पुणे:ऑटो हब, आयटी हब, इलेक्ट्रानिक्स हब म्हणून नावारूपाला आलेल्या शहरात मोठ्या प्रमाणात देशी आणि विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता आहे. त्याचा फायदा स्थानिक स्तरावरील व्यवसायांची वाढ आणि स्वयंरोजगार व नोकरीच्या संधी निर्मितीसाठी व्हावा, यासाठी पुण्याचे स्वतंत्र औद्योगिक धोरण तयार करणार असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.
मिसाळ यांच्या प्रचारार्थ आज सिंहगड रस्ता परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, ज्योती गोसावी, मंजुश्री नागपुरे, बाळासाहेब आखाडे, राहुल जोशी, दीपक नागपुरे, राजू कदम, अभिजीत कदम, विशाल पवार, सागर यादव, श्रावणी जगताप, मंगेश गुजवे, प्रणव कुकडे, कागर साळुंखे, दीपक महाडिक, विजय मानकर, सुनील भगरे यांचा सहभाग होता
मिसाळ म्हणाल्या, पुणे आणि आसपासच्या परिसरातील उद्योग क्षेत्राचा चेहरामोहरा बदलत आहे. आयटी क्षेत्रातील निर्यातीत पुण्याचा देशात तिसरा क्रमांक लागतो. मे इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमात सर्वाधिक गुंतवणूक पुण्यात होत आहे. अनेक कंपन्या इथे आपले संशोधन आणि विकास केंद्रे उभारू लागल्या आहेत. विदेशी वाहन उत्पादक कंपन्यांनी एक्स्पोर्ट हब म्हणून शहराला मान्यता दिली आहे. इलेक्ट्रानिक्स उद्योगांचे हब म्हणून शहर विकसित होत आहे.
मिसाळ पुढे म्हणाल्या, प्रदूषण रोखून पर्यावरण संवर्धनासाठी जैविक इंधनासह अक्षय्य ऊर्जेचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी धोरण आखले जाईल. उत्पादनक्षम कामास अधिक वेळ मिळावा यासाठी वाहतुक वेगवान करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी मेट्रो, लोहमार्ग चौपदरीकरण, सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणावर विशेष प्रयत्न होत आहेत. महामार्ग आणि आंतर शहरीय रस्त्यांची कामे मार्गी लावणे, आंतर शहरीय रस्त्यांची कामे पूर्ण करणार आहोत. स्टार्टअपला प्रोत्साहन, उद्योगांच्या मूल्यवर्धनासाठी सोपी, सुटसुटीत व्यवस्था निर्माण करण्यावर भर देणार आहे.