Home Blog Page 554

देवाभाऊंचे देव देव ….आणि गोमातांचे पूजन

मुंबई-

देवेंद्र फडणवीस यांनी दादर येथील सिद्धिविनायक मंदिरात जात दर्शन घेतले. शपथविधीपूर्वी फडणवीस यांनी श्रीगणरायाचरणी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्यासोबत गिरीश महाजन देखील उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीपूर्वी गोमातेचे पूजन करुन आर्शीवाद घेतले.मुंबादेवी मंदिरातही फडणवीसांनी दर्शन घेतले.

महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर 13 दिवसांनी आज नवीन सरकार स्थापन होणार आहे. आज सायंकाळी 5.30 वाजता आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होणार आहेत. त्यांच्याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे हेही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री होणारे शिंदे हे दुसरे नेते आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

याशिवाय भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय देशभरातील 400 संत-मुनी सहभागी होणार आहेत.

फडणवीस यांचा शरद पवार, उद्धव, राज ठाकरेंना फोन:शपथविधीचे दिले निमंत्रण,400 संत-मुनी सहभागी होणार

मुंबई-भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना फोन करत शपथविधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. मात्र, संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने शरद पवार दिल्लीत असल्याने ते शपथविधीला येणार नसल्याचे फडणवीसांना कळवल्याची माहिती आहे.भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह एकनाथ शिंदे अन् अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील फोन करुन निमंत्रण दिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याशिवाय भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय देशभरातील 400 संत-मुनी सहभागी होणार आहेत.

दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी फोन करत निमंत्रण दिल्यानंतरही ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे हे शपथविधीला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे हे त्यांच्या व्यैयक्तिक कारणामुळे शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थित राहण्यामागचे कारण समजू शकेल नाही

आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी सांगितले. तसेच सात आणि नऊ डिसेंबर रोजी आमदारांचे शपथविधी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मिसेस महाराष्ट्र 2024 सीझन 8: साहस, आत्मविश्वास आणि मुकुट

पुणे-

दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या मिसेस महाराष्ट्र 2024 स्पर्धेचा यशस्वी समारोप 1 डिसेंबर 2024 रोजी HYATT पुणे येथे झाला. या कार्यक्रमाचे आयोजन अंजना आणि कार्ल मस्करेनहास यांनी, DIVA Pageants या संस्थेचे संस्थापक म्हणून केले होते. या वर्षीची स्पर्धा ही बुद्धिमत्ता, सौंदर्य, आणि सामाजिक जागरूकता यांना अधोरेखित करणारी होती, ज्याने सौंदर्य स्पर्धेचा पारंपरिक दृष्टिकोन बदलला.

या 8 व्या सलग वर्षीच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील 53 अंतिम स्पर्धकांनी भाग घेतला. या महिलांनी आपल्या अप्रतिम क्षमतांचे प्रदर्शन करत, वय, क्षेत्र किंवा पार्श्वभूमी यांच्यामुळे सौंदर्य, कौशल्य आणि कृपेच्या मर्यादा कधीही येत नाहीत हे दाखवून दिले.

कार्यक्रमाला प्रसिद्ध ज्यूरींची उपस्थिती लाभली. यात सोनाली कुलकर्णी, ज्यांनी “दिल चाहता है”, “सिंघम” यांसारख्या आयकॉनिक चित्रपटांमधून आपली छाप पाडली, तसेच अभिनेता विराट मडके यांचा समावेश होता. याशिवाय, अपेक्षा दबराल (DIVA क्वीन आणि Universal Woman India 2024 Social Project विजेत्या), कार्ल मस्करेनहास (DIVA Pageantsचे डायरेक्टर), फरहा अन्वर (मिसेस इंडिया 2016 आणि मिसेस एशिया 2018), मेघना देवान गोपाल (Woman of the Universe Indo Asia 2024), विद्या तिवारी (लोकप्रिय खाद्य समीक्षक आणि फॅशन स्टायलिस्ट), आणि शिखा सिंग (मिसेस महाराष्ट्र 2023 विजेत्या) हे ज्यूरी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य राठी यांनी केले, ज्यांनी प्रेक्षकांना संपूर्ण रात्र खिळवून ठेवले. अंजना आणि कार्ल मस्करेनहास, सिसिलिया सन्याल, माधवी घोष, आणि अपेक्षा दबराल यांच्या नेतृत्वाखाली अंतिम स्पर्धकांना त्यांच्या उत्कृष्टतेची ओळख करून देण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले.

स्पर्धेच्या चार दिवसांत, स्पर्धकांना पोझिंग, सादरीकरण, प्रश्नोत्तर, रॅम्प वॉक आणि इतर अनेक गोष्टींवर वैयक्तिक प्रशिक्षण देण्यात आले. पूजा सिंग यांनी कोरिओग्राफी केली, ज्यामुळे कार्यक्रम अधिक भव्य झाला. DIVA मार्गारेट शिबू यांना मिसेस मिलेनियम युनिव्हर्स इंडिया 2025, आणि DIVA राधिका भूषण यांना वुमन ऑफ द युनिव्हर्स इंडिया 2025 म्हणून गौरविण्यात आले. त्या आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतील.

कार्यक्रमाचे यश हे मृणालिनी भारद्वाज, मृणाली तायडे, तनुजा बंगेरीया, सिसिलिया सन्याल, आणि स्पेंटा पटेल यांच्या समर्पित कार्यसंघामुळे शक्य झाले, ज्यांनी प्रत्येक गोष्टीची अचूक योजना आखली.

विजेतेमिसेस महाराष्ट्र 2024 सीझन 8

सिल्व्हर श्रेणी

•          विजेती: नंदिता चौहान

•          फर्स्ट रनर-अप: मेहर इक्बाल

•          सेकंड रनर-अप: प्रतीक्षा जगताप

•          थर्ड रनर-अप: मोनिका भोसले

गोल्ड श्रेणी

•          विजेती: डॉ. स्वेता कारलापुडी

•          फर्स्ट रनर-अप: डिंपल झवेरी

•          सेकंड रनर-अप: प्रियांका गोवर्धन

•          थर्ड रनर-अप: अमृता कौर

एलीट श्रेणी

•          विजेती: प्राजक्ता भोईर

•          फर्स्ट रनर-अप: अनुपमा सिंग

•          सेकंड रनर-अप: डॉ. मनीषा नाईक (सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका)

•          थर्ड रनर-अप: प्रमिता शेट्टी

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत पीआयसीटीच्या प्राध्यापकांचा सहभाग

पुणे: रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (RTMSSU) यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंतर्गत ‘आधुनिक अध्यापन कौशल्ये व पद्धती’ या विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (PICT) मधील प्रा. योगेश हांडगे, प्रा. पराग जांभुळकर, डॉ. श्वेता धर्माधिकारी आणि प्रा. मृणाल मुळे यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉ. अपूर्वा पालकर, कुलगुरू, RTMSSU यांनी ‘शैक्षणिक प्रणालीतील नवकल्पना व स्टार्टअप्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आधुनिक अध्यापन कौशल्ये विकसित करण्यासाठी विविध दृष्टिकोन मांडले.
कार्यशाळेत शिक्षकांसाठी प्रभावी अध्यापन पद्धती, विद्यार्थी सहभाग वाढवण्यासाठीच्या युक्त्या आणि केस स्टडी पद्धतीचा शैक्षणिक क्षेत्रातील उपयोग यावर सखोल चर्चा करण्यात आली. हार्वर्ड बिजनेस स्कूलसारख्या संस्थांच्या उदाहरणांचा संदर्भ देऊन केस स्टडी पद्धतीचे महत्त्व पटवून देण्यात आले.‘केस स्टडी विश्लेषण: अध्यापन पद्धती’ या सत्रात विविध गटचर्चा व कृती कार्यक्रमांद्वारे केस स्टडी कशी तयार करावी आणि ती कशी निवडावी, यावर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रासाठी भावेश कोठारी (CEO, आय स्पार्क), निलेश सरवटे, आणि डॉ. अमर सक्सेना ( RTMSSU) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचा समारोप सहभागी शिक्षकांनी आपले अनुभव आणि संकल्पना मांडून करण्यात आला. या कार्यशाळेने शिक्षणक्षेत्रातील नवकल्पना स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे मत सहभागी शिक्षकांनी व्यक्त केले. डॉ. अमर सक्सेना आणि डॉ. राजेंद्र तळवारे यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यशाळेचा समारोप केला.
PICT महाविद्यालयाचे संचालक डॉ. पी. टी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. संजय गंधे, आणि कॉम्प्युटर विभागप्रमुख डॉ. गीतांजली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापकांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवला.ही कार्यशाळा शिक्षकांना नवीन दृष्टिकोन आणि कौशल्ये आत्मसात करण्यासाठी उपयुक्त ठरली असल्याचे सहभागी शिक्षकांनी नमूद केले.

कबुतरांपासून उद्भवणाऱ्या समस्या: आरोग्यासाठी गंभीर धोका आणि प्रतिबंधात्मक उपाय

कबुतरं ही माणसांच्या शहरी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहेत. त्यांच्या शांत स्वभावामुळे आणि उघड्यावर सहज अन्न मिळाल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते. धार्मिक श्रद्धा आणि कबुतरांना अन्न टाकण्याच्या सवयी यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळते. मात्र, या पक्ष्यांमुळे श्वसनसंस्थेशी संबंधित अनेक गंभीर आजार होऊ शकतात. कबुतरांच्या पिंता आणि विष्ठेतून होणाऱ्या आजारांबाबत पुणे महानगरपालिका सातत्याने इशारे देत आहे. कबुतरांची अनियंत्रित संख्या आता सार्वजनिक आरोग्यासाठी मोठा धोका बनली आहे.

कबुतरांपासून होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या

कबुतरांच्या पिंता आणि विष्ठेमध्ये सूक्ष्म जीवजंतू, प्रथिने, आणि फफुंदीजन्य घटक असतात, जे हवेत मिसळून श्वसनमार्गातून शरीरात जातात. हे कण अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरतात:

  1. हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया (HP): हा आजार कबुतरांच्या विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म कणांमुळे होतो. फुफ्फुसांवर परिणाम करणारा हा आजार दीर्घकालीन आणि गंभीर असतो. पुणे महानगरपालिकेच्या अहवालानुसार, श्वसनविकारांनी ग्रस्त नागरिकांमध्ये HP आजार होण्याचे प्रमाण 60-65% आहे.
  2. एलर्जी आणि दमा: कबुतरांच्या पिंतात असलेल्या प्रथिनांमुळे श्वसनमार्गात सूज येते, ज्यामुळे दमा आणि एलर्जी होऊ शकते.
  3. त्वचाविकार: कबुतरांच्या संपर्कामुळे काही व्यक्तींना त्वचेला खाज, पुरळ, किंवा चट्टे येण्याची तक्रार असते.
  4. जीवाणूजन्य आणि फफुंदीजन्य संसर्ग: कबुतरांच्या विष्ठेमुळे सैल्मोनेलोसिस आणि क्रिप्टोकोकोसिस यांसारख्या आजारांचा धोका असतो.
  5. श्वसनाचे दीर्घकालीन विकार: सतत कबुतरांच्या संपर्कात राहणाऱ्या लोकांना दीर्घकालीन श्वसन समस्या होऊ शकतात, ज्यामुळे जीवनशैलीत मोठा अडथळा निर्माण होतो.

पुण्यातील वाढती समस्या

पुणे शहरात कबुतरांची संख्या वेगाने वाढत आहे. उघड्यावर अन्न टाकण्याच्या सवयीमुळे आणि त्यांच्या पोषणासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यामुळे त्यांच्या वावरात मोठी वाढ झाली आहे.

सार्वजनिक ठिकाणी, सोसायट्यांमध्ये आणि व्यस्त रस्त्यांवर कबुतरांचे मोठे थवे दिसून येतात.

त्यांच्यामुळे पिंता आणि विष्ठेचे प्रमाणही वाढले आहे, ज्यामुळे शहरातील हवेचा दर्जा खराब होतो.

या समस्यांमुळे पुणे महानगरपालिकेला शहरातील स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे लागत आहे.

महानगरपालिकेच्या उपाययोजना

पुणे महानगरपालिका या समस्येवर प्रभावीपणे काम करत आहे. त्यांनी खालील उपाययोजना हाती घेतल्या आहेत:

  1. कबुतरांना अन्न टाकण्यावर बंदी: कबुतरांना उघड्यावर अन्न टाकणे हा त्यांची संख्या वाढवण्याचा प्रमुख घटक असल्याने, महापालिकेने अशा कृतींवर कडक बंदी घातली आहे.
  2. दंडात्मक कारवाई: जर कोणी अन्न टाकताना आढळले, तर संबंधित व्यक्तींवर दंड आकारण्याचा आदेश दिला आहे.
  3. आरोग्यविषयक जनजागृती: नागरिकांना कबुतरांपासून होणाऱ्या आजारांविषयी माहिती देण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत.
  4. सार्वजनिक स्वच्छता मोहिमा: शहरातील कबुतरांच्या विष्ठेचे प्रमाण कमी करण्यासाठी स्वच्छता मोहिमा राबवल्या जात आहेत.

नागरिकांची जबाबदारी

महानगरपालिकेच्या सूचनांचे पालन करणे आणि कबुतरांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

  1. खाद्य टाकणे टाळा: कबुतरांना उघड्यावर अन्न देऊ नका.
  2. घर आणि परिसर स्वच्छ ठेवा: कबुतरांचे घरटे तयार होणार नाही, याची खबरदारी घ्या.
  3. आरोग्यविषयक सावधानता: कबुतरांच्या संपर्कात येण्यापासून बचाव करण्यासाठी मास्क घाला.
  4. डॉक्टरांचा सल्ला घ्या: श्वसनाचे कोणतेही त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

धार्मिक आणि भावनिक दृष्टिकोन
कबुतरांना अन्न टाकणे ही धार्मिक श्रद्धांशी संबंधित कृती असते. मात्र, सार्वजनिक आरोग्यासाठी याचा त्रास होतो. त्यामुळे श्रद्धा पाळतानाही आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. कबुतरांना अन्न टाकण्याऐवजी अन्य पर्याय शोधणे योग्य ठरेल.

कबुतरांपासून होणाऱ्या समस्यांवर प्रतिबंध लावणे ही आजची गरज आहे. पुणे महानगरपालिकेच्या आदेशांचे काटेकोर पालन करून आपण आपल्या आरोग्याचे रक्षण करू शकतो. नागरिकांनी स्वच्छता राखून आणि कबुतरांच्या संपर्कात येण्यापासून बचाव करून या समस्येवर तोडगा काढावा. आरोग्य टिकवा, कबुतरांना उघड्यावर अन्न टाकणे थांबवा!
लेखक: प्रा. योगेश अशोकराव हांडगेपाटील , कात्रज, पुणे.

विशेष : देवेंद्र फडणवीस तसेच त्यांच्या पत्नीकडे कुठलेही चारचाकी वाहन नाही..पहा त्यांची आहे किती संपत्ती

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला असून आता महायुती सरकारचे भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असणार आहेत. आज 5 तारखेला मुंबई येथील आझाद मैदानावर फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती किती आहे.

निवडणूक आयोगासमोर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांच्या संपत्तीची माहिती सादर केली होती. त्यानुसार फडणवीस यांची एकूण 13.27 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याचसोबत त्यांच्यावर 62 लाख रुपयांचे देणे देखील आहे.विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस तसेच त्यांच्या पत्नीकडे कुठलेही चारचाकी वाहन नाही. 2023-24 या कालावधीत देवेंद्र फडणवीस यांचे उत्पन्न एकूण 79.3 लाख रुपये होती. याच्या एक वर्षांपूर्वी त्यांचे उत्पन्न जवळपास 92.48 लाख रुपये इतकी होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्थावर मालमत्ता बघितली तर पती-पत्नी दोघांकडे मिळून 1.27 कोटी रुपयांची शेतजमीन आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर 3 कोटींचे एक घर आणि 47 लाख रुपयांचे दुसरे घर आहे. या व्यतिरिक्त त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर देखील 36 लाखांची रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहे.

निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेल्या उत्पन्न दाखल्यानुसार देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या बँक खात्यात 5 लाखांहून अधिक डिपॉजिट आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शेअर बाजार, बॉन्ड इत्यादीमध्ये गुंतवणूक केलेली नाही, मात्र त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जवळपास 5.63 कोटी रुपयांचे बॉन्ड, शेअर आणि म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे. या व्यतिरिक्त देवेंद्र फडणवीस यांच्या एनएसएस पोस्टल सेव्हिंग खात्यात 17 लाख रुपये जमा आहेत, तसेच त्यांच्याकडे 3 लाख रुपयांची एलआयसी पॉलिसी देखील आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या इतर संपत्ती बद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडे जवळपास 450 ग्रामचे सोने आहे व त्यांच्या पत्नी अमृता यांच्याकडे 900 ग्राम सोने आहे. याची किंमत जवळपास 98 लाख रुपये एवढी सांगितली जाते. . देवेंद्र फडणवीस यांच्यावर दोन कर्ज आहेत, जे त्यांच्या पत्नीकडून घेण्यात आले आहे, जवळपास 62 लाख रुपयांचे हे कर्ज त्यांच्यावर आहे.

शपथविधी सोहळ्यात 10 हजार लाडक्या बहिणींसाठी झाली स्वतंत्र कक्षाची उभारणी,२५०० पेक्षा अधिक पोलिस तैनात

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे, अजित पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा गुरुवारी (५ डिसेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक मुख्यमंत्री, संत-महंतांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास ४० हजार लोक येतील, असा अंदाज असला तरी ३० हजारांपेक्षा जास्त लोक बसतील एवढा मोठा मंडप उभारण्यात आला आहे. शपथविधीसाठी मुख्य मंच ८ हजार चौरस फुटांचा आहे. याशिवाय ४ हजार चौरस फुटांचे दोन स्वतंत्र मंच उभारण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महायुतीला पुन्हा सत्तेत येण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणाऱ्या दहा हजार लाडक्या बहिणी शपथविधी सोहळ्याला येतील. त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.

मुंबईत शपथविधी सोहळ्याला व्हीव्हीआयपी उपस्थित राहणार असल्याने अडीच हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १० पोलिस उपायुक्त, २० सहायक पोलिस आयुक्त, १०० पोलिस निरीक्षक, १५० सहायक व पोलिस उपनिरीक्षकांसह १५०० पेक्षा अधिक पोलिस शपथविधी सोहळ्यावर नजर ठेवतील. ड्रोनद्वारेही नजर असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वासुदेव बळवंत फडके चौक, हजारीमल सोमाणी मार्गावरील चाफेकर बंधू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्ग, प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते कोस्टल रोडदरम्यानची दोन्ही बाजूंची वाहतूक गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत बंद राहणार असल्याचे वाहतूक पोलिस विभागाने कळवले आहे.

‘लाडकी बहीण कक्षात १० हजार महिला असतील. या लाडक्या बहिणी राज्याच्या विविध भागांतून येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा दिला होता. आता शपथविधी सोहळ्यातही ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा दिसणार असून त्यासाठी खास कक्ष निर्माण करण्यात आला आहे. या ठिकाणी ‘एक हैं तो सेफ हैं’ अशा आशयाचे मजकूर असलेले टी-शर्ट परिधान करून महायुतीचे कार्यकर्ते बसणार आहेत. तसेच शेतकरी, संविधान असे आणखी दोन कक्ष निर्माण करण्यात आले आहेत.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदास राजी,गृहसह सर्व महत्त्वाची खाती भाजपलाच

मुंबई – पक्ष टिकवायचा असेल तर सत्ता गरजेची आहे या अनुषंगाने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झाले आहेत . शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास राजी झालेत.असे शिंदे गटाचे शिरसाठ यांनी म्हटले आहे. मात्र गृह, विधी व न्याय, जलसंधारण, गृहनिर्माण, राजशिष्टाचार, महसूल, दुग्ध व पशुसंवर्धन, वन, सांस्कृतिक, उच्च व तंत्रशिक्षण, ओबीसी, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम सोडून), कामगार, ऊर्जा, कौशल विकास, रोजगार या महत्त्वाच्या खात्यांवर भाजपने दावा केला आहे. २०१४ मध्ये भाजपचे १२३ आमदार असल्याने त्यांनी शिवसेनेला दुय्यम खाती दिली होती. यंदा १३२ आमदार असलेला भाजप अर्थ व नगरविकास सोडली तर मित्रपक्षांना कमी महत्त्वाची खाती देणार आहे.

गृह मंत्रालय मिळाले तरच सरकारमध्ये सामील होऊ, अशी ताठर भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार मात्र सत्तेत सहभागी होण्यासाठी उत्साही आहेत. शिंदे यांनी सत्तेबाहेर राहण्याचा विचारही न करता उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, अशी गळ ते घालत आहेत. गेल्या वेळी शिंदेसेनेच्या काही आमदारांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती. त्यांना आता संधी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शिंदेंच्या मनधरणीसाठी भाजपच्या नेत्यांसोबत शिवसेनेचे प्रमुख नेतेही सक्रिय हाेते.

आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेतील हे निश्चित झाले आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतील की नाही, हे अनिश्चित हाेते. गृह मंत्रालयावर ते अडून होते, तर भाजप ही मागणी पूर्ण करण्यास तयार नाही. पण रात्री उशिरा शिंदे शपथ घेण्यास राजी झाले. मुख्यमंत्र्यांसोबत काही कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी करावा, यासाठी शिंदे सेना व अजित पवार गट आग्रही आहे. पण भाजप हायकमांडकडून त्याला संमती मिळाली नव्हती.

युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्यूटतर्फे ७ व ८ डिसेंबरला’रिकन्स्ट्रक्टीव्ह युरोलॉजी’वर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा

दोन दिवसीय कार्यशाळेत जगभरातून पाचशे तज्ज्ञ युरोलॉजिस्ट होणार सहभागी

पुणे : मूत्राशयाच्या किचकट शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक, मूत्राशय व प्रोस्टेट संबंधित गुंतागुंतीचे आजार, तसेच आधुनिक उपचार पद्धती याविषयी चर्चा करण्यासाठी बाणेर येथील युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्यूटच्या वतीने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजिली आहे. येत्या ७ व ८ डिसेंबर २०२४ रोजी ही कार्यशाळा होणार असल्याची माहिती युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी भारतातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, युरोलॉजिस्ट डॉ. पंकज जोशी आदी उपस्थित होते.
डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले, “दोन दिवसांच्या या कार्यशाळेत जवळपास ३५ ते ४० शस्त्रक्रिया होणार असून, ‘युरोकुल’मध्ये होणाऱ्या या शस्त्रक्रियांचे लाईव्ह प्रक्षेपण बंतारा भवन येथील सभागृहात जगभरातून आलेले युरोलॉजिस्ट पाहणार आहेत. डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. पंकज जोशी यांच्यासह लंडन येथील प्रा. अँथनी मंडी, इटली येथील डॉ. गुइडो बार्बगली, तामिळनाडू येथील डॉ. गणेश गोपालकृष्णन, लंडन येथील ज्युलियन शाह, डॉ. मिरोस्लाव्ह दोर्डोव्हिक, कतार येथील डॉ. तारिक अब्बास, अमेरिकेतील डॉ. ली झाह, डॉ. दिमित्री निकोलावास्की या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा होणार आहे. भारतातील पाचशे, तर विदेशातील ८० तज्ज्ञ युरोलॉजिस्ट या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.”
‘युरेथ्रोप्लास्टी’मुळे मूत्राशय आणि संबंधित विकारांच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही मुलांना जन्मतःच मूत्रविसर्गाची जागा शिश्नाच्या खालील बाजूस असते. अशा रुग्णांसाठी अद्ययावत शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. तसेच संभोग करण्यास पुरुषाचे लिंग जर अकार्यक्षम असेल, तर रुग्णाच्या शरीरात ‘थ्री पीस पिनाईल प्रोस्थेसिस’ हे उपकरण शस्त्रक्रियेद्वारे बसवले जाते. त्यानंतर रुग्णाच्या इच्छेनुसार अंडकोषाजवळ बसवलेले बटन दाबल्यानंतर पुरुषाचे लिंग ताठ होते आणि तो संभोग करण्यास सक्षम होऊ शकतो, असे डॉ. संजय कुलकर्णी यांनी नमूद केले.
पुरुषांचे लिंग जर ताठ झाल्यावर वाकत असेल, तर तेही ऑपरेशन करून सरळ करता येते. याला ‘पेरोनीज डिसीज ‘असे म्हणतात. ऑपरेशननंतर पेशंटची लघवी गळत असेल, तर लघवीच्या मार्गाभोवती आर्टिफिशियल स्नायू बसवला जाऊ शकतो, जेणेकरून पेशंटचे लघवी गळणे थांबते, हेही ऑपरेशन युरोकूलमध्ये केले जाते. अपघातामध्ये किडनी व लघवीची पिशवी जोडणारी नळी तुटली व पोटात लघवी होऊ लागली तर त्या रुग्णाची नाजूक नळी परत जोडण्याचे ऑपरेशन रोबोटच्या साह्याने केले जाणार आहे. जगातील सर्वात अद्ययावत टेक्नॉलॉजी, रोबोटिक सर्जरी युरोकुलमधे मागील दीड वर्ष होत आहेत. ही शस्त्रक्रिया ‘दा विंची रोबोट’ वापरून केली जात आहे. या कार्यशाळेत विविध प्रकारच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया रोबोटमार्फत केल्या जाणार आहेत, असे डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले.
‘युरोकुल’ची बांधिलकी’
युरोलॉजी’ व ‘नेफ्फरोलॅाजी’साठी समर्पित १०५ बेडचे ‘युरोकुल’ भारतातील तिसरे मानांकित हॉस्पिटल आहे. मूत्रमार्गाच्या विकारांवरील अद्ययावत व सुसज्ज सेवा एकाच छताखाली २४ तास उपलब्ध आहेत. रुग्णांवर परवडणाऱ्या किंमतीत शस्त्रक्रिया, तसेच बिल भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णाला परत पाठवले जात नाही, हे येथील वैशिष्ट्य आहे. या सामाजिक बांधिलकीमुळे देश-विदेशातील रुग्णांमध्ये ‘युरोकुल’ आपलेसे झाले आहे. जगातील सुमारे ५० देशांमध्ये जाऊन प्रात्यक्षिकांसह ‘युरेथ्रोप्लास्टी’ शस्त्रक्रिया करणारे डॉ. संजय कुलकर्णी ‘युरोकुल’चे प्रमुख आहेत, असे डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी सांगितले.

१२ दिवस चर्चेचा खल, पण भाजपसमोर एकमेव पर्याय..देवेंद्र फडणवीस

विधानसभेत भाजपला १३२ तर महायुतीला २३० हून अधिक जागांचे बहुमत मिळूनही १२ दिवस लांबलेल्या मुख्यमंत्री निवडीच्या चर्चेवर बुधवारी पडदा पडला. .निकालापासून १२ दिवस भाजपने मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत मुख्यमंत्रिपदासाठी अनेक नावांची चाचपणी केली. भाजपमधील फडणवीसविराेधी गटाने मराठा किंवा आेबीसी चेहराच कसा गरजेचा आहे हे भाजप श्रेष्ठींना पटवून देत विनोद तावडे, रवींद्र चव्हाण, मुरलीधर माेहोळ यांची नावे चालवली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. भाजपसह मित्रपक्षांतील बहुतांश आमदारांची देवेंद्र यांनाच पसंती होती. त्यामुळे केंद्रीय निरीक्षकांसमोर दुसऱ्या नावाचा पर्यायही आला नाही.केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी व निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता भाजपच्या आमदारांची बैठक झाली. त्यात देवेंद्र फडणवीस यांना गटनेते बनवण्याचा प्रस्ताव एकमुखाने मंजूर करण्यात आला. एकनाथ शिंदे व अजित पवारांनीही त्यांना समर्थन दिले. नंतर फडणवीस, शिंदे व पवार यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला

गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती राहिल. या वेळी मुख्यमंत्री व २ उपमुख्यमंत्रीच शपथ घेतील, असे भाजप नेते गिरीश महाजन, अतुल सावे, संजय शिरसाट यांनी सांगितले. पण गृह खात्यावर अडलेल्या शिंदेंनी रात्रीपर्यंतचा वेळ मागितला होता. फडणवीसांनी सलग दुसऱ्या दिवशी शिंदेंशी ५० मिनिटे चर्चा करून मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी निर्णय दिला नाही, पण शिरसाट यांच्या मते, शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास राजी झालेत.

देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाचा विरोध असल्याचे चित्र उभे केले होते. मात्र भाजपला सर्वच समाजातून भरघोस मतदान मिळाले, त्यातून हा भ्रम दूर झाला. आता मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या बैठकीत मांडताना सर्व प्रमुख जातींच्या आमदारांना अनुमोदक म्हणून उभे करत फडणवीस हे सर्वमान्य नेतृत्व असल्याचे ठसवण्याचा भाजपने प्रयत्न केला. चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला. ओबीसी नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्याला समर्थन देताना ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून चालणारे शिवभक्त’ अशी देवेंद्र यांना उपमा दिली. रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, मेघना बोर्डीकर या मराठा आमदारांनीही अनुमोदन दिले. ओबीसी नेत्यांमधून पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, दलित नेते संजय सावकारे, आदिवासी नेते दिलीप बोरसे व अशोक उईके या आमदारांनीही अनुमोदन दिले. ‘गावगाड्याचे रक्षणकर्ते, बहुजनांचे उद्धारक, गोरगरीब उपेक्षितांचे हृदयसम्राट’ अशी विशेषणे पडळकर यांनी लावली. तर बोरसे यांनी देवेंद्र यांचा उल्लेख ‘आदिवासींचे नेते’ असा केला.

राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेतील. यापूर्वी २०१४ ते २०१९ दरम्यान ५ वर्षे, २०१९ मध्ये ७२ तासांचे मुख्यमंत्री होण्याची नोंद त्यांच्या नावे. मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्री होणारे ते एकमेव नेते.

यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. त्या वेळी भाजपचाच व संघभूमीतलाच मुख्यमंत्री हवा असा परिवाराचा आग्रह होता. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवताना श्रेष्ठींचा आदेश शिरसावंद्य मानून देवेंद्र यांनी आपल्या दाव्याचा ‘त्याग’ केला. तसेच इच्छा नसतानाही उपमुख्यमंत्री हे डिमोशनचे पद स्वीकारून पक्षनेतृत्वाच्या शब्दाचा मान राखला. त्याची बक्षिसी आता देवेंद्र यांना मिळाली. त्यांची प्रतिमा एकदम स्वच्छ आहे. भ्रष्टाचाराचे डाग नाहीत, प्रशासनावरही उत्तम पकड आहे.

मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपचे स्वबळावर सरकार होते. म्हणून तिथे नवा चेहरा देता आला. मात्र, महाराष्ट्रात महायुतीत तीन पक्ष आहेत. त्यातही एकनाथ शिंदे व अजित पवार या मुरब्बी नेत्यांवर ‘अंकुश’ ठेवू शकेल असे फडणवीस हे एकमेव नेते भाजपकडे आहेत. त्यामुळे महायुतीचे सरकार चालवण्यासाठी त्यांनाच पसंती देण्यात आली.

कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान विक्रम पारखींचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

पुणे- कुमार महाराष्ट्र केसरीसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मुळशीचे नाव करणारा विक्रम पारखी यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. बुधावरी नेहमीप्रमाणे व्यायामाल गेलेले असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. थोड्याच दिवसात विक्रम यांचे लग्न देखील होणार होते, मात्र त्याआधीच काळाने घाला घातला.

कुस्तीच्या आखाड्यात अनेक दिग्गजांना चितपट करणारा पैलवान हृदयविकाराने गेल्याने मुळशी येथे शोककळा पसरली आहे. मुळशी येथील माण गावात विक्रम यांनी कसरत करत मेहनत घेत कुस्ती क्षेत्रात आपले नाव कमावले होते. येत्या 12 डिसेंबर रोजी विक्रम यांचा विवाह होणार होता. कुस्तीच्या आखाड्यात दंगल माजवणारा पैलवान गडी संसारच्या आखाड्यात उतरण्यापूर्वीच हारला. वयाच्या अवघ्या तिशीतच मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे.

विक्रम पारखी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपले नाव कोरत मनांची गदा मिळवली होती. 2014 साली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद द्वारे आयोजित कात्रज येथे महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत विक्रम यांनी अजिंक्यपद पटकावले होते. याच सोबत विक्रम यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदके व किताब मिळवले आहेत.

विक्रम पारखी हे हिंदकेसरी पैलवान अमोल बुचडे यांचे शिष्य होते. विक्रम यांचे वडील शिवाजीराव पारखी हे निवृत्त सैनिक असून त्यांनी 1999 च्या कारगिल युद्धात लढा दिला आहे. विक्रम यांच्या जाण्यामुळे मुळशीसह कुस्ती जगतात देखील दुःख व्यक्त केले जात आहे.

30 कोटी रुपयांचे कर्ज देतो सांगून 13 लाखांची फसवणूक

पुणे- व्यवसायासाठी ३० कोटी रुपयांचे कर्ज तात्काळ मंजूर करून देतो असे सांगत, एकाने कन्स्ट्रक्शन व्यावसायिक व्यक्तीची १३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. राकेश विठ्ठल मारणे (रा. रिजेंट पार्क, बिबवेवाडी) असे आरोपीचे नाव असून, विकास गोपाल कुलकर्णी (६२, रा. सहकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हा प्रकार डिसेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ दरम्यानच्या कालावधीत घडला. आरोपी राकेश मारणे याने विकास कुलकर्णी यांना ३० कोटी रुपयांचे कर्ज त्याच्या आरंभ लक्ष्मी निधी लिमिटेड मधून तात्काळ कर्ज मंजूर करून देतो असे सांगितले. तसेच, यासाठी फिर्यादी यांच्याकडून स्टँम्प ड्यूटीसाठी म्हणून १० लाख ५० हजार रुपये तीन टप्प्यात फोन पे व आरटीजीएस द्वारे त्याच्या स्वतःच्या बँक खात्यावर वळवून घेतले. यावेळी तक्रारदार यांच्याकडून सिक्युरिटी म्हणून घेतलेल्या एकूण १२ चेक पैकी एक चेक त्याने त्याची आई सुशिला मारणे यांच्या नावाने परस्पर बनवून घेतला. त्याद्वारे तक्रारदार यांच्या बँक खात्यातून २ लाख ३० हजार रूपये काढून घेतले.

यानंतर विकास कुलकर्णी यांना राकेश मारणे याने कर्ज मंजूर करुन देतो असे सांगत आपली १२ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसांकडे धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीची चौकशी करून वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस खाडे करत आहेत.

पोलिसांच्या प्रचंड ताफ्याने राहुल-प्रियांकांना अडवले,संभलला जाऊ दिले नाही,गाझीपूर सीमेवरून माघारी पाठवले

दिल्ली- उत्तर प्रदेशातील संभलमध्ये बुधवारी झालेल्या हिंसाचारानंतर पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेल्या राहुल आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी गाझीपूर सीमेवर रोखले.संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. राहुल यांनी अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. म्हणाले- मी पोलिसांच्या वाहनात एकटा जायला तयार आहे. मात्र अधिकाऱ्यांना ते मान्य केले नाही राहुल-प्रियांका गाझीपूर सीमेवर 2 तास थांबले, पण अधिकाऱ्यांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. हातात संविधान घेऊन राहुल गांधी कारमध्ये चढले. माध्यमांना संबोधित केले. यानंतर राहुल-प्रियांका दिल्लीला परतले. ते म्हणाले- आता आपण 6 डिसेंबरला परत येऊ.

गाझीपूर सीमेवर पोलिसांच्या ताफ्यामुळे आणि त्यांच्याकडून होणाऱ्या तपासणीमुळे 5 किलोमीटर लांब वाहतूक कोंडी झाली होती. जाममध्ये अडकलेल्या लोकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी वाद घालत झटापट झाली. यानंतर लोकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाणही केली.संभल येथील न्यायालयाच्या आदेशानुसार 24 नोव्हेंबर रोजी जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यावेळी हिंसाचार उसळला, ज्यात गोळी लागल्याने चार तरुणांचा मृत्यू झाला.यापूर्वी शनिवारी सपाच्या शिष्टमंडळाने तर रविवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही सावध राहण्याची घोषणा केली होती. मात्र, पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून कोणालाही जाऊ दिले नाही.

राहुल गांधी म्हणाले- आम्ही संभलला जाण्याचा प्रयत्न करत आहोत, पण पोलिस परवानगी देत ​​नाहीत. विरोधी पक्षनेता म्हणून तेथे जाणे हा माझा अधिकार आहे, तरीही ते मला रोखत आहेत. मी म्हणालो की मी एकटा जायला तयार आहे, मी पोलिसांसोबत जायला तयार आहे, पण त्यांनी हेही मान्य केले नाही. आता काही दिवसात आम्ही परत आलो तर ते आम्हाला सोडून देतील, असे सांगत आहेत. हे विरोधी पक्षनेत्याच्या अधिकाराविरुद्ध आहे, त्यांनी मला जाऊ द्यावे.

हे संविधानाच्या विरोधात आहे, आम्हाला फक्त जमायचे आहे, लोकांना भेटायचे आहे आणि तिथे काय झाले ते पाहायचे आहे. मला माझे घटनात्मक अधिकार दिले जात नाहीत. हा नवा भारत आहे, हाच भारत आहे जो संविधान नष्ट करतोय, आम्ही लढत राहू.

प्रियांका गांधी म्हणाल्या- राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना घटनात्मक अधिकार आहेत, त्यांना अशा प्रकारे थांबवता येणार नाही. हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे, त्यांना पीडितांची भेट घेण्याची परवानगी द्यावी. त्यांनी असेही सांगितले की ते यूपी पोलिसांसोबत एकटे जाणार आहेत, परंतु पोलिसांनी हेदेखील मान्य केले नाही.

ब्रॅन्डेड कंपनीच्या नावाखाली बोगस कपड्यांची विक्री पुण्यात पुन्हा छापा -८ लाखाचा माल पकडला

पुणे-ब्रॅन्डेड कंपनीच्या नावाखाली बोगस कपड्यांची विक्री करण्याच्या प्रकारात पुण्यात तुफान वाढ झालेली असून आज याप्रकरणी दुसरा छापा टाकून पोलिसांनी ८ लाखाचा माल पकडला. puma कंपनीचा लोबो वापरून या बनावट मालाची विक्री करण्यात येत होती .
पुणे शहरात वेगवेळ्या ठिकाणी ब्रेन्डेड कंपनीचा बनावट मालाची विक्री होत असलेबाबत माहिती मिळाली होती. त्या अनुषंगान कारवाई करणेकामी पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी प्रताप मानकर, यांचे पथकातील अधिकारी अंमलदार व puma कंपनीचे अधिकृत प्रतीनिधी मार्फत पुणे शहरात शोध मोहिम चालू असताना प्राप्त माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुक लिपाणे वस्ती कात्रज पुणे येथील stylox fashion hub या शॉपमध्ये मोठया प्रमाणावर puma या ब्रँडेड कंपनीचे लोबो वापरुन बॅग, टि शर्ट, स्पोटस शुज, स्लाईडर चप्पल, जॅकेट, ट्रॉव्हझर, बॉक्सर पॅन्ट विक्री चालू होती त्याप्रमाणे सदर माहितीची खात्री केली.
दिनांक ३/१२/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पथकाने आंबेगाव बुद्रुक निपानी वस्ती कात्रज पुणे येथील stylox fashion hub या शॉपमध्ये छापा कारवाई केली असता सदर शॉपमध्ये एकुण ८,०२,६०० रु.चा किमंतीचा puma या ब्रँडेड कंपनीचे लोबो वापरुन बॅग, टि शर्ट, स्पोटस शुज, स्लाईडर चप्पल, जॅकेट, ट्रॉव्हझर, बॉक्सर पॅन्ट असा मुददेमाल जप्त केला असून असून शॉप मालक याचेवर आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि क्रमांक १०१८/२०२४ कॉपीराईट अॅक्ट १९५७ चे कलम ५१,६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक नितिन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, अमोल सरडे, ओमकार कुंभार, संजय आबनावे, विनोद चव्हाण, पुष्पेद्र चव्हाण, साधना ताम्हाणे, विजय पवार, प्रमोद कोकणे, निखिल जाधव, गणेश थोरात नागनाथ राख या पथकाने केली आहे.

राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा –

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहे. विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. महायुतीमधील प्रमुख नेते फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे शपथविधी होणार आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव महायुतीकडून ठरल्यानंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद दिसतोय. दरम्यान, उद्या मुंबईतील आझाद मैदानवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहे. असे असताना त्यापूर्वी महायुतीतील अनेक प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले .या भेटीत महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला गेला.

सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते एकाच गाडीतून राज भवनावर गेले. यावेळी तिघांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तीन नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला . तर या शपथविधीसाठी इतर पक्षाचे अनेक दिग्गज नेते आणि प्रमुख ही हजेरी लावणार आहे. यासाठी दिल्ली, मणीपूर, नागालॅंड आणि मेघालय राज्याचे प्रमुख आज मुंबईत येणार असल्याची माहिती दिली .भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,आमदार प्रवीण दरेकर आमदार प्रसाद लाड आणि पंकजा मुंडे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन भाजपचे रवींद्र चव्हाण, अशोक चव्हाण भाजप नेते विनोद तावडे, आमदार श्रीकांत भारती आमदार निरंजन डावखरे आमदार रत्नाकर गुट्टे आणि विनय कोरे आमदार कालिदास कोळंबकर आमदार आशिष शेलार रावसाहेब दानवे चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार यावेळी राजभवनात उपस्थित होते.