Home Blog Page 597

विधानसभा निवडणुकीत चंद्रकांतदादांना किमान दीड लाखाचे मताधिक्य देणार!

जनसंघ- भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा निर्धार

पुणे-कोथरूड विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना किमान दीड लाखाचे मताधिक्य मिळवून देऊन विजयी करणार, असा निर्धार जनसंघ आणि भाजपाच्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. जनसंघापासून ते भारतीय जनता पक्षापर्यंतच्या प्रवासात कोथरुड मध्ये संघटन उभारणीसाठी काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मेळावा कोथरूडमध्ये संपन्न झाला.

यावेळी जगन्नाथ कुलकर्णी, शिवराम मेंगडे, बाळासाहेब मोकाटे, शाम सातपुते , शशिकला मेंगडे, ललिता भावेताई, बाळासाहेब शेडगे, प्रताप चोरघे, बाळासाहेब शेडगे, दिलीप उंबरकर, गणेश पाचलकर, जनार्दन क्षीरसागर, राजाभाऊ जोरी, योगेश थत्ते, भगवान मोहिते, सुधीर पाचपोर, प्रशांत हरसुले, ॲड. वर्षा डहाळे यांच्यासह भाजपचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

जनसंघापासून ते भारतीय जनता पक्षाच्या उभारणीच्या प्रवासात अनेक कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून काम केले. त्यामुळे कोथरूड मतदारसंघात हिंदुत्व आणि पर्यायाने भाजपाचा बालेकिल्ला झाला. हा किल्ला अभेद्यच आहे. गेल्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना जे मताधिक्य मिळाले; त्यात लाख मतांची भर घालण्यासाठी प्रचार करु! असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

तसेच, चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात प्रचंड कामे केली आहेत. या सर्व कामांची जाणीव मतदारांना आहे.” अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

पर्वती मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात ई लर्निंग स्कुल उभारणार : आबा बागुल

पुणे-वाढत्या महागाईच्या काळात, समाजातील गरीब, कष्टकरी वर्गातील पालकांना त्यांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे. शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, या उद्देशाने, पर्वती विधानसभा मतदारसंघातील उर्वरित ५ प्रभागात राजीव गांधी ई लर्निंग स्कुलच्या धर्तीवर ई लर्निंग स्कुल ची उभारणी आगामी पाच वर्षात केली जाईल. असे आश्वासन पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी शुक्रवारी दिले.

पुण्यासारखं महानगर एकीकडे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट , विद्येचं माहेरघर अशी बिरुद मिरवत असतानासुद्धा, त्याच पुण्यात अजूनही समाजातील आर्थिक दुर्बल घटक हे दर्जेदार शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळेच दूरदृष्टी, नाविन्याची कास आणि समाजातील प्रत्येक घटकाचा विचार यालाच प्राधान्य देऊन मी पुणे महानगरपालिकेतर्फे राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंग २०११ मध्ये सुरु केली, असल्याचे बागुल यांनी सांगितले.

आज गेल्या १३ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे देशात एक रोल मॉडेल आणि देशातील पहिले ई लर्निंग स्कुल ठरले आहे आणि अल्पावधीत लोकप्रियही झाले आहे, असे आबा बागुल यांनी सांगितले. आजमितीला स्कुलमधील माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदांवर यशस्वी व्यावसायिक कारकीर्द करत आहेत. दहावी बारावी मध्ये टॉपर ठरलेले विद्यार्थी आयआयटी सारख्या सर्वोच संस्थांमध्ये प्रवेश मिळवून तेथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बरोबरीने टॉपर ठरत आहेत. काही विद्यार्थी आयपीएस अधिकारी तर काही अभियांत्रिकी क्षेत्रात नाव उज्ज्वल करत आहेत. गेले अनेक वर्षे सातत्याने दहावी -बारावी आणि अन्य परीक्षांच्या निकालांमध्ये शंभर टक्क्यांची परंपरा कायम राखणाऱ्या ई स्कुलमधील ५०० विद्यार्थ्यांनी आयआयटीमध्ये तर जेईईमध्ये १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. इतकेच नव्हे तर राजेश अग्रवाल हा ई स्कुलचा माजी विद्यार्थी जेईई मेन्स परीक्षेत देशात प्रथम आला आहे. ‘नासा’ सारख्या अंतराळ संशोधन करणाऱ्या अमेरिकन संस्थेमध्ये दोन विद्यार्थीही पात्र ठरले. हे ई स्कुलसाठी, पुणेकरांची मान अधिक उंच करणारी बाब आहे.

महापालिकेच्या शाळेत १ हजार ५०० पेक्षा जास्त प्रतीक्षा यादी असणारे हे पुण्यातील नव्हे, तर राज्यातील एकमेव स्कुल आणि हीच येथील दर्जेदार शिक्षणाची ग्वाही आहे. हीच ज्ञानगंगा संपूर्ण भारतात पोहोचावी यासाठी मी तत्कालीन पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग याची भेट घेऊन ही कल्पना त्यांना दिली व असा शैक्षणिक प्रकल्प देशभर राबवू असेही म्हंटले होते, असे आबा बागुल यांनी सांगितले. त्यामुळेच निवडून आल्यावर पर्वती मतदार संघात ५ प्रभागांमध्ये ५ ई लर्निंग स्कूल उभारणारच, असे म्हणतच उपस्थित शेकडो नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाटात प्रतिसाद दिला.

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत २३ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि. ८ : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या आदर्श आचारसंहिता कालावधीत पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील कारवाईत अवैध हातभट्टी दारू, देशी, विदेशी दारूची वाहतूक, विक्री व इतर साहित्य असे एकूण २३ लाख ७३ हजार ९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान अवैद्य दारू निर्मिती वाहतूक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टिने मोहिम आखून पुणे, अहिल्यानगर व सोलापूर या जिल्ह्यातील अवैद्य गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या, बनावट विदेशी मद्य निर्मितीच्या तसेच अवैद्य दारू विक्रीच्या ठिकाणावर सातत्याने छापे मारून एकूण २७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यामध्ये १४ वारस व १३ बेवारस गुन्ह्यांचा समावेश आहे.

या कारवाईमध्ये आतापर्यंत १२ आरोपी विरूद्ध गुन्हे नोंदविण्यात आले असून २६ हजार ८०० लिटर अवैद्य गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे रसायण, ३ हजार ४३८ लिटर अवैद्य गावठी हातभट्टी दारू, १४४ ब.लि. बनावट मद्य, मद्य वाहतूकीचे ३ वाहने व इतर साहित्य असा एकूण २३ लाख ७३ हजार ९५ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दुय्यम निरीक्षक व्हि. एम. माने, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलिम शेख आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

यापुढे देखील विधानसभा निवडणूकीच्या आदर्श आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर अवैद्य दारू व्यवसाय करणाऱ्यावर अशाच प्रकारची कारवाई सूरू राहणार असून कोठेही अवैद्य दारू व्यवसाय सूरू असल्यास राज्या उत्पादन शुल्क कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९११९८६ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

‘निर्मल वारी’ दशकपूर्ती निमित्तपुण्यात सन्मान सोहळ्याचे आयोजन

पुणे ८ नोव्हेंबर
पंढरीच्या वारीमध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘निर्मल वारी’ या अभियानाचा दशकपूर्ती सोहळा रविवारी, १० नोव्हेंबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात ‘निर्मल वारी’ अभियानात उत्कृष्ट योगदान देणार्‍यांचा विशेष सन्मान केला जाईल.

‘सेवा सहयोग फाउंडेशन’ आणि ‘निर्मल वारी अभियान’ यांच्यातर्फे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी ही माहिती दिली. या अभियानाचे मार्गदर्शक ह.भ.प शिवाजी महाराज मोरे, माजी खासदार प्रदीप रावत, संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे प्रमुख किरण ढमढेरे आणि अतुल नागरस हेही यावेळी उपस्थित होते.

पंढरीची वारी हे अवघ्या महाराष्ट्राचे भूषण आहे. संतपंरपरा म्हणजे पंढरीची वारी. या वारीला निर्मल करण्याचा ध्यास पुण्यातील ‘सेवा सहयोग फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने २०१४ साली घेतला आणि काम सुरू केले. या आगळ्या अभियानाची यंदा दशकपूर्ती झाली. त्यानिमित्ताने या उपक्रमात लक्षणीय कार्य केलेले स्वयंसेवक, शासकीय कर्मचारी, अधिकारी, गावागावांमधील युवामंडळे, स्वयंसेवी संस्था, सरपंच, स्वच्छता कर्मचारी आदिंचा विशेष सन्मान सोहळा १० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची या सोहळ्यात प्रमुख उपस्थिती असेल. त्यांचे मार्गदर्शनही उपस्थितांना लाभणार आहे. कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

निर्मल वारी या अभियानाची माहिती ऐकण्यासाठी तसेच हे अभियान यशस्वी करणार्‍या सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन ‘सेवा सहयोग फाउंडेशन’नेे केले आहे.

दिल्लीचे तख्त जिंकण्याचा मार्ग साहित्य संमेलन सुकर करेल -विनय सहस्रबुद्धे

: संजय सोनवणी लिखित ‌‘महाराष्ट्र आणि दिल्ली‌’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : मराठी भाषा ही साहित्याचा प्राण आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषा आणि अस्मितेविषयी सकारात्मक चर्चा झाल्यास ते संमेलनाचे फलित ठरेल. दिल्लीचे तख्त जिंकण्याचा मार्ग सुकर करेल, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत, लेखक, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. वैचारिक अस्पृश्यता ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. दिल्लीतील संमेलनाच्या मंचावर सर्व प्रकारच्या विचारधारांना व्यासपीठ मिळावे, अस्पृश्यता बाळगू नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सरहद, पुणे आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमित्त साधून संजय सोनवणी लिखित ‌‘महाराष्ट्र आणि दिल्ली : ऐतिहासिक संबंधांचा आढावा‌’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज (दि. 8) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. पुस्तकाचे प्रकाशन विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. सरदह, पुणेचे अध्यक्ष संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे मंचावर होते.
सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, दिल्ली हे जसे सत्ताकेंद्र आहे त्याच प्रमाणे लोकशाहीचेही केंद्र आहे. मराठी भाषा, साहित्याद्वारे दिल्ली जिंकायची संधी मराठी साहित्य संमेलनाद्वारे आली आहे. ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या संमेलनांमध्ये जे वैचारिक अस्पृश्यतेचे, असिहिष्णुतेचे वातावरण रहिले ते पाहता दिल्लीतील साहित्याच्या उत्सवात लोकतांत्रिकतेची बूज राखली जावी.
‌‘महाराष्ट्र आणि दिल्ली‌’ पुस्तकाद्वारे इतिहास मार्मिकपणे मांडला असल्याचे सांगून प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले, संकुचित मनोवृत्ती आणि कोतेपणा हा प्रगतीतला सगळ्यात मोठा अडसर आहे. मराठी माणसांची मानसिकता हेच त्याच्या समोरचे मोठे आव्हान आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी पक्ष, विचारधारा आणि राजकारण दूर ठेवून महत्वाच्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याची मानसिकता आणि राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाली तरच महाराष्ट्राचे भले होईल. देशाला विचार आणि दिशा देणारे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे पण आज महाराष्ट्र चाचपडतो आहे. कुणापुढेही झुकायचे नाही या महाराष्ट्र धर्माचे विस्मरण आजच्या राजकारण्यांना झाले आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
पुस्तक लिखाणाविषयी संजय सोनवणी यांनी मनोगत व्यक्त केले. दिल्लीत होत असलेल्या संमेलनामुळे मराठी भाषेद्वारे राष्ट्रीय स्तरावर प्रभाव टाकण्याची, जगासमोर जाण्याची संधी मिळत आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविकात संजय नहार यांनी दिल्ली येथे आयोजित करण्यात येत असलेल्या संमेलनाविषयी भूमिका मांडली. आताची लढाई तलवारीची नाही तर लेखणीची आहे. महाराष्ट्र एक आहे, हे जगाला देशाच्या राजधानीतून दिसावे यासाठी दिल्लीत संमेलन घेत असल्याचे नहार म्हणाले. सूत्रसंचालन डॉ. वंदना चव्हाण यांनी केले तर आभार लेशपाल जवळगे यांनी मानले.

गाव भेट दौऱ्यात भेटला ‘आपला माणूस ‘

पुणे-खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार भिमराव (आण्णा) तापकीर यांच्या गाव भेट दौऱ्याला आज येथे चांगला प्रतिसाद मिळाला . तापकीर यांचे बोलणे , वावरणे ,लोकांशी चर्चा करणे यातून अनेकांनी गाव भेट दौऱ्यात भेटला ‘आपला माणूस ‘ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तीन वेळा आमदार राहूनही कसला गर्व नाही कि हम कारे सो वृत्ती नाही दिसली दिसला तो आपल्यातलाच एक आपला माणूस .. अशा शब्दात गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. या दौऱ्याची सुरुवात जांभळी येथे पांडुरंगाच्या दर्शनाने करण्यात आली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या प्रश्नांसाठी झटण्याची ग्वाही दिली.

बहुली येथे श्री कालभैरवनाथ मंदिरात दर्शन करून त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला , भगतवाडी येथे विठ्ठलसेवा मंडळाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला पोटेवाडी येथे ग्रामस्थांचे स्वागत स्वीकारून त्यांच्याशी चर्चा केली सांगरुण येथे पांडुरंग दर्शन व संवाद.मांडवी खुर्द ,मांडवी बुद्रुक खडकवाडी ,अगळंबे खडकवाडी ,कुडजे खडकवाडी येथे गावकऱ्यांशी संवाद साधला .

यावेळी या दौऱ्यात माजी उपमहापौर दिलीप भाऊ बराटे, कृषी उत्पादन बाजार समिती संचालक दत्तभाऊ पायगुडे, उद्योजक गजानन पायगुडे, राजाभाऊ जोरी, संतोष चोरघे, पुणे ग्रामीण उपाध्यक्ष सचिन पायगुडे, तसेच भाजपा ग्रामीण अध्यक्ष नवनाथ तागुंदे, महिला अध्यक्ष दिपाली ताई वाव्हळ आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

गाव भेटी दरम्यान आमदार भिमराव तापकीर यांनी त्यांच्या कार्यकाळातील विकास कामांचा आढावा घेतला आणि आगामी काळातही शाश्वत विकास आणि गावांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

हास्य योग परिवाराचा आनंद मेळावा कोथरूडमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न

पुणे -नवचैतन्य हास्य योग परिवाराचे सदस्य चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर प्रचंड खूश असून, चंद्रकांतदादांसारखा लोकप्रतिनिधी कधीही पाहिला नाही, अशी भावना नवचैतन्य हास्य योग परिवाराचे कार्याध्यक्ष मकरंद टिल्लू यांनी व्यक्त केली. नवचैतन्य हास्य योग परिवाराच्या वतीने कोथरूड विभागाचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी कोथरुड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील, नवचैतन्य हास्य योग परिवाराचे संस्थापक विठ्ठल कांटे सर, सुमन काटे, जयंत दशपुत्रे, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, सरचिटणीस गिरीश खत्री, अनुराधा एडके, नगरसेविका हर्षाली माथवड यांच्या सह हास्य योग परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मकरंद टिल्लू म्हणाले की, माणसांना सृजनशील बनविण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत विविध प्रकारचे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबविले. दादांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व दिलंय. असा राजकारणी सामाजिक जीवनात पाहणं मोठं कठीण आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात नकारात्मक माणसांऐवजी सकारात्मक माणसांना साथ दिली पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. यावेळी विठ्ठल काटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना दादांच्या कामाचे कौतुक करुन आशीर्वाद दिले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आज जगात प्रत्येकजण आनंदाच्या शोध आहे. हास्य योग परिवाराशी गेल्या पाच वर्षांत खूप जोडला गेलोय, याचा आनंद होतो. ह्या परिवाराने समाजातील नकारात्मकता बाजूला ठेवून सकारात्मकता वाढविण्यासाठी यज्ञ आरंभिला आहे. कोथरूड हे माझं कुटुंब आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना ज्या गोष्टी लागतात, त्या गोष्टींचा उपलब्ध करुन देण्यावर भर आहे. त्यातून सुखी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची भावना व्यक्त केली.

इंद्रयुद्ध मजुमदार यांचे सरोदवादन आणि अभंग रचनांवर आधारित ‌‘वैकुंठनायक‌’ स्वराविष्कार

अल्फा इव्हेंटस्‌‍तर्फे शुक्रवारी सांगीतिक कार्यक्रम
पुणे : अभिजात शास्त्रीय संगीत क्षेत्रात मोलाची भूमिका बजावत असलेल्या अल्फा इव्हेेंटस्‌‍तर्फे शुक्रवारी युवा पिढीतील आश्वासक कलाकार इंद्रयुद्ध मजुमदार यांच्या सरोद वादनाच्या मैफलीसह महाराष्ट्रातील संतांच्या अभंग रचनांचा स्वराविष्कार असलेल्या आणि संगीत विश्वातील दिग्गज घराण्यांमधील कलाकारांचा सहभाग असलेल्या ‌‘वैकुंठनायक‌’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संत रचना नव्या स्वराविष्कारात ऐकावयास मिळणार आहेत.
पुणेकर रसिकांसाठी पर्वणी ठरणारा वादन आणि गायनाचा कार्यक्रम शुक्रवार, दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता मयूर कॉलनीतील बाल शिक्षण मंदिरातील ऑडिटोरियमध्ये आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अल्फा इव्हेंटस्‌‍चे संचालक निखिल जोशी आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका अपर्णा पणशीकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात युवा पिढीतील आश्वासक कलाकार अशी ख्याती प्राप्त केलेल्या इंद्रयुद्ध मजुमदार यांचे सरोद वादन होणार असून त्यांना प्रसिद्ध तबलावादक पंडित अरविंदकुमार आझाद साथसंगत करणार आहेत. इंद्रयुद्ध यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून सरोद वादनाचे
धडे वडील पंडित तेजेंद्र मजुमदार यांच्याकडून घेण्यास सुरुवात केली. त्याच प्रमाणे आई विदुषी डॉ. मानसी मजुमदार यांच्याकडून गायनाचे मार्गदर्शन लाभले. इंद्रयुद्ध हे सरोद वादनातील ख्यातनाम सेनिया मेहेर घराण्याचे प्रतिनिधीत्व करतात. देशविदेशात त्यांच्या अनेक मैफली झाल्या असून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात श्री संत सेवा संघाची निर्मिती असलेला वैकुंठनायक हा कार्यक्रम सादर होणार आहे. संत जनाबाई, संत श्रीविठा महाराज, संत श्रीनिळा महाराज, संत श्रीचोखामेळा महाराज, संत श्रीनरहरी सोनार महाराज, संत श्रीसेना न्हावी महाराज, संत श्रीसावतामाळी महाराज, संत श्रीतुकाराम महाराज, संत श्रीज्ञानेश्वर महाराज, संत श्रीएकनाथ महाराज या संतांच्या रचना सादर केल्या जाणार आहेत. मेवाती घराण्याचे अध्वर्यु पंडित जसराज यांचे शिष्य पंडित संजीव अभ्यंकर, भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पंडित आनंद भाटे आणि गानसरस्वती किशोरी अमोणकर यांचे शिष्य पंडित रघुनंदन पणशीकर संत रचना सादर करणार आहेत. जीवन धर्माधिकारी यांनी रचनांना संगीत दिले आहे. कार्यक्रमाचे निरूपण श्री संत सेवा संघाच्या विश्वस्त स्वर्णिमा करणार असून कलाकारांना भरत कामत (तबला), प्रसाद जोशी (पखवाज), उद्धव कुंभार (तालवाद्य), शुभदा आठवले (संवादिनी) यांची साथसंगत असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

‘मॅड सखाराम’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

२६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखात सांगता

पिंपरी, पुणे (दि. ०८ नोव्हेंबर २०२४) मराठी सारस्वताचा अभिमान
पु. ल. देशपांडे यांच्या जयंती निमित्त पु. ल. लिखित सखाराम बाईंडर या सुप्रसिद्ध
नाटकावर आधारित मंगेश सातपुते यांनी दिग्दर्शित केलेले ‘मॅड सखाराम’ हे विडंबन नाट्य २६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप प्रसंगी सादर केले. समाजातील विविध वृत्ती – प्रवृत्तींवर या नाटकाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः सखारामाची भूमिका करणारे सुनील जाधव यांनी मानवी स्वभावातील कंगोरे अभिनयातून लिलया सादर केले.
‘मॅड सखाराम’ मध्ये श्रेयस वैद्य, विशाल मोरे, अलका परब, किरण राजपूत, प्राजक्ता पवार या सहकलाकारांनी आपापल्या भूमिका सादर केल्या. शिवाजी राणे यांची ध्वनी क्षेपण व्यवस्था केली.
यानंतर “अनुभूती” हा कार्यक्रम नुपूर नृत्यालयाने सादर केला. याची सुरुवात गुरु डॉ. सुमेधा गाडेकर यांनी गणेश वंदनेने केली. नंतर विद्यार्थिनींनी झपताल, कवित, आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारे द्रौपदी हा गतभाव इत्यादींची प्रस्तुती केली. त्यानंतर ‘महाराष्ट्राची संत परंपरा’ ही नृत्यनाटिका स्वरूपात प्रस्तुत केली. विविध संतांच्या कथा या नाट्य आणि नृत्य स्वरूपात प्रस्तुत केल्या. या नृत्य नाटिकेला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. सादरीकरणाचे निवेदन मंजिरी भाग्ये यांनी केले. नाटिकेत रसिका, मंजिरी, रिया, मुग्धा, अनुष्का, श्वेता, काव्या, आनंदी, नीरजा, अवनी, जान्हवी, अन्वी, त्रिषा, अन्विता, आर्या, अड्विका, दुर्गा, अर्पिता, अनुष्का, काव्या, कनीष्का, क्षेराजा या विद्यार्थिनींचा सहभाग होता.
स्वर सागरच्या अंतिम सत्रात “ब्लॅक अँड व्हाइट” या दृकश्राव्य हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमाचे निवेदन राहुल सोलापूरकर यांनी केले. मालविका दीक्षित, अभिलाषा चेल्लम, चैतन्य कुलकर्णी, जितेंद्र अभ्यंकर गायकांनी गाणी सादर केली, तर नृत्याविष्कार ऋतुजा इंगळेने सादर केला. “अपलम चपलम”, “मधुबन में राधिका नाचे रे”, “अपना दिल तो आवारा”, “अभी ना जाओ छोड़कर”, “प्यार किया तो डरना क्या” या सदाबहार गाण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली
‌स्वर सागर महोत्सवाचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी थिगळे, हंबीर आवटे, श्रेयश आवटे, मृगेश नटराजन, गजानन शंकर चिंचवडे, पुरुषोत्तम डबीर, मोहन लोंढे, सुरेखा कुलकर्णी, अस्मिता सावंत, अनिल दराडे, सोनाली थोरवे, सुनील पोटे, शिरीष कुंभार, काजोल क्षीरसागर, राजू म्हेत्रे, संदीप बोडके, मलप्पा कस्तुरे, संतोष कुरळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

बारामतीत भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी येऊ नये:मी एकटा तिथे पुरेसा – अजित पवार

पुणे-राज्यातील विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रात शुक्रवार पासून सभा सुरू झाल्या आहे. राज्यात विविध जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, बारामती मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी याची सभा नको, असे अजित पवार यांनी मत व्यक्त केले होते. याबाबत खुलासा देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, एका पत्रकाराने मला विचारले की, बारामतीत पवारांची सभा आहे का? तर मी म्हटल की, देशातील राष्ट्रीय नेते जेव्हा राज्यात येतात, तेव्हा ते जिल्ह्यात सभा घेतात. पुण्यात देखील त्यांची सभा असून पुण्यात बारामती येतोच ना, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तालुका स्तरावर नाही, तर जिल्ह्यात सभा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बारामतीत भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी येऊ नये, कारण राज्यात अनेक ठिकाणी खूप काम असून मी एकटा तिथे पुरेसा आहे, असेही अजित पवार म्हणाले.

पुणे शहरातील वडगाव शेरी मतदार संघात महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची जाहीर सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीत सभा झाली होती, त्यावेळेस ती गोष्ट वेगळी होती. तेव्हा तिथे अजित पवार नावाचा कोण तरी व्यक्ती उभा होता आणि तेव्हा त्यांना अजित पवारला पराभूत करायचे होते, म्हणून त्यांनी बारामतीत सभा घेतली होती. आता त्यांना पराभूत करायचे नाही, तर मला निवडून आणायचे आहे. म्हणून त्यांनी सभा नाही घेतली.

एका पुस्तकात जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या संदर्भात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. परंतु भुजबळ यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. यावर अजित पवार म्हणाले की, छगन भुजबळ यांनी याबाबत पुरेसा खुलासा केला आणि ते या बाबत न्यायालयात देखील जाणार आहे असे त्यांनी सांगितल आहे.अलीकडे निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येत आहे, तसे विरोधकांकडून महत्त्वाचे प्रश्न जाणीवपूर्वक बाजूला करून नवीन नरेटीव्ह सेट केला जात आहे. हा निवडणुकीचा मुद्दा नाही. राज्य पुढील पाच वर्षांसाठी कोणाच्या हातात द्यायचे, हा मतदारांच्या समोर महत्वाचा मुद्दा आहे, असेही अजित पवार म्हणाले.

काँग्रेस संपली म्हणणाऱ्या मोदींच्या भाषणात ५० वेळा काँग्रेस नावाचा जप, काँग्रेस नाही तर मोदी सरकारच कुबड्यांच्या आधारावर आहे.

ओबीसींबद्दलचा नरेंद्र मोदींचा कळवळा पुतणा मावशीचे प्रेम, ओबीसींचे राजकीय आरक्षण भाजपानेच घालवले.

मुंबई, दि. ८ नोव्हेंबर २०२४
विधानसभेच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पराभवाची चाहूल लागल्यानेच जाती व धर्माच्या नावाने मतांचा जोगवा मागत आहेत. जाती धर्माच्या उतरंडी ही मनुवादी भाजपाचीच संस्कृती आहे. जाती जातीत भांडणे लावण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले असून नरेंद्र मोदींनी त्याचे खापर काँग्रेसवर फोडू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीत जाती धर्माच्या नावावर माथी भडकावून राजकीय पोळी भाजण्याचा मोदी-शाह यांचा प्रयत्न महाराष्ट्रातील जनता खपून घेणार नाही, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
भाजपाचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, राहुल गांधी हे लोकशाही व संविधान वाचवण्याची लढाई लढत असताना त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रकार हा संविधानाचा अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा व संविधानाचा अपमान भारतीय जनता पक्षाने सातत्याने केला आहे. लोकशाही व संविधान वाचवणाऱ्या लोकांना नक्षलवादी ठरवण्याचे पाप भाजपाने केले आहे. काँग्रेसने जाती जातीत भांडणे लावली, ओबीसींतील जातीत भांडणे लावली ओबीसींना आरक्षण दिले नाही या नरेंद्र मोदींच्या आरोपाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, ओबीसींना आरक्षण देणाऱ्या मंडल आयोगाला भारतीय जनता पक्षानेच तीव्र विरोध केला होता, हे देशातील जनतेला माहित आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण भाजपानेच घालवले. महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी, हलबा समाजामध्ये भाडंणे लावण्याचे पाप भाजापानेच केले आहे. सरकारी कंपन्या विकून नोकऱ्यातील आरक्षण संपवण्याचे पाप भाजपानेच केले आहे. युपीएससीची परीक्षा न घेता आरएसएसच्या विचारणीच्या तरुणांना थेट संयुक्त सचिव पदावर नियुक्ती देऊन एससी, एसटी, ओबीसी समाजाच्या मुलांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचे पाप मोदी सरकारनेच केले आहे. दोन दिवसांपूर्वीच यवतमाळच्या वणी येथे भाजपच्या एका पदाधिका-याने कुणबी समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते पण कुणीही त्याला थांबवले नाही. ओबीसी समाजाबद्दल नरेंद्र मोदींनी दाखवलेला कळवळा हे फक्त ‘पुतणा मावशीचे प्रेम’, आहे.

‘बटेंगे तो कटेंगे’, सारखी नारेबाजी करून महाराष्ट्रात धार्मिक उत्पात घडवायचा भाजपाचा प्रयत्न आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाबद्दलची भाजपाची भूमिका पाहता भाजपा या समाजाला देशाचे नागरिक समजत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस पक्ष आता राष्ट्रीय राहिला नसून प्रत्येक राज्यात दुसऱ्या पक्षांच्या कुबड्या घेत आहे हा नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत बालीश व हास्यास्पद आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकारच चंद्रबाबू नायडू व नितीशकुमार यांच्या कुबड्यावर उभे आहे. महाराष्ट्रातील सरकार बनवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून त्यांच्या कुबड्यावर सरकार बनवले, हे देशाच्या पंतप्रधानाना माहित नाही का? काँग्रेस संपली आहे असे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींनी भाषणात ५० – ६० वेळा काँग्रेस नावाचा जप केला. नरेंद्र मोदींचे भाषण म्हणजे नेहमी प्रमाणे खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता पण महाराष्ट्राची जनता या भूलथापांना बळी पडणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

जगातील सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात – अजित पवारांचा दावा

पुणे- मतदार राजाला एकच विनंती आहे की, कृपया भूलथापांना बळी पडू नका. महाराष्ट्रातील उद्योग पळवले गेले, यात काही सत्यता नाही. जगातली सगळ्यात जास्त गुंतवणूक ही भारतामधील महाराष्ट्रात होते. खोटं बोलणं आमच्या रक्तात नाही.असे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

आज उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे विधानसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार सुनिल टिंगरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं. दिवाळीचा सण आपण सगळ्यांनी उत्साहात साजरा केला. आता मात्र तमाम पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं, असं आवाहन यावेळी केलं.

ते म्हणाले,’ यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गाफिल राहून अजिबात चालणार नाही. सर्वांनी एक जीवानं कामं करायची आहेत. काहीजण दमदाटी करू पाहत आहेत. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, या लोकांना विधिमंडळाचा दरवाजा मी दाखवला. मात्र माझं एकच सांगणं आहे की, कुणाकडे लक्ष देऊ नका. आपल्याला आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. कामाच्या बाबतीत आम्ही सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं चिराग नगरमध्ये स्मारक उभारायचं आहे, त्याच्याकरता ३०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी मार्टी संस्था आपण काढली आहे. सर्व समाज घटकाला आपला वाटावा असा जाहीरनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सादर केला आहे.राज्य सरकारनं सुरू केलेल्या तमाम शासकीय योजना जशा की, माझी लाडकी बहीण योजना, वीजबिल माफी, मुलींना मोफत शिक्षण, प्रशिक्षण भत्ता, एक रुपयात पीक विमा आदी योजना आपल्याला पुढची पाच वर्षे सुरूच ठेवायच्या आहेत. या योजना विरोधक बंद पाडू पाहत आहेत. आपल्याला शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. केंद्र सरकार आपल्या विचारांचं असल्यानं राज्याला बळकट करण्याचं काम आम्ही करत आलो आहोत.

स्वारगेट परिसरात महिलेवर तिघांकडून बलात्कार

पुणे – पुण्यातील स्वारगेट परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 25 वर्षीय महिला घरात अंघोळ करत असताना ओळखीच्या एका तरुणाने तिच्या घरात शिरुन तिला बाथरुमधून बळजबरीने बाहेर ओढून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.त्यानंतर पुन्हा महिला चुलत सासरच्या घरी गेली त्यावेळी तिसऱ्या मजल्यावर पाण्याची टाकी तपासणीसाठी गेल्या असताना दोन जणांनी तिचा पाठलाग करुन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. ही घटना शहरातील स्वारगेट परिसरात घडली आहे.याबाबत पिडित महिलेने तीन आरोपी विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही स्वारगेट परिसरात राहण्यास आहे. महिला घरात अंघोळ करत असताना सुरुवातीला एक आरोपी तिच्या घरी आला व त्याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच तिचा गळा दाबून कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.त्यानंतर पिडित महिला ही तिच्या चुलत सासऱ्यांच्या घरी गेली. त्यावेळी ती तिसऱ्या मजल्यावर पाण्याची टाकी तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी दोन आरोपी जबरदस्तीने तिच्या मागून येऊन एका रुम मध्ये नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. महिलेने या प्रकाराला विरोध केला असता तिला आरोपींनी मारहाण केली व सदर प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुझी समाजात बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक एस पाटील करत आहे.

भारताचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा शेवटचा कामकाज दिवस,ज्यांच्या नावाची परदेशातही झाली चर्चा …

नवी दिल्ली-CJI (Chief Justice of India’) चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होतील, परंतु त्याआधी सर्वोच्च न्यायालयात त्यांचा शेवटचा कामकाजाचा दिवस 8 नोव्हेंबर रोजी होता. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निरोपासाठी औपचारिक खंडपीठ सुरू होते.ज्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. न्यायमूर्ती मनोज मिश्रा, न्यायमूर्ती जेबी पारदीवाला, ज्येष्ठ वकील, 10 नोव्हेंबरपासून सीजेआय म्हणून पदभार स्वीकारणारे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचाही यात समावेश आहे. न्यायमूर्ती खन्ना हे देशाचे 51 वे सरन्यायाधीश असतील.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांची 13 मे 2016 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदावरून सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती झाली. त्यांच्या कार्यकाळात, CJI चंद्रचूड 1274 खंडपीठांचा भाग होते. त्यांनी एकूण 612 निवाडे लिहिले. CJI चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सध्याच्या न्यायाधीशांमध्ये सर्वाधिक निकाल लिहिले आहेत. शेवटच्या दिवशीही त्यांनी 45 खटल्यांची सुनावणी केली.CJI चंद्रचूड यांच्या 2 वर्षांच्या कार्यकाळातील प्रमुख निर्णयांमध्ये कलम 370, रामजन्मभूमी मंदिर, वन रँक-वन पेन्शन, सबरीमाला मंदिर वाद, निवडणूक रोख्यांची वैधता आणि CAA-NRC यासारख्या निर्णयांचा समावेश आहे.

CJI DY चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या लायब्ररीमध्ये ठेवलेल्या ‘लेडी ऑफ जस्टिस’ची नवी मूर्ती ऑर्डर केली होती. देशातील कायदा आंधळा नाही आणि ते शिक्षेचे प्रतीक नाही, असा संदेश देणे हा त्याचा उद्देश आहे. याशिवाय 1 सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेच्या समापन कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वज आणि बोधचिन्हाचेही प्रकाशन करण्यात आले.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे देशाचे 16 वे सरन्यायाधीश होते. त्यांचा कार्यकाळ 22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 पर्यंत म्हणजेच सुमारे 7 वर्षांचा होता. वडिलांच्या निवृत्तीनंतर 37 वर्षांनी त्याच पदावर बसले. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सुप्रीम कोर्टातील त्यांच्या वडिलांचे दोन मोठे निर्णयही रद्द केले आहेत.

स्वतःच्या नावात आईचे नाव लावण्याचा निर्णय महिलांचा सन्मान वाढवणारा : डॉ गोऱ्हे

मुंबई दि.८: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घरेलू कामगारांसह समस्त महिला वर्गासाठी अर्थात लाडक्या बहिणींसाठी असंख्य महत्त्वपूर्ण आणि क्रांतीकारी निर्णय घेतले. घरेलू कामगारांसाठी योजना आणल्या तर स्वतःच्या नावात वडिलांसह आईचेही नाव लावण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी समस्त महिलांचा सन्मान वाढवला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी केले.

सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटनेच्या वतीने मुंबईतील चेंबूर येथे काल गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी घरेलू कामगारांसाठी आयोजित भाऊबीज मेळावा कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या.

डॉ नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जात असलेल्या स्त्री आधार केंद्राच्यावतीने घरेलू कामगारांसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा उल्लेख डॉ गोऱ्हे यांनी यावेळी केला. त्या म्हणाल्या, स्त्री आधार केंद्रामध्ये अनेक घर कामगार करणाऱ्या महिलांचा समावेश असल्याने त्यांचे प्रश्न अचूकपणे समजून घेण्यास मदत झाली. त्यातून विधानपरिषदेत घरेलू कामगारांसाठी विधेयक मांडण्यात आले, त्यावेळी वास्तव मांडता आले.

त्या म्हणाल्या, हे विधेयक मंजूर करताना घर कामगारांसाठी कल्याण मंडळ सुरू करण्याची संकल्पना देखील मांडली. समाजातील अवघड कामे घर कामगार मंडळी करत असतात. त्यांच्याप्रती समाजाने आदराची आणि सन्मानाची भावना कायमच ठेवली पाहिजे.

गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घर कामगार करणाऱ्या वर्गाच्या दृष्टीने हिताचे असणारे अनेक निर्णय घेतले. या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी केल्याने कामगार वर्गाला फायदा झाल्याचे दिसून येत आहे, याकडे डॉ गोऱ्हे यांनी लक्ष वेधले.

घर कामगार करणाऱ्या महिलांनी सुरक्षेच्या दृष्टीने सावध रहावे, स्वतःला कणखर बनवावे, त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, असे मार्गदर्शन करतानाच अनेक घटनांमध्ये महिला कामगारांना त्रास देणाऱ्या लोकांना शिक्षा झालेली आहे, हे डॉ गोऱ्हे यांनी उपस्थित घरेलु कामगारांच्या निदर्शनास आणून दिले आणि त्यांच्यातील आत्मविश्वास जगवला.

राज्यातील सर्वच घरकाम करणाऱ्या महिला या मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण झाल्या आहेत, असे सांगून डॉ गोऱ्हे म्हणाल्या, या सर्वच महिलांना अभिमान वाटावा असा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारने घेतला आहे. स्वतःच्या नावापुढे वडीलांप्रमाणेच आईचे नाव लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन महायुती सरकारने महिलांचा समाजातील सन्मान वाढवला आहे.

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, सर्वांना मान ताठ करून जगण्यास शिकवले. तोच आदर्श घेऊन सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटना काम करत आहे. मराठे दाम्पत्याने घर कामगारांच्याबाबतीत वाखाणण्याजोगे काम केले आहे, अशा शब्दात डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे कौतुक केले.

याप्रसंगी माजी नगरसेविका आशाताई मराठे, संघटनेचे अध्यक्ष सुभाष मराठे, उपाध्यक्ष सलीम शेख यांसह इतर मान्यवर व घरेलू कमगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.