Home Blog Page 604

काँग्रेसच्या प्रचार समितीत मोहन जोशी यांचा समावेश

पुणे – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विधानसभा निवडणूक प्रचार समितीमध्ये माजी आमदार, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या नियुक्तीची घोषणा केली. खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार समिती नेमण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश संघटनेत मोहन जोशी यांनी विविध पदांवर काम केले असून, त्यांनी कर्नाटक, तेलंगण आदी १२ राज्यांमध्ये निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. महाराष्ट्र प्रदेश पार्लमेंटरी बोर्डाचेही ते सदस्य आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. विधानसभा निवडणुकीतही आघाडीचेच सरकार येईल, प्रचारही एकजुटीने चालू आहे. त्या दृष्टीने पक्ष आणि आघाडीचा प्रचार हिरीरीने करेन, अशी प्रतिक्रिया मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

थेट हल्ला करण्याची हिंमत नसल्याने आरएसएस संविधानावर लपून हल्ला करते: राहुल गांधी

जातनिहाय जनगणनेच्या मागणीमुळे मोदींची झोप उडाली, काहीही झाले तरी जातनिहाय जनगणना होणार व आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच.

विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या उपस्थितीत नागपुरात संविधान सन्मान संमेलन संपन्न.

नागपूर/मुंबई, दि. ६ नोव्हेंबर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर जगण्याचा मंत्र आहे. संविधानात भगवान बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रिबाई अशा महापुरुषांचा आवाज आहे. संविधानातील विचार हजारो वर्षांपूर्वीचे आहेत, संविधानात सर्व जाती, धर्माचा, प्रदेशाचा आदर आहे. याच संविधानावर भाजपा व आरएसएस सातत्याने हल्ले करत आहेत. आरएसएस संविधानावर थेट हल्ला करु शकत नाहीत, ते लपून हल्ला करतात, आरएसएसमध्ये हिंमत असती तर त्यांनी समोरुन हल्ला केला असता, असा घणाघाती हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.

नागपूरमध्ये संविधान सन्मान संमेलनात बोलताना राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी हे स्वतःबद्दल बोलत नसत, ते जेव्हा बोलायचे तेंव्हा तो कोट्यवधी लोकांचा आवाज असायचा. संविधानात सर्वांच्या विकासाबद्दल लिहिले आहे. संविधानामुळे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, आयआयटी, आयआयएम, सार्वजनिक रुग्णालये आहेत. निवडणूक आयोग, सरकारी यंत्रणा आहेत. संविधानात एक व्यक्ती एक मतदान, प्रत्येक जात, धर्म, प्रदेशाचा आदर केला आहे. पण देशात ९० टक्के लोकांवर दररोज अन्याय होत आहे, त्याविरोध आपली लढाई आहे. हे ९० टक्के लोक जेल, मनरेगा या ठिकाणी दिसतात. हा अन्याय दूर करण्यासाठी जातनिहाय जनगणना गरजेची आहे. जातनिहाय जनगणनेची मागणी होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची झोप उडाली आहे. जातनिहाय जनगणनेवर मी बोलतो तेव्हा नरेंद्र मोदी माझ्यावर देश तोडण्याची भाषा करतो असा आरोप करतात. जातनिहाय जनगणनेवर काय भूमिका घ्यायची यावर आरएसएसमध्येही मंथन सुरु आहे, त्यांनी कोणतीही भूमिका घेतली तरी जातनिहाय जनगणना करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादासुद्धा हटवली जाईल असा निर्धार राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्याने कर्ज परतफेड केली नाही तर त्याला जेलमध्ये टाकले जातो आणि करोडो रुपये कर्ज घेऊन जो परदेशात पळून जातो त्याला उद्योगपती म्हणतात असा टोला राहुल गांधी लगावला, आपल्या भाषणात त्यांनी शिशुमंदिरासाठी एवढा पैसा कुठून येतो असा सवाल उपस्थित करत हा पैसा गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, नॅशनल हायवे, अदानी व अंबानीचा पैसा आहे असे म्हटले जाते. पाच टक्के लोक देश चालवत आहेत.

नागपूरात आगमन झाल्याबरोबर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नागपुरात दिक्षाभूमीला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, नागपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. अभिजीत वंजारी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात निवडणूक साहित्य व्यवस्थापन विभाग सज्ज

पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 शांततेत आणि पारदर्शकतेसह पार पाडण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयातील निवडणूक साहित्य व्यवस्थापन विभाग पूर्ण सज्ज झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, किरण सुरवसे, आणि सचिन आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी रोहिदास जाधव,दिपक चव्हाण सहाय्यक अधिकारी पल्लवी जोशी, शशिकांत कांबळे, शदरक करसुलकर, रवींद्र शिंदे, सागर शेवाळे आणि इतर अधिकारी व कर्मचारी या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
निवडणूक साहित्य व्यवस्थापन विभागाचे मुख्य काम म्हणजे निवडणुकीसाठी आवश्यक सर्व साहित्याचे योग्य नियोजन, वितरण आणि नियंत्रण राखणे. मतदान केंद्रांवर पाठवण्यात येणाऱ्या मतदान यंत्रे, मतपत्रिका, मतदार याद्या, शिक्के, शाई, सील, लेखन सामग्री यांसारख्या आवश्यक वस्तूंची सूची तयार करणे आणि त्याचे वितरण सुनिश्चित करणे हे त्यांचे मुख्य काम आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान या साहित्याची कमतरता भासू नये यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी यांच्या देखरेखीखाली साहित्य विभागाने कोणत्याही तांत्रिक अडचणी न येता मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व साहित्य वेळेत उपलब्ध करण्याची जबाबदारी घेतली आहे. यासह, निवडणूक संपल्यानंतर साहित्य परत एकत्र करून सुरक्षित ठिकाणी संग्रहित करणे, तसेच त्याची नोंद ठेवणे हे देखील त्यांचे एक महत्त्वपूर्ण कार्य आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात मायक्रोऑबझर्व्हर प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न

पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 शांततेत आणि पारदर्शकतेसह पार पाडण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयात मायक्रोऑबझर्व्हर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, किरण सुरवसे आणि सचिन आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला.
प्रशिक्षणादरम्यान, मायक्रोऑबझर्व्हर्सना निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रांवर त्यांच्या भूमिकांची माहिती देण्यात आली. मतदान प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध ठेवण्यास त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. ते मतदार पडताळणी, मतदान यंत्रणांची तपासणी आणि शिस्तीचे पालन यावर लक्ष ठेवून कार्य करतात.
प्रा. तुषार राणे आणि प्रा. माधुरी माने यांनी तांत्रिक व व्यवस्थापकीय कौशल्यांवर मार्गदर्शन केले. सहाय्यक अधिकारी साहीर सय्यद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

वडगांवशेरी विधानसभा मतदार संघातील १४ मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल

पुणे, दि. ६ : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ च्या वेळी वडगांवशेरी विधानसभा मतदार संघात पत्राशेड किंवा तात्पुरत्या स्वरूपात उभे करण्यात आलेले १४ मतदान केंद्र जवळपास असलेल्या पक्क्या इमारतींमध्ये स्थलांतरीत करण्यात आली आहेत. मतदारांनी झालेल्या बदलाची नोंद घेऊन आपापल्या मतदान केंद्रावर मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांनी केले आहे.

या विधानसभा मतदारसंघातील लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी आणि येरवडा या प्रमुख भागातील काही मतदान केंद्र स्थलांतरीत करण्यात आली आहेत.

लोहगाव येथील ठिकाणे बदललेली मतदान केंद्रे:

मतदान केंद्र क्रमांक ४६ संस्कार पब्लिक स्कूल लोहगाव खोली क्रमांक १ हे मतदान केंद्र ब्रिलियंट इंटरनॅशनल प्री स्कूल, आश्रय सोसायटी, बाजारतळासमोर खोली क्रमांक १ असे राहील. मतदान केंद्र क्रमांक ४७ संस्कार पब्लिक स्कूल लोहगाव खोली क्रमांक २ हे मतदान केंद्र ब्रिलियंट इंटरनॅशनल प्री स्कूल, आश्रय सोसायटी, बाजारतळासमोर खोली क्रमांक २ असे राहील. मतदान केंद्र क्रमांक ४८ संस्कार पब्लिक स्कूल लोहगाव खोली क्रमांक ३ हे मतदान केंद्र ब्रिलियंट इंटरनॅशनल प्री स्कूल, आश्रय सोसायटी, बाजारतळासमोर खोली क्रमांक ३ असे राहील. मतदान केंद्र क्रमांक ४९ संस्कार पब्लिक स्कूल लोहगाव खोली क्रमांक ४ हे मतदान केंद्र ब्रिलियंट इंटरनॅशनल प्री स्कूल, आश्रय सोसायटी, बाजारतळासमोर खोली क्रमांक ४ असे राहील.

धानोरी येथील ठिकाणे बदललेली मतदान केंद्रे:

मतदान केंद्र क्रमांक ५५ कै. बाबुराव माधवराव टिंगरे पुणे मनपा मुलांची आणि मुलींची शाळा क्र. १६४ धानोरी गावठाण पश्चिमेकडील पत्रा शेड खोली क्र. ६ येथे असणारे मतदान केंद्र न्यूरॉन लॅब्स स्कूल सीबीएससी सेंटर, सर्वे नं. १९, धानोरी –लोहगाव रोड, विठ्ठल-रूक्मिणी मंदिराच्या मागे, धानोरी-१५ खोली क्र. १ येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. मतदान केंद्र क्रमांक ५६ कै. बाबुराव माधवराव टिंगरे पुणे मनपा मुलांची आणि मुलींची शाळा क्र. १६४ धानोरी गावठाण पश्चिमेकडील पत्रा शेड खोली क्र. ७ हे मतदान केंद्र न्यूरॉन लॅब्स स्कूल सीबीएससी सेंटर, सर्वे नं. १९, धानोरी –लोहगाव रोड, विठ्ठल-रूक्मिणी मंदिराच्या मागे, धानोरी-१५ खोली क्र. २ असे राहील.

मतदान केंद्र क्रमांक ५७ कै. बाबुराव माधवराव टिंगरे पुणे मनपा मुलांची आणि मुलींची शाळा क्र. १६४ धानोरी गावठाण पश्चिमेकडील पत्रा शेड खोली क्र. ८ हे मतदान केंद्र न्यूरॉन लॅब्स स्कूल सीबीएससी सेंटर, सर्वे नं. १९, धानोरी-लोहगाव रोड, विठ्ठल-रूक्मिणी मंदिराच्या मागे, धानोरी-१५ खोली क्र. ३ असे राहील. मतदान केंद्र क्रमांक ५८ कै. बाबुराव माधवराव टिंगरे पुणे मनपा मुलांची आणि मुलींची शाळा क्र. १६४ धानोरी गावठाण पश्चिमेकडील पत्रा शेड खोली क्र. ९ हे मतदान केंद्र न्यूरॉन लॅब्स स्कूल सीबीएससी सेंटर, सर्वे नं. १९, धानोरी-लोहगाव रोड, विठ्ठल-रूक्मिणी मंदिराच्या मागे, धानोरी-१५ खोली क्र. ४ असे राहील. मतदान केंद्र क्रमांक ५९ कै. बाबुराव माधवराव टिंगरे पुणे मनपा मुलांची आणि मुलींची शाळा क्र. १६४ धानोरी गावठाण पश्चिमेकडील पत्रा शेड खोली क्र. १० हे मतदान केंद्र न्यूरॉन लॅब्स स्कूल सीबीएससी सेंटर, सर्वे नं. १९, धानोरी-लोहगाव रोड, विठ्ठल-रूक्मिणी मंदिराच्या मागे, धानोरी-१५ खोली क्र. ५ असे राहील.

मतदान केंद्र क्रमांक ८४ कै. वसंतराव आनंदराव टिंगरे मनपा शाळा क्र. १५६ भैरव नगर पुणे, नवीन इमारत धानोरी मैदानातील पत्राशेड खोली क्र. १ हे मतदान केंद्र गोकुलम शाळा, ५१/१५५, धानोरी रोड, भैरवनगर, धानोरी-१५, खोली क्र. १ असे राहील. मतदान केंद्र क्रमांक ८५ कै. वसंतराव आनंदराव टिंगरे मनपा शाळा क्र. १५६ भैरव नगर पुणे, नवीन इमारत धानोरी मैदानातील पत्राशेड खोली क्र. २ हे मतदान केंद्र गोकुलम शाळा, ५१/१५५, धानोरी रोड, भैरवनगर, धानोरी-१५, खोली क्र. २ असे राहील.

विश्रांतवाडी, येरवडा येथील ठिकाणे बदललेली मतदान केंद्रे:

मतदान केंद्र क्रमांक १६८ आचार्य आत्मवल्लभ इंग्रजी माध्यम शाळा, शांतीनगर, विश्रांतवाडी, पुणे-६, पत्रा शेड खोली क्र. १ हे मतदान केंद्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शांतीनगर, येरवडा असे राहील. मतदान केंद्र क्रमांक ३२९ नेताजी सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक पुणे महानगरपालिका शाळा, पत्रा शेड खोली क्र. ६ हे मतदान केंद्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर, तळमजला पार्किंग, कापडी पार्टीशन, येरवडा, खोली क्र. १, असे राहील. मतदान केंद्र क्रमांक ३३२ नेताजी सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक पुणे महानगरपालिका शाळा, पत्रा शेड खोली क्र. ९ हे मतदान केंद्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर, तळमजला पार्किंग, कापडी पार्टीशन, येरवडा खोली क्र. २, असे राहील.

ट्रम्प यांना बहुमत, पुन्हा होणार राष्ट्राध्यक्ष:दुसऱ्या महायुद्धानंतर पहिले राष्ट्राध्यक्ष जे पराभूत होऊन पुन्हा जिंकले; कडवी झुंज देऊनही कमला हरल्या

ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेवरही ताबा मिळवला

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर 4 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा निवडणूक जिंकणारे ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. ट्रम्प 2016 मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले. 2020 च्या निवडणुकीत ते जो बायडेन यांच्याकडून पराभूत झाले.
132 वर्षांपूर्वी ग्रोव्हर क्लीव्हलँड दोनदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. 1884 आणि 1892च्या अध्यक्षीय निवडणुका त्यांनी 4 वर्षांच्या अंतराने जिंकल्या.
अमेरिकेतील 538 जागांपैकी ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला 277 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 270 जागांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर कमला हॅरिस यांच्या पक्षाने 224 जागा जिंकल्या आहेत. दोघांमध्ये केवळ 43 जागांचा फरक आहे. मात्र, उर्वरित सर्व 5 राज्यांमध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत. अशा परिस्थितीत चुरशीची लढत देऊनही कमला यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे.
राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीसोबतच अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या, सिनेट आणि प्रतिनिधीगृहाच्या निवडणुकाही झाल्या. रिपब्लिकन पक्षाला सिनेटमध्ये बहुमत मिळाले असून हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आघाडीवर आहे.
ट्रम्प म्हणाले- मी अमेरिकेला महान बनवणार
विजयानंतर अमेरिकन जनतेला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले – मी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवणार आहे. या दिवसासाठी देवाने माझा जीव वाचवला होता. ट्रम्प यांच्यावर 13 जुलै रोजी पेनसिल्व्हेनियामध्ये हल्ला झाला होता. एक गोळी कानाला लागली आणि बाहेर गेली. या हल्ल्यात त्यांचा जीव थोडक्यात बचावला.कमला हॅरिस यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला, याचे एकमेव कारण म्हणजे स्विंग स्टेट्स. कमला यांना यापैकी एकातही आघाडी मिळाली नाही. 7 स्विंग राज्यांपैकी ट्रम्प यांनी 3 जिंकले आहेत आणि 4 मध्ये ते आघाडीवर होते. गेल्या निवडणुकीत ट्रम्प यांनी फक्त एक स्विंग स्टेट, नॉर्थ कॅरोलिना जिंकले.

स्विंग स्टेट्स ही अशी राज्ये आहेत जिथे दोन पक्षांमधील मतांचे अंतर खूपच कमी आहे. हे कोणत्याही मार्गाने जाऊ शकतात. या राज्यांमध्ये 93 जागा आहेत.

अध्यक्षीय निवडणुकीसोबतच अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या, सिनेट आणि प्रतिनिधीगृहाच्या निवडणुकाही झाल्या. यामध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सिनेट म्हणजेच वरिष्ठ सभागृहात विजय मिळवला आहे.

त्यांना 93 पैकी 51 जागा मिळाल्या. बहुमतासाठी 50 जागांची गरज होती. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्येही रिपब्लिकन आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये डेमोक्रॅट्सना 133 जागा मिळाल्या आहेत, तर रिपब्लिकनला 174 जागा मिळाल्या आहेत. यात 435 सदस्य आहेत, त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे.

ट्रम्प 4 वर्षांनी व्हाईट हाऊसमध्ये परतणार आहेत. ते 2017 ते 2021 पर्यंत राष्ट्राध्यक्ष होते. कमला हॅरिस या निवडणुकीत विजयी झाल्या असत्या तर त्यांनी पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनून इतिहास रचला असता. त्या सध्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत.

आबा बागुलांच्या विकास यात्रेने पर्वती दुमदुमली -विकास पाहिजे तर आबाच पाहीजेच्या घोषणा..

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांची हजारो महिला व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहभागाने निघालेल्या विकास यात्रेने सर्व पर्वती मतदारसंघात विकास पाहिजे तर आबाच पाहीजे या घोषणांनी दुमदुमून गेला. तत्पूर्वी बागुल यांनी पर्वती पायथा येथील श्री महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेत, नारळ अर्पण करीत पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी हेमंत बागुल, अमित बागुल व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी पासून काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या बागुल यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला असला तरी, पर्वती विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी बागुल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.
आबा बागुल यांच्या पदयात्रेची आज सकाळी दहा वाजता अप्पर बस डेपो येथून मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांनी हातात बागुल यांचे फोटो व त्यांचे निवडणूक चिन्ह असलेले ‘हिरा’ चे कट आउट घेऊन, आबांच्या विजयाचा जयघोष केला. आबा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे. हिऱ्या सारखे व्यक्तिमत्त्व असलेल्या आबांना हिरा हे निवडणूक चिन्ह मिळाले हे आबांच्या विजयाचे संकेत आहेत, पर्वतीचा विकास हा केवळ आबा बागुल करू शकतात, यावेळी आमच्या श्रावणबाळाला विधानसभेवर पाठविणारच अशा भावना अनेकांनी या पदयात्रेदरम्यान बोलून दाखविल्या.
अप्पर बस डेपो येथून सुरू झालेली ही पदयात्रा वाजत गाजत अप्पर,सुप्पर,महेश सोसायटी, इंदिरा नगर, बिबवेवाडी गावठाण, बिबवेवाडी ओटा मार्गी वाळवेकर लॉन्स येथे दुपारी दोनच्या सुमारास पोहचली. या पदयात्रेदरम्यान जागोजागी लाडक्या श्रावण बाळ आबा बागुल यांचे औक्षण करून त्यांना ओवाळून विजयाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच चौकाचौकात बागुल यांचे परिसरातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी हार, पुष्पगुच्छ देऊन बागुल यांचे स्वागत करीत त्यांना विजयी करून देण्याचा निर्धार व्यक्त केला. फटाक्यांची आतिषबाजी, बँडचा निनाद, हलगीचे वादन व बागुल यांच्या नावाचा जयघोष अशा शाही थाटात ही पदयात्रा मार्गस्थ होत होती. पदयात्रेदरम्यान रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी उस्फूर्तपणे बागुल यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
पर्वती विधानसभा मतदारसंघ हा जागृत नागरिकांचा मतदार संघ असून, येथील विकास गेली पंधरा वर्षे मागे का पडला हा प्रश्न सर्वच नागरिकांच्या मनात आहे. त्यामुळे हा मागे पडलेला विकास भरून काढण्यासाठी अधिक वेगाने व जिद्दीने काम करण्याची गरज आहे. त्यासाठी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी मी ही निवडणूक लढवत असून, भविष्यातील सुखदायी व आनंद देणारा पर्यावरणवादी मतदारसंघ करण्याचा माझा संकल्प आहे. त्यास नागरिकांनी पाठींबा द्यावा, असे आवाहन आबा बागुल यांनी पदयात्रेच्या शेवटच्या टप्प्यात भाषण करताना केले.
पदयात्रेत पर्वती मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये जयकुमार ठोंबरे, नीता नेटके, बेबी राऊत, सुनीता नेमुर, राजिया बिलारी, इंगवले ताई, महाराणा प्रताप मंडळ, अखिल अप्पर मित्र मंडळ, दुर्गा माता नवरात्री उत्सव, पंचशील मित्र मंडळ, निळं वादळ ग्रुप आदीसह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी होते.

विधानसभा निवडणुकीत निवडणुकीत महिला गेम चेंजर ठरणार – भाजप नेते प्रवीण दरेकर

पुणे –
महायुती सरकार म्हणून आम्ही मतदार यांच्या समोर जाताना अडीच वर्षातील विकासाची शिदोरी घेऊन जात आहे. लाडकी बहिण योजना माध्यमातून दीड हजार रुपये महिलेच्या बँक खात्यात जाणार आहे ती रक्कम वाढवणे आश्वासन सरकारने दिले आहे. आघाडी मधील नेते ही योजना बंद करण्यासाठी धडपड करत असताना काही नेते हो योजना स्वतःच्या कार्यालयातून राबवत दुटप्पी भूमिका घेत आहे. नौटंकी करण्याचे काम आघाडी करत असून आम्ही ताकदीने ही योजना पुढे नेणार आहे कारण हा सामाजिक विषय आहे. महिलांचे संसार यावर चालणार नसले तरी त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ही रक्कम उपयोगी पडत आहे. या निवडणुकीत महिला गेम चेंजर ठरणार आहे असे मत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कवीटकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
दरेकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत महविकास आघाडी फसव्या घोषणा देण्यात आघाडीवर आहे. फेक नारेटिव्ह माध्यमातून अवास्तव खोटे मुखवटे लावले आहे ते जनता यंदा निवडणुकीत उतरवल्या शिवाय राहणार नाही. कर्जमाफी , सातबारा कोरा करण्याच्या, वीजबिल माफी अशा घोषणा उध्दव ठाकरे यांनी सत्तेत असताना दिल्या पण त्यांची पूर्तता केली नाही. हिरवी शाल पांघरून ते हिंदुत्ववादी भूमिका घेत आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडीकडून जे संभ्रमित करण्यात आले ,त्याचा वचपा यंदाच्या निवडणुकीत जनता घेईल. लखपती दीदी, एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, शेतकरी यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून सन्मान निधी मिळत आहे. शेतकरी कर्जमाफी निर्णय देखील झाला आहे. शेतकरी कृषी पंप यांना वीज माफी करण्यात आली आहे. उध्दव ठाकरे यांच्या काळात सिंचन प्रकल्पांना कोणती मंजुरी मिळू शकली नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी १०६ सिंचन प्रकल्प मंजुरी दिली. रोजगार बाबत आघाडी सरकार असताना राज्य गुंतवणुकीस मागे गेले होते पण युती काळात पुन्हा आपण गुंतवणूक मध्ये अग्रेसर राहिलो आहे. सरकार आल्यावर पुढील १०० दिवसातील व्हिजन आमचे तयार आहे. जीवनावश्यक वस्तू दर स्थिर ठेवणे प्रयत्न केले जातील. तरुणांना रोजगार हमी देण्यात येत आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देणे प्रयत्न युती सरकार करत आहे.
पुण्यात मेट्रो जाळे पसरत आहे तीन विस्तारित मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. रिंग रोड माध्यमातून वाहतूक कोंडी सोडवली जात आहे. राज्यातील जनतेला विश्वास देणे काम आमच्या माध्यमातून होत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आघाडी नेते महिला सन्मान गोष्टी करून त्यांना अर्वाच्च भाषेत त्यांचे नेते बोलणे करत आहे. वैफल्यग्रस्त ते झाल्याने त्यांची अशी वक्तव्य होत आहे. खासदार संजय राऊत यांनी नेहमी प्रमाणे गरळ ओकत आहे आता ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणे गोष्टी ते करतात. पण याबाबत आम्हीच सकारात्मक निर्णय घेतला. आघाडी नेत्यांना केवळ विशिष्ट लोकांचे लांगूलचालन पाहिजे आहे. केवळ हातात संविधान घेऊन नौटंकी करण्याचे काम काँग्रेस नेते राहुल गांधी करत आहे.त्यांनी संविधान मेळावा घेण्यापेक्षा अंतःकरणात संविधान हवे याकडे लक्ष्य द्यावे. भाजपने नेहमी संविधान सन्मान करून त्याचे रक्षण केले. लोक आता सजग झाले असून ते आता महायुती सोबत राहतील. राज्याचे उज्वल भविष्यासाठी युती काम करत असून आघाडी सरकार हे स्थगिती सरकार होते हे लोकांनी पाहीले आहे. नवाब मलिक यांचा प्रचार भाजपचे कार्यकर्ते करणार नाही हे आम्ही ठरवलेले आहे त्यामुळे मतदारसंघात युतीच्या उमेदवाराचे काम करण्यात येईल असे दरेकर यांनी स्पष्ट केले.
जेष्ठ नेते शरद पवार खोट्या गोष्टी सातत्याने मांडत आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली उध्दव ठाकरे यांचे सरकार असताना जीएसटी बैठकीत व्यापारी अडचणी मांडू शकले नाही. अजित पवार केवळ दोन बैठकीस गेले नाही परंतु इतर सर्व जीएसटी बैठकींना ते हजर राहिले आहे. कोणता तरी नरेटिव्ह सेट करण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. बारामती मध्ये पुढील पिढीचे नेतृत्व पाहिजे असे शरद पवार सांगून योगेंद्र पवार यांचे नेतृत्व पुढील तीस वर्षाकरिता लागत आहे बाकीच्या युवा पिढीने केवळ त्यांचे झेंडे वाहण्याचे काम करावयाचे का असा टोला देखील यावेळी दरेकर यांनी लगावला आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांच्या बाईक रॅलीला बाणेरकरांचा मोठा प्रतिसाद

पुणे-कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवडणूक प्रचार्थ बाणेर-बालेवाडी भागात बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. बाणेरकरांकडून या रॉलीचे जंगी स्वागत करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा महायुतीने चांगलीच आघाडी घेतलेली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरिकांच्या आणि प्रथितयश व्यक्तींच्या घरोघरी भेटी घेऊन संपर्क अभियान राबविले आहे. त्यासोबतच आज भाजपा कोथरूड उत्तर मंडलच्या वतीने महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ बाणेर- बालेवाडी भागात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोझे कॉलेज, साई चौक, ममता चौक, दसरा चौक – बालेवाडी गावठाण, बालेवाडी- ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर, बालेवाडी- भीमनगर, पाण्याची टाकी, लक्ष्मीमाता मंदिर, चाकणकर मळा, बालेवाडी फाटा, माधव बाग, छत्रपत्री शिवाजी महाराज स्मारक, बाणेर गावठाण, दत्तमंदिर, बाणेर गावठाण, राघुनाना चौक मुरकुटे गार्डन, युतिका सोसायटी – चांदेरे चौपाटी, अंजोर सोसायटी आदी मार्गे ही रॅली मार्गस्थ झाली. तर माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांचे जनसंपर्क कार्यालय येथे रॅलीचा समारोप झाला.

या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आणि पुष्पवृष्टीने ठिकठिकाणी चंद्रकांतदादा पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तर अनेक चौकांमध्ये महिलांकडून औक्षण करुन आ. पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आमदार पाटील यांनी बैलगाडीचेही सारथ्य करत, साऱ्यांचेच लक्ष्य वेधले.

यावेळी भाजप उत्तर उत्तर मंडलचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, उमाताई गाडगीळ, अस्मिता करंदीकर यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सिद्धार्थ शिरोळे कायमच लाडके भाऊ,महिला मेळाव्यातील प्रतिक्रिया; शिरोळे यांनाच पुन्हा निवडून आणण्याचा निर्धार

पुणे, दि. ६ नोव्हेंबर, २०२४ : आमच्यासारख्या अनेक बहिणींना सिद्धार्थ शिरोळे आणि शिरोळे परिवाराने कायमच मदतीचा हात दिला आहे. काही कुटुंबांना उभं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे आमच्यासाठी सिद्धार्थ शिरोळे हे कायमच लाडके भाऊ आहेत, अशी प्रतिक्रिया संगमवाडी गावठाणातील विठ्ठल मंदिरात झालेल्या महिला मेळाव्यात उमटली.

भाजप महिला आघाडीच्या वतीने संगमवाडी गावठाणात विठ्ठल मंदिर येथे झालेल्या या मेळाव्याला सुमारे चारशे महिलांनी उपस्थिती लावली होती. सुजाता सिद्धार्थ शिरोळे, अॅड. वर्षा डहाळे यांनी मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली महिला सन्मान आणि आत्मनिर्भरतेच्या भूमिकेला पूरक काम सिद्धार्थ शिरोळे करत आहेत. शिवाजीनगर मतदारसंघाचा विकास करताना त्यांनी महिलांच्या समस्या सोडवण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. आपल्या या लाडक्या भावाला आपण पुन्हा विधानसभेत पाठवले पाहिजे, असे आवाहन यावेळी अॅड. वर्षा डहाळे यांनी उपस्थितांना केले.

संगमवाडी परिसरातील महिला या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. या महिलांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव यावेळी सांगितले. घरातल्या आजारपणाचा विषय असो, मुलांच्या प्रवेशाचा मुद्दा असो की घराच्या डागडुजीचा प्रश्न असो, या सगळ्या विषयांसाठी शिरोळे कायम मदत करतात. त्यांचे अनेक कुटुंबांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे ते आमच्या कुटंबाचा एक भाग, अगदी जिवाभावाचे लाडके भाऊ बनले आहेत, असे उद्गार या महिलांनी काढले.  

मेळाव्याला शिवाजीनगर महिला आघाडी अध्यक्ष अपर्णा कुऱ्हाडे, महिला आघाडी शहर सरचिटणीस भावना शेळके, नगरसेविका स्वाती लोखंडे, राजश्री काळे, मेळाव्याच्या संयोजिका सुजाता सोरटे आदी उपस्थित होत्या.

तिहेरी तलाक, लाडकी बहीण अशा योजनांमुळे मोदी सरकारची महिलांविषयीची आदराची भूमिका अधोरेखित झाली आहे. महायुतीच्या राज्यात महिला सुरक्षित आणि आत्मनिर्भर बनल्या आहेत. ही स्थिती टिकवण्यासाठी सिद्धार्थ शिरोळे यांना पुन्हा विधानसभेत पाठवू या, असे आवाहन अॅड. वर्षा डहाळे यांनी यावेळी केले.

राहुल गांधी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे विरोधी

महायुतीचा प्रचार न करणाऱ्यांवर कारवाई होणार! •   चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

नागपूर: बंडखोरी करणाऱ्या ४० भाजपा पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही जे पदाधिकारी पक्षविरोधी कार्य करीत मित्रपक्षाचा प्रचार करणार नाही किंवा मित्र पक्षाच्या उमेदवार सोडून दुसऱ्या पक्षासाठी प्रचार करतील. अशा भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असा थेट इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. भाजपा कार्यकर्त्यांसाठी पक्ष हा आईसमान असून त्यासोबत बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात राहण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोराडी (नागपूर) येथे ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. श्री बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्या नागपूर दौऱ्यावर भाष्य केले. ते म्हणाले, राहुल गांधी बंद दाराआड चर्चा करीत आहेत. त्यांना मीडिया देखील नको आहे. त्यांचा प्रयत्न जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आहे. राहुल गांधी शहरी नक्षलवादाला सहकार्य करण्यासाठी, राष्ट्रविरोधी कारवाईचे समर्थन करण्यासाठी ते आले असून, कॉंग्रेसने ८० वेळा संविधानात बदल केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा पराभूत करण्याचे काम कॉंग्रेसने केले. कॉंग्रेसला कधीच बाबासाहेबांचे विचार रुजले नाही. राहुल गांधी बाबासाहेबांच्या विचारांचे विरोधी असून ते आता संविधानाच्या गोष्टी करीत आहेत.

 ते असेही म्हणाले…
•   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणीला वर्षाला २५ हजार रुपये देण्याचे ठरविले आहे, आता १८ हजार मिळत आहेत. त्याच प्रमाणे दिव्यांग, निराधारांना २१०० रुपये महिना मिळणार आहे.
•   ऊद्धव ठाकरे यांचा अजेंडाच महाराष्ट्रात आलेल्या प्रकल्पांना विरोध करणे हाच आहे. यामुळे ते  महाराष्ट्राचे नुकसान करत आले आहेत.
•   राज ठाकरे यांनी विदर्भाच्या मागसलेपणावर त्यांचे मत मांडले असले तरी १० वर्षांपूर्वीचा विदर्भ आणि आजचा विदर्भ यात बदल झाला आहे. काँग्रेसचे ४५ वर्ष आणि आमचे दहा वर्ष यात मोठा बदल झाला.
•   शरद पवार यापूर्वीही ते पावसात भिजले आहे, कधी सहानुभूती कार्ड खेळले आहे, मात्र जनता आता या सहानुभूती वर जाणार नाही. महायुतीने केलेल्या कामाकडे जनता लक्ष देईल

राहुल गांधींवर अर्बन नक्षलवादाचा आणि ते देशात अराजकता पसरवत असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

कोल्हापूर-काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून देशात अराजकता पसरवण्याचे काम होत असल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो या समुहातील अनेक संघटना अतिशय टोकाच्या डाव्या विचारांच्या आहेत. त्यांची ध्येय धोरणे पाहिली, त्यांची कामाची पद्धत पाहिली तर त्या अराजकता पसरवत असल्याचे स्पष्ट आहे, असे ते म्हणालेत.काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. ते बुधवारी दुपारी नागपुरात आयोजित संविधान सन्मान परिषदेला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 6 वा. मुंबईतील बीकेसीमध्ये त्यांची महाविकास आघाडीसाठी जाहीर सभा होणार आहे. या सभेत महाविकास आघाडीचा निवडणूक जाहिरनामाही प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर देशात शहरी नक्षलवाद पसरवण्याचा आरोप केला आहे.

देवेंद्र फडणवीस बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, भारत जोडो समुहातील अनेक संघटना अतिशय टोकाच्या डाव्या विचारांच्या आहेत. त्यांची ध्येय धोरणे पाहिली, त्यांची कामाची पद्धत पाहिली, तर त्या अराजक पसरवणाऱ्या संघटना असल्याचे स्पष्ट होते. त्याला अराजकतावादी असेही म्हणता येईल.

एकीकडे राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. खरे म्हणजे संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. पण लाल संविधान का? तुम्ही लाल पुस्तक दाखवून कुणाला इशारा देत आहात? संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर आणि अराजकतावादाचा अर्थ असतो डिसऑर्डर. तुम्ही अराजक पसरवत आहात. त्यामुळे संविधान व भारत जोडोच्या नावाखाली अराजकता पसवणाऱ्या लोकांना एकत्र करून समाजात विद्वेष आणि अराजकता तयार करण्याचे काम याठिकाणी होत आहे. अर्बन नक्षलवाद हा यापेक्षा वेगळा नाही.

अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की, लोकांची मने प्रदूषित व कलुषित करायची. त्यांच्यामध्ये अराजकतेचे रोपण करायचे. जेणेकरून देशातल्या ज्या संस्था आहेत, देशातल्या ज्या व्यवस्था आहे, त्याच्यावरून त्यांचा विश्वास उडेल आणि कुठेतरी या देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल. हीच अराजकता पसरवण्याचे काम राहुल गांधी यांच्यामुळे देशात होत आहे आणि मी त्याच्यावरच बोललो आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांच्यावर अर्बन नक्षलवादाचा प्रभाव असल्याचा आरोप केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षांचे नेते उपद्रवी व अर्बन नक्षलवाद्यांच्या ताब्यात सापडलेत. राहुल गांधींमध्ये आज फार थोड्या प्रमाणात काँग्रेसचा विचार उरला आहे. ते एका डाव्या विचारसरणीतून कट्टर डाव्या विचारसरणीच्या विचारधारेकडे वळले आहेत. ते मूळ निळ्या रंगातील संविधानाऐवजी लाल कव्हरचे संविधान लोकांना दाखवत आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ही आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण करत आहेत, असे फडणवीस आपल्या मुलाखतीत म्हणाले होते.

सदा सरवणकर यांच्यासाठी एकनाथ शिंदे मैदानात: भाजप नेत्यांकडून आघाडी धर्माचे पालन नाही थेट भाजप नेतृत्वाकडे तक्रार

मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांवर आघाडी धर्माला हरताळ फासण्याचा आरोप केला आहे. यासंबंधी त्यांनी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांचा सूर बदललेला दिसून येत आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातील भाजपने अमित ठाकरे यांना दिलेल्या कथित पाठिंब्यावर शिंदे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिंदे गटाने माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी मनसेने राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना मैदानात उतरवले आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या पाठिंब्याची परतफेड म्हणून भाजपच्या आशिष शेलारांसारख्या स्थानिक नेत्यांनी अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचे सूतोवाच केले. पण त्यानंतरही सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. त्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरी व निवडणूक निशाणी चोरण्याच्या मुद्यावरून थेट शिंदेंवर घणाघात केला.

यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच नाराज झालेत. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, एकनाथ शिंदे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्यांनी अमित ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्याप्रकरणी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. महाराष्ट्र भाजपचे नेते आघाडी धर्माचे पालन करत नाहीत, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजप नेतृत्वाने राज्यातील नेत्यांची कानउघाडणी केल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे यांच्या तक्रारीनंतर भाजपच्या नेत्यांचे सूर बदललेत. आता ते सदा सरवणकर हेच माहीम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असल्याचा दावा करत आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. या प्रकरणी अन्य एखादा निर्णय झाला तर तो महायुतीच्या टॉप लिडरशीपकडून होईल, असे ते म्हणत आहेत. खासदार नारायण राणे यांनी यासंबंधी केलेले विधान या प्रकरणी अत्यंत सूचक मानले जात आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे अमित ठाकरे यांच्या उमेदवारीविषयी आता आणखी एक नवी माहितीही उजेडात येत आहे. शिंदे गटाने अमित ठाकरे यांच्यापुढे माहीम ऐवजी भांडूप विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण राज ठाकरे यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. अमित यांनी आपले निवासस्थान असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी असा त्यांचा आग्रह होता. या मोबदल्यात त्यांनी शेजारच्या शिवडी मतदारसंघातही भाजप व शिंदेंकडून पाठिंब्याची मागणी केली होती.

‘पुनीत बालन ग्रुप’चा पैलवान सिकंदर शेख 2024 चा रुस्तुम-ए-हिंद किताब जिंकणारा महाराष्ट्रातील चौथा कुस्तीपटू

पुणे ;‘पुनीत बालन ग्रुप’चा खेळाडू असलेल्या’महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेखने पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेत बाजी मारत रुस्तुम-ए-हिंद हा मानाचा किताब जिंकला आहे. हा किताब जिंकणारा शेख हा महाराष्ट्रातील चौथा पैलवान ठरला असून त्याच्या या विजयाबद्दल ‘पुनीत बालन ग्रुप’कडून अभिनंदन करण्यात आले आहे.

गतवर्षी म्हणजे २०२३ ला सिकंदर शेख याने ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती जिंकून ६६ वा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळविला होता. त्याच्या कुस्तीमधील पुढील करिअरसाठी पुण्यातील ‘पुनीत बालन ग्रुप’ने सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि सिकंदर शेख यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या मदतीच्या आधारे शेख याची विविध कुस्ती स्पर्धांत भाग घेण्याची आणि त्यात विजय मिळविण्याची घौडदौड जोमाने सुरू असून त्यात आणखी एका मोलाच्या विजयाची भर पडली आहे.पंजाब मधील जांडला जि. जालंधर येथे 2024 च्या रुस्तुम-ए-हिंद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशातील अनेक नामवंत पैलवानांनी सहभाग घेतला होता. मात्र, त्यांना धुळ चारत सिकंदर शेख याने रुस्तुम-ए-हिंद हा किताब पटकविला. या रुस्तुम-ए-हिंद या किताबावर नेहमीच उत्तर भारतीय मल्लांचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. त्यात केवळ पै. हरीशचंद्र बिराजदार, अमोल बुचडे आणि असाब अहमद यांनीच हा किताब जिंकल्याचे सांगितले जाते. त्यांच्यानंतर आता सिकंदर शेख हा किताब जिंकणारा महाराष्ट्रातील चौथा मल्ल ठरला आहे. या स्पर्धेत सिकंदर च्या रोशन किरलगड आणि बग्गा कोहली यांच्यासोबत झालेल्या कुस्त्या रोमहर्षक आणि पाहण्यासारख्या होत्या. अंतिम स्पर्धेत सिकंदर विरूध्द बग्गा कोहली यांच्यात कुस्ती झाली यात सिकंदर विजयी झाला. त्याला बक्षीस म्हणून मानाची गदा, ट्रॅक्टर या बक्षिसाबरोबरच आर्थिक स्वरूपातही बक्षिस मिळाले आहे.

“सिंकंदर शेख हा एक गुणवान खेळाडू आहे. त्याने रुस्तम-ए-हिंद किताब जिंकून आपल्या महाराष्ट्राचं नाव देशपातळीवर गाजवलं. भविष्यात शेख कुस्तीच्या माध्यमातून जगभरात महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव तो उंचावेल अशी खात्री आहे. ‘पुनीत बालन ग्रुप’कडे असे गुणवंत खेळाडू आहेत, ही आमच्यासाठी आणखी आंनदाची आणि अभिमानाची बाब आहे. शेख याने मिळविलेल्या यशामुळे आणखी प्रतिभावान खेळाडूंच्या मागे उभं राहण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली.”

  • पुनीत बालन
    अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप

मायावती यांची पुण्यात सभा

पुणे, ६ नोव्हेंबर २०२४

समाजातील शोषित, पीडित, उपेक्षितांना नेतृत्व देवून त्यांना शासनकर्ती जमात करण्याचे महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कांशीराम साहेब आयुष्यभर झटले. बहुजन समाज पक्षाने तळागाळातील समाजाला नेतृत्व देत उत्तर प्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्ता मिळवली. आता महाराष्ट्रातही उपेक्षित वर्गाचा राजकीय प्रतिनिधी बसपाच्या माध्यमातून कायदेमंडळात पोहचेल,असा विश्वास बसपचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र प्रभारी, वडगाव शेरी मतदार संघाचे उमेदवार डॉ.हुलगेश चलवादी यांनी बुधवारी (ता.६) व्यक्त केला.

देशाच्या आयरन लेडी, उत्तर प्रदेशचे कणखर नेतृत्व, माजी मुख्यमंत्री मायावती यांची येत्या १७ नोव्हेंबर रोजी पुण्यातील येरवडा येथे महासभेला संबोधित करणार आहेत. दुपारी १२ वाजता येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालय मैदान, कॉमर झोन येथे आयोजित या सभेसाठी समाजातील अनेक बुद्धिवंत, विचारवंत आणि समाजसेवकांना आमंत्रित करण्यात आले आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले. राज्यात गेल्या काही वर्षात मराठा आरक्षणाचे आंदोलन बरेच गाजले.उपेक्षितांना विकासाच्या पुढील पंगतीत आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. बसपाचे आरक्षणाला समर्थन आहे.राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर बसपा योग्य मार्ग काढू शकतो. अशात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची नुकतीच भेट घेत त्यांना देखील सभेचे निमंत्रण देण्यात आल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

पुणेरी पगडी आणि संविधानाची प्रत यावेळी बसपच्या शिष्टमंडळाकडून जरांगे यांना देण्यात आली.यावेळी बसपाचे प्रदेश सचिव सुदीप गायकवाड आणि स्वप्नील शिर्के प्रामुख्याने उपस्थित होते.जरांगेची मराठा आरक्षण आंदोलनातील भूमिका प्रेरणादायी आहे.सर्व समाजाने एकत्रित येवून यशस्वी नवीन राजकीय समीकरणे जुळवून आणता येईल,अशी भावना डॉ.चलवादी यांनी या भेटीनंतर व्यक्त केली.वडगाव शेरी मतदार संघात पक्षाचा कॅडर घरोघरी जावून मतदारांना बसपाची भूमिका आणि विचार समजावून सांगत आहे. मतदारांना येणाऱ्या काळात पक्षाकडून केल्या जाणाऱ्या विकासकामांची ‘गॅरंटी’दिली जात असल्याचे देखील डॉ.चलवादी म्हणाले.