Home Blog Page 551

भाजपा आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू बनत आहेत.

बावनकुळेंचे विधान म्हणजे विचारांची नव्हे केवळ सत्तेसाठी ची लढाई हीच भाजप ची एकमेव दिशा

पुणे-भाजपचे बावनकुळे यांनी काल पुण्यात बोलताना काँग्रेस फोडा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सामील करून घ्या असे जाहीर आवाहन केले आहे.आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी यावर जोरदार टीका केली आहे.’ एकेकाळी भाजप स्वतःला ‘ पार्टी विथ डिफरन्स ‘ म्हणून घेत असे आणि तत्त्वांवर चालणारी कार्यकर्त्यांची फळी असल्याचा दावा करीत असे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आयात उमेदवारांवरच भाजपचा भर दिसून आलेला आहे. आता उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांनाही भाजप दरवाजे खुले करीत आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यामधील हिंदुत्वाचा मुद्दा सोडता इतर कुठल्या मुद्द्यांच्या बाबतीत मतभेद नाहीत हे उघड आहे. शिक्षण, आरोग्य,रोजगार आदी धोरणात्मक बाबींवर काम करताना काँग्रेसच्या कामगिरीत आणि भाजपच्या कामगिरीत फारसे उजवे डावे करता येणार नाही अशी स्थिती आहे.’ असे आप प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी आणि महायुती सरकार मधले पक्ष नावाने जरी वेगवेगळे असले तरी त्यातील अनेक मंत्री तेच आहेत. काँग्रेस मधीलच सरंजामदार आणि घराणेशाही असलेले नेते भाजपने उचलून त्यांना महत्त्वाची पदे दिली आहेत. त्यासाठी जरूर तिथे इडी सीबीआयचा वापर करूनही हे केले आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मोदींच्या हुकूमशाही विरुद्ध लढणारे काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार आता भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेस यांच्या मधला सेतू खुला झाला आहे.

या पुढच्या राजकारणात आम आदमी पार्टी सारखा पर्याय जनतेच्या प्रश्नाला उत्तर काढू शकेल. राजकारणातील हा लढाईचा टप्पा कठोर परिश्रमाचा आहे परंतु स्थानिक निवडणुकीच्या द्वारे आम आदमी पार्टी हा व्यवस्था परिवर्तनाचा पर्याय मतदारांसमोर उभा करेल असेही मुकुंद किर्दत (Mukund Kirdat)यांनी म्हटले आहे.

नाकर्ते सरकार, बेजबाबदार शहरी नागरिकांमुळे पाणी समस्या

पुणे-मुंबई शहरात पाण्याचा अतिवापर : लक्ष्मीकांत देशमुख यांची टीका : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे जलदूत देवांग जानी यांचा गौरव
पुणे : पाण्याविषयी सरकारचा नाकर्तेपणा आणि शहरांमधील बेजबाबदार नागरिकांमुळे पाणीसमस्या उद्भवली आहे. मोठ्या शहरांमध्ये पाण्याचा अपव्यय सुरू राहिल्यास खेड्या-पाड्यांमधील भेडसावणारा भीषण पाणीप्रश्न भविष्यात शहरांमध्ये निर्माण होऊ शकतो, असा इशारा ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिला. पाणी टंचाईची भीषण परिस्थिती समजून न घेता पुणे-मुंबईसारख्या शहरातील नागरिक अमाप आणि अयोग्य पद्धतीने पाणी वापर करीत असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केली.
पाणीविषयक मोलाचे कार्य करणारे नाशिक येथील गोदाप्रेमी समितीचे अध्यक्ष, जलदूत देवांग जानी यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे आज (दि. 5) पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, काव्य विभागाच्या संचालिका प्रज्ञा महाजन मंचावर होते. शाल, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रम झाला.
देशमुख पुढे म्हणाले, मानवाने प्रत्येक नदीशी खेळ केला आहे. नदी कोरडी होणे म्हणजे जणू स्त्री अब्रू घेणे आहे. जसजशी शहरे श्रीमंत होत गेली तसतशा नद्या कोरड्या पडत गेल्या. हे समजून घेताना नदीने आत्महत्या केली की, दुराग्रही माणसाने त्यांचा खून केला याचा विचार होणे आवश्यक आहे. लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची गरज व तहान वाढली आहे. परंतु पिण्याचे पाणी हे अक्षय नाही. पाणी वापराबरोबरच त्याचे पुनर्भरण होते की नाही याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. पाणी मुबलक आहे म्हणून उधळू नका. विहिरी, तलाव, हौद, उपनद्या पुनर्जिवित करा, अशी सूचनाही त्यांनी केली.
पुणेकर हट्टी
पुणे शहरात मुबलक पाणी उपलब्धी आहे म्हणून त्याचा अविवेकी वापर केला जात आहे. याविषयी जागृती करूनही पुणेकर पाण्याचा निष्काळजीपूर्वक वापर करीत आहेत. आम्ही पैसे देतो त्यामुळे आम्हाला पाहिजे त्या वेळी आणि पाहिजे तेवढे पाणी मिळावे अशी पुणेकरांची दुराग्रही आणि हट्टी भूमिका आहे, अशी टीका लक्ष्मीकांत देशमुख यांनी केली.

नद्यांमध्ये मानवी हस्तक्षेप वर्जित : देवांग जानी
आपल्या कार्याची माहिती देताना देवांग जानी म्हणाले, नाशिक महापालिकेने गोदावरी पात्रातील 17 प्राचीन कुंडे बुजविल्याने नदीतील जीवंत पाण्याचे स्रोत नष्ट झाले होते. त्याविरुद्ध शासनाशी लढा देत नदीपात्रातील पाच कुंडातील सुमारे पाच लाख किलो सिमेंट काढण्यात यश आले. त्यातून स्रोत जीवंत झाले. गोदावरी नदी ही नाशिक शहराचे हृदय आहे तर उपनद्या म्हणजे वाहिन्या आहेत. उपनद्या जीवंत राहिल्यास मुख्य नदी जीवित राहते, या करिता पाण्याचे नैसर्गिक स्रोत, उपनद्या जीवंत ठेवण्यासाठी कार्य करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीनुसार नद्यांना आईचा दर्जा दिला जातो, त्यामुळे नद्या प्रदुषित करणे म्हणजे आईचा आपमान करण्यासारखे आहे. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, नैसर्गिक स्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. निसर्गाकडून आपण फक्त ओरबाडून घेत आहोत त्याला परत काहीच देत नाही ही मानवाची मोठी चूक आहे. नद्या निसर्गनिर्मित आहेत, त्यांच्यात मानवी हस्तक्षेप वर्जित आहे.
ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात देवांग जानी यांच्या कार्याची माहिती दिली. ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींचे काम समाजापुढे आणावे, ज्या योगे सकारात्मकता निर्माण होईल, यासाठी उपक्रमांचे आयोजन केले जाते.
भविष्यात कुणालाही पाणी फुकट मिळणार नाही. तर पाण्यासाठी पैसा मोजावा लागेल, असे प्रज्ञा महाजन म्हणाल्या. मानपत्राचे वाचन आणि सूत्रसंचालन वैजयंती आपटे यांनी केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे पाणी या विषयावर कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

प्रतिभावान, हौशी छायाचित्रकारांचे प्रदर्शन ‌‘प्रतिबिंब‌’

पुणे : पुणे कॉटन कंपनी, देहम्‌‍ नेचर क्युअर आणि कृतार्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 ते 10 मे या कालावधीत हौशी छायाचित्रकारांच्या ‌‘प्रतिबिंब‌’ या छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
छायाचित्र प्रदर्शनी बालगंधर्व कला दालनात भरविण्यात येणार असून उद्घाटन दि. 8 रोजी सकाळी 10:30 वाजता सुप्रसिद्ध पक्षी छायाचित्रकार डॉ. सुधीर हसमनीस यांच्या हस्ते होणार आहे. देहम्‌‍ नेचर क्युअरचे संचालक डॉ. सुजय लोढा, डॉ. कोमल लोढा, कृतार्थचे संचालक निलेश शुक्ला, दिपाली शुक्ला, क्रिकेट विश्लेषक-समालोचक सुनंदन लेले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रदर्शन तीनही दिवस सकाळी 10 ते रात्री 8 या कालावधीत सर्वांसाठी खुले असणार आहे.
अमर अतितकर, अमेय वाळवेकर, ओंकार मुळगुंद, केदार दंडगे, विलास तोळसंकर, समीर अय्यर, विश्वेश बेहरे, अनंतप्रसाद देशपांडे, अमोद फडके आणि सागर मुथा यांची व्यन्यजीव, पक्षी, निसर्ग या विषयांवरील अनोखी छायाचित्रे प्रदर्शनात असणार आहेत. प्रदर्शनात हसभागी छायाचित्रकार वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असून छायाचित्रणाची आवड जोपासत आहेत. प्रदर्शनाची रचना ओंकार मुळगुंद यांची आहे. हौशी, प्रतिभावान छायाचित्रकारांची वैविध्यपूर्ण छायाचित्रे अनुभवण्याचा आनंद पुणेकरांना मिळणार आहे.

महापालिकेच्या बांधकाम सल्लागाराच्या घरातील 26 लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीने मारला डल्ला

पुणे महानगरपालिकेत बांधकाम सल्लागार म्हणून काम करणाऱ्या विपुल कुमार चाँदकुमार गर्ग (वय- ५४) यांच्या बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लब रस्त्यावर उच्चभ्रू सोसायटी असलेल्या सुप्रीम अॅमडोर येथील फ्लॅट क्रमांक १४०२ मध्ये मागील चार महिन्यापासून एक ३० वर्षीय महिला घरकाम करत होती. सदर महिलेने गर्ग यांच्या घरातील बेडरूम मधील कपाटाच्या ड्रावर मध्ये ठेवलेले २५ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी विपुलकुमार गर्ग यांनी बाणेर पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार २७/२/२०२५ ते २७/४/२०२५ यादरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घरकामगार महिला ही गर्ग यांचे घरी मागील चार महिन्यापासून काम करत आहे. तिने घरातील लोकांचा विश्वास संपादन करुन घरातील बेडरूम मध्ये नियमित साफसफाई करत होती. यादरम्यान तिने घरातील लोकांची नजर चुकवून बेडरूममधील कपाटाच्या ड्रावर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने घरात काम करत असताना, टप्प्याटप्प्याने चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. गर्ग कुटुंबीय एका लग्नासाठी जाताना त्यांनी कपाटातील दागिन्यांची पाहणी केली असता ते मिळून आले नाही. त्यामुळे घरकामगार महिलेची विचारपूस केली असता ती पसार झाल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी आरोपी महिलेवर गर्ग कुटुंबीयांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने दागिने चोरी केल्याचा गुन्हा बाणेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली आहे.

विमानतळाबाबतची भूमिका बदलणार नाही,सर्वेक्षण थांबवले:आम्ही शेतकऱ्यांना ऑफर देऊ, त्यांनी आम्हाला ऑफर द्यावी – चंद्रशेखर बावनकुळे

पुणे-पुरंदर विमानतळ प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या विरोधासाठी शनिवारी झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. या पार्श्वभूमीवर सरकारने सध्या तरी पुरंदर विमानतळाच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आम्ही शेतकऱ्यांना ऑफर देऊ, शेतकऱ्यांनी आम्हाला ऑफर द्यावी. त्यांनी विमानतळ होऊ न देण्याचा हट्ट सोडावा, असेही बावनकुळे म्हणाले.

पुरंदर येथे होणाऱ्या विमानतळाला 7 गावातील ग्रामस्थांचा मोठा विरोध आहे. दोन दिवसांपूर्वी विमानतळाच्या जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी पथक आले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी पथकाला सर्वेक्षण करण्यास विरोध करत आंदोलन केले. या दरम्यान, पोलिस आणि ग्रामस्थ यांच्यात धक्काबुक्की होऊन आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावर आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुरंदर विमानतळाबाबत सुरू असलेले सर्वेक्षण थांबवण्यात आलेले आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मुळावर उठून आम्हाला काही करायचे नाही. मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. आमची शेतकऱ्यांना ऑफर आहे, त्यांनी विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट सोडावा, असेही ते म्हणाले. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला विरोध असणाऱ्या अनेक मान्यवरांशी आम्ही चर्चा केली. परवा जी घटना घडली त्याचासुद्धा आम्ही आढावा घेतला असून शेतकऱ्यांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते कमी केले पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे म्हणाले, पुरंदर विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहे, शेतकऱ्यांचा माल निर्यात होऊ शकतो, पुण्याच्या विकासाबाबत मुंबई, दिल्लीनंतर नाव येते. त्यामुळे हे संभाव्य विमानतळ करण्याचा मानस आहे आणि ती भूमिका शासनाची बदलणार नाही. मी शेतकऱ्यांना विनंती करतोय की, 7 दिवसात तुम्ही तुमच्या मागण्या काय आहेत हे आम्हाला कळवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खिशात काय टाकता येईल, अशी भूमिका आम्ही मांडली आहे.

शासन एखादी घोषणा करेल तेव्हा सरकारने आमचे चांगले केले, असे शेतकऱ्यांना वाटेल. आम्ही शेतकऱ्यांना ऑफर देऊ, शेतकऱ्यांनी आम्हाला ऑफर द्यावी, टेबलवर बसून तिढा सुटेल. पुढील 15 दिवसात पुन्हा चर्चा करू, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

परवा घडलेल्या घटनेचा सुद्धा आढावा आम्ही घेतल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेतले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. गुन्ह्यात जे लोक प्रत्यक्ष सहभागी आहेत, त्यांचा वेगळा विचार करायला लागेल. जे निरपराध आहेत त्यांचे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उद्या याबाबत चर्चा करेन. असेही बावनकुळे म्हणाले.

अखनूरमध्ये चिनाब नदी कोरडी पडली

जम्मू आणि काश्मीरमधील रहिवासी म्हणाले – चिनाब नदीत २ फूट पाणी शिल्लक आहे, ती लवकरच पूर्णपणे सुकून जाईलजम्मू आणि काश्मीरमधील अखनूरमध्ये राहणारे रामसूर शर्मा म्हणाले – मी ७५ वर्षांचा आहे, पण चिनाब नदीचे पाणी थांबवल्याचे मी पहिल्यांदाच पाहिले आहे. मी पंतप्रधान मोदींचे त्यांच्या निर्णयाबद्दल आभार मानतो. नदीत फक्त १.५-२ फूट पाणी शिल्लक आहे. पुढील २ तासांत हे पाणीही सुकून जाईल.

ट्रम्प यांना विचारून पाकिस्तानवर कारवाई करणार का?जेसन मिलर यांची नियुक्ती का केली? प्रकाश आंबेडकरांनी मोदी सरकारकडे मागितले स्पष्टीकरण

पहलगामच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमधील सलाहकार जेसन मिलर यांची नेमणूक केली, असे वृत्त पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने दिले आहे. या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला थेट सवाल केला असून, एका सार्वभौम राष्ट्राला परकीय व्यक्तीची वकिली का लागावी, असा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच जेसन मिलरकडून परवानगी आल्याशिवाय आपण पहलगाम प्रकरणी काही कारवाई करणार नाही का? याचा खुलासा भारतीय जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जनता पाकिस्तानच्या विरोधात कारवाईची मागणी करत आहे. हल्ल्याच्या घटनेला आठवडा उलटून गेला आहे. मात्र, सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले, अशी परिस्थिती दिसत आहे. सामान्य जीवन सुरू असल्याची परिस्थिती भासवली जात असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणालेत. पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्रात एक बातमी आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र जेसन मिलर नावाच्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक नेमकी पाकिस्तानवर जी कारवाई करायची आहे, ती करण्यासाठी या सल्लागाराकडून परवानगी मागितली जाणार का? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारून पाकिस्तानवर कारवाई करणार का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

देशाकडे स्वतःचे परराष्ट्र मंत्रालय असताना भारताला परकीय सल्लागाराची गरज भासते हे चिंताजनक आहे, असे म्हणत आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला. भारत सरकारने या प्रकरणात पारदर्शकता दाखवावी आणि नेमणुकीचे कारण व उद्दिष्ट देशातील नागरिकांसमोर ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रकरणात आंबेडकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे प्रश्न उपस्थित केले आहेत. जेसन मिलर यांची नेमणूक केंद्र सरकारने केली का? जर हो, तर त्यामागचे कारण काय आहे? असा थेट सवाल करत त्यांनी या बाबतीत केंद्र सरकारने खुलासा करावा, अशी मागणी केली. भारत सरकार आता जेसन मिलर यांच्या परवानगीशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही का? असा गंभीर सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जर एखाद्या विदेशी व्यक्तीला भारतात धोरणात्मक जबाबदारी दिली जात असेल, तर त्याबाबत संपूर्ण पारदर्शकता व उत्तरदायित्व असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

जेसन मिलर हे यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार होते. अशा पार्श्वभूमीच्या व्यक्तीची भारतासारख्या देशात नियुक्ती होणे, हे अनेक प्रश्न निर्माण करणारे ठरत आहे. परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत भारत स्वतः सक्षम असून, विदेशी व्यक्तीच्या सल्ल्याची आवश्यकता का भासली, हे केंद्र सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी आंबेडकरांनी केली. या संपूर्ण प्रकरणावर तातडीने उत्तर देत केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणते पावले उचलली आहेत, हे सांगणे गरजेचे असल्याचे आंबेडकरांनी म्हटले आहे. देशाच्या धोरणांत कोणताही परकीय हस्तक्षेप होऊ नये, यासाठी सरकारने स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

एक साडेचार फुटी मंत्री म्हणतो- धर्म विचारून सामान घ्या:काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची नीतेश राणे यांच्यावर टीका

देशात व राज्यात सध्या जातीयवादाचे विष पेरले जात आहे. बीडमध्ये तर दोन जाती एकमेकांपुढे उभ्या टाकल्या जात आहेत. अशा स्थितीत महायुती सरकारचा एक साडेचार फुटांचा मंत्री नागरिकांना धर्म विचारून दुकानातून सामान विकत घेण्याचे सांगत आहे, अशा तिखट शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी नुकतेच दापोली येथील सभेत हिंदू धर्मियांना दुकानदारांकडून धर्म विचारून खरेदी-विक्री करण्याचा सल्ला दिला होता. दुकानदाराला धर्म विचारून वस्तू खरेदी करा. विशेषतः त्याच्या धर्माविषयी शंका आल्यास त्याला हनुमान चालीसा म्हणायला लावा, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असताना विजय वडेट्टीवार यांनी उपरोक्त शब्दांत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सद्यस्थितीत देशात व राज्यात जातीयतेचे विष पेरले जात आहे. बीडमध्ये दोन जाती एकमेकांच्या विरोधात उभ्या केल्या जात आहेत. त्यातच आता राज्य सरकारचा साडेचार फुटाचा एक मंत्री जनतेला जात विचारून दुकानातून सामान घेण्याचे सांगत आहे, असे ते म्हणाले.

विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सत्ताधारी भाजपवरही निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसला फोडून रिकामे करण्याची वल्गना करत आहेत. पण आमचे दिवस आले तर आम्हीही चुनचुनके मारू. एकनाथ शिंदे व अजित पवारांची काय परिस्थिती आहे. त्यांचा केवळ वापर केला जात आहे. पुढच्या निवडणुकीत ते कुठे असतील हे पहावे लागेल. सरकारने सीबीआय व ईडीला बाजूला करावे. त्यानंतर काय होते ते पहावे.

या सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली. यांना 10 दिवस लोटले तरी पहलगाम अतिरेकी हल्ल्यातील आरोपी सापडत नाहीत. ते कधी ते सापडणार? हे या सरकारने सांगावे. अतिरेक्यांचे कपडे भेटले, लोकेशन भेटले, मग अतिरेकी का सापडत नाहीत.

..तर राज – उद्धव ठाकरेंचा सत्कार करणार

विजय वडेट्टीवार यांनी यावेळी राज व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही भाष्य केले. तसेच असे खरेच घडले तर त्यांचा सत्कार करण्याचेही संकेत दिले. दोन भाऊ एकत्र येत असताना त्याची चिंता भाजपला लागली आहे. पण हे दोन भाऊ खरेच एकत्र येत असले तर त्यांनी सर्वधर्म समभाव घेऊन सोबत यावे. आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार घेऊन त्यांनी एकत्र यावे. असे झाल्यास आम्ही स्वतः त्यांचा सत्कार करू, असे ते म्हणाले.

आर्यंश कंसल आणि वरद मांडे यांनी जागतिक स्तरावर दाखवली भाषिक प्रतिभा

पुणे, ५ मे – भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने मंजूर केलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड २०२४-२५ मध्ये पुण्यातील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. इयत्ता पाचवीच्या वरद मांडे ने स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला, तर इयत्ता चौथीच्या आर्यंश कंसलने आठवा क्रमांक मिळवून शाळेचा आणि देशाचा अभिमान वाढविला.
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्ता प्रमाणपत्र आणि प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आला. हे यश त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि हिंदी भाषेवरील प्रेमाचे फळ आहे.
या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना शाळेचे संचालक यशवर्धन मालपाणी म्हणाले, “आमच्या विद्यार्थ्यांनी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट भाषिक प्रतिभा दाखवली आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि आम्हाला विश्वास आहे की भविष्यातही ते जागतिक स्तरावर हिंदी भाषेला आदर मिळवून देत राहतील.”
मुख्याध्यापिका संगीता राऊत  म्हणाल्या, “या मुलांचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, जे त्यांना भाषा आणि साहित्यात रस वाढवण्यास प्रोत्साहित करेल.”
तसेच यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली.
हे यश केवळ शाळेसाठी अभिमानाची गोष्ट नाही तर समर्पण आणि वचनबद्धता असेल तर भाषेतील अडथळे देखील पार करता येतात हे देखील ते दर्शवते.

ब्राह्मण कार्यालयाच्या वतीने जनकल्याण रक्तपेढीला साडेसहा लाखांचा रेफ्रिजरेटर भेट

पुणे : ब्राह्मण कार्यालय संस्था  शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील जनकल्याण रक्तपेढी या संस्थेला त्यांच्या आवश्यकतेनुसार साडेसहा लाख रुपये किमतीचा ८०० लिटर साठवण क्षमतेचा आणि दोन अंश तापमानापर्यंत कार्यक्षम असणारा मोठा रेफ्रिजरेटर  भेट म्हणून देण्यात आला.

स्वारगेट येथील जनकल्याण रक्तपेढी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्राह्मण कार्यालय संस्थेचे उपाध्यक्ष रमेश भागवत उपस्थित होते. या प्रसंगी जनकल्याण रक्तपेढी तर्फे डॉ. अतुल कुलकर्णी यांनी संस्थेचे आभार मानले. डॉ. माधुरी बर्वे यांनी रक्तपेढीच्या संपूर्ण कामकाजाची माहिती दिली.

डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, ब्राह्मण कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या नवीन रेफ्रिजरेटरमुळे रक्त साठवणुकीची क्षमता लक्षणीय वाढणार आहे. परिणामी पुणे शहरातील रक्तसाठा व्यवस्थापन अधिक सक्षम होईल. पैशाअभावी रक्त मिळणार नाही, याची आम्ही विशेष काळजी घेतो. थॅलेसेमिया ग्रस्त लहान मुलांना दरवर्षी ४ हजार रक्तपिशव्या रक्तपेढीच्या वतीने विनामूल्य दिल्या जातात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

रमेश भागवत म्हणाले , ब्राह्मण कार्यालय संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जनकल्याण रक्तपेढी यांना त्यांची गरज ओळखून केवळ रक्त पेढीसाठी उपयुक्त असणारा रेफ्रिजरेटर देण्यात आला. नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेलाही सुरक्षा कॅमेरा बसविण्यात आर्थिक मदत संस्थेमार्फत करण्यात आली आहे. समाजाच्या कल्याणासाठी अशा कार्यात सहभागी होणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भविष्यातही ब्राह्मण कार्यालय संस्था अशाच कार्यासाठी पुढे राहील, असेही त्यांनी सांगितले.

बारामती येथील अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी, आरोपीना अटक करून कडक कारवाई करावी : डॉ.नीलम गो-हे

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

पुणे जिल्हय़ातील बारामती तालुक्यातील महादेव मळा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची छेडाछेड केल्याच्या घटनेतील आरोपींवर पॉस्को आणि एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर त्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी,असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांना दिले.
पुणे जिल्हय़ातील बारामती तालुक्यातील महादेव मळा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना 13 एप्रिल रोजी घडली.त्यावेळी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी स्थानिक पोलिसांकडे याबाबतची तक्रार देताच, आरोपी विरोधात विविध कलम लावून पॉस्को आणि एट्रॉसिटी चा गुन्हा दाखल केला.पण त्या आरोपींना अटक करण्यात आली नाही.यामुळे पीडित कुटुंबियांनी नाराजी व्यक्ती केली आहे.पीडित मुलीसोबत घडलेला प्रकार आणि सध्या गावातील एकूणच वातावरण, याबाबत पिडीत मुलींच्या कुटुंबियांनी मला सविस्तर माहिती दिली आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांनी तात्काळ ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांना फोन लावून,त्या घटनेतील सध्याची माहिती जाणून घेतली.त्यावेळी पोलीस तपास पथकाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करीत,पीडित मुलीच्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन केले पाहिजे,असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

भाजपा व रा. स्व. संघाकडून जाती धर्माच्या नावावर विष पसरवून समाजात दुही माजवण्याचे काम: रमेश चेन्नीथला.

जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल: हर्षवर्धन सपकाळ

सद्भावना यात्रेच्या माध्यमातून दुभंगलेली मने जोडण्याचे काम: विजय वडेट्टीवार.

काँग्रेसच्या संविधान बचाओ पदयात्रेला परभणीकरांचा मोठा प्रतिसाद.

परभणी, दि. ५ मे २०२५
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरु केली आणि पहिल्याच यात्रेच्या घोषणेनंतर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाती धर्माच्या नावावर देशात विष पसरवून दुही माजवण्याचे काम करत आहे. म्हणून सद्भावना वाढीस लागावी यासाठी काँग्रेस ही यात्रा काढत असून यापुढेही राज्यात अशाच यात्रा काढण्यात येतील, असे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा नेतृत्वाखाली आज परभणी शहर काँग्रेस कार्यालयापासून संविधान बचाओ पदयात्रा काढण्यात आली. या यात्रेची सांगता अक्षता मंगल कार्यालयात संविधान संमेलनाने झाली. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणितीताई शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, यु. बी. व्यंकटेश, खा. डॉ. कल्याण काळे, खा. रविंद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष व यात्रेचे समन्वयक मोहन जोशी,
आ. अमित झनक, माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, इंटकचे प्रदेशाध्यक्ष कैलाश कदम, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर, शहराध्यक्ष नदीम इमानदार, बुलढाणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रदेश सरचिटणीस ब्रीज दत्त, रामचंद्र दळवी जितेंद्र देहाडे, सचिव विश्वजीत हाप्पे, बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनावणे, धाराशिव जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, प्रदेश सचिव विश्वजीत हाप्पे, धनराज राठोड, मुजाहिद खान, जफर खान, अभय देशमुख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व परभणीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्यावर झालेल्या अन्यायाप्रश्नी राहुल गांधी यांनी आवाज उठवला, या घटनेला तीन महिने झाले तरी तरी अद्याप सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर सरकारने कोणतीच कारवाई केलेली नाही, मुख्यमंत्री फडणीस यावर काही बोलत नाहीत. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायासाठी जातीजनगणनेचा मुद्दा उपस्थित केला, याचा फायदा मागास, वंचित, पीडित लोकांना होईल. जातनिहाय जनगणनेचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा भाजपा व मोदी यांनी त्याला विरोध केला पण शेवटी मोदी सरकारला जनगणनेचा निर्णय घ्यावाच लागला. मोदींवर जनतेचा विश्वास राहिला नाही, महिला आरक्षण विधेयक पास केले पण त्याची अंमलबजवाणी केली नाही. जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला पण तो कधी होईल हे जाहीर करत नाहीत.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरल्याने मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला. जातनिहाय जनगणना झाली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. ओबीसीला २७ टक्के आरक्षण आहे ते सुद्धा ६५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. भाजपा मात्र जाती जातीत भांडणे लावत आहे अशावेळी बहुजन समाज एकत्र असणे ही काळाची गरज आहे. राज्यात रोज ६ शेतकरी आत्महत्या होत आहेत, मुलांना नोकरी मिळत नाही आणि सरकारला मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून अदानी अंबानींचे हित महत्वाचे वाटत आहे. गरज नसताना ८८ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्यात सरकार प्राधान्य देत आहेत.

विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, सद्भावना यात्रेच्या माध्यमातून दुभंगलेली मने जोडण्याचे काम केले जात आहे, समाजा-समाजाला जोडण्याचे काम होत आहे. भाजपा २०१४ पासून देशात व राज्यात जातीयतेचे व धर्मांधतेचे विष पेरत आहे.आता भाजपा नेते काँग्रेस फोडण्याची भाषा करत आहेत. दुसऱ्याची घरे फोडण्याची सवय भाजपाला लागली आहे. आमची वेळ आल्यावर याचा बदला घेऊ. काही लोक पक्ष सोडून जात आहेत पण दुसऱ्याच्या मागे चालण्यापेक्षा स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा, असे वडेट्टीवार म्हणाले.

संविधान वाचले तर सद्भाव कायम राहिल..
माजी मंत्री नसीम खान म्हणाले की, भाजपा व रा. स्व. संघ जाती धर्मात वाद निर्माण करत तोडण्याचे काम करत आहे तर काँग्रेस जोडण्याचे काम करत आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता राहुल गांधी यांनी देशभर पदयात्रा काढली. देशावर संकट येते, सामाजिक सौहार्द बिघडते तेव्हा सर्वात आधी काँग्रेस पक्ष समोर येतो. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, पोलीस कोठडीत सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या करण्यात आली पण भाजपा युती सरकारवर त्याचा काही फरक पडला नाही. राहुल गांधी यांनी परभणीत येऊन सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आज देशात संविधान व लोकशाही वाचवण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे. संविधान वाचले तर सद्भाव कायम राहिल, संविधान वाचले तर सर्व जाती धर्माला न्याय मिळेल, असे नसीम खान म्हणाले.

भाजपाला संविधान बदलून मनुवाद आणायचा आहे.
खासदार चंद्रकांत हांडोरे यावेळी म्हणाले की, भाजपा, रा. स्व. संघ, बजरंग दल देशात अराजक माजवण्याचे काम करत असून भाजपा सरकार त्यांना पाठबळ देते. भाजपा सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरली असल्याने जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी जाती धर्मात भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात पवित्र संविधान दिले, सर्वांन समान अधिकार,हक्क दिले आहेत पण भाजपाला हे संविधान बदलायचे आहे आणि मनुवाद आणायचा आहे. देशात सद्भाव वाढला पाहिजे यासाठी काँग्रेस संविधान बचाव व सद्भावना यात्रा काढत आहे. सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला त्यास दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत विजय वाकोडे यांचे स्मारक सरकारने बांधले नाही तर खासदार निधीतून आपण करू अशी ग्वाही दिली.

महायुतीत ‘तीन तिघाडा व काम बिघाडा’ !
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, पहलगामला अतिरेकी हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी पहलगामला गेले, हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली पण पंतप्रधान मोदी बिहारला प्रचार सभेला गेले. इंदिराजी गांधी यांनी धाडस करून पाकिस्तानला धडा शिकवला मग नरेंद्र मोदी कशाची वाट पहात आहेत. भाजपा काँग्रेसला कमकुवत करण्याची भाषा करत आहे पण काँग्रेस कमकुवत होणार नाही उलट महायुतीतच तिन तिघाडा व काम बिघाडा झाली आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केले तर आभार शहराध्यक्ष नदीम इनामदार यांनी मानले.

शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकाससारख्या क्षेत्रांसाठी कृत्रीम बुद्धीमत्तेचे स्वतंत्र कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

‘मायक्रोसॉफ्ट’सारख्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या कृत्रीम बुद्धीमत्ता कौशल्यवृद्धी सहकार्यात
उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी

शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य क्षेत्रांमध्ये
कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचाचा वापर वाढवणे काळाची गरज

-कृत्रीम बुद्धीमत्ता क्षेत्रात कौशल्यवृद्धीसाठी मदत करणाऱ्या
मायक्रोसॉफ्टसह सर्वांचे स्वागत, सर्वांनासहकार्याची भूमिका

मुंबई, दि. 5 :- शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रीम बुद्धीमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करुन कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रे स्थापन करण्यासह एआय तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगासाठी ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि राज्य शासन यांच्यात सामंजस्य करार झाला असून एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्समुळे प्रशासनात कार्यक्षमता, पारदर्शकता, डिजिटल साक्षरता वाढणार आहे. नॉयडातील मायक्रोसॉफ्ट सेंटर ऑफ एक्सलन्स आणि तेलंगणातील हैदराबाद इथल्या गुगुलच्या आयटी पार्कच्या धर्तीवर बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकारातून शहरात आयटी पार्क किंवा इनोव्हेशन सेंटर उभारण्याचा प्रयत्न असून त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला कौशल्यविकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, नियोजन विकास विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कौशल्यविकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, उद्योग सचिव डॉ. अनबलनग पी., एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, मायक्रोसॉफ्टच्या उद्योग संचालक व कृषी तज्ञ सपना नौहारिया, रतन टाटा कौशल्यविकास विद्यापीठाच्या कुलगुरु अपूर्वा पालकर, कौशल्यविकास आयुक्त नितीन पाटील, बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे, विद्या प्रतिष्ठानचे किरण गुजर आदींसह शेती, उद्योग, व्यापार, माहितीतंत्रज्ञान, कौशल्यविकास आदी क्षेत्रातील तज्ञ तसेच शासनाच्या संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विद्या प्रतिष्ठानच्या बारामतीतील प्रस्तावित सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ आर्टीफिशिएल इंटलिजन्स केंद्रासोबत राज्यात मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा उभारणे, बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात कृत्रीम बुद्धीमत्ता वापराचे प्रशिक्षण सुरु करणे, कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, मायक्रोसॉफ्ट व शासनाच्या सहकार्यातून ज्ञान व माहितीचे आदान-प्रदान, एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, डिजिटील कौशल्यवृद्धी, संशोधन केंद्रे सुरु करणे, कर्करुग्णांवरील उपचारप्रक्रियेत वापरले जाणारे मायक्रोसॉफ्टचे इ-संजीवनी तंत्रज्ञान बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालय, सिल्वर ज्युबिली रुग्णालय, राज्यातील अन्य रुग्णालयांना उपलब्ध करुन देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

राज्य शासनाचे सर्व विभाग, शेती, उद्योग, व्यापार, सहकार अशा अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर वाढवणे ही काळाची गरज बनली असून या क्षेत्रात राज्याला मदत करण्यासाठी पुढे येणा्ऱ्या मायक्रोसॉफ्टसह सर्वांचे स्वागत करण्यात येईल. सर्वांना शक्य ते संपूर्ण सहकार्य, मदत केली जाईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिला.

वाणी कपूर ‘रेड 2’ च्या यशानंतर आनंदित

“बॉक्स ऑफिसवर यशस्वी होणं हे नेहमीच स्वप्नवत वाटतं!” :

वाणी कपूर अजय देवगणसोबतच्या तिच्या नवीन चित्रपट ‘रेड 2’ ला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे अत्यंत आनंदित आहे. केवळ चार दिवसांतच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे आणि तिकीट खिडकीवर भरघोस कमाई करत आहे.

वाढवलेल्या ओपनिंग वीकेंडमध्ये ‘रेड 2’ ने आतापर्यंत 70.75 कोटी रुपये कमावले आहेत आणि लवकरच हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील होण्याच्या मार्गावर आहे.

या यशावर प्रतिक्रिया देताना वाणी म्हणाली,“बॉक्स ऑफिसवर यशस्वी होणं हे नेहमीच एक स्वप्नासारखं वाटतं. एखाद्या अशा चित्रपटाचा भाग होणं, जो प्रेक्षकांच्या हृदयाशी जोडला जातो, ही खूप समाधानाची गोष्ट आहे. ‘रेड 2’ ला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद अत्यंत प्रेरणादायक आहे आणि मी या प्रवासाचा भाग असल्याबद्दल अत्यंत कृतज्ञ आहे.”

वाणी कपूरच्या भूमिकेचे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही कौतुक केले आहे, आणि तिने यशस्वी चित्रपटात काम केल्याने ती नम्रतेने भारावून गेली आहे.

वाणी पुढे म्हणाली,“चित्रपटाची कथा खूपच ताकदीची आहे. राज कुमार गुप्ता सरांच्या दूरदृष्टीने दिग्दर्शित या प्रोजेक्टवर काम करणं माझ्यासाठी एक समृद्ध अनुभव होता. माझ्या भूमिकेसाठी मिळणाऱ्या कौतुकाबद्दल मी माध्यमांचे, समीक्षकांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानते.”

ती पुढे म्हणाली,“अजय सर आणि राज कुमार गुप्ता सर यांच्यासोबत काम करताना मला एक कलाकार म्हणून खूप काही शिकायला मिळालं. ‘रेड 2’ चे यश माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टमुळे मला अधिक मेहनत करायची प्रेरणा मिळते आणि सतत प्रगती करत राहायचं बळ मिळतं.”

यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री आलिया भटचे पदार्पण

लोरिएल पॅरिसची ब्रॅण्ड अम्बेसिडर म्हणून २८ व्या भागीदारी सोहळ्यात आलिया भट हजर राहणार

आलियासोबत अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनही उपस्थित राहणार

पुणे , ५ मे २०२५ – लोरिएल पॅरिस हा जगप्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन उत्पादनांचा ब्रॅण्ड आता कान्स फिल्म फॅस्टिवलमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. १३ ते २४ मे दरम्यान कान्स फिल्म फॅस्टिवल सोहळा पार पडेल. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लोरिएल पॅरिसचे ब्युटी पार्टनर म्हणून यंदाचे २८ वे वर्ष आहे. लाइट्स, ब्युटी एण्ड एक्शन ही संकल्पना यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये राबवली जाईल. प्रत्येकाच्या अंतरंगात एक आकर्षक सौंदर्य दडलेलं आहे, हे सौंदर्य तुमचा खरा आत्मविश्वास आहे, असा संदेश या संकल्पनेतून मांडण्यात आला आहे.

आपल्या अभिनयाने सर्वांना घायाळ करणारी प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट ही यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलचे प्रमुख आकर्षण ठरेल. लोरिएल पॅरिसची जागतिक ब्रॅण्ड एम्बेसिडर म्हणून आलिया कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करेल. आलियासोबतच माजी विश्वसुंदरी, प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायही यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उपस्थित असेल. गेली कित्येक वर्षे ऐश्वर्या राय या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लोरिएल पॅरिससाठी ब्रॅण्ड एम्बेसिडर म्हणून प्रतिनिधीत्व करत आहे. अभिनय आणि सौंदर्याचा सुरेख संगम असलेल्या या दोन कसदार अभिनेत्रींची हजेरी ही सौंदर्यांची सकारात्मक व्याख्या असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश लोरिएल पॅरिस देत आहे. सर्वसमावेशक सक्षमीकरण हा सकारात्मक विचार पसरवण्यासाठी लोरिएल पॅरिस कटिबद्ध आहे.

कान्स फिल्म सोहळ्याबद्दल अभिनेत्री, निर्माती आणि उद्योजिका आलिया भटने आपण प्रचंड उत्सुक असल्याचे सांगितले. आयुष्यात पहिल्यांदाच घडणा-या अनेक गोष्टींबाबत आपल्याला कुतुहूल असते. यंदाच्या वर्षी मी पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाऊल ठेवणार आहे. सिनेमाच्या या अंतरंगी दुनियेत प्रवेश करण्यासाठी मी नक्कीच उत्सुक आहे. लाइट्स, ब्युटी एण्ड एक्शन ही संकल्पना यंदा राबवली जाईल. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेणे ही माझ्यासाठी निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. माझ्यासाठी सौंदर्य म्हणजे प्रत्येक माणसाच्या वेगळेपणाचा, आत्मविश्वासाचा आणि आत्म-सन्मानाचा उत्सव आहे. या विचारांचे सौंदर्य अमर्याद आणि अद्वितीय असते. स्त्रियांच्या अस्तित्वाचा आदर करणा-या आणि त्यांना स्वतःच्या प्रकाशाच चमकण्यासाठी सक्षण करणा-या लोरिएल पॅरिससोबत काम करणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, असे आलिया भट्ट म्हणाली.

लोरिएल पॅरिस इंडियाचे महाव्यवस्थापक डारिओ झिझ्झी यांनीही कान्स फिल्म फेस्टिव्हलबद्दल आपले मत मांडले. ते म्हणाले, ‘‘कान्स फिल्म फेस्टिव्हल हा नेहमीच कथाकथानक, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक संवादासाठी एक प्रभावी व्यासपीठ राहिला आहे. ही मूल्ये लोरिएल पॅरिसच्या विचारधारेशी जुळतात. या फिल्म फेस्टिव्हलचा अधिकृत मेकअप भागीदार म्हणून आम्ही २८ वर्ष पूर्ण करत आहोत. या जागतिक व्यासपीठावर आलिया भटचे स्वागत करताना आम्हांला आनंद होत आहे. या मंचावर गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ ऐश्वर्या राय बच्चन आमच्यासाठी उपस्थित राहिल्या आहेत. यंदाही त्यांचा सहभाग आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. या फेस्टिव्हलमध्ये आलिया भटचे पदार्पण हे जागतिक पातळीवर भारतीय सिनेमाचा वाढता प्रभाव दर्शवते. तिचे पदार्पण आमच्या ब्रॅण्डच्या जगभरातील विविध सौंदर्य आणि महिला सक्षणीकरणाचा उत्सव साजरा करण्याच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.’’

लोरिएल पॅरिसने यावर्षी सामरिक भागीदारीसाठी देशातील प्रसिद्ध ऑनलाईन खरेदीचे व्यासपीठ नायकासोबत ब्युटी पार्टनर म्हणून भागीदारी केली आहे. या भागीदारीतून नायकाच्या ऑनलाईन खरेदीतून सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना महिलांना कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेट लूकही तयार करण्याची माहिती दिली जाईल. आता लोरिएल पॅरिसचे सर्वात जास्त मागणी असलेले प्लम्प एमबिशस लिप ऑईल नायकावर खास उपलब्ध झाले आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरु असेपर्यंत नायकावर लोरिएलचे हे प्रसिद्ध लिप ऑईल खरेदी करता येईल.

लोरिएल पॅरिससोबतच्या भागीदारीबद्दल नायका ब्युटीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंचित नायर यांनीही आपली भूमिका जाहीर केली. ते म्हणाले, ‘‘ गेल्या ३० वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लोरिएल पॅरिसची उपस्थिती आहे. इतक्या वर्षांपासून लोरिएल पॅरिस जागतिक स्तरावर सौंदर्याचा उत्सव साजरा करत आहे. भारतात लोरिएल पॅरिसचा अधिकृत सौंदर्य भागीदार म्हणून नायकाला हा सहयोग आपल्या ग्राहकांना मिळवून देता येत आहे. नायकाच्या ४ कोटींहून अधिक ग्राहकांना आणि २०० हून अधिक स्टोअर्सला या भागीदारासून या फेस्टिव्हलची अनुभूती देता येईल. हे आमच्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. या जागतिक व्यासपीठावर भारतीय सौंदर्याचा सन्मान होत आहे. आपल्या सौंदर्यांवर नितळ विश्वास ठेवणा-या प्रत्येकाचा हा सन्मान आहे. ’’

यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लोरिएल पॅरिसच्या जागतिक ब्रॅण्ड एम्बेसिडर इव्हा लॉन्गोरिया, व्हायोला डेव्हिस, जेन फोंडा, अजा नाऔमी किंग, अँकी मॅकडॉवेल, सिमोन अश्ले, एल फॅनिंग, बेबे विओ आणि यसेल्ट आदी नामवंत कलाकार उपस्थित राहतील. हे सर्वजण लोरिएल पॅरिसच्या अस्सल सौंदर्याचा उत्सव साजरा करण्याच्या ध्येयाचे प्रतिनिधीत्व करतात.

यावेळी लोरिएल पॅरिसकडून लाइट्स ऑन वुमेन्स अर्थ हा पुरस्कारही दिला जाईल. चित्रपटांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. महिला चित्रपट निर्मात्यांना प्रकाशझोतात आणण्यासाठी तसेच त्यांना प्रोस्ताहित करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन केले जाते. हा पुरस्कार महिलांच्या कलेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि चित्रपट उद्योगातील त्यांच्या व्यावसायिक प्रवासाला गती देण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे.

या संपूर्ण महोत्सवात लोरिएल पॅरिसकडून वेगवेगळे मेकअप लूक प्रसिद्ध केले जातील. या आकर्षक लूकची संपूर्ण जबाबदारी ही जगप्रसिद्ध मेकअप क्रिएटीव्ह डायरेक्टर हॅरोल्ड जेम्स करतील. लोरिएल पॅरिससाठी ही जबाबदारी पेलण्यासाठी नुकताच हॅरोल्ड जेम्स यांनी हा कार्यभार स्विकारला आहे.