Home Blog Page 612

महाराष्ट्रात 47 जागांवर शिवसेना VS शिवसेना:36 जागांवर NCP विरुद्ध NCP लढत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बुद्धिबळाचा पट आता जवळपास निश्चित झाला आहे. मुख्य लढत भाजप प्रणित महायुती व काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीमध्ये आहे. पण यात असली विरुद्ध नक्कलीचीही एक लढाई होणार आहे. महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय समीकरणात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडलेत. शिवसेनेच्या एका गटाचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे, तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. त्याच प्रमाणे शरद पवार व अजित पवार यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेस विभागली गेली आहे. यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत केवळ सत्तेत कोण येणार? याचाच फैसला होणार नाही, तर अप्रत्यक्षपणे खरी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस कोणती? हे ही ठरणार आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपसोबत महायुती आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाविकास आघाडीसोबत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार राज्यातील 47 विधानसभा मतदारसंघांत शिवसेना विरुद्ध शिवसेना, तर 36 मतदारसंघांत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीत लढत होणार आहे. या जागांवर दोन्ही पक्षांच्या गटांनी पूर्ण ताकद लावली आहे. कदाचित महाराष्ट्राच्या सत्तेचा फैसलाही याच जागांवरून होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी एकनाथ शिंदे यांची शिवसेना 82 जागांवर निवडणूक लढवत आहे. यातील 47 जागांवर त्यांचा सामना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांशी होणार आहे. उर्वरित 35 जागांवर त्यांच्या उमेदवारांना काँग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी सामना करावा लागेल. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणाऱ्या 47 पैकी 16 जागा मुंबई विभागातील व 18 जागा कोकण विभागातील आहेत. याशिवाय मराठवाडा विभागातील 7 जागांवर दोन्ही शिवसेनेत सामना रंगणार आहे. उर्वरित जागा विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतरची ही दुसरी निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने मुंबईच्या मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिम या 3 जागांवर उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना फक्त 1 जागा जिंकता आली. अशाप्रकारे मुंबईतील 10, पुण्यातील 2 आणि कल्याणमधील 3 जागांसह विधानसभेच्या 47 जागांवर शिंदे गट व ठाकरे गटात थेट लढत होणार आहे. कोपरी-पाचपाखाडी आणि वरळीसारख्या हायप्रोफाईल जागांचाही यात समावेश आहे. वरळीत शिंदे गटाचे मिलिंद देवरा हे आदित्य ठाकरेंना, तर कोपरी पाचपाखाडीमध्ये ठाकरेंचे केदार दिघे हे मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान देत आहेत.

भायखळा, माहीम, जोगेश्वरी पूर्व, मागाठाणे, कुर्ला, विक्रोळी, दिंडोशी, चेंबूर, अंधेरी पूर्व, भांडुप, शिवरी, अंबरनाथ, कल्याण पश्चिम, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण आणि ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटांत थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी निर्णायक व अस्तित्वाची लढाई असेल. शिवसेनेच्या दोन्ही गटांत थेट लढत होणाऱ्या प्रत्येक जागेवर चुरशीची स्पर्धा होईल. त्यानंतरच खरी शिवसेना कोण? हे ठरेल, असे मानले जात आहे.

दुसरीकडे, शिवसेनेसारखीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार व शरद पवारांच्या गटांत थेट लढत होणार आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात 52 जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यापैकी 36 जागांवर त्यांच्या उमेदवारांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा सामना करावा लागेल. अजित पवार यांनी आपल्या 35 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट दिले आहे, तर शरद पवार यांनीही त्यांच्यासोबत ठामपणे उभ्या असणाऱ्या 15 आमदारांना उमेदवारी दिली आहे.

अजित पवार विरुद्ध शरद पवार गटातील लढतीचे राजकीय केंद्र बारामती आहे. तिथे शरद पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उभे केले आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जागांवर अजित पवार यांचे उमेदवार शरद पवार गटाच्या उमेदवारांसमोर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत बारामतीच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जागांवरही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना शरद पवार गटाच्या उमेदवारांशी दोनहात करावे लागले. त्यात शरद पवारांचा वरचष्मा राहिला. अजित पवारांना फक्त 1 जागा जिंकता आली होती. याऊलट शरद पवारांनी 7 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे अजित पवारांना आपल्या चुलत्याशी लढत देताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या राजकीय लढती होताना दिसून येत आहेत. राज्यातील 3 क्षेत्रांत भाजप विरुद्ध ठाकरे गटाची लढाई होण्याची शक्यता आहे. ठाणे – कोकण क्षेत्रात शिवसेना विरुद्ध शिवसेनेची लढत आहे, तर मुंबई व मराठवाड्यात भाजपचा सामना उद्धव ठाकरे गटाशी आहे. याऊलट विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात भाजपला काँग्रेसच्या बलाढ्य आव्हानाचा सामना करावा लागेल. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या पक्षाचा सामना करावा लागेल. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना व राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत होणाऱ्या जागांवरूनच महाराष्ट्राचे नवे सरकार ठरेल असा दावा केला जात आहे.

राज्यात आरोग्यदायी राहणीमान विकसित होण्यात हरित व शाश्वत बांधकाम पध्दती ठरतेय महत्वपूर्ण

पुणे : अलीकडच्या काळात राज्यातील पुण्यासह इतर काही शहरांनी हरित व शाश्वत बांधकाम स्वीकारले आहे. त्यामुळे या शहरांमध्ये नागरिकांना आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होत आहे. ही हरित व शाश्वत बांधकाम पद्धत आत्मसात करण्यासाठी विकासकांना प्रोत्साहन दिले जात असतानाच नागरिकांकडूनही पर्यावरणपूरक घरांची मागणी होत असल्याचे चित्र आहे.

हरित व शाश्वत स्थावर मालमत्ता विकासात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. राज्यात भारतातील सर्वाधिक हरित-प्रमाणित प्रकल्प आहेत. ज्यामध्ये १०९४ हरित इमारती अर्थात ग्रीन बिल्डिंग आहेत. त्यापैकी अनेक इमारती पुण्यात आहेत. याचे श्रेय शाश्वत व हरित बांधकामाला प्रोत्साहन देणाऱ्या राज्याच्या पुरोगामी धोरणांना दिले पाहिजे.

पुण्यातील बांधकाम उद्योगाला गेल्या काही वर्षांत अनियमिततेच्या आव्हानांचा सामना करावा लागला आहे. परंतु, गेल्या दशकात शाश्वत आणि जबाबदार बांधकामाच्या दिशेने काही आश्वासक बदल वेगाने होत आहेत. पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांच्या पुढाकाराने होत असलेल्या बदलांचा फायदा विकासक आणि घरमालकांना मिळत आहे.

शाश्वत व हरित बांधकामाना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या दोघांनीही विकासकांना विविध सवलती देण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये अतिरिक्त फ्लोअर स्पेस इंडेक्स (एफएसआय), मालमत्ता कर सवलत व कमी विकास शुल्क याचा समावेश आहे. या धोरणांमुळे बांधकाम प्रकल्पांमध्ये नवीकरणीय ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारखे प्रकल्प तसेच पर्यावरणास अनुकूल सामग्रीचा वापर वाढला आहे.

परिणामी, हरित इमारतींना मागणी वाढत असून, या बदलामध्ये नागरिकांचाही महत्त्वाचा वाटा आहे. हरित घरे आणि कार्यालयीन जागा विकत अथवा भाड्याने घेताना पर्यावरणीय जागरूकता, आरोग्याचे फायदे आदी घटकांचा प्रामुख्याने विचार केला जात आहे. सौर पॅनेल, ऊर्जा-कार्यक्षम उपकरणे आणि जलसंधारण प्रणाली घरमालकांना उपयुक्तता खर्च कमी करण्यास मदत करतात, हाही मुद्दा लक्षात घेतला जातो.

बांधकाम प्रकल्पांनी त्यांचा पर्यावरणीय परिणाम कमी करावा, यासाठी सरकारने विविध परवानगी प्रक्रिया राबवल्या आहेत. यामध्ये बांधकाम व्यावसायिकांना सरकारने निश्चित केलेल्या ३९ प्रकारच्या परवानग्या घेणे आवश्यक आहे. बांधकाम सुरू करण्यापूर्वी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाची मंजुरी अर्थात एन्व्हायरमेंट क्लीअरन्स घेणे आवश्यक आहे. १५०,००० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रावरील कोणताही विकास प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्या प्रकल्पाच्या पर्यावरणीय प्रभावाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. प्रकल्पाचे पर्यावरणीय परिणाम व्यवस्थापित करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी पर्यावरणीय व्यवस्थापन योजना (ई.एम.पी.) तयार केली जाते. ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन देखील शाश्वत बांधकाम प्रकल्पातील एक महत्त्वाचा भाग आहे.

एन्हायर्नमेट मॅनेजमेंट प्लॅन्स (ईएमपी) हा बांधकाम सुरू करण्यापूर्वी तयार केला जातो, पण प्रत्यक्षात बांधकाम सुरू झाल्यावर कागदावरच्या तरतुदी कागदावरच राहण्याच्या घटना घडतात, ही वस्तुस्थिती आहे. यासंदर्भात वास्तू आरेखनतज्ञ अनघा परांजपे-पुरोहित म्हणतात, “ईएमपीचे पालन काटेकोरपणे न झाल्याने अनेक पर्यावरणीय आव्हाने उभी राहतात. बांधकाम सामग्री, कामगारांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. अतिरिक्त ऊर्जा खर्ची पडते. कार्बन फूटप्रिंट वाढण्याचा धोका असतो. जल आणि ध्वनी प्रदूषणाची समस्या सतावते. कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होऊ शकते.”

या पार्श्वभूमीवर, प्रकल्पांच्या शाश्वत उभारणी प्रक्रियेत पुढील मुद्दे महत्त्वाचे ठरतात. बांधकाम प्रकल्पांचे सातत्याने लेखापरीक्षण (ऑडिट) करणे, पर्यावरण पूरक प्रकल्पांवरील कामाचे गरजेनुसार प्रशिक्षण, दर्जेदार सामग्री आणि सुरक्षेची खात्री मिळते. शाश्वत व हरित बांधकाम प्रणाली हे सातत्याने बदलणारे उद्योग क्षेत्र आहे. त्यामुळे सुरक्षा आणि शाश्वततेला धोका उत्पन्न करणारे घटक कमी कसे करता येतील, यावर नवे उपाय शोधत राहणे अनिवार्य आहे. नाविन्याची ही वाटच राज्यातील हरित व शाश्वत बांधकाम प्रकल्पांना वेगळ्या दिशेकडे नेणारी ठरेल.

खडकवासल्याचा आमदार मंत्री होणार…तापकीरांच्या प्रचार यंत्रणेतला मुख्य सूर

पुणे- लोकांना त्रास देणारा बिल्डर नको,गुन्हेगार नको,युवकांचे घोळके घेऊन फिरणारा दहशत निर्माण करणारा नको एक सयंमी शांत स्वभावाचे नेतृत्व हवे,जे स्वतः हि शांत राहील आणि आपला परिसरही शांत ठेवण्याचा प्रयत्न करेल अशा दृष्टीकोनातून मिळणारी साथ घेऊन प्रचाराची यंत्रणा राबवणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर आता खडकवासल्याचा आमदार आता मंत्री होणार अशा अपेक्षेला तोंड देत घरोघरी फिरताना दिसत आहेत.या उलट ज्यांचा त्यांनी गेल्या निवडणुकीत अत्यल्प मतांनी पराभव केला होता त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराची मात्र गेल्यावेळेची स्थिती आता उरली नसल्याचे दिसते आहे.

खडकवासला मतदार संघातील उमेदवारी जाहीर करताना महायुती आणि आघाडी या दोहोंनाही उशीर झालेला.तोही याच कारणाने आघाडी नेमकी याच प्रश्नावरून साशंक होती कि आता सचिन दोडके यांची गेल्यावेळेची हवा अजूनही कायम आहे कि ती सुटली आहे. पण नेमके ते नेत्यांना समजू शकले नाही आणि दोडके यांना उमेदवारी देण्या शिवाय गत्यंतर उरले नाही.बाळा धनकवडे, काका चव्हाण सारखे चांगले कार्यकर्ते रांगेत होते. ज्यांच्यामुळे लोकसभेला सुप्रिया सुळेना या मतदार संघातून चांगली मते मिळाली होती.त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले.

तशा लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही गोष्टी खडकवासलाच्या दृष्टीने अलग मानल्या जातात.खडकवासला विधानसभा बारामती लोकसभेत आल्याने लोकसभेला त्याला पवारांच्या प्रतिभेची, नेतृत्वाची किनार लाभते मात्र विधानसभेला स्थानिक शांतता,संयमता याला इथले मतदार अधिक प्राधान्य देतात.यावेळी मयुरेश वांजळे सारखे उमेदवार देखील आपण जिंकण्यासाठी मैदानात असल्याचे सांगत आहेत.पण विद्यमान आमदारांशी त्यांची लढत होईल कि आघाडीच्या उमेदवाराशी त्यांची लढत होईल हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.

कोथरूड मतदार संघात ज्यांनी भाजपच्या सहायाने शेकडो कोटीच्या इमारती उभारल्या,आपल्या मोकळ्या जागा भाजपच्या नेत्यांना प्रचारासाठी देखील दिल्या तेच आघाडीचे पुढारी येथे भाजपच्या विरोधात आहेत हे गणित इथल्या मतदारांच्या डोक्यावरून जाणारे आहे. निव्वळ जागा बळकावणे,योग्य अयोग्य न पाहता बांधकामे करणे ती करताना वाहतुकीचा विचार न करणे,राजकारणाचा उपयोग अशा व्यवसायासाठी करणे हे इथल्या पुढाऱ्यांचे मूळ धोरण हि मतदार ओळखून आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अखेरीस तापकीर उजवे ठरत असल्याचे प्रचार यंत्रणेतूनच स्पष्ट होताना दिसत आहे. आणि आता चौथ्यांदा जर निवडून आले तर आपल्या मतदार संघातला आमदार मंत्री होईल आणि अनेक सुविधा सहज सुलभपणे उपलब्ध होऊ शकतील हि धारणा देखील मतदारात आहे. ज्याला प्रचार यंत्रणा सामोरे जाताना दिसते आहे.एकूणच यावेळी चौथ्यांदा तापकीर बाजी मारणार कि अजितदादा सोडून गेल्याने राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याबाबतची सहानुभूती दोडके यांच्या कामी येणार हे मात्र मतदानातूनच स्पष्ट होणार आहे.

मागासवर्गीय जनतेसाठी विविध योजना आणण्याचा प्रयत्न-आमदार महेश लांडगे यांची ग्वाही

पिंपरी, पुणे (दि. १ नोव्हेंबर २०२४) भोसरी, पिंपरी चिंचवड मधील मागासवर्गीय जनतेसाठी विविध प्रकारच्या प्रभावी विकास योजना आणि प्रकल्प राबविण्याचा भविष्यात प्रयत्न असेल अशी ग्वाही भोसरी मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय आठवले महायुतीचे उमेदवार आमदार महेश दादा लांडगे यांनी दिली.
भोसरी विधान सभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. महेशदादा लांडगे यांचे हात बळकट करण्यासाठी भोसरी विधानसभेतील मातंग तथा मागासवर्गीय प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी आमदार अमित गोरखे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, बापू घोलप, डॉ. धनंजय भिसे, नितीन घोलप, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, कीर्ती जाधव, मारुती जाधव, अरुण जोगदंड, युवराज दाखले तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघातील ४०० पेक्षा जास्त मागासवर्गीय प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांनी केलेले भोसरी विधान सभेतील कार्य अतुलनीय आहे. मी आमदार होत असताना त्यांनी मला केलेले हक्काने मतदान हे समाज कधीही विसरणार नाही, आज भोसरी विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे असे संविधान भवन त्यांनी उभे करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मोठी मानवंदना दिलेली आहे, ते स्वतः स्थायी समितीचे अध्यक्ष असताना निगडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बांधण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. त्याचबरोबर दरवर्षी अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाला मनपाकडून मोठे अनुदान देण्याचे कामही ते करीत आहेत. त्यांच्या मतदारसंघातील अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांनी आरटीई च्या माध्यमातून मोफत प्रवेश मिळवून दिलेले आहेत, भोसरी मतदारसंघात मागासवर्गीयांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान आवास योजना, घरकुल योजना, एसआरए प्रकल्प येथे हक्काचे घर मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तसेच महायुतीच्या माध्यमातून मातंग तथा मागासवर्गीय समाजाला नुकतेच घरकुल बांधणीचे अनुदान दीड लाख हुन अडीच लाखापर्यंत करण्यात आले. त्याच बरोबर भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन मधील निवासस्थान, पुण्यातील लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक, बार्टीच्या धरती वर आर.टी. ची निर्मिती असेल अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईतील स्मारक असेल अशा अनेक चांगल्या गोष्टी महायुती सरकारने केलेल्या आहेत. त्यामुळें संपूर्ण मागासवर्गीय समाज महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या सोबत
असेल, व त्यांच्या विजयात भोसरी तील मागासवर्गीय जनतेचा मोठा वाटा असेल. असे आ. गोरखे म्हणाले.
आमदार महेशदादा लांडगे यांनी येणाऱ्या काळामध्ये भोसरीतील मागासवर्गीय जनतेसाठी अनेक योजना आणण्याचा प्रयत्न असेल असे सांगितले त्याचबरोबर त्यांनी आज पर्यंत केलेल्या कामांचा लेखाजोखा समोर मांडला.
कार्यक्रमाचे आयोजन मारुती जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन अरुण जोगदंड यांनी केले. आभार युवराज दाखले यांनी मानले.

पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, अंकुश चिंतामण यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

पुणे : पुण्यामधून ‘अह उल सुफा’ या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना पकडून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे कोथरूड पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Hemant Patil) आणि बिटकॉइन घोटाळा प्रकरणाचा उल्लेखनीय तपास करणारे पुणे सायबर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण (Ankush Chintaman) या दोन्ही अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. राज्य पोलीस दलातील अकरा अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झाले आहे. पाटील सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत राबोडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

१८ जुलै २०२४ रोजी गस्तीदरम्यान कोथरूड पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई करीत ‘अह उल सुफा’ या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी पकडले होते. त्यानंतर, देशभरातील २६/११ प्रमाणे हल्ला करण्याचा मोठा कट उघडकीस आला होता. या पोलीस कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तब्बल दहा लाखांचे रोख पारितोषिक देऊन सन्मान केला होता. पोलीस शिपाई अमोल नजन, प्रदीप चव्हाण, पोलीस हवालदार बालारफी शेख, पोलीस अंमलदार अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ तसेच वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांनी ही कामगिरी केली होती. ‘पुणे पोलिसांच्या कारवाईमुळे पुणे ‘इसिस मॉड्युल’ उघडकीस आले. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अनेक दहशतवादी कारवायांची गुप्त माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली. त्यामुळे पुणे पोलिसांनी केलेली ही कारवाई अत्यंत महत्वाची ठरली. पुढे हा तपास एटीएस आणि नंतर एनआयएकडे सुपूर्द करण्यात आला. एनआयएनकडून याचा सखोल तपास करीत एक एक कडी उलगडत नेली. या तपासात आयसीसचे महाराष्ट्र मोड्यूल उघडकीस आले. या कारवाईमुळे देशावरचे मोठे संकट टळले.

दिल्ली येथे राहणाऱ्या भारद्वाज बंधूंनी २०१६-१७ मध्ये केलेल्या बिटकॉइन घोटाळ्याचा चिंतामण यांनी तपास केला होता. आरोपींनी बीटकॉईन चलनामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. अनेक गुंतवणूकदारांना आकर्षिक करण्यासाठी एजंटांचे जाळे तयार करीत देशभरातून लाखो बिटकॉइन गुंतवणूक स्वरूपात उकळले. कोणताही परतावाही न देता गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. पुणे शहरात २०१८ मध्ये निगडी आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास निरीक्षक चिंतामण यांनी केला होता.

दिवाळीनिमित्त ‌‘स्वरसम्राज्ञी‌’, ‌‘सौभद्र‌’ आणि ‌‘मानापमान‌’ पाहण्याची संधी

पुणे : सुमारे 130 वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे पुणेकर रसिकांच्या आग्रहास्तव दि. 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भरत नाट्य संशोधन मंदिराची निर्मिती असलेल्या तीन दर्जेदार संगीत नाट्यकृती रसिकांना पाहायला मिळणार आहेत. दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या नाट्य महोत्सवाचे यंदाचे पहिले वर्ष आहे.
भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे दरवर्षी मे महिन्यात वासंतिक नाट्य महोत्सव आयोजित करण्यात येतो. या महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. वासंतिक नाट्य महोत्सवाव्यतिरिक्त आणखी एक महोत्सव आयोजित केला जावा, अशी रसिकांनी सातत्याने मागणी केल्यामुळे दिवाळीचे निमित्त साधून संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भरत नाट्य संशोधन मंदिराचे कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
मंगळवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेत्री, विदुषी निर्मला गोगटे यांच्या हस्ते संगीत महोत्सवाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर विद्याधर गोखले लिखित संगीत स्वरसम्राज्ञी या नाटकाचा प्रयोग होणार आहे. बुधवार, दि. 6 नोव्हेंबर रोजी अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत सौभद्र आणि गुरुवार, दि. 7 नोव्हेंबर रोजी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित संगीत मानापमान या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. दिग्दर्शन रवींद्र खरे यांचे आहे. तीनही दिवस प्रयोगाची वेळ सायंकाळी 5:30 अशी आहे.
डॉ. चारुदत्त आफळे, डॉ. राम साठ्ये, वज्रांग आफळे, चारुलता पाटणकर, श्रद्धा सबनीस, अपर्णा पेंडेसे, तनुश्री सोवनी, भक्ती जोशी, विश्वास पांगारकर, सुधीर फडतरे, दीपक दंडवते, राजन कुलकर्णी, संजय डोळे, प्रदीप रत्नपारखे, अभय जबडे यांच्या भूमिका आहेत. राहुल गोळे, संजय गोगटे, प्रसाद करंबेळकर, संजय करंदीकर, मुकुंद कोंडे साथसंगत करणार आहेत.
नाट्य महोत्सवाच्या तिकिट विक्रीला भरत नाट्य मंदिर येथे सुरुवात झाली असून तिकिट दर 300 रुपये आहे.

बंगलोर येथे ‌‘मानापमान‌’चा प्रयोग
बंगलोर येथील रंगशंकरा संस्थेने भरत नाट्य मंदिरास संगीत नाटक सादर करण्यासाठी विशेष निमंत्रण दिले असून संस्थेतर्फे दि. 10 नाव्हेंबर रोजी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित संगीत मानापमान या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे.

चिंचवड मतदार संघात सर्वाधिक तर मावळमध्ये सर्वात कमी दिव्यांग मतदार

पुणे, दि. १: जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार १०१ दिव्यांग मतदार चिंचवड विधानसभा मतदार संघात तर सर्वात कमी म्हणजेच १ हजार ६८९ दिव्यांग मतदार मावळ मतदार संघात आहेत, दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदार संघात विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात २१ विधानसभा मतदार संघात मिळून ९० हजार १३४ दिव्यांग मतदार आहेत. यात अस्थिव्यंग, कर्णबधिर, अल्पदृष्टी आणि इतर प्रकारच्या दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. जुन्नर मतदार संघात १ हजार ९१७, आंबेगाव २ हजार ७७६, खेड- आळंदी ३ हजार ६१२, शिरुर ३ हजार ९८६, दौंड ३ हजार १८०, इंदापूर २ हजार १२, बारामती ४ हजार ९८०, पुरंदर ४ हजार ३१३, भोर ६ हजार ८०, मावळ १ हजार ६८९, चिंचवड १२ हजार १०१, पिंपरी ४ हजार २५१, भोसरी ७ हजार १४३, वडगाव शेरी ३ हजार ५३७, शिवाजीनगर २ हजार २१६, कोथरुड २ हजार ८१४, खडकवासला ३ हजार ४३९, पर्वती ३ हजार ४४०, हडपसर ७ हजार ६१५, पुणे कॅन्टोन्मेंट ५ हजार १०० तर कसबा पेठ मतदार संघात ४ हजार ८६८ इतके दिव्यांग मतदार आहेत.

दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रांवर रॅम्पची सुविधा, पुरेशा व्हील चेअर्स, वाहन व्यवस्था, स्वतंत्र रांगा, ब्रेल लिपीतील साहित्य, कर्णबधिर दिव्यांगांसाठी दुभाषक, सहायक, प्रतिक्षालय, फॉर्म १२ ड भरुन घरातूनच मतदानाची सोय, ९२२६३६३००२ हा हेल्पलाईन क्रमांक आदी सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्यात‍ येणार आहेत. ‘सक्षम’ ॲपच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांच्या मागणीप्रमाणे मतदारसंघनिहाय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, अशी माहितीही निवडणूक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

‘मिशन अयोध्या’ चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर!

येत्या २३ जानेवारी (गुरुवारी) महाराष्ट्रात प्रदर्शित होणार!!

मुंबई: दिवाळीच्या मंगलमय वातावरणात, मराठी चित्रपटसृष्टीतील एका अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपटाने विलक्षण कुतूहल निर्माण केले आहे. समीर रमेश सुर्वे लिखित – दिग्दर्शित आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाच्या महाराष्ट्रातील प्रदर्शनाची तारीख दिवाळीच्या मंगलमय मुहूर्तावर नुकतीच जाहीर करण्यात आली. येत्या वर्षात २३ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक जाहीर होताच त्याने सर्वांचे लक्ष वेधले असून त्याच्या प्रदर्शनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाच्या शीर्षकाने सर्वांच्या मनात कुतूहल चाळविलें असून अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदीराची रेखीव प्रतिमा या शीर्षक पोस्टरवर असून अयोध्या श्रीराम मंदिर निर्मितीच्या प्रथम वर्षपूर्तीचे निमित्त साधून हा चित्रपट येत्या वर्षात २३ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले आहे. लेखक दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे  यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

समीर रमेश सुर्वे यांनी यापूर्वी व.पु. काळे यांच्या लोकप्रिय कादंबरीवरील ‘श्री पार्टनर’, ‘शुभलग्न सावधान’, ‘जजमेंट’ या गाजलेल्या चित्रपटांचे लेखन दिग्दर्शन आणि ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’चे संवाद लेखन तसेच भोजपुरीतील ‘नचनिया’ या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे. अत्यंत कल्पक आणि शिस्तबद्ध दिग्दर्शक म्हणून समीर हे चित्रपटसृष्टीत सुपरिचित आहेत.

‘मिशन अयोध्या’ चित्रपटाची कथा रामभक्ती आणि अयोध्या या ऐतिहासिक संदर्भात गुंफलेली असल्याने चित्रपटाबद्दल जनमानसात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील कलाकार आणि निर्मितीशी संबंधित इतर सदस्यांची नावे अद्याप गुपित ठेवली गेली आहेत. त्यामुळे या चित्रपटातील भूमिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार, याबाबत सर्वांनाच कुतूहल आहे.

दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी या चित्रपटाबद्दल अधिक माहिती देताना सांगितले, “मिशन अयोध्या’ हा चित्रपट केवळ मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील रामप्रेमाच्या आदर्शांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो., एक विशेष औचित्य साधून प्रदर्शित होत असल्याने प्रेक्षकांसाठी तो एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.”

धान्यरुपी जोगवा मागून वंचितांची दिवाळी केली गोड 

विघ्नहर्ता पथकातर्फे ९५० किलो धान्य व शिधा संस्थांना सुपूर्द ; विनामूल्य वादन करुन जमा केला शिधा
पुणे : विविध मंडळे, कार्यक्रमात ढोल-ताशा वादन करुन नवरात्रोत्सवात जमा केलेला धान्यरुपी जोगवा दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक संस्थांना देऊन विघ्नहर्ता ढोल-ताशा पथकाने वंचितांची दिवाळी गोड केली. भोर वेळवंड येथील समर्थ विद्या प्रसारक मंडळी, वाघोली येथील लुई ब्रेल अंध अपंग कल्याणकारी संस्था या सामाजिक संस्थांना हा धान्यरूपी जोगवा देण्यात आला.

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ गणेश मंदिरासमोर शिधा प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रचे अध्यक्ष पराग ठाकूर, खडक पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. अभिजित पवार, कुमार रेणुसे, शिरीष मोहिते, महेश जगताप, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष पराग शिंदे, उमेश कांबळे आदी उपस्थित होते. 
तब्बल ९५० किलो धान्य संस्थांना देण्यात आले. पथकाचे अ‍ॅड.वृषाली जाधव- मोहिते, विराज मोहिते, गौरव देवकर, सौ विद्या मोहिते,  सचिन गायकवाड, निधी पोटे, उमेश चंद्रगी, सार्थक कामठे,अश्वजीत अष्टिगे , सिद्धेश्वर दळवी , रोहन भिल्लरकर आदींनी संयोजनात सहभाग घेतला.

पराग ठाकूर म्हणाले, वादन ही गणपती बाप्पाची सेवा आहे. पूर्णब्रह्म असलेल्या अन्नाचा जोगवा मागत धान्य व शिधा जमा करण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. वादन करुन पैसे मिळू शकतात, मात्र अन्न-धान्य मिळवून ते समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचविणे महत्वाचे आहे. हे काम विघ्नहर्ता पथकाकडून केले जात आहे.

प्रास्ताविकात  अ‍ॅड. वृषाली जाधव मोहिते म्हणाल्या, ज्यांना गरज आहे, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणे आवश्यक आहे. समाजात अशा अनेक संस्था आहेत, ज्या चांगले काम करीत आहेत. त्यांना आपण मदतीचा हात द्यायला हवा. यंदा धान्य व शिधा अंतर्गत गहू, तांदूळ रवा, पोहे, शेंगदाणे , डाळी इत्यादी प्रकारचे धान्य तसेच तेल, साखर, चहा पावडर, मसाले, बिस्किटे, कांदे, बटाटे, केळी यांचा देखील समावेश होता.

वानवडी पोलीसांनी नागरिकांचे गहाळ / हरवलेले एकुण ४५ मोबाईल हस्तगत करून नागरीकांना केले परत

पुणे-
वानवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रवासा दरम्यान व विविध ठिकाणाहून मोबाईल हँडसेट गहाळ झाले बाबत वानवडी पोलीस स्टेशन येथे ऑनलाईन तक्रारी तसेच सी.ई.आर. आर. या पोर्टलवर तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. सदर गहाळ झालेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन हरवलेले मोबाईल वापरत असलेल्या लोकांना संपर्क करुन कि. रु.६,२५,०००/-चे एकूण ४५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल संबंधीत तक्रारदार यांना परत देण्यात आले आहेत. मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदार यांनी आनंद व्यक्त करुन पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत.
मोबाईल हरविल्यानंतर त्यांची तक्रार पुणे पोलीस वेबसाईट वरील लॉस्ट अॅण्ड फाऊंट वर तसेच शासनाचे CEIR या पोर्टवर तात्काळ नोद करावी असे आवाहन पुणे पोलीसांमार्फत करण्यात येत आहे.
सदरची कारवाई ही पोलीस उप आयुक्त परि. ५. पुणे शहर श्री. आर. राजा सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव, तपास पथकाचे पोलीस उपनिरिक्षक संजय आदलिंग, पोलीस अमंलदार अतुल गायकवाड, अमोल पिलाणे, आनंद दरेकर, महेश गाढवे, दया शेगर, हरी कदम, सर्फराज देशमुख, संदिप साळवे, सोमा कांबळे, गोपाळ मदने, यतिन भोसले, विष्णू सुतार, अमोल गायकवाड, सुजाता फुलसुंदर यांनी केली आहे.

पुणे आर्टिस्ट ग्रुपच्या वतीने भोर च्या दुर्गम भागात मिठाई,ब्लँकेट वाटप 

पुणे :
दिवाळी सणानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून पुणे आर्टिस्ट ग्रुप आणि मित्रपरिवारच्या वतीने भोर तालुक्यातील धानवली,दुर्गाडी(मानटवस्ती),उबार्डे(उबार्डेवाडी),आशिंपी या दुर्गम भागात मिठाई,ब्लँकेट,पुस्तक आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.चित्रकार सुरेंद्र कुडपणे-पाटील यांनी त्यात पुढाकार घेतला. 
चित्रकार सुरेंद्र कुडपणे-पाटील यांच्यासह सिकंदर रणवरे,सचिन पडवळ,महेश तेनकाळे,नितीन थोरात,योगेश गुजर,सौरभ वावळ,स्वामी धुमाळ,मयूर शिळीमकर,वनाजी साटोटे, विलास मतगुडे,जय कुडपणे,करण कुडपणे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.वैभव मिठारे,सुजित काळे,अबीर मिठारे,प्रभास काळे,विजय धनावडे,धनश्री काळे,रणधीर खवले,अजय दळवी,श्री.टिके,गंगादास मच्छा,कुणाल बेलदरे,सुनीता राव,देवयानी नलावडे,स्वप्नील कुयटे,सनी कुडपणे,अनिकेत देशमुख,स्वाती जराडे,पौर्णिमा वाळुंज,पूर्णिमा गोरडे,स्नेहा नवरे,आकाश कुडपणे,नितीन फडणीस,योगेश गायकवाड,अस्मिता देशपांडे,रामदास कांबळे,संजय गरुड,रीना शहा,रवी गायकवाड,महेंद्र थोपटे,धनंजय कोटकर,शोभा रायकर यांनी सहभाग घेतला.या ग्रुपच्या सामाजिक उपक्रमाचे हे  सहावे  वर्ष आहे. 

या ग्रुप तर्फे  दरवर्षी विविध भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असा उपक्रम आयोजित केला जातो.दिपावली सणानिमित्त भोर तालुक्यातील धानवली,दुर्गाडी(मानटवस्ती),उबार्डे(उबार्डेवाडी) आणि आशिंपी या दुर्गम भागात पायाभूत सुविधांची कमतरता असतानाही हा उपक्रम आयोजित केला गेला.निसर्गाच्या सानिध्यात राहणारी माणसं कोणत्याही अपेक्षेशिवाय निरपेक्ष भावनेने एकमेकांशी आणि निसर्गाशी जुळवून आपले जीवन जगत असताना त्यांच्याही चेहऱ्यावर हास्य उमलावं या हेतूने प्रयत्न करण्यात आले’,असे सुरेन्द्र कुडापणे-पाटील,वैभव मिठारे,सुजित काळे यांनी सांगितले.

मुलांना देशासाठी अर्पण करणा-या वीरमातांचा सन्मान

सैनिक मित्र परिवार तर्फे आयोजन ; अभिनेते रवींद्र खरे, अश्विनीकुमार उपाध्ये यांची उपस्थिती
पुणे : आपल्याकडील एखादी वस्तू काही काळासाठी दुस-याला द्यायची, तरी देखील आपण चार वेळा विचार करतो. मात्र, देशरक्षणार्थ आपल्या पोटच्या मुलांना एका क्षणाचाही विचार न करता अर्पण करणा-या वीरमातांचे कार्य अलौकिक आहे. अशाच देश रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या लष्करी अधिका-यांच्या पाच वीरमातांचा सन्मान सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. भारत माता की जय… च्या जयघोषात व सनई- चौघडयाच्या निनादात हा सन्मान सोहळा पार पडला. 
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात सैनिक मित्र परिवार तर्फे आयोजित सन्मान वीरमातांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे, संपदा सहकारी बँकेचे अध्यक्ष अश्विनीकुमार उपाध्ये, कर्नल ॠषिकेश चिथडे, भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, सैनिक मित्र परिवारचे आनंद सराफ, विष्णू ठाकूर, गिरीश सरदेशपांडे, पराग ठाकूर आदी उपस्थित होते. 
रांगोळी आणि फुलांच्या पायघडयांनी केलेले स्वागत, सुवासिनींनी केलेले औक्षण अशा देशभक्तीने भारलेल्या वातावरणात वीरमाता ॠता देसाई, वृंदा पाथरकर, सुमेधा चिथडे, उर्मिला मिजार, अनुराधा गोरे यांचा सन्मान करण्यात आला. पुण्यातील अनेक गणेशोत्सव मंडळे आणि संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला. गिरीश पोटफोडे, संगीता ठकार, कल्याणी सराफ, दीपक काळे, संकल्प कोंडेकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. 
रवींद्र खरे म्हणाले, देश रक्षणार्थ सिमेवर जरी सैनिक सज्ज असले, तरी देखील आपणही शस्त्र चालविणारे मन आणि मनगट निर्माण करणे गरजेचे आहे. मनगटात आणि मनात ताकद असायला हवी. आपली भूमी ही क्रांतिकारकांची भूमी आहे. त्यामुळे देव, देश आणि धर्माचा प्रचंड अभिमान बाळगून आपण रहायला हवे. 
अश्विनीकुमार उपाध्ये म्हणाले, आपल्या मुलांना सिमेवर पाठविणे, हे उच्च कर्तव्य भावनेचे प्रतिक आहे. आपण सामान्य नागरिक हे बलिदान करु शकत नाही. त्यामुळे अशा वीरमातांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले. वीरमातांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. अनुराधा गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. आनंद सराफ यांनी प्रास्ताविक केले. गिरीश पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले. पराग ठाकूर यांनी आभार मानले. 

राजसी हा पहिला ई-दिवाळी विशेषांक – २०२४ ऑनलाईन पद्धतीने प्रकाशित- प्रतिक्रिया जरुर नोंदवा

https://online.fliphtml5.com/ulovq/vrui/ या लिंक वर क्लिक करा आणि अंक जरूर वाचा

आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेच्या पुणे विभागाचा राजसी हा पहिला ई-दिवाळी विशेषांक – २०२४ हा २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर ऑनलाईन पद्धतीने प्रकाशित करण्यात आला.

या संस्थेच्या ज्योत्स्नाताई चांदगुडे अध्यक्ष असून मीनाताई शिंदे उपाध्यक्ष आणि वैजयंती आपटे या तंत्रज्ञान समिती प्रमुख आहेत.

राजसी ह्या दिवाळी अंकाच्या संपादकपदाची धुरा ज्योत्स्नाताई चांदगुडे यांनी सांभाळली असून मीनाताई शिंदे या उपसंपादक आहेत आणि वैजयंती आपटे या कार्यकारी संपादक आहेत.

या अंकात संस्था सदस्य मैत्रिणींच्या कथा आणि कविता यांचा समावेश असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल पुणे विभागाच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे यांनी लेख लिहिला आहे. त्याचबरोबर त्यांचे संपादकीय देखील आहे.
आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या अध्यक्ष प्रा. पद्माताई हुशिंग यांनी संस्था अहवाल वृत्तांत लेखन या स्वरूपात लिहिला असून अध्यक्षीय शुभेच्छा दिल्या आहेत.

तंत्रज्ञान समिती प्रमुख वैजयंती आपटे यांनी डिजिटल दिवाळी अंकाबाबत त्यांच्या भूमिकेविषयी आणि निर्मिती प्रक्रियेविषयी मनोगत लिहिले आहे. या संपूर्ण ई-दिवाळी अंकाची मुखपृष्ठ मांडणी, अक्षरजुळणी, सजावट आणि फ्लिप बूक आरेखन वैजयंती आपटे यांनी केलेले आहे.
राजसी या दिवाळी अंकाच्या प्रतिक्रिया 9892836604 या क्रमांकावर जरुर नोंदवाव्यात.

आबा बागुलांच्याप्रमाणे धंगेकरांनी घेतला बाल दिवाळी आनंद मेळावा, चिमुकल्यांनी लुटला दिवाळीचा आनंद

 पुणे : सनई चौघड्यांचा मंगलमयसूर…. रांगोळ्याच्या पायघड्या… पाटाभोवती केलेली आकर्षक रांगोळी… शाही अभ्यंगस्नान, फराळ आणि नवीन कपडे चिमुकल्यांना मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुलांना अभ्यंगस्नान घातले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. यावेळी कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारी , आमदार धंगेकर यांनी  मुला मुलींना उटणे व मोती साबणाने आंघोळ घालून त्यांचे औक्षण केले. तसेच मुलांना  नवीन कपडे, फराळ व फटाके  देण्यात आले.  मुलांनी फटाके, फुलबाजे फोडून आनंद साजरा केला. चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.
 गरजू व गरीब कुटुंबातील मुला-मुलींना दिवाळीचा आनंद लुटता यावा व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी रवींद्र धंगेकर मित्र मंडळातर्फे शुक्रवारी सकाळी  लोहियानगर येथील म्हसोबा मंदिर जवळील शिवराज चौक येथे ‘बाल दिवाळी आनंद मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार रवींद्र धंगेकरयाप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळ तिवारी, सादिकभाई शेख, चंदन पाचंगे, सामाजिक कार्यकर्ते सोनूभाई शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. सोनू शेख, नगमा शेख, मालन शिंदे, मोबीना शेख, सेना शेख, हमिदा शेख, सोनिया शेख यांच्यासह स्थानिक महिला-पुरुष देखील उत्साहाने सहभागी झाले होते.

       आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, हा उपक्रम प्रचाराचा भाग नाही. गेल्या 35 वर्षाहून अधिक सामाजिक व राजकीय काम करताना व सामान्यांची नाळ जोडल्या गेली आहे. सर्वसामान्य गरीब, गरजू, वंचित नागरिकसोब दिवाळी साजरी करणे हा खूप मोठा आनंद आहे.हिंदू,मुस्लिम, शीख, ईसाई इथं जाती-धर्मांचे सण आम्ही साजरे करतो. वर्षानवर्षे आम्ही सर्व धर्मीय  एकमेकांमध्ये मिसळून एकोप्याने  सण साजरा करतो. दिवाळी सणामधील लक्ष्मीपूजन हा महत्त्वाचा सण मानला जातो.   या सणांमध्ये सर्व धर्माचे लोक एकत्र येतात. एकमेकांना शुभेच्छा देतात. एकोपा पुढे नेण्यासाठी वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद दिसण्यासाठी उपक्रमात आम्ही सहभागी होतो, यावेळी त्यांनी सांगितले.

पुण्यातील भिक्षेकऱ्यांची दिवाळी गोड

महा एनजीओ फेडरेशन कडून बुधवार पेठेत पोषण आहार आणि दीपावली स्वीट बॉक्स ची भेट
पुणे : महा एनजीओ फेडरेशन तर्फे आत्मनिर्भर दिवाळी २०२४ अंतर्गत आणि क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या सीएसआर अंतर्गत पुण्यातील विविध भागात अनेक कुटूंबांना आत्म निर्भर दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत पुण्यातील शेकडो भिक्षेकऱ्यानाही महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या शुभहस्ते दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक  शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून सदर उपक्रम चालू आहे.

या उपक्रमा अंतर्गत पुण्यातील बेवारस, निराधार, अपंग, मतीमंद मुले, दिव्यांग व्यक्ती, आदिवासी, पारधी समाजातील शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या वाड्या वस्तीवर आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना तसेच स्मशान भूमीतील कर्मचारी आणि सेवक यांना सदर दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. शिवाय ह्या उपक्रमा अंतर्गत ४० महिलांना रोजगार  उपलब्ध करून देऊन आणि महा एनजीओ फेडरेशनच्या पुण्यातील ५० एनजीओच्या सहकार्याने पुण्यातील ठीक ठिकाणी हा दिवाळी फराळ पोच करण्यात आला.

शनिवार वाडा येथील कार्यक्रम भिक्षेकरुंची सेवा करणारे डॉ. अभिजित सोनावणे (सोहम ट्रस्ट) यांनी सदर कार्यक्रमाचे संयोजन शनिवारवाडा फुटपाथवर केले होते. भिक्षेकरी यांचे पुनर्वसन या महत्वाच्या विषयावर शेखर मुंदडा यांनी सकारात्मकरित्या विचार करत येत्या काळात यावर महा एनजीओ फेडरेशन सोबत एकत्रित येत काम करण्याची तयारी दर्शवली.

क्लीन सायन्सचे कृष्णकुमार बुब यांचे ह्या उपक्रमास विशेष सहकार्य  लाभले. याप्रसंगी महा एनजीओ फेडरेशन वरिष्ठ संचालक मुकुंद शिंदे, राहुल जगताप, सदस्य रवींद्र चव्हाण,विठ्ठल काळे, अपूर्वा करवा तसेच सोहम ट्रस्टचे डॉ. अभिजित सोनावणे,  डॉ.मनीषा सोनावणे आणि  सोहम ट्रस्टचे आणि महा एनजीओ फेडरेशनचे अनेक सहकारी उपस्थित होते.
बुधवार पेठेत पोषण आहार आणि दीपावली स्वीट बॉक्स ची भेट 

बुधवार पेठ , पुणे येथील ९० एचआयव्ही बाधित महिलांना शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून पोषण आहार आणि  दीपावली स्वीट बॉक्सचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी सेवा संकल्प च्या पदाधिकारी स्नेहा कलंत्री, किरण जाखोटिया, ज्योती मालपाणी, सरोज लद्दर, संध्या शाह, संगीता आगरवाल, मंथन फाउंडेशनच्या अध्यक्ष आशा भट्ट आणि अपूर्वा करवा व इतर मान्यवर उपस्थित होते.  महा एनजीओ फेडरेशनचे वरिष्ठ संचालक मुकुंद शिंदे,संचालक अमोल उंबरजे, कैलास सिकची, राहुल जगताप, रवींद्र चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.