Home Blog Page 548

बुद्धिबळ खेळाडूंनी स्पर्धा जिंकण्यासाठी नियमित सरावाबरोबरच रणनीती तयार करून स्पर्धा खेळाव्यात-प्रकाश देशपांडे

पुणे-“बुद्धिबळ हा खेळ आपल्याला विचार करायला,समस्या सोडवायला आणि रणनीती तयार करायला शिकवतो म्हणून खेळाडूंना स्पर्धा जिंकण्यासाठी नियमित सराव,अभ्यासपूर्ण चाली व आत्मविश्वास याची आवश्यकता” असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू प्रकाश देशपांडे यांनी केले.
पुण्यातील वारजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे राजे कॅसल चेस अकॅडमी व बलराज चेस अकॅडमी द्वारा आयोजित बुद्धिबळ स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी प्रशिक्षक अनिल राजे,विलास मोघे,अर्चना राजे ह्यांची मुख्य उपस्थिती होती.
एकूण ५१ खेळाडूंनी ह्या स्पर्धेत भाग घेतला.प्रमुख पाहुणे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे,वारजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चे व्यवस्थापक योगेश चव्हाण यांचे हस्ते विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.स्पर्धा यशस्वितेसाठी राजे कॅसल चेस अकॅडमीच्या मुख्य अर्चना राजे,मुख्य प्रशिक्षक अनिल दत्त राजे,मुख्य स्पर्धा संचालक विलास मोघे (बलराज चेस अकॅडमी),स्पर्धा संचालक रेनुक पावडे, निलाक्षी पावडे,आश्विन राजे यांनी प्रयत्न केले.अभिजित कुंटे यांनी सर्व खेळाडूंशी प्रत्यक्ष संवाद साधला व सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले.सहा फेऱ्यांमध्ये झालेल्या ह्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये medalist व नॉन medalist असे दोन विभागात खेळाडूंचे वर्गीकरण करण्यात आले होते.medalist गटामध्ये राघव पावडे हा पाच गुण मिळवून प्रथम आला.तर नॉन medalist विभागात वैदिक भावसार प्रथम आला.


विजेत्यांची नावे
Medalist ग्रुप
५ गुण
राघव पावडे विजेता (प्रथम क्रमांक)
४ गुण
विहान आढाव
उपविजेता (द्वितीय क्रमांक)
चतुर्थी परदेशी तृतीय,
३.५ गुण
ओवी पावडे, चतुर्थ
३ गुण
विहान शाह पाचवा
,श्रेयस सरदेशमुख, पार्थ दिवाण,आयुष सर्जेराव,शौनक पाठक,वेदिष साधले.
२.५ गुण
विराट दोडके,
२ गुण
लाभ वर्मा, जुई कुलकर्णी,नचिकेत कुलकर्णी,स्वयं मेटी,स्वरा दोडके
१ गुण
अमर्त्य कुबल,मिहिर दाभाडकर,श्रावणी रघुवंशी
……………………………………non medalists
५ गुण
वैदिक भावसार विजेता( प्रथम क्रमांक)
रियांश चतुर्वेदी द्वितीय क्रमांक
,राजवीर नगराळे तृतीय क्रमांक
श्लोक देकाते,चतुर्थ क्रमांक
४ गुण
अबीर सुद पाचवा क्रमांक

,श्रावणी राजूरकर,ओजस्वी जोशी,
अन्वेश आढाव,अनुप झांबरे,विवान कुलकर्णी.
३.५ गुण
अभिराज शर्मा, रुद्रांश चोर्घे
३ गुण
अनया तरफदार, युवान दास, सोहम राजूरकर,वेध तांबिटकर, तेजस दफ्तरदार, सयुंक्त राजपूत,
२.५ गुण
आरव तरफदार,विराज क्षत्रिय,आरूष सप्रे, रुद्रो राघव, पार्थ गावकर,रूद्र साहू
२ गुण
प्रभास भवर,अविनाश बेंडाळे,रूद्र सर्जेराव
१.५ गुण
कुमार अयांश,अक्षय प्रभुणे,इदिका गुळवे,दियारा वाणी
अर्जुन कुर्डूकर
……..…………………………..

नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकांमधील कवितांवर आधारित ‌‘मन का गीत‌’ कार्यक्रम शनिवारी

गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून होणार सादरीकरण
संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद, पुणेचा संयुक्त उपक्रम
पुण्यात शुभारंभ : राज्यासह दिल्लीतही होणार कार्यक्रम

पुणे : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‌‘आँख ये धन्य है‌’ आणि ‌‘साक्षी भाव‌’ या पुस्तकांमधील कवितांवर आधारित ‌‘मन का गीत‌’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून सादर होणारा हा कार्यक्रम शनिवार, दि. 14 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे निलेश कोंढाळकर आणि संवाद, पुणेचे सुनील महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
‌‘मन का गीत‌’ हा विशेष कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. ‌‘मन का गीत‌’ या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती सुनील महाजन यांची असून संहिता लेखन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य यांचे तर दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेते योगश सोमण यांचे आहे. नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले असून डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीत संयोजनाची बाजू सांभाळली आहे.
पुस्तकातील निवडक कविता व गीतांचे अभिवाचन सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जमेनिस आणि अक्षय वाटवे करणार आहेत. शिल्पा दातार, शर्वरी ओतरी, श्रुतिका अत्रे, अदिती देवधर, ईश्वरी बापट, प्राजक्ता सांभू, अंतरा बोरगावकर विविध रचनांवर नृत्यविष्कार सादर करणार आहेत. निकिता मोघे यांचे नृत्य दिग्दर्शन आहे. महेश लिमये (दृकश्राव्य), अक्षर वडके (प्रकाश योजना), अमन वरखेडकर (की बोर्ड) तांत्रिक बाजू सांभाळणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी करणार असून संयोजन केतकी महाजन-बोरकर करणार आहेत.
या कार्यक्रमादरम्यान मा. नरेंद्र मोदी यांच्या जयश्री जोशी यांनी अनुवादित केलेल्या आणि उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मराठी कवितांच्या ‌‘नयन हे धन्य हे‌’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी मंत्री, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती निलेश कोंढाळकर आणि सुनील महाजन यांनी दिली.

राजकीय व्यक्ती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वांना ओळख आहे. मात्र कवी, साहित्यिक म्हणून पंतप्रधान मोदी हे ‌‘मन का गीत‌’ या कार्यक्रमाद्वारे प्रथमच समोर येणार आहे. शनिवारी होणारा पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग असून राज्यात विविध ठिकाणी तसेच दिल्लीतही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
मुरलीधर मोहोळ
केंद्रीय राज्यमंत्री, सहकार आणि नागरी विमान वाहतूक

‌‘पुरुषोत्तम‌’ची महाअंतिम फेरी 27 ते 29 डिसेंबर दरम्यान

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी शुक्रवार, दि. 27 डिसेंबर ते रविवार, दि. 29 डिसेंबर 2024 या कालावधीत पुण्यात होणार आहे. पुण्यासह अमरावती, रत्नागिरी, संभाजीनगर आणि कोल्हापूर विभागातील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि सर्वोकृष्ट प्रायोगिक अशा प्रत्यकी चार एकांकिकांचे सादरीकरण होणार असून यातून महाअंतिम फेरीतील विजेता ठरणार आहे.
महाअंतिम फेरी भरत नाट्य मंदिर येथे पाच सत्रात होणार आहे. दि. 27 आणि दि. 28 रोजी सकाळी 9 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 9 आणि दि. 29 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळात स्पर्धा होणार आहे. पारितोषिक वितरण सभारंभ दि. 29 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

महाअंतिम फेरीत पोहोचलेले संघ :
पुणे विभाग : म. ए. सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय (बस नं. 1532), विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती (पाटी), न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर (देखावा), म. ए. सो.चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर कोर्सेस (सखा).

अमरावती विभाग : श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला (तमसो मा ज्योतिर्गमय), श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती (डेडलाईन), सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती (बट बिफोर लिव्ह), प्रादेशिक कला विभाग -1 (सं. गा. बा. अ. वि.), अमरावती (उत्खनन),

रत्नागिरी विभाग : आठल्य, सप्रे, पित्रे महाविद्यालय, देवरुख (हिरो नंबर 1), सिद्धयोग विधी महाविद्यालय, खेड (समाप्त), फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी (होळयो नागरा), संत राऊळ महाराजा महाविद्यालय, कुडाळ (ऑफलाईन),

कोल्हापूर विभाग : शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर (कलम 375), राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय, इस्लामपूर (व्हाय नॉट?), डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पिंडग्रान), देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर (यात्रा)

संभाजीनगर : (संभाजीनगर विभागाची स्पर्धा दि. 15 ते 17 डिसेंबर या कालावधीत होत असून त्यातून निवडलेले चार संघ महाअंतिम फेरीत सादरीकरण करणार आहेत.)

: स्पर्धेची तिकीटविक्री ऑनलाईनही :

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली असून ऑनलाईन तिकीट विक्रीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी तसेच नाट्य रसिकांना तिकिट खिडकीद्वारे आपले तिकीट सुनिश्चित करता येणार आहे. सिझन तिकीट 500/- रुपये असून दैनंदिन (एका सत्रासाठी) तिकीट 150/- रुपये आहे.

विद्यार्थीनींना स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन-माजी आमदार मोहन जोशी

पुणे – काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात सुंदरबाई मराठी विद्यालयात मुलींसाठी मार्शल आर्ट स्वसंरक्षण शिबीर आज सोमवारी आयोजित करण्यात आले होते. त्यात ४५० विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.

या शिबीरात दाई-ईची मार्शल आर्ट अकादमीच्या वतीने कराटे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रसंगी सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाचे आयोजक, माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, शिबीराचे संयोजक, विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस संकेत गलांडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी, शिक्षक सुनील वळसे, योगेश साकोरे, प्रतिक झुरूंगे, अमित कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

बदलापूर येथील घटनेमुळे महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. राज्यातील लाडकी बहिण सुरक्षित करणे महत्त्वाचे झाले. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून कराटे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले, असे मोहन जोशी यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.

हल्ली शिक्षण, नोकरी, व्यवसाय आदी निमित्ताने समाजात वावरताना विद्यार्थीनीना, युवतींना बराच काळ घराबाहेर वावरावे लागते, वावरताना काहीवेळा त्यांना अपप्रवृत्तींचा सामना करावा लागतो. अशावेळी स्वसंरक्षणासाठी, स्वतःच्या बचावासाठी त्यांना कराटे किंवा तत्सम प्रशिक्षण उपयोगी ठरते. त्या भूमिकेतून मार्शल आर्ट प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला, असेही मोहन जोशी यांनी सांगितले.

महापालिकेची कार्यालये, शाळांमध्ये ‘शांतता…पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम जल्लोषात होणार – आयुक्त राजेंद्र भोसले

पुणे पुस्तक महोत्सवात महापालिकेचा सक्रिय सहभाग; सर्व विभागांद्वारे आवश्यक सोयी- सुविधा देणार; पुणेकरांनी मोठ्या संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन

पुणे, ०९ डिसेंबर: पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या बुधवारी ११ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या कालावधीत पुणेकरांसाठी होणाऱ्या ‘शांतता… पुणेकर वाचत आहे’ या उपक्रमात पुणे महापालिकेने सक्रिय सहभाग घेतला असून, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सेवक वाचन चळवळीत सहभागी होणार आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये महापालिकेचे प्रशासन आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येईल, अशी माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, त्या अनुषंगाने विविध सार्वजनिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे हा महोत्सव पुणेकरांचा असल्याने पुणेकर नागरिक मोठ्या प्रमाणावर या महोत्सवातत सहभागी होणार आहे. त्यांचा सहभाग अधिक वाढावा यासाठी उद्या बुधवारी ११ डिसेंबरला ‘ शांतता…पुणेकर वाचत आहे’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात पुणे महापालिकेचे प्रशासन सक्रिय सहभाग होणार असून, पालिकेचे अधिकारी कर्मचारी आपल्या आवडीचे पुस्तक वाचून वाचन चळवळ बळकट करण्यासाठी योगदान देणार आहेत.

या उपक्रमाच्या निमित्ताने पुणे महापालिकेच्या सभागृहात अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी वाचनाचे महत्त्व पटविणाऱ्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात येईल. त्याचप्रमाणे पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आणि महापालिकेच्या २७२ शाळांमध्ये हा उपक्रम उत्साहात साजरा होणार आहे. या उपक्रमात प्राथमिक विभागाचे ६६ हजार, तर माध्यमिक विभागाचे १६ हजार विद्यार्थी, तसेच शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या उपक्रमाद्वारे पुणे शहराला ‘ वाचन संस्कृती जपणारे शहर ‘ अशी नवी ओळख देण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.

हा उपक्रम विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, सार्वजनिक वाचनालय, ग्रंथालये, पुणे विमानतळ, मेट्रो स्टेशन, पीएमपीएमएल बसस्थानक, रिक्षा थांब्यांवरही होणार आहे. अशा ठिकाणी पुणे महापालिकेच्या वतीने आवश्यक सोयी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या उपक्रमात पुणेकरांनी उत्साहाने सहभागी होण्यासाठी साधारण ८ लाख नागरिकांच्या मोबाईलवर सहभागी होण्याबाबत संदेश पाठवण्यात येईल. त्याचप्रमाणे ३ लाख लोकांना ई-मेल पाठविण्यात येत आहे. पुणे पुस्तक महोत्सव आठ दिवस सुरू राहणार असून, त्यामध्ये हजारो नागरिक दरदिवशी येणार आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये महोत्सवासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा पुणे महापालिका प्रशासन पुरविणार आहे. त्यासाठी सर्व विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहे, अशी माहिती भोसले यांनी दिली आहे.

पुणे पुस्तक महोत्सवात १५ ते १९ डिसेंबर या कालावधीत मुलांसाठी चिल्ड्रेन फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये महापालिकेच्या २७२ शाळांचा सक्रिय सहभाग असणार आहेत. या निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक चित्रपटांचा आनंद घेता येईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली.

या उपक्रमात महापालिकेचा सक्रिय सहभाग
११ डिसेंबरला – शांतता… पुणेकर वाचत आहेत
१२ डिसेंबरला – संविधान शब्दाचा गिनीज बुक रेकॉर्ड
१३ डिसेंबरला – सरस्वती : गिनीज बुक रेकॉर्ड
१४ डिसेंबरला – ग्रंथदिंडी
१४ डिसेंबरला- पुणे पुस्तक महोत्सव उद्घाटन कार्यक्रम
२० ते २२ डिसेंबर – लिट फेस्टीव्हल

पुणे पुस्तक महोत्सवात उद्या शनिवारी ११ डिसेंबरला ‘शांतता…पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम दुपारी १२ ते १ या कालावधीत होईल. या कालावधीत आपल्याला आवडीचे किंवा जवळ असलेले पुस्तक वाचायचे आहे. पुस्तक वाचन करतानाचे छायाचित्र काढून ते pbf24.in/register या लिंकवर पाठवावे, असे आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

लाडकी बहीण योजनेबद्दल नव्याने छाननी नाही -आदिती तटकरेंकडून महिलांना दिलासा

मुंबई : लाडकी बहीण योजनेबद्दल आदिती तटकरे यांनी म्हटले की, लाभार्थी महिलांच्या अर्जाची योग्य छाननी करण्यात आलीये. आता नव्याने कोणत्याही प्रकारची छाननी सरकारकडून करण्यात येणार नाहीये. नव्याने छाननी करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतला नाहीये.लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जाची पुन्हा छाननी होणार असल्याची चर्चा होती. ज्या अर्जांबद्दल तक्रारी आल्या, त्याची छाननी होणार. लाभार्थी नियमानुसार आहेत की नाही याची छाननी होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, अशाप्रकारच्या छाननीचा निर्णय सरकारकडून करण्यात आला नाहीये.पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांना 2100 रुपयांचा लाभ देण्याचे महायुतीने कबूल केलेले आहे. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची घोषणा करणार असल्याचे देखील तटकरे यांनी सांगितले आहे. सध्या ज्या महिलांना लाभ मिळत आहे, तो पढील अर्थसंकल्पापर्यंत तसाच मिळत राहणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणून सरसकट सर्वांना १५०० रुपये महिना देण्यात आले. तेव्हा निवडणुका होत्या मते हवी होती म्हणून सरसकट सर्वांना पात्र मानून पैसे दिले गेले. आणि आता बहुमत मिळाल्यावर मात्र अर्जांची छाननी करून लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा सरकार प्रयत्न करणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्यात. मात्र अशा प्रकारची कोणतीही छाननी आता होणार नाही . मात्र कोणी कोणाबद्दल तक्रार केली तर तेवढ्यापुरती संबाधीता बद्दलच छाननी होऊ शकते .मात्र अद्याप यावरही सरकारने काही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

योजनेचा फायदा महायुती सरकारला झाल्याचे सांगितले जाते. हेच नाहीतर निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींचे आभारही मानले. आता लाडकी बहीण योजनेवरून मोठे राजकारण रंगताना दिसतंय. संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केलीये. संजय राऊत म्हणाले की, निवडणुकीच्या अगोदर कोणतीही शहानिशा न करता पंधराशे रूपयांचा व्यवहार मतांसाठी झाला. आणि पंधराशे रूपयांमध्ये बहिणींची मते विकत घेण्याचा प्रयत्न झाला. आणि आता मात्र शहानिशा करायची म्हणतात .

” शांतता पुणेकर वाचत आहेत ” ह्या उपक्रमात सहभागी व्हा – दीपक मानकर,धीरज घाटे,नाना भानगिरे,संदीप खर्डेकर यांचे आवाहन

“एक तास, वाचन ध्यास”

पुणे-
“चला वाचूया, पुण्याला नवी ओळख देऊया” हा अभिनव उपक्रम 11 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 1 ह्या वेळेत होणार असून आम्ही यात आमच्या कुटुंबीय, मित्र परिवार व कार्यकर्त्यांसह सहभागी होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष दीपक मानकर,भाजपा चे शहराध्यक्ष धीरज घाटे,शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद तथा नाना भानगिरे, आर पी आय चे शहर अध्यक्ष संजय सोनावणे व भाजपा चे राज्य प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले आहे.
‘”शांतता …. पुणेकर वाचत आहेत” ह्या उपक्रमासाठी विविध सामाजिक संस्था संघटना , ज्ञाती संस्था, राजकीय पक्ष व विविध क्षेत्रातील सामान्य पुणेकरांशी संपर्क साधत असून सर्वांनीच ह्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविण्याचे मान्य केल्याचे पुस्तक महोत्सवातील ह्या उपक्रमासाठीच्या समितीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
११ डिसेंबर दुपारी १२ ते १ ह्या वेळेत पुणेकरांनी आपल्या आवडत्या पुस्तकाचे वाचन करावे .
व त्याचा फोटो किंवा व्हिडिओ काढून सोबतचा QR कोड स्कॅन करून किंवा pbf24.in/register वर तो फोटो पाठवावा असे आवाहन ही दीपक मानकर,धीरज घाटे,प्रमोद तथा नाना भानगिरे व संजय सोनावणे यांनी केले आहे.
तसेच सोशल मीडियावर #पुणेपुस्तकमहोत्सव हॅशटॅगसह पोस्ट केल्यास सहभागाबद्दल प्रमाणपत्र मिळणार असल्याचे ह्या महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी स्पष्ट केले आहे.
हा कोणत्याही राजकीय पक्षाचा विषय नसून यातसर्वांनी सहभागी व्हावे आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी १४ ते २२ डिसेंबर २०२४ पुणे पुस्तक महोत्सवाला ही भेट द्यावी असे आवाहन देखील दीपकभाऊ मानकर, धीरज घाटे,प्रमोद भानगिरे, संजय सोनावणे व संदीप खर्डेकर यांनी केले आहे.

‘भारत तोडो’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीयत्व बळकट करण्याची गरज-अविनाश धर्माधिकारी

पुणे, ९ डिसेंबर
एकसंध राष्ट्रीयत्व ही भारताची खरी ताकद आहे. वेगवेगळ्या मार्गांनी भारत तोडण्याचे प्रयत्न सुरू असले तरी आपले राष्ट्रीयत्व बळकट करू या. कारण जगाला सुख, शांती, समाधान देण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.

कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेत धर्माधिकारी बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठाचे माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्याख्यानमालेचे यंदा तिसरे वर्ष होते.

‘भारत तोडो षडयंत्र’ या विषयावर मार्गदर्शन करताना धर्माधिकारी म्हणाले, भारताचा सनातन विचार हाच जगातील सर्वात सहिष्णु विचार आहे. हा सर्व जगाला जोडणारा विचार आहे. विश्वालाच कुटुंब मानणे ही भारताची संकल्पना आहे. भारत एकसंध राहू नये म्हणून परकीय शक्ती आणि त्यांना मदत करणाऱ्या भारतातील शक्ती भारत तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉ. करमळकर म्हणाले, भारत तोडण्याचे जे कारस्थान सुरू आहे, ते समजून घेणे, त्याची माहिती घेणे आवश्यक आहे.

व्याख्यानमालेचे द्वितीय सत्र प्रसिद्ध निरूपणकार, लेखक विवेक घळसासी यांनी गुंफले. ‘भारताच्या वैभवाचा आधार – माझं घर माझा परिवार’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि कायदेतज्ज्ञ डी. डी. शहा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. घळसासी म्हणाले, आपल्या देशाला आपल्याला परमवैभवाला न्यायचे आहे आणि हे काम इतरांनी नाही तर मला माझ्यापासून, माझ्या घरापासून करायचे आहे. देशाला परमवैभवाला नेणे ही माझी जबाबदारी आहे, हे प्रत्येकाला लक्षात ठेवावे लागेल.

स्वतः विषयीचा आत्मविश्वास, कृतज्ञता, सर्वसमावेशकता, सहभागीता, संयम, श्रमप्रतिष्ठा, उत्तम अभिव्यक्ती, अनुशासन, त्याग, तपस्या ही तत्त्व आपल्याला अंगी बाणवावी लागतील. मुळात उत्तम माणूस घडला तर देश उभा राहील. हा माणूस घरात म्हणजेच कुटुंबात संस्कारातून घडेल. म्हणून माझं घर – माझा परिवार हा वैभवशाली भारताचा आधार आहे, असेही घळसासी यांनी सांगितले. व्याख्यानमालांसारख्या कार्यक्रमांची समाजाला गरज आहे. म्हणून असे कार्यक्रम सातत्याने करत राहणे आवश्यक आहे, असे मृणाल कुलकर्णी म्हणाल्या.

संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी सत्कार आणि स्वागत तर नागेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

पुणे पुस्तक महोत्सव विश्वविख्यात होईल – आमदार चंद्रकांतदादा पाटील

महोत्सवाच्या तयारीच्या दृष्टीने आयोजित केलेली अभ्यासक, तज्ज्ञ, प्राध्यापक, साहित्यिक, लेखक, कवी, कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात संपन्न

पुणे; ०८ डिसेंबर : ‘लेखन, वाचन, चिंतन, संशोधन ही समाजाला सकारात्मक करणारी क्षेत्रे आहेत. पुणे या क्षेत्रांची प्रयोगशाळा असून, संपूर्ण जग या शहराचे अनुकरण करते. पुण्याचा गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे, तसा यंदाचा पुणे पुस्तक महोत्सवही विश्वविख्यात होईल,’ असा विश्वास राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी व्यक्त केला.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणावर ‘पुणे पुस्तक महोत्सव’ रंगणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनाची व्यापक बैठक रविवारी सायंकाळी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अ‍ॅम्फी थिएटर येथे पार पडली. या प्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, अभिनेते-लेखक प्रवीण तरडे, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, ‘एनबीटी’चे सहायक संचालक (प्रदर्शन) मयांक सुरोलिया, संयोजन समितीचे सदस्य बागेश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणवीस, प्रा. संजय चाकणे, डॉ. आनंद काटीकर आदी उपस्तित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘गत वर्षीच्या तुलनेत यंदाचा ‘पुणे पुस्तक महोत्सव’ चौपट मोठा होणार असून, त्याद्वारे पुस्तक प्रदर्शनांच्या जगतात नवा विश्वविक्रम प्रस्थापित होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, त्यांनी नागपूर येथेही अशाच पुस्तक महोत्सवाच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवाचे अनुकरण सर्व शहरांना करावेसे वाटत आहे,’ असे समाधानही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, ‘यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बाराशे महाविद्यालय-संस्थांमधील साडेसात लाख विद्यार्थी सक्रिय सहभागी होणार आहेत. या महोत्सवातून होणारी पुस्तक विक्री, तसेच ‘शांतता पुणेकर वाचत आहेत,’ या उपक्रमातून कोणत्या वयोगटाचे वाचक काय वाचतात, त्यांची आवड-निवड काय, त्यातून वाचन संस्कृती कशी जोपासली जाते, याचा महत्त्वपूर्ण ‘डेटा’ उपलब्ध होईल.’

डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले, ‘‘पुणे पुस्तक महोत्सव’ ही एक वाचन चळवळ असून, त्यातून नवा पायंडा पाडण्याची संधी पुण्याला आहे. ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’ नंतर ‘पुणे पुस्तक महोत्सवा’कडे साहित्य संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने पाहिले जात असून, लवकरच हा देशातील पहिल्या क्रमांकाचा पुस्तक महोत्सव होईल.’

प्रवीण तरडे म्हणाले, “पुणे पुस्तक महोत्सव’ हा पुण्याच्या मूळ संस्कृतीशी जोडलेली नाळ असून, सारस्वतांच्या पंढरीची नामदेवांची पायरी आहे. पुस्तकांच्या या कुंभमेळ्यात पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या पुणेकरांनी साहित्य स्नान करावे. त्यातून पुणेकर हे साहित्यप्रेमी असल्याची हरवलेली ओळख पुन:प्रस्थापित होईल.’

राजेश पांडे म्हणाले, “पुणे पुस्तक महोत्सव’ हा पुणेकरांचा महोत्सव असून, त्यामध्ये प्रत्येकाने सहभाग नोंदवून संघशक्तीच्या जोरावर ही वाचन चळवळ यशस्वी करावी. ‘पुणे पुस्तक महोत्सवा’च्या भव्य प्रवेशद्वाराचे येत्या १० डिसेंबरला मान्यवरांच्या हस्ते अनावरण केले जाणार आहे, तसेच येत्या ११ डिसेंबरला ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम होणार असून, त्यामध्ये प्रत्येकाने दहा पुणेकर वाचकांना जमवून पुस्तकांचे वाचन करावे. शहराचे प्रमुख चौक, महाविद्यालये-शाळा, महापालिकेसह शासकीय कार्यालय, मेट्रो या ठिकाणी हा उपक्रम करून अधिकाधिक वाचकांना पुस्तकांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली.

बागेश्री मंठाळकर यांनी महोत्सवाच्या नियोजनासाठी निर्माण केलेली खाती व खातेप्रमुखांची माहिती दिली. ‘हा महोत्सव जगन्नाथाचा रथ असून, शेकडो कार्यकर्त्यांच्या जोरावर तो यशस्वी होईल,’ असे त्या म्हणाल्या.

डॉ. आनंद काटीकर यांनी सूत्रसंचालन केले. ‘काव्य-शास्त्र-विनोदाने परिपूर्ण अशा या महोत्सवात सर्व पुणेकरांनी सक्रिय सहभाग घ्यावा,’ असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप झाला.

“ये काली काली आंखें SRK यांच्या बिनधास्त भूमिकांना एक ट्रिब्यूट आहे” – ताहिर राज भसीन

अभिनेता ताहिर राज भसीन स्वत:ला सुपरस्टार शाहरुख खान यांचा मोठा चाहता मानतो . त्यांच्या वेब सीरिज ये काली काली आंखें (YKKA) चे नाव SRK यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट बाजीगर मधील गाजलेल्या गाण्यावरून घेतले आहे. हा एक योगायोग आहे की या शोचे नाव SRK च्या आयकॉनिक चित्रपटाच्या गाण्याशी जोडले गेले आहे.

ताहिर राज भसीन म्हणतात, “शाहरुख खान यांनी बाजीगर आणि कभी हां कभी ना मध्ये साकारलेल्या भूमिकांचे महत्त्व फक्त अभिनयापुरते मर्यादित नव्हते; त्या भूमिकांनी एंटी-हीरोच्या जटिलतेचा आदर्श प्रस्तुत केला. SRK यांचा कट्टर चाहता म्हणून, मी नेहमीच त्यांना केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर एका अशा बाहेरून येऊन आपली क्षमता आणि मेहनतीच्या जोरावर यशस्वी झालेल्या व्यक्तीच्या रूपात पाहिले आहे. त्यांचा प्रवास नेहमीच माझ्यासाठी प्रेरणा आणि धैर्याचा स्रोत राहिला आहे, जो दाखवतो की कोणतेही स्वप्न मोठे नाही आणि कोणताही प्रवास कठीण नाही. ये काली काली आंखें आपल्या धाडसी कथानक, जबरदस्त थरार आणि प्रखर ऊर्जेसह SRK यांनी बाजीगर आणि डर सारख्या भूमिकांमध्ये दिलेल्या बिनधास्त आत्म्याला सलाम करते.”

ते पुढे म्हणाले, “SRK यांनी साकारलेले गंभीर, संघर्षमय आणि द्विधा मनस्थितीत असलेले एंटी-हीरोचे पात्र केवळ मला नव्हे तर एक संपूर्ण पिढीच्या कथा सांगणाऱ्यांनाही प्रभावित केले आहे. ये काली काली आंखें मधील माझा विक्रांतचा पात्र हा 90 च्या दशकातील त्या नायकाला एक श्रद्धांजली आहे – जो सतत एका काठावर उभा असतो, जिथे चांगल्या आणि वाईट यामधील रेषा धूसर असतात. विक्रांतचे पात्र SRK च्या आयकॉनिक एंटी-हीरोजवर आधारित आहे, ज्यांनी आपल्याला विचार करायला, सहानुभूती दाखवायला आणि कधी कधी डार्क साइडसाठी चीयर करायला भाग पाडले. पात्राची गुंतागुंती, त्याचा संघर्ष, त्याची आवड आणि त्याचे धाडस – हे सर्व त्या बिनधास्त ऊर्जेला दर्शवते, जी SRK यांनी त्यांच्या आयकॉनिक भूमिकांमध्ये दिली. शोमध्ये विक्रांतची प्रवास ही त्याच धाडस, गडदपणा आणि अस्पष्टतेचे प्रतिनिधित्व करते, जी SRK यांनी त्यांच्या भूमिकांमध्ये प्रकट केली होती.”

ये काली काली आंखें चा दुसरा सीझन क्राईम, प्रेम, वेड आणि खून यांच्या रोमहर्षक मिश्रणाने प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. हा शो आपल्या पात्रांच्या जटिलतेमध्ये अधिक खोल जातो आणि गडद विषयांना एका प्रखर उर्जेसह सादर करतो. क्राईम थ्रिलर शैलीतील हा शो प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देतो, जो त्यांना प्रत्येक क्षणी जागेवर खिळवून ठेवतो.

फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर:राहुल नार्वेकर एकमताने अध्यक्षपदी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला असून तो आवाजी मताने मंजूर करण्यात आला. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून, त्यामुळे या ठरावावर कोणताच विरोध होण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे उदय सामंत यांनी मांडलेला विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला.
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी 105 आमदारांनी शपथ घेतली. अनेक आमदारांनी 7 डिसेंबरला ईव्हीएमच्या मुद्द्यावर शपथ घेण्यास नकार देत सभागृहातून वॉकआउट केले होते, त्यानंतर शपथविधी थांबवण्यात आला होता. आजही काही सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर लगेचच अध्यक्षांची निवड करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे भाजप आमदार राहुल नार्वेकर हे पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत.

भाजपा युतीला ‘लाडकी बहीण’ची गरज संपली; सरकार आता ‘लाडका भाऊ’साठी काम करणार: नाना पटोले

विरोधी पक्षनेतेपदासाठी सदस्यसंख्येची अडचण नाही, विरोधी पक्षनेतेपद व उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्यावे.

सत्तापक्ष मतदारांच्या मतांची थट्टा करतो, जनभावना पायदळी तुडवणे ही सत्तेची मस्ती.

मुंबई, दि. ९ डिसेंबर २०२४
‘लाडकी बहीण’मुळेच पुन्हा सत्तेत आलो असे भाजपा युतीचे नेते सांगत आहेत पण आता निवडणुका संपल्याने लाडक्या बहिणीची महायुतीला गरज राहिलेली नाही. लाडकी बहीणचा विषय आता संपला आहे. सरकारचा शपथविधी होताच दोन दिवसात एका ‘लाडक्या भावाला’ एक हजार कोटी रुपयांची संपत्ती परत मिळाली आहे. ही तर सुरुवात असून ‘आगे आगे देखो होता है क्या? म्हणत महाराष्ट्रात सत्तेत आलेले भाजपा युतीचे सरकार हे ‘लाडक्या भावा’ साठी काम करणारे सरकार आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
विधिंमडळ परिसरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भाजपा युतीला पाशवी बहुमत मिळाले आहे त्यामुळे त्यांची मस्ती दिसत आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर अभिनंदनाचा ठराव मांडला असता त्यावरच चर्चा होणे अपेक्षित होते पण सत्ताधारी पक्षातील सदस्य मतदारांची थट्टा करत होते. मारकवाडीप्रमाणे इतर गावातही ग्रामसभा ठराव करत आहेत. मतदार हा राजा आहे, त्याला मताचा अधिकार असून आपले मत कुठे गेले हे जनता विचारत आहे. मारकडवाडीतील लोक मॉक पोलिंग करणार होते तो अधिकार गावकऱ्यांना आहे, तो कोणीही हिरावू शकत नाही. मारकडवाडीच्या मुद्द्यावर सभागृहातही चर्चा झाली पाहिजे पण सत्तापक्ष मतदारांच्या मतांची थट्टा करते, जनभावना ओळखत नाही ही सत्तेची मस्ती आहे.

विरोधी पक्षनेतेपदासाठी सदस्य संख्येची अडचण नाही…

महाराष्ट्र विधिमंडळाला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. अनेकदा काँग्रेसकडे मोठे बहुमत असतानाही त्यावेळी विरोधी पक्षांची सदस्य संख्या न पहाता विरोधी पक्षनेते पद दिले होते. हीच परंपरा लक्षात घेऊन विधान सभेचा विरोधीपक्ष नेता व विधानसभेचा उपाध्यक्ष विरोधी पक्षांचा असावा अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत मांडली आहे. सरकारही सकारात्मक असून नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता होईल अशी अपेक्षा आहे असे नाना पटोले म्हणाले.

कर्नाटक मुद्दा..
कर्नाटकात भाजपाचे सरकार असताना बेळगावात मराठी भाषिकांवर अत्याचार करण्यात आले होते, त्यावेळी भाजपा गप्प बसले होते आणि आता ते का बोलत आहेत. केंद्रात सरकार भाजपाचे आहे त्यांनी काही निर्णय घ्यावा. भाजपा हा धर्माच्या नावावर भाजपा मते मागून राजकारण करत आहेत असेही नाना पटोले म्हणाले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु नाथा ताम्हाणे व त्यांचे दोन सहकारी यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धेत मिळवले यश .

पुणे-वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु नाथा ताम्हाणे व त्यांचे साताऱ्यातील दोन सहकारी यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धेत यश मिळवून पदक प्राप्त केले आहे.

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, बस्लटन येथे १डिसेंबर रोजी Ironman ही स्पर्धाvc आयोजित केली होती.सदर स्पर्धेत जगभरातून 1700 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 1100 स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. त्यामध्ये पुण्यातील जवळपास 14 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पुण्यामध्ये यापूर्वी कार्यरत असलेले व सध्या ठाणे आयुक्तालय मधिल उल्हासनगर चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु नाथा ताम्हाने वय 56 वर्ष यानी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर त्यांचा मुलगा गौरंग ताम्हणे वय 18 वर्ष तसेच त्यांचे सहकारी विजय अनपट (CA) व संदीप पाचपुते यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला होता. सदर स्पर्धे दरम्यान थंडी ऊन, वारा,पाऊस यामुळे मुलगा गौरांग तामाने या सदरची स्पर्धा अर्धवट सोडावी लागली.
विष्णू ताम्हणे, विजय अनपट, संदीप पाचुपुते यांनी यापूर्वी अनेक अर्ध मॅरेथॉन व पूर्ण मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतलेला आहे.
विष्णू ताम्हणे यांनी ही स्पर्धा पूर्ण करणे म्हणजे माझी एकट्याची वैयक्तिक कामगिरी नसून माझे सहकारी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी माझी कोचेस, कुटुंब अशा सर्वांची मिळून सांघिक कामगिरी आहे. त्याचप्रमाणे सदरची कामगिरी संपूर्ण पोलीस दलासाठी गौरवशाली बाब आहे अशा प्रकारे आपल्या विजया बद्दलच्या भावना व्यक्त केल्या. आयर्न मॅन स्पर्धेत 3.8 किमी जलतरण, 180 किमी सायकलिंग, आणि 42.2 किमी धावणे हे सलग 17 तासामध्ये पूर्ण करणे आवश्यक असते. ते करत असताना स्पर्धकाच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कस लागतो. या स्पर्धेचे ध्येय वाक्य ” एवरीथिंग इज पॉसिबल” हे आहे. त्या अर्थाने स्पर्धक हा कोणत्याही वयामध्ये ही कामगिरी करू शकतो. यामधूनच प्रेरणा घेऊन विष्णू ताम्हणे यांनी वयाच्या 56 व्या वर्षी त्यांचे सहकारी विजय अनपट यांच्या मदतीने पार पाडून समाजातील नागरिकांना व मुलांना तसेच पोलीस दलातील अधिकारी अंमलदार यांच्यासाठी प्रेरणा दिली आहे. विष्णू ताम्हणे हे आसूं ता फलटन येथिल रहनारे आहेत. तसेच त्यांचे सहकारी विजय अनपट हे अनपटवाडी तालुका वाई येथील आहेत. त्याचप्रमाणे संदीप पाचपुते हे कराड येथील आहेत. या तिघांची कामगिरी त्यांच्या गावासाठी, जिल्ह्यासाठी व पोलीस दलासाठी अभिमानासपद ठरत आहे.

ताम्हाणे यांनी यापूर्वी नागरिक व पोलीस मध्ये शारीरिक तंदुरुस्ती साठी पुणे येथे असतानापोलीस दला मध्ये मॅरेथॉन सारख्या स्पर्धा चे आयोजन केले होते त्याच प्रमाणे त्यांनी पोलीसचे तंदुरुस्ती साठी मुंढवा व समर्थ पोलीस स्टेशन ला सायकल पेट्रोलिंग सुरू केले .विष्णू ताम्हणे व विजय अनपट यांना सदर स्पर्धेत स्विमिंग कामी संजीवन वालावलकर, रनिंग व सायकलिंग साठी चैतन्य वेल्हाळ, स्ट्रेंथ ट्रेनिंग साठी विजय गायकवाड यांनी मार्गदर्शन केले आहे.

IRONMAN स्पर्धेत सहभागी होणेसाठी ताम्हाणे यांना सतत प्रोत्साहन देणारे व सहकार्य करणारे तसेच स्पर्धेत सहभागी होनेसाठी परवानगी देणारे ठाणे शहर चे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे व त्यांचे सहकारी यांचे देखील या कामगिरी बद्दल अभिनंदन केले जात आहे. ठाणे आयुक्तालय मधील पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांचे व ठाणे आयुक्तालय यांचे या जागतिक पातळीवरील कामगिरी बद्दल पोलिस दल व नगारिक मधुन विशेष कौतुक होत आहे.

भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण

पुणे : भाजपचे आणि विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांचे चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे.त्यांचे चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.सतीश सातबा वाघ (वय ५८, रा. फुरसुंगी फाटा , आकाश लाॅन शेजारी,मांजरी फार्म ) असे टिळेकर यांच्या मामाचे नाव आहे. त्यांचे अपहरण झाल्याप्रकरणी वाघ यांच्या मुलाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रत्यक्षदर्शी निलेश बाळासाहेब सोडणर (वय ४७ )यांनी स्वतः हि घटना पाहिली .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार योगेश टिळक यांचे मामा सतीश वाघ हे सकाळी सोलापूर रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल ब्लू बेरीसमोर थांबले होते. तिथे अचानक एक क्रीम कलरची शेवरलेट एन्जोय ही चारचाकी गाडी येऊन थांबली. त्या गाडीतून उतरलेल्या दोघांनी सतीश वाघ यांनी जबरदस्तीने गाडीत बसवले. सतीश वाघ यांचे चौघांनी अपहरण केले आहे. असे त्यांच्या मुलाने दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांना सोलापूरच्या दिशेने नेल्याची माहिती सतीश वाघ यांच्या मुलाने दिली. या प्रकरणाचा तपास हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे हे तपास करत आहेत.

सतीश वाघ हे आज सकाळच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील एका हॉटेलजवळ थांबले होते. यावेळी एक चारचाकी गाडी त्यांच्याजवळ आली. त्यातून दोघे जण खाली उतरले. दोघांनी सतीश वाघ यांच्याकडे कशाबद्दत तरी विचारपूस करण्याचे नाटक केले. बोलत असतानाच अपहरणकर्त्यांनी सतीश वाघ यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यानंतर ते निघून गेले. दरम्यान, सतीश वाघ यांचे अपहरण का करण्यात आले? यामागे वैयक्तिक किंवा राजकीय वैमनस्यातून हे कृत्य करण्यात आले का? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

बराच वेळ झाला, तरी सतीश वाघ घरी न आल्यामुळे त्यांच्या मुलाने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतरही ते सापडत नसल्याने त्यांच्या मुलाने हडपसर पोलिस ठाणे गाठत पोलिसांत तक्रार दिली. यानंतर हडपसर पोलिसांनी सतिश वाघ यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान, सोलापूर रोडवरील हॉटेल ब्ल्यू बेरी हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता काही अज्ञात सतीश वाघ यांचे गाडीतून अपहरण करत असल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.

शांतता…पुणेकर वाचत आहे’…नवा उपक्रम

पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्साहात होणार; महाविद्यालयांसोबत वाचनालये, सामाजिक संस्था, संघटना सहभागी होणार

पुणे विमानतळ, मेट्रो, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रिक्षा थांब्यांवर नागरिक उपक्रमात सहभाग नोंदविणार

पुणे, ०८ डिसेंबर : पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येत्या ११ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या वेळेत पुणे शहरातील विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या शांतता …पुणेकर वाचत आहे या उपक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाविद्यालये, सामाजिक संस्था, संघटना, ग्रंथालये, वाचनालये अशा समाजातील विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. यातच आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक असणाऱ्या पुणे मेट्रो, पुणे विमानतळ, रेल्वेस्थानक, रिक्षा थांबे आणि पीएमपीएमएल थांब्यांवरही हा उपक्रम उत्साहात होणार असून, अनेकजण आपल्या आवडीचे किंवा तेथे उपलब्ध असणारे पुस्तक वाचणार आहे. त्यामुळे या उपक्रमात आपणही सहभागी होऊन, त्याचे छायाचित्र पाठवायचे आहे.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणावर रंगणार आहे. हा महोत्सव पुणेकरांचा असल्याने, तो घराघरात पोहोचावा यासाठी विविध जाहीर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा उपक्रम ‘ शांतता… पुणेकर वाचत आहे ‘ बुधवारी ११ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या वेळेत पुणे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी होणार आहे.या उपक्रमात शहरातील प्रत्येकाने या ठरलेल्या वेळेत, आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेले पुस्तक वाचायचे असून, वाचनासाठी प्रेरणा इतरांनाही द्यायची आहे.या उपक्रमासाठी अनेक पुणेकर आणि संघटना सरसावल्या असून, दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. या उपक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालये, खासगी विद्यापीठे, संशोधन संस्था, सार्वजनिक वाचनालये, ग्रंथालयांमध्ये उत्साहात साजरा होणार आहे. अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांनी चौकांमध्ये सामूहिक वाचन करण्याचे उठवले आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली आहे.

पुणे शहरात विमानतळ, मेट्रो स्टेशन, एसटी बसस्थानक, रेल्वेस्थानक, पीएमपीएमएल, रिक्षा अशा महत्त्वाच्या वाहतुकीच्या साधनांद्वारे दररोज लाखो नागरिक ये – जा करतात. त्यामुळे या ठिकाणी उपक्रम राबविण्यात येण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नागरिक उपक्रमात सहभागी होऊन, त्यांना वाचनाचे महत्त्व कळणार आहे आणि त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे. वाचन संस्कृतीला बळकट करण्यासाठी पुण्यातील सरकारी आणि खासगी कार्यालये, आस्थापने यांनी उस्फुर्तपणे आपला उपक्रम नोंदवावा, असे आवाहन पांडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
पुणेकर म्हणून काय करता येईल...

  • या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी, वाचन करतानाचे आपले छायाचित्र आम्हाला https://pbf24.in/register लिंक वर किंवा क्यूआर कोडवर पाठवावे.
  • फेसबुक, एक्स, लींकडीन, इंस्टाग्राम अशा समाजमाध्यमावर #पुणेपुस्तकमहोत्सव #PuneBookFestival2024 या हॅशटॅगसह शेअर करावा
  • शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, कार्यालये, कंपन्या आणि विविध संस्थांनी मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबवावा.
  • पुणे शहरातील ग्रंथालये, वाचनालयात या उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडून सहकार्य करावे.