Home Blog Page 611

मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे भाजपाचे घाणेरडे राजकारण भाजपवर उलटले-सचिन सावंत

मुंबई-सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टनुसार, सुशांतची हत्या झाली नसून आत्महत्याच आहे. त्यामुळे रिया चक्रवर्तीला क्लीन चिट देण्यात आली आहे. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार हल्ल चढवला आहे. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे भाजपाचे घाणेरडे राजकारण भाजप वर उलटले, असे ते म्हणाले. रिया सारख्या एका मुलीला भाजपच्या गलिच्छ राजकारणात त्रास दिला गेला. सुशांतसिंगच्या नातेवाईकांना वेठीस धरले गेले. असा आरोप देखील सचिन सावंत यांनी भाजपवर केला.

सचिन सावंत म्हणाले की, सीबीआयने सुशांतसिंग राजपूत च्या मृत्यूची चौकशी बंद केली आहे. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे भाजपाचे घाणेरडे राजकारण भाजप वर उलटले आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी तसेच बिहार निवडणुकीत यश मिळविण्यासाठी सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचा भाजपने गैरवापर केला. एवढेच नाही तर सीआरपीसीचे उल्लंघन करुन बिहारमध्ये झीरो एफआयआर नोंदवून सीबीआयकडे केस वर्ग करण्यात आली. यातून कायद्याचेही तीन तेरा वाजले. तीन तीन तपास यंत्रणा लावण्यात आल्या. जागतिक दर्जाच्या मुंबई पोलिसांची बदनामी केली गेली.

सचिन सावंत पुढे म्हणाले, रातोरात लाखो फेक अकाउंट सोशल मीडियावर तयार करुन त्यामध्ये सुशांत सिंगच्या आत्म्यास बोलावण्याचे थोतांड पसरवून अनेक कथा रचून सुशांतची हत्या झाल्याचे व महाविकास आघाडी सरकारने ते दाबल्याचे चित्र तयार करण्यात आले. हल्ली हल्ली पर्यंत सातत्याने सुशांतसिंगचा सोशल मीडियावर विषय ट्रेंड करण्यात येत होता. एम्सने अहवाल देऊन अनेक महिने होऊन ही सीबीआय साडेचार वर्षे गप्प बसली. मी सातत्याने हा विषय लावून धरत होतो.

सचिन सावंत म्हणाले, रिया सारख्या एका मुलीला भाजपच्या गलिच्छ राजकारणात त्रास दिला गेला. सुशांतसिंगच्या नातेवाईकांना वेठीस धरले गेले. यातून सीबीआय व ईडीसारख्या राष्ट्रीय तपास यंत्रणांचा राजकीय उपयोग होतो हे अधोरेखित झालेच, पण त्यांची विश्वासार्हता ही प्रश्नांकीत झाली आहे. पालघर साधूंचे प्रकरण असो वा दिशा सालीयनच्या मृत्यूची चौकशी असो विरोधी पक्षांची बदनामी करण्याचे भाजपचे हीन राजकारण देशासाठी किती घातक आहे हे स्पष्ट होते. शेवटी सत्याचा विजय होत असतोच! जनतेने ओळखावे! भाजपच्या गलिच्छ राजकारणाचा जाहीर निषेध, असे सचिन सावंत यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

निवडणुकांच्या अनुषंगाने मनसेमधील नवीन संघटनात्मक बदल आणि रचना आज जाहीर

मुंबई-आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्ष संघटनेत अनेक बदल केले आहेत. रविवारी रवींद्र नाट्यमंदिरात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक पार पडली. राज ठाकरे यांनी मनसेमधील नवीन संघटनात्मक बदल आणि रचना आज जाहीर केले आहेत. मनसेने पहिल्यांदाच मुंबईसाठी अध्यक्षपदाची नेमणूक केली असून संदीप देशपांडे यांच्याकडे ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर राजपुत्र अमित ठाकरे यांच्यावरही मोठी जबाबदारी दिली असून मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. फक्त विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेमध्ये आता शहर अध्यक्ष आणि उप-शहर अध्यक्ष या नव्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठे अपयश आले होते. त्यांचा एकही आमदार निवडून आला नाी. या अपयशानंतर पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पक्ष संघटनेत मोठे बदल करण्याचे संकेल दिले होते. त्यासाठी त्यांनी पक्षातील पदांचे पुनर्गठन, पदाधिकाऱ्यांची आचारसंहिता आणि इतर महत्त्वाचे मुद्दे यावर विचार करून आराखडा तयार करण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार आज मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत केंद्रीय समिती स्थापनेसह, मुंबईत महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाला मजबूत कसे करावे, यावर सखोल चर्चा करण्यात आली.

काय करायचे, कसे करायचे त्याची आखणी 2 एप्रिल पर्यंत सर्वांना मिळेल. शहर रचनेत कामांची रचना आहे काय करायचे आणि काय नाही करायचे, हे सांगितले जाईल, असे राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ज्याला जे काम दिले त्यांनी तेच करायचे. त्यामुळे भांडणे कमी होतील, अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. अनेक गोष्टी साचल्या आहेत. ते सर्व गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

मनसेने आतापर्यंत मुंबईसाठी कधीही अध्यक्षांची नेमणूक केली नव्हती. आता मात्र थेट पहिल्यांदाच मुंबई अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली असून संदीप देशपांडे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दक्षिण मुंबईच्या उपशहर अध्यक्षपदी यशवंत किल्लेदार तर मुंबई पश्चिम उपनगरपदी कुणाल माईणकर आणि मुंबई पूर्व उपनगरपदी योगेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांना मनसेच्या केंद्रीय समितीत स्थान देण्यात आले आहे. ही केंद्रीय समिती मनसेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर देखरेख ठेवेल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

ठाण्यातही अशीच एक केंद्रीय समिती असेल, त्यात अविनाश जाधव, राजू पाटील, अभिजीत पानसे, गजानन काळे असतील. यामुळे दोन्ही बाजूने पक्ष बांधला जाईल, अशी रचना केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही रचना लावण्यात येईल. सध्या मुंबई आणि ठाण्यात केलेला हा बदल आहे. एप्रिल-मे महिन्यात महाराष्ट्रात ही रचना होईल” अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली

राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण १ लाख ३८ हजार ८२५ दावे निकाली

पुणे, दि. २३ : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली २२ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व १ लाख २५५ व तडजोडचे ३८ हजार ५७० असे एकूण १ लाख ३८ हजार ८२५ दावे निकाली काढण्यात आले आहेत.

लोक अदालतीमध्ये बँकेचे कर्जवसूली ८ हजार ८१९, तडजोड पात्र फौजदारी ३१ हजार ५३७, वीज देयक ३२९, कामगार विवाद खटले १८, भुसंपादन १११, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण १६३, वैवाहिक विवाद ७४, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट १ हजार ९९४, इतर दिवाणी ५१४, इतर २ हजार ६७३, महसूल ७ हजार ७३१, पाणी कर ८४ हजार ८६०, ग्राहक वादविवाद २ अशी एकूण १ लाख ३८ हजार ८२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या ९७ हजार ६४४ प्रलंबित प्रकरणांमधून ३८ हजार ५७० प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात ३२० कोटी ६८ लक्ष १२ हजार ४०७ तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. वादपूर्व २ लाख ४२ हजार ९८७ दाव्यापैकी १ लाख २५५ दावे निकाली काढण्यात येऊन २५६ कोटी ७० लाख ९८ हजार ७४९ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. एकूण १ लाख ३८ हजार ८२५ प्रलंबित दावे निकाली काढण्यात येऊन ५७७ कोटी ३९ लाख ११ हजार १५६ रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले.

पुणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनादरम्यान दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभाग, महानगरपालिका, विविध शासकीय विभाग आणि नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती सोनल पाटील यांनी दिली आहे.

स्विफ्ट डिझायर गाडीतून बारा लाखाचा गांजा जप्त

पुणे- परारज्यातुन येवुन गांज्याची विक्री करणाऱ्या तरुणाला पकडून त्याच्या कडून बारा लाखाचा गांजा पुणे पोलिसांनी हस्तगत केला,कर्नाटकातून आणून स्विफ्ट डिझायर गाडीत फिरत हा तरुण गांजाची विक्री पुण्यात करत होता .

पोलिसांनी सांगितले कि,’काल दिनांक २२/०३/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना हॅण्डल्युम हाऊस शॉपच्या समोर, शंकरशेठ रोड, स्वारगेट पुणे सार्वजनीक रोडवर नदिम मोईज शेख वय २८ वर्षे, रा. जुना मायलोर, हनुमान मंदिरा जवळ, बिदर, कर्नाटक, हा इसम त्याचे जवळील स्विफ्ट डिझायर गाडी मध्ये संशयस्पदरित्या बसलेला मिळुन आल्याने सदर ठिकाणी झडती घेतली असता त्याचे गाडीच्या डिक्की मध्ये १२,००,७४०/- कि.चा चार नायलॉनच्या पोत्यामध्ये भरलेला ३० पॅकेट असा एकुण ६० किलो ०६७ ग्रॅम वजनाचा गांजा मिळुन आल्याने, सदर मालासह स्विफ्ट डिझायर गाडी व मोबाईल असा एकुण १७,१०,४४०/- रु किं मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर इमसा विरुध्द स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा इसम हा मुळचा कर्नाटक राज्यातील असुन त्याने सदरचा गांजा कोठुन आणला व कोठे विक्री करणार होता याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन शर्मा,अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे,पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पो. आयुक्त, गुन्हे २ राजेन्द्र मुळीक यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार, विशाल दळवी, सचिन माळवे, संदिप शिर्के, सुजीत वाडेकर, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर संदेश काकडे, दत्ताराम जाधव, यांनी केली आहे.

परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाचे विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन, सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे, डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाम भूमिका

मुंबई, : वाशी येथील एका महाविद्यालयात परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीशी केलेल्या आक्षेपार्ह वर्तनाच्या घटनेबाबत तातडीने चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना केली आहे.

या संदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी या प्रकरणातील आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करून अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकरणाचा तातडीने आणि निष्पक्षपणे तपास होण्यासाठी तज्ज्ञ व अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, तसेच आरोपीला कोणतेही पाठबळ मिळणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, आरोपीने यापूर्वी अशा प्रकारचे कृत्य केले असल्यास त्याचा तपास करून पुरावे गोळा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

विद्यार्थिनींवरील कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अत्याचारासंदर्भात कठोर पावले उचलली जातील आणि दोषींना कडक शिक्षा होईल, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जावी असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे.

“आयुर्वेदाचार्य डॉ. रानडे यांच्या निधनाने आयुर्वेद क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण”, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली

मुंबई : सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. रानडे यांच्या निधनाने आयुर्वेद क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही दुःखद बातमी समजताच विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शोक व्यक्त केले.

“डॉ. रानडे सरांच्या दुःखद निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. त्यांनी आपल्या अद्वितीय कार्यातून आयुर्वेदिक उपचार पद्धती समृद्ध केली. १६८ पुस्तके, असंख्य व्याख्याने आणि लेखांमधून त्यांनी दिलेले सखोल मार्गदर्शन हे आम्हा सर्वांसाठी दीपस्तंभासारखे आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले. त्यांच्यावतीने त्यांच्या स्त्री आधार केंद्र, पुणे संस्थेच्या प्रतिनिधी यांनी अंत्यसंस्काराला उपस्थित राहून पुष्पहार अर्पण केला.

या कठीण प्रसंगी संपूर्ण कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशी भावना व्यक्त करत, “परमेश्वर आपल्याला व कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची ताकद देवो,” अशी प्रार्थनाही डॉ. गोऱ्हे यांनी केली.

मार्केटिंग व सेल्स क्षेत्रांत काम करणाऱ्या यशस्वी महिलांची प्रकट मुलाखत संपन्न

पुणे- पुणे मॅनेजमेंट असोसिएशन व एसएमजे कंन्सलटंन्स यांच्या संयुक्त विद्यमाने मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रात उत्तुंग कार्य करण्याऱ्या महिलांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. आयएमडीआर सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमात वेदवती राजे(लीडर फ्लीटगार्ड फिल्टर्स),शितल ब्रम्हे(सीईओ एनी टाईम बार्टल),अंजली पाटील (फाउंडर डायरेक्टर इल्यूमीना कन्सल्टिंग) यांची मुलाखत मृणालिनी सचान यांनी घेतली. या कार्यक्रम प्रसंगी पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे, एसएमजे कंन्सलटंन्सचे राहुल जोशी आदी मान्यवरांच्या बरोबरच मार्केटिंग व सेल्स विभागात कार्य करणारे अधिकारी वर्ग उपस्थित होते. या वेळी मुलाखतीत यशस्वी महिलांनी मार्केटिंग व सेल्स याची सखोल माहिती, काय करू नये व काय करावे याविषयी माहिती देत असतांनाच भावी काळातील आव्हाने व त्याचे निराकरण याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

मुक्तछंद म्हणजे स्वातंत्र्य आहे; स्वैराचार नाही : डॉ. सदानंद मोरे

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे वर्षा कुलकर्णी यांचा काव्य जीवनगौरव पुरस्कार

पुणे : मुक्तछंद म्हणजे स्वातंत्र्य आहे; स्वैराचार नाही. ज्या कविंना आपले विचार कोणत्याही छंदात, वृत्तात मावत नाहीत, छंदांचे बंधन वाटते त्यांनीच मुक्तछंदात काव्य लिहावे. कविता प्रकार अत्यंत सोपा आहे, असे आजच्या काळातील कवींना वाटते. त्यामुळेच कुणीही उठतो आणि कवी होतो. यातूनच कवींची बहुतेकवेळा अवहेलना, टिंगल, चेष्टा होते आणि कविता या साहित्यप्रकाराला तसेच कवीला गांभीर्याने घेतले जात नाही, अशी स्पष्टोक्ती महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केली.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे काव्य जीवनगौरव पुरस्काराने ‌‘वृत्तबद्ध कविता : कला आणि शास्त्र‌’ या ग्रंथाच्या लेखिका आणि ज्येष्ठ कवयित्री वर्षा कुलकर्णी यांचा आज (दि. 23) सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोतल होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष मैथिली आडकर मंचावर होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आजच्या कवींना ओवीबद्ध, छंदबद्ध लिखाणाचे तंत्र, शास्त्र अवलंबावे असे वाटत नाही, असे नमूद करून डॉ. सदानंद मोरे पुढे म्हणाले, अशा परिस्थितीत वृत्तबद्ध कविता : कला आणि शास्त्र या पुस्तकातून कविता या साहित्य प्रकाराविषयी मोलाची माहिती लोकांसमोर आणण्याचे कार्य वर्षा कुलकर्णी यांनी केले आहे. काव्य लिखाण करताना आजच्या कवींनी व्याकरणाला सुटी देणे, छंदबद्धता नाकारणे योग्य नाही.

सत्काराला उत्तर देताना वर्षा कुलकर्णी म्हणाल्या, काही वर्षांपूर्वीपर्यंत कविता लिखाणाचे शास्त्र असते याविषयी मलाही कल्पना नव्हती. परंतु हे जाणल्यानंतर साहित्य क्षेत्रातील दिग्गजांशी चर्चा, साहित्यप्रेमींचे अभिप्राय अनेक कवितांचे रसग्रहण, चर्चा यातून मी हे तंत्र समजावून घेत या विषयी सोप्या मराठी भाषेत छोटे छोटे लेख लिहिले. वडिलांनी पाठपुरावा केल्यामुळे या लेखांचे पुस्तकरूपात प्रकाशन झाले. त्या पुढे म्हणाल्या, काव्य लेखन करताना कवितेचा आशय, आत्मा, कला आणि शास्त्र यांचा संगम करत काव्याचे बीज पुरेसे रुजल्यानंतर बहरू द्यावे. आयुष्यभर विद्यार्थी राहून संपूर्णत्वाचा अट्टाहास न धरता कला व्रत म्हणून जोपासली जावी.

प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याविषयी माहिती सांगितली. परिचय आणि सन्मानपत्राचे वाचन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले तर सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केल.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित कविसंमेलनात प्रभा सोनवणे, स्वप्नील पोरे, तनुजा चव्हाण, वैजयंती आपटे, नचिकेत जोशी, मिलिंद छत्रे, डॉ. मृदुला कुलकर्णी-खैरनार, डॉ. मंदार खरे, डॉ. ज्योती रहाळकर, ज्योती उटगीकर-देशपांडे, सुजाता पवार यांचा समावेश होता. सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी केले.

‘स्नेहाधार गौरव पुरस्कारा‌’ने वासंती देव आणि मनिषा पवार यांचा गौरवदृढ निश्चयातून समाजाला दिशा देण्याचे कार्य : उमेश झिरपे

पुणे : समाजकार्यात महिला शक्ती किती सक्षम असू शकते हे ‌‘स्नेहाधार गौरव पुरस्कारा‌’तून समाजापुढे येत आहे. सामाजिक कार्यातून समाजाला दिशा व प्रेरणा मिळते. सामाजिक क्षेत्रात समाजकंटक मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरतात. परंतु विरोधाला न डगमगता, दृढ निश्चयाने कार्यरत असणाऱ्या वासंती देव आणि मनिषा पवार यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन निष्णात गिर्यारोहक, गिरीप्रेमी संस्थेचे संस्थापक उमेश झिरपे यांनी केले.

स्नेहालय, अहिल्यानगर संचलित स्नेहाधार पुणे परिवारातर्फे ‌‘स्नेहाधार गौरव पुरस्कारां‌’चे वितरण झिरपे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. निवारा सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात पेण येथील ‌‘अहिल्या महिला मंडळ‌’च्या संस्थापिका वासंती श्रीकांत देव आणि कळसंबर (ता. बीड) येथे ‌‘आपला परिवार‌’ वृद्धाश्रमाची स्थापना करणाऱ्या मनीषा भाऊराव पवार यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी होते. प्रसिद्ध व्यावसायिक कृष्णा राजाराम अष्टेकर यांची विशेष उपस्थिती होती. स्नेहाधार परिवार, पुणेच्या सहसंचालिका गौरी पाळंदे मंचावर होत्या. शाल, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
उमेश झिरपे पुढे म्हणाले, संस्थात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात समाजकार्य करणे वाटते तितके सोपे नाही, या करिता पुरस्कारप्राप्त महिलांनी त्याग आणि धाडस केलेले आहे. समाजाने त्यांच्या कार्याला भरभरून मदत करावी आणि सशक्त पिढी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
अध्यक्षपदावरून बोलताना सुहास मापारी म्हणाले, स्नेहालय ही फक्त संस्था नसून हे चालते, बोलते, फिरते विद्यापीठच आहे. दु:खी, पिडित, वंचित घटकांसाठी असलेल्या योजना माहिती अभावी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. अशा वेळी समाजकार्य करणाऱ्या संस्था लाभार्थी आणि शासनामधील दुवा ठराव्यात. विपरित परिस्थितीत जिद्दीने सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था खऱ्या अर्थाने समाजाच्या नायक आहेत.
गो-सेवेच्या क्षेत्रात कार्यरत असताना स्नेहालय या संस्थेशी संपर्क आला, असे सांगून कृष्णा अष्टेकर म्हणाले, या संस्थेचे कार्यकर्ते जीवाला जीव देऊन अखंडितपणे कार्यरत आहेत. या पुरस्काराच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या इतर संस्थांनाही नेटाने काम करण्याची स्फूर्ती-जिद्द देत आहेत. हे कार्य म्हणजे परमेश्वराची खरी पूजा आहे.
वासंती देव यांच्यावतीने मनोगत व्यक्त करताना अश्विनी गाडगीळ म्हणाल्या, सामाजिक दायित्व ओळखून अहिल्या महिला मंडळाच्या माध्यमातून आदिवासी पाड्यातील स्त्रियांसाठी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करण्यात येत आहे. महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी कार्यकर्ते अविरतपणे प्रयत्नशील आहेत. प्रामाणिकपणे काम केल्यास समाज कायम पाठीशी उभा राहतो, असा अनुभव आहे.
पुरस्काराने फक्त आत्मविश्वासच वाढला नाही तर पुढील कार्य करण्यास प्रेरणा मिळाली असल्याचे सांगून मनिषा पवार म्हणाल्या, समाजातील दु:ख पाहून ज्येष्ठांसाठी कार्य करावे, या संकल्पनेतून वृद्धाश्रमाची स्थापना केली. आमच्या संस्थेचे कार्य पाहून पुण्यातील अनेक सामाजिक संस्था व व्यक्तींनी आमच्या कार्याला मदत केली आहे.
प्रास्ताविकात शुभांगी कोपरकर यांनी संस्थांच्या उपक्रमांची माहिती सांगितली. मान्यवरांचे स्वागत गौरी पाळंदे, सुहास मापारी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख विवेक नारळकर यांनी करून दिली. मानसी चंदगडकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

आगीमुळे २२० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग; हिंजवडीमधील उद्योगांसह ९० हजारांवर ग्राहकांचा पाऊणतास वीज खंडित

पुणे, दि. २२ मार्च २०२५: आंबेगाव (ता. मुळशी) येथे लागलेल्या आगीमुळे शनिवारी (दि. २२) दुपारी १२.४४ वाजता महापारेषणच्या पिरंगुट-कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाब टॉवर लाइनमध्ये ट्रिपिंग आले. त्यामुळे हिंजवडीमधील २०० आयटी उद्योगांसह हिंजवडी, वाकड, पिरंगुट, भुकुम, भुगाव, पौड, मुठा खोरे, कोळवण खोरे आदी परिसरातील घरगुती, व्यावसायिक व इतर सुमारे ९० हजार २०० ग्राहकांचा वीजपुरवठा ४३ मिनिटे बंद होता.

याबाबत माहिती अशी की, आंबेगाव (ता. मुळशी) येथील टेकड्यांच्या परिसरात आज लहानमोठ्या झाडाझुडपांना आग लागली होती. या ठिकाणी असलेल्या महापारेषणच्या पिरंगुट-कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाबाच्या टॉवर लाइनखाली ही आग पसरल्यानंतर या लाइनमध्ये ट्रिपिंग आले. परिणामी महावितरणच्या पिंपरी विभागातील १३ व मुळशी विभागातील १८ अशा ३१ उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला व वीजयंत्रणेत १८२ मेगावॅटची तूट निर्माण झाली. यामुळे हिंजवडी फेज १ ते ३ मधील २०० आयटी उद्योग तसेच वाकड परिसर, पिरंगुट, भुगाव, भुकूम, उरावडे, कासारआंबोली, पौड, पळवण खोरे, मुठा खोरे, कोळवण खोरे, लवळे, कोठावडे आदी परिसरातील ९० हजार घरगुती, व्यावसायिक व इतर ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. महापारेषणच्या वरिष्ठ अभियंत्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर ४३ मिनिटांनी या सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला.

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना

पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

पुणे:आज तरुण पिढी पाश्चात्य संगीताच्या आहारी जात आहे. त्यातून सर्वांना आनंद मिळतो असे नाही. मात्र, शास्त्रीय संगीत आणि नृत्यामधून एक वेगळाच आनंद मिळतो, अशी भावना, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था प्रस्तुत नृत्य गुरु पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे उद्घाटन आज झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, नृत्य गुरु शमा भाटे, नृत्य गुरु मनिषा साठे, सुचेता चापेकर, भाजपा सरचिटणीस तथा‌ कार्यक्रमाचे संयोजक पुनीत जोशी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात ५०० पेक्षा जास्त कलाकार आपला कलाविष्कार सादर करत असून, देशातील दोन नामांकित संस्था देखील सहभागी झाल्या आहेत.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, प्रत्येक कलाकारांना संवाई गंधर्व मध्ये आपली कला सादर करण्याची इच्छा असते. आज तरुण पिढी पाश्चात्य संगीताच्या आहारी जात आहे. , पाश्चात्य संगीतातून आनंद मिळतो असे नाही. सध्या डीजे डॉल्बी आणि त्याला जोडीला ड्रग्ज आले आहे. त्यामुळे हे तरुण पिढीला उद्ध्वस्त करत आहे. याला सांस्कृतिक कार्यक्रम उत्तर आहे.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येकामध्ये एक कलाकार दडलेला आहे. त्यामुळे तो आज आपापल्या परीने कला सादर करत असतो. कोणी आपल्याला आवडणारे गाणं गुणगुणत असतो. तर कोणी बंद खोलीत नृत्य करतो. त्यातून एक सकारात्मक लहरी निर्माण होतात. त्यामुळे आनंद बाहेर शोधण्याऐवजी, स्वतः मध्येच शोधला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.‌

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणे हे सांस्कृतिक राजधानी असलेले शहर आहे. पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या वैभवात भर घालत आहे. गेल्या पाच वर्षांत नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून सातत्याने पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घातली आहे. पुढील वर्षी हा महोत्सव अधिकाधिक भव्यदिव्य व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी नृत्य गुरु मनिषा साठे यांनी देखील भावना व्यक्त केली. शास्त्रीय नृत्याच्या सरावासाठी एखादे नृत्य संकुल उभारण्याची नृत्य संवर्धन संस्थेच्या सर्व सदस्यांची इच्छा असल्याची भावना असून, त्यासाठी राजाश्रय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून, नृत्य महोत्सवाच्या माध्यमातून अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आले.

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर पडसाद नागपूर दंगलीच्या रुपाने समाेर आलेत. साेशल मिडियावर औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर देखील पाेलिसांची नजर असून याबाबत कठाेर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पुण्यात देखील इन्स्टाग्राम स्टेटसला औरंगजेबचा फाेटाे ठेवत वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकरणी दाेन तक्रारी पाेलिसांकडे आल्या. त्यानुसार दाेन जणांवर पाेलिसांनी समर्थ आणि विश्रांतवाडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विश्रांतवाडी पाेलिस ठाण्यात याबाबत विष्णू मनाेज साळुंके (वय- २४,रा. येरवडा,पुणे) यांनी इन्स्टाग्राम आयडी नंबर लाला २७१० वापरकर्ते विराेधात पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित इन्स्टाग्राम आयडीधारकाने त्याचे इन्स्टाग्राम स्टेटसला औरंगजेबची कबर व त्याखाली ‘ऊस बादशाह की क्या शान रही हाेगी जिसका नाम लेके आजतक लाेग सियासत करते है’ असा स्टेटस ठेवला. यामुळे संबंध हिंदु समाजाच्या भावना दुखावून हिंदु मुस्लिम समाजात तेढ निर्माण हाेऊन सार्वजनिक शांतता बिघडविण्याचे हेतूने पाेस्ट प्रसारित करण्यात आली आहे. याबाबत घटनेची माहिती मिळाल्यावर, खडकर विभागाचे सहाय्यक पाेलीस आयुक्त विठ्ठल दबडे, विश्रांतवाडी पाेलिस ठाण्याच्या वरिष्ठ पाेलिस निरीक्षक कांचन जाधव, पाेउपनि नितीन राठाेड यांनी तक्रारदार यांचेसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक शब्बीर शेख करत आहे.

दुसऱ्या घटनेत समर्थ पाेलिस ठाण्यात हेमंत दत्ता गायकवाड (वय- २५,रा.मंगळवार पेठ,पुणे) यांनी पाेलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आराेपी सईद अमजद पठाण (रा.राजेवाडी,पुणे) याचे विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आराेपी याने हिंदु समाजाच्या भावना दुखावुन, हिंदु व मुस्लिम या समाजात तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्था धाेक्यात येईल अशाप्रकारे वाद निर्माण हाेण्याचे उद्देशाने त्याचे इन्स्टाग्रामवर औंरंगजेबचे स्टेटस ठेवले हाेते. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक सुहास पाटील करत आहे.

अव्यक्त, अविनाशी, निराकार ज्ञानदेव उलगडले ‌‘नमो ज्ञानेश्वरा‌’तूनडॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठानची प्रस्तुती

पुणे : महाराष्ट्राला संतांची महान परंपरा लाभली आहे. संतांनी जनमानसास विवेकाचा मार्ग दाखविला, यात ज्ञान, भक्ती, शांती, प्रिती आणि क्रांती यांच्या समन्वयातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी समतेची पताका हाती घेत भागवत धर्माचा पाया रचला. अशा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा प्रासादिक सांगीतिक जीवनपट ‌‘नमो ज्ञानेश्वरा‌’ या अनोख्या कार्यक्रमातून आज उलगडला.
कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर (750) सुवर्णमहोत्सवी जन्मवर्षानिमित्त डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठानतर्फे आज (दि. 21) भरत नाट्य मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‌‘पुंडलिकवरदा हरि विठ्ठल‌’ या विठ्ठलनामाच्या गजराने कार्यक्रमास सुरुवात झाली तेव्हाच उपस्थितांनी नामघोषात तल्लीन होत एकरूपता साधली. ज्ञानेश्वर महाराज यांनी संपूर्ण विश्वाचे माऊलीपद स्वीकारून समाजातील प्रत्येक व्यक्तीला समतेच्या माध्यमातून विवेकाचा मार्ग कसा दाखविला, त्याची महती काय, समकालीन आणि इतर संतांनी ज्ञानेश्वर माऊलींचे केलेले वर्णन यांचा गोफ विणत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी संतवचने, भगवत्‌‍गीतेतील लोक, ज्ञानेश्वरीतील दाखले, संस्कृत सुभाषिते, काव्य यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींचे श्रेष्ठत्व निरूपणाच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडले.
संत वचनांचे अनुकरण करणाऱ्या आणि त्याचा द्वेष करणाऱ्या दोघांनाही संत-माऊली मायाच देतात, प्रत्येकाच्या मनात भक्तीचा मळा फुलविण्याचा प्रयत्न करतात, जो पर्यंत भक्त आपले सर्वस्व भगवंताला अर्पण करत नाही तो पर्यंत त्याची ओढ लागत नाही, अशा अनेक शिकवणुकीदेखील डॉ. भावार्थ यांनी समर्थपणे मांडल्या.
उपस्थितांमधील प्रत्येकाच्या मनात भावनांचा कल्लोळ उठवत डॉ. पूजा देखणे यांनी ज्ञानेश्वर माऊलींचा समग्र जीवनपट अतिशय ताकदीने-तयारीने सादर केला. माऊली व इतर भावंडांच्या जन्माच्या पूर्वपिठीकेपासून ते माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यापर्यंत केलेले वर्णन ऐकताना सगुण-निर्गुण भक्तीच्या पलिकडेही आत्म्याचा आत्म्याशी संवाद होऊ शकतो अशी अनुभूती प्रत्येकास आली.
अवधूत गांधी यांनी निरूपण व कथानकाच्या अंगाने स्पर्श करीत अनेक अभंगांचे, संत रचनांचे अतिशय समधुर आवाजात सादरीकरण करताना ‌‘ओम नमो ज्ञानेश्वरा‌’, ‌‘अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर‌’, ‌‘पूर्वजन्मी सुकृते‌’, ‌‘अजी सोनियाचा दिनु‌’, ‌‘गुरू हा संतकुळीचा राजा‌’, ‌‘ऐसा योगिराज‌’, ‌‘ओम नमो जी आद्या‌’ अशा ज्ञानेश्वर माऊलींच्या रचना ऐकविल्या. ‌‘परिमळाची धाव भ्रमर वोढी‌’, ‌‘नवल देखिले‌’ यांसह काही रचना प्रियांका ढेरंगे-चौधरी यांनी सादर केल्या.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेल्या ज्ञानेश्वरीतून श्रोतृसंवाद घडतो, अमृतानुभवाच्या माध्यमातून आत्मसंवाद घडतो, हरिपाठाच्या माध्यमातून लोकसंवाद घडतो तर चांगेदव पासष्टीच्या माध्यमातून शिष्यसंवाद घडतो आणि त्यातूनच जनमानस ब्रह्मसाक्षर होतो याची भावानुभूती ‌‘नमो ज्ञानेश्वरा‌’ या प्रासादिक कार्यक्रमात आज उपस्थितांना आली.
कार्यक्रमाचे संहिता लेखन डॉ. पूजा देखणे यांचे होते. केदार दिवेकर यांचे पार्श्वसंगीत होते तर अभय नलगे, राजेंद्र बघे, चैतन्य पवार, प्रसाद भांडवलकर यांनी समर्पक साथसंगत केली. संगीत संयोजन गौरव धावडे तर प्रकाश योजना ओंकार दसनाम यांची होती.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त निरंजन नाथ, संत तुकाराम महाराज संस्थानचे नितीन महाराज मोरे, भगवान महाराज साळुंखे, डॉ. माधवी वैद्य, विठ्ठल-रुख्मिणी मंदिर पंढरपूरच्या विश्वस्त माधवी निगडे, विश्राम कुलकर्णी, दिग्‌‍पाल लांजेकर, डॉ. मिलिंद भोई, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संगीता बर्वे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

‘महिला कलाविष्कार‌’बहारदार गायन-वादनाच्या मैफलीस रसिकांची मनमुराद दाद

पुणे : प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन आयोजित महिला कलाविष्कार मैफलीत रसिकांना शास्त्रीय, उपशास्त्रीय, भक्तीगीत, नाट्यगीत आणि तबला वादनाचा स्वराविष्कार अनुभवायला मिळाला.
महिला दिनानिमित्त प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनच्या संचालिका विदुषी सानिया पाटणकर यांनी या कार्यक्रमाचे एस. एम. जोशी सभागृहात आयोजन केले होते. उद्योजक चंद्रशेखर शेठ आणि विवेक सुरा यांची विशेष उपस्थिती होती.
मैफलीची सुरुवात आश्वासक युवा गायिका शाश्वती चव्हाण-झुरंगे यांनी राग मधुवंतीतील ‌‘मै आऊ तोरे मंदरवा‌’ या छोटा ख्यालने केली. यानंतर ‌‘रूप पाहता लोचनी‌’ हा अभंग सुरेलपणे सादर केला. त्यांना माधव लिमये (संवादिनी), ऋषिकेश जगताप (तबला), दीपक दसवडकर (पखवाज), श्रावणी गुरव (सहगायन) यांनी साथसंगत केली.
बनारस घराण्याच्या सुप्रसिद्ध तबलावादक हेतल मेहता (अहमदाबाद) यांची एकल तबलावादन मैफल रसिकांना विशेष भावली. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात मध्यलय तीन तालातील विलंबित धमार सादर करून केली. त्यानंतर बनारास घराण्याचे वैशिष्ट्य असणाऱ्या चलनचारीची झलक दाखविली. बनारस घराण्यातीलच वैशिष्ट्य असणारे बाँठ, सवाई, अडकारी, झुला, अनागत तिहाई, दोहोरे बोलोंकी गत, ‌‘धा‌’चे वैविध्य दाखविणारा तुकडा, कथक नृत्य शैलीत वाजविला जाणारा तुकडा तयारीने सादर केला. विद्वान पंडित मदनमोहन (आझमगड) यांची उपज, पंडित किशनमहाराज यांचा फर्माइशी चक्रदार तसेच पंडित पूरणमहाराज रचित सवाई लय तबल्यावर ऐकवून मेहता यांनी रसिकांना आनंदित केले. मेहता यांना यशवंत थिट्टे यांनी लहेरासाथ केली.
मैफलीच्या अखेरच्या सत्रात ज्ञानेश्वरी घाडगे हिचे बहारदार गायन झाले. तिने ‌‘पद्मनाभा नारायणा‌’ या रचनेने सादरीकरणाची सुरुवात केली. सुरांवरील पकड, आवाजातील फिरत, दमदार ताना ऐकवून रसिकांना संमोहित केले. ‌‘केतकी गुलाब जुही चंपक‌’ ही रचना सादर केल्यानंतर ज्ञानेश्वरी हिने जग्‌‍तगुरू संत तुकाराम महाराज यांनी रचलेला आणि पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांनी आपल्या आवाजाने अजरामर केलेला ‌‘बोलावा विठ्ठल‌’ हा अभंग तसेच संत नामदेव महाराज रचित आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायनातून सर्वोच्चपदी नेऊन ठेवलेला ‌‘तीर्थ विठ्ठल‌’ हा अभंग एकत्रितपणे सादर करून गायनातील तयाराची झलक दर्शविली. ज्ञानेश्वरी हिच्या समर्पित गायनास रसिकांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत सुरात सूर मिसळून टाळ्यांच्या गजरात साथ केली. ‌‘अलबेला सजन आयो रे‌’, ‌‘जयशंकरा करुणाकरा‌’, ‌‘कुहु कुहु बोले कोयलिया‌’ या रचना ऐकविल्यानंतर कार्यक्रमाची सांगता ‌‘सुरत पिया की छिन‌’ या नाट्यगीताने केली. तिला कार्तिकी घाडगे (संवादिनी), ऋषिकेश जगताप (तबला), दीपक दसवडकर (पखवाज), महेंद्र शेडगे (तालवाद्य) यांनी समर्पक साथ केली.
कलाकारांचा सत्कार विदुषी सानिया पाटणकर, उद्योजक चंद्रशेखर शेठ आणि विवेक सुरा यांनी केला. प्रास्ताविकात संस्थेचे विश्वस्त नितीन महाबळेश्वरकर यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राने दिलेलं योगदान लागू करण्यात येणाऱ्या सीबीएसई अभ्यासक्रमाद्वारे देशभरात कळले पाहिजे – दीपक मानकर

पुणे-राज्यातील शाळांमध्ये यंदाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. ह्या सीबीएसई अभ्यासक्रमातील इतिहास विषयात महाराष्ट्राचा इतिहास समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिले आहे .
दीपक मानकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि , “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाची वाटचाल करीत असताना महायुती सरकारने परिपूर्ण समाज घडविण्यासाठी राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करण्याचा व इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणेही बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व समस्त पुणेकरांकडून आपले मनपूर्वक आभार मानण्यात येत आहे.मंगल देशा,पवित्र देशा,महाराष्ट्र देशा असा आपला महाराष्ट्र ज्याने जगाच्या पाठीवर अनेक इतिहास रचले आहेत. ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमातून आपल्या महाराष्ट्राची यशोगाथा ही संपूर्ण देशासह जगात पसरली पाहिजे. राज्यातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे राज्यातील शाळांमध्ये ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करणे. राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना ‘सीबीएसई’अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असून राज्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर राज्य सरकारने भर दिला आहे. ही कौतुकास्पद बाब आहे.
या ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमातील इतिहास विषयात महाराष्ट्राचा इतिहास शिकविला जाणे अत्यंत गरजेचे आहे. इतिहासात मराठा साम्राज्याबद्दल वाचले तर जर कोणाचे नाव प्रथम येते तर ते माँसाहेब जिजाई, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराजाचे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथे सुरु केली. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे, स्वा. विनायक दामोदर सावरकर यांसारख्या अनेक थोर पुरुषांचे कार्य तसेच ज्या क्रांतिकारकांच्या अथक प्रयत्नांतून व आत्मबलिदानातुन स्वातंत्र्याचा सुखकर दिवस भारतीयांच्या जीवनात उजाडला होता त्या क्रांतिकारकांचे कार्य हे ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमात शिकवले जाणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्र हे निसर्गसंपन्न राज्य असून त्यामध्ये असलेली ऐतिहासिक स्थळे, शिवकालीन मंदिरे, पर्यटनस्थळे यांची माहिती अभ्यासक्रमात घेण्यात यावी.
नुकत्याच नागपूर येथे झालेल्या आंदोलनात आपल्या हिंदू धर्माबाबत अनर्थ गोष्टी घडल्या. आपला इतिहास हा पुसून टाकण्याचा कोणाचा प्रयत्न असेल तर त्याला त्याची जागा दाखवून देणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या अभ्यासक्रमातच आपल्या महाराष्ट्रातील थोरपुरुष, क्रांतिकारक यांचा इतिहास शिकवला गेला तर भविष्यात आपले अस्तित्व दाखवून देण्याची गरज भासणार नाही.