच आत्मसात केले. अन् तोच महामंत्र शिवरायांना बेंगलोरच्या किल्ल्यात प्रात्यक्षिकासह शिकवला होता. त्याच महामंत्रावर आपला सारा इतिहास घडला होता. दुर्दैवाने आज त्या महाप्रसंगाचे आम्हा सर्वांना विस्मरण व्हावे, यासारखी दुर्दैवी गोष्ट दुसरी असू शकत नाही.
परवा #सिंधुदुर्ग मधील शिवरायांचां पुतळा पडला म्हणून मराठवाड्यापासून सर्वजण तिकडे धावले. परंतु आजच्या #अहिल्यानगर पासून म्हणजेच अहमदनगर पासून अवघ्या अकराव्या मैलावर , म्हणजेच आपल्या उंबरठ्याशी घडलेल्या या महाप्रसंगाचे सर्वांना विस्मरण घडावे, हे आपल्या भूमीचे दुर्दैव आहे.
आज नगर जिल्ह्याच्या तालुक्या तालुक्यामध्ये सत्तेचा सारीपाट, राजकीय प्रचार व #चिखलफेक सुरू आहे. त्यातून नव्या पिढीने थोडी सवड काढून भातवडीच्या रानात जाऊन त्या राष्ट्रासाठी #धारातीर्थी पतन पावलेल्या शरीफजी भोसलेंच्या बाजूला पडलेल्या समाधीवर फुलांच्या चार ओंजळी जरूर वाहव्यात. वर मी दिलेल्या छायाचित्रात या समाधीची किती दुरावस्था झाली आहे हे आपल्या लक्षात येईल .
केवळ प्रसिद्धीसाठी शिवराय आणि #संभाजीराजे यांचे उंच उंच पुतळे उभे करायचे. मात्र त्यांच्याच इतिहासातील खऱ्या घटनांप्रसंगांचा आणि भातवडी सारख्या धगधगत्या स्फूर्तीदायी अग्निकुंडांचा विसर पडू द्यायचा हे या भूमीच्या भवितव्यासाठी फारसे काही चांगले नाही, असेच मला वाटते
या लढाईचे वर्णन प्रत्यक्ष साक्षीदार #परमानंद_स्वामी यांनी आपल्या “शिवभारता”मध्ये केलेले आहे. डॉक्टर बाळकृष्ण यांनी आपल्या “शिवाजी द ग्रेट” या ग्रंथाच्या पहिल्या खंडात त्याबाबत विस्ताराने लिहिली आहे. मी माझ्या शिवरायांच्या जीवनावरील “महासम्राट” कादंबरीच्या #झंजावात या पहिल्या भागातही या लढाईचे संपूर्ण वर्णन केलेले आहे, वाचकांनी तो स्फूर्तीदायी इतिहास जरूर वाचावा.
या निमित्ताने भातवडीच्या युद्धात रणरंग खेळून कीर्तिमान होणाऱ्या शहाजीराजे, शरीफजी भोसले, मलिक अंबर, हंबीरराव चव्हाण, दत्ताजी नागनाथ, मंबाजी भोसले, नरसिंह पिंगळे, मुधोजी फलटणकर, विठोजी काटे अशा तमाम बहाद्दराना माझा मानाचा मुजरा.
-काळाच्या मांडीवरी पहुडला
मर्द शरीफजी ज्या सम्रांगणात
चला वाहू फुले तिथे अन
ओवाळू आसवांची वात !


– विश्वास पाटील

स्वीगी लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 06 नोव्हेंबर 2024 पासून सुरू

·         स्वीगी लिमिटेड (“कंपनी”) च्या प्रत्येकी 01 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर”) 371 रुपये ते 390 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित. 

·         प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख मंगळवार 05 नोव्हेंबर 2024 असणार आहे.

·         बोली/ऑफर बुधवार 06 नोव्हेंबर 2024 रोजी खुली होईल आणि शुक्रवार 08 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होईल.

·         बोली किमान 38 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 38 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

·         अधिक माहितीसाठी, कृपया संलग्न म्हणून शेअर केलेली किंमतपट्टा जाहिरात पहा किंवा फायनान्शिअल एक्सप्रेस वृत्तपत्राच्या 30 ऑक्टोबर 2024 च्या अंकातील पृष्ठ क्रमांक 26 वर प्रकाशित किंमतपट्टा जाहिरात पहा

मुंबई,: स्वीगी लिमिटेड (“कंपनी”) इक्विटी शेअर्सची (“ऑफर”) प्राथमिक समभाग विक्री बुधवार 06 नोव्हेंबर 2024 पासून सुरू करत आहे. बोली शुक्रवार 08 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख एक कार्यालयीन दिवस आधीची मंगळवार 05 नोव्हेंबर 2024 असणार आहे.

स्वीगी लिमिटेडच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 371 रुपये ते 390 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 38 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 38 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

या ऑफरमध्ये 44,990 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू (“फ्रेश इश्यू”) आणि विक्री समभागधारकांकडून 175,087,863 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची (“ऑफर केलेले शेअर्स”) ऑफर फॉर सेल आहे. या ऑफरमध्ये प्रत्येकी 01 रुपये दर्शनी मूल्याच्या 750,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा राखीव हिस्सा असून पात्र कर्मचाऱ्यांद्वारे (“कर्मचारी राखीव हिस्सा”) सबस्क्रीब्शनसाठी पोस्ट ऑफर पेड अप भांडवलाच्या 5% पेक्षा जास्त नसलेला इक्विटी शेअर्सचा राखीव हिस्सा समाविष्ट आहे. कर्मचारी राखीव हिस्स्याशिवाय असलेली ऑफर यापुढे “नेट ऑफर” म्हणून ओळखली जाते.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस द्वारे सादर करण्यात आलेले कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) च्या (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 च्या 19(2)(ब) सुधारित नियमावलीनुसार  ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(2) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 75 % पेक्षा कमी नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (“Anchor Investor Portion”) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून). (the “Net QIB Portion”). ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून) फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. किमान 75% नेट ऑफर QIBs ना वाटप करता येत नसेलतर संपूर्ण बोली रक्कम (जशी येथे पुढे परिभाषित केली आहे) तात्काळ परत केली जाईल. तथापिम्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी निव्वळ QIB वाटपाच्या 5% पेक्षा कमी असल्यासम्युच्युअल फंड भागामध्ये वाटपासाठी उपलब्ध असलेल्या शिल्लक इक्विटी शेअर्सना उर्वरित QIB भागामध्ये समाविष्ट केले जाईल आणि QIB ना प्रमाणानुसार वाटप केले जाईल. तसेच, नेट ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी (अ) बिगर संस्थात्मक विभागाच्या एक तृतीयांश भाग 200,000  रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब) बिगर संस्थात्मक विभागाच्या दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या बिगर संस्थात्मक विभागाच्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या बिगर संस्थात्मक विभागाच्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राइस पेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर आणि नेट ऑफरच्या 10% पेक्षा जास्त नसलेल्या बोलीवर सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफर किमतीवर किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झाल्यास तो भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना (“RIB”) उपलब्ध होईल.

तसेच, कर्मचारी राखीव कोट्याअंतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना ऑफर किंमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीवर प्राप्त झालेल्या वैध बोलींनुसार, समप्रमाणात इक्विटी शेअर्सचे वाटप केले जाईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक तपशीलांसाठी, रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या पृष्ठ क्रमांक 445 वर सुरू होणारी “ऑफर प्रक्रिया” पाहा.

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, जे. पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, BofA सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, जेफ्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,  आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि अॅव्हेंडस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.

येथे वापरलेले परंतु परिभाषित न केलेले शब्द त्यांच्या अर्थांसह RHP मध्ये दिलेल्या परिभाषेप्रमाणेच मानले जातील.

इंदीरा गांधीं स्मृती दिन – मोदी सरकार’चे दुर्लक्ष, ‘राजकीय असुयेचे’ प्रदर्शन -काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी

महीला राष्ट्रपती मुर्मुं कडून, ‘शहीद महीला पंतप्रधानांची’ दखल अपेक्षीत होती
पुणे दि ३१ आक्टों –
आज दि ३१ आक्टो हा दिवंगत उपपंतप्रधान व देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांचा ‘जयंतीदिन’ व देशाची एकता व अखंडते प्रती बलीदान देणाऱ्या स्व इंदीरा गांधी यांचा ‘स्मृतीदिन’ हा राष्ट्रीय संकल्प दिन साजरा केला जात असतांना… देशाच्या अखंडते साठी ‘खलीस्तानी दहशत वाद्यांशी’ पंगा घेऊन,त्यांचेवर कारवाई करणाऱ्या तसेच देशास अंतराळ संशोधन, सॅटेलाईट, कृषी व श्वेत क्रांती क्षेत्रात स्वावलंबी बनवणाऱ्या व पाकिस्तान’चे दोन तुकडे करणाऱ्या व ‘आयर्न लेडी’ म्हणून जग-मान्यता मिळवणाऱ्या, भारताच्या पहिल्या महीला पंतप्रधान श्रीमती इंदीरा गांधी यांची हत्या (३१ आक्टो १९८४) झालेला दिवस अर्थात त्यांचा ‘स्मृती दिन’ देशभर साजरा होत असतांना.. तसेच सदर चा स्मृती_दिन ‘राष्ट्रीय संकल्प दिन’ म्हणून मुळात साजरा होत असतांना, हाती असलेल्या सत्तेच्या आधारे ३१ आक्टो हा दिवस नव्याने ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा करून, केवळ राजकीय द्वेषा पोटी दिवंगत पंतप्रधान इंदीराजींचे प्रती सरकार तर्फे आदरांजली न वाहणे.. व जाणीव पुर्वक दुर्लक्ष करणे हे मोदी सरकारच्या राजकीय असुयेचे प्रदर्शन असल्याची प्रखर टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली व मोदी सरकार चा महीला नेतृत्वा विषयी दुजाभाव व असुया देखील स्पष्ट होत असल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, देशाचे पहीले (उप-पंतप्रधान) गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेलांनी महात्मा गांधींच्या हत्ये नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याची भुमिका धेतली व तसे प्रयत्न केले, ही सत्य वास्तविकता असतांना, मात्र मोदी सरकार व भाजप त्यांची जयंती देशभर साजरी करते.. मात्र लोकशाही मुल्यांची व स्वातंत्र्याची जोपासना करणाऱ्या व स्वातंत्र्य संग्रामात अग्रणी असणाऱ्या ज्या पंडीत नेहरूंनी ते मान्य केले नाही, त्यांचे विषयी व नेहरू – गांघी कुटुंबियां विषयी मात्र सतत द्वेष, असुया व्यक्त करते.. ही देशाच्या सत्य – वास्तववादी ईतिहासाशी प्रतारणा असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
देशाच्या सत्य वास्तवादी ईतीहासाचे दिशाभूल करणारे असत्य प्रदर्शन हा लोकशाहीवादी प्रजासत्ताक राष्ट्राकरीता एक प्रकारे राष्ट्रद्रोह असल्याचे कथन देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले व दिवंगत महीला पंतप्रधान श्रीमती इंदीराजी गांधी यांचा अवमान करण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नां बद्दल तिव्र खेद व्यक्त करून निषेध करत असल्याचे ही त्यांनी म्हंटले आहे..!

मांजरीच्या महिलेने १४ वर्षाच्या मुलीला सव्वातीन लाखाला गंडवले-चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष

पुणे-१४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख २२ हजार रुपये लुबाडल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी ज्योती धनाजी खंकाळ (वय ३८, रा. ढेरे बंगला, मांजरी) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत घुले कॉलनीतील एका ४३ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार १८ सप्टेबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १४ वर्षाची मुलगी दहावीला शिकत आहे. आरोपी महिलेची मुलगीही तिच्या बरोबर असते. फिर्यादीचे पती व्यावसायिक असल्याने त्यांच्या घरात रोकड असते. फिर्यादी या पतीसह गावी गेल्या होत्या. त्यांच्या घरासमोर ज्योती खंकाळ या राहतात. त्यांच्या दोन्ही मुलीची मागील दोन महिन्यांपूर्वी त्यांची इन्स्टाग्राम सेलेब्रिटी फेस या आय डीवरुन उमा नावाच्या महिलेशी ओळख झाली. ती त्यांना चित्रपटात काम देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ज्योती हिने फिर्यादी यांच्या मुलीला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी देणार असल्याचे सांगितले.

ज्योती हिने या मुलीशी गोड बोलून घरात असलेले भिशीचे १ लाख ७० हजार रुपये घेतले. त्यानंतर वारंवार तिच्याकडून ५ हजार, ४ हजार रुपये असे ४२ हजार रुपये फोन पेद्वारे घेतले. त्यानंतर घरातील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व २ ग्रॅमची सोन्याची अंगठी घेऊन गेले. फिर्यादी या २० ऑक्टोबर रोजी घरी परत आल्या. तेव्हा घरामध्ये ठेवलेले पैसे व सोने पाहिले असता ते मिळून आले नाही. त्यांनी मुलीकडे चौकशी केल्यावर तिने आपल्याला ज्योती खंकाळ हिने कसे फसविले, याची माहिती दिली. ज्योती हिने २ लाख ६२ हजार रुपये रोख व ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा ३ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक अशोक गंधाले तपास करीत आहेत.