अल्फा इव्हेंटस्तर्फे शुक्रवारी सांगीतिक कार्यक्रम
पुणे : अभिजात शास्त्रीय संगीत क्षेत्रात मोलाची भूमिका बजावत असलेल्या अल्फा इव्हेेंटस्तर्फे शुक्रवारी युवा पिढीतील आश्वासक कलाकार इंद्रयुद्ध मजुमदार यांच्या सरोद वादनाच्या मैफलीसह महाराष्ट्रातील संतांच्या अभंग रचनांचा स्वराविष्कार असलेल्या आणि संगीत विश्वातील दिग्गज घराण्यांमधील कलाकारांचा सहभाग असलेल्या ‘वैकुंठनायक’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संत रचना नव्या स्वराविष्कारात ऐकावयास मिळणार आहेत.
पुणेकर रसिकांसाठी पर्वणी ठरणारा वादन आणि गायनाचा कार्यक्रम शुक्रवार, दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता मयूर कॉलनीतील बाल शिक्षण मंदिरातील ऑडिटोरियमध्ये आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अल्फा इव्हेंटस्चे संचालक निखिल जोशी आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका अपर्णा पणशीकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात युवा पिढीतील आश्वासक कलाकार अशी ख्याती प्राप्त केलेल्या इंद्रयुद्ध मजुमदार यांचे सरोद वादन होणार असून त्यांना प्रसिद्ध तबलावादक पंडित अरविंदकुमार आझाद साथसंगत करणार आहेत. इंद्रयुद्ध यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून सरोद वादनाचे
धडे वडील पंडित तेजेंद्र मजुमदार यांच्याकडून घेण्यास सुरुवात केली. त्याच प्रमाणे आई विदुषी डॉ. मानसी मजुमदार यांच्याकडून गायनाचे मार्गदर्शन लाभले. इंद्रयुद्ध हे सरोद वादनातील ख्यातनाम सेनिया मेहेर घराण्याचे प्रतिनिधीत्व करतात. देशविदेशात त्यांच्या अनेक मैफली झाल्या असून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात श्री संत सेवा संघाची निर्मिती असलेला वैकुंठनायक हा कार्यक्रम सादर होणार आहे. संत जनाबाई, संत श्रीविठा महाराज, संत श्रीनिळा महाराज, संत श्रीचोखामेळा महाराज, संत श्रीनरहरी सोनार महाराज, संत श्रीसेना न्हावी महाराज, संत श्रीसावतामाळी महाराज, संत श्रीतुकाराम महाराज, संत श्रीज्ञानेश्वर महाराज, संत श्रीएकनाथ महाराज या संतांच्या रचना सादर केल्या जाणार आहेत. मेवाती घराण्याचे अध्वर्यु पंडित जसराज यांचे शिष्य पंडित संजीव अभ्यंकर, भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पंडित आनंद भाटे आणि गानसरस्वती किशोरी अमोणकर यांचे शिष्य पंडित रघुनंदन पणशीकर संत रचना सादर करणार आहेत. जीवन धर्माधिकारी यांनी रचनांना संगीत दिले आहे. कार्यक्रमाचे निरूपण श्री संत सेवा संघाच्या विश्वस्त स्वर्णिमा करणार असून कलाकारांना भरत कामत (तबला), प्रसाद जोशी (पखवाज), उद्धव कुंभार (तालवाद्य), शुभदा आठवले (संवादिनी) यांची साथसंगत असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.