पुणे :बहुप्रतिक्षित हंड्रेड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा शुक्रवारी 6 डिसेंबररोजी एलएसबीआय बॅडमिंटन मैदान, वडगाव शेरी, पुणे येथे सुरू झाली, या प्रतिष्ठित स्पर्धेत भारतभरातील 300 स्पर्धक सहभागी झाले आहेत. उल्लेखनीय सहभागींमध्ये प्रकाश रामाप्पा (हैदराबाद), वय 78, विजया लक्ष्मी (पुणे), वय 70, आणि सेवानिवृत्त ब्रिगेडियर श्रीनिविसन आणि त्यांच्या पत्नी इंदू यांचा समावेश आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेसाठी प्रेरणा आणि उत्साह वाढला आहे. संपूर्ण कार्यक्रमात सहभागींना मोफत पिक-अँड-ड्रॉप सेवा, मोफत जेवण, स्नॅक्स, फळे (सफरचंद आणि केळी) आणि पूर्णवेळ चहा आणि कॉफी प्रदान केली जात आहे. मल्टीफिट जिम, वडगाव शेरीने सर्व खेळाडूंना मोफत तीन दिवसीय चाचणी कूपन दिले आहेत. स्पर्धेच्या आवाहनाला जोडून, हंड्रेड बॅडमिंटनने या ठिकाणी एक पूर्ण स्टॉल उभारला आहे, ज्यामध्ये खरेदीसाठी सर्व उपलब्ध उत्पादने उपलब्ध आहेत, खेळाडू आणि अभ्यागतांना प्रीमियम बॅडमिंटन उपकरणे आणि सुलभ प्रवेश प्रदान केला आहे.सनलाइट स्पोर्ट्सद्वारे प्रायोजित, विजेत्यांना प्रीमियम हंड्रेड ब्रँड रॅकेट आणि सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके मिळतील. उपविजेत्याला उच्च दर्जाचे बॅडमिंटन किट दिले जातील. या स्पर्धेचे निपुणतेने आयोजन केले जात आहे राज सिंग, एक प्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू, शेखर यादव यांच्यासह अनेकजण यात सहभागी आहेत. हा कार्यक्रम 8 डिसेंबर पर्यंत सुरू राहील, ज्यामध्ये रोमांचक सामने आणि चुरशीची स्पर्धा असेल.
पुणे-अवैद्य गावठी हातभट्टी दारूच्या दोन भट्टया उध्वस्त करुन, त्या मधील ४,३४० लिटर गावठी हातभट्टी दारु व गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे १२,००० लिटर गुळमिश्रीत कच्चे रसायन पकडुन ९,२७,५००/-रु.कि.चा मुद्देमाल काळेपडळ पोलीसांनी हस्तगत केला. आणि दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’ दिनांक ०६/१२/२०२४ व दिनांक ०७/१२/२०२४ रोजी काळेपडळ कडील तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक अमित शेटे, परि-पोलीस उप निरीक्षक, अनिल निबाळकर, पोलीस हवालदार , परशुराम पिसे, संजय देसाई, पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, सद्दाम तांबोळी, असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे यांना गोपनीय बातमी मिळाली की, औताडवाडी, स्मशान भूमीच्या पश्चिमेस, ओढ्यालगत वडाचीवाडी पुणे व सर्व्हे नं.१३/२ ओढयालगत वडाचीवाडी पुणे येथे दोन इसम हे गावठी हातभट्टी दारु काढण्यासाठी लागणारे साहीत्य गोळा करुन, दारु काढणेची भट्टी लावून, गावठी हातभट्टी दारु गाळण्याचे तयारीत आहेत. अशा मिळालेल्या बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व वर पोलीस स्टाफ यांनी वर दोन ठिकाणी सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकून कारवाई केली. या छापा कारवाई मध्ये दारु गाळणारेदोघांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव, पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांचे नावे १) जगदीश भैरुलाल प्रजापती, वय २४ वर्षे, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे २) गुलाब संपकाळ रचपुत वय ३३ वर्षे, रा. पिजनवस्ती, होळकरवाडी पुणे असे असल्याचे सांगितले. सदर ठिकाणा वरुन तयार हातभट्टीच्या दारुने भरलेले एकुण १२४ कॅन व १२,००० लिटर कच्चे रसायनसह दोन मोबाईल हॅन्डसेट असा एकुण ९,२७,५००/-रु.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्या बाबत कोढवा पोलीस ठाणेस गु.र.नं.१३३२/२०२४ मा.न्या.सं. कलम १२३ सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम सन १९४९ कलम ६५ (ब) (क) (ई) (फ) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, अनिल निंबाळकर हे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ .५ आर. राजा, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, यांचे मागदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, .मानसिंग पाटील, यांचे सुचने प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, परि-पोलीस उप निरीक्षक, अनिल निबाळकर, पोलीस हवा, परशुराम पिसे, संजय देसाई, पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, सद्दाम तांबोळी यांचे पथकाने केली आहे.
पुणे-: “मागील १० वर्षात वडगावशेरी मतदारसंघातील लोहगावच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले. पाणी, रस्ता, वीज यांसारख्या मूलभूत सुविधाही इथल्या नागरिकांना पुरवण्यात आल्या नाहीत. परंतु, येणाऱ्या काळात या सर्व समस्या नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लावत लोहगावाला विकासाच्या प्रवाहात आणणार”, असे म्हणत वडगावशेरी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे यांनी लोहगाव भागाची पाहणी केली. पाहणीदरम्यान, महानगरपालिका पाणी पुरवठा तसेच पथ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
लोहगाव भागात पाण्याची मोठी समस्या गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे. अनियमित व अपुरा पाणी पुरवठा यांमुळे लोहगावकर हैराण झाले आहेत. यावर बापूसाहेब पठारे यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत पाण्याच्या टाक्यांची पाहणी केली. पाहणी झाल्यानंतर, पठारे यांच्या माध्यमातून पाणी प्रश्न नक्की सुटेल, अशी सकारात्मक चर्चाही इथल्या नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
अधिकाऱ्यांनीदेखील महानगरपालिकेच्या माध्यमातून लोहगावमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी समवेत दगडूदादा खांदवे(सामाजिक कार्यकर्ते), राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राजेंद्र खांदवे, सुभाष काळभोर,सुनिल खांदवे मास्तर, सागर खांदवे, केशव राखपसरे, निलेश पवार, विजय निमगिरे, तुषार बालघरे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे एकनाथ खांदवे, सोमनाथ खांदवे, शरद खांदवे, श्रीकांत खांदवे, सचिन खांदवे, दिपक खांदवे कॉंग्रेस, रमेश मामा खांदवे कॉंग्रेस, अंबर खांदवे, सामाजिक कार्यकर्ते भानुदास खांदवे, भाऊसाहेब खांदवे, प्रताप खांदवे, रामभाऊ खांदवे चौकट: लोहगाव-वाघोली या रस्त्यावरील ‘स्मशानभूमी ते संतनगर’ दरम्यानची होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या रस्त्यावरील महावितरणचे विद्युत तारा भूमिगत करून रस्त्याच्या दोन्ही बाजूचे विद्युत पोल हटविणे बाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूच्या साईड पट्या तयार करून रस्ता करण्यासाठी मनपाच्या पथ विभागाला कारवाई करण्यास सांगितले आहे. लवकरच ही कामे सुरू होणार आहे असे आमदार बापूसाहेब पठारे यांनी सांगितले आहे.
ठाणे : महाराष्ट्र राज्यात विनापरवाना मद्यविक्री आणि बोगस, परराज्यातील बनावट दारू विक्रीच्या देखील अनेक घटना समोर येत आहेत. गोव्यातून दारू आणून महाराष्ट्रात विक्रीचे प्रकरणही उत्पादन शुल्क विभागाने समोर आणले होते. मात्र, आता चक्क एका नामांकित ब्रँडच्या नावाचा वापर करून मद्याची तस्करी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. एशियन पेंटची वाहतुक करण्याच्या नावाखाली मद्याची तस्करी करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने शिळफाटा येथे जप्त केला. विभागाच्या पोलिसांनी ) कंटेनर चालक पूनमा राम गोदारा याला अटकही केली आहे.
कर्नाटक राज्यातील हुबळी येथून भिवंडीला जाणाऱ्या या कंटेनरमध्ये गोवा आणि हिमाचल प्रदेश निर्मित 600 बॉक्स विदेशी व्हिस्की व रम आणि बिअरचे 110 बॉक्स असा सुमारे 55 लाख 69 हजारांचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे उपअधिक्षक वैभव वैद्य यांनी दिली. मद्याने भरलेल्या या कंटेनरमधून जप्त केलेल्या वाहतूक चलनावर चक्क एशियन पेंटची वाहतूक होत असल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यामुळे, एका नामवंत ब्रँडनेमचा वापर करुन मद्यविक्री करणाऱ्यांचा भांडाफोड करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आलं आहे.
दरम्यान, येणाऱ्या थर्टी फर्स्टच्या पार्श्वभुमीवर अनधिकृतरित्या मद्य विक्री करणाऱ्या ठाण्यातील धाबे आणि मद्य विक्रेत्यांवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून अवैध मद्यसाठा आढळल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा उपअधिक्षक वैभव वैद्य यांनी दिला आहे. त्यामुळे, अवैध मद्यसाठा विक्री करणाऱ्यांचे धाबे या कारवाईने दणाणले आहेत.
पुणे-बांगलादेशी हिंदूच्या सन्मानासाठी पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलन केले .यावेळी बांगलादेशचा झेंडा पायदळी तुडवून व जाळून निषेध करण्यात आला.
या संदर्भात शिवसेना शहर अध्यक्ष संजय मोरे म्हणाले,’बांगलादेशी इस्कॉन या मानवतावादी, अध्यात्मिक संघटनेच्या सदस्यांविरोधात तेथील सरकार हल्ले, अन्याय व अत्याचार करत असल्याच्या निषेधार्थ आज झाशीराणी पुतळा, बालगंधर्व चौक येथे शिवसेना पुणे शहराचे वतीने धरणे आंदोलन करण्यात आले . तसेच बांगलादेशचा झेंडा पायदळी तुडवून व जाळून निषेध करण्यात आला. भारतीयांवर बाहेर देशांमधील वाढते अत्याचार हल्ले थांबविण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, शिवसेना पुणे शहराच्या वतीने यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली, मोदी सरकारची लाडकी बहीण … शेख हसीना … शेख हसीना” ही घोषणा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. मोदी भक्तांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान मोदींच्या एका फोनमुळे रशिया – युक्रेनचे युध्द थांबले. मग बांगलादेशात हिंदूंवर होणारे हल्ले, अन्याय, अत्याचार थांबवण्यासाठी भक्तांनी दुसरा फोन करण्यासाठी पंतप्रधानाकडे आग्रह धरावा. फक्त निवडणुकीपुरते हिंदुत्व करायच नंतर पुर्णपणे दुर्लक्ष करायच हि भाजपची निती. बांगला देशातील हिंदूवरील हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत बांगला देशासोबत क्रिकेट बंद करा हि शिवसेना नेते आ.आदित्य ठाकरे यांची मागणी अमलात आणा असे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले. बांगलादेशी हिंदूंविरोधातील अत्याचार थांबले नाही तर शिवसेना महाराष्ट्रात व पुणे शहरात विविध भागात उग्र आंदोलन करणार आणि झोपलेल्या केंद्र सरकारला जागे करणार आहे. असे आंदोलनात ठरविण्यात आले. यावेळी धरणे आंदोलनात शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकूडे, विजय देशमुख, प्रशांत बधे, रामभाऊ पारिख, राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, दत्ता घुले, उपशहप्रमुख भरत कुंभारकर, प्रशांत राणे, राजेश पळसकर, आबा निकम, उमेश वाघ, उत्तम भुजबळ, बाळासाहेब भांडे, अनंत घरत, प्रविण डोंगरे, विलास सोनवणे, दिलीप पोमण, संतोष भुतकर, नंदू येवले, राजेश मोरे, राजेंद्र शहा, भगवान वायाळ, मुकुंद चव्हाण, अमर मारटकर, रूपेश पवार, प्रसाद काकडे, सचिन चिंचवडे, अजय परदेशी, संतोष तोंडे, राजू चव्हाण, हेमंत यादव, दिलीप व्यवहारे, दत्ता खवळे, नितीन निगडे, नागनाथ शिंदे, आशिष आढळ, संतोष होडे, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, समन्वयक युवराज पारिख, चेतन चव्हाण, अजित जाधव, सोहम जाधव, शुभम दुगाणे, कुणाल झेंडे, तेजस मर्चंट, सागर दळवी, चिंतामणी मुंगी, बकुळ डाखवे, प्रतीक गालिंदे, नागेश खडके, अमित जाधव, शैलेश जगताप, महिला आघाडीच्या कल्पना थोरवे, विद्या होडे, रोहिणी कोल्हाळ , स्वाती कथलकर, करुणा घाडगे, प्रविणी भोर, ज्योती चांदेरे, सोनाली जुनवणे, शितल जाधव, स्नेहल पाटोळे, राजेश मुप्पीड, विनायक नांगरे, सूर्यकांत पवार, नितीन रावळेकर, अरविंद दाभोळकर, बाबा कोरे, सोमनाथ गायकवाड, नितीन जाधव, सचिन खेंगरे, शाम कदम, आनंद वाघमारे, सचिन घोलप, प्रकाश चौरे, प्रकाश धामणे, प्रभाकर कुंटे, विकी धोत्रे, राहुल शेडगे, संजय लोहोट, संतोष ओरसे, अफाक शेख, जुबेर शेख, मंदार धोत्रे, धीरज शिंदे, असीम शेख, जुबेर तांबोळी , प्रशांत काकडे, अथर्व लांडगे, अनिल हावळे इतर शिवसैनिक उपस्थित होते.
पुणे-पुण्यातील उच्च्भ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या कोरेगावपार्क, कल्याणीनगर भागात पुन्हा एकदा मध्यरात्री उशिरा पर्यंत हाॅटेल सुरू ठेवत धिंगाणा सुरू असल्याचे उघडकीस आले. पुणे पोलिसांचे आदेश धुडकावून हाॅटेलमध्ये मध्यरात्रीपर्यंत ध्वनीवर्धक सुरू ठेवल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दोन हाॅटेलच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल केल आहे. कल्याणीनगर येथील कुकू हॉटेलचे मालक खुशबू वर्मा, व्यवस्थापक फैयाज फकीरउद्दीन मीर (वय ३२) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलीस कर्मचारी प्रवीण खाटमोडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी मध्यरात्री कोरेगावपार्क येथील हॉटेल कुकू येथे पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी हॉटेलमध्ये बेकायदा ध्वनीवर्धक सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी हॉटेलमध्ये ४८ ग्राहक होते. पोलिसांनी हॉटेल मालक, व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या कारवाईत कल्याणीनगर येथील हॉटेल ‘ओ आय ब्रू’ येथे छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी या हाॅटेलमध्ये २५ ते ३० जण ग्राहक तेथे होते. मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवून ध्वनीवर्धक सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेलचे मालक अमन प्रेम तलरेजा (वय ३०, रा. कोरेगाव पार्क), व्यवस्थापक निखिल बेडेकर (वय ३६, मुंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणीनगर भागातील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर या भागातील मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणारे हॉटेल, पबविरुद्ध नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. पोलीस, उत्पादन शुल्क विभागाने तेथे कारवाई करून वीसहून अधिक पबविरुद्ध कारवाई केली. मात्र, त्यानंतर या भागातील हॉटेल, पब पुन्हा मध्यरात्रीपर्यंत सुरू झाल्याचे दिसून आले आहे.रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू असल्याने तेथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत या भागातील रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या.
मुंबई- ईव्हीएमच्या विरोधासाठी शरद पवार उद्या मारकडवाडी येथे येणार आहेत. माझ्याविरोधात पराभूत झालेले भाजपाचे उमेदवार राम सातपुते आणि मी मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी आग्रही आहोत, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी म्हटले आहे. उत्तम जानकर पुढे बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगाने मतपत्रिकेवर फेरमतदान घेण्याची परवानगी दिल्यास मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहे.दरम्यान ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत पुढे बोलताना म्हणाले की, मी किमान 40 हजार मतांनी निवडून आलो असतो. मी राजीनामा देणयासाठी तयार आहे, पण बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊतांनी देखील केली आहे.उत्तम जानकर म्हणाले की, माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत ईव्हीएम विरोधातील आक्रोशाची चिंगारी पेटली आहे. ही चिंगारी संपूर्ण देशभर पेटण्याअगोदर निवडणूक आयोगाने राज्यात तातडीने पुनर्मतदानाचा आदेश काढावा. निवडणूक आयोगाने आदेश काढला नाही, तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत आणि त्यातूनही काही नाही झाले तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी मारकडवाडीमधून लॉंग मार्च काढणार आहे.
उत्तम जानकर म्हणाले की, पुढील 15 दिवसांत मतपत्रिकेवर निवडणूक घेऊन राज्यात आणि देशात जे संशयाचे धुके निर्माण झाले आहे, ते बाजूला करावे असा आमचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोगाला आम्ही पत्र देत आहोत. त्यांनी यासाठी होकार दिल्यानंतर मी राजीनामा देणार आहे.
उत्तम जानकर म्हणाले की, मारकडवाडीने एक साधा सॅम्पल करण्याचा प्रयत्न केला, त्याला जवळपास 18 ते 19 कोटी लोकांनी दाद दिली. भारतातील निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी त्या घटनेच स्टेट्स ठेवले होते. लोकांमध्ये किती आग आहे, उद्रेक आहे, हे यातून दिसून येते. राज्यात अनेकांनी ईव्हीएमला विरोध केला आहे. मात्र, ती तांत्रिक बाब असल्यामुळे दडपशाहीपुढे ते टिकला नाही. मात्र, त्याचा आता पर्दाफाश होणार आहे.
अधिकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच मद्य खरेदी करा
राज्य उत्पादन शुल्क, पुणे चे अधीक्षक,चरणसिंग राजपुत यांचेकडून असेही आवाहन करण्यात येते की, बेकायदेशीर मद्य व्यवसायात सामील असणा-या व्यक्तींची माहीती स्थानीक राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांचे कार्यालयीन क्र.०२०-२६१२-७३२१ यावर कळवावे, तसेच अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या टोल फ्री क्र.१८००२३३९९९९ व व्हॉटसअप क्र.८४२२००११३३ यावर संपर्क साधावा.
पुणे- ब्रँडेडच्या नावाने बोगस कपड्यांच्यानंतर बनावट स्कॉच व्हिस्की दारूचाही पुण्यात सुळसुळाट होत असून या संदर्भात तातडीने दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई सुरु केली आहे . या प्रकरणी एका पटेल नामक हस्तकाला पोलिसांनी पकडला असून जाव्ल्जाव्ल ६ लाकाहाचा ऐवज जप्त केला आहे . हि कारवाई आता आणखी वेगाने करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क, पुणे चे अधीक्षक,चरणसिंग राजपुत यांनी सांगितले आहे.
या संदर्भात उत्पादन शुल्क विभागाने दिलेली अधिकृत माहिती अशी अशी कि,’ दि.०६/१२/२०२४ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी साहेब, संचालक अंमलबजावणी व दक्षता पी.पी. सुर्वे साहेब विभागीय उप-आयुक्त, पुणे विभाग पुणे सागर धोमकर साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे चरणसिंग राजपुत साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करणेकामी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग, पुणे यांनी चिंचवड गावच्या हद्दीत, चिंचवड पिंपरी लिंक रोडवर, हॉटेल ईगल गार्डन समोर, चिंचवड, पुणे येथे बनावट स्कॉचचा साठा उध्वस्त केला. उप-अधीक्षक, पिंपरी चिंचवड सुजित पाटील, यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार कमी प्रतीचे मद्य, उच्च प्रतीच्या रिकाम्या स्कॉचच्या बाटल्या मध्ये भरून बनावट स्कॉच व विदेशी मद्याची विक्री होते असल्याने त्यांनी अभय औटे दुय्यम निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पथक निर्माण केले. सदर पथकाने हॉटेल ईगल गार्डन समोर, चिंचवड, पुणे याठिकाणी सापळा रचून वाहतूक करीत असताना इसम नामे धनजी जेठा पटेल हा उच्च प्रतीच्या स्कॉचच्या रिकाम्या बाटल्यामध्ये कमी प्रतीचे विदेशी मद्य अशा एकूण २४ बाटल्या तसेच तीनचाकी रिक्षाचालक बाबासाहेब शिवाजी धाकतोडे रिक्षा वाहन क्र. एमएच- १४-जेपी-०८८४ यामधून अवैध मद्याची वाहतूक करीत असताना मिळून आल्याने दोन्ही इसमांस जागीच ताब्यात घेण्यात आले. त्यात पुढील तपास करीत असताना सदरील अवैध मद्य मारूंजी गावावरून आणल्याचे निष्पन्न झाल्याने सदरील ठिकाणी मारूंजी गावचे हद्दीत, स्प्रिंग वुडस सोसायटी, फ्लॅट नं.२०१, स.नं.०२, ता. मुळशी, जि. पुणे या त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात विविध ग्रॅण्डच्या उच्च प्रतीच्या स्कॉचच्या १ लि. क्षमतेच्या एकूण १८ सिलबंद बाटल्या तसेच विविध ग्रॅण्डच्या उच्च प्रतीच्या स्कॉचच्या ११० रिकाम्या बाटल्या, बुचे, लेबले इ. साहित्य, ०१ तीनचाकी रिक्षा, ०१ दुचाकी वाहन, ०१ मोबाईल फोन असा एकूण रू.५,९६,५१०/- किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यास जागीच अटक करून ताब्यात घेतले. त्याचे विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयामधील मुख्य आरोपी धनजी जेठा पटेल याचे बाहेर राज्यातील संबंध असण्याची शक्यता असून पुढील तपास अभय अ. औटे दुय्यम निरीक्षक हे करीत आहेत. सदर कारवाई करीता निरीक्षक एस.यु.शिंदे, अभय अ. औटे, बी.जी. रेडेकर, श्री. गणेश पठारे, श्रीमती. अमृता पाटील. दुय्यम निरीक्षकै व कर्मचारी वर्ग सर्वश्री प्रमोद पालवे, विजय धंदुरे, संतोष गायकवाड, रसुल काद्री, प्रमोद खरसडे, यांनी भाग घेतला. या गुन्हयाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आवाहन करण्यात येते की, नवीन वर्षाच्या व नाताळ सणाच्या निमिताने मद्य प्राशन करणाऱ्या नागरीकांनी केवल स्वस्त दराने आणि घरपोच मद्य मिळत आहे म्हणून मद्य खरेदी न करता अधिकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच मद्य खरेदी करावे. अन्यथा स्वस्त दरात उपलब्ध होणारे मद्य बनावट, भेसळीचे किंवा कमी दर्जाचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सासवड, : सतरावे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे, उद्घाटन समारंभ, कथाकथन, ग्रंथदिंडी, नाट्यप्रयोग, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संमेलनाच्या संयोजन बैठकीला राजाभाऊ जगताप, प्रसिद्धी प्रमुख दत्तानाना भोंगळे, सुनील लोणकर, श्यामकुमार मेमाणे, गंगाराम जाधव, बहुजन हक्क परिषदेचे सुनील धिवार, दत्ता कड, अरविंद जगताप, दीपक पवार, संजय सोनवणे, आदी उपस्थित होते.
महात्मा फुले यांच्या मूळ खानवडीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात राज्यभऱातून लेखक, कवी सहभागी होतात. क-हा नदीच्या काठावर रंगणा-या या साहित्य संमेलनात सहभागी होऊ इच्छिणा-या लेखक,कवींनी मो.९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री यादव यांनी केले आहे.
पुणे: महाराष्ट्र विधानसभा सदस्यांची शपथविधीची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत एक गमतीशीर प्रसंग घडला, ज्यामुळे सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. भाजपचे कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने विरोधी बाकावर बसले होते.मात्र, तिथेच अजित पवार यांनी हेमंत रासने यांना हाताला धरून योग्य बाकावर बसवले.
हेमंत रासने, हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यांनी कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या विजयामुळे भाजपला एक मतदारसंघात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. कसबा मतदारसंघाची परंपरागत जागा असून, याआधीही भाजपचा दबदबा होता, मात्र 2023 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने या सीटवर विजय मिळवला होता.
हेमंत रासने हे पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची ओळख झाली असून, त्यांना भाजपमध्ये एक महत्त्वाची भूमिका दिली गेली आहे.
आज शपथविधी दरम्यान हेमंत रासने यांनी विधानसभा सभागृहात प्रवेश केला. सर्वसाधारणपणे, सत्ताधारी नवीन सदस्यांना सत्ताधारी बाकांवर बसावे लागते, मात्र रासने यांना विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसण्याची चूक झाली. यावेळी अजित पवार हे सभागृहात उपस्थित होते. त्यांनी हेमंत रासने यांना हाताला धरून सत्ताधारी बाकावर नेले.
हे दृश्य पाहून सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. यावेळी हेमंत रासने यांनीही अजित पवार यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.हेमंत रासने यांना केवळ कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे नाही तर पुण्यातील मोठ्या नेत्यांचे समर्थन मिळालं आहे
मुंबई, दि. ७ डिसेंबर २०२४ विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. विधानसभा परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी महाविकास आघाडीचे नेते भेट घेऊन पुढील रणनिती ठरवतील. भाजपा युतीचे सरकार हे जनतेचे सरकार नाही. मतांची चोरी करून आलेल्या सरकारने आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली. तरुण मुले व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. नागपूर भागात ७७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्या पण भाजपा युतीला त्याचे काही देणेघेणे नाही त्यांनी सरकारचा शपथविधी सोहळा धुमधडाक्यात घेतला. मारकरवाडीची लढाई… लोकशाही व मताचा अधिकार वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. मारकडवाडीतून जी ठिणगी पेटलेली आहे ती देशात पोहचवण्याचा काँग्रेसचा संकल्प आहे. यासंदर्भात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली असून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या आंदोलनावर दिल्लीत तयारी सुरु आहे. सर्व तयारी झाल्यानंतर मारकडवाडीचे आंदोलन देशव्यापी करण्यासंदर्भात निर्णय होईल असेही नाना पटोले म्हणाले. आयकर विभागाने जप्त केलेली अजित पवारांची १ हजार कोटींची संपत्ती परत देण्याच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोलो म्हणाले की, ना खाऊंगा, ना खाने दुंगा ही भूमिका नरेंद्र मोदींच्या लोकांसाठी नाही. भाजपाबरोबर असलेल्या नेत्यांच्या भ्रष्ट कारभारावर पांघरूण घालण्याचा हा प्रयत्न आहे असे पटोले म्हणाले.
पुणे-पुण्यातील शाकाहार प्रेरक डॉ. कल्याण गंगवाल हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजात पशुबळी विरोधी चळवळ उभारावी, यासाठी त्यांनी व्यापक काम केले आहे. पुण्यापासून १९०० किलोमिटर अंतरावर असलेले गधीमाई देवीची मंदिर आहे. येवढ्या लांब जावून डॉ. गंगवाल यांनी अनेक प्राणी हत्या थांबवली असून सध्या ते नेपाळच्या सीमारेषेवर प्राणी हत्या थांबवण्यासाठी ते मोठ्या हेरीने काम करत आहेत. गधीमाई देवीची मंदिराच्या आवारात दर पाच वर्षांनी जगातील सर्वात मोठे प्राण्यांचे बलिदान दिले जाते. त्याठिकाणी प्राण्यांची निर्घृणपणे हत्या केली जाते.
गधीमाई देवीच्या नावावर चाललेली प्राणी हत्या कायमची बंद करावी यासाठी डॉ. कल्याण गंगवाल अहोरात्र मेहनत घेत आहेत. नेपाळ तसेच भारतातील विविध राज्यातील तसेच महाराष्ट्रातून देखील अनेक लोक त्या ठिकाणी जात असतात. फक्त वयाच्या ८० वर्षाचे असलेले डॉ. गंगवाल हे गेल्या अनेक वर्षांपासून देशाच्या कानाोपऱ्यात जावून पशुबळी थांबण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक ठिकाणी पशुबळीची अनिष्ट प्रथा बंद झाल्या आहेत.
लोकांची अशी अंधश्रद्धा आहे की गधीमाई देवीला बळी दिला की मनातील मनोकामना पूर्ण होतात तसेच नवसाला पावणारी ही देवी आहे. अशी लोकांची भावना असल्याने मोठ्या प्रमाणात प्राण्यांची बळी दिली जाते. महिनाभर चालणाऱ्या या उत्साहात हजारो प्राण्यांच्या कत्तली केल्या जातात. २०१९ मध्ये सुमारे लाखो म्हशी, बकऱ्या, कबुतरे इतर प्राण्यांची कत्तल करण्यात आली होती, ते पुढे म्हणाले की अंदाजे ७० टक्के प्राणी हे भारतातून सीमा ओलांडून आयात केले जातात. वाहतुकीदरम्यान त्या प्राण्यांना पुरेसे अन्न, पाणी आणि निवारा भेटत नाही. त्यांची अवैधरीत्या तस्करी केली जाते. त्या प्राण्यांना जिवंतपणीच मरणयातना दिल्या जातात.
गंगवाल म्हणाले की आता गधीमाई देवीची यात्रा सुरू आहे. देवीसाठी बळी आणि रक्त अर्पण करण्याची अंधश्रद्धा एवढी बोकळली आहे. त्यामुळे लोकांची मानसिकता बदलणे फार गरजेचे आहे. दर ५ वर्षांनी आम्ही तिकडे जात असतो. या वर्षी देखील मी आणि माझे सहकारी बिहार येथील रक्सौलला आलो आहे. तेथील लोकांशी तसेच सरकारशी बोलणी करून सदरील उत्सवात होणारी प्राणी हत्या थांबण्यासाठी आमचे अथक प्रयत्न सुरू आहेत. गधीमाई येथील निष्पाप प्राण्यांची बळी देण्याची प्रथा तबोडतोप बंद करावी. अशी मागणी शाकाहार प्रेरक डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकद्वारे केली आहे.
चंपाषष्ठी निमित्त स्वरूपा परिवारच्या वतीने १० बाय १० फूट आकारातील रेखीव सजावट पुणे : जुन्या पुण्यातील वाडा संस्कृती ते नव्या इमारतीपर्यंत यशस्वीतेचा प्रवास १० बाय १० फूट आकारातील रेखीव सजावटीतून कसबा पेठेत साकारण्यात आला आहे. शिंदे परिवार तर्फे ४४५ कसबा पेठ नवदीप मंडळ येथील श्री खंडोबा देवस्थान येथे ही सुरेख प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
चंपाषष्ठी निमित्त स्वरूपा परिवार यांचे वतीने ही प्रतिकृती व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. परिवाराचे संस्थापक तुषार शिंदे यांची संकल्पना असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव प्रमुख शिवेनदादा शिंदे, व प्रसाद कारंजकर, अभि निजामपूरकर, ओंकार कवळे, गणेश चव्हाण, श्रीनिवास सातव,विशाल दाभेकर, ज्ञानेश्वर पवार, रविंद्र शिंदे, श्रीनिवास टेमगिरे, प्रतीक भुजबळ, नितीन होले यांनी विशेष परिश्रम घेतले.
तुषार शिंदे म्हणाले, हा वाडा ८४ वर्षांपासून इथे अस्तित्वात असून खंडोबाचा उत्सव आम्ही सन २००७ पासून साजरा करतो. यंदा आमचा शिंदे परिवाराचा खंडोबाचा कृपने झालेला वाडा संस्कृती ते नव्या इमारतीपर्यंतचा यशस्वी प्रवास प्रतिकृतीच्या माध्यमातून मांडला आहे. यामध्ये वाडयातील सर्व खोल्या, चौक, जिने यापासून ते सुसज्ज इमारत हुबेहूब साकारण्यात आली आहे.
तसेच श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान, पाल (पेंबर) येथील प्रवेशद्वार व मंदिर देखील साकारण्यात आले आहे. तब्बल १५-२० दिवसांपासून आम्ही प्रतिकृतीसाठी तयारी केली. चंपाषष्ठी निमित्ताने असंख्य भाविकानी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. दिवसभरात श्रींचा अभिषेक, भजन, श्री सत्यनारायण पूजा व इतर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे : बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित ‘बालरंगभूमी संमेलन’ पुणे येथील अण्णाभाऊ साठे स्मारक, बिबवेवाडी येथे दिनांक २०, २१ व २२ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष अभिनेत्री अॅड निलम शिर्के सामंत यांनी केली. पुण्यातील नवी पेठेत पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत नीलम शिर्के-सामंत बोलत होत्या. पत्रकार परिषदेस बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष राजू तुलालवार, उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, दीपा क्षीरसागर, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकुमार जुवेकर, पुणे शाखेच्या अध्यक्ष दिपाली शेळके, कार्यकारी सदस्य दिलीप रेगे, योगेश शुक्ल, नागसेन पेंढारकर, अनंत जोशी, पुणे शाखेचे पदाधिकारी देवेंद्र भिडे उपस्थित होते.
अॅड. नीलम शिर्के-सामंत म्हणाल्या, “शिक्षण हा बालकाचा अधिकार आहे आणि कलाशिक्षण बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाची गरज आहे. बालकांच्या मनोरंजनासाठी व प्रबोधनासाठी बालरंगभूमी परिषद सातत्याने कार्यरत आहे. नृत्य, नाट्य, गायन, वादन या रंगमंचीय कलांसोबत लहान मुलांना रमवणारे बाहुल्यांचे खेळ, जादूचे खेळ, शॅडो प्ले, जगलरी, इत्यादी खेळ बालरंगभूमीच्या कक्षेत येतात. मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या रंगमंचीय कलेचा, खेळांचा.. प्रचार आणि प्रसार करण्याचे उद्दिष्ट घेऊन वाटचाल करीत असलेल्या बालरंगभूमी परिषदेचे कार्य महाराष्ट्रभर २८ शाखांच्या माध्यमातून होत आहे. या शाखांचे कार्य व बालकलावंतांना राज्यस्तरावर व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पहिल्या बालरंगभूमी संमेलनाचे आयोजन केले आहे.”
यावेळी बोलतांना त्यांनी बालरंगभूमी संमेलनाचे उद्दिष्ट या संमेलनात सादर होणारे राज्यभरातील बालकलावंत व दिव्यांग बालकलावंतांच्या कार्यक्रमाची माहिती दिली. बालरंगभूमी संमेलनाध्यक्षपदी सिने-नाट्य अभिनेते मोहन जोशी यांचे नाव निश्चित झाले असून, संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले, अभिनेते सयाजी शिंदे, अजित भुरे, अभिनेते व सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष विजय गोखले, सविता मालपेकर, सुबोध भावे यांच्यासह नाट्य व बालनाट्य क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच संमेलन समारोप व पुरस्कार सोहळा दिनांक २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असून या प्रसंगी बालरंगभूमी परिषद पुरस्कार जेष्ठ नाट्यकर्मी प्रतिभा मतकरी यांना देण्यात येणार आहे. याप्रसंगी डॉ. मोहन आगाशे, सचिन पिळगावकर, मोहन जोशी, गंगाराम गव्हाणकर, प्रियदर्शनी इंदुलकर, गणेश मतकरी, ऋजुता देशमुख व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सलील कुलकर्णी, संदीप खरे, पद्मश्री परशुराम गंगावणे, श्री उदय देशपांडे, मेघना एरंडे, शैलेश दातार यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे.
बालकलावंत मायरा वायकुळ, निलेश गोपणार, स्वरा जोशी व इतर बाल कलावंताचे सादरीकरण होणार आहे. संमेलनानिमित्त बाल कलावंतांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात विविध कलांचे, चित्ररथांचे प्रदर्शन केले जाणार आहे. बालरंगभूमी संमेलनात महाराष्ट्राभर नावाजलेले बालनाट्य, बालकलावंतांचे सर्वोत्कृष्ट असलेले लोककलेचे कार्यक्रम तसेच महाराष्ट्रातील विविध दिव्यांग संस्थांच्या बालकलावंतांचे नामांकित कार्यक्रम, गायन, वादन, नृत्य, एकपात्री, नाट्यछटा, जादूगार, बोलक्या बाहुल्यांचे खेळ, पपेट शो, नाटुकल्या, ग्रिप्स थिएटर आदी भरगच्च कार्यक्रम संमेलनात सादर होणार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने कलादालनाची निर्मिती करण्यात आली असून यात चित्र, शिल्प, रांगोळी, हस्तकला, मुखवटे आदींचे प्रदर्शन व प्रशिक्षण ठेवण्यात आलेले आहे. तसेच उपमंचावर देखील बाल कलावंतांच्या विविध एकल कलांचे सादरीकरण होणार आहे, असे नीलम शिर्के सामंत यांनी नमूद केले.
मुंबई-महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी आजच्या दिवशी शपथ न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज आमदारकीची शपथ घेतली नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत एवढा मोठ्या प्रमाणात विजय झाल्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी उत्साह असतो, जल्लोष असतो. मात्र तसे वातावरण राज्यात दिसत नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. महायुतीला मिळालेले बहुमत हे जनतेने दिलेले बहुमत आहे की, ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाने दिलेले बहुमत आहे? असा प्रश्न देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
मध्यंतरीच्या काळात काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न निवडणूक आयोगाकडे उपस्थित केले होते. राजकीय पक्ष म्हणून आम्ही जसे प्रश्न उपस्थित करतो, तसेच मारकडवाडी येथील गावकऱ्यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले होते. हे सर्व निवडणुकीच्या निकालानंतर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. विजयी झालेल्या आमदारांनी देखील हे प्रश्न उपस्थित केले असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
मरकडवाडी मध्ये जनतेने मॉकपोल मागितला होता. मात्र तो मॉकपोल घेऊ दिला नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. केवळ संचारबंदीच नाही तर तेथील काही जणांना अटक देखील करण्यात आली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आज या सर्वांचा जे निषेध करत आहेत ते विजयी झालेले आमदार आहेत. आमच्या मनात ईव्हीएम बद्दल आणि निवडणूक आयोगाबद्दल शंका आहे? तीच आम्ही व्यक्त करत असल्याचा आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. जनतेचा मान राखून जनतेच्या मनातील शंकेचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नसल्याचा आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
लोकशाहीचे दडपवण्याचे काम या आधी देखील झाले होते आणि आता देखील होत आहे. 2014 पासून हे सर्व सुरू असल्याचा आरोप आणि ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळेच मारकडवाडी येथून लाँग मार्च काढण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. हा जनतेचा, बहुमताचा कौल नसल्याचा देखील दावा त्यांनी केला. त्यामुळे या विरोधात आवाज उठवत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
विधानसभेचा निकाल आल्यानंतर या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा बसेल? असा प्रश्न सर्व सामान्यांच्या मनात निर्माण झाला होता. त्यानंतर मारकडवाडी या गावाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचे ठरवले होते. मात्र, असे होत असतानाच निवडणूक आयोग मध्ये आला असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. मला माझ्या गावांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्यात पोलिसांचा काय संबंध? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्हाला महाराष्ट्राला काय खरे आणि काय खोटे दाखवून द्यायचे आहे. गावातील लोकांनी घेतलेल्या निर्णयांवर वरवंटा फिरवण्याचे काम जर लोकशाहीत निवडून आलेले सरकार करत असेल, तर हे निवडून आलेले सरकारच नसल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. मतदानातील 13 टक्के आकडेवारी कशी वाढली? असा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.