: संजय सोनवणी लिखित ‘महाराष्ट्र आणि दिल्ली’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : मराठी भाषा ही साहित्याचा प्राण आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषा आणि अस्मितेविषयी सकारात्मक चर्चा झाल्यास ते संमेलनाचे फलित ठरेल. दिल्लीचे तख्त जिंकण्याचा मार्ग सुकर करेल, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत, लेखक, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. वैचारिक अस्पृश्यता ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. दिल्लीतील संमेलनाच्या मंचावर सर्व प्रकारच्या विचारधारांना व्यासपीठ मिळावे, अस्पृश्यता बाळगू नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सरहद, पुणे आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमित्त साधून संजय सोनवणी लिखित ‘महाराष्ट्र आणि दिल्ली : ऐतिहासिक संबंधांचा आढावा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज (दि. 8) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. पुस्तकाचे प्रकाशन विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. सरदह, पुणेचे अध्यक्ष संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे मंचावर होते.
सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, दिल्ली हे जसे सत्ताकेंद्र आहे त्याच प्रमाणे लोकशाहीचेही केंद्र आहे. मराठी भाषा, साहित्याद्वारे दिल्ली जिंकायची संधी मराठी साहित्य संमेलनाद्वारे आली आहे. ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या संमेलनांमध्ये जे वैचारिक अस्पृश्यतेचे, असिहिष्णुतेचे वातावरण रहिले ते पाहता दिल्लीतील साहित्याच्या उत्सवात लोकतांत्रिकतेची बूज राखली जावी.
‘महाराष्ट्र आणि दिल्ली’ पुस्तकाद्वारे इतिहास मार्मिकपणे मांडला असल्याचे सांगून प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले, संकुचित मनोवृत्ती आणि कोतेपणा हा प्रगतीतला सगळ्यात मोठा अडसर आहे. मराठी माणसांची मानसिकता हेच त्याच्या समोरचे मोठे आव्हान आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी पक्ष, विचारधारा आणि राजकारण दूर ठेवून महत्वाच्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याची मानसिकता आणि राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाली तरच महाराष्ट्राचे भले होईल. देशाला विचार आणि दिशा देणारे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे पण आज महाराष्ट्र चाचपडतो आहे. कुणापुढेही झुकायचे नाही या महाराष्ट्र धर्माचे विस्मरण आजच्या राजकारण्यांना झाले आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
पुस्तक लिखाणाविषयी संजय सोनवणी यांनी मनोगत व्यक्त केले. दिल्लीत होत असलेल्या संमेलनामुळे मराठी भाषेद्वारे राष्ट्रीय स्तरावर प्रभाव टाकण्याची, जगासमोर जाण्याची संधी मिळत आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविकात संजय नहार यांनी दिल्ली येथे आयोजित करण्यात येत असलेल्या संमेलनाविषयी भूमिका मांडली. आताची लढाई तलवारीची नाही तर लेखणीची आहे. महाराष्ट्र एक आहे, हे जगाला देशाच्या राजधानीतून दिसावे यासाठी दिल्लीत संमेलन घेत असल्याचे नहार म्हणाले. सूत्रसंचालन डॉ. वंदना चव्हाण यांनी केले तर आभार लेशपाल जवळगे यांनी मानले.