पुणे:ऑटो हब, आयटी हब, इलेक्ट्रानिक्स हब म्हणून नावारूपाला आलेल्या शहरात मोठ्या प्रमाणात देशी आणि विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता आहे. त्याचा फायदा स्थानिक स्तरावरील व्यवसायांची वाढ आणि स्वयंरोजगार व नोकरीच्या संधी निर्मितीसाठी व्हावा, यासाठी पुण्याचे स्वतंत्र औद्योगिक धोरण तयार करणार असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.
मिसाळ यांच्या प्रचारार्थ आज सिंहगड रस्ता परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, ज्योती गोसावी, मंजुश्री नागपुरे, बाळासाहेब आखाडे, राहुल जोशी, दीपक नागपुरे, राजू कदम, अभिजीत कदम, विशाल पवार, सागर यादव, श्रावणी जगताप, मंगेश गुजवे, प्रणव कुकडे, कागर साळुंखे, दीपक महाडिक, विजय मानकर, सुनील भगरे यांचा सहभाग होता
मिसाळ म्हणाल्या, पुणे आणि आसपासच्या परिसरातील उद्योग क्षेत्राचा चेहरामोहरा बदलत आहे. आयटी क्षेत्रातील निर्यातीत पुण्याचा देशात तिसरा क्रमांक लागतो. मे इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमात सर्वाधिक गुंतवणूक पुण्यात होत आहे. अनेक कंपन्या इथे आपले संशोधन आणि विकास केंद्रे उभारू लागल्या आहेत. विदेशी वाहन उत्पादक कंपन्यांनी एक्स्पोर्ट हब म्हणून शहराला मान्यता दिली आहे. इलेक्ट्रानिक्स उद्योगांचे हब म्हणून शहर विकसित होत आहे.
मिसाळ पुढे म्हणाल्या, प्रदूषण रोखून पर्यावरण संवर्धनासाठी जैविक इंधनासह अक्षय्य ऊर्जेचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी धोरण आखले जाईल. उत्पादनक्षम कामास अधिक वेळ मिळावा यासाठी वाहतुक वेगवान करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी मेट्रो, लोहमार्ग चौपदरीकरण, सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणावर विशेष प्रयत्न होत आहेत. महामार्ग आणि आंतर शहरीय रस्त्यांची कामे मार्गी लावणे, आंतर शहरीय रस्त्यांची कामे पूर्ण करणार आहोत. स्टार्टअपला प्रोत्साहन, उद्योगांच्या मूल्यवर्धनासाठी सोपी, सुटसुटीत व्यवस्था निर्माण करण्यावर भर देणार आहे.
पुण्यासाठी स्वतंत्र औद्योगिक धोरण तयार करणार :आमदार माधुरी मिसाळ
श्रीपाल सबनीस, ॲड. शैलजा मोळक यांना संविधान रत्न पुरस्कार जाहीर
पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवारी होणार गौरव
पुणे : भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीतर्फे भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवारी संविधान रत्न पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम गुरुवार, दि. 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सहभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि शिवस्पूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. शैलजा मोळक यांना संविधान रत्न पुरस्काराने गौरविले जाणार आहे. पुरस्कार वितरण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर असून कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर असणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
खेळाडू आणि क्रीडा संघटनांचारमेश बागवे यांना जाहीर पाठिंबा
पुणे : पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्ष काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांना शहरातील विविध खेळ प्रकारातील दिग्गज खेळाडूंनी आणि क्रीडा संघटनांनी गुरुवारी एकमुखी पांठिबा जाहीर केला. बागवे यांनी शहरात क्रीडा संस्कृती रूजविण्याचे महत्त्वाचे कार्य केले असून यापुढे त्यांच्या हातून क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण काम व्हावे, यासाठी त्यांना या निवडणुकीत जाहीर पाठिंबा देत असल्याचे विविध क्रीडा संघटना आणि मान्यवर खेळाडूंनी जाहीर केले.
पुणे शहर बॉक्सिंग संघटनेतर्फे भवानी पेठेतील लक्ष्मी बाजार सांस्कृतिक भवन येथे शहरातील खेळाडूंचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी रमेश बागवे यांच्या वतीने सत्कार स्वीकारला. शिवछत्रपती पुरस्कार विजेते रेनॉल्ड जोसेफ आणि सलमान शेख (बॉक्सिंग), जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव प्रदीप परदेशी, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष भरतकुमार व्हावळ, संजय कांबळे (स्केटिंग), हर्षल निकम (अँथलेटिक्स), अनिल शिंदे (बॉडी बिल्डिंग), श्याम सहानी (पॉवर लिफ्टिंग), पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव अभिमन्यू सूर्यवंशी, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष मदन वाणी, राष्ट्रीय पुरस्कार विजेती सईद डावखर, समीक्षा सूर्यवंशी, भूमिका खिलारे, क्रीडा संघटक विजय उत्तुरे, सोफी असिफ ( कराटे), सुरेशकुमार गायकवाड, भगवान वायाळ (पॉवर लिफ्टिंग), इलियाज शेख (वेटलिफ्टिंग), किरण भिसे (बॉल्डी बिल्डिंग), प्रशिक्षक उमेश जगदाळे, यांच्यासह विविध खेळाडू आणि शंभर पालक उपस्थित होते.
बागवे यांनी महापालिकेतर्फे जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियम, तसेच सुसज्ज व्यायामशाळा उभारली. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलाच्या उभारणीसाठी त्यांनी योगदान दिले. शहरातील बॉक्सिंगसह सर्व प्रकारच्या क्रीडा संघटनांच्या मागे ते कायम खंबीरपणे उभे राहिले आहेत. शहरातील क्रीडा संस्कृती घडविण्यात बागवे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, अशी भावना खेळाडूंनी व्यक्त केली.
लाडकी बहीण म्हणून महिलांना दीड हजार रुपये देण्यापेक्षा महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. महिला अधिकाऱ्यांना आणि पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण करणारे लोकप्रतिनिधी नको. सर्वसामान्य नागरिक आणि खेळाडूंना विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणारे आणि खेळाडूंच्या सदैव पाठीशी राहणारे रमेशदादा यांना मतदान करावे, असे आवाहन खेळाडूंनी केले. रमेशदादांचा खेळाडूंशी एखादी स्पर्धा आयोजित करण्यापुरता संबंध नसून ते सर्व खेळाडूंच्या अडचणीच्या काळात त्यांच्यासाठी उभे राहतात. खेळाडूंनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशी भावना अविनाश बागवे यांनी व्यक्त केली. मदन वाणी यांनी सूत्रसंचालन केले. अभिमन्यू सूर्यवंशी यांनी आभार मानले.
तत्पूर्वी आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियममधील साळवे यांच्या पुतळ्याला रमेश बागवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संगमवाडी येथील समाधी स्थळी पुष्पहार अर्पण करून त्यांनी आदरांजली वाहिली. देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त नेहरू स्टेडियममधील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. वानवडी बाजार, गिरमे शाळा, कटके वस्ती, नेताजी नगर या भागात निघालेल्या रमेश बागवे यांच्या पदयात्रेचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
“आमच्या उज्वल भवितव्यासाठी व राज्याच्या प्रगतीसाठी मतदान करा” पत्रातून विद्यार्थीनींचे पालक आणि नातेवाईकांना साकडे
पुणे, दि. 14 : “आमच्या उज्वल भवितव्यासाठी व राज्याच्या प्रगतीसाठी मतदान करा”, असे साकडे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मॉडर्न विद्यालयातील विद्यार्थिनींनी भ्रमणध्वनी संदेशाचे माध्यम वापरण्याऐवजी पत्र पाठवून आपल्या पालकांना व नातेवाईकांना घातले आहे.
मतदानाचा टक्का वाढावा म्हणून भारत निवडणूक आयोग, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व स्विप व्यवस्थापन कक्ष यांच्यावतीने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. शिवाजीनगर येथील मॉडर्न मुलींचे विद्यालय या शाळेतील विद्यार्थिनींनी पालक आणि नातेवाईकांना पत्र लिहीले आहे. निवडणुकीपूर्वीच ते त्यांच्या हातात मिळेल. “आमच्या उज्वल भवितव्यासाठी व राज्याच्या प्रगतीसाठी मतदान करा”. असे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे.
या उपक्रमात 300 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. शालेय अभ्यासक्रमामध्ये पत्रलेखन हा विषय आहे. मात्र भ्रमणध्वनीच्या या जमान्यात पत्रलेखन करून आपल्या नातेवाईकांशी हितगुज करणे दुरापस्त झाले असतांना पत्रलेखन करण्याचा अनुभव घेत आपल्या नातलगांना विद्यार्थीनींनी पत्र लिहीले आहे. मतदानापूर्वी त्यांच्या नातेवाईकांच्या हातात हे टपाल खात्याचे पत्र पोहोचेल, ते सुद्धा याचा सुखद अनुभव घेतील, अशा बेताने हे पत्र टपालाद्वारे पाठविले जाणार आहे. या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ स्वीप समन्वय समितीचे दीपक कदम, सागर काशीद, विशाल म्हेत्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका माया नाईक, डॉ. उज्ज्वला हातागळे, वैशाली घोडके, अनुप्रिती गाजरे, माधवी चिटणीस, जान्हवी दुर्गे, रेश्मा आदमाने, अश्विनी चेन्नूर, श्रुती साठे यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.
मानवी साखळी करून लोकशाहीसाठी मागितले मताचे दान
पुणे, दि. 14 : येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा या उद्देशाने तृतीयपंथीय आणि बचत गटातील महिलांद्वारे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामधील रस्त्यावर मानवी साखळी करून लोकशाहीसाठी मताचे दान मागितले.
निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात स्वीप पथकाद्वारे कमी मतदान झालेल्या भागांमध्ये विशेष मोहीम राबवून उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या अनुषंगाने पाटील इस्टेट वसाहत येथे मतदार जन जागृती कार्यक्रम घेण्यात आला. तृतीयपंथी आणि बचत गटातील महिलांनी या मोहिमेत सहभाग घेत ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’ अशा घोषणा देत घरोघरी जात मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. पाटील वसाहत येथील पुणे-मुंबई रस्त्यावर मानवी साखळी तयार करून मतदारांचे लक्ष्य वेधत सदृढ लोकशाहीच्या बळकटीसाठी मताचे दान मागून मतदारांना प्रोत्साहित करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमामध्ये समूह संघटिका अलका गुजनाल, तृतीयपंथी आयकॉन शरद खुडे यांच्यासह महिला बचत गटातील प्रतिनिधी तसेच शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ स्वीप समन्वय समितीचे दीपक कदम, सागर काशीद, विशाल आदी या उपक्रमात सहभागी झाले होते.
मातोश्री, हेमराज संघाचे विजय
एन. बी. ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा : निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजन
पुणे : मातोश्री इलेव्हन, हेमराज मृत्यूंजय यांनी निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा टेनिस प्रीमियर एन. बी. ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
वडगाव बुद्रुक येथील सिंहगड रोडवरील मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.पहिल्या लढतीत मातोश्री इलेव्हन संघाने टिंगरे सरकार ग्रुपवर २७ धावांनी मात केली.मातोश्री इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ८ षटकांत ३ बाद १०४ धावाकेल्या. दिलीप वर्माने २३ चेंडूंत सात षटकार व दोन चौकारांसह नाबाद ६३ धावाकेल्या. त्याला कर्णधार राजेश पवारची उत्तम साथ लाभली. पवारने १९ चेंडूंत दोन षटकार व तीन चौकारांसह ३३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल टिंगरे ग्रुप संघाला ८बाद ७७ धावा केल्या. यात धीरज गच्चेने अवघ्या सहा धावांत टिंगरे ग्रुपचा निम्मा संघ गारद केला.
‘ड’ गटात मातोश्री इलेव्हन संघाचा हा पहिलाच विजय आहे. यानंतर दुसऱ्या लढतीत हेमराज मृत्युंजय संघाने शिरसाठ संघावर ५३धावांनी मात केली. हेमराज संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १११ धावापर्यंत मजल मारली. अनिकेत ताकवनेने २१ चेंडूंत पाच षटकार व चार चौकारांसह ५५ धावा केल्या.लक्ष्याचा पाठलाग करताना शिरसाठ स्पोर्ट्स संघाला ७ बाद ५८ धावाच करता आल्या.
‘क’गटात हेमराज संघ सलग दोन विजयांसह अव्वल क्रमांकावर आहे. धावफलक : मातोश्री इलेव्हन – ८ षटकांत ३ बाद १०४ (दिलिप वर्मा नाबाद ६३, राजेश पवार ३३, असिफ शेख १-२३, अमोल पवार १-२३,अनिकेत रोडे १-४) वि. वि. टिंगरे सरकार ग्रुप – ८ षटकांत ८ बाद ७७ (रोहन गर्दाडे २४,भरत कदम २०, धीरज गच्चे ५-६, अविष्कार दाते २-१३, प्रथमेश गोसावी १-२४).
हेमराज मृत्युंजय – ८ षटकांत ६ बाद १११ (अनिकेत ताकवने ५५, विशाल सरकार १९, किसन मरगळे १३, सूरज गवळी २-२८, संदीप गिर्हे१-२८, रणजित फराटे १-२३) वि. वि. शिरसाठ स्पोर्ट्स – ८ षटकांत ७ बाद ५८(संकेत भुजबळ १९, प्रतीक फराटे १६, वसिक शेख २-२, अनिकेत ताकवने२-२१).
शिरसाठ स्पोर्ट्स – ८ षटकांत ९ बाद ६४ (रणजित फराटे १८, अक्षय खोंड नाबाद १६, नीलेश ढगे २-१०, अमर गोरे २-१९, अभि २-३) वि.वि. सुखाई प्रतिष्ठान – ८ षटकांत सर्व बाद ५६ (रोहित पाटील १३, रणजित फराटे ३-११, संदीप गिर्हे १-१३, प्रतीक फराटे १-११).
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जून्नर येथे 13 लाख रुपयाचा विदेशी मद्यसाठा जप्त
पुणे, दि. 14: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे 13 लाख रुपये किंमतीचे विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.3 चे पुणे निरीक्षक देवदत्त पोटे यांनी दिली आहे.
पथकाला 13 नोव्हेंबर रोजी माहितीनुसार बालाजी प्लाजा नगर कल्याण रोड, ओतुर एसटी स्टॅण्ड जवळ,ओतूर ता.जुन्नर येथे विदेशी दारु, वाईन, बिअरचा साठा बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकून पथकाच्यावतीने कारवाई केली असता विदेशी मद्दाचे 100 बॉक्स, बिअरचे 125 बॉक्स,वाईनचे 37 बॉक्स असे मिळून एकूण 262 बॉक्स एकूण 13 लाख 20 हजार 420 रुपये किंमतीचा मद्दसाठा जप्त करण्यात आला. मयूर पुरुषोत्तम तांबे याचे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईत भरारी पथक क्र.3 पथकाचे निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक वाय.एम.चव्हाण, पी.ए.ठाकरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक संजय साठे, जवान सर्वश्री जगन्नाथ चव्हाण,अमर कांबळे,जयदास दाते,अनिल दांगट व शरद हांडगर सहभागी होते, अवैध मद्य निर्मिती, विक्री वाहतूक तसेच साठवणूकीबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पोटे यांनी केले आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रात आता ६४ पदनिर्देशित ठिकाणे
पुणे, दि. १४ : पर्वती विधानसभा मतदारसंघात यापूर्वी असलेल्या ६३ पदनिर्देशित ठिकाणांमध्ये आणखी एका पदनिर्देशित ठिकाणाची वाढ होवून आता एकूण ६४ पदनिर्देशित ठिकाणे झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली आहे.
पर्वती मतदारसंघात ३४४ मतदान केंद्रे आहेत. यातील मतदान केंद्र क्र. ६३ हे रोहन कृतिका हौसिंग सोसायटी, पु. ल. देशपांडे उद्यान जवळ, नवश्या मारुती परिसर, सिंहगड रोड येथे आहे. या केंद्राची एकूण मतदार संख्या १ हजार ३७९ झाली असल्यामुळे पर्वती विधानसभा मतदार संघाच्या पदनिर्देशित ठिकाणांच्या संख्येत एकने वाढ झालेली आहे.
संबधित मतदान केंद्रामध्ये पुणे पाट बंधारे खात्याची नारायण कोठी उत्तर दिशेकडील गणेश मंदीर जवळ-जयदेव नगर- साठे वसाहत- गणेश मळा-सिंहगड रोड-रोहन कृतिका हौसिंग सोसायटी-सीता बाग- विठ्ठलवाडी जुना जकात नाक्या जवळ- व्यंकटेश्वरा हॅचरीज कंपनी शेजारीचा भाग असून या मतदान क्षेत्रामध्ये असलेल्या मतदारांनी या मतदान क्षेत्रामध्ये असलेल्या मतदारांनी या मतदान केंद्रावर जावून तेथे असणाऱ्या मतदार यादीबाबत खात्री करून घ्यावी, जेणेकरून मतदानाचे दिवशी त्यांचा मतदान केंद्राबाबत गोंधळ न होता ते नियोजित वेळेत मतदान करू शकतील, अशी माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघाचे निवडणुक निर्णय अधिकारी श्री. खैरनार यांनी दिली आहे.
‘बटेंगे तो कटेंगे’ या भाजपच्या नाऱ्याचे मी समर्थन करत नाही, अजित पवारांनी सांगितले ठणकावून
बीड-उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बुधवारी पुन्हा एकदा आपला पक्ष ‘बटेंगे तो कटेंगे’ या भाजपच्या नाऱ्याचे समर्थन करत नसल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र हा साधू संतांचा व शाहू, फुले, आंबेडकरांचा प्रदेश आहे. त्यामुळे येथे ‘बटेंगे तो कटेंगे’ असले काहीही चालणार नाही. आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही कुणाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे ते म्हणालेत.अजित पवार यांची बुधवारी बीडमध्ये प्रचारसभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘बटेंगे तो कटेंगे’ या भूमिकेशी कोणताही संबंध नसल्याचे ठणकावून सांगितले. ते म्हणाले, कुणी काहीही बोलले तरी आम्ही त्याचे समर्थन करत नाही. महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’ अजिबात चालणार नाही. ते तिकडे उत्तर भारतात चालेल. महाराष्ट्र हा साधू संतांचा प्रदेश आहे. शिवप्रेमींचा महाराष्ट्र आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्यांचीच शिकवण आमच्या रक्तात भिनलेली आहे. त्यामुळे आम्ही त्याच रस्त्याने पुढे जाणार
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’ची हाक दिली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘एक है तो सेफ है’चा नारा दिला आहे. या दोन्ही नाऱ्यांमु्ळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघत असताना अजित पवारांनी त्यापासून स्वतःला व स्वतःच्या पक्षाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
अजित पवार यांनी यावेळी अल्पसंख्याक समाजाला चुचकारण्याचाही प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाने वेगळा निर्णय घेतला. त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. पण असे करून त्यांनी काय मिळवले. शिवसेनेने वक्फ बोर्डाचा विषय आला तेव्हा सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. काय साध्य झाले? ज्यांना तुम्ही मते दिली तेच बहिष्कार टाकून गेले, याचा काहीतरी विचार करा ना. अल्पसंख्याक समाजाने आपल्या विचाराचे कोण आहेत, मदत करणारे कोण आहेत, वेळेवर धावून येणार कोण आहेत, बोलतात तसे वागणारे कोण आहेत याचा विचार करून मतदान केले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलण्याचा चुकीचा नरेटिव्ह पसरवला. आरक्षण रद्द करण्याची अफवा पसरवली. यामुळे मागासवर्गांची दिशाभूल झाली. अरे पण हे कुणी सांगितले? विरोधकांकडे दुसरा कोणताही मुद्दा नव्हता. त्यामुळे त्यांनी मनात येईल ते बेछुट आरोप केले. कुणी संविधान बदलले? आम्ही न्यायदेवेच्या डोळ्यांवरील पट्टी काढून तिच्या हातात तराजू व संविधान दिले. एवढा संविधानाचा आदर आम्ही करतो. हे चाललंय आमचे.
संविधानाने जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपल्या सर्वांना एकसंध ठेवले आहे. त्यामुळे आपल्या इथे पाकिस्तान व बांगलादेशासारखे उठाव होत नाहीत. जे युक्रेन व रशियात सुरू आहे तसेही आपल्याकडे घडत नाही. शेवटी आपली एक परंपरा आहे. आपली एक संस्कृती आहे. आपल्याला एक इतिहास आहे. या सर्वांचा विसर तुम्ही पडू देऊ नका, असे अजित पवार म्हणाले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा महाराष्ट्रात झंझावाती प्रचार, मविआ उमेदवारांसाठी नंदूरबार व नांदेड मध्ये भव्य प्रचारसभा.
नंदूरबार/नांदेड, दि. १४ नोव्हेंबर २०२४
संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधाना रिकामे पुस्तक म्हणतात. संविधान रिकामे पुस्तक नाही तर त्यात बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची विचारसरणी आहे. संविधानात भारताचे ज्ञान, देशाचा आत्मा आहे. नरेंद्र मोदींनी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणून बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, गांधीजी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. काँग्रेस, इंडिया आघाडी मात्र कोणत्याही परिस्थितीत संविधानाचे रक्षण करेल आणि संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करेल, असा विश्वास लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नंदूरबार व नांदेड मध्ये भव्य प्रचारसभा झाल्या. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, राज्यघटनेत ‘आदिवासी’ असे म्हटलेले असताना भाजप-आरएसएसचे लोक आदिवासींना ‘वनवासी’ म्हणून जल, जंगल व जमिनीवरील हक्कापासून वंचित ठेवत आहे. आदिवासींच्या हक्कासाठी बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला व शहीद झाले. आज नरेंद्र मोदी आणि भाजपविरुद्ध लढावे लागत आहे. भूसंपादन विधेयक आणि पेसा कायदा आणून काँग्रेसने आदिवासींची जल, जंगल आणि जमीन संरक्षित केली पण भाजपची सत्ता येताच त्यांनी ‘वनवासी’ म्हणत आदिवासींचे हक्क हिरावून घेत आहे.
भाजपा सरकारवर तोफ डागत राहुल गांधी पुढे म्हणाले की, भाजपा सरकारने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातसह इतर राज्यात पाठवले, त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात जावे लागते. वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पाने १० हजार तरुणांना रोजगार दिला असता, टाटा एअरबस प्रकल्पातून १० हजार तरुणांना रोजगार मिळाला असता, आयफोन प्रकल्पातून ७५ हजार तरुणांना रोजगार मिळाला असता, ड्रग पार्कमुळे ८० हजार तरुणांना रोजगार मिळाला असता, गेल पेट्रोकेमिकल प्रकल्पातून २१ हजार रोजगार मिळाले असते पण भाजपा शिंदे सरकारने सर्व प्रकल्प गुजरातला पाठवून महाराष्ट्रातील ५ लाख नोकऱ्या गमावल्या. यामुळेच तरुण बेरोजगार झाले आहेत. मविआचे सरकार असे होऊ देणार नाही. जो प्रकल्प गुजरातचा आहे तो त्यांचाच राहील आणि जो महाराष्ट्राचा आहे तो इथून कुठेही जाणार नाही अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.

मोदी सरकार मुंबईतील धरावीची एक लाख कोटी रुपयांची जमीन अदानींना देत आहे पण आदिवासी, दलित, मागासवर्गीय, शेतकरी, महिलांना काय दिले, असा प्रश्न विचारून मविआ सरकार आल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला ३ हजार रुपये खटाखट खटाखट जमा होतील, महिलांना मोफत बस प्रवास देणार, शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंतची कर्जमाफी करणार. धान, कापूस, सोयाबीनला हमीभाव देऊ. सर्वांना २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा व मोफत औषधे देणार, बेरोजगार तरुणांना ४ हजार रुपयांना भत्ता, २.५ लाख सरकारी नोकर भरती करणार, जातनिहाय जनगणना व ५० टक्यांची मर्यादा हटवू असे राहुल गांधी यांनी सांगितले.
पाच वर्षांत 19,031 कोटी रुपयांचे प्रकल्प खडकवासला मतदारसंघात प्रगतीपथावर आणले- आमदार तापकीर
पुणे, 14 नोव्हेंबर 2024-“खडकवासल्याचा सर्वांगीण विकास हेच माझे प्राधान्य आहे,” असे सांगत तापकीर यांनी पाच वर्षांत 19,031 कोटी रुपयांचे प्रकल्प खडकवासला मतदारसंघात प्रगतीपथावर आणल्याचे म्हटले आहे आणि चौथ्या टर्मसाठी विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार आणि भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार भिमराव तापकीर यांचा आज आज प्रचार बावधान, कोथरूड, रामनगर आणि भुसारी कॉलनी येथे होता.यावेळी सुशील मेंगडे, राणी भोसले दिलीप वेडे पाटील, अल्पना वर्पे म्हणाले,’भीमराव अण्णांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघातील विकासाचे नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. त्यांच्या या कार्यकाळात ग्रामीण आणि शहरी भागांना समतोल पद्धतीने विकासाची गंगा मिळवून देत जनतेशी आपुलकीचे बंध निर्माण केले आहेत.
गेल्या पाच वर्षांत 19,031 कोटी रुपयांचे प्रकल्प खडकवासला मतदारसंघात प्रगतीपथावर आणले गेले. गोगलवाडी ते घेरा सिंहगड, खडकवासला ते आंबी, पानशेत-जांभळी यांसारख्या ग्रामीण भागांपासून वारजे, शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंढवे धावडे, एनडीए, अहिरे, खडकवासला, कीरकटवाडी, नांदोशी, सणस नगर, नांदेड, धायरी, नऱ्हे, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द, सिंहगड रोड, सनसिटी, माणिक बाग, कर्वेनगर, बावधान-भुसारी, कोथरूड, भारती विद्यापीठ, कात्रज, बालाजी नगर, बिबेवाडी, धनकवडी, राजीव गांधी नगर या भागांमध्ये नागरी आणि पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे.
महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग, चांदणी चौक उड्डाणपूल, खडकवासला पश्चिम रिंग रोड प्रकल्प, नवले पूल ते कात्रज रस्त्याचे सहापदरीकरण, वारजे ते माळवाडी मुठा नदीवरील नवीन पूल, स्वामीनारायण मंदिर ते नऱ्हे जंक्शन उड्डाणपूल, सनसिटी रोड (सिंहगड रोड) नदीवर पुल, खडकवासला फुरसुंगी बंदिस्त पाण्याचा भुयारी मार्ग यासाठी देखील २२०० कोटी अशा अनेक योजनांचा समावेश आहे. सिंहगड किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी जिल्हा नियोजन आणि पर्यटन विभागांकडून विशेष निधी, खाजगी सोसायट्यांच्या सीमा भिंती करिता ४८ कोटी, तसेच खाजगी सोसायट्या मध्ये सोलर प्रकल्प राबविण्यासाठी कोट्यावधीचा निधी, नगरविकास विभाग व ग्रामविकास विभागाकडून निधीतून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठ्याप्रमाणात निधी मंजूर करण्यात तापकीर यांना यश आले आहे.
पुणे महानगरपालिकेत समाविष्ट 32 गावांमधील मालमत्ता कराचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रभावीपणे पाठपुरावा केला. ग्रामपंचायतीच्या तुलनेत आकारल्या जाणाऱ्या जाचक कराला स्थगिती मिळवून त्यांनी जनतेला दिलासा दिला.
खडकवासला मतदारसंघातील विकासाच्या या प्रवासात सन २०१७ ते २०२२ याकाळात लोकप्रतिनिधी राहिलेले राहिलेले दिलीप वेडे पाटील, अल्पना वर्पे, किरण दगडे, श्रद्धा प्रभुणे, सुशील मेंगडे, वृषाली चौधरी, राजाभाऊ बराटे, दिलीप बराटे, दिपाली धुमाळ, हरिदास चरवड, नीता दांगट, राजश्री नवले, राजाभाऊ लायगुडे, श्रीकांत जगताप, प्रसन्न जगताप, ज्योती गोसावी, मंजुषा नागपुरे, दत्तात्रय धनकवडे, राणी भोसले, मनीषा कदम, प्रकाश कदम, वर्षा तापकीर, अश्विनी भागवत, युवराज बेलदरे, अश्विनी पोकळे, जयश्री भुमकर, जयश्री पोकळे, उषा नाणेकर, अनिरुद्ध यादव, सचिन दांगट, गंगाधर भडावळे, वैभव मुरकुटे, बाळा टेमकर यांचा उल्लेख करण्यात ते विसरले नाहीत यातूनच त्यांची सर्वसामान्य नागरिक यांच्यासोबत पक्ष निष्ठा दिसून येते.
EVM मध्ये गडबड, मला एकाचा सतत फोन येतोय:सुप्रिया सुळे यांचा दावा
नाशिक- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदान यंत्रात गडबड करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. एक व्यक्ती मला सतत फोन करून ईव्हीएम अर्थात मतदान यंत्रात गडबड झाल्याचे सांगत आहे. मी ही गोष्ट निवडणूक आयोगाच्या कानावर घालणार आहे, असे त्या म्हणाल्यात. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अटकळींना पेव फुटले आहे.
सुप्रिया सुळे बुधवारी येथे बोलताना म्हणाल्या, मला सातत्याने एक व्यक्ती फोन करत आहे. त्यात तो ईव्हीएममध्ये गडबड करण्यात आल्याचा दावा करत आहे. माझा या गोष्टींवर विश्वास नाही. पण खबरदारी म्हणून मी ही माहिती निवडणूक आयोगाच्या कानावर घालणार आहे. कारण, कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराची फसवणूक होऊ नये अशी माझी प्रेमळ भावना आहे. मी यासंबंधी कुणावरही आरोप करत नाही. पण असे फोन येतात तेव्हा काळजी वाटते. सत्तेत असो किंवा विरोधात कारभार पारदर्शक झाला पाहिजे असे माझे मत आहे.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी आपला लढा कुटुंबासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी असल्याचेही यावेळी ठणकावून सांगितले. अजित पवारांना कुटुंबातील कटुता संपणार नाही असे वाटते. हे त्यांचे मत आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. पण ही लढाई कुटुंबाची नाही तर वैचारिक आहे. महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाविरोधातील ही लढाई आहे. मी माझ्या कुटुंबासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी लढते आहे.
मायबाप जनतेसाठी संघर्ष करत आहे. महागाई, बेरोजगारी व भ्रष्टाचाराविरोधात लढत आहे. याचा कुटुंबाशी काय संबंध? आम्ही राजकारणात आमच्या कुटुंबासाठी आलो नाही. आम्ही राजकारणात राज्यातल्या मायबाप जनतेसाठी आलो आहोत, असेही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या बैठकीला उद्योगपती अदानी उपस्थित असल्याच्या मुद्यावरून घेतलेल्या युटर्नवरही निशाणा साधला. अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या मुद्यावर झालेल्या बैठकीला उद्योगपती गौतम अदानी उपस्थित असल्याचा दावा केला होता. याविषयी तुम्ही त्यांनाच विचारले पाहिजे. मी यापूर्वीच मला या भेटीची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले आहे. पण आता त्यांनीच आपल्या वक्तव्यावरून युटर्न घेतला आहे, असे त्या म्हणाल्या.
आजच्या अंदाधुंद राजवटीत पं. नेहरूंच्या विचारांची प्रकर्षाने गरज – उल्हास पवार
बालदिनानिमित्त आमदार रवींद्र धंगेकर यांनी बालचमूला मिठाई वाटून साजरी केली नेहरू जयंती व लहुजी वस्ताद जयंती
पुणे : आज महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात भाजप सरकारमार्फत सर्व लोकशाही संकेत धुडकावून बेबंदशाहीचा कारभार सुरू आहे. या अंदाधुंद कारभाराच्या पार्श्वभूमीवर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांची प्रकर्षाने गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी केले.
पंडित नेहरू जयंतीनिमित्त आज नेहरू स्टेडियम येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उल्हासदादा बोलत होते.
यावेळी क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांनाही उपस्थितांनी जयंतीनिमित्त अभिवादन केले.
यावेळी बोलताना उल्हासदादा म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभेच्या सध्या निवडणुका सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर नेहरू जयंती साजरी करताना या राज्यात पुन्हा लोकशाही आणि संविधान सर्वोच्च स्थानी ठेवणाऱ्या राज्यकर्त्यांची महाराष्ट्रात गरज आहे, याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. पंडित नेहरू यांनी आधुनिक भारताची पायाभरणी करताना देशात अनेक विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन संस्था उभारल्या. ‘इस्रो’सारखी अंतरिक्ष संशोधन संस्था नेहरूंनीच सुरू केली. नेहरूंच्या पुढाकाराने पुणे परिसरातही असंख्य संस्था उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे पुण्याच्या वैभवात भर पडली आहे. पंडित नेहरूंनी अत्यंत सुसंस्कृत राजकारण केले. विरोधकांनाही संसदीय राजकारणात योग्य तो मानसन्मान दिला. पण आज सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांचे संपूर्ण खच्चीकरण करण्याचे काम विद्यमान राजवटीत सुरू आहे. संसदेत विरोधकांचा माइक बंद केला जातो, त्यांचा आवाज दाबला जातो, दरवाजे बंद करून आवाजी मतदानाने कोणताही विषय दडपून संमत केला जातो, संवेदनशील विषयांवर चर्चा होऊ दिली जात नाही. हा सगळा प्रकार जर थांबवायचा असेल, तर आपल्याला नेहरूंच्या विचारानेच यापुढील काळात मार्गक्रमण करावे लागेल, असेही उल्हासदादा म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार रवींद्र धंगेकर यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली वाहतानाच, क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांनी समाजकारणात दिलेल्या योगदानाचेही स्मरण केले. लहुजी वस्ताद यांनी अनेक माणसे घडवली. त्यांच्या तालमीत बलोपासनेबरोबरच राष्ट्रउपासनेचेही धडे दिले गेले, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृह राज्यमंत्री व कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश बागवे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संजय बालगुडे, नरेंद्र व्यवहारे, अप्पा शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित बालचमूनेही पंडितजींच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर या उपस्थित बालचमूला रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते खाऊवाटप करण्यात आले. उपस्थित बालकांनी नेहरू चाचा आणि लहुजी वस्ताद यांच्या नावांचा जयघोष करीत त्यांना अभिवादन केले.
‘अनंताख्यान’चे पारायणरूपाने वाचन व्हावे : डॉ. कल्याणी नामजोशी
ती डॉ. धनंजय शिरोळकर लिखित ‘अनंताख्यान’ ओविबद्ध चरित्रग्रंथाचे प्रकाशन
पुणे : गुरूंप्रती अत्यंत नम्रभाव, श्रद्धा, शरणागती या त्रिगुणातून ‘अनंताख्यान’ अर्थात ‘श्री वरदानंद भारती : कथामृत काव्यबिंदू’ या ओविबद्ध चरित्रग्रंथाची निर्मिती डॉ. धनंजय शिरोळकर यांच्या हातून घडल्याचे जाणवते. हा ग्रंथ परिवारापुरता मर्यादित न राहता जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावा आणि त्याचे पारायणरूपाने वाचन व्हावे, अशी अपेक्षा श्री राधादामोदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. कल्याणी नामजोशी यांनी व्यक्त केली. अनंताख्यान हे ग्रंथ शिर्षक अत्यंत समर्पक असून या ग्रंथातून प.पू. वरदानंद भारती यांच्या जीवनातील घटनाक्रम सहज-सोप्या आणि आशयघन शब्दांतून ओवीरूपाने समोर आला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
प.पू. वरदानंद भारती तथा अनंतराव (अप्पा) आठवले यांच्या तेजाचे चांदणे या आत्मचरित्रपर ग्रंथाच्या ओवीबद्ध अवतर्णिकेची निर्मिती त्यांचे सुशिष्य डॉ. धनंजय शिरोळकर यांनी केली आहे. या ओवीबद्ध चरित्रग्रंथाचे प्रकाशन डॉ. कल्याणी नामजोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रम गणेश सभागृहात आयोजित करण्यात आला होता. गोरटे येथील श्री दासगणू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. कल्याणी शिरोळकर, देवव्रत शिरोळकर व्यासपीठावर होते.
डॉ. नामजोशी पुढे म्हणाल्या, ग्रंथातील ओव्यांची मांडणी आकर्षक असून कमीतकमी शब्दात परंतु भक्तीरसाची महती दर्शविणारा भावविलास उत्तम साधला आहे. प.पू. वरदानंद भारती यांना आलेल्या अतींद्रिय अनुभूती रचनाकार डॉ. शिरोळकर यांनी अतिशय निर्भिडपणे सात्विक-निर्मळ मनातून मांडल्या आहेत.
महेश आठवले यांनी प.पू. दासगणु महाराजांचे अनुयायी असलेल्या वडील प.पू. वरदानंद महाराज यांच्या अनेक आठवणी सांगत त्यांच्या स्वभावाचे, विचारांचे पैलू उलगडून दाखविले. हा ग्रंथ म्हणजे प.पू. वरदानंद महाराज यांच्या चरित्राचे रसाळ शब्दातील ओवीबद्ध दर्शन होय, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
पुस्तकाच्या निर्मितीविषयी बोलताना डॉ. धनंजय शिरोळकर म्हणाले, प.पू. वरदानंद महाराज यांच्या विचारधनाचे भांडार सर्व समाजापर्यंत पोहोचावे, त्यांचे सामाजिक योगदान पुढे यावे यासाठी ग्रंथाची निर्मिती केली आहे. देवव्रत शिरोळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले तर आभार अभय जबडे यांनी मानले.
फोटो ओळ : ‘अनंताख्यान’ अर्थात ‘श्री वरदानंद भारती : कथामृत काव्यबिंदू’ या ओविबद्ध चरित्रग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) कल्याणी शिरोळकर, महेश आठवले, डॉ. कल्याणी नामजोशी, डॉ. धनंजय शिरोळकर.
ख्रिस्ती समाजाच्या विविध समस्या विधानसभेत मांडू व सोडवू; बापूसाहेब पठारे यांचा निश्चय
मार्कस पंडित यांच्या माध्यमातून चर्चासत्रात वडगावशेरी मतदारसंघातील सर्व कॅथोलिक चर्चचा सहभाग
पुणे: खराडी येथे ख्रिस्ती समाजाचे नेते मार्कस पंडीत यांच्या नेतृत्वाखाली ख्रिस्ती समाजाच्या विविध समस्यांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रमुख उपस्थित हे चर्चासत्र पार पडले.
यावेळी संत फ्रान्सिस डी सेल्स चर्च, डीव्हाईन मर्सी चर्च, क्राईस्ट द किंग चर्च, कार्मिल चर्च, होली फॅमिली चर्च लोहगाव त्याचप्रमाणे कॅथलिक असोसिएशन ऑफ पुणे, वडगावशेरी मायनॉरीटी काँग्रेस आय पार्टी, ख्रिश्चन कोकणी संघटना, तमिळ ख्रिचन संघटना, एस एफ मराठी कॅथलिक संघटना, मिलाग्रास फाउंडेशन वडगावशेरी, पुणे कोकणी ख्रिस्त सभा, ख्रिस्त जागृती मंच या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तरपणे विविध विषयांवर चर्चा केली.
आगामी निवडणुकीसाठी या सर्व संघटनांनी व ख्रिस्ती समाजाने बापूसाहेब पठारे यांना पाठींबा जाहीर केला. तसेच, ख्रिस्ती समाजाच्या समस्या विधानसभेत मांडण्याची विनंती पठारे यांना केली. “ख्रिस्ती समाजाने दिलेला पाठिंबा फार महत्त्वाचे योगदान देणारा ठरेल. येणाऱ्या काळात विविध माध्यमातून ख्रिस्ती समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडू व त्यावर नक्कीच तोडगा काढू”, असे आश्वासन बापूसाहेब पठारे यांनी दिले.
यावेळी जयप्रकाश पारखे (सचिव, महाराष्ट्र राज्य प्रोग्रेसिव्ह पीपल काँग्रेस पक्ष), जॉन फर्नाडिस (अध्यक्ष, मिलाग्रास फाउंडेशन), जो रोड्रिग्ज (अध्यक्ष, कोकणी सभा), एडविन अलेक्स (अध्यक्ष, तामिळ सभा), रविभाऊ कांबळे (अध्यक्ष, मराठी सभा व सरचिटणीस, काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती जमाती), जो कसबे (पुणे धर्मप्रांत अध्यक्ष कॅथलिक असोसिएशन), ए वी थॉमस (धानोरी चर्च), स्वप्नील साळवे सर ( क्राईस्ट द किंग चर्च), मॅथ्यू थॉमस (कार्मेल चर्च), पासकल लोपोझ, बेंजामिन डिकोस्टा, अँथॉनी फर्नांडिस, मधुकर सदाफुले, अमर पंडीत इ. विविध संघटनांचे मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
