Home Blog Page 599

स्वतःच्या नावात आईचे नाव लावण्याचा निर्णय महिलांचा सन्मान वाढवणारा : डॉ गोऱ्हे

मुंबई दि.८: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घरेलू कामगारांसह समस्त महिला वर्गासाठी अर्थात लाडक्या बहिणींसाठी असंख्य महत्त्वपूर्ण आणि क्रांतीकारी निर्णय घेतले. घरेलू कामगारांसाठी योजना आणल्या तर स्वतःच्या नावात वडिलांसह आईचेही नाव लावण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी समस्त महिलांचा सन्मान वाढवला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी केले.

सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटनेच्या वतीने मुंबईतील चेंबूर येथे काल गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी घरेलू कामगारांसाठी आयोजित भाऊबीज मेळावा कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या.

डॉ नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जात असलेल्या स्त्री आधार केंद्राच्यावतीने घरेलू कामगारांसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा उल्लेख डॉ गोऱ्हे यांनी यावेळी केला. त्या म्हणाल्या, स्त्री आधार केंद्रामध्ये अनेक घर कामगार करणाऱ्या महिलांचा समावेश असल्याने त्यांचे प्रश्न अचूकपणे समजून घेण्यास मदत झाली. त्यातून विधानपरिषदेत घरेलू कामगारांसाठी विधेयक मांडण्यात आले, त्यावेळी वास्तव मांडता आले.

त्या म्हणाल्या, हे विधेयक मंजूर करताना घर कामगारांसाठी कल्याण मंडळ सुरू करण्याची संकल्पना देखील मांडली. समाजातील अवघड कामे घर कामगार मंडळी करत असतात. त्यांच्याप्रती समाजाने आदराची आणि सन्मानाची भावना कायमच ठेवली पाहिजे.

गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घर कामगार करणाऱ्या वर्गाच्या दृष्टीने हिताचे असणारे अनेक निर्णय घेतले. या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी केल्याने कामगार वर्गाला फायदा झाल्याचे दिसून येत आहे, याकडे डॉ गोऱ्हे यांनी लक्ष वेधले.

घर कामगार करणाऱ्या महिलांनी सुरक्षेच्या दृष्टीने सावध रहावे, स्वतःला कणखर बनवावे, त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, असे मार्गदर्शन करतानाच अनेक घटनांमध्ये महिला कामगारांना त्रास देणाऱ्या लोकांना शिक्षा झालेली आहे, हे डॉ गोऱ्हे यांनी उपस्थित घरेलु कामगारांच्या निदर्शनास आणून दिले आणि त्यांच्यातील आत्मविश्वास जगवला.

राज्यातील सर्वच घरकाम करणाऱ्या महिला या मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण झाल्या आहेत, असे सांगून डॉ गोऱ्हे म्हणाल्या, या सर्वच महिलांना अभिमान वाटावा असा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारने घेतला आहे. स्वतःच्या नावापुढे वडीलांप्रमाणेच आईचे नाव लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन महायुती सरकारने महिलांचा समाजातील सन्मान वाढवला आहे.

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, सर्वांना मान ताठ करून जगण्यास शिकवले. तोच आदर्श घेऊन सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटना काम करत आहे. मराठे दाम्पत्याने घर कामगारांच्याबाबतीत वाखाणण्याजोगे काम केले आहे, अशा शब्दात डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे कौतुक केले.

याप्रसंगी माजी नगरसेविका आशाताई मराठे, संघटनेचे अध्यक्ष सुभाष मराठे, उपाध्यक्ष सलीम शेख यांसह इतर मान्यवर व घरेलू कमगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘गुलाबी’ मैत्रीचा प्रवास उलगडला…

बहुप्रतीक्षित ‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला. गुलाबी थीम असणाऱ्या या सोहळ्यात चित्रपटाची संपूर्ण टीम सहभागी झाली होती. यावेळी ‘गुलाबी’च्या मॅशअपवर लहानग्यांनी सुंदर सादरीकरणही केले. गुलाबी नगरी, जयपूरच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या तीन स्त्रियांच्या मैत्रीचा हा प्रवास प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारा ठरणार आहे. तीन मैत्रिणींच्या मैत्रीचा प्रवास आणि त्यांच्या स्वप्नांची सफर दर्शवणारा हा कमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून एकत्र आलेल्या या तीन मैत्रिणी कशा आपल्या आयुष्यातील संघर्षांना सामोरे जातात आणि मैत्रीतून जगण्याची एक वेगळी दिशा शोधतात, हे या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.

‘गुलाबी’ ही कथा फक्त मैत्रीची नसून, त्यांच्या वैयक्तिक संघर्षांची आणि आत्मसन्मानाच्या शोधाची गोष्ट आहे. या प्रवासात श्रुती मराठे, अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिका मुख्य आहेत. तिघींच्या प्रवासाची रंगमय झलक ट्रेलरमध्ये दिसत असतानाच जयपूरमधील विविध रंगांचे आणि सौंदर्याचे दर्शनही घडत आहे.

दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, ” या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही मैत्री, स्वप्न आणि स्वातंत्र्य यावर प्रकाश टाकला आहे. गुलाबी केवळ स्त्रियांच्या भावविश्वाचा कहाणी नसून त्या आपला प्रवास कसा घडवतात, हेही या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्राच्या जीवनात असलेल्या गुलाबी रंगाची छटा दाखवली आहे. हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना एक सकारात्मक दृष्टिकोन देईल, याची मला खात्री आहे.”

अभ्यंग कुवळेकर यांनी दिग्दर्शित ‘गुलाबी’ या चित्रपटाची निर्मिती सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांनी व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, शैलेश दातार, आणि निखिल आर्या यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. संगीतकार साई-पियुष यांचे संगीत चित्रपटाच्या भावनांना आणखी उजळवते, ज्यामुळे ही कथा प्रेक्षकांना अधिक भावते

दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेणाऱ्या लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबर पर्यंत हयातीचे दाखले जमा करण्याचे आवाहन

पुणे, दि. ८ : दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेणाऱ्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी त्यांचे हयातीचे दाखले पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रत्यक्ष जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल स. दे. हंगे (नि.) यांनी केले आहे.

पोस्टाने हयातीचे दाखले पाठविणाऱ्या लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत दाखले पोहचतील याची दक्षता घ्यावी. हयातीचे दाखले विहित मुदतीत पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास प्राप्त होणार नाहीत अशा लाभार्थ्यांचे अनुदान माहे डिसेंबर २०२४ पासून बंद करण्यात येईल. हयातीचे दाखले प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना फरकासह अनुदान देण्यात येईल. तसेच ज्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, अशा लाभार्थ्यांचा मृत्युचा दाखला अर्जासहीत त्यांच्या अवलंबितांनी जमा करावा, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

कोथरूड, कर्वे पुतळ्याजवळ आणि शनिवार पेठेत छापा:बनावट विदेशी मद्य प्रकरण

विधानसभा निवडणूक कालावधीत निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डी विभागाच्या
कारवाईत परराज्यातील दारू, ०४ वाहनासह ४० लाख ६४ हजार ३६० रुपयांचा
मुद्देमाल जप्त

पुणे-
आदर्श निवडणूक आचारसहिंता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्य आय्कुत डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक राज्य उत्पादन शुल्कप्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग सागर धोमकर, पुणे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चरणसिंग राजपूत, पुणेउप-अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्कसंतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डी विभागाकडून दिनांक २७/१०/२०२४ रोजी घोटावडे गावच्या हद्दीत, आंबटवेट रोडवर दारूबंदी गुन्ह्याकामी सापळा लावला असता, टाटा कंपनीचे एस गोल्ड या प्रकाराचे चारचाकी वाहन क्र. MH १२ TV५१२२ या वाहनामधून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतीबंधित असलेली विदेशी दारूचे एकूण १८ बॉक्स (८६६ सिलबंद बाटल्या) तसेच महाराष्ट्र राज्याचे बनावट लेबल असा एकूण ३,५५,१४०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी किरण ज्ञानोबा साळुंके वय ४६ वर्षे, रा. फ्लॅट नं. ३०१, अंजली हाईट्स, भूमकर चौक, भगवान नगर, वाकड, पुणे यास अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याची ३ दिवस एक्साईज कोठडी मंजूर केली पुढील तपासात दिनांक ०४/११/२०२४ रोजी कोथरूड, कर्वे पुतळ्याजवळ तपासाकामी छापा टाकला असता सदर गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे विविध बॅन्डचे विदेशी मद्याचे एकूण १०,००० नग बनावट लेबलसह एकूण ८८,१६०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर गुन्ह्यातील पुढील तपासात दिनांक ०६/११/२०२४ रोजी शनिवार पेठ, येथून सदरचे बनावट लेबल छपाई करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मशीनसह एकूण ३०,०२,२५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असा सदर गुन्ह्यात एकूण ३४,४५,५५०/- रुपयांच्या मुद्देमालासह एकूण ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डी विभाग सचिन श्रीवास्तव, ई विभागाचे निरीक्षक, शैलेश शिंदे, स.दु.नि. स्वप्नील दरेकर, स.दु.नि. सागर धुर्वे, जवान गजानन सोळंके, जवान संजय गोरे, यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असून पुढील तपास निरीक्षक,सचिन श्रीवास्तव करीत आहेत.
तसेच सदर विभागाने ०१ ऑक्टोबर २०२४ पासून आजपर्यंत एकूण ३१ गुन्हे नोंद करून ३१ आरोपींना अटक करून ४ वाहनांसह एकूण ४०,६४,३६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये गावठी दारू ९९१ लिटर, कच्चे रसायन १६०० लिटर, ताडी २२७ लिटर, देशी दारू ३३.०० ब. लि., बिअर २५५ ब. लि. व परराज्यातील गोवा निर्मित मद्य एकूण १५५.८८ ब. लि. यांचा समावेश आहे. सदर कारवाई विभागाचे दुय्यम निरीक्षक, विजय सूर्यवंशी, गणपती थोरात, श्रीमती शीतल देशमुख जवान श्रीमती वृषाली भिटे, श्री. वामन माळी, जवान नि वाहनचालक दत्तात्रय आबनावे यांनी केली केली.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे दुसरे रँडमायझेशन पूर्ण

पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघात २०२४ निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (इव्हीएम) आणि व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) मशीन्सचे दुसरे रँडमायझेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. निवडणूक आयोगाच्या रिटर्निंग ऑफिसर (RO) हँडबुकमधील मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करत ही प्रक्रिया राबवण्यात आली.
या प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली आणि तहसीलदार किरण सुरवसे यांच्या मार्गदर्शनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यात आली. इव्हीएम कक्षाचे नोडल अधिकारी सचिन आखाडे, मंडळ अधिकारी किशोर पाटील, गजानन किरवले आणि नारायण पवार यांनी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली होती.
प्रशिक्षण सत्रादरम्यान, निवडणूक प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या सुरक्षिततेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. या रँडमायझेशन प्रक्रियेत प्रत्येक मशीनचे विशिष्ट मतदान केंद्रावर असलेले स्थान निश्चित करण्यात आले असून, यामुळे निवडणुकीत पारदर्शकता राखली जाईल.
कार्यक्रमात उपस्थित उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्सच्या वापराची संपूर्ण माहिती देण्यात आली. EMS २.० प्रणालीद्वारे तयार केलेली, मशीनच्या सिरियल नंबरसहित प्रत्येक मतदान केंद्रासाठी नियुक्त केलेली यादी उमेदवार/प्रतिनिधींना देण्यात आली.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी आठ पथकांची नियुक्ती

पुणे, दि. ८: पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील ९१ जेष्ठ नागरिक व सहा दिव्यांग अशा एकूण ९७ मतदारांच्या गृह मतदानासाठी आठ पथकांची नियुक्ती करण्यात आली असून १४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसात गृह मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कळविली आहे.

गृह मतदान पथकामध्ये एक मतदान अधिकारी, एक इतर अधिकारी, पोलीस कर्मचारी, शिपाई,व्हिडिओ ग्राफर व सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश राहील. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांना भारतरत्न सर विश्वेसरैया हॉल, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ५, तिसरा मजला अर्सेनल प्लॉट, हॉटेल सागर प्लाझा समोर, कॅम्प, पुणे येथील सभागृहात १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनंदा भोसले तसेच पोस्टल बॅलेटचे समन्वय अधिकारी पी.के. कांबळे मार्गदर्शन करणार आहेत.

आम्ही व्यापारी ग्राहकांनाही मतदानासाठी आवाहन करणार- सुनील गहलोत

पुणे -पुणे शहर राजस्थानी समाजाच्या संघटनेने भारतीय जनता पक्षाला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. दिवाळीनिमित्त समस्त राजस्थानी समाज पुणे शहराच्या वतीने बाणेर मध्ये दिवाळी सस्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संघटनेच्या वतीने एकमताने भाजपा आणि कोथरुड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.यावेळी अध्यक्ष सुनिल गहलोत, महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित उमेश चौधरी, रामलाल चौधरी, चंदुलालजी भायल, जयप्रकाश पुरोहित, दिनेश चौधरी (सिवासी), लक्ष्मणराव परिहार, भाजपा नेते प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, प्रकाश तात्या बालवडकर, लहुजी बालवडकर यांच्या सह भाजपचे इतर पदाधिकारी आणि राजस्थानी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजस्थानी समाज संघटनेचे अध्यक्ष सुनील गहलोत म्हणाले की, राजस्थानी समाज भाजपा वर प्रेम करणारा आहे. आम्ही व्यापारी आहोत, त्यामुळे आम्ही तर मतदान करणारच आहोत, पण आम्ही आमच्या ग्राहकांनाही भाजपा आणि कोथरूडचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनाच मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहोत, अशी ग्वाही दिली.

समाजाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, स्वातंत्र्य काळापासून राजस्थानी बांधवांचं भाजपावर प्रेम राहिलेलं आहे. भैरवसिंह शेखावत हे तीनदा राजस्थानचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ते उपराष्ट्रपती झाले. त्यानंतरही वसुंधरा राजेजी, राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री भजनलालजी शर्माजी यांच्या पाठिशी राजस्थानी समाज उभा राहिला आहे.

ते पुढे म्हणाले की, राजस्थानी समाज हा व्यापारी समाज आहे. व्यापाराच्या निमित्ताने तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जातो, तिथे आपलं स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करतो. माननीय नरेंद्र मोदीजी यांच्यावरही समाजाने भरभरून प्रेम केले आहे. समाजाच्या मागणीनुसार माननीय मोदीजींनी एलबीटीतून व्यापाऱ्यांची सुटका केली. त्यामुळे भविष्यात ही समाजाचे प्रेम भाजपावर कायम राहो, अशी भावना यावेळी व्यक्त केली.

शिवराय म्हटले की देवेंद्र फडणवीस यांच्या अंगाची आग होते:सुरतेतही शिवरायांचे मंदिर बांधणार-उद्धव ठाकरे

बुलढाणा -शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधण्यात येईल. पण शिवराय हा शब्द उच्चारल्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांच्या अंगाची आग होते. त्यांना ते सहनच होत नाही, असे ते म्हणालेत. भाजपला केवळ मतांसाठी शिवाजी महाराज हवे असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.आणि सुरतेतही शिवरायांचे मंदिर बांधणार अशी घोषणाही केली .
उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी दुपारी बुलढाण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी महायुती विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, आपण सर्व महाराष्ट्र प्रेमी आहोत. पण दुसरीकडे महाराष्ट्र लुटणारे महाराष्ट्र द्रोही आहेत. मागच्यावेळी आपल्याकडून एक चूक झाली. मी सध्या निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत आहे. पण प्रत्येक ठिकाणी आपल्याविरोधात आपलाच गद्दार उभा राहिला आहे. साहजिकच चूक माझीच होती.
या लोकांना गेल्यावेळी मी उमेदवारी दिली होती. त्यानंतर जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले होते. मी त्या चुकीसाठी तुमची माफी मागतो. पण आता मी या चुकीची पुनरावृत्ती करणार नाही. ही चूक सुधारण्यासाठी मी येथे जयश्री शेळके यांना उमेदवारी दिली आहे. आता विश्वासघात करणाऱ्यांना धडा शिकवा.
उद्धव ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले. हा शिवरायांचा पवित्र भगवा मावळ्याच्या हातात शोभतो, दरोडेखोरांच्या हातात शोभत नाही. आपल्या पक्षावर त्यांनी दरोडा घातला. चोरी नव्हे अख्खा दरोडा घातला. 40 जणांच्या टोळीने दरोडा टाकून आपला पक्ष चोरून नेला. आता म्हणतात हा पक्ष आमचाच आहे. हे गद्दार, धोकेबाज व खोकेबाज लोक आहेत. पण आता 50 खोके नॉट ओके. त्यांनी आपल्या भावी पिढ्यांसाठी भरपूर कमावले आहे. त्यांची घरे भरली. पण गरिबांची रिती झाली. त्यामुळे आता प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे.
बुलढाणा म्हटले की मातृशक्तीला वंदन केलेच पाहिजे. आपले सरकार आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे एक चांगले मंदिर बांधणार आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर हे गद्दार जिकडे पळून गेले होते, त्या सुरतेतही बांधणार आहे. का नाही बांधायचे? हे केवळ घंटा वाजवण्यासाठी व केवळ पळी – पंचपात्र घेऊन बसण्यासाठी नसेल. हे मंदिर आमचे संस्कारपीठ असेल.
देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराजांच्या मंदिरावर आक्षेप घेत आहेत. कारण, शिवाजी महाराज की जय म्हटले की, त्यांच्या अंगाची आग होते. त्यांनी मला मुंब्र्यात मंदिर बांधण्याचे आव्हान दिले. मुंब्रा महाराष्ट्रातच आहे. फडणवीस यांनी आमचा दाढीवाला गद्दार फोडून जो आपल्या डोक्यावर बसवला आहे, तो मिंधे ज्या जिल्ह्यातील आहे, त्याच जिल्ह्यात हे मुंब्रा आहे. फडणवीस यांनी हे लक्षात घ्यावे. मग तुम्ही अडीच वर्षे त्यांच्यासोबत अंडी उबवत बसला होतात का? ज्या जिल्ह्यातील तुम्ही मुख्यमंत्री केला, त्या जिल्ह्यात मंदिर बांधणे तुम्हाला अवघड वाटते का? आजही मुंब्र्याच्या वेशीवर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, सावित्रीबाई, जिजाऊ यांची चांगली शिल्पे उभी करण्यात आली आहेत. मग मंदिर महाराजांचे नाही तर काय मोदींचे बांधायचे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
भाजपला शिवाजी महाराज हे केवळ मतांची मशिन वाटते. हे गाजावाजत करत कुठेही पुतळे बांधतात. त्यांना मते मागण्यासाठी शिवाजी महाराज चालतात. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी मालवण येथे महाराजांचा पोकळ पुतळा बांधला. त्यांचे प्रेम पोकळ व पुतळाही पोकळ. हे तेवढ्यावरच थांबले नाहीत. महायुतीचे सरकार आतापर्यंतचे सर्वात भ्रष्ट सरकार आहे. त्यांनी पुतळ्यातही भ्रष्टाचार केला. अशुभ हातांनी केलेले कोणतेही काम यशस्वी होत नाही. त्यानुसार मोदींच्या हातांनी उभा केलेला पुतळा वर्षभराच्या आतच कोसळला.
आता हा पुतळा वाऱ्याने कोसळल्याचा कांगावा केला जात आहे. ज्या महाराजांनी सिंधुदुर्ग उभा केला, तो किल्ला आजही समर्थपणे वादळ – वाऱ्यांना तोंड देत उभा आहे. पण आताच्या आधूनिक काळात उभा केलेला पुतळा कसा पडतो?
लोकसभा निवडणुकीत मशालीच्या प्रचारगीतात शिवाजी महाराजांचा उल्लेख होता. तो उल्लेख काढण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला. पण आम्ही तो उल्लेख वगळला नाही. आमचे काहीही झाले नाही. पण आता तुम्हा महाराजांचे नाव पुसण्यास निघालात. कोश्यारी महाराजांचा अवमान करून निघून गेले. प्रफुल्ल पटेल यांनी महाराजांचा जिरेटोप मोदींच्या डोक्यात घातला. हे पाहून महाराष्ट्राच्या हृदयात जखम झाली. म्हणून मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचे मंदिर बांधणार असून, या मंदिरात त्यांनी दिलेली सर्वच शिकवण दिसून येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पंडित नेहरू ते राहुल गांधी सारेच आरक्षणविरोधी:नरेंद्र मोदी यांचा आरोप

धुळे- काँग्रेसचा जाती-जातीमध्ये भांडणे लावण्याचा डाव आहे. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंपासून ते त्याच परिवारातील युवराज (राहुल गांधी) पर्यंत नेहरू-गांधी परिवार आरक्षण विरोधी आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते धुळ्यामध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते.मोदी म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणासाठी मोठी लढाई लढली. दलित, मागासवर्गीयांना आरक्षण मिळू नये म्हणून माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी प्रयत्न केले. एससी, एसटींना आरक्षण मिळू नये यासाठी इंदिरा गांधींनी प्रयत्न केले. राजीव गांधी ओबीसी आरक्षणविरोधी होते. आता त्याच परिवारारातले युवराज आरक्षण विरोधी आहेत. त्यांच्याकडून देशातील ओबीसींना छोट्या-छोट्या जातीमध्ये वाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केला.

काँग्रेसने पूर्वी धर्माच्या नावावर कट रचला. आता जाती-जातीमध्ये फूट पाडणे सुरू आहे.आदिवासी, ओबीसींच्या लहान-लहान जातींमध्ये भांडणे लावण्यात येत आहेत. या जाती एक राहिल्या तर त्यांची ताकद वाढेल. आम्ही एकत्र राहिलो, तरच सुरक्षित असू, असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी धुळ्यातील आपल्या पहिल्या प्रचारसभेत विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवत राज्यातील जनतेला महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाके आहेत, ना ब्रेक आहे. त्यातच त्यांच्यात ड्रायव्हरच्या सिटवर बसण्यासाठीही वाद सुरू आहे. त्यांच्यात चारही बाजूंनी वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्न ऐकू येत आहेत, याऊलट महायुती सरकारच्या अडीच वर्षांत महाराष्ट्र विकासाच्या एका नव्या उंचीवर पोहोचला आहे, असे ते म्हणालेत. आचारसंहिता संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मागील अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या विकासाला जी गती मिळाली आहे ती थांबू देणार नाही. पुढील 5 वर्षांत महाराष्ट्राच्या प्रगतीला एका नव्या उंचीवर घेऊन जाणार. महाराष्ट्राला हवे असणारे सुशासन केवळ महायुतीचेच सरकार देऊ शकते. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाके आहेत, ना ब्रेक आहे आणि ड्रायव्हरच्या सिटवर बसण्यासाठीही त्यांच्यात वाद सुरू आहे. त्यातच चारही बाजूंनी वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्न ऐकू येत आहेत.राजकारणात आल्यानंतर प्रत्येकाचे एक लक्ष्य असते. आमच्यासारखे लोक जनतेला ईश्वराचे रूप मानतात. आम्ही जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आलोत. याऊलट काही लोकांच्या राजकारणाचा आधार हा लोकांना लुटण्याचा आहे. हे लोक सरकारमध्ये आले की, ते विकास ठप्प करतात. ते प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार करतात. तुम्ही महाविकास आघाडीचे धोक्यातून बनलेल्या सरकारचे अडीच वर्षे पाहिले. या लोकांनी प्रथम सरकारची लुट केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लूट केली. त्यांनी मेट्रो प्रकल्प ठप्प केले. वाढवण बंदरांच्या कामात अडथळे निर्माण केली. समृद्धी महामार्गाच्या कामात अडथळे निर्माण केले.महाविकास आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रत्येक प्रकल्प ठप्प केला. या प्रकल्पांमुळे येथील जनतेचे भविष्य उज्ज्वल होणार होते. ही स्थिती तेव्हा बदलली, जेव्हा तुमच्या आशीर्वादाने येथे महायुतीचे सरकार आले. महायुतीच्या अडीच वर्षांत महाराष्ट्राने विकासाचे नवे विक्रम रचले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अडीच वर्षांत महाराष्ट्राला त्याचा गौरव परत मिळाला आहे. विकासाचा भरवसा परत मिळाला आहे. त्यामुळे येथील मतदारांनी भाजप महायुती आहे, तरच गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे हे लक्षात घ्यावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.मोदी म्हणाले, मी आज महायुतीला खूप खूप शुभेच्छा देतो. या सरकारने महाराष्ट्राला नवी समृद्धी देणारा वचननामा जाहीर केला आहे. महायुतीच्या 10 संकल्पांची खूप चर्चा होत आहे. शिंदे, माझे मित्र देवेंद्र फडणीस व अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या सूचनांचा हा शानदार वचननामा तयार केला आहे. महायुतीचा वचननाम्यामुळे विकासाची वाढेल गती, महाराष्ट्राची होणार हमखास प्रगती.महायुतीच्या या वचननाम्यात प्रत्येक वर्गाच्या आर्थिक प्रगतीची योजना आहे. समानतेचा भाव आहे. सुरक्षेची हमी आहे. तसेच सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विश्वास आहे. यात महाराष्ट्राच्या भविष्याचा रोडमॅप आहे. मी अशा जनकल्याणाच्या जाहिरनाम्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचेही कौतुक करतो. हा वचननामा विकसित महाराष्ट्राचा आधार बनेल, विकसित भारताचा आधार बनले, असे ते म्हणाले.

या सभेला आमच्या भगिनी दूरवरून आल्यात. विकसित महाराष्ट्र व विकसित भारतासाठी आमच्या भगिनींचे जीवन सहज सुलभ बनवणे फार महत्त्वाचे आहे. कारण, जेव्हा महिला पुढे जातात, तेव्हा संपूर्ण समाज वेगाने प्रगती करतो. त्यामुळे मागील 10 वर्षांत केंद्राने महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक मोठे निर्णय घेतले. मागील सरकारने सैनिकी शाळांपासून कामाच्या विविध क्षेत्रांत महिलांचे मार्ग रोखला होता. पण हा मोदी आहे. त्याने हे सर्व बंधन काढले. महिलांना अधिकाधिक क्षेत्रांत कामाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी सर्व दरवाजे उघडले. आम्ही नारीशक्ती वंदन कायद्याद्वारे विधानसभा व संसदेत महिलांना आरक्षणाचा अधिकार दिला. शौचालयांपासून गॅस सिलिंडरपर्यंत सर्वच योजनांच्या केंद्रस्थानी महिलाच आहेत. आम्ही या योजना सुरू केल्या तेव्हा काँग्रेसने आमची खिल्ली उडवली. पण आज याच योजना महिला सक्षमीकरणाच्या पर्याय बनल्या आहेत, असे मोदी म्हणाले.पीएम मोदी पुढे म्हणाले, राज्यातील महायुती सरकारही आमचा दृष्टिकोन पुढे नेण्याचे काम करत आहे. येथील माता-भगिनींसाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या. आज महाराष्ट्रातील प्रत्येक दस्तावेजांवर आईचे नाव अनिवार्य करण्यात आले आहे. महायुती सरकारच्या या निर्णयाचे प्रत्येकाने मोकळ्या अंतकरणाने स्वागत केले. महाराष्ट्र पोलिसांतही 25 हजार मुलींच्या भरतीतून एक नवा विश्वास तयार होईल असा मला विश्वास आहे. यामुळे महिलांचे सामर्थ्य वाढेल, एक नवा विश्वास तयार होईल, महिला सुरक्षेतही वाढ होईल, तसेच मुलींना रोजगारही मिळेल.आमच्या सरकार महिला सक्षमीकरणासाठी अनेक पाऊले उचलत आहे. हे काँग्रेस व महाविकास आघाडीला सहन होत नाही. यामुळेच ते माझी लाडकी बहीण योजनेवर टीका करत आहेत. या योजनेची देशाच्या कानाकोपऱ्यात चर्चा सुरू आहे. पण काँग्रेस ही योजना बंद करण्यासाठी विविध कटकारस्थान रचत आहे. काँग्रेसच्या इको सिस्टिमवाले लोक या योजनेविरोधात कोर्टात गेले आहेत. काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांना ही सत्ता मिळाली तर सर्वप्रथम ते ही योजना बंद करतील. त्यामुळे जनतेने त्यांच्यापासून सावध रहावे. कारण हे लोक कधीही नारीशक्तीला सशक्त होताना पाहू शकत नाहीत, असे ते म्हणाले.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ही अनेक वर्षांची मागणी होती. काँग्रेसने महाराष्ट्र व केंद्रात सरकार चालवले, पण त्यांनी हा दर्जा दिला नाही. पण आमच्या सरकारने हा दर्जा देऊन दाखवला, असे म्हणाले.महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारने केलेले काम सर्व जग पाहत आहेत. आज परदेशी गुंतवणुकीत, नव्या संधीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र सलग 2 वर्षे परदेशी गुंतवणुकीत एक क्रमांकावर राहिले आहे. या वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यांत 50 टक्क्यांहून जास्त परदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आला. महाराष्ट्राला सर्वच गुंतवणूक योजनांत प्राधान्य दिले जात आहे, असे मोदी म्हणाले.मी वाढवण बंदराच्या पायाभरणीला आलो होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एक इच्छा व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, देशाचे सर्वात मोठे बंदर तयार होत आहे, मोदीजी एवढे सारे करत आहात, हजारो कोटी लावत आहात, तर तिथे एक विमानतळही तयार करा. मी तेव्हा गप्प राहिलो. पण आचारसंहिता संपून राज्यात महायुतीच्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर मी महाराष्ट्र सरकारसोबत बसून फडणवीस यांची इच्छा पूर्ण करण्याचे काम करेन, असे मोदी म्हणाले.काँग्रेस आघाडी एकीकडे जम्मू काश्मीरमध्ये दलितांना मिळालेला अधिकार प्रस्ताव हिसकावून घेण्याचा प्रस्ताव पारित करते. तर दुसरीकडे, महाराष्ट्रात दलित व आदिवासींच्या अधिकाऱ्यांचे नावाने खोटे पसरवणे, दिशाभूल करणे, त्यांना भडकावण्याचे काम करत आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेबांचे संविधान लागू झाले आहे. पण काँग्रेस व त्यांच्या मित्रांना हे सहन होत नाही. त्यांनी पाकिस्तानचा अजेंडा देशात राबवण्याचा प्रयत्न करू नये. काश्मीरसंबंधी फुटिरतावाद्यांची भाषा बोलू नका. तुमचे हे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. मोदींवर जनतेचा आशीर्वाद असेपर्यंत तुम्हाला काश्मीरमध्ये काहीही करता येत नाही. काश्मीरमध्ये आता केवळ बाबासाहेबांचेच संविधान चालेल. हा मोदींचा निर्णय आहे. जगातील कोणतीही ताकद आता काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करू शकत नाही. महाराष्ट्र आर्थिक प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे, असेही मोदी यावेळी काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हणाले.

महायुतीचा संदेश घराघरात पोचवण्यासाठी सज्ज व्हा

माजी खासदार प्रदीप रावत यांचे आवाहन; शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचा मेळावा

पुणे, दि. ८ नोव्हेंबर, २०२४ : घराघरापर्यंत असलेला संपर्क ही भाजपची खरी ताकद आहे. समर्पित कार्यकर्ता ही पक्षाची ओळख आहे. म्हणूनच प्रत्येक कार्यकर्त्याने मतदानाच्या दिवसापर्यंत झोकून देत काम करावे , असे आवाहन माजी खासदार प्रदीप रावत यांनी केले.

शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपचे आजी-माजी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा सहकुटुंब मेळावा हॉटेल सेंट्रेल पार्क येथे आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुजाता सिद्धार्थ शिरोळे, प्रचारप्रमुख दत्ता खाडे, अपर्णा कुऱ्हाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना रावत म्हणाले, “महायुती सरकारने जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले व्हिजन लोकांपर्यंत पोचवण्याचे काम सिद्धार्थ शिरोळे करत आहेत. महिला, युवक, ज्येष्ठ नागरीक या सगळ्यांसाठी उपयुक्त अशा या योजनांमुळे सामान्यांचे जगणे सुखकर बनले आहे. परंतु विरोधी पक्ष दिशाभूल करण्याचे काम करत आहे, त्याला सडेतोड उत्तर दिले पाहिजे.”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धासाठी तलवारीसारखी शस्त्रे होती. परंतु या राजकीय युद्धात विचार हेच शस्त्र आहे. भाजपचा विचार घराघरात पोचवणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकही मिनिट वाया न घालवता यासाठी झोकून दिले पाहिजे, असेही रावत यांनी सांगितले.

राज्यात महाआघाडीने जातीजातीत भांडणे लावण्याचे काम सुरू केले आहे. महायुतीने राबविलेल्या कल्याणकारी योजना आणि विकासकामांकडे नागरीकांचे दुर्लक्ष व्हावे यासाठीचा हा डाव आहे. परंतु त्याला बळी न पडता आपण विकासकामे लोकांपर्यंत पोचवून भाजपला निवडून आणण्यासाठी कंबर कसली पाहिजे, असेही रावत यांनी नमूद केले. या मेळाव्याला पक्षाच्या सर्व सेलचे आजी-माजी पदाधिकारी, महिला आणि युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

पक्ष फोडणारे आणि पक्ष घेऊन जाणाऱ्यांना घरी बसवा:तो पर्यंत विकास होणार नाही; राज ठाकरे

गुहागर-सध्या राज्यातील राज्यकर्ते आणि राजकारणी कसेही वागत आहेत. मतदार देखील त्यांच्याकडे शांतपणे बघत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. जो पर्यंत तुम्ही त्यांच्यात बदल करत नाही, जो पर्यंत त्यांना घरी बसवत नाही, तोपर्यंत विकास होत नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मागील पाच वर्षात या सर्व लोकांनी राजकारणात गोंधळ घातला आहे. काही या पक्षातून त्या पक्षात गेले. काही पक्ष सोबत घेऊनच दुसरीकडे गेले. आम्ही हे सर्व बरोबर केले असल्याचा त्यांचा समज जोपर्यंत चिडून, भडकवून दूर करत नाही, तोपर्यंत विकासाची स्वप्ने विसरून जा. त्यामुळे आधी या सर्वांना बाजूला करा आणि महाराष्ट्र निर्माण सेनेच्या राज्यभरातील उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.मतदारांनी निवडून दिलेल्या नेत्यांनी काय केले? असा प्रश्न त्यांना विचारला जात नसल्याची खंत देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. केवळ पर्यटनावर कोकणातील सिंधुदुर्गसह तीन जिल्हे हे अख्या महाराष्ट्र पोसू शकतात, अशा शब्दात राज ठाकरे यांनी कोकणवासीयांना साद घातली. केवळ पर्यटन या विषयावर गोवा राज्य चालवले जात असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.कोकणामध्ये कोणते उद्योग धंदे आणले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आता उद्योगधंदे आणू अशी ग्वाही विद्यमान आमदार – खासदार देतात. मग इतके वर्ष त्यांनी काय केले? असा प्रश्न त्यांना का विचारला जात नाही, असे देखील राज ठाकरे यांनी म्हणाले आहे. कोकण इतका सुंदर करता येऊ शकतो, ते आतापर्यंत का झाले नाही? याचे कारण मतदारांनी त्याच – त्याच लोकांना आणि त्याच – त्याच पक्षांना निवडून दिले असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.इथून आमदारांना आणि खासदार निवडून दिले की ते दिल्लीत जाऊन काय करतात? कोणते प्रश्न मांडतात? कोकणातील आतापर्यंत कोणते प्रश्न त्यांनी दिल्लीत मांडले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पर्यटन विषयी कोणते प्रश्न मांडले गेले? असा प्रश्न त्यांना विचारायला हवा, असेही ते म्हणाले. मागील सतरा अठरा वर्षापासून कोकणच्या रस्त्याचे कामे सुरू आहेत. मात्र अद्याप देखील आम्ही खड्ड्यातून जात असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

खडकवासला मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाच्या कक्षात विविध परवानग्यांसाठी गर्दी

पुणे:खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयात विविध निवडणूक परवानग्यांसाठी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पदयात्रा, स्टार प्रचारकांच्या सभा,पक्षाच्या नेत्यांच्या सभा,लाउडस्पीकर वापर, आणि पॅम्प्लेट वाटप यासारख्या विविध निवडणूक प्रक्रियांसाठी आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची एकच लगबग आहे.
खडकवासला मतदारसंघातील निवडणूक कार्यालयाच्या एक खिडकी कक्षातून सुविद्य पवार, शैलेंद्र सोनावणे, आणि संदीप रेणुसे या अधिकारी मंडळींनी उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. उमेदवारांनी प्रचाराच्या नियोजनासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या परवानग्यांसाठी एकाच ठिकाणी सुविधा दिल्यामुळे गर्दी व्यवस्थापन सुलभ झाले आहे.
पदयात्रा आणि मोठ्या प्रचारसभांसाठी विशेष परवानगी, तसेच लाउडस्पीकरच्या वापरावर वेळ व ठिकाणानुसार निर्बंध, पॅम्प्लेट वाटपासाठी नियमानुसार परवानगी या सर्व प्रकारच्या तांत्रिक बाबींवर अधिकारी मंडळींनी उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
यामुळे मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुलभपणे पार पडण्यास मदत होणार असून, सर्व प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे चित्र पाहायला मिळते.

मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत- उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार

पुणे विभागाच्या विधानसभा पूर्वतयारी आढावा बैठकीत निर्देश

पुणे, : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करावेत; या दृष्टीने स्वीप अंतर्गत मतदान जागृती उपक्रमांवर भर द्यावा, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूकआयुक्त हिरदेश कुमार यांनी आज विभागातील निवडणूक यंत्रणांना दिले. मतदारांना मतदान केंद्रावर किमान आश्वासित सुविधा योग्यरित्या पुरविल्या जातील यासाठी योग्य व्यवस्थापन करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

पुणे येथे आयोजित विभागांतर्गत सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त संजय कुमार, प्रधान सचिव अविनाश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, भारत निवडणूक आयोगाचे उपसचिव सुमनकुमार, अवर सचिव अनिलकुमार, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.

शहरी भागात मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे सांगून श्री. हिरदेश कुमार म्हणाले, मतदारांना आपल्या मतदान केंद्राची माहिती व्हावी यासाठी सर्व साधनांचा अवलंब करावा. मतदार चिठ्ठ्यांचे 100 टक्के आणि वेळेत वाटप करावे. पुणे जिल्ह्यात ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या- नो युवर पोलींग स्टेशन’ उपक्रम चांगल्या प्रकारे राबविला जात असून त्याप्रमाणे विभागातील इतर जिल्ह्यातही राबविला जावा. मतदारांना मोबाईल ॲपद्वारे मतदान केंद्रांची माहिती कशा प्रकारे पहावी याबाबत प्रचार प्रसिद्धी करावी.

सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, रॅम्प, विद्युत पुरवठा, सावली, दिव्यांग मतदार व ज्येष्ठ मतदारांसाठी व्हीलचेअर आदी सुविधा उपब्ध करुन द्याव्यात. मतदान केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवावी. आपल्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राहील याची दक्षता घ्यावी. निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाने वाहनांची कसून तपासणी करावी. अवैध मद्य, अंमली पदार्थ, रोकड, मौल्यवान वस्तू आदींच्या वाहतुकीवर नजर ठेऊन आवश्यक तेथे ताब्यात घेण्याची, जप्तीची कारवाई करावी, असेही ते म्हणाले.

विभागातील सर्व निवडणूक निरीक्षकांनी नेमून दिलेल्या मतदार संघात भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडेल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही हिरदेश कुमार यांनी दिल्या.

श्री. सुमनकुमार म्हणाले, सायंकाळी लवकर अंधार पडत असल्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद यांनी आपल्या क्षेत्रातील विद्युतपुरवठा नसलेल्या मतदान केंद्रावर विद्युतपुरवठ्याची व्यवस्था करावी. पाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे. मतदानावेळी गर्दी होऊ नये यासाठी मतदारांच्या रांगाचे व्यवस्थापन करावे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता जपण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राजकीय पक्षांना सर्व टप्प्यांवर आवश्यक ती माहिती द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले, मतदान केंद्रांवर आवश्यक ते सर्व दिशादर्शक, ठिकाणदर्शक फलक (सायनेजेस) असावेत. मतदारांना आपले मतदान केंद्र माहित असावे, यासाठी प्रयत्न करावेत. मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी भरावयाचे सर्व नमुने, अहवाल व्यवस्थितरित्या भरुन वेळेत पोहोचतील आदी बाबींबाबत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी यांना व्यवस्थित प्रशिक्षण द्यावे. पाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या इमारतीच्या ठिकाणी मतदारांना बसण्यासाठी बाकडे, खुर्च्या उपलब्ध करुन द्याव्यात. मतदानासाठी घरुन येण्यासाठी व जाण्यासाठी वाहनाची मागणी केलेल्या दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असेही ते म्हणाले.

निवडणुकीत उभे असलेलले उमेदवार, राजकीय पक्ष यांना निवडणूक प्रक्रियेची वेळोवेळी माहिती देऊन पारदर्शकता राहील याकडे लक्ष द्यावे. त्यांच्या सूचना घ्याव्यात, तक्रारींचे वेळेत निराकरण होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही श्री. चोक्कलिंगम यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे पुणे जिल्ह्यातील तयारीबाबत सादरीकरण करताना म्हणाले, जिल्ह्यात मतदार चिठ्ठ्याचे शंभर टक्के वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. एकाच इमारतीत पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी सर्व मतदान केंद्रांवर समसमान मतदारसंख्या असेल अशी रचना करण्यात आली आहे. मतदानावेळी रांगाच्या व्यवस्थापनासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आवश्यक तेथे राखीव मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.

बैठकीस पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निरीक्षक, खर्च निरीक्षक तसेच पोलीस निवडणूक निरीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. इतर पाच जिल्ह्यातील निवडणूक निरीक्षक, सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सातारचे समीर शेख, सोलापूरचे अतुल कुलकर्णी, कोल्हापूरचे महेंद्र पंडीत, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह निवडणूक प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेने केला १३०० भागांचा टप्पा पार !

“आज जे ब्रह्मांडनायक आहेत त्यांना साकारण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो” – अक्षय मुडावदकर

कलर्स मराठी वरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभत आहे. अन्यायाला मोडीत काढत आणि मार्गातल्या असंख्य लोकांचा उध्दार करत, त्यांना उपदेश करत स्वामी समर्थ कसे सोलापूर येथील अक्कलकोट येथे पोहचले… कशी लोकांना त्यांच्या महानतेची प्रचिती येत गेली, अक्कलकोट येथील चोळप्पा महाराज, सेवेकरी सुंदराबाई, अक्कलकोटचे राजे मालोजीराव, या भक्तांनी स्वामीलीला अनुभवली आणि ते कसे कृतार्थ झाले, त्यांचे कसे नाते होते आणि या भक्तिमार्गात आणखी कोणकोणती माणसं श्री स्वामी समर्थांच्या कृपाछायेखाली आली हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये आजवर बघायला मिळाले. अक्कलकोट येथे स्वामींच्या वास्तव्याने वटवृक्षाखाली दोन दशके चैतन्य ऊर्जा नांदली ती कशी हे देखील प्रेक्षकांना रोजच्या रोज अनुभवता येत आहे. ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेने यशाचा एक नवीन विक्रम स्थापित केला आहे. मालिकेने १३०० भागांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करून प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. स्वामी समर्थांच्या जीवनातील दिव्य कथा, त्यांच्या अलौकिक चमत्कारिक कार्यांचा प्रवास आणि त्यांच्या उपदेशांनी भरलेले अनेक प्रसंग यामुळे ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय झाली आहे.

याक्षणी बोलताना जय जय स्वामी समर्थ मालिकेतील स्वामी अर्थात अक्षय मुडावदकर म्हणाले,” आज जय जय स्वामी समर्थ या मालिकेचे १३०० भाग पूर्ण होत आहेत. सर्व प्रथम या मालिकेशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो कारण ४ वर्षांचा १३०० भागांचा यशस्वी प्रवास पुर्ण झाला आहे. एक टीम म्हणून प्रत्येकाचा यामध्ये मोलाचा वाटा आहे कारण हे कोणा एकट्यामुळे शक्य नाही. हे यश संपूर्ण टीमचे आहे. टीम सोबत मी रसिक प्रेक्षकवर्गाचे आभार मानतो कारण त्यांनी मालिकेच्या पहिल्या भागापासून मालिकेवर, कलाकारांवर आणि कलर्स मराठीवर भरपूर प्रेम केले. मला खूप छान वाटत आहे की, मी अशा एका प्रोजेक्टचा भाग आहे ज्याने एवढा मोठा टप्पा पार केला आहे. ही गोष्ट प्रत्येकाच्या नशिबात येईलच असे नाही. त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आज जे ब्रह्मांडनायक आहेत त्यांना साकारण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. या मालिकेद्वारे मी आज घराघरात पोहोचलो लोकांनी मला भरभरुन प्रेम दिले. आम्ही आता १३०० भागांपर्यंत आलो आहोत स्वामींचा अलौकिक जीवनपट पाहता अजून खूप प्रवास बाकी आहे. स्वामींच्या अनेक अलौकिक लीला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रसिकांना हीच विनंती की, असेच आमच्यावर प्रेम करत राहा.स्वामींच्या अलौकिक लीलांचे साक्षीदार व्हा,जगणे समृद्ध करा”

या यशाच्या निमित्ताने मालिकेतील कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी एकत्र येऊन हा आनंद साजरा केला. तसेच, प्रेक्षकांचे आभार मानले, ज्यांच्या प्रेमामुळे ही मालिका सतत नवीन शिखरे गाठत आहे. ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेच्या यशस्वी प्रवासाच्या या टप्प्याबद्दल बोलताना संपूर्ण टीमने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. “स्वामी समर्थांच्या भक्तीतून प्रेरणा घेऊन आम्ही ही मालिका सुरू केली आणि प्रेक्षकांच्या अपार प्रेमाने हा प्रवास यशस्वी झाला आहे. हा टप्पा म्हणजे आमच्या संपूर्ण टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे,” स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि प्रेक्षकांच्या प्रेमाने ही मालिका आणखी दीर्घकाळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहील, असा विश्वास आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी समन्वय कक्ष सज्ज

पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 शांततेत आणि पारदर्शकतेसह पार पाडण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी समन्वय कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, किरण सुरवसे, आणि सचिन आखाडे यांच्या नेतृत्वाखाली मतदान प्रक्रियेची तयारी सुरू आहे. मतदारसंघात शांततामय व निर्भय वातावरणात निवडणूक पार पडावी यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
या कक्षाचे नोडल अधिकारी प्रा. मनिष खोडस्कर आणि रवी फणसे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य कर्मचारी मतदान केंद्रांवरील कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. कक्षाच्या व्यवस्थापनात निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे मतदारांना योग्य सुविधा, शिस्तबद्ध व्यवस्था, आणि तक्रार निवारणासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकूण 505 मतदान केंद्र असून, त्यापैकी दोन विस्तारित केंद्रे देखील कार्यान्वित करण्यात आली आहेत. मतदारांच्या व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या सोयीसाठी या केंद्रांची व्यवस्था आखली गेली आहे. प्रत्येक केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांसोबतच मायक्रोऑब्झर्व्हर्सना नियुक्त करण्यात आले आहे, जे मतदारांना मार्गदर्शन करून त्यांचे अनुभव सुगम करण्यासाठी तत्पर आहेत.
मतदान प्रक्रिया शांततामय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने विविध सुरक्षा यंत्रणा तैनात केल्या आहेत. मतदान केंद्रांवर पोलीस, सुरक्षा कर्मचारी, आणि आवश्यकतेनुसार मेडिकल किटची सोय करण्यात आली आहे. मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या मतदानाच्या हक्काचा उपयोग निर्भयतेने करता यावा, यासाठी ही सर्व यंत्रणा सज्ज आहे.
या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी समन्वय कक्षाद्वारे, मतदारांना पारदर्शक आणि व्यवस्थित निवडणूक प्रक्रिया अनुभवता यावी यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.