पुणे, १० डिसेंबर: ‘पुणे पुस्तक महोत्सवा’च्या बोधचिन्हाच्या स्वरुपात साकारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी पाच वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक-वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले, माजी आयपीएस अधिकारी अशोक धिवरे, महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, दिल्ली येथे नियोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संयोजक संजय नहार, माजी खासदार प्रदीप रावत, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे डॉ. सुधाकर जाधवर आदी मान्यवरांच्या हस्ते या प्रवेशद्वाराचे उद्घाटन झाले. पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या शनिवार वाड्याचे प्रवेशद्वार आणि पुण्याच्या वाचनसंस्कृतीची ओळख दर्शविणारे पुस्तकरुपी बुरुज अशा संकल्पनेतील महोत्सवाचे बोधचिन्ह महोत्सवाच्या भव्य-दिव्य प्रवेशद्वाराच्या स्वरुपात साकारण्यात आले असून, महोत्सवाला भेट देणाऱ्या वाचकांसाठी ते खास आकर्षण ठरणार आहे. ६६ फूट रुंदी आणि ३३ फूट उंची असलेले हे प्रवेशद्वार फॅब्रिकेशन, प्लायबोर्ड, रबरशीट आदी साहित्य वापरून तयार करण्यात आले आहे.
असली 5 उंदरं पवार साहेब रोज नाश्त्याला खातात:पडळकर-खोतांच्या टीकेला जानकरांचे प्रत्युत्तर, सातपुतेंवरही साधला निशाणा
100 सातपुते मोहिते पाटलांचे बुट पुसायला असतात
मुंबई-शंभर शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले, अशी जहरी टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली होती. या टीकेला शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. बारक्या उंदरांच्या सुळसुळाटाने काही फरक पडत नाही. असली बारकी- चिरकी 5 उंदरं पवार साहेब रोज नाश्त्याला खातात, अशा शब्दांत शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या गावाने मॉक पोलिंगचा निर्णय घेतला होता. रविवारी शरद पवार यांनी या गावात भेट दिली होती. त्यावेळी घेतलेल्या सभेत ग्रामस्थांनी मॉक पोलिंगच्या घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले होते. त्यानंतर आज महायुतीच्या नेत्यांनी या गावात सभा घेत विरोधकांवर निशाणा साधला. त्यामुळे सध्या मारकडवाडी हे गाव राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे.
बारक्या उंदरांच्या सुळसुळाटाने काय फरक पडत नाही. असली बारकी- चिरकी 5 उंदरं पवार साहेब रोज नाश्त्याला खातात, अशी टीका उत्तमराव जानकर यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर केली. त्यांच्या मागे कोण सगळ्यांना माहिती आहे. अशी बारीक उंदरं मारकडवाडीत जाऊन पवारसाहेबांवर टीका करतात. पण कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत, असेही जानकर म्हणाले. पवार साहेब हे पवार साहेब आहेत. त्यांनी भल्याभल्यांना लोळवले आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक होत नाही तोपर्यंत मारकडवाडीमधील आंदोलन सुरूच राहील, असे म्हणत उत्तमराव जानकर यांनी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
पुढे बोलताना उत्तमराव जानकर यांनी राम सातपुते यांच्यावरही हल्लाबोल केला. 2029 ला भाजपचाच गुलाल उधळणार, असा विश्वास राम सातपुते यांनी मारकडवाडीत बोलताना व्यक्त केला होता. राम सातपुतेंनी माझ्यासोबत यावे. गुलाल उधळायला 2029 कशाला? मी एका महिन्याची संधी देतो. 2029 फार लांब, असे आव्हान जानकर यांनी राम सातपुते यांना दिले. त्याने काय बरळावे, तो त्याचा स्तर आहे. तो वैफल्यग्रस्त आहे. तो मेंटल हॉस्पिटलमध्ये होता. असे 100 राम सातपुते मोहिते पाटलांचे बुट पुसायला असतात, असे म्हणत जानकरांनी राम सातपुतेंवर जोरदार हल्लाबोल केला.
पौर्णिमेच्या रात्री सिंहगडावर रंगणार…
भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा

पुणे -महाराष्ट्र पर्यटन विभाग व सिम्पल स्टेप्स फिटनेस संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड किल्ल्यावर भारतातली पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा 13 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत स्पर्धकांना माउंट एव्हरेस्टची उंची 8848 मीटर सिंहगड चढून सर करायची आहे. त्यामुळे स्पर्धकांना लागोपाठ 16 वेळा सिंहगड सर करावा लागेल. पूर्ण एव्हरेस्टिंग (सोळा वेळा) व अर्ध एव्हरेस्टिंग (आठ वेळा) अशा दोन विभागात यात स्पर्धक सहभागी होऊ शकतात. स्पर्धक स्वतंत्र रीतीने अथवा टीम करून देखील सहभागी होऊ शकतात. नवोदितांसाठी यामध्ये फन रन / वॉक हा पर्याय देखील उपलब्ध आहे. या पर्यायात स्पर्धक पौर्णिमेच्या रात्री म्हणजे 14 डिसेंबरला एकदा सिंहगड सर करतील.
सर्व स्पर्धक घाट रस्त्याने सिंहगड सर करणार आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या कालावधीत सिंहगड घाट रस्ता वाहतुकीसाठी (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता) पूर्णपणे बंद असेल. महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेरचे अनेक स्पर्धक यामध्ये सहभागी होत आहेत. सिम्पल स्टेप्सच्या वतीने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वांना टी-शर्ट व गुडी बॅग देण्यात येईल. तसेच स्पर्धेच्या ठिकाणी सर्व सहभागींना रूट सपोर्ट, स्पर्धा कालावधीत जेवण व वैद्यकीय सेवा याचीही सोय केली जाईल. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व यशस्वी स्पर्धकांना मेडल देण्यात येईल. पतंजली आत्मबोध वेलनेस सेंटर हा स्पर्धेचा बेस कॅम्प व स्टार्ट पॉइंट असणार आहे. यानिमित्त या केंद्रातर्फे आरोग्य विषयक कार्यशाळा स्पर्धकांसाठी घेतल्या जातील.
या स्पर्धेची माहिती देण्याकरिता 10 डिसेंबर 2024 रोजी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्रीमती शमा पवार, उपसंचालक महाराष्ट्र पर्यटन पुणे विभाग, वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. दीपक पवार, सिंपल स्टेप्स चे संस्थापक श्री. आशिष कासोदेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर ऍडव्होकेट श्री. प्रकाश केदारी सिंहगड परिवार, श्री. दिग्विजय जेधे अध्यक्ष वेस्टन घाट रनिंग फाउंडेशन हे मान्यवर देखील आवर्जुन उपस्थित होते.

‘बेबी जॉन’ सिनेमाचा ट्रेलर मोठ्या थाटामाटात लॉन्च केला
‘बेबी जॉन’ या आगामी हिंदी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली होती आणि सिनेमाची चर्चा तर जोरदार रंगली. नुकतंच वरुण धवन, वामिका गब्बी, प्रेझेंटर अटली आणि निर्माता मुराद खेतानी आणि प्रिया अटली यांनी पुण्यात चाहत्यांच्या उपस्थितीत या कौटुंबिक मनोरंजन करणा-या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला.
कालीस यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘बेबी जॉन’ या सिनेमाच्या टीझकमध्ये बेबी जॉनच्या जगाची झलक दाखवतो, जो ऍक्शन, मनोरंजन, क़ॉमेडी आणि डान्सच्या जबरदस्त ट्रॅकचा दमदार कॉम्बिनेशन आहे. प्रसिद्ध संगीतकार एस. थमन यांनी दिलेले संगीत आणि पार्श्वसंगीत (बीजीएम) ट्रेलरला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता आणखी वाढलेली दिसून आली.
वरुण धवनच्या दमदार एन्ट्रीने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले, तर आधीच लोकप्रिय ठरलेल्या “नैन मटक्का” गाण्यावर वामिका गब्बीसोबत त्याने केलेल्या भन्नाट डान्स मूव्ह्जनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. ट्रेलर लॉन्चचं एकंदरीत वातावरण खूपच उत्साहवर्धक होतं. फॅन्सनी “गुड वाइब्स ओनली”च्या घोषणा देत माहोल अजूनच खास बनवला होता.
या सिनेमाविषयी व्यक्त होताना वरुण धवन म्हणाला की, “’बेबी जॉन’चा मी एक भाग होता आला मला खूप आनंद आहे. हा सिनेमा खूपच भावनिक आहे आणि स्टोरीलाईन बद्दल म्हणायचं तर हा सिनेमाच खूप पॉवरफुल जर्नी आहे. यामधील पात्रं साकारण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. ट्रेलरमध्ये या कथेची तीव्रता आणि झलक पाहायला मिळते. या प्रोजेक्टवर काम करणे खरोखरच खास होते, आणि ही कथा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी मी खूपच उत्साहित आहे.”
सिने 1 स्टुडिओचे निर्माते मुराद खेतानी म्हणाले, “बेबी जॉनच्या माध्यमातून आम्हाला असा एक सिनेमा बनवायचा होता जो ऍक्शन आणि मानवी भावना यांचा सुंदर संगम दाखवेल. बेबी जॉन आमच्या प्रेमाचा आणि मेहनतीचा परिणाम आहे. आज प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे मला खात्री आहे की हा सिनेमा पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय अनुभव असेल. आम्ही हा सिनेमा जगासमोर सादर करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. अद्वितीय टीमसोबत काम करून तयार झालेल्या या सिनेमाचा आम्हाला खूप अभिमान आहे.”
प्रेजेंटर अटली म्हणाले, “बेबी जॉन ही एक खूप महत्त्वाची आणि आजच्या काळाला साजेशी कथा मांडते. हा एक मनोरंजनपूर्ण कौटुंबिक सिनेमा आहे, पण महिलांच्या सुरक्षेसारख्या गंभीर विषयांवरही प्रकाश टाकते, जे आजच्या समाजासाठी मोठ्या चिंतेचा विषय आहे. याशिवाय, हा सिनेमा पालकत्वाच्या परिणामांवर भर देत आहे. चांगल्या आणि वाईट वडिलांमधील फरक दाखवत, चांगले पालकत्व समाजाला कसे सकारात्मक स्वरूप देऊ शकते, हे अधोरेखित करते. या अर्थपूर्ण प्रोजेक्टचा भाग होऊन मला खूप अभिमान वाटतो.”
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मीडिया आणि कंटेंट बिझनेसच्या अध्यक्ष ज्योती देशपांडे म्हणाल्या, “‘बेबी जॉन हा एक उत्कृष्ट मसाला, मनोरंजनाने भरलेला सिनेमा आहे, ज्यामध्ये थरारक ऍक्शन, हृदयाला स्पर्श करणारा ड्रामा, मजेशीर क्षण आणि रोमान्सचा समावेश आहे. हे सर्व मिळून हा सिनेमा कुटुंबासोबत या सुट्ट्यांच्या हंगामात पाहण्यासाठी उत्तम निवड नक्कीच ठरते. ऍक्शन आणि भावना यांच्यात सुंदर संतुलन साधण्यात एटली आणि कालीस यांचं कौशल्य, वरुणची अप्रतिम ऊर्जा आणि थमनचे जबरदस्त संगीत यांचा उल्लेखनीय सहभाग आहे. जिओ स्टुडिओसाठी 2024 हे एक अविस्मरणीय वर्ष ठरले आहे, आणि आम्ही या वर्षाचा शेवट ‘बेबी जॉन’सारख्या खास सिनेमाने करण्यासाठी उत्सुक आहोत. प्रेक्षकांसाठी हा आणखी एक अद्वितीय आणि आनंददायक सिनेमा अनुभव असेल.'”
‘बेबी जॉन’ हा सिनेमा वरुण धवन, राष्ट्रीय पुरस्कार विजेती कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव यांच्या प्रमुख भूमिकांमुळे चर्चेत आहे. मुराद खेतानी, प्रिया अटली आणि ज्योती देशपांडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. अटली आणि सिने1 स्टुडिओज यांच्या सहकार्याने जिओ स्टुडिओजने प्रस्तुत केलेला हा सिनेमा एक भव्य सिनेमॅटिक अनुभव देणारा ठरणार आहे, जो न चुकता, सिनेमागृहात अनुभवायालाच हवा. ए फॉर ऍपल स्टुडिओज आणि सिने1 स्टुडिओज यांनी तयार केलेला, कालीस यांनी दिग्दर्शित केलेला ‘बेबी जॉन’ 25 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
मुंबईत बसचालकाने 30-40 वाहनांना चिरडले:7 ठार, 49 जखमी
मुंबई-कुर्ल्यातील लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावरील आंबेडकरनगर भागात ‘बेस्ट’ शहर वाहतूक सेवेच्या बसने 30 ते 40 वाहनांना ठोकरले. यात 7 जणांचा मृत्यू झाला तर 49 जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. जखमींना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस इलेक्ट्रिक वाहन होते. कुर्ला स्टेशनहून येणाऱ्या या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. अर्पण हाॅस्पिटलजवळ त्याचे नियंत्रण सुटले व सुमारे 500 मीटरपर्यंत त्याने रस्त्यावरील 30 ते 40 वाहनांना ठोकरले. यात पाच ते सहा ऑटो रिक्षांचा चक्काचूर झाला.
या आपघातातील आरोपीला 21 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. हा अपघात आहे की, कट याचा तपास बाकी असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. त्या आधारावर न्यायालयाने आरोपी 21 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.आरोपी चालक संजय मोरे सोमवारी पहिल्यांदाच ही बस चालवत होता, अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वी तो मिनी बस चालवत होता अशी माहिती आहे. 1 डिसेंबर रोजीच ते बेस्टमध्ये कंत्राटी चालक म्हणून रुजू झाला होता. त्याने ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचे समजते आहे. त्यामुळेच हा अपघात झाला.
शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे म्हणाले की, कुर्ला स्थानकातून निघालेल्या बसचे ब्रेक निकामी झाले आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. चालक घाबरला आणि ब्रेक दाबण्याऐवजी त्याने एक्सलेटर दाबला, त्यामुळे बसचा वेग वाढला.अचानक अनियंत्रित झाल्याने क्षणार्धात काय झाले हे चालकालाही कळले नाही. एका कोपऱ्यात जाऊन बस धडकल्यानंतर जमावाने त्याला खाली ओढले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून चालकाला ताब्यात घेतले. तो खरेच दारू प्यालेला होता का, याची खात्री करण्यासाठी वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन जवान मदतीला धावून आले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, या मार्गावर नेहमीप्रमाणे वर्दळ असताना अचानक अनियंत्रित झालेली बस बाजारपेठेत घुसली. दिसेल त्या वाहनाला तिने चिरडले. त्यामुळे सर्वजण भयभीत झाले. सुमारे 500 मीटरपर्यंत ही बस गाड्या चिरडत होती, नंतर एका कोपऱ्यात जाऊन धडकली. परिसरातील लोकांनी तातडीने जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र बचावकार्यासाठी एक तासाने रुग्णवाहिका आली. तोपर्यंत नागरिकांनी आपापल्या वाहनांनी जखमींना रुग्णालयात नेले होते. या तातडीच्या मदतीमुळे अनेकांचे जीव वाचल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.
सेवानिवृत्त पोलीसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईची मागणी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
नागपूर : नागपूर गिट्टीखदान परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. नागपूर शहर पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची सत्यस्थिती विधानपरिषद उपसभापती कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नागपूर पोलिसांकडून जाणून घेतली.
या प्रकरणाचा गिट्टीखदान पोलीस स्थानकात ६ डिसेंबर २०२४ रोजी FIR क्र. ९६०/२०२४ नोंद झाला आहे. हे प्रकरण गंभीर आहे. याबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तत्काळ दखल घेतली असून निवेदनाद्वारे विशेष सूचनाही दिलेल्या आहेत.
आरोपी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाची जामीन मंजूर होणार नाही याबाबत पोलीसांनी न्यायालयात प्रभावी युक्तीवाद करावा. या गुन्ह्याबाबत इतर पुरावे त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज तपासणी पोलीसांनी करावी. तसेच, पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात यावी. पोलीस अहवालामध्ये पिडीतेचा जाब विचारून तज्ञ समुपदेशकडून सहकार्य मिळवून द्यावे. मनोधैर्य योजेनेअंतर्गत आवश्यक असे सहकार्य करावे.
भारतीय न्याय संहिता अंतर्गत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याकरीता न्यायालयास विनंती करावी. बालहक्क संरक्षण अधिनियम अंतर्गत अत्याचार झालेल्या पीडितेचे नाव समाजमाध्यमात येवू नये याची काळजी घ्यावी. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस उपआयुक्त दर्जाचा अधिकारी नेमावा. आरोपीविरूद्ध वस्तीतील इतर मुलींच्या काही तक्रारी असल्यास त्याचा शोध घ्यावा. अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नागपूर पोलीस आयुक्त यांना दिल्या आहेत.
सतीश वाघ अपहरण आणि हत्येप्रकरणात सुमारे १० आरोपी- दोघांना पकडले..
पुणे- (Satish Wagh Murder Case Update)भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून करण्याच्या प्रकरणात एकूण सुमारे १० आरोपींचा समावेश असल्याचे पोलीस सूत्राकडून सजते आहे दरम्यान यापैकी दोघांना पोलिसांनी वाघोली येथे पकडले असून एकाचे नाव पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे असल्याची माहिती पुढे येते आहे.
पोलिसांनी सांगितले कि “काल सकाळी जेव्हा सतीश वाघ यांचं अपहरण झालं होतं. त्याची आम्हाला माहिती मिळाली.आम्ही सगळीकडे तपास केला. त्यांचा मृतदेह संध्याकाळी सापडला आहे. त्यांचा मृत्यू हा सकाळी झाला असावा जिथे त्यांचा मृतदेह सापडला त्या घटनास्थळावर एक लाकडी दांडा दिसत आहे.संध्याकाळी ५ ते ६ वाजता काही मुलं फिरण्यासाठी आले होते. त्यांना सतीश वाघ यांचा मृतदेह दिसला. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर लगेच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांच्या शरिरावर अजून कोणत्या जखमी आढळून आल्या नाही.या घटनेचा कसून तपास सुरू आहे. काही लोकांना तपासासाठी आम्ही ताब्यात सुद्धा घेतलं आहे. या संपूर्ण घटनेच्या तपासासाठी एकूण 16 टीम्स तयार करण्यात आले आहेत. सहा क्राइम ब्रांचच्या टीम सुद्धा यात सहभागी आहेत. CP स्वतः या संपूर्ण घटनेकडे बारीक केली लक्ष ठेवून आहेत. काही सीसीटीव्ही फुटेज देखील आम्हाला मिळाले आहेत. संपूर्ण घटनेचे गांभीर्य ओळखत काही गोपनीयता पाळणं गरजेचं आहे. लवकरच आम्ही आरोपी पर्यंत पोहोचू आणि त्यांना अटक करू, अशा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.मृतदेह उरुळी कांचन मधील शिंदवणे घाटात सापडला. पुणे शहर पोलिसांची फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉडने घटनास्थळी काम पूर्ण केले आहे.
सतीश वाघ यांची लोणी काळभोर परिसरातील माळीमळा येथे वडिलोपार्जित शेती आहे. ती शेती सतीश वाघ करतात.या शेतातील एक एकराबाबत दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे. त्याची सुनावणी सुरू आहे, दाखल फिर्यादीत नमूद केल्यानुसार सतीश वाघ यांनी दहा वर्षांपूर्वी एका व्यक्तीला तीस ते पस्तीस लाख रुपये जमिनीच्या व्यवहारासाठी दिले होते व पैसे परत मिळत नसल्याने वडील (सतीश वाघ) हे वारंवार कॉल करत असल्याचे ओंकार वाघ यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. किंवा या व्यतिरिक्त अन्य कोणतं वैयक्तिक कारण आहे का याचा पोलिस तपास करत आहेत. पुण्यातील या घटनेने पुन्हा खळबळ उडाली आहे.
पहाटे 6.00 वाजता सतीश वाघ यांचं अपहरण
ओळखीच्या प्रत्यक्षदर्शीने घटनेची 7 च्या सुमारास माहिती कुटुंबाला दिली.नातेवाईक,स्थानिक यांना सगळ्यांना माहिती कळविण्यात आली.पोलिसांना 7.30 वाजता घटनेची माहिती हडपसर पोलिसांना कळविण्यात आली.
हडपसर पोलिसांनी तात्काळ प्रत्यक्षदर्शीच्या माहितीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला साधारण 8.30 वाजता
गुन्हे शाखेला 9 वाजता टीम रवाना करण्याचे आदेश.
9.30 वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या 12 टीम्स ने प्रत्यक्षात शोधाशोध सुरू केली.
12 वाजता सीसीटीव्ही आणि टॉवर लोकेशनच्या मदतीने तपास सुरू
3 वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्त स्वतः हडपसर पोलीस ठाण्यात दाखल
शोध सुरू असताना संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास उरूळीकांचनच्या घाटात बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली.
हडपसर पोलीस,गुन्हे शाखेचे पोलीस मृतदेह सापडलेल्या ठिकाणी पोहोचले.
रात्री 8 वाजेच्या सुमारास आयकार आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी रवाना.
शंभर शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले:गोपीचंद पडळकर यांची पवारांवर एकेरी टीका
मारकडवाडी-राज्यातील मारकडवाडी गावातून महाविकास आघाडी फेक नरेटीव्ह पसरवत असल्याचा आरोप महायुतीच्या वतीने करण्यात आला आहे. या विरोधात आता महायुती देखील मैदानात उतरली आहे. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये मारकडवाडी गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत महाविकास आघाडीच्या वतीने फेक नरेटीव्ह पसरवण्यात येत असल्याचा आरोप भाजपेने केला आहे.
शंभर शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. यावेळी पडळकर यांनी शरद पवार यांचा उल्लेख एकेरी भाषेत केला. शरद पवारांनी मुद्दाम मारकडवाडी हे गाव आंदोलनासाठी निवडले असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे. या मतदारसंघांमध्ये शंभर गाव आहेत. मात्र, केवळ धनगर समाज लोकशाही मानत नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठीच शरद पवार यांनी हे गाव निवडले असल्याचे पडळक यांनी म्हटले आहे.महायुतीच्या वतीने आयोजित या सभेला सर्वसामान्य नागरिकांनी येऊ नये, यासाठी मोहिते पाटील यांनी त्यांचे गुंड ठिकठिकाणी उभे केले असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे. निवडणुकीत देखील मोहिते पाटील यांनी गुंडगिरीचा वापर केला असल्याचा आरोप राम सातपुते यांनी केला आहे. मात्र, येथे मारकडवाडी गावातील नागरिक उपस्थित आहेत. ते काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभे राहतात. रनजीतसिंह मोहिते पाटील यांच्याकडून गावागावात पैसे वाटण्यात आल्याचा आरोप देखील सातपुते यांनी केला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्याला त्यांच्या गुंडांनी धमक्या दिला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गुंडांच्या विरोधात लढणाऱ्या सोनाली शिरतोडे या भाजपच्या कार्यकर्ता असलेल्या महिलेचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मारकडवाडी गावाने येथील ग्रामस्थांनी एक इतिहास रचला आहे. त्यामुळे देशभरात मारकडवाडी गावाचे नाव झाले असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. त्यामुळे मारकडवाडी गावाला दंडवत करण्यासाठीच आपण येथे आलो असल्याचे खोत यांनी म्हणाले आहे. या वेळी इंद्रजीत भालेराव यांची कविता देखील त्यांनी म्हणून दाखवली. मारकडवाडी गाव भाग्यवान असल्याचे खोत यांनी म्हटले आहे.
राहुल गांधीचा शपथविधी आणि लग्नही येथेच करा
भारतातला सगळ्यात मोठा चोर राहुल बाबा देखील तुमच्या गावात येणार आहे. मात्र ते येण्याआधची बोर्ड लावून ठेवा, त्यात ‘कसा गावाकडे आला रे माझ्या दोस्ता’ असा प्रश्न त्यांना विचारा. राहुल बाबा हे अमेरिका, जपान, रशियाला जातात. मात्र त्यांना या इंडियामध्ये देखील भारत नावाचा देश आहे आणि येथे साधी माणसे दगड- मातेची घरात राहतात, हे त्यांना माहितीच नसल्याचे खोत यांनी म्हटले आहे. ‘मेरी शादी कब होगी, मै प्रधानमंत्री बनूंगा तब होगी’ असे त्यांचे स्वप्न आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा पंतप्रधान पदाचा शपथविधी आणि त्यांचे लग्न देखील मारकडवाडी गावातच लावा, असा टोला देखील खोत त्यांनी लगावला.
आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई-भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी प्रसाद लाड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्याची मागणी प्रसाद लाड यांनी पोलिसांकडे केली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने बोलताना आठवले आणि गडकरी यांच्याशी संबधीत ठिकाणांचा उल्लेख केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, मनिष निकोसे नामक व्यक्तीने यापूर्वीही प्रसाद लाड यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी होती. त्यावेळी प्रसाद लाड यांनी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली होती. परंतु, तक्रार दाखल केल्यानंतरही मनिष निकोसे याने आज पुन्हा प्रसाद लाड यांना फोन करून सुरुवातीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर 2 हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेन, अशा शब्दांत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
तसेच ज्याने प्रसाद लाड यांना धमकी दिली तो आरोपी कधी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे तर कधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचा दावा करतो. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असून सदर व्यक्तीची कसून चौकशी करावी, त्याच्यावर धमकीचा गुन्हा दाखल करावा आणि त्याला अटक करावी अशी विनंती आमदार प्रसाद लाड यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये केली आहे. सदरील घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
धमक्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिले होते पत्र
दरम्यान, वर्षभरापूर्वी देखील अज्ञात इसमाकडून प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवले होते. आपल्या जीवाला धोका असून वारंवार धमकी दिली जात असल्याचे त्या पत्रात म्हटले होते. तसेच एका अनोळखी व्यक्तीकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा देखील प्रसाद लाड यांनी आपल्या पत्रात केला होता. कामगारांसाठी काम करत असताना आपल्याला अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी त्यावेळी म्हटले होते. त्यानंतर आज पुन्हा त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
निलंबन केले असल्यास ते तातडीने मागे घ्यावे ! काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे आबा बागुल यांची मागणी
पुणे – एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिला असलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर होत असल्याने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनाच उभारी मिळाली शिवाय काँग्रेस विचारधारेच्या मतदारांची ‘व्होट बँक’ही राखता आली. त्यामुळे कोणतेही पत्र न देता आणि म्हणणे ऐकून न घेता पक्षातून निलंबन केले असल्यास ते तातडीने मागे घ्यावे आणि काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असल्याचे पत्र द्यावे अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
यासंदर्भात आबा बागुल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रशासन व संघटक उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्यासह निरीक्षक रमेश चेन्निथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्व नेत्यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे कि,
पर्वती मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे गेली पंधरा वर्षे आहे मात्र त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार सलग तीन वेळा मोठ्या मताधिक्याचे फरकाने पराभूत झालेले आहेत. यंदाच्या निवडणुकीतही पुन्हा त्याच पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने पराभूत झालेले आहे.
ही सर्व परिस्थिती पक्ष श्रेष्ठींकडे अनेक वेळा मी व इतरही पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेली होती व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आता हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे घेण्यासंबंधी प्रयत्न केल्याचेही कळविले होते. पण नेहमीप्रमाणे २१२ पर्वती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे (शरद पवार गट) यांच्याकडे जागावाटपात राहीला. परिणामी गेली अनेक वर्षे पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असूनही माझ्या उमेदवारी बाबत विचार केलाच गेला नाही.गेल्या तीस वर्षांपासून या मतदारसंघात वॉर्ड असो किंवा प्रभाग सलग निवडून येणारा काँग्रेस पक्षाचा एकमेव नगरसेवक आहे. शिवाय वार्डामध्ये नाविन्यपूर्ण विकासकामे तर केली तसेच पुण्यातील अनेक भागांमध्ये चांगली विधायक कामे केलेली आहेत.त्याबद्दल पक्षांमधील सर्व ज्येष्ठ व सक्रिय नेत्यांनी तसेच महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमधील नेत्यांनी माझी वेळोवेळी जाहीर प्रशंसा केलेली आहे. त्यामुळे यंदा पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी मिळणे अत्यंत आवश्यक होते. परंतु दुर्दैवाने तसे काही झाले नाही व सलग चौथ्या वेळी म्हणजेच वीस वर्ष मला आमदारकीची उमेदवारीपासून डावलण्यात आले आहे. परिणामी गेली वीस वर्षे या मतदारसंघात काँग्रेस पक्ष कमी होत आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या मतदारसंघात काँग्रेस पक्ष नावालाही राहणार नाही. या कारणामुळे केवळ नाईलाजाने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कायमस्वरूपी पक्षासमवेत राहावेत व काँग्रेसचे मतदार जपले जावेत या हेतूने मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला होता.याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले आहे.
शिस्तभंग नाहीच…
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेमध्ये व कायदा यामधील तरतुदींचा कोणताही विचार न होता मला नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार माझे खरे व योग्य म्हणणे ऐकून न घेता तसेच कोणतेही लेखी अथवा तोंडी खुलासा करण्याची संधी न देता तसेच मला पक्षातर्फे अधिकृतरित्या कोणतीही निलंबनाची नोटीस आजमितीपर्यंत कोणत्याही मार्गाने व कशाही प्रकारे अद्याप पर्यंत प्राप्त झालेली नसताना निलंबनाची माहिती प्रसार माध्यमांद्वारे समजली आहे व केवळ त्याच कारणाने मी आपणाकडे हा खुलासा माझे सर्व अधिकार अबाधित ठेवून प्राथमिक स्वरूपात केलेला आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध मी निवडणूक लढवली नाही. त्यामुळे मी पक्षाची शिस्तभंग केलेली नाही.तरी या कारणामुळे माझे पक्षाने निलंबन केले असल्यास ते तातडीने मागे घेऊन मला काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असल्याचे पत्र द्यावे असेही आबा बागुल यांनी पत्रात नमूद केले आहे.
पुण्यातील १३ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवात “अत्तर” दरवळणार
द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स प्रस्तुत व रुहानी म्युझिक निर्मित आणि रामकुमार शेडगे दिग्दर्शित असलेल्या अत्तर लघुपटाला जगभरातील व देशभरातील गाजलेल्या लघुपट महोत्सवात आता पर्यंत अनेक नामंकने आणि पुरस्कार मिळाले असून पुण्यातील १३ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवात “अत्तर” लघुपटाची निवड झाली आहे. माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ‘अत्तर’ खूप महत्वाची भूमिका बजावत असते. ‘अत्तर’ जणू माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. याच सुगंधी ‘अत्तराची अस्वस्थ करणारी गोष्ट दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी मांडली आहे.
शनिवारी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ४.०० वा. लॉ, कॉलेज रोड येथील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय येथे अत्तर लघुपट दाखवला जाणार असून या लघुपटातील कलाकार मीरा शेडगे, पुरुषोत्तम बाबर, रेवा बर्गे, विनय सोनवणे, रमेश साठे, सिराज कसबे तसेच निर्माते राजू लुल्ला, दिग्दर्शक रामकुमार शेडगे हे उपस्थित राहणार आहेत. तरी चित्रपट रसिक प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बॅलेटपेपरवर मतदान घेण्याच्या मागणीसाठी लवकरच भारत जोडो यात्रेप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे करु: नाना पटोले.
लोकशाही वाचवण्याच्या लढाईत मारकडवाडीच्या योद्ध्यांच्या पाठीशी काँग्रेस खंबीरपणे उभा.
मारकडवाडीतील गावकऱ्यांवर जबरदस्तीने दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या.
मारकडवाडी, दि. १० डिसेंबर २०२४
भारताच्या शेजारच्या देशातील लोकशाही संपुष्टात येत असताना भारतात लोकशाही व्यवस्थेला ग्रहण लावण्याचे काम सुरु आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो त्या मतदार राजाच्या मतदानाची चोरी केली जात आहे. यामध्ये ईव्हीएम मशिनबद्दल जनतेच्या मनात शंका आहेत म्हणूनच मारकडवाडीच्या लोकांनी आपले मत कोणाले गेले हे पाहण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेऊन देशाला दिशा दाखवली आहे. लोकशाहीत मतांचा अधिकार अबाधित रहावा व बॅलेट पेपरवरच मतदान व्हावे या मागणीसाठी लवकरच भारत जोडो यात्रेप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे केले जाईल व त्याची सुरुवात मारकडवाडीपासून करु, असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्याबरोबर माजी आमदार रामहारी रुपनवर, माजी आमदार व राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार पवार, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, प्रा. यशपाल भिंगे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावकऱ्यांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील आश्चर्यकारक निकाल पाहून निवडणूक प्रक्रियेवरच शंका निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार ५८.३३ टक्के मतदान झाले होते, त्याच रात्री ११.३० वाजेपर्यंत ६५.२% तर दुस-या दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता ६६.०५% मतदान झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले आहे. यात ७६ लाख मतदान कसे वाढले, कोणत्या मतदारसंघात संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मोठ्या रांगा होत्या त्याचे व्हिडिओ चित्रिकरण सादर करा अशी मागणी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केली आहे पण अद्याप त्यांच्याकडून उत्तर मिळालेले नाही.
लोकशाही वाचवण्यासाठी मारकडवाडीच्या योद्ध्यांनी सुरु केलेल्या लढाईत काँग्रेस पक्ष गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आता राज्यातील इतर गावांमधूनही ग्रामसभा ठराव करून बॅलेट पेपरवर मदतदान घेण्याची मागणी करत आहेत. मारकडवाडीतून सुरु झालेला हा लढा आता राज्यभर पसरु लागला आहे. सांगली जिल्ह्यातील कोळेवाडी, रायगड जिल्ह्यातील माणगाव यासह राज्यातील अनेक गावांमध्ये आंदोलने उभी रहात आहेत. ही लढाई आता मारकडवाडीची राहिलेली नसून देशव्यापी आंदोलन बनत आहे. मारकडवाडीच्या लढाईची सर्व माहिती लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिली असून भारत जोडो यात्रेप्रमाणे लवकरच एक मोठी यात्रा काढण्यावर विचार सुरु आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.
मारकडवाडीतील लोकांनी केवळ मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेतला तर सरकार घाबरले व पोलीसांच्या मदतीने हा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. १४४ कलम लावले, अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. गावकऱ्यांवर दाखल केले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही नाना पटोले यांनी दिले आहे.
‘अर्धा वाटा’ सिनेमातून प्रसाद ओक आणि मृण्मयी देशपांडे पहिल्यांदा एकत्र
पुणे : रोजच्या दैनंदिन जीवनात कुठल्या ना कुठल्या संदर्भात थेट दिल्ली पासून गल्ली पर्यंत सहज आणि सर्रासपणे वापरात येणारा शब्द म्हणजे ‘अर्धा वाटा’, आता याच शिर्षकावर लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम मराठी सिनेमा करत आहेत. सिनेमाच्या अनुषंगाने येणारा हा शब्द नेमका कशाबद्दल आहे, राजकारणाबद्दल, शिक्षणाबद्दल, समाजकारणाबद्द्ल की खेळाबद्दल आहे? की भावनेच्या संदर्भात आहे? याबद्दल अद्याप उलगडा झालेला नाही. हर्षद पाटील यांच्या ‘सी व्हेवज’ निर्मितीसंस्थे अंतर्गत राजू मेश्राम लिखित, दिग्दर्शित “अर्धा वाटा” या सिनेमातून मराठी सुपरस्टार प्रसाद ओक आणि मृण्मयी देशपांडे पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. मुंबईत आणि आसपासच्या परिसरात या सिनेमाचे वेगात चित्रीकरण सुरु आहे.
‘पावर’, ‘झरी’, ‘लव्ह बेटिंग’, ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ सारख्या आशयघन चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले लेखक, दिग्दर्शक राजू मेश्राम “अर्धा वाटा” सिनेमाबद्दल सांगतात कि, हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे, या सिनेमातून आम्ही काही वेगळं सांगू पाहतोय, जसे की सिनेमाचे शीर्षक आहे, अर्धा वाटा, हा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नोंद घेणारा शब्द आहे, कुणाच्या सुखात तर कुणाच्या दुखात, कुणाच्या यशात तर कुणाच्या अपयशात कुणाचा तरी अर्धा वाटा असतोच असतो, मात्र या सिनेमात ‘अर्धा वाटा’ नेमका कोणत्या अर्थाने आहे हे जरा आम्ही गुलदस्त्यात ठेवलं आहे. नेमका कुणाचा आणि कशात अर्धा वाटा हे प्रत्यक्ष सिनेमात बघून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
‘धर्मवीर’ सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर मराठी सुपरस्टार प्रसाद ओक, यांना वेगळ्या भूमिकेत बघण्याची संधी या सिनेमातून प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रसाद सिनेमाबद्दल सांगतात कि, सर्वप्रथम लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी जेव्हा मला या सिनेमाची गोष्ट ऐकवली त्याच क्षणी मी सिनेमात काम करण्यास होकार दिला. मला त्यांच्या सिनेमाचा विषय खूप आवडला, सिनेमाचा विषय आम्ही मुद्दाम गुपित ठेवला आहे, भावबंधाचे विश्व उलगडणारा हा सिनेमा एक वेगळा अनुभव देऊन जाईल यात शंका नाही. या सिनेमातली माझी भूमिका कदाचित तुम्हाला चकित करू शकणारी ठरू शकेल, पण हे सर्व प्रेक्षकांनी सिनेमात बघावं अशी माझी इच्छा आहे.
मृण्मयी देशपांडे सांगते कि, एवढ्या वर्षात एकाच क्षेत्रात असूनही मी आणि प्रसाद एकत्र पडद्यावर काम केलेले नाही, त्यामुळे मी खूप खुश आहे कि, आम्ही दोघे एकत्र काम करतोय. माझ्यासाठी सुरवातीला ही थोडी आव्हानात्मक वाटत होती, पण सीनेमाची संपूर्ण कथा ऐकल्यावर माझा आत्मविश्वास वाढला, आजवर प्रेक्षकांनी मला अशा रुपात बघितले नाहीये. अशाप्रकारच्या आशयाचे सिनेमे मराठीत अवश्य यायला हवे, आणि आपण त्याचा अर्धा वाटा घेऊया या हेतूने मी ‘अर्धा वाटा’ सिनेमात काम करण्यास होकार दिला.
मराठीमध्ये भावनिक, संवेदनशील सिनेमांना प्रेक्षक नेहमीच प्राधान्य देतात, “अर्धा वाटा” सिनेमा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवेल यात शंका नाही.
डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी संविधान प्रेमी गटाच्या उपक्रमांना तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, ९: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी काम केले. परंतु आज महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण, वाढता जातीवाद, धर्मांधता यांमुळे समाजातील विषमता अधिकाधिक वाढत चालली आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे कार्य आपल्यासाठी प्रासंगिक, प्रेरणादायी आणि दिशादर्शक असून बाबासाहेबांचे साहित्य वाचण्याचा व ते समाजापर्यंत पोहचवण्याचा संकल्प करूयात असं एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने स्पष्ट मत मांडले. याला निमित्त होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील संविधान प्रेमी गटाने आयोजित केलेल्या उपक्रमांचे, ज्याला तरुण-विद्यार्थी-महिला यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरात रविवार दिनांक 8 डिसेंबरला लोकायत हॉलवर संविधान प्रेमी गटातर्फे वाचन शिबिर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियमला भेट अशा कार्यक्रमांचे आयोजन केले होते, असं संविधान प्रेमी गटाच्या समन्वयक कल्याणी दुर्गा रवींद्र यांनी सांगितले. यावेळी बाबासाहेबांनी लिहिलेले साहित्य व अनेक सामाजिक राजकीय विषयांवरची पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. बाबासाहेबांच्या कार्याबद्दल सांगताना महिलांनी सांगितले की, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक,धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या वक्तृत्वाने, लेखनाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या, श्रमिकांच्या, महिलांच्या उन्नतीसाठी अविरतपणे काम केले’.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझिअम, पुणेला भेट या उपक्रमातही विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती लक्षणीय होती. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांचे फ़ोटो प्रदर्शन दाखवत माहिती देण्यात आली. कामगार मंत्री असताना बाबासाहेबानी केलेलं काम, स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना, हिंदूंकोड बिल, चवदार तळे सत्याग्रह, भारतीय संविधान बनवण्यातील सहभाग अशा घटनांवर चर्चा करण्यात आली. तसेच म्युझियममध्ये बाबासाहेबांनी वापरलेली खुर्ची, टेबल, पुस्तके, जेवणाची भांडी ह्या वस्तू पाहून बाबासाहेब हे देखील आपल्यासारखे सामान्य मनुष्य होते व आपणही समाज परिवर्तनासाठी प्रयत्न केले पाहिजे याची जाणीव झाली. यातून आम्हाला समाजासाठी काम करण्याची नवीन ऊर्जा मिळाली, अशा भावनाही उपस्थितांनी व्यक्त केल्या.
भारत फोर्ज लिमिटेडतर्फे क्यूआयपीच्या माध्यमातून १६५० कोटी रुपये निधीची उभारणी
पुणे, १० डिसेंबर २०२४ – भारत फोर्ज लिमिटेडला कळवण्यास आनंद होत आहे, की ९ डिसेंबर २०२४ रोजी क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (क्यूआयपी) क्लोजरमधून कंपनीने यशस्वीपणे १६५० कोटी रुपयांची उभारणी केली आहे. या विक्रीला देशांतर्गत आणि परकीय संस्थात्मक गुंतवणुकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून इश्यूच्या आकाराच्या १० पट मागणी आली.
९० टक्क्यांपेक्षा जास्त विभाजन प्रतिष्ठित देशांतर्गत आणि फॉरिन लाँग ओन्ली फंड्स व विमा कंपन्यात करण्यात आले. क्यूआयपीची विक्री प्रती शेयर १३२० रुपयांनुसार करण्यात आली, तर सेबी आयसीडीआरनुसार फ्लोअर प्राइस प्रती शेयर १३२३.५४ रुपये आहे. क्यूआयपीतून मिळालेला निधी डेट परतफेडीसाठी आणि यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या इनऑरगॅनिक विकास उपक्रमांसाठी वापरला जाणार आहे.
उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अमित कल्याणी म्हणाले, ‘आम्ही सद्य आणि नव्या गुंतवणुकदारांचे त्यांनी भांडवल उभारणीसाठी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. यावरून त्यांचा आमच्या कंपनीत घडून येत असलेल्या स्थित्यंतरावरचा विश्वास दिसून येतो. आम्ही त्यांना चांगला विकास तसेच भागधारकांना चांगले मूल्य मिळवून देण्यासाठी बांधील आहोत.’
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड आणि मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेडने या विक्रीसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम) म्हणून काम केले. खेतान अँड कं. ने भारत फोर्डसाठी कायदेशीर सल्लागाराचे काम केले, तर शार्दूल अमरचंद मंगळदास अँड कं. आणि फ्रेशफील्ड्स ब्रुकहाउस डेरिंजर बीआरएलएमचे कायदेशीर सल्लागार होते.
