मुंबई-येथील उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कोनशिला समारंभात बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी वास्तूची भव्यता आणि लोकशाही मूल्यांच्या सुसंगततेवर भर दिला. सरन्यायाधीश म्हणाले, “मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की, न्यायाधीश आता सरंजामदार नाहीत. न्यायाधीश, मग ते ट्रायल कोर्टाचे असोत, उच्च न्यायालयाचे असोत की सर्वोच्च न्यायालयाचे असोत, ते सर्व किंबहुना आपल्या सर्व संस्था – न्यायपालिका, विधिमंडळ, कार्यपालिका या देशाच्या शेवटच्या नागरिकाची सेवा करण्यासाठी, समाजाला न्याय देण्यासाठी संविधानानुसार काम करतात. आणि म्हणूनच इमारतीची भव्यता आणि आयकॉनिक रचना टिकवून ठेवताना त्यात कोणताही अवास्तवपणा नाही याची खात्री केली पाहिजे. कारण ते अंतिमतः न्यायाचे मंदिर आहे, पंचतारांकित हॉटेल नाही. त्यांनी आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर आणि समितीला डिझाइनचे पुनरावलोकन करण्याची स्पष्ट विनंती केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेचा पुनरुच्चार करत गवई म्हणाले की, इमारतीने शाही संरचनेचे प्रतीक न बनता संविधानाने जपलेल्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत असावे. केवळ न्यायाधीशांच्या गरजांवर लक्ष केंद्रित न करता अलाहाबाद किंवा औरंगाबाद खंडपीठाप्रमाणे इमारतीचा मोठा भाग रिकामा राहू नये याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला जुने हायकोर्ट कसे बांधले गेले याची आठवण करून दिली. ते म्हणाले की, ती इमारत आवंटित केलेल्या खर्चापेक्षा कमी रकमेत बांधली गेली होती. त्याचप्रमाणे नवीन इमारतीचे कामही ठरलेल्या वेळेत आणि निश्चित केलेल्या बजेटमध्येच पूर्ण करावे, अशी सूचना त्यांनी केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या प्रकल्पासाठी पूर्वीच्या ३७५० कोटी रुपयांच्या तुलनेत ४१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबईच्या वैभवात भर घालणारी ही नवीन वास्तू ५० लाख स्क्वेअर फुटांची असेल. ही वास्तू अतिशय दर्जेदार असेल.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे पुष्परंगावलीतून सूर्यनमस्कारांचे रेखाटन पुणे : आकर्षक रंगातील पणत्यांसह हजारो दिव्यांची आरास, विविध रंगातील फुलांची सजावट आणि पुष्परंगावलीतून सूर्यनमस्कारांचे रेखाटन सारसबागेजवळील श्री महालक्ष्मी मंदिरात करण्यात आले. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात आयोजित दीपोत्सवात तब्बल ५१ हजार दीप प्रज्वलित करण्यात आले.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, डॉ.तृप्ती अग्रवाल यांसह विश्वस्त, पदाधिकारी व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. विश्वकर्मा विद्यालय व विश्वकर्मा युनिर्व्हसिटी यांचे शिक्षक व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी संयोजनात सहभाग घेतला.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, सूर्यनमस्कार हा सर्वांगिण व्यायाम आहे. सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो. त्यामुळे यंदा सूर्यनमस्कार हे पुष्परंगावलीतून साकारण्यात आले. तसेच विविधरंगी दीप प्रज्वलित करुन संपूर्ण मंदिराप्रमाणे समाजातील अज्ञानरुपी आणि विकाररुपी अंध:कार दूर व्हावा, अशी प्रार्थना देखील मातेचरणी करण्यात आली.
शिवतांडव नृत्य, रथयात्रा आणि आतषबाजीने ओंकारेश्वर मंदिर परिसर दुमदुमला
पुणे: त्रिपुरासुराच्या तीन पुत्रांच्या पुतळ्याचा शंकराने एकाच बाणाने केलेला संहार… त्यानंतर झालेली आकर्षक आतषबाजी त्यासोबत सुंदर शिव तांडव नृत्य यांच्या एकत्रित सादरीकरणातून पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पाठीमागील योग हॉल परिसरात त्रिपुरासुराच्या तीन पुत्रांचे पुतळे उभारण्यात आले होते. नटरंग अकादमीच्या कलाकारांनी शंकराचे तांडव नृत्य सादर केले. त्यानंतर सजवलेल्या रथातून भगवान शंकराची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीने त्या पुतळ्यांसमोर पोहोचताच शंकराने एकाच बाणाने त्रिपुरासुराचा संहार केला आणि त्यानंतर आकर्षक आतषबाजीने आकाश उजळून निघाले.
कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिर परिसर, मुठा नदीकाठ व मेट्रो पुलावरून गर्दी केली होती. देवस्थानच्या सूचनेनुसार भाविकांनी शिस्त राखत वाहतुकीला अडथळा न होता कार्यक्रमाचा आनंद घेतला.
मंदिराचे कार्यकारी विश्वस्त धनोत्तम लोणकर म्हणाले, दिल्लीतील रावण वध कार्यक्रमाप्रमाणे पुण्यातही धार्मिक सादरीकरण व्हावे, या उद्देशाने देवस्थानचे तत्कालीन अध्यक्ष स्व. गिरीश बापट यांनी हा उपक्रम सुरू केला होता. गेली १२ वर्षे हा उत्सव सातत्याने साजरा होत असून, तो आबालवृद्धांचा आवडता सोहळा बनला आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिर परिसर सायंकाळी भक्ति आणि उत्साहाने उजळून निघाला. भगवान शंकराच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या त्रिपुरासुर वधाच्या देखाव्याने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
पुणे : भारतीय जनता पक्षाने आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवडणूक प्रभारी (जिल्हा प्रमुख) म्हणून तर माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांच्यावर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
मोहोळ यांनी पूर्वी स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून कार्यभार सांभाळला आहे तर बीडकर यांनी यापूर्वी नगरसेवक, गटनेता, स्थायी समिती अध्यक्ष तसेच सभागृह नेते म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली. त्यानुसार जिल्हा निवडणूक प्रभारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात बीडकर यांच्याकडे पुणे शहराच्या निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
‘केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. विकासाभिमुख धोरणांची आखणी आणि त्याची वेगवान अंमलबजावणी हे केंद्र आणि राज्य सरकारचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार नक्कीच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर विश्वास दाखवतील. पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप, महायुतीच सत्तेवर येईल,असे मोहोळ म्हणाले. पक्षनेतृत्वाने ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असेही मोहोळ यांनी नमूद केले.
‘ राज्यात भाजप व महायुतीला अनुकूल वातावरण आहे. पुणे महापालिकेत २०१७-२२ या काळात भारतीय जनता पक्षाचीच सत्ता होती. या पाच वर्षात पुणे शहराच्या भाजपने मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. यंदाही पुणेकर भाजप व महायुतीच्याच पाठीशी राहतील, याची मला खात्री आहे. शहर निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आभारी आहे. २०१७ च्या निवडणुकीतही निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी माझ्याकडे होती. त्या वेळेप्रमाणेच यंदाही भाजप, महायुती सत्तेवर येईल,’असा विश्वास बीडकर यांनी व्यक्त केला.
धन्यवाद, भारतीय जनता पार्टी ! 🪷🙏🏽पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिकांसाठी तर पुणे जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीचा निवडणूक प्रभारी म्हणून दायित्व दिल्याबद्दल मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे मनापासून धन्यवाद ! पक्ष क्षेष्ठींनी दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने आणि यशस्वीपणे पूर्ण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. विकासाभिमुख धोरणांची आखणी आणि त्याची वेगवान अंमलबजावणी हे केंद्र आणि राज्य सरकारचे वैशिष्ट्य आहे.पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरात सध्या जी विकासकामे सुरु आहेत, ती वेगाने पुढे नेण्यासाठी, नव्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी आणि भविष्यातील पुणे घडविण्यासाठी मतदार भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी ठामपणे उभे राहतील, हा विश्वास आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वात हा विकासाचा गाडा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून असाच पुढेही सुरु राहिल ! त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार नक्कीच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर विश्वास दाखवतील. पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप, महायुतीच सत्तेवर येईल ! मुरलीधर मोहोळ
डॉ. मदन कोठुळे यांच्यावतीने सुरु झाला न्यायालयीन लढा
पुणे (प्रतिनिधी): लोकमान्यनगर परिसरातील सावली सहकारी गृहनिर्माण सोसायटी आणि स्थानिक रहिवाशी डॉ. मदन मोहन कोठुळे यांनी त्यांच्या जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासावर लादण्यात आलेल्या स्थगितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ४० वर्षांहून अधिक जुनी आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी शासन आणि म्हाडा प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप केले आहेत.
या पार्श्वभूमीवर सावली सोसायटीने डॉ. कोठुळे यांच्या माध्यमातून वकिलांमार्फत (अॅड. रणजित गवारे आणि अॅड. भाग्यश्री बेलकर) मुख्यमंत्री, पुणे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ आणि पुणे महानगरपालिका यांना कायदेशीर नोटीस दिली आहे. या नोटिसीत म्हटले आहे की, “इमारती अत्यंत जीर्णावस्थेत असून रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरीदेखील लोकमान्यनगर परिसरात क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखाली सर्व पुनर्विकास प्रकल्पांवर ब्लॅंकेट स्थगिती लावणे अन्यायकारक आहे.”
नोटिसीनुसार, सावली सोसायटीची इमारत ४० वर्षांहून अधिक जुनी आणि पुनर्विकासासाठी ठराव सभेत मंजूर करण्यात आला आहे. मात्र, स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून “सर्व इमारतींचा एकत्रित क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प राबवावा” अशी मागणी केली, ज्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर शासनाने सर्व पुनर्विकास प्रकल्पांवर स्थगिती लागू केली.
डॉ कोठुळे यांच्या मते, “संपूर्ण लोकमान्यनगरमधील सर्व इमारती सारख्या स्थितीत नाहीत, काही इमारती पूर्णपणे जीर्ण, काहींचा पुनर्विकास सुरू आहे आणि काहींची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत कोणतीही वस्तुनिष्ठ स्थळ पाहणी न करता ब्लॅंकेट लावणे म्हणजे नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ आहे.”
सोसायटीने महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याच्या कलम ३६५अ चा दाखला देत म्हटले आहे की, ३० वर्षांहून अधिक जुन्या इमारतींची स्थिरता तपासणे कायदेशीर बंधनकारक आहे आणि अशा इमारतींचे पुनर्विकास टाळणे योग्य नाही. सोसायटीचे वकील अॅड. गवारे म्हणाले, “सरकारने लोकमान्यनगरमधील पुनर्विकासावरील स्थगिती तातडीने पुनर्विचारात घ्यावी; अन्यथा आम्हाला न्यायालयीन मार्ग पत्करावा लागेल.”
दरम्यान, लोकमान्यनगरचे रहिवासी डॉ. मदन कोठुळे यांनी दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) कडे लेखी पत्र पाठवून विचारणा केली की, मुख्यमंत्री यांच्या ११ मार्च २०२५ रोजीच्या आदेशानुसार लोकमान्यनगरच्या एकात्मिक विकासाबाबत तयार करायचा वस्तुनिष्ठ अहवाल नेमका कुठे आहे?
यावर म्हाडाने दिनांक २९ मार्च २०२५ रोजी प्रत्युत्तर देताना मान्य केले की, “अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली २७ मार्च २०२५ रोजी बैठक बोलावली होती, परंतु ती बैठक झालेली नाही. त्यामुळे शासनाला कोणताही वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्यात आलेला नाही.”
या पत्रामुळे पुनर्विकासाच्या स्थगितीमागील संपूर्ण प्रक्रियेत शासन आणि म्हाडा प्रशासनातील निष्क्रियतेचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. डॉ. कोठुळे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही म्हाडा आजपर्यंत अहवाल सादर करत नाही, ही बाब रहिवाशांच्या दृष्टीने गंभीर आणि अन्यायकारक आहे. सहा महिने उलटूनही पुनर्विकासाबाबत कोणतीही गती नाही. त्यामुळे आम्ही संबंधित खात्याला कायदेशीर नोटीस पाठवली असून, न्यायालयीन लढा सुरू केला आहे.”
रहिवाशांचा संताप वाढला; बिल्डरहिताचा आरोप
लोकमान्यनगरमधील अनेक सोसायट्यांनी स्वतंत्रपणे म्हाडाच्या नियमांनुसार पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू केली होती. काही सोसायट्यांना म्हाडाची मान्यताही मिळाली होती. मात्र, आमदार रासने यांच्या पत्रानंतर शासनाने एकत्रित प्रकल्पाचा प्रस्ताव पुढे सरकवला. रहिवाशांच्या मते, “हा निर्णय लोकहिताचा नसून, राजकीय आणि बिल्डरहिताचा आहे.”
काही रहिवाशांनी म्हाडा अधिकाऱ्यांवर बिल्डरपक्षीय भूमिकेचा आरोप केला असून, “लोकमान्यनगरचा भूखंड एकत्रित प्रकल्पाच्या नावाखाली काही बिल्डर गटांना देण्यासाठी राजकीय हस्तक्षेप केला जात आहे,” असे आरोप त्यांनी केले आहेत.
स्थानिक रहिवाशांनी याबाबत सार्वजनिकरीत्या आवाज उठवला असून, सावली सोसायटीच्या नोटिसीनंतर आणि डॉ. कोठुळे यांच्या न्यायालयीन पावलांमुळे या प्रकरणाला कायदेशीर आणि प्रशासकीय स्तरावर नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आदित्य ठाकरे अन् रोहित पवारांची सरकार, EC वर आगपाखड
मुंबई- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत ब्राझीलच्या एका मॉडेलने एक-दोनदा नव्हे तर तब्बल 22 वेळा मतदान केल्याचे सप्रमाण सिद्ध केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी सरकार व निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवत देशात आता निवडणुका स्वतंत्र व निष्पक्ष राहिल्या नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे आज एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी पुन्हा एकदा मत चोरीचा मुद्दा उपस्थित केला. हरियाणात एग्झिट पोल व पोस्टल बॅलेट काँग्रेसच्या बाजूने होते, पण प्रत्यक्ष निकालात आमचा पराभव झाला. हा पराभव का झाला? याचे पुरावे आमच्याकडे आहेत. हरियाणात 5 श्रेणींमध्ये एकूण 25 लाख बनावट मते पडली. म्हणजेच दर 8 पैकी 1 मतदार खोटा होता. निवडणुकीत 5,21,000 पेक्षा जास्त बोगस मतदार आढळले. या माध्यमातून राज्यात 25 लाख मतांची चोरी झाली, असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित पवार यांनी सरकार व निवडणूक आयोगावर निशाणा साधला. बनावट आधार कार्ड कसे बनवले जातात याचा डेमो देताना डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड बनवून दाखवले म्हणून माझ्यावर भाजपने गुन्हा दाखल केला होता. आज राहुल गांधीनी ब्राझिलियन मॉडेल Matheus Ferrero च्या नावाने दहा वेगवेगळ्या बुथवर 22 वेळेस हरियाणामध्ये मतदार नोंदणी झाल्याचे पुराव्यासकट सिद्ध केले. राहुल गांधींचा डेमो बघून माझ्यावर बनावट गुन्हा दाखल करणाऱ्या भाजपचे डोळे उघडतील, ही अपेक्षा, असे ते म्हणाले.
आमदार आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणी सरकार व निवडणूक आयोगावर तोंडसूख घेतले. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी भाजपला मतचोरीच्या माध्यमातून विविध राज्य ताब्यात घेण्यास मदत करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या हेराफेरीचा पर्दाफाश केला आहे. आज संपूर्ण जग भारताची निवडणूक स्वतंत्र व निष्पक्ष राहिली नसल्याचे पुराव्यांसकट पाहत आहे. कुणी राहुल गांधी किंवा इंडिया आघाडीशी सहमत किंवा असहमत असू शकेल, पण ही गोष्ट राजकारण व विचारधारेशी संबंधित नाही. मत चोरीवरील सादरीकरण प्रत्येक भारतीयाने, मग ती कोणत्याही राजकीय विचारसरणीची असो, अवश्य पाहावे असे आहे.
हे सादरीकरण तुमच्या मतांच्या मूल्याविषयी आहे. जे मूल्य आता शून्य झाले आहे. कारण, निवडणूक आयोग एका विशिष्ट राजकीय पक्षाला मतदार यादीत बोगस व बनावट मतदार समाविष्ट करण्याची परवानगी देत आहे. गत काही वर्षांत भारतीय निवडणूक आयोगाने जगातील सर्वात मोठ्या भारतातील जीवंत लोकशाहीला एका ढोंगात रुपांतरित केले आहे. निडवणूक कुणीही जिंको किंवा हारो, पण प्रत्येक भारतीयाला त्याच्या मताचे एकसमान मूल्य मिळण्याचा अधिकार आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, काही दिवसांपूर्वीच आम्ही वरळी व महाराष्ट्रातील इतर मतदार संघातील मतदारांच्या हेराफेरीचा पर्दाफाश केला. आम्ही त्याविरोधात एक मोठे आंदोलनही केले. पण निवडणूक आयोग त्यावर कोणतीही कारवाई करण्यास नकार देत आहे. राहुल गांधी यांनी हरियाणा निवडणुकीत फसवणूक, बोगस मतदार जोडून व खऱ्या मतदारांना मतदानाची संधी नाकारून हेराफेरी करण्यात आली हे स्पष्टपणे सिद्ध केले आहे. ही लढाई भारत व संपूर्ण भारतातील स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुकांसाठी आहे. ही लढाई लोकशाही व आपल्या संविधानासाठी आहे. व्होट चोर, गद्दी छोड, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
232 आमदार जनादेशातून नव्हे मतचोरीतून आले हे स्पष्ट – काँग्रेस
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचा दाखला देत महाराष्ट्रात महायुतीचे 232 आमदार जनादेशातून नव्हे तर मतचोरीतून आल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा केला आहे. आज या देशातील मोदींच्या टोळीने लोकशाहीवर केलेले आक्रमण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी जनतेसमोर आणले आहेत. भाजपा सरकार आणि जनादेश दोन्हींवर कसा दरोडा टाकते हे स्पष्ट झाले. हरयाणा बरोबर महाराष्ट्रातही व्होट चोरी झाली आहे. महाराष्ट्रातही आता 232 आमदार जनादेशातून नव्हे तर चोरीने निवडून आले आहेत हे स्पष्ट आहे. जनतेने या व्होट चोरांना धडा शिकवला पाहिजे, असे ते म्हणाले.
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते…; राहुल गांधींच्या ‘हायड्रोजन बॉम्ब’नं निवडणूक आयोगाची उडाली झोप दिल्ली – लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. एकच फोटो वापरून १०० विविध नावांनी मतदार नोंदवले जातात. एकाच मतदारसंघात असे हजारो लोक आहेत.जे उत्तर प्रदेशातही मतदान करतात, तेच हरियाणातही मतदान करतात असं सांगत राहुल गांधी यांनी प्रत्येक गोष्टीचे पुरावे मांडले. हरियाणात जवळपास २५ लाख मतांची चोरी केली गेली असा आरोप काँग्रेसने केला.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मतचोरीबाबत प्रेंझेटेशन केले. त्यात एका घरात ५०० मतदारांची नोंदणी केली जाते. १० पेक्षा जास्त मतदार एकाच घरात असतील तर नियमानुसार तिथे निवडणूक आयोगाचे कर्मचारी जाऊन तपास करतात. परंतु जाणुनबुजून निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करते. एका एका घरात ५०, १०० मतदार आढळतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मतदान केले होते, मात्र काही मतदारांची नावे विधानसभेत वगळण्यात आली. ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरून मतदान केले जाते. ब्लर फोटो वापरले जातात. भाजपाच्या यूपीतील सरपंचाकडून हरियाणातही मतदान केले जाते. हरियाणात काँग्रेसचा विजय पराभवात बदलण्यात आला असा आरोप त्यांनी केला.
तसेच निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपा मतांची चोरी करत आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि निवडणूक आयोगातील लोकांनी मिळून देशातील लोकशाही संपवण्याचा घाट घातला आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीतही हीच सिस्टम लागू करण्यात आली आहे. आम्ही देशातील युवकांना पुराव्यासह दाखवू शकतो, निवडणूक आयोगाने काढलेली यादी आहे. त्यात दुबार, बोगस मतदार आहेत. आमच्याकडे व्यवस्था नाही, कारण यंत्रणा त्यांच्या हातात आहे. देशाची लोकशाही उद्ध्वस्त केली आहे. आम्ही आतापर्यंत विविध पुरावे मांडले. ही लोकशाही देशातील जनतेची आहे. त्याचे रक्षण करणे तुमची आणि आपली जबाबदारी आहे असं आवाहन राहुल गांधी यांनी Gen Z युवकांसह देशातील जनतेला केले. दरम्यान, मतदार यादी भ्रष्ट असेल आणि आम्हाला शेवटच्या क्षणी मतदार यादी दिली जात असेल तर फायदा नाही. मतदार यादी हा लोकशाहीचा पाया आहे. आम्ही लोकांना जागरूक करू शकतो, परंतु कायदेशीरपणे ५-५ वेळा नावे यादीत येत असतील. निवडणुकीसाठी मतदार यादीचा वापर होत असेल आणि भ्रष्ट यादीच पुढे येत असेल तर आम्ही काय करू शकत नाही. कुठलाही राजकीय पक्ष काहीच करू शकत नाही. हा सगळा मतदार यादीचा डेटा निवडणूक आयोगाचा आहे. हा आमचा डेटा नाही. आम्ही दाखवलेले प्रेझेंटेशन सुप्रीम कोर्टही पाहतोय. त्यामुळे आम्ही कुणापासून लपून काही करत नाही. हे सगळे देशाच्या जनतेसमोर मांडले जात आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन : वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आधुनिक उपचार पद्धतींवर चर्चासत्रे
पुणे : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे यांच्या वतीने ३५वे वार्षिक मेगा जीपीकॉन २०२५ हे वैद्यकीय अधिवेशन होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिक अनुभव यांची देवाणघेवाण साधण्यासाठी दोन दिवसीय वैद्यकीय परिषद पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ५ यावेळेत आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत देशातील आणि राज्यातील नामवंत डॉक्टर विविध विषयांवर आपले सखोल विचार मांडणार आहेत, अशी माहिती आयोजनाध्यक्ष डॉ. सुनील भुजबळ आणि सचिव म्हणून डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आयोजन सचिव डॉ. राजेश दोशी, आयोजन सह-अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब काकडे उपस्थित होते.
वैद्यकीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिनांक ८ नोव्हेंबर रोजी डॉ. उर्मी सेठ (रुबी हॉस्पिटल) ‘हिमॅटोलॉजी’ या विषयावर उद्घाटनपर व्याख्यान देतील. यानंतर डॉ. नीरज अडकर ‘जटिल हिप फ्रॅक्चरमध्ये कॉक्सो-फेमोरल बायपास’, डॉ. यशवंत माने ‘आयव्हीएफ – मानवजातीसाठी वरदान’, आणि डॉ. रितेश भल्ला ‘मेंदूतील ट्यूमरचे पॅथोफिजिऑलॉजी” या विषयांवर मार्गदर्शन करतील. उत्कृष्ट शैक्षणिक सत्रे, फार्मा स्टॉल प्रदर्शन, पेपर आणि पोस्टर सादरीकरण, निबंध व वादविवाद स्पर्धा, तसेच सर्वोत्कृष्ट क्लिनिक स्पर्धा ही या अधिवेशनाची मुख्य आकर्षणे असतील.
त्यानंतर डॉ. मनोज श्रीवास्तव ‘आजच्या युगातील लिव्हर ट्रान्सप्लांट’, डॉ. सुनील जावळे ‘डायबेटिक किडनी’, तसेच डॉ. रुशिकेश बडवे ‘दैनंदिन जीवनातील सांधेदुखी’, डॉ. सुनील आंभोरे ‘गुदाशय विकार’, डॉ. निखिल ऋषिकेशी ‘सामान्य डोळ्यांचे आजार’ आणि डॉ. विशाल सेठ ‘स्टिएटोरिक लिव्हर डिसीजचे मेटाबॉलिक विकार’ या विषयांवर बोलणार आहेत. दिवसाच्या अखेरीस प्रश्नोत्तर आणि पॅनेल चर्चा होणार आहे.
दुसऱ्या दिवशी, म्हणजे ९ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता वक्ते अनिकेत शिंदे यांचे मार्गदर्शन होणार आहे. यानंतर डॉ. नस्ली इचापोरिया ‘स्ट्रोकची प्रारंभिक चेतावणी चिन्हे’, डॉ. समीर सोनार ‘न्यूक्लियर मेडिसिन उपचार – भविष्य इथेच आहे’, डॉ. पियुष लोढा आणि डॉ. सायमन ग्रँट ‘रेडिओलॉजीतील नवे प्रगत तंत्रज्ञान’ या विषयांवर सादरीकरण करणार आहेत. सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ होणार आहे. या वेळी मुख्य अतिथी म्हणून लेफ्टनंट जनरल माजी महासंचालक, वैद्यकीय सेवा (भारतीय सेना) (डॉ.) ए. के. दास उपस्थित राहणार आहेत. तसेच रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन व विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट हेही विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
दुपारच्या सत्रात डॉ. अनुज दरक ‘तापामध्ये पुनर्उर्जितीकरणाचे महत्त्व’, डॉ. हसमुख गुजर ‘ऑफिस प्रॅक्टिसमध्ये डिस्लिपिडिमियाचे व्यवस्थापन’, डॉ. हिमानी तापस्वी ‘शाळेतील सोयीपासून प्रवेश परीक्षेच्या प्रवासापर्यंत’, डॉ. सुष्रुत सेव्हे ‘बुरशीजन्य संसर्ग आणि त्यावरील उपचार’, तसेच डॉ. संजय राऊत ‘द सोलफुल सोल्यूशन – कार्डिओ-किडनी-मेटाबॉलिक आरोग्यात ओरल सेमाग्लुटाईडची प्रगती’ या विषयांवर बोलणार आहेत.
पुणे, ५ नोव्हेंबर ः उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई योगासन नॅशनल्स २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय यश मिळवून शाळेचे नाव उंचावले. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील आशा मॉडर्न स्कूलमध्ये झालेल्या या स्पर्धेत योगासनाच्या प्राचीन कलेतील त्यांचे कौशल्य, शिस्त आणि क्रीडा कौशल्य दाखवण्यात आले. आठवीच्या वर्गातील निरल वाडेकरने लयबद्ध एकल प्रकारात सुवर्णपदक आणि पारंपारिक वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकत एक स्टार कलाकार म्हणून उदयास आला. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या संचालिका अनिष्का मालपाणी, विश्वस्त यशवर्धन मालपाणी आणि प्राचार्य शारदा राव यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले. स्पर्धेत तरूण मुलांनी आणि मुलींनी मोठ्या उत्साहाने आणि शिस्तीने त्यांचे योग कौशल्य दाखवले. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या पारंपारिक गट संघात आद्या पांडे, निरल वाडेकर,आभा पांडे, इरा ठाकूर आणि रिद्धिया नायर यांचा समावेश होता. त्यांनी रौप्य पदक जिंकून शाळेला सन्मानित केले, जे त्यांच्या शक्तीचे, समन्वयाचे आणि सांघिक भावनेचे प्रतीक आहे. ही कामगिरी विद्यार्थ्यांच्या समर्पणाचे, शिस्तीचे आणि योगाबद्दलच्या आवडीचे प्रतिबिंब आहे. प्रशिक्षक स्वप्नील जाधव आणि श्रीमती किरण वाडेकर यांचे समर्पण आणि मार्गर्शन यांनी या पातळीच्या उत्कृष्टतेच्या यशात महत्वाची भूमिका बजावली आहे.
वैद्यकीय कौशल्य, प्रशिक्षण आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवेचा येथे संगम सुयोग्य प्रशिक्षण, उत्कृष्ट प्रकारची चिकित्सा आणि कर्करोगासारख्या गुंतागुंतीच्या आजारांच्या उपचारांवर विशेष लक्ष या वैशिष्ट्यांमुळे पुण्यातील रुग्णालयांत जटिल रोबोटिक शस्त्रक्रिया होतात मोठ्या संख्येने. रुग्णालयात राहण्याचा कालावधी आता होत आहे निम्मा; उच्च जोखमीच्या रुग्णांचा बरे होण्याचा वेग जास्त; त्यामुळे प्रगत शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी इतर शहरांतील अधिकाधिक रुग्ण करतात तुलनेने कमी खर्च येणाऱ्या पुण्याची निवड. पुणे, 05 नोव्हेंबर २०२५ : दरवर्षी हजारो रोबो-सहाय्यित शस्त्रक्रिया करणाऱ्या आणि गेल्या काही वर्षांत प्रगत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतलेल्या पन्नासहून अधिक शल्यविशारदांच्या माध्यमातून पुणे आता भारतातील रोबो-सहाय्यित शस्त्रक्रियेचे (आरएएस) अग्रगण्य केंद्र म्हणून झपाट्याने उदयास आले आहे. साधारणपणे दिल्ली आणि मुंबईसारखी महानगरे याबाबत चर्चेत असतात, मात्र आता युरोलॉजी, ऑन्कोलॉजी, स्त्रीरोगशास्त्र, पचनसंस्था आणि बालरोग अशा विविध शाखांमध्ये अत्यंत अचूक आणि अत्यल्प छेद घेतल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांद्वारे पुणे नवीन मापदंड निर्माण करत आहे. त्याचबरोबर, येथे दिली जाणारी प्रगत आरोग्यसेवा मोठ्या महानगरांच्या तुलनेत सुमारे वीस टक्के कमी खर्चात उपलब्ध असल्याने रूग्ण पुण्याकडे आकर्षित होऊ लागले आहेत. ‘दा विन्ची’सारखे अत्याधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञान पुण्यातील रुग्णालये मोठ्या प्रमाणात स्वीकारत आहेत. त्यामुळे प्रगत शस्त्रक्रिया अधिक प्रमाणात होत आहेत. या तंत्रज्ञानाने रुग्णांच्या प्रकृतीत गुंतागुंत कमी होऊन ते लवकर बरे होतात आणि उपचारांचे दीर्घकालीन परिणामही अधिक चांगले दिसून येतात. पुण्यात शल्यविशारदांचे कौशल्य, उत्कृष्ट प्रशिक्षण आणि रुग्णांना सहज उपलब्ध होणारी सेवा हे तिन्ही घटक एकत्र येऊन उत्कृष्ट आरोग्यसेवा मिळते. ही पुण्याची खासियत आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयसह (डीएमएच) पुण्यातील इतर अग्रगण्य रुग्णालयांनी उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेवर आणि शल्यविशारद मार्गदर्शनावर भर देणारे सक्षम रोबोटिक कार्यक्रम उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. “दीनानाथमध्ये आत्तापर्यंत २००पेक्षा अधिक रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. येथील डॉक्टर सध्या दरमहा १२ ते १५ जटिल शस्त्रक्रिया करतात. यामध्ये प्रोस्टेट, मूत्रपिंड आणि मूत्राशयातील कर्करोग यांवरील शस्त्रक्रिया, त्याचबरोबर आयव्हीसी थ्रॉम्बेक्टॉमी, पेनाइल कर्करोगासाठीचे ग्रॉइन नोड डिसेक्शन, वृषणाचा कर्करोग आणि रोबोटिक युरीनरी डायव्हर्शन यांसारख्या प्रगत युरोलॉजिकल शस्त्रक्रियांचा समावेश आहे. मूत्रपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे घेऊन येणारे तरुण रुग्ण सध्याच्या काळात अधिक प्रमाणात दिसत आहेत. या संदर्भातील किडनी-सेव्हिंग पार्टिअल नेफरेक्टॉमी शस्त्रक्रियांसाठी डीएमएच आज एक उत्कृष्ट रेफरल केंद्र म्हणून ओळखले जाते,” असे ‘डीएमएच’मधील युरॉलॉजिकल ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरीचे सल्लागार डॉ. अश्विन ताम्हणकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “आमचे उपचार संपूर्णपणे युरो-ऑन्कोलॉजी आणि कर्करोग उपचारांवर केंद्रित असतात. यातून पुण्यातील वैद्यकीय उपचारांतील तफावत भरून निघत असून आम्हाला सातत्यपूर्ण गुणवत्ता राखण्यास त्याची मदत होत आहे. आमचा केंद्रित आणि समर्पित दृष्टिकोन हा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या
एकत्रित प्रयत्नांवर आधारित आहे. युरो-ऑन्कोलॉजिस्ट, युरो-रेडिओलॉजिस्ट, युरो-पॅथॉलॉजिस्ट, युरो- फिजिओथेरपिस्ट आणि विशेष प्रशिक्षण घेतलेले युरो-ऑन्कोलॉजी शल्यविशारद अशी ही आमची टीम रुग्णांच्या जलद आणि सुरक्षित बरे होण्यावर लक्ष केंद्रित करते. आमच्या एन्हान्स्ड रिकव्हरी प्रोटोकॉल्समुळे रुग्णांचा आयसीयूतील मुक्काम खूपच कमी राहतो, रक्तस्राव कमी होऊन रुग्णालयात राहण्याचा कालावधीही घटतो. त्यामुळे अगदी उच्च जोखमीचे रुग्णही अनेकदा शस्त्रक्रियेनंतर थेट वॉर्डमध्ये हलवले जाऊ शकतात.” ‘डीएमएच’मध्ये आता संरचित प्रशिक्षण हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य बनले आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी मान्यताप्राप्त प्रॉक्टरिंग सेंटर म्हणून हे रुग्णालय देशभरातील शल्यविशारदांना त्यांच्या प्रारंभिक प्रशिक्षण काळात मार्गदर्शन आणि पाठबळ देते. त्यामुळे ते आत्मविश्वासाने रोबोटिक तंत्रज्ञान आत्मसात करू शकतात. “रोबो-सहाय्यित शस्त्रक्रियेचे भवितव्य हे तंत्रज्ञानातील नवकल्पनांइतकेच शल्यविशारदांच्या व्यापक प्रशिक्षणावरही अवलंबून आहे. त्या दृष्टीने आम्ही युरोलॉजिकल ऑन्कोलॉजी या विषयात एक विशेष फेलोशिप योजना विकसित करीत आहोत. त्यात प्रत्यक्ष चिकित्सीय अनुभव, प्रगत सिम्युलेशन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन असा एकत्रित कार्यक्रम असेल. शल्यविशारदांना या प्रणाली आत्मविश्वासाने आणि कौशल्याने वापरण्यास सक्षम करणे हीच खरी यशस्वीता ठरणार आहे. त्यायोगे देशभरात सुरक्षित, सातत्यपूर्ण आणि उच्च दर्जाची आरोग्यसेवा पुरवता येईल,” असे डॉ. ताम्हणकर यांनी सांगितले. वैद्यकीय कौशल्याबरोबरच, पुण्यात इतर महानगरांच्या तुलनेत तुलनेत कमी खर्च येतो. साहजिकच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचा पुण्याकडे अधिक ओढा असतो. उच्च दर्जाच्या उपचारांचे चांगले परिणाम अनुभवल्यामुळे आणि जागरुकता वाढल्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांतून आणि आणि अगदी मुंबईसारख्या महानगरातूनही पुण्याकडे येणाऱ्या रुग्णसंख्येत आणि रेफरल प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अवयव जपणाऱ्या उपचारपद्धती आणि शस्त्रक्रियेनंतरच्या जलद पुनर्प्राप्तीस प्राधान्य देणाऱ्या मिनिमली इनव्हेसिव्ह (अत्यल्प छेदाच्या) तंत्रांचा वापर यांमुळे पुण्याची आज देशात विशेष ओळख निर्माण झाली आहे. आरोग्यसेवेच्या अशा वातावरणात, जिथे नवीन, कल्पक उपचारांचा लाभ प्रामुख्याने मोठ्या महानगरांपुरताच मर्यादित असतो, तिथे पुणे दाखवून देत आहे की लक्षपूर्वक वैद्यकीय नेतृत्व, प्रशिक्षणासाठीची बांधिलकी आणि तंत्रज्ञानात केलेली गुंतवणूक यांच्यामुळे भारतात प्रगत शस्त्रक्रिया सेवांचा चेहरामोहरा बदलू शकतो
खासदार क्रीडा महोत्सवातील टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन पुणे, ता. ५ – स्पर्धा म्हटली की विजय-पराभव आलाच. मात्र, त्याचा विचार न करता सर्वोत्तम खेळावर भर द्या, असे प्रतिपादन केंद्रिय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधऱ मोहोळ यांनी केले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील ‘फिट इंडिया’ संकल्पनेअंतर्गत पुण्यात सुरू असलेल्या ‘सांसद खेल महोत्सव’ अर्थात खासदार क्रीडा महोत्सवातील टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन डेक्कन जिमखाना येथे झाले. या वेळी बोलताना मोहोळ म्हणाले, मीही एकेकाळी खेळाडू होतो. खेळाडूंना काय आवश्यक असते, याची मला पूर्ण जाण आहे. मात्र, खेळाडूंनी आपल्या सर्वोत्तम खेळाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. सर्वोत्तम खेळ केला, तर यश आपोआप मिळते. पराभवातून शिकून पुढे जायला हवे. आपले काय चुकले, त्याचा विचार करून पुढे ती चूक पुन्हा होणार नाही, यावर मेहनत घेतली पाहिजे. खेळ कुठलाही असो, मेहनतीशिवाय पर्याय नाही. या उद्घाटनप्रसंगी विविध वयोगटांतील युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग पाहून मोहोळ भारावले. त्यांनी खेळाडूंशी व्यक्तिगत संवाद साधून स्पर्धकांचे मनोबल वाढवले, तसेच अनेक खेळाडूंशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा, अडचणी आणि प्रशिक्षणाविषयीच्या गरजा जाणून घेतल्या. त्याचबरोबर अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान दिसत असलेली तरुणाईची ऊर्जा, शिस्त आणि स्पर्धात्मक भावना ही निश्चितच समाधानाची बाब असल्याचे मोहोळ म्हणाले.
या उद्घाटन प्रसंगी पुणे पोलीस उपायुक्त संदीपजी भाजीभाकरे साहेब, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुनील बाबरस, मॉर्डन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे, प्रकाश तुळपुळे, खासदार क्रीडा चषकाचे समन्वयक मनोज एरंडे, शैलेश टिळक, राजीव बोडस, प्रकाश तुळपुळे, श्रीराम कोणेकर, स्मिता बोडस, अजय शिंदे, मोहन उसगावकर, श्रीकांत अंतुरकर, राष्ट्रीय खेळाडू सन्मय परांजपे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते रोहित चौधरी, सुजाता बाबरस, अश्लेषा बोडस, सोनिया देशपांडे, रवींद्र साळेगावकर, सुनील पांडे, शैलेश बडदे, संयोजक किरण ओरसे, सौरभ कुंडलिक, सागर परदेशी, अर्चना सोनवणे, ईश्वर बनपट्टे, अपूर्व सोनटक्के, लताताई धायगुडे, अपर्णा कुऱ्हाडे, अजय दुधाने, हेमंत डाबी, सुजित गोटेकर, प्राजक्ता डांगे, प्रीती शहा, सचिन मानवतकर आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा १६ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. या महोत्सवात एकूण ३५ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. पुणेकरांना विविध खेळाचा थरार अनुभवण्याची संधी या महोत्सवानिमित्ताने मिळत आहे. विविध वयोगटात शालेय विद्यार्थी, महाविद्यालयातील तरुण, अनुभवी खेळाडू आणि प्रौढ खेळाडूही या स्पर्धांमध्ये आपले कौशल्य दाखवित आहेत.
पुणे-राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम मंगळवारी (दि. ४) जाहीर केला. त्यानुसार हरकत नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबर, तर हरकत असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.या स्थितीत उमेदवाराच्या हातात प्रचारासाठी केवळ चार दिवस उरतील, अशी स्थिती आहे. २ डिसेंबर रोजी नगरपरिषदांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरला प्रचार थंडावेल. ज्या ठिकाणी हरकती दाखल होतील तेथे उमेदवारी अर्ज माघारीची मुदत २५ नोव्हेंबर आहे. त्यानुसार २६ नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होऊन चिन्हवाटप होईल. नगरपरिषद निवडणुकीचा विचार करता मोठ्या संख्येने हरकती दाखल होत असतात. या स्थितीत उमेदवाराला प्रभागात प्रचार करण्यासाठी केवळ चार दिवसांचा अवधी हाती राहणार आहे.निवडणूक आयोगाने यंदा निवडणूक खर्चात वाढ केली आहे. ‘अ’ वर्ग नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला १५ लाख रुपये खर्च करता येईल. सदस्यांसाठी खर्चमर्यादा ९ लाख रुपये आहे. ‘ब’ वर्ग पालिकेत अध्यक्षपदासाठी ११ लाख २५ हजार, तर सदस्यांना साडेतीन लाख रुपये खर्च करता येईल. ‘क’ वर्गमध्ये अध्यक्षपदासाठी साडेसात लाख रुपये, तर सदस्यांना अडीच लाख व ‘ड’ वर्ग नगरपरिषदांमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवाराला सहा लाख व सदस्य उमेदवाराला सव्वादोन लाख रुपये खर्च करण्याची परवानगी आहे.
पुणे-माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मुंबई, पुणे आणि सोलापूर येथील शासकीय रुग्णालयांसाठी स्मोक डिटेक्टर खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, चार कोटी रुपयांचे काम असताना त्यासाठी तब्बल ८० कोटी रुपये खर्च केले जात आहेत.वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने ४ नोव्हेंबर रोजी एक शासन निर्णय (GR) काढला आहे. यानुसार, ऐरालिक्वि टेक्नॉलॉजी इनोव्हेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून ‘डेटेक्स स्मोक डिटेक्टर’ खरेदीस मान्यता देण्यात आली आहे. ही खरेदी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय वर्षातील राज्य योजनेअंतर्गत केली जाणार आहे.
मुंबईतील केईएम आणि संलग्न रुग्णालये, पुण्यातील ससून रुग्णालय आणि सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ही उपकरणे बसवण्यात येणार आहेत. कुंभार यांनी या ८० कोटींच्या खर्चाला केवळ भ्रष्टाचार नसून राज्याच्या तिजोरीवर टाकलेला दरोडा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे.
४ कोटींचं काम, पण खर्च ८० कोटी! ससून, केईएम, सोलापूर रुग्णालयांसाठी स्मोक डिटेक्टर खरेदीत २० ते ३० पट दरवाढ! एकच कंपनी, कोणतीही स्पर्धा नाही! हा फक्त भ्रष्टाचार नाही , हा राज्याच्या तिजोरीवर थेट दरोडा टाकण्याचा प्रयत्न आहे.#SmokeDetectorScam#Maharashtrapic.twitter.com/ed5SPbTOY8
ससून रुग्णालयासाठी ३५० युनिट्स, सोलापूर रुग्णालयासाठी ३५३ युनिट्स आणि केईएम रुग्णालयासाठी १३६ युनिट्स असे एकूण ८३९ स्मोक डिटेक्टर युनिट्स खरेदी केले जाणार आहेत. प्रति युनिट ९ लाख ४२ हजार ८२० रुपये असा दर मंजूर करण्यात आला आहे. कुंभार यांच्या मते, हा दर अत्यंत फुगवलेला असून सार्वजनिक निधीचा गैरवापर आहे.बाजारभावानुसार, प्रत्येक युनिटवर सुमारे अडीच ते तीन हजार टक्के अधिक दर आकारला गेला आहे. यामुळे तब्बल ७५ कोटींपेक्षा अधिक अनावश्यक खर्च होत आहे. या प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधित खरेदी तात्काळ स्थगित करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कुंभार यांनी केली आहे.एकूण ८३९ युनिट्ससाठी ९.४३ लाख प्रति युनिट दराने ७९.१० कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. प्रत्यक्षात, बाजारात प्रगत स्मोक डिटेक्टर ४० हजार ते ५० हजार रुपयांना उपलब्ध आहेत, ज्यामुळे हा खर्च केवळ ४.२० कोटींपर्यंत झाला असता. म्हणजेच, हा खर्च सुमारे ७५ कोटी रुपयांनी वाढवण्यात आला आहे.
शासन निर्णयात ‘तात्पुरता दर’ नमूद असूनही बाजारभावाची पडताळणी न करताच मंजुरी देण्यात आली आहे, जे नियमबाह्य आहे. वस्तू बाजारात २० ते ३० पट कमी दराने उपलब्ध असतानाही अशा अवास्तव दराने खरेदी केल्यामुळे राज्याचे गंभीर आर्थिक नुकसान होणार आहे.अशा प्रकारची खरेदी ‘एकमेव स्रोत’ (single source) पद्धतीने करण्याची आवश्यकता नव्हती. खरेदीदारांचा हेतू पारदर्शक नसतो तेव्हाच अशाप्रकारे खरेदी केली जाते, असे कुंभार यांनी म्हटले आहे. राज्यात शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नसताना अशाप्रकारे राज्याच्या तिजोरीची लूट केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
बेतिया -काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी बिहारमधील बेतिया येथील चनपटिया येथे पोहोचल्या. त्या एका मेळाव्यात म्हणाल्या की, गेल्या २० वर्षांत सरकारने तुम्हाला संघर्षाची सवय लावली आहे.स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात चंपारणच्या भूमीवर झाली. येथील शेतकऱ्यांचा आवाज महात्मा गांधींपर्यंत पोहोचला आणि ते इथे आले. आज ब्रिटिश नाही तर मोदी राज्य करत आहेत. त्यांच्या राजवटीत सर्व काही महाग झाले आहे.
मोदी साम्राज्यात शेतकरी कर्ज घेतात आणि व्याज भरूनही अडचणीत येतात. तुमचे कर्ज कधीच माफ होत नाही, पण अंबानी आणि अदानी यांचे लाखो कोटींचे कर्ज माफ झाले आहे.देशाचे पंतप्रधान बिहारच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या व्यासपीठावर आणत नाहीत. ते इतर पक्षांना प्रश्न विचारतात. ते असा दावा करतात की काँग्रेसच्या पोस्टर्समध्ये तेजस्वी यांचे चित्र लहान आहे. त्यांना देशाची नाही तर राहुल गांधी आणि तेजस्वी यांच्या भविष्याची चिंता आहे. व्यासपीठावरून नेत्यांनी दावा केला की भाजप आमदार मकान सिंहांनी चनपटिया लुटले आहेत. प्रियंका गांधी हसल्या आणि म्हणाल्या, “कशी-कशी नावे आहेत! मकान सिंग! जसे नाव तसे काम. तो लोकांना लुटून स्वतःची घरे बांधत आहे. बिहारमध्ये किती मकान सिंह, खदान सिंह, ठेकेदार सिंह आहेत कोणास ठाऊक जे तुम्हाला लुटत आहेत. अशा प्रकारचे सरकार बदलण्याची वेळ आली आहे.”
रॅली दरम्यान, एका तरुणाला प्रियंका गांधींना त्यांच्या समस्येबद्दल सांगायचे होते. प्रियंका गांधींनी त्याला स्टेजवर बोलावले आणि त्याचे नाव विचारले. त्या तरुणाने म्हटले, “आरिफ.” प्रियंका म्हणाल्या, “हे बघा, हा बिहारचा एक तरुण आहे जो आपले विचार व्यक्त करू इच्छितो. त्याला त्याच्या समस्या आणि वेदना सांगायच्या आहेत.” प्रियंका त्याला थोडा वेळ थांबायला म्हणाल्या आणि मग त्याची समस्या ऐकली. भाषण संपल्यानंतर, प्रियंकांनी आरिफची समस्या ऐकली. त्याच्या भावाने NEET परीक्षा दिली. त्याच्या मित्रांनी SSC परीक्षा दिली. निकाल ज्या पद्धतीने आला त्यावरून पेपर फुटल्याचे दिसून येते. आम्ही विरोध केला तेव्हा प्रशासनाने आम्हाला मारहाण केली. ज्याप्रमाणे तो स्टेजवर येऊ इच्छित होता तेव्हा पोलिसांनी त्याला रोखले. ही पोलिसांची चूक नाही; त्यांना जनतेचा आवाज दाबण्यास सांगितले गेले आहे. ही सर्व सरकारची चूक आहे. त्यांना तुम्ही बोलू नये असे वाटते.
यापूर्वी, त्यांनी वाल्मिकी नगरमधील एका निवडणूक सभेत म्हटले होते – माझा भाऊ राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मत चोरीविरुद्ध मोर्चा काढला.भाजपने म्हटले की हा मोर्चा घुसखोरांसाठी होता. मला विचारायचे आहे की बिहारचे लोक घुसखोर आहेत का? भाजपला समाजाच्या कल्याणासाठी लढायचे नाही. समाजातील प्रत्येक घटकाला संधी मिळाली पाहिजे.
प्रत्येक निवडणुकीत मतांची चोरी होते. येणाऱ्या काळात निवडणुका होतील की नाही हे आम्हाला माहित नाही. देशाची जनता गप्प आहे अशी आमची तक्रार आहे. तुमची शक्ती ओळखा, हे सरकार बदला. हे सरकार हाकलून लावा. असे सरकार आणा जे तुमचा विकास करेल. ते आमच्या शहीदांना घराणेशाही म्हणतात.स्वातंत्र्य चळवळ बिहारमध्ये सुरू झाली. तुमच्या गावी, वाल्मिकी नगर येथील शेतकऱ्यांनी गांधींना ही चळवळ सुरू करण्यास प्रेरित केले. तुमचे अनेक पूर्वज स्वातंत्र्याच्या लढाईत शहीद झाले असतील. आपल्या स्वातंत्र्याने आपल्याला एक संविधान दिले.
प्रियंका म्हणाल्या, “बिहारमध्ये स्थापन झालेल्या सर्व उद्योगांचे या सरकारने काय केले आहे? लोकांना सरकारी कारखान्यांमध्ये नोकऱ्या हव्या होत्या, पण मोदींनी सर्व उद्योग त्यांच्या दोन मित्रांना सोपवले. आता सरकारी कारखान्यांना कंत्राट दिले जात आहे. देशाची संपत्ती नष्ट होत आहे.”
नितीश कुमार यांचे कोणत्याही गोष्टीवर नियंत्रण नाही. त्यांचे कोणीही ऐकत नाही. सरकार दिल्लीतून चालवले जाते. पंतप्रधान बिहारमध्ये येतात तेव्हा ते सर्व प्रकारच्या गोष्टी बोलतात. त्यांना रोजगाराची चिंता नाही. काँग्रेसच्या पोस्टर्सवर तेजस्वी यादव यांचे चित्र नसल्याबद्दल त्यांना काळजी वाटते. प्रियंका म्हणाल्या, “बिहारमधील सर्व उद्योगांचे या सरकारने काय केले आहे? लोकांना सरकारी कारखान्यांमध्ये नोकऱ्या हव्या होत्या. पण मोदींनी सर्व उद्योग त्यांच्या दोन मित्रांना सोपवले. आता सरकारी कारखान्यांना कंत्राट दिले जात आहे. देशाची संपत्ती नष्ट होत आहे.”
प्रियंका गांधी म्हणाल्या, “नितीश कुमार यांचे कोणत्याही गोष्टीवर नियंत्रण नाही. त्यांचे कोणीही ऐकत नाही. सरकार दिल्लीतून चालवले जाते. पंतप्रधान बिहारमध्ये येतात तेव्हा ते सर्व प्रकारच्या गोष्टी बोलतात. त्यांना रोजगाराची चिंता नाही. काँग्रेसच्या पोस्टर्सवर तेजस्वी यादव यांचे चित्र नसल्याबद्दल त्यांना काळजी वाटते.”
पुणे : गाडीचा पाठलाग करुन त्यांच्या गाडीला पाठीमागून धडक देवून बाजीराव रोडवर भरदुपारी एका अल्पवयीन मुलाचा खून करणारे तिघे अल्पयीन मुले पोलिसांनी पकडलेले आहेत.
या प्रकरणी एका (वय १६ वर्षे रा. सर्वे नं.१३३ इंडीयन ऑईल पेट्रोलपंपाजवळ, दांडेकर पुल, पुणे. असलेल्या) मुलाने फिर्याद दिली आहे आणि तीन विधीसंर्घर्षित बालक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत काल दि.०४/११/२०२५ रोजी दुपारी ३ वाजून १० मिनिटे झाली असतानाच्या सुमारास कृष्णकुंज बिल्डींग समोर, महाराणा प्रताप गार्डन जवळ, १३२७ शुक्रवार पेठ, पुणे येथे सार्वजनिक रोडवर हि हत्या करण्यात आली .यातील फिर्यादी व त्यांचा मित्र नमुद ठिकाणी मोपेड गाडीवरुन जात असताना, या ३ आरोपींनी जुने भांडणाच्या कारणावरुन त्यांचा गाडीचा पाठलाग करुन त्यांच्या गाडीला पाठीमागून धडक देवून फिर्यादी यांचा मित्र नामे मयंक सोमदत्त खरारे, वय १७ वर्षे, रा.आंबिलवाडा कॉलनी, साने नगर, बिल्डींग नं.२ पुणे. (मयत) याला धारदार हत्याराने मारुन खुन केला.
दुचाकीवरुन जाणार्या दोघा युवकांवर मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी कोयत्याने सपासप वार करुन त्यातील एका १७ वर्षाच्या युवकाचा निर्घुण खुन करण्यात आला. बाजीराव रोडवर मंगळवारी भर दुपारी झालेल्या या घटनेतील तिघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयंक सोमदत्त खरारे (वय १७, रा. साने गुरुजीनगर, आंबिल ओढा) असे खुन झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचा मित्र (वय १६, रा. दांडेकर पुल) यालाही कोयता लागून जखम झाली आहे. त्याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मयंक खरारे हा मुळचा मंगळवार पेठेत राहणारा आहे. त्याची आई महापालिकेत कामाला आहे. त्यामुळे त्यांना साने गुरुजीनगर येथे खोली मिळाली आहे. तेथे ते राहतात. जुलै महिन्यांत जनता वसाहतीतील मुलांबरोबर त्याची भांडणे झाली होती. त्यात मयंक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर मयंक याचा खुन करणारा मुख्य अल्पवयीन मुलगा त्यावेळी फिर्यादी होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि मयंक खरारे हे दोघे मोपेडवरुन मंडईकडे मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जात होते. त्यावेळी त्यांचे ओळखीचे तिघे जण मोटारसायकलवरुन पाठलाग करत आले. महाराणा प्रताप गार्डन जवळील कृष्णकुंज बिल्डिंगसमोर त्यांनी इंगळे याच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. मयंक खरारे याच्या तोंडावर, मानेवर व डोक्यावर कोयत्याने ठिकठिकाणी सपासप वार केले. मयंक याला वाचविण्याचा प्रयत्न करताना इंगळे याच्यावर ही त्यांनी वार करुन जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयंक याचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
राहुल गांधींनी ढिगभर पुरावे देऊनही निवडणूक आयोगाकडून शून्य कारवाई, निवडणूक आयोग झोपेचे सोंग घेत आहे.
निवडणूक आयोग भाजपा सरकारच्या हातातली कठपुतली बाहुली, मतदार याद्यांतील घोळ हा लोकशाहीसाठी घातक.
मुंबई, दि. ५ नोव्हेंबर २०२५
भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सरकारच चोरत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एक बॉम्ब टाकून भाजपा व निवडणूक आयोग लोकशाहीचा खून कसा करत आहेत हे देशाला दाखवून दिले. हरियाणात मतचोरी कशी केली याचे एक एक पुरावे देऊन निवडणूक आयोगाला नागडे केले पण निर्लज्जम सदा सुखी या उक्तीप्रमाणे निवडणूक आयोगाच्या कामात काहीच सुधारणा होत नाही. निवडणूक आयोग हा सरकारच्या हातातली कठपुतली बाहुली बनले आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
यासंदर्भात वर्धा सेवाग्राम येथे प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राहुल गांधी यांनी आज देशासमोर पुराव्यासह ठेवल्यानंतरही निवडणूक आयोग जागा होत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की झोपी गेलेल्याला जागे करणे सोपे आहे पण झोपेचे सोंग घेत असलेल्याला जागे करणे अवघड आहे. निवडणूक आयोग पुरावे मागत होते ते पुरावेही राहुल गांधी यांनी दिले. आम्ही त्यांना सांगतोय की सूर्य पूर्वेकडून उगतोय तर ते म्हणतात की पश्चिम कडून का उगवत नाहीय याचे उत्तर द्या. निवडणूक आयोग हा सरकारच्या दबावाखाली काम करत आहे, मतदार यादीमध्ये तांत्रिक घोटाळा मोठ्या प्रमाणात केला आहे. मतदार यादी नोंदण्याची आणि मतदार यादीमध्ये नाव इतरत्र वळविण्याच्या अनुषंगाने एकत्रित स्वरूपाची गुन्हेगारी सुरू असून निवडणूक आयोग मात्र हातावर हात देऊन बसला आहे.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, लोकशाहीमध्ये निवडणुका या निष्पक्ष व पारर्दशक पद्धतीने घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. पण आयोगच सरकारच्या ताटाखालचे मांजर बनून काम करत असेल तर ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे आणि तेच आज देशभरात होत आहे. हरियाणात २५ लाख मतांचा घोटाळा उघड झाला आहे. एकच व्यक्तीचे नाव विविध नावाने २२ वेळा मतदार यादीत असणे, एका ब्राझिलियन मॅाडेलचे नाव २२ वेळा मतदार यादीत असणे, अनेक वेगवेगळ्या बुथवर एकाच व्यक्तीचे नाव असणे अशा अनेक पद्धतीने मतदार याद्यांमध्ये गडबड करण्यात आली. महाराष्ट्रातही विधानसभेला तोच हरियाणा पॅटर्न वापरून भाजपाने चोरीचे सरकार बनवले. महाराष्ट्रात अवघ्या सहा महिन्यात ४७ लाख मतदार वाढले तर मतदानानंतर रात्रीच्या अंधारात जवळपास ८ टक्के मतदान वाढल्याचे दाखवले. आता त्याच सदोष मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी वापरल्या जात आहेत. विरोधी पक्षांनी त्या याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली असता त्याकडे दुर्लक्ष करुन निवडणुका जाहीर केल्या हे सर्व भाजपाला अनुकुल आहे.
मतदार यादीतील दुबार तिबार मतदाराच्या नावापुढे स्टार लावण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात घेतला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्याकडे दुबार, तिबार, दोनशेबार, पाचशे बार एका मतदाराचे नाव यादीत आहे, याचा स्पष्ट डेटा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. निवडणूक आयोगाकडून अपेक्षा आहे की त्यांनी टू स्टार देऊन दोन नंबरी कारभार करू नये. निवडणूक आयोगाचा जो ४२० चा दस नंबरी कारभार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मतदार याद्यांतील घोळाबद्दल प्रश्नांच्या फैरी झाडल्या पण एकाही प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोगाला देता आले नाही. अशा भ्रष्ट मार्गाने निवडणुका होत असतील तर त्याचा काय उपयोग? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.