Home Blog Page 59

टीम इंडियाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मंधानाच्या कुटुंबियांच्या भेटीप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे गौरवोद्गार

बाबा… तुमच्या लेकीने आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी इतिहास घडवला. केवळ सांगलीकरच नाही; तर प्रत्येक भारतीयांना त्यांचा अभिमान आहे, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली.

महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळवला. आज टीम इंडियाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मंधानाच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे देखील उपस्थित होते.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, स्मृती मंधाना आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय अभिमान व्यक्त करत आहे. ह्या मुलींच्या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक मुलगी आकाशाला गवसणी घालेल. त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतील आणि यातून देशाचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

KP जमीन घोटाळा:अजित पवार यांचा राजीनामा, तर पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे; विजय वडेट्टीवार यांची मागणी

नागपूर -पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीची खरेदी करण्यात आली,त्यावर स्टॅम्प ड्यूटी माफ करण्यात आली आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांना यातील काहीच माहित नव्हते? या जमीन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

एखाद प्रकरण झालं, ते अंगलट आले की उपमुख्यमंत्री अजित पवार हात झटकतात..आता तर पुण्यातील जमिनीचे प्रकरण आहे,त्यांच्या मुलाने व्यवहार केला आहे, प्रकरण वाढल्यावर माझा याच्याशी संबंध नाही अस बोलून उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदारी झटकू शकत नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी अमेडिया कंपनीने व्यवहार केला. या कंपनीत पार्थ पवार पार्टनर आहेत, त्यांच्या सह्या आहेत मग गुन्हा फक्त दिग्विजय पाटील वर का दाखल झाला? महायुती सरकार म्हणजे तू खा, मी ही खातो आणि एकमेकांना वाचवू अस संगनमताने काम सुरू आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात माध्यमांशी बोलताना केली.

पुणे जमीन घोटाळाप्रकरणी आता सांगण्यात येत आहे की दिग्विजय पाटील याला व्यवहार करण्यासाठी अधिकार देण्यात आले होते,पण व्यवहार करायला पैसे आले कुठून? व्यवहार कुणामुळे झाला? कुणामुळे स्टॅम्प ड्युटी माफ झाली? पार्थ पवार यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे या प्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली पाहिजे या प्रकरणाशी सबंधित महसूल विभागाचे अधिकारी,उद्योग संचानालय,शीतल तेजवानी सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार काल म्हणाले, तीन महिन्यापूर्वी कानावर आले,चुकीच्या गोष्टी मला चालणार नाही अस सांगितलं होते.मग तेव्हाच पार्थ पवार यांना अजित पवार यांनी का थांबवले नाही? घरात हा व्यवहार होतो हे माहीत होते तेव्हाच थांबवले असते तर हा घोटाळा घडला नसता अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

मराठा आरक्षण प्रकरणी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. कुणाबरोबर वैचारिक मतभेद असू शकतात पण म्हणून त्यांच्या जीवावर उठणे हे महाराष्ट्रात शोभत नाही त्यामुळे जरांगे पाटील यांना अधिकचे पोलिस संरक्षण देण्यात यावे असे वडेट्टीवार नागपुरात म्हणाले.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे २५ वर्षापासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी

एकलव्य कॅालेज जवळील मिसिंग लिंकचे लोकार्पण

पुणे- ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे २५ वर्षांपासून प्रदीर्घ काळ रखडलेला मिसिंग लिंकचा प्रश्न मार्गी लागला असून, एकलव्य कॅालेज पासून राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचे आज लोकार्पण झाले. यापूर्वी एरंडवणे रजपूत वीटभट्टी येथून नदीपात्राच जाणाऱ्या मिसिंग लिंकचे ना. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे रुंदीकरण होऊन आता हा मार्ग वाहतुकीसाठी सुलभ झाला आहे.

कोथरुड मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मतदारसंघातील मिसिंग लिंक पूर्ण करण्याचा ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी संकल्प केला होता. यासाठी महापालिका आयुक्तांसोबत वारंवार बैठका घेऊन; यातील अडथळे दूर करण्याच्या सूचना आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

यापैकी एकलव्य कॅालेज ते राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मिसिंग लिंकसाठी जमीन अधिग्रहण ही मोठी अडचण होती. ही मिसिंग लिंक पूर्ण करण्यासाठी संबंधित जमीन मालकासोबत महापालिका अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका होऊनही त्यात यश येत नव्हते. त्यामुळे ना. पाटील यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून जागा मालकास भेटून त्याच्या सर्व शंकाचे निरसन करुन महापालिकेची जमीन हस्तांतरित करुन दिली. तसेच, महापालिकेला ही जलदगतीने रस्ता पूर्ण करण्याच्या सूचना ही दिल्या.

त्यानुसार, सदर रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आज त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना ना. पाटील म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी कोथरुड मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मिसिंग लिंकचा प्रश्न मार्गी लागणे प्रकर्षाने जाणवत होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर सदर विषयात लक्ष घालून पाठपुरावा करत होतो. यामध्ये जमीन अधिग्रहण हा मुख्य मुद्दा असल्याचे लक्षात आले. त्यामुळे संबंधित जागा मालकांशी वारंवार संवाद करुन रस्त्याची आवश्यकता ही पटवून दिली. त्यामध्ये एकलव्य कॅालेज ते महामार्गाला जोडणाऱ्या मिसिंग लिंकसाठी बांदल कुटुंबियांनी ही सहकार्य केले. त्यामुळे सदर मार्ग तयार होऊन वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मतदारसंघातील इतरही मार्ग लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या लोकार्पण प्रसंगी महापालिकेच्या पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, जागा मालक बांदल कुटुंबीय, माजी नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभूणे-पाठक, अल्पना वरपे,माजी नगरसेवक किरण दगडे पाटील,दिलीप वेडे पाटील, भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश वरपे, जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, विद्या टेमकर, गिरीश भेलके, वैभव मुरकुटे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फिजिक्सवाला लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री मंगळवार 11 नोव्हेंबर 2025 पासून होणार सुरू

·         प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) 103  रुपये  ते 109  रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित. 

·         फ्लोअर प्राईस इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 103  पट आणि कॅप प्राईस इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 109  पट

·         बोली/ऑफर मंगळवार 11 नोव्हेंबर 2025रोजी खुली होईल आणि गुरूवार, 13 नोव्हेंबर 2025 रोजी बंद होईल.

·         प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक बोली/ऑफर सुरु होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजेच सोमवार 10 नोव्हेंबर 2025आहे.

·         बोली किमान 137 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 137 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

·         कर्मचारी राखीव भागांत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 10 रु. ची सवलत

·         RHP लिंक: https://investmentbank.kotak.com/kib-cms/sites/default/files/offer-documets/Physicswallah%20Limited_RHP_vf.pdf

पुणे-7 नोव्हेंबर 2025फिजिक्सवाला लिमिटेड (“COMPANY”) इक्विटी शेअर्ससाठी प्राथमिक समभाग विक्रीसाठीची बोली/ऑफर (“Issue”) मंगळवार 11 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करत आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक बोली/ऑफर सुरु होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजेच सोमवार 10 नोव्हेंबर 2025आहे. बोली/ऑफर गुरूवार, 13 नोव्हेंबर 2025 रोजी बंद होईल.

एकूण ऑफर साईज मध्ये 3480 कोटी रु. पर्यंतच्या प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू  आहेत. आयपीओ मध्ये 3100  कोटी रु. पर्यंत प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि 380 कोटी रु. पर्यंत प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे.

प्रति इक्विटी शेअरसाठी 103  रुपये  ते 109  रुपये पर्यंतचा किंमतपट्टा (“The Price Band”) निश्चित करण्यात आला आहे. 

कर्मचारी राखीव भागांत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 10 रु. ची सवलत ऑफरमध्ये समाविष्ट आहे.

बोली किमान 137 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 137 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (“Bid Lot”).

कंपनीने या इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग अनेक धोरणात्मक उद्दिष्टांसाठी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सुमारे 460.551 कोटी रु. नवीन ऑफलाइन आणि हायब्रिड केंद्रांच्या फिट-आउट्सकरिता भांडवली खर्चासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत, तर 548.308 कोटी रु. कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या विद्यमान केंद्रांच्या भाडे देयकांसाठी वापरले जातील. 47.168 कोटी रु. ची गुंतवणूक कंपनीच्या उपकंपनी झायलम लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड मध्ये करण्याचे नियोजित आहे. त्यामध्ये 31.648 कोटी रु. नवीन ऑफलाइन केंद्रे (“न्यू झायलम सेंटर्स”) उभारण्यासाठी आणि 15.520 कोटी रु. विद्यमान झायलम केंद्रे आणि वसतिगृहांच्या भाडे देयकांसाठी वापरले जाणार आहेत. याशिवाय, 28.002 कोटी रु. उत्कर्ष क्लासेस अँड एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड मध्ये गुंतवले जाणार आहेत. त्यांचा उपयोग विद्यमान ऑफलाइन केंद्रांच्या भाडे देयकांची पूर्तता करण्यासाठी केला जाईल. तसेच, 200.106 कोटी रु. सर्व्हर आणि क्लाउड-संबंधित इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आणि 710 कोटी रु. मार्केटिंग उपक्रमांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. कंपनी 26.5 कोटी रु. खर्च करून आपली उपकंपनी उत्कर्ष क्लासेस अँड एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड मधील अतिरिक्त भागभांडवल संपादन करण्याचीही योजना आखत आहे. उर्वरित निधी अजून नक्की न ठरलेल्या अधिग्रहणांद्वारे इनऑर्गनिक वाढीच्या निधीसाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाईल.

ही ऑफर SCRR च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित  नियम 6(2) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत नियम 32(2) च्या नियमनात SEBI ICDR नियमांनुसार ऑफरच्या किमान 75% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये समाविष्ट केले जातील. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBsसाठी प्रमाणात वाटप केले जाईल. तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी (अ) एक तृतीयांश भाग 200,000  रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब) दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना वाटप केला जाऊ शकतो सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार Retail Individual Bidders (RIBs) साठी निव्वळ ऑफरच्या (“Net Offer”) 10% पेक्षा अधिक भाग वाटपासाठी उपलब्ध राहणार नाही. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल.

येथून पुढे, पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना त्यांची वैध बोली ऑफर किंमती एवढी किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास इक्विटी शेअर्सचे प्रमाणात वाटप केले जाईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, जे.पी.मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गोल्डमन साच्छ (इंडिया ) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड  आणि ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.

धनंजय मुंडेंनी माझ्या विरोधात षड्यंत्र रचले:मला ठार मारण्याची सुपारी दिली- मनोज जरांगे

जालना -माझ्या गाडीचा अपघात करत मला ठार मारण्याचा प्रयत्न होता असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. बीडचा कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे, धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात हे षड्यंत्र रचण्याचे काम केले आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचे आहे. कारण वेळ तुमच्यावरही येणार आहे. माझे तुमचे मतभेद असले तरी हा विषय गंभीर आहे. करणाऱ्यापेक्षा करुण घेणारा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे असे मी मानतो.मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अशा वृत्तीचा आपल्याला नाय नाट करावा लागेल. आरक्षण, राजकारण हा विषय वेगळा आहे. पण जीवावर उठणे हा विषय खूप गंभीर आहे. आपण जर सावध नसतो तर यांचा बाप ठरलो नसतो असे जरांगे यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, बीडच्या कार्यकर्त्याने संशयित आरोपींना सोबत परळीला नेल. मुंडेंनी त्यांच्यासाठी बैठक सोडली आणि या दोघांची भेट घेतली. मग यांचे 2 कोटी रुपयांमध्ये हे ठरले आणि 50 लाख रुपये असे ठरले. यापूर्वी त्यांनी 6 कोटी रुपये असेच नासवले आहे. यानंतर त्यांचे घातपाताचे सुरू केले. धनंजय मुंडे यांनी हे करायला सांगितले हे या आरोपींना माहिती आहे. काहीच जमले नाही तेव्हा संभाजीनगरच्या झाल्टा फाट्यावर धनंजय मुंडे या आरोपींची वाट पाहत थांबले. हे खरं आहे की खोटे आहे. हे तुम्ही शोधा. त्यावेळी त्यांनी तिथे चर्चा केली मी तुम्हाला गोळी औषधे देतो. हे आरोपी भाऊबीजेच्या दिवशी त्यांना भेटले, आंतरवालीमधील बडे नावाचा कुणीतरी यामध्ये सहभागी आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, काहीच जमले नाही तेव्हा तुम्ही मला गाडी घेऊन द्या आम्ही गाडीने त्यांना ठोकतो तेव्हा धनंजस मुंडे आरोपींना म्हणाला की नवी गाडी घेऊन देण्यापेक्षा पर राज्यातील पासिंगची गाडी घेऊन देतो आणि तुमचे चालू द्या. या सर्वच्या पाठीमागे धनंजय मुंडे आहे. अशाने राजकारण होत नसते.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे यांचा पीए की कार्यकर्ते यांनी मिळून हत्येचा कट रचला. त्यामागे धनंजय मुंडे होते. त्यांनी भेट घेत कसा मारायचं याचा प्लॅन केला. गाडीने गाडी धडकून मारू, असा प्लॅन झाला. त्यासाठी परराज्यातील पासिंग असलेली गाडी देण्याची तयारी धनंजय मुंडे यांनी दाखवली, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, पोलिसांनी आरोपींना धरावे का नाही हा त्यांचा विषय आहे. जनतेच्या कोर्टात खरे काय आहे हे सर्वांना माहिती आहे. आम्हाला पोलिसांवर काही शंका नाही. कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने मी त्यांचे नाव घेणार नाही पण जे दोघे धरले आहे त्यांचे काय केले. बीडचा एक कार्यकर्ता की पीए त्यांने एका आरोपीची भेट घेत त्यांना सोबत नेले आहे. त्यांनी मला मारण्यासाठी 3 पर्याय दिले होते. माझे खोटे रेकॉर्डिंग तयार करायचे होते पण ते भेटले नाही. दुसऱ्या मुद्दा माझा खूनच करुण टाकायचा, तिसरा मुद्दा माझा औषध गोळ्या देत घातपात करण्याचा होता. राज्यातील सर्व घाण आपण संपवणार आहोत.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ज्या व्यक्तीने माझी सुपारी दिली त्याने आजपर्यंत काय केले आणि काय करणार आहे हे कुणालाही समजलेले नाही. पण त्यांनी काही करण्यापूर्वीच आपल्याला सर्व काही समजले त्यामुळे आपण त्यांचे बाप ठरलो आहोत. आमचे देखील हात खूप लांब पर्यत आहेत हे त्यांच्या लक्षात आले असेल. मराठा समाजाने शांत रहावे, सर्वांनी सावध पवित्रा घेणं गरजेचे आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तो पर्यंत काही करु नका मी मेल्यावर तुम्हाला काय करायचे ते करा. मी माझ्या समाजासाठी लढायला खंबीर आहे. आपण बेसावध नाही कारण तसे असते तर ही घटना घडून गेली असती. कुणीही असो त्यांचा नायनाट तर होणारच.

पार्थ पवारांच्या कंपनीचा जमीन व्यवहार वादात:पार्थ यांनी स्वतः सही केलेली संबंधित कागदपत्रेही समोर, तरीही गुन्ह्यात नाव नाही

0

मुंबई-अजित पवार यांच्या कुटुंबाशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणाने मोठं वादळ निर्माण केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून 1,800 कोटी रुपये किंमतीची जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या व्यवहारामुळे शासनाची सुमारे 152 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या व्यवहारात केवळ 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले गेले. या प्रकरणात गंभीर अनियमितता आढळल्याने सरकारने कारवाईचा बडगा उगारला असून, दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी बावधान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील कोरेगाव पार्कमधील या जागेच्या विक्रीत अनेक नियमांचा भंग झाल्याचे आरोप आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अमेडिया कंपनीचा भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, जमीन विक्रीसाठी मुखत्यार असणारी शीतल तेजवानी आणि निलंबित दुय्यम निबंधक आर.बी. तारू यांच्याविरोधात गुन्हे नोंदवले आहेत. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक), 409 (विश्वासघात), 334 आणि 316(5) तसेच इतर कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, पार्थ पवार किंवा त्यांच्या कंपनीचं नाव या एफआयआरमधून वगळण्यात आलं आहे, ही बाब विरोधकांच्या रोषाचं कारण ठरली आहे.

तक्रारीनुसार, 6 कोटींच्या मुद्रांक शुल्काचा भरणा न केल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन होणार आहे.

पार्थ पवारांना वाचवले जात आहे – सुषमा अंधारे ………या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकार आणि चौकशी यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये या व्यवहाराशी संबंधित कागदपत्र शेअर करत म्हटले आहे की, पार्थ पवार यांनी स्वतः या व्यवहारावर सही केली आहे, तरीदेखील त्यांचं नाव एफआयआरमध्ये नाही. एकच दस्त वापरून जमीन नोंदणी करण्यात आली आणि जिल्हा इंडस्ट्री बोर्डाच्या मुद्रांक माफीच्या ठरावावर पार्थ पवारांची सही आहे, हे चौकशी अहवालात नमूद आहे. तरीदेखील त्यांचं नाव घेण्यापासून यंत्रणा का दूर राहिली? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी पुढे म्हटले की, अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांचा 99 टक्के हिस्सा आहे आणि दिग्विजय पाटील फक्त एक टक्का भागीदार आहेत. तरीही दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून पार्थ पवारांना वाचवले जात आहे.

समितीत जनतेचे प्रतिनिधित्व करण्यास तयार – अंजली दमानिया………….सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणात सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी एक्सवर लिहिले की, एफआयआर झाला, पण त्यातही स्कॅम! पार्थ अजित पवारचं नाव नाही आणि कंपनीचंही नाव नाही? ही कोणती चौकशी? जर सरकार खरंच पारदर्शक असेल, तर दोषींना संरक्षण देऊ नका, कठोर कारवाई करा. दमानिया यांनी पुढे मागणी केली की, चौकशीसाठी स्थापन होणाऱ्या समितीत फक्त शासकीय अधिकारी न ठेवता जनतेचे प्रतिनिधीही असावेत. मी स्वतः या समितीत जनतेचे प्रतिनिधित्व करण्यास तयार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, अनेकांनी त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.

सरकारचं जादूचे प्रयोग – अंबादास दानवे……..दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावर अधिक थेट हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटलं की, कोरेगाव पार्क प्रकरणात गुन्हा दाखल झाला, पण पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचं नाव स्वच्छ वगळण्यात आलं. म्हणजे सरकारचं जादूचे प्रयोग, सुरू झाले आहेत. एवढ्या गंभीर प्रकरणात केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करून विषय झाकला जातोय. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून म्हटलं की, या चौकशीसाठी विकास खारगे नक्कीच प्रामाणिक अधिकारी आहेत, पण या प्रकरणातील गंभीरतेमुळे चौकशी समितीत एक निवृत्त न्यायमूर्ती नेमणे गरजेचे आहे. विरोधकांच्या या सर्व प्रतिक्रियांमुळे पार्थ पवार आणि अजित पवार यांच्याभोवतीचा राजकीय दबाव वाढताना दिसत आहे.

भक्ती आणि शक्तीचा अनोखा वापर हे आनंदमठ चित्रपटाचे सूत्र : सुलभा तेरणीकर

पुणे : आनंदमठ या कादंबरीचा विषय हा राष्ट्रप्रेमाच्या उद्‌गाराचा असून भक्ती आणि शक्तीचा अनोखा वापर हे या चित्रपटाचे सूत्र आहे. ही कादंबरी सत्य घटनेवर आधारित असून चित्रपटाची निर्मिती करताना निर्मात्याने सांस्कृतिक स्वातंत्र्याचा वापर न करता मूळ कादंबरीला, पात्रांना धक्का लावलेला नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर यांनी केले.

आनंदमठ या हिंदी चित्रपटाला ७४ वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटातील वंदे मातरम्‌ या लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीतामुळे हा चित्रपट आजही रसिकांच्या आठवणीत आहे. वंदे मातरम्‌ जयंती दिनाचे औचित्य साधून आनंदमठ या चित्रपटावर चर्चात्मक कार्यक्रम आज (दि. ६) आयोजित करण्यात आला होता. वन्दे मातरम् सार्ध शती जयंती समारोह समिती, जन्मदा प्रतिष्ठान व महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या सहयोगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र कल्चरल सेंटर येथे आयोजित चर्चासत्रात सुलभा तेरणीकर यांच्यासह चित्रपट संगीत अभ्यासक धनंजय सप्रे यांचा सहभाग होता. त्या वेळी तेरणीकर बोलत होत्या.

चित्रपटातून इतिहासाचे दर्शन …
सुलभा तेरणीकर पुढे म्हणाल्या, स्वातंत्र्यपूर्वीचा काळ कादंबरीतून मांडताना इतिहासाकडे जागरुकतेने पाहता येते हे जाणवते. हाच धागा पुढे नेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे काही कालावधीसाठी सचिव म्हणून कार्यरत राहिलेले हेमेन गुप्ता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. ही निर्मिती म्हणजे जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असून यातील पात्रयोजना करताना सखोल अभ्यास केल्याचे लक्षात येते.

विरोधाभासी दृश्यात संगीताचा स्वतंत्र बाज..
धनंजय सप्रे म्हणाले, ऋषी बंकिमचंद्र यांनी अध्यात्मवाद आणि राष्ट्रवादाची उत्तम सांगड घालणारी आनंदमठ ही कादंबरी लिहिली. ज्याला उदात्त भावना व तत्त्वज्ञानाची जोड होती. या कादंबरीने तसेच यातील वंदे मातरम्‌ या गीताने न भुतो न भविष्यती अशी ख्याती प्राप्त केली. याच कादंबरीवर आधारित आनंदमठ हा हिंदी चित्रपट १९५२ साली प्रदर्शित झाला. यातील कथानकाला पुढे नेत जाणारी एकूण सात गीते चित्रपटात आहेत. हेमंत कुमार यांनी संगीत दिग्दर्शित केलेला हा पहिला हिंदी चित्रपट होता. चित्रपटातील विरोधाभासी दृश्ये साकारताना संगीताचा स्वतंत्र बाज अवलंबला आहे. वीररस, भक्तीरस, शांतिरस, व्याकुळ मनोवस्था, सामाजिक-मानसिक परिवर्तने दर्शविताना हेमंत कुमार यांनी विविध वाद्यांच्या वापरातून संगीताच्या माध्यमातून दृश्यात्मकता प्रभावीपणे मांडली आहे. लता मंगेशकर यांनी गायलेले वंदे मातरम्‌ हे गीत स्फुरण, त्वेष, जोश उत्पन्न करणारे असून चित्रपटाचे संगीत आक्रमकता आणि कारूण्य यांचा अपूर्व संयोग साधते.

कार्यक्रमाविषयी संयोजक, वंदे मातरम्‌चे अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. मान्यवरांचे स्वागत प्रसाद भडसावळे, सुधीर जोगळेकर यांनी केले.

अहिल्यानगरमधील सोनई घटनेतील आरोपींवर मोक्का लावा, अन्यथा राज्यभर मातंग समाज आंदोलन करणार- रमेश बागवे

पुणे – सोनई (ता. नेवासा, जि. अहमदनगर) येथे मातंग समाजातील युवकावर झालेला हल्ला, त्यानंतर निघालेल्या मोर्चात महिलांविषयी, संपूर्ण मातंग समाज, व समाजातील काही नेत्यांविषयी झालेल्या अत्यंत अर्वाच्च, अपमानास्पद केलेले भाष्य, जीवे मारण्याची उघडपणे दिलेली धमकी आणि समाजात द्वेष पसरविणाऱ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पुणे शहर जिल्हा मातंग समाज यांच्या वतीने सोनई पोलीस स्टेशनला भेट देऊन सदरील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली .
सोनई मधील आरोपींवर सामाजिक द्वेष पसरवणे तसेच मोक्का ची कठोर कारवाई पोलीस प्रशासनाने करावी अन्यथा मातंग समाज राज्यभर आंदोलन करणार आहे असा इशारा मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक व माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांनी दिला आहे . यावेळी मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने घटनेविषयीचा लेखी पुरवणी जबाब (Supplementary Statement) सादर केला असून, संबंधित शेवगाव विभागाचे डीवायएसपी नीरज राजगुरू, व तपास अधिकारी विजय माळी, यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.

डीवायएसपी यांनी या प्रकरणातील सर्व पुरावे, तक्रारीतील व्हिडिओ व माहिती पाहून लवकरात लवकर हा पुरवणी जबाब न्यायालयात सादर करून संबंधित कलमे वाढविण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणात केवळ जातीय अपमान नाही, तर समाजात भीती, द्वेष आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे, यामध्ये जिवे मारण्याच्या धमक्या, तसेच संगठित गुन्हेगारीचे स्वरूप असल्यामुळे मोक्का (अंतर्गत) कलमे लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आमच्याकडे घटनेचे सर्व व्हिडिओ, छायाचित्रे व पुरावे सुरक्षित ठेवलेले असून, राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये या प्रकारची एफ.आय.आर. दाखल करण्यासाठी सामाजिक आवाहन करण्यात येणार आहे.

पुणे शहर जिल्हा मातंग समाज चे शिष्टमंडळाचे नेतृत्व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक व माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांनी केले, त्यांच्या समावेत अनिल हातागळे, दीपक कसबे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, दलित युवक आंदोलनाचे संस्थापक सचिन बगाडे, दलित महासंघाच्या लक्ष्मीताई पवार, अँड. राजश्री अडसूळ, शंकर तडाखे, मनोजआप्पा शिरसागर, रवी पाटोळे, अँड महेश सकट, निलेश वाघमारे, दयानंद अडागळे ,ज्ञानेश्वर राक्षे, विठ्ठल थोरात, अरुण गायकवाड, विनोद वैरागेर, विकास सातारकर, रवी आरडे, व इतर प्रमुख नेते व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
पुणे शहर जिल्हा मातंग समाज या प्रकरणात समाजासोबत ठामपणे उभा असून, न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरू राहील.
हा लढा केवळ एका समाजाचा नाही, तर न्याय, सन्मान आणि संविधानिक अधिकारांचा आहे. अशी भूमिका पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली .

पणत्यांचा लखलखाट व समूहगायनाने ‘वंदे मातरम्’ चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा

इतिहास प्रेमी मंडळ व ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या वतीने १५०० हजार पणत्यांचा भव्य दीपोत्सव : तब्बल ५०० विद्यार्थ्यांनी केले ‘वंदे मातरम्’ चे समूहगान  

पुणे: तब्बल दिड हजार पणत्या प्रज्वलित करून साकारलेली अक्षरे… पाचशे विद्यार्थ्यांनी खड्या आवाजात केलेले वंदे मातरम् चे समूहगान… अशा देशभक्तीने भारलेल्या वातावरणात  वंदे मातरम् या अजरामर गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त १५०० हजार दीप प्रज्वलित करण्यात आले.

स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला इतिहास प्रेमी मंडळ आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व लेखक प्रा. डॉ.न. म. जोशी, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी उपस्थित होते.

मैदानावर वंदे मातरम् ही अक्षरे रेखाटण्यात आली होती. कविवर्य ग.दि. माडगूळकर लिखित ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ हे गीत गात १५०० पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. तसेच तब्बल ५०० विद्यार्थ्यांनी अजय पराड यांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम् गीताचे समूहगान सादर केले.

डॉ.न म.जोशी म्हणाले, क्रांतीची ज्वाला कधीही विझत नाही. राष्ट्र प्रेमासाठी अर्पण होणारे विद्यार्थी व्हा. राष्ट्रप्रेम आणि सदवर्तन ठेवा. वंदे मातरम हे गीत नाही तर ऊर्जा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मोहन शेटे म्हणाले, बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी वंदे मातरम् हे गीत ‘आनंदमठ’ या कादंबरीत समाविष्ट केले होते. १९०५ मध्ये झालेल्या वंगभंगविरोधी आंदोलनात या गीताला जणू रणघोषाचे स्वरूप प्राप्त झाले. आम्ही भारतीय लोक राष्ट्राला केवळ जमीन मानत नाही, तर ‘आई’ म्हणून तिचे पूजन करतो,  हाच आपला सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. बंगालचे महाकवी बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी वंदे मातरम् या गीताची रचना केली. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात या गीताने जनतेच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. या भावनेचा गौरव करण्यासाठीच हा दीपोत्सव आयोजित करण्यात आला. ज्ञान प्रबोधिनीचे श्रीरंग टोके यांनी आभार मानले.

पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी तहसीलदारांना निलंबित केलेले नाही तर डेअरीची शासकीय जागा खासगी व्यक्तीला दिल्याने निलंबित केले

पुणे-पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी तहसीलदारांना निलंबित केलेले नाही तर डेअरीची शासकीय जागा खासगी व्यक्तीला दिल्याने निलंबित केले आहे असे येथे कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी निलंबनाच्या आदेशाची कॉपी देखील समाज माध्यमावर पोस्ट केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी असेही म्हटले आहे कि,’ पुण्याचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांना पार्थ पवार जमीन हडपण्याच्या प्रकरणात नाही तर पुण्याच्या बोपोडी येथील सर्वे नं. ६२ मधील अॅग्रीकल्चर डेअरीची शासकीय मालकीची जागा खासगी व्यक्तीस दिल्याप्रकरणी निलंबित केले आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने सरकारची ४० एकर जमीन हडपल्याच्या प्रकरणात तहसीलदार येवले याला अटक केल्याच्या बातम्या पसरवून हे दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. शीतल तेजवानी यांनी शासनाच्या मालकीच्या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून त्या जमिनीची विक्री केलेली आहे. त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आणि खरेदी करणा-या अमेडिया कंपनीविरोधातही गुन्हा दाखल केला पाहिजे. फक्त दुय्यम निबंधकाला निलंबित करून चालणार नाही. जमिनीची विक्री करणारे आणि खरेदीदार या दोघांवरही खोटे दस्तावेज बनवून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे.

‘आत्या मी काही चूक केलेली नाही’:पार्थ पवारांचा सुप्रिया सुळे यांच्याशी फोनवर बोलताना दावा

पुणे- आज सकाळीच येणाऱ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर अखेरीस सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांना फोन केला आणि विचारले की नेमका विषय काय आहे, जरा समजून तरी सांगा. त्यावर पार्थ पवार म्हणाले की आत्या मी काहीही चूक केलेली नाही… असे खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमीडीया होल्डिंग्स एलएलपी’ कंपनीने केलेल्या जमीन खरेदी व्यवहारावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून, अजित पवार आणि सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुण्यातील जमिनीचे प्रकरण नेमके काय आहे, हे राज्याच्या सरकारने स्पष्ट केले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट करायला पाहिजे. कारण सर्व संभ्रम आहे, या प्रकरणात माझे तीन प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न आहे की ही जमीन सरकारी होती का? तर मग ती विकता येते का? जर विकता येत असेल तर नियमाप्रमाणे व्यवहार झाला का? दूसरा महत्त्वाचा मुद्दा तहसीलदार म्हणतात की मी त्यावर स्वाक्षरी केली नाही, मग स्वाक्षरी केली नसेल तर व्यवहार कसा झाला? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला आहे.

सुप्रिया सुळे यांचे पार्थ पवार यांच्याशी काही बोलणे झाले का? असा प्रश्न विचारण्यात आला असता त्या म्हणाल्या, हो सकाळीच पार्थ पवारांना फोन केला आणि विचारले की नेमका विषय काय आहे, जरा समजून तरी सांगा. त्यावर पार्थ पवार म्हणाले की आत्या मी काहीही चूक केलेली नाही आणि माझ्या वकिलांशी माझे बोलणे झाले आहे. मग जर पार्थ पवार यांचे वकिलांशी बोलणे झाले असेल तर वकील याबाबत स्पष्टीकरण देतील, असे सुळे म्हणाले.

मुख्यमंत्री पार्थ पवार यांना अडचणीत आणत आहेत का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला, यावर त्या म्हणाल्या, शक्यता नाकारता येत नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी यात उत्तर दिले पाहिजे. शासनाचे विभाग कोणाला उत्तरदायी असतात? तर मुख्यमंत्र्यांना.पार्थ पवारांचा या प्रकरणात काही संबंधच येत नाही. महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदा सांगितलं की, या जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही. जर व्यवहारच होऊ शकत नसेल तर मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस कशी काय आली? मुद्रांक शुल्क किती असावे? यावरही एकमत नाही. या प्रकरणात गोलमाल दिसत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

वाढीला गती देण्यासाठी A91 पार्टनर्सकडून स्पेसवुडतर्फे 300 कोटी रु. ची उभारणी कंपनीचे व्हॅल्यूएशन सुमारे 1200 कोटी रु. वर

0

मुंबई, 06 नोव्हेंबर 2025: भारतातील अग्रगण्य मॉड्युलर फर्निचर उत्पादक आणि ब्रँड स्पेसवुड फर्निशर्स प्रा. लि. (“स्पेसवुड”) ने भारतातील ग्राहक-केंद्रित आणि ग्रोथ-स्टेज व्यवसायांमध्ये गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या A91 पार्टनर्स या नामांकित प्रायव्हेट इक्विटी फर्मकडून 300 कोटी रु.चा निधी उभारला आहे.

या गुंतवणुकीमुळे A91 पार्टनर्सला स्पेसवुड मध्ये महत्त्वाचा मायनॉरिटी स्टेक मिळाले असून या निधीच्या माध्यमातून कंपनी विस्तार, ब्रँड उभारणी आणि कामकाज आणखी मजबूत करणे हा आपला पुढील वाढीचा टप्पा अधिक वेगाने पार पाडणार आहे.

या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना स्पेसवुडचे सह-संस्थापक आणि संचालक श्री. किरीट जोशी म्हणाले:
“A91 पार्टनर्स आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. भांडवलाच्या पलीकडे जात कंझ्युमर ब्रँड्स विस्तारण्याचा मोठा अनुभव त्यांच्या कडे आहे. आमच्या पुढील वाढीच्या टप्प्यात आम्हाला तो अत्यंत उपयुक्त ठरेल.”

गुंतवणुकीबद्दल आपले मत व्यक्त करताना A91 पार्टनर्समधील पार्टनर श्री. अभय पांडे म्हणाले:
“आम्हाला किरीट, विवेक आणि नितीन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यायोगे आम्ही होम एन्ड ऑफिस इम्प्रुमेन्ट क्षेत्रात एक प्रभावी आणि अग्रगण्य कंपनी उभारू इच्छित आहे.”

1996 मध्ये श्री. किरीट जोशी आणि श्री. विवेक देशपांडे यांनी स्थापन केलेल्या स्पेसवुडने भारताच्या संघटित फर्निचर क्षेत्रात सर्वात विश्वासार्ह नावांपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 2011 मध्ये श्री. नितीन सुदामे यांनी स्पेसवुड ऑफिस सोल्यूशन्स (SOS) चे संस्थापक म्हणून कंपनीत प्रवेश केला आणि ऑफिस फर्निचर क्षेत्रात कंपनीचा विस्तार केला.

डिझाइन नाविन्यपूर्णता, टिकाऊपणा आणि उत्कृष्ट कारागिरीवर लक्ष केंद्रित करून स्पेसवुडने संपूर्ण घरात मॉड्युलर उपायसुविधा पुरवणारा विश्वासार्ह ब्रँड म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे.

आर्थिक वर्ष 26 (अंदाजे) साठी कंपनी सुमारे 700 कोटी रु. गट महसुलाचे उद्दिष्ट ठेवत आहे. A91 पार्टनर्सच्या पाठबळाने स्पेसवुड पुढील पाच वर्षांत 25–30% वार्षिक वाढ साध्य करण्याचे आणि नफा मिळविण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. कंपनीच्या कामकाज आणि रिटेल स्थानात मजबुतीसाठी हा निधी तंत्रज्ञान अद्ययावत करणे, प्रक्रिया स्वयंचलित करणे आणि कौशल्य प्राप्त करणे यासाठी वापरला जाणार आहे.

स्पेसवुड भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक फर्निचर उत्पादन केंद्रांपैकी एक चालवते. हे सुविधा केंद्र  1 दशलक्ष चौरस फुट पेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेले आहे आणि अत्याधुनिक पॅनेल आणि शीट मेटल प्रोसेसिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. कंपनीच्या विविध उत्पादन पोर्टफोलिओमध्ये मॉड्युलर किचन्स, वॉर्डरोब्स, होम फर्निचर, प्री-हंग डोअर्स आणि SOS ब्रँडखालील ऑफिस फर्निचर यांचा समावेश आहे.

सध्या, स्पेसवुडकडे 20 हून अधिक शहरांमध्ये 35 हून अधिक एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आहेत. तसेच 150 शहरांमध्ये आणि गावांमध्ये 500 हून अधिक भागीदारांचे डीलर नेटवर्क आहे. पुढील काही वर्षांत कंपनी देशभरात 100 स्टोअर्स पर्यंत विस्तार करण्याची योजना आखत आहे आणि Amazon आणि Pepperfry सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे आपले ओम्नीचॅनेल स्थान मजबूत करणार आहे.

कंपनीचा उद्योग व्यवसाय भारतातील प्रमुख कॉर्पोरेट्स आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्सना सेवा पुरवतो. स्पेसवुड ऑफिस सोल्यूशन्स विभागाने ॲक्सेंचर, केपजेमिनी, एचडीएफसी आणि अदानी ग्रुप सारख्या 1000 हून अधिक कॉर्पोरेट्ससाठी कार्यस्थळ सोल्युशन्स पुरवले आहेत. याशिवाय, कंपनी प्रमुख शैक्षणिक संस्थांसाठी फर्निचर पुरवते. “आम्ही पुढील काही वर्षांत टियर 2 शहरांमध्ये विस्तार करण्याची योजना आखत आहोत,” असं नितीन सुदामे यांनी सांगितलं.

त्यांचा सुमाई डोअर्स विभाग भारतातील 200 हून अधिक डेव्हलपर्स सोबत कार्य करतो. त्यामध्ये गोदरेज प्रॉपर्टीज, डीएलएफ, लोढा, एम3एम, कोलते पाटीलआणि इतर अग्रगण्य नावे समाविष्ट आहेत. त्यामुळे कंपनीची B2B क्षेत्रातील विश्वासार्हता अधिक मजबूत झाली आहे.

या गुंतवणुकीमुळे आधुनिक, कार्यक्षम आणि सौंदर्यपूर्ण जीवनशैली शोधणाऱ्या डिझाइन-कॉन्शस ग्राहकांना सेवा देत स्पेसवुड मास-प्रिमियम आणि प्रिमियम फर्निचर कॅटेगरीजमध्ये आपले नेतृत्व अधिक बळकट करणार आहे.

विद्यार्थी दिवसानिमित्ताने शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन

पुणे, दि. ६ नोव्हेंबर: विद्यार्थी दिवसानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन आदी विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे सहायक आयुक्त (समाजकल्याण) विशाल लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

सामाजिक न्याय विभागामार्फत ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा, पुणे येथे “शिक्षण हेच वाघिणीचे दूध” या विषयावर अॅड. विभीषण गदाचे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाबाबत विद्यार्थ्यांना अधिक माहिती व्हावी याकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार दरवर्षी ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये “विद्यार्थी दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे.

छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघसमस्या आणि विकासकामे मार्गी लावण्याबाबत व्यापक बैठक-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील रस्ता रुंदीकरण, स्वच्छता, विहिरी संवर्धन, महापालिका वसाहत पुनर्निर्माण आदी विकासकामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ३४ मुद्द्यांवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या समवेत आमदार शिरोळे यांनी आज प्रदीर्घ चर्चा केली. छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील विकासकामे आणि अन्य नागरी सुविधांच्या कामांची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशा सूचना आयुक्त राम यांनी विविध खात्यांच्या प्रमुखांना दिल्या. शिवाय कामांच्या प्रगतीचा आढावा सहा महिन्यांनी घेतला जाईल, असेही आश्वासन आयुक्तांनी, आमदार शिरोळे यांना दिले.

महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाचे आधुनिकीकरण करणे आणि इनोव्हेशन हबची उभारणी करणे, जंगली महाराज रस्त्यावरील मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्प मार्गी लावणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडचे रुंदीकरण करणे, औंधमधील भाजी मंडई, जलतरण तलाव, ड्रेनेज लाईन सुधारणा आदी कामे, छत्रपती संभाजी महाराज उद्यानात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविणे आणि उद्यानाचे सुशोभीकरण करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, कचऱ्याचे निर्मुलन करणे आणि अतिक्रमण हटविणे, महापालिका शाळांच्या इमारतीत दुरुस्त्या करणे, महापालिकेची रुग्णालये सुसज्ज करणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाल करणे, मुळा आणि मुठा नद्यांचे संवर्धन करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि विहिरींचे जतन आणि संवर्धन करणे, वाकडेवाडी, पांडवनगर येथील महापालिका वसाहतींचे (कॉलनी) पुनर्निर्माण करणे, भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणि केबल व्यवस्थापन यांसारखे नागरिकांशी निगडित अनेक विषय वेगाने मार्गी लागतील, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

पार्थ पवारांच्या १८०४ कोटींच्या जमीन व्यवहारावर शिवसेनेचा संताप – पुण्यात एस.पी. कॉलेज चौकात आक्रमक आंदोलन

पुणे –
मुंढवा परिसरातील तब्बल १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेण्यात आली असल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर करण्यात येत आहे. या संशयास्पद आणि गैरव्यवहारिक जमीन खरेदी-विक्री प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुणे शहराच्या वतीने एस.पी. कॉलेज चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले.

शिवसेनेच्या नेत्यांनी आरोप केला की, “अमेडा कंपनीचे भांडवल केवळ एक लाख रुपये असूनही या कंपनीने ३०० कोटी रुपयांची जमीन विकत घेतली, हा प्रकार सत्तेचा उघड गैरवापर असून आर्थिक गैरव्यवहाराचे उदाहरण आहे.”तसेच, या व्यवहारासाठी केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचे उघड झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला.आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी “भ्रष्टाचार करणाऱ्यांना अटक करा”, “जनतेच्या जमिनींची लूट थांबवा” अशा घोषणा देत सरकारवर जोरदार निशाणा साधला.शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “ही जनतेच्या जमिनींची लूट असून तपास यंत्रणांनी याकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देईल.”

आंदोलनात शहरप्रमुख संजय मोरे,गजानन थरकूडे,उपशहरप्रमुख आबा निकम, प्रशांत राणे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत,
संघटक राजेंद्र शिंदे, पराग थोरात,वाहतूक सेनेचे दत्तात्रय घुले,विभाग प्रमुख सूरज लोखंडे, नितीन परदेशी, मुकुंद चव्हाण, विलास सोनवणे, गोविंद निंबाळकर, नंद येवले, संदीप गायकवाड, नितीन रावळेकर, संजय गवळी, दिलीप पोमण, मकरंद पेठकर, गणेश घोलप, सूर्यकांत पवार, नितीन दलभजन, नीलेश वाघमारे, हेमंत यादव, नागेश खडके, नितीन थोपटे, नितीन निगडे, राहुल शेडगे, नंदू साबळे, नितीन आल्हाट, नीलेश पवार, गौरव सिन्नरकर, अर्जुन जानगवळी, द्न्यानंद कोंढरे, परेश खांडके, नीरज नांगरे, पुरुषोत्तम विटेकर, गिरीश गायकवाड, सोहम जाधव, वैभव कदम, अनिल वांजळे, दिलीप व्यवहारे, दाजी गुजर, संजय वाल्हेकर, गणेश औरंगाबादकर, अभिषेक जगताप, झुबेर शेख, नीलेश चव्हाण, अतुल कवडे, श्रीनिवास कराड, आबा लोखंडे, राजेश राऊत, संजय लोहार, रमाकांत शस्ते, कैफ शेख, संजय साळवी, पाला मोरे, संतोष चव्हाण, विजय पालवे आदींनी सहभाग घेतला.महिला आघाडीच्या निकिता मारटकर, वैशाली दारवटकर, सुलभा तळेकर, रेखा कोंडे, स्वाती कथलकर, ज्योती वीर, करूना घाडगे, रोहिणी कोल्हाळ, जयश्री भनगे, विजया मोहिते, स्नेहल पाटोळे या महिला पदाधिकाऱ्याही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.