Home Blog Page 60

माजी नगरसेविका प्राची आल्हाटांसह चौघांवर 24 लाखांची फसवणूकीचा गुन्हा दाखल

पुणे-सार्वजनिक सेवा सुविधांसाठी राखीव भूखंड (ॲमेनिटी स्पेस) मिळवून देण्याचे आमिष दाखवून हडपसर येथील एका डॉक्टरची २४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी माजी नगरसेविकेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी नगरसेविका प्राची आल्हाट, त्यांचे पती अशिष आल्हाट, चिंतामणी कुरणे (रा. महंमदवाडी) आणि आसिफ शेख (रा. मंगळवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. डॉ. महेंद्र धोंडीराम सुरवसे (वय ३९, रा. महंमदवाडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. सुरवसे यांचे महंमदवाडी परिसरात रुग्णालय आहे. आरोपींनी त्यांना ‘ॲमेनिटी स्पेस’ मिळवून देण्याचे आणि महानगरपालिकेची परवानगी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

यासाठी आरोपींनी डॉ. सुरवसे यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती. आरोपींवर विश्वास ठेवून डॉ. सुरवसे यांनी त्यांच्या पत्नीच्या आणि मित्राच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने २४ लाख २० हजार रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले. मात्र, ठरलेली जागा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे डॉ. सुरवसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

राजर्षि शाहू सहकारी बँकेचा विजय

सहकार करंडक क्रिकेट स्पर्धा ; पुणे नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या वतीने आयोजन 

पुणे : रोहन बलकवडेच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर राजर्षि शाहू सहकारी बँकेने पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी आयोजित आंतरसहकारी बँक सहकार करंडक क्रिकेट स्पर्धेत संत सोपानकाका सहकारी बँकेवर आठ गडी राखून सहज मात केली.

नेहरू स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. संत सोपानकाका सहकारी बँकेला प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ८ षटकांत ७ बाद ४९ धावाच करता आल्या. यात केवळ एकालाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. इतरांनी राजर्षि शाहू बँकेच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. राजर्षि शाहू बँकेकडून रोहन बलकवडेने तीन गडी बाद केले, तर वैभव पायगुडेने दोन गडी बाद करून त्याला उत्तम साथ दिली. राजर्षि शाहू बँकेने विजयी लक्ष्य ६.१ षटकांतच पूर्ण केले. यात वैभव पायगुडेने १७, तर प्रशांत सुपेकरने नाबाद १५ धावा केल्या.

धावफलक
१) संत सोपानकाका सहकारी बँक – ८ षटकांत ७ बाद ४९ (कैलास शिंदे १०, श्रीपाद जगताप नाबाद ९, योगेश वाघ नाबाद ९, रोहन बलकवडे ३-१६, वैभव पायगुडे २-९, दीपक वैराट १-१५) पराभूत वि. राजर्षि शाहू सहकारी बँक – ६.१ षटकांत २ बाद ५१ (वैभव पायगुडे १७, प्रशांत सुपेकर नाबाद १५, कैलास शिंदे १-१, रोहित कडू १-१४). सामनावीर – रोहन बलकवडे. 

२) पुणे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक – ८ षटकांत ५ बाद ४७ (हृषितोष सावळे १३, सुमीत गद्रे २०७, भूषण शहारे १-६, श्रेयस फाटक १-५) पराभूत वि. संपदा सहकारी बँक – ५.१ षटकांत २ बाद ४८ (श्रेयस फाटक नाबाद २६, मंदार गुर्जुर नाबाद ६, किरण चोरमारे १-२७, एम. ढमढेरे १-४). सामनावीर –  श्रेयस फाटक. 

३) सन्मित्र सहकारी बँक – ८ षटकांत ७ बाद ५९ (प्रवीण ताम्हाणे २२, नितीन लोहार १३, ऋषीकेश जगताप १०, मयुरेश जाधव २-३, हर्षद जळगावकर १-७) पराभूत वि. कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक – ३.४ षटकांत बिनबाद ६० (प्रसाद शिंदे नाबाद २८, प्रतीक पटवर्धन नाबाद २५). सामनावीर – मयुरेश जाधव. 

४) जनता सहकारी बँक – ८ षटकांत ५ बाद ८१ (अथर्व जोशी ३१, उदय नाबाद १०, वेदान्त मराठे ८, अभिषेक कुलकर्णी २-२०, हिमांशू १-१५) वि. वि. महेश सहकारी बँक – ८ षटकांत ४ बाद ६२ (सागर सप्रे ११, विशाल के. नाबाद १५, चैतन्य २-१०, अश्विन शेलार १-२५, तुषार दिवटे १-१३). सामनावीर – अथर्व जोशी. 

कोंढव्यातही बेकायदा बांधकामांवर जोरदार कारवाई, 18500 चौ.मी.चे बांधकाम पाडले.

पुणे- केवळ हातगाडी वाले , पथारीवाले यांच्यावर कारवाई महापालिका करते असा ठपका आता पुसण्याचे जणू काम सुरु झाले असून धनकवडी बरोबर कोंढव्यातही बेकायदा बांधकामांवर जोरदार कारवाई सुरु आहे.

कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक परिसरामध्ये अनाधिकृत बांधकाम कारवाई साठी नियुक्त केलेल्या विशेष पथकामार्फत आज दि.06/10/2025 रोजी कोंढवा खुर्द , भाग्योदय नगर S.no 52, मक्का मस्जिद जवळ एक B3+ 10 मजल्याच्या , इमारतीवर 15000 चौ.फुट आर सी सी बांधकाम तसेच कोंढवा बुद्रुक परिसरामधील स.नं. 5 (पार्ट ) लक्ष्मी नगर गल्ली नं. 1 येथे तळ मजला + 1 मजले (आर सी सी) व गल्ली नं. 5 येथे plinth वर कारवाई करण्यात आली आहे. एकूण सुमारे 18500 चौ.मी. कारवाई झाली
सदर कारवाई साठी 6 बिगारी, 5 पोलीस, 1 jcb , 4 brekar, 2 गॅस cutter, 5 कनिष्ठ अभियंता, 2 उपअभियंता उपस्थित होते.
त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम हे कारवाई झाल्यामुळे धोकादायक झालेले आहे.त्याचा वापर करण्यात येऊ नये व सदर इमारतीत सदनिका विकत घेऊ नये.असे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे.

इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या कर्मचाऱ्यांना ‘दादांचा वादा’ …

दादा, दिलेला शब्द पाळतो..! ;गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन प्रश्न लावणार मार्गी…

मुंबई दि. ६ नोव्हेंबर – इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत वरळी डोम येथे बैठक घेऊन आपल्या समस्या मांडल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकचे नेते अर्जुन टिळे यांच्यासमवेत आलेल्या इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या शिष्टमंडळातील कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांचे गार्‍हाणे अजितदादांसमोर मांडले. यावेळी अजितदादा पवार यांनी आपल्या समस्या मुद्देसूद माझ्याकडे द्या, त्या सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लवकरच दिल्लीत भेट घेऊन तुमच्या समस्या लवकरात लवकर सोडवेन असा शब्द झालेल्या बैठकीत दिला.

यावेळी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, नाशिक येथील राष्ट्रवादीचे नेते अर्जुन टिळे, डॉ. जाकीर शेख, राजेश बेंस, इंडिया सिक्युरिटी प्रेसचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धुंदरे, जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे उपस्थित होते.

पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण:माझा दुरान्वये संबंध नाही- अजित पवार

मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमीडीया होल्डिंग्स एलएलपी’ कंपनीने केलेल्या जमीन खरेदी व्यवहारावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून, अजित पवार आणि सरकारवर टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणी आता माध्यमांसमोर येत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अजित पवार म्हणाले, मला याबाबतीत माहिती नाही. माझा अजित पवार म्हणून त्या गोष्टीशी संबंध नाही. त्या जमीन व्यवहार प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही. उलट मी या निमित्ताने अधिकारी वर्गांना सांगेल की जर माझ्या नावाचा वापर करून कोणी चुकीचे काम करत असेल किंवा नियमात न बसणारे कृत्य करत असेल तर त्याला माझा कुठलाही पाठिंबा नसेल. मी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारा व्यक्ती आहे, हे तुम्हाला माहीत आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून पुढे काय होणार ते बघूया.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, या प्रकरणाशी संपूर्ण माहिती घेऊन मी उद्या तुमच्याशी संवाद साधेल. स्टॅम्प ड्यूटी असेल किंवा आणखी काही त्याची संपूर्ण माहिती मी घेईल. राज्याच्या अर्थमंत्री या नात्याने मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालेल. हा माझ्या घरचा प्रश्न नाही. तिथल्या बंगल्यावर पार्थ अजित पवारचे नाव आहे. मी कधीही चुकीच्या कामाचे समर्थन करत नाही. माझा यात दुरान्वये संबंध नाही. मी तुमच्याशी संवाद साधला नसता तर तुम्हाला वाटले असते की इथे कुठेतरी पाणी मुरत आहे. त्यामुळे मी स्वतःहून तुमच्यासमोर आलो आहे. मी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारा कार्यकर्ता आहे.

पार्थ पवार यांच्या अमीडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने सुमारे 1800 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. आरोपांनुसार, हा खरेदी व्यवहार झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे सरकारी नियमांना पायदळी तुडवून जमिनीची खरेदी झाली असून महसूल विभागाने विशेष सवलत दिली का, असा सवाल विरोधक विचारत आक्रमक झाले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीची अमेडिया कंपनी आणि दिग्विजय अमरसिंह पाटील या सहमालकाविरोधात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. या जमिनीची बाजार किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे कागदोपत्री दाखवले गेले, परंतु प्रत्यक्ष किंमत 1800 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अमेडिया कंपनीने या जमिनीची खरेदी करताना आयटी पार्क उभारणीच्या नावाखाली सरकारकडून स्टँप ड्युटी माफी मिळवल्याचे आरोपात नमूद करण्यात आले आहे. 22 एप्रिल 2025 रोजी कंपनीनं आयटी प्रकल्पाचा ठराव केला आणि फक्त दोन दिवसांत म्हणजे 24 एप्रिल रोजी उद्योग संचालनालयाने त्यावर स्टँप ड्युटी माफ, असा शेरा नोंदवला. इतक्या वेगाने झालेल्या प्रशासकीय हालचालींनी संशय निर्माण केला आहे. आश्चर्य म्हणजे, या संपूर्ण व्यवहारासाठी फक्त 500 रुपयांची स्टँप ड्युटी भरल्याचे समोर आलं असून, एवढ्या मोठ्या मूल्याच्या जमिनीचा व्यवहार फक्त काही आठवड्यांत पूर्ण झाला. हे सर्व घडत असताना, संबंधित कंपनीला कोणताही पूर्वानुभव नसल्याचे आणि तरीही तीला सरकारी सवलती कशा मिळाल्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पार्थ पवार जमीन व्यवहार:देवेंद्र फडणवीसांनी सांगितले, अनियमितता आढळली, तर कडक कारवाई

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी महसूल विभाग, आयजीआर आणि लँड रेकॉर्ड विभागाकडून सर्व कागदपत्रे आणि सविस्तर माहिती मागवली असून, प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. या संदर्भात फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात समोर आलेले मुद्दे गंभीर आहेत. त्यामुळे योग्य ती चौकशी होईल आणि जर कुठे अनियमितता आढळली, तर अतिशय कडक कारवाई केली जाईल. तसेच, उपमुख्यमंत्री अशा प्रकारच्या कोणत्याही गैरप्रकाराला पाठीशी घालतील, असे मला वाटत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे पार्थ पवारांच्या व्यवहारावरून सुरू असलेल्या राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर मोठा आरोप केला आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, पार्थ पवार यांच्या कंपनीने 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतली आणि या व्यवहारासाठी केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली. एवढेच नव्हे तर ही जमीन कोरेगाव पार्क परिसरात असून, तिथे आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची योजना करण्यात आली आहे. एक लाख रुपयांच्या भांडवलाची कंपनी एवढा मोठा व्यवहार कसा करू शकते? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे.
अंबादास दानवे यांच्या मते, या व्यवहारात अनेक शंका निर्माण करणारे मुद्दे आहेत. उद्योग संचालनालयाने फक्त 48 तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचा आणि फक्त 27 दिवसांत संपूर्ण व्यवहार पूर्ण झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे. या प्रकरणात सरकारमधील प्रभावी व्यक्तींचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. विरोधकांनी पार्थ पवार आणि अजित पवार या दोघांवरही जोरदार टीका सुरू केली आहे.

या सर्व घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. या संदर्भात माध्यमांना माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मी या व्यवहाराबाबत सर्व माहिती मागवली आहे. महसूल विभाग, लँड रेकॉर्ड आणि आयजीआर या विभागांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. अजून संपूर्ण माहिती मिळालेली नाही, पण प्राथमिक अहवालानुसार काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी सांगितले की, आज पूर्ण माहिती आल्यानंतर शासन पुढील निर्णय घेईल आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार अशा कोणत्याही अनियमित व्यवहाराला पाठीशी घालतील, असे मला वाटत नाही. आमच्या सरकारचे या विषयावर स्पष्ट मत आहे, कुठेही गैरप्रकार झाला असेल, तर त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. त्यामुळे या प्रकरणात जर अनियमितता आढळली, तर दोषींवर अतिशय कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्याने विरोधकांच्या आरोपांना महत्त्व मिळाले असून, सरकार आता दबावाखाली आल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

मुलाच्या नावाने पुण्यात ४० एकर सरकारी जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करा: हर्षवर्धन सपकाळ

हजारो कोटींची जमीन फक्त ३०० कोटी रुपयांत पवारांच्या घशात घालण्यासाठी मदत करणा-या अधिका-यांना तात्काळ निलंबित करा.

शेतक-यांना मोफत नको म्हणणा-या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या रोग जडला आहे.

मुंबई, दि. ६ नोव्हेंबर २०२५

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या कंपनीने पुण्यातील वतनाची ४० एकर जमीन भ्रष्ट मार्गाने बळकावल्याचे उघड झाले आहे. पार्थ पवार यांनी हजारो कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटी रुपयात म्हणजे कवडीमोल भावाने हडप केली असून स्टँप ड्युटी फक्त ५०० रुपये दिली आहे. सरकारच्या ताब्यात असणा-या वतनाच्या या जमिनीचा व्यवहार झालाच कसा? असा प्रश्न विचारून भ्रष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हकालपट्टी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे म्हटले आहे की, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याची अमेडिया नावाची कंपनी असून या कंपनीने कोरेगाव पार्क भागातील जमीन अत्यंत अल्प किंमतीत घेतली आहे, ज्या कंपनीने हा व्यवहार केला त्या अमेडिया कंपनीचे भागभांडवल फक्त १ लाख रुपये आहे. अमेडिया कंपनीला या जागेत आयटी पार्क उभारायचे आहे आणि त्यास सरकारच्या उद्योग संचालनालयाने अवघ्या ४८ तासात मंजुरीही दिली. सरकारच्या ताब्यात असलेली वतनाची जमीन विकत घेता येते का ? स्टॅम्प ड्युटी माफ का केली? असे प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित करून हा व्यवहार रद्द करावा व संपूर्ण व्यवहाराशी संबंधित अधिका-यांना तात्काळ निलंबित करून सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ‘सारखं मोफत कसं मागता, जरा हातपाय हलवा’ असा दम शेतक-यांना देणाऱ्या अजित पवार यांच्या दिवट्याच्या जमीन व्यवहारात तब्बल २१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे. मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना अजित पवारांना वेदना का होतात, हे म्हणजे ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं’, असा प्रकार असून हा व्यवहार एक मोठा स्कॅम आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा केला पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

बेकायदा बांधकामे: धनकवडीत जोरदार कारवाई सुरु

पुणे- धनकवडी येथील बेकायदा बांधकामांना महापालिकेने आता लक्ष केले असून धनकवडी नवीन हद्द सर्वे नंबर 22 सर्वे नंबर तीन आंबेगाव खुर्द नवीन हद्द सर्वे नंबर 41 साई मंदिर परिसरा मागे 2 गल्ल्या येथील आर.आर.सी.सी/पक्क्या स्वरूपाचे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली .ही कारवाई महापालिकेचे अधीक्षक अभियंता व बांधकाम विभाग झोन क्र. 02 च्या कार्यकारी अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता, कनिष्ठ अभियंता यांचे उपस्थितीत करण्यात आली


या कारवाईत एकूण 13,500 चौरस फूट आर.सी.सी/पक्क्या स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे.कार्यकारी अभियंता बांधकाम विकास विभाग झोन क्र. 02 विभागामार्फत हि कारवाई करण्यात आली कारवाई च्या अनुषंगाने पोलिस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल च्या मदतीने कारवाई करण्यात आली.यात 1 जेसीबी, एक गॅस कटर, 7 अतिक्रमण कर्मचारी अशी यंत्रणा वापरण्यात आली.

पुनर्विकासाच्या नावाने जुनी गुंठेवारी किंवा अनधिकृत घरे परस्पर पाडून पुन्हा त्यावर नवी वाढीव अनधिकृत बांधकामे असलेल्या मोठ्या इमारती उभारणाऱ्या इमारतींची आता चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येथे सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघड; अडीच कोटींची सुपारी, दोन जण ताब्यात

बीड-मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा एक मोठा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, जरांगे पाटलांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी जालना पोलिस अधीक्षकांना जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी तक्रार दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई केली आणि बीड जिल्ह्यातून दोन संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे दादा गरुड आणि अमोल खुणे अशी आहेत. यापैकी अमोल खुणे हा जरांगे पाटील यांचाच पूर्वीचा सहकारी असल्याचे समोर आले असून, या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, बीड शहरात काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी गुप्त बैठकाही घेण्यात आल्या होत्या. या बैठकीत जरांगे पाटलांच्या ओळखीतील काही जण उपस्थित होते. या बैठकीदरम्यान हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची डील ठरल्याची चर्चा आहे. ही माहिती मिळताच गंगाधर काळकुटे यांनी पोलिसांकडे लेखी निवेदन देऊन तक्रार केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री बीडमध्ये छापा मारून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र, पोलिसांनी अधिकृतरीत्या कोणतेही नाव जाहीर केलेले नाही.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः रात्री उशिरा जालना पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी पोलिसांना सर्व माहिती देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला कमजोर करण्यासाठी काही शक्ती प्रयत्न करत आहेत. पण आम्ही मागे हटणार नाही. आमच्या जीवावर बेतला तरी आम्ही समाजासाठी लढत राहू. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू केली असून, या कटामागे कोण, कशासाठी आणि किती लोक सहभागी आहेत हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राज्यात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कारण मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षणाच्या चळवळीचे प्रमुख चेहरे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मोठं आंदोलन झालं आहे. त्यामुळे त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार समोर येणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. पोलिस तपासातून यामागे कोणत्या राजकीय शक्तींचा हात आहे का? हा प्रश्न आता पुढे आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. जर वेळेवर कारवाई झाली नसती, तर गंभीर घटना घडली असती, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, त्यांना अतिरिक्त पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. राज्यातील राजकीय वातावरणात या प्रकरणामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. विरोधी पक्षांनी यावर सरकारकडे सुरक्षेच्या त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर सरकारने या कटामागील सर्व दोषींना कठोर शिक्षा होईल, असा विश्वास दिला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा प्रकार राज्याच्या राजकारणाला हादरवून सोडणारा ठरत आहे.

राज ठाकरे पुण्यात संतापले:डबल ढोलकी मराठी कलाकाराना म्हणाले ,एकीकडे संघाच्या संचलनाचे ढोल पिटविता, मग मनसेत का थांबता ?एकाच ठिकाणी रहा..

निष्क्रिय पदाधिकाऱ्यांनो पद सोडा ,म्हणाले- आकडे नकोत, काम दाखवा

पुणे- पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत संताप व्यक्त केला. पक्षातील अनेक पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांकडून अपेक्षित काम होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी थेट इशारा दिला की, काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा. इतके दिवस काय केलं ते दाखवा. राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पक्षाचे काम मनापासून करणाऱ्यांनाच आता संघटनेत स्थान मिळेल. निष्क्रिय कार्यकर्त्यांमुळे पक्षाचे नुकसान होत असल्याची तक्रार त्यांनी मांडली.काही कलाकार गेली अनेक वर्षे मनसेत आहेत पण RSS च्या संचलनात जातात तिथले फोटो सोशल मिडिया वर टाकून छाती ठोकून सांगता की मी संघाचा कार्यकर्ता आहे. मग मनसेत का आहात?एकाच ठिकाणी रहा.. असे सुनावले. पुण्यातील संकल्प हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शाखाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ही बैठक प्रत्यक्षात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आणि संघटनात्मक तयारीवर केंद्रित होती. परंतु राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर तोफ डागली. त्यांनी काही नेत्यांना थेट नाव घेऊन प्रश्न विचारले, मतदार याद्या पूर्ण का नाहीत? शाखांमध्ये बैठक का होत नाहीत? शहरातील लोकांशी संवाद कुठे आहे? त्यांच्या या प्रश्नांना बहुतेक पदाधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे सभागृहात काही काळ पूर्ण शांतता पसरली होती. राज ठाकरे यांनी सांगितले की, मनसेचा कार्यकर्ता जर लोकांमध्ये दिसत नसेल, तर पक्षाचे नाव टिकणार नाही. तुम्हाला जर पक्षासाठी वेळ नाही, तर ते स्पष्ट सांगा आणि पद सोडा, असा इशाराही त्यांनी दिला.

या बैठकीत मुळशी पॅटर्न फेम अभिनेता आणि मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश उर्फ पिट्या परदेशी यांनाही राज ठाकरे यांनी फटकारले. काही दिवसांपूर्वी परदेशी यांनी तसेच त्यांच्या काही सहकारी कलाकारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा फोटो पाहून राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत विचारले, तुम्ही छाती ठोकून सांगत होतात की मी संघाचा कार्यकर्ता आहे. मग मनसेत का आहात? एकाच ठिकाणी राहा. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले. राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, मनसेची ओळख आणि विचारधारा वेगळी आहे, आणि कार्यकर्त्यांनी ती जपली पाहिजे.

राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, पक्षाच्या शाखा हे मनसेचे बळ आहे. जर शाखाच निष्क्रिय राहिल्या तर पक्षाची ताकद कमी होते. त्यामुळे प्रत्येक शाखाध्यक्षाने आपल्या भागातील लोकांशी संपर्क ठेऊन स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवावा. त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले, मला आकडे नकोत, काम दाखवा. शाखांमध्ये लोकांची उपस्थिती वाढली पाहिजे, यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घ्या. त्यांनी मतदार याद्यांबाबतही नाराजी व्यक्त केली. मतदार यादी पूर्ण का नाहीत? हे तुमचं मूलभूत काम आहे. निवडणूक आली की शेवटच्या क्षणी धावाधाव सुरू होते, हे बंद झालं पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.

बैठकीचा मुख्य उद्देश पुण्यातील स्थानिक प्रश्नांवर चर्चा करणे आणि आगामी निवडणुकांसाठी धोरण निश्चित करणे हा होता. परंतु अपेक्षेप्रमाणे चर्चा पुढे न सरकल्याने राज ठाकरे नाराज झाले आणि त्यांनी बैठक अल्पावधीतच संपवली. बैठकीनंतर अनेक शाखाध्यक्ष गप्पच राहिले, तर काहींनी माना खाली घातल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत पक्षात मोठे फेरबदल होऊ शकतात. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना दूर करून सक्रिय कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांच्या या कठोर भूमिकेमुळे आता मनसेच्या संघटनात्मक कामाला गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

‘एसएईएल इंडस्ट्रीज’ने 4,575 कोटी उभारण्यासाठी ‘सेबी’कडे दाखल केला डीआरएचपी

एसएईएल इंडस्ट्रीज लिमिटेड ही अक्षय उर्जा क्षेत्रामधील भारतातील पाच अग्रगण्य स्वतंत्र वीज उत्पादक कंपन्यांपैकी (आयपीपी) एक आहे. या कंपन्या ऊर्ध्वपातळीवर एकत्रित कार्यप्रणाली असलेल्या असून, दि. 30 जून 2025 पर्यंतची कार्यक्षम क्षमता लक्षात घेतल्यास त्या स्वतःच्या सोलार मॉड्यूल निर्मिती क्षमतेने सुसज्ज आहेत (संदर्भ : क्रिसिलचा अहवाल). 

‘एसएईएल इंडस्ट्रीज कंपनी’ने सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या संस्थेकडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे. या आयपीओतून कंपनी प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सच्या इश्यूद्वारे एकूण 4,575 कोटी रुपयांची रक्कम (एकूण ऑफरचा आकार) उभारणार आहे

या प्रस्तावित इश्यूमध्ये 3,750 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स (फ्रेश इश्यू), तसेच भागधारकांकडील विक्रीसाठी ऑफर करण्यात आलेले (ऑफर फॉर सेल) 825 कोटी रुपयांचे शेअर्स यांचा समावेश आहे. 

या ‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’द्वारे ऑफर करण्यात येणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) या स्टॉक एक्सचेंजेसवर सूचीबद्ध होण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे (लिस्टिंग तपशील). 

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड, आणि अँबिट प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

कर आकारणी संकलन आणि घनकचरा उपायुक्त पदासाठी महापलिकेत जोरदार रस्सीखेच

पुणे- महापालिकेत एकीकडे निवडणूक विभाग,सांस्कृतिक विभाग यांच्याकडे कर्मचारी अधिकारी यांची मारामार होत असताना दुसरीकडे उपायुक्त कर आकारणी आणि कर संकलन पदासाठी काही अधिकारी वर्गात जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे वृत्त आहे.आणि या अनुषंगाने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यावर या प्रकरणी थेट मंत्रालयातून देखील दबाव आणण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे समजते आहे.ही दोन्ही खाती विशेष महत्वाची मानली जातात आणि थेट जनतेच्या मुलभूत सेवेशी संबधित आहेत.कर आकारणी संकलन हे खाते तर महापालिकेची तिजोरी सांभाळण्यात आघाडीवर असले पाहिजे अशी स्थिती आहे.आणि घनकचरा विभाग हे शहराच्या स्वच्छता आणि आरोग्याशी निगडीत असल्याने तेही कामकाजात अग्रेसर असलेच पाहिजे अशी भूमिका असते.पण केवळ याचमुळे ती मलईदार देखील समजली जातात.आता या पदांवर कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकारी बसनेच लोकांच्या हिताचे असते याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी जरी आयुक्तांवर असली तरी त्यांना त्यासाठी प्रचंड दबावाला सामोरे जावे लागते हि वस्तुस्थिती आहे.

दरम्यान गेल्या ३१ ऑक्टोबर रोजीच महापालिकेतील ३ अतिरिक्त आयुक्तांकडे आयुक्त नवल किशोर राम यांनी वर्गीकरण करून विविध खात्यांची जबाबदारी सोपविली आहे . पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील

अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांच्या कडे सामान्य प्रशासन विभाग,मुख्य लेखा व वित्त विभाग,लेखापरिक्षण विभाग,पाणीपुरवठा विभाग व पाणीपुरवठा प्रकल्प,घनकचरा व्यवस्थापन विभाग,आरोग्य विभाग,भवन रचना विभाग,अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभाग,विधी विभाग,उप आयुक्त (विशेष) विभाग ,समाज कल्याण विभाग,
समाज विकास विभाग,प्राथमिक शिक्षण विभाग,शिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभाग,कामगार कल्याण विभाग,मंडई विभाग,
जनरल रेकॉर्ड विभाग,तांत्रिक विभाग,,प्रशिक्षण प्रबोधिनी विभाग,मागासवर्ग कक्ष,परिमंडळ क्र. १ व २ असे २१ विभाग सोपविले आहेत
तर

अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) यांचे नियंत्रणाखाली
१)कर आकारणी व कर संकलन
२)बांधकाम विभाग (संपूर्ण नस्ती सह)
३)मलनिःसारण प्रकल्प (जायका)
४)मलनिःसारण देखभाल व दुरूस्ती विभाग
५)माहिती व तंत्रज्ञान विभाग
६)प्रकल्प विभाग
७)नदी सुधारणा प्रकल्प
८)विद्युत विभाग
९)सुरक्षा विभाग
१०)पर्यावरण विभाग
११)अतिक्रमण / अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग
१२)आकाशचिन्ह व परवाना विभाग
१३)मोटार वाहन विभाग
१४)जिल्हा नियोजन व विकास समिती विभाग (डी.पी.डी. सी.)
१५)मुद्रणालय विभाग
१६)नगर सचिव विभाग
१७)परिमंडळ क्र. ४ व ५

असे १७ विभाग सोपविण्यात आले आहेत .

अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) यांचे नियंत्रणाखाली

१)पथ विभाग
२)मालमत्ता व व्यवस्थापन विभाग
३)भूसंपादन व व्यवस्थापन विभाग
४)मध्यवर्ती भांडार विभाग
५)टेंडर सेल
६)उद्यान विभाग
७)क्रिडा विभाग
८)निवडणूक विभाग
९)सांस्कृतिक केंद्र विभाग
१०)प्रधानमंत्री आवास योजना
११)एस.आर.ए.
१२)माहिती व जनसंपर्क विभाग
१३)झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नवसन विभाग, चाळ विभाग

१४)स्थानिक संस्था कर विभाग
१५)जनगणना विभाग
१६)ऑप्टीकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर विभाग
१७)बी.एस.यु.पी. सेल
१८)बी. ओ. टी. सेल विभाग
१९)सायकल विभाग
२०)परिमंडळ क्र. ३

असे २० विभाग सोपविण्यात आले आहेत .


अधिकारी, कर्मचारी रजेवर जात असल्याने महापालिकेच्या निवडणूक कामकाजात अडथळा

पुणे- महापालिकेचे उप आयुक्त (निवडणूक) प्रसाद काटकर यांनी अधिकारी आणि कर्मचारी रजेवर जात असल्याने महापालिकेच्या निवडणूक कामकाजात अडथळा येत असल्याच्या प्रकारची गंभीर दखल घेतली असून निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कोणत्याही प्रकारची रजा किंवा सुट्टी खातेप्रमुखांनी मंजूर करू नये अत्यावश्यक बाबीसाठी निवडणूक कार्यालयाची पूर्व परवानगी घ्यावी असे आदेश काढले आहेत .

आपल्या कार्यालयी परिपत्रकातून दिलेल्या आदेशात निवडणूक प्रमुख प्रसाद काटकर यांनी म्हटले आहे कि,’पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे कामकाज नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन व राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे आदेश व निर्देशानुसार सुरु असून सद्यस्थितीत प्रभाग रचनेची कार्यवाही पूर्ण झालेली आहे व प्रारूप मतदार याद्यांचे कामकाज युद्ध पातळीवर सुरु असून निवडणूक विषयक इतर कामे ही अतित्वर्य व कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक आहेत. त्यानुषंगाने असे निदर्शनास आले आहे की, निवडणूक कर्तव्यावर काम करत असताना अधिकारी / कर्मचारी रजेवर जात आहेत. त्यामुळे निवडणूक कामकाजात अडथळा निर्माण होत आहे.
तरी या कार्यालयीन परिपत्रकाचे दिनांकापासून पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे संपूर्ण कामकाज पूर्ण होईपर्यंतचे कालावधीत निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त असणाऱ्या सर्व अधिकारी / कर्मचारी यांची कोणत्याही प्रकारची रजा / सुट्टी ही निवडणूक कार्यालयाची पूर्वपरवानगीशिवाय मान्य करू नये.

१८०० कोटींची जमीन ३०० कोटींत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये! अजितदादांचे सुपुत्र पार्थ ची कमाल

२७ दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये ५००! फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र!

पुणे- पुण्यातील प्रतिष्ठित आणि महागड्या कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरून वादळ उठलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीची अमेडिया कंपनी आणि दिग्विजय अमरसिंह पाटील या सहमालकाविरोधात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. या जमिनीची बाजार किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचं कागदोपत्री दाखवलं गेलं, परंतु प्रत्यक्ष किंमत 1800 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.अवघे १ लाखाचे भांडवल असलेल्या अजितदादा यांच्या सुपुत्राच्या म्हणजे पार्थ पवारांच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटीची जमीन अवघ्या ३०० कोटीला घेतल्याचा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे केल्याने आज राजकारणात खळबळ उडाली . पुण्यातील जैन बोर्डिंग च्या घोटाळ्यावर पडदा पडतो ना तोच पार्थचा हा घोटाळा आता पुढे आल्याने अजितदादा ऐन निवडणुकीच्या तोंडावर यास उत्तर देणार काय हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.

काय म्हटले आहे अंबादास दानवे यांनी ते पहा …

उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं. गंमत तर पुढे आहे..एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल! दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली! २२ एप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे २७ दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये ५००! फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र!

यामुळे उपस्थित झालेत प्रश्न …

सरकारच्या ताब्यातली 40 एकर मोक्याची जमीन देताना सरकारी यंत्रणा वायुवेगानं कशी धावली? अमेडिया कंपनीला कोणताही पूर्वानुभव नसताना कंपनीला स्टँप ड्युटीत माफी कशी मिळाली?300 कोटींचा जमीन व्यवहाराचे आर्थिक पुरावे असलेले चेक, एनईएफटी याची कागदपत्रं रजिस्ट्रेशनमध्ये का जोडण्यात आली नाहीत? जमीन व्यवहारात अनेक कच्चे दुवे आहेत या दुव्यांकडं जाणिवपूर्वक दुर्लक्ष झालं का?

अमेडिया कंपनीने या जमिनीची खरेदी करताना आयटी पार्क उभारणीच्या नावाखाली सरकारकडून स्टँप ड्युटी माफी मिळवल्याचं आरोपात नमूद करण्यात आलं आहे. 22 एप्रिल 2025 रोजी कंपनीनं आयटी प्रकल्पाचा ठराव केला आणि फक्त दोन दिवसांत म्हणजे 24 एप्रिल रोजी उद्योग संचालनालयानं त्यावर स्टँप ड्युटी माफ, असा शेरा नोंदवला. इतक्या वेगाने झालेल्या प्रशासकीय हालचालींनी संशय निर्माण केला आहे. आश्चर्य म्हणजे, या संपूर्ण व्यवहारासाठी फक्त 500 रुपयांची स्टँप ड्युटी भरल्याचं समोर आलं असून, एवढ्या मोठ्या मूल्याच्या जमिनीचा व्यवहार फक्त काही आठवड्यांत पूर्ण झाला. हे सर्व घडत असताना, संबंधित कंपनीला कोणताही पूर्वानुभव नसल्याचं आणि तरीही तीला सरकारी सवलती कशा मिळाल्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महार वतनाची जमीनसदर जमीन ही महार वतनाची असल्यामुळे कायद्यानुसार तिचा व्यवहार करता येत नाही, असा तज्ज्ञांचा दावा आहे. वतनधारक जमीन विकली गेल्यास त्या किमतीचा काही भाग सरकारला नजराण्याच्या स्वरूपात द्यावा लागतो. मात्र, या व्यवहारातील कागदपत्रांमध्ये असा कोणताही उल्लेख नसल्याचे सांगितले जात आहे. कागदोपत्री हा व्यवहार पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर या शीतल तेजवानी यांच्या कंपनीसोबत झाला असल्याचं भासवलं असलं, तरी प्रत्यक्षात अमेडिया कंपनीनं मूळ गायकवाड आणि 274 जमिनमालकांसोबत खरेदी खत नोंदवलं असल्याचं उघड झाले आहे. या प्रकरणातील आर्थिक देवाणघेवाण, चेक, एनईएफटी व्यवहार किंवा बँक पुरावे, हे नोंदणी दस्तावेजात जोडले गेले नाहीत, यावरून या व्यवहारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाचे पंतप्रधान मोदी 7 नोव्हेंबर रोजी करणार उद्घाटन

नवी दिल्ली

संस्कृती मंत्रालय 7 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे  “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या 150 वर्षांच्या स्मरणोत्सवाचा उद्घाटन समारंभ आयोजित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. हा कार्यक्रम 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या वर्षभर चालणाऱ्या राष्ट्रव्यापी स्मरणोत्सवाचा औपचारिक प्रारंभ आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आणि आजही राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना जागृत करणाऱ्या या कालातीत रचनेच्या 150 वर्षांचा हा उत्सव आहे.

2025 हे वंदे मातरम् चे 150 वे वर्ष आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेले आपले  “वंदे मातरम्”, हे राष्ट्रीय गीत 1875 मध्ये 7 नोव्हेंबर रोजी असलेल्या अक्षय नवमीच्या शुभ मुहूर्तावर लिहिले गेले असे मानले जाते. वंदे मातरम् सर्वप्रथम त्यांच्या आनंदमठ या कादंबरीचा भाग म्हणून ‘बंगदर्शन’ या साहित्यिक नियतकालिकात मालिका स्वरूपात आणि नंतर 1882 मध्ये एका स्वतंत्र पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाले. त्या काळात, भारत मोठ्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय बदलांमधून जात होता आणि राष्ट्रीय अस्मिता तसेच वसाहतवादी राजवटीला विरोध करण्याची जाणीव वाढत होती. मातृभूमीला सामर्थ्य, समृद्धी आणि देवत्वाचे प्रतीक मानणारे हे गीत भारताच्या जागृत होत असलेल्या एकता आणि आत्मसन्मानाच्या भावनेला काव्यात्मक अभिव्यक्ती देत होते. हे गीत लवकरच राष्ट्रासाठी भक्तीचे अखंड प्रतीक बनले. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी घोषित केले की, स्वातंत्र्य लढ्यात ऐतिहासिक भूमिका बजावलेल्या “वंदे मातरम्” या गीताला  “जन गण मन” या राष्ट्रगीताच्या बरोबरीने सन्मान दिला जाईल.

या सोहळ्याला सकाळी ठीक दहा वाजता सर्व सार्वजनिक  स्थानांवर वंदे मातरमच्या पूर्ण आवृत्तीच्या सामूहिक गायनाने सुरुवात होणार असून त्यात सर्व नागरिक, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नियुक्त लोकप्रतिनिधी, पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स, शिक्षक, वाहनचालक, दुकानदार आणि समाजातील सर्व संबंधित घटक भाग घेतील. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होईल.

वंदे मातरम गीताचे ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एक ऑक्टोबर 2025 रोजी वंदे मातरम्  या राष्ट्रीय गीताच्या 150 वर्षा निमित्त देशभरात उत्सव साजरा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर, 24 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय अंमलबजावणी समितीने  7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 पर्यंत वर्षभर हा सोहळा साजरा करण्यास मान्यता दिली.

उद्घाटन समारंभाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे असतील:

प्रमुख पाहुण्यांच्या आगमनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम

राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’च्या 150 वर्षांच्या इतिहासावर आधारित प्रदर्शन.

भारतमातेला पुष्पार्पण सोहळा

वंदे मातरम: नाद एकम, रूपम अनेकम:

वंदे मातरमच्या 150 वर्षांच्या इतिहासावर  लघुपटाचे प्रदर्शन.

स्मारक तिकीट आणि नाण्याचे प्रकाशन.

प्रमुख पाहुण्यांचे  भाषण.

वंदे मातरमचे सामूहिक गायन.

सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेश, केंद्र सरकारची मंत्रालये/विभाग आणि त्यांची संलग्न/अधीनस्थ कार्यालये आपल्या कार्यालय परिसरात 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता “वंदे मातरम्” या गीताचे सामूहिक गायन आयोजित करतील. हे गायन उद्घाटन समारंभाशी समन्वयित असेल.या वेळी पंतप्रधानांच्या संबोधनाचे  थेट प्रक्षेपण देशभरातील सर्व कार्यालये आणि संस्थांमध्ये सामूहिकरीत्या पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल.

संस्कृती मंत्रालयाने या उपक्रमासाठी एक विशेष वेबसाइट:  https://vandemataram150.in/   सुरू केली आहे. या संकेतस्थळावर नागरिक आणि संस्थात्मक सहभागासाठी खालील सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत:

  • अधिकृत ब्रँडिंग साहित्य (होर्डिंग्ज, बॅनर्स, वेब क्रिएटिव्ह्ज)
  • लघुपट आणि निवडक प्रदर्शनी
  • सामूहिक गायनासाठी संपूर्ण गीताचा संगीतबद्ध ध्वनीफीत व गीतपाठ
  • “कराओके विथ वंदे मातरम्” सुविधा

या उपक्रमात देशातील सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे, जेणेकरून आपल्या राष्ट्रीय गीताबद्दलचा देशभक्तीचा आणि कृतज्ञतेचा भाव सामूहिकरीत्या व्यक्त करता येईल.हे गीत आजही आपल्याला अभिमान, आदर आणि एकात्मतेच्या भावनेने एकत्र बांधून ठेवते