Home Blog Page 552

प्रशांत धुमाळ,रमा सरोदे, विठ्ठल गायकवाड, मिलिंद अहिरे यांना ‘संविधान रक्षक’ पुरस्कार प्रदान

भाजपकडून धार्मिक द्वेष पसरवण्यासह मतांचे ध्रुवीकरणाचे काम-डॉ. कुमार केतकर

सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहामध्ये ‘माझे जीवन, माझे संविधान’वर मार्गदर्शन
पुणे: “राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत लाडकी बहिण योजनेसह हिंदू विरुद्ध मुस्लिम असा अपप्रचार भाजपकडून केला गेला. धार्मिक द्वेष करत मतांचे ध्रुवीकरण झाल्याने निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार वाढून जातीय व धार्मिक विद्वेष वाढला आहे. अशावेळी देशाचे राजकीय आणि सामाजिक ऐक्य टिकवण्याचे आव्हान आहे. आगामी काळात समाजातील सर्व घटक एकत्रित आणण्याची जबाबदारी ही काँग्रेसची असून, भारतीयत्वाची भावना जपण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. कुमार केतकर यांनी केले.

अखिल भारतीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या पुढाकारातून आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहामध्ये ‘माझे जीवन, माझे संविधान’ या कार्यक्रमावेळी डॉ. कुमार केतकर बोलत होते. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात मानवाधिकार कार्यकर्त्या ऍड. रमा सरोदे, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विठ्ठल गायकवाड, उद्योजक व आंबेडकरी कार्यकर्ते मिलिंद अहिरे व पुरोगामी विचारांना पुढे नेणारा कार्यकर्ता प्रशांत धुमाळ यांना ‘संविधान रक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ गांधी-आंबेडकर अभ्यासक अरुण खोरे प्रमुख पाहुणे म्हणून, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन जोशी होते. संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, माजी नगरसेविका लताताई राजगुरू, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ आमराळे यांच्यासह चंद्रशेखर कपोते, अनिल सोंडकर, ऍड. शाबीर खान, सुरेश कांबळे, अयुब पठाण आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांकडून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
डॉ. कुमार केतकर म्हणाले, “संविधान निर्मितीसाठी घटना समिती नेमली गेली, त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. स्वातंत्र्य मिळताना धर्माच्या आधारे देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे समितीवर दबाव होता की, देश केवळ हिंदुस्थान का होऊ शकत नाही. कारण, मोठ्या प्रमाणात जातीय हिंसाचार होऊन अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. तेव्हाच घटनेने हिंदुस्तान असे जाहीर केले असते, तर आजचा देश निर्माण झाला नसता. संविधानमुळे आज देश टिकलेला आहे. ईशान्य भारतातील अनेक राज्य, काश्मीर, गोवा, पंजाब, पाँडिचेरी हे देशापासून तेव्हाच धर्माआधारे तुटले असते. ब्रिटिशांनी एकसंध भारत जिंकला नव्हता, तर आपल्या अनेक संस्थानिकांनी त्यांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. मात्र, तत्कालीन नेत्यांच्या धोरणात्मक कार्यामुळे भारत एकसंध झाला.
“फाळणीनंतर हिंसा होऊनही देश टिकला. पण आज मोठ्या प्रमाणात धार्मिक द्वेष वाढला आहे. सेक्युलर लोकांना भाजपने लक्ष्य केले. पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यात जाणीवपूर्वक वाद निर्माण करून काँग्रेसवर टीका केली जाते. फाळणी, स्वातंत्र्य आणि महात्मा गांधी हत्या घटना घडल्यावर घटना समिती बैठक झाली त्यास पंडित नेहरू यांचे मार्गदर्शन होते. महात्मा गांधी यांनीच देशाचे पंतप्रधान पदासाठी नेहरू यांचे नाव सुचवले. भारताचे न झालेले पाहिले पंतप्रधान म्हणून गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा नरेंद्र मोदी यांनी उभारला आहे. हिंदू राष्ट्र निर्मिती स्वप्नासाठी भाजपने सेक्युलर आणि सोशलिस्ट शब्द यांना विरोध केला. पण सर्वोच्च न्यायलयाने त्यांना फटकारले आहे. इंदिरा गांधी यांनी देशातील अशांततेची परिस्थिती खंबीरपणे सांभाळली,” असेही केतकर यांनी नमूद केले.

जेष्ठ पत्रकार अरुण खोरे म्हणाले, “देशाच्या घटनात्मक संस्था खिळखिळ्या होत आहे. २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. आंबेडकर यांनी संविधान सादर करत देशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती यात समानता आणण्याचा प्रयत्न केला. संविधान हा लोकशाहीचा आत्मा असून, त्याचे अनुकरण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. संविधानाच्या निर्मितीसाठी डॉ. आंबेडकर यांनी खूप तपश्चर्या केली. संविधानाप्रमाणे सरकार किंवा सत्तारूढ पक्ष आज वागत नाही, ही चिंताजनक बाब आहे. गांधी, नेहरू आणि आंबेडकर या त्रिमुर्तीमुळे देशाला संविधान मिळाले. पण त्यांच्यात भांडणे लावण्याचे काम काहीजण करत आहेत.”
प्रास्ताविक करताना मोहन जोशी म्हणाले, “सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाचे २० वे वर्ष आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सन २००४ मध्ये देशाचे सर्वोच्च असे पंतप्रधान पद नाकारून त्यांनी त्याग करत पक्ष आणि देशसेवा केली. त्यांच्या त्यागाची प्रेरणा पुढील पिढीस मिळावी, यासाठी हा सप्ताह दरवर्षी आयोजित करण्यात येत आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात काँग्रेस पक्षाने संविधान जागृत ठेवण्याचे काम केले आहे. राहुल गांधी यांनी यासाठी भारत जोडो यात्रा देशात काढली.”
प्रवीण करपे यांनी आभार मानले.

पुण्यात ब्रँडेड कंपनीचे नाव वापरून बनावट कपडे विक्री:तिसऱ्या छाप्यात ३५ लाखाचा माल जप्त

पुणे- पुण्यात ब्रँडेड कंपनीचे नाव वापरून बनावट कपडे विक्रीला उत आला असून पुणे पोलिसांनी टाकलेल्या तिसऱ्या छाप्यात सुमारे साडे पस्तीस लाखाचे ब्रँडेड कंपनीचे बनावट लोगो असलेले बोगस कपडे जप्त करून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलीस तक्रारदाराने केलेल्या ठराविक भागातच छापे मारत असल्याचा आरोप आता होत आहे दरम्यान अशा पद्धतीच्या व्यापाराचा पुण्यात सर्वत्र सुळसुळाट झाला असून ग्राहकांची खुलेआम फसवणूक करून कोट्यावधींची फसवणूक केली जात आहे . या प्रकरणी संबधित व्यापाराबद्दल केंद्रीय ग्राहक हक्क समितीने लक्ष घालून पुण्यातील व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे ,संगनमत होऊ नये संगनमता साठी निव्वळ पोलिसांचा वापर त्यासाठी होऊ नये याचीही दक्षता घेतली गेली पाहिजे असेही ग्राहक चळवळीतील मान्यवरांचे मत आहे .

दरम्यान आज कोरेगाव पार्क भागातून ब्रेन्डेड कंपनीचे बनावट कपडे व इतर वस्तू विक्री करणा-या दुकानांवर छापा एकुण ३५,३१,०५१/- रु.कि.चा. मुददेमाल पोलिसांनी जप्त केला आहे . या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’पुणे शहरात वेगवेळ्या ठिकाणी ब्रेन्डेड कंपनीचा बनावट मालाची विक्री होत असलेबाबत माहित्ती मिळाली होती. त्या अनुषंगान कारवाई करणेकामी पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी प्रताप मानकर, यांचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच कंपनीचे अधिकृत प्रतीनिधी मार्फत पुणे शहरात शोध मोहिम चालू असताना प्राप्त माहितीनुसार, कोरेगाव पार्क भागातील नार्थ रोडवरील इनक्लॉथ स्टोअर्स व कोरेगाव पार्क मधील मेन रोडवरील डिनोव्हो क्लॉथ स्टोअर्स मध्ये LACOSTE, UNDERARMOUR, POLO, GANT या ब्रँडेड कंपनीचे रजिस्ट्रेशन असलेले वरील कंपनीचे बनावट लेबल व लोगोचा वापर करुन हुबेहुब दिसणारे बनावट कपडे व इतर वस्तू विक्री चालू होती.
त्याप्रमाणे सदर माहितीची खात्री करुन दिनांक ०४/१२/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पथकाने कोरेगाव पार्क भागातील १) नार्थ रोडवरील इनक्लॉथ स्टोअर्स व २) डिनोव्हो क्लॉथ स्टोअर्स मध्ये छापा कारवाई केली असता सदर दोन्ही शॉपमधुन वरील प्रमाणे एकुण ३५,३१,०५१ रु. LACOSTE, UNDERARMOUR, POLO, GANT NIKE या ब्रेडेड लोगो वापरुन दुकानाचे मालक १) मोनिश लिलाराम अकतराय वय २३ वर्ष रा.२०२० अशोका बिल्डिंग ग्रीन व्हॅली वानवडी पुणे २) सोनू राम लोकनादन वय २६ रा.लेन नंबर ४ अजिंक्य तारा सोसायटी कवडेनगर नवी सांगवी व ३) एक महिला यांच्यावर कारवाई केली असून, त्याबाबत कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. क्रमांक १७९/२०२४ कॉपीराईट अॅक्ट १९५७ चे कलम ६३,६५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री गणेश इंगळे यांचे मागदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक नितिन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, अमोल सरडे, ओमकार कुंभार, संजय आबनावे, गणेश थोरात, हनुमंत कांबळे, साधना ताम्हाणे, पुष्पेद्र चव्हाण, विजय पवार, प्रमोद कोकणे, निखिल जाधव, नागनाथ राख या पथकाने केली आहे.

‘संतवाणी’ तून उलगडला भक्तीगीतांचा महिमा 

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे उत्सवाचे आयोजन

पुणे : माझे माहेर पंढरी…, शरण जाता रमावरा सर्व सुखे आली घरा…, माझ्या भोळ्या महादेवा, आवड तुला बेलाची…, इंद्रायणी काठी देवाची आळंदी… अशा भक्तीगीतांनी कसबा पेठेतील श्री काळभैरवनाथ मंदिर परिसर भक्तीमय झाला. सांगीतिक कार्यक्रमाचे श्री काळभैरवनाथ जयंती उत्सवाचा समारोप झाला. 

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे श्री काळभैरवनाथ जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पौराणिक महत्त्व असलेल्या पुण्याच्या कसबा पेठेतील प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती जन्माष्टमीच्या दिवशी उत्साहात साजरी करण्यात आली. उत्सवात पं. आनंद जोशी यांच्या ‘संतवाणी’ या भक्तीसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

पं. आनंद जोशी यांनी विविध भक्तीगीतांचे सादरीकरण केले. त्यांना तेजस जोशी (तबला), वरद वाधवडे (हार्मोनियम), सौमिनी देवरे (व्हायोलिन), विवेक कुलकर्णी (तालवाद्य) यांची उत्कृष्ट साथ मिळाली. तसेच अंजली जोशी-हिंगणीकर, तन्वी पाटील, आणि श्रेयस जोशी यांनीही साथसंगत केली. डॉ. सरोज देवरे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. 

कार्यक्रमाची सुरूवात वक्रतुंड महाकाय या गणेश वंदनेने झाली. त्यानंतर खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली… माऊली माऊली… या गीतांनी कार्यक्रमाच्या पूर्वाधात भाविक भक्तीमय झाले. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा… माझे माहेर पंढरी या गीतांनी मंदिराचा परिसर भक्तीमय झाला. यावेळी कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समतेचा विचार पुढे नेण्याचा निर्धार करुया – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

देशाच्या प्रगतीचे श्रेय डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. अस्पृश्यता निवारण, जातीमुक्त समाजनिर्मितीत डॉ. बाबासाहेबांनी सर्वाधिक योगदान दिले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, अशा शब्दात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली.

मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात डॉ. बाबासाहेबांचे स्मरण करताना राज्यपाल श्री. राधाकृष्णन पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. ते शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ञ, लेखक, पत्रकार, साहित्यिक, समाजसुधारक सर्वकाही होते. सामाजिक सुधारणांची दूरदृष्टी असलेले उत्तुंग व्यक्तीमत्व होते. देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय सुधारणांसाठी त्यांनी दिलेले योगदान कायम लक्षात राहील. डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचार, आदर्श नवीन पिढीपर्यंत पोहचवण्याचा निर्धार करुया, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, राजकुमार बडोले, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, संजय बनसोडे, कालिदास कोळंबकर, अमोल मिटकरी,  मुख्य सचिव सुजाता सौनिक, माजी खासदार सर्वश्री नरेंद्र जाधव, राहुल शेवाळे, अमर साबळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे आदींसह समाजाच्या सर्वक्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी जातीयवादापासून मुक्त समाजाचे स्वप्न पाहिले होते. अज्ञान, असमानता, दारिद्र्य यांचे समूळ उच्चाटन करण्याचे सामर्थ्य शिक्षणात असल्याने प्रत्येक व्यक्तीला शिक्षण, विकासाची समान संधी मिळेल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा विचार देणाऱ्या बाबासाहेबांचे भव्य स्मारक दादर येथील इंदू मिल परिसरात आकाराला येत आहे. हे स्मारक देशातीलंच नव्हे, तर जगातील नागरिकांसाठी, विशेषत: युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही राज्यपाल यांनी यावेळी व्यक्त केला.

देशाच्या प्रगतीचे श्रेय डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सध्या भारत जगात पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. आपला देश सध्या विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. या प्रगतीचे श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला समता, एकता, बंधुतेचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात दिसत असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बाबासाहेब द्रष्टे, अभ्यासू व व्यासंगी व्यक्तिमत्व होते. त्यांनी त्यावेळी कायदा, पाटबंधारे, मजूर व वीज मंत्री म्हणून काम केले. त्यांचा कार्यकाळ हा पायाभूत सोयी-सुविधांची मुहूर्तमेढ करणारा ठरला आहे. श्री. फडणवीस म्हणाले,  सध्या देशाच्या प्रमुख नीती, धोरणांमध्ये बाबासाहेबांनी तेव्हा केलेल्या भविष्यातील संकल्पनांचा अंतर्भाव दिसून येतो. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉ.बाबासाहेबांचे लिखाण एक प्रमाण म्हणून मानले जाते. त्यांनी तेव्हा लिहिलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात. देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या सोडविण्याचा उपाय भारतीय संविधानामध्ये आहे. असे जगात सर्वात सुंदर असलेले संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले आहे. इंदू मिल परिसरात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यात येईल, असे सांगून राज्यात शासन नेहमी वंचित, दुर्बल घटकांच्या कल्याणाचा विचार करुन संविधानाच्या अनुरूप कार्य करेल, असेही ते म्हणाले.

कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशाची समृद्धी ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे आहे. त्यांच्या विचार, आचारांवर शासनाचा कारभार सुरू आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांनुसारच लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

श्री. शिंदे म्हणाले, सत्ता हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असत. त्याचा उपयोग शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून समाज कल्याणासाठी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग तळागाळातील लोकांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांनी केवळ भारतातच नाही, तर जगभरातील मानवी हक्कांच्या प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिले आहे. त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने प्रत्येक तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आदर्श मानून शासनाचा कारभार –  उपमुख्यमंत्री अजित पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून शासनाचा कारभार सुरू आहे. राज्यातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे, याची काळजी शासनाने कायम घेतली आहे. भविष्यातही वंचित, दुर्बल घटकांच्या जीवनात आनंद निर्माण होईल, यासाठी काम केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, मानवतेच्या कल्याणाचा मार्ग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दाखविला आहे. बाबासाहेबांच्या विचारात देशाला एकता, बंधुता व समतेमध्ये बांधून ठेवण्याची ताकद आहे. अशा या महामानवाच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. येथे आलेला हा अथांग जनसागर त्याचेच प्रतिक आहे.

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी यावेळी मान्यवरांना संविधानाची प्रतिमा भेट दिली. तसेच मान्यवरांच्या हस्ते माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्या ‘भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

विधानसभेची शनिवारी तर विधानपरिषदेची सोमवारी मुंबईत बैठक

मुंबई, दि. ६ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी संविधानाच्या अनुच्छेद 174, खंड (1) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र विधानसभेची बैठक विधानभवन, मुंबई येथे उद्या शनिवार, दि.७ डिसेंबर रोजी सकाळी ११  वा. आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र विधानसभेचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे यांनी दिली आहे.

याचबरोबर महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक सोमवार, दि. ९ डिसेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ४ वा. आयोजित करण्यात आली असल्याचेही विधानमंडळ सचिवालयामार्फत कळविण्यात आले आहे.

कालिदास कोळंबकर यांनी घेतली विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ

मुंबई, दि. ६: विधानसभेचे जेष्ठ सदस्य कालिदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने तर सांगता राष्ट्रगीताने झाली.

राहुल गांधी EVM विरोधात रान पेटवणार:सोलापूरच्या मारकडवाडी गावातून काढणार लाँग मार्च

मुंबई-काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथून ईव्हीएमविरोधात लाँगमार्च काढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली आहे. मारकडवाडी येथे ईव्हीएमविरोधात पडलेली ठिणगी आता देशभर वनवा पेटवेल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. तर सत्तेचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीची प्रचंड हाराकिरी झाली. 288 सदस्यीय विधानसभेत महायुतीला 230, तर महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागा मिळाल्या. या अनपेक्षित निकालामुळे राजकीय पक्षांसह जनतेत ईव्हीएमविषयी संशय व्यक्त केला जात आहे.

सोलापूरच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी येथील नागरिकांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी त्यांनी तालुका प्रशासनाकडे गावात मतपत्रिकेद्वारे मतदान चाचणी घेण्याची विनंती केली होती. तसेच त्यासाठी येणारा सर्व खर्च लोकवर्गणीतून देण्याचा निर्णयही कळवला होता. पण प्रशासनाने त्यांची मागणी फेटाळली. त्यानंतरही गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्धार केला. पण प्रशासनाने गावात जमावबंदी लागू करून त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

या प्रकरणी उलटसूलट चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मारकडवाडी येथून ईव्हीएमविरोधात लाँगमार्च काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर याविषयी माहिती देताना म्हणाले की, निवडणूक आयोगाने या राज्यात पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा आदेश काढला पाहिजे. आयोगाने असे केले नाही तर पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाईल. या प्रकरणी महाविकास आघाडीचे नेते विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी स्वतः या प्रकरणी मारकडवाडी गावातून ईव्हीएमविरोधात लाँगमार्च काढणार आहेत. ही आग यापुढे देशभर भडकत जाईल. त्यानंतर ती राज्यकर्त्यांना थांबवता येणार नाही.

दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात ईव्हीएम विरोधात जनआंदोलनाची हाक दिली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात झालेले हे आंदोलन टप्प्याटप्याने तीव्र होत जाईल. पुण्यात झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 3 डिसेंबरपासून स्वाक्षरी मोहीम सुरू झाली आहे. ही मोहीम 16 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दरम्यान, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानेही ईव्हीएमविरोधात संशय व्यक्त केला आहे.

स्वातंत्र्याच्या लढाईत ब्रिटिशांना साथ देणारे संबित पात्राच्या पक्षाचे पुर्वजच खरे गद्दार व देशद्रोही: नाना पटोले

अदानीच्या भ्रष्टाचारावर चर्चेची मागणी केल्यानेच भाजपाकडून राहुल गांधींची बदनामी, भाजपाने काहीही केले तरी ‘अदानी मोदी भाई भाई !

पाकिस्तानात न बोलताच बिर्याणी खाणारे, ISI ला भारतात पायघड्या घालणारेच देशद्रोही..

मुंबई, दि. ६ डिसेंबर २०२४
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानीच्या भ्रष्टाचारावर चौकशी करण्याची मागणी करताच अदानीचे दलाल राहुल गांधींची बदनामी करु लागले आहेत. जेव्हा जेव्हा अदानीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केले जाते तेव्हा तेव्हा अदानीचे दलाल भाजपाचे नेते काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर बेछुट आरोप करतात. आताही भाजपाचा टुकार खासदार संबित पात्राने राहुल गांधी यांना देशद्रोही व गद्दार म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत. वास्तविक पाहता स्वातंत्र्याच्या लढाईत ब्रिटिशांना साथ देणारे संबित पात्राच्या पक्षाचे पुर्वजच खरे गद्दार व देशद्रोही आहेत असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

भाजपा खासदार संबित पात्राच्या विधानाचा तीव्र निषेध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाची पोलखोल केली, ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत काँग्रेसने मोठे योगदान दिले आहे. देश ब्रिटिशांशी लढत होता तेव्हा संबित पात्राच्या पक्षाचे पूर्वज ब्रिटीशांची साथ देत होते हा इतिहास आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यात अनेकदा तुरुंगवास भोगला, पंडित जवाहलाल नेहरु यांनी ११ वर्षे तुरुंगवास भोगला, इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आणि देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी यासाठी राहुल गांधी यांनी देशभर पदयात्रा काढून देश जोडण्याचे काम केले, त्यावेळी भारतीय जनता पक्ष धार्मिक तेढ निर्माण करून देश तोडण्याचे पाप करत होता. अशा विभाजनकारी विचारसरणीचे लोकच देशाचे खरे गद्दार व देशद्रोही आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण नसताना पाकिस्तानात ‘बिन बुलाये मेहमान’ म्हणून गेले व नवाज शरिफ यांची बिर्याणी खाऊन आले. मोदी सरकारनेच पाकिस्तानच्या आयएसआय ला भारतात पायघड्या घातल्या ते देशद्रोही कृत्त नाही का? भारताविरोधात घातपाती कारवाया करणाऱ्या दहशवाद्याला भाजपाच्या वाजपेयी सरकारने कंधारला सुरक्षित सोडून दिले त्याला देशद्रोही म्हणायचे नाही तर काय? याची उत्तरे भाजपा व संबित पात्राने द्यावीत. संबित पात्रा याची राहुल गांधींवर बोलण्याची पात्रता नाही पण ‘अदानी मोदी भाई भाई’ असल्यामुळे मालकाच्या इज्जतीखातर पात्रा बोलून गेला पण त्याला भाजपाचा खरा इतिहास माहित नसावा असेही नाना पटोले यांनी म्हटले. आमच्या नेत्यांची बदनामी कराल तर त्याला जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही पटोलेंनी यांनी दिला.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पुणे : महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजमाता रमाबाई आंबेडकर चौक, सिद्धार्थ नगर बावधन  येथे  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ), विकास प्रतिष्ठान, सुजाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महापरिनिर्वाण अभिवादन सभेच्या आयोजन करण्यात आले होते, यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी बुद्ध वंदना घेऊन अभिवादन सभेची सुरुवात करण्यात आली, या अभिवादन सभेत बोलताना बावधन पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून सांगितला. तसेच माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, माजी सरपंच वैशाली कांबळे, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक उमेश कांबळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं,

यावेळी माजी उपसरपंच तानाजी दगडे, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत भुंडे, युवा नेते अभिजीत  दगडे, रेखा सरोदे, आशा भालेराव, विजया कांबळे, ज्ञानेश्वर साळवे, अजय पाचपुजे, अंकुश तिडके, संजय कांबळे, अविनाश कांबळे, राहुल कांबळे, संदीप कांबळे, आनंद कांबळे, यशराज कांबळे, रोशन खाडे संतोष सहजराव यांच्यासह बावधन मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर चंदनशिवे यांनी केले.

महिंद्रा फायनान्स आणि मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्सचा उदयोन्मुख भारतासाठी वित्तीय प्रवेश वाढवण्याकरता सहयोग

·  महिंद्रा फायनान्सच्या ग्राहकांना मॅग्मा एचडीआयच्या वैयक्तिकृत विमा उपाय सुविधांद्वारे आर्थिक सुरक्षा उंचावण्यासाठी भागीदारी

·  नाविन्यपूर्ण जनरल इन्शुरन्स उत्पादने देखील पुरवण्यासाठी सहकार्य

मुंबई : भारताच्या जनरल इन्शुरन्स क्षेत्रातील वेगाने वाढणारी कंपनी मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्स कंपनीने देशातील आघाडीच्या एनबीएफसींपैकी एक असलेल्या महिंद्रा फायनान्ससोबत कॉर्पोरेट एजन्सी करार केला आहे. या कराराअंतर्गत मॅग्मा एचडीआय महिंद्रा फायनान्सच्या ग्राहकांना मोटर आणि नॉन-मोटर विभागातील विविध जनरल इन्शुरन्स उत्पादने उपलब्ध करून देणार आहे.

या करारावर स्वाक्षरी करण्याच्या समारंभात महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राउल रिबेलो आणि मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव कुमारस्वामी यांसह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राउल रिबेलो म्हणाले, “मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्ससोबतच्या सहकार्यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना वैयक्तिकृत जनरल इन्शुरन्स कव्हरेज देऊ शकतो याचा आम्हाला आनंद आहे. उदयोन्मुख भारतासाठी  जबाबदार आर्थिक उपाय सुविधा सहयोगी बनण्याची आपली बांधिलकी पूर्ण करताना हा धोरणात्मक सहयोग विमा क्षेत्राच्या सतत वाढणाऱ्या उपलब्धतेला चालना देईल.”

मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव कुमारस्वामी म्हणाले, “महिंद्रा फायनान्ससोबतची आमची भागीदारी ‘2047 पर्यंत सर्वांसाठी विमा’ या विमा उद्योगाच्या दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल आहे. वैयक्तिकृत विमा उपाय उपलब्ध करून देऊन आम्ही आमच्या ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत. त्याचवेळी जीवनातील अनिश्चिततेला सामोरे जाण्यासाठी त्यांना आवश्यक ती मनशांती मिळेल हे आम्ही सुनिश्चित करतो.”

महिंद्रा फायनान्सची विस्तृत पोहोच आणि मॅग्मा एचडीआयच्या विमा क्षेत्रातील कौशल्याचा लाभ घेत, हे सहकार्य भारतभर ग्राहकांचा अनुभव आणि आर्थिक सुरक्षा वाढवण्यासाठी कार्य करणार आहे.

‘मिशन अयोध्या’चे थेट विषय मांडणारे पोस्टर प्रदर्शित!

‘पुष्पा २’ सोबत ‘मिशन अयोध्या’ची स्टॅटिक झलक वाढवतेय रसिकांची उत्कंठा!!

 २३ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार

मुंबई : अयोध्येच्या पवित्र भूमीशी जोडलेला आणि मराठी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाचा प्रवास, त्याच्या अत्यंत आकर्षक पोस्टरच्या प्रकाशनाने एका नवीन उंचीवर पोहोचला आहे. सामाजिक माध्यमांवर चर्चेचा विषय ठरलेले हे ‘पोस्टर’ आज ‘पुष्पा २’ या ब्लॉकबस्टर चित्रपटासोबत ‘स्टॅटिक झलक’ रूपात प्रदर्शित करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच अशा तोलामोलाच्या पोस्टरने उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

‘पुष्पा २’ च्या इंटरवलमध्ये दिसलेली ‘मिशन अयोध्या’ ची १० सेकंदांची स्टॅटिक झलक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली आहे. भस्मासुरी आगीच्या वावटळीत उभ्या असलेल्या एका पाठमोऱ्या व्यक्तीचा शक्तिशाली प्रतिमाविष्कार, तिच्या हातातील प्रभू श्रीरामांच्या झेंड्याचा तेजस्वी अभिमान आणि पार्श्वभूमीवर ऐकू येणारी प्रभू रामांच्या नामाची भक्तिमय धून यांचा परिपूर्ण संगम प्रेक्षकांवर गारूड घालतो.

या अभिनव कॅम्पेनबाबत बोलताना दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे म्हणाले, “पुष्पा -२ च्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांसमोर प्रेरणादायी झलक मांडण्याचा आमचा उद्देश होता. ‘मिशन अयोध्या’ची अवघ्या १० सेकंदांच्या स्टॅटिक पोस्टरला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा चित्रपटाच्या यशाची नांदी आहे. महाराष्ट्रभर सुरू असलेल्या चर्चांमुळे ‘मिशन अयोध्या’ २३ जानेवारीपासून बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवेल.”

या पोस्टरमध्ये संघर्ष, भक्तिभाव, आणि प्रेरणा यांचा अभूतपूर्व मिलाफ दिसतो. आगीच्या विळख्यात झेंड्याला घट्ट पकडून उभा असलेला व्यक्तीचा संघर्ष रामभक्तांच्या सशक्ततेचे प्रतीक आहे. यातून ‘मिशन अयोध्या’ हा केवळ एक चित्रपट नसून, भक्तिभावाचा सुवर्ण पर्व आहे, हे स्पष्ट होते, असे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे व योगिता कृष्णा शिंदे यांनी म्हटले आहे.

‘मिशन अयोध्या’ हा अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या स्थापनेनंतर चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट आहे. आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. च्या बॅनरखाली निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे यांनी या भव्य चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रख्यात दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांच्या लेखन – दिग्दर्शनातून हा चित्रपट उभा राहिला आहे.

राममंदिर स्थापनेच्या पहिल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत, ‘मिशन अयोध्या’ २३ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

नानासाहेब पेशवे यांच्या व्दिशताब्दी जन्मसोहळ्या निमित्त पुणे ते वेणगाव रथयात्रा

रायगड आणि शनिवार वाडा येथील जलकलश रथयात्रेतून नेणार

नानासाहेब पेशवे स्मारक समिती आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्यावतीने भव्य सोहळ्याचे आयोजन 
पुणे :  नानासाहेब पेशवे यांचा व्दिशताब्दी जन्मसोहळा रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी वेणगाव (कर्जत) येथे संपन्न होणार आहे. या निमित्ताने इतिहास प्रेमी मंडळाने पुणे ते वेणगाव अशी नानासाहेब पेशवे रथयात्रा आयोजित केली असून, त्यामधे रायगड व शनिवारवाडा येथील जलकलश नेण्यात येणार आहेत. रविवार, दिनांक ८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता एसएसपीएमएस (श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन रथयात्रेला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी दिली. 
नानासाहेब पेशवे यांचा जन्म ८ डिसेंबर १८२४ रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळच्या वेणगाव येथे झाला. त्यानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  चाणक्य मंडळाचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांचे प्रमुख भाषण होणार असून खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे व प्रशांत ठाकूर, पेशव्यांचे वारसदार पुष्कर पेशवे, इतिहास अभ्यासक मोहन शेटे उपस्थित राहणार आहेत.  समारंभस्थळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, शस्त्र व क्रांतिकारक छायाचित्रे प्रदर्शन आयोजित केले आहे. 

मोहन शेटे म्हणाले, भारताच्या इतिहासात इंग्रजी साम्राज्या विरुद्ध भारतीयांनी १५० वर्ष केलेला स्वातंत्र्य संग्राम हे अभिमानास्पद पर्व आहे. त्यामध्ये १८५७ च्या स्वातंत्र्य समराला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतात एकाचवेळी विविध समाज घटकांनी उठाव करणे ही अभूतपूर्व घटना होती. त्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई, सेनापती तात्या टोपे, रंगो बापुजी गुप्ते अशा अनेकांनी नेतृत्व केले. मात्र या अखिल भारतीय संग्रामाचे नियोजन करण्यात सिंहाचा वाटा होता तो नानासाहेब पेशवे यांचा. त्यांची दूरदृष्टी, संघटन कौशल्य,धाडस , अविश्रांत परिश्रम करण्याची तयारी व प्रखर राष्ट्रभक्ती या गुणांमुळे हा संग्राम सर्वव्यापी होऊ शकला.

घरफोड्या करणाऱ्या टोळीला पकडले,सर्वांची वये २० ते २४ वर्षे…

पुणे- सराईत घरफोडी करणाऱ्या टोळीला टोळीप्रमुखासह पुणे पोलिसांनी पकडले आहे. १) शाहरूख सलाउद्यीन खतीब, वय २४ वर्ष, रा. घर क्र. २०४, गल्ली क्र. २५, भाग्योदय नगर, किर्ती इमारतीसमोर, कोंढवा, पुणे, २) सलिम हसन शेख, वय २४ वर्ष, रा. शेख अब्दुल रेहमान चौक, कासेवाडी, भवानीपेठ, पुणे, ३) सर्फराज पाशा शेख, वय २२ वर्ष, रा. शेख अब्दुल रेहमान चौक, कासेवाडी, भवानीपेठ, पुणे, ४) अजीम बबलु शेख, वय २० वर्ष, रा. भगवा चौक, कासेवाडी, भवानीपेठ, पुणे, अशी या टोळीतील अटक झालेल्यांची नावे आहेत.
लष्कर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर २७७/२०२४, भा. न्या. सं. कलम ३०५, ३३१ (२), ३३१ (४) ३(५) मधील फिर्यादी रा. कोंढवा, पुणे यांचे मालकीचे सेल एक्स्प्रेस या नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान मरियम मंझिल, न्यु मोदिखाना कॅम्प, पुणे या ठिकाणी असुन, हे दुकान दि. ०३/१२/२०२४ रोजी रात्रौ दरम्यान बंद असताना दुकानाचे शटर उचकटुन अज्ञात चोरट्यांनी घर फोडी करून दुकानातील वनप्लस व ओपो कंपनीचे एकुण १० मोबाईल किंमत रूपये ४४,०००/- असा माल घरफोडी चोरी करून चोरून नेला या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द दि. ०३/१२/२०२४ रोजी लष्कर पो. स्टे. येथे वर उल्लेखीत गुन्हा दाखल करण्यात आला होता .
घरफोडी चोरी करणारे गुन्हेगारांबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसताना, वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली लष्कर पो. ठाणे कडील तपास पथकाचे पो अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील तसेच आजुबाजुचे परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पडताळुन पाहणी केली असता, तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातुन मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली, व अथक प्रयत्नाने सापळा रचुन गुन्ह्यातील या चारही आरोपीना पकडण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली आहे, आरोपी शहारूख खतीब हा पोलीस अभिलेखावरील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती प्राप्त झाली असुन त्याचेवर एकुण ०५ घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडुन लष्कर पो. स्टे कडील दाखल गुन्ह्यातील एकुण ४४,०००/- रू. किंमतीचे वन प्लस व ओपो कंपनीचे एकुण १० मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा तपास पोलीस उप-निरिक्षक राहुल घाडगे, हे करीत आहेत.
ही कामगीरी ही पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग, दिपक निकम, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिषकुमार दिघावकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) प्रदिप पवार, पोलीस उप निरिक्षक राहुल घाडगे, यांचे नेतृत्वाखाली, तपास पथकातील पोलीस अंमलदार महेश कदम, सोमनाथ बनसोडे, संदिप उकिर्डे, रमेश चौधर, सचिन मांजरे, लोकेश कदम,. हराळ, कोडिलकर, महिला पोलीस अंमलदार अल्का ब्राम्हणे, यांनी केलेली आहे.

एमआयटी डब्ल्यूपीयूतमहापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन

पुणे, दि ६ डिसेंबर: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी त्यांच्या स्मृतिंना उजाळा देऊन विनम्र अभिवादन केले. तसेच विद्यापीठाचे विश्वस्त, कुलगुरू, विविध विभागातील विभाग प्रमुख, डीन, डायरेक्टर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पाअर्पण करून अभिवादन केले.
या वेळी अमेरिकेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी,वरिष्ठ साहित्यीक आचार्य रतनलाल सोनग्रा, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एम.पठाण, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्रा.डॉ. विनोद जाधव, प्रा.डॉ. दत्ता दांडगे व प्रा. गायकवाड उपस्थित होते.
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” या देशातील लोकांना भगवान गौतम बुद्ध, म. गांधी आणि डॉ. आंबेडकर कधीच कळला नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. त्यामुळेच आत्मचिंतन किंवा आत्मपरिक्षणाची वेळ आली आहे. त्यांनी आपल्याला कर्तव्याची जाणिव करून दिली आहे. मानवता हीच भारतीय संस्कृतीचे खरे वलय आहे.”
आचार्य रतनलाल सोनग्रा म्हणाले,” अहमदनगरच्या जेलमध्ये जेव्हा मौलाना अबुल कलाम आझाद, पं. जवाहरलाल नेहरू, आचार्य नरेंद्र बंदिस्त होते. त्यावेळेस प्रत्येकाने ग्रंथ लिहिला. परंतू डॉ. आंबेडकर यांनी बाहेर राहून ‘थॉट्स ऑफ पाकिस्तान’ हा ग्रंथ लिहिला. एकाच वेळी देशात सर्वात सुंदर ग्रंथ निर्मिती त्याकाळी झाली होती. यामुळेच आपल्या देशात गुरूग्रंथ असे संबोधिल्या जाते. आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे.”
त्यानंतर डॉ. अशोक जोशी, डॉ.एस.एम.पठाण, डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ.दत्ता दांडगे, प्रा. विनोद जाधव  डॉ.मिलिंद पात्रे, प्रा. गायकवाड यांनी भाषणातून सांगितले की, महामानव डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ आहे. त्याच प्रमाणे त्यांनी सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिल्यामुळे आज देश प्रगतीपथावर आहे. डॉ. आंबेडकरांचे तीन गुरू होते भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले हे होते. प्रत्येकाने आपले मूल्य ठरवून जीवन जगावे अशी बाबासाहेबांच्या शिकवणी ला उजाळा दिला.

प्रभू श्रीराम आणि सीता माई यांचा विवाह सोहळा थाटात 

महाराष्ट्रात प्रथमच श्री सीतारामचंद्र विवाह सोहळा ;श्री रामजी संस्थान, तुळशीबाग यांच्या वतीने आयोजन 


पुणे: फुलांनी सजलेले पेशवेकालीन श्रीराम मंदिर… पारंपरिक वस्तूंनी सजलेले रुखवत… सनई चौघड्याचे मंगलमय सूर आणि भक्तीने भारलेल्या वातावरणात प्रभू श्रीराम आणि सीता माई यांचा पवित्र आणि ऐतिहासिक विवाह सोहळा पुणेकरांनी प्रत्यक्ष अनुभविला. महाराष्ट्रात प्रथमच श्री सीतामाई व प्रभू श्रीरामचंद्र विवाह सोहळ्याचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते.  
श्री रामजी संस्थान, तुळशीबाग यांच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच राजा दशरथ यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रभू श्रीराम आणि राजा जनक यांची ज्येष्ठ कन्या श्री सीतामाई यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन तुळशीबाग राममंदिरात करण्यात आले होते. 
कुडलि शृंगेरी महासंस्थान मठाचे शंकराचार्य श्री श्री अभिनव शंकर भारती महास्वामी यांनी सोहळ्यास उपस्थित राहून आशीर्वाद दिले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.  
विवाह सोहळ्यातील पारंपरिक विधींसह हळद, कन्यादान आणि मधुपर्क यांसारख्या विधींनी सोहळा साजरा करण्यात आला. मंगलाष्टकांच्या स्वरात देवतांच्या मूर्तींवर अक्षता टाकून श्रीराम आणि सीतेचा विवाह सोहळा मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला ११ वाजून ४८ मिनिटांनी संपन्न झाला.
भरत तुळशीबागवाले म्हणाले, श्री सीता रामचंद्र विवाह सोहळा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि आनंददायी उत्सव आहे. हा सोहळा भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या विवाहाची आठवण म्हणून साजरा केला जातो. हा दिवस धर्म, नीती, आणि कर्तव्याचे प्रतीक आहे. भगवान राम आणि माता सीता यांचा विवाह वैदिक परंपरेनुसार संपन्न झाला होता, जो भारतीय विवाहसंस्थेचा आदर्श मानला जातो. श्रीराम हे धर्माचे प्रतीक असून माता सीता या श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहेत, त्यामुळे त्यांचा विवाह भक्तांसाठी आदर्श सहजीवनाचा संदेश देतो. त्यामुळे हा सोहळा पुण्यातील तुळशीबाग राममंदिरात प्रथमच साजरा करण्यात आला.