नाशिक- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदान यंत्रात गडबड करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. एक व्यक्ती मला सतत फोन करून ईव्हीएम अर्थात मतदान यंत्रात गडबड झाल्याचे सांगत आहे. मी ही गोष्ट निवडणूक आयोगाच्या कानावर घालणार आहे, असे त्या म्हणाल्यात. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अटकळींना पेव फुटले आहे.
सुप्रिया सुळे बुधवारी येथे बोलताना म्हणाल्या, मला सातत्याने एक व्यक्ती फोन करत आहे. त्यात तो ईव्हीएममध्ये गडबड करण्यात आल्याचा दावा करत आहे. माझा या गोष्टींवर विश्वास नाही. पण खबरदारी म्हणून मी ही माहिती निवडणूक आयोगाच्या कानावर घालणार आहे. कारण, कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराची फसवणूक होऊ नये अशी माझी प्रेमळ भावना आहे. मी यासंबंधी कुणावरही आरोप करत नाही. पण असे फोन येतात तेव्हा काळजी वाटते. सत्तेत असो किंवा विरोधात कारभार पारदर्शक झाला पाहिजे असे माझे मत आहे.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी आपला लढा कुटुंबासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी असल्याचेही यावेळी ठणकावून सांगितले. अजित पवारांना कुटुंबातील कटुता संपणार नाही असे वाटते. हे त्यांचे मत आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. पण ही लढाई कुटुंबाची नाही तर वैचारिक आहे. महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाविरोधातील ही लढाई आहे. मी माझ्या कुटुंबासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी लढते आहे.
मायबाप जनतेसाठी संघर्ष करत आहे. महागाई, बेरोजगारी व भ्रष्टाचाराविरोधात लढत आहे. याचा कुटुंबाशी काय संबंध? आम्ही राजकारणात आमच्या कुटुंबासाठी आलो नाही. आम्ही राजकारणात राज्यातल्या मायबाप जनतेसाठी आलो आहोत, असेही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या बैठकीला उद्योगपती अदानी उपस्थित असल्याच्या मुद्यावरून घेतलेल्या युटर्नवरही निशाणा साधला. अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या मुद्यावर झालेल्या बैठकीला उद्योगपती गौतम अदानी उपस्थित असल्याचा दावा केला होता. याविषयी तुम्ही त्यांनाच विचारले पाहिजे. मी यापूर्वीच मला या भेटीची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले आहे. पण आता त्यांनीच आपल्या वक्तव्यावरून युटर्न घेतला आहे, असे त्या म्हणाल्या.